श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ नाती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
अवतीभवती सगळी नाती उपरी होती
लुबाडणारी घातक टोळी जबरी होती
*
वाटेवरती कुठे माणसे नाही दिसली
एकामागे एक चालली बकरी होती
*
जरा तापल्या उन्हात आली वितळत गेली
बनावटी ही सर्व खेळणी रबरी होती
*
दडके फसवे मजूर होते कामावरती
पैश्या साठी बोगस भरली हजरी होती
*
सोन्यासाठी इथे कशाला भटकत बसला
नीट बघाना हीच बनावट गुजरी होती
*
निमंत्रणाचा सोस कुणाला उरला नाही
स्वागताची मानवंदना छपरी होती
*
लग्नासाठी हीच वेळ तर योग्य वाटते
आज घडीला उपवर झाली नवरी होती
*
वरकरणी जे शिकवले ते नाटक होते
मेघ आतली त्यांच्या लेखी दुसरी होती
*
पाठीवरती हात फिरवता हळहळले ते
नस हाताच्या खाली दबली दुखरी होती
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



