श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०९ आणि ११० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. १०९ – – 

जनीं वाद वेवाद सोडूनि द्यावा ।

जनीं सूखसंवाद सुखें करावा ।

जगीं तो चि तो शोकसंतापहारी ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ।।१०९।।

अर्थ : वादविवाद किंवा व्यर्थ चर्चा करणे सोडून द्यावे. ज्यामुळे संवाद हा सुखसंवाद होईल अशा प्रकारे चर्चा करावी. अशा सुखसंवादामुळे मनाचे (शोक, संताप आदी)क्लेश दूर होतात. ज्यामुळे वादाचे किंवा शंकेचे निरसन होऊन परमार्थ मार्गावर चालणे सुकर होते, अशी चर्चा किंवा संवाद हितकारक असतो.

(वादविवाद – उलटसुलट प्रश्नोत्तरे /निरर्थक चर्चा, सुखसंवाद – मनाला समाधान देणारी चर्चा)

विवेचन : आधीच्या श्लोकात समर्थांनी संत, सज्जनांच्या सहवासात राहिल्याने आपल्या अंतरंगात जो बदल होतो तो परमार्थ मार्गावर चालण्यासाठी आपल्याला अत्यंत उपकारक ठरतो. त्याचप्रमाणे संतांशी निरर्थक वाद घालू नये असे सांगितले. या श्लोकामध्ये ते कोणता वाद किंवा चर्चा आपल्यासाठी हितकारक आहे ते सांगत आहेत. मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. त्यामुळे इतर प्राण्यांसारखे केवळ आहार, भय, मैथुन आणि निद्रा एवढ्याच गोष्टी त्याला जीवन जगण्यासाठी पुरेशा होत नाहीत. काहीतरी बौद्धिक खाद्य मिळाल्याशिवाय त्याची बौद्धिक भूक भागत नाही. जेव्हा मनुष्य परमार्थ मार्गावर वाटचाल करायची ठरवतो, तेव्हा अनेक शंका त्याच्या मनात घर करून असतात. एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून त्या शंकांचे जोपर्यंत निराकरण होत नाही, तोपर्यंत अध्यात्म मार्गात त्याची प्रगती होत नाही. त्यामुळे आपल्या मनातील शंका दूर होऊन आपल्याला मार्गदर्शन मिळावे या हेतूने आपण गुरूंकडे जातो.

परंतु काही लोकांचा स्वभाव व्यर्थ वाद घालण्याचा असतो. अशा लोकांच्या वाद घालण्यात ज्ञानाची जिज्ञासा कमी आणि आपले ज्ञान दाखवण्याची वृत्ती जास्त असते. गुरूंकडे गेल्यावरही त्यांच्या या वृत्तीत बदल होत नाही. पण जे खरे संत असतात, ते फार बोलत नाहीत. ते साधकांच्या जिज्ञासेचे योग्य प्रकारे समाधान करतात. त्यातूनच साधकाने योग्य तो बोध घ्यायचा असतो.

अशा प्रकारची उदाहरणे समर्थ रामदास, स्वामी समर्थ किंवा गजानन महाराज यांच्या चरित्रात वाचायला मिळतात. ज्या विद्वान किंवा पंडितांना आपल्या ज्ञानाचा गर्व होता, त्यांचा गर्व त्यांनी हरप्रकारे उतरवला आहे. मंडन मिश्रा हे अत्यंत विद्वान होते. ते निरनिराळ्या पंडितांशी वाद घालून त्यांना चर्चेत हरवत असत. परंतु शंकराचार्यांबरोबर झालेल्या चर्चेत त्यांच्या ज्ञानाचा अहंकार गळून पडला आणि ते पुढे शंकराचार्यांचे अनुयायी झाले. अशी अनेक उदाहरणे संत चरित्रात आपल्याला सापडतात.

अशा चर्चांमधून जेव्हा शंकांचे निरसन होते, काहीतरी सार हाती लागते तेव्हा मनातील शोक, संताप आदी व्याधी साहजिकच दूर होऊन मन समाधानी होते, तृप्त होते. कोणत्याही शंका शिल्लक राहत नाहीत. असे निःशंक झालेले मन मग परमार्थ मार्गावर अधिक चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकते. पण ज्यांना केवळ वादच घालायचा असतो, अशा लोकांबरोबर केलेल्या चर्चा या शोक संतापाचे कारण ठरतात. शाब्दिक हमरातुमरी होऊन बरेचदा चर्चा हातघाईवर येते अशी अनेक उदाहरणे आपण व्यवहारात पाहतो. अनेक संघटनांच्या, पतसंस्थांच्या किंवा गृहनिर्माण सोसायट्यांच्या वार्षिक सभांमध्ये वाद वाढत जाऊन अगदी हाणामारीची वेळ येते. अशा वेळी शोक आणि संताप या मानसिक क्लेश देणाऱ्या गोष्टी उद्भवतातच.

‘वादे वादे जायते तत्वबोध: ‘ असे आपण म्हणतो. ज्या वादातून किंवा चर्चेतून काहीतरी आवश्यक किंवा हितकारक असे तत्व हाती लागते अशाच चर्चा साहजिकच हितकारक ठरतात. अशा चर्चांना समर्थांनी ‘ सुखसंवाद ‘ असा अतिशय सुंदर शब्द वापरला आहे.

असा सुखसंवाद जेव्हा होतो, तेव्हा तो अतिशय हितकारक ठरून साधकाला परमार्थ मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शक होतो. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या आश्रमात त्यांचे आणि शिष्यांचे असे ‘ सुखसंवाद ‘ होत असत. त्यातूनच पुढे राम, कृष्ण यांच्यासारखे शिष्य निर्माण झाले. अशा शिष्यांनी आपल्या वागण्याने आदर्श निर्माण करून संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन केले.

स्वसंवाद : 

१. मी चारचौघांत किंवा समाजमाध्यमांवर जेव्हा एखाद्या विषयावर चर्चा करतो, तेव्हा त्यात माझा हेतू केवळ ‘माझे ज्ञान दाखवून वाद जिंकण्याचा’ असतो, की काहीतरी चांगले शिकण्याचा असतो?

२. संतांचे ग्रंथ वाचताना किंवा ज्येष्ठांशी बोलताना माझ्या मनात ‘जिज्ञासा’ असते, की मी केवळ माझेच मत खरे करण्यासाठी ‘तर्क-कुतर्क’ लढवत राहतो?

३. माझ्या घरातील किंवा कार्यालयातील चर्चा बऱ्याचदा ‘शोक-संताप’ वाढवणाऱ्या वादात बदलतात, की मन शांत करणारा ‘सुखसंवाद’ ठरतात?

४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, मनातल्या शंकांचे वेळीच योग्य व्यक्तींकडून निरसन करून घेऊन, मी ‘निःशंक’ मनाने परमार्थ मार्गावर चालावे असे मला वाटते का?

=====

 श्लोक क्र. ११० – –

तुटे वाद संवाद त्याते म्हणावे । 

विवेके अहंभाव यातें जिणावे ।

अहंतागुणे वाद नाना विकारी ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ।।११०।।

अर्थ : ज्या चर्चेतून शंकेचे किंवा संशयाचे निराकरण होते त्या चर्चेला संवाद म्हणावे. विवेकाच्या साहाय्याने अहंकारावर मात करावी. अहंकारामुळे नाना प्रकारचे विकार निर्माण होतात. ज्या संवादातून वाद किंवा शंकेचे निराकरण होऊन काही तत्व हाती लागते, अशी चर्चा हितकारक समजावी.

(अहंभाव – अहंकार, अहंतागुणे – अहंकारामुळे, जिणावे – जिंकावे) 

विवेचन : मनुष्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात असे अनेक प्रसंग उद्भवतात की ज्यामुळे त्यांच्या मनात शंकांचे वादळ निर्माण होते. आध्यात्मिक जीवनात तर माणसे अनेक शंका मनात ठेवून वावरत असतात. जेव्हा एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून या शंकांची समाधानकारक उत्तरे मिळतात, तेव्हा त्यातून काहीतरी मौलिक मार्गदर्शन मिळते. काहीतरी तत्व किंवा सार हाताशी लागते. अशी चर्चा जेव्हा होते तेव्हा तिला ‘ संवाद ‘ म्हणता येईल असे समर्थ म्हणतात. अशी चर्चा किंवा संवाद तेव्हाच होऊ शकतो जेव्हा दोन्ही पक्षातील मंडळी चर्चेतील व्यक्तींपेक्षा मुद्द्यांना अधिक महत्व देतात. जेव्हा विषयापेक्षा व्यक्तींना अधिक महत्व प्राप्त होते, तेव्हा चर्चेत संवाद न होता वादच जास्त होतात आणि फारसे काही हाती लागण्याची शक्यता कमी असते. चर्चा करण्याचा अहंभाव जेवढा जास्त, तेवढी ती चर्चा ‘ संवादाच्या ‘ पातळीवर न राहता वादाच्या पातळीवर उतरते.

अहंकारी व्यक्तींची बुद्धी चंचल असते. त्यांचे चित्त चर्चेतील मुद्द्यांवर एकाग्र होत नाही. आपलेच म्हणणे खरे करण्याच्या मागे अशा व्यक्ती असतात. असा अहंकार जिंकण्याचा काही मार्ग आहे का? याचे उत्तर समर्थ पुढील ओळीत देतात. ते म्हणतात विवेकाने अहंकाराला जिंकावे. विवेक म्हणजे काय योग्य, काय अयोग्य याचे भान आणि ज्ञान असणे. विवेकी व्यक्ती दुसऱ्याचे मत सुद्धा काळजीपूर्वक ऐकतात. आपले जर कुठे चुकत असेल, तर त्यात दुरुस्ती करण्याची किंवा आपल्या विचारात बदल करण्याची त्यांची तयारी असते.

म्हणून व्यक्तींना गौण स्थान असावे आणि चर्चेच्या विषयाला अधिक महत्व दिले गेले पाहिजे. पण बरेचदा असे होत नाही. संवादात भाग घेणाऱ्या व्यक्तींच्या मनात स्वतःबद्दल, स्वतःच्या ज्ञानाबद्दल अहंकार असतो. अशा वेळी चर्चेतून काही तत्व हाती न लागता समोरच्या व्यक्तीचा द्वेष, मत्सर, तिरस्कार इ. प्रकारचे नाना विकार निर्माण होतात. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा समाजाने संन्याशाची मुले म्हणून छळ केला आणि वाळीत टाकले होते. आळंदीच्या विद्वानांना स्वतःच्या ज्ञानाबद्दल प्रचंड अहंकार होता. सुरुवातीला विठ्ठलपंतांनी केलेला युक्तिवाद किंवा नंतर ज्ञानेश्वरांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत ते नव्हतेच. अशा परिस्थितीत संवाद शक्यच नव्हता. तेव्हा ज्ञानेश्वरांना आळंदीच्या पंडितांनी पैठणहून शुद्धिपत्र आणायला सांगितले गेले. पैठणच्या विद्वानांसोबत त्यांची धर्मशास्त्रावर चर्चा झाली. त्यावेळी ज्ञानेश्वरांनी पशु-पक्षी, प्राणी आणि माणूस यांच्यामध्ये एकच आत्मतत्व असल्याचे प्रतिपादन केले. सुरुवातीला त्यांचा त्यावर विश्वास बसला नाही परंतु जेव्हा ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून दाखवले, तेव्हा तेथील पंडितांना त्यांच्या सांगण्याची खात्री पटली. या चर्चेच्या वेळी सुरुवातीला तेथील पंडितांमध्ये स्वतःच्या ज्ञानाबद्दल अहंकार होता. पण ज्ञानेश्वरांनी अत्यंत नम्रपणे चर्चेच्या विषयाला अधिक महत्व देऊन आपला मुद्दा पटवून दिला. या चर्चेतून माणूस आणि इतर प्राणी यांच्यात एकच आत्मतत्व विद्यमान असल्याचा निष्कर्ष हाती लागला. ही चर्चा निकाली निघाली. हा विवेक आणि नम्रतेने अहंकारावर मिळवलेला विजय होता. असा संवाद हितकारक असतो असे समर्थांना सांगायचे आहे.

अशा प्रकारच्या चर्चा कौटुंबिक किंवा सामाजिक संवादासाठी देखील उपयुक्त आहेत. त्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण अधिक निकोप राहू शकेल. पण इथे वाद, संवाद यांचा हेतू अध्यात्म मार्गातील साधकांच्या शंका निवारण व्हाव्यात आणि ते परमार्थ मार्गावर अग्रेसर व्हावेत हा आहे. इतर व्यावहारिक चर्चा किंवा वादविवाद इथे अपेक्षित नाही.

स्वसंवाद 

१. एखाद्या चर्चेत भाग घेताना माझा हेतू समोरच्या व्यक्तीला ‘चुकीचे ठरवून स्वतःचा अहंकार सुखावणं’ हा असतो, की विषयातील सत्य जाणून घेण्याचा असतो?

२. “विवेके अहंभाव यातें जिणावे” या समर्थांच्या सूत्राप्रमाणे, जर माझे कुठे चुकत असेल तर मी माझे विचार बदलण्याची किंवा माझी चूक मान्य करण्याची नम्रता दाखवतो का?

३. माझ्या बोलण्यामुळे किंवा वाद घालण्याच्या प्रवृत्तीमुळे माझ्या मनात नकळत समोरच्या व्यक्तीबद्दल द्वेष, मत्सर किंवा तिरस्कार यांसारखे ‘नाना विकार’ तर निर्माण होत नाहीत ना?

४. ज्ञानेश्वर माउलींनी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या ज्ञानाचा किंवा अनुभवाचा अभिमान बाजूला ठेवून सर्वांभूती एकच आत्मतत्त्व पाहण्याचा प्रयत्न करतो का?

– क्रमशः श्लोक १०९ आणि ११०

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted