मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कविता… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

श्री विनायक कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ कविता… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆ 

[वृत्त. वनहरिणी (मात्रा ८+८+८+८)]

मी प्रतिभेच्या प्रासादातिल शब्द हवे ते निवडत जातो

वेगवेगळ्या भाव भावना कविते मधुनी गुंफत जातो

यमक साधते नकळत माझ्या वृत्त बद्घता जमून येते

एक एक मी माझी कविता शब्द कृपेने घडवत जातो

काळ सुखाचा असतो जेंव्हा कविता माझी उजळत असते

प्रेमा मधला गंध लेवुनी मनास माझ्या सुखवत असते

क्षण दुःखाचे असता भवती कविता सुध्दा दुःखी होते

तरि आशेचा किरण होउनी धीर देत मज जगवत असते

 *

तिला शारदा बहाल करते अलंकार शब्दांचे भारी

अभंग होते कधी कविता करून येते विठ्ठल वारी

होते दोहा गीत गझल अन् ओवी सुध्दा कविता बनते

स्वातंत्र्याची मशाल बनते अन् क्रांतीची बने तुतारी

 *

ज्ञानोबाची असते वारी ही नाम्याची असे पायरी

अभंग होउन ही तुकयाचे मुक्त हिंडते दारोदारी

मुक्ताईची कान्हाईची जनामायची गाउन ओवी

दळावयाला कांडायाला घरी आणते तीर्थे चारी

© श्री विनायक कुलकर्णी

मो – 8600081092

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- वखरे साहेबांनी माझ्या डोक्यावरचं ओझं किती अलगद उतरवून घेतलं होतं! त्यांचे आभार मानून मी जायला वळणार एवढ्यांत त्यांनी मला थांबवलं.

“लिमये, माझ्या घरच्या जबाबदाऱ्या अजून पूर्ण व्हायच्यात. त्या तशा झाल्या असत्या तर मीही तुम्ही घेतलाय तसाच निर्णय घेतला असता. सोs यू आर आॅन राईट ट्रॅक. गो अहेड. ऑल द बेस्ट. एन्जॉय अॅंड बी हॅप्पी! ” ते म्हणाले होते.

त्यांचे शब्द माझ्यासाठी सदिच्छाच नव्हते फक्त तर त्यांच्या तोंडून ‘तो’ च देत असावा असे आशीर्वादही होते!)

मनाला स्पर्शून गेलेला हाच विचार सोबत घेऊन मी माझ्या केबिनमधे आलो. आता इथला आपला अन्नाचा शेर अल्पकाळाचाच. जाण्यापूर्वी सगळी कामं पूर्ण करायला हवीत. असा विचार करीत मी बसायला माझी खुर्ची ओढली एवढ्यांत माझ्या लक्षात आलं की आजच्या

इनवर्ड मेलमधे आलेलं माझ्या नावाचं एक बंद एन्व्हलप शिपायाने आधीच तिथं माझ्या टेबलवर पेपरवेटखाली ठेवलेलं होतं. पाहिलं तर ते आमच्या नागपूर रिजनल आॅफिसकडून आलेलं होतं. मी ते न फोडता तसंच बाजूला सरकवून पुन्हा त्यावर पेपरवेट ठेवून दिला. आणि माझ्या समोरची इतर महत्त्वाची कामं हातावेगळी करायला सुरुवात केली. कारण त्या पत्रात बाकी दुसरं कांही नसणार हे गृहितच होतं. याआधीही नागपूर रिजनल ऑफिसकडून मला साधारण दोन महिन्यांपूर्वी एक पत्र आलं होतंच. आमची अकोला ब्रॅंच नागपूर रिजनच्या अखत्यारीत होती आणि अकोल्याला माझी ट्रान्स्फर व्हायला निमित्त ठरलेल्या अनियमित कर्ज खात्यांबद्दल जे गंभीर प्रश्न निर्माण झालेले होते त्यामुळे होणाऱ्या बॅंकेच्या आर्थिक नुकसानीला कोण जबाबदार हे ठरवण्याचे प्रोसेस पूर्वीच सुरू झालेले होते. त्या कार्यप्रणालीचाच एक भाग म्हणून आधी आलेले ते पत्र! त्या पत्रात ‘तुम्ही तेथे मॅनेजर म्हणून कार्यरत असताना या बुडीत होऊ पहाणाऱ्या कर्जांची वसुली करण्यासाठी आवश्यक पावले उचलली गेली नव्हती असे निदर्शनास आले आहे. याबद्दलचे आपले म्हणणे आठ दिवसांच्या आत लेखी कळवावे’ असे सूचित केलेले होते. ते पत्र वाचून भीति वाटण्याऐवजी तेव्हा मला हसूच आले होते. कारण मला तो कागदी घोडे नाचवण्याचा हास्यास्पद प्रकारच वाटला होता. खरंतर या गंभीर त्रुटी मी तिथे चार्ज घ्यायच्या आधीच आॅडिटमधेच रिपोर्ट झाल्या होत्या. त्याला जबाबदार असलेल्या आधीच्या मॅनेजरची तेथून उचलबांगडीही झाली होती. आणि ती घाण उपसण्यासाठीच माझी तिथे बदली झाली होती. सेन्ट्रल ऑफिसच्या सूचनेप्रमाणे सहा कर्जखातेदारांविरूध्द क्रिमिनल केसेस् दाखल करून इतर थकीत खातेदारांविरूध्दही वसुलीच्या नोटिसा पाठवून मी पाठपुरावा सुरूही केलेला होता. त्या ब्रँचमधल्या पाच महिन्यांच्या अल्पवास्तव्यात एक जबाबदार ब्रॅंच मॅनेजर म्हणून जे करायचे ते वेळोवेळी रिजनल ऑफिस आणि सेंट्रल ऑफिस या दोघांचेही मार्गदर्शन घेऊन मी तत्परतेने केलेले होते आणि प्रत्येक खात्याबद्दलची रिपोर्टिंग्जही त्या त्या वेळी सर्व वरिष्ठ कार्यालयांना पाठवत आलो होतो. या सगळ्याची मुद्देसूद सविस्तर माहिती देऊन ‘मी माझ्या कर्तव्यात कोणतीही कसूर केलेली नसल्याने होणाऱ्या आर्थिक नुकसानीला मला जबाबदार ठरवता येणार नाही’ असे त्या पत्राला उत्तर दिले होते त्यालाही दोन महिने होऊन् गेले होते. त्यामुळेच आज मला आलेलं ते समोरच्या इन्व्हलपमधलं पत्र हे मी पूर्वी पाठवलेल्या त्या लेखी उत्तराची पोच आणि त्या प्रश्नाला रिजनल आॅफिसने दिलेली क्लिनचीट असणार याबद्दल मला शंका नव्हतीच. पण…?

पण साधारण तासाभराने मला इतर कामांमधूनच थोडा निवांतपणा मिळताच मी ते एन्व्हलप फोडून आतलं पत्र वाचलं आणि मला हादराच बसला. ते मला वाटलं होतं तसं साधं पत्र नव्हतं. ती मला आलेली एक नोटीस होती. क्षणभर कां होईना कांहीतरी अभद्र घडत असल्याच्या आशंकेने मी अस्वस्थ झालो.

‘तुम्ही सदर कर्ज खात्यांबाबतचा पाठपुरावा समाधानकारक केलेला नसल्यामुळे तुम्ही मांडलेली कैफियत स्वीकारता येणार नाही. ‘ असे नमूद करून ‘ सदर खात्यांमधील अनियमितता आणि आर्थिक नुकसानीस तुम्हाला कां जबाबदार धरू नये? ‘ अशी मला बजावलेली ती ‘शो काॅज नोटीस’ च होती.

माझी भूमिका स्वच्छ होती. त्यामुळे ते पत्र वाचल्यानंतर उमटलेली माझी पहिली नकारात्मक प्रतिक्रिया क्षणकाळच टिकली. शांतपणे विचार केल्यानंतर एक गोष्ट मला स्पष्टपणे जाणवली. माझ्या अकोला ब्रॅंचमधील वास्तव्यादरम्यान नागपूरचे तेव्हाचे रिजनल मॅनेजर आणि मी या कर्जखात्यांच्या संदर्भात सतत संपर्कात असायचो. किंबहुना सेन्ट्रल आॅफिस आणि म्हणून झोनल आॅफिस या दोन्हीकडून माझ्या इतकाच त्यांच्यामागेही या गंभीर प्रकरणांबाबतचा ससेमिरा असायचाच. मी आणि ते दोघांच्या जवळजवळ एकाचवेळी प्रमोशन मिळून ट्रान्स्फर्स झालेल्या. आज ते तिथेच असते तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता. पण आता तिथे आलेले नवीन रिजनल मॅनेजर आम्हा कुणालाच ओळखत नव्हते. त्यामुळे त्यांनी चुकीच्या पध्दतीने धसाला लावलेल्या या प्रश्नात ते मलाही गुंतवू पहात होते. त्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश होता ते मला समजत नव्हतं. मी कितीही निर्दोष असलो तरी ते सिद्ध करून यातून बाहेर पडणं अवघड नसलं तरी मनस्ताप देणारं आणि वेळखाऊ ठरणारंही होतं. जे करायचं ते अतिशय विचारपूर्वक आणि शांतपणे करायला हवं आणि तेही ताबडतोब हे माझ्या लक्षात आलं!

स्वेच्छानिवृत्तीसाठीची ती आकर्षक योजना, सर्वांशी मोकळेपणाने चर्चा करून त्यासाठी अर्ज करायचा मी घेतलेला निर्णय, त्यामधे सेंट्रल आॅफिसच्या नुकतेच प्रमोशन मिळालेल्या आम्हा सर्वांच्या संदर्भातल्या धोरणामुळे निर्माण झालेली अनिश्चितता हे सगळे अडसर वखरेसाहेबांशी मोकळेपणाने चर्चा केल्यानंतर दूर झालेत असं वाटलं होतं पण तो असा एक चकवाच ठरला होता तर! दु:ख माझ्या स्वेच्छानिवृत्तीत आता पुन्हा अडसर निर्माण होणार याचं नव्हतंच. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण कांहीही करू शकत नाही याचं दु:ख होतं!

आज जवळजवळ पंचवीस वर्षांनंतर या सगळ्याच घटनांकडे वळून पहाताना मला माझ्या बाबांचे शब्द आठवतात.

‘कर्ता करवता ‘तो’च. आपण फक्त निमित्तमात्र’ असं ते म्हणायचे. त्याचा नेमका अर्थ या सर्व घटनाच मला समजावून सांगू पहातायत असंच वाटू लागलं!

आज आलेलं हे पत्र वाचण्यापूर्वी फक्त तासभरच आधी मी माझ्या स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयाला वखरेसाहेबांची संमती घेऊन बाहेर पडलो होतो ते जग जिंकून आल्याच्या आनंदातच! वखरेसाहेबांना मी माझ्या या निर्णयामागची माझी भूमिका

मोकळेपणाने समजावून सांगितल्यानेच त्यांनी मनापासून आपल्याला पाठिंबा दिला असंच मला वाटलं होतं. इथं समोर हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अपेक्षित अशा वळणावर वळायचं कीं आहे त्या सरळ रस्त्यानेच पुढे जात रहायचं याचा निर्णय घेणारा आता मीच आहे असंच मला वाटलं होतं! माझ्या मनात आलेल्या या ‘मी’ मधे कणभर कां होईना ‘अहं’ होताच! पण नंतर अगदी

अल्पकाळातच तो ‘अहं’ पूर्णतः नाहीसा झाला तो हे पत्र आल्यानंतर! आता मी करतो म्हणून कांहीही होणार नाहीय यांची स्पष्ट जाणीव मला झाली. मी निमित्तमात्र आहे आणि करता करवता ‘तो’च आहे हेच खरे! आता या क्षणी ‘तो’ बुध्दी देईल तसं करत जायचं आणि जे घडेल तेच ‘त्या’चा प्रसाद म्हणून स्वीकारायचं. तो अन्याय असो वा अन्यायाचं निराकरण. असं ठरवलं आणि मन शांत झालं. त्याचवेळी अचानक इंटरकाॅमवर वखरेसाहेब…!

“लिमये, तुमचा अॅप्लीकेशन फाॅरवर्ड करायला आत्ताच स्टाफ डिपार्टमेंटला पाठवलाय. आता लगेचच तुम्ही व्ही. आर. एस. घेताय ही बातमी आपल्या ऑफिसमधे षटकर्णी होईल बघा… ‘ असं म्हणून ते गंमतीने हसत होते. पण.. ते ऐकून मनाला स्पर्शू पहाणारा आनंद मात्र माझ्या हातातल्या ‘त्या’ पत्राकडे लक्ष जाताच मलूल होऊन गेला..!

या पत्राबद्दल वखरे साहेबांना आत्ताच कल्पना द्यायला हवी. माझा अॅप्लीकेशन फाॅरवर्ड होण्यापूर्वी त्यांना हे समजायलाच हवं.. ‘ मी भानावर आलो. झरकन् उठून बाहेर आलो. ‘ते’ पत्र हातात घेऊन वखरेसाहेबांच्या केबिनकडे धाव घेतली…! माझी पावलं या क्षणी प्रकाशवाटेकडे धाव घेतायत कीं मिट्ट काळोख्या अंधारवाटेकडे हे मात्र फक्त ‘त्या’लाच,… त्या कर्त्या-करवत्यालाच माहित होतं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आत्मनिर्भर — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ मुखवटे — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

भावनाला या ऑफिस मध्ये नोकरी मिळाल्यावर तिचा आनंद गगनात मावेना. इतके दिवस तिला एमबीए असूनही मनासारखी नोकरी मिळत नव्हती. या ऑफिसचे जॉइनिंग लेटर आल्यावर भावना मनापासूम खूषच झाली.

पहिल्या दिवशी ऑफिस मध्ये गेल्यावर शेजारच्या क्युबिकल मध्ये बसलेला हसतमुख तरुण हिला बघून बाहेर आला.

हॅलो, मी भार्गव परचुरे. तुमच्या आधी सहा महिने जॉईन झालो. वेलकम टू होरायझन कंपनी.

आपल्याएवढाच असलेला हा हसतमुख तरुण बघून भावनाला हायसं झालं. त्याने सगळ्या स्टाफशी तिची ओळख करून दिली.

हे तुमचं टेबल. त्याने तिला तिचं टेबल दाखवलं आणि तो कामाला निघून गेला.

भावना मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबातली मुलगी. चार खोल्यांचा साधासुधा फ्लॅट आणि आईवडील भाऊ आणि ही असं कुटुंब.

भावना दिसायला सुरेख स्मार्ट तर होतीच. जरा महत्त्वाकांक्षी आणि उच्च रहाणीची आवड असलेली सुद्धा.

ऑफिसमध्ये भावना चार महिन्यात रुळून गेलीसुद्धा. तिची आणि भार्गवची चांगली मैत्री झाली.

अचानक ऑफिस मध्ये मुंबईहून बदलून एक स्मार्ट तरतरीत तरुण जॉईन झाला. हॅलो मी मकरंद साने.

त्याने सगळ्याना आपली ओळख करून दिली.

किती स्मार्ट होता मकरंद. किती पॉश कपडे होते त्याचे. त्याच्या परफ्यूमने ऑफिसमध्ये सुंदर गंध दरवळला.

मकरंद पण होता एमबीए. भावनाच्या पलीकडेच त्याचे टेबल होते.

आता टिफिन च्या सुट्टीत भार्गव आणि भावनाबरोबर मकरंद पण त्यांना जॉईन झाला. , मकरंदचं घर मुंबईला होतं. इथे मात्र तो एका मित्राबरोबर रूम शेअर करून रहात होता.

“मी पुण्याला कायम नाही रहाणार रे बाबा. लवकर मुंबईला जातो बघ खटपट करून. माझं स्वतःचं सुंदर घर आहे मुंबईला. मकरंद म्हणायचा.

भार्गवपेक्षा भावना पटकन आकर्षित झाली मकरंदकडे. भार्गव ला टाळून बऱ्याच वेळा ती त्याच्या मोटर सायकलच्या मागे बसून लांब लंचला जाई.

भार्गव हे निमूटपणे बघत होता.

भार्गव एकदा म्हणाला”काय भावना,, काय म्हणतोय नवा मित्र?

 बरेच वेळा दिसतेस हल्ली मकरंद बरोबर. लग्न झालंय बरं का त्याचं.

सांगितलं असेलच तुला ना. ”

“भार्गव, बरीच माहिती आहे रे तुला बाकीच्या जगाची. हो, सांगितलं आहे बरं त्याने. ”भावनाला राग आला भार्गवचा.

भार्गव हसला म्हणाला” हे बघ. ते काहीही असो. माझं प्रेम आहे तुझ्यावर. ते काही कमी होणार नाही. करतेस का लग्न माझ्याशी?

आपलं बाबा सगळं सरळसरळ असतं. मी एकुलता एक आहे.. श्रीमंत नाही पण परिस्थिती मस्त आहे आमची. जबाबदारी नाही काही. बघ. विचार कर”.

भावना म्हणाली “, काही नको. मला नाही लग्न करायचं इतक्यात. ”

भार्गव म्हणाला ओके. पण विचार करशील तेव्हा माझं नाव लक्षात असू दे म्हटलं. आपलं प्रेम आहे तुझ्यावर. ”भार्गव हसून तिथून निघून गेला.

भावनाला हसू आलं. तिला भार्गव मनापासून आवडायचा पण आता मकरंदने तिला चांगलीच भूल घातली होती.

त्या दिवशी मकरंद आणि भावना सहज लॉंग ड्राईव्हला गेले.

भावना म्हणाली, काय रे मकरंद, बायको कशी आहे तुझी?

सांगितलं नाहीस मला तिच्याबद्दल काहीही. ”

मकरंदचा चेहरा पडला. ”अग काय सांगायचं, सांगण्या सारखं काहीही नाही ग. अगदी दुर्मुखलेली आणि रडतराव आहे आमची लीना मॅडम. सतत तक्रारी.

मी म्हणून सहन करतोय बरं. पण आमचं अजिबात पटत नाही ग भावना. मला तुझ्यासारखी बायको मिळालीअसती तर किती भाग्यवान ठरलो असतो मी.

मी घटस्फोट घ्यायच्या विचारात आहे. ते सगळं झालं की करशील माझ्याशी लग्न? थांबशील ना माझ्यासाठी? ”मकरंद डोळ्यात पाणी आणून म्हणाला.

भावना म्हणाली, ते बघू नंतर. आधी म्हणतोस तसा नक्की घटस्फोट तर घे”. मकरंद म्हणाला, गेले कित्येक वर्षे माझा तिच्याशी शारीरिक संबंध पण आलेला नाही. त्याही बाबतीत सगळा उजेडच आहे लीनाच्या बाबतीत. ” 

मला तुझ्यासारखी रसिक हुशार आनंदी मुलगी हवी होती ग बायको म्हणून. ”मकरंदने सुस्कारा सोडला. भावनाला त्याच्याबद्दल मनापासून वाईट वाटलं. देव तरी कशा विजोड जोड्या जमवतो ना. तिच्या मनात आलं.

त्या दिवशी ती घरी गेली तर तिला आश्चर्याचा धक्काच बसला.

हॉलमध्ये भार्गव खुशाल तिच्या आईवडिलांशी गप्पा मारत होता.

चहा झालेला दिसत होता.

भावना आल्याबरोबर भार्गव म्हणाला “या या. तुमचीच वाट बघत होतो. आई, चहा द्या ना भावनाला. खूप काम असतं हो हल्ली आम्हाला ऑफिस मध्ये. ’ भावना ओरडून म्हणाली, तू इथं आमच्या घरी काय करतो आहेस भार्गव? ”

भावनाचे वडील म्हणाले, भावना ही काय पद्धत ग तुझी बोलायची?

सॉरी म्हण त्यांना आधी.

समोरच्या गुप्तेकाकांना त्यांचे पार्सल द्यायला आले होते हे. सहज आपलं नाव बघितलं आणि मग तुझं नाव घेऊन म्हणाले, हिच्याच ऑफिस मध्ये मी काम करतो.

आम्हीच बोलावलं त्यांना चहाला. ”

भार्गव हसत होता.

भावना अगदी ओशाळून गेली.

सॉरी हं. मला नव्हतं माहीत. ”ती नरमाईने म्हणाली. होतं असं कधीकधी भावना. भार्गव म्हणाला.

चलो बाय. भेटू पुन्हा म्हणत तो निघून गेला.

आई म्हणाली”, किती चांगला मुलगा आहे ग हा. गुप्ते काका आजारी असतात ना, त्याच्या वडिलांचे मित्र आहेत ते. हा मुलगा त्यांची औषधे न चुकता आणून देतो.

त्याला नव्हतं माहीत ग की हे तुझं घर आहे ते. ”

भावनाला अगदी गिल्टीवाटलं. सॉरी हो बाबा. चुकलंच माझं. ”

उद्या मी सॉरी म्हणेन त्याला पुन्हा. ”

त्या नंतर भावनाचे पंधरा दिवस अगदी गडबडीत गेले. वर्क लोड खूप होतं आणि मकरंद दोन आठवडे रजेवर होता. त्याचेही काम भावनालाच बघायला लागलं. हा मकरंद फोनसुद्धा का उचलत नाहीये म्हणून चिडचिड झालीच होती तिची.

त्या दिवशी लंचब्रेक मध्ये भार्गव म्हणाला, मला ऑफिसच्या कामासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईला जावं लागणार आहे आपल्या हेड ऑफिसला.

भावना येतेस का तू पण मुंबईला? टाक की एक दिवस रजा.

माझं काम झालं की मस्त हिंडू. आणि आणखी एक तुला आवडेल असं काम.

ऑफिसमधून मकरंदचा पत्ता घेऊ आणि त्याला सरप्राईज म्हणून भेटून पण येऊ. आवडेल तुला? ”भार्गवने तिला आवर्जून विचारलं.

भावनाला त्याचं मनापासून कौतुक वाटलं. किती सरळ आहे हा मुलगा. माझी मकरंदशी वाढत असलेली मैत्री बघूनही हा जेलस नाही होत.

भार्गव तिला आणखीचआवडायला लागला.

“खरंच की रे भार्गव. जाऊया का आपण? येते मी तुझ्याबरोबर. मस्त आऊटिंग होईल मला बघ. आणि खरंच भेटून येऊ मकरंदला. सरप्राईज देऊ त्याला. ”भावना आनंदाने म्हणाली.

भावनाने त्या दिवशी रजा टाकली.

भार्गवला ऑफिस मुंबईला जाण्यासाठी कार देणार होतं.

मग तर काय.

भावनाला न्यायला भार्गव तिच्या घरी गेला.

भावना तयार होऊन खाली आली. “माय माय. कसली ग वंडरफुल दिसते आहेस तू या ब्लॅक टाईट्स आणि मरून टॉप मध्ये. मार्व्हलस”.

भार्गवने दिलखुलास पावती दिली.

कार मुंबईच्या दिशेने धावू लागली.

वाटेत गप्पा मारताना भावनाच्या लक्षात आलं किती हुशार आणि बहुश्रुत आहे भार्गव. इंग्लिश आणि मराठीही तो अफाट वाचतो. त्याचे जनरल नॉलेज फारच छान आहे.

नकळत तिच्या मनात आलं, मकरंद किती कमी आहे याच्यापुढे.

सिनेमाशिवाय आणि त्यांच्या गॉसिपशिवाय त्याला कशातच इंटरेस्ट नसतो. फक्त छान कपडे हॉटेलिंग आणि खरेदी यापलीकडे जग नाही मकरंदचं.

भार्गवचं ऑफीसचं काम झालं.

त्याने भावनाला एका सुंदर हॉटेल मध्ये नेलं. समुद्रकाठी असलेलं ते सुंदर हॉटेल, नारळाच्या झावळ्यानी बनवलेल्या छोट्या हट्स. आणि सुंदर जेवण. बरोबर असलेला हा उमदा हुशार तरुण. इतका आनंद आपल्याला आजपर्यंत मकरंदच्या सहवासात अनेक वेळा राहूनही मिळाला नाही असं भावनाच्या मनात आलंच. पण तरीही मकरंद ची मोहिनी काही उतरत नव्हती भावनाच्या मनावरून.

“चला. आता जायचं ना मकरंदच्या घरी? मी ऍड्रेस घेतलाय त्याचा. ” भार्गव म्हणाला.

“हो जाऊया. किती आनंद आणि आश्चर्य वाटेल ना त्याला. ’ भावना म्हणाली.

भार्गव म्हणाला “, मला बघून नाही पण तुला बघून मात्र नक्की होईल आनंद त्याला. ” भावना हसली आणि म्हणाली, “ शेवटी पुरुष ते पुरुषच. चला आता मकरंदच्या घरी.”

ड्रायव्हरने दिलेल्या पत्त्यावर बरोबर कार नेली. एका सोसायटीमध्ये रो हाऊसच्या रांगेत एका बंगल्यासमोर कार उभी राहिली. बाहेरची पाटी मात्र सांगत होती, हे कोणा कर्नल पाटणकर यांचे घर आहे. श्री व सौ पाटणकर.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रेडिओ आणि मी… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ रेडिओ आणि मी ☆ संगीता कुलकर्णी ☆

(१३ फेब्रुवारी “जागतिक रेडिओ दिन” निमित्त.) 

मी सकाळी वर्तमानपत्र वाचत मोबाईल वर लावलेली गाणी ऐकत असताना ” ‘लग जा गले के फिर ये हंसी रात…’’ या सुमधुर गाण्याने माझे लक्ष वेधून घेतलं.. आज पुन्हा आठवलं नव्यानं…!

या निमित्ताने रेडिओच्या दिवसांतील माझ्य अनेक आठवणी मात्र जाग्या झाल्या… काही गोष्टी, आठवणी वस्तू अक्षरश: आपलं आयुष्य घडवतात. आणि अंशी आयुष्य बनूनच राहतात..!

रेडिओचे दिवस किती रम्य दिवस होते ते आणि त्या अविस्मरणीय आठवणी… आठवण एवढ्याचसाठी म्हटलं कारण माझ्या आयुष्यात त्याचं एक वेगळ स्थान होतं…! ती जुनी गाणी ऐकताच माझे मन नकळतच जुन्या आठवणीत रमून गेले.. आठवू लागले लहानपणीचे रम्यदिवस.. रेडिओच्या आठवणीचे..!

टीव्हीच्या आगमनापूर्वी रेडीओ या श्राव्य माध्यमाने माझ्यावर अधिराज्य केले किंबहुना तो माझा जीवन साथीच होता म्हणा ना..!

लहानपणापासून माझे व रेडिओ चे अतूट असं एक नात…!

सकाळी विविध भारतीच्या सिग्नेचर ट्यूनच्या आवाजाने जाग यायची.

सकाळची कामे उरकता उरकता ‘संगीत-सरिता’ कानावर पडायचं. हा शास्त्रीय-संगीतावर आधारित छान कार्यक्रम असायचा. एखादा राग निवडून त्याची वैशिष्ट्ये, त्याचे आरोह-अवरोह दिग्गजांच्या तोंडून ऐकायला मिळत. त्या दिवशीचे सन्माननीय अतिथी असलेले शास्त्रीय गायक, वादक त्या रागावर आधारित आपली पेशकश करत असत. त्या काळात या कार्यक्रमातून अनेक दिग्गज प्रभृती पेश झालेत हे विशेष. त्यानंतर त्या रागावर आधारित अशी एखादी धून किंवा चित्रपट गीत ऐकवलं जाई… रेडिओ सिलोन’ वरचा ‘पुराने फिल्मों के गीत’ हा कार्यक्रम…! “फौजी भाईयों की पसंद के फिल्मी गाने..! या कार्यक्रमासोबत मदमस्त गाण्यांचा सिलसिला…!

ऐकलेल्या गाण्यांचा कैफ मनावर ताजा असतानाच प्रादेशिक संगीत, हवामहल, चित्रलोक, भुले बिसरे गीत, भावसरगम, फिल्मसंगीत इ. अशा एकाहून एक सरस कार्यक्रमांची रेलचेल.. अभ्यासातल्या कविता चटकन पाठ होत नसत पण रेडिओवरच्या जाहिराती, जिंगल्स आजही लक्षात आहेत. ‘ये ढेर से कपडे मैं कैसे धोऊं…’, ‘रंग जमाता है कोकाकोला…’, ‘पापा पापा आए, हमारे लिए क्या लाए…’ ‘तंदुरुस्ती की रक्षा करता है …’ वगैरे वगैरे… रेडिओवरचा खास जिव्हाळ्याचा प्रोग्रॅम म्हणजे अमीन सायानीजी यांचा ‘बिनाका गीतमाला’… ‘ जीऽऽ हां… भाईयों और बहनो ” असं आपलेपणाने अँकरिंग करणारे अमीन सयानजी केक पायदान पेश करत.. बिनाका गीतमालाचा कार्यक्रम म्हणजे गाण्यांची मेजवानीच…! गाण्यांशी माझं भावविभोर विश्व निगडीत होतंच की..! मी कागद-पेन घेऊन ती यादी लिहून काढायची. वर्षभरातच्या आपल्या आवडत्या गाण्यांशी ती ताडून पाहायची.. रेडिओमुळे अनेक गीतांचे गीतकार, संगीतकार, गायक नीट लक्षात रहायचे.

विविधभारती वर गाणे लावण्यापूर्वी अगदी स्पष्ट आणि खणखणणीत आवाजात निवेदक वा निवेदिका सांगायचे.. “आईये, अब सुनते है, आशा भोसले और किशोर कुमार की आवाज में, शैलेंद्र का लिखा गीत, संगीत से सवांरा है एस डी बर्मनने और फिल्म का नाम है… ” किती छान वाटायचं हे ऐकताना..! इतकच काय तर क्रिकेट समालोचनात सर्वात आवडते म्हणजे सुरेश, सरय्या

किती मधाळ बोलणे अन ओघवती भाषा.!

अक्षरक्षः एका मागे एक अमॄतधारांचा वर्षावव..!!

रेडिओवर गाणी ऐकतच मी लहानाची मोठी झालेली.. इतकच काय रेडिओमुळे बर्‍याच जुन्या गाण्यांशी माझा दोस्ताना ही झाला होता… ती ‘भुली-बिसरदी यादें’, ‘बेला का फूल’! … विविध भारतीवरील अनेक कार्यक्रम (तेव्हाचे आणि आताचे). कॉलेजात असताना मी ‘साज और आवाज’ खूप आवडीने ऐकायचे. काही जाहिराती तर पाठ झाल्या होत्या. जशा की…

फिनोलिक्स नं आणलं पाणी…

प्रकाशचे माक्याचे आयुर्वेदिक तेल 

असे अजून बरेच काही आहे…

खरंच..! आठवणींचे मोहोळ उठलं..

या रेडिओच कलेच्या क्षेत्रात मोठं योगदान आहे. कित्येक कलाकार या रेडिओने घडवलेत. रेडिओवर नेहमी काही ना काही कार्यक्रम होत असत. त्यात नव्या कलाकारांना संधी मिळताच त्या संधीचं सोनं करीत असत. या कार्यक्रमाच्या अमृतमंथनातून अनेक रत्ने गवसलीत… ज्यांचे नाव उच्चारताच आजही माझे हात आदरानं कानाच्या पाळीकडे आपसूकच जातात..!

खरचं… रेडीओला पर्यायच नाही. मग युट्युब असो वा काहीही..! कारण किती तरी सुंदर निवेदने, अनेक सुंदर कार्यक्रम ऐकता येतात रेडिओ वरती… रेडिओ तो रेडिओच…! रेडिओला पर्यायच नाही…!

माझ्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलेला पण मध्ये विस्मरणात गेलेला हा रेडिओ,, आता, हवा का रुख देखकर, त्यानं आता नवं रुप धारण केलंय बरं…! . एफ. एम. रेडिओ..!! एफ. एम. आले तेच वाजतगाजत. या एफ. एम. मुळे गाणी ऐकण्याच्या आवडीला पुन्हा खतपाणी मिळालंय. पुन्हा रेडिओ माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग झाल्याचं पाहून मी मनोमन सुखावली..!

माझ्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलेला हा रेडिओ माझी व रेडीओची पुनर्भेट म्हटलं तर वावग ठरणार नाही..!

आज आपण टेक्नॉलॉजिमध्ये कितीही पुढे गेलो असलो आणि मनोरंजनाच्या साधनामध्ये वैविध्यता आणली तरी ‘रेडिओ’ या श्राव्य माध्यमाची जी जादू आणि विश्वासाहर्ता आहे ती आजही टिकून आहे. रेडिओ हे संवादाचे जुने माध्यम असले तरी, संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून आजही पाहीले जाते.

ज्या रेडिओने मला गाण्यांचे वेड लावले, जगातील घडामोडींचे अपडेट्स दिले.. या आणि अशा कितीतरी रेडिओच्या आठवणी मनात आजही घर करून उभ्या आहेत..

रेडिओची त्या सुवर्ण कामाची आठवण काढीत मी गुणगुणत राहिले

“दिल ढुंढता है, फिर वही, फुरसत के रात दिन, “..!!

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आजारपणाची गंमतगोष्ट…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “आजारपणाची गंमतगोष्ट…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

आमच्या लहानपणी साधं सरळ आयुष्य होतं. ब्रेकफास्ट म्हणजे फोभा, फोपो किंवा पोहे… अगदी क्वचित कधीतरी रविवारी वडील पाव आणायचे. मग त्या दिवशी आम्हा तिन्ही भावंडांना चहा मिळायचा.

 इतर वेळेस आई सांगायची, ” लहान मुलांनी चहा प्यायचा नसतो. “

 यावर का? कशाला? वगैरे प्रश्न आम्ही विचारत नव्हतो. कारण वडीलधारे सांगतात ते बरोबरच असणार ही खात्री होती.

जेवणात पोळी, भाजी, भात, वरण थोडीशी कोशिंबीर. सकाळचं राहिलेलंच रात्री खायचं. त्याच्या जोडीला मुगाची खिचडी नाहीतर डाळ फळ… पानात टाकायचं नाही आणि वाया घालवायचं नाही हा नियमच होता.

त्या काळी सगळेच जण असं साधं सात्विक अन्न खात असल्याने आजारपण कोणाला फारसे नसायचेच.. आणि झाले तर अगदी साधे आजार होत असत. लगेच त्यावर आजीचे घरगुती उपचार सुरू व्हायचे…

पोट दुखण… हा आजार मधून मधून व्हायचा. त्यावर कधी, काय, किती खाल्लंय याचा विचार करून आई आणि आजी कुठलं औषध द्यायचं ते अचूक ठरवायच्या.

कधी ग्लासभर लिंबाच सरबत आजी द्यायची. वर बजावून सांगायची, ” घटाघटा पिऊ नको. थोडं थोडं थांबून घे. “

आता लक्षात येतं.. साखर, मीठ, पाणी म्हणजे ते ओरल सलाईनच असायचं. रात्री थोडंसं दूध घातलेली साबुदाण्याची खीर द्यायची. त्याने दुसरे दिवशी पोट एकदम बरे व्हायचे.

दुसरा इलाज म्हणजे तिखट बाळांतशेपा चावून खायला सांगायची. ते नको म्हटलं की उकळून त्या पाण्यात साखर घालून द्यायची.

ओवा भाजून तो हातावर चोळून लहान मुलांच्या पोटाला चोळायची. त्यानी कुरकुरणारं बाळ शांत झोपायचे.

गरम दुधात तूप घालून द्यायची. त्यांनी पोट मऊ पडतं(म्हणजे काय होत कोण जाणे) असं ती सांगायची. त्या दोघी हे कुठून शिकल्या याच आम्हाला आश्चर्य वाटायचं.

खोबरेल तेल तर बहुऊपयोगी होते. कान दुखला की चार थेंब कानात, लहान मुलांचे पोट दुखलं की कोमट करून ते बेंबीत थोडं थोडं घालायचं. केस चांगले वाढण्यासाठी रविवारी अंघोळीच्या आधी केसांना भरपूर खोबरेल तेल लावायचं. नंतर एक तासाने शिकेकाईनी केस धुवायचे.

थंडीत तेल पायाला लावायचं… तेच आमचं स्क्रीन लोशन असायचं. आणि गंमत म्हणजे त्याचे कुठले साईड इफेक्ट कधी व्हायचे नाहीत.

घसा दुखत असला की लवंग भाजून पूड करायची ती मधात खलून त्याच चाटण करून द्यायची.

सुंठ पूड विकत मिळायची. पण ती महाग असायची. आजी घरीच खलबत्त्यात सुंठ कुटायची. गरम पाण्यात साखर, सुंठपुड घालून ती प्यायला द्यायची. गवती चहा पाण्यात घालून त्याच्यात अजून काही काही घालून त्याचे काढे आम्हाला प्यायला द्यायची.

एवढ्या तेवढ्याला डॉक्टरांकडे जायचं नाही हे ठरलेलं असायचं. ताप आला तर मात्र डॉक्टरांना दाखवायच.

जवळच सिंधूताई आपटे यांचा दवाखाना होता. त्यांच्याकडे गेलं की त्या आ करायला सांगून जीभ बघायच्या. श्वास आत बाहेर करायला सांगून छाती तपासायच्या. बसं ईतकच… लगेच त्यांच्याकडच्या तयार असलेल्या पांढऱ्या गोळ्यांच्या पुड्या द्यायच्या. सोबत औषधाची बाटली… त्यावर शंकरपाळ्याच्या आकाराचा पांढरा कागद डोस किती घ्यायचा याच्या खुणेसाठी चिटकवलेला असायचा. त्यातल लालसर गोड औषध आम्हाला फार आवडायचं. दोन दिवसात ताप गायबच व्हायचा.

खेळताना भावाचा पाय मुरगळला आणि सुजला होता. आईनी लगेच रक्तचंदनाची बाहुली सहाणे वर उगाळायला घेतली. त्याचा घट्ट लेप भावाच्या पायाला लावला. ” जसजसं वाळेल तसं आकसून सूज आपोआप कमी होईल. “ती म्हणाली आणि खरंच तीन-चार दिवस लेप लावल्यानंतर सूज उतरूनच गेली.

कधी पाय दुखायला लागला की आजी तिळाच तेल लावून चोळायला सांगायची. घसा दुखत असला की गरम हळद दूध ती देत असे.

“गरम तव्यावर फडक गरम करून त्याने छाती शेकली की कफ सुटतो आणि खोकला लगेच बरा होतो. “आजी हे इतकं ठामपणे सांगायची की आम्हाला ते ऐकूनच बरं वाटायला लागायचं.

पाळी आली की पोटात दुखतय म्हंटलं तर आई सांगायची,

“प्रत्येक बाईला त्या दिवसात दुखत असतं. बाईंनी तेवढं सहन करायला शिकायलाच पाहिजे. त्यासाठी औषध घ्यायचं नाही. पुढं बाळंतपणाच्या कळा सोसायला बाईच शरीर तयार होत असतं. ” आईच्या या वाक्याचा अर्थ पुढे फार उशिरा कळला.

सायकल शिकताना गुडघे फुटणार.. हे इतकं गृहीत धरलं होतं की त्याचं काहीच वाटायचं नाही. नुसतं पाण्याने धुऊनही गुडघे बरे व्हायचे.

वर आजी म्हणायची, ” पडो झडो माल वाढो”.

वडिलांची पाठ दुखायला लागली की ते भिंतीजवळ पालथे झोपत. मग मी भिंतीचा आधार घेऊन त्यांच्या पाठीवर ऊभ राहून इकडे तिकडे अस करत चेपुन देत असे. आता हा ऊपचार आठवला तरी गंमत वाटते.

सकाळी झालेला आजार आजीच औषध घेऊन संध्याकाळी एकदम बरा होऊन जायचा. शाळा बुडवली असेल तर आज बाईंनी काय शिकवलं ते विचारायला संध्याकाळी मैत्रिणीकडे पळायच. इतक सोप जगणं होत.

आत्ताही बरं वाटलं नाही की आई आजींची औषधचं आधी मी घेऊन बघते…

त्या औषधात माया, आपुलकी, प्रेम होतं. त्या औषधाने मला बरं वाटणार… ही श्रद्धा पण होती. शरीराला मनाची साथ असल्याने आजार बरे व्हायचे. आईच्या उबदार कुशीत झोपताना आईचा हात कपाळावरून फिरला की निम्म दुखणे तिथेच पळून जायचं…

किती गोड दिवस होते ते…

 म्हणूनच त्या आठवणी आज तुम्हाला वाचण्यासाठी पेटीतून बाहेर काढल्या…

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कालगणना आणि दिनदर्शिका… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ कालगणना आणि दिनदर्शिका… ☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतातील कालगणनेचा इतिहास हा केवळ दिवस, महिने आणि वर्षे मोजण्याचा तांत्रिक प्रश्न नसून तो मानवी संस्कृती, धर्म, शेती, राज्यव्यवस्था आणि वैज्ञानिक समज यांच्याशी घट्ट जोडलेला आहे. मानवाने ज्या क्षणी ऋतूंचे पुनरावर्तन, चंद्राची कला आणि सूर्याच्या गतीचा अभ्यास सुरू केला, त्या क्षणी कालगणनेची गरज निर्माण झाली. भारतीय उपखंडात ही प्रक्रिया अतिशय प्राचीन काळात सुरू झालेली दिसते. वैदिक काळातच दिवस, रात्र, मास, ऋतू आणि वर्ष यांचा उल्लेख आढळतो. ऋग्वेद, यजुर्वेद आणि ब्राह्मणग्रंथांमध्ये चंद्राच्या कलांवर आधारित मासांची आणि सूर्याच्या गतीवर आधारित ऋतूंची सूक्ष्म निरीक्षणे नोंदलेली आहेत. त्यामुळे भारतातील कालगणनेचा पाया हा खगोलशास्त्रीय निरीक्षणांवर आधारित होता, केवळ धार्मिक कर्मकांडापुरता मर्यादित नव्हता.

प्राचीन भारतात पंचांग ही संकल्पना विकसित झाली. पंचांग म्हणजे पाच अंगांवर आधारित कालगणना—तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. यातील तिथी ही चंद्राच्या स्थितीवर आधारित असल्याने भारतीय पंचांग मुख्यतः चांद्र कालगणनेवर आधारित होते. अमावास्या ते पौर्णिमा आणि पुन्हा अमावास्या असा चंद्राचा एक फेरा म्हणजे एक मास अशी संकल्पना रूढ झाली. परंतु केवळ चांद्र मास स्वीकारल्यास ऋतूंचा मेळ बसत नाही, हे भारतीय खगोलशास्त्रज्ञांच्या लक्षात आले. चंद्रवर्ष हे सुमारे ३५४ दिवसांचे असते, तर सौरवर्ष सुमारे ३६५ दिवसांचे. त्यामुळे दरवर्षी सुमारे अकरा दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी अधिक मासाची संकल्पना विकसित करण्यात आली. यामुळे भारतीय चांद्र-सौर पद्धतीचा जन्म झाला. धार्मिक सण, व्रते आणि विधी चांद्र मासांवर आधारित राहिले, तर ऋतूंची संगती राखण्यासाठी सौर गतीचा विचार करण्यात आला.

ही पंचांग व्यवस्था भारतीय समाजाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली. शेती, लग्ने, उत्सव, यात्रा, राजकीय निर्णय आणि युद्धसुद्धा शुभ तिथी-नक्षत्र पाहूनच ठरवले जात. त्यामुळे पंचांग हे फक्त दिनदर्शिका नसून समाजनियंत्रणाचे आणि सांस्कृतिक सलगतेचे साधन होते. प्रत्येक प्रांतात स्थानिक खगोलशास्त्रज्ञांनी आणि पंडितांनी आपापल्या पंचांगांची निर्मिती केली. त्यामुळे कालगणनेत एकसंघता न राहता विविधता निर्माण झाली. एकाच दिवशी वेगवेगळ्या पंचांगांमध्ये तिथीभेद आढळू लागला. ही विविधता धार्मिक दृष्ट्या स्वीकारली गेली, पण प्रशासकीय आणि वैज्ञानिक दृष्ट्या ती अडचणीची ठरू लागली.

जगाच्या इतर भागांतही कालगणनेचा विकास वेगवेगळ्या मार्गांनी झाला. प्राचीन इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुरावर आधारित सौर कालगणना विकसित झाली. बाबिलोनियन संस्कृतीत चांद्र-सौर पद्धत होती. ग्रीक आणि रोमन साम्राज्यांत सुरुवातीला चांद्र पद्धतीचा वापर झाला, पण पुढे सौर कालगणनेचे महत्त्व वाढले. रोमन सम्राट ज्युलियस सीझरने इ. स. पू. ४६ मध्ये ज्युलियन कॅलेंडर लागू केले, जे पूर्णतः सौरवर्षावर आधारित होते. मात्र या कॅलेंडरमध्ये वर्षाची लांबी थोडी जास्त धरली गेल्याने शतकानुशतके जाताना ऋतू आणि दिनांक यांत फरक पडू लागला.

हा फरक दुरुस्त करण्यासाठी १५८२ साली पोप ग्रेगरी तेराव्याने ग्रेगोरियन कॅलेंडर लागू केले. यात लीप इयरची सुधारित पद्धत स्वीकारली गेली. या कॅलेंडरमुळे सौरवर्ष आणि दिनदर्शिका यांचा मेळ अधिक अचूक बसला. सुरुवातीला हे कॅलेंडर केवळ ख्रिस्ती राष्ट्रांतच स्वीकारले गेले, पण व्यापार, वसाहतवाद आणि वैज्ञानिक संवाद यांमुळे हळूहळू ते जागतिक स्तरावर प्रचलित झाले. आधुनिक विज्ञान, उद्योग आणि जागतिक व्यवहारांसाठी एकसमान कालगणना आवश्यक असल्याने ग्रेगोरियन कॅलेंडर आंतरराष्ट्रीय मानक बनले.

भारतावर ब्रिटिश राजवटीत ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर प्रशासकीय पातळीवर सुरू झाला. न्यायालये, महसूल व्यवस्था, शिक्षण आणि लष्करी कारभार यासाठी इंग्रजी दिनदर्शिका वापरली जाऊ लागली. तरीही सामान्य जनतेच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात पंचांगाचे स्थान कायम राहिले. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर प्रश्न उभा राहिला की, राष्ट्रीय ओळख जपणारी पण वैज्ञानिकदृष्ट्या सुसंगत अशी कालगणना कोणती असावी. पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आधुनिक भारत उभारायचा होता. त्याच वेळी भारतीय परंपरेची नाळ तोडायची नव्हती. याच पार्श्वभूमीवर ‘भारतीय राष्ट्रीय कालगणना’ किंवा ‘शक संवतावर आधारित राष्ट्रीय दिनदर्शिका’ तयार करण्याची कल्पना पुढे आली.

या उद्देशासाठी मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. मेघनाथ साहा हे केवळ खगोलशास्त्रज्ञ नव्हते, तर विज्ञान आणि समाज यांचा मेळ घालणारे विचारवंतही होते. समितीने विविध भारतीय कालगणनांचा अभ्यास केला. अखेरीस शक संवतावर आधारित सौर कालगणना स्वीकारण्यात आली. या दिनदर्शिकेत चैत्र हा पहिला महिना मानण्यात आला आणि वर्षाची सुरुवात वसंत ऋतूशी जोडली गेली. हे महिने मराठी आणि इतर भारतीय सौर महिन्यांशी साधर्म्य राखणारे होते—चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. ही कालगणना पूर्णतः सौर असल्याने ऋतू आणि महिने यांचा मेळ अचूक बसत होता. १९५७ साली भारतीय राष्ट्रीय कालगणना अधिकृतपणे लागू करण्यात आली. सरकारी गॅझेट, आकाशवाणी आणि काही अधिकृत दस्तऐवजांमध्ये तिचा वापर सुरू झाला. मात्र ती सर्वसामान्य जीवनात फारशी प्रचलित झाली नाही. यामागे अनेक कारणे होती.

पहिले कारण म्हणजे जनमानसाची सवय. शतकानुशतके चालत आलेली पंचांग परंपरा आणि ब्रिटिश काळात रुजलेली ग्रेगोरियन दिनदर्शिका या दोन्हींच्या मध्ये राष्ट्रीय कालगणनेला स्वतंत्र सामाजिक अवकाश मिळाला नाही. सामान्यजनांसाठी धार्मिक सणांसाठी पंचांग आवश्यक होते आणि आधुनिक व्यवहारांसाठी ग्रेगोरियन कॅलेंडर अपरिहार्य होते.

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रशासकीय अर्धवटपणा. भारतीय राष्ट्रीय कालगणना सक्तीने लागू करण्यात आली नाही. सरकारी कार्यालयांतही तिचा वापर दुय्यम स्वरूपात राहिला. बहुतांश कागदपत्रांत ग्रेगोरियन दिनांकासोबत कंसात शक दिनांक दिला जाई. त्यामुळे लोकांना स्वतंत्रपणे ही कालगणना वापरण्याची गरजच वाटली नाही. शिक्षण व्यवस्थेतही तिचे सखोल शिक्षण देण्यात आले नाही. परिणामी नवीन पिढीला या दिनदर्शिकेशी भावनिक किंवा व्यावहारिक जडणघडण झाली नाही.

तिसरे कारण म्हणजे सांस्कृतिक आणि धार्मिक व्यवहार. भारतीय समाजात सण, व्रते आणि उत्सव अजूनही चांद्र तिथींवर आधारित आहेत. दिवाळी, होळी, गणेशोत्सव, एकादशी, शिवरात्र यांसारखे सण चंद्राच्या स्थितीवर अवलंबून आहेत. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका सौर असल्याने ती या सणांची तिथी थेट सांगू शकत नाही. त्यामुळे सामान्य माणसासाठी पंचांग अपरिहार्यच राहिले. राष्ट्रीय कालगणना धार्मिक जीवनाशी जोडली गेली नाही.

चौथे कारण म्हणजे जागतिकीकरण. स्वतंत्र भारताने आंतरराष्ट्रीय व्यापार, कूटनीती, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश केला. या सर्व क्षेत्रांत ग्रेगोरियन कॅलेंडर हेच आंतरराष्ट्रीय माध्यम होते. विमानसेवा, बँकिंग, शेअर बाजार, संगणक प्रणाली आणि इंटरनेट या सर्वांनी ग्रेगोरियन दिनदर्शिकाच स्वीकारली. अशा परिस्थितीत एक स्वतंत्र राष्ट्रीय कालगणना वापरणे व्यवहार्य वाटले नाही.

या सगळ्या प्रक्रियेमुळे आज आपण एका द्विधा स्थितीत सापडलो आहोत. धार्मिक-सांस्कृतिक जीवनासाठी चांद्र किंवा चांद्र-सौर पंचांग वापरले जाते, तर प्रशासकीय, वैज्ञानिक आणि जागतिक व्यवहारांसाठी ग्रेगोरियन सौर दिनदर्शिका वापरली जाते. भारतीय राष्ट्रीय कालगणना ही या दोहोंच्या मध्ये अडकून पडलेली आहे. ती वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आणि भारतीय परंपरेशी सुसंगत असली, तरी तिचा वापर मर्यादित राहिला आहे. यातून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर येतो की, कालगणना ही केवळ तांत्रिक व्यवस्था नसून सामाजिक स्वीकारावर अवलंबून असते. कोणतीही दिनदर्शिका लोकांच्या दैनंदिन गरजांशी, श्रद्धांशी आणि व्यवहारांशी जोडली गेली नाही, तर ती कागदावरच मर्यादित राहते. भारतीय राष्ट्रीय कालगणनेच्या बाबतीत हेच घडले. ती वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असली, तरी सामाजिकदृष्ट्या अपरिहार्य बनू शकली नाही.

आज आपण जी कालगणना स्वीकारली आहे ती मुख्यतः सौर मासावर आधारित आहे, कारण आधुनिक जीवनाला ऋतूंची अचूकता, वेळेची एकसंधता आणि जागतिक सुसंगती आवश्यक आहे. चांद्र कालगणना भावनिक आणि धार्मिक पातळीवर महत्त्वाची राहिली आहे, पण ती आधुनिक प्रशासनासाठी पुरेशी नाही. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका हा एक समन्वयाचा प्रयत्न होता—भारतीय महिने आणि सौर शास्त्र यांचा मेळ घालणारा. मात्र तो प्रयत्न अपूर्ण राहिला असे म्हणावे लागेल. चंद्राच्या कलांपासून सूर्याच्या अचूक गतीपर्यंतचा मानवाचा हा प्रवास म्हणजे अंधश्रद्धेपासून निरीक्षण, गणित आणि विज्ञानाकडे झालेली वाटचाल आहे. प्रत्येक धर्माची कालगणना त्याच्या काळातील गरजांची पूर्तता करत होती. मात्र आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, सौर कालगणना हीच सर्वाधिक अचूक, स्थिर आणि सार्वत्रिक ठरते, तर चांद्र कालगणना ही सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून आजही आपले स्थान टिकवून आहे. भविष्यात या कालगणनेचे पुनर्मूल्यांकन होऊ शकते. डिजिटल युगात अनेक कालगणना एकत्र वापरणे शक्य आहे. परंतु त्यासाठी केवळ सरकारी आदेश नव्हे, तर सामाजिक संवाद, शिक्षण आणि सांस्कृतिक पुनर्संवाद आवश्यक आहे. कालगणनेचा इतिहास आपल्याला हेच शिकवतो की वेळ मोजण्याची पद्धत ही मानवी गरजांनुसार बदलत जाते. चंद्रापासून सूर्यापर्यंत आणि स्थानिकतेपासून जागतिकतेपर्यंतचा हा प्रवास म्हणजे मानवी संस्कृतीच्या विकासाचा आरसाच आहे.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९ आणि १० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९ आणि १० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक ९ वा – – – 

नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे |

अति स्वार्थबुद्धी न रे पाप साचे|

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे |

न होता मनासारिखे दुःख मोठे |९|

अर्थ : 

समर्थ मनाला उपदेश करताना म्हणतात की पुढीलांचे म्हणजे दुसऱ्याचे द्रव्य किंवा पैसा त्याज्य समजावा. पैशाची हाव सुटली की माणूस फक्त स्वार्थाचा विचार करतो आणि त्यातून पापाचाच संचय होतो. आणि ज्यामुळे पापकर्माची फळे भोगावे लागतात असे कर्म खोटे म्हणजे त्याज्य आहे. स्वार्थाची इच्छा धरणारा माणूस त्याच्या मनासारखे झाले नाही की दुःखी होतो.

मागील श्लोकात समर्थांनी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवून सज्जनांना संतुष्ट करावे असे सांगितले आहे. या श्लोकात समर्थ आपल्याला दुसऱ्याच्या पैशाचा किंवा संपत्तीचा लोभ ठेवू नये असे सांगत आहेत. पुढीलांचे या शब्दाचे अनेक अर्थ होतात. पुढीलांचे म्हणजे पूर्वजांचे असाही अर्थ घेता येतो आणि दुसऱ्यांचे हाही अर्थ या ठिकाणी लागू होतो. त्याचप्रमाणे दुसरा अर्थ म्हणजे पुढच्या पिढीसाठीचे. आपल्या पूर्वजांनी कमावलेले धन आयतेच आपल्याला मिळावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु अशा प्रकारची अभिलाषा धरली तर आपल्या कर्तृत्वाला फारसा वाव मिळत नाही. माणूस आळशी बनतो आणि अनेक दुर्गुण त्याच्या अंगात प्रवेश करतात. पूर्वजांच्या संपत्तीसाठी (वारसा हक्कासाठी)होणारी भांडणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भानगडी, कोर्टकचेऱ्या आपणा सर्वांना परिचित आहेत.

स्वार्थ कोणाला चुकला आहे? लहान मुलाला सुद्धा आपला स्वार्थ कळतो. त्यामुळे आपली गरज भागेल एवढे जरूर मिळवावे. परंतु गोंधळ होतो तो अती स्वार्थ बुद्धीमुळे. आपल्या चरितार्थासाठी आवश्यक तेवढा पैसा जरूर मिळवावा. पण पुढील पिढ्यांसाठी त्याचा संचय करू नये असेही समर्थ आपल्याला सुचवत आहेत. गोंदवलेकर महाराज म्हणत, “घरात तीन दिवसांचे अन्न असले म्हणजे चौथ्या दिवसाची चिंता करू नये. ” परंतु प्रत्यक्षामध्ये आपण असे पाहतो की साधारणतः तीन पिढ्यांना पुरून उरेल एवढी संपत्ती असतानाही लोकांना अधिकाधिक संपत्तीची हाव असते.

पुढीलांचे म्हणजे दुसऱ्याचे द्रव्य किंवा पैसा नको. ते कोणत्याही प्रकारे घेणे म्हणजे एक प्रकारची चोरीच आहे. मग पैसा मिळवायचाच नाही का? प्रापंचिक माणसाला तर पैसा आवश्यकच असतो. अगदी साधू संन्यासी यांना देखील अन्न, वस्त्र, निवारा यांची आवश्यकता असतेच. मग पैसा कसा मिळवावा? याचे उत्तर संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ‘ जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हे आहे. अशा पद्धतीने पैसा मिळवला तर तो धर्माला मान्य आहे. सरळमार्गी राहून पैसा मिळवता येत नाही अशा प्रकारची साधारण समजूत आहे. परंतु कष्टाने आणि सरळ मार्गाने पैसा मिळवून श्रीमंत झालेल्यांची अनेक उदाहरणे समाजात आहेत. परंतु त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही. पण अशी उदाहरणे आदर्श म्हणून समाजासमोर ठेवली गेली पाहिजेत.

असे म्हणतात की माणसाच्या गरजा पूर्ण करता येतात परंतु हाव पूर्ण करता येत नाही. म्हणून गरजेपुरते असले की माणसाने समाधानी असावे. परंतु तसे होत नाही. म्हणून आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असलेल्या व्यक्तीकडे पहावे असे म्हटले जाते. कारमध्ये फिरणाऱ्या माणसाने मोटरसायकलवर फिरणाऱ्या माणसाकडे पाहून आपण त्यापेक्षा भाग्यवान आहोत असे समजून समाधान मानावे. मोटरसायकलवाल्याने सायकल चालवणाऱ्याकडे, सायकलवर असणाऱ्याने पायी चालणाऱ्याकडे लक्ष द्यावे म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत हे लक्षात येईल. परंतु असे होत नाही. आपण नेहमी उलटच करत असतो. श्रीमंत अतिश्रीमंताकडे पाहत असतो आणि स्वतःला दुःखी करून घेत असतो.

अतिस्वार्थ बुद्धीमुळे आपल्याला अधिक हवे असे वाटत असते आणि मग ते कोणत्याही मार्गाने मिळवण्यात काही गैर वाटत नाही. परंतु असे करत असताना आपण पापकर्मांचाच संचय करत जातो. गैरमार्गाने पैसा कमावणारे लोक समाजात सुखाने जगताना दिसतात. ते पाहून आपणही तसे करावे असे वाटणे साहजिक असते. परंतु कर्माच्या सिद्धांतानुसार अशा लोकांना देखील आपल्या पापाचा हिशेब द्यावाच लागतो. ज्यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप आहेत असे भ्रष्ट नेते एखाद्यावेळी न्यायालयातून निर्दोष सुटतीलाही परंतु नियती हे असे न्यायालय आहे की जिथे आपल्या कर्मांचा योग्य तो हिशेब होतोच. तिथे कोणाचीही सुटका नाही. अधिकाधिक पैसा कमावण्याचा हव्यास लागतो तेव्हा अनेक प्रकारच्या चिंता, दडपण, स्पर्धा यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यातूनच मग दडपण, निद्रानाश, अपचन, रक्तदाब, हृदयविकार यासारख्या अनेक विकारांना निमंत्रण मिळते. त्यामानाने सरळ मार्गाने वागणारा माणूस खाऊन पिऊन सुखी आणि समाधानी असतो. पैशाची, संपत्तीची आणि सत्तेची हाव सुटलेल्या माणसाला जेव्हा त्याच्या मनासारखे होत नाही तेव्हा मोठ्या दुःखाला सामोरे जावे लागते. धनवृद्धीसोबत जर चिंतावृद्धी होत असेल तर काय उपयोग? समर्थांचा इशारा स्पष्ट आहे —

– – द्रव्य मिळव, पण द्रव्याचा दास होऊ नकोस.

– – संपत्ती कमव, पण स्वार्थाचा संचय करू नकोस.

स्वसंवाद : 

  • माझ्या मनात दुसऱ्याच्या संपत्तीबद्दल आकर्षण किंवा हेवा आहे का?
  • मी गरज आणि हाव यातील फरक ओळखतो का?
  • पैसा कमावताना माझा मार्ग प्रामाणिक आणि नीतिमान आहे का?
  • अधिकाधिक मिळवण्याच्या धडपडीत माझे समाधान हरवत तर नाही ना?
  • धनवृद्धीबरोबर माझी चिंताही वाढते आहे का?

– – – 

श्लोक १० वा – – – 

सदा सर्वदा प्रीती रामी धरावी|

दुःखाची स्वये सांडी जीवी करावी|

देहेदुःख ते सुख मानीत जावे| 

विवेके सदा सस्वरूपी भरावे |१०|

अर्थ:

या श्लोकात समर्थ आपल्याला भगवंतावर प्रेम करायला सांगतात. प्रारब्धामुळे जे दुःख आपल्याला प्राप्त झाले आहे त्याचे वाईट वाटून न घेता त्या जाणिवेचा त्याग करायला शिकावे. देहाच्या दुःखाला सुख मानण्याचा अभ्यास करावा. योग्य आणि अयोग्याचा विवेक करून आपले मन सस्वरुपी स्थिर करावे.

प्रेम करणे हा मनुष्यस्वभाव आहे. प्रत्येकाचे कोणावर तरी किंवा कोणत्यातरी वस्तूवर प्रेम असते. कंजूष माणसाचे धनावर प्रेम, विषयलंपट माणसाचे विषयावर प्रेम, कोणाला सत्ता प्रिय असते. असे प्रेमाचे विविध विषय असतात. प्रेमातून आनंद मिळतो परंतु हा आनंद चिरकाल टिकणारा नसतो. प्रेमाचा विषय चुकला तर दुःख पदरी पडणारच! मदिरेच्या प्रेमात धुंद होऊन (चित्रपटात दाखवल्याप्रमाणे)देवदास बनण्यापेक्षा भगवंताचे प्रेम लागून त्याचे म्हणजे देवाचे दास होणे कधीही चांगले. या प्रेमातून जो आनंद मिळेल तो चिरंतन असेल. म्हणूनच समर्थ म्हणतात ‘सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. ‘

आपण मनुष्य जन्मात आलो आहोत तेव्हा सुखदुःख हे असणारच. परमेश्वराने जेव्हा मानवी अवतार धारण केला तेव्हा त्याला किंवा संतांना देखील सुखदुःखे चुकली नाहीत. मग आपल्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा! आपण सुखाने आनंदतो आणि दुःखाने दुःखी होतो. परंतु या ठिकाणी दुःखाचा त्याग करायला शिका असे समर्थ आपल्याला सांगतात. थोडक्यात असे म्हणता येईल की दुःखाची जाणीवेला आपल्या मनात स्थान देण्यापेक्षा परमेश्वराच्या चिंतनाकडे जर लक्ष दिले तर दुःख हलके होईल.

हा दुःखाचा त्याग करणे म्हणजे मनाला एक प्रकारचे वळण लावणे आहे. ही गोष्ट सहजासहजी होणारी नाही. त्यासाठी समर्थ सांगतात की देहाला जे दुःख होते त्यालाच सुख मानून पुढे चालावे. याचा अर्थ प्रारब्धाने जे दुःख आपल्याला प्राप्त झाले आहे त्याचे वाईट वाटून न घेता त्याचा स्वीकार करावा आणि आपले कर्म करावे. बऱ्याच लोकांना आपल्या आजाराचा आणि दुःखाचा बाऊ करण्याची सवय असते. दुसऱ्यासमोर आपल्या दुःखाचे वारंवार प्रदर्शन करून ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यामुळे फारसे काही साध्य होत नाही. सतत अशी तक्रार करणारी माणसे इतरांना नकोशी होतात. प्रारब्धाने जे दुःख आपल्या वाट्याला आले आहे ते स्वीकारण्याची आणि त्यालाच सुख मानण्याची वृत्ती जेव्हा आपली होईल तेव्हा सुखाचा वेगळा शोध घेण्याची आवश्यकता राहणार नाही. असेल त्या परिस्थितीतही आपण आनंदी, सुखी आणि समाधानी राहू.

आपल्या अवतीभवती जर नजर टाकली तर आपल्याला ज्यांना अनेक प्रकारचे शारीरिक त्रास किंवा व्याधी आहेत असे लोक आपल्या दृष्टीस पडतात. परंतु त्यातील बरेच लोक त्यांचा स्वीकार करून आपले जीवन ध्येय जे आहे त्या मार्गावर वाटचाल करताना दिसतात. प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना मज्जासंस्थेचा गंभीर आजार झाला तरी देखील त्यांनी आपले संशोधन कार्य सुरूच ठेवले. प्रसिद्ध नृत्यांगना असलेल्या सुधा चंद्रन यांना आपला एक पाय अपघातात गमवावा लागला. परंतु त्यांनी जिद्दीने त्यावर मात केली. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. थोडक्यात सांगायचे तर: या व्यक्तींनी आपल्या शारीरिक मर्यादांना आपली कमकुवत बाजू न बनवता, त्यांना आपली ताकद बनवले. “शरीराला अपंगत्व असू शकते, पण मनाला नाही, ” हेच त्यांनी जगाला दाखवून दिले.

म्हणून समर्थ म्हणतात की माणसाने विवेकाची कास धरून स्वस्वरूपाचे चिंतन करावे. मी म्हणजे देह नाही. त्यामुळे देहाला होणाऱ्या दुःखाशी माझा खऱ्या अर्थाने संबंध नसून मी म्हणजे एक आनंदस्वरूप आत्मा आहे अशी भावना मनाशी दृढ करावी. त्यासाठी भोवतालच्या परिस्थितीकडे साक्षी भावाने पाहता यायला हवे. साधकाने आत्मस्वरूपाच्या चिंतनातच (म्हणजेच भगवंताच्या नामस्मरणात)इतके रंगून जावे की त्याला त्यामुळे दुःखाची जाणीव सुद्धा होणार नाही.

स्वसंवाद : 

  • माझे प्रेम नेमके कशावर आहे — नश्वर गोष्टींवर की चिरंतन तत्त्वावर?
  • एखादे दुःख आले की मी त्याचा बाऊ करतो, की शांतपणे स्वीकारून पुढे चालतो?
  • माझ्या देहाच्या त्रासाशी मी पूर्णपणे एकरूप होतो का, की मी त्याचा साक्षी राहू शकतो?
  • विवेकबुद्धी वापरून मी परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांमध्ये फरक करू शकतो का?
  • माझे मन नामस्मरणात किंवा आत्मचिंतनात किती वेळ रमते? (क्रमशः)

 – क्रमशः श्लोक ९ आणि १०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गुप्तदान…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

सौ.राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “गुप्तदान…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.राधा पै ☆

पुण्याजवळच्या एका खेड्यातल्या ‘ जिल्हा परिषद शाळेत’ आज मोठा कार्यक्रम होता. शाळेला १० संगणक (Computers) भेट देण्यासाठी मुंबईचे मोठे बिझनेसमन ‘मिस्टर सुहास ओक’ आले होते.

सुहासरावांचा थाटच वेगळा होता. पांढरी शुभ्र मर्सिडीज, अंगावर महागडा सफारी सूट आणि डोळ्यावर रे-बॅनचा गॉगल. त्यांच्यासोबत चार बाउन्सर आणि दोन फोटोग्राफर होते. त्यांचा नियमच होता – “दहा रुपयांचं दान करायचं, तर शंभर रुपयांचा गाजावाजा झाला पाहिजे.”

शाळेच्या पटांगणात कार्यक्रम सुरू झाला. सुहासराव मंचावर (Stage) मधल्या खुर्चीत बसले होते.

त्यांची नजर अचानक मंचाच्या खाली, एका कोपऱ्यात गेली.

तिथे एक ७५-८० वर्षांचे म्हातारे गृहस्थ जमिनीवर सतरंजीवर मुलांमध्ये बसले होते. त्यांचे कपडे अत्यंत साधे होते – एक विटकं धोतर, जुना सदरा आणि डोक्यावर एक मळके उपरणं. ते सारखे खोकत होते आणि त्यांच्या पायात एक जुनी चप्पल होती.

सुहासरावांना ते दृश्य खटकलं. त्यांना वाटलं, “हा भिकारी इथे काय करतोय? माझ्यासारखा एवढा मोठा माणूस आलाय आणि इथे मंचासमोर हे असं दृश्य?”

त्यांनी मुख्याध्यापकांना (Principal) खुणेने जवळ बोलावलं.

सुहासराव रागाने कुजबुजले, “सर, तो म्हातारा कोण आहे? त्याला तिथून उठवा. माझ्या फोटोच्या फ्रेममध्ये येतोय तो. ‘स्टँडर्ड’ खराब दिसतंय शाळेचं. भिकारी वाटतोय तो, त्याला गेटच्या बाहेर काढा आणि जेवण देऊन वाटेला लावा.”

मुख्याध्यापक थोडे ओशाळले. ते म्हणाले, “साहेब, ते… ते…”

सुहासरावांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही. “अहो, कसले ‘ते’? सांगा शिपायाला. उचलून बाहेर काढा त्यांना.”

शिपाई गेला आणि त्याने त्या म्हाताऱ्याला (ज्यांचं नाव ‘तात्या’ होतं) हाताला धरून उठवलं.

“तात्या, चला उठा. साहेबांना त्रास होतोय. तुम्ही मागे जाऊन बसा किंवा बाहेर थांबा.”

तात्या काहीच बोलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होतं. त्यांनी आपली काठी टेकवली आणि ते थरथरत्या पायांनी मंचाच्या मागच्या बाजूला, जिथे मुलांचे बूट ठेवले होते, तिथे जाऊन एका दगडावर बसले.

कार्यक्रम पार पडला. सुहासरावांनी १० कॉम्प्युटर दिले. खूप टाळ्या वाजल्या. हार-तुरे झाले.

शेवटी भाषणाची वेळ आली.

मुख्याध्यापक माईकवर आले. त्यांचा आवाज भरून आला होता.

ते म्हणाले:”आज सुहासरावांनी आपल्याला १० कॉम्प्युटर दिले, त्याबद्दल त्यांचे आभार.

पण आज मला एका अशा व्यक्तीची ओळख करून द्यायची आहे, ज्याने या शाळेसाठी आपलं ‘सर्वस्व’ दिलं, पण कधी स्टेजवर येऊन हार स्वीकारला नाही.

सुहासराव, मगाशी ज्यांना तुम्ही ‘भिकारी’ समजून मंचासमोरून उठवलंत आणि बूट स्टँडजवळ बसवलंत ना…

ते ‘तात्या पाटील’ आहेत.

या शाळेची जी २ एकर जमीन आहे, ज्याची आजची किंमत ५ कोटी रुपये आहे… ती जमीन या तात्यांनी शाळेला ‘दान’ दिली आहे.

तात्यांकडे राहायला स्वतःचं पकं घर नाहीये, ते पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. त्यांची मुलं त्यांना सोडून गेली.

म्हातारपणी औषधाला पैसे नसतात, पण दरवर्षी आपल्या पेन्शनचे पैसे साठवून ते शाळेतल्या गरिबांच्या पोरांना गणवेश (Uniform) देतात.

साहेब, तुम्ही १० कॉम्प्युटर दिलेत, पण त्यासाठी १० फोटोग्राफर आणलेत.

या माणसाने ५ कोटींची जमीन दिली, पण आज स्वतःच्याच जागेवर बसण्यासाठी त्यांना तुमच्या परवानगीची गरज लागली.

खरा ‘श्रीमंत’ कोण, हे आज तुम्हीच ठरवा.”

सगळ्या सभामंडपात स्मशानशांतता पसरली.

सुहासरावांचा चेहरा पांढराफटक पडला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

ज्या माणसाला ते कपड्यावरून ‘भिकारी’ समजत होते, त्या माणसाची दानत सुहासरावांच्या संपत्तीपेक्षा हजार पटीने मोठी होती.

सुहासराव मंचावरून खाली उतरले. त्यांचे बाउन्सर, त्यांचे फोटोग्राफर सगळे बघत होते.

सुहासराव धावत त्या मंचाच्या मागे गेले.

तिथे तात्या एका दगडावर बसून, मुलांनी दिलेलं बिस्किट खात होते.

सुहासरावांनी आपले महागडे बूट तिथेच काढले आणि त्या मळक्या धोतर नेसलेल्या तात्यांच्या पायावर डोकं ठेवलं.

“मला माफ करा तात्या! मी पैशाने श्रीमंत झालो, पण मनाने खूप गरीब राहिलो. तुम्ही खरे ‘राजा’ आहात. मी तुमची लायकी काढली, पण खरी लायकी आज मला माझी समजली.”

तात्यांनी हसून सुहासरावांच्या पाठीवर हात फिरवला.

“अरे बाबा, त्यात काय झालं? देव देतो आणि देवच नेतो. आपण फक्त माध्यम असतो. तू दिलं, मी दिलं… हे महत्त्वाचं नाही. पोरांनी शिकणं महत्त्वाचं. उठ, कपडे खराब होतील तुझे.”

सुहासरावांच्या डोळ्यात पाणी आलं.

आज त्यांना समजलं होतं की, श्रीमंती बँकेच्या बॅलन्समध्ये नसते, तर ती ‘देण्याच्या’ वृत्तीमध्ये असते.

त्या दिवशी सुहासरावांनी एकही फोटो काढला नाही. त्यांनी तात्यांचा हात धरला आणि त्यांना सन्मानाने मंचावर नेऊन आपल्या खुर्चीवर बसवलं.

कोणाच्या कपड्यावरून त्यांची लायकी ठरवू नका. साध्या राहणीमागे खूप मोठं आणि श्रीमंत मन असू शकतं. दान दिल्यावर त्याचा गाजावाजा करणं म्हणजे त्या दानाची किंमत कमी करण्यासारखं आहे. ‘गुप्तदान’ हेच श्रेष्ठ दान असते जेथे एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला देखील कळलेलं नसतं.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अर्कपत्र पहुडावी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अर्कपत्र पहुडावी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(अष्टाक्षरी)

सूर्याचे तेज नभी

सूर्यकिरण चमचमती

अर्कपत्र पहुडावी

बहु सुंदर होय क्षिती

*

तेज मला मोहविते

जाईन मी त्या तिकडे

मातीवर फुललेले

कनकाचे जणू रुपडे

*

सूर्यवर्त, दिवाकर

अर्कादल म्हणती फुला

सूर्यकमल, सूर्यकांती

काय म्हणू सांग तुला

*

दिशा देई रवीकर तुज

वळशी तू त्या संगे

सूर्योदय सूर्यास्ता

प्रवास हा किती रंगे

*

पाहताच तुझ्याकडे

चैतन्ये सळसळती

चित्रपतंगास मोह

भिरभिरती बागडती

*

पिवळी पिवळी कुरणे

शब्द होती दिवाणे

सूर्यफुला ऐक जरा

कवनाचे नजराणे

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कोरा कॅनव्हास… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कोरा कॅनव्हास… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

कोरा कॅनव्हास घेऊन हाती 

विठ्ठल रुक्मिणी विवाह रेखीला 

भाव सुंदर असा सोहळा 

पण कसा कुणी तो न देखीला 

*

कुठे आहे असे चित्र यावर 

विचारता त्या चित्रकाराला 

म्हणाला पंढरपूरला सारे सोहळ्यास जाता

कसे दिसतील ते इथे तुम्हाला?

*

वसंतपंचमी आहे म्हणूनी

रेखीली सरस्वती हंसवाहिनी

ती पण कुठे दिसत का नाही

सांग झणी मला समजावूनी

*

कसे सांगू तुम्हा का न दिसे ती

चित्रकार तो बोले हसूनी

पहा माझी कला वाढवण्या

बसली माझ्या करात येऊनी||

*

गवत खाणाऱ्या गायीचे चित्र

कुठे आहे विचारता खोदूनी

 म्हणे गवत खाऊन संपले म्हणूनी

गायही तेथून गेली निघूनी||

*

अशा अगणीत चित्रांचे कोलाज

आहे या कोऱ्या कॅनव्हास वरती

मनःचक्षुने पाहता त्याकडे

चित्रे त्यातील स्पष्ट दिसती||

*

दिसते तसे कधीच नसते

म्हणून तर जग फसत असते

करता विचार तर्क शुद्धीने

चित्र त्यावर सहज प्रकटते||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares