मराठी साहित्य – विविधा ☆ “स्वयंपाक घर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “स्वयंपाक घर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

 स्वयंपाक घरात होणारी चर्चा काहि ठराविक मुद्यांवरच होते. त्या मुद्यांचा जागतिक मुद्यांशी तसा संबंध नसतो. तसा असायचं कारणही नाही. कारण आज भाजी कोणती करु?… या प्रश्नाशी जागतिक बाजारातपेेठेेत मिळणार्‍या भाज्या कोणत्या. त्या पालेभाज्या आहेत का फळभाज्या. त्या करायच्या कशा… म्हणजे.  तेलावर का शिजवून.  पातळ भाजी का दाण्याचा कुट लावायचा. किंवा त्यांचे असलेले बाजारभाव याचा आपल्याशी काहीही संबंध नाही. अगदी खोबरं किंवा मिर्ची याचा ऊल्लेख आला तरी खोबर्याच्या बाबतीत राजापुरी खोबरं आणि मिर्ची बाबत सिमला मिर्ची अथवा लवंगी मिर्ची या पनवेेल किंवा सिमल्याची.  नाहीतर कोल्हापुरची सीमा ओलांडून पलिकडे आम्ही गेलो नाही.

 फारतर दिवाळी जवळ आली की फराळाचे पदार्थ करायचे का… कोणते… का विकत आणायचे… यावर चर्चा होते.  किंवा थांबते. तिथे काही दिवाळीत विकत घ्यायच्या फटाक्यांचे प्रकार किंवा बाण आणि संरक्षण क्षेत्राकडे असणारे अग्निबाण.  किंवा फटाक्यातले बाॅम्ब आणि सैन्याकडे असणारे बाॅम्ब यांंचा या र्चेचत संबंध नसतो.

 अधुुनमधूून कामवाली येणार नाही.  किंवा पाणी येणार नाही याचवेळी थोडी आणिबाणी जाणवायची. पण ती सुध्दा घरगुती. त्याचा जागतिक घडामोडींशी किंवा निर्माण झालेल्या आणिबाणी सद्रुष्य परिस्थितीशी संबंध नसायचा. त्यामुळे स्वयंपाक घरात जागतिक चर्चा होतच नव्हती. थोडक्यात स्वयंपाकघर आणि जागतिक घडामोडी यांच्या सीमा सुरक्षित ठेवल्या होत्या. कोणत्याही प्रकारे सिमोल्लंघन किंवा घुसखोरी नव्हती.

 दोन देशात काही बाबतीत शीतयुद्ध असत. पण आमची चर्चा शितकपाट म्हणजेच फ्रिज यात काय भरलंय याच विषयावर फ्रिज व्हायची. त्यामुळे तिथेही असणारा आंतरराष्ट्रीय प्रभाव तसा थंडच होता. पण आता मात्र त्या चर्चा बदलल्या होत्या.

 रशिया.  युक्रेन.  इस्रायल.  चिन.  अमेरिका आणि विशेषकरून डोनाल्ड ट्रंप यांचा विषय येतोच. म्हणजे भंंगार किंंवा रद्दी घेणारा.  भाजीवाला जस सहजपणे दोनचार वेळा दारावरून ओरडत जातो.  तितक्याच सहजपणे यांचा विषय होतो. कारण काय तर या सगळ्यांमुळे वाढत जाणारे सोन्या चांदिचे भाव. हमास या शब्दाचा वापर तर हमाम साबण जितक्या सहजतेने आणि सारखा सारखा वापरतो तेवढ्या सहजतेने वापरला जात होता.

 आता टमाटा आणि डोनाल्ड ट्रंप यांचा काहीच संबंध नाही. तरीही डोनाल्ड ची धोरणंतर टमाट्याच्या भावासारखी रोज बदलतात असा सूर लावत त्याच्या धोरणांना आम्ही सहज टमाट्याच्या बरोबर तोंडीलावायला घेतो. डोनाल्ड या नावाचाच राग आहे.

 मी मोबाईल वर ॲलन डोनाल्ड या क्रिकेट खेळाडूची एक ध्वनीचित्रफित बघत होतो. त्याच्या आवाजाने घरात विचारलं.  काय पाहताय येवढं. मी सहज म्हंटल.  ङोनाल्डचा व्हिडीओ आहे छोटासा.  छान आहे.

 झालं… डोनाल्डचा व्हिडीओ.  आणि चांगला.  यावरच आवाज इतका वाढला कि कदाचित ॲलन किंवा ट्रंप पैकी कोणताही डोनाल्ड जवळ असता.  किंवा दोघेही असते तर ते सुध्दा थोडावेळ गप्प बसले असते…

 काय म्हणतोय तो आता.. आता काय वाढवतोय… मग मला सांगाव लागलं कि हा वेगळा डोनाल्ड आहे. हा फास्ट बॉलर होता… तरीही डोनाल्ड या नावाचा राग काही गेला नव्हता…

 असेल फास्ट बॉलर… याची धोरणं डोक्यावरुन जातात. त्याचे बाॅल जात असतील. पण सगळं डोक्यावरुनच जात नं… त्याचा बॉल डोक्याला लागू नये म्हणून निदान हेल्मेट तरी वापरता येतं. याच्या डोक्यावरुन जाणाऱ्या गोष्टींसाठी काय वापरणार… डोक्यावरुन जाणारा चेंडू कसा टाकायचा.  यासाठी तरी तो तुुमचा डोनाल्ड डोकं वापरत असेल. पण या डोनाल्डच्या डोक्याच काय… आता या युक्तीवादावर मी काय बोलणार… मी आपलं अंपायर्स काॅल सारखा निर्णय मान्य केला.

 हा राग काहि येवढ्यावरच थांबला नाही. पुढे सुरुच होतं.

 याचा राग कशावर.  तर आम्ही दुसरीकडून घेत असलेल्या तेलावर. अरे तुला काय त्याच्याशी. तुला विकायच तर आम्हाला परवडेल त्या किमतीला विक… आम्ही पाच किलो तेल घ्यायला बाजारात गेलो तरी दोन ठिकाणी तेलाचे भाव पाहतो… तुला जमत असेल तर दे.  नाहीतर जा तेल लावत… हे याचं म्हणजे वडाच तेल वांग्यावर काढण्यासारख आहे. यावर तेलाचा आंतरराष्ट्रीय विचार थांबतो. नाहीतर हे तेल प्रकरण इतक गरम झालं असत कि भक्त प्रल्हाद सारखं यालाही गरम तेलात टाकण्याची शिक्षा दिली असती.

 हा संताप किंवा राग थांबला अस वाटत होत. तेवढ्यात एक मित्र सपत्नीक आला. त्याचा दात दुखत असल्याने संध्याकाळी तो दाताच्या डाॅक्टरांकडे जाऊन आला होता.

 तो म्हणाला.  डाॅक्टरांनी त्याचे सहज दिसणारे दात त्यांच्या भिंगाच्या सहाय्याने पाहिले. दोनचार प्रश्न विचारले आणि म्हणाले.  फार काहि नाही.  थोडी मोकळी जागा आहे तिथे फक्त थोडी चांदी भरावी लागेल. इतकच. झालं… त्यावरून परत चर्चा सुरु झाली…

 काय भाव वाढत चाललेत चांदिचे. यांना काय लागत फक्त थोडी चांदी भरा म्हणून सांगायला. अगोदर ब्लड रिपोर्ट करणारे यांच्या संबंधातले असतात अस म्हणत होतो. आतातर चांदिवालेपण मिळालेले वाटतात. आणि जी चांदी वरुन दिसणारच नाही ती भरुन करायचं काय.. चाटायची आहे… चाटायची म्हंटली तरी दाताच्या खालीच असणार… कशी पुरणार जिभ…

 माझ्या पायातली साखळी किंवा अंगठी केली तर दिसेल किंवा दाखवता येईल. पण दातातल्या चांदिच काय करणार… ते काही हत्तीचे दात आहेत दिसायला.

असं म्हणत मित्राची बायको माझ्या बायकोबरोबर स्वयंपाक घरात गेली… आणि परत स्वयंपाक घरातल्या चर्चेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ आला…

 

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घसरगुंडी… ☆ मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ घसरगुंडी… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

दुपारचा एक वाजून गेला होता. मनोजची मालगाडी लोणावळा ओलांडून कर्जतच्या दिशेने निघाली होती. मनोज गेली पंचवीस वर्षे रेल्वेमध्ये मालगाडीचा गार्ड म्हणून कार्यरत होता. मनोजने आयुष्याचा मोठा भाग घाटातल्या या रूटवर घालवला होता. येथल्या वाऱ्याचा वेग, वळणे, उतारांचे रागरंग —सगळं सगळं त्याला पाठ होतं.

आज सिमेंटच्या गोणींनी भरलेल्या ५८ वाघिणी घेऊन तो मुंबईला निघाला होता. मालगाडीच्या डब्यांना वाघीण नाव कोणी बरं ठेवलं असेल? त्याला नेहमीच गंमत वाटायची.

पळसदरी स्टेशन येत होतं, इथून कर्जत यायला साधारण पाच किलोमीटर, तिथून कल्याणला पोचेपर्यंत आणखी एक तास, मग तासाभराने ठाणे आणि आणखी एखाद्या तासाभरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गाडीचे शेवटचे स्टेशन. मनोज मनातल्या मनात हिशेब करत होता. थोडेफार सिग्नल आणि सायडिंग जरी धरलं संध्याकाळी सहापर्यंत ड्युटी संपेल असा अंदाज तो बांधत होता.

घाट संपून कर्जत ओलांडले, की मग सोबत आणलेली पोळीभाजी खावी अशी गणितं तो करत असतानाच वॉकीटॉकी खरखरली, विनेशचा – गाडीच्या ड्रायव्हरचा आवाज ऐकू येत होता – “मनोज, वेग वाढतोय गाडीचा … ब्रेक नीट पकडत नाहीयेत बहुतेक. ”

मनोज क्षणभर थिजला.

…. घाट उतरताना ब्रेक नीट लागत नाहीयेत?

मनात थंड शिरशिरी उठली, जीवाची कालवाकालव झाली. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं.

दुनिया जरा जास्तच वेगाने मागे पडत होती. झाडं धावत असल्यासारखी दिसत होती.

वॉकीटॉकीवर काही सेकंदातच पुन्हा विनेशचा आवाज आला – आवाजातला कंप आता स्पष्ट जाणवत होता : “एअर ब्रेक्स प्रतिसाद देत नाहीत… डायनॅमिक ब्रेक लावतोय… पण अजून तो पुरेसा होत नाहीये. ”

मनोजने डोळे मिटले.

पंधरा वर्षांपूर्वी ऐकलेली एक गोष्ट आठवली—

…. “बिघडलेल्या ब्रेकसह घाट उतरणं म्हणजे डोंगराशी झुंज – मृत्यूशी झुंज. ”

आज ती झुंज त्याच्या वाट्याला आली होती.

मनोजने त्याच्या डब्यातील – ब्रेकव्हॅनमधील हँडब्रेकचे चक्र घट्ट पकडलं.

आणि हळूहळू, मोजक्या प्रमाणात त्याने ते चक्र फिरवत ब्रेक लावायला सुरुवात केली—

– – त्याला त्याच्या पहिल्या ट्रेनिंग ऑफिसरने शिकवलं होतं: “ब्रेक झटके देत लावू नकोस, एकदम अचानकही ब्रेक लावू नकोस….. गाडीसोबत बोल. तिच्याशी संवाद साध. ती तुला काय सांगते ते ऐक. त्यानुसार ब्रेक लाव. ”

गाडीची गती जास्त होती, हँडब्रेकचे चक्र फिरवणं कठीण होत चाललं होतं.

जोर लावून ते चक्र फिरवताना घाम फुटत होता, पण त्याने हातांची पकड सैल होऊ दिली नाही.

तिकडे रेल्वे इंजिनमध्ये, समोर, विनेश जिद्दीने लढत होता—एअर ब्रेक, डायनॅमिक ब्रेक वापरत होता, सोबत असलेली रेती ट्रॅकवर फेकत होता (सँडिंग) — मनोज आणि विनेश – दोघेही एकाच शत्रूशी झगडत होते—उतरण आणि त्या उतरणीवर गाडीचा कमी न होणारा वेग.

गाडी आता घाटात जोरात धावत होती. जिथे ताशी ६० किलोमीटरपेक्षा कमी गती असायला हवी तिथे वेग ताशी ७५ किलोमीटरच्या पुढे गेला होता.

– – वारा ब्रेकव्हॅनमध्ये चाबकासारखा घुसत होता.

– – डबे हलत होते, अडखळत होते, थरथरत होते.

मनोजचं हृदय प्रत्येक चाकासोबत धडधडत होतं.

तो हळू आवाजात पुटपुटला— “हळू धाव माझे आई, … शांत हो, … थांब ग…”

…. जणू गाडी त्याचा आवाज ऐकत होती.

विनेशचा आवाज आला – हताश, कमकुवत – “मी नाही थांबवू शकत आहे हिला, नियंत्रण सुटतंय, संपतंय सगळं. ”

मनोजचे श्वास थांबले…..

डोळ्यासमोर जीवाभावाच्या सगळ्यांचे चेहरे तरळून गेले –

सकाळी चहा करत असलेली बायको,

अजून झोपलेली मुलं,

…. आणि विनेशचाही चेहरा – विनेश आणि स्वतःला तो नेहमीच दोन डोळे म्हणायचा, “दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी” म्हणायचा. ५० च्यावर डबे, पाऊण किलोमीटर अंतर असायचं ड्रायव्हर आणि गार्डमध्ये, असायचे एकाच मालगाडीच्या दोन टोकांना, पण क्वचितच भेटायचे एकमेकांना.

मनोजने दीर्घ श्वास घेतला, स्वतःला स्थिर केलं आणि अवसान आणून, शांत स्वरात विनेशला म्हणाला: “हार मानू नकोस. आपण दोघं आहोत. दोघं मिळून थांबवू गाडीला. तू रेल्वे कंट्रोलला सूचना दे. ”

“पळसदरी कर्जत उतारावर मालगाडीचे ब्रेक लागत नाहीयेत” – कंट्रोल रूमवर जणू विजेच्या लोळासारखी बातमी कोसळली. प्रशिक्षण, अनुभव आणि धैर्य पणाला लागलं, सिग्नल adjust केले गेले, मालगाडीच्या मार्गात सुदैवाने अन्य कोणती गाडी नव्हती, कर्जत स्टेशनपुढील गाडीचा मार्ग बदलला गेला, वाहतुकीचा अडथळा नसलेला ग्रीन कॉरिडॉर तयार केला गेला, जास्त रहदारीच्या नेहमीच्या ट्रॅकवरून सायडिंगच्या कमी वापरातल्या ट्रॅकवर गाडी वळवली जाणार होती. दोन किलोमीटर नंतर या ट्रॅकला अशा प्रसंगांसाठीच बांधलेल्या कॅच सायडिंगची तयारी होती—

कर्जत स्टेशन जवळ येत होतं, स्टेशनवर रेल्वे स्टाफ सज्ज होता, सिग्नलमन, पॉईंटमन, स्टेशनमास्तर – सगळे डोळ्यात प्राण आणून धडाडत येणाऱ्या गाडीकडे पाहत होते.

विनेश ओरडला: “वेग अजून जास्त आहे! ”

मनोजने होता नव्हता तो सगळा जोर लावून हँडब्रेक पूर्ण ताकदीने फिरवला.

हात भरून आले होते, हातांना रग लागली होती…

– – – आणि गाडीचा वेग कमी होऊ लागला….

…. खरंच कमी होत होता का भास होऊ लागले होते?

नाही, हा भास नव्हता. वेग नक्की कमी होत होता, खूप नाही, पण पुरेसा.

उतरण जणू थोडी माघार घेत होती.

कर्जत स्टेशन कधीच मागे पडलं होतं, भिवपुरी स्टेशनही मागे गेलं होतं. वेग खूप कमी झाला होता, आणि शेवटी तो क्षण आला—

डायनॅमिक ब्रेक, हँडब्रेक, सँडिंग, आणि माणसांची इच्छाशक्ती — — सगळ्यांनी मिळून त्या ५८ डब्यांच्या राक्षसी गाडीला थांबवलं होतं.

गाडी एक क्षणभर थरथरली…

आणि मग घनघोर शांतता पसरली.

मनोज थकून एका बाकावर कोसळला.

डोळ्यातून घळघळा पाणी आलं. तो वॉकीटॉकीवर कसंबसं बोलला – “वाचलो आपण…”

अधिकारी आले, तपास सुरू झाला.

ड्रायव्हरचे हात अजूनही थरथरत होते.

मनोजच्या तळहातांवर टरटरून फोड आले होते.

ब्रेकच्या घर्षणाने चाकं गरम झाली होती, पण सुरक्षित होती.

लोकांनी विचारलं—

“नेमकं कशाने वाचवलं तुम्हाला? ”

मनोज फक्त एवढंच म्हणाला—

“घाट उतरायला सुरुवात करताना नियमानुसार ब्रेकची चाचणी केली होती, तेव्हा ब्रेक व्यवस्थित होते. नंतर काय बिनसलं, माहित नाही, पण आत्ता गाडी कशी थांबली विचाराल, तर रेल्वेने केलेला ग्रीन कॉरिडॉर, विनेश – मी आणि आमची ही गाडी … आणि मुख्य म्हणजे देवाने – डोंगराने – निसर्गाने आम्हाला दिलेली एक संधी – या सगळ्यांमुळे गाडी थांबली. ”

प्राथमिक तपास पूर्ण झाला, रात्री घरी आल्यावर त्याच्या लहानग्या मुलीने मनोजला विचारलं: “बाबा, आज मी बागेत खेळायला गेले होते. तिथे एक मस्त नवी घसरगुंडी आली आहे. मी तिच्यावर खूप खेळले. झूSSम करून खाली येताना पोटात गोळा येत होता. पण मज्जा आली. तुम्ही आज काय केलंत? आज काही विशेष झालं का? ”

त्याने तिच्याकडे पाहिलं…..

घाटातला गाडीचा वेग, तो सोसाट्याचा वारा, ती भीती, ते धैर्य, आणि सरतेशेवटी थांबलेल्या गाडीचा तो शांत क्षण – आजची त्याच्या गाडीची घसरगुंडी, त्याच्या पोटात आलेला गोळा – हे सगळं सगळं क्षणार्धात त्याच्या नजरेसमोर तरळून गेलं – तो हलकेच हसला…..

“हो, ” तो म्हणाला, “मी सुखरूप घरी आलो… हेच सर्वात विशेष झालंय आज. ”

(२७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे मुंबई घाट उतरताना, पळसदरी रेल्वे स्टेशननंतर एका मालगाडीचा वेग नियंत्रणात येत नव्हता. या सत्यघटनेवर आधारित हा लेखन प्रपंच. पात्रांची नावे काल्पनिक आहेत.)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अहल्या… ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ अहल्या…  ☆ उज्ज्वला केळकर

अहल्या – – 

अहल्येची नि माझी ओळख माझ्या नकळत्या वयात झाली. आमचं बालपण, तिन्हिसांजेला घरी आल्यावर हात-पाय धुऊन, वडीलधार्‍यांना नमस्कार करून, ’शुभं करोती’ आणि नंतर पाढे-परवचे म्हणण्यात सरलं. ते झालं की आजी वेगवेगळे श्लोक शिकवायची. म्हणून घ्यायची. त्यानंतर गोष्टीचा खुराक असे. या विविध प्रकारच्या श्लोकांमुळे, मनावर आणि वाणीवर उत्तम संस्कार होतात, असं तेव्हा मानलं जायचं. तिने शिकवलेल्या श्लोकांमध्ये एक श्लोक असा होता- 

‘अहल्या, द्रौपदी, सीता, तारा मांदोदरी तथा। पंचकन्या स्मरे नित्यं महापटक नाशनम्।।‘ अर्थ न समजता, त्यावेळी पाठांतर म्हणून पाठ केलेला हा श्लोक.

प्राथमिक शाळेत गेल्यावर देव-देवतांच्या, रामायण-महाभारतातल्या कथा वाचायला-ऐकायला मिळाल्या. त्यातच रामाच्या पदस्पर्शाने शिळा झालेल्या अहिल्येचा उद्धार झाला, ही कथाही ऐकली-वाचली. त्याच काळात रामदासांचे मनाचे श्लोक पाठ केलेले आठवतात. त्यातच एक श्लोक असा होता, ‘अहल्या शिळा राघवे मुक्त केली. पदी लागता दिव्य होओनी गेली. ‘

अर्थात असा अहिल्येला उद्धारणारा श्रीराम, ज्याचे गुणवर्णन करताना वेदवाणीही शिणून गेली, त्या रामाच्या गैरवासाठीच या श्लोकाची रचना रामदासांनी केली होती.

हायस्कूलमध्ये गेले आणि हे असं का? ते तसं का, हे जाणून घेण्याचं कुतुहल वाढलं. त्यावेळी एकदा आजीला म्हंटलं, ‘ तू तो पंचकन्या स्मरे नित्यं ’ श्लोक शिकवलास ना, म्हणजे बघ…. आधी कितीही पापं केली, तरी चालतील… या पंचकन्यांचं स्मरण केलं की झालं! मिळाली सगळ्या पापांपासून मुक्ती… ’

‘फाजीलपणा करू नकोस! तुम्हाला पापं करायला परवानगी दिलीय, असा नाही याचा अर्थ होत! ’ आजी रागारागानं म्हणाली.

‘पण काय ग आजी, या पंचकन्यांचं स्मरण का करायचं?

‘अग, त्या महान पतिव्रता होत्या. ’

‘ मग मला सांग आजी, अहल्या पतिव्रता होती ना? मग गौतम ऋषींनी तिला शिळा होण्याचा शाप का दिला? ’

‘भ्रष्ट झाली होती ना ती? ’

‘पण ती भ्रष्ट झाली यात तिची काय चूक होती? मग तिला का शाप? ’

‘तुम्हा हल्लीच्या मुलींना काही सांगायची सोय नाही. सांगायला गेलं की टांगायला नेता तुम्ही! ’ आजीचं हे उत्तर म्हणजे स्वत: माघार घेताना दुसर्‍यावर ठेवलेलं ठेपर असे. पण अहल्येचं पातिव्रत्य आणि तिचं शिळा होणं याची तर्कशुद्ध सांगड काही आजीला घालता यायची नाही.

अभ्यास वाढला आणि विज्ञानाचा पगडा मनावर बसला, तेव्हा माणसाचं शिळा होणं, बुद्धीनं नाकारलं. या कथेवरची चमत्काराची पुटं खरवडून, त्यावेळी नक्की काय घडलं असेल, याचा शोध, मन नकळत घेऊ लागलं.

अहल्येकडे गौतमाच्या वेशात इन्द्र आला आणि अहल्या फसली, असं पुराणकथा सांगते. पण मला वाटतं, तसं नसणार. कारण ती गौतमांच्या स्ंनन्संध्येची ती वेळ. आपला पाती कोणत्या वेळी कोणती मागणी करेल आणि कोणती अपेक्षा बाळगेल, हे पत्नी या नात्याने अहल्येला निशितच माहीत असणार. ’गणेश पुराण’सारख्या काही पुराणातून अहल्येने इंद्राला ओळखलं होतं, असंही म्हंटलं आहे पण अहल्येने स्वखुशीने इंद्राला जवळ केलं, असं मानलं, तर परंपरेने एक पतिव्रता स्त्री म्हणून अहल्येचं नाव आपल्यापर्यंत पोचवलं नसतं. काळाच्या विस्मृतीत ते केव्हाच लोप पावलं असतं.

इंद्र, इंद्र म्हणूनच अहल्येकडे गेला असेल. त्याला वाटलं असेल, आपल्या वैभवाने, नाव-कीर्तीने आपल्या सौंदर्याने-शौर्याने-सत्तेने अहल्या दिपून जाईल पण प्रत्यक्षात तसे घडले नसेल. अहल्येच्या सौंदर्याने मोहित झालेल्या इंद्राने तिच्यावर बलात्कार केला असेल. या आकस्मित आघाताने ती इतकी बधीर, चेतनाशून्य झाली असेल, की आपल्याबाबतीत काय घडलं, याची जाणीवच ती हरवून बसली असेल. एखाद्या दगडाप्रमाणे, ती आपल्या जाणीवा, वास्तवाचं-परिसराचं भान हरवून बसली असेल. अहल्या शिळा झाली असेल, ती या अर्थाने. एखादा कटू प्रसंग विसरण्यासाठी, तो घडल्याचच मन-बुद्धी नाकारते, असं मानसशास्त्र सांगतं. अहल्येच्या काळातील समाजाची मानसिकता लक्षात घेतली, तर तेव्हा पातिव्रत्य या मूल्याला सगळ्यात जास्त महत्व होतं. त्यामुळे व्यक्तीगत पातळीवर अहल्येने स्वत:चं अस्तित्व नाकारलं असेल. तत्कालीन समजधारणेचा विचार केला तर, चूक आसो की नसो, अहल्या भ्रष्ट झाली, ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे अहल्या एक प्रकारे वाळीत टाकली गेली असेल. तिच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला गेला असेल. तिचे अस्तित्व नगण्य, अर्थशून्य मानले गेले असेल. अपराध इंद्राचा असेल, हे मनोमनी पटूनही इंद्रासारख्या देवराजाच्या विरुद्ध जाण्याची हिंमत कोण दाखवणार? त्यापेक्षा अहल्येला दोषी ठरवणं, अपराधी ठरवणं जास्त सोपं होतं. जास्त सोयीचं होतं. त्यामुळे त्यांनी तिच्याशी बोलणं टाकलं असेल. नातं तोडलं असेल. तिच्याबरोबर कुठलाही व्यवहार करणं टाळलं असेल. ती अगदी एकटी, एकाकी पडली असेल, रस्त्यावरच्या शीळेसारखी.

श्रीरामाने अहल्येचा उद्धार केला, याचा अर्थ एका बाजूने अहल्येच्या मनातली अपराधीपणाची भावना दूर केली असेल. संवेदनाशून्य आणि बधीर मनोवस्थेतून बाहेर यायला तिला मदत केली असेल. स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायला मदत केली असेल. तिच्यात संवेदना, चेतना निर्माण केल्या असतील. त्याचवेळी सामाजिकदृष्ट्या, अहल्या निरपराध आहे, हे ठामपणे सांगून, तिच्या कुटुंबियांनी आणि समाजाने तिचा स्वीकार करावा, असे आवाहन केले असेल.

‘नरेंद्र कोहली’ या हिन्दी लेखकाने रामायणावर आधारलेल्या आपल्या ‘दीक्षा’ या कादंबरीत ‘अहल्योद्धारा’चा हाच सामाजिक आशय उलगडून दाखवलेला आहे. राम हा युवराज. सम्राट दशरथाचा पुत्र. भावी सम्राट. तेव्हा त्याची मान्यता, ही सर्वसामान्य प्रजेच्या दृष्टीने महत्वाची ठरली. अनुकरणीय ठरली. अहल्येला रामाने समाजमान्यता मिळवून दिली. तिचं निर्दोषत्व ग्राह्य धरलं. तिला एक प्रकारे न्याय मिळवून दिला. या अर्थाने रामाने अहल्येचा उद्धार केला.

केव्हा तरी ‘विनय राजाराम’ या हिन्दी कवयित्रीची ‘तुम अहल्या नहीं हो’ ही कविता वाचली आणि ‘अहल्या’ या शब्दाचा एक वेगळाच अर्थ मनाशी उलगडला. इथे ‘अहल्या’ ही सामाजिक नीति-नियमांच्या, कल्पना- धारणांच्या प्रस्ताराखाली दबल्या गेलेल्या स्त्रीची प्रतिनिधी म्हणून यते. या स्त्रीला ना स्वत:चं मन, ना इच्छा-आकांक्षा, ना कल्पना-भावना, ना संवेदना-चेतना. म्हणून कवयित्री म्हणते, ‘समाजाच्या प्रतारणेच्या, फसवणुकीच्या प्रस्तराखाली दबलेल्या हे नारी, तू प्रस्तर (दगड) नाहीस. तू परमाणू आहेस. (या विश्वाचे सृजन परमाणूपासून झाले, असे मानणारे एक तत्वज्ञान आहे.) त्यादृष्टीने तू विश्वाची जननी आहेस. निर्माती आहेस. ऊठ. जाग. स्वत:ला ओळख. आपल्या स्वत:च्या उद्धारासाठी, उन्नतीसाठी तू स्वत:च राम बन.

आपल्या स्वत:च्या विकल परिस्थितीला आपण स्वत:च अनेकदा कारणीभूत असतो, नाही का सख्यांनो? आपल्यातील ऊर्जेची, कार्यशक्तीची आपल्यालाच ओळख नसते. म्हणूनच आपली सखी कवयत्री ‘विनय राजाराम’ आपल्याला सांगते, ‘तू निश्चय कर, तू निश्चल नाही, चल बनशील.

‘अहल्या नहीं, हल्या बनोगी

मन-मस्तिष्क और कर्मशक्तीसे

अनुर्वरा नहीं, उर्वरा बनोगी’

हल म्हणजे नांगर. ‘हल्या’ म्हणजे नांगरण्यायोग्य, अर्थात सुपीक जमीन. ‘अहल्या’ म्हणजे बरड जमीन. ज्या जमिनीत नांगरणी-पेराणी करता येणार नाही अशी जमीन. ज्या जमिनीवर संस्कार करताच येणार नाहीत, ज्याच्यावा पडलेलं बीज, तसंच निष्फळ राहील, अशी अहल्या तू नाहीस. मन-बुद्धी, कर्म- शक्तीच्या योगाने तू ‘अनुर्वरा’ नाही, ‘उर्वरा’ बनशील. म्हणजे सुफलीत, सृजनशील बनशील. चांगल्या विधायक विचारांचं बी तुझ्या मन-बुद्धीत वाढेल. विकासेल. चांगलं कार्य तुझ्या हातून घडेल. नवसृजन होईल. ‘तू अहल्या नाहीस… अहल्या नाहीस…’

सखयांनो, आपल्या आसपास, जवळच्या- दूरच्या परिवारात एखाद दुसरी शिळेतील अहल्या आढळते. तिला दिलासा देणं, तिचा आत्मसन्मान जागृत करणं, तिला क्रियाशील बनवणं, एवढं तरी आपल्याला करायलाच हवं नाही का?

©  उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जर मी… तू असते, आणि तू… मी असतास…” – हिन्दी लेखिका / कवयित्री : नादिरा बब्बर ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? मनमंजुषेतून ?

☆ “जर मी… तू असते, आणि तू… मी असतास…” – हिन्दी लेखिका / कवयित्री : नादिरा बब्बर ☆ प्रा.भारती जोगी ☆

तर… प्रेमाची मितीच बदलली असती.

प्रेमातील दिवसांचे रूपच वेगळं असतं.


तू… तळमळत काढली असतीस आख्खी रात्र, आणि मी… गाढ झोपले असते.

तू… रात्रभर अश्रू गाळत बसला असतास, आणि मी आनंदात, हसत!


तेव्हा तू पत्र लिहिलं असतस, आणि मी… मी ते असच कुठेतरी पडू दिल असतं… विसरून ही गेले असते.

तू… एकटा, एकाकी उभा… खिडकीतून बाहेर बघत… आणि मी..


मी… रात्र रात्र मित्रांच्या मैफिलींमध्ये रंगून जात, त्यांना मोहवत, त्यांची भुलावण करत राहिले असते.

चूक माझी असतांनाही, तू माफी मागितली असतीस.

तेव्हा मी… आणखीनच ताठ होत, ऐट दाखवली असती.

 *जर मी… तू असते, आणि तू मी असतास… तर.. *.


तू आनंद, दु:ख, लज्जा… सगळी गुपिते कानी घातली असतीस माझ्या

आणि मी… मी ती उडवून लावली असती हवेत… निष्ठुर, भावनाहीन, बेपर्वा होऊन.


जेव्हा एकटेपणा असह्य होऊन तू कोसळला असतास पायावर माझ्या

मी… मोठ्या ताठ्याने तूला शहाणपण शिकवलं असतं.

तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींचं कारण पुढे करत… रोज तुझ्या पासून, थोडी थोडी दूर होत गेले असते मी.


जर तू स्वाभिमानाची लाज राखण्यासाठी म्हणून माझ्याशी बोलला असतास ; तर…

मी… मौन धारण करून सुटका करून घेतली असती माझी.

 *जर मी तू असते, आणि तू मी असतास*

*तर… मितीच बदलली असती प्रेमाची*

जेव्हा तू नाईलाजाने माझी प्रत्येक गोष्ट मानून तडजोड केली असतीस

तेव्हा मी माझा हक्क समजून जीवनात आणखीनच मौज-मजा केली असती.

जीवनाच्या प्रत्येक वळणावर तूला माझी उणीव भासली असती.

पण मला तुझी प्रतिमा, माझ्या परिघात खूपच छोटी वाटली असती.


तू काही सांगत असतास तर मला ते ऐकूच आलं नसत.

तू वारंवार आला असतास, पण मी बोलावलं नसत तूला.

तू हात पुढे केला असतास… मी माझा हात मागे घेतला असता.

तूला हसावसं वाटलं असतं… मी पुन्हा पुन्हा रडवलं असत.


पण… हे सगळं कसं बरं झालं असत?

हे तर केवळ अशक्य ना??

भाग्यरेखा कशी बरं पुसता येईल?

तू तर तूच रहाणार आहेस, आणि मी मीच…

प्रेमाच्या तारखा, आणि मिती ही तशाच रहाणार…

युगानुयुगांची परंपरा ही… कोण बदलणार??

गा-हाणी… व्यथा… घुसमटलेल्या मनांच्या… कोण ऐकणार???

(नादिरा बब्बर यांच्या और तुम होते मैं या हिंदी कवितेचा स्वैर भावानुवाद!)

अनुवादिका / कवयित्री : प्रा.भारती जोगी.

पुणे. 

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘स्त्री सक्षमीकरण: राष्ट्रोन्नतीचा उन्नत राजमार्ग…’ – भाग – १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘स्त्री सक्षमीकरण: राष्ट्रोन्नतीचा उन्नत राजमार्ग…’ – भाग – १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार प्रिय मैत्रांनो!

“मी एकटी जग बदलू शकत नाही, पण मी पाण्यात दगड टाकून अनेक लाटा निर्माण करू शकते.” 

 – मदर तेरेसा

स्त्री सक्षमीकरण आणि तिच्या शैक्षणिक अर्हतेशी समांतर असलेले आर्थिक स्वातंत्र्य यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. किंबहुना तिच्या सक्षमीकरणासाठी योग्य शिक्षणाधारित आर्थिक उत्त्पन्न हे सर्वाधिक महत्वाचे आहे. स्त्रीशिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. मुलगी शिकली तर ती दोन घरांमध्ये ज्ञानाचा प्रकाश उजळू शकते ही संकल्पना जुनी असली तरी आज देखील कधी नव्हे इतकी प्रासंगिक आणि समर्पक वाटते. यंदाच्या ८ मार्च या ‘जागतिक महिला दिन’ या विशेष दिनानिमित्य २०२६ ची थीम अतिशय बोलकी आणि आकर्षक आहे. या थीमचा प्रमुख संदेश आहे: “गिव्ह टू गेन” अर्थात ‘कांही हवे असल्यास आधी द्या! ‘ यातील देवाणघेवाणीचा व्यवहार स्त्रिया युगानुयुगे करीत आल्या आहेत. ‘कोहळा देऊन आवळा घेणे’ असे या व्यवहाराचे उफराटे तत्वज्ञान आहे. जीवनभर दुसऱ्यांसाठी चंदनासारखे झिजत राहा, सुगंध येईल तेवढ्यावर आनंद मानीत राहा, कधी त्यागमूर्ती, तर कधी मखरातली देवी बनून राहा पण कांही मागू नकोस, अशी उपजतच शिकवणी घरातील थोरामोठ्या बायांकडून मिळाल्यावर परत तीच दामदुपटीने आपल्या मुलीकडे फॉरवर्ड करणे हे कांही एकल भारतीय स्त्रीचे वर्णन नाही. कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र जगभरात जगात आढळून येते. नाही तर वेगळ्या महिला दिनाची गरज पडती ना!

२०२६ च्या महिला दिनी सकारात्मक दृष्टिकोनातून बघितल्यास हा जो देणे – घेणे नामक उपक्रम आहे त्यात ‘महिला सक्षमीकरण’ महत्वाचे पुढचे पाऊल आहे. हे प्रारूप मांडणारे विचारवंत म्हणतात, “ही वजाबाकी नसून प्रगतीचा हेतुपुरस्सर जोडलेला गुणाकार आहे. ” याला अनुषंगून मला एक सर्वविदित उदाहरण आठवते आहे. मॅट्रिकच्या परीक्षांचा हंगाम सुरु आहे. त्यांच्यापैकी कुठल्याही निकालाची टक्केवारी बघा, मुलींनीच आघाडी मारलेली असते. मंडळी, जेव्हां एखादी मुलगी कसून मेहनत करीत ज्ञानार्जन करीत असते तेव्हां ती तिच्या आयुष्यातील प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर करीत यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत असते. मात्र आश्चर्याची गोष्ट की इयत्ता १२ वी नंतर पुढील शिक्षणाकरता आपल्या देशात ४९. ६% मुलांच्या तुलनेत ४७. २% मुली टिकून राहतात. महाराष्ट्रातील अलीकडली आकडेवारी आशादायक आहे. २०२३-२४ च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की माध्यमिक स्तरावर (माध्यमिक शाळा) १२. ३% मुलांनी शाळा सोडली, तर मुलींच्या बाबतीत हे प्रमाण ९. ४% होते. मुलींच्या उच्चशिक्षणाच्या आड कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिबंध, लेकीचे हात पिवळे करण्याची तत्परता, घराजवळ महाविद्यालयांचा अभाव, आर्थिक विपन्नता, शैक्षणिक संस्थांच्या आवारात मुलींच्या मूलभूत गरज भागविण्याविषयी उदासीनता यासारखी कारणे दिलेली आहेत. मुलींची सुरक्षितता हा मुद्दा पालकांसाठी नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. स्त्रीचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लैंगिक शोषण ही सार्वकालीन समस्या आहे. दुर्दैवाने तिला भौगोलिक, आर्थिक व शैक्षणिक पातळ्यांचा अडसर नाही. सध्या जगभरात गाजत असलेल्या एपस्टीन फायलींच्या प्रकरणाने हा विषय वैश्विक आहे हे सिद्ध केले आहे. मात्र समाधानाची गोष्ट ही की मुलींसाठी शिक्षणातून माघार घेण्यात शिक्षणाविषयी उदासीनता हे कारण अभावानेच आढळते. जर समाज, संस्था आणि सरकार या अडचणींवर मात करण्यासाठी उदारकर्त्या दात्यांची भूमिका घ्यायला तयार झाले तर त्या संधीचे सोने करायला बहुतांश मुली तयार होतील असे वाटते. हाच तो समजून उमजून केलेला भविष्याप्रतीचा गुणाकार समजावा. दात्यांनी एक पट दिले तर गरजू मुली दहा किंवा अधिक पटीने समाजाचे ऋण फेडण्यास कंबर कसून मेहनत घेतील हे नक्की

 प्रिय मैत्रांनो, मला एक भविष्यकालीन आकडेवारी अचंभित करून गेली. २०२५ पर्यंत जागतिक लोकसंख्या पुरुषांना थोडेच झुकते माप देत आली आहे, दर १०० महिलांमागे अंदाजे १०१ ते १०२ पुरुष (अंदाजे ५०. ३% पुरुष: ४९. ७% महिला) असे! मुले जन्माला येत असताना (१०० मुलींमागे अंदाजे १०६ मुले) असा मामला असूनही पुरुषांमध्ये मृत्युदर अधिक आहे. त्यामुळे वृद्ध वयोगटात महिलांची संख्या समान किंवा अधिक आहे. त्यामुळेच जागतिक स्तरावर २०५० पर्यंत स्त्री-पुरुष प्रमाण समसमान होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. हे जर सत्य म्हणून गृहीत धरले तर महिलांची भरभराट पुरुषांइतक्याच गतीने व्हायला हवी. प्रत्यक्षात वस्तुस्थितीचा अंदाज लावायला उच्चभ्रू समाजातील स्त्रिया, जन्मापासूनच एकल संतती म्हणून सर्वप्रकारच्या सुख-सोयी-सुविधा लाभलेल्या स्त्रिया किंवा मोजक्या सुधारक मनोवृत्तीच्या दानशूर पालकांच्या भाग्यवान कन्यका यांच्याकडे अंमळ दुर्लक्ष करावे लागेल. म्हणजे बघा, एखाद्या राज्यात मोठा राजवाडा आहे. सभोवती नोकर-चाकर मंडळींचा वावर असल्याने राजवाड्याच्या आसपास थोडीफार घरे आहेत. या राजवाड्याच्या परिसरात संपन्नता ओसंडून वाहत आहे. एखाद्या हुशार प्रवाश्याला राज्याच्या वैभवाचा अंदाज घ्यायचा असेल तर तो या राजवाड्याच्या परिसरात जाईल कां? नाही! तो एखाद्या गरीब नागरिकाच्या झोपडीत आसरा मागायला जाईल. अर्थात राजाच्या राज्याचा अंदाज लावायला त्याच्या राज्यातील निर्धनातील निर्धनांच्या झोपड्यांची परिस्थिती बघायला हवी.

श्रीमंती किंवा संपत्ती ही मर्यादित नसते, ती नवनिर्मित केली जाऊ शकते. एकाची गरिबी दूर करण्यासाठी दुसऱ्याला गरीब बनवण्याची गरज नाही, तर संधी, शिक्षण आणि कौशल्याच्या माध्यमातून गरिबांना सक्षम करणे आवश्यक आहे. हे प्रमेय मांडण्याचे कारण लाडकी बहीण योजना व तत्सम विद्यमान रेवडी वाटणाऱ्या तथाकथित समाजकल्याण योजना! या योजनांतून कुणाचे किती आणि कसे कल्याण होते, हे सांगायची मुळीच आवश्यकता नाही. या योजनांतून आपण आर्थिक सुस्थितीकडे जात नसून यांचा उपयोग एखाद्या बाळबोध पांगुळगाड्यासारखा करीत आहोत. मुळात फुकट पैसे मिळाले की त्यांची किंमत शून्य होते. असे आर्थिक गणित सोडवण्यासाठी महत्त्वाची आर्थिक आणि सामाजिक संकल्पना समजून घेण्याची आवश्यकता आहे.

 या संकल्पनेचे निम्नलिखित मुख्य पैलू स्त्रीच्या आर्थिक आणि सामाजिक उत्कर्षासाठी अत्यंत महत्वाचे आहेत असे माझे मत आहे.

– क्रमशः भाग पहिला 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सज्जनांचे मौन : एक दाहक वास्तव… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ सज्जनांचे मौन : एक दाहक वास्तव… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

 (जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर..) 

परवा टीव्हीवर महाभारतातला द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग पाहत होतो. हा प्रसंग अनेक वेळा पाहिलेला असला तरी प्रत्येक वेळी तो मनाला नव्याने अस्वस्थ करून जातो. खरे तर हा प्रसंग इतका हृदयविदीर्ण करणारा आहे की तो पाहवत नाही. भर दरबारात उभ्या असलेल्या द्रौपदीचा आक्रोश, तिने लज्जा रक्षणासाठी केलेली धडपड, तिचाआकांत, तिच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू आणि तिची असहाय्यता पहावत नाही.

पण त्या प्रसंगात सर्वांत जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट कोणती आहे हे माहिती आहे का? तर ती आहे सभेत बसलेली महान पराक्रमी अशी धुरंधर मंडळी. पितामह भीष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य, विदुर यांसारखे धर्मनिष्ठ आणि विद्वान मानले जाणारे लोक त्या दरबारात उपस्थित असतात. पण त्या वेळी ही सगळी मंडळी आपल्या तोंडात जणू मिठाची गुळणी धरून असतात. अन्याय डोळ्यांसमोर घडत असताना ते हातावर हात धरून शांत बसलेले दिसतात. त्यांची हतबलता पहावत नाही.

त्याशिवाय ज्यांनी अशा प्रसंगी उसळून उभे राहावे असे द्रौपदीचे पराक्रमी म्हणून ओळखले जाणारे पाच पतीदेखील त्या वेळी असहाय्य होऊन बसलेले असतात. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या पत्नीचा अपमान होत असताना ते हात चोळत बसण्यापलीकडे काही करू शकत नाहीत. ज्यावेळी आपल्या पत्नीच्या पदराला कोणी हात घालते आहे अशा वेळी राजशिष्टाचार, द्युताचे नियम इत्यादी सगळ्या गोष्टी बाजूला सारून भीम, अर्जुन यांच्यासारखी धुरंदर मंडळी उभी राहिली असती तर पुढील महाभारत कदाचित घडले नसते. शेवटी द्रौपदीचा कृष्ण सखा मदतीला धावतो.

हे सगळे पाहून अस्वस्थ व्हायला होते. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने गीता फक्त अर्जुनाला सांगितली नाही. अर्जुन हा निमित्त आहे परंतु गीतेचा उपदेश हा सर्वांसाठी आहे. त्याचप्रमाणे मला असे वाटते की हा द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग केवळ द्रौपदी पुरता मर्यादित राहत नाही द्रौपदी ही प्रातिनिधिक आहे. ती केवळ ऐतिहासिक व पौराणिक व्यक्तिरेखा म्हणून सोडून देता येणार नाही. ती जगातील सगळ्या स्त्रियांची प्रतिनिधी आहे. दुर्योधनादि कौरव सोडले तर दरबारात बसलेली सगळी मंडळी म्हणजे सज्जन मंडळी आहेत असे म्हणूया. हे तथाकथित सज्जन देखील सार्वकालिक सज्जनांचे प्रतिनिधी आहेत असे मला वाटते आणि अशा सज्जनांचे मौन किंवा त्यांची निष्क्रियता समाजासाठी किती घातक आहे याचे हे इतिहासाने दिलेले तेव्हापासूनचे उदाहरण आहे.

द्रौपदी वस्त्रहरणाचा महाभारतातील हा प्रसंग केवळ एका स्त्रीच्या अपमानाची कथा नाही, तो समाजातील सज्जनांच्या निष्क्रियतेचा आरसा आहे. अन्याय करणारा दुर्जन नक्कीच दोषी असतो; पण त्याच्याइतकाच दोष त्या सज्जनांचाही असतो, जे आपल्या डोळ्यासमोरअन्याय घडत असताना शांत बसलेले दिसतात. अशावेळी त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा, त्यांच्या पराक्रमाचा काय उपयोग! त्यांचे शिक्षण व्यर्थच म्हणायचे!

आता आपल्या लज्जा रक्षणासाठी कोणी येणार नाही हे जेव्हा द्रौपदीला लक्षात आले, तेव्हा तिने अनन्य स्वराने श्रीकृष्णाचा धावा केला. त्याला आर्त हाक मारली. द्रौपदीचा हा सखा त्या हाकेला प्रतिसाद देत धावून आला आणि त्याने तिची लाज वाचवली. तिच्या साडीचे अंतहीन वस्त्र झाले. तिचे वस्त्र ओढणारे हात थकून जमिनीवर पडले आणि भर दरबारात तिचे जे वस्त्रहरण होणार होते ते टळले.

त्या प्रसंगी संकटाच्या क्षणी श्रीकृष्ण धावून आले. आजही ते तसेच येतील का? त्यांची वाट पाहायची का? आजच्या काळात तसे होणे शक्य आहे का?

आजच्या या काळात कोणा अबलेच्या आर्त हाका ऐकून श्रीकृष्ण धावून येतील आणि तिची दुष्टांच्या तावडीतून सुटका करतील अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

आजची परिस्थिती वेगळी आहे. आज प्रत्येक सज्जन माणसालाच स्वतःमध्ये कृष्ण जागवावा लागेल. आपण भगवद्गीता वाचतो. अनेकदा तिचे पारायणही करतो. तिच्या श्लोकांचा आदर करतो. पण गीतेचा संदेश केवळ वाचण्यासाठी नाही; तो आचरणात आणण्यासाठी आहे. अन्यायासमोर उभे ठाकणे, दुर्बलांच्या पाठीशी उभे राहणे आणि अधर्माला विरोध करणे हाच गीतेचा खरा अर्थ आहे. आपल्या कर्तव्यापासून च्युत झालेल्या अर्जुनाला कर्मप्रवृत्त करणे हाच गीतेचा उद्देश होता आपल्याला देखील गीता कर्म प्रवण करते.

समाजात अनेक ठिकाणी स्त्रियांवर वेळोवेळी अन्याय होतो. कधी घराच्या चार भिंतीत, कधी भर रस्त्यावर, तर कधी तिच्या कार्यक्षेत्रात. अशा वेळी अनेकदा सभोवताली उभे असलेले (सज्जन) लोक गप्प राहणे पसंत करतात. सत्तेची भीती, पैशाचा मोह किंवा स्वतःच्या सुरक्षिततेची चिंता या कारणांमुळे सज्जन लोक मौन बाळगतात.

पण इतिहास सांगतो की समाजाचे सर्वांत मोठे नुकसान दुर्जनांच्या शक्तीने होत नाही; ते सज्जनांच्या मौनामुळे होते. लोकशाहीत जेव्हा निवडणुका होतात, तेव्हाही बऱ्याचदा सज्जनशक्ती मौन राहते त्यामुळेच नको असलेल्या व्यक्ती सत्तेवर येण्याचा धोका असतो.

८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा होतो आहे. त्या दिवशी आपण स्त्रीशक्तीचा गौरव करतो, तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करतो. तिचे अभिनंदन करून मोकळे होतो. परंतु तिचा खरा सन्मान केवळ अभिनंदनाच्या संदेशांत नाही. तो त्या वेळी सिद्ध होतो, जेव्हा अन्यायाच्या प्रसंगी समाजातील सज्जन लोक धैर्याने उभे राहतात. असे जेव्हा होईल तेव्हाच स्त्रीला आपण सुरक्षित असल्याचा विश्वास निर्माण होऊ शकेल. एक व्यक्ती म्हणून तिला तिचे अधिकार देणे ही त्या पुढची पायरी आहे.

वर उल्लेख केलेला महाभारतातील प्रसंग आपल्याला सांगतो की सज्जनांचे मौन हेही अनेकदा अधर्माला बळ देणारे असते. आजच्या काळात श्रीकृष्ण प्रत्यक्ष येणार नाहीत. कारण त्यांनी गीतेच्या माध्यमातून विवेकाची ज्योत आपल्या हातात दिली आहे.

आता सज्जनशक्ती हीच कृष्णशक्ती व्हावी ही काळाची गरज आहे. कदाचित स्त्रीसन्मानाचा खरा उत्सव तेव्हाच साजरा होईल, जेव्हा समाजातील सज्जनांचे मौन तुटेल.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘मनातला कचरा…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

श्री मनोहर जांबोटकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘मनातला कचरा…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

मनावरील ताण कमी करण्यासाठी उत्तम उपाय!

‘समीर’ (वय २८) हा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. कामाचा प्रचंड ताण, डोक्यावर ३० लाखाचं गृहकर्ज आणि ऑफिसमधे बॉसचा जाच. समीर नेहमी चिडचिड करायचा. त्याच्या चेहऱ्यावर कधीच हास्य नसायचं. त्याला वाटायचं, “जगात फक्त मलाच दुःख आहे. “

तो रोज संध्याकाळी पार्कमध्ये जाऊन एका बाकड्यावर बसत असे. तिथेच समोरच्या बाकड्यावर एक ७०-७५ वर्षांचे आजोबा, ज्यांना सगळे ‘दामू काका’ म्हणायचे, बसलेले असायचे. दामू काका दिसायला एकदम साधे. पांढरा सदरा, डोक्यावर गांधी टोपी.

त्यांच्या हातात नेहमी एक ‘जाड काळ्या रंगाची डायरी’ आणि एक पेन असायचं.

ते कोणाशीच बोलायचे नाहीत. ते फक्त मान खाली घालून त्या डायरीत काहीतरी भरभर लिहीत असायचे. कधी कधी ते थांबायचे, आकाशाकडे बघून हसायचे आणि पुन्हा लिहायला लागायचे.

समीरला त्यांचा खूप राग यायचा. “काय म्हातारा आहे? घरात बसून देवाचं नाव घ्यायचं सोडून इथे येऊन काय कादंबरी लिहितोय? “

एक दिवस समीरचा बॉसशी खूप मोठा वाद झाला. समीरला रडू येत होतं. तो पार्कमध्ये आला आणि डोक्याला हात लावून बसला.

तेवढ्यात त्याला खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला.

दामू काका उभे होते.

काका शांतपणे म्हणाले, “बाळा, खूप ओझं झालंय का डोक्यावर? माझ्याकडे दे, मी हलकं करतो. “

समीर चिडला. “तुम्ही काय करणार? तुम्ही काय जादूगार आहात? जा. तुमचं काम करा. “

दामू काका हसले. त्यांनी आपली ती ‘काळी डायरी’ उघडली आणि पेन समीरच्या हातात दिलं.

“हे बघ, मी जादूगार नाही. मी फक्त एक ‘कचरा वेचणारा’ आहे.

लोक घरातला कचरा डस्टबिनमध्ये टाकतात, पण डोक्यातल्या कचऱ्याचं काय?

त्याचा वास येतो, तो सडतो आणि मग माणूस वेडा होतो.

माझं एकच काम आहे… लोकांच्या डोक्यातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे.

तुला ज्या गोष्टीचा त्रास होतोय, ज्याचा राग येतोय, ते सगळं या पानावर लिही. शिव्या दे, रड, ओरड… सगळं या कागदावर उतरव. “

समीरला काय वाटलं कुणास ठाऊक, त्याने पेन घेतलं आणि लिहायला सुरुवात केली.

बॉसचा राग, कर्जाचं टेन्शन, बायकोशी झालेला वाद, स्वतःचा अपयशीपणा…

समीर लिहीत गेला. १ पान, २ पानं… ४ पानं भरली.

लिहिता लिहिता समीरच्या डोळ्यातून पाणी येत होतं. त्याचा हात थरथरत होता.

पण जसं जसं तो लिहीत होता, तसं तसं त्याच्या छातीवरचं ओझं कमी होत होतं.

त्याला वाटलं, जणू कोणीतरी त्याच्या मनातला ‘विषारी वायू’ काढून घेतलाय.

लिहून झाल्यावर त्याने काकांकडे बघितलं.

काकांनी ती ४ पानं डायरीतून फाडली.

समीरला वाटलं ते वाचतील.

पण काकांनी खिशातून एक लायटर (Lighter) काढला.

आणि समीरच्या डोळ्यादेखत ती लिहिलेली ४ पानं… जाळून टाकली.

समीर ओरडला, “अहो! हे काय करताय? मी इतकं महत्त्वाचं लिहिलं होतं! “

दामू काका हसले आणि म्हणाले:

“बाळा, ते महत्त्वाचं नव्हतं, तो ‘कचरा’ होता.

एकदा कचरा घराबाहेर काढला की आपण तो जपून ठेवतो का? नाही ना?

मग मनातल्या वेदना कागदावर का जपून ठेवायच्या?

तू लिहिलंस… तुझं मन रिकामं झालं.

आणि मी जाळलं… म्हणजे त्या समस्या आता अस्तित्वातच नाहीत.

आता तू मोकळा आहेस. नवीन सुरुवात कर. “

समीरला त्या दिवशी खूप शांत झोप लागली.

त्यानंतर समीर रोज काकांकडे जायचा. काही ना काही लिहायचा आणि काका ते पान जाळून टाकायचे.

समीरच नाही, तर पार्कमधले अनेक लोक आता काकांकडे आपला ‘मानसिक कचरा’ टाकायला येत होते.

काका कोणाचंही गुपित वाचत नसत. ते फक्त जाळत असत.

सहा महिन्यांनंतर…

एक दिवस समीर पार्कमध्ये आला, पण दामू काकांचा बाकडा रिकामा होता.

दुसऱ्या दिवशीही ते आले नाहीत.

तिसऱ्या दिवशी समीरला समजलं की, रात्री झोपेतच दामू काकांचं निधन झालं.

समीर धावत काकांच्या घरी गेला.

तिथे काकांचा मुलगा सामान आवरत होता.

समीरने विचारलं, “त्यांची ती डायरी कुठे आहे? मला ती बघायची आहे. “

मुलाने कपाटातून ती ‘काळी जाड डायरी’ काढून समीरच्या हातात दिली.

समीरला वाटलं, यात काकांनी जगाचं रहस्य, काहीतरी मोठं ज्ञान लिहून ठेवलं असेल.

त्याने थरथरत्या हाताने डायरी उघडली.

पहिलं पान… कोरे (Blank).

संदुसरं पान… कोरे.

तिसरं… चौथं… शेवटचं पान…

संपूर्ण डायरी ‘कोरी’ होती.

त्या डायरीच्या शेवटच्या कव्हरवर काकांच्या अक्षरात फक्त एक ओळ लिहिलेली होती:

“माणसाने आठवणी ठेवाव्यात, पण जखमा नाही. मी माझं आयुष्य रोज जाळलं, म्हणूनच रोज नव्याने जगलो. “

समीरला समजलं की काका रोज संध्याकाळी डायरीत काय लिहीत होते?

ते काहीच लिहीत नव्हते.

ते फक्त दिवसभराच्या कटू आठवणी कागदावर उतरवून त्या जाळून टाकत होते.

त्यांनी कधीच दुःख ‘साठवून’ ठेवलं नाही, म्हणून ते ७५ व्या वर्षीही मुलासारखे हसत होते.

समीरने त्या दिवशी ती कोरी डायरी आपल्यासोबत घेतली.

लिहण्यासाठी नाही… तर हे आठवण्यासाठी की, “जगण्याचं पहिलं सूत्र म्हणजे विसरणे (Letting go). “

आपण मोबाईलची मेमरी फुल झाली की ‘क्लीन’ करतो, पण मनाची मेमरी कधीच क्लीन करत नाही. जुन्या भांडणांचं आणि अपमानाचं ओझं वाहून नेऊ नका.

रोजच्या रोज मनातला कचरा कागदावर उतरवा आणि जाळून टाका. ‘रिकामं मन हेच आनंदाचं घर असतं. ‘

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गळाभेट… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ गळाभेट...श्री प्रमोद वामन वर्तक ☆

भेट झाली आम्हां भावांची

आला कसा दुर्मिळ योग,

काय असे उद्याचा भरवसा 

कोणा नशिबी कसले भोग!

*
उद्या करेल कोणी ललना

आम्हां कोणाचा शिरच्छेद,

काढ्यात घालून सकाळी 

घालवू पाही आपला मेद!

*

कोणा किसून किसणीवर 

किस कोणाचा तरी पाडेल,

चव वाढवण्या लोणच्याची 

आमचाच उपयोग करेल!

*

आमची आजची गळाभेट 

असेल कदाचित शेवटची,

आयुष्य सदा खर्ची पडते

चव वाढवण्या जिभेची!

चव वाढवण्या जिभेची!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पाटा वरंवटा ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पाटा वरंवटा ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

पाटा वरंवटा हा तेंव्हा

स्वयंपाकाचा साथी होता

किती वाटा वाटण तुम्ही

कामाला दणकट होता!!

*

बारीक, भरडे हवे तसे

कौशल्यच हातजोराचे

घरच्याघरात स्त्रियांसाठी

जिमच होते जणू ते घरचे!!

*

चव त्यामुळे पदार्थाची

जिभेवर रेंगाळत राही

घरचे जेवण सकस असे

पंगतीतही कौतक होई!!

*

कधी वडारीण दारावरती

टाकी लाऊन देण्या येई

टाकी लावता पाटावरवंटा

सेवेला परत तयार होई!!

*

बारशात कधी हा वरवंटा

बाळा आधी पुजला जाई

गोविंद घ्या, गोपाळ घ्या ची

बाळा आधी गोपा होई!!

*

अजूनही किचनमधे माझा

अस्तित्वात पाटा-वरवंटा

कित्येक वर्षे स्वयंपाकात

खुपच होता त्याचा वाटा!!

*

लहानमोठा दगडी खलबत्ता

यांचा तेंव्हा दुजा साथी होता

छोठ्या टेचायाच्या कामी

चुलीजवळच हाती होता!!

*

पाट्या वरंवट्याच्या सोबत

आजही येते त्याची आठवण

श्वास चालू आहे तोवर राही

मनात आठवणींची साठवण!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – संस्मरण ☆ “भगवान् का कितना अंश बचा डाॅक्टर में?” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ संस्मरण – “भगवान् का कितना अंश बचा डाॅक्टर में?” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

हरियाणा के राज्यपाल बंडारू दत्तात्रेय  ने रोहतक पीजीआई के दीक्षांत समारोह में कहा कि- “डाॅक्टर को जनता भगवान् मानती है। ऐसे में डाॅक्टर को अपने पेशे को समाजसेवा का माध्यम बना लेना चाहिए। सेवाभाव से किये हर कार्य से परिवार में समृद्धि आती है।” इस तरह महामना राज्यपाल ने डाॅक्टर के रूप में उन्हें भगवान् के बहुत करीब माना। पर आजकल आप जो स्थिति बड़े या छोटे अस्पतालों में देखते हैं, क्या वह डाॅक्टर को इसी रूप में, इसी छवि में प्रस्तुत करती है? मुझे याद है वह सन् 1999 का तेइस सितम्बर, जब मेरी बेटी के जीवन में भयंकर तूफान आया था और मैं उसे एम्बुलेंस में पीजीआई रोहतक में लेकर पहुंचा था। बेटी का छह घंटे लम्बा ऑपरेशन चला और वह ज़िंदगी की लड़ाई जीत गयी। डाॅक्टर एन के शर्मा ने पूछा कि क्या आपको विश्वास था कि बेटी का ऑपरेशन सफल होगा ? मैंने जवाब दिया कि डाॅक्टर शर्मा आप भी नहीं जानते, जब आप मेरी बेटी का ऑपरेशन कर रहे थे तब आपके नहीं वे हाथ भगवान् के हाथ थे, उस समय आप भगवान् के बिल्कुल करीब थे, जिससे मेरी बेटी को भगवान् ज़िंदगी लौटा गये। डाॅक्टर शर्मा की आंखों में भी खुशी के आंसू थे और मेरी आँखों में भी ! इसमें उन दिनों मंत्री और मेरे मित्र प्रो सम्पत सि़ह का भी योगदान रहा, जो पता चलते ही दूसरे दिन वे पीजीआई, रोहतक के डायरेक्टर के पास पहुंचे और मुझे भी बुला लिया ! इस तरह हम तीन माह के बाद पीजीआई से मुक्त हुए लेकिन सचमुच भगवान् के दर्शन हो गये।

आजकल क्या ऐसे भगवान् बच रहे हैं? प्राइवेट अस्पताल अब पांच सितारा होटल जैसे हो गये हैं और इनका सारा खर्च मरीज के परिजनों से ही वसूला जाता है। बड़े बड़े अस्पतालों की खबरें आती हैं कि लाखों लाखों रुपये का बिल बना दिया और परिजन परेशान हो रहे हैं घर‌ तक बिकने की नौबत आ जाती है, बैंक बेलेंस खाली हो जाते हैं। एक घटना और याद आ रही है! बेटी डेंगू से पीड़ित थी और डाॅक्टर अजय चौधरी ने उसका इलाज करना शुरू किया और बड़े विश्वास से कहा, कि मैं इसे ठीक कर दूंगा और उपचार शुरू किया। एक दिन बेटी के प्लेटलेट्स चढ़ाये जा रहे थे कि मुझे अज्ञात नम्बर से फोन आया और कहा गया कि आप फलाने अस्पताल पहु़ंच जाइये ! हम तोशाम के निकट खानक के मज़दूर हैं और हमारे एक साथी की मृत्यु इलाज के दौरान हो गयी है, डाॅक्टर हमें शव ले जाने नहीं दे रहे। मैं चलने लगा तो पत्नी ने रोकने की कोशिश की कि आपकी बेटी ज़िंदगी से लड़ रही है और आप दूसरों के लिए भाग रहे हो ? मैंने कहा कि क्या पता उनकी दुआ मेरी बेटी को लग जाये और मैंं उस अस्पताल गया, जहां वे लोग मेरी राह देख रहे थे, डाॅक्टर के चैम्बर में उनके साथ गया और विनती की कि आप इनके साथी का पार्थिव शरीर‌ दे दीजिए लेकिन डाॅक्टर का कहना था कि ये हमारे पैसे नहीं दे रहे, इस पर मजदूरों ने बताया कि हमारी यूनियन ने चंदा इकट्ठा किया है और वही हमारे पास है, इससे ज्यादा की हमारी हिम्मत नहीं। डाॅक्टर ने कहा कि मैं‌ तो अपनी फीस छोड़ दूंगा लेकिन मेरे सहयोगी डाॅक्टर नहीं मानेंगे। मैंने कहा कि  फिर ठीक है, मेरे सहयोगी पत्रकार मेरी बात मान जायेंगे और अभी आकर लाइव चला देंगे, फिर आपका क्या होगा, यह विचार कर लीजिए ! बस, वे सयाने और अनुभवी थे, उन्होंने बिना एक रुपया लिए उन्हें उनके साथी का शव सौंप दिया लेकिन ऐसी नौबत अनेक अस्पतालों में आती है और आये दिन ऐसी शर्मसार करने वाली खबरें भी पढ़ने को मिलती हैं ! कृपया भगवान् का रूप बने रहिये !

उदय भानु हंस ने कहा भी है :

मैं न मंदिर न मस्जिद गया

कोई पोथी न बांची कभी

एक दुखिया के आंसू चुने

बस, मेरी बंदगी हो गयी !

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares