सौ .कल्पना कुंभार

??

☆ मी कृतज्ञ आहे… ☆ सौ .कल्पना कुंभार ☆

मी कृतज्ञ आहे

त्या विद्यामंदिराची ..

जिने मला घडवले

ओळख करून दिली जगाची ..

 

बोट पकडूनी आईचे .. टाकले

पहिले पाऊल त्या मंदिरात…

कुशीत घेतले बाईनी ..

नेले मला वेगळ्याच विश्वात..

 

 गिरवायला शिकवले ग म भ न 

 जिथे बोट धरुनी बाईंनी..

मी नेहमीच कृतज्ञ त्या शाळेशी 

अलंकृत केले मला जिने संस्कारांनी..

 

शाळेच्या त्या चार भिंतीत

आयुष्याचे ध्येय समजले..

पंखात भरारी घेण्याचे

बळही तिनेच दिले…

 

मित्र मैत्रिणी..सखे सोबती

भेटले त्या मंदिरात…

सरस्वतीचा वरदहस्त

बाईंच्या आशीर्वादात..

 

क्रीडांगणावर रमले मन

व्यायामाने सुदृढ तन..

राष्ट्रभावना जागृत होण्या

साजरे केले राष्ट्रीय सण…

 

अभ्यासाबरोबरच कलेशी

नाळ जोडली जिथे अलवार ..

वर्तन घडता काही चुकीचे

कधी कधी मिळाला छडीचा मार ..

 

नेहमीच मी कृतज्ञ

माझ्या या शाळेशी ..

घडवले मला जिने 

नाळ जोडली मातीशी ..

        

मला अजूनही आठवतो तो दिवस .. शाळेचा पहिला दिवस.. किती रडले होते मी.. आणि त्यानंतर एक वेगळच जग अनुभवलं.. माझ्यासारखेच रडणारे कितीतरी जण.. पण प्रत्येकाच्या पाठीवरून हात फिरवत.. त्याच्याशी गोड बोलून त्याला कुशीत घेणाऱ्या बाई.. रडता रडता एकमेकींकडे पहात .. हात घट्ट पकडून ठेवणाऱ्या मैत्रिणी.. मला इथेच भेटल्या..

चार भिंतीच्या या शाळेत काय काय नाही शिकले मी.. अभ्यास तर होतच होता.. पण माझ्यातला लेखनाचा गुणही इथेच सापडला मला.. कला, क्रीडा, विविध गुण दर्शन या कार्यक्रमातून आम्ही सगळेजण समृद्ध होत गेलो… अन् अमाप कौतुक नजरेत  साठवत ही शाळा आम्हाला घडवत गेली..

चुकताना सावरलं अन् आयुष्याचं एक ध्येय दिलं.. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी पंखांना पुरेस बळही दिलं ते शाळेनेच.. सांस्कृतिक कार्यक्रमातून.. खेळातून.. विविध उपक्रमांतून.. जणू ही शाळा आम्हा सगळ्यांना आकार देत होती… घडवत होती.. घडवताना ठोकेही देत होती बरं का…

आज मागे वळून बघताना सगळ अगदी सगळ आठवतं.. अन् या माझ्या विद्यामंदिरा बद्दल मन कृतज्ञतेने भरून येत… त्यावेळी नाही व्यक्त होता आलं.. पण आता या माध्यमातून मला नक्कीच कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे..

मी खूप कृतज्ञ आहे माझ्या शाळेशी..

शतशः नमन तिच्या प्रत्येक पायरीशी ..

तिच्या प्रत्येक कोपऱ्यात साठवलेल्या आठवणींशी…

 

© सौ .कल्पना कुंभार

इचलकरंजी

मोबाईल : 9822038378

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments