मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २१ – भाग ५ – कॅनडा ऽ ऽ राजा सौंदर्याचा ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २१ – भाग ५ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कॅनडा ऽ ऽ  राजा सौंदर्याचा ✈️

कोलंबिया आइसफिल्डपासून जवळच एक अद्भुत वास्तव आमची वाट पहात होतं. ते म्हणजे ग्लेशियर स्कायवॉक! सनवाप्ता या निसर्गरम्य, सुशांत,  सुंदर, अनाघ्रात दरीखोऱ्याचं दर्शन प्रवाशांना आकाशातून मनमुक्त उडणाऱ्या पक्ष्याप्रमाणे घेता यावं या कल्पनेचा ध्‍यास कॅनेडियन इंजिनियर्सनी घेतला. तज्ज्ञ इंजिनियर्सनी अनेक वर्षं परिश्रम करून या स्कायवॉकचा आराखडा बनविला.स्टील, ग्लास आणि लाकूड यांचा वापर करून पर्वतकड्याच्या टोकावरून  एक अर्धवर्तुळाकार वॉक वे बनविण्यात आला. विशेष प्रकारच्या क्रेनच्या सहाय्याने ही काचेची लंबगोल जमीन बसविण्याचे काम २६ जुलै २०१३ रोजी पूर्ण झाले. संपूर्ण काचेची जमीन असलेला हा ‘ऑब्झर्वेशन वॉक वे’ सनवाप्ता दरीच्यावर २८० मीटर ( ९१८ फूट )वर उभारलेला आहे.  अधांतरी वाटणाऱ्या या काचेच्या जमिनीवर पहिली पावलं टाकताना नक्कीच भीती वाटते. समोरच्या पर्वतावरचे ग्लेशियर, त्यातून ओघळणारे, कुठे थबकलेले  हिमशुभ्र बर्फाचे प्रवाह, खालच्या खोल दरीमध्ये उड्या घेणारे धबधबे, पर्वत उतारावरील सूचिपर्णी वृक्ष, उतरणीवर चरणारे माउंटन गोट्स आणि बिगहॉर्न शिपस् असे विहंगम दृश्य कितीतरी वेळ त्या अर्धवर्तुळाकार, अधांतरी वाटणाऱ्या काचेच्या जमिनीवरुन पाहता आले. चालताना आपल्या पायाखाली पर्वतशिखरे आणि खोल दरी आहे ही अद्भुत, स्वप्नसुंदर कल्पना प्रत्यक्ष अनुभवण्याचा देवदुर्लभ आनंद मिळाला. या वॉकवेला ‘वर्ल्ड आर्किटेक्चर फेस्टिवल’ॲवार्डने सन्मानित करण्यात आले आहे.

सरळसोट आठ पदरी हायवेने जास्पर इथे पोहोचलो.कॅनडाच्या पूर्वेकडील न्यू फाउंड लॅ॑डपासून पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबियापर्यंतचा ट्रांन्स कॅनडा हायवे हा ८००० किलोमीटर ( ५००० मैल )  चा अत्यंत सुंदर मार्ग आहे. ट्रेनने  पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जाणाऱ्या कॅनेडियन रेल्वेने हा प्रवास चार दिवस आणि पाच रात्रींचा आहे. पर्वतरांगा, त्यावरील घनदाट जंगले, प्रचंड मोठे शेती व फळ विभाग, खूप मोठ्या प्रेअरीज ( मांस निर्यातीसाठी जोपासना केलेले पशुधन ), सायकलिंग, ट्रेकिंगचे वेगळे मार्ग आणि जलमार्गाजवळून बांधलेले मालगाड्यासाठींचे  वेगळे मार्ग हे दृश्य सतत पाहायला मिळते. कॅनडाच्या पूर्व-पश्चिमेला जाणाऱ्या या मालगाड्यातून गहू, पशुधन, न्यूजपेपर व इतर पेपर पल्प बनविण्यासाठी लागणारे प्रचंड मोठे लाकडी ओंडके, खनिजे यांची सतत वाहतूक सुरू असते.

जास्परमधील सुबक बंगले गुलाब, डेलिया, जास्वंदासारख्या सुंदर फुलझाडांनी नटलेले होते .जांभळे हिरवे पोपटी तुऱ्यांचे गवत आणि रस्त्यामध्ये शोभिवंत फुलझाडांच्या मोठमोठ्या कुंड्या होत्या. आमच्या हॉटेलसमोर रॉकी माउंटन रेल्वेचे स्टेशन होते. सभोवतालच्या निळसर हिरव्या पर्वतरांगामुळे थंडी वाढली होती. हॉटेलच्या अंगणात  निळसर ज्योतींची लांबट चौकोनी शेकोटी ठेवली होती. शेकोटीभोवती ठेवलेल्या खुर्च्यांवर बसून शेक घेताना मजा वाटत होती.

तिथे आणखी एक मजा अनुभवली. आमच्या हॉटेलमधून जेवणासाठी आम्हाला जवळच्याच एका भारतीय हॉटेलमध्ये जायचे होते. त्या हॉटेलचे तरुण मालक गोपाळ व सविता शेळके हे आठ वर्षांपूर्वी नाशिकहून येऊन इथे स्थिरावले आहेत. दोघेही कुशल पाकतज्ज्ञ आहेत. हॉटेलमध्ये परदेशी लोकांची  भरपूर गर्दी होती. माझी मैत्रीण शोभा म्हणजे जगन् मित्र! शोभाची या दोघांशी लगेच मैत्री झाली आणि शोभाने तिचा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडला. दुसऱ्या दिवशी चतुर्थी होती. काही जणांचा पक्का उपवास तर आमच्यासारख्या काही जणांचा लंगडा उपवास होता. शोभाने त्यांच्या किचनमध्ये बटाट्याच्या उपासाच्या काचर्‍या करण्याची परवानगी मिळवली. नयनाच्या मदतीने दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे काचऱ्या बनविल्या. स्वतः गोपाळ यांनी शोभाने दाखविल्यासारख्या बारीक काचऱ्या कापून दिल्या व मोठ्या कढईत ढवळूनही दिल्या.त्यांच्याकडून काकड्या बारीक चिरून घेतल्या. आम्ही तिथल्या स्टोअर्समधून प्रत्येक ठिकाणी दही- ताकाची खरेदी करीत होतो. इथे शोभाने स्टोअर्समधून पीनट बटरची बाटलीही घेतली. नयनाच्या मदतीने, गोपाळच्या सहकार्याने त्याची झकास दाण्याची आमटी बनवली. गोपाळ आणि सविताने साऱ्याचे पॅकिंग केले. कारण आम्हाला तिथून साडेअकरा वाजता निघून साडेचारशे किलोमीटरवरील कामलूप्स इथे पोचायचे होते. या मार्गावर आम्ही वाटेत केलेला फराळ हा ‘दुप्पट खाशी’ या सदरात मोडणारा होता. बटाट्याच्या काचऱ्या, काकडीची कोशिंबीर, दाण्याची आमटी,नयनाने घरून भाजून आणलेल्या साबुदाण्याचा जिरे, मिरचीची फोडणी घातलेला दही- साबुदाणा शिवाय पक्का उपवासवाल्यांनी आणलेले डिंकाचे लाडू आणि फराळी चिवडा असा भरभक्कम मेनू होता. गोपाळ सविताचा निरोप घेताना आम्ही छान छोट्या पर्समध्ये काही डॉलर्स घालून सविताला दिले आणि मुंबईहून आणलेला खाऊ गोपाळला दिला. ‘आम्हीपण आज छान नवीन पदार्थ शिकलो’ असे म्हणत त्या दोघांनी भरल्या डोळ्यांनी आम्हाला ‘अच्छा’ केलं.कॅनडामध्ये  संस्मरणीय चतुर्थी साजरी झाली. अर्थातच फराळापूर्वी आम्ही अथर्वशीर्ष म्हणायला विसरलो नाही.

जास्पर नंतर ‘ब्रिटिश कोलंबिया’ हा विभाग सुरू होतो. वाटेत ऊन-पावसाचा खेळ चालू होता. खूप मोठी पोपटी कुरणे, त्यात चरणाऱ्या धष्टपुष्ट गाई, उतरत्या दगडी छपरांची घरे, काळपट हिरवे पाईन वृक्ष, नद्या आणि धबधबे यांची नेहमीची साथ-संगत होतीच.कामलूप्स हे डोंगरमाथ्यावरचे एक छोटे ,स्वच्छ- सुंदर शहर आहे. दुसऱ्या दिवशी कामलूप्सहून साडेतीनशे किलोमीटर्सचा प्रवास करून व्हॅ॑क्यूव्हरला पोहोचलो.

पूर्वेकडे रॉकी माउंटन्स आणि पश्चिमेकडे पॅसिफिक महासागर अशा देखण्या कोंदणात व्हॅ॑कूव्हर वसले आहे. व्हॅ॑कूव्हरमधील ‘लायन्स गेट ब्रिज’ ओलांडून कॅपिलोनो  इथली सामन (Salman ) हॅचरी बघायला गेलो. कॅपिलानो नदीवरच्या धरणाजवळ सामन माशांचे प्रजोत्पादन केंद्र आहे. हे मासे प्रवाहाविरुद्ध पोहत जाऊन अंडी घालतात. त्यांची शिकार करण्यासाठी अस्वले टपून बसलेली असतात. गंडोला राइडने ग्रूझ पर्वतशिखरावर गेलो. इथे पूर्वीच्या काळचे शिकारी, ट्रेकर्स, अस्वले, घुबड यांचे मोठमोठे लाकडी पुतळे बनविलेले आहेत. दुपारी लंबर शो झाला. पूर्वी भल्यामोठ्या लाकडी ओंडक्यांचे तुकडे कसे करीत, त्यापासून बनवलेल्या विविध वस्तू, ६० फूट उंच वृक्षाच्या ओंडक्यावर सरसर चढत जाणे, इतक्या उंचावरून विविध कसरती करणे, या ओंडक्यावरून तशाच दुसऱ्या ओंडक्यावर तारेवरून घसरत जाणे असे धाडसी खेळ दोघांनी करून दाखविले. त्याला एका स्त्रीच्या उत्साही निवेदनाची जोड होती.

या ३००० फुटांवरील पर्वतमाथ्यावरून, छोट्या उघड्या केबलकारमधून ६००० हजार फूट उंचीवर जाताना कॅपिलानो नदी,पाइन वृक्षराजी, डोंगरमाथे यांच्या डोक्यावरून केबलकार जात होती. सूचीपर्ण वृक्षांचे शेंडे जवळून बघायला मिळाले. या वृक्षांची पाने पुढून पोपटी व मागे काळपट हिरवी होती. अधून-मधून त्यावर लाल बोंडं दिसत होती. त्यामागे निळसर हिरवे कोन होते. केबलकारने परतताना काही तांत्रिक अडचणीमुळे सर्व केबलकार्स अडकून स्तब्ध झाल्या. खूप उंचावरच्या त्या उघड्या ,अधांतरी, झुलत्या केबलकारमध्ये बसून आम्ही आजूबाजूच्या केबलकार्समधील देशोदेशींच्या लटकलेल्या प्रवाशांशी ‘हाय हॅलो’ करीत, गप्पा मारत खालच्या दरीकडे बघण्याचे टाळले. थोड्या वेळाने दुरुस्ती होऊन कार्स चालू झाल्या.

‘कॅपिलानो सस्पेन्शन ब्रिज पार्क’मधील सस्पेन्शन ब्रिज त्याच्या कठड्याला धरून,  हलत-डुलत, थांबून- थांबून, धीर एकवटून क्रॉस केला. या पार्कमध्ये १००० हजार वर्षांहून अधिक वयाचे वृक्ष आहेत. या रेन फॉरेस्टमध्ये डग्लस फर,रेड सिडार,हॅमलॉक असे ३००-३५० फूट उंच वृक्ष निगुतीने सांभाळले आहेत. एके ठिकाणी जंगली घुबड बॅटरीसारखे डोळे विस्फारुन बसले होते. एका मोठ्या तळ्यामध्ये ट्राउट  मासे उड्या मारीत होते.

या पार्कमधील ‘ट्री टॉप वॉक’ हा एक वेगळा अनुभव घेतला. उंच झाडांना मध्यावर गोल प्लॅटफॉर्म बांधून तिथले सात भलेमोठे घनदाट वृक्ष केबल ब्रिजने जोडले आहेत. जिन्याने पहिल्या झाडापर्यंत पोहोचताना दम निघाला पण तिथे पोहोचल्यावर भरपूर ऑक्सिजनयुक्त ,थंडगार, ताजी हवा मिळाली.खूप उंच झाडांच्या मध्यावरून त्या जंगलातील झाडे बघण्याचा अतिशय वेगळा अनुभव मिळाला. सस्पेन्शन केबलवरून चालत त्या सातही झाडांना भोज्जा करून आलो. आम्ही साधारणपणे दहा मजले उंचीवरून फिरण्याचा पराक्रम केला होता.

कॅनडा भाग ५ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २१ – भाग ४ – कॅनडा ऽ ऽ राजा सौंदर्याचा ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २१ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कॅनडा ऽ ऽ  राजा सौंदर्याचा ✈️

मॉन्ट्रियलहून साडेचार तासांचा विमान प्रवास करून कॅनडाच्या पश्चिम भागात पोहोचलो. कॅलगरी एअरपोर्टपासून बांफपर्यंतचा  प्रवास नयनरम्य होता. आमच्या बसची ड्रायव्हर गाइडचे कामही करत होती. ती उंचनिंच, धिप्पाड आणि बोलकी होती. भरभरून माहिती देत होती. जुन्या काळातील देखणी घरे,  भोवतीच्या सुबक बागा, कारंजी, पुतळे यांनी कॅलगरी सजली होती. दारं- खिडक्या बंद करून निवांतपणे हे बंगले बसले होते. आत्ममग्न, उच्चभ्रू लोकांचे हे शहर असावे.कॅलगरी विमानतळापासून ‘बो’ नदीचीसाथ लाभली. रॉकी माउंटन्समधून उगम पावलेली बो नदी कॅलगरीमधून वाहते. तिच्या काठावरून जॉगिंग, सायकलिंग, स्केटिंगसाठी सुंदर मार्ग आहेत. फळाफुलांनी भरलेल्या बागांतून लोकं सहकुटुंब पिकनिकचा आनंद घेत होते. नदीच्या स्वच्छ, नितळ पाण्यातून कयाकिंग, राफ्टिंग करत होते. काठावरून मासे पकडण्याचा छंद जोपासत होते. ही नदी ट्राउट माशांसाठी ओळखली जाते.

कॅलगरीमध्ये दरवर्षी जुलै महिन्यात ‘स्टम्पेड’ हा दहा दिवस चालणारा  रोडिओ शो होतो. १९१२ पासून चालू असलेला हा उत्सव म्हणजे पाश्चिमात्य परंपरा व स्थानिक इतिहास यांचे मिश्रण आहे.’ ग्रेटेस्ट आऊटडोअर शो ऑन दी अर्थ’ असे त्याचे वर्णन केले जाते. जगभरातून जवळजवळ दहा लाख पर्यटक वेगवेगळे काउबॉय स्टाईल शो बघायला येतात. घोड्यांची रेस (डर्बी ),स्टम्पेड परेड, काऊबॉयच्या वेशातील फ्लोटस्,बॅ॑डस्,  म्युझिक, लोकसंगीताच्या तालावरील नृत्य असा सारा माहोल असतो. बियर फेस्टिवलपासून स्वीट कॉर्न फेस्टिवल, बेबी ॲनिमल फेस्टिवल साऱ्याचा जल्लोष असतो.

कॅलगरीमधील जुन्या दगडी इमारती तसेच आधुनिक टॉवर्स शेजारच्या इमारतींना भुयारी रस्त्याने किंवा छोट्या ब्रिजने एकमेकांना जोडलेल्या आहेत. नोव्हेंबरपासून पुढे पाच- सहा महिने इथली थंडी वाढत जाते. दुपारी तीन वाजताच काळोख होतो. सतत ढगाळ हवामान व काळोख यामुळे पूर्वी लोकं निराश, अनुत्साही होत. अति थंडीमुळे बाहेर पडायची सोय नव्हती. तेंव्हा रोजचे व्यवहार अडू नयेत म्हणून अशा पद्धतीने बिल्डिंगज् जोडल्यामुळे लोकांना खरेदीला,  रेस्टॉरंट्समध्ये जाता येते. एवढेच नाही तर एके ठिकाणी काचेच्या बंद दरवाजाआड सुंदर बाग उभी केली आहे. तिथे एकत्र येऊन लोक चहा-कॉफी, नाश्ता, मनोरंजन यांचा आस्वाद घेऊ शकतात. आता तर सर्वत्र आधुनिक सोयीसुविधा व दिवाळीसारखी रोषणाई, थंडीतले खेळ, स्पर्धा चालू असतात.

कॅलगरीपासून जगप्रसिद्ध रॉकी माउंटनसचे  दर्शन सुरू होते. युनेस्कोने या पर्वतरांगांना वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा दिला आहे. रॉकी माउंटनस ही पर्वतांची रांग म्हणजे सौंदर्याची खाण आहे. फिओर्डस, नद्या, सरोवरे, पर्वत उतारावरील सूचीपर्ण वृक्ष, औषधी गरम पाण्याचे झरे, ग्लेशिअर्सच्या बर्फाळ सौंदर्याचा खजिना, ग्लेशिअर्सच्या पाण्याने बनलेली पोपटी, हिरवी सरोवरे सारे स्वप्नवत सुंदर, डोळे आणि मन निववणारे आहे.मोकळ्या आकाशाच्या भव्य घुमटामधला एखादा झळझळीत नीळा तुकडा नीलण्यासारखा या सौंदर्यावर सरताज चढवितो.

बांफ हे कॅनडातील सर्वात उंचावर( ४५३७ फूट ) वसलेले छोटेसे सुंदर शहर आहे. बांफ इथे १८८५ साली कॅनडातील पहिल्या नॅशनल पार्कची स्थापना करण्यात आली. इथली नॅशनल पार्कची संकल्पना म्हणजे पर्वत, नद्या, सरोवरे, जंगले यांनी वेढलेला खूप मोठा प्रभाग!   यात एखादे छोटेसे शहर वसविलेले असते. या सर्व प्रभागाच्या पर्यावरण रक्षणाची जबाबदारी तेथील नागरिकांवर  असते. नैसर्गिक सौंदर्याला बाधा न येता तिथल्या तांत्रिक सोयीसुविधा उभारण्याकडे लक्ष दिले जाते. देवाघरचे हे अनाघ्रात सौंदर्य जपले जाईल हे कटाक्षाने पाहिले जाते.

सकाळी उठून जवळपास फेरफटका मारला. खळाळून वाहणाऱ्या बो नदीवरील ब्रिजवरून सभोवतालचे बर्फाच्छादित डोंगर व दाट पाईन वृक्ष देखण्या चित्रासारखे दिसत होते. नंतर गंडोला राईडने सल्फर माऊंटनच्या शिखरावर अलगद पोहोचलो. खोल दरीतल्या उंच वृक्षांच्या माथ्यावरुन जाताना खालची बो नदी एखाद्या पांढऱ्या रेघेसारखी दिसत होती. सभोवतालची हिमाच्छादित पर्वतशिखरे, त्यातून कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे बघून ‘कड्याकपारीमधोनी घट फुटती  दुधाचे ‘ या बा. भ. बोरकर यांच्या कवितेची आठवण झाली. अपंग आणि वृद्ध यांच्यासाठी असलेल्या विशेष सोयी- सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे सर्वांना या निसर्गसौंदर्याचा विनासायास आस्वाद घेता येतो. पर्वतावरून खाली खोल दरीतले  छोटेसे बांफ शहर दिसत होते. खालच्या लेकमध्ये प्रवाशांना घेऊन फिरणाऱ्या क्रूज दिसत होत्या.

गंडोलाने* सल्फर माउंटनवर पोहोचल्यावर पर्वताच्या टोकापर्यंत जायला एक सुंदर पायवाट होती. थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला. थंडी वाढली आणि आम्ही परतीचा मार्ग धरला. नंतर बो नदीतून कोसळणार्‍या धबधब्यांवर गेलो.  तिथल्या भल्या मोठ्या बागेत लोकं निवांतपणे वाचत बसले होते.

बांफवरून जास्पर इथे जायचे होते. बांफ, लेक लुईसा आणि जास्पर ही रॉकी पर्वतांमधील सर्वात निसर्गरम्य ठिकाणे आहेत. अतिशय देखण्या अशा अशा लेक लुईसाचे नामकरण क्वीन व्हिक्टोरियाच्या मुलीच्या नावावरून केले आहे. त्या सभोवतालची बर्फाच्छादित पर्वतराजी व त्यावरील ग्लेशियर माउंट व्हिक्टोरिया व व्हिक्टोरिया ग्लेशियर म्हणून ओळखले जाते.( मला वाटतं क्वीन व्हिक्टोरिया हिला खऱ्या अर्थाने  साम्राज्ञी म्हटले पाहिजे. जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये, अगदी कॅनडापासून ऑस्ट्रेलियापर्यंत तिची नाममुद्रा पर्वत, धबधबा,बागा , रेल्वेस्टेशन पासून घोडागाडीपर्यंत उमटलेली आहे. ) लेक लुईसा समुद्रसपाटीपासून ५६८० फूट उंचीवर आहे. व्हिक्टोरिया ग्लेशियरचे तुकडे पर्वतावरून घसरताना त्यांनी आपल्याबरोबर तांबे, ॲल्युमिनियम अशा प्रकारची खनिजेही आणली. त्या खनिज कणांमुळे झालेला या सरोवराचा अपारदर्शी , झळझळीत पोपटी निळसर रंग नजर खिळवून  ठेवतो. सभोवतालच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांचं प्रतिबिंब सामावून घेऊन लुईसा लेक शांतपणे पहुडला होता.कनोई म्हणजे लांबट होडीतून आपण या लेकची सफर करू शकतो किंवा गंडोलामधून जाऊन लेकचे विहंगम दृश्य पाहू शकतो.

जास्परला जायला घाटातला वळणदार रस्ता होता. मध्येच पाऊस हजेरी लावून जात होता. दुतर्फा बर्फाचे मुकुट घातलेली पर्वत शिखरे , त्यातून उड्या मारणारे धबधबे, पर्वतांच्या अंगावरील बर्फाच्या शुभ्र माळा आणि पर्वतपायथ्यापर्यंत अल्पाइन वृक्षांची अभेद्य काळपट हिरवी भिंत होती. वर्षानुवर्षे  पर्वतांवरून बर्फ, पाणी वाहत असल्यामुळे काही ठिकाणी पर्वतांचे आकार एखाद्या किल्ल्याच्या तटासारखे, अजिंठा- वेरूळच्या डोंगरांसारखे दिसत होते. लेक लुईसाच्या परिसरात कॅराव्हॅन कॅ॑पिंगसाठी तळ उभारलेले आहेत. अनेकजण या रम्य मार्गाची सफर सायकलवरून करीत होते. रस्त्याच्याकडेची जांभळी, पिवळी रानफुले, निळे- पांढरे गवत तुरे माना डोलावत स्वागत करीत होते. कोसळणाऱ्या धबधब्यांच्या, वाऱ्याबरोबर येणाऱ्या तुषारांनी  ती रानफुले स्नानाचा आनंद घेत होती.

वळणा-वळणांचा चढत जाणारा रस्ता माऊंट अथाबास्कापर्यंत जातो. आमच्या बसमधून उतरून तिथल्या बसने पर्वताच्या माथ्यावर गेलो. तिथे पुन्हा बस बदलली. सहा प्रचंड मोठे दणकट रबरी टायर असलेल्या लांबलचक आइस एक्स्प्लोरर स्नो कोच मधून  कोलंबिया आइस फिल्डवर गेलो. आठ ग्लेशियर्सचा मिळून बनलेला कोलंबिया आइसफील्डचा  विस्तार ३५ चौरस किलोमीटर एवढा प्रचंड आहे. आर्किक्ट सर्कलचा हा सर्वात दक्षिणेकडील भाग समजला जातो. आइसफिल्डशी पोचेपर्यंतचा रस्ता चढ-उताराचा, मध्येच पाण्यातून जाणारा होता. शेजारून बर्फाचा झरा वाहत होता. बसच्या खिडक्यांमधून आणि बसच्या डोक्यावरच्या काचेच्या छतातून स्वच्छ आभाळातला सूर्य, तांबूस पांढरे ढग आणि आजूबाजूचे लांबवर पसरलेले बर्फच बर्फ दिसत होते. बस चालविणारी सुंदर तरुणी तिथल्या गमतीजमती सांगत मजा आणत होती. बर्फातच गाडी थांबली.धीर करून त्या बर्फावर थोडेसे चालण्याचा पराक्रम केला. बर्फावरून घसरण्याची भीती वाटत होती. खूप थंड वारे होते तरी फोटो काढण्याचा उत्साह होता.

कॅनडा भाग ४ समाप्त

 * विजेच्या तारांवरून जाणारी पाळण्यासारखी छोटी केबिन. त्याला तिकडे गंडोला म्हणतात, पण त्याला केबल कार म्हणतो

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २१ – भाग ३ – कॅनडा ऽ ऽ राजा सौंदर्याचा ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २१ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कॅनडा ऽ ऽ  राजा सौंदर्याचा ✈️

ओटावाहून दोनशे किलोमीटर्सवरील मॉन्ट्रियल इथे पोहोचलो. ही कॅनडाची औद्योगिक नगरी आहे. ब्रेकफास्ट करून बाहेर फेरफटका मारला.एका बागेमध्ये योध्यांचे, गरुडाचे पुतळे आहेत. रस्त्यावर एका कॉर्नरला जगप्रसिद्ध पियानिस्ट ऑस्कर पीटरसन यांचा दगडी बाकावर बसलेला पुतळा आहे. आपण पुतळ्याजवळ गेलो की सेन्सर्सच्या सहायाने पियानोची सुंदर सुरावट ऐकायला येते. जुन्या मॉन्ट्रियलमध्ये व्हिक्टोरियन काळातील, तांबूस दगडांचा वापर करून बांधलेली गॉथिक शैलीतली चर्चेस, म्युझियम्स, राहती घरे आहेत. विद्यार्थी आणि प्रवासी यांनी शहर गजबजले होते.१९१८ साली बांधलेली सन लाइफ बिल्डिंग ही दुसऱ्या महायुद्धामध्ये, अनेक युरोपियन राष्ट्रांनी सोने सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली होती. रस्त्यांसाठी वापरलेले लांबट चौकोनी दगडी पेव्हरब्लॉक ३६० वर्षांपूर्वीचे पण अगदी सुस्थितीत आहेत.

नेत्रोदाम या भव्य चर्चच्या आत लाकडी कोरीवकाम व त्यावर सोन्याचा मुलामा दिलेले असे  आहे. स्टेन्ड ग्लासच्या खिडक्यांवरील रंगीत चित्रे अप्रतिम आहेत. भव्य घंटा व अजूनही वापरात असलेला पोकळ खांबांचा ऑर्गन तिथे  आहे. बार्बी म्युझियममध्ये सर्व देशातील वेगवेगळे ड्रेस घातलेल्या असंख्य बार्बी डॉल्स सुंदर सजवून मांडल्या आहेत. मॉन्ट्रियल इथे १९७६ मध्ये ऑलिंपिक गेम्स झाले होते. त्यावेळी उभारलेल्या मोठ्या आणि तिरक्या- तिरक्या जाणाऱ्या लिफ्टने जाऊन ऑलंपिक मनोर्‍याचे टोक गाठले. तिथून ऑलिंपिक ज्योत लेसर किरणांच्या साहाय्याने जिथे प्रज्वलित करण्यात आली होती तो उंच प्लॅटफॉर्म, निरनिराळ्या खेळांची स्वच्छ मैदाने दिसत होती. कुठे खेळांची प्रॅक्टीस चालू होती. त्यावेळी आपल्याकडे नुकत्याच सुरू झालेल्या टीव्हीमुळे  ऑलिंपिक गेम्स पाहता आले होते. रुमानीयामधील ‘रबर गर्ल’ नादिया हिची आठवण झाली.

मॉन्ट्रियल इथून क्यूबेक इथे जायला चार तास लागले. कॅनडामधील ही पहिली कायमस्वरूपी वसाहत फ्रेंच प्रवासी, संशोधक सॅम्युएल चॅम्पलेन यांनी १६०५ मध्ये नोवा स्कॉटियाच्या किनाऱ्यावर उभारली. त्यानंतर दोन वर्षांनी ब्रिटिश आले. त्यांनी हडसन बे कंपनीची स्थापना केली. ब्रिटिश व फ्रेंच  यांच्या आपापसात लढाया सुरू झाल्या. सात वर्षांनंतर  ब्रिटिश जनरल जेम्स वुल्फ यांनी फ्रेंचांचा  पराभव केला. तरीही क्यूबेकमध्ये ब्रिटिश व फ्रेंच संस्कृती, दोन्ही भाषा, विविध संस्था यांची हातात हात घालून वाढ झाली. आजही इथे कॅनडातील ८५% फ्रेंच राहतात. इथली अधिकृत भाषा फ्रेंच आहे व फ्रेंच सिव्हिल लॉ वापरण्यात येतो.

क्यूबेक हे ऐतिहासिक शहर सेंट लॉरेन्स या सागरासारख्या नदीकाठी आहे. पोपटी मखमली हिरवळ असलेल्या अवाढव्य बागा, भरदार वृक्ष, अनेक रंगांची फुले, गुलाबांचे ताटवे यांनी सारे शहर भरले आहे .बागांमधून अनेक कुटुंबे समर पिकनिक साठी आली होती. डोंगर उतरणीचा दगडी पायऱ्यांचा रस्ता उतरून खाली आलो.पंचवीस वर्षांपूर्वी तिथल्या चार मजली बिल्डिंगच्या संपूर्ण भिंतीवर जुन्या क्यूबेकचे चित्र रंगविले आहे. ब्रिटिश- फ्रेंच लढाया, चारचाकी घोडागाड्या, खेळणारी मुले, लपलेली मांजरे, प्रेमिकांची कुजबुज, बंदुका, लायब्ररी, मित्रांच्या बारमधील गप्पा असे सारे त्या चार मजली बिल्डिंगच्या पूर्ण भिंतीवर रंगविले आहे.

जुन्या क्यूबेक शहराभोवती संपूर्ण दगडी भिंत होती. त्याचे अवशेष दिसतात. सर्व वास्तुंची ब्रिटिश आणि फ्रेंच शैलीची जपणूक आज चारशे वर्षांनंतरही उठून दिसते. इथल्या थंड, कोरड्या हवेमध्ये सफरचंद, स्ट्रॉबेरी, चेरी अशी फळफळावळ विपुल प्रमाणात होते. उतरत्या छपरांची, लाल,  राखाडी रंगांची  घरे सभोवताली असलेल्या रंगीत फुलांच्या बागेमुळे शोभिवंत दिसतात. चार चाकांच्या घोडागाड्या प्रवाशांना घेऊन फिरत असतात. डोंगराच्या उंच कड्यावरून खाली येणारी फनीक्यूलर रेल्वे मजेशिर दिसते.क्यूबेक पासून मॉन्ट्रियलपर्यंत गेलेला रस्ता हा अठराव्या शतकातील व्यापारी व टपाल मार्ग होता. मॉन्ट्रियलला परत येताना मॉ॑टमोरेन्सी हा नायगाराहूनही अधिक उंचीवरून पडणारा धबधबा पहिला.झुलत्या अरूंद पुलावरून, डोंगराच्या या टोकावरून, धबधब्यावरून, दुसर्‍या डोंगरावर पोहोचण्याचा धाडसी खेळ तरुणाई तिथे खेळत होती. तसेच ट्रेकिंग व फिशिंगही चालू होते.

कॅनडा भाग ३ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २१ – भाग २ – कॅनडा ऽ ऽ राजा सौंदर्याचा ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २१ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कॅनडा ऽ ऽ  राजा सौंदर्याचा ✈️

नायगाराहून ६०० किलोमीटरचे अंतर पार करून कॅनडाची राजधानी ओटावा इथे पोचायचे होते. सरळसोट, गुळगुळीत आठ पदरी रस्त्यावरून गाडी पळत होती. कुठेही सिग्नल्स नाहीत की टोल नाके नाहीत. दोन्ही बाजूंना बसविलेले टीव्ही कॅमेरे वाहतुकीचे सुयोग्य नियंत्रण करतात. रस्त्याच्या दुतर्फा गहू, मका, द्राक्षं, स्ट्रॉबेरी, चेरी यांची प्रचंड मोठी शेती होती. शेतात धान्य साठवण्याच्या उंच, उभ्या कणग्या होत्या. अनेक ठिकाणी वायनरीज होत्या.शेतिच्या पलीकडे आकाश रेषेपर्यंत भिडलेली सूचिपर्णी वृक्षांची घनदाट जंगले दिसत होती.

या साऱ्या प्रवासाला खळाळती साथ होती ती रिडो कॅनॉलची! अनेक अडचणींवर मात करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १८३२ मध्ये पूर्ण करण्यात आला.किंग्जस्टन इथल्या लेक ओंटारिओपासून सुरू झालेला २०२ किलोमीटरचा (१२५ मैल ) हा नितांत सुंदर जलमार्ग राजधानी ओटावापर्यंत जातो. या प्रकल्पात दोन नद्या आणि मोठमोठी सरोवरे यांची जोडणी समपातळीत करण्यासाठी ४७ लॉकसची योजना केली आहे. आजही हा ऐतिहासिक जलमार्ग गजबजलेला असतो. युनेस्कोने या जलमार्गाला वर्ल्ड हेरिटेज डेस्टिनेशनचा दर्जा बहाल केला आहे.कनोइ,कयाक, मोटारबोटी यातून ही जलवाहतूक सुरू असते.कॅनाल शेजारून सायकलींसाठी स्वतंत्र मार्ग आहे. जॉगिंग व स्केटिंगही चालू होते. अनेक सुंदर बागांमधून लोक समर पिकनिकचा आनंद घेत होते.

दुसऱ्या दिवशी ओटावाहून चार तासांचा प्रवास करून किंग्स्टनला पोहोचलो.’थाउजंड आयलंड’चा हा परिसर नितांत सुंदर आहे. स्वच्छ, सुंदर, टुमदार, निवांत अशी  लाल, तपकिरी, दगडी रंगांच्या उतरत्या कौलांची ऐश्वर्यशाली घरे निसर्गाच्या कॅनव्हासवरील सजीव चित्रांसारखी भासत होती.

‘ग्रेट लेक्स’ मधून उगम पावलेली सेंट लॉरेन्स नदी समुद्रासारखी विशाल आहे. ग्रेटेस्ट कॅनेडियन रिव्हर म्हणून ती ओळखली जाते. नदीतील ८० किलोमीटरच्या परिघात१८६४ बेटे आहेत. ही बेटे म्हणजे प्राचीन कालातील पर्वतांचे माथे आहेत. अगदी छोट्या आकाराच्या बेटापासून १०० चौरस किलोमीटर्स (४० चौरस मैल ) ची व्याप्ती असलेली ही खडकांवरील हिरवीगार बेटे आहेत.क्रुझमधून आम्ही या बेटांच्या दर्शनासाठी निघालो.

या अथांग पाण्यात अमेरिका आणि कॅनडा यांची तिथली सरहद्द दाखवणारे दोन्ही राष्ट्रांचे ध्वज एका बेटावर फडकत होते. निळसर हिरव्या आरस्पानी पाण्यात लहान मोठ्या बेटांची प्रतिबिंबे पडली होती. यातील काही बेटांवर मनुष्यवस्ती नाही आणि काही बेटे अमेरिकेच्या मालकीची आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला न्यूयॉर्क येथील धनाढ्य हॉटेल मालक जॉर्ज बोल्ट यांनी इथले हार्ट आयलँड विकत घेतले. त्यावर सहा मजली घर उभारले. किल्ल्यासारख्या या बिल्डिंगमध्ये १२० दालने व त्यांना जोडणारी अंतर्गत टनेल्स आहेत. पॉवर हाउस, इटालियन गार्डन, ब्रिज सारे त्यांनी आपली प्रिय पत्नी लुईसा हिच्यासाठी उभारले. पण लुईसाच्या अकस्मात मृत्यूनंतर हे घर दुर्लक्षित झाले. १९७७ साली अमेरिका व कॅनडा सरकारने या सार्‍या बेटांचे पुनरुज्जीवन केले. क्रूझमधून आम्हाला या  हिरव्यागार, फळा- फुलांनी बहरलेल्या बागेतील प्रवासी फिरताना दिसंत होते.

‘डार्क आयलंड’वर सिंगर कॅसल आहे. सेंट लॉरेन्सचा खूप उंच, उभा पुतळा एका खडकावर उभारलेला आहे. अमेरिकेचे बेट आणि कॅनडाचे बेट जोडणारा एक इंटरनॅशनल ब्रिजही तिथे आहे. दगडी बेटांच्या हिरव्या कुशीत लपलेली, लाल, पिवळ्या, हिरव्या, राखाडी कौलांची तांबूस पांढरी घरं बघताना आपण परीराज्यातून फेरफटका मारीत आहोत असेच वाटते. घरांच्या अंगणात सुंदर हिरवळ, फुलबागा, फळबागा होत्या.समर सुरू झालेला असल्याने काही घरांच्या अंगणात मुले खेळत होती. काही अगदी जवळची दोन बेटं जोडण्यासाठी  सुबक, कमानदार ब्रिज उभारले आहेत. एका बेटावर चर्च आहे. वीस बेटांच्या एका समूहावर थाउजंड आयलँड नॅशनल पार्क उभारले आहे. मासेमारी आणि पाण्यातले खेळ यात काही जण रमले होते. मध्येच वेगाने दौडणाऱ्या पांढऱ्या स्वच्छ स्पीड बोटस् पळत होत्या. स्वच्छ पांढरे अंग , राखाडी पंख ,काळी शेपटी आणि पिवळसर चोच असलेले सीगल्स पंख पसरून भक्षाचा वेध घेत होते. ही सगळी बेटे म्हणजे विधात्याने स्वतःसाठी फुलविलेली एक आगळीवेगळी बाग आहे. फार फार वर्षांपूर्वी या बेटांवर मूळ कॅनेडियन लोकांची (Aborigines ) वस्ती होती. आज कोट्यावधी डॉलर्स किमतीची ही घरे धनाढ्यांची मिरासदारी आहे. क्रूजमधून या अद्भुत दुनियेचा फेरफटका करून आम्ही परतलो. किनाऱ्यावरील माना उंचावलेल्या सिडार, व्हाईट पाइन वृक्षांनी आम्हाला ‘जमिनीवर’ आणले.

आम्ही जूनच्या मध्यावर तिथे पोहोचलो होतो. पुण्यासारखी थंडी होती पण त्यांचा समर चालू झाला होता. चार महिन्यांच्या कडक थंडीनंतर आता सूर्यदेव पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत प्रकाश देत होते. विविध रंगांची फुलं मोठमोठ्या  कुंड्यांमधून ओसंडत होती.उत्साही पावलातून वसंतोत्सव सळसळत होता.खेळांना उधाण आलं होतं .डॉग फेस्टिवलपासून चिल्ड्रेन फेस्टिवलपर्यंत तसंच नृत्य-नाट्य-संगीत, बेंजो, फिडल सारे महोत्सव होते. सारे ओटावा शहरच जणू एक फिरता रंगमंच झालं होतं.

रिडो  हॉल म्हणजे गॉथिक शैलीतील दगडी कौलारू घर आहे.  १८६७ पासून  कॅनडाच्या गव्हर्नर जनरलचे ते  घर  आता पंतप्रधानांचे निवासस्थान आहे. या घराभोवती सुंदर  गार्डन व आर्ट कलेक्शन सेंटर आहे.

म्युझियम ऑफ हिस्ट्रीचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. २००० वर्षांपूर्वी कॅनडातील मूळ जमाती कनोई म्हणजे  लाकडाच्या लांबट होडीतून इथे आल्या.म्युझियमच्या हॉलमधील सिलिंग हे कनोईच्या तळासारखे बनविले आहे.हॅलचे  खांब वल्हयांसारखे आहेत आणि पार्श्वभूमीवर घनदाट हिरव्या, उंच मजबूत वृक्षांचे भले मोठे चित्र आहे.टोटेम पोल्स म्हणजे आदिवासींनी लाकडी खांबांवर कोरलेले मुखवटे , चिन्हे यांचा खूप मोठा संग्रह तिथे आहे. हे खांब म्हणजे आदिवासींची श्रद्धास्थाने होती तसेच गुप्त संदेश देण्याचे साधनही होते. म्युझियममध्ये मुलांसाठी विशेष विभाग आहे. गाणी, कोडी, खेळ यातून मुलांचे इतिहासाविषयी कुतूहल जागृत होईल असे कार्यक्रम केले जातात. तिथल्या स्टॅम्प संग्रहात १८५१ मध्ये वापरलेल्या पहिल्या पोस्टल स्टॅ॑पपासून आजपर्यंतच्या स्टॅ॑प्सचे कलेक्शन आहे.

ओटावामध्ये रिडो, ओंटारिओ व ओटावा या तीन नद्यांचा संगम होतो. संगमावर डुबकी मारून तिथले पाणी गढूळ करण्यासाठी ,पुण्य मिळविण्यासाठी कुणीही येत नाही. इथून मोठमोठी मालवाहू जहाजे अटलांटिक महासागरापर्यंत जाऊ शकतात. संगमाजवळील हिरव्या वनराईत लपलेले सर्व देशांचे दूतावास गाडीतून बघितले. त्यातल्या एका घरावर भारताचा तिरंगा फडकत होता.

कॅनडा भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २१ – भाग १ – कॅनडा ऽ ऽ  राजा सौंदर्याचा ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २१ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कॅनडा ऽ ऽ  राजा सौंदर्याचा ✈️

| स्वस्ति श्री जलदेवता प्रसन्ना भवतु |

| स्वस्ति श्री वनदेवता प्रसन्ना भवतु  |

| स्वस्ति श्री निसर्गदेवता प्रसन्ना भवतु |

|जलवननिसर्गदेवता: सुप्रसन्ना: भवन्तु |

‘आकाशातल्या बाप्पाने’ अवाढव्य कॅनडाला जगातील सर्वाधिक सरोवरे, समुद्रासारख्या नद्या, घनदाट जंगले, माथ्यावर बर्फाचे मुकुट मिरवणारी पर्वतराजी, मनमोहक निसर्ग यांचा असा भरभरून आशीर्वाद दिला आहे. या स्वप्नसुंदर भूमीवरील आकाशाच्या भव्य घुमटातून डोकावणारा देवबाप्पा समाधानाने हसत असतो कारण कॅनडाने या साऱ्या दैवी देणगीची कसोशीने जपणूक केली आहे. या दैवी देणगीचा आदरपूर्वक सन्मान केला आहे.

फ्रँकफर्टला विमान बदलून टोरंटोला उतरलो. विमानतळावरील सोयी-सुविधा अनुभवून बोलक्या ड्रायव्हरच्या साथीने गुळगुळीत रस्त्यावरून हॉटेलपर्यंत अलगद पोहोचलो आणि प्रवासाचा सारा शीण पळाला.

ओटावा ही कॅनडाची राजधानी आहे पण आर्थिक राजधानी टोरंटो आहे . सांस्कृतिक विविधता असलेल्या टोरंटो शहराने इतिहासाच्या पाऊलखुणा जपल्या आहेत तसेच गगनाला भिडणारे टॉवर्सही उभारले आहेत. बसमधून कॅसालोमा इथे उतरलो. कॅसालोमा हा किल्ल्यासारखा राजवाडा सर हेनरी यांनी शंभर वर्षांपूर्वी बांधला.९८ दालने, ३०  बाथरूम्स, दोन गुप्त भुयारी रस्ते, आठशे फूट लांबीचे अंतर्गत जोडणी करणारे टनेल, २५ फायर प्लेसेस, १७०० बाटल्या मावतील एवढी वाईनसेलर, दहा हजार ग्रंथ असणारी लायब्ररी असा सारा अफलातून कारभार  आहे. त्या महालासभोवती पाच एकर जागेवर कारंजी आणि सुंदर पुतळे असलेला रंगीबेरंगी फुलांनी डवरलेला सुंदर बगीचा आहे. आपल्याला फक्त त्या बागेत फेरफटका मारुन उंची महालाचे दर्शन व फोटो घेता येतात.

बाटा शू म्युझियममध्ये जगभरातील वैविध्यपूर्ण १३००० बुटांचा संग्रह आहे. चीनमधील एम्ब्रॉयडरी केलेल्या रेशमी बुटांपासून  बॉलरूम डान्सिंग बुटांपर्यंत सारे प्रकार या संग्रहात आहेत. शोकेसमध्ये बुटाचा स्टॅन्ड ठेवलेला असावा अशी या इमारतीची रचना आहे.इटॉन सेंटर या  शॉपिंग मॉलचे एक प्रवेशद्वार एका रेल्वे स्टेशन जवळ तर दुसरे प्रवेशद्वार त्यापुढच्या स्टेशनजवळ  एवढा तो भरपूर लांब, अवाढव्य मॉल आहे.

साऱ्या आधुनिक इमारतींचा मानबिंदू म्हणजे सी -एन् टॉवर ! ३६५ मीटर्स म्हणजे ११९८ फूट उंच असलेला हा टॉवर काही वर्षांपूर्वी जगातला सर्वात उंच टॉवर होता. लिफ्टने दीड मिनिटात या टॉवरच्या ऑब्झर्वेशन डेस्कवर पोचलो. पायाखालच्या काचेच्या जमिनीवरून खालची माणसे, गाड्या बुद्धिबळातल्या सोंगट्यांएवढी दिसंत होती. अनेक जण त्या काचेवर झोपून सेल्फी काढण्यात रमले होते. इथे रेस्टॉरंट, थिएटर अशा सोयी आहेत तसेच भक्कम दोराच्या सहाय्याने या टॉवरला बाहेरून फेरी मारण्याचा धाडसी खेळही आहे.

काही वर्षांपूर्वी नायगाराचा अनुभव अमेरिकेच्या बाजूने घेतला होता. आता तोच नायगारा कॅनडाच्या बाजूने अनुभवायचा होता. लांबूनच त्याचा घनगंभीर आवाज कानावर आला. चंद्रकोरीच्या आकारातून धमासान कोसळणारा तो जलप्रपात पाहिला आणि समर्थ रामदास स्वामींचे शब्द आठवले ;

‘गिरीचे मस्तकी गंगा, तेथूनी चालली बळे

धबाबा लोटल्या धारा, धबाबा तोये आदळले’

जणू ते प्रचंड पाणी आकाशातून येऊन आवेगाने पाताळात घुसत होते. पाण्यावर पडलेल्या सूर्यकिरणांमुळे इंद्रधनुष्यांचे  अनेक शेले त्यावर तरंगत होते. नजर खिळवून ठेवणारे, तनमन व्यापून टाकणारे ते दृश्य होते.

१८००० वर्षांपूर्वी हिमयुगाचा अंत होऊ लागला तेंव्हा सध्याच्या अमेरिका आणि कॅनडा देशांच्या सरहद्दीवर असलेल्या पाच ग्रेट लेक्स भागातलं बर्फ वितळू लागलं. लेक एरी भागातील बर्फ संथपणे उत्तरेला ओन्टारिओ सरोवर भागाकडे वाहू लागलं.वाहताना वाटेत एका कड्यावरून कोसळू लागलं तोच हा सुप्रसिद्ध नायगारा धबधबा! कालौघात खडकांची झीज होऊन धबधबा मूळ जागेपासून मागे जातो. जून, जुलै, ऑगस्टमध्ये भरभरून कोसळणारा धबधबा प्रवाशांना आकर्षित करतो. या  धबधब्यात बंद पिंपात बसून उडी मारण्याचं वेडं साहसही अनेकांनी केलं आहे. धबधब्याच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेले  ‘नायगारा,’ ‘सुपरमॅन’ असे अनेक चित्रपट आहेत. हिवाळ्यात एरी सरोवराचं पाणी गोठतं.  जलप्रवाह अतिशय क्षीण होतो. १८४८ च्या मार्च महिन्यात तर हा धबधबा पूर्णतः गोठला होता.

धबधब्याच्या पाण्यावर जल विद्युत केंद्र चालविले जाते. विद्युत केंद्राचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये म्हणून एरी सरोवरातून नायगारा नदीत दोन मैल लांबीच्या साखळीला खूप मोठे लोखंडी , तरंगणारे प्लॅटफॉर्मस् सोडलेले आहेत. त्यामुळे सरोवरातील हिमखंडांना अटकाव होऊन विद्युत केंद्राचा पाणीपुरवठा चालू राहतो.

नायगारावरील तरंगती इंद्रधनुष्ये डोळ्यात साठवून आम्ही  ‘जर्नी बिहाइंड दी फॉल्स ‘ साठी एका लिफ्टने जमिनीच्या पोटात दीडशे फूट खाली गेलो. नंतर एका लहानशा ओल्या टनेलमधून गेल्यावर आम्ही थेट नायगाराच्या कोसळणाऱ्या पाण्याच्या पडद्यामागे उभे ठाकलो.आवेगाने अविरत कोसळणाऱ्या नायगाराचे थंडगार तुषार, अंगावर शिरशिरी आणंत होते. तिथून थोडे वर चढल्यावर अर्धवर्तुळाकार ऑब्झर्वेशन गॅलरी आहे. तिथून दिसणारा, आपल्या बाजूने लांबट अर्धवर्तुळाकार  कोसळणारा धबधबा पाहताना डोळ्याचं पारणं फिटतं.

आता आम्हाला नायगाराची गळाभेट घ्यायची होती. ‘हॉर्न ब्लोअर’ नावाच्या क्रूझमधून धबधब्याला समोरून भिडताना अंगावर जलतुषारांचा फवारा उडत होता. रेनकोट घालूनही सर्वांग भिजंत होतं. नायगाराच्या उसळत्या पाण्यात शिरलेली बोट हेलकावत होती. कोसळणार्‍या धारा, त्यावर तरंगणारे धुक्याचे ढग, कानामनात भरून राहिलेली ती अजस्त्र ऊर्जा सारेच विलक्षण अद्भुत वाटत होते.

रात्री आमच्या हॉटेलरुमच्या काचेच्या खिडकीतून दिसणारा नायगारा संथगतीने खाली उतरत आहे असं वाटंत होतं. दिवसभरच्या श्रमाने नायगारा थोडा दमल्यासारखा दिसंत होता. झोप येईपर्यंत त्याचे दर्शन घेतले. पुन्हा पहाटे उमलती सूर्यकिरणे त्यावर पसरली. इंद्रधनुष्याचा सप्तरंगी खेळ सुरू झाला. पाण्याचा प्रचंड मोठा रंगीत पडदा झिरमिळत घरंगळू लागला.

जगातील सर्व प्रवाशांना नायगाराचे आकर्षण आहे .अमेरिका व कॅनडा यांनी अनेक सोयी- सुविधा तिथे निर्माण करून, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने धबधब्याला माणसाळले आहे.भरदार आयाळ असलेल्या सिंहाच्या गळ्यात पट्टा बांधावा तसे! सदर्न ऑंटारिओ भागात नायगारा नदीचा संगम लेक ऑंटारिआमध्ये होतो. त्याला ‘नायगारा ऑन दी लेक’ म्हणतात. इथल्या छोट्या शहरावर ब्रिटिश वास्तुशैलीची छाप आहे. इथे अनेक वायनरीज आहेत. जगप्रसिद्ध ‘आइस वाइन’ इथे बनविली जाते. अतिशय थंड हवेत वेलीवर लगडलेल्या द्राक्षांमध्ये बर्फ तयार होतो. त्या द्राक्षातून निघालेला थेंबभर रस खूप गोड असतो. म्हणून त्यापासून बनविलेली वाइन,इतर वाइनपेक्षा जास्त मधुर असते. डेझर्ट वाइनसाठी आइस वाइन उत्तम समजली जाते.

कॅनडा भाग- १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २० – भाग ३ – कंबोडियातील अद्वितीय शिल्पवैभव ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २० – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कंबोडियातील अद्वितीय शिल्पवैभव ✈️

सियाम रीपहून आम्ही कंबोडियाची राजधानी नामपेन्ह इथे आलो. तिथले ‘रॉयल पॅलेस’ एका स्वच्छ, भव्य बागेत आहे. हरतऱ्हेची झाडे व अनेक रंगांची फुले फुलली होती. नागचाफा ( कैलासपती ) म्हणजे कॅननबॉलचा महाप्रचंड वृक्ष होता. त्याला बुंध्यापासून गोल फळे लगडली होती. कमळासारख्या गुलाबी मोठ्या पाकळ्या असलेल्या या फुलात मधोमध छोटी शंकराची पिंडी व त्यावर पिवळट केसरांचा नागाचा फणा असतो. एक मंद मादक सुवास सगळीकडे दरवळत होता. राजवाड्याचे भव्य खांब अप्सरांच्या शिल्पांनी तोललेले  आहेत. राजवाड्याची उतरती छपरे हिरव्या, निळ्या, सोनेरी रंगाची आहेत. आवारात वेगवेगळे स्तूप आहेत. हे स्तूप म्हणजे राजघराण्यातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यावर त्यांचे दागिने, कपडे, रक्षा ठेवण्याची जागा आहे. राजाची रक्षा सोन्याच्या कमलपात्रात ठेवली आहे.

सिल्व्हर पॅगोडा पाहिला. पॅगोडाच्या आतील संपूर्ण जमीन  चांदीची आहे. एक किलो १२५ ग्रॅम वजनाची एक लादी अशा ५३२९ चांदीच्या लाद्या इथे बसविण्यात आल्या आहेत. या साऱ्या लाद्या फ्रान्समध्ये बनविल्या आहेत. प्रवाशांना त्यातील एक लादी काढून दाखविण्याची सोय केली आहे. या पॅगोडामध्ये सोने, रत्ने वापरून केलेला बुद्धाचा घडीव पुतळा आहे. त्याच्या कपाळावर आठ कॅरेटचा हिरा जडविलेला आहे. त्याच्या मुकुटावर व अंगावर मिळून २०८६ रत्ने बसविलेली आहेत अशी माहिती गाईडने दिली. या रत्नजडित बुद्धाच्या मागे थोड्या उंचीवर संपूर्ण एमरेल्डचा (Emerald ) पोपटासारख्या रंगाचा पण पारदर्शक असा बुद्धाचा पुतळा आहे. त्याच्या मागे जाऊन पाहिले की आरपार पोपटी उजेड दिसतो.

म्युझियममध्ये होडीच्या आकाराचे मोठे तंतुवाद्य होते. कंबोडियामध्ये उत्तम प्रतीचा पांढरा व हिरवट मार्बल मिळतो. तो वापरून हत्तीचे, बुद्धाचे पुतळे बनविले आहेत. सॅण्डस्टोन मधील स्कंद म्हणजे कार्तिकेयाची मूर्ती आहे. सहाव्या शतकातील शंख, चक्र, गदा, पद्मधारी श्री विष्णूची मूर्ती आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश, शिवलिंग, सिंह, गरुड, वाली-सुग्रीव यांच्या मूर्ती आहेत. अर्धनारीनटेश्वराची ब्रांझमधील मूर्ती आहे. नागाच्या वेटोळ्यावर बसलेल्या बुद्धाला काही लोकं काडीला लावलेला मोगरा व लाल फूल वाहत होते.उदबत्यांचे जुडगे लावीत होते. तीन-चार हजार वर्षांपूर्वीची शस्त्रास्त्रे, वाद्ये, दागिने,सिल्कची वस्त्रे विणण्याचे माग, राजाचा व धर्मोपदेशकाचा ब्राँझचा पुतळा अशा असंख्य गोष्टी तिथे आहेत.

मानवतेला काळीमा फासणारा एक काळाकुट्ट काळ कंबोडियाने अनुभवला आहे. क्रूरकर्मा पॉल पॉट या हुकूमशहाने त्याच्या चार वर्षांच्या कारकिर्दीत ( १९७६ ते १९७९) वीस लाख लोकांना यमसदनास पाठविले. हे सर्व लोक त्याच्याच धर्म- वंशाचे होते. बुद्धीवादी सामान्य नागरिक म्हणजे शिक्षक, प्राध्यापक, लेखक, पत्रकार, संपादक, डॉक्टर, वकील अशा लोकांचा पहिला बळी गेला. पॉल पॉटने हिटलरसारखे कॉन्संस्ट्रेशन कॅ॑पस् उभारले होते. महाविद्यालये , शाळा बंद होत्या. निरपराध लोकांना तिथे आणून हालहाल करुन मारण्यात आले. आम्हाला एका शाळेतील असा कॅम्प दाखविण्यात आला. गाईड बरोबर फिरताना, तिथले फोटो, कवट्या बघताना अश्रू आवरत नाहीत. गाईडचे नातेवाईकही या छळाला बळी पडले होते. एखादा माणूस असा राक्षसासारखा क्रूरकर्मा होऊ शकतो यावर विश्वास बसत नव्हता. पण हा चाळीस -बेचाळीस वर्षांपूर्वीचा सत्य इतिहास आहे. क्रूरतेची परिसीमा गाठलेला, माणुसकी हरवलेला!

कंबोडियन लोक साधे, गरीब व कष्टाळू आहेत. आपल्या परंपरा, धर्म आणि रूढी जपणारे आहेत. एप्रिल महिन्यात त्यांचे नवीन वर्ष सुरू होते. नोव्हेंबर मधील पौर्णिमेला बोन ओम थोक नावाचा सण साजरा करण्याची प्रथा बाराव्या शतकापासून आहे. त्यावेळी नद्यांमध्ये बोटीच्या स्पर्धा होतात. फटाके वाजविले जातात.  केळीच्या पानातून अन्नाचा भोग (नैवेद्य ) दाखविला जातो. आता कंबोडियातील बहुतांश लोकांनी बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे. त्यामुळे बुद्ध पौर्णिमा ही विशेष प्रकारे साजरी होते. मे ते ऑक्टोबर हा तिथला पावसाळ्याचा ऋतू आहे. त्यामुळे नोव्हेंबर ते साधारण फेब्रुवारी मध्यापर्यंत कंबोडियाला जाण्यासाठी योग्य काळ आहे. त्यानंतर मात्र चांगलाच उन्हाळा असतो.

कंबोडियात परंपरेप्रमाणे क्रामा म्हणजे एक प्रकारचे छोटे उपरणे वापरण्याची पद्धत आहे. आम्हालाही एकेक क्रामा भेट म्हणून देण्यात आला. उन्हापासून संरक्षण करायला, लहान बाळाला गुंडाळून घ्यायला, झाडावर चढण्यासाठी अशा अनेक प्रकारे त्याचा वापर केला जातो.

अनेक शतके पिचत पडलेल्या कंबोडियाच्या राजवटीने गेली दहा वर्षे आपली दारे जगासाठी उघडली आहेत. या दहा वर्षात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. भारतीय प्रवासी कमी असले तरी युरोप व इतर प्रवाशांचा चांगला ओघ असतो. आम्ही राजधानी नामपेन्ह  इथे भारतीय उच्चायुक्तांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या राहण्याची व कार्यालयाची जागा एकाच छोट्या बंगल्यात होती. त्यांनी कंबोडियाबद्दल थोडी माहिती दिली.रबर,टिंबर, तयार कपडे यामध्ये कंबोडियाची निर्यात वाढत आहे तर औषधे, प्रक्रिया केलेले अन्न, पेट्रोल व पेट्रोलियम उत्पादने चीन, तैवान, थायलंड, सिंगापूर येथून आयात केली जातात. व्यापार व इतर व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होतात. कंबोडिया भारताकडून औषधे, वाहनांचे सुटे भाग, मशिनरी, कॉस्मेटिक्स आयात करतो. पण अजूनही गुंतवणुकीला भरपूर वाव आहे. सिंगापूर, चीन, कुवेत, कोरिया,कतार यांनी बांधकाम व्यवसायात व शेतकी उत्पन्नात चांगली गुंतवणूक केली आहे. खाण उद्योग, वीज निर्मिती, रस्तेबांधणी तेल व गॅस संशोधन यामध्ये गुंतवणुकीला भरपूर वाव आहे.चीनने नेहेमीप्रमाणे मुसंडी मारली आहे. दोन मोठ्या सरकारी इमारती ‘फुकट’ बांधून देऊन उत्तरेकडील सोन्याच्या खाणीचे कंत्राट मिळविले आहे. उदासीनता झटकून भारतानेसुद्धा येथील संधीचा फायदा घेतला पाहिजे.

सांस्कृतिक आणि अध्यात्मिक समृद्धी असलेल्या या देशाला आपले पूर्ववैभव प्राप्त करता येईल अशी आशा करुया.

भाग – ३ व कंबोडिया समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २० – भाग २ – कंबोडियातील अद्वितीय शिल्पवैभव ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २० – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कंबोडियातील अद्वितीय शिल्पवैभव ✈️

अंगकोर येथून आम्ही दा फ्रॉम इथे गेलो. दा फ्रॉम येथील शिल्पकाम राजा जयवर्मन सातवा याच्या काळात बाराव्या तेराव्या शतकात झाले. इथे त्याने आपल्या आईसाठी यज्ञगृह, ध्यानगृह उभारले होते. भगवान बुद्धाच्या आयुष्यातील विविध प्रसंग इथे कोरलेले आहेत. द्वारपाल, भूमी देवता, लायब्ररी, नृत्यालय, घोडेस्वारांची मिरवणूक, पुराणातील प्राणी असे सारे शिल्पकाम गाईडने दाखविल्यावरच आपल्याला दिसते. कारण महाप्रचंड वृक्षांनी आपल्या मगरमिठीमध्ये हे सारे शिल्पकाम जणू गिळून टाकले आहे. सावरीच्या ‌ कापसाची झाडे व एक प्रकारच्या अंजिराच्या जातीच्या झाडांनी या बांधकामातील  भेगा रुंद करीत आपली पाळेमुळे त्यात घुसवून या शिल्पांवर कब्जा केला आहे.अंजेलिना जोली या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या ‘ टुम्ब रेडर’ (Tomb Raider) सिनेमाचे चित्रिकरण इथे झाले आहे. तेव्हापासून ती या जागेच्या प्रेमात पडली व तिने इथली एक मुलगी दत्तक घेतली आहे. तसेच इथले  एक गावही दत्तक घेतले आहे. सततच्या परकीय आक्रमणांमुळे तसेच स्वकीय क्रूरकर्मा, हुकुमशहा पॉल पॉट याच्या अत्याचारामुळे इथे फार मोठ्या प्रमाणावर अनाथ मुले आहेत. काही वेळा त्यांचा वाईट कामासाठी उपयोग केला जातो. या अनाथ मुलांना शिक्षण, निवारा देण्यासाठी जगातील अनेक संस्था कार्यरत आहेत. आम्ही गेलो त्या दिवशी आम्हाला ‘कंबोडियन ऑर्फन फॅमिली सेंटर ऑर्गनायझेशन’ या संस्थेतर्फे अनाथ मुलांचा पारंपारिक डान्स शो बघण्याचे आमंत्रण मिळाले होते. पण वेळेअभावी ते जमू शकले नाही.

बान्ते सराय या ठिकाणाचा शोध १९३६ साली लागला. गुलाबी सॅ॑डस्टोनमधील येथील शिल्पकाम अत्यंत सुबक, शोभिवंत आहे. मूर्तींभोवतीच्या महिरपींवरील नक्षी कमळे, पाने, फुले, फळे, पक्षी यांनी सुशोभित केली आहे. नंदीवर बसलेले उमा-महेश्वर, हिरण्यकश्यपूचा वध करणारा नृसिंह, इंद्राचा ऐरावत, सीता हरण, सुंद- उपसुंद यांची लढाई, भीम-दुर्योधन गदायुद्ध, शिवाचे तांडवनृत्य, सिंहरूपातील दैत्यावर नर्तन करणारी दुर्गा, शिवावर बाण मारणारा कामदेव, खांडववनाला लागलेल्या आगीवर पाऊस पाडणारा इंद्र, व त्या पावसाला अडविण्यासाठी अर्जुनाने उभारलेले बाणांचे छप्पर, कृष्णाने केलेला कंसवध, कुबेर,हंसावरील देवता अशा अनेक देखण्या शिल्पांनी सजलेले हे मंदिर इतर वास्तूंपेक्षा छोटे असले तरी  कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे. माकड, गरुड, सिंह, अप्सरा, शंकराच्या मांडीवर बसलेली पार्वती, सज्जे, दरवाजांवरील छज्जे असे सारे सुंदर, उठावदार नक्षीकामाने, शिल्पकामाने इंच-इंच भरलेले आहे.युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेल्या इथल्या शिल्पांचे संरक्षण, पुनर्बांधणी करण्यासाठी चीन, जपान, फ्रान्स असे अनेक देश मदत करीत आहेत. भारताच्या पुरातत्त्व खात्यातर्फे येथील दोन मंदिरात पुनर्निर्माणाचे काम करण्यात येत आहे. येथील अनेक मूर्ती चोरून विकण्यात आल्या आहेत तसेच पॉल पॉट याच्या कारकिर्दीत त्यांचा विध्वंसही करण्यात आला आहे.

कंबोडिया हा शेतीप्रधान देश आहे. मेकॉ॑ग रिव्हर चीनमध्ये उगम पावून तिबेट, लागोस, बँकॉक, कंबोडियामधून व्हिएतनाममध्ये जाते. व साऊथ चायना समुद्राला मिळते.सियाम रीप शहरामध्ये ‘तोनले साप लेक’ या नावाचा ६० किलोमीटर लांब, ३६ किलोमीटर रुंद व १२मीटर खोल असलेला दक्षिण आशियातील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा तलाव आहे .यात उदंड मासे मिळतात. मेकाँग नदीच्या पुरामुळे आजूबाजूची जमीन सुपीक होते. भाताची तीन- तीन पिके घेतली जातात. भात व मासे निर्यात केले जातात. या खूप मोठ्या तलावामध्ये पाण्यावर बांधलेली घरं आहेत. तलावात बोटीने सफर करताना आपल्याला ही घरे, हॉस्पिटल, शाळा, दुकाने, बाजार, गाई-गुरे असे सारे तरंगणारे गावच दिसते. ८० हजार लोकांची वस्ती या तलावात आहे असे गाईडने सांगितले.

कंबोडियामध्ये ऊस, कापूस,  रबर यांचे उत्पादन होते.केळी,  नारळ, आंबे,फणस, अननस, चिक्कू अशी फळे होतात. आम्हाला नोव्हेंबर महिन्यात उत्तम चवीचे आंबे व फणसाचे गरे खायला मिळाले. झाडांवर आंबे व फणस लटकत होते. दोन हातात न मावणाऱ्या शहाळ्यातील मधुर पाणी व कोवळे खोबरे खाऊन पोट भरले.गाडीतून प्रवास करताना अनेक ठिकाणी रस्त्यावरील विक्रेते कणसासारखे काहीतरी भाजून देताना दिसले. त्यांच्याभोवती गर्दीही होती. एकदा गाडी थांबवून आम्हीही अशा एका विक्रेत्याकडे गेलो. गाईडने सांगितले की हा ‘बांबू राइस’ आहे. आम्ही याला ‘कलांग’ असे म्हणतो.कोवळ्या बांबूच्या पोकळ नळीत तांदुळ, पाणी, खोबरेल तेल व बीन्स घालतात. गवताने त्याचे तोंड बंद करून तो बांबू विटांच्या भट्टीत भाताचे तूस जाळून त्यावर भाजत ठेवतात. विक्रेत्याने तो बांबू कणसासारखा सोलून त्यात बांबूचाच चमचा घालून खायला दिला. तो गरम, थोडासा चिकट भात चविष्ट होता. एकदा तेथील जेवणात आम्हाला एक वेगळ्या प्रकारची करी दिली. फ्लॉवर, गाजर ,बिन्स, बटाटे वगैरे अगदी थोड्या तेलावर परतून त्यात  सौम्य मसाले घातले होते.  टेबलावर प्रत्येकाला कमळासारखे सोललेले शहाळे ठेवले होते. शहाळ्याच्या पाण्यात या परतलेल्या भाज्या घातल्या व शहाळ्यातील कोवळ्या खोबऱ्याचे बारीक तुकडेही त्यात घातले होते. अशी ही वेगळी चविष्ट, छान करी आम्हाला मिळाली. उसाचा सुमधुर ताजा रस मिळाला.  तिथे केक केळीच्या पानात किंवा नारळाच्या कोवळ्या पानात गुंडाळून देण्याची पद्धत आहे .बीन्स किंवा साबुदाणा वापरून बनविलेल्या गोड सुपामध्ये ताज्या फळांचे बारीक तुकडे घालतात.

कंबोडियाच्या उत्तर भागात डायमंड, रुबी, सफायर, चांदी व सोने मिळते. गल्फ ऑफ थायलंडमध्ये तेल मिळते. चांदीच्या भांड्यांवरील नक्षीकाम, लाखेवरील नक्षीकाम यासाठी कंबोडिया प्रसिद्ध आहे. छोट्या, स्वच्छ गावातून सायकलवरून शाळेत जाणारी मुले आम्हाला पाहून हात उंचावून आनंद व्यक्त करीत होती. जपान, बँकॉक इथून मोटरबाईक आयात करून त्याला मागे रिक्षासारखे वाहन जोडून प्रवाशांची वाहतूक करतात. पुराच्या भीतीमुळे बहुतांश घरे स्टील्टवर उभारलेली असतात .घरांवर लाल, गुलाबी रंगाची उतरती स्वच्छ छपरे होती.ठिकठिकाणच्या पॅगोडांवरील कौले सोनेरी, निळसर, व विटकरी रंगाची होती. फुटबॉल, सॉकर व खमेर युद्धकलेतून जन्मलेले किक बॉक्सिंग लोकप्रिय आहे. एका हॉटेलमध्ये जेवणासोबत अप्सरा नृत्य बघायला मिळाले. त्यातील तरुणांनी सोवळ्यासारखे काष्ट्याचे धोतर व शर्ट आणि तरुणींनी  नऊवारीसारखे  काष्टयाचे वस्त्र कमरेभोवती गुंडाळून वरती ब्लाउज घातले होते. अतिशय संथ हालचालींमध्ये, तालवाद्य व दक्षिण भारतीय संगीतासारख्या गाण्यावर वेगवेगळ्या  छोट्या कथा त्यांनी सादर केल्या.

कंबोडिया_ भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २० – भाग १ – कंबोडियातील अद्वितीय शिल्पवैभव ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २० – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कंबोडियातील अद्वितीय शिल्पवैभव ✈️

सिंगापूर आणि थायलंड हे देश आपल्या परिचयाचे आहेत. बँकॉक म्हणजे थायलंडच्या राजधानीला अनेकांनी भेट दिली असेल. थायलंडला जोडून आग्नेय दिशेला  कंबोडिया नावाचा एक छोटासा देश आहे. बँकॉकला विमान बदलून आम्ही कंबोडियाच्या सियाम रीप या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो.

कंबोडियाचे आधीचे नाव कांपुचिया तर प्राचीन नाव कंबुज असे होते. इसवी सन ९७४ मधील तिथल्या एका संस्कृत शिलालेखाप्रमाणे दक्षिण भारतातील एका राजाने कंबोडियाच्या नागा राजकन्येशी विवाह केला होता. सियाम रीपपासून जवळच अंगकोर नावाचे ठिकाण आहे. अंगकोर ही त्यावेळी कंबोडियाची राजधानी होती. अंगकोर येथे १८०० वर्षांपूर्वी बांधलेला हिंदू देवालयांचा एक शिल्पसमूह  ७७ चौरस किलोमीटर एवढ्या प्रचंड परिसरात आहे. इथल्या अद्वितीय शिल्पकलेवर तामिळनाडूतील चोला शैलीचा तसेच ओरिसा शैलीचा प्रभाव जाणवतो.सॅ॑डस्टोन, विटा व लाल- पिवळा कोबा वापरून उभारलेले हे शिल्पांचे महाकाव्य जगातील सर्वात मोठे धार्मिक शिल्पकाम समजले जाते.

प्राचीन काळापासून इथे खमेर संस्कृती नांदत आहे व आजही इथले ९०% लोक खमेर वंशाचे आहेत. त्यांची लिपी व भाषा खमेर आहे. कंबोडियावर अनेक शतके व्हिएतनाम, थायलंड, चीन, जपान, फ्रान्स अशा अनेक देशांनी राज्य केले. सोळाव्या शतकात धाडसी युरोपीयन प्रवाशांना इथल्या जंगलात फिरत असताना अंगकोर इथल्या शिल्पसमूहाचा अकस्मात शोध लागला.

अंगकोर वाट ( मंदिर )हे बरेचसे सुस्थितीत असलेले प्रमुख देवालय आहे. राजा सूर्यवर्मन (द्वितीय ) याच्या कारकिर्दीमध्ये हे देवालय १२ व्या शतकाच्या पूर्वार्धात बांधण्यात आले. या अतिशय भव्य, देखण्या मंदिराला पाच गोपुरे आहेत. यातील मधले उंच गोपूर हे मेरू पर्वताचे प्रतीक मानले जाते. ही मेरू पर्वताची पाच शिखरे मध्यवर्ती मानून साऱ्या विश्वाची प्रतीकात्मक स्वरूपात उभारणी होईल अशा पद्धतीने पुढील प्रत्येक राजाने इथले बांधकाम केले आहे.  मंदिराभोवतालचे तळे सागराचे प्रतीक मानले जाते. गुलाबी कमळांनी भरलेल्या तळ्यात मंदिराचे देखणे प्रतिबिंब पाहून मंदिर प्रांगणातील उंच, दगडी पायऱ्या चढायला सुरुवात केली.

जगातील सर्वात मोठी श्रीविष्णूची आठ हात असलेली भव्य मूर्ती इथे आहे. शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या, खांद्यावरून सिल्कचे सोवळे पांघरलेल्या या मूर्तीची आजही पूजा केली जाते. परंतु या मूर्तीचे मस्तक आता भगवान बुद्धाचे आहे.खमेर संस्कृतीमध्ये हिंदू व बौद्ध या दोन्ही धर्मांचा प्रभाव होता. श्री विष्णूचे मूळ मस्तक आता म्युझियम मध्ये आहे.

या मंदिराच्या दोन्ही बाजूच्या लांबलचक ओवऱ्या त्यावरील सलग, उठावदार, प्रमाणबद्ध कोरीव कामामुळे जगप्रसिद्ध आहेत.  ६०० मीटर लांब व दोन मीटर उंच असलेल्या या दगडी पॅनलवर रामायण व महाभारत यातील अनेक प्रसंग अत्यंत बारकाईने कोरलेले आहेत. कुरुक्षेत्रावर लढणारे कौरव-पांडव, त्यांचे प्रचंड सैन्य, हत्ती, घोडे, रथ व त्यावरील योद्धे, बाणाच्या शय्येवर झोपलेले भीष्म,बाणाने वेध घेणारे द्रोणाचार्य , भूमीत रुतलेले रथाचे चाक वर काढणारा कर्ण, अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा श्रीकृष्ण, हत्तीवरून लढणारा भीम व त्याच्या ढालीवरील राहूचे तोंड असे अनेकानेक प्रसंग कोरलेले आहेत.

पायाला बांधलेल्या उखळीसकट रांगणारा कृष्ण, कृष्णाने करंगळीवर उचललेल्या गोवर्धन पर्वताखाली आश्रय घेणारे गुराखी व गाई, आपल्या वीस हातांनी कैलास पर्वत हलविणारा रावण,  शंकराला बाण मारणारा कामदेव, कामदेवाच्या मृत्यूनंतर रडणारी रती, वाली व सुग्रीव युद्ध, वासुकी नागाची दोरी करून समुद्रमंथन करणारे  देव-दानव, त्या समुद्रातून वर आलेले मासे, मगरी, कासवे ,आकाशातील सूर्य- चंद्र, कूर्मावतारातील विष्णूने तोलून धरलेला मंदार पर्वत अशा अनेक शिल्पाकृती पाहून आपण विस्मयचकित होतो.

दुसऱ्या बाजूच्या पॅनेलवर सूर्यवर्मन राजाची शाही मिरवणूक आहे. यात प्रधान, सेनापती, हत्ती, घोडे, रथ,  बासरी , ढोलकी व गॉ॑ग वाजविणारे वादक दाखविले आहेत. त्या पुढील पॅनलवर हिंदू पुराणातील स्वर्ग-नरक, देव-देवता, रेड्यावरील यमराज दाखविले आहेत. या सबंध मंदिरात मिळून जवळजवळ  १८०० अप्सरांचे पूर्णाकृती शिल्प आहे. त्यांच्या केशरचना, नृत्यमुद्रा, भावमुद्रा, दागिने, वस्त्रे पाहण्यासाठी जगभरचे कलाकार आवर्जून कंबोडियाला येतात.  विविध ठिकाणी शंकर, मारुती, गणपती यांच्या छोट्या मूर्ती आहेत. हे गणपती दोन हातांचे, सडपातळ व सोंड पुढे वाकलेली असे आहेत. जिथे गणपतीला चार हात आहेत तिथे मागील दोन हातात कमळ, चक्र आहे.

वास्तुशास्त्राचा अजोड नमुना म्हणून वाखाणलेल्या या देवालयाचे एकावर एक तीन मजले आहेत. लांबलचक कॅरिडॉर्स व उंच जिने यांनी ते एकमेकांना जोडलेले आहेत. दुसऱ्या मजल्यावर जाताना भगवान बुद्धाचे उभे व बसलेले वेगवेगळ्या मुद्रांमधील अनेक पुतळे आहेत. गॅलरीच्या दोन्ही बाजूच्या खांबांवर नागाची शिल्पे आहेत. तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पाच मजले उंच शिडी चढून जावे लागते. तेथील गच्चीवरून या मंदिराची रचना व आजूबाजूचा भव्य परिसर न्याहाळता येतो. मंदिराच्या गॅलऱ्यांचे दगडी खांब एखाद्या लेथवर केल्यासारखे गुळगुळीत, सुरेख वळणावळणांचे आहेत. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेले, भव्य पण प्रमाणबद्ध रचना असलेले, असंख्य रेखीव शिल्पाकृती असलेले हे महाकाव्य भारावून टाकणारे असेच आहे.

अंगकोर थोम ( शहर ) येथील गुलाबी कमळांच्या तळ्यावरील छोटा पूल ओलांडला की रस्त्याच्या एका बाजूला देव तर दुसऱ्या बाजूला दानव सात फण्यांच्या नागाचे लांबलचक जाड अंग धरुन समुद्रमंथन करताना दिसतात. या नगरीचे प्रवेशद्वार २३ मीटर्स म्हणजे जवळजवळ सात मजले उंच आहे. त्यावर चारी दिशांना तोंडे असलेली एक भव्य मूर्ती आहे. प्रवेशद्वाराशी दोन्ही बाजूंना तीन मस्तके असलेला इंद्राचा ऐरावत आहे. हत्ती सोंडेने कमळे तोडीत आहेत. त्यांच्या सोंडा प्रवेशद्वाराचे खांब झाले आहेत. अशी पाच प्रवेशद्वारे असलेल्या या शहराचा बराचसा भाग आता जंगलांनी व्यापला आहे. आठ मीटर उंच व प्रत्येक बाजू तीन किलोमीटर लांब अशी भक्कम , लाल कोब्याची संरक्षक भिंत या शहराभोवती उभारण्यात आली होती. यातील फक्त दक्षिणेकडील भाग सुस्थितीत आहे.

प्रत्येक कोपऱ्यात उंच देवालय तसेच लोकेश्वर बुद्धाची देवळे आहेत. मुख्य देवालय तीन पातळ्यांवर असून त्यावर ५४ उंच मनोरे आहेत. प्रत्येक मनोर्‍यावर राजाच्या चेहऱ्याशी साम्य असलेले चार हसरे चेहरे आहेत. फणा उभारलेले नाग, गर्जना करणारे सिंह आहेत. सहा दरवाजे असलेल्या लायब्ररीसारख्या बिल्डिंग बऱ्याच ठिकाणी आहेत. त्यावरील पट्टिकांवर कमळे, देवता असे कोरले आहे. एक आरोग्य शाळा ( हॉस्पिटल ) आहे. एके ठिकाणी नागाच्या वेटोळ्यावर बसलेली, चेहर्‍याभोवती नागाचा फणा असलेली, बारा फूट उंचीची भगवान बुद्धाची पद्मासनात बसलेली मूर्ती आहे.उंच चौथऱ्यांच्या खालील बाजूला अप्सरा, चायनीज व खमेर सैनिक, वादक, प्राण्यांची शिकार, शिवलिंग, आई व मूल, बाळाचा जन्म, मार्केटमध्ये भाजी-फळे विकणाऱ्या स्त्रिया, माकडे, कोंबड्यांची झुंज, मोठा मासा, गरुडावरील विष्णू, नौकाविहार करणाऱ्या स्त्रिया अशी अनेक शिल्पे आहेत. एका चौथऱ्यावर खाली हत्तींची रांग तर एके ठिकाणी मानवी धडाला सिंहाचे तोंड, गरुडाचे तोंड कोरलेली अनेक शिल्पे आहेत. अगदी खालच्या पातळीवर पाताळातील नागदेवता,जलचर आहेत. एके ठिकाणी हाताचा अंगठा नसलेला व लिंग नसलेला एक राजा कोरला आहे. त्याला ‘लेपर किंग’ असे म्हणतात. राजा जयवर्मन सातवा व राजा जयवर्मन आठवा यांच्या कारकिर्दीमध्ये हे शहर उभारले गेले.

कंबोडिया_ भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक १९ – भाग ३ – विद्या आणि कला यांचं माहेरघर – ग्रीस ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक १९ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ विद्या आणि कला यांचं माहेरघर– ग्रीस ✈️

दुसऱ्या दिवशी सॅऺटोरिनी बेट ते अथेन्स हा प्रवास एका अवाढव्य क्रूझमधून केला. अडीच ते तीन हजार माणसं आणि कितीतरी मोटारी , ट्रक पोटात घेऊन ती क्रूझ, पोपटी पाण्यावर पांढऱ्या समुद्र फेसाची नक्षी काढत डौलात चालली होती. प्राचीन काळापासून ग्रीकांची समुद्रावर सत्ता होती. इथूनच धाडशी खलाशांनी आपली गलबतं रशिया आणि पार इंग्लंड फ्रान्स इटलीपर्यंत नेऊन व्यापार केला होता.  ग्रीसच्या वैभवात भर टाकली होती.

आज अथेन्सहून डेल्फी इथे जायचं होतं. ग्रीक पौराणिक कथांप्रमाणे झ्यूस हा देवांचा देव आहे.  डेल्फी हे झ्यूसच्या मुलाचं म्हणजे अपोलोचं ठिकाण आहे.  अथेन्सपासून डेल्फीपर्यंतचा रस्ता अतिशय सुंदर होता. पारोसनेस पर्वतांच्या निळ्या-हिरव्या सलग रांगा पसरल्या होत्या. सुपीक जमिनीत द्राक्षं, सफरचंद, पीच, चेरी यांच्या बागा व गहू मका अशी शेती होती. ऑलिव्ह वृक्षांच्या बागा होत्या. मेपल आणि बर्चची झाडं होती.ग्रीक पुराणकथेप्रमाणे झ्यूस देवाने  पृथ्वीचे मध्यवर्ती स्थान शोधण्यासाठी पूर्व आणि पश्चिमेला दोन गरुड पाठविले. त्यांची गाठ डेल्फी इथे पडली. म्हणून डेल्फी ही पृथ्वीची बेंबी आहे असं ग्रीक मानत.

पाच हजार वर्षांपूर्वी पर्वतांच्या कुशीमध्ये अपोलोचं व अथिनाचं अशी दोन महाप्रचंड देवालये होती. या धर्मकेंद्रात भाविकांचा ओघ असे. लोकप्रिय व श्रीमंत अशा या देवालयांनी  एक हजार वर्षांचा सुवर्णकाळ अनुभवला. नंतर रोमन सम्राट थिओडोसिअस याने डेल्फीचा नाश केला. नंतरच्या भूकंपामध्ये दोन्ही मंदिरे व डेल्फी जमिनीत गाडली गेली.  साधारण दोनशे वर्षांपूर्वी उत्खननातून हे अवशेष मिळाले.

उंचावरील अपोलोच्या देवळाच्या मूळ ४० खांबांपैकी आता सहाच खांब शिल्लक आहेत.पुढे ॲ॑फी  थिएटरचे अवशेष आहेत. आता या ठिकाणी प्राचीन नाट्यशास्त्र,पुरातत्व,नाटकं, संगीत या विषयांवरील परिषदा आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

म्युझियमची इमारत प्रशस्त, देखणी आहे. आतल्या तेरा मोठ्या दालनात प्राचीन इतिहास, संस्कृती, कला यांची झलक दाखविणारी शिल्प व इतर वस्तू आहेत.म्युझियमच्या प्रवेशद्वाराजवळ ओम्फालस म्हणजे नाभी- स्तंभ आहे.  उत्तम कोरीव काम असलेल्या या शिल्पाला कळीसारखा शेंडा आहे.

अपोलोची चार घोड्यांच्या रथावरील मूर्ती अतिशय देखणी आहे. स्त्री-पुरुषांच्या इतर अनेक शिल्पातून स्नायूंची प्रमाणबद्धता, मानवी शरीराची रचना, चेहऱ्यावरील भावभावना, पोशाख, केशरचना, दागिने यांचं मार्बलमधून कोरलेलं, जिवंत वाटणारं दर्शन होतं. मोझॅइक भित्तीचित्र आहेत. भाजलेल्या मातीचे रंगविलेले कलश,  उंच उभे रांजण, भूमितीमधील त्रिकोण, षट्कोन, वर्तुळ यांच्यातील सुंदर आकृती, दागिने ठेवण्याची नक्षीदार पात्रे, गर्भवती स्त्रिया, स्तनपान करणाऱ्या स्त्रिया अशा प्रकारच्या अनेक कलाकृतीतून एका समृद्ध, संपन्न संस्कृतीचं दर्शन होतं.

ब्रांझच्या रथाचा सारथी उजव्या हाताने घोड्याचा लगाम खेचतोय. त्याचा डावा हात अर्धवट तुटलेला आहे. पण त्याच्या पायघोळ वस्त्राच्या चुण्या, डोळ्यातील जिवंत भाव पहाण्यासारखे आहेत. सुवर्ण विभागात स्त्रियांच्या गळ्यातील नाजूक डिझाईनचे हार, नाना प्रकारचे रत्नजडित अलंकार, रत्नजडित भांडी, डिश, पेले आहेत. देवालयाच्या स्तंभांवरील कोरीव पट्टिका, सिंहाचं अंग आणि  मानवी चेहरा व पंख असलेला स्फिंक्स, डोक्यावर ब्रांझच्या मोठ्या  घमेल्यात यज्ञकुंड घेतलेली स्त्री ,मार्बलच्या कोरीव स्टॅन्डवरील तीन देवतांच्या मूर्ती अशा सार्‍या कलाकृती बघण्यासारख्या आहेत.

गाईडने एका उंचावरील हॉटेलमध्ये स्थानिक पद्धतीचं जेवण घेण्यासाठी नेलं. हॉटेलच्या काचेच्या खिडक्यांमधून दूरवरील डोंगर रांगा आणि खालची दरीतली घरं, हिरवी शेती, झाडं, दिसत होती. प्रथम लिंबाचं सरबत व उकडलेल्या, सॉस घातलेल्या  भाज्यांची डिश दिली.  त्या नंतर मोठ्या टोमॅटोमध्ये भरलेला भात आला.या भाताला  याहिस्ता असं म्हणतात. आम्ही एके ठिकाणी द्राक्षाच्या पानात गुंडाळलेला डोल्मा राईस खाल्ला होता. त्यापेक्षा याहिस्ता चविष्ट होता. सुवलाकी म्हणजे चिकन किंवा मेंढीचे मांस भाजून केलेला पदार्थ लोकप्रिय आहे. टोमॅटो राईसनंतर चॉकलेट पुडिंग्जचा आस्वाद घेऊन स्थानिक जेवणाला मनापासून सलाम केला. बाहेर बाजारात घेतलेली बकलावा म्हणजे ड्रायफ्रूट भरलेली छोटी गुंडाळी चविष्ट होती.

आम्ही ग्रीसला गेलो त्यावेळी ग्रीसची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली होती. एक कोटीहून अधिक लोकसंख्या असलेला  ग्रीस, ‘आहे मनोहर तरी……..’ अशा परिस्थितीत होता. वरवर उत्तम, सुंदर दिसंत असलं तरी प्रत्यक्षात ग्रीसचा एक पोकळ डोलारा झाला होता. अर्थव्यवस्था घसरणीला लागली होती.१९७३ साली  ग्रीसमध्ये प्रजासत्ताक राज्याची स्थापना झाली. नंतर तो देश नाटोचा मेंबर झाला. १९८१ मध्ये ग्रीस युरोपियन युनियनचा सदस्य झाला. पश्चिम युरोपच्या मदतीने आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे पण त्याची गती खूपच कमी आहे. क्षमतेपेक्षा जास्त कर्जाची उचल, वाढती वित्तीय तूट, आणि ती तूट भरून काढायला अधिक कर्ज असं दुष्टचक्र सुरू आहे. राजकीय अस्थैर्य वाढलं. बेरोजगारी आणि असंतोष वाढला .अथेन्समधील भिंती निषेधाच्या काळ्या रंगातील ग्राफिटीने भरून गेल्या होत्या. युरोपियन युनियनच्या आधीन झालेल्या या देशाला कडक आर्थिक निर्बंधाना तोंड द्यावं लागत  आहे.

सध्याच्या अतिवेगवान जगामध्ये इतिहासकालीन समृद्धीवर, स्मरणरंजनावर फार काळ जगता येणार नाही हा धडा ग्रीस कडून मिळाला आहे.

सॅ॑टोरीनी  बेटावर जाताना अथांग, पोपटी पारदर्शक समुद्राच्या दोन्ही कडांचे पर्वत पाहून ,’ समुद्र वसने देवी, पर्वत:स्तन मंडले….’ या श्लोकाची आठवण येत होती. सध्या या ‘विष्णुपत्नी लक्ष्मी’ चा ग्रीसवरील रुसवा घालविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

भाग 3 व ग्रीस समाप्त

 © सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक १९ – भाग २ – विद्या आणि कला यांचं माहेरघर – ग्रीस ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक १९ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ विद्या आणि कला यांचं माहेरघर– ग्रीस ✈️

प्राईम मिनिस्टर रेसिडन्स म्हणजे पूर्वीच्या रॉयल पॅलेस इथे उतरलो. इथे दर तासाला ‘चेंजिंग द गार्डस्’  सेरीमनी होतो. दोन सैनिक पांढरी तंग तुमान व त्यावर पांढरा, तीस मीटर्स कापडाचा, ४०० सारख्या चुण्या असलेला घेरदार ड्रेस घालून,  डोळ्यांची पापणीसुद्धा न हलवता दोन बाजूंना उभे होते. त्यांच्या डोक्यावर लाल पगडीसारखी टोपी आणि हातात तलवारी होत्या. त्यांच्या पायातील लाकडी तळव्यांचे बूट प्रत्येकी साडेतीन किलो वजनाचे होते. थोड्यावेळाने सैनिकांची दुसरी जोडी आल्यावर या सैनिकांनी गुडघ्यापर्यंत पाय उचलून बुटांचा खाडखाड आवाज करीत शिस्तशीर लष्करी सलामी दिली. ते निघून  गेल्यावर त्यांची जागा दुसऱ्या जोडीने घेतली.

प्लाका या भागात शहराचं जुनं खानदानी सौंदर्य दिसतं. जुन्या पद्धतीची घरं, उघडमीट होणारी शटर्स असलेल्या काळ्या लाकडी पट्टयांच्या खिडक्या, घरापुढील कट्टयावर सुंदर फुलझाडं, षटकोणी लांबट लोलकासारखे  काळ्या रंगाचे डिझाईनचे दिव्याचे खांब, चर्चेस, जुन्या वास्तू, घरांच्या कलापूर्ण गॅलेऱ्या  ब्राँझचे रेलिंग असलेल्या होत्या.अशा या भागात जुन्या काळी श्रीमंत व्यापारी, राजकारणी,विद्वान यांची घरं असायची .आजही तिथे घर असणं अभिमानास्पद समजलं जातं.

ॲक्रोपोलीसवरील तोडमोड केलेली अनेक शिल्पं आणि शहरभर उत्खननात सापडलेले अनेक भग्न अवशेष आता ॲक्रोपोलिस म्युझियममध्ये अत्यंत काळजीपूर्वक जतन करण्यात आले आहेत. प्राचीन इतिहास, मानवी जीवन, स्थापत्यशास्त्र, शिल्पकला यांचा जागतिक महत्त्वाचा हा खजिना बघण्यासाठी तसंच ॲक्रोपोलिसचे उद्ध्वस्त अवशेष पाहण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो प्रवासी ग्रीसला भेट देतात. उत्खननात सातव्या ते नवव्या शतकातील बेझेन्टाईन काळातील एका छोट्या वसाहतीचे अवशेष मिळाले . हे सापडलेले अवशेष साफसफाई करून त्यावर जाड काचेचे आवरण घालून ॲक्रोपॉलिस म्युझियमच्या प्रांगणात ठेवण्यात आले आहेत .इथून म्युझियममध्ये प्रवेश करताना या लोकवस्तीची वर्तुळाकार रचना, सार्वजनिक हॉल, मध्यवर्ती असलेली विहीर अशी रचना पाहता येते. ॲक्रोपोलीसमध्ये सापडलेल्या मार्बलच्या पट्टिका म्युझियमच्या तिसऱ्या मजल्यावर आहेत.  पॅसिडॉन, अथेना, अपोलो आणि इतर अनेकांचे अतिशय रेखीव  कोरलेले पुतळे तिथे आहेत. त्यांची बसण्याची आसने, अंगावरील वस्त्रे, बसण्याची ऐटदार पद्धत, कुरळे केस, दाढी, चेहऱ्यावरील भावभावना ,शरीराच्या स्नायूंचा डौलदारपणा, तेजस्वी डोळे असं पाहिलं की त्या प्राचीन शिल्पकारांच्या कलेला मनापासून दाद द्यावीशी वाटते.पर्शियाने ग्रीसवर आक्रमण केलं व तोडफोड सुरू केली त्यावेळी ॲक्रोपोलीसवरील सौंदर्य देवतेचा पुतळा शत्रूपासून वाचविण्यासाठी जमिनीत पुरला होता. तो १८८६ मध्ये उत्खननातून वर काढला. तिचा हसरा चेहरा, डोक्यावरील रुंद महिरप आणि दोन्ही खांद्यांवरून पुढे आलेल्या पीळ घातल्यासारख्या तीन-तीन वेण्या बघत रहाव्या अशा आहेत. त्रिकोणी आसनावर नृत्याच्या मुद्रा करणारी, डोक्यावरून पदरासारखं मार्बलच वस्त्र घेतलेली स्त्री वर्षभरातील वेगवेगळ्या ऋतूंचं अस्तित्व दाखवते. तिने उजव्या खांद्यावरून मार्बलचे चुणीदार वस्त्र घेतले आहे. त्याचे काठ  व वस्त्रावरील डिझाईन रंगीत काळसर मार्बलचं आहे. काही पाठमोरे स्त्री पुतळे कुरळ्या केसांच्या पाचपेडी वेण्या घालून खाली केसांचे झुपके सोडलेल्या अशा आहेत.

महान योद्धा अलेक्झांडर खुष्कीच्या मार्गाने भारतापर्यंत आला होता. त्याचा फक्त मानेपर्यंत चेहरा असलेला एक पुतळा इथे आहे. त्याच्या कुरळ्या केसांची महिरप, तरतरीत नाक आणि हिरवे घारे डोळे बघण्यासारखे आहेत. लहान मोठ्या अनेक उंच खांबांवर स्त्री-पुरुषांचे उभे पुतळे ठेवले आहेत. त्यातील कोणाचे हात तुटलेले आहेत तर कुणाचं नुसतं धडच आहे. तरीही त्यांचं शरीरसौष्ठव, उभे राहण्याची पद्धत, अंगावरील वस्त्रांच्या चुण्या यावरून त्यांच्या शरीराच्या प्रमाणबद्ध रचनेची कल्पना येऊ शकते.

भाजलेल्या मातीच्या, भोवर्‍याच्या आकाराच्या, सुंदर रंगकाम केलेल्या अनेक स्पिंडल्स १९५० साली उत्खननात सापडल्या. प्राचीन काळातील स्त्रिया हे *स्पिंडल देवीच्या पायाशी वाहत असत असे गाईडने सांगितले. काही पट्टीकांवर ग्रीक आणि पर्शियन योद्धे एकमेकांशी लढताना दाखविले आहेत. तीन सशक्त, हसऱ्या मुद्रेच्या पुरुष प्रतिमा एकाला एक चिकटून आहेत. पाणी, अग्नी आणि वायू यांचे ते प्रतीक आहे. एका घोडेस्वाराची तंग तुमान आणि चुडीदार अंगरखा रंगीत आहे तर घोड्याच्या आयाळीवरील लाल हिरवा मार्बलचा पट्टा रेशमी वस्त्रासारखा दिसतो. घोड्याच्या शेपटीलाही हिरवट रंगाचा मार्बल वापरला आहे. समाजातील उच्चभ्रू स्त्रियांची स्कर्टसारखी फॅशनेबल व रंगीत डिझाईनच्या मार्बलची वस्त्र लक्षवेधी आहेत. एक दाढीवाला तरूण मानेभोवती गाईच्या छोट्या वासराला घेऊन निघाला आहे तर हात तुटलेल्या एका नग्न उभ्या युवकाचं प्रमाणबद्ध शरीर, तेजस्वी डोळे, छाती- पोटाचे, पायाचे स्नायू अतिशय रेखीव आहेत.एका पेल्मेटवरील रंगीत उमलत्या फुलांचं शिल्प वाऱ्यावर डोलत असल्यासारखं वाटतं. गतकाळातील हा अमूल्य सांस्कृतिक वारसा पाहता-पाहता  खरोखरच हरवल्यासारखं झालं.

सॅ॑टोरिनी हे ग्रीसचं छोटसं बेट एजिअन समुद्रात आहे. अथेन्सहून विमानाने सॅ॑टोरिनीला पोचलो. एका चढणीवरच्या रस्त्यावरील सुंदर प्रशस्त बंगला हे आमचं हॉटेल होतं. हॉटेलच्या आवारात टोमॅटो, अंजीर, रंगीत बोगनवेल ,सुवासिक मॅग्नेलिया बहरली होती. लंबवर्तुळाकार निळ्या पोहण्याच्या तलावाभोवती आमच्या रूम्स होत्या. रूमला छोटी गॅलरी होती. वाटलं होतं त्यापेक्षा हॉटेल खूपच मोठं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी  दाराचा पडदा सरकवला तर काय आश्चर्य स्विमिंगपुलावरील आरामखुर्च्या बाजूला सरकवून त्या जागेवर योगवर्ग चालू होता. एक कमनीय योग शिक्षिका समोरच्या पंचवीस-तीस स्त्री पुरुषांकडून योगासनं, प्राणायाम करून घेत होती. खरं म्हणजे हा योगवर्ग हॉटेलमधील सर्व प्रवाशांसाठी होता. आदल्या दिवशी संध्याकाळी तिथे आल्यावर बाजारात फेरफटका मारताना अतिशय रसाळ, लालसर काळी, मोठाली चेरी मिळाली होती. मोठे पीच आणि तजेलदार सफरचंद आपल्यापेक्षा खूप स्वस्त व छान वाटली म्हणून घेतली होती. जेवून हॉटेलवर आल्यावर सर्वांनी तिथल्या हॉलमध्ये बसून गप्पा मारताना त्या फळांवर ताव मारला होता आणि त्या गडबडीत हॉलमध्ये लावलेली योगवर्गाची नोटीस वाचायची राहिली. नाही तर आम्हालाही योगवर्गाचा लाभ घेता आला असता. पण आमचा ‘योग’ नव्हता. भारतीय योगशास्त्राचे महत्त्व आता जगन्मान्य झालं आहे हे मात्र खरं!

माझी मैत्रीण शोभा भरतकाम आणि विणकाम करण्यात कुशल आहे. नाश्त्याच्या वेळी तिथल्या एका खिडकीचा विणकाम केलेला पांढरा स्वच्छ पडदा तिला आवडला म्हणून ती जवळ जाऊन बघायला लागली तर टेबलावरच्या आमच्या डिश उचलून, टेबल साफ करणारा इसम लगबगीने तिच्याजवळ गेला. आणि कौतुकाने सांगू लागला की हे सर्व भरतकाम, क्रोशाकाम माझ्या आईने केले आहे. तीन चार वर्षांपूर्वी आमची आई आणि नंतर वडीलही गेले. आम्ही सर्व बहिण भावंडं मिळून हा फॅमिली बिझनेस चालवतो. मग त्याने आम्हाला आपल्या आई-वडिलांचे फोटो, आईने केलेल्या अनेक वस्तू, विणलेले रुमाल दाखवले. खरोखरच सर्व हॉटेलमधील निरनिराळ्या पुष्परचना, सोफ्यावरील उशांचे अभ्रे, पडदे, दिवे, कलात्मक वस्तू उच्च अभिरुचीच्या, स्वच्छ, नीटनेटक्या होत्या. आई-वडिलांबद्दलंच प्रेम आणि अभिमान त्या देखणेपणात भर घालीत होतं.

आज दिवसभर छोट्या बोटीतून एजिअन समुद्रात फेरफटका होता. आम्हा दहाजणांसाठीच असलेली ती छोटीशी बोट सर्व सुविधायुक्त होती. चालक व त्याचा मदतनीस उत्साहाने सारी माहिती सांगत होते आणि अधून मधून वेगवेगळे खाद्यपदार्थ देऊन आमची जिव्हा तृप्त करीत होते. त्या छोट्याशा बोटीच्या नाकाडावर बसून समुद्राचा ताजा वारा प्यायला मजा वाटत होती. दोन्ही बाजूला उंच कड्यांच्या डोंगररांगा होत्या. काहींचा रंग दगडी कोळशासारखा होता. काही डोंगर गाद्यांच्या गुंडाळीसारखे वळकट्यांचे होते.  काही पांढरट पिवळट लालसर मार्बलचे होते. काही डोंगर ग्रॅनाइटचे होते. एका छोट्या डोंगराजवळ बोट थांबली. हा जागृत ज्वालामुखी आहे. त्याच्या माथ्यावरच्या छिद्रातून सल्फ्युरिक गॅसेस बाहेर पडताना दिसतात. दगडी कोळशासारखा दिसणार तो डोंगर अतिशय तप्त होता.

तिथून जवळच थर्मल वॉटरचे झरे समुद्रात आहेत. आमच्या आजूबाजूला असंख्य लहान- मोठ्या बोटी प्रवाशांनी भरलेल्या होत्या. सर्फिंग करणारे, छोट्या वेगवान यांत्रिक बोटीतून पळणारे अनेक जण होते.उष्ण  पाण्याच्या झऱ्यांजवळ आल्यावर आजूबाजूच्या बोटीतून अनेकांनी समुद्रात धाड् धाड् उड्या मारल्या. जल्लोष,मौज मस्ती यांना ऊत आला होता. समुद्रस्नान, परत डेकवर सूर्यस्नान असा मनसोक्त कार्यक्रम चालू होता. इथे बाकी कशाची नाही पण अंगावरच्या कपड्यांची टंचाई नजरेत भरत होती. आणि सिगारेटसचा महापूर लोटला होता. बोट थिरसिया बेटाजवळ आल्यावर चालकाने बोट थांबवून बोटीतच सुंदर जेवण दिलं. तिथून परतताना एका उंच डोंगरकड्यावर पांढरीशुभ्र असंख्य घरं एका ओळीत बसलेली दिसली. पांढरे शुभ्र पंख पसरून बसलेला राजहंसांचा थवाच जणू!’ इथे कुठे यांनी घरं बांधली? वर जायची- यायची काय सोय?’ असं मनात आलं तर चालकाने डोंगरातून वर जाणाऱ्या केबल कार्स आणि डोंगराच्या पोटातून जाणारी फनिक्युलर रेल्वे दाखविली. उच्चभ्रू श्रीमंत लोकांची ती उच्च वसाहत होती.

ग्रीस भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares