श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “इन द नेम ऑफ गॉड” – लेखक : श्री रवि सुब्रमण्यन – अनुवाद : श्री शिरीष सहस्त्रबुद्धे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : इन द नेम ऑफ गॉड
– – गुंतागुंतीच्या रहस्याचे गूढ उलगडणारे विशेष पुस्तक
लेखक : रवि सुब्रमण्यन
अनुवाद: शिरीष सहस्त्रबुद्धे
पाने:- ४००
मूल्य:- ७५०₹
रहस्य आणि थरार. तिरुवनंतपुरम. केरळची राजधानी किनारपट्टीवरच्या या शहरात आहे, अतिभव्य, प्राचीन श्री अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर. अन् त्यात म्हणे आहे अपरंपार संपत्ती. मोजता येणार नाही, इतका खजिना. त्याच्या किल्ल्या? त्या आहेत तिरुनाल धर्मराज वर्मा यांच्या हातात. त्रावणकोरच्या पूर्वीच्या राजघराण्याचे वारसदार. नव्वदीच्या वयाचा, पण ताठ पाठकण्याचा हा राजा ना थकलाय, ना वाकलाय, ना कुणासमोर झुकलाय! अर्थात अनंत पद्मनाभ स्वामी सोडून..! त्यांचा मात्र तो दास! म्हणून पद्मनाभदास!
सागरी वादळं नवीन नाहीत केरळला. पण आत्ताचं वादळ घोंगावतंय या मंदिराभोवती, अन् खजिन्याभोवती. वादळाचे जबरदस्त तडाखे. संशयाचे भोवरे. खुद्द राजेसुद्धा सुटू शकत नाहीत या संशयचक्रातून. एकापाठोपाठ एक चार हत्या… त्यातला एक मृतदेह तर तरंगतोय मंदिराच्या आवारातल्या पवित्र तलावात! खजिन्याचं ऑडिट आणि त्यातही गफलती. का पडावा मंदिराच्या खजिनदाराचा बळी?
या सगळ्यांचा छडा लावण्यासाठी उभे ठाकतात दोघेजण, सीबीआयचे सहसंचालक कबीर आणि केरळचे पोलीसप्रमुख कृष्णन. दुबईतला दरोडा, भारतीय प्राचीन मूर्तीची तस्करी आणि मुंबईतले बॉम्बस्फोट यांचे धागेदोरेही येऊन धडकतात मंदिरापर्यंत. सिंगापूर, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया… वाढतच जाते गुंतागुंत. कबीर खानचा संशय चक्क धर्मराज वर्मांवर. पण कृष्णनची खात्री की महाराज निर्दोष. मग दोषी कोण? गुन्हेगार कोण? खुनी कोण? सूत्रधार कोण?
मंदिराची अफाट संपत्ती, सर्वोच्च न्यायालयाची ऑडिट टीम, राजघराण्याचा विरोध, राजकारण आणि गुन्हेगारी यांची गुंतागुंत वाढत जाते. तीन-चार हत्या, ऑडिटरचा खून, मंदिराच्या तलावात सापडलेला मृतदेह, पुराणवस्तूंची तस्करी, काळा पैसा, दरोडे, बॉम्बस्फोटांचं गूढ आणि प्रेमकहाण्या कथेला वेग देतात. संशयाची सुई सतत वेगवेगळ्या दिशेने फिरत राहते. सीबीआयचे कबीर आणि डीजीपी कृष्णन या गुंतागुंतीच्या रहस्यांचा माग काढताना खऱ्या गुन्हेगारापर्यंत कसे पोहोचतात, याची उत्कंठावर्धक कहाणी म्हणजे हे पुस्तक.
सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, सगळ्या कोड्यांचा उलगडा आहे ह्या कादंबरीत. देवाच्या नावानं आपल्या देशात काय काय घडू शकतं, याचं प्रभावी चित्रण आहे रवी सुब्रह्मण्यन यांच्या या कादंबरीत
इन द नेम ऑफ गॉड… देवाच्या नावानंऽऽ…!
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





