श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ बरसात… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
☆
क्षितिजकरांनी शिंपित जीवन, गगन धरेवर झुकले रे
किती दिसांनी आभाळाला, फुटला ऐसा पाझर रे! ..
*
लोट धुळीचे आले उडवित, घोंघावत वादळवारे
बघता बघता होय नभांगण, काजळकाळे सारे रे
वीजशलाका अजस्र कडकड, लखलख उजळत अंबर रे!
*
गगनघोष तो कृष्णघनांचा, दुमदुमतो दाहि दिशांना
पुण्यात्म्याच्या कंठामधली, दिव्यभव्यचि जणु प्रार्थना
जीवनगाणे जयनादाचे, चराचरातुन झंकृत रे!
*
मुकुट धुक्याचे लेवुन सजली, उन्नत पर्वत शिखरे ती
दरीदरीतुन तुषार उडवित, निर्झर सारे झुळझुळती
रुजला अंकुर नवसृजनाचा, उरी धरेच्या गंधित रे!
*
तुडुंब ओहळ, तुडुंब शेते, तुडुंब भरली तळी तळी
भरुन दूथडी नद्या वाहती, दिशान्त बुडले सर्व जळी
येत दर्पणी जलाशयाच्या, इंद्रधनू सतरंगी रे!
*
सुदुर हासती प्रसन्न हिरवी, चिंब भिजूनी वने वने
प्राशून अमृत धारांमधले, झाली हिरवी रणे रणे
अभिषेकामधि मम प्राणांचे, गोकुळ अवघे न्हाले रे!
*
(वृत्त : हरिभगिनी)
(माझ्या ‘ऐलपैल’या कवितासंग्रहातून)
☆
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






