☆ “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे…
… आणि तो मी मिळवणारच !!
स्वातंत्र्य पूर्वीचा काळ… ब्रिटिश महासत्ता यांचे साम्राज्य… अशावेळी चाललेला स्वातंत्र लढा… त्याचवेळी कायद्याचा अभ्यास करून त्याच्या जोरावर अनेक सभा गाजवणारे बाळ गंगाधर टिळक… जन समान्यांचे मन जिंकणारे त्यांचे प्रभूत्व आणि त्याच जोरावर मिळालेली लोकमान्य ही पदवी किंवा मिळालेला किताब…
१९१६ चा झालेला स्वातंत्र्याचा महासंग्राम आणि त्याचवेळी लखनौ येथील परिषदेत काढलेले हे धीरोदगार
“ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.. आणि तो मी मिळवणारच.”
हेच वाक्य घेऊन नंतर स्वातंत्र्य लढ्याची पुढील वाटचाल सुरु झाली. जणू स्वातंत्र्याच्या काटेरी वाटेवर या वाक्याच्या मखमली पायघड्या त्यांनी अंथरल्या होत्या.
काय नाहीये या वाक्यात? या वाक्यात खच्चून भरलेली खंबीरता आहे. एक ठोस मागणी आहे. एक दृढ निश्चय आहे. एक धमकावणी आहे. एक आत्मविश्वास आहे. एक ध्येयासक्ती आहे. एक नेतृत्व आहे. एक परखडपणा आहे. एक स्वप्न आहे. एक दिलेली मोठी समज आहे….
अशा कितीतरी भावनांची ज्योत करून लावलेली एक धगधगती मशाल म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच हे उद्गार.
एवढ्या सगळ्या भावनांनी भरलेले हे उद्गार काढण्यासाठी टिळकांना आधी स्वराज्य या शब्दासाठी पण मोठा झगडा करावा लागला होता. स्वराज्य ही संकल्पना शिवाजी महाराजांना स्मरून त्यांनी रुजवली असल्याचे सांगितले जाते. पण स्वराज्य म्हणजे काय हे स्पष्ट करताना बेळगावहून सातारा व वाई येथे कार्यक्रम करीत टिळक अहमदनगर शहरात दाखल झाले. तेथे ३१ मे आणि १ जून या दिवशी भरवलेल्या सभांमधून त्यांनी ‘स्वराज्या’ची भूमिका स्पष्ट केली. आपला इंग्लंडमधील राजसत्तेला मुळीच विरोध नसून या राजसत्तेच्या भारतातील नोकरांना विरोध असल्याचे ते सांगू लागले. ब्रिटिशांची मूळ सत्ता म्हणजे मूळ धनी चांगला असून त्याला आपला पाठिंबाच आहे, पण त्याच्या इथल्या कोठावळ्यांना विरोध केला पाहिजे. त्यांच्याऐवजी आमचा कारभार आम्ही करणे म्हणजे स्वराज्य. यात ब्रिटिश सत्तेला विरोधाचा प्रश्न येतोच कोठे? आपल्या सर्व समस्यांचे उत्तर स्वराज्य हे आहे. स्वराज्य ही गुरुकिल्लीच आहे. असा युक्तिवाद करून त्यांनी स्वराज्य ही संकल्पना ब्रिटिशांच्याही गळी उतरवली होती आणि स्वराज्यासाठी मान्यता मिळवली होती.
जन्मसिद्ध अधिकार म्हणजे काय? ते कोणते? ते कसे असायला हवेत याचा कायदेशीर अभ्यास करून अत्यंत परखड भूमिका घेत ठणकावून हे उद्गार काढले होते.
जन्मसिद्ध अधिकार म्हणजे जन्मत: मिळालेले अधिकार असे नसून वारसा हक्काने मिळालेले अधिकार आहे हा सूक्ष्म भेद पण त्यांनी जाणला होता. जसे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर काही अधिकार फक्त मोठ्या मुलालाच मिळतात, काही गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य फक्त मुलांनाच दिलेले असते तसे काहीसे आहे असे सांगून ब्रिटिश लोकांना मोठ्या चतुराईने फसवले होते. परंतु त्यात निव्वळ देशभक्ती होती. त्यात त्यांचा वैयक्तिक फायदा नव्हता. म्हणूनच या वाक्याने दाखवलेली दिशा ही स्वातंत्र्य मंदिराकडे जाणाऱ्या पहिल्या पायरीवरील शिळा ठरली.
म्हणूनच आजच्या काळातही जेथे जेथे अन्याय दिसत आहे, जेथे जेथे आपल्या देशाची अभिमानता दाखवून द्यायची गरज आहे तेव्हा तेव्हा हेच उद्गार नाही काढले तरी तशी आग्रही भूमिका घेऊन.. तशीच परखडता ठेऊन.. तेवढाच खंबीरपणा दाखवून आपले म्हणणे सांगता आले पाहिजे. तो करारीपणा.. तो निग्रहीबाणा प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे.
☆ ओळख एका विलक्षण माणसाची… – लेखक : डॉ. प्रसाद दाढे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
कॅप्टन सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन
… ज्याच्या घरी साक्षात भाषा पाणी भरीत होती !!
सध्या आपल्याकडे ‘भाषा’ विषयावरून बरेच वादविवाद सुरू आहेत. कधी थरूरांच्या इंग्रजीची चेष्टा होते तर कधी दुसऱ्या भाषेतील फलकांना काळे फासले जाते. अर्थातच ही गोष्ट नवीन नाही. पण एकूणच प्रांतभेद, भाषाभेद अश्या वादांना सध्या प्रसारमाध्यमे वाजवीपेक्षा महत्त्व देतात असं वाटतं.
आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त निदान दोन भाषा किमान बोलता येणं ही अपेक्षा फारशी अतिरेकी नसावी. पण काही जणांना हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला वाटतो म्हणून कदाचित वाद चिघळत असतील. आणखीन काही आयाम असू शकतात.
एका व्यक्तीला एका आयुष्यात किती भाषा अवगत असू शकतील असा विचार केला तर कल्पनेची धाव चार किंवा पाचपेक्षा पुढं जायला धजावत नाही. अतिशयोक्ती जरी करावी वाटली तरी तो आकडा ‘तीस’ असू शकत नाही….. पण ही अतिशयोक्ती नाही.. तर सत्य आहे.
– – – तो जन्माने इंग्रज होता त्यामुळे इंग्रजी त्याची मातृभाषा होती. फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, लॅटिन आदी युरोपियन भाषांवर त्याचं प्रभुत्व होतंच पण त्यासोबत अरेबिक, हिंदी, मराठी, संस्कृत, गुजराती, सिंधी, स्वाहिली अश्या जवळजवळ ‘तीस’ वेगवेगळ्या भाषांत तो पारंगत होता. कित्येक बोलीभाषाही त्याला येत होत्या. ह्याच्या पुढची अतर्क्य गोष्ट म्हणजे त्याने माकडांच्या भाषेतील साठ शब्द शोधून काढले होते !
कॅप्टन सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन ! काहींना नावावरून हॉलिवूडचा जुना नट आठवेल. पण भाषापंडित रिचर्ड बर्टन एकोणिसाव्या शतकात होऊन गेला.
आज भाषांवरून वाद घालणारे जग बर्टनला विसरले आहे. बाळ सामंतांनी लिहिलेलं त्याचं चरित्र ‘शापित यक्ष’ (परचुरे प्रकाशन) वाचलं नसतं तर मला हा माणूस कळला नसता.
केवळ भाषापंडित नाही तर इतके गुण (आणि काही अवगुणसुद्धा) बर्टनच्या अंगी होते की हा एकच माणूस होता की ह्याच नावाच्या वेगवेगळ्या व्यक्ती होत्या असं कुणाला वाटून जाईल.
लिओनार्दो दा विंची हा अष्टपैलू होता म्हणतात. बर्टनला अर्वाचीन काळातील विंची म्हणावे लागेल.
केवळ भाषाच नाही तर तो भिन्न भाषिकांच्या संस्कृतीचा, जीवनमानाचा, प्रथांचा, धार्मिक विधींचा सखोल अभ्यास करीत असे. त्या काळातील कठीण गोष्ट म्हणजे निरनिराळ्या समाजातील लैंगिक प्रथांचासुद्धा त्याने शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला होता. समलैंगिकतेवर धाडसाने लिहिणारा हा विद्वान आपल्या हयातीत वादग्रस्त बनला, सनातन्यांच्या टीकेचे लक्ष्य बनला ह्याचं आश्चर्य काय?
बर्टनने काही काळ ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतलं असलं तरी शिस्तभंगाच्या आरोपावरून त्याची हकालपट्टी झाली होती. त्यानंतर तो ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात दाखल झाला आणि भारतात आला. मुंबई, कराची आदी नगरात त्याचे वास्तव्य होते. भारतीय भाषांची, संस्कृतीची गोडी त्याला इथेच लागली. काही तासांत तो एखादी भाषा शिकत असे. त्याच्या पध्दती अफलातून होत्या. म्हणायचा, नवीन भाषेतील अगोदर शिव्या शिका ! तर कधी तो चक्क वेश्यांकडून नवीन भाषा शिकत असे.
तो एक धाडसी शोध-प्रवासीही होता. आफ्रिकेतील महाकाय सरोवर लेक ‘टांगानिका’चा शोध त्याने लावला. त्या काळात तो प्रवास भयंकर अवघड असे. प्रतिकूल हवामान, घनदाट जंगल, रोगराई, विषारी कीटक-सर्प, नरभक्षक प्राणी व आदिवासी आणि प्राथमिक अवस्थेतील दळणवळण ह्या सगळ्यावर मात करून बर्टनने आफ्रिकेत भ्रमंती केली आणि तिथली भौगोलिक तसेच सामाजिक परिस्थिती प्रगत जगासमोर पहिल्यांदा मांडली.
त्याने केलेला दुसरा मोठा पराक्रम म्हणजे गैरमुस्लिम असूनही मक्केला जाण्याचे धाडस. मक्केस आजही केवळ मुस्लिम धर्मीयच जाऊ शकतात. त्या काळात तर अन्यधर्मियाचा जागेवर शिरच्छेद होत असे. बर्टनने वेषांतर करून मक्का-मदिना यात्रा केली. अगोदर त्याने अरबी भाषेवर प्राविण्य मिळवले, कुराण मुखोद्गत केले व इस्लामचा धार्मिक व सामाजिक प्रथांचा बारकाईने अभ्यास केला. त्यामुळे मक्का-मदीनेतील मुल्लामौलवींना संशय आला नाही.
बर्टनने अनेक प्रांतात मुशाफिरी केली. तो युरोपातील एक नावाजलेला तलवारबाज होता. शिल्पकला, चित्रकलेत त्याला गती होती. शिवाय तो उत्तम बुद्धिबळपटूसुद्धा होता.
उत्तर आयुष्यात त्याने वात्सायनाचे कामसूत्र, कल्याणमल्लाचे अनंगरंगरतीशास्त्र तसेच अरेबियन नाईट्सचे त्या काळी ‘बोल्ड’ वाटणारे इंग्रजी अनुवाद केले व ते प्रचंड गाजले. त्याच्या ग्रंथांमध्ये मजकुराइतक्याच, किंबहुना त्यापेक्षा अधिक प्रमाणात माहितीपूर्ण तळटिपा असत. कारण त्याला केवळ भाषा अवगत नव्हती तर वेगवेगळ्या समाजातील दंतकथा, लोककथा, रूढी, समजुती तो उत्तमरीत्या जाणत होता.
वैयक्तिक पातळीवर तो नास्तिक असला तरी अनेक धर्मांचा अभ्यास केल्यामुळे तो काही रूढी पाळत असे. एकदा मुंबईतील वाळकेश्वर मंदिरात पत्नीसह गेला असतांना पुजाऱ्याने ‘किरीस्तावास मज्जाव’ केल्यावर बर्टनने आपले जानवे दाखवले व गायत्री मंत्र म्हणून दाखवला. पुजारी अवाक झाला असणार.
तरुणपणी आडदांड, धसमुसळा, संधी मिळेल तिथे मारामारी करणारा, पीळदार मिश्या राखणारा बर्टन लेडी’ज मॅन म्हणूनही प्रसिद्ध होता.
त्याच्या वात्रट स्वभावाचे एक उदाहरण देतो…
रोज दुपारी त्याच्या बायकोच्या (इझबेल) अनेक मैत्रिणी तिच्याशी गप्पा मारायला घरी येत असत. त्यांच्या फालतू बडबडीमुळे बर्टन वैतागून जात असे. एक दिवस तो त्या खोलीत गेला आणि बायकांसमोर एक हस्तलिखित आदळून निघून गेला. बायकांना बर्टन मोठा लेखक आहे हे ठाऊक होतं म्हणून त्यांनी लगबगीने हस्तलिखित पाहिलं तर त्याचा मथळा होता, ‘पादण्याचा इतिहास’ !
लंडनचे उपनगर ‘मॉर्टलेक’मध्ये बर्टनची वैशिष्ट्यपूर्ण कबर आहे. बेदाऊन तंबूसारखी रचना असलेल्या कबरीचा दरवाजा उघडला की उंटाच्या गळ्यातील घंटेचा नाद ऐकू येतो आणि आपल्याला बर्टनसोबत अरबस्तानातील वाळवंटात नेतो..
आपल्यासारख्या सामान्यांना बर्टनसारख्या पंचवीस-तीस भाषा येणं अशक्य असलं तरी इतर भाषांबद्दल, संस्कृतीबद्दल किमान आदर बाळगायला काही हरकत नसावी.
☆
लेखक : डॉ. प्रसाद दाढे.
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “जग प्रकाशित करून गेलेला वेडा शास्त्रज्ञ!” – इंग्रजी लेखक : रिचर्ड डॉकिन्स – अनुवादक : अज्ञात☆ सुश्री शोभा जोशी ☆
— निकोला टेस्ला –
‘टेस्ला’चं नाव पहिल्यांदा ऐकताय का…? चूक तुमची नाही… अभियांत्रिकी संबंधित व्यक्ती सोडून कुणाला टेस्ला माहीत असेलच असे नाही… कारण आपल्या शालेय जीवनात आपल्याला एडिसन सापडतो, मात्र टेस्ला नाही!
ज्याच्यामुळे आपल्या घरातली सर्व विद्युत उपकरणं सुरू आहेत, त्या ‘टेस्ला’चं नाव उपेक्षित आहे!
१० जुलै १८५६ रोजी क्रोएशियात (तेव्हाचं ऑस्ट्रिया) मुसळधार पाऊस पडत होता. मध्यरात्री विजांचा कडकडाट होत असताना एक बालक जन्माला आलं; ज्यानं आयुष्यभर आपल्या मर्जीप्रमाणे विजेला शब्दशः खेळवलं. पाद्री वडील आणि निरक्षर गृहिणी आईच्या पोटी जन्माला आला– निकोला टेस्ला.
टेस्ला त्याच्या आईचं खूप कौतुक करतो. घरात काही बिघडलं, की त्याची ही निरक्षर आई ते दुरुस्त करायची. टेस्ला म्हणतो की शोधक आणि कल्पक वृत्ती ही खात्रीनं त्याला केवळ आईकडून मिळालीय, वडिलांकडून नाही.
वडिलांशी त्याचं जास्त पटायचं नाही. पाद्र्याची पोरं पाद्री व्हावीत, असं त्याच्या बापाला वाटायचं. त्यात ह्याचा एकमेव भाऊ अपघातात गेला… मग जी काही आशा ती ह्याच्यावर! पण हा लहानपनापासूनच अवलिया. तो कसला बापाच्या हाती लागतो!
पोरगं एवढं अफाट होतं की बाईंनी अवघड मोठी मोठी गणितं फळ्यावर द्यावीत आणि ह्यानं काही सेकंदात तोंडीच उत्तर द्यावं. बाईंना वाटायचं हा चीटिंग करत असणार… मार खायचा पण शहाणपणा करायचं सोडायचा नाही.
त्या काळात शाळा पूर्ण झाली की नियम होता– एक वर्ष सक्तीची सैन्यात नोकरी करायची. ह्यानं तिथंही हुलकावणी दिली. एक वर्ष जंगल दऱ्यापर्वतात शिकार करत फिरला. आणि मग घरी आला. बाप म्हणाला, ‘हो पाद्री…’ हा म्हणाला, “नाही, मला अजून शिकायचंय! ”
त्यात त्याला पटकीची बाधा झाली. जगण्याची फारशी आशा नव्हती. नऊ महिने अंथरूणावर पडून काढल्यावर जेव्हा एके दिवशी बाप म्हणाला, “तुला सगळ्यात भारी इंजिनिअरिंग कॉलेजला टाकतो…” तेव्हा कुठं पोरानं उभारी धरली आणि सर्व नीट झालं.
पण तिथं तरी यानं नीट शिकावं की नाही… पण छे, एका वर्षात चार विषय पूर्ण करायचे, तर यानं नऊ केले! पहाटे तीन ते रात्री अकरा रोज अभ्यासात गर्क… कॉलेजनं ह्याच्या वडिलांना पत्र पाठवलं की ‘असंच जर सुरू राहिलं तर मुलाच्या प्रकृतीची बरंवाईट होऊन बसेल! ’
एवढी मेहनत केल्यावर गुरूच्या पुढं जाणारच ना! मास्तरांना कौतुकानं नवीन आयडिया सांगायला गेला आणि ते मास्तरांच्या डोक्यावरून गेलं, म्हणून त्यांनी ह्याला वेड्यात काढलं.
निराश होऊन हा जुगाराकडे वळला… त्यात पार डुबला… (दोन्ही अर्थानं). स्कॉलरशिपचे, फी चे सगळे पैसे त्यात घालवले (नंतर वसूल पण केले म्हणा! ) तर अशी अवदसा आठवली त्याला आणि पदवी न घेताच घरी यावं लागलं.
बापाचं टुमणं सुरूच… ‘पाद्री बन! ’ पण ह्याच्या डोक्यात ‘वीज’ घुसलेली. पाच सहा वर्ष मिळेल ती काम करत असंच पॅरिसला कामाला गेला. तिथं चार्ल्स बॅचलर यानं ह्याची गुणवत्ता ओळखली आणि त्याला इथं आयुष्य फुकट घालवण्यापेक्षा अमेरिकेला एडिसन यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला.
चार्ल्स एडिसन यांचा चांगला मित्र होता. त्यानं टेस्लाकडे एडिसन साठी एक शिफारस पत्र दिलं; ज्यात लिहिलं होतं–
‘आयुष्यात मी दोन जीनियस पाहिले… एक तू आणि एक हा पत्र घेऊन आलेला टेस्ला! ’
थॉमस अल्वा एडिसन… विजेवर बल्ब पेटवणारा शास्त्रज्ञ आणि अमेरिकेत वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीचा संचालक! एडिसननं थोड्या अवधीत ओळखलं की ‘ये लंबी रेस का घोडा है…! ’ त्यानं त्याला अवघड अवघड कामं दिली. ती टेस्लानं सहज पार पाडली. दोघांनी मिळून एक वर्षभर खूप छान काम केलं.
एडिसन वीज पोहोचवण्यासाठी ‘डीसी’ करंट वापरायचा. ज्याला मर्यादा होत्या. पॉवर स्टेशन पासून केवळ एक किमी अंतरावर वीज या पद्धतीनं पोहोचायची. खर्चही खूप यायचा. आणि या विजेवर मोठमोठी मशीन्स चालवणं शक्य नव्हतं.
टेस्लानं कॉलेजमध्ये असतानाच त्यावर पर्याय म्हणून ‘एसी’ करंटनं (जी पद्धत आपण आज वापरतो) वीज वितरित करणं शोधून काढलं होतं. (मास्तरांशी वाद यावरूनच झाला होता! )
टेस्लानं हे एडिसनला दाखवलं आणि एडिसन हादरला! हा तर आपल्या सवाई निघाला…! ! ! ह्याचं म्हणणं मान्य करावं, तर आजवर एडिसननं केलेले सगळे शोध मोडीत निघणार होते…! एडिसननं मुद्दामच, ‘तुझं म्हणणं मूर्खपणाचं आहे’, असं सांगून विषय संपवला.
एक दिवस एडिसननं टेस्लाला आव्हान दिलं, “हा बिघडलेला जनरेटर दुरूस्त केलास, तर तुला ५०००० डॉलर देईन. ”
टेस्लाने चिक्कार मेहनत करून तो दुरुस्त केला आणि हक्कानं पैसे मागायला गेला. मात्र, एडिसननं त्याला उडवाउडवीची उत्तरं देऊन वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
इथं टेस्लाचा एडिसनशी खटका उडाला… एडिसनच्या तोंडावर राजीनामा फेकून, “आता माझीच कंपनी टाकतो तुला टक्कर द्यायला…” म्हणत तो बाहेर पडला.
मात्र त्याला कोणी फायनान्सर मिळेना! शेवटी एडिसनच्याच ठेकेदाराकडे त्यानं दोन वर्ष खड्डे खणायचं काम केलं. त्या काळात त्यानं आपल्या शोधाचं पेटंट नोंदवलं.
दोन वर्षांनंतर टेस्लाला फायनान्सर मिळाला आणि त्याचीही कंपनी सुरू झाली. एडिसन जाणून होता, टेस्ला शर्यतीत उतरला आणि जर याची पद्धत मार्केटमध्ये आली तर आपली पद्धती कालबाह्य होईल, म्हणून त्यानं स्वतःचं ‘वजन’ वापरत टेस्लाला त्रास देणं सुरू केलं. या दोघात झालेले वादविवाद ‘करंट वॉर’ म्हणून प्रसिद्ध आहेत.
टेस्लानं एडिसनचे स्पॉन्सरर्स फोडायला आणि एडिसननं ह्याचे पंख छाटायला सुरुवात केली.
‘एसी करंट’ किती धोकादायक आहे हे दाखवण्यासाठी एडिसन रस्त्यावर मुक्या प्राण्यांना करंट देऊन मारण्याचं जाहीर प्रात्यक्षिक दाखवू लागला. लोकांत दहशत पसरू लागली.
नीचपणाचा कळस म्हणजे मृत्यूची शिक्षा झालेल्या कैद्याला एसी करंट देऊन मारण्याची शिफारस केली. २००० वॉल्टचा एसी करंट देऊन शिक्षा अमलात सुद्धा आणली गेली… ‘पाहा किती धोकादायक आहे एसी करंट…! ’ अशी एडिसन पुरस्कृत भरपूर प्रसिद्धीही केली गेली.
हे कमी म्हणून की काय, कायदेशीर वजन वापरून टेस्लाची कंपनी गाळात घालण्याचा देखील प्रयत्न झाला… पण, कोंबडं कितीही झाकलं तरी उजाडायचं राहतं का…?
सत्याचा विजय इथंही झाला… टेस्लाच्या पद्धतीला मान्यता मिळाली. इतकंच नव्हे, तर जगप्रसिद्ध नायगारा धबधब्यावर जनित्र बसवून वीज निर्मिती करण्याचं काम टेस्लाच्या कंपनीला मिळालं!
खूप मोठा प्रोजेक्ट एडिसनच्या कंपनीच्या हातून गेला… परिणामी एडिसनची संचालक पदावरून गच्छंती झाली. नायगाराचे काम मिळणं हा टेस्लाच्या आयुष्यातला परमोच्च बिंदू… त्याचं बालपणापासून उराशी बाळगलेलं स्वप्न साकार करणारा!
१८९५ मध्ये टेस्लाच्या ऑफिसला आग लागली आणि तिथून पुढं सगळं उलट होत गेलं… त्यानं बनवलेल्या डिझाईनवर मार्कोनी यानं रेडिओ बनवला. ही बाब त्याला खूप निराशा देणारी होती.
(रेडिओचं पेटंट आधी मार्कोनीकडे होतं, मात्र नंतर ते टेस्लाकडे देण्यात आलंय.)
वायरलेस वीज पुरवठा करण्याचा त्याचा अतिमहत्त्वाकांक्षी आणि खर्चिक प्रकल्प सुरू होता. स्पॉन्सररला वाटलं की ह्याला वीज फुकट वाटायचीय… त्यानं अंग काढून घेतलं आणि टेस्ला अक्षरशः रस्त्यावर आला.
तिथून पुढं त्याचं आयुष्य अतिशय हलाखीचे गेलं. नंतर त्याचे अनेक प्रयोग अपूर्ण राहिले. मेंदू मधल्या भावनांचे फोटो त्याला काढायचे होते, ते काम अपूर्ण राहिलं. तो अश्या एका अस्त्रावर काम करत होता की आपल्या देशाच्या सीमेवर प्रवेश करणाऱ्या शेकडो विमानांना केवळ विद्युत स्तंभ वापरून नष्ट करायचं… पण तेही पूर्ण झालं नाही.
१९४३ साली टेस्ला कालविवश झाल्याचं समजलं तेव्हा त्याची सारी कागदपत्रं, हिटलरच्या हाती पडू नयेत म्हणून अमेरिकन सरकार ने ताब्यात घेतली.
टेस्ला कधी स्त्रियांच्या आहारी गेला नाही. तसा तो जरा तिरसट होताच. कुणाचे कान टोचलेले पाहिले की ह्याच्या पोटात ढवळायचं. दागिने पाहिले की मळमळ व्हायची. कापराचा वास आला तरी जाम आजारी पडायचा. महिलांपासून तर दोन हात दूरच राहायचा… त्यामुळं त्यानं लग्न केलं नाही. म्हणायचा, “मी आयुष्य विज्ञानाला वाहिलंय. ” (आधी लग्न करून मग ध्येयप्राप्ती साठी बायकोला सोडून देण्यापेक्षा हे नक्कीच योग्य होतं.)
शांततेचं नोबेल जगभरातल्या अनेक गांधीवाद्यांना मिळाले आहे मात्र स्वतः गांधीना नाही. त्याचप्रमाणं टेस्लाचं डिझाईन वापरून रेडिओ बनवणाऱ्या मार्कोनीला नोबेल मिळालं मात्र टेस्लाला नाही…
जगाच्या कानाकोपऱ्यात प्रकाश पोहोचवणारा हा जिनीयस प्रसिध्दीच्या झोतात मात्र कधी आलाच नाही. त्याला योग्य प्रसिद्धी द्यायचे काम आपलं!
इंग्रजी लेखक : रिचर्ड डावकिन्स
अनुवादक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ तिन्ही सांजा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
आज सकाळी एका मित्राने विचारलं होतं की कविवर्य भा०रा० तांबे ह्यांच्या एका कवितेत ‘तिन्ही सांजा’ असा शब्दप्रयोग आढळतो : “तिन्ही सांजा सखे मिळाल्या / देई वचन तुला… “
तसेच ‘झाल्या तिन्ही सांजा, करून शिंगार साजा.. ‘ या गाण्यातही तिन्ही सांजा असा अनेकवचनातच शब्द प्रयोग केला आहे.. असं का बरं..?
मग मलाही हे लक्षात आलं की खरंच,
ह्यात ‘तिन्ही सांजा’ म्हणजे काय? एरवी आपण ‘सांज झाली’ असे म्हणतो; ‘सांजा झाल्या’ असे म्हणत नाही. ‘तिन्हीसांजेची वेळ झाली’ असे म्हणतो; ‘तिन्ही सांजांची वेळ झाली’ असे म्हणत नाही. तर, ‘तिन्ही सांजा’ या शब्दप्रयोगाला काही संदर्भ आहे का?
तिन्हीसांजा हा खरंतर आपल्या नेहमीच्या वापरातला आणि सोपा शब्द आहे. पण आज मात्र तोच अवघड वाटायला लागला.
आणि मनात प्रश्न आला, सांज म्हणजे संध्याकाळ. सांजा हे त्याचे अनेकवचन असेल… पण मग तिन्ही सांजा म्हणजे काय? कुतूहलाने शब्दकोशात पाहिले. तिथे तिन्ही सांजा म्हणजे सायंकाळ, संध्याकाळची वेळ असेच दिलेले. पण तिन्ही म्हणजे काय?
… आणि मग दोन्ही गाण्यांचे lyrics पुन्हा पुन्हा ऐकले.. त्यातून काही संदर्भ लागतोय का हे चाचपडून पाहिलं.. मग अर्थातच गुगल ची मदत घेतली. प्रथम तर गुगल वर तिन्ही सांजा असे टाइप करताच भराभरा चार पाच सांज्याच्या रेसिप्यांचे व्हिडीओज दिसायला लागले…! ! पण मग आणखी नेटाने गुगलून पाहिलं तर ही अशी माहिती मिळाली की,
‘तिन्ही सांजा’ हा शब्दप्रयोग ‘त्रिसंध्या’ ह्या संस्कृत शब्दावरून आला असावा असे डॉ० अशोक केळकर (भाषा तज्ञ) ह्यांनी सुचविले आहे. ‘त्रिसंध्या’ हा शब्द आपटयांच्या तीन खंडांच्या संस्कृत-इंग्रजी कोशात (सुधारित आवृत्ती संपा० प्रा० गोडे, प्रसाद प्रकाशन, पुणे, १९७९) आढळतो.
पहाट आणि सायंकाळ ह्या दिवस व रात्रीच्या सीमारेषेवरील दोन संध्या व माध्याह्न ही सकाळ व दुपार ह्यांच्या सीमारेषेवरील संध्या अशा ह्या तीन संध्या…. तिन्ही सांजा! !
‘तिन्हीसांज’ प्रमाणे ‘त्रिकाल’ (तिन्ही त्रिकाळ) हाही शब्द रूढ आहे.
हा अर्थ समजल्यानंतर जेंव्हा
तिन्ही सांजा सखे मिळाल्या हे गीत परत वाचलं तेंव्हा वाटलं.. की रात्र संपून दिवस सुरू होताना रात्र व सकाळ एकजीव असलेली एक सुंदरशी पहाट म्हणजे पहिली सांज..
दिवस वर येऊन सकाळ व दुपार एकजीव असतानाची ती दुसरी सांज..
व दिवस सम्पताना दिवस व रात्रीच्या सुरवातीच्या जो एक एकजीव काळ असतो ती म्हणजे तिसरी सांज..
दिवसाच्या या चक्रात असे तीन संधिकाल असतात पण पहिल्या संधिकाली-म्हणजेच सांजवेळी आपण रात्र व दिवसाची सुरवात वेगळी करू शकत नाही… दुसऱ्या व तिसऱ्या संधिकाली – सांजवेळीही असेच! !
त्यामुळे, “तिन्ही सांजा” हे कदाचित एकजीवतेचे प्रतीक म्हणून वापरले असावे.. असे मला वाटते.
तिन्ही सांजा गीताच्या पहिल्या कडव्यात सर्व शाश्वत गोष्टीना साक्षी मानून तुझा हात हाती घेतला आहे, तो ही तिन्ही सांजांची एकजीवता स्मरून.. असा भावार्थ जाणवतो.
दुसऱ्या कडव्यात नाद- बासरी, रस- कविता, पाणी- मोती.. अशा उदाहरणातून द्वैत- अद्वैत ही कल्पना मांडली आहे.. माझ्या हृदयातील जीव म्हणजे तू अशी एकजीवता म्हणजेच द्वैतातील अद्वैत सांगून पुन्हा तिन्ही सांजा हे रूपक वापरत गाणे समेवर येते..
झाल्या तिन्ही सांजा या गाण्यात ही अशीच एकजीवता अपेक्षित आहे, असे वाटते.
हा मला समजलेला अर्थ आहे.
आज त्या मैत्रिणीने ‘तिन्ही सांजा’ बद्दल विचारलं म्हणून मी ही बारकाईने शब्द व अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला.
संदर्भासाठी ‘तिन्ही सांजा.. ‘हे गीत दिले आहे..
तिन्ही सांजा सखे मिळाल्या,
देई वचन तुला
आजपासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला
तिन्ही सांजा सखे मिळाल्या..
कनकगोल हा मरीचिमाली
कनकगोल हा मरीचिमाली
जोडी जो सुयशा
चक्रवाल हे पवित्र,
ये जी शांत गभीर निशा
त्रिलोकगामी मारुत,
तैशा निर्मल दाहि दिशा
साक्षी ऐसे अमर करुनी हे तव
कर करी धरिला
तिन्ही सांजा सखे मिळाल्या…
नाद जसा वेणूंत, रस जसा सुंदर कवनांत
गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षांत
पाणी जसे मोत्यांत
पाणी जसे मोत्यांत,
मनोहर वर्ण सुवर्णांत
मनोहर वर्ण सुवर्णांत
हृदयीं मी साठवीं तुज तसा
जीवित तो मजला
तिन्ही सांजा सखे मिळाल्या,
देई वचन तुला
तिन्ही सांजा सखे मिळाल्या..
— कवी : श्री. भा रा तांबे
┉❀꧁꧂❀┉
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “अद्भुत असे केदारनाथ मंदिर” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केले ह्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य यांच्यापर्यंत. पण मला त्यात जायचं नाही. केदारनाथ मंदिर साधारण ८ व्या शतकात बांधले गेले असावे असे आजचे विज्ञान सांगते. म्हणजे नाही म्हंटल तरी हे मंदिर कमीत कमी १२०० वर्ष अस्तित्वात आहे. केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२, ००० फुट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१, ६०० फुट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२, ७०० फुटाचा भरतकुंड. अश्या तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी. ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत. ह्या क्षेत्रात मंदाकिनी नदीचे राज्य आहे. थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणारं पाणी. अश्या प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती प्रचंड अभ्यास केला गेला असेल.
केदारनाथ मंदिर ज्या ठिकाणी आज उभं आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अश्या ठिकाणी त्याचे निर्माण का केले गेले असावे? त्याशिवाय १००-२०० नाही तर तब्बल १००० वर्षापेक्षा जास्ती काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसे उभे राहिले असेल? हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा. जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण १० व्या शतकात होतं तर पृथ्वीवरच्या एका छोट्या ‘आईस-एज ‘कालखंडाला हे मंदिर सामोरं गेलं असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला. साधारण १३०० ते १७०० ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडलं गेलं असावं व त्याची शहानिशा करण्यासाठी वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी, डेहराडूनने केदारनाथ मंदिराच्या दगडांवर लिग्नोम्याटीक डेटिंग ही टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट ही दगडांचं आयुष्य ओळखण्यासाठी केली जाते. ह्या टेस्टमध्ये असं स्पष्ट दिसून आलं की साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडले गेले होते. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही.
२०१३ साल केदारनाथ इकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असलेच. ह्या काळात इकडे सरासरी पेक्षा ३७५% जास्त पाऊस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल ५७४८ लोकांचा जीव गेला. ४२०० गावाचं नुकसान झालं. तब्बल १ लाख १० हजार पेक्षा जास्ती लोकांना भारतीय वायू सेनेने एअर लिफ्ट केल. सगळंच्या सगळं वाहून गेलं. पण ह्या प्रचंड अश्या प्रलयात केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला थोडा धक्का पण लागला नाही. अर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया च्या मते ह्या प्रलयानंतर सुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चर च ऑडीट मध्ये १०० पेकी ९९ टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे. आय. आय. टी. मद्रास ने मंदिरावर एन. डी. टी. टेस्टिंग करून बांधकामाला २०१३ च्या प्रलयात किती नुकसान झाल आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला. त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे. दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर फक्त पासच नाही तर सर्वोत्तम असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात? तब्बल १२०० वर्षानंतर जिकडे त्या भागातले सगळे वाहून जाते, एकही वास्तू शिल्लक रहात नाही, तिकडे हे मंदिर दिमाखात उभं आहे आणि नुसते उभे नाही तर अगदी मजबूत आहे. ह्या पाठीमागे श्रद्धा मानली तरी ज्या पद्धतीने हे मंदिर बांधले गेले आहे, ज्या जागेची निवड केली गेली आहे, ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे, त्यामुळेच हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभं राहू शकलं आहे असं आजचं विज्ञान सांगत आहे.
हे मंदिर उभारताना उत्तर – दक्षिण असे बांधले गेले आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिरं ही पूर्व – पश्चिम अशी असताना केदारनाथ दक्षिणोत्तर बांधले गेले आहे. ह्यातील जाणकारांच्या मते जर मंदिर पूर्व- पश्चिम असं असतं. तर आधीच नष्ट झालं असतं. किंवा निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच. पण ह्याच्या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे. त्यामुळेच वातावरणातील फरक तसेच तब्बल ४०० वर्ष बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या प्रोपर्टीजमध्ये फरक झालेला नाही. त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या भिन्न कालचक्रात आपली मजबुती टिकवून आहे. मंदिरातील हे मजबूत दगड कोणतही सिमेंट न वापरता एशलर पद्धतीने एकमेकात गोवले आहेत. त्यामुळे तपमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंट वर न होता मंदिराची मजबुती अभेद्य आहे. २०१३ च्या वेळी एक मोठा दगड पाठीमागच्या घळई मधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धारही विभागली गेली आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सगळं काही आपल्यासोबत वाहून नेलं, पण मंदिर आणि मंदिरात शरण घेतलेले लोक सुरक्षित राहिले. ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायू दलाने एअर लिफ्ट केलं होतं.
श्रद्धेवर विश्वास ठेवावा का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण तब्बल १२०० वर्ष आपली संस्कृती, मजबुती टिकवून ठेवणारं मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याच बांधकामाच मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही. टायट्यानिक बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना एन. डी. टी. टेस्टिंग आणि तपमान कस सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजल. पण आमच्याकडे तर त्याचा विचार १२०० वर्षापूर्वी केला गेला होता. केदारनाथ त्याच ज्वलंत उदाहरण नाही का? काही महिने पावसात, काही बर्फात, तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून उन, वारा, पाऊस ह्यांना पुरून उरत समुद्रसपाटी पासून ३९६९ मीटर वर ८५ फुट उंच, १८७ फुट लांबीच, ८० मीटर लांबीच मंदिर उभारताना त्याला तब्बल १२ फुटाची जाड भिंत आणि ६ फुटाच्या उंच प्ल्याटफोर्म ची मजबुती देताना किती प्रचंड विज्ञान वापरल असेल ह्याचा विचार केला तरी आपण स्तिमित होऊ. आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने ‘ १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी सगळ्यात उंचीवरचं मंदिर ‘ असा मान मिळवणाऱ्या केदारनाथ च्या वैज्ञानिक बांधणीपुढे मी नतमस्तक.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुनील देशपांडे
ईमेल : sunil68deshpande@outlook.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ इडली डोश्याचा MBA प्रवास…☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
शहर – हैदराबाद.
१९८९ साली हैदराबाद शहरी लक्ष्मणराव शिंदे यांनी आपली सगळी जमापुंजी गुंतवली आणि एक रेकडी – ढकलगाडी विकत घेतली. आपल्या ८ वर्षांच्या मुलाच्या – रामच्या सोबतीने त्यांनी इडली डोश्याचा व्यवसाय सुरू केला. शाळा सांभाळून राम वडिलांना सकाळ – संध्याकाळ मदत करायचा. लक्ष्मणराव रोज वेगवेगळ्या ठिकाणी गाडी लावून नवनवीन ग्राहकांपर्यंत पोचायचे. हातची चव आणि बापलेकांची मेहनत यामुळे व्यवसाय ठीकठाक चालला होता. रोजचे खर्च निभत होते, रामच्या शिक्षणाचा खर्च निघत होता. पण ना धंद्याला म्हणावी तशी बरकत होती, ना गाठीशी पैसे साठत होते.
राम शिकत गेला, नुसता पदवीधर नव्हे तर MBA (मास्टर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन) झाला. आता राम नोकरीसाठी ठिकठिकाणी अर्ज करू लागला, नोकरीच्या शोधात दारोदार फिरू लागला. पण देऊ केला जाणारा पगार त्याला काही पुरेसा वाटत नव्हता.
आपण आपलाच व्यवसाय नावारूपाला आणावा असंच त्याचं अंतर्मन त्याला सांगत होतं. आणि त्यानं तसंच केलं, तो पूर्णवेळ आपल्या वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाला. वर्ष होतं २०११.
पण परिस्थिती आणि उत्पन्न “जैसे थे”च होतं. स्पर्धा होती मॉलमधील गाळ्यांशी आणि आजूबाजूच्या अन्य मोठ्या दुकानांशी – हॉटेल्सशी. लोकांना कमी पैश्यांत आणि कमी वेळात वैविध्य हवं होतं.
रामने या सगळ्याचा अभ्यास केला, आपलं व्यवस्थापनाचं (मॅनेजमेंट) पुस्तकी शिक्षण प्रत्यक्षात उतरायचं ठरवलं आणि मेनू आमूलाग्र बदलला. साध्या इडली डोश्यांसोबताच आता शेझवान डोसा, चीज डोसा, पिझ्झा डोसा, तवा इडली असे अनेकविध पदार्थ मिळू लागले. या नवनव्या पदार्थांची चर्चा शहरभर होऊ लागली, लोकं त्यांना शोधत येऊ लागले, आता त्यांना रोज वेगवेगळ्या ठिकाणी गाडी लावावी लागत नव्हती. उत्पन्न वाढलं, आणि गंमत म्हणजे ५० रुपयांच्या डोश्यापेक्षा १५० रुपयांच्या पिझ्झा डोश्यावर लोकं जास्त तुटून पडत होते. उत्पन्न वाढू लागलं होतं.
लक्ष्मणराव आजही सकाळी ८ वाजल्यापासून व्यवसायाला सुरुवात करत होते. ही वेळ आणखी लवकर करण्याची आयडिया रामला एका ग्राहकाकडून मिळाली. आयटी कंपनीत नोकरी करणारा तो ग्राहक सांगत होता, “आमची रात्रपाळी पहाटे ३ वाजता संपते. तुम्ही त्या वेळेला काही गरमागरम नाश्ता देऊ शकाल का? “
बाप लेकांना हा विचार पटला. दुसऱ्या दिवशीपासून पहाटे ३ वाजता त्या भागातल्या आयटी क्षेत्रातल्या चाकरमान्यांना रात्रपाळी संपवून घरी जाताना भरपेट गरमागरम नाश्त्याचा एक समर्थ स्वादिष्ट पर्याय उपलब्ध झाला होता.
इतकं उत्पन्न आजवर कधीच मिळालं नव्हतं.
दहा वर्षांत या रामलक्ष्मणांच्या जोडीने चांगले बस्तान बसवले. २०२० साली त्यांच्या दोन नियमित ग्राहकांनी त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला. जगभरातल्या करोना संकटामुळे हा प्रस्ताव थोडा लांबणीवर पडला पण २०२१ साली “राम की बंडी (हातगाडी)” च्या शहरभर पाच शाखा यशस्वीरीत्या सुरू झाल्या.
आज ७० हून जास्त माणसं आता इथं रात्रंदिवस कामाला आहेत आणि रोज हजारो ग्राहक यांच्याकडे क्षुधाशांतीसाठी येतात. खरंतर आता “राम की बंडी” हे फक्त पोट भरण्याचं ठिकाण राहिलेलं नाही, तो एक must visit अनुभव झाला आहे.
आता लक्ष्मणराव निवृत्त झाले आहेत. आणि आयुष्यभर जोपासलेल्या रोपाचा, आपल्या मुलाच्या नेतृत्वाखाली विशाल वटवृक्ष झालेला पाहून सुखावलेही आहेत आणि हरखलेही आहेत.
….. श्री समर्थ रामदास स्वामींचा हा अभंग आहे. हनुमानाच्या सर्व कथा रामभक्तीने भारलेल्या आहेत. त्याला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी रामच दिसत होता. त्याची राम भक्ती पाहून सीतामाता प्रसन्न झाली. तिला वाटले श्रीरामांच्या या सेवकाला आपण काहीतरी भेट द्यावी. तिने एक सुंदर मोत्याची माळ त्याला भेट दिली. हनुमानाने माळ घेतली पण तिचे काय करावे हे त्याला कळेना.
तो समोर जाऊन एका खडकावर बसला. माळेतील एक एक मणी काढायला सुरुवात केली. प्रत्येक मण्याचा प्रथम वास घेतला. नंतर प्रत्येक मणी सगळीकडून अगदी निरखून निरखून पाहिला. आणि फोडून टाकला. आत काय आहे ते बघितले. आणि टाकून दिले. असे करत करत त्याने त्या माळेतील ते सर्व मौल्यवान मणी फोडून टाकले. हे सारे सीतामातेने पाहिले. तिला खूप राग आला. आपण प्रेमाने याला माळ दिली. आणि याने प्रत्येक मणी फोडून टाकला. इतकी मौल्यवान माळ पण याला मात्र त्याचे काहीच नाही.
तिने त्याला विचारले, ” तू असे का केलेस”? तेव्हा हनुमान म्हणाला, ” मला त्या माळेत किंवा माळेतल्या कुठल्याही मण्यात राम दिसलाच नाही. मला माझा राम कुठे दिसतो का हे बघण्यासाठी मी प्रत्येक मणी फोडला. ज्याच्यात राम नाही ते माझ्या काय कामाचे? म्हणून मी ते सगळे टाकून दिले. “सीता अवाक् झाली. मग तिच्या लक्षात आले की आपण माळ दिली पण ते श्रीरामाचे स्मरण न करताच मी माळ दिली. श्रीरामच सर्व काही करत असतो. तिने हनुमानाची क्षमा मागितली. आणि दुसरी माळ श्रीरामाचे स्मरण करून त्याला दिली. श्रीरामाच्या नामजपाने सिद्ध झालेली ती माळ हनुमानाने भक्ती भावाने आपल्या गळ्यात घातली. सीतेला खूप आनंद झाला.
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)
आश्रम हरणांशी खेळता खेळता मैत्रेयी माझ्याजवळच पहुडली. तिचा विपुल केश संभार माझ्या वल्कलांवर पडला होता. तिचा तो शांत आनंदी चेहरा पाहून थोडा मत्सर जागा झालाच. असं वाटलं की एवढं या चेहऱ्यात काय आहे की तिच्याकडे पाहिलं की ऋषीवर्यांचे डोळे चमकायला लागतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज पसरते. एक प्रसन्नता अलगद येते. असं वाटतं की, त्यांच्या डोळ्यातून तृप्तीचा पाझर उतरतो आहे व त्यांना चिंब भिजवतो आहे. खरं म्हणजे त्यांच्या माझ्याशी वागण्यात मैत्रेयीच्या येण्यानं काहीच फरक पडला नव्हता. मैत्रेयी होतीच तितकी लाघवी की त्यांनाच काय मला सुद्धा तिचा लोभ जडला होता. कधीतरी पण, आपल्यात काहीतरी न्यून आहे. ती नाथांना जे देते ते आपल्याला देता येत नाही, याची खंत वाटून अस्वस्थ व्हायला होतं.
आठवते ती विवाहापूर्वीची मैत्रेयी! राजप्रधान मित्रा यांची कन्या! तत्त्वज्ञानी, ब्रह्म वादिनी, जनकाच्या दरबारात सीतेसह येत होती. याज्ञवल्क्यांबरोबर वाद विवादात तिने भाग घेतला. नाथांची बुद्धिमत्ता पाहून भाळली. इतकी ऐश्वर्यवान हसते, तिचं व्यक्तिमत्त्वच इतकं भरजरी आहे नां! सगळं ऐहिक सुख मागे ठेवून ही आश्रमात आली कशी? नुसती आली नाही रमली सुद्धा! ते गोधन, ती वल्कलं, सडा सारवण! हिला कधी माहेरची आठवण येत नसेल? मेखला, वाकी, पैंजण, बिंदी, कंबरपट्टा कशी नखशिखांत सजलेली असायची. कधी जाऊन नटावं वाटलं नसेल? म्हणायची, ” नाही गं! त्या साजाचा मला कधीच मोह वाटला नाही. पण ते दिवस खरच सुंदर होते. कला विलासाबरोबर राजर्षी जनकाने दिलेला ज्ञानाचा वसा फार मोहक होता. त्याचं खूप आकर्षण होतं. पण सुदैवानं ती भूक इथेही भागते आहे. अगदी मन भरून जातं. ऐश्वर्याची ही बाजूच मला जास्त भावते. त्यात तुझ्यासारखी सखी मिळाली. हा कवेत घेणारा परिसर मिळाला. माझ्या ज्ञानाच्या कंगोऱ्यांना सुवर्ण मुलामा चढवणारा पती मिळाला. आणखी काय हवं! “
अशी बोलायला लागली नां की मी बघतच राहते तिच्याकडे! खरं म्हणजे मी तर भारद्वाज ऋषींची कन्या! आश्रमातच लहानाची मोठी झाले. तरीही ते नागरजीवन, नृत्य गायनात मग्न असणारे, अजूनही आठवतं. त्या घराचा सुगंध मनाला तिथे ओढून नेतो. तुझ्यासारखी जर राजवैभवात वाढले असते तर सारखं माहेरी जाण्याचा हट्ट केला असता. पण मला नां, हा संसार, पती, मुलं, त्यांची काळजी घेणं, त्यांना खाऊ पिऊ घालणं, फार आवडतं. म्हणून मी इथे रमले. मैत्रेयी म्हणाली, ” मी तरी कुठे इतकी ऋषीतुल्य आहे. राग, लोभ हे शत्रू अजूनही घेऊन बसली आहे कुशीत! ” मी विचारलं, ” तुला कधी राग येतो गं? ” तर म्हणते कशी, ” तुझा येतो, ऋषीवर्यांचा येतो. पण मी काय करते माहित आहे, त्यांच्या जागी, तुझ्या जागी मला ठेवते. मग आपणच आपल्याला कसं रागवायचं? मग राग जातो पळून! ” आणि असं म्हणून खूप हसायची. मला वाटायचं की यांच्यासोबत पण ही अशीच बडबडत असेल? हसत असेल? मलाच हे वेड्यासारखं वाटतंय. मग त्या ज्ञानी पुरुषाला काय वाटत असेल? पण मग त्यांच्या चेहऱ्यावरचं, तिच्या दर्शनाने उमटणारं स्मित पाहिलं की मला गोंधळायला होतं.
हेच पहा नां! ऋषिवर्यांनी आम्हाला त्यांचा संन्यास घेण्याचा निर्णय सांगितला. त्याला विरोध करण्याची माझी कुवतच नाही. त्यामुळे नको म्हणायचा प्रश्नच नव्हता. पण जेव्हा ते माझं सगळं ऐश्वर्य तुम्हाला देऊन जातो असं म्हणाले, तेव्हा मी बर म्हटलं. तेवढंच बरं वाटलं. यांनी माझ्या भविष्याची काळजी घेतली. पण मैत्रेयी यांना म्हणते कशी, ” हे ऐश्वर्य घेतल्याने मी सुखी होईन का? अमर होईन कां? मग मी हे ऐश्वर्य घेऊन काय करू? मला अमर होण्याचा मार्ग सांगा. ” आणि त्यांच्याकडून ज्ञानाचा वसा घेऊन आत्मशोध घेण्यासाठी सगळे पाश तोडून सहज निघून गेली.
त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात मैत्रेयी आहे. पण ही साधीसुधी प्रपंचात रमणारी, छोट्याशा सुखानंही तृप्त होणारी, कात्यायनी, कुणालाच माहिती नाही. यांचा प्रत्येक शब्द झेलणारी, कधीच उलट प्रश्न न करणारी!
त्यामुळेच संसार करूनही ते परमार्थाची उग्र तपश्चर्या करत होते. विषयोपभोगाची सीमा कोठे संपते, याची त्यांना कल्पना होती. ते संसाराला विटले नव्हते. आमच्या संसाराला आनंदाची, संतोषाची झालर होती. तृप्तीची किनार होती. त्यांना ज्ञान वाटण्यासाठी दूर दूर फिरायचं होतं. इतक्या तृप्तींनं गृहस्थाश्रम उपभोगून संन्यासाश्रम स्विकारणारे ते पहिले ऋषी आहेत. मलाही इतक्या तपस्वी, ब्रह्मज्ञानी पतीचा सहवास मिळाला. माझे जीवन धन्य झाले. एकच इच्छा होती, अशीच शेवटपर्यंत त्यांची साथ लाभावी आणि त्यांच्या सानिध्यात हे डोळे मिटावेत. ती मात्र अपूर्ण राहिली..! !
(ही कात्यायनी, भारद्वाज ऋषींची तनया! तशीच कात्यायन ऋषींची मुलगी पण कात्यायनी, ही दुर्गेचे रुप आहे. नवरात्रीच्या नऊ देवींपैकी एक!)
☆ बुद्धिबळ – दोन घडीचा डाव…☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
” बुध्दीबळ” खेळणे हे जरी बुध्दीचे काम असले तरी एकंदर सोयी- सुविधा मिळण्याबाबत आजची पिढी नशिबवानच.
हा खेळ खेळावा असे वाटल्या क्षणी संगणक, मोबाईल, टॅब वर क्षणात ‘पट’ तयार असतो. टिचकीचा अवकाश!
(आमच्या वेळेला पट आणि सोंगट्या हुडकायला २ दिवस जायचे आणि मिळाल्यावर समोरच्याने आपल्यापण सोंगट्या मांडाव्यात ही सुप्त इच्छा असायची)
कुणाशी खेळायचे? हा प्रश्न आज पडत नाही. अभासी व्यक्तीही (मशीन) तुम्हाला (सहज) हरवू शकते
(आमच्या वेळी, आपल्या शिवाय कोण जास्त बुध्दीचे असणार हा विचार एकदा मनात आणला की काम संपायचे)
तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आमच्यावेळी नसायची ती म्हणजे १६+१६ = ३२ सोंगट्यां पैकी एक ही न हरवणे.
माझ्या कडच्या सेटमधील एखादे प्यादे खेळ सुरू व्हायच्या आधीच वझीर बनलो आहोत या थाटात कुठेतरी मोहिमेवर गेलेले असायचे तर त्याच सेट मधील दुस-या रंगाचा उंट कपाटातील कुठल्या कप्यात लपलाय हे कळायचे नाही मग ही ‘मिसिंग लिंक’ जोडण्यासाठी घरातील वस्तू पटावर यायच्या. मग पहिले ध्येय असायचे एखादे प्यादे मुद्दाम धारातीर्थी देऊन मग त्या वस्तूच्या ठिकाणी त्याला विराजमान करायचे
प्यादे सहज रिप्लेस व्हायचे पण उंट, घोडा, हत्ती रिप्लेस करे पर्यत गेम व्हायचा. त्या पटावरील त्या मिसिंग लिंक साठी ठेवलेली वस्तू घोडा, ऊंट हे समजवून घेण्यात इतर चालींकडे लक्ष लागायचे नाही
आजच्या पिढीला काय कळणार हा ‘स्ट्रगल’?
आमची पण बुध्दी ना! अधूनमधून आम्हाला अशा आठवणींच्या पटावर घेऊन जाते अर्थात निमित्य ठरले ते कालच जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य ठरलेली महाराष्ट्र कन्या‘दिव्या देशमुख‘ तिचे खूप खूप अभिनंदन – – –
अवांतर : तिच्या विजयी चित्रात ती काळ्या सोंगट्या घेऊन खेळत होती आणि काळेवाले, गो-यांपेक्षा ब-याचदा उजवे ठरतात या माझ्या मताचा आणखी एक विजय झाला आहे
जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत सिद्धांनी आणि साधकांनी देह रक्षणासाठी भोजनादी क्रिया केल्या पाहिजेत आणि सर्वकाळ योग्य आचरण ठेवून लौकिक कर्माचे पालन केले पाहिजे.
विवरण :
परमार्थ मार्ग आचरणात आणताना साधकाला त्याच्या देहाला सोबत घेऊन, त्याचा आश्रय घेऊनच पुढील वाटचाल करावी लागते. सर्व संत देहबुद्धि ती आत्मबुद्धि करावी असे सांगतात. पण दुर्दैवाने काही साधक त्याचा त्यांच्या सोयीनुसार अर्थ लावतात, आणि देहाला उगाचच कष्ट देतात, त्याची हेळसांड करताना आढळतात. मी देह नाही तर आत्मा आहे हे साधकाने कायम लक्षात ठेवावे आणि तसे आचरण करावे असे सर्व संत सांगतात. आपण एक उदा. पाहू. एका मनुष्याकडे एक वाहन आहे. त्याचा उपयोग करून तो मनुष्य त्याला आवश्यक असेल तिथे प्रवास करू शकतो. हा प्रवास करताना कोणी विचारले किंवा विचारले नाही तरी तो कधीही असे मानीत नाही की मी म्हणजे ते वाहन आहे. वाहन आणि तो स्वतः यातील भेद त्याच्या कायम लक्षात असतो, तो त्यानुरूप आचरण करीत असतो. इथे देह म्हणजे परमेश्वर प्राप्तीचे साधन आहे, ते एक वाहन आहे हे साधकाने नित्य लक्षात ठेवले पाहिजे.
८४ लक्ष योनी फिरल्यावर मनुष्य देह मिळतो असे आपले शास्त्र सांगते. अर्थात आत्मा अमर आहे, तो अनेक योनी फिरत फिरत पूर्व सुकृतानुसार मनुष्य योनी प्राप्त करतो अर्थात तो सतत देह बदलत असतो. थोडक्यात देह हे एक आत्म्याच्या प्रवासाचे माध्यम/वाहन आहे, असे साधकाच्या मनात ठसले तर मग त्याची पुढची प्रगती विनासायास होण्याची शक्यता वाढू लागते. मी देह नाही तर प्राप्त देहाचा उपयोग करून, त्याच्या सहयोगाने मी अनंताचा प्रवास करण्यास सुरुवात केली आहे असे मनात पक्के झाले की साधक देहरूपी वाहनाची काळजी घेण्यास उद्युक्त होतो. प्रवासाला निघण्यापूर्वी मनुष्य आपल्या वाहनातील तेलपाणी तपासतो, त्याची योग्य ती तपासणी करून घेतो, आवश्यक ती दुरुस्ती करून घेत असतो. इतकेच नव्हे तर प्रवासात देखील तो त्या वाहनांची उचित काळजी घेत असतो, नाही का? त्यानुरूप साधकाने देहाला भगवतांच्या प्राप्तीसाठी त्यानेच दिलेले वाहन/माध्यम मानावे आणि त्याची आवश्यक ती निगा राखावी. प्रवासाअंती गंतव्य स्थान दिसू लागले की वाहन सोडून जाण्याची तयारी ठेवावी. गंमत म्हणून विचार करून पहा की प्रवास करायला नवीन एसटी बस मिळाली म्हणून कोणी गंतव्य स्थान सोडून नुसतीच त्या बसमधून कोणी ये जा करीत नाही….!
एखादा मनुष्य परमार्थ मार्गात अग्रेसर होऊ लागला म्हणून त्याने थेट संन्यासी होऊन जावे, अशी अपेक्षा करणे पूर्णपणे चुकीचे ठरू शकते. त्यातील एकेक पायऱ्या चढत चढत पुढचा प्रवास करायचा असतो. देह आहे, देहबुद्धि आहे तोवर त्या देहाची निगा राखण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करणे क्रमप्राप्त आहेच आहे. जोपर्यंत साधकाचे प्रारब्ध शिल्लक आहे, तोपर्यंत देहधारण आहे, जोपर्यंत देहधारण आहे, तोपर्यंत देहशुद्धी, आहार, निद्रा, स्नान, वस्त्रधारण हे त्याला करावे लागणार. त्यासाठी त्याला घरदार, अन्नवस्त्र, धनधान्य इत्यादीची आवश्यकता राहणारच, म्हणजे माणसाला समाजात राहावे लागले की कांही प्राथमिक वस्तूची गरज ही राहणार. ती पूर्ण करण्यासाठी त्याला उद्योग, व्यवसाय काही तरी करावाच लागणार. अनेक भक्त हे असा आपला लौकिक व्यवहार सांभाळून भक्तीत रंगलेले होते असे दिसून येईल. श्री गोरोबा कुंभार, सावतामाळी, सेना न्हावी इत्यादी संतांनी अंतःकरणात अनन्य भक्तीचा उदय झाल्यानंतरही लौकिक व्यवहार सांभाळलेला दिसतो.
भक्ती करणे म्हणजे कामधंदा सोडून काही तरी लोकापेक्षा वेगळा, विचित्र किंवा विक्षिप्त आचार करणे नव्हे! संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
“मार्गाधारे वर्तावे । विश्व हे मोहरे लावावे ।अलौकिक नोहावे । लोकाप्रती ।”
भगवंत म्हणतात कि मी स्वतः पूर्णकाम असूनही प्राणीमात्र माझ्याकडे बघून चालतात म्हणून मी सकाम पुरुषाप्रमाणे कर्माचरण करतो. भगवंत अर्जुनास उपदेश करतात की लोकसंग्रह करण्याची इच्छा असलेल्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्म करावे, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगाला सरळ मार्गाला लावावे, लोकांमध्ये राहून लोकबाह्य वागू नये.
श्रीज्ञानेश्वर माउली हे स्वतः जीवनमुक्त ज्ञानी पुरुष असूनही त्यांनी ज्ञानेश्वरी लेखनाचा प्रपंच का मांडला याचे उत्तर त्यांच्या या वरील उपदेशात दिसते.
संत तुकाराम महाराज इथे थोडे अधिक रोकडे सांगतात. पुढील अभंगात ते म्हणतात
“नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ॥१॥ मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥२॥
साधकाने आपल्या देहाचा, आपल्या आयुष्यात येणाऱ्या, आलेल्या लोकांचा आणि जीवनात घडणाऱ्या घटनांचा, तसेच झालेल्या लाभ हानीचा उपयोग, विविध कौशल्ये वापरून आपल्या भगवंत प्राप्तीच्या ध्येयासाठी करून घ्यावा असे नारद महाराज सांगत असावेत.