मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नोटा छापण्याकरिता नाशिकच का ? – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

नोटा छापण्याकरिता नाशिकच का ? – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणच का ठरवलं? ( इतिहास )

पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनाव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे.

१७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली होती. गंमत अशी होती की पेशवाईतली नाणी फारसी लिपीत आणि मोघल राजांच्या नावाने पाडली जायची. बहुतांश अशिक्षित असणाऱ्या रयतेला मोघलाई पासून चालत आलेले चलनच परिचयाचे असल्याने रयतेच्या सोईसाठी त्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून तशाच नक्षीकामाचे चलन पेशव्यांनी चालू ठेवले. नाण्यावर ‘गुलशनाबाद उर्फ ना’ असा उल्लेख सापडतो. हे ना म्हणजे नाशिक. चांदवडच्या टांकसाळीतून निघालेल्या नाण्यावर जाफराबाद उर्फ चांदोरचा उल्लेख सापडतो. १६६५च्या सुमारास औरंगजेबाने चांदवडचे जाफराबाद करून टाकले होते. पेशव्यांचे सेनाधिकारी तुकोजीराव होळकर यांनी चांदवडच्या किल्ल्यावर एका कारकुनाला सोने, चांदी, तांब्याची नाणी पडण्याचा परवाना दिला होता. पण नंतर म्हणजे सुमारे १८०० मध्ये ही टांकसाळ चांदवड शहरात आली. त्या वर्षी दहा तासात या टांकसाळीत वीस हजार नाणी पाडली जायची.

सन १८०० च्या पुढे एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांचा अंमल बळावत चालला. सुरुवातीला त्यांनी त्या त्या ठिकाणांचीच नाणी व्यापारासाठी वापरली. सुमारे १८३० पर्यंत तरी स्थानिक नाणी आणि स्थानिक टांकसाळी आहे त्या परिस्थितीत चालू ठेवल्या. पण १८३५ साली मात्र इंग्रजांनी नाणे विषयक कायदा केला. संपूर्ण हिंदुस्थानात एकाच प्रकारची नाणी वापरण्याची सक्ती केली. नाण्याच्या एका बाजूला किंमत लिहिलेली असे आणि दुसऱ्या बाजूला सुरुवातीला चौथ्या विल्यमचे आणि १८४० नंतर व्हिक्टोरिया राणीचे चित्र. १८३० साली मुंबईत जॉन हॉकिन्स नामक अभियंत्याने नवीन टांकसाळ बांधली आणि जेम्स फारीश नामक साहेबाच्या नेतृत्वाखाली इथली बहुतेक सर्व नाणी मुंबईच्या टांकसाळीत पाडली जाऊ लागली. तोपर्यंत टांकसाळीत धातू तापवून लवचिक करून हातोड्याने बडवूनच नाणी केली जायची.

पण याच कालावधीत इंग्लंडात जोरदार औद्योगिक क्रांती झाली होती ती मुख्यत्वे वाफेवर चालणाऱ्या जेम्स वॉटच्या इंजिनाच्या जोरावर. मुंबईच्या नव्या टांकसाळीत जेम्स साहेबाने तीन वाफेवर चालणारी इंजिने बसवली. आधी वीस पंचवीस हजार नाणी दिवसागणिक पडायची. आता इंजिन आल्यावर दीड लाख नाणी मुंबईच्या टांकसाळीत पडू लागली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तर हिंदुस्थानातल्या रुपया बरोबर इंग्रज साहेबाने त्यांना इंग्लंडात लागणारी त्यांची नाणी पण इथे लाखांच्या संख्येने इथे छापुन तिकडे नेली. पण पहिल्या महायुद्धामुळे चांदीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आणि साहेबाच्या डोक्यात हिंदुस्थानात कागदी रुपये छापायची कल्पना आली.

इंग्रज व्यापाऱ्यांच्या कलकत्ता, मद्रास, मुंबई सारख्या ठिकाणी काही बँका होत्या. त्या त्या ठिकाणच्या, स्थानिक व्यवहारांसाठी या बँका कागदी नोटा वापरायच्या. पण हिंदुस्थानात वापरल्या जाणाऱ्या या नोटा इंग्लंडातच छापल्या जायच्या. तिथून इकडे यायच्या. पण नाण्यांमुळे काम चालत असल्याने नोटा तिकडे छापून इकडे आणण्याची अडचण वाटत नव्हती. पण आता चांदीच्या तुटवड्यामुळे इंग्रजाला कागदी नोटा इथे हिंदुस्थानात कुठे तरी छापायच्या होत्या. आणि रंगून, कराची, ढाका, कलकत्ता, लाहोर, कानपुर, मद्रास, दिल्ली, पुणे, बेंगलोर इत्यादी सगळी महत्वाची ठिकाणे बाजूला सारून साहेबाला नाशिकनेच भुरळ घातली. नाशिकची निवड नोटा छापण्यासाठी करताना इंग्रजांनी अगदी सखोल विचार करूनच केली होती. नाशिक एकतर मुंबईच्या जवळ. हवामानाच्या बाबतीत नाशिक सुरुवातीपासूनच सरस. कुठल्याच मोसमात अतिरेक नाही पण वर्षभर तुलनेने थंड हवेचे ठिकाण. उन्हाळ्यातही दिवसातले काही तास सोडले तर अन्य प्रहरी नाशकात सुखद हवामान. साठ वर्षांपूर्वी सुरु झालेली रेल्वे हेही एक महत्वाचे कारण होते ज्यामुळे साहेबाला नाशिक नोट छपाईसाठी आकर्षक वाटले.

शेजारीच देवळाली होते. पूर्वीपासूनच देवळाली हा इंग्रजी फौजेचा तात्पुरता तळ असे. त्यामुळे नोटा तयार झाल्यावर रेल्वेतून वाहतूक करताना आवश्यक असण्याऱ्या संरक्षणाची व्यवस्थाही तयार होती. एका व्यवसायाची अनोख्या ठिकाणी सुरुवात करताना सर्वात महत्वाची आवश्यक ती बाब म्हणजे मनुष्यबळाची. विसाव्या शतका पर्यंत हजारो वर्षे नाशिकमध्ये असणाऱ्या आणि बहरत गेलेल्या उद्योग आणि व्यापारामुळे नाशिक हे एक उद्यमशील शहर होते आणि त्यामुळेच इथे एका नवीन उद्योगाला आवश्यक असणाऱ्या कारागिरांची आणि अन्य मनुष्यबळाची इथे कधीच कमतरता नव्हती आणि नाही. अशा अनेक मुद्द्यांचा सारासार विचार करून इंग्रजांनी नाशकात नोटा छापायचा निर्णय घेतला आणि १९२८ साली नाशकात हा कारखाना सुरु झाला. उद्योगांच्या बदलेल्या व्याख्ये नुसार हा नाशिकचा पहिला कारखाना ज्या मध्ये एका छताखाली हजारो लोकांना इथे नोकरी मिळाली. आधुनिक नाशिकच्या इतिहासातला ही नोट प्रेस हा महत्वाचा टप्पा आहे. नोटांबरोबर स्टॅम्पपेपर, पोस्टाची तिकिटे, पासपोर्ट, व्हिसा आणि अन्य अनेक महत्वाच्या कागदपत्रांची छपाई इथे आज होते. नोटप्रेस आणि सिक्युरिटी प्रेस मिळून साधारण पणे पाच हजार लोक इथे आज काम करतात.

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जय वाल्मिकी तुज हे तर्पण … ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ जय वाल्मिकी तुज हे तर्पण … ☆ श्री दिवाकर बुरसे

जय मृत्युंजय जय कविभूषण
जय वाल्मीकी तुज हे तर्पण
तव चरणीं सर्वस्व समर्पण!

©️ दिवाकर बुरसे, पुणे

आज अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आणि… आदिकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती

जगातील सर्वाधिक लोकप्रिय, अजरामर आद्य महाकाव्य ‘रामायणा’चे रचयिता आद्य महाकवी महर्षी वाल्मिकी !ज्यांच्यामुळे प्रत्येक हिंदु भारतियाच्या श्वासा-श्वासात राम रुजला ते वाल्मिकी! ज्यांच्यामुळे सामान्यांना आपल्या जीवनात ‘राम वाटू लागला’ ते वाल्मिकी! भारतीय काव्यसृष्टीला अनुपम असा ‘अनुष्टप् छंद’ अर्पण करणारे असे महर्षी वाल्मिकी ! आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुण्यस्मरण आणि त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन !

जन्म:
महर्षी वाल्मिकींचा जन्म त्रेतायुगात अश्विन मासाच्या पौर्णिमेला झाला. पौराणिक मान्यतेनुसार भगवान वरुण देवाच्या दहा पुत्रांपैकी एक पुत्र ‘प्रचेता’ आणि त्याची पत्नी ‘चार्षणी’ यांच्या पोटी त्यांचा झाला. अनेक ठिकाणी त्यांना ‘प्रचेतस पुत्र’ असेही संबोधले गेले आहे. अन्य काही पुराणांनुसार ते ब्राह्मण कुलातील होते. त्यांचे नाव ‘रत्नाकर’ होते.

जन्मग्राम व बालपण
पौराणिक कथेनुसार महर्षी वाल्मिकींचे जन्मग्राम महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील ‘वालझरी’ मानले जाते. दुसरी मान्यता अशी की, पुरंदर तालुक्यात पालखी मार्गावर ‘ वाल्हे ‘ नावाने एक गाव लागते. काहींच्या मते महर्षी वाल्मिकींचा जन्म या गावी झाला. या गावात त्यांचे एक मंदीरही आहे.

बालपणीच त्यांचे एका भिल्ल स्त्रीने अपहरण केले. तिनेच त्यांचे संगोपन, पालनपोषण केले. त्या समाजात त्यांना ‘वाल्या’ किंवा ‘वाल्या कोळी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मोठा झाल्यावर तो वाल्या चोऱ्यामाऱ्या, वाटमाऱ्या, दरोडेखोरी करू लागला. पुढे देवर्षि नारदांच्या कृपेने आणि ऋषींमुनींच्या संगतीत नामस्मरण आणि योगसाधना केल्यामुळे त्यांच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन झाले.

नारदानुग्रह व तप:श्चर्या
नारदमुनिंच्या मार्गदर्शनाखाली त्याने राम नामाचा जप सुरू केला. प्रदीर्घ जपसाधनेने त्यांचा जीवनप्रवाह पूर्णपणे बदलला. साधनाकाळात त्यांनी दीर्मकांच्या (वाळवी ) घरात तपश्चर्या केली. कालांतराने त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. वाल्मीक म्हणजे वारुळ. वारुळातून प्रकटले म्हणून त्यांना “वाल्मीकी” नाव मिळाले. खडतर तपश्चर्येने त्यांनी संपूर्ण आत्मशुद्धी प्राप्ती केली.

रामायणाची रचना

पुढे नारदांच्या सांगण्यावरून त्यांनी संस्कृतमध्ये रामायण हे महाकाव्य रचले. प्रभु रामचंद्रांनी सीतेचा त्याग केल्यानंतर त्यांनी त्या वनवासी सीतेला आपल्या आश्रमात आश्रय दिला. लव-कुश यांचा जन्म त्यांच्याच आश्रमातच झाला. यथावकाश महर्षींनी लवकुशांना रामकथा शिकविली.

रामायणाविषयी अल्प
महर्षी वाल्मीकि हे संस्कृत भाषेतील आदिकवी मानले जातात. त्यांची प्रमुख रचना म्हणजे “रामायण”. रामायण हे प्रभु रामचंद्रांच्या जीवनावर आधारित महाकाव्य आहे. मर्यादा आणि धर्म याचे आदर्श चित्रण त्या काव्यात केले आहे.

वाल्मिकी रामायणमध्ये सुमारे २४, ००० श्लोक असून हे सात कांडांमध्ये म्हणजे खंडांमध्ये विभागलेले आहे. या सात कांडांची नावे आणि त्यांचे विषय खालीलप्रमाणे आहेत:-

१) बालकांड
रामाचा जन्म, बालपण, अयोध्येतील रामाचे जीवन, विश्वामित्रांनी रामाला राक्षसांपासून संरक्षणासाठी वनात नेणे, सीता स्वयंवराची घटना या कांडात आहे.

२) अयोध्याकांड
कैकेयीच्या हट्टामुळे रामाला वनवासाला जावे लागणे, दशरथाचा मृत्यू, रामाचे वनवासासाठी प्रयाण, भरताच्या भेटीचा प्रसंग यात आहे.

३) अरण्यकांड
रामाचे वनवासातील जीवन, रावणाकडून सीतेचे अपहरण, जटायूचे आत्मार्पण, ऋषिमुनिंच्या आश्रमांचे संरक्षण यांचे वर्णन.

४) किष्किंधाकांड
रामाचे किष्किंधा नगरीत, वानर राजसत्तेत आगमन, सुग्रीव आणि हनुमान यांचा सहयोग, वाली निर्दलन, वानर सेनेकडून सीतेच्या शोध मोहिमेचा आरंभ.

५) सुंदरकांड
हनुमानाचे लंकेला जाणे, अशोकवाटिकेत सीतेस भेटणे, लंकादहन, रामाला लंकेची व सीता स्थानबद्ध असलेल्या स्थानाची माहिती देणे.

सुंदरकांडला ‘सुंदर’ असे नाव देण्याचे मुख्य कारण असे की या कांडात राम नाही तर हनुमान हे मुख्य पात्र आहे. त्याची नि:स्वार्थ भक्ती, शौर्य, पराक्रम आणि प्रेम यांचे सुंदर वर्णन महर्षींनी केले आहे. वाल्मिकी यांनी हनुमानाला लाडाने ‘सुंदर’ म्हणून संबोधले आहे. त्या कथेतील प्रत्येक घटक, म्हणजे राम, सीता आणि हनुमान यांचे सर्व गुण आणि त्यांची कथा अत्यंत मनोहर आणि सुंदर असल्यामुळे ‘सुंदरकांड’ असे नाव ठेवले आहे.

श्रीलंकेतील अशोक वाटिका, तिच्या भोवतालची ‘सुंदर पर्वतराजी’ ज्या ठिकाणी हनुमानाने सीतेचा शोध घेतला, तिथे त्याने केलेले पराक्रम, लंकादहन, अशा क्रियाकलापांनाही ‘सुंदर’ या नावाशी जोडले आहे. त्यामुळे कांडाचे नामकरण ‘सुंदर’ असे केले आहे. ‘सुंदरकांड’ हे रामायणातील एकमेव असे कांड आहे ज्यात हनुमान हा मुख्य नायक आहे. तो ह्या साऱ्याच कथानकात भक्ति आणि वीरता यांचा सुंदर रंग भरतो. हनुमानाच्या भक्तीतील सुंदरता, त्यांच्या साहसांचा गौरव आणि अशोक वाटिकेच्या परिसराचा संदर्भ यामुळे या कांडाला ‘सुंदरकांड’ असे समर्पक नाव दिले गेले आहे.

६) युद्धकांड
राम आणि रावण यांच्यातील युद्ध, कुंभकर्ण, मेघनाद, रावणाचा वध, रामाचे अयोध्येकडे परतणे आणि राज्याभिषेक.

७) उत्तरकांड

रामाने लोकनिंदेमुळे सीतेचा त्याग करणे, लव-कुश यांचा जन्म, रामाचा अश्वमेध यज्ञ, त्यानंतरची कथा आणि रामावताराची समाप्ती

महर्षींनी हे महाकाव्य लिहून भारतीय संस्कृती, कर्तव्यपरायण जीवन आणि मानवतेचे संदेश दिले आहेत. रामायणाने भारतीय संस्कृतीवर अमिट ठसा उमटवला आहे.

महर्षींची अवतारसमाप्ती
महर्षी वाल्मीकी यांची अवतारसमाप्ती म्हणजे त्यांच्या मृत्यूविषयी मात्र स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.

वाल्मिकींची प्रतिभा त्यांच्या काव्यगुणवैशिष्ठ्यांमुळे अतुलनीय ठरली आहे. त्यांनी ‘रामायण’ महाकाव्य रचून भारतीय काव्यसंपदेला अमर केले आहे.

काव्याची वैशिष्ठ्ये
त्यांच्या काव्यातील मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे सर्जनशीलता, उत्तुंग कल्पनाशक्ती, रसरशीत, जिवंत वर्णनशैली, सहजता व नैसर्गिकतेचा संगम आणि चरित्रप्रधान कथाकथन. वाल्मिकींचे काव्य मानवी भावभावनांनी संपन्न असून त्यांनी प्रत्येक पात्राची मनोवृत्ती, मानसिक अवस्था प्रभावीपणे मांडलेली आहे. त्यांची भाषा साधी, सोपी, प्रवाही व प्रभावशाली आहे. त्यामुळे त्यांचे काव्य सहजाकलनीय झाले आहे.

वाल्मिकींची प्रतिभा केवळ रचनेत नाही तर त्यांनी सामाजिक, धार्मिक, नैतिक, आणि मानवतेची मूल्येही प्रकट केली आहेत. त्यांच्या काव्यशैलीत वर्णन आणि संवादांचे उत्कृष्ट संतुलन आहे. रामायणामध्ये निसर्गाचे, नात्यांचे, धर्माचे गूढ दर्शन होत असून त्याचा प्रभाव संपूर्ण काव्यावर दिसतो.

सारांश, वाल्मिकींची उत्तुंग प्रतिभा अद्वितीय काव्यनिर्मिती आणि कल्पनाशक्तीत आहे. त्यांच्या काव्यात जिवंत वर्णने, भावभावना, साधी पण प्रभावी भाषा यांचे एकत्रीकरण दिसते. रामायण सामाजिक, धार्मिक आणि नैतिक मूल्यांचा प्रखर संदेश देणारे महाकाव्य आहे. हे काव्य शास्त्र व ललित काव्याच्या संमिश्रतेने ओतप्रोत भरलेले आहे. ही सारी वैशिष्ट्ये वाल्मिकींच्या अत्युच्च प्रतिभेचा, काव्यसिद्धीचा परिचय करुन देतात. वरील सर्व काव्यगुणवैशिष्ठ्यांमुळे रामायण अनेक शतके भारतीय आणि जागतिक साहित्याच्या शिखरावरील एक अमर ग्रंथ मानले जाते.

काव्यशैली विषयी

वाल्मिकींच्या काव्यशैलीची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:-

वाल्मिकी रामायणातील काव्य अतुलनीय आणि अलौकिक आहे. त्यामध्ये समास, संधी, विभक्ती यांसारख्या संस्कृत काव्यनियमांचे काटकोर पालन केलेले आहे. त्यात समता म्हणजे प्रकर्षादि दोषांचा अभाव, माधुर्य, प्रसाद, सुबोधता यांचे सामर्थ्य स्पष्ट दिसते. त्यांच्या काव्याचा प्रमुख रस ‘कारुण्य’ हा आहे. या महाकाव्याचा उद्गमच मुळी काममोहित क्रौंच मिथुनातील नर क्रौंचाच्या वधाच्या करूण दृश्यामुळे झाला आहे! खेरीज शृंगार, हास्य, रौद्र, भयानक, वीर आणि शांत या इतर रसांचे देखील संतुलित दर्शन रामायणात होते.

संपूर्ण काव्य श्लोकात्मक, अनुष्टपछंदोबद्ध असून ते विलक्षण गेय आहे. त्याच्या वाचनाने रसिक मनाला सात्विक सौंदर्याचे दर्शन होऊन परमानंद प्राप्त होतो.

वर्णनशैली अतिशय सजीव, सुसंगत असून, निसर्ग, ऋतू, व्यक्ती, नगररचना व सामाजिक जीवनाचे बारकावे यांचे सुंदर चित्रण केलेले आहे. (उदा. अयोध्या नगराचे तपशिलवार वर्णन)

काव्यात चमत्कृती किंवा अतर्क्य अतिशयोक्ती नसून, रामायण एक मानवी गाथा म्हणून प्रामाणिकपणे मांडलेली आहे. रामायण हा जीवन मार्गदर्शक आणि तत्वज्ञानात्मक ग्रंथ सुद्धा आहे. वाल्मिकींच्या काव्यशैलीमध्ये नैतिकता, धर्माचरण, मनुष्य जीवनातील सत्य आणि कर्तव्य यांचे निर्देश मोठ्या प्रकर्शाने दिसतात.

हे काव्य अत्यंत प्रभावी आणि भावप्रधान असून, प्रत्येक पात्राची मनोवृत्ती आणि भावनांचे सखोल दर्शन घडवते. ही सारी वैशिष्ट्ये वाल्मिकींच्या काव्यशैलीला शास्त्रशुद्धतेसह लालित्य प्रदान करतात. त्यामुळेच रामायणाला जनमानसात ‘सदाबहार महाकाव्य’ म्हणून अग्रस्थान प्राप्त झाले आहे

जगभरातील अनेक भाषांमध्ये रामायणाची भाषांतरे झाली आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या संकलनामध्ये १९७७ रामायणांच्या आवृत्त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये असल्याचे आढळते. यामध्ये भारतातील विविध प्रादेशिक भाषा उदा. बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, असमिया, मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू, फारसी तसेच फार मोठ्या प्रमाणात अन्य आंतरराष्ट्रीय भाषातून झाली आहेत. अनेक आशियायी भाषा जसे की जपानी, थाई, चिनी, तिबेटी, इंडोनेशियन, फ्रेंच, जर्मन, रशियन, इत्यादी भाषांमध्ये सुद्धा झाली आहेत.

*समारोप*
अशा या महान, रामचरित्रावर महाकाव्य निर्मिणाऱ्या आद्यकवी महर्षि वाल्मिकींना कोटी कोटी प्रणाम!

॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘वय हे मनाला असतं…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘टायफॅाईड मेरी…’ – लेखक : डॉ. प्रज्ञावंत देवळेकर ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

 टायफॅाईड मेरी – – मेरी मेलॉन

“पालिकेचे फोन ‘ब्लॅाक करत ‘होम क्वारंटिन’चा शिक्का पुसून ‘कोविड’ पेशंट सर्रास फिरतायेत” अश्या आशयाच्या वृत्तपत्रातल्या बातम्या कोविडकाळात सर्रास वाचनात यायच्या आणि डे टू डे मेडिकल प्रॅक्टिसमधल्या अनेक व्यक्ती-घटना-अनुभव आठवायच्या..

अश्याच संदर्भातली ही एक ऐतिहासिक केस..

एका उच्चभ्रू अमेरिकन बेटावर एका श्रीमंत कुटुंबातील मुलीला तापानं घेरलं.. निदान झालं विषमज्वर अर्थात ‘टायफॅाईड’.

त्याच आठवड्यात तिच्या घरात आणखी पाच जणांना तशीच लक्षणं दिसून आली..

साधारणपणे गरिबी आणि अस्वच्छता असलेल्या ठिकाणी होणारा आजार इथं आलाच कसा?कुटूंबप्रमुखानं ताबडतोब तज्ज्ञांना पाचारण केलं..

या संसर्गजन्य आजाराची कारणं शोधण्याची मोहीम सुरू झाली; पिण्याचे पाणी-टॅायलेट-मैला-मूत्र-टाक्या-आऊटहाऊस सगळीकडं अगदी कसून शोध घेण्यात आला पण संसर्गाचं उगमस्थान काही सापडलं नाही..

बाहेरून येणारे पदार्थ जसं दुध-मासे-किराणा-वर्तमानपत्र हे ही तपासलं गेलं; अनेकांवर संशय व्यक्त केला गेला पण त्यांच्या संपर्कातलं कुणीच आजारी पडलं नव्हतं..

स्थानिक आरोग्य खात्यानं तसा अहवालही दिला पण घरमालकाचं समाधान काही होईना; त्यानं न्यूयॉर्क शहरात आपल्या मित्रमंडळीकडे चौकशी करून यातला कुणी तरी ‘जाणकार’ पाठवण्याची मागणी केली आणि त्यातच एका रेफरन्सवरून दाखल झाले ‘डॉ. जॉर्ज सोपर’ नावाचे आरोग्य खात्याचे एक सॅनिटरी इंजिनीअर..

डॉ. सोपर यांनी पेशंटच्या तपासण्या-बाकीचे अहवाल नजरेखालून घातले, सगळ्यांची कसून चौकशी करत एक यादीच बनवली, पुन्हा एकदा तपासण्या केल्या पण “कुणाचाही संबंध नसल्याचा” निष्कर्ष आला..

बारीकसारीक दुवे तपासूनही उलगडा होईना म्हणून आता डॉ. सोपर यांनी उलट्या मार्गाने जाण्याचे ठरवलं; तापाची लागण होण्यापूर्वीच्या हा आजार साधारणत: जे दहा ते चौदा दिवस घेतो, त्यापुर्वीच्या गोष्टींवर लक्ष्य केंद्रीत केलं..

त्यादरम्यान एक बदली स्वयंपाकी येऊन गेल्याचं कळलं. स्वयंपाकीण बाईचं नाव होतं ’मेरी मेलॉन’

सोपरना या महिलेचं वर्णन देण्यात आलं त्यांनी चौकशी सुरू केली..

.. चांगला स्वयंपाक बनवते-थोडी अस्वच्छ आहे-अबोल आहे-अंमळ चिडकी आहे संमिश्र माहिती मिळत गेली..

सोपरनी ज्या ज्या लोकांकडं तिनं काम केलं याचा शोध घेत जवळपास दहा वर्षांचा इतिहास-भुगोल गोळा केला आणि त्यांना सत्य गवसलं.. युरेकाऽऽऽ

– – मेरीनं जिथं जिथं काम केलं होतं त्या त्या घरात ‘टायफॅईड’चा उद्रेक झाला होता पण हिला नेमकं शोधायचं तरी कुठं?

तिचा मागोवा घेत असताना मेरीनं एका ठिकाणी काम केलं होतं तिथं चौघांना अचानक हा आजार झाला होता. त्या आधीच्या सुटीत एके ठिकाणी सात जणांना बाधा झाली होती आणि या सगळ्याचं खापर शहरातल्या अस्वच्छतेवर फोडलं गेलं होतं..

तरी सोपर यांचं काम एखाद्या सराईत गुप्तहेराप्रमाणं चाललं होतं..

न्यूयॉर्कमधल्या एका कुटूंबामध्ये टायफॅाईडच्या केसेस सापडल्या;त्यातल्या एका तरुणीचं निधन झालं, तिची शुश्रुषा करणारी नर्स आजारी पडली.. हे वृत्त सोपर यांच्या कानावर पडलं आणि ते तडक तिथं पोहोचले त्यांनी स्वयंपाक्याला बोलवण्याचा आदेश दिला..

– स्वयंपाकीण हजर झाली.. वर्णन मेरीशी मिळतंजुळतं होतं सोपरनी आवाज चढवत विचारणा केली ‘शी वॅाज मेरी मेलॅान.. ’

‘टायफॅाईड’ हा संसर्गजन्य आजार ‘साल्मोनेला टायफी’ या सूक्ष्मजंतूंमुळं होतो; ज्या अन्न आणि पाण्यात माणसाची विष्ठा-मूत्र मिसळले गेले आहे ते पोटात गेल्यावर ताप येतो; थोडक्यात ‘दूषित पाणी’ हे अशा संसर्गाचे मूळ आहे..

.. या शिवाय ज्या लोकांच्या शरीरात या तापाचे जंतू ठाण मांडून बसलेले असतात तोपर्यंत ते तुम्हाला हा ताप देऊ शकतात..

.. काही पेशंट आपल्या विष्ठेतून ताप आल्यावर पुढील तीन महिने तापाचे जंतू बाहेर टाकत टायफॅाईडचे ‘कायम वाहक’ बनतात.. त्यांच्या शरीरातील पित्ताशय-पचन नलिकांमध्ये हे जंतू एखाद्या पोटभाडेकरू किंवा पेन्शनरांसारखे ठाण मांडून राहतात..

– – ‘मेरी मेलॉन’ ही अशा आयुष्यभराच्या वाहकांपैकीच एक होती..

ज्या महिलेचा आपण गेले काही महिने शोध घेत आहोत तिच्यासमोर आज आपण खरोखर उभे आहोत यावर क्षणभर डॉ. सोपर यांचा क्षणभर विश्वास बसत नव्हता, पण त्यांचा उत्साह-चिकाटी-कळकळ उपयोगात आलं नाही..

विनामूल्य वैद्यकीय चाचणीला साफ धुडकावून लावत मेरी आपलं काम करत राहिली..

“मेरीला तत्काळ ताब्यात घेण्यात यावं” अशी शिफारस करत सोपरनी हे प्रकरण शहराच्या आरोग्य अधिकाऱ्याकडं सोपवलं.. आरोग्य खात्यानं मेरी काम करत असलेल्या घराजवळ एक रुग्णवाहिका पाठवली-पोलिसांनी घराला गराडा घालत सुटकेचे मार्ग बंद केले आणि महिला डॉक्टर आणि महिला पोलिसांनी नाईलाजानं मेरीला जेरबंद केलं..

.. मेरीला आता न्यूयॉर्क आरोग्य खात्यातील प्रयोगशाळेच्या ताब्यात देण्यात आलं; त्यांना जे नमुने हवे होते ते मेरीला द्यावे लागले.. तिच्या विष्ठेच्या पहिल्याच नमुन्यात टायफॅाईडचे जंतू असल्याचे आढळले; तिच्या पित्ताशयात जंतूंचे आगर असल्याचं लक्ष्यात आलं..

.. मेरीनं पित्ताशय काढून टाकण्याच्या सल्ल्याला टोलवून लावलं..

शेवटी गुन्हेगार नसली तरी एखाद्या कैद्याप्रमाणं तिला एका बेटावर विभक्त करण्यात आलं; अनेक उपचार झाले पण मेरी मेलॉन शेवटपर्यंत टायफॅाईडच्या जंतूंची आगार बनून राहिली..

वकील-मानवी हक्कवाले-पत्रकार-चर्चा.. यामुळं मेरी त्याकाळची ‘न्यूज सेन्सेशन’ बनली होती; एका बाजूला सहानुभूती आणि दुसऱ्या बाजूला तिरस्कार अश्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटत होत्या..

. एकानं तर ‘तिच्याशीच विवाह करेन’ असं जाहिर केलं होतं; तिनंही ‘ख्रिश्चन’ समाजाचा दाखला देत 

“मला अशी गुन्हेगारासारखी वागणूक नको” अशी न्यायालयात दाद मागितली; कधी ती फेटाळली गेली तर कधी सहानुभूतीनं विचार केला गेला..

सरतेशेवटी “स्वयंपाक्याचं काम करणार नाही” आणि “नियमित आरोग्य तपासणीसाठी हजर राहीन” या दोन माफक अटींवर मेरीला मुक्त करण्यात आलं..

– – मेरीनं हळूहळू आरोग्य खात्यात हजेरी लावणं बंद केलं आणि गायब होत खोटं नाव धारण करून मिळेल त्या पगारावर काम पत्करत आपलं कुकींगचं काम सुरु केलं.. अनेक दिवस तिनं गुपचूप हा ‘कारभार’ केला पण तेवढ्यात मॅनहटनच्या स्लोन हॉस्पिटलमध्ये टायफॅाईडचं संकट ओढवलं..

डॉक्टर्स-नर्सेस सगळे मिळून पंचवीसेक लोकं तापाने आजारी पडले;दुर्दैवानं त्यातल्या दोघांचा बळी गेला..

‘सोपर’ पुन्हा कार्यान्वित झाले अन् त्यांनी स्लोनच्या स्टाफचं मस्टर मागवलं त्यातली एक स्वाक्षरी मेरीच्या हस्ताक्षराशी जुळत होती.. पुनःश्च पोलिसांना पाचारण करण्यात आलं.. पण यावेळी मेरी थकली होती.. तिचं वय झालं होतं.. तिलाही सततच्या लपंडावाचाही वीट आला होता.. त्या मानानं तिला आता ‘आयसोलेशन’ म्हणून ठेवलेलं नॉर्थ ब्रदर बेटावरचं वातावरण बरं वाटलं..

.. पुढची तेवीस वर्षे मेरी मेलॉन तेथेच राहिली. तिथं तिला प्रयोगशाळेत तांत्रिक सहाय्यकाची नोकरी देण्यात आली पण अखेरपर्यंत तिने “आपण टायफॅाईडच्या साथीचे कारण होतो” हे कबूल करण्यास साफ नकार दिला.

एके दिवशी मेरीला हृदयविकाराचा झटका आला; ती हळूहळू अंथरुणाला खिळली आणि त्यातच गेली..

तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोजून ‘नऊ’ व्यक्ती हजर होत्या..

टायफॅाईड मेरी’ नावानं जिवंतपणी आख्यायिका झालेली मेरी दोषी होती-गुन्हेगार होती असं बिल्कुल नाही. पण साथीच्या आजारात इतरांच्या अंगाशी येईल असं तिचं वागणं समर्थनीय नक्कीच नव्हतं..

कोविडसारखा पॅंडेमिक जाऊ देत, अगदी छोट्या मोठ्या संक्रमणातही “आपल्यामुळं दुसरा कुणी अडचणीत येऊ नये” याची आपण काळजी घेतली तरी संसर्गजन्य आजारांचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी होईल..

– – मेरी मेलॅानच्या जन्मदिनी सहज पुनःश्च एकवार हे संस्मरण ! 

लेखक : डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कर्जात बुडालेला “मेरा नाम जोकर” ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ कर्जात बुडालेला “मेरा नाम जोकर” ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

कर्जात बुडालेला “मेरा नाम जोकर”

 – – आणि जिद्दीने लढणारा राजकपूर !

आजवरच्या प्रवासात म्युजिक शो प्रोड्युसर, इव्हेंट मॅनेजर, अँकर, पत्रकारिता अशा विविध टप्प्यावरून आलो. त्यात अनुभवलेल्या पडद्यामागच्या काही अनोख्या किश्यांची ही सिरीज….

‘बजाज’ची एक नवीन दुचाकी लॉन्च होणार होती, त्याबद्दल मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये प्रेस पार्टी ठेवलेली. त्याचे निमंत्रण असल्याने अस्मादिक तिथं ! हॉलमध्ये गेलो…. तर समोर प्रसिद्ध लेखक व तत्कालीन पत्रकार साक्षात शिरीष कणेकर ! अर्थात आमची पूर्वीपासून पत्रमैत्री होतीच…. मात्र भेट अशी पहिलीच. मात्र मला पाहाताच शिरीषराव त्यांच्या खास स्टाईलमध्ये म्हणाले, “आओ मेहेरबान…. हुजूर आते आते बहोत देर कर दी”

आणि मग तिथल्या स्थानिक पत्रकारांना माझी ओळख करून दिली…. तेव्हाचे एक वाक्य अद्याप लक्षात आहे. ते म्हणाले, “लंबी रेस का ये घोडा है…. लिख के रखना”

प्रेस कॉन्फरन्स संपली आणि नंतर ते म्हणाले, “थांबणारे की निघणार लगेच पुण्याला ?” मी म्हटलं ” असं काही फिक्स नाही”

तर म्हणाले, “आताशी बारा वाजलेत. इथलं जेवण काही खास नाही…. आपण बाहेर जाऊ…. गप्पा मारू निवांत, संध्याकाळी जा मग तू पुण्याला”

मी नकार कशाला देतोय.

आणि मग ताजच्याच गल्लीत walking distance वर त्यांचे एक नेहमीचे हॉटेल ठिय्याचे स्थळ होते, तिथं त्यांचे दोन मित्र, ते व मी असे गेलो. आणि साडेबाराला सुरु झालेली मैफिल चक्क संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालली ! अविस्मरणीय ते क्षण ! तर त्या मैफलीत मी हळूच त्यांना आठवण करून देत म्हणालो, “मेरा नाम जोकर” बद्दल जरा वेगळं सांगणार होता तुम्ही… पत्रात प्रॉमिस केलं होत…. “

यावर त्यांची एकदम कळी खुलली आणि त्यांनी एकसे एक असे किस्से सांगितले…. त्यातले मोजके आज सांगतोय….

सिनेमा तर अनेकजण बनवतात. मात्र “ग्रेटेस्ट शो मॅन” हा जनसन्मान फक्त राजकपूर याना लाभला. कारण त्यांना सगळं काही भव्य दिव्यच बनवायचं असायचं. त्यात कधीही त्यांनी तडजोड केली नाही. प्रसंगी प्रचंड अपयश सोसलं पण हार मानली नाही.

त्यांच्या आयुष्यात आधी “संगम” सिनेमा आला जो सुपर डुपर हिट आणि भरपूर कमाई करून देणारा ठरला. मात्र त्यानंतर काही काळाने आलेला “मेरा नाम जोकर” हा मात्र सुरुवातीला सुपर फ्लॉप ठरला…… इतका की राजकपूर रस्त्यावर येण्याची वेळ आली.

१९७० मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच सिनेमाची हि चित्तरकथा….

‘बहुरूपिया’ सिनेमा जो डब्यात गेला…

संगम नंतर राजकपूर यांचा ‘बहुरूपिया’ सिनेमा जुळवाजुळवी सुरु होऊन वैजयंती मालासह शुटिंगही झाले. मात्र मधेच काही कारणाने ते सगळं बंद करावं लागलं आणि तो सिनेमा डबाबंद झाला. यातून बाहेर पडण्यासाठी राजकपूर यांना एका सुपरहिट सिनेमाची गरज होती. आणि त्यांनी “मेरा जाम जोकर” ची जुळणी सुरु केली. त्याकाळातील हा पहिलाच मल्टी स्टारर सिनेमा होता. एकेका हिरोचे त्याकाळी कैक सिनेमा हिट जात होते अन या सगळ्यांना “मेरा नाम जोकर”साठी एकत्र आणण्याची कमाल राजजी यांनी केली. सिम्मी गरेवाल, पद्मिनी, एक रशियन हिरोईन, मनोजकुमार, दारा सिंह, धर्मेंद्र अशी तगडी स्टारकास्ट फायनल झाली. ख्वाजा अहमद अब्बास यांच्यावर लेखनाची जबाबदारी दिली गेली. मात्र तीन टप्प्यात तीन हिरोईन सॊबत कथानक पुढं सरकत जाताना ते इतकं लांबत गेलं की चक्क २५५ मिनिटांची स्टोरी झाली. संगम प्रमाणेच राजजी यांनी या सिनेमाला दोन इन्टर्वल ठेवले. कारण सुमारे सव्वा चार तासाचा हा सिनेमा झाला होता. हाही फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक विक्रमच आहे जो आजवर जगाच्या पाठीवर कुणी मोडू शकला नाही, असं सांगितलं जात.

सहा वर्षांची मेहनत…

लोकेशन पासून ड्रेपरीपर्यंत सर्वच भव्य दिव्य करायच्या ध्यासातून हा सिनेमा शूट पूर्ण व्हायला चक्क सहा वर्ष लागली. राजजी कोणत्याच बाबतीत तडजोड करायला तयार नव्हते. या सिनेमासाठी जणू त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावले होते. इतकं की, त्यांचा आर के स्टुडिओ त्यांनी गिरवी ठेवून कर्ज काढलं होत. तरी नंतर पैसे कमी पडू लागल्यावर स्वतःचे राहते घर त्यांनी गिरवी ठेवले पण शूटिंग सुरु ठेवलं.

बोल्ड सीनचे धाडस…

तसेही राजजी यांच्या सिनेमात एखादा तरी छोटासा बोल्ड सीन असतोच. मात्र “मेरा नाम…. ” मध्ये त्यांनी दोन दोन बोल्ड सीन शूट केले. कमी वयातला ऋषी कपूर (ज्याने मोठ्या राजची लहानपणाची भूमिका केलेली) तो शिक्षिका सिम्मी च्या प्रेमात पडतो. त्याच आकर्षणातून सिम्मी एका शेतात कपडे बदलायला जाते तेव्हा तिला ऋषी चोरून पाहतानाचा सिन शूट करण्यात आला.

आणि दुसरा सीन म्हणजे… यात पद्मिनी हिरोईन असली तरी जोकरच्या आयुष्यात ती “मिनू” नावाचा मुलगा बनून येते. मुलांचेच कपडे ती घालत असते. मात्र एका झटापटीच्या सीनमध्ये तिचा शर्ट फाटतो अन काही सेकंद राज तिच्याकडे पाहत थक्क होतात की हा मुलगा नसून मुलगी आहे हे सिद्ध होणारा तो बोल्ड सीन !! पद्मिनीने देखील मोठ्या हिमतीने तो सीन शूट केला. असं म्हणतात की या दोन्ही सीनसाठी राजजी यांनी दोन्ही हिरोईनला ऑकवर्ड वाटू नये म्हणून इतर बाकी सगळ्या कामगारांना दूर ठेवून मोजकेच चार पाच लोक घेऊन शूट केलं होत.

खरेतर या सिनेमात पद्मिनीच्या आधी वैजयंतीमालाच भूमिका करणार होती मात्र तिने याच बोल्ड सीनला नकार दिला आणि सिनेमा सोडला. राजजी यांनीही मग फेवरीट असूनही तिला बाजूला करून पद्मिनीला घेतलं.

सुरुवातीलाच दणका बसला…

मोठ्या गाजावाजात रिलीज झालेला हा “मेरा नाम…. ” पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कोसळला. त्याकाळात यासाठी लाखों रुपये ओतले होते, गाणीही सुंदर झाली होती. पण का कोण जाणे सिनेमा फ्लॉप ठरला. कदाचित त्यावेळी पब्लिकला सव्वाचार तासाचा सिनेमा हेच डायजेस्ट झालं नसाव. मात्र त्यामुळे राजजी यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले. पण गंमत म्हणजे हाच सिनेमा नंतर दहा वर्षांनी री-रिलीज करण्यात आला तेव्हा मात्र तोच सिनेमा सुपरहिट झाला. “जिना यहा मरना यहा” हे जणू राजजी याचेच जीवनगीत बनले. आजही राजकपूर म्हटलं की पहिल्या दोन सिनेमात याच “मेरा नाम…. “चे नाव घेतलं जात. अर्थात डोक्यावर आधी झालेले कर्ज उतारण्यासाठी राजजी यांनी लगेचच अत्यंत कमी बजेटमधला पण तरुणाईला आवडेल असा “बॉबी” सिनेमा करायला घेतला. ज्यातून ऋषी कपुरची खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये एंट्री झाली. आणि डिम्पल कपाडियाची पण ! त्यावेळी ती पंधरा वर्षाची होती. बॉबी इतका हिट गेला की त्याच्या कमाईतून राजजी यांनी आपलं सगळं कर्ज तर फेडलच शिवाय नवीन एक घरही घेतलं.

असे होते जिद्दी राजजी !

धर्मेंद्रला राजजीनी दिलेला झटका

“मेरा नाम…. ” मध्ये भलेही राजकपूर सिनेमातील जोकरचे काम करत त्या सर्कसचा मालक दाखवलाय धर्मेंद्र ! मात्र शूटिंग सेटवर उलट चित्र असायचं. तिथं बॉस राजजीच असायचे. शूटिंग दरम्यान एकदा राजजी धर्मेंद्रवर असे काही भडकले की बास ! झालं असं की, खरेतर स्वतः राजकपूर मद्यप्रिय…. शौकीन !! मात्र सेटवर मद्याला पूर्णपणे बंदी त्यांनी घातली होती. एकेदिवशी सेटवर कोपऱ्यातल्या एका बेंचवर धर्मेंद्र “टाईट” होऊन पडलेला राजजींना दिसला. त्यावर राजजी यांनी त्याला गदागदा हलवून जागे केले आणि जाम खरडपट्टी काढली. धर्मेंद्र खाड्कन जागा झाला आणि सरळ राजजीच्या पायावर पडून माफी मागितली. आणि त्यानंतर सेटवर कधीच धर्मेंद्र त्या वाटेला गेला नाही !

राजकुमार आणि राजकपूर यांच्यातील शाब्दिक चकमक

“मेरा नाम, … ” मध्ये शेवटी एक गाणे आहे ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीमधले अनेक नामवंत झलक दाखवून जातात. त्याला “कैमियो” असं म्हणतात. तर यामध्ये राजकुमार यांनी पण काम करावे असं राजजी याना वाटले. यासाठी “मेरा नाम, … “मधील त्या कॅमियो मध्ये सर्कसच्या एका जादूगाराचा रोल ऑफर केला. त्यावर राजकुमार यांनी निरोप पाठवला की, “जर तुमच्या सिनेमात मी हवा असेल तर असे छुटपूट रोल नको, . माझ्या लेव्हलचा असा एखादा रोल असेल तर सांगा आणि नसेल तर क्रिएट करा… मग पाहू”

यावर राजजी मनोमन प्रचंड संतापले होते. मात्र त्यावेळी ते राग गिळून शांत बसले. नंतर प्रेम चोप्रा यांच्या बड्डे पार्टीत या दोघांची गाठ पडली. त्यावेळी राजजी थोडे एन्जॉयच्या मूडमध्ये मस्त “रंगले” होते. आणि नेमकं त्यावेळी त्यांच्यासमोर राजकुमार आले. हे पाहताच मागचा अपमान आठवून राजजी तिथं थेट मोठ्याने बोलले…. “आ गया ब्लडी मर्डरर”

झालं असं होत की, राजकुमार हिरो होण्याआधी पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांच्यावर एका खुनाचा आरोप होता…. त्याकाळी ते खूप गाजलेलं प्रकरण होत, त्याचा संदर्भ घेत राजजीनि त्यांना मर्डरर…. असं म्हणत उट्टे काढले.

त्यावर राजकुमारने यांनीही पलटवार करत म्हटले की, “भुखा मर जाऊंगा लेकिन तुम्हारे पास कभी नही आऊंगा…. पहले फिल्म बनाना सीख लो…. “

आणि “मेरा नाम, … ” सुरुवातीला फ्लॉप झाल्याचे जाहीर झाल्यावर राजकुमार चुटकी वाजवत म्हणाला होता, “राज कपूर को फिल्म मेकिंग का कोर्स कर लेना चाहिये”

असं हे शाब्दिक युद्ध त्याकाळी अनेक फिल्मी मॅगझीन मध्ये झळकले !

आणि आठवणींची राख झाली., ….

साल 2017 मध्ये आरके स्टुडिओला आग लागली आणि त्यात “मेरा नाम, … “मध्ये वापरलेल्या अनेक वस्तू, ड्रेस जळून खाक झाले. त्यातच राजजी याचा तो फेमस झालेला जोकरचा ड्रेस आणि मास्क पण जळून गेला. आणि उरल्या मागे फक्त त्याच्या आठवणी !!

तर असा हा एकंदरीत बऱ्याच उलथापालथी घडवणारा “मेरा नाम, … ” सिनेमा ! आजही इतक्या वर्षांनंतर त्याची मोहिनी (विशेषतः त्याच्या गाण्याची मोहिनी) अनेकांच्या मनावर गारुड करतेय…. यात सगळं आलं.

डॉ. डीडी क्लास : एखादा माणूस इतका मोठा जेव्हा होतो त्याआधी त्याला काय काय सोसावं लागलेलं असतं, त्याच्या ध्यासासाठी घरदार गहाण ठेवावं लागलेलं असत आणि तरी फ्लॉपचा शिक्का बसल्यावर खचून न जाता पुन्हा जनमानसाची नाडी ओळखून बॉबी सारखा लो बजेट सिनेमा तयार करून तो हिट करून त्यातून मागचे नुकसान भरून काढायचे असते, हेच यातून शिकायला मिळते. तसेच “मेरा नाम, … ” जेव्हा दहा वर्षांनी पुन्हा री-रिलीज केला गेला तेव्हा मात्र जबरदस्त धंदा करून गेला जितका पहिल्या वेळी झाला नव्हता. याचा दुसरा अर्थ असा काढला जातो की, राजजीचा “मेरा नाम, … “सिनेमा जगाच्या दहा वर्ष आधीच आला त्यामुळे तो लोकांना पचला नाही. म्हणजेच काय तर…. काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याची क्षमता असणारे असे हे राजजी म्हणूनच ग्रेट आहेत. उगीच नाही त्यांना “ग्रेटेस्ट शो मॅन” म्हणत !! पन्नाशी क्रॉस आमच्यासारख्या अनेकांच्या तरुण जीवनात राजजी यांनीच तर मोरपंखी आनंदाचा पिसारा फुलवला होता…. त्याकाळात संगम सिनेमातील “बोल राधा बोल संगम होगा के नही” हे केवळ गाणे राहिले नव्हते तर अनेक तरुणाचे ते जणू तरुणींसाठी “प्रपोज करण्याची ओळ” झाली होती. यात सगळं आलं ! 

रियली… राजजी ने सही मायने मे इंडस्ट्रीपे राज किया !! हॅट्स ऑफ !!

अशा या कलाकारांना मनोमन दंडवत !

तर अशी हि चित्तरकथा !

कशी वाटली…. आवर्जून सांगा !

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्योत से ज्योत जगाते चलो… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ज्योत से ज्योत जगाते चलो… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

सुश्री गीता नलावडे 

ती प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली त्यालाही १०-१२ वर्षं होऊन गेली होती. पण तिच्या कामामुळे, व्यासंगामुळे आणि विद्यार्थ्यांचे भले करण्याच्या तळमळीमुळे आजही तिला अनेक ठिकाणी शिक्षण क्षेत्रसंबंधातली कार्यक्रमांना मार्गदर्शन करण्यासाठी अथवा परीक्षक म्हणून बोलावलं जायचं. शालेय विद्यार्थी हा तिचा जीव की प्राण, त्यामुळे तीही आवर्जून अशा कार्यक्रमांना जायचीच.

आजही असंच तिला मुंबईतील खूप जुन्या प्रख्यात शाळेत, मुलांच्या व शिक्षकांच्या एका वक्तृत्व स्पर्धेला परीक्षक म्हणून बोलावले होते. मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाची मुले व शिक्षक स्पर्धेत होते.

आलेल्या शिक्षकांपैकीच एकाने एवढी मोठी लायब्ररी याच शाळेची आहे असे सांगितले.

असंही ती एरवी कधी मेकअप वगैरेच्या भानगडीत पडायची नाही, आजही पडली नव्हती.

त्या शाळेत गेल्यावर, अन्य परीक्षक जिथे बसले होते तिथे ती गेली. दुसऱ्या एका शाळेची माजी मुख्याध्यापिका असलेली तिची मैत्रीण तिला तिथे भेटली. मराठीतून दोघींच्या मनसोक्त गप्पा रंगल्या.

अन्य शिक्षक बहुधा इंग्रजी माध्यमात, cbse, icse शाळांत, कॉलेजांत शिकवणारे होते, “हल्लीचा विद्यार्थीवर्ग वाचनच करत नाही” या विषयावर त्यांची इंग्रजीतून तावातावाने चर्चा सुरू होती.

साड्या नेसलेल्या, मराठी बोलणाऱ्या या दोघींकडे त्या ग्रुपने क्षणभर नजर फिरवली, पण त्याचा पेहराव व मराठीतून संभाषण ऐकून त्यांनी त्या दोघींची काही दखल घेतली नाही.

“आमच्या शाळेत, शाळेच्या वाचनालयात तब्बल ९०० पुस्तकं आहेत. मुंबईतील शाळांमधला हा रेकॉर्ड आहे, ” ज्या शाळेत स्पर्धा आयोजित केली होती त्या शाळेतलेच एक शिक्षक एकजण फर्ड्या इंग्रजीत शेखी मिरवत होते, मग मात्र हिला रहावले नाही.

“Excuse me a moment, may I say something?” म्हणत तिनं संभाषणात प्रवेश केला, “मी गोरेगावच्या सन्मित्र मंडळाच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होते, आणि आमच्या मंडळाच्या शाळेत वाचनालयात एक हजाराहून जास्त पुस्तकं आहेत, हे मी अभिमानानं सांगू इच्छिते. “

पुढील चर्चेतून ही शाळा ssc स्टेट बोर्डाची शाळा आहे, आणि मराठी माध्यमाची शाळा आहे हे ऐकल्यावर त्यांचा आपल्या कानावर विश्वासच बसेना.

“तुम्ही मगाचपासून विद्यार्थी पुस्तकं वाचत नाहीत म्हणून तक्रार करत आहात, आणि खरंही आहे ते. पण निव्वळ तक्रार करण्याच्या पलीकडे जाऊन, याचं कारण काय आणि याच्यावर उत्तर काय याची चर्चा करणं जास्त महत्त्वाचं नाही का ?” ती शांतपणे पण ठामपणे बोलत होती.

“आज या मुलांच्या अवतीभवती असलेले सगळेच सतत मोबाईलमध्ये नाहीतर अन्य कोणत्या स्क्रीनमध्ये गुरफटलेले असतात. काही व्हॉट्सॲप, इंस्टाग्राममध्ये तर काही फेसबुकवर मग्न असतात. कोणी रील्स् बघत असतं, कोणी गेम्स खेळत असतं, आणि बाकीचे नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओत मश्गूल असतात. शिवाय कामासाठी कॉम्प्युटर, टॅब्लेट हे आहेतच.

या मुलांच्या अगदी लहानपणापासून, त्यांनी खाणं खावं, आपल्याला गप्पा मारू द्याव्यात अथवा काम करू द्यावं यासाठी आपणच त्यांच्या हातात मोबाईल देतो.

ज्यांच्याकडे बघून पुस्तकं वाचायची प्रेरणा घ्यावी असे त्यांचे शिक्षक आणि अगदी आईवडिलसुद्धा मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेले असतात. मग अनुकरणप्रिय मुलांनी पुस्तकं सोडून मोबाईलची वाट धरली, तर याला जबाबदार आपणच आहोत ना ?”

या भडीमाराने सगळे स्तिमित झाले. त्यातला एकजण, बहुधा चाळीशीतला असावा तो, रमेश नाव होतं त्याचं, पुढे आला, आणि त्यांच्याशी स्पष्ट, स्वच्छ, शुद्ध मराठीत बोलू लागला, “कळतंय पण वळत नाही, अशी काहीशी सगळ्यांची परिस्थिती आहे. मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी, खरंच, काय करता येईल ?” हा रमेश कारंथ icse मध्ये अकरावी बारावीला गणित शिकवत होता.

“अनेक संत महंत आणि थोर व्यक्तींनी म्हटलं आहे आणि आपल्या आचरणातून सिद्धही केले आहे, तेच आपल्यालाही करावे लागणार आहे. ‘आधी केले, मग सांगितले’. आपण स्वतःच, एक शिक्षक म्हणून, एक पालक म्हणून, रोज नियमितपणे वाचन करू लागलो, तर मुलांसमोर एक आदर्श वस्तुपाठ सादर होईल, ” ती सांगू लागली.

मुलांच्या वयोगटानुसार, वकुबानुसार, आवडीनिवडींनुसार, चांगली पुस्तकं कोणती, चांगले लेखक कोणते याबद्दल त्यांना मार्गदर्शन करता येईल, तशी पुस्तकं त्यांना उपलब्ध करून देता येतील.

माझ्या परिचयाचे एक दंतवैद्य आहेत. त्यांच्या घरी सगळेजण घरी आले, की आपापले मोबाईल एका टेबलावर ठेवून देतात. कोणाचा काही कामानिमित्त फोन आला तरच फोनला हात लावायचा असा त्यांच्याकडे नियमच केला आहे घरात.

काय असतं ना, मुलं आपले बारकाईने निरीक्षण करत असतात. आपल्या उक्ती आणि कृतीत फरक पडला की ते त्यांच्या लगेच लक्षात येतं. मग तुम्ही तोंडाने त्यांना पुस्तकं वाचायला सांगत असलात आणि स्वतः मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला असलात तर ही विसंगती ते चट्कन जाणतात, आणि पुस्तकांच्या वाटेलाही जात नाहीत.

आपण जर ठरवून पुस्तकं वाचली, मुलांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल त्यांच्याशी चर्चा केली, तर त्यांनाही वाचनाची गोडी लागते, त्यांचा व्यासंग वाढतो. “

ती बोलत होती, बाकी सगळे लक्ष देऊन ऐकत होते. रमेशच पुन्हा पुढे बोलू लागला. “आज जणू शाळेतल्या निवृत्त शिक्षिकेशी नव्हे, तर खुद्द आईने समजाऊन सांगितल्याचा भास झाला. I promise you, माझ्या शाळेत तर मी हे अंमलात आणेनच, पण घरीसुद्धा मुलांच्या समोर कधीच मोबाईल हाताळणार नाही. “

ती समाधानाने हसली, निदान एकाने तरी प्रेरणा घेतली होती.

“ज्योत से ज्योत जगाते चलो” हे तिचं ब्रीदवाक्य आजही अविरत सुरू राहिलं होतं.

ती आहे राष्ट्रपती पुरस्कार विजेती, गोरेगाव, मुंबईच्या बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळेची निवृत्त मुख्याध्यापिका – सौ गीता वासुदेव नलावडे.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एमिली शेंकल – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ एमिली शेंकल – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

एमिली शेंकल 

“ही त्या स्त्रीची कथा आहे, जिने देशासाठी पती गमावला… पण इतिहासानं तिचं नावसुद्धा पुसून टाकलं. “

या आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पत्नी, ज्यांना स्वातंत्र्यानंतर भारतात पाऊल ठेवू दिले गेले नाही. जाणून घ्या का…

ही गोष्ट 1947 पूर्वीची आहे. ही कथा आहे एका जर्मन स्त्रीची – नाव होतं एमिली शेंकल. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल, आणि नाही ऐकलं तरी तुमची चूक नाही, कारण इतिहासातून हे नाव जवळजवळ पुसून टाकलं गेलं.

1937 साली एमिली शेंकल यांनी भारतमातेच्या लाडक्या पुत्राशी विवाह केला आणि एका अशा देशाला सासर मानलं ज्याने कधीही या सुनेचं स्वागतच केलं नाही. ना तिच्या आगमनावर मंगलगीत गायलं गेलं, ना तिच्या मुलीच्या जन्मावर आनंद सोहळा झाला. लोकमानसात तिच्या जीवनाविषयी कुठलीच चर्चा झाली नाही.

एकूण सात वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात तिला पतीसोबत फक्त तीन वर्षे राहता आलं. त्यानंतर पती देशासाठी लढायला निघून गेले. जाताना एवढंच वचन दिलं – “आधी देशाला स्वातंत्र्य मिळवून देतो, मग उरलेलं आयुष्य आपण सोबत घालवू. ” पण तसं होऊ शकलं नाही. 1945 मध्ये कथित विमान दुर्घटनेत ते बेपत्ता झाले.

तेव्हा एमिली शेंकल अतिशय तरुण होत्या. हवं तर त्या युरोपीय संस्कृतीप्रमाणे दुसरा विवाह करू शकल्या असत्या, पण तसं न करता त्यांनी आयुष्यभर प्रचंड संघर्ष केला. टेलिग्राफ ऑफिसमध्ये एका क्लर्कची छोटीशी नोकरी आणि अत्यल्प वेतन यावर त्यांनी आपल्या मुलीचं संगोपन केलं. ना कुणाकडे तक्रार केली, ना काही मागितलं.

दरम्यान भारत स्वतंत्र झाला होता. एमिलींची इच्छा होती – किमान एकदा तरी त्या देशात जावं, ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या पतीने प्राण दिले.

पण भारतातील एका राजकीय घराण्याला या एकाच स्त्रीची एवढी भीती वाटत होती की, जिचं स्वागत सन्मानाने करून नागरिकत्व द्यायला हवं होतं, तिला भारताचा व्हिसाही कधी दिला गेला नाही.

अखेरीस कोणत्याही झगमगाटापासून दूर, संघर्षमय आणि साधं जीवन जगत मार्च 1996 मध्ये एमिली शेंकल यांनी गुमनामपणे देह ठेवला.

“इतिहासानं नावं कोरली, पण एका पत्नीचं बलिदान गाळलं. ती होती एमिली शेंकल बोस. “

देशाच्या सर्वात लोकप्रिय नेत्याच्या, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या धर्मपत्नी. पण गांधी-नेहरू घराण्याने कधीच त्यांना या देशात येऊ दिलं नाही.

कारण कदाचित नेहरू परिवाराला ठाऊक होतं – या परदेशी सुनेचं भारतात पाऊल पडलं असतं तर देशाने तिला डोक्यावर उचलून घेतलं असते. त्यांच्यासाठी ही मोठी राजकीय धोक्याची घंटा ठरली असती… आणि कदाचित तसं खरंच झालं असतं.

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र २४ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २४ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नास्त्येव तस्मिंस्तत्सुखसुखित्वम् ॥ २४ ॥

अर्थ : त्यात (जार प्रेमामध्ये व महात्म्यज्ञानावाचून होणार्‍या प्रेमामध्ये) प्रियतमाच्या प्रेमाने-सुखाने सुखी होणे हे नसते.

विवरण:  काम व प्रेम यांतील भेद या सूत्राच्याद्वारे स्पष्ट केला जात आहे. कामामध्ये कामी स्त्री किंवा पुरुष स्वतःच्या सुखभोगाकडेच पाहत असतो. जारिणी जारापासून स्वतःला किंवा जार जारिणीपासून आपल्याला सुख व्हावे अशी इच्छा व प्रयत्न करीत असतो, व जोपावेतो ते सुख मिळत राहते तोपावेतोच अनुकूल संबंध राहतो. जर दुसर्‍याची सुख देण्याची शक्ती संपली किंवा प्रतिबंध आला तर परस्परांचा संबंधविच्छेद होतो, हे कामाचे स्वरूप आहे. पण प्रेमात स्वसुख-सुखित्वापेक्षा तत्सुख म्हणजे जो प्रेमविषय आहे त्याच्या सुखाने प्रेम करणारा सुखी होत असतो, किंवा स्वतःला सुखी समजत असतो. कामी पुरुष दुसर्‍याला भोग्य समजून स्वतःला भोक्ता समजतो. तसेच त्याचे प्रेम प्रेमविषयाच्या आत्म्यापेक्षा बाह्य स्वरूपावरच असते व त्या बाह्य विषयापासून ऐंद्रियिक सुखाचा भोग होत असतो. त्यासच तो श्रेष्ठत्व देतो. तो स्वतःला अंगी व ज्याच्यावर प्रेम करतो त्याला अंग समजतो. पण खरा प्रेमी स्वतःला अंग व प्रेमविषयाला अंगी समजत असतो; म्हणूनच त्याच्या ठिकाणी तत्सुखसुखित्व हे प्रेमाचे खरे लक्षण लागू पडते.

उद्धव गोकुळात श्रीकृष्णाचा निरोप घेऊन आला होता, त्याने तिथे काही दिवस वास्तव्य केले. परत जाताना त्यांना गोपींना विचारले की कृष्णाला काही निरोप आहे का?

त्यावर गोपी म्हणाल्या की कृष्णाला बोलावले आहे असे सांगा. कृष्ण इथे आला तर आम्हाला खूप आनंद होईल. पण इथे येण्यामुळे त्याला यत्किंचित ही त्रास होणार असेल तर तो जिथे आहे तिथेच सुखात राहू दे. आमच्यामुळे त्याला त्रास व्हावा असे आम्हाला स्वप्नात ही वाटणार नाही आणि आवडणारही नाही. आपल्या प्रियतम व्यक्तीला, आराध्य देवतेला जे आवडते ते करणे म्हणजे त्याच्यावर प्रेम करणे. अपेक्षा ठेवून जे केले जाते त्याला काम वासना (अर्थात इच्छा तृप्त करणे) असे म्हणता येईल.

राधा आणि कृष्णामधील एक काल्पनिक संवाद आहे. पण खरे प्रेम समजून घेण्यास तो पुरक आहे असे वाटते. कृष्ण राधेला भेटतो आणि जायला निघतो. राधा त्याला निघताना आडवत नाही. त्यावर कृष्ण म्हणतो तिला माझ्यावरील तुझे प्रेम अटल का? मी जातोय म्हणून तुला वाईट वाटत नाही. त्यावर राधा म्हणते तू चालला आहेस, अस तुला वाटतंय. कदाचित तू देहाने माझ्यापासून दूर जात असशील…..! पण तुला हे माहित नाही की मी तुला माझ्या मनात कायमच जपून ठेवलं आहे. प्रत्येक क्षणाला माझा तुझ्याशी संवाद चालू आहे, माझ्या प्रत्येक श्वासावर तुझ्या नामाची मुद्रा उमटत असते…..! मी जाणारा श्वास आणि आता येणारा श्वास एकच धून गात असतात….! त्यातून फक्त कृष्ण कृष्ण अशीच धून निर्माण होत असते……! अरे सावळ्या, तू कुठेही असलास, गेलास, तरी माझ्या मनातील तुझं स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही…! जन्मभरीचे श्वास देऊन मी तुला खरेदी केलं आहे……! अशी भक्ति केली की देव भक्ताचा देणेकरी होतो, दासापुढे मान खाली घालून उभा रहातो, त्याच्या घरी श्रीखंड्या बनून पाणक्या होतो, मिरेचे विष पितो, सखूचे दळण दळतो, आवडीच्या पायातील काटा काढतो…… , काहीच नाही तर तो सोबत असल्याची अनुभूती देतो……!

*
गोपींनी अशी भक्ति केली…!

खरे प्रेम हेच सांगते…

मी नाही तूच…!! 

*
।। जय जय रघुवीर समर्थ ।। 

नारद महाराज की जय!!!

 – भक्ती सूत्रे क्र. २४.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा! ☆ श्री संभाजी बबन गायके 

सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा!! – – – अर्थात नॅशनल सिक्युरिटी गार्ड!

सर्वत्र, सर्वोत्तम आणि सुरक्षितता या तिन्ही शब्दांना प्राणांचे मोल देऊन जागणारी भारतीय सेनेची ताकद म्हणजे National Security Guard अर्थात N. S. G.! संपूर्ण भारतातील सर्व प्रकारच्या सैन्यातून या दलासाठी सर्वोत्तम सैनिक निवडले जातात. यांना ब्लॅक कॅट कमांडोज म्हणूनही ओळखले जात असले तरी या दलात वाघाच्या काळजाच्या जवानांचा समावेश असतो, यांची चाल सिंहाची तर झडप चित्त्याची असते! हे शत्रूवर वीजेसारखे कोसळतात आणि त्याची राखरांगोळी केल्याशिवाय ह्यांची मोहिम संपत नाही!

ही कथा आहे या बहाद्दरांनी फत्ते केलेल्या असंख्य मोहिमांपैकी एका मोहिमेची!

गुजरातमधील गांधीनगर येथे असलेले अक्षरधाम मंदिर! दिवस आहे २४ सप्टेंबर, २००२! सायंकाळचे पावणेपाच वाजलेत. मंदिरात शेकडो स्त्री-पुरूष भक्तमंडळी आपल्या लहानग्यांसोबत दर्शन, प्रार्थनेसाठी एकत्रित झालेले आहेत. गर्दी वाढतच चाललेली आहे.

— — याच गर्दीतून दोन राक्षस पाठीवरल्या हॅवरसॅक्स मध्ये अत्याधुनिक शस्त्रे घेऊन मंदिर-परिसरात दाखल झाले. देवळात राक्षसही येऊ शकतात हे भक्तांच्या गावीही नव्हते. सुरक्षारक्षकांना हूल देत, तिथल्या जाळीवरून उड्या मारून मुख्य मंदिराच्या बाहेरील माणसांवर बेछूट गोळीबार करीत दोन अतिरेकी या भव्य मंदिरात घुसले. एका महिलेच्या पायांत गोळ्या लागून ती खाली कोसळली, सोबत तिची तीन वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा होता. अतिरेक्यांनी या मुलांवर गन रोखल्या… त्या मातेने तशाही स्थितीत हात जोडले… माझ्या मुलांना तरी मारू नका हो…. तिने आकांत मांडला… त्या दोघा अतिरेक्यांनी ‘बरं’ म्हणून माना हलवल्या आणि रायफलचा ट्रिगर दाबला… दोन्ही मुलांच्या कोवळ्या देहांतून गोळ्या आरपार गेल्या… ती बालके जखमी आईच्या कुशीत निष्प्राण होऊन पडली आणि देवाच्या साक्षीने देवाघरी गेली! दहशतवाद्यांना कुठली आलीये दया आणि त्यांना तरी आपण दया का दाखवावी?

हल्लेखोर मुख्य मंदिरात प्रवेश करण्याच्या उद्देशाने हातबॉम्ब फेकत आणि वाटेत दिसेल त्याच्यावर गोळीबार करीत पुढे निघाले. मंदिराच्या व्यवस्थापक श्री. खोडसिंह जाधव आणि त्यांच्या सहका-यांनी जीवाच्या आकांताने २०० फूट धाव घेत मुख्य १५ फुटी दरवाजा बंद केला. आत मध्ये सुमारे ३५ भक्त होते.. ते बचावले!

मंदिरात हल्लकल्लोळ माजला. गोळीबार सुरू होऊन तीन मिनिटे झाली होती. तिस-या मिनिटाला साधू विश्वविहारी स्वामी यांचा गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात तातडीचा संदेश गेला. यंत्रणा त्वरीत हलली. काही मिनिटांतच पोलिस, राज्य कमांडो दलातील जवान मंदिर परिसरात दाखल झाले. मंदिराबाहेरील जनसमुहाने मंदिराच्या प्रवेशद्वारात मोठी गर्दी केली होती.

– – मुख्य मंदिरात घुसण्याचा मार्ग बंद झालेला पाहून या दोघांनी शेजारच्या प्रदर्शन सभागृहांकडे मोर्चा वळवला, पण तेही स्वयंसेवकांनी चपळाईने बंद करून घेतले होते. अतिरेकी सभागृह क्र. १मधील मंदिर-चित्रपटप्रदर्शन कक्षाचा मागील दरवाजा तोडून आत घुसले. या कक्षात अक्षरधामचे आराध्य दैवत स्वामीनारायण भगवान यांच्या जीवनचरित्राचे चित्रपट-दर्शन सुरू होते, आत अनेक माणसं होती.. अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अनेकजण जागेवरच गतप्राण होऊन पडले! अतिरेकी या सभागृहातून आल्या मार्गी परत फिरले. तोपर्यंत गुजरात पोलिस आणि गुजरात कमांडो मंदिरात दाखल झाले होते, त्यांना पाहून दोन्ही अतिरेकी भिंत चढून वरच्या परिक्रमामार्गात लपून बसले. पोलिसांनी लोकांना बाहेर काढले, तर स्वयंसेवकांनी जखमींना इस्पितळात न्यायला सुरूवात केली. पोलिस कमांडोजनी अतिरेक्यांचा शोध घेण्यास सुरूवात करताच लपलेल्या त्या दोघांनी त्यांच्यावर वरून गोळीबार केल्याने, कमांडोजना मागे सरावे लागले आणि अतिरेकी तिथून निसटले. सुदैवाने या गोळीबारात कुणाला काही झाले नाही. अतिरेक्यांचे मंदिराबाहेर जाण्याचे मार्ग पोलिसांनी रोखून धरल्याने अतिरेक्यांना बाहेर पळता आले नाही. तो पर्यंत मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांचेशी संपर्क साधून एन. एस. जी. कमांडोज पाठवण्याची विनंती केली. दिल्लीतून तातडीने निघून रात्री सव्वादहा वाजता ३५ कमांडोजची तुकडी आपल्या विशेष आयुधांसह कर्नल तुषार जोशी साहेबांच्या नेतृत्वात मंदिरात पोहोचली!

त्यांनी ऑपरेशनचा ताबा घेतला. एन. एस. जी. कमांडो सर्वांत पुढे होते… राज्य कमांडो आणि स्थानिक पोलिस दुस-या आणि तिस-या फळीत सज्ज थांबले. आता अतिरेक्यांच्या आयुष्याची उलटी गिनती सुरू झाली! आता लपून बसलेल्या लांडग्यांच्या शिकारी साठी एन. एस. जी. चे वाघ मैदानात उतरले होते.

– – सर्व योजना आखून एन. एस. जी. ने अतिरेक्यांची शोधमोहिम सुरू केली. रात्र वाढत चाललेली होती. अतिरेकी कुठूनही गोळीबार करू शकत होते. जवानांना जपून पावले टाकावी लागत होती, कारण शत्रू लपून बसला होता. मध्यरात्री साडेबारा वाजता दोघाही अतिरेक्यांनी परिक्रमा भिंतीवरून उड्या मारल्या आणि एका स्वच्छतागृहात शिरले. पण अंधारामुळे काही अंदाज येत नव्हता. आपली पोझिशन कळू नये म्हणून अतिरेक्यांनी गोळीबार थांबवला… पण त्यांच्या दिशेने गोळीबार करीत राहून त्यांना उलट गोळीबार करायला भाग पाडले गेले, जेणेकरून त्यांच्याकडील दारूगोळा संपत जावा! त्यातील एक नंतर बाहेर पडून तिथल्या नर्सरीमध्ये घुसला. दुसरा आणखी कुठे पसार झाला समजेना. नर्सरीतल्या झुडपात लपून बसलेला अतिरेकी तेथून गोळीबार करू लागला पण त्याच्या रायफलमधून उडालेल्या ठिणग्यांनी त्याची पोझिशन स्पष्ट झाली! त्याचे दिवस भरले… कारण या मोहिमेचे नेतृत्व करणारे कर्नल तुषार जोशीसाहेबांना तो दिसला. नर्सरीच्या भिंतीच्या आडोशाला जोशीसाहेब आणि त्यांचा सहाय्यक कमांडो सुरजन सिंह भंडारी काही सेकंद थांबले आणि त्यांनी भिंतीवरून खाली उड्या घेण्याचा निर्णय घेतला. या प्रयत्नात ते असतानाच अतिरेक्याने ही हालचाल पाहिली व हेवी फायर केला. सुरजन सिंह भंडारी साहेब डोक्यात गोळ्या शिरून खाली कोसळले. जोशीसाहेबांनाही गोळ्या लागल्या… पण त्या जीवघेण्या नव्हत्या… साहेब डगमगले नाहीत… पण क्षणभर थबकले.. इथं दु:ख करत बसायला वेळ नव्हता…. त्यांनी सुरजन सिंह यांना जागेवरच (सीपीआर) प्राथमिक उपचार दिला पण सुरजन सिंह यांची शुद्ध हरपली होती! त्यांना तेथून उपचारांसाठी नेले जाण्याचे आदेश जोशीसाहेबांनी दिले.

साहेबांचे दुसरे तरणेबांड साहाय्यक (Buddy) दुर्गा प्रसाद डिमरी जोशी साहेबांच्या मदतीला धावले. “बेटे दुर्गाप्रसाद, इस टेररिस्ट्ने हमारा आदमी गिराया है… हम उसे अब जिंदा नहीं छोडेंगे! “कमांडो…. ” अशी गर्जना करीत त्या दोघांनी भिंतीवरून उड्या टाकत, हातबॉम्ब फेकत, गोळीबार करत अतिरेक्याच्या दिशेने धाव घेतली. आणि नर्सरीच्या झाडांत लपलेल्या दुष्टावर प्रचंड आवेशात गोळीबार केला आणि त्याला ‘उसके अंजाम तक पहुँचा दिया’! आणि ते दुस-या अतिरेक्याच्या मागावर निघाले.

– – तो पर्यंत दुस-या अतिरेक्याने स्वच्छतागृहातून पलायन करून तिथल्या एका छोट्या हॉलमध्ये घुसून ८०-९० लोकांना ओलिस(होस्टेज) ठेवले. हॉलच्या दरवाजा समोर जोशीसाहेब पोहोचले… दरवाजा तोडून गोळीबार करावा तर आतल्या लोकांना गोळ्या लागल्या असत्या. काय करावे? इलाज खुंटला… साहेब मग दुस-या मार्गाने त्या हॉलच्या छतावर गेले… दुर्गाप्रसाद आणि त्यांनी शरीराला दोर बांधले आणि ते दोघे भिंतीवरून खाली उतरत अतिरेकी लपलेल्या हॉलच्या सज्जाच्यावर लटकत राहिले. या हॉलच्या ज्य पाय-या होत्या त्याच्या वर पुढे आलेला हा सज्जा (कॉरिडॉर) होता. त्यांना तेथून हॉलचा दरवाजा दिसत नव्हता. अतिरेकी आत होता.. त्याला साहेब दिसत नव्हते. हॉलच्या दिशेने जवान अधून मधून गोळीबार करीत होते. जोशीसाहेबांनी एक चाल खेळली… आपल्या सहका-यांना गोळीबार थांबवण्याचा आदेश दिला….. सुमारे पंधरा मिनिटे फायरिंग थांबले… अतिरेकी अस्वस्थ झाला. त्याने सोळाव्या मिनिटाला हॉलचा दरवाजा उघडला. पण बाहेर येताना एका महिलेला पुढे आणले, तिच्यामागे तो उभा होता.. त्याने त्या महिलेच्या पाठीवर रायफलची नळी टेकवलेली होती. तो बाहेर आल्याची खबर लगेच काही अंतरावर पोझिशन घेऊन बसलेल्या स्नायपर(नेमबाज)ने जोशीसाहेबांना कळवली. अतिरेक्याच्या डोक्यात गोळी डागण्याचा प्रयत्न गोळी टारगेट्वर अगदी शंभर टक्के लागण्याची खात्री असली तरच करण्याचा आदेश साहेबांनी स्नायपरला आधीच देऊन ठेवला होता. हे स्नायपर्स अचूक गोळी डागण्यात तरबेज असतात. “साहब, टारगेट पर परफेक्ट निशाना यहांसे लगाना मुश्किल है’ आप नीचे उस टेररिस्ट के सामने उपरसे जंप करोगे तो वो आपकी बायीं तरफ सिर्फ पाँच-छह मीटरपर होगा. ” स्नायपरने मेसेज दिला. आता फार थांबण्यात अर्थ नव्हता. साहेबांनी उडी घेण्याचा निर्णय घेतला तेवढ्यात स्नायपरने कळवले “साहब, वो फिर अंदर चला गया! ’… पुन्हा १५ मिनिटे भयाण शांतता पसरली!

जोशीसाहेब आणि दुर्गाप्रसाद दोराला लटकून होते… कितीवेळ चालणार हे ऑपरेशन.. काहीही होऊ शकते.. अतिरेक्याने पाहिले तर आपण ‘सिटींग डक’.. म्हणजे एकदम सोपे टारगेट ठरू… तेवढ्यात “साहब, वो फिर बाहर आया है! आप नीचे कुदोगे तो टारगेट आपकी दाहिनी तरफ स्टेप्स पर खडा हुआ दिखेगा… हा मेसेज आला आणि साहेबांच्या डोळ्यांत अंगार उतरला. आता याला सोडायचा नाही! पण अतिरेक्याने या वेळेला एका वृद्धाला ढाल बनवून बाहेर आणले होते! त्या वृद्धाच्या आडून फायरींग करून तेथून निसटून जाण्याचा त्याचा इरादा होता!

— — मंदिराबाहेर शेकडोंचा जमाव श्वास रोखून उभा होता. अक्षरधामचे साधू भगवान स्वामीनारायणांची करूणा भाकत होते. अतिशय उच्चशिक्षित असणारे अखंड ब्रम्हचर्य व्रताचे कसोशीने पालन करणारे सर्व साधू ह्या कठीण प्रसंगात अत्यंत संयमाने वावरत होते….. मानवी देहधारी सैनिक-देवतांच्या सर्व आज्ञा शिरसावंद्य मानून तसा प्रतिसाद देत होते. स्वयंसेवकांच्या मदतीने मृतदेह उचलून बाहेर नेत होते. एकही साधू जीवाच्या भितीने मंदिराच्या बाहेर पळून गेले नव्हते किंवा कुठे लपून बसले नव्हते.

हॉलच्या वरच्या पायरीवर उभा असलेला अतिरेकी, त्याच्या ताब्यात असलेले ते वृद्ध भाविक एक पायरी खाली उभे…. अतिरेक्याच्या मानेपासून वरचा भाग गोळीच्या रेंजमध्ये होता!

— — जोशीसाहेबांनी दुर्गाप्रसाद साहेबांना सांगितले… हम दोनो एकसाथ नीचे कुदेंगे… रायफल सिंगल शॉट में रखनी है.. नीचे उतरतेही उसके सीधे हेड पर गोली मारनी है.. पहले मैं फायर करूँगा… अगर मेरी रायफल नहीं चली तो तुम फायर करना… जरासी भी देर नहीं होनी चाहिये…. याद रखना.. वो टेररिस्ट पहले गोली चलायेगा तो हम नहीं बचेंगे और हमने उसके पहले अ‍ॅक्युरेट फायर किया तो वो नहीं बचेगा… वो नहीं बचना चाहिये… और गोली सिर्फ आतंकवादीके सिर पर लगनी चाहिये… होस्टेज को कोई नुकसान न हो!

साहेबांनी दोनेक क्षणच घरी असलेल्या आपल्या गरोदर पत्नीचा आणि दीड वर्षाच्या मुलीचा चेहरा नजरेसमोर आणला… न जाणो पुन्हा भेट होईल न होईल! माणूस कुणीही असला तरी आपल्या आप्तांना सोडून जाण्याची कल्पना त्याला सहन होत नाही… मरणाची भीती तर सर्वांनाच वाटते… पण सैनिक ‘डर नाम की चीज से दो कदम आगे चलते है.. क्योंकी डर के आगे ही जीत होती है!’ आणि एकाच वेळेस जोशीसाहेब आणि दुर्गाप्रसाद साहेबांनी खाली उडी घेतली… ती थेट त्या अतिरेक्याच्या पुढ्यात… त्याला तर साक्षात दोन शैतानच त्याच्या समोर अगदी पाच-सहा मीटर्सच्या अंतरावर प्रकटल्याचा भास झाला होता… दोन प्रवृती एकमेकांसमोर एकमेकांचा मृत्यू बनून उभ्या ठाकलेल्या होत्या… सत्याच्या बाजूने सैनिक आणि पापाच्या बाजूला अतिरेकी! तो अतिरेकी प्रचंड आश्चर्यचकित होऊन जागच्या जागी थिजला… तो त्याचे बोट ट्रिगरवर दाबणार एवढ्यात जोशी साहेबांनी ट्रिगर दाबला… गोळी उडाली… शंभर टक्के अचूक लक्ष्यभेद.. धनुर्धर अजुर्नासारखा! गोळी त्या शत्रूच्या दोन्ही डोळ्यांच्या बरोबर मधून घुसली आणि त्यांचा सडका मेंदू फोडून आरपार झाली! त्याचे धूड जोशीसाहेबांच्या पुढ्यात येऊन पडले! चौदा तासांची मोहिम संपली होती… एन. एस. जी. च्या देवदूतांमुळे मंदिर मुक्त झाले होते! मंदिरातील देवतांनी आशीर्वादाचे हात उंचावले… घंटानाद घुमू लागला! या नादातून जणू जय हिंद चा ध्वनि उमटू लागला होता!

(या कारवाईत ५७ भाविक, २३ पोलिस अधिकारी-कर्मचारी जखमी झाले. एन. एस. जी. कमांडो श्री. सुबेदार सुरेशचंद्र यादव साहेब, गुजरात राज्य कमांडोज श्री. अर्जुनसिंह गामेतीसाहेब आणि अल्लारखा खानसाहेब हे बहादुर हुतात्मा झाले. एन. एस. जी. कमांडो श्री. सुरजन सिंह भंडारी दोन वर्षे कोमात राहून हुतात्मा झाले! २९ भाविकांनाही आपले प्राण गमवावे लागले! या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली! !!) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ थेट फोनच हॅक होतोय? हे करा… ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ थेट फोनच हॅक होतोय? हे करा…  ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

व्हाट्स अप अथवा थेट फोनच हॅक होतोय?

– – हे सेटिंग करून घ्या… सुरक्षित राहा

परवाच एका मित्राचा एकदम घाबऱ्याघुबऱ्या आवाजात कॉल आला की, “डीडी, मला संशय आहे की माझ व्हाट्स अप हॅक झालं असावं. “

मी त्याला त्याची कारणे विचारली तेव्हा कळलं की काही संशयास्पद असं त्याला जाणवत आहे. त्याला आधी शांत बोलून रिलॅक्स केले आणि त्याला जो उपाय सांगितला… तोच तुम्हाला इथं सांगतोय. न जाणो तुम्हाला पण याची भविष्यात गरज पडू शकते.

तर भविष्यातला “उद्याचा” धोका तुम्ही “आजच” कायमचा रोखू शकता.

तर यासाठी काय करायचे??

फार सोपी प्रोसिजर आहे!

  1. तुमच्या whats app वर जा
  2. तिथं उजव्या बाजूला तीन डॉट्स असतात तिथं जाऊन त्यात सेटिंग्जवर जा, त्याला क्लिक करा.
  3. तिथं गेल्यावर “Privacy” वर क्लिक करा
  4. त्यानंतर तिथं थोडं खाली जाऊन स्क्रोल करत “Advanced” हे ऑप्शन पहा आणि त्यावर क्लिक करा.
  5. तिथं आल्यावर तिथं दोन ऑप्शन दिसतील. “Protect IP address in calls” आणि “Disable link previews” तर या दोन्हीला क्लिक करा. म्हणजे ऑन करा.

त्यानंतर बॅक बॅक करत बाहेर या.

झालं तुमचं सेटिंग ओके!!

एकदा का तुम्ही हे केल्यावर, हॅकर्स तुमचे फोन हॅक करू शकत नाहीत कारण तुमचा IP address आता संरक्षित आहे. एकदा तुम्ही तुमचा आयपी ऍड्रेस व्हॉट्सॲपमध्ये सुरक्षित केला की, तुमचे व्हॉट्सॲप तसेच व्हाट्स अप च्या माध्यमातून फोनही हॅक होण्याची शक्यता बरीच कमी होते.

तेव्हा मंडळी… सावध राहा…. सुरक्षित राहा!

डॉ. डीडी नोट : अर्थात या सेटिंग नंतर एक थोडी अडचण होऊ शकते ती म्हणजे तुम्ही पूर्वी एखाद्याला एखादे रीळ / व्हिडीओ / पोस्ट पाठवत असायचा तेव्हा समोरच्याला त्याचा प्रिव्हयु दिसायचा. आता हे सेटिंग केल्यावर कदाचित दिसणार नाही! फक्त लिंक जाईल. आणि समोरच्याने त्यावर क्लिक केलं की फाईल ओपन होईल!

मात्र त्याला इलाज नाही!

कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है न! सिक्युरिटी चाहिये….. तो प्रिव्हयु नही मिलेगा! सोचो अब…. सिक्युरिटी मेन है या प्रिव्हयु?

*

एक कळकळीची विनंती : तुम्ही पण हे सगळं तुमच्या सर्कलमध्ये व्हायरल करत जा! ते लोकही सुरक्षित होतील आणि तुम्हाला त्यातून नकळत ते लोक थँक्स देतील!!

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ९ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ९ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

(आज नवव्या म्हणजेच शेवटच्या भागात, सर्वात मोठ्या लोकशाहीचे स्तंभ झालेल्या दुर्गा, घेऊन नवरात्रीची सांगता करते.)

– – पहिल्या निवडणुकीत निवडून आलेल्या, खासदार झालेल्या १५ महिला होत्या व आमदार झालेल्या १३ महिला होत्या.

पहिली महिला पंतप्रधान —-इंदिरा गांधी(या काळात त्यांनी स्वतःकडे बरीच खाती घेतली होती, काही अल्प काळा साठी होती, त्या मंत्री पदांसाठी त्यांना पहिली महिला धरलेले नाही.)

पहिली महिला 

राष्ट्रपती —– प्रतिभा पाटील

राज्यपाल—– सरोजिनी नायडू

लोकसभा अध्यक्ष—मीरा कुमार

गृहमंत्री —— उमा दीक्षित

संरक्षण मंत्री —— निर्मला सीतारमण

रेल्वे मंत्री —– ममता बॅनर्जी 

परराष्ट्र मंत्री—- सुषमा स्वराज

शिक्षण मंत्री—– शीला कौल

आरोग्य मंत्री—- राजकुमारी अमृता कौर 

वित्त मंत्री ——- निर्मला सीतारमण

– – पण अर्थसंकल्प संसदेत सादर करणारी पहिली महिला इंदिरा गांधी. (अल्प काळ वित्तमंत्री असताना १९७० ला त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.)

राज्यसभा अध्यक्ष —– मार्ग्रेट अल्वा

मुख्य निवडणुक आयुक्त—- व्ही. एस. रमादेवी 

१९३८ साली राज्यपरिषदेसाठी निवडली गेलेली महिला राधाबाई सुबारायन

राज्यवार पहिल्या महिला मुख्यमंत्री

उत्तर प्रदेश. सुचेता कृपलानी

ओरिसा. नंदिनी सतपथी 

गोवा. शशिकला काकोडकर

आसाम. सैय्यदा तैमूर 

तमिळनाडू. व्ही. एन्. जानकी रामचंद्रन 

(या अल्पकाळ होत्या पण लगेच जयललिता मुख्यमंत्री झाल्या व बरीच वर्षे राहिल्या.)

पंजाब. राजिंदर कौर 

बिहार. राबडीदेवी 

दिल्ली.. सुषमा स्वराज 

(या अल्पकाळ होत्या पण नंतर बरीच वर्षे शीला दीक्षित मुख्यमंत्री राहिल्या.)

मध्यप्रदेश उमा भारती

राजस्थान. वसुंधरा राजे शिंदे 

पश्चिम बंगाल. ममता बॅनर्जी 

गुजरात. आनंदीबेन पटेल 

जम्मू काश्मीर. मेहबूबा मुफ्ती 

— 

यूपीएससी अध्यक्ष रोज मिलियन बैथ्यू

यू. एन. ओ सभापती. विजयालक्ष्मी पंडित

आय. ए. एस. अन्ना जाॅर्ज मल्होत्रा

आय. पी. एस.. किरण बेदी

आणखी दोन महत्त्वाच्या महिला – 

कर्नेलिया सोराबजी —१८९२ ला ऑक्सफर्ड मधून लाॅ करणारी पहिली भारतीय महिला, १८९९ ला मुंबई विद्यापीठातून लाॅ करणारी पहिली महिला, महिलांना परवानगी नसल्याने शिक्षण घेण्यासाठी भांडावे लागले, पण महिलांना वकिली करण्याची परवानगी १९२४ ला मिळाली.

उच्च न्यायालयात खटला लढवणारी (१९४४)पहिली महिला, वायलेट अल्वा.

पहिली शाळा शिक्षिका सावित्रीबाई फुले — 

पण त्याआधी गुरुकुलात शिकविणाऱ्या शिक्षिका : या अत्यंत बुद्धिमान महिलेचे नांव ‘ होती विद्यालंकार ‘. तिला विद्यालंकार ही पदवी बहाल केली होती. (१७६०च्या दरम्यान) (तिचे ‘होती’ हे नाव चुकीचे असावे‌ काय ही शंका येते)

लेखमाला समाप्त —

संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares