कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # ३१० – विजय साहित्य
☆ ऊनसावली…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(दशाक्षरी)
☆
कोरा कागद, लिहून जातो
अंतर्मनीच्या,भाव भावना
पुस्तकातले, धन शब्दांचे
मने वाचण्या,देई प्रेरणा…!
*
पुस्तक आहे, शाळू सोबती
टिपून ठेवी, प्रवास सारा
वाचत जाता, कथा कविता
मनी नाचतो,मोर पिसारा.
*
पुस्तक पाने,करा बोलकी
वेळ रिकामा, मिळेल जेव्हा
अनुभवाने,अनुभूतींना
रमवा आणि, जगवा तेव्हा.
*
पुस्तक आहे, घर शब्दांचे
घरात त्यांच्या, काळीज ओले
जरा वाचूनी, पहा एकदा
माणुसकीचे, हळवे डोळे.
*
वसा वारसा, ज्ञान दिलासा
मनोरंजना , आतुर पाने
पुस्तक आहे,काळजातले
मंतरलेले, सुरेल गाणे.
*
पुस्तकात ज्या, दिसेल भाषा
आपुलकीची, शब्द आवली
तीच पुस्तके, मनी जपारे
काळजातली,ऊनसावली..!
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





