श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०५ आणि १०६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. १०५ – – – 

विवेके क्रिया आपुली पालटावी ।

अति आदरे शुध क्रिया धरावी ।

जनीं बोलण्यासारिखे चाल बापा ।

मना कल्पना सोडी संसार तापा ।।१०५।।

अर्थ : विवेकाच्या साहाय्याने आपल्या वागणुकीत बदल करावा. चांगले आचरण जाणीवपूर्वक आणि आदरपूर्वक करावे. आपले वागणे आणि बोलणे यात एकवाक्यता असावी. हा संसार जरी दुःखमय असला तरी त्याविषयी उगीचच नको त्या कल्पना करणे सोडून द्यावे.

(विवेक- सारासार विचार, पालटावी – बदल घडवून आणावा, शुध – चांगले/उत्तम आचरण, संसार तापा – संसारातील दुःख)

विवेचन : साधकाने कसे वागावे हे समर्थ मागील श्लोकाप्रमाणे याही श्लोकात सांगत आहेत. आयुष्यात आणि परमार्थ मार्गावर वाटचाल करताना देखील विवेक अतिशय महत्वाचा. विवेकबुद्धी म्हणजे सारासार विचार करण्याची बुद्धी. काय चांगले आहे, काय वाईट आहे हे समजून त्याप्रमाणे वागणे म्हणजे विवेक. दुर्योधन एकदा श्रीकृष्णाला म्हणाला होता की मला चांगले काय आहे हे समजते. मी वागतो ते वाईट आहे हेही मला समजते. पण मला चांगले वागण्याची बुद्धीच होत नाही. इथे दुर्योधनाच्या वागण्यात विवेक बुद्धीचा अभाव आढळतो. चांगले आणि वाईट म्हणजे श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे आपल्या अंतिम हिताची जी गोष्ट आहे त्याची निवड करणे. प्रेयस गोष्ट सुरुवातीला आकर्षक वाटत असली तरी अंतिमतः आपली हानी करणारी असते. नियमित व्यायाम करणे अंतिमतः माझ्या हिताचे आहे. पण आळसामुळे मला झोप प्रिय वाटते. इथे मी श्रेयसची निवड न करता प्रेयस निवडतो. ते अंतिमतः हानिकारक आहे.

वाईट सवयींचे वळण लागण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. पण चांगल्या गोष्टींची सवय जाणीवपूर्वक लावावी लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात की ‘ शुध क्रिया धरावी ‘ म्हणजे जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टींचे आचरण करावे. चांगल्या गोष्टींच्या आचरणासाठी समर्थ जाणीवपूर्वक ‘शुद्ध’ हा सुंदर शब्द वापरतात. खरोखरच जे चांगले आहे ते शुद्ध आणि ज्यामध्ये काही दोष आहे किंवा वाईट आहे ते अशुद्ध! विवेकाच्या साहाय्याने आपल्या वागण्याबोलण्यात योग्य तो बदल घडवावा. तो सुद्धा कसा? तर समर्थ म्हणतात, ‘ अति आदरे. ‘ त्या गोष्टींबद्दल म्हणजेच चांगल्या गोष्टींबद्दल मनात आदर बाळगून आदरपूर्वक त्यांचे आचरण करावे. आपल्या वागण्याने सज्जनांना आनंद होईल अशा प्रकारे वागावे. ‘ सदाचार हा थोर सांडू नये तो ‘ असे समर्थांनी आपल्याला मागील श्लोकात सांगितले आहेच. पण चांगल्या गोष्टी या पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात.

बऱ्याच वेळा आपले बोलणे आणि वागणे यात अंतर पडते. आपण बोलतो काही आणि करतो काही. म्हणजेच आपल्या ‘ कथनी और करनी ‘ यात फरक असतो. एखादी व्यक्ती वारंवार अशा पद्धतीने वागू लागली की समाज अशा लोकांवर विश्वास ठेवत नाही. त्यांच्या शब्दाला काडीचीही किंमत लोक देत नाहीत. म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण जसे बोलतो तसे वागावे. आपले आचार, विचार आणि उच्चार यात एकवाक्यता असावी.

हा संसार दुःखमय आहे हे मान्य. त्यात पूर्णपणे सुखी आहे अशी कोणीच व्यक्ती नाही. पण म्हणून आपल्या भविष्याविषयी उगीच चिंता करीत बसू नये. कोणी भविष्यात आपले कसे होईल याच्या कल्पना करीत बसतात तर कोणी नको त्या कल्पनेच्या मनोराज्यात रमतात. कल्पनेनेच आपण स्वतःला दुःखी करून घेतो किंवा काल्पनिक गोष्टींमध्ये सुख मानत बसतो. संसार दुःखमय आहेच त्यात आणखी भर अशा कल्पना करून कशाला टाकायची? कल्पनाच करायची झाली तर ती चांगल्या गोष्टींची करावी. ज्या गोष्टींची कास आपल्याला धरायची आहे त्याबद्दल कल्पना करायला हरकत नाही. कारण त्यातूनच त्या चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा आपण करू शकू.

स्वसंवाद 

१. दुर्योधनाप्रमाणे मलाही एखादी गोष्ट ‘चुकीची आहे’ हे माहीत असूनही, मी केवळ तात्कालिक सुखासाठी (प्रेयससाठी) विवेकाचा बळी देऊन त्याच मार्गावर चालत राहतो का?

२. चांगल्या सवयी आणि आचरण अंगी बाणवण्यासाठी मी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे जाणीवपूर्वक आणि ‘अति आदराने’ (मनापासून) प्रयत्न करतो, की आळसाला शरण जातो?

३. चार लोकांमध्ये आदर्श विचार मांडताना, प्रत्यक्षात माझ्या कुटुंबात आणि व्यवहारात माझे बोलणे आणि वागणे यात थोडी तरी एकवाक्यता (प्रामाणिकपणा) असते का?

४. संसारातील चालू घडामोडींना सामोरे जाण्याऐवजी, मी भविष्यातील काल्पनिक संकटांचे ‘मनोराज्य’ उभे करून स्वतःचा ‘संसार ताप’ (चिंता) तर विनाकारण वाढवत नाही ना?

—–

श्लोक क्र. १०६ — — 

बरी स्नानसंध्या करी येकनिष्ठा ।

विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ।

दया सर्व भूतीं जया मानवाला ।

सदा प्रेमळु भक्तिभावे निवाला ।।१०६।।

अर्थ : आपले जे स्नानसंध्या आदी नित्यनैमित्तिक कर्म असेल ते निष्ठापूर्वक करावे. भरकटणाऱ्या म्हणजेच स्थानभ्रष्ट झालेल्या मनाला विवेकाच्या साहाय्याने आवर घालावा. सर्व प्राणिमात्रांबद्दल मनात दयाभाव किंवा करुणा असावी. अशी प्रेमळ व्यक्ती भगवंताबद्दल मनात असलेल्या भक्तिभावाने समाधान पावते.

(येकनिष्ठा – संपूर्ण श्रद्धेने, स्थानभ्रष्ट – भरकटणारे, निवाला – तृप्त झाला/समाधान पावला)

विवेचन : साधकाच्या अंगी कोणते गुण असावेत किंवा हे गुण त्याने कसे विकसित करावेत हे समर्थ या श्लोकात आपल्याला सांगताहेत. आपल्याला आपल्या धर्मात किंवा घरात परंपरेने चालत आलेले जे स्नानसंध्यादि कर्म आहे, ते निष्ठापूर्वक म्हणजेच संपूर्ण श्रद्धेने करायला हवे. त्याचप्रमाणे सद्गुरूंनी नामस्मरण आदी गोष्टींचा जो उपदेश आपल्याला दिलेला असेल, त्याचेही नियमितपणे पालन करणे आवश्यक आहे. स्नानाने आपल्या शरीराला स्नान घडते तर संध्या आपल्या मनाला स्नान घालते. अलीकडे या गोष्टींची कर्मकांड म्हणून जी हेटाळणी केली जाते, ती परमार्थ मार्गात बाधक ठरते. या गोष्टी नियमितपणे करण्याचे वळणच मनाला आणि शरीराला लावून घ्यायला हवे. घरात जर थोडे कर्मठ वातावरण असेल तर त्याचा फायदा असे वळण लागण्यासाठी फार उपयोगी पडतो. घरातूनच असे संस्कार मुलांवर होतात.

आज मोबाईल, टीव्ही यांच्यासारखी अनेक मनोरंजनाची साधने सर्वांना उपलब्ध झाली आहेत. समाजमाध्यमे आहेत. यातून बऱ्याचदा चांगले कमी आणि वाईट गोष्टीच जास्त डोळ्यासमोर येतात. ते सगळे पाहून आणि समाजातील लोकांचे नको ते आचरण पाहून आपले मन भरकटण्याचा म्हणजेच समर्थांच्या शब्दात स्थानभ्रष्ट होण्याचा मोठा धोका असतो. आजकाल समाजात वाटेल ते खाणे, वाटेल त्या वेळी खाणे, मन मानेल तसे वागणे याबद्दल लोक विधिनिषेध बाळगताना दिसत नाहीत. तात्पर्य, स्थानभ्रष्टता मोठ्या प्रमाणावर बोकाळली आहे. तिला आवर घालायचा असेल तर विवेक हवा. विवेक म्हणजे योग्यायोग्यतेची जाणीव होऊन योग्य गोष्टी करणे, अयोग्य गोष्टी कितीही आकर्षक वाटल्या तरी त्या करायचे टाळणे. यासाठी मनावर नियंत्रण ठेवण्याची सवय करावी लागते. एखादी गोष्ट वारंवार केली तर तिची सवय लागते. वाईट गोष्टींची सवय लागायला वेळ लागत नाही. चांगल्या गोष्टींची सवय मात्र जाणीवपूर्वक लावावी लागते.

ज्याला साधनामार्गावर वाटचाल करायची आहे अशा व्यक्तीच्या मनात केवळ मनुष्यच नव्हे तर सर्व प्राणिमात्रांबद्दल दया किंवा करुणाभाव हवा. आपल्याप्रमाणेच त्यांच्यातही परमेश्वराचा अंश आहे, याची जाणीव हवी. संत एकनाथांनी तृषार्त गाढवाला दुरून आणलेल्या गंगेच्या कावडीतील पाणी पाजले होते. सर्व प्राणिमात्रांबद्दलचा हा समत्वभाव संतांमध्ये आपल्याला विशेष करून दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, ‘ दया तिचे नाव, सर्व भुतांचे पाळण आणिक निर्दालन कंटकांचे. ‘ हाच ‘ धर्म नीतीचा व्यवहार ‘आहे. सर्वांबद्दल प्रेम असणाऱ्या माणसाच्या मनातच ईश्वराबद्दल भक्तिभाव उत्पन्न होतो. आपल्या आणखी एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, ” मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त. ‘ ज्या चित्तात अशी मृदुता, प्रेमळपणा असेल आणि ईश्वराबद्दल भक्तिभाव असेल, असे चित्त समाधानी असते. तेच समर्थ आपल्याला या श्लोकात सांगतात.

स्वसंवाद 

१. रोजच्या धावपळीत शरीराच्या स्वच्छतेसोबतच, माझे मन शुद्ध आणि शांत ठेवण्यासाठी मी संतांनी सांगितलेल्या ‘संध्या’ किंवा नामस्मरणाचा आश्रय नित्यनेमाने घेतो का?

२. मोबाईल, इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या प्रभावामुळे माझे मन संसाराच्या नको त्या आकर्षणात ‘स्थानभ्रष्ट’ (भरकटत) होत असताना, मी त्याला विवेकाने आवर घालण्याचा प्रयत्न करतो का?

३. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे माझे चित्त लोण्यासारखे ‘मृदू सबाह्य नवनीत’ आहे का? माझ्या मनात घरातील माणसांबद्दल, प्राणिमात्रांबद्दल आणि हाताखालील लोकांबद्दल खरी दया आणि करुणा आहे का?

४. बाह्य जगात आनंद आणि समाधान शोधण्याऐवजी, मी कधी आंतरिक ‘भक्तिभावाने’ मनाची तृप्ती किंवा समाधान अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे का?

– क्रमशः श्लोक १०५ आणि १०६

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted