मराठी साहित्य – विविधा ☆ मराठी भाषा समुद्रापलीकडे जावी यासाठी काय करावे? ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ मराठी भाषा समुद्रापलीकडे जावी यासाठी काय करावे? ☆ सौ राधिका भांडारकर

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि समस्त मराठी मनामनात आनंदाचा सागर उचंबळला. वास्तविक हा मनामनातला आनंद मायमराठी बद्दलच्या अभिमानाचेच प्रतीक आहे पण नुसता भाषेचा अभिमान, अस्मिता बाळगणं पुरेसं नाही तर आपल्या भाषेला जागतिक दर्जा मिळवून देण्याचं प्रत्येक मातृभाषिकाचं कर्तव्य आहे. जगात कितीतरी परकीय भाषा बोलल्या जातात, अभ्यासल्या जातात, मग जगाच्या कानाकोपऱ्यात सातासमुद्रापलीकडेही आपली मराठी भाषा त्याच आत्मियतेने अथवा औत्स्युक्याने, त्यातलं सौंदर्य, संस्कृती, परंपरा जाणून, आपल्या अफाट ग्रंथसंपदेचा मान राखून का अभ्यासली जाऊ नये? आज अनेक मराठी कुटुंबातील मुले परदेशी स्थायिक आहेत. तिथे जन्माला येणाऱ्या मुलांना मराठी भाषा ही त्यांची ही मूळ मातृभाषा आहे याची जाणीव करून देणे हे त्यांच्या पालकांचं कर्तव्य आहे. त्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये परदेशी भाषेला पर्याय नसला तरी जिथे आपलं मूळ आहे त्या भाषेचं ज्ञान असायला हवं याची जाणीव जरी करून देता आली तरी मराठी भाषेसाठी चाललेली चळवळ अर्धी जिंकलो असं म्हणायला हरकत नाही.

तिसऱ्या पिढीशी आपला संवाद जुळला पाहिजे आपल्याच नातवंडांशी आपल्याला बोलता यावं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी, गमती जमती सांगता, करता याव्यात म्हणून मराठी मातृभाषेची ओळख आणि त्यातून आवड निर्माण करण्याची गरज ही मागच्या पिढीकडून अपेक्षित आहे,

माझ्या नाती माझ्याशी मराठीत बोलू शकतात याचं मला कौतुकच नाही पण अभिमानही वाटतो. त्यांच्या सुट्टीच्या काळात मी त्यांना आंतरजालावर वर्णमाला, बाराखडी, शब्दांची ओळख, जोडाक्षरे आणि वाक्यं लिहायला आणि ओळखायला शिकवली, त्यांना मराठी आलंच पाहिजे हा माझा दुराग्रह नक्कीच नव्हता पण एका सुंदर, आणि त्यांचं मातृमूळ असलेल्या भाषेशी त्यांचं नातं जुळावं म्हणून माझा खटाटोप होता आणि तो नक्कीच यशस्वी झाला. हळूहळू मी त्यांना काही बडबड गीते काही बालगीते शिकवली, भारतातून पुस्तके पाठवली. त्यांनी तर ती वाचलीच पण या मराठी भाषेचे कौतुक त्यांनी त्यांच्या सवंगड्यांपर्यंत पोहोचवले. हे काही थोडकं आहे का?

आज तिथे शनिवार रविवारी काही मराठी संघटनाच्या माध्यमातून अथवा खाजगीरित्या काही तास मराठीचे वर्ग घेतले जातात आणि अशा वर्गात आपल्या मुलांना पालक मराठी भाषेचं जतन व्हावं म्हणून आपुलकीने पाठवतात. तिथे मराठी शब्दांचे उच्चार, पाठांतर, श्लोक पठण, प्रार्थना या माध्यमातून मराठी भाषा शिकवली जाते.

अगदी अलीकडेच एका समारंभात एका मराठी कुटुंबातल्या परंतु जन्माने अमेरिकन असलेल्या तेरा वर्षीय मुलाने शिवरायाचा पोवाडा अस्खलितपणे सादर केला तेव्हा सभागृहातील समस्त मराठी समुदायाने त्याला उभे राहून मानाचा मुजरा दिला.

।ईये मराठीचिये नगरी अवतरली जणू अटकेपार सागरी।।

तिथल्या संपन्न वाचनालयात गेल्यानंतर एका विभागात मला सुप्रसिद्ध मराठी लेखकांची पुस्तके दिसली आणि माझं मन एकदम भरून आलं पण त्यांची अल्पसंख्या पाहून मात्र थोडसं वाईटही वाटलं. हा विभाग इथल्या वाचकांसाठी अधिक समृद्ध करायला हवा त्यासाठी मराठी साहित्य संपदेचा इथे जाणीवपूर्वक भरणा झाला तर मराठी पुस्तकांसाठी एक चांगला वाचक वर्ग तयार होईल.

एक विचार माझ्या मनात आला की इथे जशी ठिकठिकाणी धार्मिक श्रद्धास्थाने मंदिरे आढळतात तशी भाषिक वाचनालये का असू नयेत इथल्या मराठी भाषिकांनी एखादं समृद्ध संपन्न मराठी वाङ्मयाचेच स्वतंत्र वाचनालय सुरू करणे मुळेच अशक्य नाही. शेवटी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी आवश्यक असते ती दर्जेदार सातत्याने होणारी साहित्य निर्मिती आणि मोठा वाचक वर्ग. ही जागरूकता असेल तर भाषा का विझेल? ती निरंतर, चिरंतन राहील. चला तर मग सागरापलीकडे रुजवूया हे रोप मराठी भाषेचे.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देवळाबाहेरचे देव… — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ देवळाबाहेरचे देव…  — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळूसकर

रेवती आंघोळ करून तयार होत होती. तिचा नवरा डॉ. मधुर नाश्ता करत होता, त्याला रेवती म्हणाली..

‘मधुर, माझ्यासाठी आज एक काम कर..

‘काय?

‘बारा वाजता देवीच्या देवळात महाआरती असते, तू आता दवाखान्यात गेलास की साडेअकराला घरी ये आणि मला देवळात सोड..

‘अग पण मला कस जमेल?

‘जमेल.. बाकी पुरुष बघ आपल्या बायकोला घेऊन सायंकाळी फिरायला जातात, हॉटेलात जातात, मॉलमध्ये जातात आणि देवळात पण जातात, तू माझ्याबरोबर कुठे येतोस का?

“अग त्त्यांचे आणि माझे प्रोफेशन वेगळे आहे, मला सायंकाळी दवाखान्यात जायचे असते आणि..

‘आणि नाही बाणी नाही.. पुढचे सर्व मला माहित आहे.. तुला देवळात यायची फारशी इच्छा नसते.. मग आत येऊ नको ना.. मला आरतीला सोड आणि फक्त अर्ध्या तासाने घरी आण. एकदिवस पेशन्ट थोडी वाट बघतील..

‘अग पण.. तुला सोडायला जायला इथून वीस मिनिटे, परत घरी सोडायचे, म्हणजे मला अर्धा तास बाहेर वाट पहात राहायला हवी..

‘मग तू आत का येत नाहीस आरतीला? तेव्हडेच पुण्य…

‘प्रत्येकाची पुण्य मिळविण्याची कल्पना वेगवेगळी असते. तुला देवींची ओटी भरून, आरती करून पुण्य मिळते असे वाटते, मला तसे नाही वाटतं. मला माझ्या पेशन्टना रोगमुक्त करण्याने त्त्यांचे आशीर्वाद महत्वाचे वाटतात..

‘ठीक आहे.. तू येतोस की नाही साडेअकराला ते बोल…

‘मी येईन पण बाहेर बसेन तुझी वाट बघत.. त्या निमित्ताने तो परिसर पहाणे होईल आणि कोणी ओळखीचे भेटले तर..

‘गप्पा? बरोबर..

‘अग गप्पा पण मारायला हव्यात, त्यामुळे समाज कळतो, लोकांना सध्याच्या परिस्थितीबंद्दल काय वाटते हे कळते.. एक भारतीय नागरिक म्हणून लोकांचा आरसा पण पहायला हवा..

‘तू आरसा बघ किंवा आणि काय बघ.. मी साडेअकराला तुझी वाट पहात आहे..

‘ठीक.. मी येतो अकराला..

 डॉ. मधुरने स्कुटर स्टार्ट केली आणि तो दवाखान्यात गेला.

मधुर दवाखान्यात पोचला. आज कोणता तरी सण होता त्यामुळे नेहमीसारखी गर्दी नव्हती. त्याने एप्रन अंगात चढवीला आणि पेशन्ट तपासायला सुरवात केली. अधूनमधून त्याचे लक्ष हातातील घड्याळाकडे जात होते.. साडेअकराला रेवतीला घरी येतो म्हणून सांगितले आहे.. तसे रेवतीला पण फारसे बाहेर जात येत नाही.. एकतर आपले घर शहरापासून लांब आहे आणि दुसरे म्हणजे आपली आई आपल्यासोबत असते.. सध्या ती बहिणीकडे गेली आहे म्हणून नाहीतर तिला एकटीला घरी सोडून रेवती कुठे जात नाही.

सव्वाअकराला डॉ. मधुर बाहेर पडला.. जाताजाता तो मंदाला म्हणाला..

‘मंदा.. मी रेवतीला घेऊन देवीच्या देवळात जातोय.. एक पर्यत येतो.. पेशन्टना सांग डॉक्टर एकनंतर येतील.

आपले साहेब आज बायकोला घेऊन देवळात जात आहेत हे ऐकून मंदाला आश्यर्यच वाटले.

पण काही न बोलता तिने मान हलवली.

मधुर घरी पोचला. त्याने स्कुटर घराबाहेर लावली आणि मोठी चारचाकी बाहेर काढली.. एकतर देवीचे मंदिर सहा किलोमीटरवर होते आणि दुपारचे ऊन होते.. त्याने हॉर्न वाजवताच देवीसाठी ओटी घेऊन रेवती बाहेर पडली, तिने घराला कुलूप केले आणि ती गाडीत बसली.

‘किती दिवसापासून माझ्या मनात होते.. देवींची ओटी भरायची आणि महाआरतीला पण हजर राहायचे.. पण जमतच नव्हते.. माझी आई रोज फोनवर विचारत असते.. देवींची ओटी भरलीस का म्हणून.. पण वेळ यावी लागते म्हणतात ना..

‘आज योग्य वेळ आली काय?

‘अरे, ते बाजूच्या बंगल्यातील नाडकर्णी आहेत ना.. त्या नाडकर्णीना हल्ली बरे नसते.. म्हणून सावित्रीबाई म्हणजे मिसेस नाडकर्णीना देवीला गाऱ्हाणे घालायचे आहे आपल्या नवऱ्याच्या तब्येतीसाठी..

‘बरं मग?

‘आज त्या आपल्या नवऱ्याला घेऊन देवीच्या देवळात जायच्या होत्या.. म्हणजे सकाळीच गेल्या पण त्या.. त्यानी मला विचारले तुम्ही आज देवळात याल का? म्हणजे काय होत.. देवीच्या देवळात जाताना रिक्षा मिळते पण येताना काही वाहन मिळतं नाही, म्हणून त्या म्हणाल्या.. तुम्ही आणि डॉ. मधुर जर आज देवीच्या दर्शनाला आलात तर येताना गाडीची सोय होईल..

डॉ. मधुर हसत म्हणाला. , ‘असं काय? म्हणजे तुम्हाला आज घरचा ड्रायव्हर हवा होता तर..

‘तस नाही रे… मला पण देवीची ओटी भरायचीच होती.. लग्नाला चार वर्षे झाली आणि अजून…

‘त्या करिता डॉ. दीक्षित यांची ट्रीटमेंट सुरु आहे ना.. आणि मध्येच देवी..

‘असुदे.. माझा आहे विश्वास..

मधुरने देवीच्या देवळाजवळ गाडी उभी केली, रेवती त्यातून उतरली आणि देवळाच्या दिशेने चालू लागली, मधुरने गाडी कामत मेडिकलच्या दिशेने वळवली. अशोक कामत त्याचा कॉलेजमधील मित्र, त्याचे या भागात मेडिकल होते.. अशोकने दुकानात येणाऱ्या मधुरकडे पाहिले आणि तो ओरडला..

‘अरे मध्या.. आज दवाखाना बंद ठेवून इकडेकुठे?

‘आली आज मित्राची आठवण.. तुला कुठे येते माझी आठवण?

‘अरे बाबा रोज येते.. तुझे पेशंट या भागात पण आहेत, ते दुकानात येतात तू लिहून दिलेली औषधे घ्यायला.. पण तू या वेळी.. आणि ते पण पेशन्टना सोडून?

‘अरे आज रेवतीला देवीच्या महाआरतीला यायचं होत.. तिला सांगत होतो रिक्षाने जा.. पण तिचे म्हणणे दुपारी या भागात रिक्षा मिळतं नाहीत.. त्यामुळे आज थोडावेळ दवाखान्यातून वेळ काढला आणि तिला इकडे घेऊन आलो..

‘बर.. म्हणजे वहिनी देवळात आणि तू बाहेर..?

‘ज्याला जिथे आवडत तिथे त्याने जावे.. तिला देवळात जायला आवडते मला माणसात मिसळायला आवडते.. तूझ्या दुकानात दहा मिनिटे बसले तर दिल्ली पासून गल्लीपर्यतच्या बातम्या आणि माणसे भेटतात..

‘ये ये.. बर वाटल.. असं म्हणूं कामतने खुर्ची पुढे केली आणि टाळी वाजवून चहाची ऑर्डर दिली

रेवती देवळात गेली.. अजून फार गर्दी नव्हती, तुरळक माणसे होती, आरतीच्या वेळी देऊळ आणि परिसर भरून जायचा. रेवती देवीची ओटी भरायला म्हणून आत आली तेंव्हा तिला नाडकर्णी जोडी दिसली.. दोघे डोळे मिटून देवीचे स्तोत्र म्हणत असावी बहुतेक. रेवतीने देवीची ओटी भरली, पुजाऱ्याने तिला तीर्थ आणि प्रसाद दिला.. तो घेऊन ती मिसेस नाडकर्णीच्या बाजूला बसली.. मिसेस नाडकर्णी तिला बघून हसल्या..

 ‘एकटीच आलीस, डॉक्टर नाही आले काय?

‘आले आहेत, मला दारात सोडल त्यांनी आणि त्त्यांचा मित्र आहे ना कामत केमिस्ट त्याच्यकडे गेलेत..

‘मग आत आले नाहीत ते? ही डॉक्टरमंडळीना बहुदा नास्तिक असतात..

‘मधुरला नास्तिक नाही म्हणता येणार.. तो लहानपणापासून आंघोळ केल्यावर अथर्वशीर्ष म्हणतोच.. सकाळी बाहेर पडताना घरच्या देवांना नमस्कार करतो.. पण मग मात्र कुठल्या देवळात जात नाही की कसला उपास करत नाही. पण त्याचा मला विरोध नसतो. मी उपास करते त्याला तो कधीच काही म्हणत नाही उलट मेडिकल सायन्सच्या दृष्टीने उपास चांगला पण उपासाला साबूतांदूळ किंवा बटाटे खाणे योग्य नसते असे त्याचे म्हणणे.

‘आरती बारा वाजता सुरु होईल.. डॉक्टर बाहेर आहेत ना? इथे रिक्षा मिळतं नाहीत म्हणून विचारले?

‘तो कामतकडे आहे.. आरती झाली की मिसकॉल दे म्हणाला.. मग आपण जाऊ. मिस्टरांची तब्येत कशी आहे?

‘नरमच आहे.. आज देवीचा प्रसाद घेतला की बरे वाटेल..

‘अहो पण ट्रीटमेंट घयायला नको का? अंगावर काढू नका..

‘जाऊ दोन दिवसांनी.. माझा या देवीवर विश्वास आहे. तिचे चमत्कार ऐकलेत मी..

‘ते असुदे.. पण उद्याच त्याना चांगल्या डॉक्टरकडे न्या. मी मधुरला सांगते, तो तुम्हाला चांगला डॉक्टर सुचविल.

एव्हड्यात देवळातील घंटा मोठमोठ्याने वाजायला लागल्या.. मोठी आरती पेटवली गेली आणि झपझप माणसे आरतीसाठी जमा झाली.

आरतीसाठी भक्तमंडळी जमली.. टाळ मृदंग वाजू लागले, लोकांनी टाळ्या वाजून आरती म्हणायला सुरवात केली..

‘दुर्गे दुर्घट भारी.. तुजवीण संसारी…

टाळ, झान्जा जोरात खणखणायला लागल्या. त्याच्यात लोकांनी जोरात टाळ्या वाजवून आरती म्हणायला सुरवात केली.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी माझ्या घरी… ☆ प्राजक्ता नरवणे ☆

प्राजक्ता नरवणे

अल्प परिचय 

अनेक वर्षांपासून ऑस्टिन, टेक्सास, USA येथे वास्तव्य.

इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असून, सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील कामाचा २५ वर्षांचा अनुभव. सध्या सेमीकंडक्टर चीप डिझाईन कंपनीमध्ये सिनियर प्रिंसिपल पदावर कार्यरत.

या व्यतिरिक्त मराठी आणि इंग्रजी लेख, कविता अशा लेखनाबरोबरच मराठी नाटकात प्रमूख भूमिका, संगीत कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि कवितांवर आधारित कार्यक्रम यातही सक्रिय. त्याचबरोबर गिरिभ्रमणाचीही आवड.

??

✦ मराठी माझ्या घरी… ✦ प्राजक्ता नरवणे ☆

माझे नवीन नवीन लग्न झाले तेंव्हाची गोष्ट, २५ वर्षापूर्वीची! पुण्यात नवर्‍याबरोबर त्याच्या एका नातेवाईकांकडे गेले होते. मला सगळेच नवीन होते. तेथे एक ८-९ वर्षाचा मुलगा खाकी चड्डी आणि बनियन घालून “सकाळ” वाचीत बसला होता. मी सहजच त्याला विचारले, “कुठल्या शाळेत जातोस? ” त्याने पटकन कुठल्याश्या शाळेचे नाव सांगितले आणि म्हणाला, “ही शाळा कॅलिफोर्नियात आहे. ” मी तीनताड उडाले आणि आपल्या मुलाला नुसते मराठी बोलायलाच नाही तर वाचायलाही शिकवणार्‍या त्याच्या NRI पालकांना मनातल्या मनात शतश: दंडवत घातले! तेव्हा मीही नवर्‍याच्या मागे मागे देशांतराची तयारी चालवली होती, त्यामुळे या प्रसंगानंतर मी ही ठरवले की माझ्या मुलांनाही असेच मराठी येत असेल!

पुढे सिंगापूरला स्थायिक झाल्यावर आम्हाला एक गोंडससा मुलगा (आपला तो बाब्या) झाला. त्याला आम्ही प्रेमाने “डामू” म्हणायचो… “डामरट मुलगा! “. हा डामू ७ महिन्यांचा असताना आम्ही त्याला घेऊन चीनला माझ्या आत्येभावाकडे गेलो होतो. हे आमचे यजमान कुटुंब अमेरिकेचे नागरिक, पण नोकरीच्या निमित्ताने २ वर्षांसाठी चीनमधे आले होते. त्यांची २ मुले साधारण ८ ते १२ वयोगटातील.. पण घरात छान मराठीत बोलायचे. इमारतीमधील इतर गोर्‍या मुलांशी झकास अमेरीकन उच्चारासकट इंग्रजी बोलायचे आणि बाजारात चिनी दुकानदारांशी अस्खलित चिनी भाषेत बोलायची. ते पाहून वाटले की मुलांची नवीन काही शिकण्याची क्षमता जबरदस्त असते हे खरेच, आणि म्हणून याच वयात आम्ही “डामू” ला ही वेगवेगळ्या भाषांचा परिचय करून दिला पाहिजे!

डामूच्या जन्माआधीपासूनच आम्ही दोघे घरात मराठीतच बोलायचो, तसेच त्याच्या बरोबरही मराठीतच बोलायला लागलो. कधी कोणी प्रश्न विचारला की “अग पण मग याला बाहेर गेल्यावर “प्रोब्लेम” येईल. ” पण म्हंटलं, “नाही तरी तो बाहेर म्हणजे कुठे शाळेतच जाणार ना.. मग तिथे तो शिकेल आपल्या आपण इंग्रजी. पण त्याची मराठीची शाळा फक्त घरच असणार आहे. “

या आमच्या विचारधारणेची पहिली कसोटी लागली ती तो १८ महिन्यांचा असताना त्याला पाळणाघरात घातले तेंव्हा! त्याला इंग्रजीचा फारसा गंध नव्हता. मला थोडीशी चिंता वाटत होती हा कसा तिथे रुळेल? त्याला जर इंग्रजीमधे शिक्षिका काय म्हणत आहेत हे कळले नाही तर त्यांना सांगायला याला धड बोलतही येत नाही. अजून आईलाही नुसता “ई” म्हणून हाक मारतो. पण माझा विश्वास सार्थ ठरला. काही दिवसातच तो तिथे इतका रुळला की थोडे बोलता येऊ लागताच तो आमच्याशी मराठीत आणि तिथे मस्त इंग्रजी + मलय + चीनी अशा खिचडीसदृश्य “सिंगलीश” मधे बोलायला लागला. घरात मराठी हे नकळत्या वयात मनात जिरले. बळजबरी करावी लागली नाही. उलट एकदा त्यानेच माझी एक वाईट खोड पकडली. मी त्याला कशावरून तरी प्रचंड रागावत असताना त्याने थंडपणे विचारले, “तू इंग्लिश मध्ये का रागवतेस”?

जसजसा डामू मोठा होत गेला तसतसा त्याची मराठी आणि इंग्रजीही सुधारत गेली. नवीन मराठी शब्द शिकण्याची इच्छा प्रबळ होत गेली आणि मुख्य गोष्ट म्हणजे आता “आपण मराठी बोलतो” याचा त्याला अभिमान आहे. पण या अभिमानाने माझी एकदा मोठी गोची झाली! सिंगापूर महाराष्ट्र मंडळाच्या मी काम करत असलेल्या “रात्र थोडी सोंगे फार” या नाटकाचे दिग्दर्शक होते गुजराथी. पण बरेच वर्ष मुंबईमधे काढल्याने त्यांना छान मराठी कळायचे. पण आता अनेक वर्ष सिंगापूरमधे काढल्याने त्यांचा मराठी बोलण्याचा सराव तुटला होता. त्यामुळे ते आमच्याशी हिंदी किंवा इंग्रजीमधे बोलायचे. डामू नेहमी माझ्या बरोबर नाटकाच्या तालमीला यायचा. एक दिवस हे वय वर्षे ७ चे कार्टे सरळ आमच्या दिग्दर्शकांना म्हणाले, ” हे महाराष्ट्र मंडळ आहे. इथे सगळ्यांनी मराठीमधेच बोलायचं! ” खुद्द दिग्दर्शकांना असे म्हटल्या मुळे मला धरणी दुभंगून पोटात घेईल का असे वाटू लागले. पण आमच्या मोठ्या मनाच्या दिग्दर्शकांनी मोठ्याने हसून त्याच्याशी मराठीमधेच बोलायला सुरुवात केली! यातील विनोद बाजूला.. पण मुलांच्या मनात मराठीबद्दल अभिमान उत्पन्न होणे महत्वाचे!

इथे परदेशात स्वत:चे मराठी राखताना आणि मुलाचे वाढवताना एक मर्यादा जाणवते ती म्हणजे इथे मराठी ऐकायला मिळणाच्या संधीची! आपली पिढी भारतात वाढताना आपण घरीदारी, शाळेत, बाजारात, मंदिरात, अगदी कट्ट्यावर सुद्धा मराठी शिकलो. पण इथे घर हाच फक्त मराठी कानावर पडण्याचा स्त्रोत आहे. त्यामुळे घरात वापरात येणारे शब्दच फक्त आपल्या शब्द्कोशात राहात आहेत. त्यावर थोडासा उपाय म्हणून आम्ही शरण गेलो, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या “पु. ल. देशपांडे” यांना. आमच्या गाडीमध्ये डामू लहान असल्यापासून पु. लं चे अभिवाचन सतत लागलेले असायचे आणि असते. आम्ही कधीच त्याच्यासाठी इंग्रजी बालकविता लावल्या नाहीत. लावली तर मराठी बडबड गीते. पण सतत “पु. ल. देशपांडे” ऐकून ऐकून त्याच्या मराठीचा दर्जा सुधारला. आजही महाविद्यालयात येणाऱ्या ताणावर रामबाण उपाय म्हणून तो “पु. ल. देशपांडे” ऐकतो.

तो चौथीत असताना आम्ही ऑस्टिनला स्थलांतरित झालो. पुढच्याच वर्षी त्याने “सांगा सांगा शब्द सांगा” या मराठी मंडळाच्या लहान मुलांसाठीच्या प्रश्नमंजुषेचे सराईतपणे मराठीत सूत्रसंचालन केले. त्याचे मराठी बोलणे, उच्चार ऐकून काही लोकं स्वतःच निष्कर्ष काढू लागले, “हां, बरोबर आहे. तो सिंगापूरला होता ना! ” आम्ही बुचकुळ्यात पडायचो कारण सिंगापूरची मराठी लोकसंख्या ऑस्टिनच्या मराठी लोकसंख्येपेक्षाही कमी आहे. आमच्या मते हे स्थळाचे नसून, इच्छाशक्तीचे आणि देशोदेशी पसरलेल्या मराठी मंडळांसारख्या व्यासपीठांचे फळ आहे. स्थळाचा फायदा थोडाफार झाला असेल तर तो त्याला देवनागरी लिपी शिकवायला. पण इथेही मराठी शाळेचे माध्यम उपलब्ध आहे.

मराठीबद्दल प्रेम निर्माण झाल्यावर पुढची पायरी म्हणजे मराठी वाचनाची गोडी. सिंगापूरच्या पहिल्या ४ वर्षांच्या त्याच्या शालेय अभ्यासक्रमातील ‘हिंदी’ या विषयामुळे देवनागरी लिपीची ओळख त्याला होतीच, तीच पुढे मराठीमधील सुंदर साहित्य वाचायला डामूला उपयोगी पडली. आजकाल अधूनमधून मला पिंटरेस्ट वरील मराठी कविता येत असतात. सुटीला घरी आल्यावर ग. दि मा. , शांताबाई, बहिणाई, इंदिरा संत यांच्या कविता आम्ही दोघे मिळून वाचत असतो. आम्हाला म्हणतो, आपण आता फक्त शुद्ध मराठीत बोलायचं, मराठी वाक्यात एकही इंग्रजी शब्द न वापरण्याचा “पण” करायचा. पण हा पण सांभाळता सांभाळता सगळ्यांच्या तोंडाला फेफरे येते.

२२ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा ‘हसत खेळत “मराठी माझ्या घरी”’ चा प्रयोग आता सुफळ संपूर्ण झाल्याची पावती आम्हाला गेले दोन वर्ष निर्विवाद मिळत आहे.

कोलंबिया युनिव्हर्सिटी मधील मातृभाषा दिनाच्या निमित्ताने डामू जेव्हा मी केलेल्या कविता सर्वांसमोर अस्खलित मराठीमध्ये सादर करतो तेव्हा असे वाटते की ज्या मराठीला माऊलींनी प्रत्यक्ष भगवतगीता भाषांतरीत करून पावन केले, तिचा गुंजारव जर असाच अनेक येणार्‍या पिढ्यानपिढ्या निनादत ठेवायचा असेल, तर प्रत्येक मराठी माणसाने आपल्या अंतरंगातील तिच्या प्रेमाचा झरा कधीही आटू देऊ नये. त्यात जर कधी प्रतिष्ठेचा, निष्क्रियतेचा किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा गाळ साठत असेल तर तो वेळोवेळी बाजूला करून तो प्रवाह अगदी खळखळून वाहू दिला पाहिजे.

– – – 

© प्राजक्ता नरवणे

ऑस्टिन, टेक्सास

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मी तरी अशी कशी???” ☆ मंजुषा सुनीत मुळे☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “मी तरी अशी कशी???” ☆  मंजुषा सुनीत मुळे  ☆

*

मी तरी अशी कशी???

 – – एकादशी दुप्पट खाशी… तरीही म्हणे मी उपाशी???

… आज “ पापमोचनी “ एकादशी म्हणून जराशीच लवकर उठले… पटापट आवरून पूजेला बसले. हार फुलांनी विठूला सजवले… पण…

.. पण लक्ष सगळं चुलीशी… पोट ओरडतंय ना… मी तर कालच्या रात्रीपासून आहे की उपाशी… ॥

… मग पूजा पटापट उरकून केली भगर नि दाण्याची आमटी उलुशी …चविष्ट खिचडी जराशी… अन् पित्त नको म्हणून गोडशी लापशी…अंमळ जास्तच झालं म्हणत… सुपारीही खाल्ली की चुकून जराशी…

तरी का वाटतंय् मला… मी आहे उपाशी… ॥

… आज भजनाचा स्पेशल क्लास… आहे ना ही ‘ पापमोचनी’ एकादशी..

मग वामकुक्षी सोडून उठले पटदिशी… मेकअप आवरला अगदी झटदिशी.. साडी नेसले ठेवणीतली झकासशी…

पण निघतांनाही वाटत होतं… आहे मी उपाशी॥

… संध्याकाळी ‘फक्त’ थालीपीठं खमंगशी… चापून खाल्ली लोणकढ्या तुपाशी…

मागचं आवरून टाकलं अगदीच चटदिशी…

टी. व्ही. पहायला अन् आडवारले जराशी… 

तरी अजून का वाटतंय् असल्यासारखं उपाशी? … ॥

… नकळतच डोळा लागला अन् मनाला जाग आली जराशी

… पोटात अडकलेले विचार… हळूच निसटून गेले मनात… अन् दचकलेच जराशी

… मनाचा देव्हारा तर रिकामाच होता… विठूरायाचा त्यात मागमूसही नव्हता…

… त्यालाच नेमकी विसरले कशी? खंत फार दाटून आली मनाच्या तळाशी… ॥

… अन् अचानक कुणीतरी बोललं कानाशी… उठून बसले मी खट्टदिशी…

… ‘‘उपास उपास म्हणत दुप्पट की खाल्लंस… आणि माझ्याकडे नेमकं दुर्लक्ष केलंस… 

… असू देत आता यावेळी… तसंही ‘पापमोचन’ नाहीच होणार.. पण तरी माफ करून टाकतो तुला…

… मात्र खाण्याच्या नादात पुन्हा मला विसरलीस तर… तर जन्मात मी कधीच भेटणार नाही तुला…

… माझ्याखेरीज मनात सारखं इतर भरताड करतेस कशाला? ..

… तिथे असू दे जागा… फक्त माझ्या नामाला…

… मन भरून सतत आठव मला … विसरून जा जरा स्वत:ला…

… मग मात्र नक्की म्हणशील… मन स्वानंदाने गच्च भरलंय्… 

… नंतर खुशाल असं म्हण ना की… एकादशी दुप्पट खाशी…

… पण.. पण आता मात्र मी मुळीच नाही उपाशी… ॥

© मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सर्वोच्च अपवाद!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “सर्वोच्च अपवाद!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

गाभाऱ्यातील मूर्ती प्राणप्रतिष्ठित असतात आणि त्यांचे केवळ डोळ्यांनी दर्शन घेणे अपेक्षित असते, असे मानले जाते. बाकी, सुरक्षितता हा मुद्दा आहेच. आणि शिवाय संबंधित धार्मिक संस्था त्या देवतांची अधिकृत छायाचित्रे प्रसिद्ध करून विक्रीस उपलब्धही करून देत असतात. पण तरीही लोक प्रत्यक्ष त्या धार्मिक स्थळी अगदी आत जाऊन त्या देवतांचे फोटो, विडीओ करण्याचा प्रयत्न का करीत असतात, हे समजण्याच्या पलीकडे आहे. बहुतांश सर्वच मंदिरांत फोटो काढण्यास मनाई असे फलक असतातच. शिवाय तिथले सेवेकरी तशा सूचनाही सातत्याने देत असतात.

– – शेगावही याला अपवाद नाही. फक्त इथे सूचना देण्यासाठी लाऊड स्पीकरचा वापर अजिबात केला जात नाही. केवळ संबंधित माणसाच्या समोर सूचनांचा फलक धरला जातो. तरीही अतिउत्साही लोक मोबाईलमध्ये चोरून चित्रण करताना सापडतात. सुरक्षा रक्षकांच्या लक्षात ही बाब येतेच, मग ते संबंधित मोबाईल ताब्यात घेऊन ते चित्रण पुसून टाकतात. प्रदक्षिणा मार्गावर इतर भाविकांना अडथळा होऊ नये म्हणून तिथे उभे राहून फोटो घेऊ दिले जात नाहीत, त्याऐवजी पर्यायी ठिकाण सुचवले जाते. पण या सा-या कामांत सेवेक-यांचा बराच वेळ जातो, हे लोकांच्या ध्यानात येत नाही. रील बनवून पैसे कमवण्याचा उद्योग तर हल्ली सर्रास दिसतो. मग त्यासाठी आपण पवित्र स्थळांचे पावित्र्य धोक्यात आणतो आहोत, हे लोक विसरतात. श्री गजानन महाराज संस्थानने श्री गजानन महाराजांचे अतिशय उत्तम दर्जाचे फोटो उपलब्ध करून दिलेले असताना आपल्याच मोबाईलमध्ये फोटो घेण्याचा अट्टहास लोक करीत राहतात. असो.

– – – भारताच्या सन्मानीय राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच शेगांव मंदिरास भेट दिली. विशेष अपवाद आणि कार्यालयीन संदर्भ या कारणांनी, मा. राष्ट्रपती महोदया प्रत्यक्ष गाभा-यासमोर उभ्या असतानाचे एकच छायाचित्र प्रसिद्ध केले गेले आहे. या छायाचित्रात श्री गजानन महाराज यांची मूर्ती दिसते आहे. मंदिराच्या आतल्या भागातील कोणतीही छायाचित्रे किंवा चित्रफिती प्रसिद्ध केल्या गेल्या नाहीत.

सामान्य लोकांना फोटो काढू देत नाहीत, मग राष्ट्रपती दौ-यात ही परवानगी कशी, असा प्रश्न काही स्वयंघोषित फेसबुक पेजवाल्यांनी उपस्थित केले आहेत. त्यावर उतावळ्या वाचकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत विविध प्रकाराच्या comments केलेल्या आढळतात. भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या मा. राष्ट्रपती महोदयांची प्रत्येक भेट ही अधिकृत/आधिकारिक/official मानली जाते. यावेळी प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगांची छायाचित्रे घेतली जातात. श्री गजानन महाराज संस्थानने याबाबत one time exception म्हणून कदाचित त्यांच्या अधिकारात ही परवानगी दिलेली असावी, आणि यात काहीही गैर दिसत नाही.

 

भारतातील एकूण परिस्थिती लक्षात घेता अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणे अपरिहार्य आहे. यासाठी विहित नियमावली तयार केली गेलेली आहे. अर्थात याचा त्रास सर्वसामान्य जनतेस होणे साहजिकच आहे. परंतू अशा भेटींची पुरेशी आगाऊ सूचना दिलेली असते, हे ध्यानात घेतले पाहिजे. संतांपेक्षा, देवापेक्षा कुणीही मोठे नाही, हे जरी खरे असले तरी ज्या वेळी देशाचे सर्वोच्च नेतृत्व मोठ्या भक्तिभावाने एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देते, त्यावेळी काही गोष्टी काही काळापुरत्या सहन करणे गरजेचे असते. या संपूर्ण भेटीदरम्यान संस्थान आणि प्रशासनाने जनतेला होऊ शकणारा त्रास कमीत कमी कसा राखता येईल, या गोष्टीला प्राधान्य दिलेले दिसले. गावापासून ब-याच अंतरावर मुख्य कार्यक्रम स्थळ असल्याने गावात फारशी अडचण झाली नाही. आनंद विहार मध्येच मा. राष्ट्रपती महोदयांची विश्रांती-अल्पोपहार इत्यादीची व्यवस्था आनंद विहार या भक्त निवास संकुलात अत्यंत देखणी व शिस्तबद्ध केलेली होती. तसेच बंदोबस्तासाठी तैनात पोलिस इत्यादी व्यक्तींची निवास व्यवस्थाही याच ठिकाणी होती. परंतु याच संकुलात निवासासाठी येणा-या भाविकांची गैरसोय होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली गेली. दौऱ्यादरम्यान उपद्रव होऊ नये म्हणून परिसरातील भटक्या श्वानांना पकडून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्राणी कल्याण संस्थेला दिली गेली होती आणि या श्वानांची योग्य ती काळजी घेतली गेल्याचे दिसले.

 

– – या व इतर सर्वच गोष्टींसाठी श्री गजानन महाराज संस्थान तसेच स्थानिक प्रशासन आणि पोलिस दल कौतुकास पात्र आहे, असे मला वाटते. जय गजानन.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११ आणि १२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११ आणि १२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक ११ वा – – 

जनी सर्वसुखी असा कोण आहे?

विचारे मना तूचि शोधूनि पाहे|

मना त्वां चि रे पूर्वसंचित केले|

तयासारिखे भोगणे प्राप्त झाले |११|

अर्थ : हे मना तू बारकाईने निरीक्षण कर आणि हे शोधण्याचा प्रयत्न करू की जगामध्ये संपूर्णतः सुखी अशी कोणी व्यक्ती आहे का? प्रत्येक माणूस आपल्या मागील जन्मांमध्ये चांगली वाईट कृत्ये करतो. त्यांचे पूर्वसंचित त्याच्याजवळ जमा झालेले असते आणि त्यानुसारच त्याला या जन्मात सुखदुःखे भोगावी लागतात.

आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात देहेदुःख ते सुख मानीत जावे. परंतु हे एकदम होत नाही. त्यासाठी मनोभूमिका तयार करावी लागते. ती मनोभूमिका तयार करण्याचे काम समर्थ या श्लोकात करतात. जो जन्माला आला, त्याला सुखदुःख भोगणे क्रमप्राप्त आहे. कोणाचीच त्यापासून सुटका नाही. कदाचित सुखदुःखाचे प्रमाण कमी जास्त असेल परंतु प्रत्येकाला ते भोगावेच लागतात. असे म्हणून चालत नाही की माझ्याच वाट्याला एवढे दुःख का?

म्हणून समर्थ मनाला (म्हणजे आपल्याला)उपदेश करताना म्हणतात, ” जरा आजूबाजूला पहा. उघड्या डोळ्यांनी शोध घे. म्हणजे तुझ्या लक्षात येईल की जगात सर्व सुखी म्हणजे सुखाने परिपूर्ण अशी कोणीही व्यक्ती नाही. ” लग्न करणाराही दुःखी असतो आणि लग्न न करणारा देखील! ज्याला संतती नाही तो तर दुःखी असतोच परंतु ज्याला संतती आहे आणि ती संतती जर कुलक्षणी निघाली तर तो त्यापेक्षाही जास्त दुःखी असतो. एखाद्या श्रीमंताला सगळे वैभव असते परंतु संतती नसते. एखाद्याकडे अमाप पैसा असतो परंतु आरोग्याची देणगी नसते. परंतु माणसाला नेहमी दुसऱ्याचे चांगले दिसते आणि माझ्या वाटेला आलेले तेवढे वाईट असे वाटते. आपण परदुःख शीतल असे म्हणतो त्याचा अर्थ हाच!

परंतु समर्थ तिसऱ्या ओळीत सांगतात की बाबा रे मागील जन्मांमध्ये तू जी काही बरी वाईट कर्मे केलीस, त्यांचे संचित जमा झाले आणि त्यानुसार या जन्मात तुला सुखदुःख भोगावे लागत आहे. या जन्मातील हे सुखदुःख अचानक किंवा अपघाताने आलेले नाही. हा भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनींच्या चिंतनातून आलेला कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. ईश्वरी सत्तेचे नियम माणसासाठी अनाकलनीय असतात. परंतु हा कर्मविपाकाचा सिद्धांत या जन्मातील सुखदुःखांच्या कारणांची मीमांसा करतो. हा सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेता येत नाही म्हणून बुद्धिवादी माणसे हा सिद्धांत नाकारतात. परंतु आपण तर्कशुद्ध विचार केला तर हा सिद्धांत आपल्याला पटतो कारण कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. आधुनिक विज्ञानाने लावलेले शोध जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढाच आपल्या पूर्वसुरींनी शोधून काढलेला हा सिद्धांत महत्त्वाचा आहे असे मला वाटते.

गीतरामायणात देखील भरताची समजूत काढताना राम त्याला सांगतो, ‘ खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ‘ साक्षात परमेश्वराचे अवतार असलेल्या राम, कृष्ण यांना देखील दुःख, संकटे यांना तोंड द्यावेच लागले. संत ज्ञानेश्वरांना समाजाचा छळ सहन करावा लागला तर तुकारामांना लोकनिंदा सहन करावी लागली. अनेक संतांच्या नशिबी अशा प्रकारचे प्राक्तन आले. पण ते त्याचा शोक करीत बसले नाहीत. अग्नीतच सोने उजळून निघते. तसेच संकट समयीच माणसाची परीक्षा होते. आलेल्या दुःखातून आणि संकटातून तावून सुलाखून निघालेल्या माणसांचे जीवन उजळते आणि इतरांसाठी दीपस्तंभ बनते.

संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध असे आपल्या कर्माचे तीन भाग होतात. आपण जे प्रत्यक्ष करीत असतो ते क्रियमाण, जे प्रत्यक्ष भोगत असतो ते प्रारब्ध आणि जे निर्माण झाले आहे आणि भोगावयाचे राहिले आहे ते संचित. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे देखील या कर्मांचाच एक भाग असतात असे म्हणता येईल.

हा सिद्धांत जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्या असे लक्षात येते की मागील जन्मात जे काही घडले, त्याबद्दल मला आता काही करता येणार नाही. त्यानुसार जी सुखदुःखे येतील ती तर भोगावी लागतीलच. परंतु या जन्मात मी जर चांगली कर्मे केली तर माझा भविष्यकाळ हा चांगला असेल. अशा प्रकारे आपल्या कर्मावर, प्रयत्नांवर आत्मविश्वास दृढ करणारा हा सिद्धांत आहे.

म्हणूनच जगामध्ये संपूर्ण सुखी असा कोणी नाही. सुखदुःखे ही प्रत्येकाला येणारच. ही गोष्ट स्वीकारू या आणि आपल्या हातात आज जे आहे ते कर्म उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करूया असेच या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगत आहेत.

स्वसंवाद :: 

  • जगात खरोखरच कोणीही पूर्णपणे सुखी नाही ही गोष्ट मला पटते का?
  • पूर्वसंचिताचा सिद्धांत लक्षात घेऊन माझ्या वाट्याला आलेली सुखदुःखे मी सहजपणे स्वीकारतो का?
  • वर्तमानात माझ्या हातून अधिकाधिक चांगली कर्मे घडली तर माझा भविष्यकाळ उज्वल होईल या गोष्टीवर माझा विश्वास आहे का?
  • माझ्या जीवनातील परिस्थितीबद्दल मी तक्रार करतो की जबाबदारी स्वीकारून पुढे जातो? (क्रमशः)

– – – – 

श्लोक १२ वा – – 

मना मानसी दुःख आणू नको रे|

मना सर्वथा शोक चिंता नको रे|

विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी|

विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी |१२|

अर्थ : हे मना (मानवा) तू आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. व्यर्थ शोक आणि चिंता करू नकोस. विवेकाच्या सहाय्याने देहबुद्धीवर विजय प्राप्त कर. विदेही म्हणजे देहात असूनही देहापासून अलिप्त राहणे. तसे राहून मुक्तीचा (आनंदाचा) भोग घे.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला जे सुखदुःख प्राप्त झाले आहे ते आपल्या पूर्वसंचितानुसार प्राप्त झाले आहे असे सांगतात. या श्लोकात आपल्याला ते सुखदुःखापासून अलिप्त कसे राहावे त्याचे साधन सांगतात. प्रपंचामध्ये माणसाला अनेक प्रकारची संकटे आणि दुःखे प्राप्त होतात. मनुष्य माझ्याच वाट्याला हे दुःख का असे म्हणून शोक करत बसतो आणि स्वतःला दुःखी करून घेतो. समर्थ म्हणतात आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. बऱ्याच वेळा माणूस भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा विचार करून दुःख करत बसतो. परंतु ‘गतं न शोच्यम्’ म्हणजे जे घडून गेले त्याचा विचार करण्यात अर्थ नाही. बीत गयी सो बात गयी. त्याचप्रमाणे उद्या काय होईल याची चिंता करत बसण्यात देखील अर्थ नाही. वर्तमानकाळ आपल्या हातात असतो आणि त्याचा वापर कसा करायचा तेही आपल्या हातात असते. म्हणून जे क्षण आपल्या हातात आहेत. ते व्यर्थ दवडू नका, व्यर्थ शोक करत बसू नका असेच समर्थांचे सांगणे आहे.

देहदुःख ते सुख मानीत जावे असे समर्थ आपल्याला सांगतात. आपल्याला कुठले तरी आजार होतात. ताप येतो, संधीवातामुळे हात पाय दुखतात. मग हे आजार किंवा दुखणे देहाला आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे का? असा समर्थांच्या सांगण्याचा उद्देश नाही. त्याकडे जरूर लक्ष द्यावे त्यावर उपचारही करावेत परंतु अंतर्यामी त्याचेच दुःख धरून शोक करीत बसू नये. आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर काही माणसे मोठ्या आजारांना देखील धैर्याने तोंड देताना आपल्याला दिसतात आणि काही माणसे थोड्याशा दुखण्याचा देखील बाऊ करताना दिसतात. अशी माणसे स्वतःचा त्रास तर वाढवून घेतातच परंतु त्यांच्याबरोबरच इतरांना देखील त्रास होतो.

जगात जी महान माणसे होऊन गेली, त्यांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले. ते शोक करीत बसले नाहीत. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात तर किती संकटे आणि दुःखाचे प्रसंग आले, दुष्काळ पडला, दिवाळे निघाले, पोरेबाळे दुष्काळात मृत्युमुखी पडली. त्यांना दुःख निश्चितच झाले असणार. परंतु त्याचा शोक न करत बसता त्यांनी आपल्याला परमेश्वर साधनेची मिळालेली ही संधी आहे असे समजून उपयोग केला. म्हणून ते ‘बरे झाले देवा, निघाले दिवाळे… ‘ असे म्हणू शकले.

समर्थ या श्लोकात आपल्याला ‘ विवेके देहेबुद्धी सोडून द्यावी’ असे सांगतात. आपली देहबुद्धी फार प्रबळ असते. आपल्याला दुःख होते ते या देहबुद्धीमुळेच. जन्मल्यापासून आपण आपल्या देहाचे लाड पुरवत असतो. खायला प्यायला चांगले हवे असते ते देहाला, बसायला उत्तम गाद्या गिरद्या हव्या असतात तेही देहालाच. उंची पोशाख, सौंदर्यप्रसाधने, आरामदायक गाडी इ सर्व गोष्टी देहासाठीच आपल्याला हव्या असतात. देहबुद्धीमुळेच माझा मुलगा, माझी पत्नी, माझे नातेवाईक इत्यादी सर्वांबद्दल ममत्व निर्माण होते. माझे घर, माझे संपत्ती, माझी गाडी हे सगळे सुद्धा देहबुद्धीमुळेच! या देहबुद्धीचा जर आपल्याला त्याग करता आला तर आपल्या बऱ्याच समस्या दूर होतील. मग हा त्या करायचा तरी कसा तर समर्थ म्हणतात विवेकाच्या सहाय्याने. आपण स्वतःला देह समजतो हीच मोठी चूक आहे. आपण म्हणजे देह नाही हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा देहात असूनही आपण देहापासून अलिप्त राहू शकू. हा बौद्धिक निष्कर्ष नसून अनुभवातून दृढ होणारी जाणीव आहे. देहाच्या सुखदुःखात न अडकणे म्हणजेच विदेहीपण असेही म्हणता येईल. हे जमले तर आपण मुक्तीचा आनंद भोगू शकू. त्यासाठी मनाला सातत्याने भगवद्‌चिंतनात ठेवण्याची सवय लावावी.

स्वसंवाद :: 

  • मी भूतकाळातील घटनांवर अनावश्यक शोक करत बसतो का?
  • भविष्याच्या चिंतेमुळे माझा वर्तमानकाळ व्यर्थ जात आहे का?
  • देहाला झालेले दुःख आणि ‘मी’ यांमध्ये फरक करण्याचा प्रयत्न मी करतो का?
  • विवेकाच्या साहाय्याने मी साक्षीभावाने जगण्याचा प्रयत्न करतो का?
  • माझे मन नियमितपणे भगवद्‌चिंतनात स्थिर राहते का?

 – क्रमशः श्लोक ११ आणि १२.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ इस ताण का क्या करे..? – लेखिका : योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

प्रफुल्ला शेणॉय

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ इस ताण का क्या करे..? – लेखिका : योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – प्रफुल्ला शेणॉय ☆

 

ताण फार घेतो हल्ली आपण सगळे…

वेळेवर उठण्यापासुन वेळेवर झोपायचंय ह्याचाही ताण घेतो आणि एवढं करुन शेवटी झोप यायची तेव्हाच येते..

बहुतांश पब्लिक सोशल मिडिया मास्टर झाल्याने सगळ्यांना अति ज्ञान प्राप्त होतंय… त्यामुळे कुठलीही व्यक्ती गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या विषयांवर खाडखाड बोलू शकते…

त्यामुळे कधीकधी हे ज्ञान आपलं आपल्यालाच झेपत नाही आणि आपला ताण अजूनच वाढतो.

बारकाईने विचार करा…

साधं जेवणाचंच उदाहरण घ्या.. दहा वर्षांपूर्वी आपण सगळे मन लावुन वरण- भात, भाजी, पोळी असं आनंदाने जेवायचो… कधी त्या अन्नाबद्दल आपण साशंक नव्हतो… पण आता…

या भाजीत हे व्हिटॅमिन..

पोळीत एवढ्या कॅलरी..

सॅलड पाहिजेच..

गोड नको रे बाबा…

हे तेल असं, ते तेल तसं…

१०००० पावलं चाललंच पाहिजे..

फलाणं आणि बिस्तानं…

अरे! दोन घास ताटात आलेत, ते खायचे नाहीत नीट आणि शंभर नाटकं…

शिस्तीत रहा… शिस्तीत खा.. आणि आनंदाने जगा… ही सूत्रं नाहीतच हल्ली…

प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत टॉपवरच जायचंय… तरुणच रहायचंय… तरुणच दिसायचंय… कशासाठी…?

तरुण मुलांना दिसू द्या की तरुण.. तुमचं तरुणपण झालंय ना जगून… आपण काय अश्वत्थामा आहोत का? पृथ्वीवरच कायम राहायला..

Accept the reality… and live your life happily.

‘मी एक अतिछोटी व्यक्ती आहे

जिला काहीही येत नाही.. काहीही दाखवायचंही नाही आणि सिद्ध तर मुळीच करायचं नाही.. ‘

असं रोज स्वतःला सांगितलं, तर आनंदी आयुष्य जगणं सोपं आहे.

फार ताण नका घेऊ… आपल्या असण्या- नसण्याने कुणाचं काहीही बिघडणार नाहीये…

काही दिवसांपूर्वी मी असंंच खूप ज्ञानाचा विस्तार केला होता.. माझ्या… पण मग माझ्या लक्षात आलं की या ज्ञानाचा मला खुप जास्त ताण येतोय.

मग सगळं बंद केलं… बातम्या बघणं बंद केलं… सिनेमा आणि मालिका बघणं बंद केलं आणि आता खूप बरं वाटतंय..

आता सध्या आला दिवस शांततेत घालवायचा प्रयत्न करते… जुने सिनेमा बघणे… गाणी ऐकणे… आणि आवडेल ते काम करणे… हेच सूत्र आहे सध्या…

तुम्हाला एक गंमत सांगते..

नवीन वर्ष सुरू झालं तेव्हा.. भविष्य सांगणारे अनेक व्हिडिओ यायला लागले…

राहू खराब… केतू खराब… देशाचं भविष्य खराब… हे खराब ते खराब… ताण यायला लागला हो…

म्हटलं हे ऐकून, वर्षभर सोडा आपला आत्ताच निकाल लागायचा… कृष्णार्पण म्हटलं आणि दिलं सोडून…

आता मस्त वाटतंय..

रोजचं जेवण… रोजची झोप.. रोजची आवराआवर… रोजचं रुटीन याचा ताण घेऊ नका…

तुमच्या सोयीने ते करा… आणि मनापासून केलेलं कधीही अपाय करत नाही… त्याचा उपयोग चांगलाच होतो..

घेऊ नका ताण आणि जगणं करा छान..

लेखिका: योगिता कुलकर्णी

प्रस्तुती :  प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हे तर प्रकाशाचे दान ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हे तर प्रकाशाचे दान ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

मावळतीला 

निघे नारायण

सुवर्णाची आभा

देई पसरून!!

*

जलालाही देई

प्रकाशाचे दान

घेई सामाऊन

अंतरात!!

*

दिनकर जाई

क्षितिजा पल्याड

सागराची गाज

निरंतर!!

*

प्राचीवर पुन्हा

येई प्रभाकर

पाखरांना जाग

आपसूक!!

*

पूर्व पश्चिमेला

सुवर्ण सोहळा

नेत्रसुखाचा हा

आनंद सोहळा!!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ करा विचार… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ करा विचार...श्री प्रमोद वामन वर्तक ☆

मुंग्या लागल्या भेसळीच्या

त्या बालाजीच्या प्रसादाला,

पैशाच्या मोहापायी बडव्यांनी 

सोडले नाही व्यंकटेशाला!

*

घातला दंडवत गोविंदाला 

पण पुजले मनांत लक्ष्मीला,

खेळून भक्तांच्या भावनांशी 

खिसा केला आपला ओला!

*

कुणावर ठेवायचा विश्वास 

प्रश्न पडतो अशावेळी खास,

भक्तांच्या भोळेपणामुळे 

होतोय नितिमूल्यांचा ऱ्हास!

*

खरंच कां हो असतो देव 

अशा श्रीमंत मंदिरांत,

कां त्याचा खरा वास असतो 

प्रत्येक माणसाच्या देहात?

*

विचार करून स्वमनाशी 

तुमचे उत्तर तुम्हीच शोधावे,

मदत करून नडलेल्यांना 

मनोमन “त्याला” भजावे!

मनोमन “त्याला” भजावे!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #३१३ ☆ संवाद : संबंधों की जीवन-रेखा… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख संवाद : संबंधों की जीवन-रेखा। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # ३१३ ☆

☆ संवाद : संबंधों की जीवन-रेखा… ☆

‘संवाद संबंधों की जीवन-रेखा है। परंतु जब आप संवाद अर्थात् वार्तालाप करना बंद कर देते हैं, तो आप अपने अनमोल संबंध खो देते हैं।’ यह वाक्य गहन-गूढ़ अर्थ को परिलक्षित करता है। जैसे संवाद अथवा कथोपथन कहानी या नाटक को गति प्रदान करते हैं; वैसे ही संवाद हमारे जीवन को ऊर्जा व जीवंतता प्रदान करते हैं… हमारे अंतर्मन में जीने की उमंग जाग्रत करते हैं। जैसाकि सर्वविदित है– मानव एक सामाजिक प्राणी है और वह अकेला रहने में स्वयं को असमर्थ पाता है। इसलिए ही वह जन्म- जात संबंधों के रहते भी अन्य संबंध स्थापित करता है, क्योंकि वह अपने सुख-दु:ख की अभिव्यक्ति किए बिना ज़िंदा नहीं रह सकता। वह अपने हृदय के भावों को अभिव्यक्ति प्रदान कर सुक़ून पाता है तथा स्वयं को अकेला, असहाय व विवश अनुभव नहीं करता।

यदि आप वार्तालाप/ संवाद करना बंद कर देते हैं, तो अनमोल संबंधों को खो देते हैं। संवादहीनता मान-दशा तक तो  वाज़िब है, परंतु उसके बाद यह सज़ा बनकर रह जाती है और एक अंतराल के पश्चात् मानव स्वयं को  नितांत अकेला अनुभव करता है। प्रश्न उठता है– क्या संबंध बनाए रखने के लिए मानव को दूसरों को प्रसन्न रखने के लिए अपने आत्म-सम्मान को दाँव पर लगा देना चाहिए? नहीं…यह तो चाटुकारिता कहलायेगी। यदि लंबे समय तक यह स्थिति बनी रहती है, तो मानव तनाव, चिंता व अवसाद से घिर जाता है और अंततः उस व्यूह को भेदना मानव के वश से बाहर हो जाता है। तनाव संबंधों की ताज़गी व पारस्परिक स्नेह-सौहार्द को लील जाता है और ऐसे व्यक्ति के साथ रहने से दूसरे पक्ष के लोग भी गुरेज़ करना प्रारंभ कर देते हैं। सो! उसे जीवन में अकेले विषम परिस्थितियों का सामना करना पड़ता है।

लंबे समय तक तनाव की यह स्थिति मानव को चिंता के अथाह सागर में धकेल देती है। चिंता चिता समान है, जो दीमक की भांति मानव के उत्साह, साहस, धैर्य आदि को लील कर, शरीर रूपी इमारत की चूलों को हिला कर खोखला कर देती है। चिंताग्रस्त मानव सदैव ख़ुद से बेखबर स्वनिर्मित लोक में विचरण करता रहता है। वह बेसिर-पैर की कल्पनाओं में खोया, अनगिनत शंकाओं में घिरा स्वयं को अपाहिज-सा अनुभव करता है। यदि ऐसा-वैसा हो गया, तो उसका क्या होगा? उसके परिवार की क्या दशा होगी? उन विषम परिस्थितियों से वे कैसे निज़ात पा सकेगे? चिंताग्रस्त मानव को चारों ओर अंधकार ही अंधकार नज़र आता है। जीवन में उसे आशा की कोई किरण दिखाई नहीं पड़ती और न ही कोई उम्मीद की झलक दिखाई पड़ती है…उसे जीवन मरु-सम भासता है। उसकी दशा रेगिस्तान के उस हिरण-सी हो जाती है, जो प्यास से आकुल-व्याकुल सूर्य की किरणों को जल समझ उनके पीछे दौड़ा चला जाता है और अंत में अपने प्राणों से हाथ धो बैठता है। यही होती है अवसाद-ग्रस्त मानव की मन:स्थिति… जिसके जीवन में न कोई उमंग रहती है; न ही कोई तरंग; न प्रसन्नता; न ही उल्लास…वह तो नितांत अकेला, तन्हा-सा अपना जीवन बसर करता है अर्थात् ढोता है।

संवादहीनता मानव को उस कग़ार पर लाकर खड़ा कर देती है, जहां वह हरदम तन्हाई के दंश झेलता है; जो नासूर बन उसे आजीवन सालते हैं। संवादहीनता आजकल सभी रिश्ते-नातों में सेंध लगाकर जीवन के सुक़ून व सुखों पर डाका डाल रही है। सुक़ून मन की वह निर्विकार अवस्था है, जहां मानव राग-द्वेष व स्व-पर की निकृष्टतम वृत्तियों से ऊपर उठ जाता है और अंतर्मन रूपी सागर के शांत जल में निरंतर अवगाहन करता रहता है और वहां पहुचने के पश्चात् सभी इच्छाओं का शमन हो जाता है। परंतु उस स्थिति तक पहुंचने में मानव को वर्षों तक साधना-तपस्या करनी पड़ती है।

आइए! हम संबंध-निर्वाह के विषय पर चर्चा कर लें। संबंध विश्वास के आधार पर स्थापित तो हो जाते हैं, परंतु उनका निबाह करने के लिए आवश्यकता होती है बर्दाश्त करने की…यदि हममें सहनशीलता का मादा है, तो संबंध स्थायी व स्थिर रह सकते हैं, अन्यथा वे पानी के बुलबुले की भांति पल-भर में विलीन हो जाते हैं। संबंध कभी भी दूसरों से जीतकर नहीं निभाए जा सकते; उन्हें बनाए रखने के लिए तो जीतकर भी हारना पड़ता है। उनकी भावनाओं को महत्व देते हुए, प्रियजनों की प्रसन्नता के लिए पराजय को स्वीकारना पड़ता है। इसके विपरीत यदि आप वार्तालाप बंद कर देते हैं, तो संबंध टूट जाते हैं;  समाप्त हो जाते हैं और उन विषम परिस्थितियों में आप अकेले रह जाते हैं और कोई पल-भर के लिए भी आपके साथ समय व्यतीत करना पसंद नहीं करता।

यदि हम संबंधों को चिरस्थाई व शाश्वत् रूप प्रदान करना चाहते हैं, तो हमारे लिए यथासमय झुकना व दूसरों को सहन करना कारग़र होगा। दूसरे शब्दों में हमें परिस्थितियों के अनुसार समझौता करना होगा। झुकना, सहना व समझौता करने की एक ही मांग होती है…अहं का विसर्जन। यह ही एक ऐसा उपादान है; जिसके द्वारा आप दूसरों का हृदय परिवर्तित कर सकते हैं…अपने प्रति दूसरों के मन में विश्वास जाग्रत कर सकते हैं। वैसे भी जीवन केवल संघर्ष ही नहीं; समझौता है। संघर्ष की स्थिति हमारे अंतर्मन की आंतरिक शक्तियों को जाग्रत करती है; प्रेरित करती है; हमें अपने लक्ष्य तक पहुंचाती है। दूसरे शब्दों में समझौता हमारे अंतर्मन की दुष्प्रवृत्तियों का शमन कर, संबंधों को शाश्वत रूप प्रदान कर हमें सुक़ून देता है; जीने की प्रेरणा देता है। सो! संबंधों को सार्थकता प्रदान करने हेतु जहां संवादों की दरक़ार है; वहीं समझौता भी वह संजीवनी है, जिसमें प्राणदायिनी शक्ति निहित है।

अंतत: हम कह सकते हैं कि जीवन में कभी संवादहीनता की स्थिति न पनपने दें, क्योंकि यह वह सुनामी है; जो संबंधों को लील जाता है और जीवन को शून्यता से भर देता है। यह स्थिति मानव के लिए अत्यंत घातक है, विस्फोटक है। सो! हम सबको अपने दायित्व का वहन करना चाहिए और समाज में स्नेह, सौहार्द, समन्वय, सामंजस्यता व समरसता की स्थिति बनाए रखने के लिए अपने अहम् का विसर्जन कर, संबंधों को सार्थक बनाने का भरसक प्रयास करना चाहिए …यही समय की मांग है और मानव-मात्र से अपेक्षित है।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares