श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ कृष्णावस्था – भाग – २ ☆ श्री सुनील देशपांडे 

(शिक्षण पूर्ण झाल्यावर पांडवांच्या पहिल्या वनवासाची माहिती त्याला मिळाली. हेरांच्या माध्यमातून गुप्त माहिती मिळवून, दुर्योधनाने रचलेले पांडवांच्या हत्येचे अनेक कट श्रीकृष्णाने आपल्या राजकीय मुत्सद्दीपणाने हाणून पाडले. पांडवांचा रक्षक, मार्गदर्शक आणि सोबती म्हणून त्याने आयुष्याची पुढील अनेक वर्षे खर्ची घातली.) 

इथून पुढे – – 

एका बाजूला स्वतःचे द्वारकेचे राज्य सांभाळणे आणि दुसऱ्या बाजूला आप्तस्वकीयांचे रक्षण करणे, यातच त्याचा काळ गेला. पांडवांच्या वनवासात आणि अज्ञातवासात त्यांच्यावर लक्ष ठेवणे, हस्तिनापुरात जाऊन विदुरासारख्या विचारवंतांशी चर्चा करून आपल्या भूमिकेला नैतिक पाठबळ मिळवणे, अशा विविध पातळ्यांवर तो सक्रिय राहिला. पुढे पांडवांना इंद्रप्रस्थ राज्याची स्थापना करून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. द्यूतप्रसंगी द्रौपदीचे रक्षण करणे असो वा त्यानंतरच्या खडतर वनवास आणि अज्ञातवासाच्या काळात पांडवांना योग्य दिशा दाखवणे असो; श्रीकृष्ण कायम पाठीशी उभा राहिला. स्वतःचे राज्य शेकडो मैल दूर असूनही त्याने ही सर्व सूत्रे अत्यंत कौशल्याने हाताळली.

काही वर्षांनंतर युद्धाचा अटळ प्रसंग आला, तेव्हाही त्याने युद्ध टाळण्यासाठी शिष्टाईचे पराकोटीचे प्रयत्न केले. युद्ध हे नेहमीच विध्वंसक असते; त्यामुळे सामोपचाराचे सर्व मार्ग संपल्यानंतरच तो अंतिम पर्याय असावा, हा वस्तुपाठ श्रीकृष्णाने घालून दिला. संपूर्ण संघर्षाने भरलेल्या आयुष्यात श्रीकृष्णाने स्वतःच्या हाताने मोजून चार-पाच दुर्जनांचाच वध केला—बालपणी पूतना, मल्ल चाणूर, जुलमी मामा कंस आणि नंतर शिशुपाल व दंतवक्र. शिशुपाल आणि दंतवक्र हे त्याचे नात्याने चुलत भाऊ होते; तरीही अधर्माची परिसीमा गाठल्यानंतरच त्याने त्यांना शासन केले.

श्रीकृष्णाची आई देवकी ही उग्रसेन कुळातील (भोज/अंधक) आणि वडील वसुदेव हे यादव (शूर) कुळातील होते. त्या काळाच्या दृष्टीने हा दोन भिन्न कुळांमधील विवाह होता. त्या पुरोगामी विचारांचे संस्कार कृष्णाच्या रक्तात उपजतच होते. सामाजिक सुधारणांच्या दृष्टीने त्याचा गोवर्धन पूजेचा प्रसंगही अत्यंत क्रांतिकारक आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली इंद्र किंवा पर्जन्याची काल्पनिक पूजा बंद करून, “जे प्रत्यक्ष आपल्याला अन्न-पाणी देतात ते डोंगर आणि दूध-दुभते देणारी गोधने हीच आपली खरी दैवते आहेत; ज्यांना कधी पाहिलेच नाही त्यांची अवास्तव भीती कशाला बाळगता? ” हा विवेकवादी विचार त्याने मांडला. रूढ, अंधश्रद्धाळू परंपरा मोडून निसर्गाधारित, उपयुक्ततावादी विचार रुजवण्याचे श्रेय श्रीकृष्णाला जाते.

श्रीकृष्णाच्या संपूर्ण आयुष्याचा पट पाहिला तर तो अखंड संघर्षाने भरलेला दिसतो. त्याच्या मनाला प्रदीर्घ विश्रांती किंवा निवांत शांतता लाभेल असा काळ फार कमी आला. पावलोपावली संकटे आली; पण त्या संकटांवर त्याने बुद्धिमत्तेने, धैर्याने आणि शक्यतो अहिंसक मार्गाने मात केली. या सगळ्या प्रवासात त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘अनासक्ती’. गोकुळ, मथुरा, वृंदावन अशा ज्या ज्या ठिकाणी तो गेला, जिथे त्याने पराक्रम गाजवला आणि जिथे लोकांनी त्याला आदराने देवाचे स्थान दिले, त्या कोणत्याही ठिकाणी अथवा नात्यात तो अडकून पडला नाही. तो कधीही मागे फिरकला नाही. सतत समोर येणाऱ्या संकटांमुळे गुंतून पडायला सवड नव्हती, किंवा स्वतःवर संकट नसतानाही दुसऱ्यांच्या रक्षणासाठी स्वतःला झोकून देण्याची त्याची वृत्ती होती. स्वार्थापलीकडे पाहण्याची सामाजिक दृष्टी असल्यामुळेच त्याचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले.

महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले. आपण मालिका किंवा चित्रपटांमध्ये कृष्णाला कायम तरुण पाहतो; परंतु कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाचे वय तब्बल ८९ वर्षांचे होते, हे अनेकांना ठाऊक नसते. कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर साधारण ३६ वर्षांनी, म्हणजेच वयाच्या १२५ व्या वर्षी त्याचा देहांत झाला. महाभारताच्या महायुद्धानंतर तरी त्याला स्वतःच्या राज्यात शांतता लाभली का? तर नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात त्याच्या स्वतःच्या यादव कुळात अंतर्गत कलह माजला आणि आपापसात यादवी माजून लोक एकमेकांच्या जीवावर उठले. त्यांची समजूत काढण्याचे त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. या विनाशाने अत्यंत उद्विग्न होऊन, वयाच्या शंभरीनंतर त्याने वनाचा आश्रय घेतला. एकांतात वास्तव्य करतानाही त्याने तेथील वनवासी आणि आदिवासी बांधवांमध्ये लोकशिक्षणाचे कार्य केले, असे सांगितले जाते. आयुष्यभर कर्तव्य पार पाडल्यानंतर एकांतात शांतपणे त्याने मृत्यूचा स्वीकार केला. एका पारध्याचा बाण चुकून पायाला लागल्यामुळे त्याचा देहांत झाला आणि त्या वनवासी बांधवांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

श्रीकृष्णाला सर्वात जास्त वेदना कशाची झाली असेल, याचा विचार केला तर कोणत्याही सुजाण मनाला हेलावून टाकणारे वास्तव समोर येते. ज्या माणसाला मुळात मानवी हिंसा मान्यच नव्हती, त्याला नाईलाजाने वयाच्या नव्वदीत एका भीषण युद्धाचे सारथ्य करावे लागले. महाभारतातील १८ अक्षौहिणी सैन्यामध्ये मिळून सुमारे ३९ लाख ३६ हजार ६०० योद्धे सामील झाले होते. केवळ १८ दिवसांत त्यातील जवळपास साडेसत्तावीस लाख सैनिक मृत्युमुखी पडले. इतक्या छोट्या भूभागावर, अवघ्या अठरा दिवसांत झालेला हा अभूतपूर्व नरसंहार ज्या माणसाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला, त्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल? आधुनिक महायुद्धांमध्येही इतक्या कमी काळात एवढा रक्तपात झाला नव्हता. युद्धात झालेला हा विनाश आणि त्यानंतर स्वतःच्याच यादव कुळात झालेली रक्तरंजित यादवी पाहून, मानवी विकृतीविषयी त्याच्या मनात प्रचंड उद्विग्नता निर्माण झाली असणार. इतकी उत्तुंग बुद्धिमत्ता, सकारात्मक ऊर्जा आणि क्रांतिकारक विचार असलेल्या महामानवाला या सामूहिक हिंसेमुळे किती खोल नैराश्याचा सामना करावा लागला असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

१२५ वर्षांचे प्रदीर्घ, संघर्षमय आयुष्य जगूनही कुठेही आसक्ती न ठेवता, शेवटी केवळ मानव कल्याणाचा शांत विचार करत हा महापुरुष वनात निघून गेला. अशा विशाल व्यक्तिमत्त्वाचा विचार “फक्त देव म्हणून नमस्कार करा” इतक्या संकुचित चौकटीत कसा करता येईल? त्या चरित्रातून आपण काय आदर्श घ्यायचा, हे समजून घेणे अधिक मोलाचे आहे. बालपणीच्या काही प्रसंगांचे विकृतीकरण करून त्यावर पूर्वग्रहदूषित भाष्य करण्यापेक्षा; संकटांवर धैर्याने मात करणे, प्रजेसाठी नवीन राजधानी उभी करून सुशासन देणे आणि संपूर्ण जीवन संघर्षात खर्ची घालूनही अनासक्त राहणे—हा त्याचा व्यापक पैलू समजून घेतला पाहिजे. महाभारतातील महासंहार आणि स्वकीयांमधील हिंसेचा वीट आल्यामुळेच मानव कल्याणाच्या चिंतनात त्याने आपले प्राण सोडले, ही या चरित्रातील सर्वात हृदयस्पर्शी भावना मला भावते. महर्षी व्यासांनी हे चरित्र साकारताना आपल्या अलौकिक प्रतिभेचा सर्वोच्च आविष्कार घडवला आहे यात शंका नाही.

*

गोपिक्रिडा ती करता करता, हरवून जावे!

एकरूप होऊन उरावे, ही कृष्णावस्था!

*

बेडर होऊन कालियास, जाऊन भिडावे!

निर्विष करण्या झुंजावे, ही कृष्णावस्था!

*

रास रचावी अनंत रूपे, अनन्य भावे प्रेम करावे!

मार्गावर ध्येयाच्या, कुठे न गुंतावे ही कृष्णावस्था!

*

सुखशय्येचा मार्ग न शिक्षण, गुरु सेवेला अनुसरावे!

विद्यार्थ्यांत न उच्चनीचता, ही कृष्णावस्था!

*

सामर्थ्याचे न वृथा दर्शन, योग्य वेळी पण प्रकट करावे,

स्मित हास्याने जग जिंकावे, ही कृष्णावस्था!

*

यशापयश दोन्ही चमकावे, कर्मामध्ये योगी व्हावे!

दूर एकटे अनंत व्हावे, ही कृष्णावस्था!

*

समाप्त –

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted