सौ शोभा जोशी
इंद्रधनुष्य
☆ “सेवामूर्ती ठक्कर बाप्पा…” ☆ सौ शोभा जोशी ☆
ठक्कर बाप्पा ज्यांनी आपले जीवनदलित आणि जनजातींच्या सेवेत खर्ची घातले त्यांच्याबद्दल स्व. डाॅ. राजेंद्र प्रसाद म्हणाले होते की, “जेव्हा जेव्हा निःस्वार्थ समाजसेवकांची आठवण येईल तेव्हा तेव्हा ठक्कर बाप्पांची मूर्तीच डोळ्यांसमोर उभी राहिल. “
ठक्कर बाप्पांचा जन्म गुजरात मधील भावनगर मध्ये २९ नोव्हेंबर १८६९ मध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव अमृतलाल ठक्कर होते. त्यांचे वडिल विठ्ठलदास लालजी ठक्कर यांची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण होती तरी समाजातील सर्व मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचे विशेष लक्ष होते. आणि वडिलांमधील हीच सेवावृत्ती ठक्कर बाप्पांच्यात आली होती. त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून पुण्यामधून इंजिनिअरींगची पदवी मिळवली होती.
त्यावेळी जातीभेदाचे भयंकर भूत समाजाच्या मानगुटी बसले होते त्यामुळे ठक्कर बाप्पा व्यथित झाले होते.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सोलापूर आणि भावनगर येथे रेल्वेत नोकरी केली पण इतर अधिकार्यांच्या प्रमाणे त्यांनी लाच घेणे नाकारले म्हणून त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले.
त्यानंतर त्यांनी वढवण, पोरबंदर राज्यात काम केले. आफ्रीकेमध्ये तसेच सांगलीमध्ये सुध्दा काही काळ काम केले. मुंबई नगरपालिकेत संपूर्ण शहराचा कचरा गोळा करणार्या रेल्वेत काम केले. त्यावेळी कचरा गोळा करणार्या हरिजन कामगारांना वरिष्ठांना लाच द्यावी लागत होती. त्यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था निर्माण झाली आणि त्यांनी याविरूध्द आवाज उठवला. २३ वर्षं त्यांनी ही नोकरी केली.
त्यांनी लोकांमध्ये स्वाभिमान जागवण्याचे काम केले तसेच खादीचाही प्रचार केला. गुजरात मध्ये झालोद -दा होच या वनवासी क्षेत्रातील भील लोकांसाठी ‘ भील सेवा मंडळा’ची स्थापना करून त्यांना शिक्षण देण्याचे काम सुरू केले ते आजही सुरू आहे.
मध्य प्रदेशात जनजातींचे धर्मांतरण करण्याचे, ख्रिश्र्चनांचे काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्याला आळा घालण्यासाठी त्यावेळचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री रवी शंकर शुक्ल यांना ठक्कर बाप्पांनी सल्ला दिला की, लोकांमध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र विभाग सुरू करावा. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सरकारने ‘ जनजाती कल्याण विभाग ‘ सुरू केला. हे काम व्यवस्थित चालावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बाळासाहेब देशपांडे यांना नागपूरहून बोलावून घेतले. त्यांच्याकडे हे काम सोपवले गेले. बाळासाहेबांनी, जनजातीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षात १०० शाळा सुरू करण्याची योजना आखली. ठक्कर बाप्पांना हे अशक्य वाटत होते. त्यांनी बाळासाहेबांना सांगितले ही योजना सफल झाली तर मी स्वतः या शाळांना भेटी देईन. या शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्यावर त्यांनी वृध्दावस्थेतही या शाळांना भेटी देऊन बाळासाहेबांचे कौतुक केले आणि त्यांना २५०/- रू. बक्षिस दिले. त्या काळात २५०/- रू. ही छोटी रक्कम नव्हती.
वनवासी कल्याण आश्रमाच्या स्थापनेमागे गोळवलकर गुरूंजीप्रमाणेच ठक्कर बाप्पांचीही प्रेरणा होती.
भारतातील एखादाच प्रांत असा असेल जिथे त्यांनी सेवाकार्य केले नाही.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर ते संसदेचे सदस्य झाले. या पदाचा उपयोग सुध्दा त्यांनी दलित आणि जनजातींच्या सेवेसाठीच केला आणि अमृत ठक्कर सर्वांचे ठक्कर बाप्पा झाले.
‘जीवन त्यांना कळले हो।मी पण ज्यांचे पक्वफळापरी सहजपणाने गळले हो।।
जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळाले हो।चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो।। ‘
कवी बा. भ. बोरकरांच्या या ओळी ठक्कर बाप्पांना तंतोतंत लागू पडतात.
२० जानेवारी १९५१ रोजी ठक्कर बाप्पांना देवाज्ञा झाली. जीवनभर सेवाकार्य करणार्या या सेवाव्रतीला त्यांच्या स्मृतीदिनी भावपूर्ण श्रध्दांजली.
© सौ शोभा जोशी.
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






