मराठी साहित्य – विविधा ☆ “छापील पुस्तकापासून माणूस दूर जाईल का?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

🌸 विविधा 🌸

☆ “छापील पुस्तकापासून माणूस दूर जाईल का?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

किंडलसारख्या वाचन ऍपचा, भ्रमणध्वनीचा, संगणकाचा आणि विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक पुस्तकांचा वाढता वापर पाहता माणसाच्या वाचनाच्या सवयींमध्ये मोठा बदल होत आहे, हे नाकारता येत नाही. पूर्वी पुस्तक वाचण्यासाठी छापील पुस्तक हातात घेणे अपरिहार्य होते; पण आज त्याच पुस्तकाचे इलेक्ट्रॉनिक रूप सहज उपलब्ध होते. एका छोट्याशा भ्रमणध्वनीत किंवा वाचनयंत्रात शेकडो, हजारो पुस्तके साठवता येतात. प्रवासात, प्रतीक्षेत किंवा घराबाहेर असतानाही वाचन करता येते. अक्षरांचा आकार बदलणे, प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करणे, शब्दाचा अर्थ तत्काळ शोधणे, पुस्तकातील एखादा उतारा शोधणे आणि वाचन जिथे थांबले तिथून पुढे सुरू करणे अशा सुविधा इलेक्ट्रॉनिक वाचनाला अधिक सोयीच्या बनवतात. त्यामुळे पुढील काळात इलेक्ट्रॉनिक वाचनाचे प्रमाण निश्चितच वाढत जाण्याची शक्यता आहे. परंतु इलेक्ट्रॉनिक वाचन वाढले म्हणजे छापील पुस्तके पूर्णपणे नष्ट होतील, या निष्कर्षावर उडी मारणे घाईचे ठरेल. करण इतिहासात प्रत्येक नवीन माध्यमाच्या आगमनावेळी जुन्या माध्यमाच्या अंताची भविष्यवाणी करण्यात आली होती; पण तसे काही घडले नाही. जसे की चित्रपट आल्यावर रंगभूमी संपेल असे मानले गेले, दूरदर्शन आल्यावर चित्रपटगृहे बंद पडतील असे वाटले, संगणक आल्यावर कागदाचा अंत होईल असे सांगितले गेले आणि भ्रमणध्वनी आल्यावर दूरध्वनीचे जुने प्रकार नाहीसे होतील असे मानले गेले. प्रत्यक्षात झाले असे की नवीन माध्यमांनी जुन्या माध्यमांचे स्वरूप, वापर आणि सामाजिक स्थान बदलले; त्यांना सर्वस्वी नष्ट केले नाही. पुस्तकाबाबतही अशीच प्रक्रिया घडण्याची शक्यता अधिक आहे. इलेक्ट्रॉनिक पुस्तक छापील पुस्तकाची जागा काही क्षेत्रांत घेईल; परंतु छापील पुस्तकाचे अस्तित्व त्यामुळे संपेलच असे नाही. या मागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे पुस्तक हे केवळ माहिती साठविण्याचे साधन नसून ती एक सांस्कृतिक वस्तू आहे. पुस्तकाच्या कागदाचा स्पर्श, त्याचा वास, मुखपृष्ठ, पान उलटण्याची क्रिया, पुस्तकावर केलेल्या खुणा, एखाद्या जुन्या पुस्तकातून मिळणारी आठवणींची अनुभूती आणि स्वतःचा पुस्तकसंग्रह असणे यांना इलेक्ट्रॉनिक पुस्तके पूर्णपणे पर्याय होऊ शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील एखाद्या पुस्तकाला काही विशिष्ट कारणांमुळे भावनिक मूल्य प्राप्त झालेले असते. मग ते पुस्तक केवळ मजकूर राहत नाही; ते एखाद्या काळाची, व्यक्तीची, विचाराची किंवा जीवनानुभवाची स्मृती बनते. त्यामुळे ज्ञानाच्या वापरासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यम अधिक उपयुक्त ठरले, तरी पुस्तकाच्या सांस्कृतिक आणि भावनिक मूल्यामुळे छापील पुस्तक टिकून राहण्याची शक्यता मोठी आहे.

भ्रमणध्वनीवर वाचताना वाचक सतत इतर सूचनांच्या, संदेशांच्या, चित्रफितींच्या आणि सामाजिक माध्यमांच्या आकर्षणात असतो. त्यामुळे दीर्घकाळ एका विषयावर एकाग्र होऊन वाचण्याची क्षमता कमी होण्याचा धोका आहे. छापील पुस्तक वाचताना पुस्तक आणि वाचक यांच्यामध्ये इतर डिजिटल व्यत्यय तुलनेने कमी असतात. म्हणून गंभीर साहित्य, तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र किंवा विज्ञान यासारखे विषय सखोलपणे वाचण्यासाठी छापील पुस्तकाला अजूनही पर्याय नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यम वाचन अधिक सुलभ करते; पण सुलभता आणि एकाग्रता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पूर्वी एखादे पुस्तक मिळवण्यासाठी ग्रंथालयात जावे लागे किंवा पुस्तक विकत घ्यावे लागे. आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे जगातील अनेक ग्रंथ काही क्षणांत उपलब्ध होऊ शकतात. दुर्मिळ पुस्तके, जुन्या आवृत्त्या, संशोधनग्रंथ आणि विविध भाषांतील साहित्यही डिजिटल स्वरूपात मिळू शकते. त्यामुळे भौगोलिक अंतर, पुस्तकांची उपलब्धता आणि काही प्रमाणात आर्थिक अडथळे कमी होतात. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी ही क्रांती अत्यंत महत्त्वाची आहे.

याहून महत्त्वाचा बदल म्हणजे पुढील पिढ्यांसाठी पुस्तक या शब्दाचा अर्थच बदलू शकतो. आज पुस्तक म्हटले की अनेकांच्या मनात कागदाची पाने, मुखपृष्ठ आणि बांधणी असलेली वस्तू येते. भविष्यात एखाद्या तरुणाच्या दृष्टीने पुस्तक म्हणजे वाचण्यासाठी उपलब्ध असलेली डिजिटल सामग्री असू शकते. जसे आज अनेक तरुणांना पत्र लिहिण्याची जुनी पद्धत अपरिचित आहे, तसेच भविष्यातील काही पिढ्यांना छापील पुस्तक हे मुख्य वाचनमाध्यम वाटणार नाही. परंतु याचा अर्थ ते पुस्तक हातात घेऊन वाचणे विसरतील असा होत नाही. म्हणून लोक पुस्तके वाचणे विसरतील असे म्हणण्यापेक्षा लोक पुस्तके वाचण्याची पद्धत बदलतील हे विधान जास्त संयुक्‍तिक ठरेल. त्यामुळे छापील पुस्तकाचा ऱ्हास काही विशिष्ट क्षेत्रांत अधिक वेगाने होऊ शकतो. संदर्भग्रंथ, शब्दकोश, वर्तमान घडामोडींशी संबंधित साहित्य, शैक्षणिक सामग्री आणि त्वरित शोध घेण्यासाठी लागणारी माहिती यासाठी डिजिटल रूप अधिक सोयीचे आहे. अशा सामग्रीसाठी मोठमोठी पुस्तके जवळ बाळगण्याची आवश्यकता कमी होईल. परंतु कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्रे, कलात्मक पुस्तके, संग्रहणीय आवृत्त्या आणि भेट म्हणून दिली जाणारी पुस्तके यांना छापील पुस्तकांच्या स्वरूपात मागणी राहू शकते. म्हणजे भविष्यात छापील पुस्तकाचे प्रमाण कमी होईल, पण त्याचे अस्तित्व अधिक निवडक आणि विशिष्ट स्वरूपाचे होण्याची शक्यता आहे.

या बदलाकडे केवळ तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहणेही योग्य नाही. पुस्तक वाचण्याची सवय टिकवणे हा समाजाच्या बौद्धिक आरोग्याचा प्रश्न आहे. माध्यम कोणतेही असो, दीर्घ लेख वाचण्याची, तर्क समजून घेण्याची, विचारांशी असहमती नोंदवण्याची, कल्पनाशक्ती वापरण्याची आणि एखाद्या विषयावर शांतपणे चिंतन करण्याची क्षमता टिकणे अधिक महत्त्वाचे आहे. भ्रमणध्वनीवर हजारो पुस्तके उपलब्ध असूनही जर माणूस फक्त लहान संदेश, शीर्षके आणि चित्रफिती पाहत राहिला, तर माहितीची उपलब्धता वाढूनही सखोल ज्ञान मिळवण्याची ओढ कमी होऊ शकते. उलट एखादा माणूस इलेक्ट्रॉनिक पुस्तकात तल्लीन होऊन शेकडो पाने वाचत असेल तर त्याचे वाचन छापील पुस्तकाइतकेच अर्थपूर्ण असू शकते. म्हणून भविष्यातील संघर्ष हा छापील पुस्तक आणि इलेक्ट्रॉनिक पुस्तक यांच्यातील नसून सखोल वाचन आणि वरवरच्या माहितीत रममाण होणे यात असणार आहे. छापील पुस्तक कदाचित आजच्या सारखे सर्वत्र दिसणार नाही. पुस्तकांची दुकाने, ग्रंथालये आणि घरातील पुस्तकांचे कपाट यांचे स्वरूपही बदलू शकते. परंतु माणसाला विचार समजून घेण्यासाठी, कल्पना आत्मसात करण्यासाठी आणि स्वतःशी संवाद साधण्यासाठी पुस्तकाची गरज लागणारच आहे. कारण माध्यम बदलले तरी ज्ञानाची आणि चिंतनाची गरज संपत नाही.

त्यामुळे भविष्यात लोक छापील पुस्तके वाचणे विसरून जातील हा अंदाज अतिशयोक्त आहे. अधिक वास्तववादी अंदाज असा वर्तवता येईल की छापील पुस्तक हे वाचनाचे एकमेव प्रमुख माध्यम राहणार नाही; तर इलेक्ट्रॉनिक वाचनाचे प्रमाण वाढेल एवढेच. परंतु छापील पुस्तक पूर्णपणे नाहीसे होणार नाही. भविष्यात दोन्ही माध्यमे परस्परपूरक असतील. ज्यांना वेग, उपलब्धता आणि सोय महत्त्वाची वाटेल ते इलेक्ट्रॉनिक पुस्तकांकडे वळतील; ज्यांना पुस्तकाचा स्पर्श, संग्रह, सौंदर्य, स्मृती आणि एकाग्र वाचनाचा अनुभव महत्त्वाचा वाटेल ते छापील पुस्तकाकडे परततील. अखेरीस बदलणार आहे तो पुस्तकाचा आकार आणि माध्यम; माणसाची वाचण्याची आणि जाणून घेण्याची मूलभूत गरज नाही. त्यामुळे छापील पुस्तकांपासून वाचक दूर जाईल हा समज गैरसमजच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “फाटणं आणि फाडणं…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “फाटणं आणि फाडणं…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

फाटणं आणि फाडणं…

लहानपणी ज्या काही गोष्टींबद्दल प्रसाद (हातावर, गालावर, आणि पाठीवर) मिळाला असेल तो या दोन गोष्टींबद्दल जास्त असेल. (देवाचा) प्रसाद हा प्रेमाने तळहातावर ठेवला जातो व तो खाल्ला जातो. पण फाटणं आणि फाडणं यामुळे मिळणारा प्रसाद हा तळहातापासून पाठीपर्यंत अंगावर पडला होता. त्यासाठी जागेचं म्हणजे शरीराच्या भागाच, आणि जागेच म्हणजे कुठे आहोत याच बंधन नव्हत. आणि गोडवा… त्याचा तर संबंधच नसायचा.

फाटणं यात वस्तूच नुकसान असत. तर फाडणं बहुतेक वेळा मुद्दाम केल जात. फाटणं यात दुर्लक्ष, निष्काळजीपणा असतो. तर फाडणं यात काळजीपूर्वक करायचं कांहीही नसत. फाटणं यात दु:ख असत, तर फाडण्यात दु:खाचा संबंध असेलच अस नाही.

हा कागद कोणी फाडला… किंवा कसा फाटला… अथवा हे कागद काही कामाचे नसतील तर फाडून टाकू… फाडणं हा शब्द साधारण अशाच प्रकारच्या वाक्यात ऐकायला येतो. किंवा यात जे घडलं तीच क्रिया फाडणं यात अपेक्षित असते.

फाडणं याला व्यवस्थितपणा लागत नाही. यासाठी कोणतही मोजमाप नसत. याला कोणतही शास्त्र, किंवा सुत्र नाही. सुसूत्रता तर मुळीच लागत नाही. ऊलट व्यवस्थितपणे केलेला अव्यवस्थितपणाच यात अपेक्षित असतो. मनाला येईल तसे आणि तेवढे तुकडे करणं यालाच आपण फाडणं म्हणतो.

पण फक्त याच अर्थाने हा शब्द वापरतो का… तर मुळीच नाही. बर्‍याच चांगल्या गोष्टींसाठीसुध्दा फाडणं हा शब्द वापरतो, आणि त्यात बोलणारा आणि ऐकणारा यांना गैर वाटत नाही.

वर्गणी किंवा इतर चांगल्या ठिकाणी पैसे मिळाल्यावर दिली जाणारी पावती. याला पावती फाडणं असच म्हणतात. चांगल्या मनाने, चांगल्या कामासाठी दिलेल्या पैशांची पोचपावती देतांना त्या पावतीचा फाडणं असा ऊल्लेख होतो.

लग्न ठरल्यावर केली जाणारी कपड्यांची खरेदी. याला कपडा फाडायचा आहे असाच ऊल्लेख खान्देशात तरी सहज केला जातो. परत हा शब्द वापरतांना उत्साह जाणवतो. अशा कपडे फाडण्याच्या कार्यक्रमाला काहींना मानाने यायला सांगितल जातं. बर्‍याचदा तर अशा वेळी पंधरावीस जणं असल्याच मी पाहिलं आहे. काहीतर दुकानाच्या बाहेरच असतात. दुकानात साडी फाडली जाते आहे का शर्ट पीस आणि पॅट पीस हे त्यांना दिसतही नाही. पण कपडा फाडायच्या कार्यक्रमास ते हजर असतात.

एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याच्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींच श्रेय, यश, अपयश कुणाच्या नावावर असेल, याला सुध्दा याचं बील कोणाच्या नावावर फाडायचं असाच प्रश्न मनात असतो. काही तर या यशासाठी आपणच असल्याचा दावा करतात. तर अपयशाच खापर कोणावर फोडाव याचा घाट घालतात.

असच बील फाडणं वस्तूच्या खरेदीनंतर सुध्दा असतं. आपल्या नांवाने जे बील फाडलं जात ती वस्तू आपण आनंदाने घेतलेली असते, बर्‍याचदा त्याचं बील संभाळून सुध्दा ठेवतो, पण वस्तू घेतांना त्याच बील मात्र फाडल जात.

दुध नासणं याला सुध्दा काही ठिकाणी दुध फाटलं असच म्हणतात. द्रवरूप पदार्थ नासतो, सांडतो. पण दुध मात्र फाटतं. दुधाचा चक्का करायचा असेल तर मात्र दुध मुद्दाम फाडलं जात. पण मला दुध फाटलं या शब्दाची गंमत वाटते.

पण या शब्दांमुळे काही गोष्टींना ऊजाळा मिळाला.

 

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक आदिवासी दिन… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ जागतिक आदिवासी दिन… ☆ संगीता कुलकर्णी ☆

९ ऑगस्ट रोजी झालेल्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने:

जागतिक आदिवासी दिन : निसर्गसंस्कृतीचा गौरव

ज्यांच्या पावलांनी जंगलाला वाटा मिळाल्या, ज्यांच्या श्वासांनी पर्वतांना जीवन मिळाले आणि ज्यांच्या संस्कृतीने निसर्गालाच देवत्व बहाल केले त्या आदिवासी समाजाला कृतज्ञ अभिवादन करण्याचा दिवस म्हणजे जागतिक आदिवासी दिन.

“जंगल आहे म्हणून जीवन आहे आणि जीवन आहे म्हणून संस्कृती आहे, ” ही भावना ज्या समाजाच्या जगण्याच्या प्रत्येक श्वासात दडलेली आहे तो म्हणजे आदिवासी समाज… निसर्गाशी सुसंवादी नाते, श्रमाला प्रतिष्ठा, सामूहिक जीवनपद्धती आणि सांस्कृतिक वैभव यांमुळे आदिवासी समाज मानवसंस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण घटक ठरतो… दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका समाजाचा गौरव करण्यासाठी नसून त्यांच्या परंपरा, संस्कृती, ज्ञान आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचा सन्मान करण्यासाठी आहे.

भील, गोंड, वारली, संथाल, मुंडा, कोरकू, कातकरी, कोलाम, ठाकूर अशा अनेक जमाती भारताच्या सांस्कृतिक समृद्धीत भर घालतात. प्रत्येक जमातीची स्वतंत्र भाषा, लोकपरंपरा, श्रद्धा, कला, लोकनृत्य आणि जीवनपद्धती आहे. या विविधतेतून भारतीय संस्कृतीचे विशाल रूप अधिक उजळून दिसते… आदिवासी म्हणजे केवळ डोंगर-दऱ्यांत राहणारे लोक नव्हेत… ते निसर्गाचे खरे रक्षक आहेत. झाडे, नद्या, पर्वत, वन्यजीव आणि पृथ्वी यांना ते केवळ संसाधने मानत नाहीत तर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपतात. त्यांच्या लोकगीतांत निसर्गाचे सौंदर्य आहे, लोकनृत्यांत जीवनाचा उत्सव आहे आणि लोकपरंपरांत पर्यावरण संवर्धनाचा अमूल्य संदेश आहे.

आदिवासी समाजाचे जीवन निसर्गाशी एकरूप झालेले आहे. जंगल, डोंगर, नद्या आणि वनसंपत्ती हे त्यांच्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे ज्ञान त्यांनी अनुभवातून आत्मसात केले आहे… आज जग पर्यावरण संवर्धनाची चर्चा करत असताना आदिवासी समाजाने ती हजारो वर्षांपूर्वीच आपल्या जीवनात उतरवली होती तसेच ही जीवनमूल्ये ही शतकानुशतके आपल्या आचार-विचारांत जपली आहेत.. त्यांनी वृक्ष तोडण्याआधी त्याची क्षमा मागितली, नदीत उतरतानाही तिचा आदर राखला आणि जंगलाचा उपयोग करतानाही त्याचे संरक्षण केले. निसर्गाशी संघर्ष नव्हे, तर सहजीवन हेच त्यांचे जीवनतत्त्व आहे. म्हणूनच त्यांच्या संस्कृतीत पृथ्वीच्या भविष्याचे मौल्यवान ज्ञान दडलेले आहे… त्यांचे पारंपरिक ज्ञान हे केवळ सांस्कृतिक नव्हे तर पर्यावरणीय दृष्टीनेही अत्यंत मौल्यवान ठरते.

आदिवासी समाज हा भारताच्या संस्कृतीच्या इंद्रधनुष्यातील एक तेजस्वी रंग आहे. त्यांच्या लोकगीतांत मातीचा सुगंध दरवळतो, लोकनृत्यांत स्वातंत्र्याचा आनंद डोलतो तर त्यांच्या चित्रकलेत निसर्गाचे स्पंदन जिवंत होते. त्यांच्या जीवनात कृत्रिमतेला स्थान नाही साधेपणा हीच त्यांची श्रीमंती आणि श्रम हीच त्यांची पूजा आहे. पहाटेच्या दवबिंदूप्रमाणे त्यांचे जीवन निर्मळ तर उंच डोंगराप्रमाणे त्यांचा स्वाभिमान अढळ आहे… सभ्यतेच्या झगमगाटात अनेकदा विस्मरणात गेलेल्या या समाजाने निसर्गाच्या कुशीत राहून मानवाला जगण्याची खरी कला शिकवली. त्यांनी जंगलाला संपत्ती नव्हे तर आई मानले, नद्यांना केवळ पाण्याचा प्रवाह नव्हे तर जीवनाची गंगा समजले आणि पृथ्वीला उपभोगाची वस्तू नव्हे तर पूजनीय माता मानले.

भारतातील आदिवासी समाजाने देशाच्या इतिहासातही मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यलढ्यात अनेक आदिवासी वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली… अनेक आदिवासी वीरांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करत स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित ठेवली… भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाचे योगदान उल्लेखनीय आहे… त्यांच्या संघर्षाची गाथा इतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. त्यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि न्याय या मूल्यांची जपणूक अधिक बळकट झाली… स्वातंत्र्यानंतरही शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी विकासाच्या प्रवाहात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे तरीही विस्थापन, वनहक्क, शिक्षणातील असमानता, कुपोषण, बेरोजगारी आणि सांस्कृतिक ओळख जपण्याची समस्या आजही गंभीर स्वरूपात दिसून येते.

आज आधुनिकतेच्या वेगवान प्रवाहात अनेक आदिवासी परंपरा आणि बोलीभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलांचे क्षेत्र कमी होत आहे, विस्थापन वाढत आहे आणि त्यांच्या पारंपरिक जीवनपद्धतीसमोर अनेक आव्हाने उभी राहत आहेत. तरीही त्यांनी आपल्या संस्कृतीची ओळख, परंपरेचा अभिमान आणि निसर्गाविषयीची निष्ठा जपली आहे. ही चिकाटी आणि आत्मसन्मान प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

जागतिक आदिवासी दिन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, जमीन, वनहक्क आणि सामाजिक न्याय या प्रत्येक क्षेत्रात आदिवासी समाजाला समान संधी मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा सन्मान करून आधुनिक विज्ञानाशी त्याची सांगड घालणे ही काळाची गरज आहे. कारण निसर्गाशी सुसंवाद साधून जगण्याची कला जगाला शिकविण्याची ताकद आदिवासी संस्कृतीत आहे.

आज आपण पर्यावरण संवर्धन, जैवविविधता आणि शाश्वत विकास यांविषयी चर्चा करतो परंतु हे विचार आदिवासी समाज शतकानुशतके आपल्या जीवनातून जगत आला आहे म्हणूनच त्यांच्याकडे केवळ सहानुभूतीने नव्हे तर आदराने आणि समतेच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. त्यांच्या संस्कृतीचे जतन करणे म्हणजे आपल्या देशाच्या सांस्कृतिक वैभवाचे संरक्षण करणे होय…

जागतिक आदिवासी दिन हा विविधतेतील एकतेचा, मानवतेचा आणि निसर्गप्रेमाचा उत्सव आहे… हा केवळ उत्सव नाही तर आत्मपरीक्षणाची संधी आहे. आदिवासी समाजाला विकासाचा समान अधिकार देताना त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेचे संरक्षण करणे, त्यांच्या ज्ञानपरंपरेचा सन्मान करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करणे, हीच या दिवसाची खरी शिकवण आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन म्हणजे मानवतेच्या प्राचीन शहाणपणाचे जतन होय म्हणूनच विविधतेचा सन्मान, समानतेची जाणीव आणि निसर्गाशी सुसंवाद या मूल्यांच्या आधारे आपण अधिक न्याय्य, समृद्ध आणि संवेदनशील समाजाची उभारणी करूया… आदिवासी संस्कृतीचे अस्तित्व टिकले तरच निसर्गाचे संतुलन आणि मानवतेचे भविष्य अधिक समृद्ध, सुंदर आणि सुरक्षित राहील हाच जागतिक आदिवासी दिनाचा खरा संदेश आहे… जंगलातील प्रत्येक हिरवे पान पृथ्वीचा श्वास जपते तसेच आदिवासी समाज भारताच्या संस्कृतीचा आत्मा जपतो. त्यांच्या अस्तित्वाचा सन्मान म्हणजे निसर्गाचा सन्मान, आणि त्यांच्या प्रगतीचा मार्ग म्हणजे भारताच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग होय.

दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन हा केवळ एका समाजाचा उत्सव नाही तर मानवसंस्कृतीच्या आद्य वारशाला अर्पण केलेला सन्मानाचा मुजरा आहे.

 

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अहंकार… ☆ दीपा नारायण पुजारी ☆

दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ अहंकार…  ☆ दीपा नारायण पुजारी ☆

संस्कृत मध्ये अहं म्हणजे मी. अर्थात अहंकार म्हणजे मी पणा. मी करतो तेच बरोबर असा विचार जिथं येतो, तिथं त्या क्षणापासून मीपणा पोसला जाऊ लागतो.

जी व्यक्ती अशी अहंकारी असते ती, स्वतःच्या विचारांना मतांना जास्त महत्त्व देते. इतरांचं मत, विचार किंवा त्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन समजून घेऊ शकत नाही. अशी व्यक्ती दुसऱ्यांना कमी लेखू लागते. कोणालाही न जुमानता आपण करतो तेच बरोबर असं वाटू लागतं. समोरच्या व्यक्तीला किरकोळ मानून त्या व्यक्तीकडं, दुर्लक्ष करणं सुरू होतं. दुसऱ्यांच्या भावनांचा विचार न करण्याची वृत्ती हे एक या मागचं कारण आहे. स्वतः विषयी अभिमान वाटणं हे जसं नैसर्गिक, तशी अहंकार ही देखील नैसर्गिक भावना आहे. स्वतःच्या यशाचा अती गर्व, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ कसा हे सांगण्याची धडपड या गोष्टीतून ही भावना वाढीस लागते. काही वेळा असुरक्षितता, सतत आपलंच कौतुक व्हावं ही अपेक्षा अशा गोष्टींमुळे ही भावना मोठी होते. कधी कधी संपत्ती, रूप, बुद्धिमत्ता याला कारणीभूत ठरतात; तर कधी नोकरीत, कुटुंबात अधिकारामुळे आलेला गर्व वाढीस लागतो, तट्ट फुगतो आणि अहंकाराच्या फुग्यात रूपांतरित होतो.

आपणच तेवढे हुशार आपल्याला कोणाची गरज नाही मी समर्थ आहे अशा धुंदीत ही माणसं वावरत असतात. स्वतःच्या नजरेत स्वतःला मोठे समजू लागतात. अचानक कधीतरी या माणसांची फजिती होते. कुणालाही न विचारता मोठे मोठे व्यवहार करताना फाजील आत्मविश्वासनं मोठे निर्णय घेतले जातात. हितचिंतकांना बेदखल केले जाते. परंतु हा निर्णय चुकीचा ठरला तर फजिती होऊ शकते मोठे संकट उडवू शकते.

गर्व किंवा अहंकार हा माणसाचा शत्रू आहे. अहंकाराने उद्ध्वस्त झालेल्या माणसांची अनेक उदाहरणं आहेत. अहंकार हा षड्रिपुंपैकी एक रिपू आहे. शक्ती, बुद्धी, संपत्ती, रूप याचा माणसाला अभिमान जरूर असावा पण त्या अभिमानाचं रूपांतर गर्वात किंवा अहंकारात होणार नाही याची काळजी घेणं जरुरीच आहे आणि महत्त्वाचं आहे.

अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करत राहायला हवा. त्यासाठी अंगी नम्रता हा गुण बाणवायला पाहिजे. नेहमी नम्र राहायला हवं. इतरांचं ऐकून घ्यायला हवं. सतत शिकण्याची वृत्ती ठेवायला हवी. आपली चूक झाली असेल, तर ती मान्य ही करायला हवी. दुसऱ्यांचा वेगळा दृष्टिकोन समजून घेतला तर, आपलीही समज वाढते. अहंपणा कमी करण्यास ही गोष्ट उपयुक्त ठरते.

विजय माझाच होणार, मीच जिंकणार, माझंच बरोबर असा हेका धरू नये. प्रत्येक वादात मीच बरोबर असं होणार नाही. कधी कधी दुसरा जिंकू शकतो, तर कधी समोरच्याचं म्हणणं ऐकून वाट वाद मिटवणं जास्त फायदेशीर ठरतं. असे समोपचारानं वागणं जमलं तर अहंकार कमी होण्यास मदत होते.

“जै जगा धाकुटे होईजे | तै जवळीक माझी ||” असे ज्ञानोबा म्हणतात.

जगाला मी जितका लहान आहे असे वाटेल तितके जग माझ्या जवळ येईल. समाजात मिसळायला, लोकांना आपलंस करायला पाहिजे असेल, तर आपण आधी लहान व्हायला हवं. साधेपणा अंगात असेल तर लोक संपत्ती वाढते. लोकसंग्रह वाढतो. अहंकाराचा लवलेश जिथे नाही तिथे, आपुलकी वाढ वाढते. जवळीक वाढते, स्नेहभाव वाढतो हाच खरा ज्ञानजन्य निरहंकार होय.

शरीराची तसेच मनाची कामं प्रकृतीच्या नियंत्रणाखाली चालतात. पण अहंकाराच्या आधीन गेलेला माणूस स्वतःला सर्व गोष्टींचा कर्ता समजतो. असा माणूस स्वतःला दु:खाच्या खाईत लोटून देतो. हे दु:ख नको असेल तर, भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील हा श्लोक आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः।

अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते॥

© दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग ८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ महावस्त्राचे पदर – भाग ८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘आत्या’ (माहेरच्या मायेचा एक हळवा कोपरा)

​नात्यांना काही नावे असतात आणि काही नात्यांना सुगंध असतो. नाव उच्चारलं की नातं समोर येतं; पण काही नाती आठवली की मनात एखादा गंध दरवळतो… जुन्या घराचा, अंगणातल्या तुळशीचा, उन्हाळ्याच्या सुट्टीचा, चुलीवरच्या स्वयंपाकाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायेचा!

​‘नात्यांचं महावस्त्र’ विणताना आपण आतापर्यंत आईची ‘मायेची पैठणी’, बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’, आजीची ‘संस्कारांची शिदोरी’, आजोबांचे ‘सुरकुत्यांमधील शहाणपण’, मामाचा ‘माहेरचा समृद्ध दुवा’ आणि मावशीची ‘आईची प्रतिछाया’ अनुभवली. या महावस्त्रात असाच एक अत्यंत हळवा, आपुलकीचा आणि माहेर-सासर या दोन घरांना जोडणारा रेशमी धागा म्हणजेच ‘आत्या’!

​तुम्ही म्हणाल, कशासाठी सांगत आहात ही नाती? तर नात्यांनीच कुटुंब आणि समाज जोडला जातो. आपलं जीवन समृद्ध होतं ते नात्यांमुळेच ना! आपल्याला एकट्याला काय महत्त्व आहे?

​जशी आईची बहीण म्हणजे मावशी, तशी वडिलांची बहीण म्हणजे आत्या. मावशी आणि आत्या… नावं वेगळी आहेत, नाती वेगळी आहेत; पण माया आणि प्रेम यात फरक नाही. कदाचित व्यक्तिपरत्वे थोडाफार फरक कोणाला जाणवू शकेल, पण त्याचा विचार इथे आपल्याला करायचा नाही.

​वडिलांच्या बहिणीला आपण ‘आत्या’ म्हणतो. नात्यांच्या व्याख्येत ही माहिती अगदी पुस्तकी आणि बरोबर आहे; पण भावनेच्या कोशात ‘आत्या’ या शब्दाचा अर्थ एवढाच नसतो. आत्या घरातील सगळ्या नात्यांना व्यापून उरते. आत्या म्हणजे बाबांच्या माहेरची जिवंत आठवण.

​‘बाबांचं माहेर?’ तुम्ही म्हणाल, “अहो, माहेर आईचं असतं, बहिणीचं असतं; बाबांचं कसं असेल?”

​पण मला वाटतं, बाबा लहान असताना ज्या गावी राहिले, ज्या घरात राहिले आणि आई-बाबा आदी ज्या व्यक्तींसोबत राहिले, ते ठिकाण म्हणजे त्यांचं माहेरच! एखाद्या स्त्रीला आपल्या माहेरची जेवढी ओढ असते, तेवढीच ओढ बाबांनाही त्यांनी बालपण जिथे घालवलं, ज्यांच्यासोबत घालवलं त्या नातेवाईकांची आणि मित्रांची असते. आणि आत्या म्हणजे बाबांच्या बालपणाची साक्षीदार! एकाच घरात वाढलेले, बरोबर जेवलेले, दंगामस्ती केलेले, छोट्या-मोठ्या कारणांवरून भांडलेले, रुसलेले आणि पुन्हा हसलेले. आपल्या बाबांना ‘अरे’ म्हणून हक्काने हाक मारणाऱ्या मोजक्या व्यक्तींमधली ती एक! आणि म्हणूनच कदाचित ‘आत्या’ या नात्यात आपल्या बाबांच्या बालपणाचा एक सुंदर तुकडा दडलेला असतो.

​आईच्या माहेरची माणसं आपल्याला ‘मामा’, ‘मावशी’, ‘आजोबा’, ‘आजी’ म्हणून लहानपणापासूनच जवळची वाटतात. पण बाबांच्या माहेरची माणसंही तितकीच आपली असतात, हे जाणवायला कधी कधी थोडा वेळ लागतो. कारण वडील स्वतःच्या भावना फारशा बोलून दाखवत नाहीत; त्यांच्या माहेरच्या आठवणींचा कप्पा ते सहज उघडत नाहीत. पण जेव्हा आत्या घरी येते, तेव्हा बाबांच्या चेहऱ्यावर अचानक एक वेगळंच निष्पाप बालपण उमलतं.

​”अरे, तू अजूनही तसाच आहेस!”

आत्याने बाबांना असं म्हटलं की आपण आश्चर्याने बाबांकडे पाहतो. कारण आपल्यासाठी ते शिस्तप्रिय बाबा असतात, पण आत्यासाठी तो अजूनही तिचा लहान भाऊ असतो! त्यांच्या बालपणीच्या खोड्या, भांडणं, रुसवे-फुगवे, शाळा, खेळ, आईचा धाक आणि वडिलांची शिस्त… सगळं काही तिच्या स्मरणात ताजंतवानं आणि जिवंत असतं. जसा अनेक वर्षांपूर्वीचा एखादा फोटोंचा अल्बम पाहताना आठवणी जाग्या होतात, तसाच बालपणीच्या आठवणींचा अल्बम आत्या आली की उघडला जातो. म्हणूनच आत्या म्हणजे केवळ एक नातं नाही; ती आपल्या वडिलांच्या हरवलेल्या बालपणाची खरीखुरी साक्षीदार असते.

​बालपणात आत्या म्हणजे एक वेगळीच लाडकी व्यक्ती असते. उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याच्या गावाला जाणं म्हणजे जणू एखादी आनंदी सहलच! तिच्या घरात गेल्यावर आईच्या घरापेक्षा थोडं अधिक स्वातंत्र्य मिळतं. खाण्यापिण्याच्या बाबतीतही तिचा हात थोडा सैलच असतो. “अरे, घे ना अजून एक!” आई समोर असताना ज्या गोष्टीसाठी दहा वेळा विचार करावा लागतो, ते आत्याकडे एकदाच मागितलं की मिळतं! आणि आईने जर आत्याकडे आपल्या मुलाच्या खोड्यांची तक्रार केली, तर आत्या बहुतेक वेळा मुलांचीच बाजू घेते.

​”असू दे गं… मुलंच आहेत. थोडं खेळणार, थोडा दंगा करणार!”

आत्याच्या या एका वाक्यात भाच्याला मिळालेला हक्काचा जामीन असतो! पण आत्या फक्त लाड करणारी नसते, वेळ आली तर ती प्रेमाने समजही देते. आई रागाने बोलते, बाबा शिस्तीने बोलतात आणि आत्या मायेने समजावते. तिच्या बोलण्यात अधिकार असतो, पण त्या अधिकाराला मायेची रेशमी किनार असते.

​माझ्या लहानपणाच्या अनेक आठवणी आत्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्या आठवणी लिहायच्या म्हटलं, तर आत्याच्या उल्लेखाशिवाय त्या पूर्ण होणारच नाहीत. तसं तर मला दीर्घकाळ आत्याची माया लाभली. मी लहान असताना, नोकरीला लागल्यानंतर तसेच पुढे लग्न झाल्यावरही तिने माझं भरभरून कौतुक केलं आहे. माझी आत्या कल्याणला राहायची. आत्या आणि तिचे यजमान यांनी माझ्या मनावर उत्तम संस्कारांचं शिंपण केलं, त्यातून मी खूप काही शिकलो.

​माझं लहानपण एका अगदी छोट्या खेड्यात गेलं. पण आत्या कल्याणला राहत असल्याने मी दर सुट्टीत तिच्याकडे जायचो. ग्रामीण भागात राहत असलेल्या माझ्यासारख्या अजाण मुलाला शहरी संस्कृतीचा स्पर्श आणि ओळख तिच्यामुळे झाली. आत्याच्या यजमानांनी स्वतः माझ्यासोबत फिरून त्यावेळची मुंबई मला दाखवली आणि अनेक गोष्टींची माहिती दिली. त्यांनीच मला तेव्हा ‘मनाचे श्लोक’ हे पुस्तक भेट दिलं होतं. ते मला म्हणाले होते, “विश्वास, हे श्लोक पाठ कर. ते पाठ झाले की मला सांग.” त्याप्रमाणे मी तेव्हा सगळे श्लोक पाठांतर केले होते. त्यांनी त्यावेळी मला एक वही आणि पेन बक्षीस म्हणून दिले होते.

​आज इतकी वर्षं उलटून गेली, तरी ती वही, ते पेन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते ‘मनाचे श्लोक’ अजूनही माझ्या हृदयात कोरलेले आहेत. पुढे याच ‘मनाचे श्लोकां’शी माझं नातं इतकं दृढ होईल आणि त्यावर माझ्याकडून एक विस्तृत लेखमाला लिहिली जाईल, याची त्या वेळी मला कल्पनाही नव्हती! माझे आतेभाऊही माझ्यापेक्षा मोठे होते, पण त्यांनीही मैत्रीच्या नात्याने माझ्याशी वागून मला खूप प्रेम दिलं आणि बऱ्याच गोष्टी शिकवल्या.

​काही नाती केवळ भेटीगाठींनी टिकत नाहीत; ती आठवणींच्या मुळांनी टिकतात. काळ जसजसा पुढे जातो, आपण मोठे होतो आणि मग शिक्षण, नोकरी, संसार, मुलं… प्रत्येक जण आपापल्या जगात रमतो. आत्याच्या घरच्या फेऱ्या कमी होतात, फोनवरच्या गप्पा कमी होतात. ‘नंतर बोलू’ म्हणता म्हणता असे अनेक ‘नंतर’ निघून जातात; पण नात्यातील ‘अंतर’ कधीच वाढत नाही.

​आजच्या काळात कुटुंबाची व्याख्याही बदलली आहे. पूर्वी एकत्र कुटुंबात आत्याचं येणं-जाणं सहज असायचं. घर मोठं होतं, माणसं जास्त होती, अंगण मोठं होतं, माणसांची मनंही मोठी होती आणि वेळही भरपूर होता. पण आता काळानुसार सगळ्याच गोष्टींचा संकोच झाला आहे. माणसं जवळ असूनही वेळ दूर निघून गेला आहे. पूर्वी आत्या अचानक दारात उभी राहायची, “काय गं, आलीस?” असा प्रश्न विचारण्याआधीच घरात तिच्या स्वागताची तयारी व्हायची! आज कोणीच अचानक येत नाही. आधी फोन येतो—”वेळ आहे का? तुम्ही घरी आहात का?” सगळ्याच गोष्टी बदलल्या.

​आत्याच्या नात्यात आणखी एक सुंदर गोष्ट असते. ती आपल्या आईची नणंद असली, तरी अनेकदा आईची जिवाभावाची मैत्रीणही असते. दोघी एकत्र आल्या की जुन्या आठवणींची पेटी उघडते. बाबांच्या बालपणातील गमतीशीर किस्से बाहेर येतात आणि मग आपल्याला कळतं—आपले बाबा ज्या व्यक्तीला ‘माझी बहीण’ म्हणतात, तिच्यासाठी ते अजूनही ‘दादा’ किंवा ‘भाऊ’च आहेत. लग्नातील किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रमांच्या आठवणी निघतात; घर काही क्षण का होईना, पुन्हा हसतं-खेळतं होतं.

​भावाबहिणीचं नातंही अतिशय विलक्षण असतं. लहानपणी एकमेकांशी क्षुल्लक गोष्टीवरून भांडणारे, मोठे झाल्यावर एकमेकांच्या संकटात धावून जाणारे! संसाराच्या वाटेवर दोघे वेगवेगळ्या घरात गेले, तरी मनाच्या एखाद्या कोपऱ्यात त्यांचं माहेरचं घर कायम राहतं; आणि त्या माहेरच्या घराची एक जिवंत खूण असते—‘आत्या’.

​म्हणूनच, दुर्दैवाने जेव्हा वडील जग सोडून जातात, तेव्हा आत्याला होणारं दुःख फक्त भावाच्या जाण्याचं नसतं; तिच्या आयुष्यातील एक संपूर्ण मोठा अध्याय बंद झाल्याचं असतं. ‘माझा भाऊ’ म्हणत ज्याच्याशी ती आयुष्यभर बोलली, भांडली, हसली, रुसली… त्याचा आवाज अचानक कायमचा शांत झालेला असतो. त्या वेळी आत्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पाहताना आपणही अंतर्मुख होतो. तेव्हा जाणवतं की नाती केवळ रक्तावर आधारित नसतात, आठवणींची मुळे त्याहून खूप खोल गेलेली असतात!

​आत्या आणि भाचा-भाची यांचं नातंही तितकंच सुंदर. आई-वडिलांच्या शिस्तीच्या चौकटीबाहेर मायेची एक मोकळी खिडकी उघडी ठेवणारी व्यक्ती म्हणजे आत्या! भाच्यांच्या यशात मनापासून आनंद मानणारी आणि त्यांच्या अपयशातही त्यांना प्रेमाने धीर देणारी. आज भाचा मोठा झाला, त्याला स्वतःची मुलं झाली, तो स्वतः बाबा झाला; तरी आत्याच्या नजरेत तो अजूनही तोच छोटासा मुलगा असतो. “किती मोठा झालास रे!” हे वाक्य आत्या जितक्या वेळा म्हणते, तितक्या वेळा आपल्याला जाणवतं की तिच्या मनात आपण कधीच मोठे झालेले नसतो. आणि आजच्या कृत्रिम जगात ही गोष्ट किती दिलासा देणारी असते!

​आत्याला हिंदीत ‘बुआ’ म्हणतात. अनेक हिंदी चित्रपटांतून, मालिकांतून आणि कथांमधून हे नातं आपल्याला डोकावताना दिसतं. पण भाषा बदलली की नातं बदलत नाही. ‘आत्या’ म्हटलं की जशी आपल्या मनात मायेची एक ओळखीची प्रतिमा उभी राहते, तशीच ‘बुआ’ म्हटलं की हिंदी भाषिकांच्या मनातही! शब्द वेगळे, उच्चार वेगळे; पण नात्याची ऊब मात्र तीच! ‘बुआ’ या शब्दातही एक वेगळीच गोडी आहे. हिंदी घरात कदाचित “बुआ के घर चलो!” असं म्हटलं की बालपणाला आनंदाची चाहूल लागते, आणि मराठी घरात “आत्याकडे चल!” म्हटलं की बालपणाला पंख फुटतात! पण दोन्हीकडे स्वागत करणारा मायेचा हात मात्र अगदी सारखाच असतो. कारण नाती भाषेच्या सीमा मानत नाहीत—‘आत्या’ असो की ‘बुआ’!

​आजच्या डिजिटल युगात नाती एका क्लिकवर जोडली जातात आणि एका क्लिकवर दूरही जातात. व्हिडिओ कॉलवर चेहरे दिसतात, संदेशांमध्ये शुभेच्छा येतात. पण आत्याने हातावर ठेवलेला उबदार हात, डोक्यावरून फिरवलेली मायेची थाप आणि “काळजी घे रे!” म्हणताना तिच्या आवाजात उतरलेली खरीखुरी काळजी… याला जगात कोणत्याही डिजिटल तंत्रज्ञानाचा पर्याय नाही.

​वय वाढतं तसं माणसाला महागड्या भेटवस्तूंपेक्षा माणसं अधिक हवीहवीशी वाटतात—विशेषतः आपल्या माहेरच्या आठवणींशी जोडलेली माणसं. कारण ज्या घरातून ती कधीतरी सासरी गेली, त्या घरातील माणसं, आवाज, हसणं-रडणं, रुसवे-फुगवे, सण-उत्सवांची लगबग… सगळं तिच्या मनात कुठतरी जिवंत असतं. तिच्या माहेरच्या आठवणींचा शेवटचा धागा कधी कधी तिच्या भावाच्या मुलांशी जोडलेला असतो.

​म्हणूनच आत्याला भेटणं म्हणजे केवळ एका नातेवाईकाला भेटणं नव्हे! ते आपल्या वडिलांच्या बालपणाला भेटणं असतं. आपल्या कुटुंबाच्या जिवंत इतिहासाला भेटणं असतं. आणि आपल्या स्वतःच्या बालपणातील एका सुंदर पानाला पुन्हा अलगद स्पर्श करणं असतं.

​‘आत्या’ हे नातं माहेरच्या अंगणातल्या त्या जुन्या, समृद्ध झाडासारखं असतं… ज्याच्या सावलीत आपण कधीतरी खेळलो होतो, ज्याच्या फांद्यांवर कधी झोका घेतला होता; आणि आयुष्याच्या उन्हात खूप पुढे आलो, तरी ज्याची शीतल सावली मनातून कधीच जात नाही… आत्या म्हणजे त्या सावलीचं मायेचं नाव!

 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खिडकीतून दिसणारे पक्षीजग ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ खिडकीतून दिसणारे पक्षीजग ☆ शालिनी जोशी ☆

आमच्या घराच्या शेजारच्या घरात आंबा आणि चिकू यांची मोठी झाडे आहेत. दोन्ही जवळ जवळ असल्याने एकमेकात मिसळून गेली आहेत. दोन्ही झाडे कायम हिरवीगार असतात. चिकू तर जास्तच, त्याची पानगळ कधी होते आणि नवीन पालवी कधी येते कळतच नाही. सहाजिकच असा वृक्षसंभार म्हणजे पक्षांचे आणि छोट्या सरपटणाऱ्या प्राण्यांचे निवासस्थान. आमच्या घराची खिडकी समोरच येते. त्यामुळे त्यांचे निरीक्षण करणे हा माझा छंद.

बरेच पक्षी झाडांना भेट देतात. कधी भारद्वाज आपल्या भारदस्त आवाजात साद घालतो. मला तो शाल पांगरलेल्या प्रौढ राजासारखा वाटतो. त्याच्या पाठीचा मखमली तांबूस रंग त्याला शोभून दिसतो. पांढऱ्या ठिपक्यांची साडी नेसलेली कोकिळा. आपल्या कर्कश आवाजात काळ्याभोर रंगाच्या, लाल डोळ्यांच्या, मंजुळ आवाजाच्या कोकिळाला साथ घालत असते. छोट्या सनबर्डची पळापळ  अखंड सुरू असते. बारीकशी पिवळी चोच असणारी साळुंकी दबक्या पावलांनी वावरत असते. खारुताई खालीवर अखंड धावत असते. या झाडावरून त्या झाडावर उडी मारणे हा तिचा आवडता छंद. शेपटीच्या हलण्यावर आवाज करते, का आवाजाच्या तालावर शेपटी हरवते ते कळत नाही. मात्र दोन्ही क्रिया अखंड आणि एकदमच सुरू असतात, एवढे मात्र खरे. एक दोनदा दुर्मिळ शिक्रा व चष्मेवाला यांनीही दर्शन दिले. टिट, रॉबिन, पोपट, कावळा ही अधून मधून असतात. बुलबुलांचा बुलबुलाट अखंड सुरू असतो. तो विविध आवाजात ओरडतो. म्हणून मी त्याच्या ओरडण्याला बुलबुलाट म्हणते. एकदा आमच्या घराच्या खिडकीच्या ग्रीलवर त्याने घरटे केले. काड्या काड्याजमवून गोल वाटी तयार झाली. एक दिवस पाहिले तर जोडी ग्रील वर बसलेली. अंडी कधी घालतील याची आम्ही वाट पाहत होतो. पण कोणीच फिरकले नाही. घरटे खाली लोंबताना दिसले. बहुतेक महाराणींच्या पसंतीस महाल उतरला नाही. काय करणार. पण या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या डोक्यावर टोपी असते. तपकिरी काळ्या रंगाचा, पांढरे पोट, रुंद चोच असलेला हा पक्षी गालावर दोन बाजूला लाल भडक रंगाचे डाग मिळवतो. शेपटीखालीही तसाच मोठा लाल टिपका असतो. समोरून पाहिला तर काळ्या शेंडीचा पांढर्या दाढीचा साधूच तो वाटतो. सगळे पक्षी मिळून काही वेळेला इतका कलकलाट करतात की पक्षांची शाळा भरली असावी.

या सर्वांपेक्षा माझे लक्ष वेधले ते नाचण किंवा नाचरा यानी(fantail). चिमणी सारखा छोटासा पक्षी, दहा-बारा सेंटीमीटर लांब, छोटीशी चपटी चोच आणि मातकट रंग. रंगाचे कोणतेही सौंदर्य नाही. पण एका जागेवर थांबली की शेपटीचा पिसारा फुलवते, तो पाहत राहावा. या पक्षाला स्थिरता नाही. अखंड पिसारा फुलवीत नाचत असतो. त्यामुळे नाव नाचण. मोराचे नृत्य भारदस्त व सौंदर्यवती नर्तकीच्या  नृत्याची आठवण करून देते. तर नाचण तुरू तुरू चालणारी बारीक अशी छोटी बालिका. अखंड उत्साहाचा झराच. आता इथे दुसऱ्या क्षणी तेथे पसारा फुलवून तयार. या फुलवलेल्या पिसार्याची नागमोडी किनार त्याची शोभा वाढवते. मला उत्साह देणारी ही नाचण. अखंड घरात बसणारी मी. पण नाचण मला अखंड काहीतरी करायची उमेद देते. त्यामुळे मी काहीतरी लिहीत, वाचत राहते. म्हणूनच मला कार्य प्रवण करणाऱ्या या नाचणचे कौतुक.

 

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘अलक आणि अलका’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘अलक आणि अलका’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

स्पष्टिकरण:

‘अलक‘ म्हणजे अति लघु कथा (Terribly Tiny Tale)

‘अलका‘ म्हणजे अति लघु काव्य (Terribly Tiny Poetry)

**

सध्या ‘अलक’ या नावाचा एक अति लघु कथा प्रकार मराठी भाषेत तुरळकपणे दिसू लागलाय खरा, पण या वाङमय प्रकाराला कोणाचीही, कुठलीही अधिकृत मान्यता नाही. रसिक वाचकांकडूनही त्याला फारशी दाद मिळाल्याचे पाहण्यात नाही.

‘अलक’ किंवा ‘अति लघु कथा’ हा एक गद्य कथाप्रकार आहे. यात थोडक्या शब्दात एखादी, घटना, प्रसंग, विचार कथारूपात सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. या कथेचा जीवच मुळी लहान असतो. अलक हा क्षुद्र कथाप्रकार सामान्यतः समाज माध्यमांवर आढळून येतो. तो अधिक जागा व्यापत नाही.

यात पुन्हा दोन उपप्रकार आहेत, सकारात्मक व नकारात्मक. सकारात्मक अलक मध्ये वाचकावर सकारात्मक परिणाम साधण्याचा प्रयत्न असतो तर, नकारात्मक अलकमधे त्याउलट प्रयत्न दिसतो.

सध्या काही नवे हौशी लेखक काही तरी ‘हटके’ करायचे म्हणून आवर्जून, प्रयत्नपूर्वक अलक लिहून विविध समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतात. आतपुढ म्हणजे ‘आले तसे पुढे ढकलले’ ही तर माध्यमांची संस्कृती. त्यामुळे ह्या अलक विविध समूहांवर फिरत असतात हे सत्य आहे.

मराठी कथा, लघुकथा, दीर्घकथा ह्या कथा प्रकारांना प्रदीर्घ, प्राचीन परंपरा आहेत. त्या सर्वश्रुत व सर्वपरिचित आहेत. त्यांना समाजानेही मानले आहे, स्विकारले आहे. थोडक्यात हे कथाप्रकार मराठी जनमानसात ‘सुप्रतिष्ठित’ झाले आहेत.

लघु आणि दीर्घ कथा

लघुकथा ही आकाराने, लांबीने लहान असली तरी ती एक पूर्ण कथा असते. दीर्घ कथा सुद्धा एक परिपू्र्ण कथा असून ती आकाराने काहीशी विस्तृत असते. त्यातील व्यक्तिमत्वे, प्रसंग, तपशील, कालमर्यादा इ. बाबतीत तिचा आवाका मोठा असतो.

सध्याच्या अलक

अलक हे कथेचे लघुकथेपेक्षाही अधिक लघुरूप असते असे गृहित धरले तरी ती एक पूर्ण कथा असावी येवढी अपेक्षा आहे. त्यातील कथानकात काही नाट्य, एखादी व्यथा, एखादा संदेश असे काहीतरी असायला हवे. प्रत्यक्षात मात्र पूर्ण कथानक सामावणारी, वरील सर्व किंवा काही लक्षणे असणारी अलक आजपर्यंत तरी माझ्या वाचनात आलेली नाही.

वाचनात आलेल्या तथाकथित अलक या पूर्ण कथा कधीच वाटल्या नाहीत. एखादे वाक्य, दोन-चार वाक्यात मांडलेला एखादा विचार, एखादा प्रसंग येवढाच त्यांचा जीव असतो. त्याला कथा असे म्हणताच येत नाही.

काही तरी नवीन करण्याच्या हेतूने काही उत्साही मंडळींनी अलिकडे हा उथळ कथाबंध हाताळायला सुरुवात केली आहे. पण त्यात चमकदार, विस्मयकारी कल्पना, हळुवार अनुभूती, एखादा कलापूर्ण प्रतिभाविष्कार आहे असे काहीही अजून तरी वाचनात आलेले नाही.

अलका – चारोळी

गेल्या तीन-चार दशकापूर्वी अस्तित्वात आलेला हा एक उथळ काव्यप्रकार असला तरी बऱ्यापैकी लोकप्रिय होत आहे. विशेषतः यात तत्कालिक राजकीय व्यंगे मांडलेली असल्याने, काही चिमटे, कोपरखळ्या, टपला, चपेटे असल्यामुळे त्या त्वरित दाद घेऊन जातात. याअति लघु काव्याला आपण ‘अलका’ म्हणूया. अशा चारोळीत अगदी लहान कथाबीज, विचारबीज असते. त्या अगदी अल्पजीवी असतात.

अलका – हायकू

‘हायकू’ हा तीन ओळींचा काव्यप्रकार म्हणून हा ही ‘अलका’. हा जपानी भाषेत लोकमान्य झाला असला तरी प्रयत्न करूनही मराठीत तो कधीच रुजला नाही. शिरीष पै यांनी या काव्यप्रकारात काही लेखन केले आहे पण त्यांच्याखेरीज इतर साहित्यिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. प्रतिभावान कवियत्री शांता शेळके यांनी काही जपानी हायकूंचा मराठीत अनुवाद करून त्याचे ‘पाण्यावरील पाकळ्या’ नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले आहे. पण असे काही तुरळक प्रयत्न सोडले तर हायकू मराठी मनाला आकर्षित करू शकले नाही हे वास्तव मान्य करावे लागेल.

अलका – सुभाषित

या पार्श्वभूमीवर संस्कृत वाङमयातील अत्यंत प्रभावी लोकप्रिय ‘सुभाषित’ ह्या लघुकाव्य – ‘अलका’ प्रकाराचा उल्लेख अटलनीय आहे.

जगातील भाषांमधील सर्वोत्कृष्ट भाषा ‘संस्कृत. ‘ त्यातील काव्य सर्वोत्तम आणि काव्यातही सर्वोत्कृष्ट प्रकार म्हणजे सुभाषित!

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण-भारती।

तस्माद्धि काव्यम् मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

सुभाषिताची व्याख्या

मिताक्षरं हितं सभ्यं वैश्विकं सार्वकालिकम् ।

सालंकृतं स्वयंपूर्णं सुबोधं तत् सुभाषितम् ।।

कमीतकमी शब्दयुक्त, हितकारक, सभेत शोभून दिसेल असे, विश्वात सर्वत्र आणि सर्वकाळी लागू पडणारे, अलंकार-युक्त, अर्थाने परिपूर्ण आणि हे सर्व असुनही जे समजण्यास सोपे असते, त्याला ‘सुभाषित’ असे म्हणतात.

अलका – शायरी

उर्दू भाषेतील ‘शेरोशायरी’ हा ही असाच एक अति लघु काव्यप्रकार- अलका विलक्षण लोकप्रिय आहे. अँड. भाऊसाहेब पाटणकरांनी सिद्ध केलेला, बोली भाषेत लिहिलेला ‘मराठी शायरी’ हा काव्यप्रकार विलक्षण प्रभावी, परिणामकारक आहे. त्याची भाऊसाहेबांनी दार्शनिक पद्धतीने केलेली व्याख्या अशी…

भावोन्मादोत्थित कल्पनाचमत्काराविष्कार विशेषः शायरी। कल्पना चमत्कृतित्वंतु विस्मय सहकृत सदभिव्यंजकत्वम्।

उत्कट भावनेतून निर्माण झालेल्या सद्भिव्यंजक अशा विस्मयकारक कल्पनेच्या अविष्काराचे एक तंत्र असा मी वरील व्याखेचा सामान्यतः अर्थ लावतो.

दुर्दैवाने भाऊसाहेबांच्या या मराठी शायरीचा वारसा पुढे चालवणारा कोणी शायर लाभल्याचे आढळात नाही. परिणामी पूर्णतः सप्रमाण, सप्रात्यक्षिक सिद्ध करून सुद्धा भाऊसाहेबांच्या पश्चात मराठी शायरी अंकुरली, फोफावली नाही. तिची परंपरा निर्माण झाली नाही.

वरील वाङमय प्रकारांचा विचार करता सध्याच्या ‘अलक’ अगदीच पुचाट, बेंगरूळ, रसहीन, अर्थहीन वाटतात.

ज्यांना ‘अलक’ हा कथाप्रकार सोईचा वाटतो, प्रभावी वाटतो, आवडतो त्यांनी लिहावे. वाचकांनी आपापल्या क्षमतेप्रमाणे त्याचे रसग्रहण, मूल्यमापन करावे आणि ठरवावीत आपापली मते. अलकविषयी मी माझी ही व्यक्तिगत मते या निमित्ताने मांडतोय येवढेच.

🙏🏻🙏🏻🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अहिंसक आंदोलनाचे आणि सशस्त्र क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यातील मोल…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? विविधा ?

☆ “अहिंसक आंदोलनाचे आणि सशस्त्र क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यातील मोल…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

“दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल” हे गीत काव्यात्मक आणि राजकीय प्रतीक म्हणून महत्त्वाचे आहेच; मात्र त्यालाच फक्त स्वातंत्र्याचा इतिहास मानणे चुकीचे ठरेल. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार, सविनय कायदेभंग आणि भारत छोडो आंदोलनांनी ब्रिटिश सत्तेला व्यापक आव्हान दिले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लाखो सामान्य लोकांनी तुरुंगवास, लाठीमार, आर्थिक नुकसान आणि सामाजिक दडपशाही सहन केली. हे आंदोलन केवळ चरखा फिरवण्याचे आंदोलन नव्हते. मिठाचा सत्याग्रह, परदेशी मालावर बहिष्कार, कर न भरणे, संप, निदर्शने आणि ब्रिटिश प्रशासनाशी असहकार या सर्वांचा त्यात समावेश होता. त्यामुळे गांधीवादी संघर्षाचे प्रतीक म्हणून चरख्याचा उल्लेख करणे आणि संपूर्ण स्वातंत्र्यलढा चरख्यापुरता मर्यादित करणे यात मोठा फरक आहे हे आपल्यासारख्या सुज्ञ माणसांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्याच वेळी, क्रांतिकारकांचे योगदान महात्मा गांधींनीही कधीच नाकारले नव्हते, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. सशस्त्र क्रांतिवीरांचा संघर्ष भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. त्याचप्रमाणे आझाद हिंद सेनेचे प्रयत्न, १९४६ मधील रॉयल इंडियन नेव्ही उठाव आणि जालियनवाला बाग हत्याकांडानंतर निर्माण झालेला संताप यांनाही इतिहासाच्या व्यापक चौकटीत स्थान द्यावे लागते.

पण येथे एक महत्त्वाची राजकीय घडामोड लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणून ब्रिटिशांना क्रांतिकारकांच्या सशस्त्र संघर्षामुळेच भारत सोडावा लागला, असे म्हणणे अतिसुलभीकरण करणे होय. क्रांतिकारकांनी ब्रिटिश साम्राज्याला नैतिक, राजकीय आणि सुरक्षाविषयक आव्हान दिले, हे तर खरेच. त्यांच्या बलिदानाने तरुणांमध्ये राष्ट्रवादाची प्रेरणा निर्माण केली, हेही खरे. परंतु त्याच काळात दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनची आर्थिक व सामरिक परिस्थिती, भारतीय राजकीय जनमत, काँग्रेसचे व्यापक आंदोलन, मुस्लिम लीगचे राजकारण, सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया आणि ब्रिटिश साम्राज्याच्या बदललेल्या जागतिक परिस्थिती या सर्व घटकांचा विचार करावा लागतो. याहून महत्त्वाचे म्हणजे, रक्तरंजित इतिहास आणि अहिंसक इतिहास ही परस्परविरोधी विभागणीच चुकीची आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा रक्तरंजितही होता आणि मोठ्या प्रमाणावर अहिंसकही होता. चौरी चौरा, जालियनवाला बाग, क्रांतिकारकांच्या फाशी, पोलिसांचा गोळीबार, तुरुंगातील अत्याचार आणि विविध उठाव हा त्याचा एक भाग आहे; तर सत्याग्रह, असहकार, बहिष्कार, उपोषणे, मोर्चे, जनआंदोलने आणि लाखो लोकांचा अहिंसक सहभाग हा दुसरा भाग आहे. एवंच एका प्रवाहाचे अस्तित्व मान्य करण्यासाठी दुसऱ्याला पुसून टाकण्याची गरज नाही. अन्यथा सेक्युलर विचारसरणी आणि हिंदुत्ववादी विचारसरणी यात फरक तो काय राहील?

म्हणूनच चरखा फिरवून स्वातंत्र्य मिळाले नाही, हे वाक्य अर्धसत्य आहे. कारण चरखा ब्रिटिश साम्राज्याचा पराभव करणारे शस्त्र नव्हता; तर तो आर्थिक स्वावलंबन, स्वदेशी आणि जनसहभागाचे प्रतीक होता. त्याचप्रमाणे भगतसिंगांची पिस्तूल किंवा आझाद हिंद सेनेची शस्त्रेही एकट्याने ब्रिटिश साम्राज्याचा पराभव करू शकली नाहीत. स्वातंत्र्य मिळवून देणारी शक्ती म्हणजे अनेक दशकांच्या विविध प्रकारच्या प्रतिकाराचा एकत्रित ऐतिहासिक परिणाम होता. म्हणून ध्वजारोहणाच्या वेळी एखादे गांधीवादी गीत वाजवले म्हणजे क्रांतिकारकांचा अपमान होतो, असे सरळ समीकरण मांडणे हे आपल्या देशभक्तीच्या विचाराला संकुचित करते. त्याऐवजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, सावरकर, टिळक, आझाद हिंद सेनेचे सैनिक, नौदल उठावातील सहभागी आणि असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक, या सर्वांच्या योगदानाची वस्तुनिष्ठ जाणीव ठेवणे अधिक योग्य ठरेल.

खरा इतिहास कोणत्याही एका महापुरुषाच्या किंवा एका विचारधारेच्या मालकीचा नसतो. भारताचे स्वातंत्र्य हे एका व्यक्तीचे कर्तृत्व नव्हते आणि एका विचार पद्धतीचेही फलित नव्हते; ते विविध विचारांचे, विविध संघर्षपद्धतींचे आणि असंख्य ज्ञात-अज्ञात भारतीयांच्या त्यागाचे संचित होते. म्हणून फक्त अहिंसेमुळे स्वातंत्र्य मिळाले, हे जसे अर्धसत्य आहे, तसेच फक्त सशस्त्र क्रांतीमुळे स्वातंत्र्य मिळाले, हेही अर्धसत्यच आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासाला खरा न्याय द्यायचा असेल तर चरख्याबरोबर क्रांतिकारकांचे रक्त, सत्याग्रहाबरोबर तुरुंगवास, जनआंदोलनांबरोबर सशस्त्र उठाव आणि राजकीय वाटाघाटींबरोबर साम्राज्याच्या अंतर्गत झालेला दबाव, या सर्व घटनांना योग्य ऐतिहासिक संदर्भात पहावे लागेल. असे केले तरच एकांगी विचार न करता स्वातंत्र्याचा खरा अर्थ उमगेल आणि समजेल. 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शतक महोत्सवी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ शतक महोत्सवी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

९ ऑगस्ट २०२६.

शतकमहोत्सवी अ.भा.मराठी साहित्य संमेलनानिमित्ताने

(हे मनोगत  सर्व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी असून ते कुणाच्याही विरोधी नाही).

 ———

पुण्यात, शंभरावे अखिल भारतीय पातळीवरचे मराठी साहित्य संमेलन जानेवारी २०२७मध्ये संपन्न होत आहे.

 २०२४ मध्ये केंद्र शासनाकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त मिळाल्यानंतर, मराठीची सध्याची स्थिती आणि उज्वल इतिहासाची चर्चा करण्यासाठीचे हे मोठे व्यासपीठ असणार आहे.  

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर, या भाषेच्या विकासाची चर्चा सगळीकडं झडत असताना, इथं मी काही विचार मांडू इच्छितो.

प्राचीनता, समृध्द साहित्यिक वारसा आणि अद्वितीय सांस्कृतिक महत्व, अशा निकषांवर मराठीचे महत्व राष्ट्रीय पातळीवर या निर्णयाने मान्य केले आहे.

या चांगल्या निर्णयाने, केंद्राकडून मराठी भाषेच्या विकासासाठी भरीव आर्थिक मदत मिळणार आहे.यातून काही शैक्षणिक पदे निर्माण होतील अशी आशा वाटते.

यातून  मराठी भाषेचा सखोल अभ्यास, संशोधन  होऊ शकेल ह्या बाबी नक्कीच आनंददायक आहेत.

पण या सकारात्मक बाबींनी हुरळून जाण्याची गरज नाही.

मराठी भाषेचा विकास व्हावा, अशी इच्छा बाळगणाऱ्या सर्वसामान्य  माणसाच्या भूमिकेतून काही मुद्दे स्पष्ट करतो.

व.पु.काळे एका ठिकाणी म्हणतात तसं, ‘स्काय इज द लिमिट’ असं  वाक्य  प्रचलित असलं तरी,प्रत्येकानं आपापलं आकाशाचा आवाका  ओळखला पाहिजे, निश्चित केला पाहिजे.

सर्वसामान्य माणसाला या परिस्थितीत काय करणं शक्य होईल?

१) अगदी प्राथमिक शाळेपासून विद्यापीठापर्यंत ज्या अनेक संस्था आहेत, त्या शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची केंद्रं आहेत; जिथं सळसळत्या तरूणाईने भारलेले तरूण असतात.अशा केंद्रांतून वक्तृत्व, वादविवाद, चर्चासत्रे, निबंध अशासारख्या, तेथील  तरूणांना  सहभागी करून घेणारे लोकप्रिय उपक्रम/ स्पर्धांचे आयोजन करून, या तरुणाईच्या माध्यमातून मराठीवर सतत चर्चा घडवून आणता येईल.

अध्ययन आणि अध्यापन यांचे माध्यम हे मराठीतूनच करण्याचा आग्रह धरला जावा.या दृष्टीने संबंधित अभ्यासमंडळांनी अभ्यासक्रम/पूरक साहित्य हे  सुलभ मराठीत तयार करण्याचा प्रयत्न करावा.

२) समाजात आर्थिक उलाढाली होणाऱ्या  संस्था (उदा.बॅंका, सहकारी पतपेढ्या इ .),न्यायालये,विविध शासकीय,अशासकीय,निमशासकीय संस्था या नियमितपणे लोकांच्या जीवनाशी संबंधित असतात.

त्यांच्यातून  लोकांना मदत आणि माहिती घेऊन लाभ घेण्याच्या दृष्टीने,त्यांच्यातील   व्यवहार सोप्या, सुटसुटीत मराठीत होणे गरजेचे आहे.अनेक संस्थांचे तसे मराठीत व्यवहार चालतात. मात्र,’त्याची उपयुक्तता आणि लोकांना त्यात काही अडचणी वाटत नाही का? त्यात  सातत्याने  बदल’ करता येईल का? ‘यावर नेहमी स्थानिक लाभधारक लोकांकडून फिडबॅक घेणे आवश्यक आहे.

३) ‘बारा मैलावर भाषा बदलते ‘असं म्हणतात.

ठिकठिकाणच्या भौगोलिक,सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीतीनुसार विविध ठिकाणच्या बोलीभाषा बोलल्या जातात आणि बदलतातही.

या बोलीभाषा लोकांच्या संवादाचे जसे माध्यम असतात, तसेच ते   संबंधित संस्कृतीचे प्रतिकही असतात.

भाषा ही काळानुसारही बदलते.बोलीभाषेची वैशिष्ट्ये,सामाजिक  व्यवहारात त्यांचे स्थान, त्यांच्या प्रसारासाठी ज्ञात आणि अज्ञात व्यक्तिं/ संस्थांनी केलेले योगदान याचेही  विविध स्तरांवर संशोधन झाले पाहिजे.

आपल्याकडे संशोधनालाही काही चौकटी असतात. त्यामुळे  सर्वसामान्य माणसाला त्याची भिती आणि पर्यायाने तिटकारा येतो आणि तो संशोधनापासून बाजूला रहातो.समाजातील प्रश्नांची उकल करण्याचे  आणि

काही चमकदार बाबी शोधण्याचे ते उत्तम साधन असते, असा दृढ विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला तर, संशोधन ही त्याची आवड आणि छंद होईल. मराठी साहित्य विकासात त्याचा उपयोग करून घेता येईल.

आपल्याकडे छपाईचे तंत्र विकसित होत असताना, इथं पुण्यातल्या पेशव्यांची सत्ता होती. म्हणून त वापरतात ती मराठी  भाषा ही ‘प्रमाण मराठी’ समजली  जाऊ लागली. तरीपण इतर बोलीभाषा (उदा. मालवणी,अहिराणी इ.)

याही मराठीचे वैभव आहेत.  

आज इंग्रजी ही जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा समजली जाते.मला वाटतं की, याचं एक कारण म्हणजे जगातील अनेक भागांत राज्य करताना, इंग्रजांनी ती सगळीकडे नेली .पण इंग्रजीत अनेक  स्थानिक  शब्दांचा आंतर्भाव आहे.आपल्याकडील ‘ट्रॅफिक जॅम’ हा शब्दही त्यापैकी एक असावा.

आजच्या सोशल मिडियाच्या  काळात मराठी बोलताना, इतर भाषांची त्यात सरमिसळ झाली म्हणून ती अशुद्ध झाली किंवा तिच्यावर आक्रमण झाले असं समजणं चूक आहे.

जोवर मराठी माणूस  जिवंत आहे,तोवर मराठीही 

भिती नाही हेच खरं.

मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त मी एक कविता लिहिली होती.तिची आठवण येते ;

‘देशाच्या शीर्षनगरी

साहित्य संमेलन होताना,

संसदेच्या कोर्टात

न्याय मिळाल्याचा आनंद ओसंडून वहाताना,

उधळा गुलाल

होऊन बेभान,

ठेवा फक्त एक भान;

अमृताच्या पैजा जिंकणारी,

चामुंडराये करवियलेली

ही श्रीमंत भाषा

सरकारी हापिसातून झिरपू द्या,

इथल्या माणसांची तहान त्याने भागू द्या;

कोर्टातून, बॅंकांतून

आणि शाळा काॅलेजांतून ती खेळू द्या,

रडणा-यांचे डोळे

पुसणारे

ते हसरे फूल होऊ  द्या!’

मराठी वापरा,मराठी वाढवा  आणि मराठी वाचवा…

या निमित्ताने अजून दोन बाबींचा उल्लेख करणं मला आवडेल.

१) महाराष्ट्रातील लोकजीवनाच्या  विद्यापीठाचे अनभिषिक्त निरक्षर कुलगुरू असा ज्याचा  गौरव केला जातो,त्या पूज्य गाडगेबाबांच्या  कीर्तनाचे वर्णन करताना एका अभ्यासक सांगत होते की,एखाद्या गावातील बाबांचे कीर्तन हा एक अवर्णनीय सोहळा असे.कुठेतरी पटांगणावर कंदिलाच्या किंवा पेट्रोमॅक्सच्या उजेडात बाबांच्या कीर्तनाला त्या गावच्या आजूबाजूलाच्या परिसरातील हजारो माणसं उपस्थित असत.अगदी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या कीर्तनात, तेव्हा खेड्यात लाईट असणं अशक्य.आणि म्हणून माईकही बहुतेक  वेळा नसायचा. पण कीर्तनात मधूनमधून  बाबा दोन्ही हात वर करून ‘गोपाला,गोपाला देवनकीनंदन गोपाला’ असं पालुपद  म्हणत;  तेव्हा तिथं हजर असलेली ती सर्व माणसंही मोठ्यांदा ते म्हणत. कीर्तनाच्या  शेवटी बसलेल्या माणसांना विचारलं की,’इतक्या दुरून तुम्हाला बाबांचं कीर्तन ऐकायला येत नसेल तरी तुम्ही का येता?’

यावर त्यांचं उत्तर विलक्षण होतं.उत्तर होतं,”आम्ही गाडगेबाबांचं कीर्तन पहायला येतो”. कीर्तन ऐकता येतं हे आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत. पण कीर्तन पहाणं जो केवळ वाक्प्रचार नव्हता; तर ते आपलेपणाचं नातं सांगणारा जिव्हाळा होता.मराठी भाषेला नवीन वाक्प्रचार होता.

माझ्या माहितील  एक कुटुंब सुट्टीत सिंहगडावर  गेलं होतं.

सिंहगड;तिथं डोंगर, झाडी  होतीच.

पायवाटही काहीशी ओबडधोबड होती.

गडावरून पायी उतरताना त्या कुटुंबातील छोटी मुलगी अचानक ओरडली,” आई,किंचोळा”.तिनं एक कीटक पाहिला होता.मात्र पाहिलेला किटक तिच्या शब्दांत किंचोळा होता.

माझ्यामते  तरी तो नवीन शब्द असेल. अशी अनेक उदाहरणं आहेत की,जेथे सर्वसामान्य माणूस व्यवहारात नकळत नवनवीन शब्द/वाक्ये किंवा वाक्प्रचार निर्माण करतो.मला वाटतं यातून भाषा समृद्ध होत  जाते. 

अनेक शिक्षणसंस्थांतून, मराठी भाषेवर संशोधन सुरू आहे.त्यांनी अशा नवीन शब्दांना संकलित केलं तर हा चांगला उपक्रम असेल,

२) आणखी एक विचार.अर्थात अनेकजण ते बोलतातही. त्याचा पुनरूच्चार करतो इतकंच.

 मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्यांनी नियमित नव्हे तर जमेल तसं काही कुटुंबांशी बोलावं आणि एकतरी मराठी पुस्तक विकत घेऊन ते वाचावं असा सल्ला द्यावा. त्यांनी

जमल्यास, त्यावर इतरांशी बोलावं.अगदी कुणाला शक्य नसेल तर, आपण जिथं काम करतो तिथं तरी फावल्या वेळात मराठी पुस्तकांवर चर्चा करता येईल.किंवा सोशल मिडीयावरूनही यावर इतर उहापोह करता येईल.मराठी  न बोलल्या  जाणाऱ्या  कुटूंबात याची गरज काय? असा मुद्दा उपस्थित होईलही.अशा ठिकाणी  त्यांचं म्हणणं   शांतपणे ऐकून, जगण्याच्या व्यवहारात  मराठी वापरणं ही गरज आहे,हे त्यांना पटवून देऊन, त्यांच्या  आवडीच्या  विषयांतील  लहान लहान  पुस्तकं  सुचवता येतील. अर्थात अशी सूचना करताना,कोणतीही राजकीय किंवा सांप्रदायिक विचारसरणीचा प्रचार करू  नये हे पथ्य  कसोशीने  पाळावे.

काही मराठी भाषेतील  समूहांवर  याविषयी उत्तम उपक्रम सतत सूरू असतात.हे नक्कीच आनंददायक आणि अनुकरणीय आहेत. त्याच्या पटी वाढवल्या जाव्यात.

———-

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक आणि म.फुले अध्यासनाचे माजी समन्वयक,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,

ईमेल- sks.satish@gmail.com मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विहंगावलोकन… ☆ दीपा नारायण पुजारी ☆

दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ विहंगावलोकन…  ☆ दीपा नारायण पुजारी ☆

विहंगावलोकन, विहंग + अवलोकन अशी फोड असणारा हा तसा समजायला सोपा शब्द. विहंग करणारे ते पक्षी. पक्षी विहंग करतात, म्हणजे आकाशात उंच उंच जातात. उंच विहार करु शकतात. तेथून ते खाली जमिनीवर लक्ष ठेऊ शकतात. थोडक्यात, विहंगावलोकन म्हणजे उंचीवरून केलेलं अवलोकन, निरीक्षण. घार, गरुड, गिधाडे असे काही पक्षी, इतर पक्ष्यांच्या तुलनेत जास्त उंचावरुन उडतात. यातील घार आपल्याला जास्त परिचीत आहे. दोनशे ते पाचशे फूट उंचीवरून उडणारी घार, जमिनीवरील भक्ष्य शोधते, तसेच आपल्या पिल्लांवरही नजर ठेवून असते. तिची नजर खूपच तीक्ष्ण असते. घारीची नजर हा वाक्प्रचारही आपण वापरतो.

विहंगावलोकन म्हणजे कोणत्याही बाबीकडे, प्रकरणाकडे, घटनेकडे, सूक्ष्म, अतिसूक्ष्म नजरेने पाहणे. या क्रियेत अतिशय बारीक सारीक मुद्दे विचारात घेतले जातात. हे काम नक्कीच सोपं नसतं. क्लिष्ट असतं. ज्या गोष्टीचा असा अभ्यास करायचा आहे, त्या गोष्टीची सखोल माहिती असणं आवश्यक असतं. त्या क्षेत्रातील कामाचा अनुभव असणं गरजेचं असतं. मुळात त्या गोष्टीकडं एकाच अंगानं न बघता अनेक कोनातून बघावं लागतं. त्या गोष्टीचा सर्वांगानं अभ्यास करावा लागतो. असा सर्वंकष विचार आपण कधीतरीच करतो. बऱ्याच वेळा तो करतच नाही. पण आपल्या आवडीच्या गोष्टीकडं मात्र आपण सर्वांकष नजरेने बघू शकतो.

एखादं ऑफिसचं काम, अभ्यास, एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन असा सर्वंकष विचार करून केला जातो तेव्हा ते किती उत्कृष्ट होतं ना! आपण कधी असा विचार केला आहे का; आपल्या कृतीचं, विचारांचं किंवा आपण केलेल्या एखाद्या कामाचं असं विहंगावलोकन करणं गरजेचं आहे? बहुतेक वेळा आपण तसा विचार करत नाही. कधी कधी आपण उगाचच आपलं मत मांडून रिकामे होतो. घडलेल्या गोष्टीविषयी मत मांडणं फारच सोपं असतं. परंतु साधक-बाधक दृष्टीने विचार करून बोलणं फार कठीण! एखाद्या वेळेस अशी आपणच आपली उलट तपासणी केली तर! आपणच आपल्या कृतीचं कामाचं मनात आलेल्या विचारांचं किंवा बोलून दाखवलेल्या वाक्याचं असं विहंगावलोकन केलं तर? यामुळे आपली शिकण्याची क्षमता वाढेल. स्वजागरूकता निर्माण होईल. भोवतालच्या परिस्थितीचा योग्य अंदाज येईल.

काम झाल्यानंतर स्वतःला प्रश्न विचारावेत. हे बरोबर झाले आहे का? योग्य आहे का? याचा काय परिणाम होईल? आणखी कोणत्या पद्धतीनं आपल्याला ते करता येईल? थोडक्यात, स्वतःच आत्मपरीक्षण करण्याची सवय लावून घ्यायला हवी. त्यामुळे आपण कुठं आहोत? काय करायचं आहे? कसं करायचं आहे? याचा आढावा घेता येणं शक्य होईल. कोणत्याही विषयावर प्रभुत्व मिळवायला हा विचार, हे प्रश्न नक्कीच मदत करतील. त्यामुळे अघटीत गोष्टी टाळता येतील, हो ना? अनिश्चितता टाळायलाही, भीती कमी करायलाही असं परीक्षण उपयोगी पडेल. आत्मबल वाढेल. प्रश्न सोडवण्याची क्षमता वाढेल. आपल्या भावनिक कक्षा रुंदावतील आणि मानसिक आरोग्य ही सुधारेल. ही गोष्ट खूप कठीण नक्कीच नाही. का, कशासाठी, कधी, कसे, केव्हा किंवा आणखी कोणते पर्याय? असे प्रश्न आपणच आपल्याला विचारायचे. आपलंच निरीक्षण करायचं. उत्तर शोधायचं. हं, दुसऱ्याकडे बोट दाखवणं सोपं असतं. त्यापेक्षा आपण आपल्याकडेच बोट दाखवू. आपल्या मनातून आपल्यातल्या ‘मी’ ला थोडं बाहेर काढू आणि ‘मी’ ला बाहेरून तपासून बघू. आपणच आपली उन्नती करून घेऊ. हेच तर आहे विहंगावलोकन.

सोप्पं वाटलं तरी हे तसं अवघड आहे. कारण हे एक प्रकारचं आत्मपरीक्षण आहे. स्वतःला तपासणं आहे. स्वतःतील उणीव शोधणे आहे आणि अशी उणीव शोधायला फारसं आपल्याला आवडत नाही. जरी उणीव लक्षात आली, तरी स्वीकारून बदल करायला त्याहूनही कठीण. पण हे साधायला पाहिजे. स्वतःची प्रगती करण्यासाठी, स्वतःला उन्नत करण्यासाठी ही गोष्ट आपण शिकली पाहिजे. हे घडेल तेव्हा आपण जास्त समाजाभिमुख होऊ. तसेच आपणच आपल्याला शिकवून शहाणं करू.

 

© दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares