मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक २३ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २३ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ एक जिद्दी देश— इस्त्रायल  ✈️

जॉर्डनची राजधानी अम्मान इथून दोन तासांचा बस प्रवास करून ‘शेख हुसेन ब्रिज’ हा जॉर्डन नदीवरील पूल ओलांडला. इथे जॉर्डनची सरहद्द ओलांडून इस्त्रायलमध्ये प्रवेश केला.

‘इस्त्रायल म्हणजे काय’? याची झलक चेकपोस्टपासूनच दिसायला लागली. आमच्या दहा जणींचा इस्रायलचा व्हिसा चेकपोस्टवर दाखवला. यांत्रिक तपासणी झाली तरी प्रत्येकीवर प्रश्नांची फैर झडत होती. ‘कशासाठी आलात? तुम्हाला कोणी काही गिफ्ट इथे द्यायला दिली आहे का? बॅगेत काही घातक वस्तू आहे का? तुमची बॅग तुम्हीच भरली आहे का? तुम्ही सर्वजणी एकमेकींना किती वर्षं ओळखता?’ अशा तऱ्हेचे प्रश्न विचारले गेले. प्रत्येकीला स्वतःच्या बॅगा उघडून दाखवाव्या लागल्या.त्या अधिकाऱ्यांचे समाधान झाल्यावरच प्रवेश परवाना मिळाला. ‘आव- जाव घर तुम्हारा’ असा ढिला कारभार कुठेही नव्हता.

गाईड बरोबर बसने यारडेनीट या ठिकाणी गेलो. इथे जॉर्डन नदी ‘सी ऑफ गॅलिली’तून बाहेर पडते. नदीच्या पाण्यात उभे राहिल्यावर अनेक छोटे मासे पायाशी भुळभुळू लागले. जगभरातील अनेक देशांतून आलेले ख्रिश्चन भाविक इथे पांढरे स्वच्छ अंगरखे घालून धर्म गुरूंकडून बाप्तिस्माचा विधी करून घेत होते. नदीकाठच्या छोट्या हॉटेलात पोटपूजा केली.

तिथून ‘सी ऑफ गॅलिली’ इथे गेलो. नाव ‘सी ऑफ गॅलिली’  असले तरी हा समुद्र नाही. याला ‘लेक टिबेरियस’ असेही नाव आहे. समुद्रसपाटीपासून ७०० फूट खाली असलेले हे एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे. याचा परीघ ५३ किलोमीटर (३३मैल ),लांबी २१ किलोमीटर आणि रुंदी १३ किलोमीटर  आहे. या सरोवराची खोली शंभर ते दीडशे फूट आहे. इस्त्रायलच्या उत्तरभागातील डोंगररांगातून येणारे काही झरे, नद्या या सरोवराला मिळतात पण या सरोवराचा मुख्य स्रोत म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी जॉर्डन नदी!

या सरोवरात दोन तासांचे बोटिंग करायचे होते. ती लाकडी बोट चांगली लांबरुंद, स्वच्छ होती. बोट सुरू झाल्यावर गाईडने ग्रुपमधील सर्वात ज्येष्ठ म्हणून मी व आमची ग्रुप लीडर शोभा असे आम्हा दोघींना बोलावले व बोटीच्या चार पायर्‍या चढून  थोड्या वरच्या डेकवर नेले. बोटीवरचा एक स्टाफ मेंबर आपल्या भारताचा तिरंगा झेंडा घेऊन आला. तो त्याने तिथे असलेल्या  काठीच्या दोरीला लावला. त्याने सांगितले की ‘आता आम्ही तुमच्या राष्ट्रगीताची धून सुरू करणार आहोत. तुम्ही दोरी ओढून झेंडा फडकवा’. त्याक्षणी थरारल्यासारखे झाले. आम्ही व समोर उभ्या असलेल्या बाकी साऱ्या मैत्रीणी उजव्या हाताने सॅल्युट  करून उभ्या राहिलो. राष्ट्रगीताची धून सुरू झाली.  झेंडा फडकविला. अनपेक्षितपणे एका वेगळ्याच अनुभवाला सामोरी गेले.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे या प्रसंगाचे फोटो व्हाट्सॲप वरून लगेच घरी पाठविले गेले. ट्रीप संपवून घरी आल्यावर सतेज म्हणजे आमचा नातू म्हणाला,’ आजी, तू झेंड्याची दोरी अशी काय ‘टग् ऑफ वॉर’ ( रस्सीखेच ) सारखी खेचून धरली आहेस?’ ‘अरे काय सांगू? अजिबात ध्यानीमनी नसताना आयुष्यात पहिल्यांदाच भारताचा तिरंगा झेंडा फडकविण्याचं भाग्य लाभलं आणि तेसुद्धा परदेशात! भर पाण्यात असल्याने, बोट चांगली हलत होती. भरपूर वारा सुटला होता. कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रगीताची धून पूर्ण होईपर्यंत फडकविलेला झेंडा खाली येता कामा नये असं मनाने ठरविले आणि मी हातातली दोरी गच्च आवळून धरली.’

झेंडा वंदनानंतर  त्यांनी आम्हाला त्यांच्या एका हिब्रू गाण्यावरच्या चार स्टेप्स शिकविल्या व हिब्रू गाणे लावले.   त्यावर आम्ही त्यांनी दाखविल्याप्रमाणे नाचण्याचा प्रयत्न केला. झेंडा उभारण्याचा, झेंडावंदनाचा हृद्य कार्यक्रम आयुष्यभराची ठेव म्हणून मनात जपला.

आम्ही बोटीतून उतरल्यावर एक जपानी ग्रुप बोटीत चढण्यासाठी सज्ज होता. मला खात्री आहे की त्यांनी जपानी ग्रुपसाठी नक्की जपानी राष्ट्रगीत व त्यांचा झेंडा लावला असेल. टुरिझम म्हणजे काय व टुरिझम वाढविण्यासाठी काय काय करता येऊ शकते याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण समजायला हरकत नाही. ज्या चिमुकल्या देशाची एकूण लोकसंख्या साधारण ८२ लाख आहे त्या इस्त्रायलला दरवर्षी तीस लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात . ज्यू धर्मियांबरोबरच ख्रिश्चन व मुस्लिम धर्मियांसाठी इस्त्रायल हे पवित्र ठिकाण आहे. धार्मिक कारणासाठीही इस्त्रायलमध्ये पर्यटकांचा ओघ असतो.

राजकीय परिस्थितीमुळे ज्यू लोक जगभर विखुरले गेले होते. त्यांचा जर्मनीमध्ये झालेला अमानुष छळ सर्वज्ञात आहे. इसवी सन १९४८ साली ब्रिटिशांच्या मदतीने जॉर्डन नदीच्या प्रदेशात इस्त्रायल या राष्ट्राचा जन्म झाला. जगभरचे राष्ट्रप्रेमाने भारावलेले ज्यू इस्त्रायलमध्ये आले.जॉर्डन,लेबोनान, सिरिया, इजिप्त अशा सभोवतालच्या अरबी राष्ट्रांच्या गराड्यात अनेक लहान- मोठ्या लढायांना तोंड देत इस्त्रायल ठामपणे उभे राहिले आणि बारा-पंधरा वर्षात एक विकसित राष्ट्र म्हणून त्यांनी जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळविले. अत्यंत कष्टाळू,कणखर, देशप्रेमी ज्यू नागरिकांनी प्रथम त्यांची अर्थव्यवस्था बळकट केली. प्रत्येक क्षेत्रात सतत संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध व त्याचा परिणामकारक वापर हे इस्त्रायलचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. इस्त्रायलचा दक्षिण भाग हा निगेव्ह आणि ज्युदियन वाळवंटाचा प्रदेश आहे तर उत्तरेकडील डोंगररांगा व पश्चिमेकडील भूमध्य समुद्र यामुळे तिथल्या गॅलिली खोऱ्यात समशीतोष्ण हवामान आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती नसूनही इस्त्रायलने शेती,फळे व दुग्ध व्यवसायात आश्चर्यकारक प्रगती केली आहे.

दुसर्‍या दिवशी आम्ही एक ‘किबुत्स’बघायला गेलो. एका छोट्या गावासारख्या वस्तीने एकत्रितपणे केलेली शेती आणि दुग्ध व्यवसाय  याला ‘किबुत्स’ असे नाव आहे. इथल्या ४३० हेक्टरच्या अवाढव्य शेती व दुग्ध व्यवसायामध्ये फक्त पाचशे माणसे कामाला होती. हजारो संकरित गाई होत्या. त्यांच्यासाठी पत्र्याच्या मोठ्या मोठ्या शेडस् बांधलेल्या होत्या. गाईंच्या डोक्यावर खूप मोठ्या आकाराचे पंखे सतत फिरत होते. मध्येच पाण्याच्या फवार्‍याने त्यांना अंघोळ घातली जात होती. आम्ही इस्त्रायलला गेलो तेंव्हा उन्हाळा होता म्हणून ही व्यवस्था असावी. प्रत्येक गाईच्या कानाला तिचा नंबर पंच केलेला होता आणि एका पायात कॉम्प्युटरला जोडलेली पट्टी होती. दररोज तीन वेळा प्रत्येक गायीचे दूध काढले जाते. या गाई दिवसाला ४० लिटर दूध देतात.आचळांना सक्शन पंप लावून दूध काढले जात असताना त्यांच्या नंबरप्रमाणे सर्व माहिती कॉम्प्युटरमध्ये जमा होते. त्यावरून त्या गाईच्या दुधाचा कस व त्यात बॅक्टेरिया आहेत का हे  तपासले जाते. लगेच सर्व दूध स्टीलच्या नळ्यांतून कुलींगसाठी जाते. दूध, दुधाचे पदार्थ व चीझ यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. उत्तम बीज असलेले, जरुरी पुरेसे वळू निगुतीने सांभाळले जातात. बाकीच्यांची रवानगी कत्तलखान्यात होते. एवढेच नाही तर गाईंची दूध देण्याची क्षमता कमी झाली, दुधाचा कस कमी झाला, दुधात बॅक्टेरिया आढळले तर त्यांचीही रवानगी कत्तलखान्यात होते.

या सगळ्या गाई अगदी आज्ञाधारक आहेत. गोठ्यामध्ये लांब काठीसारखा सपाट यांत्रिक झाडू सतत गोल फिरत होता. त्यामुळे जमिनीवरील शेण, मूत्र गोळा केले जात होते . यांत्रिक झाडू आपल्या पायाशी आला की गाई शहाण्यासारखा पाय उचलून त्या झाडूला जाऊ देत होत्या.  दूध काढण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी जाऊन उभ्या राहत होत्या व त्यांचे सक्शन पंप सुटले की लगेच पुन्हा वळून आपल्या जागेवर जाऊन राहत होत्या. गोळा केलेले शेण व मूत्र खत बनविण्यासाठी जात होते.

जवळच लालसर आंब्यांनी लगडलेली दहा फूट उंचीची झाडे एका लाइनीत शिस्तीत उभी होती. प्रत्येक झाडाच्या बुंध्यात ड्रीप इरिगेशनने ठराविक पाणी देण्यात येत होते. त्यातूनच योग्य प्रमाणात खत देण्यात येत होते. अशीच रसदार लिचीची झाडे होती. ॲव्हाकाडो, ऑलिव्ह भरपूर प्रमाणात पिकवितात. झाडाची फळे हातांनी किंवा शिडी लावून काढता येतील एवढीच झाडाची उंची ठेवतात.केळींवर भरपूर संशोधन केले आहे.टिश्शू कल्चर पध्दतीने केळीच्या अनेक  जाती शोधून त्याचे भरपूर पीक घेतले जाते. कुठेही पाण्याचा टिपूससुद्धा जमिनीवर नव्हता. सर्व पाणी व खत ड्रीप लाईन्समधूनच दिले जाते. इस्त्रायलमधून मधून मोठ्या प्रमाणावर ऑलिव्ह व फळे निर्यात होतात.

इस्त्रायल भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २२ – भाग ३ – जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २२ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर  ✈️

इथून जेराश इथे गेलो. साधारण सहा हजार वर्षांपूर्वीच्या मनुष्यवस्तीच्या खुणा जेराश इथे सापडल्या आहेत. रोमन साम्राज्यात हे शहर वैभवाच्या शिखरावर होते. या शहराचे बरेचसे अवशेष सुस्थितीत आहेत. शेकडो वर्षे हे शहर वाळूच्या आवरणाखाली गाडलं  गेलं होतं.  सत्तर वर्षांपूर्वीच्या उत्खननात या सुंदर शहराची जगाला पुन्हा ओळख झाली. या शहराचं प्रवेशद्वार लाइम स्टोनचे चार उंच, भव्य खांब व कमानी यांनी बनलेले आहे. त्यावरील चक्रं, पानं, फुलं यांचे डिझाईन बघण्यासारखं आहे. रस्त्यांवर मोठ्या चौकोनी लाद्या तिरक्या बसविलेल्या आहेत. रथाच्या घोड्यांचे पाय घसरू नयेत म्हणून ही व्यवस्था होती. एका बाजूला टेकडीवर चर्च आहे तर एका टेकडीवर डायना या रोमन देवतेचे देऊळ आहे. डायना ही समृद्धीची निसर्गदेवता समजली जाते.थिएटर्स, खूप मोठे चौक, सार्वजनिक स्नानगृहे, कारंजी, आरोबा म्हणजे फ्लेश मार्केट, तिथली शेळ्या- मेंढ्या मारण्याची जागा, विक्रीची जागा, पाण्याची सोय अशा अनेक सोयी व बांधकामे तिथे  बघायला मिळाली. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सारं अतिशय प्रमाणबद्ध व प्रगत संस्कृतीचं द्योतक आहे. ग्रीक, रोमन आणि अरब यांच्या कला व संस्कृतीचा सुंदर संगम इथे पहायला मिळतो .

(जेराश,मृत समुद्र)

‘मृत समुद्र’ (डेड सी ) म्हणजे जॉर्डनमधील एक मोठं आकर्षण आहे. उत्तरेकडून वाहत येणारी जॉर्डन नदी या मृत समुद्राला मिळते. याला समुद्र असं म्हटलं तरी हे एक ५० किलोमीटर लांब व १५ किलोमीटर रुंदीचं खाऱ्या पाण्याचं तळं आहे. याच्या चहूबाजूंनी जमीन असल्यामुळे यात लाटा येत नाहीत. याचं वैशिष्ट्य म्हणजे मृत समुद्र व व त्याच्या परिसरातील जमीन ही पृथ्वीवरील सर्वात खोलवरची म्हणजे समुद्रसपाटीपेक्षा ४१० मीटर्स ( १३३८ फूट ) खोल आहे. पाण्याचा निचरा फक्त बाष्पीभवनामुळे होतो व त्यातले क्षार तसेच शिल्लक राहतात. त्यामुळे या समुद्राच्या पाण्याची क्षारता नेहमीच्या समुद्राच्या पाण्यापेक्षा दसपटीने जास्त आहे. हे क्षार मॅंगनीज, पोटॅशिअम, मीठ, ब्रोमीन, सोडियम या खनिजांनी समृद्ध आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात क्षार असल्यामुळे या पाण्यात जलचर जिवंत राहू शकत नाही म्हणून याचं नाव ‘मृत समुद्र’ असं पडलं.

या समुद्राच्या पाण्यामध्ये व त्यातील खनिजसमृद्ध माती, वाळूमध्ये त्वचारोग बरे करण्याचे, त्वचा सतेज करण्याचे गुणधर्म आहेत. तसेच सांधेदुखी, अस्थमा यावरही त्याचा उपयोग होतो. इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून या पाण्याचे औषधी गुणधर्म माहित होते. प्राचीनकाळी इजिप्तमध्ये मृत शरीराची ‘ममी’ तयार करताना  जी रसायने वापरीत त्यातले प्रमुख रसायन मृत समुद्रातली माती हे असे. इजिप्तची राणी क्लिओपात्रा व राणी शिबा या त्यांच्या सौंदर्यप्रसाधनासाठी मृत समुद्रातली माती मागवून घेत.नेबेटिअन्सना या मातीचे गुणधर्म माहीत होते.प्रिझर्व्हेटिव्ह व जंतुनाशक म्हणून त्याचा वापर केला जात असे. तसेच त्यांनी या औषधी मातीचा व्यापारासाठीही उपयोग केला. आजही जॉर्डनमध्ये या मातीची पाकीटे, मातीपासून बनवलेली सौंदर्यप्रसाधने, क्रीम, लोशन विक्रीसाठी असतात.

नेहमीच्या समुद्राच्या पाण्याहून मृत समुद्राचं पाणी दसपट क्षारयुक्त व जड असल्यामुळे या पाण्यात कुणालाही तरंगता येतं. बुडण्याची धास्तीच नाही. अनेक प्रवासी मजा म्हणून या पाण्यावर पहूडून मासिकं,पेपर वाचतात. मृत  समुद्रात तरंगण्याचा अनुभव  जॉर्डनहून इस्त्रायलला गेल्यावर घ्यायचा असे आम्ही ठरविले होते. या समुद्राचा एक भाग इस्त्रायलमध्ये येतो.

जॉर्डनमध्ये खनिजतेल मिळत नाही पण इजिप्त वगैरे देशांकडून खनिजतेल घेऊन त्याचं शुद्धीकरण करणाऱ्या रिफायनरीज आहेत. चुनखडीचा दगड असल्याने सिमेंटच्या दोन फॅक्टरीज आहेत. सिमेंट व रेड सी भोवतालच्या डोंगरातील रॉक फॉस्फेट, पोटॅश निर्यात केलं जातं. ऑलिव्हची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ऑलिव्ह प्रॉडक्स व फळे निर्यात केली जातात.

मध्यपूर्वेतील ख्रिश्चन, मुस्लीम व ज्यू धर्मियांमध्ये सलोखा व्हावा, शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च गुरू पोप फ्रान्सिस यांनी २०१४ मध्ये जॉर्डनला भेट दिली.आधीचे राजे किंग हुसेन व  सध्याचे राजे किंग अब्दुल्ला (द्वितीय ) यांनी नेहमीच सामंजस्याची भूमिका घेऊन जॉर्डनची प्रगती साधली आहे.

सध्या सर्व जगामध्येच अस्वस्थता व अशांतता आहे. विज्ञानाचा उपयोग विनाशासाठी होतो आहे. गुंतागुंतीच्या राजकारणात सामान्य लोकांचे बळी जात आहेत. ही परिस्थिती सुधारून वेगवेगळ्या देशांमध्ये, धर्मामध्ये सौहार्दाचे संबंध प्रस्थापित व्हावेत अशी प्रार्थना करणं एवढेच आपल्या हातात आहे.

जॉर्डन भाग– समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २२ – भाग २ – जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २२ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर  ✈️

जॉर्डनवर बाबीलोनियन, पर्शियन यांच्यानंतर इसवी.सन ६३ पर्यंत नेबेटिअन्सनी राज्य केलं.इ. स. पूर्व दुसऱ्या शतकापासून पेट्रा ही नेबेटिअन्स राज्यकर्त्यांची राजधानी होती. हिंदुस्थान ,चीन, युरोप यांना जोडणारा व्यापारी मार्ग पेट्रावरून जात असे.नेबेटिअन्सनी  या व्यापारी मार्गावरून जाणाऱ्या उंटांच्या कबिल्यांना, व्यापार्‍यांना संरक्षण दिलं व त्यांच्याकडून करवसुली केली. त्याकाळी हिंदुस्थानातून मसाल्याचे पदार्थ,रेशीम, अरबस्तानातून सुगंधी धूप व ऊद, आफ्रिकेतून हस्तीदंत व जनावरांची कातडी यांचा व्यापार होत असे. नेबेटिअन्सकडून   राज्य घेण्याचा प्रयत्न ग्रीकांनी केला.  नंतर रोमन जनरल पॉ॑म्पे याने सिरिया व जॉर्डन जिंकून घेतलं . रोमन्सनी शहराचं पुनर्निर्माण केलं. मोठ्या रुंद रस्त्यांच्या कडेने उंच कलाकुसरीचे दगडी खांब उभारले. सार्वजनिक बाथस्,ॲ॑फी थिएटर्स, सुंदर इमारती, कारंजी उभारली. व्यापारी मार्ग ताब्यात घेतला. नंतर रोमन साम्राज्यात ख्रिश्चन हा अधिकृत धर्म ठरविण्यात आला. दोन चर्चेस बांधण्यात आली. पुढे सातव्या शतकात इस्लामचा प्रसार झाला. इसवी सन ७३७ मध्ये भयानक भूकंप झाला आणि पेट्रा गाडलं गेलं, नाहीसं झालं व नंतर विस्मृतीत गेलं. इसवी सन १८१२ मध्ये स्विस प्रवासी जोहान बर्कहार्ड यांनी प्रयत्नपूर्वक  पेट्रा शोधून काढलं व पेट्राचं पुनरुज्जीवन झालं.

आज मदाबा व माउंट नेबो इथे जायचं होतं. माउंट नेबो हा दोन हजार पाचशे फूट उंचीचा डोंगर आहे .डोंगरावर जायला चांगला रस्ता बांधून काढलेला आहे. दोन्ही बाजूला छोट्या बागा, फुलझाडं, ऑलिव्ह वृक्ष आहेत. सुरुवातीला पुस्तकाच्या पानासारखं उंच, आधुनिक शिल्प आहे. त्यावर तिथे भेट दिलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींची नावे कोरली आहेत. माउंट नेबो इथे मोझेसचं दफन केलं असं समजलं जातं. म्हणून ही जागा धार्मिक, पवित्र मानली जाते. या डोंगराच्या माथ्यावर उभं राहिलं की जॉर्डन रिव्हर व्हॅलीचं दृश्य दिसतं. तसंच इथून मृत समुद्र (डेड सी ) व जेरूसलेमचे डोंगर दिसतात . चौथ्या शतकातील एका भग्नावस्थेतील चर्चच्या पुनर्बांधणीचे काम चालू होतं. मूळ चर्चमध्ये सापडलेल्या मोझॅक  टाइल्स व्यवस्थित मांडून त्यांची सफाई करण्याचं, रंग देण्याचं काम चालू होतं. या मांडलेल्या टाइल्समध्ये आपल्या बारा राशींची चित्र – मेंढा, विंचू, मासा वगैरे- होती. जिथून जॉर्डन रिव्हर व्हॅली दिसते त्याठिकाणी ब्रांझचे एक आधुनिक शिल्प उभारलेलं आहे. काठीसारख्या उभ्या खांबाभोवती अनेक सर्पाकृतींनी विळखा घातला आहे असे ते शिल्प आहे. मोझेसने स्वसंरक्षणार्थ काठीपासून साप तयार केले अशी गोष्ट गाईडने सांगितली. या सर्पाकृतीच्या डोक्यावर क्रॉसचं चिन्हआहे.

तिथून एक मोझॅक टाइल्सची फॅक्टरी बघायला गेलो. एका तरुण स्त्रीने अस्खलित इंग्रजीमध्ये मोझॅक टाइल्सच्या छोट्या- छोट्या तुकड्यांपासून सुंदर चित्रं कशी बनविली जातात ते सांगितलं.जॉर्डनमध्ये स्त्रिया शिकलेल्या आहेत. बुरख्याची पद्धत नाही.पण केस झाकलेले असतात. तरुण मुली जीन्स-टॉप वगैरे  पाश्चात्य वेशात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतात. शिक्षिका म्हणून अनेक जणी नोकरी करतात. तसेच त्या पोलीस व सैन्यदलातही काम करतात. फॅक्टरीमध्ये स्त्रिया कापडावर तऱ्हेतऱ्हेची  पानं-फुलं,मोर, धार्मिक चित्रे यांची डिझाईन्स शाईने काढून त्यावर रंगीत मोझॅक टाइल्सचे छोटे तुकडे फेव्हिकॉलने ( पूर्वी यासाठी वेगळा विशिष्ट झाडाचा डिंक वापरत असत ) चिकटवीत होत्या. यातून भित्तिचित्र, टेबल टॉप, फ्रेम्स बनवत होत्या. शिवाय तिथे सिरॅमिक डिशेस, उंची फर्निचर विक्रीसाठी ठेवलं होतं.

तिथून मदाबा इथे गेलो. सेंट जॉन चर्चकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक विक्रेते स्थानिक व धार्मिक कलाकृतींची विक्री करत होते. दिल्लीहून एक खूप मोठा ख्रिश्चन ग्रुप आला होता. या सेंट जॉन चर्चमध्ये ६ व्या शतकातला,मोझॅक टाइल्सचा होली लँड दाखविणारा नकाशा आहे. चर्चच्या अंतर्भागातील जमिनीवर हा नकाशा मोझॅक टाइल्सच्या वीस लाख रंगीत तुकड्यांनी बनविलेला आहे. यात डोंगर-दऱ्या, नाईल नदीचा त्रिभुज प्रदेश, पॅलेस्टाईनमधील गावे,बेझेंटाईन काळातील जेरुसलेम म्हणजे ‘होली लॅ॑ड’ असे सारे दाखविले आहे. आधी बाहेरच्या हॉलमध्ये प्रोजेक्टरच्या सहाय्याने गाईडने हे नकाशा चित्र समजावून सांगितले. नंतर चर्चच्या अंतर्भागातील थोड्या काळोखात असलेला, जमिनीवरील हा मोझॅक टाइल्सचा नकाशा आम्ही बॅटरी…

जॉर्डन भाग– समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रवासवर्णन ☆☆ चला आसाम मेघालयाला… भाग -5 ☆☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

✈️ प्रवासवर्णन ✈️

☆ चला आसाम मेघालयाला… भाग – 5 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.

आता परत गुवाहाटीकडे. आमच्या प्रवासाची जिथून सुरुवात झाली त्याच ठिकाणी परत जायचे. गुवाहाटी म्हणजे गोहत्ती. गोहत्तीचे  चे प्राचीन नाव, प्रागज्योतिषपूर असे आहे.आसाम राज्यातील आणि ईशान्य भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे हे शहर.  हे आसामच्या मध्य पश्चिम भागात,ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे..प्राग्ज्योतिषपूर या नावाने प्रचलित असलेले गुवाहटी, हे,ऐतिहासिक कामरूप राज्य तंत्राची राजधानी होती. आता दिसपूर ही.आसामची राजधानी आहे.काझीरंगा ते गुवाहाटी हे जवळजवळ १९३  किलोमीटरचे अंतर आहे.  गुवाहाटी कडे जाणारा हा रस्ता अतिशय रमणीय होता.  वातावरण पावसाळी होते.  आकाश ढगाळलेले होते. चहाचे लांबचलांब मळे दुतर्फा होते.  केळी सुपारी होत्याच.बटाट्याचीही शेती दिसली.  वाटेत, चहा, नारळाचे पाणी,किरकोळ खरेदी अशी मौजमजा करत प्रवास चालला होता. गाडीत ड्रायव्हरने आसामी गाणी लावली होती. काहीशी भजनी चाल वाटत होती.  काही शब्दही कळत होते. थोडीशी  बंगाली पद्धतीची शब्दरचना वाटत होती. आवाजही चांगला होता. गाणी ऐकताना मन रमले.

आजचे विशेष आकर्षण होते ते ब्रह्मपुत्रा नदीतील क्रूझ. आणि रोपवे सफारी. मात्र गुवाहाटीला पोहोचल्यावर मुसळधार पावसाने सारीच त्रेधातिरपीट उडवली. रोपवे सफारी रद्द करावी लागली. मात्र आमच्या टूर सहायकाने दुसर्‍या दिवशी जाऊ असे आश्वासन दिले.म्हणून बरे वाटले.

 1. ब्रह्मपुत्रा 2.आसामी कलकुसर 3. आसामी जेवण

ब्रह्मपुत्रेचं दर्शन आत्मानंदी होतं! आशिया मधली ही एक प्रमुख नदी आहे. तिबेट, चीन, भारत,आणि बांगलादेश मधून ही वाहते. बांगलादेशामध्ये तिला जमुना या नावाने ओळखले जाते. गंगेच्या त्रिभुज प्रदेशात येऊन ब्रह्मपुत्रा बंगालच्या उपसागरास मिळते. ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून ब्रह्मपुत्रा.काही ठिकाणी तिचा ब्रह्मपुत्र असा पुलिंगीही ऊच्चार करतात. आसाम राज्यातील बहुतेक मोठी शहरे ब्रह्मपुत्रेच्या काठावर वसलेली आहेत.नद्यांना आपण देवता का मानतो? अनुभूतीतून ते जाणवायला लागतं. संथ वाहणाऱ्या या महाकाय सरितेच दर्शन खरोखरच स्वर्गीय आनंद देणार होतं! तिच्या पात्राकडे बघता बघता नकळतच हात जुळले.निसर्गातल्या अज्ञात शक्तीला केलेलं ते नमन होतं!गंगा,गोदावरी,इंद्रायणी जणू सार्‍यांचं एकरुप पहात आहोत असं वाटलं.वात्सल्यरुपी माऊलीसारखीच मला ती भासली. पावसाळ्यात मात्र ती रौद्र रुपात एखाद्या देवीसारखीच भासत असावी.

अल्फ्रेस्को ग्रँड हे आमच्या बोटीचं नांव.तीन  मजली बोट होती. यामधून केलेला विहार अतिशय आनंददायी होता. बोटीवरच जलपान झाले. आणि सारेच पर्यटक नाचगाण्यात  रमून गेले. नदीमध्ये अनेक लहान मोठी बेटे, झाडाझुडपात दडलेली आहेत. तिथे मंदिरेही आहेत. मावळतीच्या वेळचे आकाशातले गुलाबी रंग आणि किरणांचे, संथ पाण्यातले प्रतिबिंब पाहता पाहता माझे मन हरखून गेले. ती नौका सफर अविस्मरणीय होती!!क्षणभर वाटलं या जलौघात सामावून जावं!!

गुवाहाटी हे तसं मोठं गजबजलेले शहर आहे. आसाम मधील मोठे, शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि व्यापारी क्षेत्र आहे. येथे सरकारी कार्यालये, विधानसभा, उच्च न्यायालयाच्या इमारती  आहेत. इथल्या नेहरु स्टेडियमवर क्रिकेट व फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय सामने होतात. मात्र इथल्या रस्त्यांचा विकास झालेला वाटला नाही. रस्ते अरुंद आणि वर्दळ प्रचंड. पण ट्रॅफिक रूल्स पाळण्याची शिस्त असल्यामुळे गोंधळ जाणवला नाही.

आमच्या हॉटेलचं नाव मला आवडलं. घर ३६५.

या! आपलं स्वागत आहे! वर्षभर घर आपलेच आहे! अशा अर्थाचं हे नाव वाटलं. रूम लहान असली तरी सर्व सुविधा संपन्न होती. रात्रीचे जेवणही छान होते. आता हळूहळू मोहरीच्या तेलातलं  आसामी  चवीचं जेवण आवडू लागलं होतं.रात्री झोपताना मात्र डोळ्यासमोर येत होती ती विशाल ब्रह्मपुत्रा!

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रवासवर्णन ☆ चला आसाम मेघालयाला… भाग -4 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

✈️ प्रवासवर्णन ✈️

☆ चला आसाम मेघालयाला… भाग – 4 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

आमच्या प्रवासाचा आता दुसरा टप्पा सुरू झाला. शीलाँग सोडताना मन थोडे जड झाले होते. पण आसामची सफर करण्यासही  मन उत्सुक होते.

आसाम हे ईशान्य भारतातले राज्य. त्याचा मुळ उच्चार असम असा आहे. असम  म्हणजे समान नसलेला प्रांत. पहाडी आणि चढ-उतार असलेले हे राज्य अतिशय निसर्गरम्य आहे शिवाय बांबू, चहा, यासाठी प्रसिद्ध आहे. . आसाम हे वाइल्डलाइफ आणि पुरातत्वशास्त्र साठी प्रसिद्ध असे राज्य आहे. आसाममधील काझीरंगा हे शहर अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. शिलॉंग ते काझीरंगा हे जवळजवळ 300 किलोमीटरचे अंतर आहे. ड्राईव्ह अर्थातच सुरेख होता. रस्ते वळणावळणाचे. दुतर्फा हिरवेगार चहाचे मळे. सुपारी, केळीची बने, लांबच लांब पसरलेले डोंगर! मेघालयातील डोंगर आपल्या सोबतीने चालतात असे वाटायचे मात्र आसाममधील डोंगर दुरूनच आपले स्वागत करतात. पण तेही दृष्य अतिशय मनोहारी वाटते. रसिक मनाला चित्तवृत्ती फुलवणारे वाटते.

काझीरंगा हे एक ऍनिमल कॉरिडॉर आहे. या जंगलात र्‍हायनो(गेंडा) हा प्राणी प्रामुख्याने आढळतो. आम्ही प्रवास करत असताना, एका जलाशयाजवळ आम्हाला तो दिसला. एक शिंगी, जाड कातडीचा, बोजड  प्राणी. डुकराच्या फॅमिलीतला वाटणारा. अत्यंत कुरूप पण वेगळा. म्हणून त्याच्या प्रथम दर्शनाने आम्ही खुश झालो. समूहातील सर्वांनी रस्त्यावर उतरून पटापट फोटो काढले. सूर्यास्त पाचलाच झाला. बाकी आजचा सगळा दिवस प्रवासातच गेला. संध्याकाळी युनायटेड-21 रिसॉर्ट हे आमचे वास्तव्य स्थान होते.

दुसऱ्या दिवशी आम्ही काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. पर्यटकांचे प्रमुख आकर्षक स्थळ म्हणजे  हे उद्यान. हे  आसाम मधील गोलघाट जिल्ह्यात आहे. भारतात १६६ राष्ट्रीय उद्याने आहेत आणि हे भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्यान आहे. १९८५ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून यास घोषित केले. हे राष्ट्रीय उद्यान एक शिंगी गेंड्या  साठी तर प्रसिद्ध आहेच शिवाय या उद्यानात, भारतात कोठेही उपलब्ध नसलेले काही प्राणी आहेत. पक्ष्यांचे उत्तम क्षेत्र म्हणूनही हे  ओळखले जाते. हंस, सारस, नाॅर्डमॅनचा हिरवा शंख, काळ्या गळ्याचा सारस असे पक्षी इथे बघायला मिळतात. इथे वाघही आहेत. जंगली पाण म्हशी इथे आढळतात. या उद्यानाची हिरवळ जगप्रसिद्ध आहे. सदाहरित असा हा जंगल प्रदेश आहे. या पार्क मध्ये आम्ही उघडी जीप सफारी केली. सकाळची प्रसन्न वेळ, दाट जंगल, जलाशय आणि मुक्त फिरणारे र्‍हायनो (गेंडे) हरणे, हत्ती, आनंदाने पोहणारी बदके. . . पक्ष्यांमध्ये निळकंठ पॅलिकेन बघायला मिळाले. रंगीबेरंगी फुलपाखरे बागडत होती. प्रदूषण विरहित जंगल सफारीचा हा मुक्त अनुभव अविस्मरणीय होता.

1. ब्रह्मपुत्रा 2.आसामी कलकुसर 3. आसामी जेवण

आसाम मधले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथली ऑर्किडची लागवड. इथली ऑर्किड्स ही जगातल्या इतर ऑर्किड्स पेक्षा निराळी आहेत असा आमचा टूर गाईड सांगत होता. या फुलांना सहाच पाकळ्या असतात शिवाय झाडांच्या पानावर संपूर्ण सरळ आणि समांतर रेषा असतात. . ऑर्किड पार्कमधला फेरफटका नेत्रसुखद होता. . अनेक रंगांची ही ऑर्किड्स मनमोहक होती. त्यांची नावेही गमतीदार होती. बटरफ्लाय ऑर्किड, लेडी ऑर्किड वगैरे. . नावाप्रमाणेच फुलांचे आकार होते. याच पार्क मध्ये कॅक्टस आणि औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे. विविध रोगांवर या वनस्पतींचा कसा उपचार होऊ शकतो याची भरपूर माहिती आम्हाला मिळाली. शंखपुष्पी, अश्वगंधा शतावरी, काळीहळद, बांबू वगैरेची झाडे पाहायला मिळाली. एका लिंबाच्या झाडाला भरपूर लिंबे लगडली होती. हे झाड माझ्या लक्षात राहिले ते लिंबांच्या आकारामुळे. एकेक  लिंबू पपई सारखे लांबट आणि मोठे. शिवाय हिरवेगार. चवीलाही अतिशय स्वादिष्ट.

पारंपारिक  आसामी जेवणाचा आस्वाद इथे आम्हाला घेता आला. भल्यामोठ्या थाळीत १४ वाट्या होत्या. या  आसामी थाळीत तिथेच पिकणार्‍या भाज्या प्रमुखांनी होत्याच. फणस केळफुल, कारली, भेंडी, तोंडली, बटाटे असे नाना प्रकार होते. तेल नसलेल्या उकडलेल्या भाज्या. डाळी आणि भरपूर भात. खीरही होती. खार नावाच्या माध्यमात ते बनवतात. स्वयंपाकात सरसोचे  तेल वापरतात. सुरुवातीला या तेलाच्या वासाने खावेसे वाटेना पण हळूहळू सवय झाली. वेगळ्या चवीचे आणि आकर्षक असे हे आसामी भोजन होते.

आसामी लोक हे मांसाहारी आहेत. त्यांचे प्रमुख खाणे भात आणि करी (कालवण)हेच आहे. ते गोमांस खातात. रस्त्यारस्त्यावर गोमांस विक्रेत्यांची उघडी दुकाने पाहताना मात्र, मन शहारले. त्या वेळी जाणवलं की आपली खाद्यसंस्कृतीची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत. !गाय हे आपल्यासाठी दैवतच आहे. त्यामुळे या दुकानांवरुन जाताना नकळतच डोळे झाकले जातात.

आसाम मध्ये बांबूचे प्रचंड उत्पन्न आहे. त्यामुळे इथली घरे, कुंपणे, फर्निचर, सजावट ही सारी बांबूची असलेली आढळते. नंबर फिफ्टी फोर, द हाऊस ऑफ अ  बांबू डोर…या गाण्याची आठवण झाली. मेघालयातही बांबूचा फार मोठा व्यवसाय आहे. इथला हस्तकला व्यवसाय ही बांबू शी निगडीत आहे. बांबू पासून केलेल्या अनेक कलात्मक कलाकृती इथे पहायला मिळतात.

इथल्याच एका म्युझियमला आम्ही भेट दिली. यामुळे आम्हाला आसामच्या पारंपरिक संस्कृतीची ओळख झाली. त्यांची स्वयंपाकाची भांडी, चुली, शेगड्या, हत्यारे, राजाराणी चे पोशाख, दागदागिने, वगैरे पाहायला मिळाले. आपल्याकडील महिला जसा पारंपारिक पद्धतीने डोक्यावरून पदर घेतात, तसेच इथल्या स्त्रिया मेखला आणि गामोशा हे वस्त्र पांघरतात. हे वस्त्र म्हणजे स्त्रियांची अब्रू राखणारे. . असा संकेत आहे. आणि इथल्या बहुतांश स्त्रियांच्या अंगावर ते दिसतेच. ते छान दिसते. पारंपारिक असले तरी सुटसुटीत आहे. आणि त्याचा आगळावेगळा लुक मला आवडला. एखादं आपण विकत घ्यावं का असा विचारही माझ्या मनात आला.

आसाम सफरी मधले वैशिष्ट्य म्हणजे तिथले बिहू हे लोक नृत्य. आपल्याकडे जसे कोळी नृत्य हा लोक परंपरेचा आणि लोककलेचा प्रकार आहे, त्याच पद्धतीचे बिहू हे लोक नृत्य. काहीसे लावणी प्रकाराशी ही त्याचे साम्य वाटले. बिहू हा आसाम चा सण आहे. आसाम हे कृषिप्रधान राज्य आहे. आणि बिहू हा तेथील शेतकर्‍यांचा सण आहे. हा वर्षातून तीनदा साजरा करतात.

पहिला रंगीन बिहू. हा 1४ एप्रिल पासून महिनाभर धूमधामपणे साजरा होतो. साधारण वसंतोत्सव सारखा हा सण असतो. युवक युवतींच्या प्रणयाला बहार आणणारा. त्यावेळची गीते आणि संगीत हे शृंगारिक असते. लगीन सराईचेही हेच दिवस.

दुसरा बिहू म्हणजे कंगाल बिहू. हा ऑक्टोबर म्हणजे कार्तिक महिन्यात असतो. यास कार्तिक बिहू असेही म्हणतात. हा दोनच दिवसांचा सण असतो. कारण या वेळेस शेतकरी, त्याच्या जवळचे सगळे पैसे शेतीसाठी गुंतवतो. त्यामुळे तो भविष्याच्या चिंतेत असतो. आणि कंगाल ही झालेला असतो.

तिसरा बिहू हा  भोगी बिहू म्हणून साजरा होतो. संक्रांतीनंतर हा सोहळा असतो. यावेळेस शेतकरी आनंदात असतो कारण पीक पाणी चांगले होऊन शेतकऱ्यांच्या खिशात पैसे खुळखुळत असतात. हा अठवडाभर साजरा केला जातो.

बिहू हे लोकनृत्य अतिशय देखणे. ठेकाबद्ध, तालमय आणि जोशपूर्ण आहे. त्यातील बांबू नृत्य हे फारच चलाखीने आणि चपळाईने केले जाते. टाइमिंग आणि एनर्जी याची कमाल वाटते. त्यांचा पोशाखही अतिशय आकर्षक आहे. पुरुष गुडघ्यापर्यंत धोतरासारखे वस्त्र घालतात. अंगात जॅकेट. डोक्यावर आसामी पद्धतीची टोपी. गळ्यात माळा वगैरे घालतात. स्त्रियांचे वस्त्र गुडघ्यापर्यंत आणि कमरेभोवती घट्ट असे नेसलेले असते लाल आणि पिवळसर रंगाची ही वस्त्रे असतात. डोक्यावर घट्ट आंबाडा आणि ऑर्किडच्या फुलांचा गजरा माळलेला असतो. गळ्यात हातातही फुलांच्या माळा असतात. या सर्व  नर्तिका अगदी वनराणी सारख्या दिसतात. चपळ आणि हसतमुख. खासी भाषेतील त्यांची गीतं, नीट लक्ष देऊन आपण ऐकली तर आपणास समजू शकतात. अर्थ आणि भाव कळतात. संगीत ही अशी भाषा आहे की मानवाच्या मनातले भाव ते सहज टिपतात. त्यासाठी बोली भाषेचा अडथळा होतच नाही. या लोकनृत्यासाठी वाजवली जाणारी वाद्य म्हणजे ढोल (ढोलकी )ताल (टाळ मंजिरी )टोपा, पिपा. ही सारी बांबूपासून बनवलेली तालवाद्य आहेत आणि त्यांचा एकत्रित मेळ एक जोशपूर्ण संगीताचा अनुभव देतो. एकीकडे हे नृत्य चालू होते आणि बाहेर निसर्गाचे तांडव नृत्य चालू होते. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा एक ताल. सारेच संगीतमय झाले होते. आसामच्या या पावसाचा अनुभव फार आल्हाददायक होता.

गुवाहाटी आणि ब्रह्मपुत्रेचं विशाल दर्शन …तिसऱ्या भागात वाचूया )

धन्यवाद !!

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रवासवर्णन ☆ चला आसाम मेघालयाला… भाग -3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

✈️ प्रवासवर्णन ✈️

☆ चला आसाम मेघालयाला… भाग – 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

शाळेच्या भूगोलात सर्वाधिक पाऊस पडणारे क्षेत्र म्हणजे चेरापूंजी हे वाचलं होतं .आज प्रत्यक्ष चेरापूंजी ला भेट देण्याची उत्सूकता अर्थातच खूप मोठी होती.  ड्रायव्ह अतिशय सुखद होता. आजूबाजूला उंच उंच डोंगर ,डोंगरावर उतरलेले  मेघ,वळणावळणाचे रस्ते,न बोचणारे परंतु गार वारे, भुरभुर पडणारा पाऊस सारेच खूप प्रसन्न होते.  वातावरण अतिशय आल्हाददायक होते. खासी व जायैती  हिल्स हा भूभाग खासी जमातीच्या अधिपत्याखाली होता अठराशे तेहतीस साली हा भाग ब्रिटिशांच्या राजवटीखाली आला आणि त्यांनी मेघालया ची राजधानी चेरापूंजी न ठेवता शिलॉंग येथे हलवली.  येथील डोंगराळ भाग व सौम्य हवामानामुळे शिलॉंग ची तुलना स्कॉटलंड सोबत केली जाते.

चेरापुंजीत पर्यटकांसाठी खास आकर्षण म्हणजे येथील कोसळणारे धबधबे!

येथील एलिफंटा फॉल्स ला आम्ही भेट दिली. हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये वाहता जातो .शंभर दीडशे पायऱ्या खाली उतरून टप्प्याटप्प्यावर या धबधब्याचे दर्शन विलोभनीय आहे. जिथून धबधब्याची सुरुवात होते तिथला भाग हा हत्तीच्या मस्त का सारखा दिसतो म्हणून त्यास एलिफंटा फॉल्स म्हणतात . मात्र आता डोंगर दगडांची पडझड झाल्यामुळे तसा आकार दिसत नाही. अतिशय नयनरम्य असा हा धबधबा ! सूरमयी संगीत ऐकताना आणि खळाळत पाणी बघताना जळू ब्रम्हानंदी टाळी लागते .

सेव्हन सिस्टर्स धबधबा  बघताना ही मन असेच हरवून गेले. नोहकालिकिया वॉटर फॉल निर्मितीमागे एका आईची कहाणी आहे .तिचा दुसरा नवरा तिच्या मुलाचा द्वेष करत असतो . एकदिवस  तो त्या मुलाची हत्या करतो आणि त्याचे मांस शिजवून तिला फसवून खायला देतो. हे जेव्हा तिला कळते तेव्हा दुःखाने ती बेभान होते व या कड्यावरून खाली उडी मारते. जणू तिच्या दुःखाने निसर्गही कोसळतो आणि निसर्गाच्या अश्रुंच्या रूपात हा भव्य धबधबा आपल्याला पहायला मिळतो नोहकालिकिया हे आईच नावच या धबधब्याला दिले आहे.  या मागची कहाणी  भीषण असली तरी निसर्गाचे हे रूप विलक्षण आहे डोळ्याचे पारणे फिटते .

मेघालयात नैसर्गिक गुहा ही खूप आढळतात. माऊस माय केव्ह ही अशीच  एक नैसर्गिक गुहा आहे. 150 मीटर आत चालत जावे लागते. वाकून, सांभाळून ,उड्या मारत आत चालावे लागते. गारवा आणि पावसाचा शिडकावा मनाला आनंद देतोच .पण हे थोडं साहसी काम आहे. 

चेरापुंजी ची ओळख शाळेच्या भूगोलात झाली होती मुसळधार पावसाचे गाव !आज आम्ही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो मजा वाटली अतिशय रम्य ठिकाण येथील रामकृष्ण मिशनला भेट देऊन आम्ही शिलाँग ला परतलो .शिलॉंग चे मूळ वंशज गोरी आणि खासी जमातीचे आहेत. पण ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली ख्रिश्चन धर्माचा प्रसार होऊन शिलॉंग मध्ये ख्रिश्चन संस्कृती उदयास आली. शीलॉंग हे राजधानीचे शहर असूनही येथे रेल्वे व रस्त्यांचा विकास झालेला आढळला नाही. मात्र पहाडी प्रदेशामुळे चढ-उताराचे अरुंद रस्ते,  आणि पर्यटकांची गर्दी यामुळे वाहन कोंडी आढळते. परंतु वाहन चालक अतिशय काटेकोरपणे रस्त्याचे नियम पाळत असल्याने व शिस्तीने गाड्या चालवत असल्याचे ही अनुभवास आले.पादचारीही शिस्तीने फूटपाथवरुनच चालतात.शाळेतली मुले,आॉफीसात जाणारी आणि इतर सारी माणसं कुठून कुठे पायीच चालत जातात असेही आढळले.

शीलाँगमध्ये प्रामुख्याने इंग्लीश भाषाच बोलली जाते.

काहीशी त्यांची राहणी युरोपीअन पद्धतीची वाटली. मेघालयवासी खरोखरच शांत प्रवृत्तीचे वाटले. कष्टाळु आणि उत्साही वाटले.

गोल गोबरे गाल, ठेंगण्या गोल बांध्यांची ही तुरतुर चालणारी माणसे पाहताना मजा वाटली.

(पुढच्या भागात आसाम,तिथली लोकसंस्कृती आणि पर्यटनावर वाचूया.)

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रवासवर्णन ☆ चला आसाम मेघालयाला… भाग -2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

✈️ प्रवासवर्णन ✈️

☆ चला आसाम मेघालयाला… भाग – 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

या प्रवासातील अविस्मरणीय भेट म्हणजे भारत-बांगलादेश मैत्री गेट. मेघालय मध्ये भारत-बांगलादेश सीमारेषा ४४३ किलोमीटर (२७५ मैल) इतकी आहे. या मैत्री द्वाराजवळ, अलीकडे पलीकडे दोन्ही देशांचे झेंडे फडकत असतात आणि संध्याकाळी ते खाली उतरवले जातात. झेंडे उतरवणे म्हणजेच, कुठल्याही प्रकारचे वैमनस्य दोन्ही देशांमध्ये नसणे हेच अध्याहृत आहे.  मेघालया मधून बांगलादेश मध्ये दगडांची निर्यात प्रचंड प्रमाणात होते. रस्त्यावरून जात असताना हे उंच उंच डोंगर ओरबाडले दिसतच होते.हे दगडही अनेक रंगी आहेत. लाल, जांभळे, पिवळे, स्वच्छ पांढरे. इथल्या लोकांचा दगडफोडी हा मुख्य व्यवसाय आहे व हे सर्व दगड बांगलादेशात पाठवले जातात. या मैत्री गेटावर ही दगड वाहतुक आम्ही प्रत्यक्ष पाहिली .अत्यंत सुरक्षित पद्धतीने ही निर्यात, येथील सैनिकांच्या देखरेखीखाली होत असते.. सीमेचे रक्षण करणारे हे नैसर्गिक पहाड आणि हे सैनिक दोन्हीही मला महान वाटले.

उमंगोट नदीच्या किनाऱ्यावर चे डावकी  हे सीमावर्ती शहर आहे.  यापूर्वी अमृतसरला वाघा बॉर्डर ला भेट दिली होती भारत-बांगलादेश मैत्री द्वाराची ही भेट तशीच संवेदनशील होती. उमंगोट नदी ही दोन्ही देशातून वाहते सहज मनात आले नदीला कुठले आहे सीमेचे बंधन !!या भिंती या मर्यादा मानवाने उभ्या केल्या.  आणि त्याबदल्यात मिळवली ती कायमची अशांती!

उमंगोट नदीचं पाणी अगदी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. संथ वाहणारे पाणी, चौफेर हिरवाईने नटलेले उंच पहाड ,मावळतीच्या वेळी या नदीतून केलेला नौकाविहार अत्यंत सुखद होता. पाण्याचा तळ नजरेला भिडत होता. ते पाहताना वाटले की माणसाचं मन या नदी सारखच नितळ का नाही असू शकत ?

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रवासवर्णन ☆ चला आसाम मेघालयाला… भाग -1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

✈️ प्रवासवर्णन ✈️

☆ चला आसाम मेघालयाला… भाग -1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

कोव्हीड थोडा आटोक्यात आला.

गेली दोन वर्ष मनात या विषाणूने भयाचे घर केले होते.  आता थोडे मुक्त झाले आणि पर्यटन खुले झाल्यामुळे प्रवास प्रेमींनी  प्रवासाचे बेत आखण्यात सुरुवात केली.

देशाच्या उत्तर-पूर्व विभागातल्या आसाम मेघालय ला भेट देण्याचे आम्हीही ठरवले.  एका वेगळ्याच भौगोलिक आणि सांस्कृतिक राज्याची ही सफर खूपच अविस्मरणीय ठरली,  या सफरीची सुरुवात आसाममधील गुवाहाटी या व्यापारी शहराच्या, लोकप्रिय गोपीनाथ बॉर्दोलोई या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुरुवात झाली.  आम्ही मुंबई छत्रपती शिवाजी विमानतळावरून इंडिगो फ्लाइट ६४३४ ने इथे आलो.  सोबत वीणा वर्लड ग्रुपचे आकाश व इतेश हे अतिशय उत्साही आणि या भागातले माहितगार असे सफर मार्गदर्शक आमच्या बरोबर होते.  आमचा २६ जणांचा समूह होता.

गुवाहाटी ते शिलॉंग हा आमच्या प्रवासाचा पहिला टप्पा होता. आमच्यासाठी विमानतळावर टॅक्सीज उभ्याच होत्या. मेघालय हे भारतातील उत्तर पूर्व राज्य असून शिलॉंग ही या राज्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे,  त्याच्या उत्तर व पूर्व भागात आसाम राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे.  १९७२ साली मेघालय राज्य आसाम पासून वेगळे झाले.

गुवाहाटी ते शिलाँग हा ड्राइव्ह अतिशय सुखद होता दुतर्फा उंच उंच पहाड, बांबूची बने, उंच उंच सुपारीच्या बागा, केळीच्या बागा, सुखद गारवा आणि डोंगरावर उतरलेले ढग असा सृष्टीचा नजारा अतिशय लोभस होता.  वाटेत उमीअम या मानव निर्मित विशाल तलावास  भेट दिली.  शीलाँग पासून हे ठिकाण साधारण १५ किलोमीटर अंतरावर आहे आणि पर्यटकांचे खास आकर्षण आहे. याचा विस्तार जवळजवळ २२० स्क्वेअर मीटर आहे  चहूबाजूला डोंगर, खासी वृक्ष, आणि तलावाचे अनोखे निळे पाणी तिथे आपल्याला खिळवून ठेवतात.  आमचे तसेच झाले. पउल निघतच नव्हते पण पुढे जायचे होते., .पूर्वी या तलावावर एक हायड्रो प्रोजेक्ट होता परंतु सध्या तो बंद आहे असे समजले,

एलिफन्टा फॉलस

या राज्यांचे  मेघालय हे नाव किती सार्थ आहे हे जाणवत होतं. उंच उंच डोंगर आणि त्यावर विहरणारे काळे मेघ हेच या राज्याचे वैशिष्ट्य!  हे सारे बघत असताना मनात येत होतं की आपल्या देशात किती विविधता आहे! सृष्टीची विविध रूपे पाहताना थक्कच व्हायला होते,  अंतराअंतरावर बदलणारी मानव संस्कृती पोशाख खाद्य,जीवन पद्धती ही खरोखरच अचंबित करते.

मेघालय मध्ये फिरताना जाणवले ते सृष्टीचे अनेक चमत्कार,  इथे अनेक नैसर्गिक गुहा आणि धबधबे पाहायला मिळतात.  वर्षा ऋतूचे अजून आगमन झाले नव्हते तरीही उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे डोळ्यांचे पारणे फेडतात.

एके ठिकाणी रबर प्लांटची मुळे वाढून एकमेकात अशा पद्धतीने गुंतली गेली आहेत की त्याचा एक मोठा पूल तयार झाला आहे, यास रूट ब्रिज असेच म्हणतात. एका नैसर्गिक ब्रीज वरुन चालताना सृष्टीच्या या दिव्य कामगिरीचा अचंबा वाटत होता. मात्र रुटब्रीजला प्रत्यक्ष पाहण्यासाठी काही अवघड चढउतार पार करावे लागतात.

१८९७ साली  मेघालयात प्रचंड भूकंप झाला होता. डोंगर कोसळले होते. इतस्ततः दगड दगड पसरले होते, ज्यावेळी ही विस्कळीत स्थिती पूर्ववत करण्यात येत होती त्यावेळी तिथे एक भलामोठा दगड एका छोट्या दगडावर व्यवस्थित स्वतःला तोलून स्थिर असलेला आढळला.  तो तसाच ठेवला गेला.  आजही तो तसाच आहे आणि आता हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे.  या दगडास बॅलन्सिंग रॉक असेच म्हणतात निसर्गाचे आणखी एक नवलच म्हणावे !!

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २२ – भाग १ –  जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २२ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ जॉर्डन – लाल डोंगर, निळा सागर  ✈️

जॉर्डनला जायचं ठरलं तेंव्हा मध्यपूर्वेतील वातावरण थोडं अशांत होतं. ‘अरब- इस्त्रायल संघर्ष नेहमीचाच’ असे म्हणत आम्ही प्रवासाचा बेत कायम ठेवला. जॉर्डनची राजधानी अम्मान इथे उतरलो. विमानतळावरच आवरून, नाश्ता करून पेट्रा इथे जायला निघालो. रमजान सुरू झाला होता पण प्रवाशांना रमजानची बंधनं नव्हती. चार तासांनी पेट्रा इथे पोहोचलो.

हॉटेलवर जेवून रात्री ‘पेट्रा बाय नाईट’ चा अनुभव घ्यायला निघालो. पेट्राच्या प्रवेशद्वारापासून रस्ता खोलगट, उंच-सखल, खडबडीत होता. रस्त्याच्या दुतर्फा कागदी पिशव्यांमध्ये दगड व वाळू भरून एक- एक मेणबत्ती लावलेली होती. आकाशात अष्टमीची चंद्रकोर, सुनसान काळोख, थंड वारा आणि दोन्ही बाजूंना उंच, वेडेवाकडे डोंगरकडे होते. अरुंद घळीत दोन्ही बाजूंचे डोंगरकडे एकमेकांना भेटायला येत तेंव्हा त्यांच्या फटीतून काळसर पांढऱ्या चाफेगौर आकाशाची अरुंद पट्टी दिसत होती. सोबतीला असलेला सिक्युरिटीचा कुत्राही मुकाट चालत होता. पुढे-पुढे रस्त्यावरील कागदी पिशव्या व त्यातील मेणबत्या यांची संख्या वाढू लागली. काळोख अधिकच गहन- गूढ वाटू लागला.अकस्मात ‘खजाना’ समोरच्या प्रांगणात शेकडो मेणबत्या उजळलेल्या दिसल्या. ‘खजाना’ ही इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील म्हणजे  २३०० वर्षांपूर्वीची टूम्ब अजूनही बरीचशी सुस्थितीत आहे. लालसर दगडांच्या डोंगरातून कोरून काढलेले हे शिल्पकाव्य शंभर फूट रुंद व दीडशे फूट उंच आहे . नेबेटिअन्स म्हणजे भटकी अरबी जमात इथे स्थिरावली.राज्याबरोबरच त्यांनी कला व संस्कृती यांची जोपासना केली.’खजाना’च्या भव्य वास्तूवर ग्रीक, रोमन आणि इजिप्तशिअन संस्कृतीचा प्रभाव आहे.सहा उंच, भव्य दगडी खांबांवर ही लालसर गुलाबी दुमजली इमारत उभी आहे. इसिस या देवतेचा पुतळा, गरुड, नृत्यांगना आणि मधोमध कलशाच्या आकाराचं भरीव दगडी  बांधकाम आहे.

शेकडो मेणबत्त्यांच्या प्रकाशात शंभर एक प्रवासी, खाली अंथरलेल्या जाजमावर बसून शांतपणे अरबी कलावंतांनी सादर केलेल्या अरबी संगीताचा आस्वाद घेत होते.त्यात सामिल झाल्यावर काळाचा पडदा बाजूला करून प्राचीन काळात डोकावून आल्याचा  अनुभव मिळाला.

आज पुन्हा दिवसाउजेडी पेट्राला भेट द्यायची होती. त्यासाठी आज दोघींसाठी एक अशा घोडागाड्या ठरवल्या. आता सकाळच्या उजेडात ते लालसर डोंगर त्यांचे वेगवेगळे आकार स्पष्ट दिसू लागले. कुठे ध्यान गुंफा कोरलेल्या आहेत तर कुठे उंट, अरबी माणूस असं कोरलेलल आहे.डोंगरकड्यांच्या पायथ्याशी जरा वरच्या बाजूला पन्हळीसारखं खोदलेलं आहे. ती पूर्वीची पाणी पुरवठ्याची व्यवस्था  होती. काही दगडांचे रंग हिरवे व निळे होते. पेट्राची गणना  आता नवीन सात जागतिक आश्चर्यात केली आहे. तसंच पेट्राला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जाही मिळाला आहे. घोडागाडीतून ‘खजाना’पर्यंत पोहोचलो. तिथून पुढे जाण्यासाठी उंटाची किंवा गाढवाची सफारी होती. चालतही जाता येत होतं. अनेक डोंगरातून छोट्या टूम्बस् बांधलेल्या आहेत. पुढे खूप मोठं रोमन पद्धतीचं अर्धवर्तुळाकार दगडी पायऱ्या असलेलं ओपन एअर थिएटर आहे. तिथे ३००० लोकांची बसण्याची व्यवस्था होती. देवळांसारखं बांधकाम, बळी देण्याच्या जागा, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला उंच, कोरीव, रोमन पद्धतीचे खांब अशी अनेक ठिकाणं बघता येतात. या व्हॅलीच्या शेवटी आठशे पायऱ्या चढल्यानंतर एक मॉनेस्ट्री आहे.आम्ही त्या मॉनेस्ट्रीचे दर्शन पेंटिंगज््मधून घेतले. गाईडने दोनशे वर्षांपूर्वीची डेव्हिड रॉबर्ट्स यांनी काढलेली लिथोग्राफिक पेंटिंग्ज दाखवली. त्यावरून त्या मोनेस्ट्रीची कल्पना आली. निरनिराळ्या अरब टोळी प्रमुखांच्या मीटिंग इथे होत असत. पारंपारिक वेषातले हे पुढारी बंदूक वगैरे हत्यारे बाळगीत. इथे पुढे आलेल्या खडकावर वॉच टॉवर बांधलेला आहे. उंटांचा तांडा बांधण्याची जागाही होती.

‘खजाना’ च्या पुढ्यात अनेक विक्रेते अरबी पारंपारिक कलाकुसरीचे ब्रेसलेट्स, कानातील वगैरे विकत होते. एक विक्रेता अगदी लहान तोंडाच्या काचेच्या गोल बाटलीत तिथली वाळू दाबून भरून त्यात रंगीत वाळू घालीत होता. नंतर त्याने काळा रंग दिलेली वाळू घातली आणि लांबट गाडीने त्या काळ्या वाळूमध्ये उंटांचा काफिला, आकाशात उडणारे पक्षी असं कोरलं.  लालसर वाळू घालून अस्ताचलाला जाणारं सूर्यबिंब काढलं. त्या बाटलीचे तोंड चिकट वाळूने बंद केलं. अनेक हौशी प्रवाशांनी त्या बाटल्या विकत घेतल्या. माणसाच्या रक्तातील कलेची बीजे सनातन आहेत. उपलब्ध साधनांचा उपयोग करून माणूस वेगवेगळ्या कलाकृती घडवत राहतो हे निखळ सत्य आहे.

परत जाण्यासाठी घोडागाडीत बसलो पण आमच्या गाडीचा अरबी, उंचनिंच, तांबूस घोडा अडून बसला.त्याला परतीच्या मार्गावर यायचंच नव्हतं. दोन पावलं टाकली की तो मागे तोंड करून वळण्याचा प्रयत्न करी. मालकाची व त्याची झकास जुगलबंदी चालू होती. माझी मैत्रीण अनघा म्हणाली ‘अगं,  घोड्याच्या मनात आपल्याला इंच-इंच पेट्रा दाखवायचं आहे. आपण सावकाशपणे आजूबाजूला बघत जाऊ.’ बरोबरीच्या गाड्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही अर्ध्या-पाऊण तासाने परतलो.’अडेलतट्टूपणा’ म्हणजे  काय? याचा  साक्षात अनुभव घेतला.

आज ‘वाडी रम’ इथे गेलो. ‘वाडी रम’ म्हणजे चंद्रदरी. चार मोठ्या चाकांच्या बदाऊनी जीपमधून दोन तासांची सफर होती. डोक्यावर रणरणतं ऊन होतं पण झुळझुळणारा वारा उन्हाची काहिली कमी करीत होता. नजर पोचेल तिथपर्यंत लालसर पांढरी अफाट वाळू पसरलेली होती. त्यात जागोजागी सॅ॑डस्टोनचे उंच, महाकाय डोंगर उगवलेले होते. हजारो वर्षे ऊन, वारा, वादळ यांना तोंड देऊन त्यांचे आकार वेडेवाकडे झाले आहेत. ते पाहून अर्थातच ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा भव्य चित्रपट आणि त्यातील पीटर ओ टूल यांची अविस्मरणीय भूमिका आठवली. ब्रिटिश सैन्यात अधिकारी असलेल्या टी. इ. लॉरेन्स यांनी जॉर्डनमध्ये येऊन अनेक नैसर्गिक व मानवी संकटांना तोंड दिलं. सर्व अरब टोळ्यांना एकत्र केलं. त्यावेळी जॉर्डनवर ऑटोमन साम्राज्याचं राज्य होतं.लॉरेन्स यांच्या नेतृत्वाखाली ऑटोमन्सचा पराभव झाला.  पहिल्या महायुद्धानंतर (   १९१८ ) जॉर्डन ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं. नंतर १९४६ साली जॉर्डनने स्वातंत्र्य मिळवलं. हा सारा इतिहास त्या वालुकामय प्रदेशात घडला होता.

दोन तास वालुकामय डोंगर सफर केल्यावर गाईडने खाली उतरवून एका छोट्याशा टेकडीकडे नेलं. तिथे  लॉरेन्स यांचा अरबी वेशातील अर्धपुतळा कोरलेला आहे. दुसऱ्या बाजूला त्यांना साथ देणाऱ्या प्रिन्स फैजल हुसेन यांचाही अर्धपुतळा कोरलेला आहे. नंतर एका बदाऊनी तंबूमध्ये गेलो. हे परंपराप्रिय अरब लोक वाळवंटात तंबूत राहणंच पसंत करतात. उंट व  शेळ्या- मेंढ्या पाळतात. तो तंबू लांबट- चौकोनी आकाराचा होता. त्याला काळपट हिरव्या रंगाची घोंगडीसारखी जाड कनात होती. जमिनीवर सुंदर डिझाईनची जाडसर सतरंजी होती. ‘ही सतरंजी मी स्वतः मेंढीच्या  लोकरीची विणली आहे’ असं तिथल्या अरबी माणसाने  सांगितलं. मधल्या लाकडी टेबलावर कशिदा कामाचे अरबी ड्रेस, औषधी वनस्पती, धातुचे दागिने वगैरे विकायला ठेवले होते. आम्हाला साखर व दूध नसलेला, हर्बस् घातलेला छान गरम चहा मिळाला.

तिथून अकाबा इथे गेलो. अकाबा हे जॉर्डनच्या दक्षिणेकडील तांबड्या समुद्रावरील बंदर आहे. रस्ते स्वच्छ व सुंदर आहेत. आधुनिक इमारती, मॉल्स, बागा, कारंजी अशी शहराची नवीन रचना उभारण्याचे काम चालू होते. समुद्राचं नाव ‘रेड सी’ असलं तरी पाणी झळझळीत निळं, पारदर्शक आहे. इथे यांत्रिक होडीतून दोन तासांची सफर होती. होळीच्या तळाला मोठी हिरवट काच बसलेली होती. दूरवर समुद्रात अवाढव्य मालवाहू बोटी उभ्या होत्या. पलीकडले लालसर डोंगर फॉस्फेट रॉकचे होते. एका बोटीत फॉस्फेट रॉक भरण्याचं काम चालू होतं.

थोड्याच वेळात होडीच्या तळातील काचेतून निळाईतला खजिना दिसायला लागला. असंख्य प्रकारची, सुंदर रंगांची कोरल्स दिसायला लागली. त्यातून जाड्या सुतळीसारखे काळसर रंगाचे साप, छोटे छोटे काळे, सोनेरी, लालसर रंगाचे मासे झुंडीने फिरत होते. निळे, जांभळे, पिवळट पांढरे, अशा अनेक रंगांचे व आकाराचे कोरल्स होते. कमळाचे ताटवे फुलावे अशी हिरव्या, शेवाळी रंगाची असंख्य कोरल्स होती. उंच जाडसर गवतासारखी कोरल्स समूहाने डोलत ,’डोला रे डोला’  नृत्य करीत होती. काही कळ्यांसारख्या कोरल्सची तोंडं एकाच वेळी उघडत मिटत होती. काही फणसासारखा आकारांचे, शेवाळी रंगाचे मोठे कोरल्स होते. निसर्गनिर्मित, पाण्याखालची अद्भुत सृष्टी पाहून मजा वाटत होती. माणसांची बेपर्वा वृत्ती इथेही दिसत होती. या प्रवाळांबरोबरच असंख्य प्लास्टिक बाटल्या,पेयांचे कॅन्स,दोऱ्या,रबरी नळ्या अशा अगणित वस्तू समुद्राने पोटात घेतल्या होत्या. एवढंच नव्हे तर एक बुडालेले जहाज आणि दुसऱ्या महायुद्धानंतर निकामी झालेला एक रणगाडादेखील समुद्राच्या पोटात होता. समुद्रजीव ( कोरल्स ) इतके समजूतदार की त्यांनी जहाजावर, रणगाड्यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या आणि बाकीच्या भंगाराकडे दुर्लक्ष केलं होतं. समुद्रात लाल रंगाची कोरल्ससुद्धा आहेत आणि  समुद्राभोवतीचे डोंगर लालसर रंगाचे आहेत म्हणून कदाचित या निळ्या-निळ्या  समुद्राला ‘रेड सी’ म्हणत असावेत.

जॉर्डन भाग–१ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक २१ – भाग ६ – कॅनडा ऽ ऽ राजा सौंदर्याचा ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २१ – भाग ६ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कॅनडा ऽ ऽ  राजा सौंदर्याचा ✈️

व्हॅ॑कूव्हरच्या पश्चिमेकडील पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरील स्टॅन्ले पार्क एक हजार एकरवर पसरला आहे.( मुंबईच्या शिवाजी पार्कचा विस्तार सहा एकर आहे ) इथे कृत्रिम आखीव-रेखीव बाग-बगीचे नाहीत .नैसर्गिकरित्या पूर्वापार जशी झाडं वाढली आहेत तसाच त्यांचा सांभाळ केलेला आहे. अपवाद म्हणून तिथे केलेली गुलाबाची एक बाग फारच देखणी आहे. नाना रंग गंधांच्या॑॑ हजारो गुलाबांनी या बागेला एक वेगळे सौंदर्य, चैतन्य लाभले आहे.

दुसऱ्या दिवशी व्हॅ॑कूव्हर पोर्टला जायला निघालो. वाटेत दोन्ही बाजूंना गव्हाची प्रचंड मोठी शेती आहे. शिवाय बदामाची झाडं, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, चेरी यांचेही मोठ मोठे बगीचे आहेत. गाईड म्हणाला की ही सर्व शेती तुमच्या भारतातून आलेल्या शिख कुटुंबियांच्या मालकीची आहे.  शंभराहून अधिक वर्षांपूर्वी ही पंजाबमधील शीख कुटुंबे ब्रिटिशांबरोबर शेतमजूर म्हणून इथे येऊन स्थिरावली आहेत. धाडस, मेहनत व स्वकर्तृत्वाने त्यांनी हे वैभव मिळविले आहे. आज अनेक शीख बांधव कॅनडामध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. तसेच अनेक जण सिनेटरही आहेत.

या धनाढ्य शिखांपैकी बहुतेकांचा स्वतंत्र खलिस्तानला  सक्रिय पाठिंबा होता. खलिस्तान चळवळीच्या वेळी कॅनेडियन विमानाचा झालेला (?) भीषण विमान अपघात, पंजाबमधील अतिरेक्यांच्या निर्घृण कारवाया, त्यांच्याशी प्राणपणाने लढणारे आपले पोलीस अधिकारी, सुवर्ण मंदिरातील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’,  जनरल वैद्य यांची तसेच इंदिरा गांधी यांची हत्या आणि त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. अजूनही हा खलिस्तानचा ज्वालामुखी धुमसत असतो आणि भारत सरकारला तेथील घडामोडींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते.

आता कॅनडामध्ये दिल्लीपासून तामिळनाडूपर्यंत अनेक प्रांतातले लोक विविध उद्योगधंद्यात विशेषतः हॉटेल बिझिनेसमध्ये कार्यरत आहेत. टोरांटो, व्हॅ॑कूव्हर अशा मोठ्या विमानतळांवर फ्लाईट शेड्युल ‘गुरुमुखी’मधून सुद्धा लिहिलेले आहे. तसेच हिंदी जाहिरातीही लावलेल्या असतात.

व्हिसलर माउंटन, व्हॅ॑कूव्हर, बुशार्ट गार्डन्स

व्हॅ॑कूव्हर पोर्टहून व्हॅ॑कूव्हरच्या दक्षिणेला असलेल्या व्हिक्टोरिया आयलंडवर जायचे होते. त्या अवाढव्य क्रूझमध्ये आम्ही आमच्या बससह प्रवेश केला. एकूण ६०० मोटारी व २२००  माणसे आरामात प्रवास करू शकतील अशी त्या महाप्रचंड क्रूझची क्षमता होती. बसमधून बोटीत उतरून लिफ्टने बोटीच्या सहाव्या मजल्यावर गेलो.अथांग सागरातून बोट डौलाने मार्गक्रमण करू लागली. दूर क्षितिजावर निळसर हिरव्या पर्वतरांगा दिसत ंहोत्या. देशोदेशींचे प्रवासी फोटो काढण्यात गुंतले होते. बोटीवरील प्रवासाचा दीड तास मजेत संपला. बोटीतील लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर येऊन आमच्या बसमधून व्हिक्टोरिया आयलंडवर उतरलो.

पॅसिफिक महासागराच्या या भागाला strait of Juan de fuca असे म्हणतात. सागरी सौंदर्य आणि इतिहास यांचा वारसा या बेटाला लाभला आहे. पार्लमेंट हाऊस, सिटी हॉल ,म्युझियम या इमारतींवर ब्रिटिश स्थापत्यशैलीची छाप आहे. राणी व्हिक्टोरियाचा भव्य पुतळा पार्लमेंटसमोर आहे. गहू, मका, अंजीर, स्ट्रॉबेरी अशी शेतीही आहे.

बेटावरील बुशार्ट गार्डनला पोहोचलो. ५० एकर जमिनीवर फुलविलेली बुशार्ट गार्डन्स जेनी आणि रॉबर्ट बुशार्ट यांच्या अथक मेहनतीतून उभी राहिली आहे. देशोदेशींचे दुर्मिळ वृक्ष, फुलझाडे, क्रोटन्स आहेत. मांडवांवरून, कमानींवरून सोडलेले वेल नाना रंगांच्या, आकाराच्या फुलांनी भरलेले होते. मोठ्या फ्लॉवरपॉटसारखी फुलांची रचना अनेक ठिकाणी होती. गुलाबांच्या वेली, तऱ्हेतऱ्हेची कारंजी, कलात्मक पुतळे यांनी बाग सजली आहे. देशी-विदेशी पक्ष्यांसाठी घरटी तयार केली आहेत. इटालियन गार्डन, जपानी गार्डन, देशोदेशींच्या गुलाबांची सुगंधी बाग असे पहावे तेवढे थोडेच होते. अर्जुन वृक्ष, अमलताशची (बहावा ) हळदी रंगाची झुंबरं, हिमालयात उगवणार्‍या ब्लू पॉपिजची झुडपे भारताचे प्रतिनिधीत्व करत होती. २००४ मध्ये या बागेचा शतक महोत्सव साजरा झाला. दरवर्षी लक्षावधी प्रवासी बुशार्ट गार्डनला भेट देतात. आजही या उद्यानाची मालकी बुशार्ट वंशजांकडे आहे.

व्हॅ॑कूव्हरपासून दीड तासावर असलेल्या व्हिसलर पर्वताच्या पायथ्याशी गेलो. तिथून एका गंडोलाने ( केबल कार ) व्हिसलर पर्वत माथ्यावर गेलो. व्हिसलर पर्वतमाथ्यावरून ब्लॅक कॉम्बो या पर्वतमाथ्यावर जाण्यासाठी दुसर्‍या गंडोलामध्ये बसलो. गिनिज बुकमध्ये नोंद असलेली, १४२७ फूट उंचीवरील आणि ४.५ किलोमीटर अंतर कापणारी ही जगातील सर्वात जास्त लांबीची व सर्वात उंचीवरून जाणारी गंडोला आहे. या गंडोलामधून जाताना खोलवर खाली बर्फाची नदी, हिरव्या पाण्याची सरोवरे, सुरूचे उंच वृक्ष, पर्वत माथे, ग्लेशिअर्स असा अद्भुत नजारा दृष्टीस पडला. ब्लॅककोम्ब पर्वतमाथ्यावर बर्फात खेळण्याचा आनंद लुटला. परत येताना काळ्या रंगाचे व सोनेरी रंगाचे अस्वल दिसले. पर्वतमाथ्यापर्यंत गंडोलातून सायकली नेऊन पर्वतउतारावरून विशिष्ट रस्त्याने सायकलिंग करत  येण्याच्या शर्यतीत तरुण मुले-मुली उत्साहाने दौडत होती. येताना उंचावरुन कोसळणारा शेनॉन फॉल बघितला.

जगामध्ये कॅनडा आकाराने दुसऱ्या नंबरवर ( पहिला नंबर रशियाचा ) आहे.९९८४६७० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ कॅनडाला लाभले आहे. एकूण क्षेत्रफळापैकी ५४ % भाग हा घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे.साधारण अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या कॅनडाचा चार पंचमांश भाग अजूनही निर्मनुष्य आहे. कॅनडाच्या उत्तरेकडील अतिथंड बर्फाळ विभागात एस्किमो लोकांची अगदी थोडी वस्ती आहे. पण हा बर्फाळ भाग खनिज संपत्तीने समृद्ध आहे. शिवाय तेथील भूगर्भात खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे आहेत. पूर्वेकडे अटलांटिक महासागर, पश्चिमेकडे पॅसिफिक महासागर, उत्तरेकडे आर्किक्ट महासागर व दक्षिणेकडे अमेरिकेची सरहद्द आहे. दोन देशांना विभागणारी जगातील सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमारेषा ही कॅनडा आणि अमेरिकेच्या दरम्यान असून तिची लांबी ८८९१ किलोमीटर आहे. जगातील सर्वात मोठी किनारपट्टी कॅनडाला लाभली आहे. सामन, ट्राऊट, बास, पाईक असे मासे प्रचंड प्रमाणात मिळतात. त्यांची निर्यात केली जाते. लेक ओंटारिओ,लेक एरी, लेक ह्युरॉन अशी ३६०० गोड्या पाण्याची सरोवरे समुद्रासारखी विशाल आहेत. प्रचंड प्रमाणात जलविद्युत निर्मिती होते व अमेरिकेला पुरविली जाते.

ॲसबेस्टास, झिंक, कोळसा, आयर्न ओर, निकेल, कॉपर,सोने, चांदी अशी सर्व प्रकारची खनिजे व धातू मिळतात. अर्धीअधिक जंगले फर, पाईन, स्प्रुस अशा सूचीपर्णी वृक्षांनी भरलेली आहेत. जगभरातील न्यूज प्रिंट पेपर व इतर पेपर्स बनविण्यासाठी मोठ-मोठ्या वृक्षांचे ओंडके तसेच पेपर पल्प यांचा कॅनडा सर्वात मोठा निर्यातदार आहे.

मेपल वृक्षाचे, हाताच्या पंजासारखे लाल पान हे कॅनडाचे राष्ट्रीय चिन्ह आहे. या मेपल वृक्षाच्या चिकापासून बनविलेले मेपल सिरप लोकप्रिय आहे. काळी अस्वले, कॅरिबू,मूस,एल्क,जंगली कोल्हे,गोट्स जंगलात सुखेनैव भटकत असतात. क्यूबेक,  नोव्हा स्कॉटिया, न्यू फाउंड लॅ॑ड असे पठारी विभाग सर्वोत्तम शेती विभाग आहेत. उत्पादनापैकी ८० टक्के गहू निर्यात केला जातो. प्रचंड मोठी कुरणे व धष्टपुष्ट गाईगुरे यांच्या प्रेअरिज आहेत.

कॅनडामध्ये जगातल्या वेगवेगळ्या २०० देशातील ४५ वंशाचे लोक राहतात. स्थलांतरित चायनीज लोकांचा पहिला नंबर आहे तर भारतीय वंशाचे लोक तिसऱ्या नंबरवर आहेत. भारतीय डॉक्टर्सना सन्मानाने वागविले जाते. गेली बावन्न वर्षे  ओटावाजवळ राहात असलेले, मूळचे बडोद्याचे असलेले डॉक्टर प्रकाश खरे – न्यूरॉलॉजिस्ट व डॉक्टर उल्का खरे- स्त्रीरोगतज्ञ यांची या प्रवासात हृद्य भेट झाली. इथल्या बहुरंगी संस्कृतीमुळे सर्वांच्या चालण्या-बोलण्यात एक प्रकारची खिलाडू वृत्ती आहे.

समृद्ध, संपन्न, विशाल कॅनडा बाहेरून जसा देखणा आहे तसंच त्याचं अंतरंगही देखणे आहे याची प्रचिती आली. कॅनडाचे तरुण पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी सीरीयामधून येणाऱ्या निर्वासितांसाठी कॅनडाचे दार उघडले. येणाऱ्या निर्वासितांना समाजात सामावून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना पुढे येण्याचं आवाहन केले. या आवाहनाला कॅनेडियन नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कॅनडात आता अनेक कुटुंबे एकत्र येऊन सिरीयन कुटुंबाचे पालक बनतात. वर्गणी काढून निर्वासितांच्या घरांचं भांडं, कपडेलत्ते याचा खर्च करतात. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतात. त्यांना इंग्लिश शिकायला, स्थानिक संस्कृती समजावयाला मदत करतात. आपल्या मुलांना निर्वासित कुटुंबातील मुलांबरोबर मैत्री करण्यासाठी प्रोत्साहन देतात . आळीपाळीने आपल्या घरी बोलावितात. अशी मदत करणाऱ्या इच्छुकांची संख्या एवढी मोठी आहे की सर्वच्या सर्व सीरीयन निर्वासितांना कोणत्या ना कोणत्या कुटुंबाचा आधार मिळाला आहे.

आज सर्व जगभर द्वेषावर आधारित समाजनिर्मिती करण्याचा प्रयत्न स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केला जात आहे. अशा वेळी निरपराधी लोकांना जिवाच्या भीतीने आपला देश, घरदार, माणसे सोडून परागंदा व्हावे लागते. युक्रेनचे ताजे उदाहरण आपल्यापुढे आहेच. आपली सारी मूळं तोडून टाकून लहान मुले, स्त्रिया यांच्यासह दुसऱ्या देशात आसरा घेणे हे अपार जीवघेणे दुःख आहे . कॅनेडियन नागरिकांनी मानवतेला लागलेला काळीमा पुसण्याचा केलेला हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

भाग-६ व कॅनडा समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares