मानवाच्या आयुष्यात ज्ञान आणि अनुभव हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.
‘केवळ पुस्तक वाचून, शिकून आपण ज्ञानी होऊ शकतो, पण त्या ज्ञानाचा खरा अर्थ कळण्यासाठी अनुभवाची गरज असते.’
– – या वाक्यातील गाभा हाच आहे की, शब्द समजणे आणि त्यांचा अर्थ जाणणे यात फरक असतो.
ज्ञानी व्यक्ती शब्दांचे अर्थ, त्यामागील विचार आणि सिद्धांत समजू शकते. ती अनेक गोष्टी वाचते, ऐकते आणि शिकते. परंतु, अनुभवाशिवाय हे ज्ञान काहीसे अपूर्ण राहते. कारण प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा आपण एखादी गोष्ट अनुभवतो, तेव्हाच त्या शब्दांना खरी खोली आणि अर्थ प्राप्त होतो.
– – उदाहरणार्थ;दुःख हा शब्द प्रत्येकाला माहित असतो. पण ज्याने खरोखर दुःख अनुभवले आहे, त्यालाच त्या शब्दाचा खरा अर्थ कळतो. तसेच आनंद, प्रेम, संघर्ष हे शब्दही अनुभवातूनच अधिक स्पष्ट होतात. त्यामुळे अनुभव हे ज्ञानाला पूर्णत्व देतात.
आजच्या काळात अनेक लोक माहितीच्या आधारे स्वतःला ज्ञानी समजतात. पण जीवनातील चढ-उतार, संकटे आणि संघर्ष यांचा अनुभव घेतल्याशिवाय त्या ज्ञानाला खरी किंमत मिळत नाही. अनुभव आपल्याला अधिक संयमी, समजूतदार आणि प्रगल्भ बनवतो. म्हणूनच, आयुष्यात केवळ ज्ञान मिळवण्यावर भर न देता अनुभव घेण्यालाही तितकेच महत्त्व द्यायला हवे. कारण ज्ञान आपल्याला मार्ग दाखवते, पण अनुभव आपल्याला चालायला शिकवतो. आणि या दोन्हींच्या संगमातूनच खरे शहाणपण निर्माण होते.
सोलापूरची खरी ओळख गिरणगाव म्हणून होती. आता एकही गिरणी शिल्लक नाही हा भाग वेगळा पण गावाची सुरुवातच मुळी गिरणीच्या वाजणाऱ्या भोंग्यान व्हायची. जुनी गिरणी, लक्ष्मी विष्णू, जाम मिल, फुटाणे गिरणी म्हणून पण एक होती. अशा गिरण्यांच्या भोंग्याच्या आवाजाने गावाला जाग येत असे. गिरणीत पाळी बदलली की भोंगा वाजायचा तोच अख्या गावाला घड्याळाच टाइमिंग दाखवायचा. पाचच्या भोंग्यावर पाणी यायचं माणसं उठायची… पाण्याचा आवाज… पाण्याच्या भांड्यांचा आवाज… मग कोणाची आदळ आपट… आणि सोलापुरातील खास विषय म्हणजे नळावरची भांडण…! सरकारी नळ असायचे. त्या नळावर अख्या गल्लीची गर्दी… वाड्यातनही अनेक बिर्हाडामध्ये एखादा नळ… तसं तर पाणी दोन वेळा यायचं… पण वाड्यात 100- 100 माणसं. वरच्या मजल्या वरील लोकांना जिन्यावरून पाण्याच्या घागरी नेऊन पाणी भरावे लागे मोटर वगैरे नव्हत्या.
लाईट जेमतेम संध्याकाळ झाल्यावर तेसुद्धा रात्री नऊ पर्यंत चालू असे. त्यानंतर सगळ्या वाड्याचा लाईट बंद.! अभ्यास करणारी पोरं मग कंदीलावर अभ्यास करत असत अरे आमका पोरगा कंदीलावर अभ्यास करून मोठा झाला… असं काही नाही सगळीच पोर कंदीलावर अभ्यास करत होती. मुन्सिपालटीच्या दिव्यावर म्हणावं तर त्याच्यात संध्याकाळी एक माणूस तेल घालून जायचा त्या तेलावर तो दिवा किती वेळ जळणार मग तेही दिवे मालवून जायचे. अशी ही दिव्याची दिव्य कथा! त्यामुळे सकाळी नळावर भांडण नाही झाल असा दिवस नव्हता अर्थात ती भांडण तात्कालीक असायची. त्याचवेळी संडासला रांगा लागलेल्या. तीन-चार बिराडात एक बाथरूम कॉमन… सगळ्यांची आंघोळीची घाई… भांड्याचा खणखणाट संपेपर्यंत… धुण्याचा धपधपात चालू व्हायचा…
त्यानंतर बटर विकणारी माणसं ओरडत यायची सकाळची ही चहा बटरची सोय झाली की मग एखादा उसsssळ असे ओरडत यायचा. आम्ही मुस्लिम गल्लीत राहत असल्यामुळे म्हणजे काळी मशीद भागात… सहा वाजताच गल्लीत असलेले थोबडे आणि अण्णाप्पा व्हट्टेते चे दुकान उघडून ती मंडळी तयार असायची. थोबड्यांचे दुकान आमच्या वाड्याच्या खालीच असल्यामुळे दुकानाचा एक दरवाजा वाड्याच्या बाहेर आणि दुसरा दरवाजा वाड्यात असा उघडत असे. त्याच्या शेजारीच त्यांच्या दोन खोल्या कधी कधी थोबडे मामाला मदत करायला आम्ही वाड्यातली पोरं जात असू कारण सकाळी गडबड असायची ना सकाळच गिऱ्हाईक आणि वस्तू ठरलेल्या… “मामा दोन बाई छाप दो(म्हणजे चहा पुड्या), एकाने की मसूर डाळ, एक आने का तेल, दो पैसे के फल्या म्हणजे भाजक्या शेंगा, दो पैसे की शक्कर, दो पैसे की मसाला पुडी और चार आणे का जवारी का पीठ”… सगळी यादी थोबडे मामांना तोंडपाठ असायची त्यांचे हात वेगाने काम करायचे मदतीला आम्ही असायचोच एवढ्या कमी पैशात त्या गरीब माणसाची सकाळ भागत होती… हे मला आता विचार करताना लक्षात येतं.!
ही लगबग संपेपर्यंत वाडा थोडा शांत झालेला असायचा एखाद्या घरचा सकाळी सहा वाजता बॅटरीवर लावलेला सकाळचा रेडिओ त्याच्यामुळे अख्ख्या वाड्याची सुरुवात बिस्मिल्ला खानच्या शहानाईने व्हायची… सुधा नरवणे बातम्या देत आहेत… या आवाजाने घरातल्या आया पोरा सोरांना उठायच्या, “उठा रे सुधाताई आल्या सात वाजले” अर्थात आळशी राहिलेल गदळ त्यावेळेला उठायच. चहाचे सुगंध आणि कपबशाच्या मधुर आवाजांचा किणकिणाटात उषःकाल संपलेला असायचा आणि घराघरातून स्टोव्हचे शेगड्यांचे आवाज यायचे. खमंग फोडण्याचे वास तुरीची डाळ आणि भात शिजल्याचा वेगळाच वास ती भाताची रटरट. तो फोडणीचा तडतडाट आणि खमंग वास… आसमंतात भरून राहायचा.. आणि गंध आणि नाद यांच्या आवाजाची जुगलबंदी कानाला सुख द्यायची. पाठोपाठ धपाधपा भाकरी बडवल्याचा आवाज..
कुठेतरी पोरांच पाठांतर. कविता वाचन कुठेतरी पूजेच्या घंटा.. कुठेतरी आरती.. आणि पोरग अभ्यास करीत नाही ऐकत नाही रट्टे खाऊन ओरडण्याचे व्रात्य पोरांचे आवाज. वाड्याच्या प्रत्येक घरात वेगवेगळे काम चालू असायचे. मग शाळेला जायची गडबड पोर सर्व जेवण करून शाळेला निघाली कि अकरा वाजता सुधा जोशी.. कामगार सभेच्या कार्यक्रमाला हजर..! पोरं शाळेला पळाली कि आया जरा मुक्तपणे… दत्त दिगंबर दैवत माझे किंवा असावे घर ते आपले छान किंवा कौसल्याचा राम बाई अशा माणिक बाईंच्या आवाजात गुंगून जायच्या. भाजी फारशी दारावर येत नसे कारण आमच्या गल्लीतच भाजीचे छोटे मार्केट होतं कधीतरी एखादा शेतकरी बैलगाडीवर मेथीच्या पेंड्या घेऊन येत असे आणि दहा नव्या पैशाला एक पेंडी याप्रमाणे तो मेथी विकून गाडी रिकामी करूनच जायचा. त्याचा आवाजाच भारी… “महागाईत सस्ताईची कमाल 10 पैसे 10 पैसे “असे मोठ्या आवाजात ओरडून तो भाजी विकायचा. मध्येच दहीवाला दहीsss म्हणून ओरडून जायचाआणि सकाळचे आवाज संपायचे.
पुरुष मंडळी गिरणीमध्ये.. पोरं शाळेत.. मग बायका मंडळींचच राज्य… त्या बिचाऱ्या सगळ आवरून विश्रांती घेत तोवर सकाळच्या शाळेत गेलेली पोरं परत यायची त्यांची उस्तवारी करायची… थोड्या आडव्या पडल्या की त्यांचं दुपारी निवडण टिपण सुरू कारण त्या काळातल येणार धान्य निवडलेलं नसायचं… तांदळात गारेचे खडे असायचे… ज्वारी गव्हात खडे असायचे… मोहरी तर विचारूच नका.! आता कसं सगळं स्वच्छ निवडलेले मिळते, अगदी रेडी टू कुक! तेव्हा फक्त घरातली बाई रेडी टू कुक असायची.
दुपारचे आवाज वेगळेच असायचे दुपारी बर्फ गोळा.. बुड्डी का बाल… काळी मैना… ए कुल्फी एक डहाळे किंवा काय घोंगडीला रेवड भरायची कायssss असे आवाज करीत तांबड पागोटे आणि खांद्यावर घोंगड आणि हातात लोकरीची टकळी फिरवत रेवड वाला यायचा यायचा(रेवड म्हणजे घोंगड्याच्या टोकाच्या बाजूला घातलेली वीण त्यामुळे त्याचं धागे सुटू नयेत)… त्याबरोबर बोहारणीचा एक आवाज असायचा “काय हाय का जुने कापडं… ” असा टिपेला गेलेला आवाज असायचा मग बाया बापड्यांची तिच्याभोवती गर्दी एक तास मनोरंजन…! जुन्या कपड्यावर केलेल्या खरेदीचा आनंद! त्याच वेळेला खाली.. दिल्ली का लाल किल्ला देखो… आग्रे का ताजमहाल देखो.. असे टाळाचा नाद करीत सिनेमा दाखवणारा माणूस यायचा त्याच्या त्या तिपाईवर एक यंत्र असायचं.. वरच्या बाजूला एक बाहुली… त्याने दोर्या आवळल्या कि ती बाहुली नाचायची समोरच्या डब्याचे झाकण काढून पोरं सिनेमा बघायची… सिनेमा कसला एका पैशात चार-पाच चित्र दाखवायचा मजा होती…
पण चार वाजता गिरणीचा भोंगा व्हायचा कामाला गेलेली माणसं परत येईतो गाव हळूहळू थकत गेलेल असायचं! घरोघरी कंदीलाच्या काचा पुसून संध्याकाळची तयारी व्हायची तुळशी वृंदावनाजवळ दिवे लावायचे. काही घरात आरती व्हायची… काही घरात शुभंकरोती.. वाड्यात खेळणाऱ्या पोरांचे आवाज हळूहळू बंद व्हायचे! रस्त्यावरती मंद प्रकाश… प्रकाशाचा झगमगाट नसल्यामुळे सारा दिवस मिटत आल्यासारखा भासायचा. तोच एका लाकडी ट्रेमध्ये आलेपाक च्या वड्या आणि ढणढण जळणारा दिवा घेऊन ए आले पाक वाला आलेपा ssssकअसे ओरडत एक आलेपाक वाला यायचा आणि हलकेच तो त्या धुरात नाहीसा व्हायचा. तो शेवटचा विक्रेता. बुधवार असेल तर वाड्यातल्या एकमेव कुठल्यातरी रेडिओवर बिनाका गीतमाला ऐकायला मात्र चढाओढ असायची. कुठलं गाणं कुठल्या पायदान वर यायचे याची चर्चा असायची त्या एकमेव घराला.. ” काकू रेडिओचा आवाज थोडा मोठा ठेवा ना “… अशी प्रेमळ सूचनाही केली जायची. साडेआठ वाजताच मशिदीतली अजान व्हायची मग नमाज… नऊ पर्यंत सगळे खाऊन पिऊन अंथरुणावर जायचे नऊच्या दरम्यान सगळे दिवे मालवले जायचे कुठेतरी एखाद्या घरात चिमणी किंवा कंदील लागलेला असायचा कुठल्यातरी घरातून लहान लेकराला झोपवण्यासाठीचा अंगाईचा आवाज, जवळच्या मठातून टाळाचे, भजनाचे, आवाज यायचे.! रस्त्यावरची रहदारी केव्हाच बंद झालेली असायची. रिक्षा गावात नव्हत्या एखाद दुसरी मोटार,… चार दोन टांगे त्यांच्या घोड्याचा टापाचा आवाज… सायकलच्या घंटेची टिंग टिंग… या पलीकडे रस्त्यावर आवाज नव्हते! मग सारा शहर शांत व्हायचं आणि आनंदाने निद्रा देवीच्या आधीन व्हायचे… रात्री क्वचित रस्त्यावर एखाद्या दारुड्याची वेडी वाकडी चाल आणि बरळणं ऐकू यायचं एखाद्या घरात नवरा बायकोला बदडून काढायचा आणि तीही त्याला ठोकायची कारण तो त्यानंतर दारू पिऊन आलेला असायचा एवढे गोड आवाज संपले की दिवस संपला…!
– – – आवाज की दुनिया पूर्णपणे निद्रिस्त व्हायची गिरणगावची सारी दारिद्र्य दुःख दैना त्या परमेश्वराला हात जोडून सांगितली की तो दिवस संपवून जाई आणि सार शहर उद्याच्या आशेच्या किरणाची… पक्षांच्या चिवचिवाटाचीआणि पुनः त्याच आवाजाची वाट पाहत शांत झोपी जायचं आणि मधेच कधीतरी एखाद्या कुत्र्याच केकाटणे चालू राहायचं… रात्रीच्या त्या निरव शांततेचा शेवट रात्री बारा वाजता गस्त घालायला येणाऱ्या रामोशाच्या आवाजाने व्हायचा. तो ओरडायचा जागते रहो ssssजागते रहो ssssआणि गंमत म्हणजे त्या वेळेला सार शहर निद्रा देवीच्या आधीन गेलेल असायचं…!
कोणी ओळखीचे भेटल्यावर सहजच विचारल्या जाणारा पहिला प्रश्न. गप्पांच्या सुरवातीचा प्रश्न…
त्याला साजेशी उत्तर…
अगदी मस्त,
मजेत
I am fine. ,
I am doing good,
अशी, generally उत्तर आपल्याला ऐकायला मिळतात. चेहर्यावर हलकेसे स्मित पण दिसते. तरच तर उत्तर आणि चेहर्यावरचे भाव मॅच होतील. नाही का?
काल माझ्या मैत्रीणीच्या आईला आजींना केअर सेंटर मध्ये भेटायला गेले.
Wheel chair वर बसवून एका नर्सने त्यांना लिफ्टमधून खाली हाॅलमध्ये आणले होते. समोर वाहता रस्ता आहे, त्यामुळे संध्याकाळचा वेळेस पेशंटस येथे आणतात. दिवसभर खोलीत गेल्यामुळे त्यांनाही बाहेर चांगले वाटते.
इतर पेशेंट्ना भेटायला येणार्यांशी पण गप्पा होतात.
तेथेच आमच्या सोसायटीच्या Mrs Sharma retired english प्रोफेसर येथे admit आहेत हे मला माहित होत. त्या समोरच दिसल्या. मी विचारल,…
How are you Mam?
Oh! I am fine, doing good, All the doctors and nurses are taking very good care of us. May be in a month or two, I will be kack to my home.
मी त्यांच्या साठी आणलेली फळ त्यांना दिली आणि तेथेच बेंचवर बसून आजीं बरोबर गप्पा मारत होते.
आजींना विचारल? कशा आहात?
आजी हळुच हसल्या. म्हणाल्या…
अग! बघ सध्या हे अस आहे. परावलंबी जीवन जगण चालू आहे. कोणीतरी बसवणार, उठवणार, घेऊन येणार, घेऊन जाणार.
अग! पण यालाही नशीब लागत बर. आता या परिस्थितीत दुसरा उपाय नव्हताच. घरी एकटी राहणे शक्य नव्हतेच. बर आता अनघाचा (मुलीचा) विचार करणे पण आवश्यक आहे. बरेच उपाय/ पर्याय विचार करून, आमलात आणून झाले. मला फक्त माझाच विचार करून चालणार नव्हत. सारासार विचार करून हे option मला पटल. अग! आता केंव्हा आणि कधी डोॅक्टर ची गरज पडेल सांगता येत नाही. पाय अधु झाल्यापासून मला मदतीची गरज लागतेच. आयुष्यात परिस्थितीप्रमाणे नेहमीच तडजोड करत आलोय. नाही का? ही पण अशीच एक तडजोड आहे बघ.
अनघा चा विचार करण ही गरजेचेच आहे तिच्या जीवाची घालमेल कळते मला.
तिची मुल आता 10, वी 12 ला आहेत. तिची नोकरी, घर, मुल सर्वच बघायच. मीच हा option google वर search केला. आणि मी येथे रहायला आले.
आजी म्हणाल्या…
चल मी तुला माझी खोली दाखवते.
खोलीत एक writing table, एक लहान music system, पेन स्टंड, एक फोन holder, room freshner, coloured pencils, drawing book for seniors, family photo, देवाचा फोटो, मैत्रीणींचा गृप फोटो होता. काही पुस्तक ठेवली होती.
म्हणाल्या…
हा बघ माझा संसार. हा IPAD मी नवीन घेतला. सध्या मी on line गीता शिकतेय.
Thank God! पायात शक्ति राहीली नाही, पण डोक मात्र जागेवर आहे.
मला खूप कौतुक वाटल आजींच.
अग! शेजारच्या खोलीत माझ्याच वयाच्या सुमनताई आहेत. झोपूनच असतात. मी मधून मधून त्यांच्याजवळ जाऊन बसते. भजन म्हणते, एखादी गोष्ट वाचून दाखवते. माझा पण वेळ चांगला जातो.
बरोबर आहे…
खुश रहने के तरीके सोचने पडते है। तकलीफे तो खुदही हमें ढूंढ लेती हैं।
तितक्यात अनघा आलीच. आईला छान भेटली, तिच्या डोक्यावरून हात फिरवला. जेवली का? झोप लागली का? थोडी विचारपूस झाली. दोन पुस्तक दिली.
अनघा मला म्हणाली झाल्या का गप्पा तुमच्या? अग! आईचे drawing book बघीतलेस का तू? अग! आमची आई म्हणजे चित्रकारच आहे बघ. काय सुंदर कलर्स भरले बघ.
क्षणभर आई मुलीच्या नात्याची अदलाबदल झाली की काय? असच वाटल मला. अनघाने आईच्या डोक्याला तेल लावल. माॅलीश केली. वेणी घातली. तिच्यासाठी आणलेल्या वस्तू जागेवर ठेवल्या. शेजारच्या सुमन काकूंना भेटून आली.
आजी म्हणाल्या,… अग! आता मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, तिथे लक्ष दे. मी ठीक आहे. आणि फोनवर बोलू की..
थोड्या वेळाने आम्ही दोघी घरी यायला निघालो.
खाली Mrs Sharma ची मुलगी मिनी भेटली. Mrs Sharma तिला म्हणत होत्या, मला घरी घेऊन चल. मला नाही रहायच इथे. …
बर! ठीक आहे. डोॅक्टर ने परमिशन दिली की जाऊ आपण घरी. मिनी म्हणाली.
अक्षरशः Mrs Sharma रडतच होत्या.
आम्ही तीघी बरोबरच बाहेर पडलो.
मी मिनी, अनघाच्या चेहर्यावरचे भाव निरखत होते, त्यांच्या मनातील घालमेल समजायचा प्रयत्न करत होते. एक पाय इथे थांब म्हणत होता तर दुसरा पाय घरांकडे जाण्याची घाई करत होता. तिथे नवरा मुल वाट बघत होती.
Past, Present आणि Future चा ताळमेळ बसवायचा त्यांचा प्रयत्न म्हणजे तारेवरची कसरतच. दोघींच्या मनात वेगळच विचार असतील. नाही का?
मिनी म्हणाली… It is very difficult rather not possible to take care of her at home.
अनघा म्हणाली,…
Old age is difficult. It totally depends on how they react / respond to it.
खरय…
It is not bad things happen to good people, I think bad things hapen to everyone, It is the way they respond to situation / problem, make them good people.
आता घरी गेल्यावर दोघी दुसर बटन on करून दुसरी जबाबदारी पूर्ण करणार.
आज अनघा आणि मिनी आपापल्या आयांचे आणि मुलांचे पालक आहेत. दोन्ही जबाबदार्या जाणून आहेत. प्रत्त्येकाच्या प्रवासात मदत करतायेत.
राहून राहून दोन्हीं आजींची
How are you?
विचारल्यावर त्यांची उत्तरे मला आठवत होती.
आपली माणस दिसली की आवाज, मनातले भाव, उत्तर सगळच बदलत.
शारिरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती / attitude महत्वाचा. येथे बाई- माणूस, शिकलेली – अशिक्षित याच काहीही देणघेण नसत.
हे प्रत्येकाची सहनशक्ती, समज, acceptance to reality यावर अवलंबून असत.
खरय…
The hardest walk in life is to walk alone. once you accept and understand the reality, it becomes easier. It makes you strong.
☆ “पहाटेचे स्वप्न…” भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
(काही लोकांना होर्डिंग मधला हा बदल लक्षात आलेला दिसत नव्हता. पण काही ठिकाणी घोळके जमायला लागले होते. थोडं पुढे गेल्यावर एलबीएस रोड लागला. ठिकठिकाणी स्पीड लिमिट ३० किमी असे बोर्ड दिसत होते.)
इथून पुढे – – –
एका मोठया होर्डिंगवर काल बऱ्याच स्थानिक नेत्यांचे फोटो होते, आज त्याची बॅक ग्राउंड फिकट पिवळी झाली होती व त्यावर असा मजकूर होता —
रस्त्यावर सगळ्यांचे स्वागत. नियम पाळा आणि सुरक्षित घरी पोहोचा / ऑफिसला पोहोचा / कामाच्या ठिकाणी पोहोचा.
१) सिग्नल तोडला, तर सर्व अंगाला खाज सुटू शकते आणि गाडी चालवणे अशक्य होऊ शकते
२) वेग मर्यादा तोडली / वेडी वाकडी गाडी चालवली, तर डोळ्यासमोर अंधारी / चक्कर येऊ शकते. गाडी साईड ला उभी करा. १०-१५ मिनिटांनी अंधारी जाईल.
३) झेब्रा मार्किंग वर गाडी उभी केली, तर उलटी होऊ शकते आणि कपडे खराब होऊ शकतात
४) गाडी चालवतांना मोबाईल वर बोलला, तर एकसारख्या शिंका येऊ शकतात, किती वेळ, ते सांगता येत नाही
५) फुटपाथवर गाडी घातली, रस्त्यावर उलट्या दिशेनी गाडी घातली / नो एंट्री मध्ये गाडी घातली, तर गाडी बंद पडेल व १० मिनिटे तरी सुरु होणार नाही.
६) पादचारी मंडळींना पण काही बंधने पाळणे, आता बंधनकारक राहील. मनमानेल तसा वावर, आता रस्त्यांवर करता येणार नाही. सिग्नल बघून रस्ता ओलांडा / झेब्रा मार्किंग वरूनच रस्ता ओलांडा. जिथे फुटपाथ आहे, तिथे फुटपाथवरच चालायचे आहे.
असे न केल्यास पायात गोळे येऊ शकतात. किती वेळ पाय दुखेल हे सांगता येत नाही.
अशाच आशयाची होर्डिंग ठिकठिकाणी दिसत होती. सिग्नल नेहेमीप्रमाणे लाग – वीझ होत होते आणि वाहन चालक नेहेमीच्या मस्तीत गाड्या मारत होते. रस्ता क्रॉस करणारे मुठीत जीव घेऊन, इकडे – तिकडे जात येत होते. नेहेमीप्रमाणे सगळ्यांचीच रस्त्यावर मनमानी सुरु होती. चालणारी बरीच मंडळी नवीन होर्डिंग वाचण्यात मग्न होती, पण त्यांना काहीच उलगडा होत नव्हता, की, होर्डिंग कुणी बदलली आणि हा सगळा काय प्रकार आहे? बाजूच्या पानपट्टीजवळ उभे राहून लोक पेपर बघत होते. सगळ्याच पेपरमध्ये फ्रंट पेज वर होर्डिंग वरची माहिती छापून आली होती. पेपरमध्ये ही माहिती कोणी छापली, हे कोडे पेपरवाल्यांना पण पडले असणार! त्या दिवशी संध्याकाळी, मी मुद्दाम चौकात चक्कर मारली. सकाळ ची काही होर्डिंग काढून, पुन्हा तिथे नेहेमीची वाढदिवस / अभिनंदन अशी होर्डिंग आली होती. टीव्ही च्या बातम्यांमध्ये ह्या सगळ्या बातम्या येत होत्या, पण हे कसे घडले आणि या मागे कोण? हे सगळ्यांकरता कोडेच होते.
दुसऱ्या दिवशी आम्ही नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलो. करिष्मा वरून पुढे मेन रोड वर आलो. आणि चौकामध्ये डावीकडे फुटपाथवर उभे राहिलो. मी घड्याळात पाहीले. ८ ला १० मिनिटे कमी होती. मी मनामध्ये १० मिनिटांचा काउंट डाऊन सुरु केला. वाहतुकीची मनमानी नेहेमीप्रमाणे सुरु होती. आश्चर्य म्हणजे काल दुपारी बदललेली होर्डिंग पुन्हा वाहतुकीचे नियम दाखवत होती. सगळ्या पेपरच्या फ्रंट पेजवर कालच्याप्रमाणेच पुन्हा वाहतूकनियम आले होते.
घड्याळात ८ वाजले आणि सिग्नल तोडून जाणाऱ्या, तीन टू व्हीलर आणि एक कार थोड्या पुढे येऊन थांबल्या होत्या. चालवणारे खाली उतरून अंग खाजवत होते. अजून गर्दी तशी तुरळकच होती आणि हळू हळू वाढत होती. झेब्रा मार्किंग वर थांबलेल्या कार ड्रायव्हर ला उलटी झाली. काच खाली करेपर्यंत उलटी कपड्यांवर झाली असावी. नवरा बायको बसलेली स्कुटी झेब्रा मार्किंग वर थांबली आणि चालवणाऱ्या बायकोला उलटी झाली. नवरा खुश झाला आणि त्यानी बायकोचे अभिनंदन केले.
गाडीवर मोबाईलवर बोलणाऱ्यांना शिंका सुरु झाल्या. दोघींचे मोबाईल खाली पडले. रस्त्यावर थोडी गर्दी वाढली, म्हणून एकानी आपली बाईक आम्ही उभे होतो तिथे फुटपाथवर घातली. आणि लगेचच तो थांबला. तेवढ्यात बाजूचा पानपट्टीवाला त्याला म्हणाला, “दादा, फुटपाथवर बाईक चालवू नका, गाडी बंद पडेल ”. बाइकवाल्यानी त्याला मुर्खात काढले आणि बाईकला किक मारली. किक वर किक मारतोय, पानपट्टीवाल्यावर चिडून किका मारल्या, पण गाडी सुरु कुठे होतेय! आता तो घाबरला आणि मुकाट फुटपाथवरून खाली उतरला. मी त्यांना म्हटलं – दादा, १० मिनिटे शांत बसा, पाय दुखले असतील. १० मिनिटांनी गाडी सुरु होते असं पेपरला आलयं.
आम्ही गणपती मंदिराकडे चालायला लागलो. बरेच पायी चालणारे फुटपाथवर बसलेले दिसत होते. मी एका आजोबांना विचारलं – आजोबा बरे वाटत नाही का? ते म्हणाले पायात गोळे आले आहेत. होर्डिंग्ज वर लिहिल्याप्रमाणे, आता चालणाऱ्यांनी पण चालायचे नियम पाळायला पाहिजेत. स्पीडनी गाड्या मारणारे साईडला थांबले होते. सिग्नल तोडून सुटणारे, बाजूला थांबून, पाठ – हात – पाय खाजवत होते. शिंकांनी घामाघूम झालेल्या एक मॅडम कार च्या बाहेर उभ्या राहून रिलॅक्स होत होत्या. शिंका थांबल्यावर, कार मध्ये बसतांना, त्यांनी मोबाईल मागच्या सीट वर फेकला आणि कार सुरु करून पुढे गेल्या. रस्त्यावर दोन प्रकारचे लोक दिसत होते. “ ह्या, असे कुठे नियम असतात का? ” म्हणणारे आणि नंतर शिंका -उलटी यांना जवळ करणारे. आणि दुसरे म्हणजे, पुढच्याला ठेच, मागचा शहाणा, हे समजून शांत पणे नियम पाळणारे.
स्वीट मार्ट चौकातून आम्ही पुढे गेलो. पुढे डावीकडे एक मोठी सोसायटी आहे. तिथून बाहेर पडणारे सगळे रस्त्यावरून उलटे मागे चौकापर्यंत येतात. आणि मग वळून पुढे जातात. आम्ही तिथे पोहोचलो आणि आतून एक भली मोठी कार बाहेर आली आणि वळल्यावर लगीच थांबली. तिथला वॉचमन पेपर घेऊन आला आणि म्हणाला, ’साब, उलटे मत जावं, गाडी बंद पडेगी ’. आम्ही बाजूला उभे राहून बघत होतो. गाडी खरंच बंद पडली होती. गाडी मालकानी बराच वेळ चावी फिरवली, नंतर बॉनेट उघडले. मी त्यांना म्हटलं – काका, काहीही करू नका, १० मिनिटे थांबा, गाडी आपोआप सुरु होईल, तसं आजच्या पेपर मध्ये दिलेले आहे. १० मिनिटे त्यांच्याशी गप्पा झाल्या. गाडी सुरु झाली. आता हा उलटा शॉर्ट कट चालणार नाही, असे म्हणून, बाय करून, काका निघाले.
दिवसभर असेच सगळे सुरु असावे. टीव्ही वर बातम्यांमध्ये सगळ्या चॅनल वर आमचे शहर झळकत होते. तब्येत ठणठणीत असणारे पण अचानक चक्कर आलेले, शिंका वाले, अंगाला खाज सुटलेले, अंगावर उलटी झालेले, अचानक गाड्या बंद पडलेले, यांच्या मुलाखती, हेच चक्र सुरु होते.
** तिसरा दिवस : पेपरच्या बातम्या
शहरातला जीवघेणा ट्रॅफिक आता सुखकर झाला आहे. पादचारी खुशीत आहेत.
** चौथा दिवस
कार्पोरेशन नि युद्ध पातळीवर रस्त्यांवरचे सर्व स्पीड ब्रेकर आणि रम्बलर काढले. खड्डे बुजवणे जोरात सुरु झाले. सर्व लोक खुश. या सगळ्यांमागे कोण? हा तपास जोरात सुरु, पण काहीही प्रगती नाही. राजकीय पुढाऱ्यांचे मार्मिक उत्तर – अरे भाई, सब लोग खुश है ना! हम यही चाहते है. आप लोग आम खाते रहो, आप को पेड से क्या मतलब है!
** पाचवा दिवस
गिनीज बुक मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड ची दखल : “या शहरा मध्ये वाहतूक अपघात – शून्य”
हा अनुभव सांगण्याकरता मनवा आणि मेघना कधी भेटतात, याच्या ‘मी’ प्रतीक्षेत! भारद्वाज पक्षी आता गेटवर कधी बसतो आणि दिसतो, याच्या “मी” प्रतीक्षेत!! आणि, मी तयार केलेल्या यादीमधल्या, पुढच्या आयटम करता, देव कधी स्वप्नामध्ये येतात, याच्या “मी” प्रतीक्षेत!!!!
परलोक ही संकल्पना मानवी भीती, अनिश्चितता आणि नियंत्रणाच्या गरजेतून निर्माण झालेली आहे, असे अनेक इहलोकवादी तत्त्वज्ञ मानतात. जेव्हा माणसाला मृत्यूचे रहस्य समजत नाही, तेव्हा तो त्याला अर्थ देण्यासाठी “परलोक” ही कल्पना उभी करतो. वेदांत परंपरेत हा परलोक केवळ अस्तित्वाचा पुढचा टप्पा नसून, नैतिक नियंत्रणाचे साधनही बनतो. इहलोकात ज्या गोष्टींना “भोग”, “वासना” किंवा “मोह” म्हणून नाकारले जाते, त्याच गोष्टींना परलोकातील स्वर्गात अधिक शुद्ध, अधिक उंच रूपात मिळण्याची कल्पना मांडली जाते. त्यामुळे एक प्रकारचा विरोधाभास तयार होतो—इथे नाकारणे आणि तिथे अपेक्षा ठेवणे.
याच्या अगदी उलट भूमिका चार्वाक (लोकायत) मांडतात. चार्वाकांचा मूलभूत आग्रह असा आहे की, प्रत्यक्ष अनुभव हाच ज्ञानाचा एकमेव विश्वसनीय स्रोत आहे. जे दिसत नाही, जे अनुभवता येत नाही, त्यावर विश्वास ठेवणे ही भ्रमनिर्मिती आहे. म्हणूनच ते परलोक, आत्मा, पुनर्जन्म यांसारख्या संकल्पना नाकारतात. “यावत् जीवेत् सुखं जीवेत्” ही त्यांची प्रसिद्ध भूमिका केवळ भोगवाद म्हणून पाहणे ही मोठी चूक ठरते; कारण येथे “सुख” म्हणजे बेफाम उपभोग नव्हे, तर या एकमेव आयुष्याचे महत्त्व ओळखून त्याचा अर्थपूर्ण उपयोग करणे असा व्यापक अर्थ घ्यायला हवा.
एवंच चार्वाक तत्त्वज्ञानात सकारात्मकतेचे अनेक पैलू दिसतात. पहिले म्हणजे, चार्वाक विचार माणसाला वास्तवात ठेवतो. तो काल्पनिक भीती (नरक) आणि काल्पनिक लालसा (स्वर्ग) यांपासून मुक्त करतो. दुसरे म्हणजे, तो जबाबदारी वाढवतो. जर परलोक नाही, तर या जगातच न्याय, आनंद आणि अर्थ निर्माण करण्याची जबाबदारी पूर्णपणे माणसावर येते. ही भूमिका पलायनवादी नसून अत्यंत सक्रिय आणि जबाबदार आहे. तथापि, चार्वाक विचारावर एक टीकाही कायम केली जाते, ती म्हणजे तो नैतिकतेचा पाया कमकुवत करतो. कारण जर “परलोकातील शिक्षा” नाही, तर माणूस अनैतिक वर्तनाकडे झुकू शकतो. पण हा आक्षेप पूर्णपणे पटणारा नाही. कारण नैतिकता ही केवळ भीतीवर टिकत नाही; ती सामाजिक सहजीवन, सहानुभूती आणि परस्पर अवलंबित्वावर उभी असते. चार्वाक तत्त्वज्ञान हेच सूचित करते की, नैतिकता ही मानवी करारातून आणि व्यवहारातून निर्माण होते, बाह्य दैवी नियंत्रणातून नव्हे. म्हणूनच, चार्वाक तत्त्वज्ञानाला “सकारात्मक” म्हणतात. कारण ते माणसाला भ्रमातून बाहेर काढून वास्तवात जगायला शिकवते. ते जीवनाला नाकारत नाही, तर उलट त्याला मध्यवर्ती ठेवते. परलोकाच्या आशेवर जगण्याऐवजी इहलोकातील न्याय, आनंद आणि मानवी मूल्यांना प्राधान्य देण्याची प्रेरणा देते. या अर्थाने ते बौद्धिक प्रामाणिकपणाचे आणि जीवनाभिमुखतेचे तत्त्वज्ञान आहे.
हे तत्त्वज्ञान मान्य करणे म्हणजे फक्त एक विचार स्वीकारणे नाही, तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलणे आहे. भीतीवर आधारित नव्हे, तर अनुभव आणि जबाबदारीवर आधारित जीवन जगणे होय. त्यामुळे हा निर्णय वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही पातळ्यांवर खोल परिणाम करणारा ठरतो. म्हणून साथींनो, चार्वाकवादी होणे म्हणजे आधुनिक काळात वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगणे होय. अदृश्य आणि काल्पनिक देवाच्या भीतीपोटी नैतिकतेने जगणे योग्य की स्वतःच्या जबाबदारीवर निर्भयतेने जगणे योग्य? यापैकी तुम्ही कशाची निवड कराल?
” Exclusive category च्या मुलांसमोर असलेले challenges. “
काल ताईचा फोन आला. म्हणाली, अग! आमंत्रण द्यायला फोन केलाय. उद्या अजयच्या नवीन घराची वास्तुशांत आहे. तेंव्हा तुम्ही सर्व सादर आमंत्रित आहात. जरा लवकरच ये ग.
मी म्हंटले अरे व्वा!! अभिनंदन!! खूप आनंदाची गोष्ट. आम्ही नक्की येणार. कुठे घेतलंय ग नवीन घर???
ताई म्हणाली अग! ‘प्रभात रोड’ वर. पेंट हाऊस घेतलय. चांगल मोठं घर, चार बेडरुम चे आहे
मी म्हटलं अरे व्वा!!! मस्तच.
माझ्या डोळ्यासमोर ताईची आधी ची दोन मुंबईची घर, एकानंतर एक आली. तसेच अनिता, ताईची एकुलती एक सून व तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी. त्यांची पण दोन घर नागपुरात आहेत म्हणे. आणि आता हे पाचवे घर पुण्यात, तेही ‘प्रभात रोड’ वर. व्वा मस्तच!! .
अजय, ताईचा एकुलता एक मुलगा. अजय आणि अनिताची पण एकच मुलगी ‘अनघा ‘.
म्हणजे जेवढी माणसे घरात, तेवढीच घर. ‘Per head one house’. असा तो हिशोब आहे.
मी स्वतः शीच हसले. हे म्हणाले, अगं! काय म्हणाल्या ताई??
मी म्हंटले, अहो, वास्तुशांती चे आमंत्रण आले आहे. अजयने नवीन घर घेतलय. आमच्या चेहऱ्यावर आनंद, व कौतुक तर होतेच, बरोबर मनात अनेक प्रश्न एकानंतर एक आले.
मी स्वतः शीच बोलले, आपल्या वेळेस लग्नात आम्ही पांच साड्या देऊ. अशा गोष्टी होत असत. आता अनघाच्या लग्नात आम्ही पांच घर देऊ अशा गोष्टी होतील का?? गोष्टी जरी नाही झाल्या, तरी हिशोब करताना हा विचार मनात येणारच. आणि मुलगा पण असाच मिळाला, ‘एकुलता एक ‘व त्यांच्या घरी पण असंच ‘status’ असलं तर ‘अनघा व Mr X ‘ यांची एकुण दहा घर असतील. आणि याच status चा मुलगा मिळायची शक्यता जास्त आहेच.
खरं तर हे मुलांचे भाग्य आहे. त्यांच्या आजी आजोबांचे कष्ट. नंतर त्यांच्या आई-वडीलांचे कष्ट. उच्च शिक्षित आई-वडीलांनी आपल्या मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे साम्राज्य उभं केले आहे. त्यांनी हे सर्व कमवले आहे. व मुलांना नशीबाने मिळाले आहे.
अनघाच्या पिढी ला सर्व ऐश्वर्य सहज मिळाले आहे.
आपल्या पिढी ने काटकसर करून एकेक गोष्ट/ वस्तू जमविली. पगार कमी असायचे. घरात मुलांची संख्या जास्त असायची. त्यामुळे काहीही घ्यायचे म्हणजे आधी’ planning ‘करावे लागायचे. आता हे घ्यायचे. पूढच्या वेळेस पैसे जमले की, मग आपण डायनिंग टेबल घेऊ या. हळूहळू एकेक सामानाची आवश्यकतेनुसार लिस्ट बनत गेली. व वस्तू घरात येत गेल्या. प्रत्त्येक वेळी किती आनंद होत होता. जेंव्हा आपण फ्रिज घेतला, तेंव्हा तर आनंदाला पारावार नव्हता. सर्वांना सांगुन झाले. आईला पत्रात सविस्तर कळविले. त्या दिवशी आपली आता श्रीमंत लोकांत गणना होणार का?? असा पुसटसा विचार मनात येऊन गेला. त्यांनंतर स्कूटर, वाशिंग मशीन, microwave व इतर अनेक गोष्टी घरात येत गेल्या व हळूहळू आम्ही श्रीमंत होत गेलो. प्रत्त्येक येणाऱ्या वस्तू ने आम्हाला खूप आनंद दिला. एवढे पैसे आपण खर्च करू शकलो याचा अभिमान वाटत असे. हळूहळू आयुष्याचा ग्राफ वर जात होता. व त्याबरोबरच समाधान, आनंद होत होता. आयुष्यातील या घटना मनावर कोरल्या गेल्या आहेत. आजही कितीदा तरी आम्ही घरचे सर्व एकत्र बसलो, तर या सर्व गोष्टींची चर्चा होते. व तेवढाच आनंद आजही होतो.
एवढे सर्व विचार मनात आले. केसेट rewind झाली. घर घेणे म्हणजे तर कितीदा तरी पैशाचा हिशोब झाला. हप्ता कसा भरायचा??? यावर चर्चा झाली. आता नको, पूढच्या वर्षी बघूया. असं करत करत शेवटी हिम्मत करून एक फ्लॅट घेतला.
या सर्व विचारांचा अजयच्या नवीन घरातल्या वास्तुशांती च्या कार्यक्रमाशी काय बरं संबंध????
मनात सहज आलं, अनघाला या लहान सहान (?? ) गोष्टींचा आनंद मिळणार नाही. कारण तिच्या समोर परिस्थिती वेगळी असेल. त्यांचे विश्व वेगळेच असेल. सर्व महागाच्या वस्तू ज्या बहुतेक आम्हाला माहीत ही नाहीत त्या सर्व तिच्या घरी सहजच असणार आहैत.. कदाचित त्यांच्या लिस्टमध्ये world tour करणे, five/seven star हॉटेल मधे सहज जाणे, विमानाने प्रवास करणे, BMW घेणे, I phone, प्रत्येकाची वेगळी कार, भरपूर नोकर चाकर, अशा अनेक गोष्टी त्यांच्या जीवनात सहज असतील.
पैशाचा हिशोब करावा लागणार नाही. मनात आलं आणि घेतलं. असं असेल.
पीढी दर पीढी असे बदल दिसणारच आहेत. याचे फायदे व नुकसान दोन्ही आहेत. मुलांना नशीबाने सर्व मिळत आहे. भाग्यवान आहेत. कष्टाने कमविलेल्या पैशाची किंमत असते. सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत करणे जमले पाहिजे. ऐश्वर्य टिकवता आले पाहिजे. त्यात भर घालता आली पाहिजे.
या ‘exclusive category ‘च्या आई-वडीलांसमोर ‘challenges ‘वेगळेच असतात. समोर पंचपकवानांनी भरलेलं ताट असताना मुलांना शिस्त लावायची आहे. स्वतः शिस्तीत राहुन ते शिकवायचे आहे. .
खूपदा मनात आले, खरच गरज असते का एवढ्या गोष्टीं जमविण्याची?? पण मग कमविलेल्या पैशांचे काय करायचे.???? ही अशी क्षमता प्रत्येकात असतेच असे नाही. ज्यांच्यात असते, त्यांचे ‘status’ असेच वाढत जाते. आणि त्यात चूक असे काही नाहीच.
शिक्षणाच्या जोरावर मिळविलेले साम्राज्य आहे हे. आणि शिक्षणाचा पर्याय सर्वांनाच असतो. संधी प्रत्येकाला मिळतेच. अशा गोष्टी मिळावायला भाग्य लागतच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे, म्हणजे वेळेवर कष्ट व वेळेवर बरोबर निर्णय घेता आले पाहिजे. पैशाचे ‘Investment’ बरोबर जागी करता आले पाहिजे. सवयी चांगल्या असल्या पाहिजेत.
” संघर्ष करता आला पाहिजे “.
म्हणतात ना
“संघर्ष प्रकृती का ‘आमंत्रण ‘ है ।
जो स्विकार करता है, वही आगे बढ़ता है।”
पैसे कमविणे जेवढे कठीण आहे. तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त कठीण ते टिकविणे आहे. नाही तर पैसा संपायला किती वेळ लागतो???
या पैसाचा माज डोक्यात जाता कामा नये. नाही तर राजाचा रंक व्हायला ही वेळ लागत नाही.
एक वाचलेले छान वाक्य सहज आठवलं,
“Kite gives us very good message
Fly high but always stay connected to the ground. “
☆ “पहाटेचे स्वप्न…” भाग – १ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
आज रोजच्या प्रमाणेच सकाळी फिरायला बाहेर पडलो. बायको मुलीकडून दुपारी येणार होती, त्यामुळे बाहेरचं चहा, असा प्लॅन ठरला. फिरतांना फक्त समोर बघून चालायची रोजचीच सवय लागल्यामुळे, आज फिरतांना, जरी बायको बरोबर नव्हती, तरी मान इकडे- तिकडे फिरायला तयार नव्हती. मारुती मंदिराजवळ पोहोचलो आणि मंजूळ स्वरातली हाक ऐकू आली – काका, या चहा प्यायला, कुठे होता! आज बऱ्याच गॅप नंतर भेटताय, आमच्या मॉर्निंग वॉक मैत्रिणी मनवा – मेघना बोलवत होत्या. बाजूच्या दुकानातून लगेच चहाचे ग्लास हातात आले. गप्पा सुरु झाल्या. तेवढ्यात मनवा म्हणाली – काका, समोर भारद्वाज पक्षी बघा. आज नक्कीच काहीतरी चांगले घडणार.
मी : माझा पण हाच अनुभव आहे. आमच्या बागेत, सकाळी रोजच भारद्वाज दिसतो आणि रोजचाच दिवस छान जातो. आज तुम्ही पण भेटल्या मुळे, आज काहीतरी एक्सट्रा चांगले असणार!
मेघना : काका कंपाऊंड च्या गेटवर बसलेला भारद्वाज बघितला, तर स्वप्नामध्ये देव येतो असे म्हणतात. कधी दिसला, तर तुमचा अनुभव सांगा, आणि त्यावर लिहा.
मस्त आणि भरपूर गप्पा – टप्पा झाल्या आणि बाय करून आम्ही आपापल्या दिशेला निघालो.
आज मनवा आणि मेघना भेटल्यामुळे दिवस छान जाणारच होता, त्यामुळे भारद्वाज पक्षानी आज सुटी घेतली, तरी चालण्यासारखे होते. रोज फिरून आल्यानंतर, माझी बागेत चक्कर असते आणि तेव्हाच, चिक्कूच्या झाडावर किंवा जमिनीवर चालतांना मला भारद्वाज दिसतोच. मी लगीच बायकोला हाक मारून, पक्षी बघायला सांगतो. तिचा दिवस चांगला गेला, तरच माझा जाणार, हे पक्के असते.
आज खरोखरच भारद्वाज पक्षानी सुटी घेतली होती. उद्या सकाळी भारद्वाज नक्की गेट वर बसलेला दिसणार, हा विचार दिवसभर डोक्यात घोळत होता.
नेहेमीप्रमाणे, दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी फिरायला बाहेर पडलो. फिरून परत आलो, आणि गेटवर चक्क भारद्वाज! मी लगेच हात जोडून नमस्कार केला व त्याला थँक्स म्हणालो. बघता बघता पक्षी उडून गेला. म्हणजे आज रात्री स्वप्नात देव येणार हे नक्की.
स्वप्न पडणं, हे एक कोडंच आहे. ठरवून ती कधी पडत नाहीत आणि न ठरवून ती थांबत पण नाहीत. स्वप्न सुंदर असेल, का भयदायक असेल, का असंबध्द असेल, हे पण आपल्या हातात नसतं. काहीही असो, पण आज रात्री स्वप्नात देव येणार, हा विचार दिवसभर मनात डोकावत होता. नेहेमीप्रमाणे रात्री ११ ची गाणी ऐकता ऐकता, केंव्हा झोप लागली, ते समजलेच नाही.
कुणीतरी मला झोपेतून उठवत होतं, असं मला जाणवलं. कुणीतरी प्रेमानी हाक मारतंय, असं वाटलं आणि मी उठलो. बघतो तर समोर साक्षात परमेश्वर. मी लगेच उठून देवाला नमस्कार केला.
मी : देवा, तुम्ही मला सगळ्याच आवश्यक गोष्टी भरभरून दिल्याबद्दल, मी तुमचे खूप खूप आभार मानतो. तुमची कृपा सगळ्यांवर कायम असू द्या.
देव : मी समोर न दिसता सुद्धा, लोक माझ्या मूर्तीसमोर उभे राहून, मागण्यांची यादी वाचत असतात. आणि मी तुझ्या समोर असूनही, तू काहीच मागत नाहीस! चल माग, काय काय पाहिजे?
मी : मला खरोखरच काहीही नको. ज्यांना खरी गरज आहे, त्यांनाच माझ्याऐवजी द्या!
देव : अरे तुझ्या मित्रांकडे, नातेवाईकांकडे दोन दोन – तीन तीन फ्लॅट्स आहेत, परदेशी गाड्या आहेत. तू अजूनही वडिलांनी ४० वर्षांपूर्वी बांधलेल्या घरात राहतोस, भारतीय छोटी कार वापरतो. माग, तुला मागायला खूप स्कोप आहे.
मी : मला खरंच काहीही नको, सगळं मस्त चाललंय.
देव : तुझ्या मनात काहीतरी मागायचे आहे, हे नक्की. पण, मागू का नको असं तुला होतंय!
मी : देवा, तुमच्यापासून काहीच लपू शकत नाही, हेच खरं. खरंच मागू का?
मी : रोज दिवसभरात, खूप मनाला खटकणाऱ्या गोष्टी घडत असतात. त्या सुरळीत करता आल्या, तर सगळ्यांचेच जीवन आनंदाचे होऊ शकेल. रस्त्यावरची जीवघेणी वाहतूक, भ्रष्टाचाराच्या घटना, अन्नपदार्थ – औषधे यामध्ये भेसळ, पैशांकरता आणि फॅशन च्या नावाखाली नट – नट्यांनी आणि सगळ्यांनीच सुरु केलेले अंग प्रदर्शन आणि त्याचे दुष्परीणाम, स्त्रियांवर वाढणारे अत्याचार, टीव्ही / मोबाईलचा अतिरेक आणि मुलांवर त्याचे दुष्परिणाम, अशी बरीच मोठी यादी आहे.
देव : तुझे म्हणणे अगदी रास्त आहे. मी मनुष्याला बुद्धी दिली आहे. काय चांगले – काय वाईट हे त्याला समजते. तुम्ही लोक बुद्धी गहाण ठेवता. मी आणि माझे, यातंच तुमचं आयुष्य खर्ची पडतं, मी यात काय हस्तक्षेप करणार! आणि हे कलियुग सुरु आहे, यामध्ये, या अशा गोष्टी घडणारच. माझा पुढचा आणि शेवटचा ‘कल्कि’ हा अवतार आहे, त्याचाच हा पूर्व रंग आहे, असे पण सांगता येईल.
मी : सगळे लोक नेमून दिलेले कायदे कानून पाळतील, एवढा जरी धाक तुम्ही निर्माण केला, तर सगळेच आनंदात राहू शकतील.
देव : ठीक आहे. आपण एक एक विषय घेऊ.
तुझ्या यादीतला पहिला विषय घेऊ – जीवघेणी वाहतूक. याकरता मी काय करायचे, ते तू मला सांगायचे. कुठलेही कायदे – कानून मोडता कामा नयेत, जे चांगल्या मार्गानी जात आहेत, त्यांना त्रास होता कामा नये. योजलेले उपाय, योग्य जागी चिमटा बसेल इतपतच कठोर असावेत.
‘जीवघेणी वाहतूक’ याकरता मी काय करावे, ते एका कागदावर लिही आणि कागद घडी करून झोपताना देवघरात ठेव. मला सगळे मुद्दे पटत असतील, तर सकाळी तुला कागद उघडलेला दिसेल व त्याच दिवशी, सकाळ पासून माझी कार्यवाहीची पूर्वतयारी तुला दिसेल. आणि नंतरच्या दिवशी, सकाळी ८ वाजता अंमलबजावणी सुरु होईल. फक्त एक महिना असे सुरु राहील.
जर लिहिलेले मुद्दे मला पटले नाहीत, तर कागद बाजूला केलेला दिसेल. तुला पुन्हा वेगळे लिहावे लागेल. गुड नाईट अँड गुड मॉर्निंग.
सकाळी नेहेमीप्रमाणे रात्रभर सुरु असलेल्या रेडिओ स्टेशन च्या मंजुळ स्वरांनी मला जागे केले. आज एकदमच फ्रेश वाटत होते. सकाळी बागेत भारद्वाज पक्षाचे दर्शन झाले. दिवस मस्त गेला.
देवाबरोबर बोलणे झाले त्याप्रमाणे जीवघेणी वाहतूक सुरळीत होईल याकरता देवाने काय काय करावे हे मुद्दे मी लिहून कागद तयार केला आणि झोपण्यापूर्वी तो कागद देवघरात ठेवला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली. देवघरात जाऊन बघितले, तर ‘अहो आश्चर्यम्’. कागद उघडलेला होता. म्हणजे देवाला मी लिहिलेले सगळे मुद्दे पटले आहेत. मी खूप खुश झालो.
सकाळचा चहा घेऊन आम्ही फिरायला बाहेर पडलो. सिटी मल्टिप्लेक्स वरुन, पुढे मेन रोडवर आलो. नेहेमी सगळ्याच रस्त्यांवर विविध पक्षांचे अभिनंदनपर होर्डिंग असतात / वाढदिवसाचे होर्डिंग असतात, जाहिरात करणारे होर्डिंग असतात. कार्पोरेशन अधून मधून होर्डिंग काढण्याची कारवाई करत असते. पण पुन्हा होर्डिंग आपापल्या जागेवर येतच असतात. आज सगळी होर्डिंग जागेवरच होती, पण त्यावरचा सगळा मजकूर रातोरात बदललेला होता. सगळ्यांवर वाहतुकीविषयी माहिती दिसत होती, वाहतुकीचे नियम दिसत होते. एका मोठ्या होर्डिंग वर मजकूर असा होता —
रस्त्यावर आलेल्या सगळ्यांचेच स्वागत. पादचारी आणि वाहनचालक या सगळ्यांचेच जीव मोलाचे आहेत. रस्त्यावर असेपर्यंत, तुमची सुरक्षा, ही जबाबदारी आमची आहे. वाहतुकीचे नियम हे सगळ्यांवरच १०० टक्के बंधनकारक राहतील. नियम अगदीच मोजके आणि सोपे आहेत. नियम लक्षात कसे ठेऊ, असे टेन्शन घेऊ नका. रस्त्यांवरची सगळी होर्डिंग यापुढे फक्त वाहतूक नियम दाखवतील. इतर जाहिराती करण्याकरता, इतर माध्यमे वापरली जातील.
वाहतूक नियम —
१) लाल – हिरवा दिवा ‘थांबा’ आणि ‘जा’ सांगतो. ते पाळा
२) दाखवलेली स्पीड लिमिट बंधनकारक आहे. लिमिट ३० असेल तर वेग +/- ५ एवढाच चालेल.
८) स्वतःच्या डोक्याची काळजी वाटत असेल तर हेल्मेट वापरा – सीट बेल्ट वापरा.
काही लोकांना होर्डिंग मधला हा बदल लक्षात आलेला दिसत नव्हता. पण काही ठिकाणी घोळके जमायला लागले होते. थोडं पुढे गेल्यावर एलबीएस रोड लागला. ठिकठिकाणी स्पीड लिमिट ३० किमी असे बोर्ड दिसत होते.
☆ ‘‘अवघा रंग एक झाला…’ लेखिका : उषा फेणाणी पाठक ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
गानसरस्वती किशोरीताई आमोणकर
” अवघा रंग एक झाला…! “
बाहेर माध्यान्हीचं रखरखीत ऊन… घरात प्रवेश केल्यावर मात्र शीतल चंद्रकिरणांचा शिडकावाच झाला जणू… ‘गानतपस्विनी’ मोगूबाईंच्या दर्शनानं!
… एक ‘सौम्य’ तरीही तितकंच करारी व्यक्तिमत्त्व! शुभ्र फुलांची ज्वाळाच जणू काही! त्यांना प्रणाम करून मी समोरच्या भिंतीवरचं त्यांचं तैलचित्र न्याहाळू लागले. तेवढ्यात, मागून किशोरीताई आल्या.
“ही माई! ” तैलचित्राकडे निर्देश करत त्या म्हणाल्या. मी मानेनेच होकार देत ताईंना अभिवादन केलं. “तू खूप चांगलं पोर्ट्रेट करतेस असं ऐकलंय”… ताईंच्या चेहर्यावर कौतुक होतं.
मग मिष्किलपणे हसत त्या म्हणाल्या, “तुला एक सांगू? मला वाटतं, मला चित्रात पकडणं मात्र तितकंसं सोपं नाही हं! आणि म्हटलं तर कठीणही नसावं कदाचित! कारण माझं पोर्ट्रेट करायचं, म्हणजे माझ्या आत जगणाऱ्या गाण्याला, त्यातल्या सुरांना चित्रात बंदिस्त करायला हवं! बाकी… नाकाच्या बाबतीत म्हणशील तर, आम्ही अगदी शिवाजी महाराजांच्या वंशातले बरं का…! ” असं म्हणत किशोरीताई खळखळून हसल्या.
… ‘पोर्ट्रेट’ रंगवायचं तर केवळ बाह्यरूपच नव्हे तर ‘अंतरंग’ चितारायला हवं, हे ताईंनी किती अचूक हेरलं होतं!
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये होणार्या त्यांच्या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांच्या घरी मुलाखतीसाठी आले होते. गप्पांच्या ओघात या विदुषीच्या प्रज्ञा कोषातली एक एक पाकळी हलकेच उमलत गेली, मला विस्मयचकित करीत! कृष्णमय मीरेविषयी बोलताना अचानक ताईंची स्वरसमाधी लागली. काय अलौकिक सूर तो! त्या दैवी सुरांचं सामर्थ्य, माझ्या समक्ष, आत्मा आणि देहाचं अद्वैत साधून एक तेजोशलाका उजळवून गेलं!
माझ्या अंतरंगाच्या तारा हळूवार छेडीत मग ताईंच्या सहवासात, पुढल्या तीन चार तास चाललेल्या सूर-संवादांच्या बंदिशरुपी मैफिलीत माझे किशोरीताईंशी जे सूर जुळले ते कायमचेच!
मुलाखत संपल्यावर मी घरी निघतेवेळी त्यांनी मला अगदी हक्काने बजावलं… “हे बघ, कार्यक्रमाच्या ठिकाणी तू मला तुझ्या गाडीतून घेऊन जायचंस आणि परत आणायचंस. तू माझ्यासोबत असायला हवीस. ” माझ्यासाठी खरंतर हा एक अतुल्य आनंदाचा योग होता. पण… विधिलिखित वेगळंच होतं.
कार्यक्रमाच्या केवळ काही दिवस आधी मला Renal colic चा जबरदस्त अटॅक आला. तीव्र वेदनेनं मी हैराण झाले. ताईंना तसं कळवलं. तशा त्या खूप अस्वस्थ झाल्या. हे समजताच मला राहवेना आणि माझ्या त्याही अवस्थेत मी ताईंना माझ्याबरोबर घेऊन जायचा निर्णय घेतला. सोबत ताई, त्यांचे तानपुरे आणि दोन शिष्य यांना दाटीवाटीने माझ्या गाडीत घेऊन मी कॉलेजच्या प्रांगणात पोहोचले.
ताई खूप खुशीत होत्या. त्यांनी मला आज्ञा केली… “माझ्या समोर बैस! ”
मैफिल ऐन रंगात आली होती… आणि अचानक मला पुन्हा वेदना जाणवू लागल्या. मैफिलीची सांगता होईस्तोवर तिथं थांबणं शक्य होईल, असं मला वाटेना. पुन्हा ताईंना सोबत घेऊन जायचीही जबाबदारी होती. ताईंचा हिरमोड होईल ही चिंता ग्रासून राहिली. मन दृढ करूनही माझा धीर खचत चालला.
अखेर डोळे मिटून ताई ध्यानमग्न गाताहेत, ही संधी साधून मी एकटीच कशीबशी घरी परतले. माझं मन खूप अपराधी झालं!
आश्चर्याची गोष्ट म्हणजे थोड्याच वेळानंतर, ताईंचा घरी फोन आला काळजीपोटी. त्यांच्या चाणाक्ष नजरेला मी समोर नसल्याचं लक्षात आलं होतं.
”तू आता ठीक आहेस ऐकून बरं वाटलं. का कुणास ठाऊक, पण मध्यंतरानंतर आज मैफिल काही मनासारखी जमली नाही, रंगली नाही. “.. ताईंचा सूर नाराजीचा होता.
मला गलबलून आलं.
माझी अपराधीपणाची भावना लक्षात येताच मला समजावत त्या म्हणाल्या,
“तू का उदास होतेस? यात तुझा काही दोष नाही! मला आत्मिक समाधान मिळालं नाही म्हणून, मीच मग आयोजकांना पुन्हा कार्यक्रम करीन, म्हणून आश्वासन दिलंय. तू का काळजी करतेस? आता लवकर बरी हो. ”
त्यांच्या स्वरात, प्रेम, जिव्हाळा होता. आईचं ममत्त्व होतं.
आता मात्र माझ्या डोळ्यांना धारा लागल्या.
‘का बरं एवढा जीव लावावा या असामान्य, अलौकिक कर्तृत्त्वाच्या कलावंताने, माझ्यासारख्या वयाने, मानाने छोट्या कलाकारावर? ‘ ही ऋणानुबंधाची किमया म्हणावी काय?
ताईंनी आयोजकांना दिलेला शब्द पाळला आणि काही दिवसातच एक अभूतपूर्व मैफिल रसिकांना अनुभवता आली. सर जे. जे. च्या वास्तूतलीही ती एक चिरस्मरणीय मैफिल ठरली!
याच दरम्यान चित्र प्रदर्शनासाठी मी लंडनला प्रयाण केलं. दोन वर्षांनी मुंबईत परतल्यावर ताईंना वचन दिल्याप्रमाणे, त्यांच्या आवडीचं अत्तर घेऊन मी त्यांच्या भेटीला गेले. ताई खूप आनंदल्या. माझ्या लंडन वास्तव्याचा वृत्तांत आणि सांगितिक, अशा खूप गप्पा रंगल्या आमच्या. ताई मला खूप excited वाटल्या. काही दिवसांनी मला अचानक त्यांचा फोन आला. म्हणाल्या, “भेटायला ये, आणि हो, पद्मजाला माझ्याकडे गाणं शिकायला पाठव. ” मी चमकलेच!
संगीत क्षेत्रातले दोन महान शिरोमणी! एकीकडे गानसरस्वती किशोरीताई तर दुसरीकडे संगीत मार्तंड (तेजोनिधी संगीतसूर्य) पंडित जसराजजी… दोघांनीही आपणहून पद्मजाला स्वतःच्या शिष्येचा मान द्यावा हे पद्मजाचं परमभाग्यच!
संगीतातल्या या दोन्ही अद्भुत किमयागारांच्या सुरमयी सहवासात संमोहित झालेले कितीतरी तृप्त क्षण माझ्या परदेशातल्या वास्तव्यात मला सदैव साथ करत राहिले.
कित्येकदा एखादी बंदिश ऐकताना किशोरीताईंच्या स्वरमंदिरातल्या मंजुळ घंटेच्या आवर्तनांचा नाद, मनाच्या गाभाऱ्यात हळूवार आंदोलत राही अन् त्याच्या घुमार्यातून त्यांचं एक वलयांकित सतेज रूप मन उजळवून जाई.
तसं पाहिलं तर किशोरीताईंच्या सहवासाचा योग हा केवळ काही काळापुरताच, पण आमच्यातल्या स्नेहबंधाला जणू ‘अवघा रंग एक झाला! ‘… हेच रूप आलं.
मध्यंतरी बराच काळ मी परदेशात असल्याने ताईंशी माझा संपर्क तुटला. मी पुन्हा भारतात आल्यावेळी त्यांना फोन केला. वाटलं, ताईंना जगभरात माझ्यासारखे त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे हजारो भक्त, चाहते, स्नेही असणार. मला कदाचित त्या आत्तापर्यंत विसरल्याही असतील! मी तसं त्याना विचारलंही!
तशा त्या हसत हसत म्हणाल्या, “विसरेन बरी मी तुला! तू प्रेमानं भेट दिलेलं अत्तर देतंय ना मला तुझी आठवण करून नेहमी! ”
मला ठाऊक होतं, अत्तर हे केवळ ‘निमित्त! ‘
किशोरीताई जेंव्हा एखाद्याला आपलं म्हणतात, तेव्हां त्या त्याच्यावर जिवापाड प्रेम करतात. मी खरंच त्या भाग्यवंतांपैकीच एक!
‘त्या’ अत्तराच्या कुपीतलं अत्तर उडून भलेही ती कुपी कधीचीच रिती झाली असेल… पण किशोरीताईंसोबतचं माझं ‘सखीपण’ प्रेमभरे मिरवताना, आजही त्या आठवणींचा मदमत्त गंध, माझं चित्त ‘हर्षधुंद’ करत राहतो!
लेखिका : उषा फेणाणी पाठक
प्रस्तुती : पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मोक्ष… भाग – २ – लेखिका : भारती ठाकूर ☆ प्रस्तुती – शशी नाईक-नाडकर्णी ☆
(खूप विचार केल्यानंतर एक युक्ती मला सुचली. कै. परांजपे यांच्या मुलाला मी इथे काय चर्चा चालू आहे लोकांमध्ये ते फोनवर सांगितलं. त्याला मी सांगितलं, की ‘ वडलांच्या चितेला अग्नी देणे हे मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे. आमचे सगळेच नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी इथे पोहोचू शकणार नाहीत. माझी आई सुद्धा येऊ शकत नाहीये. अशावेळी किमान मला अस्थिकलश घेऊन जाता यावा म्हणून तरी पार्थिव शरीराचे दहन होणे आवश्यक आहे. ’– असे तू त्या स्वामीजींना सांग. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वादात मी जिंकले. गावकरी आणि ते स्वामीजी नर्मदा किनाऱ्यावर कै. परांजपे यांचा अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले.) — इथून पुढे – –
संध्याकाळी अंधार पडू लागला तसे अंत्यक्रियेसाठी लोक जमू लागले. कोणी फुलं हार तर कुणी उदबत्ती असं घेऊन आले. विशेष म्हणजे थोड्याच वेळात बँड पार्टी सुद्धा पोचली. परिक्रमावासीचा नर्मदा किनारी मृत्यू होणे हे भाग्याचं लक्षण आहे. तो दुःखाचा नाही तर आनंदाचा क्षण आहे म्हणून हा बँड बाजा.. खूपच गहिवरून आलं होतं मला. रात्री साडेनऊच्या सुमारास परांजपे यांचा मुलगा, मुलगी आणि जावई तसेच श्री. वाळुंजकर तिथे पोहोचले. कुणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. निशब्दपणे एकमेकांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचत होत्या. वाजत गाजत अंत्ययात्रा नर्मदा किनाऱ्यावर गेली. कार्तिकी पौर्णिमेचा चंद्र अगदी माथ्यावर आलेला होता.
त्यांच्या मुलीला – पूजाला सोबत म्हणून मी आश्रमातच थांबले. भांबावली होती बिचारी. थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं ही सगळी मंडळी अंत्ययात्रेला गेलीत पण आश्रमातले स्वामीजी आणि त्यांचे गावातच राहणारे एक परिचित हे दोघे मात्र आश्रमातच थांबले आहेत. न राहवून मी विचारलं त्यांना, “ दिवसभर तुम्ही इतकं सहकार्य केलं. मग आता अंत्यविधीसाठी का नाही गेलात? ” कदाचित जलसमाधी दिली नाही म्हणूनही स्वामीची गेले नसावेत असं मला क्षणभर वाटून गेलं. पण ते म्हणाले, “हम कैसे जा सकते है? हमारा असली काम तो अब चालू होगा | इन लोगोने भोजन नही किया है।भोजन की तयारी भी तो करनी है |” दोघांनीही आंघोळी केल्या आणि स्वयंपाकाला लागले. त्यांनी दाल बाटी चा बेत केला. कमी वेळात जास्त माणसांसाठी स्वयंपाक करायचा असेल तर दालबाटीला पर्याय नसतो.
अंत्यविधी झाल्यानंतर मंडळी परतली. त्यात गावकरीही होते. त्या सगळ्यांना स्वामीजींनी आणि त्यांच्या त्या गावातल्या सहकाऱ्याने प्रेमाने जेवू घातलं. दुसऱ्या दिवशी अस्थिकलश घेऊन कै. माधव परांजपे यांचे चिरंजीव शांतिशआणि लेक- जावई पुण्याला परतले.
अशीच एक घटना गेल्या वर्षी घडली. दिलीप गोखले हे माझी नाशिक ची मैत्रीण सौ. माधुरी माटे हिचे बंधू.
ते नर्मदा परिक्रमेत आहेत हे समजलं होतं. अशी अनेक मंडळी परिक्रमेत असतात. प्रत्येक वेळी भेट होऊ शकतेच असेही नाही. मुळात लेपा, भट्याण आणि छोटी खरगोन या ठिकाणी आमच्या ज्या गरीब कुटुंबातील मुलांसाठी निशुल्क शाळा चालतात त्याचे व्यवस्थापन आणि आर्थिक जुळवाजुळव यामध्येच वेळ इतका जातो की परिक्रमावासी आमच्याकडे लेपाला आले तरी त्यांच्याशी फार गप्पा गोष्टी होऊ शकतात असं नाही. नंतरही प्रत्येकाशी फारसा संपर्क राहतोच असेही नाही. त्यामुळे दिलीप गोखले येऊन गेले असतील आमच्याकडे पण मला नाव आठवत नव्हतं. एक दिवस भल्या पहाटे माधुरीचा फोन आला. तिचा भाऊ दिलीप नरसिंगपूर जवळच्या एका आश्रमात रात्री झोपेतच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू पावला. त्याचं कुटुंब मुंबईला तर माधुरी नाशिकला. दोन्ही कुटुंबांनी लवकरात लवकर नरसिंगपूरला पोहोचायचं ठरवलं तरी दीड दोन दिवस लागणार होते. श्री दिलीप गोखले यांच्या मोबाईल मध्ये मुलाचा नंबर मिळाला म्हणून संपर्क तरी झाला. एकटेच परिक्रमा करत होते. म्हणून पोलिसांनी पोस्टमार्टेम करावं लागेल असं सांगितलं. आता काय करायचं? माधुरी आणि तिचे नातेवाईक काळजीत होते. माझ्याशी फोनवर संपर्कही चालू होता. अचानक मला आठवलं, महिनाभरापूर्वीच नरसिंगपूरचे डॉक्टर चांदोरकर व त्यांच्या पत्नी आमच्याकडे लेपाला येऊन गेले होते. त्यांचा परिचय झाला होता. त्यांना मी फोन केला. ही अडचण सांगितली. तर म्हणाले आता तुम्ही कुठलीच काळजी करू नका. या पुढची सर्व जबाबदारी माझी. माझा फोन नंबर दिलीप गोखले यांच्या नातेवाईकांना द्या. विशेष म्हणजे पोस्टमार्टेम करून घेण्यापासून तर पार्थिवाला बर्फाच्या पेटीत ठेवून स्वतःच्याच दवाखान्यात ठेवणे ही सोय त्यांनी केली. दुसऱ्या दिवशी दिलीप गोखले यांचे नातेवाईक तिथे पोहोचले तर बर्मानघाट येथे अंत्यसंस्काराची सर्व सोय आधीच तयार होती. मानवता म्हणून ही सोय करणं, त्यांच्या नातेवाईकांच्या राहण्याची भोजनाची सोय करणं हे मी समजू शकते. पण प्रसंग ओळखून त्यांच्या परतीच्या प्रवासा साठी रेल्वेचे आरक्षण करणे – जे मला कदाचित सुचलं देखील नसतं, ती व्यवस्थाही डॉक्टर चांदोरकर यांनी करून ठेवली होती.
नर्मदा परिक्रमा करत असताना एक महंत मला म्हणाले होते, “ नर्मदा परिक्रमा केलीत म्हणजे तुमचा सीमित परिवार असीम परिवार होतो. ” याचा अनुभव या अशा प्रसंगातून येतो.
नर्मदा परिक्रमा करत असताना परिक्रमावासी जर मृत्यू पावला तर त्याला स्वर्ग प्राप्ती होते अथवा मोक्ष मिळतो असे म्हणतात. स्वर्ग आणि मोक्ष ही काय भानगड आहे हे आपण स्वतः मेल्याशिवाय कसं कळणार? अशा वेळी मात्र मला विनोबाजींनी केलेली मोक्षाची व्याख्या आठवते. विनोबा म्हणतात, मोक्ष म्हणजे काय? मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. ही व्याख्या मला मनापासून पटते. कारण भौतिक आयुष्यात कुठलाच मोह उरलेला नसतो म्हणून हे लोक परिक्रमेला येतात.
मला मात्र मोक्ष म्हटला की स्वामी विवेकानंद यांची आठवण येते. ते म्हणत मी साधना भलेही करत असेन. पण ती मोक्षासाठी नाही. जोपर्यंत या देशातला एखादा बेवारशी कुत्रा देखील उपाशी आहे तोपर्यंत मी मोक्षप्राप्तीची कामना करणार नाही. स्वामी विवेकानंद माझे आदर्श! त्यांच्या या संकल्पात मला थोडी भर घालावीशी वाटते. माझ्या स्वतःच्या बाबतीत. जोपर्यंत या देशातला गरीबातला गरीब मुलगा अथवा मुलगी शिक्षित होत नाही तोपर्यंत मलाही मोक्ष नको. अगदी मी नर्मदा किनार्यावर रहात असले तरी.
– समाप्त –
लेखिका : भारती ठाकूर
नर्मदालय, लेपा पुनर्वास (बैरागढ) जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश.
प्रस्तुती : शशी नाडकर्णी-नाईक
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मोक्ष… भाग – १ – लेखिका : भारती ठाकूर ☆ प्रस्तुती – शशी नाईक-नाडकर्णी ☆
ही घटना आहे 27 नोव्हेंबर 2012 ची. नर्मदा किनारी नगावा नावाचे एक गाव आहे. गंमत आहे ना ! गावाचे नाव नगावा. तिथे अगदी नर्मदा किनाऱ्यावर केवट धर्मशाळेत शाळा मध्येच सोडून दिलेल्या मुलांसाठी आमचे एक अनौपचारिक शिक्षण केंद्र होते. आपण निशुल्क कोचिंग क्लास असे म्हणूया त्याला हवं तर. सकाळी दहा साडेदहा ची वेळ होती. मी वर्गात शिकवत होते. खिडकीतून बाहेर लक्ष गेले तर दोन परिक्रमावासी येताना दिसले. थोड्याच वेळात त्यांच्यापैकी एकाने वर्गाच्या खिडकीतून डोकावून मला विचारले, “भारती ठाकूर से मिलना था | कहा मिलेगी ?” मी हसून म्हटलं, “मीच आहे ती. दमून आला आहात. थोडं बसा, एवढा विषय संपवून मी येतेच. ”
जवळच्याच एका मंदिरात परिक्रमावासींची रहाण्याची सोय होती. तिथल्या ओट्यावर दोघेही माझी वाट बघत थांबले. थोड्यावेळाने मी तिथे पोहोचले. एकमेकांशी परिचय झाला. पुण्याचे राहणारे ते दोघेही सख्खे भाऊ होते. एक श्री माधव परांजपे आणि दुसरे श्री मुकुंद परांजपे. दोघांचीही वयं सत्तरीच्या आसपास असावीत. थोरल्या भावानी बॅगेतून एक वही काढली. त्यातल्या एका पानावर काही जणांची नावे लिहिली होती आणि वरती शीर्षक होतं नर्मदा परिक्रमेत या लोकांना अवश्य भेटणे आहे. त्या चार -पाच नावांमध्ये माझेही एक नाव होते. माझ्या नावासमोर त्यांनी माझा मोबाईल नंबर लिहिला.
त्या मंदिरात आमचे नेहमीच जाणेयेणे असल्यानेतिथली सगळीच मंडळी माझ्या ओळखीची होती. तिथल्या व्यवस्थापकांना मी सांगितलं, “ये हमारे पुना के मेहमान है । जरा अच्छेसे ध्यान रखना इनका |” आणि मी तिथून पुन्हा लेपाला परतले.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच सहाच्या सुमारासच धाकट्या भावाचा म्हणजे श्री मुकुंद परांजपे यांचा फोन आला. “ ताई-दादा गेले. मी मुकुंद परांजपे बोलतोय” मला काही कळेना की कुठे गेले आणि इतक्या सकाळी ? मी विचारलं कुठे गेले? “ गेले म्हणजे दादा वारले काल रात्री. पहाटे अडीच तीनच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आम्ही भटयाण येथे गोधारी आश्रमात थांबलो आहोत. काल नगाव येथे जेवण करून पुढे निघालो आणि संध्याकाळपर्यंत गोधारी आश्रमात पोहोचलो आणि तिथेच थांबलो. आम्हाला रात्री झोपायला स्वतंत्र खोली पण मिळाली. रात्री झोपेपर्यंत दादा व्यवस्थित होते. पहाटे अडीच तीनला मला त्यांच्या हालचालीने जाग आली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय हे मला जाणवलं. मी त्यांना प्यायला पाणी दिलं. एखाद-दोन घोट पाणी प्यायले असतील. पण लगेच त्यांचा प्राण गेला. आश्रमातल्या स्वामीजींनी डॉक्टरांना बोलावले पण काही उपयोग झाला नाही. प्राण गेला होता. काय करावे मला सुचत नाहीये. मी घरी पुण्याला कळवलं आहे. पण घरचे लोक कुठल्याही वाहनाने आले – अगदी विमानाने सुद्धा तरी त्यांना रात्रीचे नऊ-दहा वाजतील यायला. ” थोरल्या भावावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या धाकट्या भावाची अवस्था मी समजू शकले.
मी म्हणाले, “तुम्ही काळजी करू नका. मी पोहोचते तिथे. मी आमच्या दोन कार्यकर्त्यांना काय घडलं ते सांगितलं आणि लवकर तयार व्हा आपल्याला निघायचे आहे अशी सूचना देखील दिली. ताबडतोब आम्ही तिथे पोहोचलो. तो दिवस होता कार्तिकी पौर्णिमेचा. गोधारी आश्रम नर्मदा किनाऱ्यावर परशुरामांची तपस्थली म्हणून प्रसिद्ध आहे. मी बरोबर जाताना भगवद् गीता आणि इतर काही स्तोत्रांची पुस्तकं आठवणीने बरोबर घेऊन गेले. करण दिवसभर त्या भावाशी काय बोलणार ?
दिवस उजाडला आणि एका परिक्रमावासीचे नर्मदा किनारी देहावसान झाले आहे ही बातमी आसपासच्या गावात वार्यासारखी पसरली. लोक दर्शनासाठी येऊ लागले. त्यांच्या बोलण्यातून समजले की नर्मदा किनारी परिक्रमावासीचा मृत्यू आणि तोही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी होणे याला भाग्य लागतं. या भाग्यामध्ये श्री परांजपे यांचं ॲडिशनल भाग्य हे होतं की ते चित्पावन ब्राम्हण होते आणि परशुरामांच्या तपस्थलीवर त्यांचा मृत्यू झाला.
दिवसभर लोक दर्शनासाठी येत होतेच. आश्चर्य म्हणजे कोणीही रिकाम्या हाती आलं नाही. कोणी आमच्यासाठी चहा आणत होते तर कोणी दूध. कुणी साजूक तूप. कुणी गोवऱ्यांची व्यवस्था करत होते तर कुणी प्रेतावर पांघरण्याचे वस्त्र. गावातल्या बायकांनी आठवणीने मला सांगितले, “ दीदी, आमच्याकडे भरपूर लाकूडफाटा आहे. स्वयंपाकासाठी आम्ही तो गोळा करून ठेवतो. ती लाकडे घेऊन जा. आमची पिकअप व्हॅन या कामासाठी उपयोगी पडली. भरपूर गोवऱ्या आणि लाकडे लोकांनी किनाऱ्यावर रचून ठेवली. तो संपूर्ण दिवस खूप अस्वस्थतेत गेला. दर तासाला त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क चालू होता. त्यांचे इंदोर मधले परिचित श्री वाळुंजकर हे या परिवाराला भट्याणला घेऊन येणार होते. आम्ही त्यांच्याशीही संपर्कात होतो नर्मदा किनाऱ्यावर सरणाची तयारी चालू आहे आणि चिता रचली गेली आहे हे गोधारी आश्रमातल्या स्वामीजींना समजताच त्यांनी वेगळा पेच प्रसंग माझ्यापुढे उभा केला. श्री परांजपे परिक्रमेत होते. म्हणजे तो एक प्रकारचा सन्यासच असतो. आणि संन्यास घेतलेल्या व्यक्तीचे नर्मदा किनारी दहन होत नाही तर ते पार्थिव शरीर नर्मदेला अर्पण केलं जातं. पार्थिवाला जल समाधी दिली जाते.
अनेकदा अशी काही पार्थिव शरीरे जलसमाधी दिल्यानंतर नर्मदेच्या पात्रात असलेल्या खडकांमध्ये अडकतात आणि कुजतात हे मी वाचलं होतं, ऐकलं होतं आणि एक-दोन ठिकाणी बघितलेही होतं. त्यामुळे हे जलसमाधीचे खूळ लोकांच्या डोक्यातून निघावं अशी माझी इच्छा होती. मी तसा वाद घालूनही पाहिला.. लोकांचं म्हणणं असं कि शरीर सडतं हे खरं आहे पण ते मासे खाऊन टाकतात. त्यांना अन्न मिळतं. माझी समजूत पटेना. कारण तेच पाणी गावातले लोक हंडे भरून पिण्यासाठी आपल्या घरी नेतात. नर्मदेवर स्नानासाठी आलेले भक्त सुद्धा तेच पाणी पितात. त्यांचे काय ? खूप विचार केल्यानंतर एक युक्ती मला सुचली. कै. परांजपे यांच्या मुलाला मी इथे काय चर्चा चालू आहे लोकांमध्ये ते फोनवर सांगितलं. त्याला मी सांगितलं, की ‘ वडलांच्या चितेला अग्नी देणे हे मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे. आमचे सगळेच नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी इथे पोहोचू शकणार नाहीत. माझी आई सुद्धा येऊ शकत नाहीये. अशावेळी किमान मला अस्थिकलश घेऊन जाता यावा म्हणून तरी पार्थिव शरीराचे दहन होणे आवश्यक आहे. ’– असे तू त्या स्वामीजींना सांग. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वादात मी जिंकले. गावकरी आणि ते स्वामीजी नर्मदा किनाऱ्यावर कै. परांजपे यांचा अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले.
– क्रमशः भाग पहिला
लेखिका : भारती ठाकूर
नर्मदालय, लेपा पुनर्वास (बैरागढ) जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश.
प्रस्तुती : शशी नाडकर्णी-नाईक
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈