मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९५ आणि ९६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९५ आणि ९६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ९५ – – – 

अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।

तया मुक्ति नारायणाचेनि नामे ।

शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।

मुखे बोलता ख्याति झाली पुराणी ।।९५।।

अर्थ : दुराचारी असलेल्या अजामेळाने अंतकाळी आपल्या नारायण पुत्राचे नाव घेतले. त्या मुलाचे सतत नाम घेतल्याने त्याला मुक्ती मिळाली. एका गणिकेने ‘ राम राम ‘ हे आपल्या पोपटाचे नाम सतत घेतल्याने तिचा देखील उद्धार झाला. आपल्या अंतकाळी भगवंताचे नाम घेणाऱ्या व्यक्तींच्या या कथा पुराणात प्रसिद्ध झाल्या.

(शुक – पोपट, कुंटणी – गणिका/वेश्या)

विवेचन : भगवंताच्या नामाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्थ या श्लोकात पुराणातील दोन वेगळी उदाहरणे आपल्या देतात. अजामेळ ब्राह्मणाची कथा भागवतात आली आहे. अजामेळ हा दुराचारी होता. आपल्या आयुष्यात त्याने कधी भगवंताचे नाम घेतले नाही. आपला अंतकाळ जेव्हा जवळ आला तेव्हा त्याला आपल्या लाडक्या नारायण या पुत्राची आठवण होऊन तो त्याच्या नावाचा जप करू लागला. तेव्हा विष्णुदूतांनी येऊन त्याला मुक्ती दिली अशी कथा आहे. दुसरी कथा आहे पिंगला या गणिकेची. तिने देखील आपल्या संपूर्ण आयुष्यात परमेश्वराची भक्ती केली नाही. परमेश्वराबद्दल तिला एक प्रकारचा तिरस्कार होता असे म्हटले तरी चालेल. त्याच भावनेतून तिने आपल्या आवडत्या पोपटाचे नाव ‘राम ‘ असे ठेवले. अजाणतेपणी का होईना पण त्यानिमित्ताने ती रामनाम घेत गेली. त्यामुळे तिचा उद्धार झाला. खरी गोष्ट अशी आहे या सगळ्यांना मृत्यूसमयी आपल्या चुकीचा पश्चाताप होऊन त्यांनी भगवंताचे नाम घ्यायला सुरुवात केली. पुढे त्यातूनच त्यांचा उद्धार झाला.

तर्कशास्त्राच्या कसोटीवर या कथा आजच्या काळात टिकणाऱ्या नाहीत. नास्तिक आणि बुद्धिवादी लोक तर या पुराणातील भाकडकथा आहेत म्हणून सहज उडवून लावतील. पण समर्थांच्या काळात या कथा प्रचलित होत्या. लोकांनी परमेश्वराचे नाम कोणत्याही प्रकारे का होईना पण घ्यावे आणि त्यांना रामनामाचे महत्व पटावे एवढाच समर्थांचा या कथा सांगण्यामागील उद्देश असावा. आपणही तो उद्देश लक्षात घेऊ या. आपल्यासाठी त्या कथांपेक्षा समर्थांचा संदेश महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे आपण धान्य निवडताना आपण फोलपट टाकून देऊन सार आपल्याकडे ठेवतो त्याप्रमाणे बाकी निरुपयोगी फोलपट टाकून सार तेवढे ग्रहण करू या. रामनाम हेच सार आहे. सुज्ञास अधिक सांगणे नलगे.

स्वसंवाद ::

१. पुराणातील कथांमधील चमत्कारिक गोष्टींवर तर्क लढवत बसण्यापेक्षा, त्यामागे संतांनी दिलेला ‘नामस्मरणाचा’ मूळ संदेश (सार) मी स्वीकारू शकतो का?

२. “अजाणतेपणी किंवा मुलाच्या ओढीने घेतलेले नाम जर अजामेळाला तारू शकते, ” तर मग मी जाणीवपूर्वक आणि मनापासून नाम घेतले तर माझ्या आयुष्यात किती सकारात्मक बदल घडू शकेल?

३. संसाराच्या वेगवेगळ्या विवंचनेत अडकलेला असतानाही, मी माझ्या रोजच्या बोलण्यात किंवा व्यवहारात भगवंताच्या नामाचे अधिष्ठान ठेवतो का?

४. संतांनी सांगितल्याप्रमाणे, “रामनाम हेच अंतिम सार आहे” हे स्वीकारून मी मनातील निरर्थक शंकांचे ‘फोलपट’ टाकून द्यायला तयार आहे का?

=====

श्लोक क्र. ९६ – – – 

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।

जपे रामनामावळी नित्यकाळी ।

पिता पापरूपी तया देखवेना ।

जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ।।९६।।

अर्थ : भगवंताचा महान भक्त असलेला प्रल्हाद याचा जन्म दैत्यकुळात झाला. परंतु तो नित्य भगवंताच्या नामाचा जप करीत असे. अत्यंत पापी असलेला त्याचा पिता हिरण्यकश्यपू याला ते पाहवेना. त्याने आपल्या आयुष्यात कधीही नामस्मरण केले नाही.

विवेचन : 

भगवंताच्या नामाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्थ आपल्याला प्रत्येक श्लोकात वेगवेगळी उदाहरणे देत आहेत. एखाद्या कुशल शिक्षकाने ज्याप्रमाणे विविध उदाहरणे देऊन आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगावे तसे समर्थ आपल्याला सांगत आहेत. या अर्थाने समर्थ हे लोकशिक्षक आहेत. जन उद्धाराची तळमळ त्यांना आहे. ‘बुडते हे जन न देखवे डोळा ‘ या भावनेतून ते आपल्याला रामनामाचे महत्व सांगत आहेत.

प्रल्हाद हा विष्णूचा महान भक्त होता. पण त्याचा जन्म एका दैत्यकुळात झाला होता. दैत्यकुळातील मंडळी म्हणजे साधारणपणे भगवंताला विरोध करणारी किंवा त्याला आपला शत्रू मानणारी होती. अशा प्रतिकूल ठिकाणी प्रल्हादाचा जन्म झाला. पण भगवद्भक्तीचे संस्कार प्रल्हादाला गर्भातूनच मिळाले होते. त्याची आई कयाधू ही गर्भारपणी महर्षी नारदांच्या आश्रमात राहिली होती. तिथेच भगवद्भक्तीचे संस्कार प्रल्हादावर झाले.

प्रल्हादाला आपल्या घरातील परिस्थिती भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी अनुकूल नव्हती. पण भगवंताचा खरा भक्त होण्यासाठी जे गुण लागतात, त्या गुणांनी तो परिपूर्ण होता. त्याच्या मुखात भगवंताचे नाम अखंड येत असे. ‘ ओम नमो भगवते वासुदेवाय ‘ या मंत्राचा नित्य जप तो करीत असे. इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रल्हाद नारायणाचे म्हणजे विष्णूचे नाम जपत होता. पण वरील श्लोकात समर्थांनी ‘ जपे रामनामावळी ‘ असे म्हटले आहे. नारायण असो की राम, तो सर्वव्यापी ईश्वर एकच आहे हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला दाखवून देतात. त्यामुळे आपण देखील भगवंताच्या नामात भेदभाव करणे योग्य नाही.

परमेश्वराला आपला शत्रू मानणाऱ्या हिरण्यकश्यपूला अर्थातच हे आवडणे शक्य नव्हते. हिरण्यकश्यपू हा भगवान शंकराचा भक्त होता. त्याने कठोर तपश्चर्या करून शंकरांकडून असा वर मागून घेतला होता की ज्या वरामुळे त्याला सहजासहजी कोणी मारू शकत नव्हते. त्यामुळे तो स्वतःला अमर समजू लागला. आणखीनच उन्मत्त झाला. प्रजेवर आणि भगवंताच्या भक्तांवर जुलूम करू लागला. पण आपला स्वतःचाच मुलगा आपले ऐकत नाही असे पाहिल्यावर त्याने प्रल्हादाला मारण्यासाठी कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही. पण प्रल्हादाची भगवंतावर अविचल श्रद्धा होती. भगवंताने हर प्रकारे त्याचे सर्व संकटातून रक्षण केले. हिरण्यकश्यपू पापी असला तरी प्रल्हादासारखे भगवंतावर अविचल निष्ठा असणारे पुत्ररत्न त्याच्या उदरी जन्मले हे त्याचे केवढे भाग्य! त्यामुळेच आपल्या अंत्यसमयी हिरण्यकश्यपूला नरसिंहरूपाने भगवंताचे दर्शन झाले आणि त्याला मुक्ती मिळाली.

प्रल्हादाचा जन्म जरी दैत्यकुळात झाला तरी इच्छा असली तरी विपरीत परिस्थितीत देखील भगवंताचे नाम घेऊन तरून जाता येते हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगतात. आपणही प्रल्हादाप्रमाणे भगवंताचे नाम घेऊन या भवसागरातुन तरून आपला उद्धार करून घेऊ शकतो. तो आपल्याला सर्व संकटातून सोडवेल.

स्वसंवाद ::

१. माझ्या सभोवतालची परिस्थिती किंवा घरचे वातावरण परमार्थ साधण्यासाठी अनुकूल नाही, असे रडत न बसता मी प्रल्हादासारखा ‘अविचल’ राहून नामस्मरण करू शकतो का?

२. राम, कृष्ण, विष्णू किंवा शिव यांच्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करून मी माझ्या मनाची ऊर्जा वाया घालवतो आहे, की सर्वव्यापी ईश्वर एकच आहे हे सत्य स्वीकारतो?

३. हिरण्यकश्यपूप्रमाणे मीही उन्मत्त होऊन माझ्या जवळच्या माणसांवर किंवा सत्प्रवृत्तींवर अन्याय तर करत नाहीये ना?

– क्रमशः श्लोक ९५ आणि ९६

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक वैदिक राष्ट्रीय प्रार्थना ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ एक वैदिक राष्ट्रीय प्रार्थना ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

ओम् आ ब्रह्मन् ब्राम्हणो ब्रम्हवर्चसी जायताम्।

आsस्मिन् राष्ट्रे राजन्य इषव्यः।

शूरो महारथो जायताम्।

दोग्ध्री धेनुर्वोढाsनङ्वानाशुः सप्तिः।

पुरान्धिर्योषा जिष्णू रथेष्ठाः।

सभेयो युवाsस्य यजमानस्य वीरो जायताम्।

निकामे निकामे नः पर्जन्यो वर्षतु, फलिन्यो न औषधयः पचन्ता योगक्षेमो नः कल्पताम्।।

समानि व आकूतिः समाना ह्रदयानि वः।

समानवस्तु वो मनो यथा वः सुसहासति।

सर्वेsत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पष्यंतु मा कश्चित दुखःमाप्नुयात्।

*

ओम् शान्तिः शान्तिः शान्तिः।।

☆

मराठी भावानुवाद

☆

हे जगदीशा, या राष्ट्राला ब्रह्म जाणते ब्राह्मण दे

शूर, धीर, गंभीर, प्रतापी महारथी लढवैय्येे दे।।१।।

*

दुभत्या गायी, पुष्ट पशुधने, समीरस्पर्धी हयदळ दे

सुंदर, सात्विक, सुबुद्ध, सुदृढ माता, वनिता, दुहिता दे।।२।।

*

युवासंघ बलशाली आणि सभेस सभ्य सभासद दे

पाउस पडु दे सुयोग्य समयी, रसरशीतसे वनधन दे।।३।।

*

स्वप्ने, ध्येये, मने आमुची एक असू दे सदाकदा

सुखी, निरोगी, मंगल जीवन सकला दे रे भगवंता।।४।।

☆

ओम् शांतिः शांतिः शांतिः।

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बॉम्बस अवे! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ बॉम्बस अवे! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

☆

सफेद सागरातल्या अंधा-या रात्रींमधले पराक्रम!

हम ही हम हैं तो क्या हम हैं…तुम ही तुम हो तो क्या तुम हो… 

१९७१च्या भारत-पाक युद्धाचे चित्रण असलेल्या आणि १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या हिंदी चित्रपटात अभिनेता सनी देओल आणि जाकी श्रॉफ यांच्यामध्ये शेवटी एक संवाद आहे… हम ही हम हैं तो क्या हम हैं…तुम ही तुम हो तो क्या तुम हो! हे दोघेही पायदळ श्रेष्ठ की वायुदळ श्रेष्ठ याची चर्चा करताना एका निष्कर्षांपर्यंत पोहोचलेले दाखवलेत…दोहोंचेही अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे!

अजूनही भारतीय जनमानसात सैन्य म्हणजे पायदळ हे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे आजवरच्या युद्धचित्रपटांमध्ये अधिक चित्रीकरण पायदलाचे झालेले आढळते. वायूदलाचा क्रमांक दुसरा तर नौसेना तिस-या क्रमांकावर येते!

पण खरं तर ही तिन्ही दले म्हणजे आपले त्रिनेत्र आहेत. आधुनिक युद्धात तर Air Supremacy अर्थात ज्याच्या ताब्यात आकाश…त्याचे वर्चस्व अशी स्थिती आहे. नुकतेच पार पडलेले ऑपरेशन सिंदूर, त्या आधी पाकिस्तानातल्या बालाकोटवर आपण केलेले हवाई हल्ले हे याला साक्षी आहेत. जगभरातले देश हवाई सामर्थ्य वाढवण्याच्या सतत प्रयत्नांत असतात, त्याला काही अर्थ आहेच!

कारगिल युद्ध हे जगातल्या सर्वाधिक उंचीवर लढले गेलेले युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. पाकिस्तानची तयारी एवढी प्रचंड होती की केवळ पायदळ त्यांना पराभूत करण्यासाठी पुरेसे नव्हते. भारतीय वायूसेनेला या युद्धात प्रत्यक्ष सहभागी होण्यात काही कारणांनी अंमळ उशीरच लागला…कारण तोवर युद्धाची निश्चित स्थितीच आपल्या सैन्याच्या लक्षात आलेली नव्हती. परिस्थिती हाताबाहेर जाते आहे याची खात्री होताच भारताने आपला हा तिसरा नेत्र उघडला…आणि ऑपरेशन सफेद सागर हाती घेतले. हा सागर जमिनीवरील नव्हता…आभाळात तरंगणा-या पांढ-या ढगांच्या वरून उडणा-या हवाई ‘जहाजां’नी केलेल्या पराक्रमांनी भरलेला आणि भारलेला होता. 

सोळा ते अठरा हजार मीटर्सची उंची. त्यामुळे हवा विरळ. त्यामुळे विमानांच्या सामर्थ्यावर निश्चित मर्यादा. त्यात प्रचंड उंचीची टोकदार हिमशिखरे. त्यांतून वाट काढीत वेगाने जाणे यासाठी अत्युच्च दर्जाचे वैमानिक कौशल्य आवश्यक. पाकिस्तानी नियमित सैन्य अतिरेक्यांच्या वेशात कारगिलच्या शिखरांवरील बंकर्स, कपा-यांमध्ये दडून बसलेले. शिखरांवर खालून चढून जावे तर वर मोक्याच्या जागी बसलेला शत्रू भारतीय सैनिकांना सहजी टिपत होता. खालून तोफा डागाव्यात तर उंच शिखरे, द-या, कपारी असल्याने आरंभी अचूक तोफ-बॉम्बवर्षाव करणे महाकठीण होते. पाकिस्तानी सैन्याला रसद पुरवणा-या व्यवस्था तर भारतीय तोफांच्या मा-याच्या आणखीनच पलीकडे होत्या. अशा स्थितीत वायुदल हाच आशेचा एक मोठा किरण होता…आणि पाकिस्तान अधिकृत सैन्य या युद्धात सहभागी नसल्याने त्यांची वायुसेनाही युद्धात सहभागी होऊ शकत नव्हती…कारण ते तर म्हणत होते की कारगिल मध्ये पाकिस्तानी सैन्य नव्हे तर काश्मिरी मुजाहिदीन, अतिरेकी शिरलेले आहेत. 

आंतरराष्ट्रीय करारांमुळे भारतीय वायुदल भारत-पाक वायूहद्द ओलांडून पलीकडे जाणारही नव्हती! अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आणि मुख्यत: तशा short noticeवर आपल्या वायूवीरांनी ७६३१ उड्डाणे केली! यांत आरंभीच्या हेलिकॉफ्टर्स उड्डाणांचाही समावेश होता. कारगिलमध्ये घुसलेले अतिरेकी, पाकिस्तानी सैन्य आणि त्यांचे ‘आका’ यांच्यातील संपर्कसूत्रे नेस्तनाबुत केली…आणि मुख्य म्हणजे सीमारेषा न ओलांडता त्यांचे मनोधैर्य रसातळाला नेऊन ठेवले!

या मोहिमेत आरंभी भारतीय वायुसेनेला मोठे नुकसान सहन करावे लागले…घुसखोरांकडे विमानविरोधी आधुनिक ‘स्टिंगर’ मिसाईल्स होती..आणि ती त्यांना डागता येत होती. त्यामुळे अगदी सुरुवातीलाच आपण अनेक मोहारे गमावले…स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा आणि राजीव पुंडीर,  फ्लाईट लेफ्टनंट सुब्रमनियम मुहीलान,  सार्जंट राजकिशोर साहू, फ्लाईट सार्जंट पी.व्ही.एन.आर.प्रसाद यांचा समावेश होता. यांतील आहुजा साहेबांना पाकिस्तानी सैन्याने हालहाल करून मारल्याचे बोलले जाते. फ्लाईट लेफ्टनंट के.नचिकेत हे तर त्यांचे विमान पाकिस्तानी हद्दीत पडल्याने शत्रूच्या तावडीत सापडले होते…मात्र भारताच्या राजनैतिक दबावामुळे त्यांची सुखरूप सुटका होऊ शकली!

त्यावेळी भारतीय वायूदलाच्या ताफ्यात असलेली विमानेच या युद्धात वापरणे भाग होते. परंतू त्या विषम हवामानात आणि पर्वतीय परिसरात आणि रात्रीही बॉम्बफेक करू शकतील अशा क्षमतांची विमाने उपलब्ध होतीच किंवा त्यांचा तिथे प्रभावी वापर करता येईलच असे नव्हते. यासाठी अपारंपारिक नीती,  जुने तंत्रज्ञान नव्या क्लृप्त्या वापरून कामात आणणे आवश्यक होते…आणि आपल्या वैमानिकांनी, तंत्रज्ञ वीरांनी ते करूनही दाखवले!

भारतीय वायुसेनेच्या १७व्या स्क्वाड्रन (Golden Arrows) चे विंग कमांडर बी.एस. अर्थात बिरेंद्रसिंग धनोआ ऊर्फ ‘टोनी’ (जे पुढे एअर चीफ मार्शल झाले! ) फ्लाईंग ऑफिसर आर.एस. अर्थात राजपाल सिंग धालीवाल ऊर्फ ‘धाली’ (जे पुढे विंग कमांडर झाले) यांची कामगिरी लक्षणीय ठरली…अर्थात त्यांच्या जोडीला असंख्य वायूवीर होतेच…जमिनीवर काम करणारे तंत्रज्ञ, संशोधकही होतेच. निश्चित केलेल्या लक्ष्यावर अचूक बॉम्ब फेकताना ते बॉम्ब्स लक्ष्याच्या दिशेने निघालेले असताना वैमानिकांनी केलेल्या बॉम्ब्स अवे…अर्थात बॉम्ब्स निघाले…या घोषणा जमिनीवर नियंत्रण कक्षात बसलेल्या अधिका-यांच्या, कर्मचा-यांच्या, पर्वतांवर आडोशाला बसून वायूदलाच्या अचूक मा-याची वाट पहात असलेल्या सैनिकांच्या अंगावर शहारे उमटवून जात!

पायदल सैनिकांनी प्रचंड संख्येने बलिदाने दिली…त्यांना वायुदलाची मोलाची साथ लाभली…म्हणून कारगिल ‘विजय’ साकारला. भारतीय वायूदलाच्या या अतुलनीय कामगिरीची दखल घेणारी टेलीविजन मालिका ऑपरेशन सफेद सागर नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केली गेली आहे. भारतीय सैन्याच्या कामगिरीमध्ये रस असणा-या सर्वांनीच ती जरूर पहावी..खरे तर यावर स्वतंत्र चित्रपट यायला पाहिजे होता!

तांत्रिक भाषा, ज्ञान कमी अवगत असणा-या माझ्यासारख्या प्रेक्षकांना या मालिकेत उल्लेख केल्या गेलेल्या विमानविद्येतील शास्त्रीय, तांत्रिक बाबी कदाचित लवकर लक्षात येणार नाहीत. पण आपल्या जांबाज fighter pilots तरुणांचे,  तंत्रज्ञ मंडळीचे शौर्य, कौशल्य निश्चितच दिसेल…समजेल,  हे निश्चित. यानिमित्ताने आपल्याला भारतीय वायूदलाच्या सामर्थ्याची खात्रीही पटेल. आहुजा साहेबांच्या आणि इतर हुतात्मा वायूसैनिकांच्या शौर्याचा परिचयही होईल. 

ऑपरेशन सफेद सागर नावाच्या या OTT मालिकेत अभिनेते सिद्धार्थ यांनी अहुजा साहेब,  जिम्मी शेरगिल यांनी धनोआ आहेब, आदिल हुसेन यांनी एअर मार्शल विनोद पटनी साहेब यांच्या भूमिका जोरदार निभावल्या असून दिया मिर्झा आणि इतर कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे. निर्माते कुशल श्रीवास्तव, अभिजित सिंग परमार आणि दिग्दर्शक ओनी सेन यांचे तसेच लेखक, संगीतकार, संवादलेखक यांचे आभार…त्यांच्यामुळे ही शौर्य गाथा पडद्यावर साकारली गेली…आणि भारतीय वायूसेनेचेही योगदान प्रकर्षाने अधोरेखित होऊ शकले. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पंचमहाभूतांचे महत्व आणि ऊर्जा… ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ पंचमहाभूतांचे महत्व आणि ऊर्जा… ☆ विभावरी कुलकर्णी ☆

भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदामध्ये संपूर्ण सृष्टीची निर्मिती पृथ्वी, आप (जल), तेज (अग्नी), वायू आणि आकाश या पाच घटकांपासून झाली असल्याचे मानले जाते. या घटकांना पंचमहाभूते म्हणतात. आपल्या शरीराचे आरोग्य आणि निसर्गाचे संतुलन या पंचमहाभूतांच्या ऊर्जेवरच अवलंबून असते.

या प्रत्येक तत्त्वाकडून ऊर्जा मिळवणे, त्याचे महत्त्व आणि आपल्या जीवनात होणारा उपयोग खालीलप्रमाणे आहे

१. पृथ्वी तत्व (Earth Element)

पृथ्वी तत्त्व आपल्याला स्थिरता,  पोषण आणि शारीरिक रचना प्रदान करते.

महत्त्व: आपल्या शरीरातील हाडे,  स्नायू आणि ऊती (tissues) हे पृथ्वी तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतात. या तत्त्वाच्या संतुलनामुळे शरीराला स्थिरता आणि मानसिक शांती मिळते.

ऊर्जा मिळवण्याचे मार्ग:

अनवाणी पायांनी जमिनीवर किंवा गवतावर चालणे (Grounding/Earthing).

मातीच्या संपर्कात राहणे (उदा. निसर्गोपचारात मड थेरपी किंवा मातीचे लेप).

नैसर्गिक आणि सेंद्रिय अन्नाचे सेवन करणे.

उपयोग: शारीरिक थकवा दूर होतो,  शरीरातील अतिरिक्त नकारात्मक ऊर्जा जमिनीत विसर्जित होते आणि हाडे मजबूत होतात.

२. आप/जल तत्व (Water Element)

जल तत्त्व हे प्रवाहीपणा, शुद्धता आणि भावनांचे प्रतीक आहे. मानवी शरीरात सुमारे ७०% भाग पाण्याचा असतो.

महत्त्व: शरीरातील रक्ताभिसरण,  पचनक्रिया आणि पेशींचे कार्य सुरळीत चालण्यासाठी जल तत्त्वाची ऊर्जा आवश्यक असते.

ऊर्जा मिळवण्याचे मार्ग:

पुरेशा प्रमाणात शुद्ध पाण्याचे सेवन करणे.

नदी, समुद्र किंवा पाण्याच्या नैसर्गिक स्रोताजवळ वेळ घालवणे.

जलचिकित्सा (Hydrotherapy) म्हणजेच योग्य तापमानाच्या पाण्याने स्नान करणे.

उपयोग: शरीरातील विषारी द्रव्ये (toxins) बाहेर पडतात,  त्वचा सतेज राहते आणि मानसिक ताण कमी होऊन मन शांत राहते.

३. तेज/अग्नी तत्व (Fire Element)

अग्नी तत्त्व हे ऊर्जा,  परिवर्तन आणि पचनाचे मुख्य स्रोत आहे.

महत्त्व: शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे आणि आपण खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करणे (जठराग्नी) हे या तत्त्वाचे कार्य आहे.

ऊर्जा मिळवण्याचे मार्ग:

सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे (सूर्यस्नान).

नियमित व्यायाम आणि योगासने करून शरीरातील उष्णता संतुलित ठेवणे.

दीपप्रज्वलन किंवा अग्निहोत्रासारख्या पारंपरिक पद्धती.

उपयोग: शरीराची चयापचय क्रिया (metabolism) सुधारते,  रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि नैराश्य दूर होऊन उत्साह जाणवतो.

४. वायू तत्व (Air Element)

वायू तत्त्व हे गती,  प्राण आणि विचारांचे प्रतीक आहे.

महत्त्व: श्वसनाद्वारे शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवणे आणि प्राणशक्तीचा प्रवाह चालू ठेवणे हे वायू तत्त्वाचे काम आहे.

ऊर्जा मिळवण्याचे मार्ग:

मोकळ्या आणि शुद्ध हवेत दीर्घ श्वास घेणे.

प्राणायाम (जसे की अनुलोम-विलोम, कपालभाती) नियमित करणे.

निसर्गरम्य ठिकाणी किंवा बागेत वेळ घालवणे.

उपयोग: फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते,  रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सुधारते आणि मन एकाग्र होण्यास मदत होते.

५. आकाश तत्व (Space/Ether Element)

आकाश तत्त्व हे विस्तार,  पोकळी आणि सजगतेचे प्रतीक आहे. इतर सर्व तत्त्वांना सामावून घेण्यासाठी आकाशाची गरज असते.

महत्त्व: शरीरातील पोकळी (उदा. कान,  नाक,  अन्ननलिका आणि पेशींमधील अंतर) आकाश तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. मनाची शांतता आणि आंतरिक जाणीव या तत्त्वावर अवलंबून असते. 

ऊर्जा मिळवण्याचे मार्ग:

ध्यान (Meditation) आणि मौन पाळणे.

अधूनमधून उपवास (Fasting) करणे,  ज्यामुळे शरीरातील अवयवांना विश्रांती मिळते आणि पोकळी निर्माण होते.

शांत ठिकाणी बसून अथांग आकाशाकडे पाहणे.

उपयोग: मेंदूचे कार्य सुधारते,  सर्जनशीलता वाढते आणि आंतरिक शांती मिळते.

आरोग्यासाठी पंचमहाभूतांचे एकत्रित महत्त्व

आपले शरीर हे या पाच घटकांचेच एक लहान स्वरूप आहे. जेव्हा या घटकांमध्ये असंतुलन निर्माण होते,  तेव्हाच आपल्याला आजार किंवा मानसिक तणाव जाणवतो.

निसर्गोपचार (Naturopathy) आणि योगसाधना याद्वारे आपण या पाचही तत्त्वांची ऊर्जा ग्रहण करून स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवू शकतो. निसर्गाच्या जितके जवळ आपण राहू,  तितकीच ही ऊर्जा आपल्याला सहज आणि प्रभावीपणे प्राप्त होते.

या पंचमहाभूतांकडून ऊर्जा मिळवण्यासाठी वेगळी मेडिटेशन असतात. 

— समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन व हिलिंग मास्टर,  समुपदेशक,  सांगितोपचारक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ साता समुद्रापल्याडही शिवरायांचा जयघोष! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ साता समुद्रापल्याडही शिवरायांचा जयघोष! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

☆

वीर सैनिक नामदेवराव रामजी जाधव!  

इटली देशातल्या त्या नदीकाठाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे नाव काही नवं होतं, असं नाही! सुमारे तीन शतकांपूर्वी इटलीत जन्मलेल्या निकोलाव मानुची नावाच्या एका सैनिक, तोफखाना तज्ज्ञ, वैद्यक तज्ज्ञ, प्रवासी लेखक माणसाने राजांविषयी Storia do Mogor या ग्रंथात मध्ये भरभरून लिहून ठेवलं होतं..आणि त्या गोष्टी या नदीच्या कानावर आल्या होत्याच! फक्त तिने त्या तीन अक्षरी मंत्राचा गगनभेदी जयघोष मात्र कधी ऐकला नव्हता…तो प्रसंग आज प्रत्यक्षात आकाराला आलेला होता!

रक्तबंबाळ अवस्थेत एक आधुनिक मावळा देहातील सर्व शक्ती एकवटून घोष करीत होता…बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय! आणि काही क्षणांतच नदीच्या पलीकडच्या दरीतून प्रतिध्वनीही उमटू लागले…जय! जय! जय! आणि मग घटकाभरात मराठ्यांनी रणक्षेत्र काबीज केलं…इतिहासाची पुनरावृत्ती करावी ती शिवरायांच्या मावळ्यांनीच!

इंग्रज माणसं हेरण्यात पटाईत. त्यांनी काही शतकांपूर्वी छत्रपती ‘सिवाजी’ महाराजांच्या गनिमी काव्याचे जिवंत ‘काव्य’ अनुभवले होतेच. महाराजांना आणि पुढे छत्रपती संभाजी महाराजांना देवाचे अकालीच बोलावणे आले म्हणून इंग्रज बचावले. इंग्रजांनी भारतात अधिकृत राज्य स्थापन केल्यावर स्थानिक तरुणांना हाताशी धरीत सैन्य भरती केली. पण बंडाची शक्यता गृहीत धरत त्यांनी मराठयांचे मोठे दल उभारण्यात आखडता हात घेतला होता…कारण त्यांनी मराठ्यांच्या समशेरींचे पाणी चांगलेच चाखले होते. पण कालांतराने ब्रिटीशांना मराठा गडी यशाचा धनी! ही गोष्ट उमगली! 

सहा वर्षी सुरु असलेलं दुसरं जागतिक महायुद्ध संपुष्टात येण्याच्या सहा महिने आधीची ही घटना. दोस्तांच्या फौजांना जगभरात बरेच ठिकाणी मोठे यश मिळू लागलेले होते. पण त्यांच्या इटलीमधील मोहिमेत एक मोठा अडथळा होता. सेनियो नदीचे सुमारे सहाशे किलोमीटर्सचे खोरे, त्यापुढील प्रचंड मोठा पठारी भूभाग ताब्यात आला असता म्हणजे जर्मन फौजांना आणखी मागे रेटता आले असते. आणि अर्थातच जर्मन सैन्य दोस्तांच्या फौजांना ही नदी ओलांडू देत नव्हते. सुमारे ९० किलोमीटर्स लांबीची ही नदी. एके ठिकाणी या नदीचे पात्र सुमारे १५ फूट रुंद होते. पाणी फार नव्हे, केवळ चार-पाच फूटच खोल होते. मात्र दोन्ही काठ भले मोठे म्हणजे ३५ फुट उंचीचे होते. नदी ओलांडून जायला हाच एक मार्ग होता…आणि अर्थात इथेच जर्मनीने भक्कम मोर्चेबांधणी केली होती. मुळात दोस्तांच्या फौजांचा मार्ग जर्मनांनी आणि इटलीतील उंच पर्वत, द-या यांनी एक वर्षभर रोखून धरला होता..एकदा इथे विजय मिळाला असता म्हणजे जर्मनीचा पराभव निश्चित झाला असता. 

पण इथेच जर्मनांची ‘गोथिक लाईन’ आडवी उभी होती. ३२० किलोमीटर्स लांबीचा हा आडवा अडथळा…हजारो बंकर्स, मशीन गन्स पोस्ट्स आणि भूसुरुंग असलेली भक्कम भिंतच जणू. ही भिंत फोडूनच पलीकडे Po Valley म्हणजे पो नावाच्या नदीचे खोरे गाठता येईल…आणि नेमके हेच कठीण होते. जर्मनांची अतिशय कुशल, सुसज्ज parachute units इथेच तर तैनात होती! 

दोस्तांच्या फौजेतील ८व्या ब्रिटीश आर्मीसमोर हे मोठे आव्हान उभे ठाकले होते…पण त्यांच्या समवेत होती ५वी मराठा लाईट इन्फंट्री. डोंगर-द-यातील गनिमी कावा युद्धनीती रक्तात भिनलेले गडी! महाराष्ट्रापासून सहा हजार किलोमीटर्स अंतरावर अत्यंत कठीण परिस्थितीत, विपरीत हवामानात, प्रचंड थंडीत मराठे लढत असले तरी जिद्द मात्र तसूभर कमी नव्हती. ‘आम्हांला या युद्धात मदत करा, आम्ही तुम्हांला स्वायत्तता प्रदान करू’ असे म्हणत ब्रिटीशांनी भारतीय शूरांना साद घातली होती. त्यामुळे या युद्धात विजय झाला तर भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग अधिक सुकर होणार…ही आशा होतीच…शौर्याला यावेळी एक निश्चित ध्येय होते!

निकराचा प्रयत्न म्हणून ब्रिटीश फौजेची पहिली तुकडी या नदीपात्रातून पुढे निघाली…आणि तिच्यावर तीन मशीनगन्स पोजिशन्स वरून प्रचंड गोळीबार झाला…दोन सैनिक आणि त्या सैन्यतुकडीचे कंपनी कमांडर वगळता इतर सर्व ठार झाले…आणि जखमी झालेले हे दोन सैनिक आणि कंपनी कमांडर पाण्यात कोसळले!

या तुकडीच्या अगदी मागोमाग आणखी एक तुकडी नदी पार करणार होती…५वी मराठा लाईट इन्फंट्री…या तुकडीत ‘रनर’ म्हणून एक मराठा गडी तैनात होता. घोडा, वाहन किंवा प्रसंगी पळत जाऊन सैन्य-तुकड्यांना लष्करी निरोपांची त्वरीत देवाण-घेवाण करणे हे रनर चे मुख्य काम असते. ते शस्त्रशिक्षित तर असतातच. युद्धात या रनर वर शत्रूचे खास लक्ष असते! 

१८ नोव्हेंबर, १९२१ ची गोष्ट. आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमज-वीरगाव या खेड्यात गरीब शेतकरी श्री.रामजी जाधवांच्या पोटी नामदेव जन्माला आले. अतिशय बारीक चणीचे पण तत्कालीन अंगमेहनती शेतकरी कुटुंबांतील अनेक तरुणांसारखे प्रकृतीने काटक असलेले नामदेवराव जात्याच चपळ, शूर आणि धाडसी होते. इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू शकणारा एक विषारी सर्प नामदेवरावांनी स्वत: हिंमत करीत मारल्याचे सांगितले जाते! 

पुढील काळात जाधव कुटुंबास आणि नामदेवरावांना विविध कारणांनी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. शेतकरी असल्याने शेतमजुरी करावी लागली. बाल नामदेवराव त्यावेळी लोकांची जित्राबं अर्थात जनावरं चारायला नेण्याचे काम करीत रानोमाळ भटकत असत. या दरम्यान गावाजवळ असलेल्या नदीचे विस्तीर्ण पात्र एका दमात पोहत पार करणे आणि त्याच वेगाने माघारी येणे, हा त्यांचा नेहमीचा छंद होता!

त्या काळात लष्करात नोकरीच्या संधी सर्वाधिक असत. किंबहुना दुष्काळग्रस्त भागांतील अनेक तरुणांना लष्करातील नोकरी हा मोठा आधार वाटू लागला यात नवल नाही. शिवाय अंगभूत शौर्य गाजवण्याची संधी दुस-या कुठल्याही नोकरीत नव्हतीच. त्यामुळे नामदेवरावांनी ब्रिटीश फौजेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. १९२१ मध्ये जन्मलेल्या या तरुणाने वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षीच म्हणजे साधारणपणे १९३९ मध्ये ब्रिटीश भारतीय सैन्यातल्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये शिपाई म्हणून पाऊल ठेवले…दुसरे महायुद्ध याच वेळी सुरु झालेले होते! 

आणि एकेदिवशी नियतीने महाराष्ट्रातल्या एक खेड्यात जन्मलेल्या नामदेव रामजी जाधव नावाच्या तरुणाला दूर इटली देशात लढायला धाडले…एक इतिहास घडणार होता!

९ एप्रिल, १९४५. मेजर विंटर, मेजर क्राफर्ड, मेजर व्हान इनगेन, मेजर हावर्ड इत्यादी अधिकारी हिटलर विरोधातील मित्र सैन्यात आघाडीवर होते. त्यांच्या सोबत.३/१५ पंजाब, १ जयपूर या सैन्य तुकड्याही होत्या. यात ५वी मराठा लाईट इन्फंट्रीही होतीच…आणि त्यांच्यावर भयावह हल्ला चढवला गेला…!

आपल्या पुढची तुकडी नामोहरम झालेली पाहताच…रनर नामदेवराव जाधव हातातली tommy gun सरसावत पाण्यात उतरले…कमांडर साहेबांना खांद्यावर घेतले…पाण्यात तीन बाजूंनी गोळीबार सुरु होताच…नदीकाठच्या भरावामध्ये ठिकठीकाणी सुरुंगही पेरून ठेवलेले होते…त्यातून वाट काढीत नामदेवरावांनी कमांडर साहेबांना एका काठावर सुरक्षित आणले. तोवर जर्मन सैन्याला अंदाज आला होता. त्यांनी आणखी जोरदार गोळीबार सुरु केला…पण नामदेवराव माघारी आले…त्यांनी आणखी एका जखमी सैनिकाला खांद्यावर घेतले…त्याच धोकादायक मार्गावर पुढे जात त्यालाही आणि त्यानंतर दुस-याही सैनिकाला काठावर नेऊन ठेवले…तीन जीव वाचवले त्यांनी!

एवढ्यावर थांबून त्यांना मागे पळून येता आले असते…पण नामदेवराव त्या पाण्यात पुन्हा उतरले…नामदेवराव सैन्यात रनर चे काम करीत असले तरी त्यांना गन्स चालवण्याचे कौशल्य हस्तगत होतेच…त्यांनी tommy gun हातात पेलली आणि त्या मशीनगन्स पोझिशिन्सला आपले लक्ष्य केले…एक एक करीत त्यांनी तिन्ही मशीनगन शांत केल्या…तोवर त्यांच्या हाताला गोळ्या लागून प्रचंड जखमा झाल्या…त्यांची पर्वा न करता त्यांनी जवळचे हातगोळे शत्रू सैनिकांवर फेकले…खंदकात लपलेल्या जर्मन सैनिकांना एवढा प्रतिकार केला जातो आहे, याचे आश्चर्य वाटत राहिले. जवळचे हातगोळे संपल्यावर नामदेवराव वेगाने पोहत या किना-यावर माघारी आले…आपल्या तुकडीतील सैनिकांकडून हातगोळे मागून घेतले…आणि पुन्हा जर्मनांच्या मागावर गेले! जन्मगावी मोठे खोल नदीपात्र एका दमात पोहणा-या नामदेवरावांना ही पाच सहा फूट खोलीची आणि पस्तीस एक फूट रुंदीची नदी अगदी सोपी होती…सोपं नव्हतं ते जर्मनांच्या गोळीबारातून निसटून जाणे…समोर मृत्यू उभा असताना धैर्य टिकवून ठेवणे…शारीरिक वेदना विसरणे आणि सैन्यधर्माला जागणे. 

काहीच क्षण आधी त्या नदीच्या अल्याडच्या आणि पल्याडच्याही काठांनी शौर्य, हिंमत, पराक्रम, जिद्द, शर्थ या शब्दांचे जिवंत अर्थ अनुभवले होते..नामदेवराव त्या मरणाच्या वर्षावात त्या नदीचा तो चढ चढून वर टेकाडावर उभे राहिले…आणि मग त्या नदी काठच्या एका उंचवट्यावरून एक गगनभेदी गर्जना ऐकू आली…बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय!…सेनियो नदीने पहिल्यांदा हा गजर ऐकला असावा…तीन अक्षरी मंत्र…ज्याच्या उच्चाराने दगडांनाही जीभा फुटाव्यात! या आवाजाच्या दिशेने जर्मनांनी मोर्टार म्हणजे छोटे विस्फोटक डागायला सुरुवात केली…पण नामदेवराव मागे हटले नाहीत…छत्रपतींचे नाव ऐकताच मराठ्यांच्या रक्तातील शौर्याला पुन्हा एकदा बळ मिळाले…आणि डोळ्यांत आग आणि हृदयात राग असलेल्या मराठा सैनिकांचा एक मोठा लोंढा त्या नदीपात्रातून पलीकडच्या तीराकडे निघाला…पात्रातले पाणी लाल झाले…पण ती लढाई जिंकली गेली! 

नामदेवरावांनी जणू एका भक्कम किल्ल्यालाच भगदाड पाडले होते…त्यातून पुढे जात दोस्तांच्या सैन्याने जर्मनीचा प्रतिकार मोडून काढला…दुसरे महायुद्ध जिंकण्याचा मार्ग यामुळे सुकर झाला…१ सप्टेंबर, १९३९ सुरु झालेले रोजी हे महायुद्ध २ सप्टेंबर, १९४५ रोजी अधिकृतरीत्या संपले…जर्मनी आणि तिच्या मित्रराष्ट्रांचा पराभव झाला हे जाहीर करण्यात आले!

सेनियो नदीच्या आसपास असलेल्या अनेकांनी नामदेवरावांचा पराक्रम उघड्या डोळ्यांनी पाहिला, अनुभवला होता. ते दोन जखमी सैनिक आणि कंपनी कमांडर तर केवळ नामदेवरावांच्या हिंमतीच्या बळावरच जिवंत राहू शकले होते. ब्रिटीश सैन्याधिका-यांनी शिपाई नामदेवराव जाधव यांच्या पराक्रमाची नोंद घेतली…आणि इंग्लंडला धाडली होती! 

विक्टोरिया क्रॉस…ब्रिटनच्या राणी विक्टोरिया यांनी २९ जानेवारी, १८५६ रोजी हा सन्मान सुरु केला…ब्रिटीश सैन्यातल्या कोणत्याही दर्जाच्या, कोणत्याही दलाच्या कोणत्याही सैनिकाला, अधिका-याला, सैन्यदलासाठी काम करणा-या नागरिकाला हा सन्मान विशेष समारंभात इंग्लंड येथील बकिंगहम राजवाड्यात प्रदान केला जातो…हा इंग्लंडचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार मानला जातो!

१५ जून, १९४५ रोजी सैन्य शिपाई नामदेवराव जाधव यांना ‘विक्टोरिया क्रॉस’ साठी राजपत्रित केले गेले आणि पुढे एका विशेष समारंभात किंग जॉर्ज (सहावे) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला! इटलीतून सैन्यकर्तव्य यशस्वीरीत्या पूर्ण करून नामदेवराव जाधव सुट्टीसाठी गावी आलेले असताना एक विशेष घटना घडल्याचे सांगण्यात येते…त्यावेळी भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते. दुस-या महायुद्धात विजयी झाल्यास ब्रिटीश भारताला मर्यादित स्वातंत्र्य देणार असल्याचे जगजाहीर होते. यामुळेच कित्येक तरुण सैन्यात भरतीही झाले होते. 

ब्रिटीश लोक त्यांच्यासाठी लढलेल्या, विशेषत: विक्टोरिया क्रॉस विजेत्या सैनिकांविषयी विशेष सन्मान दर्शवतात, असे दिसून येते. यामुळेच भारताचे तत्कालीन Voiceroy Lord Mountbatten रेल्वे प्रवासात असताना श्रीरामपूर स्टेशनवरून पुढे जाणार होते. त्यांनी नामदेवरावांना स्टेशनवर सन्मानाने बोलावून घेत त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी जाधव यांना “काही हवे आहे का? ” असे विचारताच जाधव साहेबांनी “कबूल केल्याप्रमाणे भारताला लवकर स्वातंत्र्य द्या!” असे म्हटल्याचे बोलले जाते…यातून नामदेवरावांचे देशप्रेमच दिसून आले! 

भारतात परतल्यावर शिपाई नामदेवरावांना ३ सप्टेंबार, १९४६ रोजी लान्स नाईक, १२ फेब्रुवारी, १९४७ रोजी लान्स हवालदार या पदांवर पदोन्नती देण्यात आली. स्वतंत्र भारतीय सैन्याने त्यांना २८ ऑगस्ट, १९५१ रोजी प्रभारी हवालदार आणि पुढे ५ जानेवारी, १९५६ रोजी हवालदार पदावर बढती देत त्यांच्या कामाचा गौरव केला. नायब सुबेदार या पदावर असताना नामदेवराव सेवानिवृत्त होऊन गावी परतले! त्यांनी कमावलेली पदके हीच त्यांच्याकडे असलेली मोठी दौलत म्हणावी लागेल…इटली स्टार पदक, युद्धसेवा पदक, वुंड मेडल(युद्धात जखमी होऊनही शौर्य गाजवल्याबद्दल दिले जाणारे पदक!) इंग्लंडच्या राणीच्या राज्यारोहणाच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जाणारे गौरवचिन्ह (१९५३…राणी विक्टोरिया यांच्या हस्ते प्रदान)…आणि भारतीय सैन्याचे PVSM परम विशिष्ट सेवा मेडल! एवढं सर्व मिळवूनही नामदेवराव जाधव साहेब साधे आयुष्य जगले, हे विशेष. त्यांच्या पत्नी द्रौपदाबाई यांनी त्यांच्या शौर्याच्या कथा आठवणींत जपून ठेवल्या. त्यांच्या एकुलत्या एका कन्येच्या तीन पैकी एका मुलाने भारतीय सैन्यात, मराठा रेजिमेंटमध्ये प्रवेश मिळवून वारसा पुढे नेला आहेच. इतर नातू नामदेवरावांच्या नावाने समाजसेवी संस्था चालवत त्यांच्या स्मृती जागवत असतात. 

एका बाबतीत परदेशी नागरीकांना मानले पाहिजे…ते सैनिकांचा पूर्ण आणि कायम आदर ठेवतात! नामदेवराव जाधव साहेब २ ऑगस्ट, १९८४ रोजी हे जग सोडून निघून गेले. पण तोपर्यंत त्यांना दर दोन वर्षांनी इंग्लंड येथे होणा-या विशेष समारंभास आठवणीने बोलावले जायचे. 

सेनिओ नदीच्या काठी San potito येथे ९ एप्रिल, २०१७ रोजी तिथल्या महापौरांच्या हस्ते नामदेवरावांचे स्मारक उभारले गेले आहे. लंडन येथील Constitution Hill येथील Memorial Gates येथे नामदेवरावांचे नाव कोरलेले आहे. 

इकडे भारतात पुण्याजवळच्या औंध लष्करी प्रशिक्षण केंद्रात ३१ जानेवारी, २०१९ रोजी नामदेवरावांचा अर्धपुतळा स्थापित करण्यात आला आहे. 

‘विक्टोरिया क्रॉस’ प्राप्त केलेल्या सैनिकांचे अत्याधुनिक record ब्रिटीशांनी जपून ठेवले आहे. त्यासाठी विशेष अधिका-याची नेमणूक केलेली असते. The Victoria Cross Association हे विक्टोरिया क्रॉस जिंकलेल्या जगभरातल्या सैनिकांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून असते. काही वर्षांपूर्वी ब्रिटीश उच्चायुक्तालयात लष्करी सल्लागार पदावर कार्यरत असलेल्या ब्रिगेडीअर इयान रीस यांनी दिल्ली ते अहिल्यानगर असा खास प्रवास करीत नामदेवरावांच्या पत्नी श्रीमती द्रौपदाबाई यांची सदिच्छा भेट घेतली होती.

२ ऑगस्ट, २०२६ ही परमवीर नामदेवराव रामजी जाधव यांची ४२वी पुण्यतिथी. 

 .. .. नामदेवरावांच्या स्मृतींना मानाचा मुजरा. बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय! 

(विक्टोरिया क्रॉस विजेत्या मराठा सैनिकांमध्ये नाईक यशवंतराव घाडगे यांचे नावही आदराने घेतले जाते. यशवंतरावांनी १० जुलै, १९४४ रोजी दुस-या महायुद्धात भीमपराक्रम करून दाखवला होता!) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९३ आणि ९४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९३ आणि ९४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ९३ – – 

जगी पाहता देव हा अन्नदाता ।

तया लागली तत्त्वता सार चिंता ।

तयाचे मुखी नाम घेता फुकाचे ।

मना सांग पा रे तुझे काय वेचें ।।९३।।

अर्थ : खरे पाहिले तर जगामध्ये परमेश्वर हा सर्वांचे भरणपोषण करणारा आहे असे दिसते. त्याला खरोखरच सर्वांची काळजी आहे. तेव्हा, हे मना, त्याचे फुकटचे नाम घेण्यासाठी तुला काही खर्च करावा लागतो का?

(तत्त्वता – वास्तविक पाहता, सार – सगळी, वेचे – खर्च होणे)

विवेचन : या जगात आपण जन्माला आलो आहोत, तेव्हा आपल्या उदरनिर्वाहाची काळजी परमेश्वराला असतेच. कोणत्याही जीवाला जन्माला घालण्यापूर्वी त्याच्या जगण्याची व्यवस्था तो करतो. मूल जन्माला येण्यापूर्वी आईच्या स्तनात दूध निर्माण होते. मूल थोडे मोठे होईपर्यंत मग त्याला बाहेरचे काही द्यावे लागत नाही. आई त्याचं सर्व प्रकारचं भरणपोषण करते. जशी त्याची शारीरिक भूक ती भागवते, तसेच आईच्या सहवासात बाळाचे मानसिक आणि भावनिक देखील भरणपोषण होते. पुढे मग ती आपल्याजवळ उपलब्ध असणारे अन्न त्याला भरवते. जशी आई, तशीच परमेश्वर ही आपली माउली आहे. तिला आपली चिंता असतेच. आपल्याभोवती असणारा निसर्ग आपल्याला फळे, फुले देतो. शेतातील अन्न आपले भरणपोषण करते. ते पिकवण्यासाठी लागणारी बुद्धीदेखील आपल्याला त्यानेच दिली आहे. आईप्रमाणेच निसर्ग सुद्धा आपल्याला मानसिक, भावनिकदृष्टया समृद्ध करीत असतो. निसर्गातील नदी, वृक्ष, समुद्र असा प्रत्येक घटक आपल्याला कसे वागावे याचा काही ना काही संदेश देत असतो.

पण परमेश्वराने जरी व्यवस्था केलेली असली तरी कोणतेही अन्न आपल्याला जागेवर बसून मिळत नाही. ते मिळवण्यासाठी हालचाल, कष्ट करावेच लागतात. ही धडपड हेच त्याच्या जगण्याचे बळ आहे. या धडपडीतूनच सजीवाला जगण्याचे ध्येय आणि जीवन जगण्यासाठीची ऊर्जा प्राप्त होत असते. पण होते काय की इतर प्राणी सोडले तर या जगण्याच्या शर्यतीत मनुष्य कमालीचा स्वार्थी बनतो. तो आपल्या गरजेपुरते न घेता इतरांच्या वाट्याचेही ओरबाडून घेतो. निसर्गालाही ओरबाडतो. त्यामुळे परमेश्वराने निर्माण केलेल्या या सुंदर जगात कोणाजवळ संपत्तीचा प्रचंड साठा केंद्रित होतो, तर कोणाला दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडते. ही विषमता मानवनिर्मित आहे. सध्या जगात सुरु असलेली युद्धे याच संपत्तीच्या आणि सत्तेच्या हव्यासापायी होताना दिसत आहेत.

या जगात आपण मोजू शकणार नाही इतके अगणित प्राणी आणि जीवजंतू आहेत. त्यांची जगण्याची व्यवस्था आपण करतो का? तो परमेश्वरच त्यांना जन्माला घालतो, तोच त्यांचे भरणपोषण करतो. इतके असूनही माणसाला आपल्या कर्तृत्वाचा किती अहंकार असतो! घरात एखादा कुटुंबप्रमुख एकटा कमावता असेल तर त्याला वाटते मी कमावतो म्हणून या सर्वांना बसून खायला मिळते. माझ्यामुळेच घर चालले आहे. आपण नोकरी करतो. जिथे काम करतो तो मालक किंवा ते व्यवस्थापन आपल्याला त्याबद्दल पगार देते. पण त्या मालकाला देखील देणारा कोणीतरी असतोच ना! थोडक्यात म्हणजे मालकाचा देखील कोणीतरी मालक आहेच. त्या मालकाला तुम्ही आम्ही का ओळखत नाही? हा मालक म्हणजे परमेश्वर. व्यापक अर्थाने तो सर्वांचे हित पाहणारा आहे.

नवऱ्याने एखादा दागिना घेतला तर बायकोला कोण आनंद होतो! ती मोठया कौतुकाने सगळ्यांना सांगत सुटते. आपल्या नवऱ्याची तारीफ करते. पण ज्या भगवंताने तो दागिना घालण्यासाठी तुला हे सुंदर शरीर दिले आहे, त्याची कधी आठवण येते? त्याची तारीफ तू करतेस का? म्हणूनच समर्थ म्हणतात की परमेश्वर जर सर्वांची काळजी घेतो, पालनपोषण करतो, तर त्याचे स्मरण आपण का करत नाही? जेवल्यानंतर आपण ‘ अन्नदाता सुखी भव ‘ असे म्हणून जेवण देणाऱ्याला धन्यवाद देतो. मग खरा अन्नदाता तर तो आहे. त्याला देतो का आपण धन्यवाद? त्याचे नाम घेण्यासाठी तर काही पैसे खर्चावे लागत नाहीत. ‘ कृतघ्नता ‘ हे सर्वात मोठे पाप आहे. अन्नदाता असणाऱ्या भगवंताबद्दल आपण कृतज्ञ राहून त्याचे नित्य स्मरण करायला हवे. त्यासाठी काही खर्च करावा लागतो का? तुकाराम महाराजांचा अभंग फार सुंदर आहे. ते म्हणतात

का रे नाठविसी कृपाळू देवासी । पोसतो जनासी एकला तो ।

बाळा दुधा कोण करितें उत्पत्ति । वाढवी श्री-पति सवें दोन्हीं ॥

* 

फुटे तरुवर उष्ण-काळ-मासीं । जीवन तयांसी कोण घाली ।

तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहें त्या अनंता आठवूनी ।

तुका म्हणे ज्याचे नांव विश्वंभर । त्याचे निरंतर ध्यान करीं ॥

 स्वसंवाद :: 

१. “माझ्यामुळेच माझे घर आणि कुटुंब चालले आहे” अशा कुठल्या खोट्या अहंकाराच्या ओझ्याखाली मी वावरत आहे का?

२. रोज जेवताना ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणताना, चराचरातील अनंत जीवांचे विनासायास पालनपोषण करणाऱ्या त्या खऱ्या ‘विश्वंभराची’ मला आठवण होते का?

३. ज्या भगवंताने मला हे सुंदर शरीर, बुद्धी आणि जगण्याची साधने दिली, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विनामूल्य असणारे नाम घेताना माझे काय ‘वेचते’ (खर्च होते)?

४. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे उन्हाळ्यात वाळलेल्या झाडांनाही पालवी फुटणारे पाणी देणारा तो ‘अनंत’ जर माझी काळजी वाहण्यास समर्थ आहे, तर मी संसाराची व्यर्थ चिंता का करत बसलो आहे?  

===== 

श्लोक क्र. ९४ – – 

तिन्ही लोक जाळू शके कोप येता ।

निवाला हरू तो मुखे नाम घेता ।

जपे आदरे पार्वती विश्वमाता ।

म्हणोनि म्हणा तेचि हे नाम आता ।।९४।।

अर्थ : भगवान शंकर जर कोपले आणि त्यांनी आपला तिसरा नेत्र उघडला तर तिन्ही लोक जाळून भस्म करू शकतात.अशा महासामर्थ्यशाली भगवान शंकरांनी जेव्हा त्यांच्या अंगाचा दाह होऊ लागला, तेव्हा रामनामाचा आश्रय घेतल्यावरच तो शांत झाला. माता पार्वती देखील अत्यंत आदराने रामनाम जपते. म्हणून आपण देखील त्याच रामनामाचा आश्रय घ्यावा.

(तिन्ही लोक -स्वर्ग-मृत्यू-पाताळ, निवाला – शांत झाला, हरू – भगवान शंकर)

विवेचन : या ठिकाणी रामनामाचे महत्व स्पष्ट करण्यासाठी समर्थ पुन्हा भगवान शंकरांचे उदाहरण देतात. त्यामागे आपल्या हिताची कळकळ आहे. एखाद्या अभ्यास न करणाऱ्या मुलाला आईवडील जसे एखाद्या अभ्यास करणाऱ्या मुलाचे उदाहरण पुन्हा पुन्हा देतात, तसेच हे आहे. भगवान शंकर देवांमध्ये श्रेष्ठ. म्हणून ते ‘ महादेव ‘ ब्रह्मदेव जगाची निर्मिती करतात, विष्णू जगाचे पालनपोषण करतात तर शंकर हे संहारकर्ते मानले जातात. त्यांच्या ठायी एवढे सामर्थ्य आहे की त्यांनी केवळ आपला तिसरा नेत्र उघडला तर क्रोधाने ते हे त्रिभुवन जाळून भस्म करून टाकू शकतात. 

अशा सामर्थ्यशाली भगवान शंकरांनी जेव्हा अखिल प्राणिमात्रांच्या कल्याणाच्या हेतूने हलाहल विष प्राशन केले, तेव्हा त्यांच्या कंठाचा प्रचंड दाह होऊ लागला. शीतल चंद्र माथी धारण करून, पवित्र आणि शीतल अशा गंगेला शिरावर धारण केले. एवढे करून देखील त्यांचा दाह शमला नाही. पण अमोघ अशा रामनामामुळे त्यांचा दाह शांत झाला. एवढे सामर्थ्य रामनामाचे आहे. जी विश्वमाता आहे, जगज्जननी आहे अशी माता पार्वती देखील रामनामाचा जप करते. म्हणून आपणही तेच नाम घ्यायला हवे असे समर्थ आपल्याला उदाहरणासह पटवून देतात.

या श्लोकाचा अर्थ आपल्याला वेगळ्या प्रकारेही घेता येतो. आपण मानव म्हणजे गुणदोषांचे पुतळे असतो. क्रोध हा आपला एक प्रमुख शत्रू असतो. क्रोध म्हणजे राग किंवा संताप. त्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी, नातेसंबंध भस्म करण्याची शक्ती असते. त्यासाठी रामनामाचा आश्रय घेणे हाच सर्वश्रेष्ठ उपाय आहे. रामनामामुळे मन शांत होऊ लागते, क्रोध कमी होऊ लागतो. भगवंताचे नाम हे शांती आणि सौख्य प्रदान करणारे आहे. म्हणून तेच आदरपूर्वक घ्यावे. 

स्वसंवाद :: 

१. माझ्या मनात जेव्हा ‘क्रोधाचा’ (रागाचा) भडका उडतो, तेव्हा मी माझे विवेक आणि नातेसंबंधांचे ‘त्रिभुवन’ जाळून खाक करतो का? त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मी काय करतो?

२. जर तिन्ही लोकांना कवेत घेणारे महादेव आणि अखिल विश्वाची माता असणारी पार्वती अत्यंत आदराने रामनाम जपतात, तर संसारी विवंचनेत अडकलेल्या माझ्या मनाला नामस्मरणाचा संकोच का वाटावा?

३. माझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या चिंता आणि संतापाचा दाह शांत करण्यासाठी, मी कधी शांत चित्ताने रामनामरूपी शीतलता अनुभवली आहे का?

४. “म्हणोनि म्हणा तेचि हे नाम आता” हा समर्थांचा आग्रहाचा शब्द ऐकून, मी उद्याची वाट न बघता ‘आता’ या क्षणापासून नामस्मरण करायला तयार आहे का? 

– क्रमशः श्लोक ९३ आणि ९४

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ३७ हजार पांडवांचे गुरु द्रोणाचार्य! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ ३७ हजार पांडवांचे गुरु द्रोणाचार्य! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

☆

शिवरायांचा ‘गनिमी कावा’ पुढे चालवणारे ब्रिगेडीअर बसंत पंवर! 

 भारताला पाकिस्तान आणि चीनसोबतची समोरासमोरची थेट युद्धे जंगलात लढावी लागली नाहीत. परंतु नक्षलवादी, माओवादी, विघटनवादी इत्यादी शक्तींशी लढताना मुख्य लढाई घनदाट जंगलातच होती आणि आहे. अर्थात भारतीय जनमानस या संघर्षाला अजूनही लढाई आणि त्यात लढणा-यांना सैनिक मानत नाही, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. जनमानसात युद्ध म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमापार प्रचंड हल्ले, मोठी शस्त्रे… लढाई आणि हारजीत! 

 त्यामुळेच आरंभी मुघल शिवरायांच्या मावळ्यांना सैनिक आणि त्यांच्या समूहाला सैन्य मानत नव्हते… पुढे शिवरायांच्या गनिमी काव्याने मुघलांच्या साम्राज्याची राखरांगोळी केली, हा इतिहास आहे. छत्रपती महाराज साहेबांनी विकसित करून प्रचंड यशस्वी करून दाखवलेला हा गनिमी कावा म्हणजेच Guerrailla warfare!

 जंगलात लढण्यासाठी विशिष्ट पद्धतीची युद्धनीती अवलंबावी लागते. Guerra म्हणजे लढाई आणि illa म्हणजे छोटी… लहान! guerrailla म्हणजे लहान लढाई… चकमक! 

 ही युद्धनीती आरंभी भारतीय सैनिकांना आरंभी तितकीशी अवगत नव्हती आणि ही नीती शिकवण्याची कोणती व्यवस्था. ही कमतरता भरून काढली ती ब्रिगेडीअर बसंत पनवर साहेबांनी. साहेब त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य. त्यांचे वडील मेजर देवीसिंग पनवार दुस-या महायुद्धात सहभागी होते. तर आजोबा म्हणजे आईचे वडील कर्नल मंगल सिंग हेही पहिल्या महायुद्धात सैनिकी अधिकारी होते. मामा कर्नल अजित सिंग, लेफ्ट. कर्नल ओंकार सिंग, मेजर रामसिंग हेही सैन्याधिकारीच होते!

 साहेबांना अगदी शालेय वयापासून घोडेस्वारीची आवड होती. आपण एक घोडा विकत घ्यावा, असं त्यांना कायम वाटे. आणि पुढील आयुष्यात त्यांनी खरोखरीच एक घोडा विकत घेतलाही. घोड्यावरून खेळले जाणारे अनेक साहसी खेळ साहेब लीलया खेळत असत! 

 साहेबांच्या वडिलांची बदली होई त्या शहरात साहेबांचे शिक्षण होत गेले… पण कळत्या वयात त्यांना पुण्याच्या बिशप्स स्कूल बोर्डिंगमध्ये राहण्याची संधी प्राप्त झाली.. ज्या ठिकाणी ब्रिटीश आर्मीमधील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. खेळांमध्ये प्रगती साधता आली. पुढे साहेब वडिलांकडे आग्रह करून सैनिकी शाळेत आणि तिथून पुढे एन. डी. ए. खडकवासला येथे प्रवेश घेते झाले. ते एन. डी. ए. मध्ये जिमनास्टीक्स, घोडेस्वारी या प्रकारांत अव्वल होते. त्यामुळे एन. डी. ए. चा अभ्यासक्रम आणि पुढे आय. एम. ए. चाही अभ्यासक्रम सहजी पूर्ण झाला!

मेरीटमध्ये उत्तीर्ण झाल्याने साहेबांना कुठल्या पलटणमध्ये जायचे हे ठरवण्याची विशेष सवलत मिळाली आणि त्यांनी त्यांच्या वडिलांनी ज्या पलटणीमध्ये कारकीर्द घडवली होती त्या फर्स्ट मराठा पलटणीत प्रवेश मिळवला! ही पलटण जंगी पलटण म्हणजे लढाऊ पलटण म्हणून ख्यातकीर्त आहे. साहेबांना पहिली नेमणूक मिळाली ती Nagaland मध्ये.

३, सप्टेंबर, १९७०. पंवर साहेबांनी यंग ऑफिसर्स नुकताच पूर्ण केला होता. नागा बंडखोरांनी त्यावेळी तिथे प्रचंड उच्छाद मांडला होता, सैनिकांना कोंडीत पकडून त्यांचा अनन्वित छळ केला होता. आणि याच ठिकाणी पंवर साहेब दाखल झाले होते.

इथे नागा बंडखोर अतिरेक्यांनी भारतीय सैन्याला मुद्दाम त्यांच्या एका प्रशिक्षण शिबिराची माहिती मिळेल अशी व्यवस्था केली… जेणेकरून एकाच वेळी अनेक सैनिक त्यांच्या तावडीत सापडू शकतील!

 त्यावेळी तरुण तडफदार सेकंड लेफ्टनंट पदावर असलेल्या पंवर साहेबांनी या छावणीवर त्यांच्या अगदी जवळ जात हल्ला चढवला. बंडखोर पळून आत जंगलात जाऊन लपले. आपल्या सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला, प्रशिक्षित श्वानांची मदत घेतली… त्यामुळे नागा बंडखोरांच्या मनात भारतीय फौजेविषयी धाक निर्माण झाला! 

 पुढे १९७१ मध्ये पाकिस्तानशी घोषित युद्ध सुरु होण्याआधी साहेबांनी सीमापार घुसत, स्थानिक मुक्ती वाहिनीच्या सदस्यांना हाताशी धरून पाकिस्तानी फौजेवर डोन मोठे छुपे हल्ले चढवले आणि यशस्वी करून दाखवले… पुढे होणार असलेल्या युद्धाची ही एक चुणूकच म्हणावी लागेल… पंवर साहेबांचा आत्मविश्वास एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला होता. इतका का ते मोहिमेवर जाताना चक्क स्वत:चा कॅमेरा घेऊन जात आणि फोटो घेत.

 आपल्याला या वयातच युद्धावर जाण्याची संधी मिळणार आहे, याचा त्यांना खूप अभिमान वाटला होता! अशा अनेक चकमकी सुरु झाल्या. अशाच एका संघर्षात आपल्या सैनिकांनी २३४ पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले… आणि त्यामुळे त्यांचे उर्वरीत सैन्य त्यांच्या कमांडरसह ढाक्यामध्ये पलायन करते झाले! याचवेळी मुक्ती वाहिनीच्या सैनिकांची आणि आपल्या सैनिकांची भेट झाली.. त्यांनी विचारले… दुश्मन किधर है? पंवर साहेब म्हणाले… दुश्मन भाग रहा है! पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि मग पंवर साहेबांना थोडी उसंत मिळाली… तोवर ते कॅप्टन पदी पोहोचले होते. पण लगेचच एक महत्त्वाची जबाबदारी दिली गेली… ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, मद्रास येथे प्रशिक्षक नेमले गेले… इतरांपेक्षा साहेबांचा अनुभव चार-पाच वर्षांनी कमी असला, त्यांचे प्रशिक्षणार्थी त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असले तरी साहेबांनी त्यांच्या दर्जेदार प्रशिक्षण, स्वत: उदाहरण बनून दाखवल्याने त्यांचा कार्यकाल खूप यशस्वी झाला! घोडेस्वारी करता करता खेळला जाणारा अतिशय रोमांचक आणि अवघड खेळ, पोलो या खेळामध्ये कॅप्टन साहेबांना खास गती होती.. त्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले. राष्ट्रपती भवनातल्या घोडदळ दलामध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली. पुढे देशाच्या अनेक भागांत, अनेक जबाबदा-या पार पाडत पाडत साहेब त्रिपुरा मध्ये आसाम रायफल्समध्ये आले.

त्या भागात भारतविरोधी कारवाया खूप मोठ्या प्रमाणात सुरु होत्या. साहेबांनी बंडखोरांना सक्त ताकीद दिली… भारतीय सेनेविरोधात तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाही… हत्यारे खाली ठेवा! 

पुढे Nagaland, मिझोरम मध्ये साहेबांनी उत्तम काम करून दाखवले. मिझोरममधल्या जोराम्थांगा सरकारशी त्यांनी बोलणी केली. जोराम्थांगा हे मुख्यमंत्री होते, जे पूर्वाश्रमीचे सशस्त्र आणि भूमिगत बंडखोर होते. आणि त्यांनी guerrilla युद्धनीतीने भारतीय सैन्याशी संघर्ष केला होता… सुमारे वीस वर्षे. ते पुढे राष्ट्रीय प्रवाहात सामील झाले व राजकरणात येऊन मुख्यमंत्री बनले. पंवर साहेबांनी याच जोराम्थांगा यांना भारतीय सेनेने स्थापन केलेल्या अतिरेकी विरोधी कारवायांना कसे तोंड द्यायचे यासाठी स्थापन केलेल्या सैन्य शैक्षणिक संस्थेत ‘गनिमी कावा’ युद्ध अर्थात guerrilla युद्ध कसे करावे? या विषयावर व्याख्यान द्यायला येण्याचे आमंत्रण देण्याचे धाडस दाखवले होते! 

 पंवर साहेबांनी त्यांचे हे युद्धकौशल्य पुढे अमेरिकन सैन्यातील काही सैनिकांनाही शिकवले… त्यावर त्यांच्या संरक्षणमंत्र्यां प्रशंसोद्गार काढले होते. पुढे भारत-अमेरिका संयुक्त सैन्य सरावात guerrilla warfare आणि पंवर साहेब हे एक समीकरण बनले होते.

 पुढे २००४ वर्ष उजाडले आणि पंवर साहेबांच्या हातून एक मोठे कार्य पार पडण्याचे दिवस आले… नक्षलवाद विरोधी अभियान! साहेबांना छत्तीसगढमध्ये आमंत्रित करण्यात आले. पोलिसांना जंगलात नक्षली बंडखोरांशी नेमके कसे लढावे याचे प्रशिक्षण फारसे नव्हते. साहेबांनी सुरुवातीला १०० पोलिस आणि पुढे आणखी काही पोलिस अधिका-यांना प्रशिक्षित केले. साहेबांच्या सेवानिवृत्तीला त्यावेळी केवळ दोन महिने उरले होते. छत्तीसगढ सरकारने पंवर साहेबांना पोलिसांना प्रशिक्षण देण्याची विनंती केली. त्यावेळी खरंतर साहेबांना कांगो या आफ्रिकी देशात जाण्याची इच्छा होती… पण भारतातही तसेच जंगल आहे आणि आपली इथे खूप गरज आहे, हे त्यांना विनंतीपूर्वक सांगण्यात आले आणि साहेबांच्या आणि नक्षलवाद विरोधी चळवळीला एक नवे वळण प्राप्त झाले… जे खूप महत्त्वाचे ठरले! 

३१ मार्च, २००५ रोजी भारतीय सैन्यातून साहेब निवृत्त झाले… कुटुंबियांना घरी सोडले आणि आणि साहेब रायपूर साठी रवानाही झाले… इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस या पदाची सूत्रे हाती घेतली! आणि त्यांनी पहिला आदेश काढला… नक्षलवाद्यांशी लढायचे ते सैनिकी वेशात… खाकी रंगाचा गणवेश नको… combat uniform वापरायचा! यामुळे पोलिसांच्या आत्मविश्वासाला मोठी झळाळी आली.

मग साहेबांनी प्रशिक्षणासाठी विशेष जागा पाहिजे म्हणून आग्रह धरला. तीन मोठ्या डोंगरांच्या मध्ये असलेली जागा निवडली. जणू ही प्रत्यक्ष युद्धभूमीच होती. नक्षली ज्या वातावरणात राहतात… तसे वातावरण तयार करून घेतले… ते जसे हल्ले चढवतात, तसेच हल्ले आपणही करायचे… एवढेच नव्हे जंगलात सैनिकांसाठी शौचालये किती आकाराची बांधायची, तयार करायची याची मोजमापे ठरवून दिली. आरंभी केवळ शंभर एक एकर जमीन मिळाली होती या कामासाठी… ती विविध प्रयत्न करून तीनशे एकरांवर नेली. वनखात्याची जमीन वापरात आणली. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर संघर्षही केला. विशेष helipad बांधून घेतले… विशिष्ट रुंदीचा रस्ताही बांधून घेतला… या रस्त्याला ELG नाव दिले. याचा full form कित्येक लोकांना लवकर समजला नाही… emergency landing ground! ज्याचा पुढे अनेकांना उपयोग झाला. जखमी सैनिकांना वेगाने रुग्णालयात नेता येऊ लागले. परिसरात ८५ हजार झाडे लावली… जंगल आणखी घनदाट केले. साडेचार महिन्यात जंगल युद्ध प्रशिक्षण केंद्र सुरु झाले. हे भारतातील पहिले प्रशिक्षण केंद्र होते… गनिमी कावा शिकवणारे! 

 प्रशिक्षण अतिशय कडक. कुणी सलग तीन दिवस अनुपस्थित राहिले की त्याने संपूर्ण अभ्यासक्रम पहिल्यापासून पुन्हा करायचा असा दंडक घालून दिला! शारीरिक व्यायाम तर होताच, पण मानसशास्त्रीय कसोट्यासुद्धा घेतल्या गेल्या… स्वत:वर नियंत्रण कसे आणावे, रागावर काबू कसा ठेवावा, कठीण परिस्थितीत निर्णय कसे घ्यायचे याचे वस्तुपाठ घालून दिले साहेबांनी. त्यामध्ये त्यांचा स्वत:चा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या शब्दांना धार आणत होता.

 या प्रशिक्षणातून तयार झालेल्या सर्वांना पोलिस ते सैनिक असा बदल अनुभवाला येऊ लागला. अतिरेक्यांसोबत चकमकी तर होतच होत्या, पण त्यात पोलिसांची हानी लक्षणीयरीत्या कमी होऊ लागली, बहादुरी गाजवणा-या पोलिसांना पदके प्रदान केली जाऊ लागली. या भागात नेमणूक म्हणजे शिक्षा हा समज हळूहळू कमी होऊ लागला.

 पंवर साहेबांनी मार्गदर्शन करावे अशी विनंती मग झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार इत्यादी दहा राज्यांनी केली.. साहेबांच्या मार्गदर्शनात त्यांनी आपापल्या पद्धती विकसित केल्या. पूर्वी नक्षली अतिरेकाविरोधात भारतीय सैन्य बोलवावे, त्यांची मदत घ्यावी अशी मागणी होत असे. आता सैन्यासारखीच क्षमता पोलिसांमध्येही ब-याच प्रमाणात आल्याने तशी फारशी वेळ आली नाही… पोलिसांचे रुपांतर सैनिकांत होऊ लागले होते… पंवर साहेब या कार्यात थोडीथोडकी नव्हेत… अठरा वर्षे सक्रीय राहिले! सैन्यातील प्रत्यक्ष सेवा आणि नंतरची ही सेवा मिळून साहेबांनी किमान पन्नास वर्षे देशसेवा बजावली. यावर्षी नक्षलवादी सशस्त्र संघर्ष जवळपास संपुष्टात आल्याची चिन्हे आहेत… येत्या काळात सर्वच नक्षलवादी मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होतील.. अशी आशा आहे. पण ही प्रक्रिया कित्येक वर्षांपूर्वी सुरु झाली होती… त्यात ब्रिगेडीअर बसंत पंवर (पन्वर) या महान योध्याच्या कार्यकुशलतेचा, नियोजन, नेतृत्व आणि मुख्य देशसेवेच्या अपार इच्छाशक्तीचा सिंहाचा वाटा होता… हे काळाला मान्यच करावे लागेल! 

आपल्याकडे महान माणसांची महती त्यांच्या मृत्यूनंतरच सामान्य लोकांना समजते… ब्रिगेडीअर साहेबांचेही काही निराळे झाले नाही… १ फेब्रुवारी, २०२३ रोजी साहेबांनी या दीर्घ सेवेतून निवृत्ती घेतली… कारण मिशन पूर्ण झाले होते! शरीराला आरामाची आवश्यकता होतीच… शिवाय कुटुंब आता वाट पहात होते… २०११ मध्ये अर्धांगिनी स्वर्गवासी झाल्या होत्या. दोन सुपुत्र तर सेनेत अधिकारी बनून सीमेवर सेवा करीत होतेच. त्यामुळे तेही फारसे घरी नसत. पण आई वाट पहात होती. त्या बिचारीने ७१ च्या लढाईतून आपला पोर सहीसलामत परत यावा यासाठी देवाला साकडे घातले असेल… पोरगं लढत राहिले पुढची कित्येक वर्षे. साहेबांनी २०२३ मध्ये २७ फेब्रुवारीला अत्यंत वृद्ध झालेल्या आईच्या गळ्यात हार घातला… आणि चरणस्पर्श केला! आई… मी घरी आलो आहे… सुरक्षित! 

 साहेबांना विशिष्ट सेवा मेडल तर मिळाले होतेच… पुढे अति विशिष्ट सेवा मेडलही तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांच्या हस्ते दिले गेले… त्याही वयात साहेबांनी उत्कृष्ट परेड चाल म्हणजे विशिष्ट सैनिकी पद्धतीने चालत जात राष्ट्रपती महोदयांना अभिवादन केले होते! 

७७ वर्षे, ४ महिने आणि २४ दिवसांच्या देदीप्यमान आयुष्यानंतर २७ जुलै, २०२६ रोजी ब्रिगेडीअर बसंत पंवर साहेबांनी या जगाचा निरोप घेतला… हाती घेतलेलं कार्य तडीस नेले… असे सैन्याधिकारी देशाला लाभले हे आपले मोठेच सुदैव. साहेबांना करावे तेवढे अभिवादन कमीच पडेल! Maratha Light Infantry मधून सैनिकी जीवन सुरु करणा-या या महान सैनिकाने बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय! हा जयजयकार खरा करून दाखवत शिवरायांची युद्धनीती जगून दाखवली आणि 37 हजार जवानांना शिकवली सुद्धा! Fight a guerrilla like a guerrilla पोलिसांतून कमांडो निर्माण करणारे ब्रिगेडीअर पंवर साहेब आपले भूषण आहेत. जय हिंद.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९१ आणि ९२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९१ आणि ९२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ९१ – – 

नको वीट मानू रघुनायेकाचा ।

अती आदरे बोलिजे राम वाचा ।

न वेचे मुखी सापडे रे फुकाचा ।

करी घोष त्या जानकीवल्लभाचा ।।९१।।

अर्थ : समर्थ मनाला उपदेश करताना म्हणतात, ” हे मना, भगवंताच्या नामाचा कंटाळा (वीट) येऊ देऊ नकोस. आपल्या मुखाने अत्यंत आदरपूर्वक रामाचे नाव घे. त्यासाठी एक पैसा देखील खर्च करावा लागत नाही. जानकीला म्हणजे सीतेला अत्यंत प्रिय असलेल्या अशा त्या श्रीरामांच्या नामाचा सतत घोष कर.

(वाचा – मुखाने, न वेचे – खर्च करावे लागत नाही)

विवेचन :  मनामाचे महत्वच या ठिकाणी अधोरेखित करताना समर्थ म्हणतात की हे मना, राघवाच्या नामाचा म्हणजे ते नाम घेण्याचा मुळीच कंटाळा करू नकोस. सामान्य माणसांची मानसिकता समर्थ जाणून आहेत. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली तरी आपल्याला कंटाळा येतो. भगवंत हा तर निर्गुण, निराकार. काही काळ हे नाम घेतल्यानंतर त्याचा काही अनुभव जेव्हा मिळत नाही, तेव्हा सामान्य माणूस ती गोष्ट सोडून देतो. आपण दृश्य जगात जास्त अडकतो. ध्यान करायला बसलो तर डोक्यात नाना विचार येतात. चित्त एकाग्र होत नाही. एखादे उत्तम पुस्तक वाचण्यापेक्षा आपल्याला टीव्ही पाहायला, मोबाईल बघायला जास्त आवडते. दृश्याकडे आपली धाव जास्त असते. तसा अनुभव नामात मिळायला दीर्घ काळ जावा लागतो. नामाची साधना न कंटाळता सातत्याने निश्चयपूर्वक सुरु ठेवावी लागते. हे नामच मला तारून नेईल. या जन्मी जरी मला भगवंताची प्राप्ती झाली नाही तरी पुढील जन्मी का होईना पण ती होईल. परंतु मी भगवंताचे नाम घेणे सोडणार नाही असा निर्धार हवा. ज्याला भगवंत हवा आहे, त्याला श्रद्धेने भगवंताचे नाम अखंड मुखात यायलाच हवे.

ते नाम किती सोपे आहे! त्यासाठी काही खर्च करावा लागत नाही. भगवंत प्राप्तीचे इतरही मार्ग आहेत. काही मार्गात कठोर तपश्चर्या करावी लागते, तर कोठे तीर्थयात्रा, यज्ञयागादी गोष्टींसाठी भरपूर पैसा लागतो. नामासाठी या कोणत्याच गोष्टी लागत नाहीत. बसल्याजागी काम करताना देखील हरिनामाचा जप करता येतो. म्हणूनच भगवंत प्राप्तीचा हा सोपा मार्ग समर्थ आपल्याला सांगतात. या मार्गाने भगवंत विनासायास प्राप्त होतो. आपण हल्ली प्रत्येक गोष्टीसाठी शॉर्टकट शोधत असतो. भगवंत प्राप्तीसाठी ‘ नाम ‘ हाच शॉर्टकट समजायला हरकत नाही. संत सोयराबाई म्हणतात, ” सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. ” सर्व संतांचे हेच सांगणे आहे. शब्द वेगळे असतील पण सांगण्यात एकवाक्यता आहे.

समर्थांनी या श्लोकात श्रीरामाच्या एका लोकप्रिय नामाचा उल्लेख केला आहे. ‘ जानकीवल्लभ ‘ हे ते नाम! सीता जनक राजाची कन्या म्हणून जानकी. जानकीला फक्त एकच गोष्ट प्रिय आहे. ती म्हणजे श्रीराम!अशा या सीतामातेला जो प्रिय आहे, तो श्रीराम आपल्यालाही प्रिय व्हावा. त्याचेच नाम आपल्या मुखात सातत्याने यावे असे समर्थाना वाटते. ज्यांनीं ज्यांनी त्याचे नाम घेतले ते हा भवसागर तरून गेले. त्यानेच आपले कल्याण होईल. “अच्युतम केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं।” या मंत्रातला गोडवा जो प्रेमाने आणि आदराने ते नाम घेईल, त्यालाच कळेल. गोंदवलेकर महाराज रामनामात पेढ्यासारखी गोडी आहे असे म्हणतात. पण पेढा गोड आहे असे नुसते म्हटले तर त्याची गोडी थोडीच जिभेवर येते? त्यासाठी तो खाऊनच पाहावा लागतो. पेढ्याचा कोणताही तुकडा खाल्ला तरी तो गोडच लागणार. तसेच भगवंताचे नाम आहे. त्याचे कोणतेही नाम गोडच आहे. ‘ केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा. ‘अनुभवून तर बघा!

स्वसंवाद :: 

१. मोबाईल किंवा टीव्ही तासनतास बघताना मला कंटाळा येत नाही, मग विनामूल्य असणारे रामनाम घेताना माझ्या मनाला ‘वीट’ (कंटाळा) का येतो?

२. “नामस्मरण हाच भवसागर तरून जाण्याचा सर्वात सोपा आणि विनासायास मिळणारा शॉर्टकट आहे, ” या संतांच्या वचनावर माझा दृढ विश्वास बसला आहे का?

३. जानकीवल्लभ श्रीरामांचे नाम केवळ ओठांवरून उच्चारण्याऐवजी, मी कधी पेढ्यासारखी त्याची आंतरिक गोडी अनुभवण्याचा प्रयत्न केला आहे का?

४. संत चोखोबांनी म्हटल्याप्रमाणे, मी माझ्या रोजच्या कामाच्या व्यापातून किती वेळ ‘आवडीने आणि आदराने’ त्या विठोबाचे किंवा राघवाचे नाव घेण्यासाठी काढतो?

=====

श्लोक क्र. ९२ – – 

अती आदरे सर्व ही नामघोषे ।

गिरीकंदरे जाइजे दुरि दोषे ।

हरी तिष्ठतु तोषला नामतोषे ।

विशेषे हरा मानसी रामपीसे ।। ९२ ।।

अर्थ : भगवंताच्या नामाबद्दल अत्यंत आदर बाळगून जो कोणी त्याचे नामस्मरण करतो, त्याचे सर्व दोष दूर गिरिकंदरी म्हणजे लांब निघून जातात. ज्या ठिकाणी आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक भगवंतांचे नामस्मरण सुरु असते, तिथे भगवंत अत्यंत संतुष्ट होऊन वास्तव्य करीत असतो. भगवान शंकरांना रामनामाचे विशेष वेड लागले आहे (आणि ते सतत त्याचे नामस्मरण करीत असतात)

(गिरिकंदरी – पर्वतांमधील गुहेत, तिष्ठतु – थांबून राहतो, तोषणे – संतोष/आनंद होणे, पिसे – वेड)

विवेचन : भगवंताचे नाम सर्व दोष हरण करणारे आहे. म्हणून भगवंताच्या नामाचे माहात्म्य स्पष्ट करताना समर्थ म्हणतात की जो कोणी भगवंताचे आदरपूर्वक नामस्मरण करतो त्याचे दोष दूर म्हणजे गिरिकंदरी निघून जातात. आधीच्या श्लोकात आपण पाहिले की समर्थ भोजन प्रसंगी आपल्याला भगवंताचे नाम मोठ्याने गजर करून आदरपूर्वक म्हणायला सांगतात. या श्लोकात ते भगवंताचे नाम आपल्याला मोठ्याने उच्चारून म्हणायला सांगतात. मोठ्याने म्हणणे म्हणजे वैखरीने म्हणणे. आधी सुरुवात वैखरीपासून करावी लागते. मग ते नाम क्रमाक्रमाने मध्यमा, पश्यन्ती या वाणींच्या प्रकारांमार्फत परा वाणीपर्यंत पोहोचते. बऱ्याच वेळा मनातल्या मनात नामजप सुरु असतो. पण त्यावेळी मन दुसरीकडे कुठेतरी असते. म्हणजे मानसिक जपात यांत्रिकता येण्याचा संभव असतो. मुखाने हे नाम उच्चारले तर आपले लक्ष त्या नामाकडे राहते. आपल्या भोवती असणाऱ्या इतर लोकांच्या कानावरही हे नाम आपोआप पडते.

भगवंताचे नाम घेण्यासाठी दूर कुठे गिरिकंदरात जावे लागत नाही. आपण त्याचे नाम घेऊ लागलो की आपल्यातील दोषच दूर गिरिकंदरात निघून जातात. जिथे नाम आहे तिथे दोष राहणे शक्य नाही. जिथे उजेड आहे, तिथे अंधार कसा राहील? तुकाराम महाराज सुद्धा नामाचे महत्व सांगताना म्हणतात

नामसंकीर्तन साधन पैं सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ॥

न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥

ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥

रामकृष्णहरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वदा ॥

– – श्लोकाच्या तिसऱ्या ओळीत समर्थ आपल्याला परमेश्वराचे वास्तव्य नेमके कुठे असते हे सांगतात. जिथे परमेश्वराचे नामस्मरण, गुणगान आदरपूर्वक किंवा मोठया प्रेमाने चाललेले असते, तिथे तो स्वतःच उपस्थित असतो. त्याला शोधण्यासाठी कुठे दुसरीकडे जावे लागत नाही. आपल्याजवळच तो सदैव उभा असतो. वरील अभंगात तुकाराम महाराजांनी पण हेच सांगितले आहे. गोंदवलेकर महाराज सुद्धा ‘ जेथे नाम तेथे माझे प्राण ‘ असे म्हणतात.

नाम घेणे हे वरवर सोपे वाटते. गोंदवलेकर महाराजांचे ३६५ दिवसांच्या प्रवचनाचे एक पुस्तक आहे. यातील प्रत्येक प्रवचनात गोंदवलेकर महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळी उदाहरणे देऊन नामाचा महिमा आपल्याला पटवून दिला आहे. त्यामुळे नाम घेणे सोपे आहे, त्यात विशेष ते काय असे आपल्याला वाटते? पण जी गोष्ट ऐकायला सोपी वाटते, ती करायला तेवढीच कठीण असते. कारण ती करण्यासाठी निर्धाराची गरज असते. आपण कमी पडतो ते इथेच! रामनामाचे किंवा भगवंताच्या नामाचे वेड लागले पाहिजे. ज्यांना एखाद्या गोष्टीचे वेड लागते, असेच लोक जीवनात काही करून दाखवतात. इथे समर्थ आपल्याला पुन्हा भगवान शंकरांचे उदाहरण देतात. त्यांना रामनामाचे पिसे म्हणजे वेड लागले आहे असे समर्थ म्हणतात. भगवान शंकर एवढे देवाधिदेव. परंतु ते देखील रामनाम जपत असतात. त्याचे महत्व वारंवार माता पार्वतीला समजावून सांगत असतात.  

रामाची भूपाळी गाताना समर्थ म्हणतात…

उठोनिया प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।

स्वये ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥

भाविक जनहो, प्रातःकाळी उठून रामनामाचे स्मरण करा. तो चंद्रमौळी म्हणजे स्वतः शिवशंकर देखील शैलपुत्रीसह म्हणजे माता पार्वतीसोबत श्रीरामांचे ध्यान करतो.  

स्वसंवाद :: 

१. मी माझे दोष दूर करण्यासाठी किंवा शांती मिळवण्यासाठी बाह्य साधनांमागे धावतो आहे, की माझ्याच अंतरी रामनामाचा उजेड पाडून अंधार दूर करण्याचा प्रयत्न करतोय?

२. मनातल्या मनात नाम घेताना माझे मन संसाराच्या चिंतेत ‘यांत्रिकपणे’ भटकत राहते का? माझ्या नामात आदर आणि एकाग्रता आणण्यासाठी मी काय करायला हवे?

३. गोंदवलेकर महाराजांच्या वचनानुसार, “जेथे नाम तेथे माझे प्राण” यावर माझा विश्वास आहे का?

४. भूपाळीत म्हटल्याप्रमाणे जर प्रत्यक्ष चंद्रमौळी शिवशंकर शैलबाळीसमवेत उठोनिया प्रातःकाळी रामनाम जपत असतील, तर मग माझ्या दिवसाची सुरुवात मी रामनामाने करतो का?

– क्रमशः श्लोक ९१ आणि ९२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ग्रंथालयाचे मनोगत” ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “ग्रंथालयाचे मनोगत” – लेख क्र. १७ ☆ प्रा.भारती जोगी ☆

” मुसळधार पाऊस बघतीयेस ना खिडकीतून… मग असाच साहित्य-संस्कृतीचा ही अखंड पाऊस आहे. आत.. प्रवेश करून पहा की जरा! 

हात लांबव, काढ त्या कपाटातील पुस्तकं, झटक त्यांची धूळ, फिरव त्यावर पारखी नजर, आणि मग…

 पहा त्या सगळ्यांची आठवण येते का?

 पैस, शेला, मृद्गंध, विशाखा,

 व. पु, पुल अन् अत्रे,

 आंबेडकरांचे ‘राजगृह‘, अन् सावरकरांच्या कविता!

दुर्बोध ग्रेस, अन् सुबोध बहिणाबाई

. .. शांताबाईंच्या शब्द खुणा अन् महानोरांची हिरवी बोली.

प्राचीन ग्रंथांचा सांस्कृतिक ठेवा, धार्मिक, सामाजिक, पौराणिक वारसा…

 हे सगळं आणि अशी कितीतरी अफाट, अमाप, अगणित मेळविलेली अक्षरे डोळ्यांनी प्यायलीस ना आजवर… पोहोचवलीस, उतरवलीस ना थेट हृदयांतरी!….

मग… आता…

 माझ्या जिरत्या पानांशी तुझी कां न उरली मैत्री?

कां दिवसेंदिवस आम्ही ओस पडत चाललो आहोत. बंद पडायच्या वाटेवर आहोत? अगं, काय सांगू…

“ग्रंथालयातील पुस्तकांचा श्वास रोज येतो कंठी

वाचकहो, तुमच्या साठी, वाचकहो तुमच्या साठी!

मान्य आहे गं मला, आज काळ बदलला. डिजिटल युग आलं. E Book चा जमाना आला. ग्रंथालयातील पुस्तके भ्रमण ध्वनीत एका टचवर मागे पुढे होऊ लागली. किंडल मध्ये नव्या रूपात, नव्या परिवेषात उभी राहिली. पण तुम्ही लोक एक महत्वाची गोष्ट विसरता की, आज माहितीचा प्रचंड स्फोट झालेल्या या युगात… मीच… म्हणजे ग्रंथालयच सत्य आणि असत्य यामधील फरक ओळखून योग्य माहिती मिळविण्याचे योग्य आणि विश्वसनीय साधन आहे. ग्रंथालय हे फक्त पुस्तक घर नसून ते एक संस्कार केंद्र आहे. विचारांची देवाणघेवाण, चिंतन, मनन, सर्जनशीलतेला चालना देणारे आलय आहे.

पुस्तके ही ज्ञानाचा अथांग सागर आहे आणि ग्रंथालय हे त्यांचे बंदर आहे.

हे विसरू नकोस ना! 

माझ्या पुस्तकांनी काळानुरूप झालेला बदल ही स्विकारलायं ना… मग तुम्ही ही एक लक्षात घेतले पाहिजे की…

ग्रंथालयांच्या मदतीने, पुस्तकांच्या सहवासात, शांत, स्थिर वातावरणात मानसिक समाधान मिळवत… तुम्ही ग्रंथालय- पुस्तके-वाचक… हे अ-क्षर नाते जपा. कारण Byte मधले शून्य ही तेच, अन् एकेरीचे आखर ही तेच! 

म्हणून ग्रंथालये ही वाचनालये कशी बनतील आणि ‘e’ च्या नव्या वेषात ही आपली भेट ग्रेट कशी होईल हा प्रयत्न करू यात! चल बराच वेळ झाला, येतीयेस ना माझ्या पाठोपाठ, पुस्तकांच्या दुनियेत! 

 आ चल, के तुझे मैं लेके चलूं, एक ऐसे गगन के तले, जहां गम भी ना हो, आंसूं भी ना हो, बस् प्यार और सच्चा ज्ञान ही पले!!!  .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हेही एक सर्वोच्च शिखरच – – –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆

श्री अमोल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हेही एक सर्वोच्च शिखरच – – –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆

नदाव बन येहूदा 

आजच व्हॉटसअप वरती एक पोस्ट वाचनात आली. इस्राएलचा चोवीस वर्षीय युवा गिर्यारोहक नदाव बन येहूदा ह्याने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट अर्थात सागरमाथा सर करायला फक्त तीनशे मीटर बाकी राहीले असताना देखील शिखर सर करण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि तरीही आज जगात ही बातमी वाचलेल्या सर्वांच्या कौतुकाचा विषय तो बनून राहिला असेल हे नि:संशय.

कारण नदावने दुसऱ्या एका गिर्यारोहकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या वैयक्तिक विक्रम, कीर्ती, उपलब्धि ह्या गोष्टीना दुय्यम स्थान देत मूल्य आणि मूल्य संस्कार ह्याना श्रेष्ठ मानत “योग्य” गोष्ट केली.

त्याच्याच शब्दात सांगायचे तर “एव्हरेस्ट वरील माझ्या चढाई च्या मार्गात मला दोन मृतदेह दिसले की जे गिर्यारोहक नुकतेच मृत झाले असावेत. मी ज्या दोराच्या आधाराने चढत होतो त्यालाच ते लटकलेले होते. अंगातील त्राण संपल्यामुळे आहे तिथेच स्वतःला anchor करून ते तिथे थांबले आणि कदाचित कोमात जाऊन मृत झाले. त्यांना पार करून सर्व पुढे जात होते. आणि नंतर मला तो दिसला – तुर्कस्तानचा आयदिन इरमाक. आम्ही खाली कॅम्प मध्ये भेटलो होतो आणि आता तो हेल्मेट नाही, ऑक्सिजन मास्क नाही, ग्लोव्हज नाहीत अशा परिस्थितीत शेवट होण्याची वाट पहात होता. इतर काही गिर्यारोहक त्याकडे दुर्लक्ष करून पुढे गेले. मात्र मी दुर्लक्ष करू शकलो नाही, आणि मी वैयक्तिक विक्रम आणि दुसऱ्या एका मनुष्याचे प्राण ह्यात दुसऱ्या गोष्टीची निवड केली. “

नदावने हा निर्णय घेतला खरा; पण तो अमलात आणणे हे तितकेच कठीण काम होते. बेशुद्ध पडलेल्या आयदिन ला उचलून खाली आणणे कर्मकठीण होते कारण त्याचे आणि स्वत:चे दोघांचे ओझे सांभाळत उतरायचे होते. आयदिन बेशुद्ध असल्यामुळे जास्त भारी वजनाचा भासत होता. अधून मधून त्याला शुद्ध यायची पण त्यात तो वेदना असह्य होऊन ओरडायचा. अशा परिस्थितीत खाली येताना नदाव चा स्वतः चा ऑक्सिजन मास्क फाटला. ग्लोव्हज काढावे लागले. त्यामुळे त्याला स्वतः ला बोटाना हिमदंश झाला. वाटेत त्याला अजून एक मलेशियन गिर्यारोहक भेटला की जो सुद्धा मरण्याच्या मार्गावर होता. वर जाणाऱ्या काही climbers कडून नदाव ने त्या दोन अत्यवस्थ climbers साठी ऑक्सिजन सिलिंडर मिळवली आणि नऊ तासांच्या भगीरथ यत्नानंतर त्या दोघांना घेऊन कॅम्प पर्यंत पोचण्यात तो यशस्वी झाला. तेथून हेलिकॉप्टरने त्यांना काठमांडू येथे नेऊन इस्पितळात दाखल केले आणि उपचार सुरू झाले. दोन जीव वाचवण्यात नदाव यशस्वी झाला.

जीवनात काही असे परीक्षेचे क्षण येतात जिथे तुम्ही कशा प्रकारचे मनुष्य आहात, तुमची मूल्य व्यवस्था कशी आहे आणि त्या मूल्यांसाठी तुम्ही किती मोठा त्याग करू शकता वा किंमत देऊ शकता हे स्वतः शीच नक्की करावं लागतं. अशा परीक्षेच्या क्षणी नदाव ने, एव्हरेस्ट सर करणारा सर्वात कमी वयाचा इस्रायली गिर्यारोहक ह्या सन्मान व कीर्तीचा त्याग करत मानवतेच्या सर्वोच्च मूल्याला प्राथमिकता दिली आणि जगासाठी एक धडा दिला. गिर्यारोहणाच्या धाडसी खेळातील अत्युच्च मूल्य ओळखून त्याप्रमाणे वागत एक अनोखे धैर्य दाखवले.

एकीकडे मानसन्मान, वैयक्तिक महत्वाकांक्षेची पूर्तता, सर्वोच्च शिखर सर करण्याची वैयक्तिक स्वप्नपूर्ती हे सारे आणि दुसरीकडे दुसऱ्या मनुष्याचा जीव वाचवण्याचा अशक्यप्राय प्रयत्न ज्यात वरील मानसन्मान, कीर्ती, स्वप्नपूर्ती, महत्त्वाकांक्षा पूर्ती ह्या गोष्टींच्या त्यागावरोबरच एक अजून भयंकर शक्यता होती आणि ती म्हणजे स्वतः चा जीव गमावण्याची. पण नदाव नियतीने पुढे वाढून ठेवलेल्या अती कठीण परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि with flying colors he passed.

आज भले नदावला सागरमाथा सर करता आला असेल. भविष्यात तो हे लक्ष्य गाठेल किंवा नाही गाठू शकणार. मात्र तो कायम स्वतः ला ताठ मानेने आरशात बघू शकेल, त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना डोळ्याला डोळा भिडवून भेटू शकेल आणि दुसऱ्याचा जीव वाचवण्याचे जे अलौकिक समाधान आहे ते कायम त्याच्या उराशी असेल.

आज सागरमाथा सर न करता सुद्धा, नदाव बन येहुदा सर्व जगातील लोकांच्या मनात सर्वोच्च शिखरावर विराजमान झाला असेल ह्यात शंका नाही.

लेखक : मनीष मोहिले

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares