डॉ मकरंद पिंपुटकर
☆ कुदळवाडीचा गोटीभाई आणि होलिका दहन… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆
गोटीभाई खुशीत होता.
म्हणजे, त्याचं तसं खरं नाव राजेश. कुदळवाडी झोपडपट्टीत रहायचा तो. उण्यापुऱ्या १०-१२ वर्षांचा. तसा अभ्यासात बरा होता तो.
शाळेत आणि कुदळवाडीत राजेशचं राजू व्हायला वेळ लागला नाही, पण त्याला हे नाव बिलकूल आवडायचं नाही. पण एके दिवशी त्याच्या गोट्या खेळण्याच्या प्रभूत्वाबद्दल वाडीत हातभट्टी, मटक्याचा धंदा करणाऱ्या मुन्नाभाईला कळलं, तेव्हा त्याने त्याचं “गोटीभाई” असं नामकरण केलं.
नावामागे भाई लागल्याची झिंग गोटीभाईला चढत गेली. तो हळूहळू भाईगिरीत शिरला. त्याचं शाळेत जाणं, अभ्यास करणं कमी झालं. तो मुन्नाभाईची सटरफटर कामं करू लागला. शर्टाची बटणं उघडी टाकून, कॉलर उंचावत फिरू लागला. भाईगिरी करू लागला.
होळी जवळ आल्यावर बिनमेहनतीत पैसा कमवायचा एक सोप्पा धंदा गोटीभाईला सापडला. देणगी गोळा करण्याचा डब्बा घेऊन त्याने लहानसहान पोरांना आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये, बंगल्यांमध्ये पाठवलं – होळीसाठी वर्गणी गोळा करायला.
झोपडपट्टीतील मुलांच्या कोण नादाला लागणार, म्हणून बहुतेकांनी पाच दहा, पाच दहा रुपये देऊन टाकले.
पण काही जणांनी पैसे दिले नाहीत – “देत नाही” म्हणून सांगितलं, तो त्याला त्याचा अपमान वाटला. मग त्याची जी-हुजुरी करणाऱ्या दोन चार मुलांना त्याने त्या दुकानांत परत पाठवलं, त्या दुकानात खरेदी करण्याच्या मिषाने फिरताना – गोटीभाई कसा danger आहे, मुन्नाभाईचा कसा तो खास आदमी आहे, गेल्या वर्षी एकाने त्याच्याशी पंगा घेतला, तर गोटीभाईने त्याच्या दुकानाची काचच कशी फोडली वगैरे ज्या सुचतील त्या बाता मारायला सांगितलं.
आणि ही गोळी लागू पडली. ज्यांनी आदल्या दिवशी पाच दहा रुपयेही दिले नव्हते त्यांच्याकडून दुसऱ्या दिवशी पन्नास शंभर रुपये वसूल करून मुलं परत आली.
गोटीभाई खुशीत होता.
त्याच्या आणि मुन्नाभाईच्या या वाढत्या प्रस्थाकडे, पोलीस ठाण्यात नुकतेच बदलून आलेल्या इन्स्पेक्टर भोसले यांचे लक्ष वेधले ते राजेशच्या शाळेतील त्याच्या वर्गशिक्षकांनी. राजेशचे वर्गशिक्षक आणि भोसले वर्गमित्र. भोसल्यांनी यात लक्ष घालण्याची मित्राला ग्वाही दिली.
आणि होलिका दहनाच्या दिवशीच त्यांना संधी मिळाली. आदल्याच रात्री धाड घालून त्यांनी मुन्नाभाई आणि त्याच्या टोळक्यातल्या पाच दहा गुंडांना पकडलं होतं. आणि होळीच्याच दिवशीच राजेशला ज्याने वर्गणी दिली नव्हती त्यातील एका दुकानाची दर्शनी भागाची काच फोडल्याची तक्रार त्यांच्याकडे आली होती.
त्यांनी त्यांच्या शिक्षकमित्राला फोन करून ठेवला आणि माने हवालदारांना राजेशला घेऊन पोलीस ठाण्यात यायला सांगितले.
बाहेर जरी दादागिरी करत असला तरी पाचवी सातवीत असणारा शाळकरी मुलगा होता राजेश. त्या दुकानाची काच कोणीतरी फोडली आहे आणि त्या संदर्भात आपल्याला पोलीसठाण्याला बोलावलं गेलं आहे हा निरोपच त्याला गर्भगळीत करून गेला होता. पण मुन्नाभाई आपल्याला यातून नक्की सोडवेल याची त्याला खात्री होती.
घाबरत घाबरतच तो पोलीस ठाण्यात पोचला. तिथे गेल्यागेल्या मुन्नाभाईला आदल्याच रात्री अटक झाल्याचं त्याला कळलं आणि त्याचं उरलं सुरलं अवसानही गळलं.
“बोल रे बाबा, का फोडलीस त्या दुकानाची काच तू? आता हे नुकसान कोण भरून देणार – तू का तुझा मुन्नाभाई? त्या दुकानदाराने तर प्राणघातक हल्ला झाल्याची आणि चोरीच्या उद्देशाने काच फोडली गेल्याची तक्रार केली आहे. आईवडिलांपासून दूर, बालसुधारगृहात रवानगी होईल तुझी, काही माहीत आहे का तुला? ”
भोसल्यांचे प्रश्न राजेशचं उरलंसुरलं धैर्य खच्ची करत होती.
हुकुमाचा एक्का म्हणून भोसल्यांनी मुन्नाभाईला कोठडीतून बाहेर आणायला सांगितलं. आदल्या रात्रीच्या झटापटीत मुन्नाने सपाटून मार खाल्ला होता. चेहरा सुजला होता, धड बोलताही येत नव्हतं त्याला. भोसल्यांनी खुणेनेच मुन्नाला परत आत घेऊन जायला सांगितलं.
“आणि तू याच्या जीवावर भाईगिरी करत होतास? आता कोण बाप येणार तुला सोडवायला? ” भोसल्यांच्या या प्रश्नाला राजेशकडे काही उत्तर नव्हतं.
आणि एवढ्यात त्याचे वर्गशिक्षक पोलीस ठाण्यात शिरले. त्यांना पहाताच भोसले चपापून उठून उभे राहिले. “सर, तुम्ही इथे? मला निरोप पाठवला असतात. मी आलो असतो ना तुम्हाला भेटायला. ” ते अदबीने बोलत होते.
त्यांच्या आर्जवाकडे पूर्ण दुर्लक्ष करत, वर्गशिक्षक सरळ राजेशजवळ गेले, त्याच्या खांद्यावर मायेने हात ठेवला आणि त्याला प्रेमाने विचारले, “राजेश, तू नाही ना रे फोडलीस ती काच? ”
आपले शिक्षक आपल्यासाठी पोलीस ठाण्यात आले हे पाहून राजेशच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. त्याने नकारार्थी मान हलवली.
शिक्षक अधिकारवाणीने भोसल्यांना म्हणाले, “माझा विद्यार्थी त्याने काच फोडली नाही असं मला सांगत आहे आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. इथून पुढे सर्व वाईट धंदे सोडून चांगले वागायचे त्याने मला वचन दिले, त्याने आजवर ज्यांना धाकदपटशा दाखवला त्यांची सपशेल माफी मागितली, तर याची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे. पण तुम्ही त्याला आत्ताच्या आत्ता याला सोडले पाहिजे. मी त्याला घेऊनच परत जाईन. “
भोसल्यांनी काहीच वाद न घालता होकारार्थी मान हलवली. शिक्षक राजेशला घेऊन त्याच्या घरी सोडून आले. वाटेत जाताना त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते हितगुज करत जात होते.
संध्याकाळी होळीवर भोसले आणि शिक्षक भेटले, एकमेकांचे हात हातात धरून मनमुराद हसले. म्हणाले, “आपण दोघेही चुकीच्या क्षेत्रात आलो, खरं तर अभिनयक्षेत्रातच जायला हवं होतं. “
भोसले हसून सांगत होते, “अरे, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका दारुड्याने काच फोडल्याचे पाहिलं होतं मी. नाहीतर मला राजेशला असं सोडता आलं नसतं. “
“हो ना. पण तो तसा चांगला मुलगा आहे. कुसंगतीने बहकत गेला होता. त्याला मुन्नाभाई नाही तर त्याचे शिक्षक आणि पोलिसच वाचवू शकतात ही जाणीव त्याला होणं गरजेचं होतं.
पण आता योग्य मार्गावर आला आहे तो. जाऊन सगळ्या दुकानदारांची माफी मागून आला. चांगला वागण्याची आईची शपथ घेतली आहे त्याने.
आणि जर पडलं परत त्याचं पाऊल वाकडं, तर आपण वेळीच सुधारू त्याला. ” वर्गशिक्षक सांगत होते.
होलिका दहनाच्या मुहूर्तावर अमंगलाचे, आसुरी वृत्तीचे दहन झाले होते. गोटीभाई आणि त्याची भाईगिरी जळून खाक झाले होते, आणि पुन्हा भरारी घेण्यासाठी, राजेश त्या राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेपावला होता.
© डॉ. मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





