संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ कविता आज माझ्याकडे आलीच नाही… ☆ संगीता कुलकर्णी ☆

☆

कविता आज माझ्याकडे आलीच नाही

शब्दांच्या उंबरठ्यावर रात्रभर

चांदण्यांची रांगोळी काढून ठेवली होती

तरी तिच्या पावलांनी

माझ्या दाराची वाट धरलीच नाही

 

मनाच्या गाभाऱ्यात

भावनांची शंखशिंपले साचली होती

हृदयाच्या अथांग सागरात

लाटाही काहीतरी सांगू पाहत होत्या

पण ओठांवर येताना

त्यांना शब्दांची नौका मिळालीच नाही

 

कागदाने कितीतरी वेळ

माझ्याकडे कोऱ्या डोळ्यांनी पाहिले

शाईच्या थेंबांत

आभाळभर पाऊस दाटला होता

पण अक्षरांच्या मातीवर

एकही ओळ अंकुरलीच नाही

 

खिडकीशी बसलेला वारा

जुने ऋतू चाळत राहिला

पानांच्या सळसळीत

तिच्या चाहुलीचा भास झाला

क्षणभर वाटले

ती आली

पण सावली होती

कविता नव्हती

 

चंद्रानेही आज

ढगांच्या ओठांवरून मौन पांघरले

रात्रीच्या काळोखाने

माझ्या एकांताला कवटाळले

तारे कितीतरी होते आभाळी

पण माझ्या शब्दांना

एकही नक्षत्र सापडले नाही

 

कालपर्यंत माझ्या श्वासांवर

ती दवबिंदूसारखी विसावायची

कधी सुगंध होऊन

अंतर्मनाच्या वाटेवर दरवळायची

आज मात्र

हृदयाच्या उघड्या दारातूनही

तिचे येणे झाले नाही

 

कदाचित ती रुसली असेल

माझ्या न बोललेल्या शब्दांवर

कदाचित हरवली असेल

माझ्याच मनाच्या एखाद्या अनामिक वळणावर

किंवा भावनांच्या गर्दीत

तिचाच आवाज माझ्याकडून हरवला असेल

 

म्हणून आज मीही

शब्दांना प्रश्न विचारला नाही

शाईला दोष दिला नाही

कोऱ्या कागदाचीही

समजूत काढली नाही

 

कारण कविता

हाक मारून येत नसते

ती तर अंतरीच्या आभाळात

अचानक दाटलेल्या मेघांसारखी

अवचित बरसत असते

 

आणि आज

मेघ होते पाऊस नव्हता

डोळे होते अश्रू नव्हते

हृदय होते स्पंदन होते

फक्त त्या स्पंदनांना

शब्द देणारी ती नव्हती

 

… कविता आज माझ्याकडे आलीच नाही

 ☆

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
1
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Neha
0

खूप छान.