मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ थेट फोनच हॅक होतोय? हे करा… ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ थेट फोनच हॅक होतोय? हे करा…  ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

व्हाट्स अप अथवा थेट फोनच हॅक होतोय?

– – हे सेटिंग करून घ्या… सुरक्षित राहा

परवाच एका मित्राचा एकदम घाबऱ्याघुबऱ्या आवाजात कॉल आला की, “डीडी, मला संशय आहे की माझ व्हाट्स अप हॅक झालं असावं. “

मी त्याला त्याची कारणे विचारली तेव्हा कळलं की काही संशयास्पद असं त्याला जाणवत आहे. त्याला आधी शांत बोलून रिलॅक्स केले आणि त्याला जो उपाय सांगितला… तोच तुम्हाला इथं सांगतोय. न जाणो तुम्हाला पण याची भविष्यात गरज पडू शकते.

तर भविष्यातला “उद्याचा” धोका तुम्ही “आजच” कायमचा रोखू शकता.

तर यासाठी काय करायचे??

फार सोपी प्रोसिजर आहे!

  1. तुमच्या whats app वर जा
  2. तिथं उजव्या बाजूला तीन डॉट्स असतात तिथं जाऊन त्यात सेटिंग्जवर जा, त्याला क्लिक करा.
  3. तिथं गेल्यावर “Privacy” वर क्लिक करा
  4. त्यानंतर तिथं थोडं खाली जाऊन स्क्रोल करत “Advanced” हे ऑप्शन पहा आणि त्यावर क्लिक करा.
  5. तिथं आल्यावर तिथं दोन ऑप्शन दिसतील. “Protect IP address in calls” आणि “Disable link previews” तर या दोन्हीला क्लिक करा. म्हणजे ऑन करा.

त्यानंतर बॅक बॅक करत बाहेर या.

झालं तुमचं सेटिंग ओके!!

एकदा का तुम्ही हे केल्यावर, हॅकर्स तुमचे फोन हॅक करू शकत नाहीत कारण तुमचा IP address आता संरक्षित आहे. एकदा तुम्ही तुमचा आयपी ऍड्रेस व्हॉट्सॲपमध्ये सुरक्षित केला की, तुमचे व्हॉट्सॲप तसेच व्हाट्स अप च्या माध्यमातून फोनही हॅक होण्याची शक्यता बरीच कमी होते.

तेव्हा मंडळी… सावध राहा…. सुरक्षित राहा!

डॉ. डीडी नोट : अर्थात या सेटिंग नंतर एक थोडी अडचण होऊ शकते ती म्हणजे तुम्ही पूर्वी एखाद्याला एखादे रीळ / व्हिडीओ / पोस्ट पाठवत असायचा तेव्हा समोरच्याला त्याचा प्रिव्हयु दिसायचा. आता हे सेटिंग केल्यावर कदाचित दिसणार नाही! फक्त लिंक जाईल. आणि समोरच्याने त्यावर क्लिक केलं की फाईल ओपन होईल!

मात्र त्याला इलाज नाही!

कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है न! सिक्युरिटी चाहिये….. तो प्रिव्हयु नही मिलेगा! सोचो अब…. सिक्युरिटी मेन है या प्रिव्हयु?

*

एक कळकळीची विनंती : तुम्ही पण हे सगळं तुमच्या सर्कलमध्ये व्हायरल करत जा! ते लोकही सुरक्षित होतील आणि तुम्हाला त्यातून नकळत ते लोक थँक्स देतील!!

—

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ९ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ९ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

(आज नवव्या म्हणजेच शेवटच्या भागात, सर्वात मोठ्या लोकशाहीचे स्तंभ झालेल्या दुर्गा, घेऊन नवरात्रीची सांगता करते.)

– – पहिल्या निवडणुकीत निवडून आलेल्या, खासदार झालेल्या १५ महिला होत्या व आमदार झालेल्या १३ महिला होत्या.

पहिली महिला पंतप्रधान —-इंदिरा गांधी(या काळात त्यांनी स्वतःकडे बरीच खाती घेतली होती, काही अल्प काळा साठी होती, त्या मंत्री पदांसाठी त्यांना पहिली महिला धरलेले नाही.)

पहिली महिला 

राष्ट्रपती —– प्रतिभा पाटील

राज्यपाल—– सरोजिनी नायडू

लोकसभा अध्यक्ष—मीरा कुमार

गृहमंत्री —— उमा दीक्षित

संरक्षण मंत्री —— निर्मला सीतारमण

रेल्वे मंत्री —– ममता बॅनर्जी 

परराष्ट्र मंत्री—- सुषमा स्वराज

शिक्षण मंत्री—– शीला कौल

आरोग्य मंत्री—- राजकुमारी अमृता कौर 

वित्त मंत्री ——- निर्मला सीतारमण

– – पण अर्थसंकल्प संसदेत सादर करणारी पहिली महिला इंदिरा गांधी. (अल्प काळ वित्तमंत्री असताना १९७० ला त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.)

राज्यसभा अध्यक्ष —– मार्ग्रेट अल्वा

मुख्य निवडणुक आयुक्त—- व्ही. एस. रमादेवी 

१९३८ साली राज्यपरिषदेसाठी निवडली गेलेली महिला राधाबाई सुबारायन

राज्यवार पहिल्या महिला मुख्यमंत्री

उत्तर प्रदेश. सुचेता कृपलानी

ओरिसा. नंदिनी सतपथी 

गोवा. शशिकला काकोडकर

आसाम. सैय्यदा तैमूर 

तमिळनाडू. व्ही. एन्. जानकी रामचंद्रन 

(या अल्पकाळ होत्या पण लगेच जयललिता मुख्यमंत्री झाल्या व बरीच वर्षे राहिल्या.)

पंजाब. राजिंदर कौर 

बिहार. राबडीदेवी 

दिल्ली.. सुषमा स्वराज 

(या अल्पकाळ होत्या पण नंतर बरीच वर्षे शीला दीक्षित मुख्यमंत्री राहिल्या.)

मध्यप्रदेश उमा भारती

राजस्थान. वसुंधरा राजे शिंदे 

पश्चिम बंगाल. ममता बॅनर्जी 

गुजरात. आनंदीबेन पटेल 

जम्मू काश्मीर. मेहबूबा मुफ्ती 

— 

यूपीएससी अध्यक्ष रोज मिलियन बैथ्यू

यू. एन. ओ सभापती. विजयालक्ष्मी पंडित

आय. ए. एस. अन्ना जाॅर्ज मल्होत्रा

आय. पी. एस.. किरण बेदी

आणखी दोन महत्त्वाच्या महिला – 

कर्नेलिया सोराबजी —१८९२ ला ऑक्सफर्ड मधून लाॅ करणारी पहिली भारतीय महिला, १८९९ ला मुंबई विद्यापीठातून लाॅ करणारी पहिली महिला, महिलांना परवानगी नसल्याने शिक्षण घेण्यासाठी भांडावे लागले, पण महिलांना वकिली करण्याची परवानगी १९२४ ला मिळाली.

उच्च न्यायालयात खटला लढवणारी (१९४४)पहिली महिला, वायलेट अल्वा.

पहिली शाळा शिक्षिका सावित्रीबाई फुले — 

पण त्याआधी गुरुकुलात शिकविणाऱ्या शिक्षिका : या अत्यंत बुद्धिमान महिलेचे नांव ‘ होती विद्यालंकार ‘. तिला विद्यालंकार ही पदवी बहाल केली होती. (१७६०च्या दरम्यान) (तिचे ‘होती’ हे नाव चुकीचे असावे‌ काय ही शंका येते)

— लेखमाला समाप्त —

☆

संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ८ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ८ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

आजच्या आठव्या भागात गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपल्या नावाची नोंद करणाऱ्या दुर्गा

१) ज्योती आमगे – वजन आणि उंची सर्वात कमी .. म्हणजे अपवादात्मक असणारी मुलगी .. ह्या नागपूरच्या मुलीने 18 वर्षाची असताना हा विक्रम नोंदवला. त्यावेळी तिचे वजन 11.2 पाउंड होते व उंची 24.7 इंच होती.

२) कलामंडलम हेमलता —  या केरळच्या महिलेने सहा जानेवारी २०११ रोजी  मोहिनीअट्टम या प्रकारचे नृत्य १२३ तास १५ मिनिटे सलग सादर केले. (सिंगल डान्स मॅरेथॉन)

३) ताशी व नुंगशी मलिक — डेहराडून मधील या जुळ्या बहिणींनी वयाच्या 23 व्या वर्षी एव्हरेस्ट सर केले, सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर केली, व उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर स्कीईंग केले.

अशाप्रकारे एक्सप्लोरर्स ग्रँड स्लॅम व थ्री पोल्स चॅलेंज पूर्ण करून ग्रीनिज बुक मध्ये स्थान पटकावले.

४) कल्पना बालन–तामिळनाडूची ही सर्वात जास्त  म्हणजे ३८ दात असणारी एकमेव महिला ठरली.

५) प्रीती मस्के –ही पुण्याची असून २२ दिवसात सुवर्ण चतुर्भुजावर सायकल चालवणारी वेगवान महिला ठरली… (सुवर्ण चतुर्भुज म्हणजे दिल्ली ते कोलकत्ता ते मुंबई ते चेन्नई ते दिल्ली असा महामार्गाचा चौकोन एकूण ६०००कि.मी. चा)

६) मिशेल काकडे–४७ वर्षीय पुण्याच्या महिलेने सुवर्ण चतुर्भुज पायी चालत १९३ दिवस १ तास ९ मिनिटात सर्वात जलद पूर्ण केला.

७) सुफिया सुफी— दिल्लीच्या या महिलेच्या नावावर बरीच रेकॉर्ड्स आहेत. 

     १.सुवर्ण चतुर्भुज धावत तिने ११० दिवस २३ तास २४ मिनिटात पूर्ण केला. 

     २.काश्मीर ते कन्याकुमारी सर्वात जलद ८७ दिवस २ तास १७ मिनिटात धावली. 

     ३.२०१८ या एका कॅलेंडर वर्षात सगळ्यात जास्त अंतर मॅरेथॉन पळाली. 

     ४.मनाली ते लेह पायी ४८५ किमी अंतर ६ दिवस १२ तास ६ मिनिटात पूर्ण केले. 

     ५.उत्तर ते दक्षिण (ॲक्रॉस कतार) २०० किलोमीटर अंतर ३० तास ३१ मिनिटात पूर्ण केले.

८) आलिया सिद्दिकी –चेन्नईच्या या सोळा वर्षीय महिलेने ४ मिनिट ४७ सेकंदात अबॅकस गणित सोडवण्याचा विक्रम केला.

९) श्रेया देशपांडे— या पाच वर्षाच्या मुलीने २७ कार्सच्या खालून,  ४८.२  मीटर अंतर स्केटिंग करत पार केले.

१०) लता टंडन-– मध्य प्रदेशातील रेवा येथील पाक कुशल महिलेने न थांबता ८७ तास ४५ मिनिटे खाद्य पदार्थ बनविले.

११) स्मिता श्रीवास्तव –प्रयागराज च्या या महिलेने सगळ्यात लांब केस असण्याचा विक्रम केला आहे. तिच्या केसांची लांबी ७ फूट ९ इंच आहे. १४ वर्षाची असल्यापासून ४६ वर्षाची होईपर्यंत तिने एकदाही केस कापले नाहीत.

१२) लैबा बासित— या बारा वर्षाच्या लेखिकेने ‘order of the galaxy’ हे पुस्तक सलग तीन भागात प्रकाशित करून सर्वात तरुण लेखिकेचा मान मिळवला आहे .

१३) नंदिनी अग्रवाल –या मध्य प्रदेशातील मुरेना शहरातील महिलेने १९ व्या वर्षी सीए ही पदवी प्राप्त करून सर्वात कमी  वयाची सीए होण्याचा मान मिळवला आहे.

१४) पुलपाका सुनीता –आंध्र प्रदेशच्या या गायिकेने  गेल्या ६० वर्षात सहा पेक्षा जास्त भाषांमध्ये सोलो,ड्युएट, कोरस बॅक्ड व शीर्षक गीते अशी एकूण १७६९५ गाणी  गाण्याचा विक्रम केला. 

१५) विजया निर्मला— हैदराबादच्या रहिवासी असणाऱ्या तमिळ सिनेमा मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री, निर्माता व दिग्दर्शक महिलेने २००२ पर्यंत  सर्वात जास्त म्हणजे ४४ पूर्ण वेळेच्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.

१६) रोशना दिलीफ –या केरळमधील कोझिकोडच्या मुलीने M.A.Yusuf या प्रसिद्ध उद्योजकाच्या जीवनावर ‘द बिलियन डॉलर जर्सी’ या नावाच्या कथेची कार्टून स्ट्रीप तयार केली आहे. २०२२ चे ४३० मीटर लांबीच्या कार्टून स्ट्रीप चे तिने रेकॉर्ड केले व २०२१ चे ४०४ मीटर लांब कार्टून स्ट्रीपचे स्वतःचेच रेकॉर्ड मोडले.

१७) जान्हवी जिंदाल— चंदिगडच्या या मुलीने अठरा वर्षाखालील गटात एकाच वेळी स्केटिंग मध्ये पाच रेकॉर्डस् केली.

  1. एका चाकावर 360 डिग्री स्पिन, 30 सेकंदात 42 स्पीनस्
  2. एका चाकावर 360 डिग्री स्पिन, एका मिनिटात 72 स्पिनस्
  3. Consecutive एका चाकावर 360 डिग्री स्पिन ,32 स्पिनस्
  4. Slalom 20 cones on two wheels, 8.85 seconds.
  5. 360 degree rotations on in line skates, in 30 seconds 27 spins.

१८) जेसिका –तामिळनाडूच्या या मुलीने हेड स्टॅन्ड स्थितीत असताना एका पायावर हुला हुपच्या सर्वाधिक २१३ प्रदक्षिणा एका मिनिटात करून विक्रम नोंदविला.

– क्रमशः भाग ८ 

☆

संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ त्रिपुरसुंदरी अष्टकम् ॥ – रचना : जगद्गुरु आदि शंकराचार्य ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ त्रिपुरसुंदरी अष्टकम् ॥ – रचना : जगद्गुरु आदि शंकराचार्य ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

☆ ☆ ☆ ☆

कदम्बवनचारिणीं मुनिकदम्बकादम्बिनीं 

नितम्बजित भूधरां सुरनितम्बिनीसेविताम् ।

नवाम्बुरुहलोचनामभिनवाम्बुदश्यामलां 

त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये ॥ १॥

*

कदम्बवनवासिनीं कनकवल्लकीधारिणीं 

महार्हमणिहारिणीं मुखसमुल्लसद्वारुणीम् । 

दयाविभवकारिणीं विशदलोचनीं चारिणीं 

त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये ॥ २॥

*

कदम्बवनशालया कुचभरोल्लसन्मालया 

कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया ।

मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया 

कयाऽपि घननीलया कवचिता वयं लीलया ॥ ३॥

*

कदम्बवनमध्यगां कनकमण्डलोपस्थितां 

षडम्बुरुहवासिनीं सततसिद्धसौदामिनीम् ।

विडम्बितजपारुचिं विकचचंद्रचूडामणिं 

त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये ॥ ४॥

*

कुचाञ्चितविपञ्चिकां कुटिलकुन्तलालंकृतां 

कुशेशयनिवासिनीं कुटिलचित्तविद्वेषिणीम् ।

मदारुणविलोचनां मनसिजारिसंमोहिनीं 

मतङ्गमुनिकन्यकां मधुरभाषिणीमाश्रये ॥ ५॥

*

स्मरप्रथमपुष्पिणीं रुधिरबिन्दुनीलाम्बरां 

गृहीतमधुपात्रिकां मदविघूर्णनेत्राञ्चलां ।

घनस्तनभरोन्नतां गलितचूलिकां श्यामलां 

त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये ॥ ६॥

*

सकुङ्कुमविलेपनामलकचुंबिकस्तूरिकां 

समन्दहसितेक्षणां सशरचापपाशाङ्कुशाम् ।

अशेषजनमोहिनीमरुणमाल्य भूषाम्बरां 

जपाकुसुमभासुरां जपविधौ स्मराम्यम्बिकाम् ॥ ७॥

*

पुरंदरपुरंध्रिकां चिकुरबन्धसैरंध्रिकां 

पितामहपतिव्रतां पटपटीरचर्चारताम् ।

मुकुन्दरमणीमणीलसदलंक्रियाकारिणीं 

भजामि भुवनांबिकां सुरवधूटिकाचेटिकाम् ॥ ८॥

*

॥ इति श्रीमद् शंकराचार्यविरचितं त्रिपुरसुन्दरीअष्टकं ॥

*

भावानुवाद … 

*

कदम्बविहरी ऋषीमुनि जिच्या पदा सेविता

जगा जिंकिले जिने असुन विश्व नीयंत्रिता

त्रिनेत्रि त्रयदेवि पद्मनयना जगा धारिणी

शिवास अति लाडकी शरण पातलो पद्मिनी ॥१॥

*

कदम्ब रहिवासिनी कनकवल्कले धारिणी

महामणि धरी सुरेख मुख ब्रह्म देहांगिणी

करूण धनदायिनी अमल नेत्र तेजस्विनी

शिवास अति लाडकी शरण पातलो पद्मिनी ॥२॥

*

निवासिनि वनी कदम्ब धनभार वक्षांवरी

नगासम विशाल वक्ष गुरुची कृपा सागरी

मधूर लहरी जिभेवर अरूण  भालावरी

सुरक्षि सकला जणू कवच दाट कायेवरी ॥३॥

*

कदम्ब वनि जाशि हेमवलयांकिता होउनी

षडम्बु कमलवासिनी सततसिद्ध सौदामिनी

सुशोभित सरोज तेज तुज चंद्रचूडामणी  

शिवास अति लाडकी शरण पातलो पद्मिनी ॥४॥

*

उरोज वरती विणा कुरळ कुंतला शोभुनी

विसाव कुश लेटुनी कुटिल बुद्धिची द्वेषिणी

मधाळ नयना अरूण  मनजास  संहारिणी

नमीत गजसाधु आश्रय मधूर संभाषिणी ॥५॥

*

प्रिया सुमन आद्य बिंदु रुधिरा सुनीलांगणी

मधूर मधुपात्र हाति फडके जिची पापणी

विशाल घन उन्नत स्तन बटा  वरी लोंबती

त्रिलोचन कलत्र आश्रयि पदा तुझ्या लागती ॥६॥

*

गळा सजविती  रुधीर कुसुमाम्ल गुंफीयले

करात  शरचाप अंकुश धरी नयन तोषले

समस्त जन मोहुनी तिज फुले वसन अर्पिती 

विधी जप करोनिया स्मरण पार्वती जागृती ॥७॥

*

पुरंदर पुरंध्रिका प्रिति चिकूर आभूषण

पितामह-पतिव्रता फडफडे पटा भूषण

गळावर उमेचिया बहुत मौक्तिके शोभुन

शिरी मणि मुकूट रूपवतिसी भजू पूजन ॥८॥

*

॥ इति श्रीमद् शंकराचार्यविरचित निशिकान्त भावानुवादित त्रिपुरसुन्दरीअष्टक संपन्न ॥

☆ ☆ ☆ ☆

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ७ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ७ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

(आजच्या सातव्या भागात निरनिराळ्या कलेत प्राविण्य मिळविणाऱ्या दुर्गा)

१) तारा सिन्हा 

भारतातील जाहिरात क्षेत्रातील पहिल्या महिला, त्याहीपेक्षा स्वतःची जाहिरात कंपनी स्थापन करणारी पहिली महिला म्हणजे तारा सिन्हा.

ज्या काळात महिला घरातून बाहेर पडण्याचे प्रमाण अत्यल्प होते, त्या काळात पुरुषप्रधान जाहिरात क्षेत्रात उतरणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या. जनसंपर्क, परराष्ट्र व्यवहार, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स या सर्व क्षेत्रांत त्यांचे वर्चस्व होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, दिल्ली आयआयटी, ॲडव्हर्टायझिंग सब-कमिटी अशा अनेक संस्थांशी निगडित असलेल्या तारा सिन्हा यांचे कर्तृत्व अत्यंत प्रेरणादायी आहे. विशीच्या उंबरठ्यावर असताना जाहिरात व जनसंपर्क पदविकेचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या. वयाच्या २३ व्या वर्षी तारा एका कंपनीच्या संचालिका होत्या.

२) गरिमा अरोरा

गरिमा ही स्थानिक सामग्री पासून पारंपारिक भारतीय पदार्थ बनविणारी आशियातील सर्वश्रेष्ठ पाककला निपुण महिला (शेफ) आहे. तिचे पाककलेतील शिक्षण ‘ले कॉर्डन ब्ल्यू ‘पॅरिस येथे झाले. तिने बँकाॅक येथे स्वतःचे रेस्टॉरंट सुरू केले. तिला अशियातील सर्वश्रेष्ठ महिला शेफ हा २०१९ चा पुरस्कार मिळाला आहे. तसेच दोन मिशेलिन स्टार मिळवणारी भारतातील पहिली महिला शेफ आहे.

३) अमृता जोशी 

ही दोन डझनहून अधिक भाषांचे व्यावहारिक आणि सैद्धांतिक ज्ञान असणारी, एका भाषेचे दुसऱ्या भाषेत भाषांतर करणारी, भाषेद्वारे आंतर-सांस्कृतिक संबध वाढवणारी, एक दुभाषी, शिक्षक, कॉर्पोरेट प्रशिक्षक आणि लेखक आहे.

भाषेच्या प्रेमामुळे – फक्त शब्दांमध्येच नाही तर जगांमध्ये – शिक्षण आणि आरोग्यसेवेपासून ते वित्त, कायदा आणि राजनिती पर्यंतच्या क्षेत्रात काम करते. तिची जी-काॅर्प नावाची कंपनी आहे. ती इमर्सिव्ह भाषा कार्यक्रम डिझाइन करते, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते, कॉर्पोरेट संस्थांना प्रशिक्षण देते, कागदपत्रांचे भाषांतर करते. ती मनोरंजक बहुभाषिक पुस्तके तयार करते. कथाकथन, खेळातून शिक्षण आणि शैक्षणिक साधनांद्वारे, जगभरातील तरुणांच्या मनात भाषांविषयी प्रेम जागृत करण्याचे तिचे ध्येय आहे.

४) चंद्रा नायडू 

यांचा जन्म १९३३ मध्ये तेलुगू भाषिक कापू कुटुंबात झाला. तिचे वडील सी के नायडू हे एक प्रसिद्ध क्रिकेटपटू होते आणि भारताच्या पहिल्या कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार होते.

चंद्रा यांनी इंग्रजीमध्ये पदवी प्राप्त केली आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका सरकारी महाविद्यालयात इंग्रजी शिकवले. तिने स्थानिक महिला क्रिकेटमध्ये काही काळ भाग घेतला. पहिल्या उत्तर प्रदेश महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. १९७० च्या दशकात क्रिकेट समालोचन करण्यापूर्वी तिच्या महाविद्यालयासाठी क्रिकेट खेळली. ती भारताची पहिली महिला क्रिकेट समालोचक होती. तिने १९७६-७७ च्या हंगामात दौऱ्यावर असलेल्या मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) विरुद्ध बॉम्बे यांच्यातील सामन्यातून समालोचनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि हिंदी आणि इंग्रजीमध्ये स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भाष्य करत राहिली. १९७९-८० मध्ये इंग्लिश संघाच्या भारत दौऱ्यादरम्यान ती भारताच्या सार्वजनिक प्रसारक, ऑल इंडिया रेडिओसाठी समालोचक होती. नायडूच्या मते, ती ऑस्ट्रेलियन महिला समालोचकाच्या आधीची पहिली महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचक होती.

५) होमाई व्यारावाला 

यांनी १९३० च्या दशकात त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला, त्यांनी मुंबईस्थित द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया मासिकासाठी काम केले. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, ती एक महिला असल्याने, त्यांचे फोटो तिच्या पतीच्या नावाने प्रकाशित केले जात होते. पत्रकार म्हणून महिलांना गांभीर्याने घेतले जात नसल्यामुळे, त्या त्यांच्या विषयांचे उच्च दर्जाचे, उघड करणारे फोटो कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय घेऊ शकल्या. १९९८ मध्ये, व्यारावाला यांना उत्कृष्ट महिला मीडिया पर्सनसाठी चमेली देवी जैन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१० मध्ये, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. २०११ मध्ये त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान केला.

होमाई व्यारावाला, जन्म ९ डिसेंबर १९१३, जिला सामान्यतः डाल्डा १३ या टोपणनावाने ओळखले जाते. त्या भारतातील पहिल्या महिला छायाचित्रकार होत्या. त्यांनी १९३८ मध्ये बॉम्बे क्रॉनिकलमध्ये काम करून शहरातील दैनंदिन जीवनाचे फोटो काढले. व्यारावाला यांनी १९४० पासून १९७० पर्यंत ब्रिटिश माहिती सेवांमध्ये काम केले, त्यानंतर त्या निवृत्त झाल्या. द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियामध्ये सामील झाल्यावर त्या मुख्य प्रवाहातील प्रकाशनात सामील होणाऱ्या भारतातील पहिल्या महिला होत्या.

६) रितू कुमार 

 रितूच्या डिझाईन्स नैसर्गिक कापडांवर आणि पारंपारिक छपाई आणि विणकाम तंत्रांवर केंद्रित आहेत. तिने तिच्या कामात पाश्चात्य घटकांचा देखील समावेश केला आहे, परंतु सामान्यतः पारंपारिक साडी डिझाइनच्या पलीकडे तिने नाविन्यपूर्ण काम केलेले नाही. तिचे कपडे राजकुमारी डायना, प्रियांका चोप्रा, लारा दत्ता, दीपिका पदुकोण, माधुरी दीक्षित नेने सारख्या सेलिब्रिटींनी परिधान केले आहेत. २०१३ मध्ये रितू कुमार यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. २०१२ मध्ये लोरियल पॅरिस फेमिना महिला पुरस्कारांमध्ये तिने अचिव्हमेंट पुरस्कार जिंकला. अमृतसरमध्ये शैक्षणिक संधींचा अभाव असल्याने तिला शालेय शिक्षणासाठी सिमला येथे जावे लागले, जिथे तिने पदवी घेतली व नंतर न्यू यॉर्कमधील ब्रायरक्लिफ कॉलेजची शिष्यवृत्ती स्वीकारली, जिथे तिने कला इतिहासाचा अभ्यास केला. भारतात परतल्यानंतर, तिने कलकत्ता विद्यापीठाचा भाग असलेल्या आशुतोष म्युझियम ऑफ इंडियन आर्टमध्ये संग्रहालयशास्त्राचा अभ्यास केला.

रितूने कोलकाता येथे दोन लहान टेबल आणि हँड-ब्लॉक प्रिंटिंग तंत्रांचा वापर करून तिचा फॅशन व्यवसाय सुरू केला. १९६० आणि ७० च्या दशकात वधूच्या पोशाख कपड्यांपासून सुरुवात करून, ती अखेर पुढील दोन दशकांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेली. भारतातील दुकानांसोबतच, कुमारच्या कंपनीने पॅरिस, लंडन आणि न्यूयॉर्क मध्येही शाखा उघडल्या. त्यावेळी तिच्या कंपनीची वार्षिक उलाढाल कोणत्याही भारतीय फॅशन आउटलेटपेक्षा सर्वाधिक होती, अंदाजे ₹१० अब्ज होती. २००२ मध्ये तिने तिचा मुलगा अमरीशसोबत भागीदारीत ‘लेबल लाइन’ ही कंपनी सुरू केली.

७) सुनयनी देवी, अमृता शेरगिल 

यांचा जन्म १८ जून १८७५ रोजी कलकत्ता येथील ऐतिहासिकदृष्ट्या प्रभावशाली टागोर कुटुंबात झाला. त्यांनी कलेचे औपचारिक प्रशिक्षण घेतले नव्हते. तिची चित्रे इंडियन सोसायटी ऑफ ओरिएन्टल आर्ट, जहांगीर गॅलरी, चित्रकूट आर्ट गॅलरी मुंबई या ठिकाणी मांडली गेली होती. तिची चित्रे भारतीय संग्रहालय कोलकत्ता. जगमोहन पॅलेस म्हैसूर, रवींद्र भारती विद्यालयाचे संग्रहालय इथे आजही संग्रहित केलेली आहेत. ही भारताची पहिली महिला चित्रकार आहे हे खरं असलं तरी तिची समकालीन व जरा जास्तच प्रसिद्ध झालेली चित्रकार अमृता शेरगिलचा उल्लेख ही करावा लागेल. अवघ्या 28 वर्षांच्या आयुष्यात तिने चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले व आपल्या कलेतून स्त्री जीवनाचे चित्रण केले. तिचे ‘व्हिलेज सीन’ हे पेंटिंग लिलावात ६. ९ कोटींना विकले गेले. त्यामुळे चित्रकला हा व्यवसाय होऊ शकतो हा विश्वास तिने पुढच्या पिढीला दिला.

८) लीला चिटणीस, मेघना एरंडे 

दुसऱ्याच्या आवाजाची नक्कल करणे किंवा कलाकाराला आपला मूळ आवाज नव्हे पण काही वेगळा आवाज त्या पात्राला शोभेल असा काढणे ही एक कला आहे. पहिली महिला म्हणून लीला चिटणीस चे नाव घेत येईल, कारण तिने काही चित्रपटात कलाकाराला आपला आवाज दिला आहे, पण तसा काही लिखित पुरावा नाही. अधिकृतपणे, व्यवसाय म्हणून असे वेगवेगळे आवाज देणारी मराठी अभिनेत्री मेघना एरंडे! तिने दिलेल्या निन्जा हातोरी मालिकेतील हातोरीच्या आवाजाने ती घराघरात पोचली. तिने बऱ्याच कार्टून ना, चित्रपटातील कलाकारांना आपला आवाज दिला आहे. अलीकडेच बाहुबली चित्रपटात शिवगामीला तिने आवाज दिला आहे. ती इतके वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढू शकते की हा आवाज तिचा आहे हे ओळखू येत नाही, ही तिचे खास वैशिष्ट्य! !

९) लीला मुखर्जी, उषाराणी, जसू शिल्पी 

शिल्पकलेतील पदवी घेतलेली पहिली महिला शिल्पकार लीला मुखर्जी (१९१६ ते २००३) पण त्यांनी स्वतंत्रपणे शिल्पकारितेला वाव दिला नाही. त्यानंतर शिल्पकारितेला व्यवसाय म्हणून पाहणाऱ्या (१९२३ते२०१३) उषा राणी. यांनी विविध खाजगी संस्थांसाठी काम म्हणून 40 होऊन अधिक पुतळे व आकृत्या कोरल्या आहेत. पण भारताची पहिली कास्य महिला, जसू शिल्पी, (१९४८ते२०१३) हिचा उल्लेख व्हायलाच हवा. अहमदाबादमधील शेठ सी. एन. काॅलेज ऑफ फाईन आर्टस मधे शिक्षण घेतले. चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत तिने २२५ हून अधिक मोठे कांस्य पुतळे व ५२५ कांस्य अर्ध पुतळे यांची निर्मिती केली आहे. तिने केलेली सर्वात मोठी निर्मिती म्हणजे २८ फूट उंच हनुमानाची कास्यमूर्ति, याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

☆

– क्रमशः भाग ७

संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ श्री जगद्धात्री स्तोत्रम् ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ श्री जगद्धात्री स्तोत्रम् ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

☆ ☆ ☆ ☆

आधाररूपे चाधेये धृतिरूपे धुरन्धरे । 

ध्रुवे ध्रुवपदे धीरे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ १॥ 

*

शिवाकारे शक्तिरूपे शक्तिस्थे शक्तिविग्रहे । 

शाक्ताचारप्रिये देविजद्धात्री नमोस्तु ते ॥२॥ 

*
जयदे जगदानंदे जगदेकप्रपूजिते । 

जय सर्वगते दुर्गे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ ३॥ 

*
सूक्ष्मातिसूक्ष्मरूपे च प्राणापानादिरूपिणि । 

भावाभावस्वरूपे च जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ ४॥ 

*
कालाधिरूपे कालेशे कालाकालविभेदिनि । 

सर्वस्वरूपे सर्वज्ञे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ ५॥ 

*

महाविघ्ने महोत्साहे महामाये वरप्रदे । 

प्रपञ्चसारे साध्वीशे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ ६॥ 

*
आगम्ये जगतामाद्ये माहेश्वरि वराङ्गने । 

अशेषरूपे रूपस्थे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ ७॥ 

*
तीर्थयज्ञा -तपोदान-योगसारे जगन्मयि । 

त्वमेव सर्वं सर्वस्थे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ ८॥ 

*
दयारूपे दयादृष्टे दयार्द्रे दुःखमोचनि । 

सर्वापत्तारिके दुर्गे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ ९ ॥ 

*
आगम्यधाम-धामस्थे महायोगीशहृत्पुरे । 

अमेयभावकूटस्थे जगद्धात्रि नमोऽस्तु ते ॥ १०॥ 

*
॥ इति श्रीजगद्धात्रीस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

 *

☆ मराठी भावानुवाद  ☆

*

ब्रह्मांडाचा आधार संतोषी अतीत आकलनाला

सृष्टीधारिणी शाश्वत नमन अचल जगद्धात्रीला ॥१॥

*

शिवाकारी शक्तीरूपी विग्रह शक्तीचा जिला

शाक्तानुष्ठान प्रिय नमन करीतो जगद्धात्रीला ॥२॥ 

*

विजयदात्री आनंददायी शक्ती अमोघ अर्चनेला

जय सर्वगते दुर्गे नमन त्या जगद्धात्रीला ॥३॥

*

प्राणापान प्राणवायु सूक्ष्मातिसूक्ष्म जीवनशक्तीला

भावाभावस्वभाव रूपिणी नमन अशा जगद्धात्रीला ॥४॥

*

सूक्ष्म कालखंडातुनी समस्त व्यापिलेस तू सृष्टीला

सर्वव्यापि सर्वरूपी सर्वज्ञ नमन स्वयंभू जगद्धात्रीला ॥५॥

*
उत्साह भ्रम वा बाधा अस्तित्व सदैव वर द्यायाला

शक्तिरूपिणी विराटपुरुषाची नमन विशाल जगद्धात्रीला ॥६॥ 

*

ब्रह्मांडमूल अनाकलनीय वरांगने माहेश्वरी तुजला

अशेषरूपी अनंतरूपी नमन सृष्टीक्रिडा जगद्धात्रीला ॥७॥

*

तीर्थ यज्ञ तपोदान योग सकलांच्या साराला

तूचि सर्व सर्वात तूहि नमन सर्वव्यापि जगद्धात्रीला ॥८॥

*
दयारूपी कारुण्यदृष्टी करुणाभाव हारी दुःखाला

सर्वशक्ती अधिष्ठाती नमन दुर्गादेवी जगद्धात्रीला ॥ ९ ॥

*

निकेत धामाला यावे योगी हृदयी निवासाला

शिखरी भावांच्या दिव्य नमन देवी जगद्धात्रीला ॥१०॥

*

॥ इति निशिकान्त भावानुवादित श्रीजगद्धात्रीस्तोत्र सम्पूर्ण ॥

☆ ☆ ☆ ☆

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ६ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ६ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

(आजच्या सहाव्या भागात, ज्यांचा आपल्याला अभिमान वाटतो अशा शास्त्रज्ञ दुर्गांचा प्रेरणादायी प्रवास)

१) जानकी अम्मल

यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९७ रोजी थलासेरी, केरळ येथे झाला. अम्मलने मद्रास येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून वनस्पतिशास्त्रात पदवी मिळवली. मिशिगन विद्यापीठात स्कॉलरशिपद्वारे वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. सायटोजेनेटिक्समधील तज्ज्ञ म्हणून जानकी अम्मल उसाच्या जीवशास्त्रावर काम करण्यासाठी कोइम्बतूर येथील ऊस प्रजनन केंद्रात सामील झाल्या. त्यावेळी, जगातील सर्वात गोड ऊसाची जात भारताने आग्नेय आशियातून आयात केली होती. भारतातील स्थानिक उसाच्या जाती सुधारण्यासाठी, १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला कोइम्बतूर येथे ऊस प्रजनन केंद्र स्थापन करण्यात आले होते. प्रयोगशाळेत संकरित जातींपासून भारतीय परिस्थितीत वाढू शकेल असा उच्च उत्पन्न देणारा उसाचा प्रकार तयार करण्यात यशस्वी झाल्या. जानकी RHS च्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ बनल्या.

२) कमला सोहोनी 

यांचा जन्म १८ जून १९११ रोजी इंदूर येथे झाला. १९३३ मध्ये मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र मध्ये बीएससी पदवी प्राप्त केली. तिने IIS रिसर्च फेलोशिपसाठी अर्ज केला. तो अर्ज फेटाळून लावला. कारण महिलांना संशोधन करण्यासाठी पुरेसे सक्षम मानले जात नाही. कमलाने सत्याग्रह’ केला व तिला प्रवेश मिळाला, कांही अपमानास्पद अटी घालून. अशा प्रकारे १९३३ मध्ये संस्थेत प्रवेश मिळवणारी ती पहिली महिला ठरली. कमला एक भारतीय बायोकेमिस्ट होत्या. ज्या १९३९ मध्ये वैज्ञानिक विषयात पीएचडी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. तिच्या संशोधनात जीवनसत्त्वांचे परिणाम आणि भारतीय विज्ञान लोकसंख्येतील काही गरीब घटकांद्वारे खाल्ल्या जाणाऱ्या डाळी, तांदूळ आणि अन्नपदार्थांच्या गटांच्या पौष्टिक मूल्यांचा अभ्यास करण्यात आला. ‘ नीरा ‘ नावाच्या ताडाच्या अर्काच्या पौष्टिक फायद्यांमुळे आदिवासी समुदायातील कुपोषित किशोरवयीन मुले आणि गर्भवती महिलांच्या आहारात स्वस्त आहार पूरक म्हणून नीराचा समावेश केल्याने आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली.

३) अदिती पंत 

यांचा जन्म नागपूर येथे ५जुलै १९४३‌ला झाला. पंतने पुणे विद्यापीठातून बीएससी पूर्ण केले. अ‍ॅलिस्टर हार्डी यांचे द ओपन सी हे पुस्तक वाचल्यानंतर तिला समुद्रशास्त्र हा विषय घेण्याची प्रेरणा मिळाली. १९८१ मध्ये भारताने अंटार्क्टिक करारावर स्वाक्षरी केल्याने भारतीय अंटार्क्टिक कार्यक्रम सुरू झाला. अदिती पंत अंटार्क्टिकावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला होती. पंत यांच्या मोहिमेचा उद्देश अंटार्क्टिक महासागरातील अन्नसाखळी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राशी संबंधित माहिती गोळा करणे होता. अदिती यांनी चार महिने मुख्य भूमीचा अभ्यास केला आणि उत्कृष्ट खुलासे केले. मोहिमेदरम्यान, टीमने दक्षिण गंगोत्री बांधले, जे अंटार्क्टिकाचे पहिले भारतीय वैज्ञानिक संशोधन बेस स्टेशन आहे. पंत यांनी १९८४ मध्ये अंटार्क्टिकाच्या पाचव्या मोहिमेतही भाग घेतला, ज्यामध्ये त्यांनी समुद्रशास्त्र आणि भूगर्भशास्त्रात संशोधन केले. पंत यांच्याकडे पाच पेटंट आहेत आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांची ६७ हून अधिक प्रकाशने आहेत. त्या महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सच्या फेलो सदस्य आहेत.

४) डॉ गगनदीप कंग 

यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९६२ रोजी शिमला येथे झाला. कंग यांनी १९८७ मध्ये वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि १९९१ मध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये एमडी पदवी पूर्ण केली आणि १९९८ मध्ये पीएचडी मिळवली. २००० मध्ये त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्टची सदस्यता घेतली. बेलर कॉलेज ऑफ मेडिसिन, ह्युस्टन येथे मेरी के. एस्टेस यांच्यासोबत पोस्ट डॉक्टरल संशोधन केले. त्या भारतीय सार्वजनिक आरोग्य संशोधक आहेत. २०२३ पासून गेट्स फाउंडेशन मध्ये आतड्यासंबंधी रोग, निदान व महामारीशास्त्र यावरील कामाचे नेतृत्व करतात. कोविड-१९ साथीच्या काळात, कंगने विज्ञान संवाद, ऑनलाइन बोलणे आणि टेलिव्हिजनवरील मुलाखतींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. चुकीच्या माहितीविरुद्ध विश्वासार्ह आवाज म्हणून काम केले. ती WHO मधील कोविड-१९ लस सुरक्षा कार्यगट आणि लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड-१९ लस कार्यगटाचा भाग होती.

५) डॉ इंदिरा हिंदुजा 

यांचा जन्म २१ ऑगस्ट १९४६ ला शिकारपूर येथे झाला. राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्थेत आयव्हीएफ संशोधनात पीएचडी तसेच तिने मुंबई विद्यापीठातून ‘ह्युमन इन व्हिट्रो फर्टिलायझेशन अँड एम्ब्रियो ट्रान्सफर’ या प्रबंधासाठी पीएचडी पदवी मिळवली आहे. त्या मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ आणि वंध्यत्व तज्ञ आहेत. त्यांनी गेमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर (GIFT) तंत्राचा पाया रचला. ज्यामुळे ४ जानेवारी १९८८ रोजी भारतातील पहिल्या GIFT बाळाचा जन्म झाला. यापूर्वी त्यांनी ६ ऑगस्ट १९८६ रोजी केईएम रुग्णालयात भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बाळाला जन्म दिला. रजोनिवृत्ती आणि अकाली गर्भाशय निकामी झालेल्या रुग्णांसाठी ओसाइट डोनेशन तंत्र विकसित करण्याचे श्रेय त्यांना जाते, ज्यामुळे २४ जानेवारी १९९१ रोजी या तंत्रातून देशातील पहिले बाळ जन्माला आले.

६) असीमा चॅटर्जी 

यांचा जन्म २३ सप्टेंबर १९१७ रोजी कोलकता येथे झाला. तिने कलकत्ता विद्यापीठाच्या स्कॉटिश चर्च कॉलेजमधून रसायनशास्त्रात उच्च शिक्षण घेतले. पुढे तिने कलकत्ता विद्यापीठातून सेंद्रिय रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. कलकत्ता विद्यापीठातून डी. एस. सी. केले. १९४४ मध्ये भारतीय विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. असीमा ही एक भारतीय सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ होती. जी सेंद्रिय रसायनशास्त्र आणि फायटोमेडिसिन क्षेत्रात तिच्या कामासाठी प्रसिद्ध होती. तिचे सर्वात उल्लेखनीय काम म्हणजे विंका अल्कलॉइड्सवरील संशोधन, एपिलेप्टिक औषधांचा विकास आणि मलेरियाविरोधी औषधांचा विकास. तिने भारतीय उपखंडातील औषधी वनस्पतींवर देखील मोठ्या प्रमाणात काम केले.

७) अंजू चढ्ढा 

यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. नौरोजी वाडिया कॉलेजमधून तिने १९७५ मध्ये रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केली. १९७७ मध्ये पुणे विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. १९८४ मध्ये, तिने बंगळुरू येथील IIS मधून पीएचडी पूर्ण केली. तिने जैव-सेंद्रिय रसायनशास्त्रावर लक्ष केंद्रित केले. ही बायोकेमिस्ट आहे. ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास येथे प्राध्यापक आहे. ती बायोकॅटॅलिसिस आणि एन्झाइम मेकॅनिझम, सेंद्रिय संश्लेषणातील एन्झाइम, कायरोटेक्नॉलॉजी, ग्रीन केमिस्ट्री आणि बायोसेन्सर या क्षेत्रात काम करते.

८) अन्ना मोदयिल मणी 

यांचा जन्म १९१८ मध्ये पीरमाडे, तत्कालीन त्रावणकोर, आता केरळ येथे झाला. मणीने चेन्नई येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. तिने भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात BSc पदवी मिळवली. नंतर १९४० मध्ये, IIS ने मणीला भौतिकशास्त्रात शिक्षण आणि संशोधन सुरू ठेवण्यासाठी शिष्यवृत्ती दिली. नंतर त्या भारतीय हवामान विभाग (IMD) मध्ये सामील झाल्या आणि उपकरण विभागात काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली १२१ जण काम करीत होते. जवळजवळ १०० वेगवेगळ्या हवामान उपकरणांचे उत्पादन सुरू केले. त्यांच्या टीमने वाऱ्याच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी, सौर किरणोत्सर्ग तसेच मापन उपकरणांचा वापर करण्यासाठी संपूर्ण भारतात देखरेख केंद्रांचे जाळे उभारले. मणी यांच्या टीमने विविध किरणोत्सर्ग उपकरणे डिझाइन आणि विकसित केली. मणी त्यांच्या काळात अशा मोजक्या लोकांपैकी एक होती ज्यांना ओझोन थराची क्षमता आणि त्याची महत्त्वाची भूमिका कळली. त्यांनी ओझोन थर मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण तयार केले. या कामामुळे ती आंतरराष्ट्रीय ओझोन आयोगाचा भाग बनली. मणी आणि त्यांच्या टीमने विकसित केलेल्या उपकरणांमुळे आणि संशोधनामुळे भारताला हवामानाचा अचूक अंदाज लावण्यास मदत झाली, तसेच त्याचे हवामान क्षेत्र विस्तारण्यास मदत झाली.

९) मंजू शर्मा 

यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४० रोजी गुजरात मधील गांधीनगर येथे झाला. लखनौ विद्यापीठातून सुवर्णपदकासह प्रथम क्रमांकाने पदवी मिळविली. १९६१ ला तेथूनच PhD केली. डेहराडून येथील वन संशोधन संस्थेत लाकडाच्या वनस्पतींवर संशोधन करताना सिलिका सामग्री व लाकडाचा कठीणपणा यामधील संबंध प्रस्थापित केला. १९७४ ला भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागात वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. विज्ञानातील महिलांवरील आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या पहिल्या अध्यक्ष होत्या. आय आय ए आर च्या अध्यक्ष व कार्यकारी संचालिका, भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयात जैवतंत्र ज्ञान विभागाच्या सचिव होत्या. अनेक संस्था स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

१०) डॉ. रोहिणी गोडबोले

पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली रोहिणी, आयआयटी मुंबई येथून पदव्युत्तर पदवी मिळाल्यावर अमेरिकेतील स्टोनी ब्रूक येथील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये पीएचडी केली. त्या काळात१९७९ मध्ये जेव्हा तिने डॉक्टरेट पूर्ण केली, तेव्हा तिने अमेरिका आणि युरोपमधून पोस्टडॉक्टरल ऑफर नाकारल्या आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), मुंबई येथे काम करु लागली. १९९५ मध्ये तिला बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे प्राध्यापक पदाची ऑफर देण्यात आली, जिथे ती डॉक्टरेट साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकली. या टप्प्यावर तिची कारकीर्द उंचावली आणि ती लवकरच एक सेलिब्रिटी बनली.

पद्मश्री रोहिणी गोडबोले या एक उत्कृष्ट “प्राथमिक कण घटनाशास्त्रज्ञ” होत्या. कण भौतिकी, उच्च ऊर्जा भौतिकी आणि कोलायडर भौतिकी या विषयातील एक कुशल संशोधक, शिक्षिका, धोरणकर्ती आणि विज्ञान प्रशासक म्हणून त्यांना जागतिक मान्यता मिळाली. उच्च-ऊर्जा भौतिकशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांना वारंवार मुख्य वक्ते म्हणून आमंत्रित केले जात असे. त्या राष्ट्रीय अकादमीच्या फेलो बनल्या आणि त्यांना भारत आणि फ्रान्स सरकारकडून पुरस्कारांसह अनेक मान्यता मिळाल्या. युरोपियन विद्यापीठांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून, त्या त्यांच्या संशोधन कार्याच्या विषयांवर पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवत असत. उच्च दर्जाचे संशोधन करत असताना, त्यांनी भारतीय विज्ञान अकादमीच्या ‘विज्ञानातील महिला पॅनेल’ची स्थापना केली आणि तिच्या पहिल्या अध्यक्षा झाल्या. २००१ मध्ये पॅरिसमध्ये भौतिकशास्त्रातील महिलांवरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्या पूर्ण वक्त्या होत्या. त्यांनी जवळजवळ शंभर भारतीय महिला शास्त्रज्ञांच्या कारकिर्दीचे संकलन ‘लीलावतीज डॉटर्स’ या पुस्तकात केले आहे.

– भाग ६.

☆

संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सहा ठिपक्यांचा निर्मळ फुलोरा! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सहा ठिपक्यांचा निर्मळ फुलोरा! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

सरोजताई टोले

सरोवराच्या जलाच्या पृष्ठभागावर अलगद डोकावत सबंध सरोवर सुगंधित करतं ते कमल. या गुलाबी रंगाच्या आणि फुलणं म्हणजे नेमकं काय याचा मनमोहक वस्तुपाठ असलेल्या कमळाला सरोज अर्थात सरोवरातून जन्मलेलं असंही एक नाव आहे.

देहाला हे नाव मिळालेलं असणं आणि त्या नावाला जागणारं कार्य हातून घडलेलं असणं हा एक दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल. सरोजताई टोले यांच्याबाबतीत हा गोड योग जुळून आलेला दिसतो.

दृष्टी ही मानवी जीवनाला मिळालेली एक अत्युत्कृष्ट अशी देणगी आहे. पण आपलं जग आपल्याच डोळ्यांनी आपल्याला हवं तसं पाहता येण्याची सवलत निसर्ग मात्र काहींना देऊ शकलेला नाही. मग पाहण्यासाठी यांना स्पर्श नावाच्या ज्ञानेंद्रियाचा आधार घ्यावा लागतो. आणि हा स्पर्शही हातांच्या बोटांनी केला तरच त्या स्पर्शाला दर्शनाचा सोहळा अनुभवता येतो. अन्यथा केवळ ऐकणं या एकाच मार्गावर अडखळत चालवं लागतं.

माणसाने अक्षर शोधलं… अक्षराला कल्पनेने चित्रित केलं आणि कागदावर त्याची प्रतिमा उमटवली… आणि दैवदत्त देणगीच्या साहाय्याने वाचून ते अक्षर मनात पोहोचवलं. पण ही प्रतिमाच जर पाहता येत नसेल तर ज्ञानाचा हा ओलावा कायमचा दुरावतो. यावर १८२४ मध्ये फ्रांस देशातल्या लुई ब्रेल नावाच्या शिक्षक महात्म्याने एक नामी उपाय शोधून काढला. त्याने कागदाच्या पृष्ठभागावर कागदाच्या मागच्या भागावर दाब देऊन उठाव निर्माण केला. या उठावाला बोटांच्या शेवटच्या टोकांनी स्पर्श केला की तो उठाव मन:चक्षुंना दिसू लागला. असे सहा उठाव एकत्रित उमटवून त्याने एक अक्षर निर्मिले. मग याच उठावांच्या रचनांमध्ये वैविध्य आणून वर्णमालेतील शक्य ती सर्व अक्षरे जुळवली… आणि केवळ स्पर्शाच्या साहाय्याने वाचता येऊ लागले… अर्थ डोळ्यांना ओलांडून जाणिवेच्या अंतरंगात पोहोचू लागला! आरंभी केवळ फ्रेंच भाषेत उपलब्ध असलेले हे उठाव पुढे १३३ भाषांना आपल्या कवेत घेते झाले आणि अंध व्यक्तींना वाचनाची संधी प्राप्त झाली. भारतात १९५१ च्या दरम्यान भारतीय भाषांत ब्रेल आली. पण खरी समस्या होती ती म्हणजे ही लिपी कागदावर सहजी उमटवायची कशी? त्यासाठी ब्रेलर नावाचे टंकलेखन यंत्र डेविड अब्राहम यांनी विकसित केले. याला पर्किन्स ब्रेलर म्हणतात.

आपल्या कथानायिका सरोजताई टोले या महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यांमध्ये वंचित विकास संस्थेच्या माध्यामातून, शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसोबत काम करीत. मराठी व्याकरणाच्या अभ्यासकांना मो. रा. वाळंबे हे नाव परिचयाचे असतेच. सरोज ताई त्यांच्याच कन्या. सरोजताई डोळस मुलांसाठी निर्मळ रानवारा नावाचा छापील अंक काढीत असत… त्यात कथा, कविता, गोष्टी असत. संपादन सुद्धा त्याच करीत. हे काम त्यांनी सलग अकरा वर्षे नेटाने चालवले होते.

याच कामाच्या दरम्यान सरोजताई दृष्टी दिव्यांग मुलांच्या संपर्कात आल्या. ताई या मुलांना अभ्यासाची क्रमिक पुस्तकं वाचून दाखवायच्या. पुढे पुढे आधुनिक तंत्रज्ञान हाताशी आल्यावर त्यांनी त्यांच्या सहका-यांच्या मदतीने पुस्तके ध्वनिमुद्रित करून द्यायलाही आरंभ केला.

पण याला काही मर्यादा आहेत. कानांनी पुस्तक ऐकणं आणि बोटांनी ते प्रत्यक्ष वाचणं यात महदंतर आहे. पण मजकूर ब्रेल लिपीत करून घेणं हे मोठं जिकिरीचं आणि खर्चाचं काम असतं. डोळस लोकांसाठी वापरल्या जाणा-या पुस्तकांपेक्षा आकार अर्थातच मोठा असतो. अंध मुलं म्हणाली… ताई! आम्हांला आमचं आमचं वाचायचं आहे… काहीतरी करा ना?

त्यावेळी सरोजताई अवघ्या एकावन्न वर्षांच्या होत्या. या वयात ब्रेल शिकणं तसं कठीणच. पण ताई अंधशाळेत शिक्षिका असलेल्या त्यांच्या एका मैत्रिणीकडून ही सहा टिंबांची भाषा शिकल्या! कुणाकडून तरी एक सेकंड hand अर्थात आधी वापरलं गेलेलं, जुनं ब्रेल लिखाण यंत्र मिळवलं… आणि ताई लिहू लागल्या… ब्रेल लिपीत लिहू लागल्या… जे केवळ बोटांच्या स्पर्शांनी वाचता येते…! जाडसर कागदावर एक एक अक्षर उमटवणं म्हणजे सुकलेल्या शेतात एक एक बीज पेरीत पेरीत पुढं जात राहणं… त्याला अर्थाचे अंकुर फुटतील तेंव्हा फुटतील. पण सरोजताईच्या हाताला यश लाभत गेलं. त्यांनी एक न अर्धे… तब्बल ३०० पेक्षा जास्त पुस्तकं अशी लिहून काढली आणि दृष्टी दिव्यांग बंधू-भगिनी यांच्यासाठी एक मोठे ज्ञानदालन उघडून दिले! पुढे पुढे तर त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग गाथा, चांगदेव पासष्टी हेही ग्रंथ ब्रेलमध्ये लिहून दिले!

पण मुळातच ब्रेल मध्ये लिहिणं कठीण होतं. काहीवेळा अक्षरांत ध चा मा होई… पण वाचक ते समजून घेत… अनर्थ होत नसे. पण एक अडचण होती. एक पुस्तक लिहून झाले की त्याची दुसरी प्रत आपोआप तयार होऊ शकत नसे. नेहमीच्या छापील पुस्तकांची झेरॉक्स /फोटो कॉपी निघू शकते पण ब्रेलची नाही. म्हणून दुसरी प्रत हवी असेल तर पुन्हा ब्रेल टंकलेखन करावेच लागत असे. सरोज ताईनी हेही कष्ट उपसले. पण पुढे संगणक क्रांती आली! संगणकाच्या साहाय्याने मूळ पुस्तकाच्या अधिक प्रती निघू सहजी निघू लागल्या. मग सरोज यांनी त्यांच्या आणखी काही सख्यांना या कामात येण्यास उद्युक्त केले. सामाजिक कामात सहभाग म्हणून या सा-याजनी मिळून एकत्र आल्या… आणि लिहू लागल्या…. त्यातून कवितांचा, गोष्टींचा फुलोरा फुलू लागला…. अक्षरांना नवा उभार आणि अर्थाला उभारी लाभली! पण याही कामाला वेगाच्या मर्यादा पडल्याच. मग ताईनी ब्रेल लिपीत वेगवान छपाई करू शकणारे स्वयंचलित यंत्र इंग्लंडमधून त्यावेळचे म्हणजे आजपासून पंधरा-वीस वर्षांपूर्वीचे सुमारे पावणे तीन लाख मोजून विकत आणले… हे पुण्यातलं पहिलंच यंत्र होते! मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ, कन्नड… या सारख्या भाषांतून ठिपके आकार घेऊ लागले…. भाषांची मर्यादा राहिली नाही. Software तज्ज्ञ श्री. देवेंद्र राक्षे आणि भाषातज्ज्ञ ज्योतीताई जोशी, मुग्धाताई देशपांडे, गौरीताई काळे, सुषमाताई हुपरीकर, सुधाकर वाळंबे, स्वाती आणि राजीव खममकर आणि इतर अनेक लोकांचे साहाय्य होतेच. शालेय क्रमिक पाठ्यपुस्तके तर झालीच. पण इतर विषयांवरील पुस्तकेही निर्माण होऊ लागली. भगवद गीता, तुकोबांची गाथा, आनंद ओवरी नावाचे नाटक यांचाही समावेश झाला. गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोरांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा बंगाली भाषेतील आणि महातामा गांधी यांनी हिंदीत केलेला भावानुवादही सरोज ताई यांनी ब्रेल मध्ये आणला आहे.

आज सरोज ताई यांनी वयाचा अमृत महोत्सव पार केला आहे. पण त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस त्यांनी अंधांच्या आयुष्यात साहित्याचे अमृतकण पेरण्याचे कार्य करून दाखवले आहे. आजही त्यांची ही उधळण अविरत सुरु आहे.

जगदंबेने पुराणात राक्षस निर्दालन केले. नव्या युगात अज्ञानाचे राक्षस नष्ट करण्याचे कार्य करणा-या सरोज ताई आणि त्यांच्या सर्व सहकारी भगिनी महिषासूर मर्दिनीची विविध रुपेच जणू.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ देवी अन्नपूर्णा स्तोत्रम् ॥ – रचना : श्री आदिशंकराचार्य ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ देवी अन्नपूर्णा स्तोत्रम् ॥ – रचना : श्री आदिशंकराचार्य ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

☆ ☆ ☆ ☆

मराठी भावानुवाद

नित्यानंदकरी वराभ्यकरी सौंदर्यरत्नाकरी

निर्धूताखिलघोरपावनकरी प्रत्यक्षमहेश्वरी ।

प्रलेयाचलवंशपावनकरी काशीपुराधीश्वरी

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मातान्नपूर्णेश्वरी ॥१॥

*
नानारत्नविचित्रभूषणकरी हेमाम्बराडम्बरी 

मुक्ताहारविलम्बमानविलसद्वक्षोजकुंभान्तरी ।

कश्मीरागुरुवासिताङ्गुरुचिरा काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मातान्न्पूर्णेश्वरी ॥२॥

*
योगानंदकरी रिपुक्ष्यकारी धर्मार्थनिर्ताकारी 

चंद्रार्कनलाभासमालाहरि त्रैलोक्यरक्षाकारी ।

सर्वैश्वर्यसमस्तावनचित्रकारी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मातान्नपूर्णेश्वरी ॥३॥ 

*
कैलासाचलकंदरालयकरी गौरी उमा शंकरी 

कौमारी निगमार्थगोचरकरी ॐकारबीजाक्षरी ।

मोक्षद्वारकपाटपाटनकरी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातन्नपूर्णेश्वरी ॥४॥ 

*

दृश्यादृश्यविभूतिवाहनकारी ब्रह्माण्डभांडोदरी 

लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपाङ्कुरी ।

श्रीविश्वेष्मनःप्रसादनकरी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥५॥ 

*
उर्वीसर्वजनेश्वरी भगवती माताअन्नपूर्णेश्वरी 

वेणीनीलसमानकुन्तलहरी नित्यान्नदानेश्वरी ।

सर्वानंदकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मातन्नपूर्णेश्वरी ॥६॥ 

*
अक्षान्तसमस्तवर्णनकारी शम्भोस्त्रिभावाकरी 

काश्मीरीआदिरात्रिजलेश्वरी त्रिलहरी नित्याङकुरा शर्वरी ।

कामकाङ्करी जनोदयकारी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मा तन्नपूर्णेश्वरी ॥७॥ 

*
देवी सर्वविचित्ररत्नार्चिता दाक्षायणि सुन्दरी 

वामे स्वपयोधरप्रियकारी सौभाग्यमाहेश्वरी ।

भक्ताभीष्टकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मातन्नपूर्णेश्वरी ॥८॥ 

*
चंद्रार्कनलकोटिकोटिसदृशा चंद्रांशुबिम्बाधारी 

चंद्रार्ककाग्निसमानकुंडलधारी चंद्रार्कवर्णेश्वरी ।

मालापुस्तकपाशसाङकुशधारी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मातन्नपूर्णेश्वरी ॥९॥ 

*

क्षत्राणकरी महाऽभयकरी माता कृपासागरी 

साक्षणमोक्षकरी सदा शिवकरी विश्वेश्वरश्रीधारी ।

दक्षाक्रंदकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी 

भिक्षां देहि कृपावलंबनकारी मातान्नपूर्णेश्वरी ॥१०॥ 

*
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे ।

ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ॥११॥

*

॥इति श्रीआदिशंकराचार्य रचित देवी अन्नपूर्णा स्तोत्रम् संपूर्णम्॥

☆ 

भावानुवाद – 

*
अभयदायी लावण्याची रत्नाकर नित्यानंदकारी

घोर पीडा विषास स्पर्शे पावन करी प्रत्यक्ष महेश्वरी

हिमगिरीवंशा पवित्र केले काशीपुरी देवी ईश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥ १॥

*
सुवर्णवसने शोभुन दिसती रत्ने विविध भूषयती

वक्षावरी रुळती मालामौक्तिक उरोजांमध्ये झळकती

सुगंधित काया करीत केशर अगरू काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥२॥

*
वासनानाशकारी योगानंददायी धर्मअर्थनिष्ठाकारी

अग्नीसूर्यचंद्रभास तेजोलहर त्रिलोक रक्षणकारी

समृद्धीदायी कामनापूर्ती महादेवी काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥३॥

*
गौरी उमा शंकरी कौमारी निवास कैलास नगावरी 

वेदान्त दिव्य बोध ज्ञान ज्ञात ॐकारबीजाक्षरी

कृपा करी मोक्षद्वार मुक्त करी काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥४॥

*
दृश्य-अदृश्य दिव्य गुणधारिणी ब्रह्मांड धारी उदरी

सृष्टी दिव्य ऊर्जा स्रोत प्रकट दीप विज्ञान अंकुरी

विश्व चलनास्तव श्रीविश्वेश्वरकृपा काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥५॥

*
सकल ईश्वरी साक्षात वसुधा माताअन्नपूर्णेश्वरी

नीलकुंतल तरंगती लहरी सदैव अन्नदानेश्वरी

सकलामोदकरी नित्य मंगलकरी काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥६॥

*
समस्त वर्णाक्षरे तथा त्रिगुणशिव वास करी अंतरी

रक्तवर्णी त्रिजलदेवी त्रिलहरी नित्यांकुरी शर्वरी

भक्तकाम पूर्ण करी सकलोदय करी काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥७॥

*
समस्त विविध रत्ने सजली दक्षराजकन्या सुंदरी

वाम स्वपयोधर अति स्वादिष्ट सौभाग्यदा माहेश्वरी

अभीष्टकारी भक्तांसी नित्य मंगल काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥८॥

*
कोटी सूर्य चंद्र वन्ही सम तेज झळकते मुखावरी

अनल सूर्य चंद्रमा सम कुंडलधारी वर्णही चंद्रापरी

माला पुस्तक पाश अंकुशधरिले काशीपुराधीश्वरी

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा माता अन्नपूर्णेश्वरी ॥९॥

*
सामर्थ्य महाभयंकर असे माता कृपासागरी

साक्षात मुक्तीदा नित्य मंगलद विश्वेश्वर श्रीधरी

गर्वा नष्ट करी आरोग्यद काशीपुराधीश्वरी 

सकला आश्रयद दे कृपाभिक्षा मातान्नपूर्णेश्वरी ॥१०॥

*
अन्नपूर्णे नित्यपूर्णे शिवशंकरकामिनी

ज्ञान-वैराग्य साध्य करण्या भिक्षेस दे भवानी ॥११॥

*

॥इति श्रीआदिशंकराचार्य निशिकान्त भावानुवादित रचित देवी अन्नपूर्णा स्तोत्र संपूर्ण॥

☆ ☆ ☆ ☆

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ५ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा… – भाग – ५ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

(आजच्या पाचव्या भागात ज्यांनी साहित्याचा दृढ पाया घालून दिला अशा दुर्गा)

वेगवेगळ्या क्षेत्रातील दुर्गा….

१) आशापूर्णा देवी 

८ जानेवारी १९०९ साळी जन्म झालेल्या या एक प्रसिद्ध बंगाली लेखिका आणि कवयित्री होत्या. कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय, त्यांनी साहित्याच्या आवडीतून स्वतःला घडवले आणि बंगाली साहित्यात मोठे योगदान दिले.

वयाच्या १३ व्यावर्षी त्यांची ‘बाइ देर डाक’ ही पहिली कविता शिशूसाथी मासिकात प्रसिद्ध झाली. आणि त्या आजीवन लिहित राहिल्या. त्यांची दोनशेहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १७८ कादंबऱ्या, ३० कथासंग्रह, ४७ बालवाङ्मय आहे.

१९७६ मध्ये त्यांना ‘प्रथम प्रतिश्रुति’ या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ज्ञानपीठ मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला लेखिका आहेत.

१९९४ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले, जो साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. याशिवायही त्यांनी बरे पुरस्कार मिळविलेले आहेत.

२) एलिस एक्का 

८ सप्टेंबर १९१७ ला यांचा जन्म रांची झारखंड येथे झाला. मूळ आदिवासी मुंडा समुदायाचा भाग होत्या. इतरांपेक्षा त्यांची भाषा, संस्कृती आणि परंपरा वेगळी असल्यामुळे शिक्षण घेतेवेळी त्यांना बराच संघर्ष करावा लागला. १९३८ मध्ये कोलकत्याच्या स्कॉटिश चर्च कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त करणारी ती पहिली आदिवासी महिला ठरली. सुरवातीला त्यांनी हिंदीतून केलेले लिखाण रांचीच्या आदिवासी पत्रिका मधून प्रसिद्ध होत होते. त्यांनी खलील जिब्रानच्या रचनांचे भाषांतर केले आहे. त्या पहिल्या आदिवासी महिला लेखिका ठरल्या. २०१५ मधे त्यांच्या कथांचे संकलन वंदना टेटे यांनी प्रसिद्ध केले.

३) काशीबाई कानिटकर

या पंढरपूरचे कृष्णराव बापट यांच्या कन्या. २० जानेवारी १८६१ रोजी साताऱ्याजवळील अष्टे या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या दोन भावांना शिकवायला पंतोजी येत, ते ऐकून, बघून त्या माहेरीच लिहायला शिकल्या. पुढे स्वप्रयत्नाने मराठी, इंग्रजी, संस्कृत नाटके वाचून त्यांनी आपली आवड जोपासली. तत्पूर्वी वयाच्या ९ व्या वर्षी काशीबाईंचे लग्न वकील गोविंदराव कानिटकरांशी झाले. ते सुधारणावादी होते. गोविंदरावांसोबत त्या रविवारी दुपारी प्रार्थनासमाजातील सभांना जात असत. त्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागली. त्यांनी बखरी वाचल्या. याशिवाय संस्कृत नाटके वाचली. इंग्रजीही त्या शिकत होत्या. गोविंदराव कानिटकर आणि काशीबाईंनी मिळून मनोरंजन आणि निबंधचंद्रिका नावाचे नियतकालिक सुरू केले. तेव्हा गोविंदरावांबरोबरच हरिभाऊ आपटे काशीबाईंना लेखनास उत्तेजन देत असत. त्या पहिल्या महिला कादंबरीकार, कथासंग्रहकार ठरल्या.

‘शेवट तर गोड झाला’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १८८९ ला व ‘रंगराव’ ही त्यांची पहिली कादंबरी १९०३ ला प्रसिद्ध झाली. १९०६मध्ये पुण्यातील ग्रंथकार संमेलनात त्या एकमेव स्त्री लेखिका होत्या. १९०९ मधील वसंत व्याख्यानमालेत त्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्या.

४) महादंबा

जालना जिल्ह्यातील रामसगावच्या, तेराव्या शतकातील चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासी. लहान वयात विधवा झाल्याने वडिलांच्या घरी परतल्या. भक्तीत रममाण होताना उपजत काव्याची ओढ जागी झाली. मराठी भाषेतील पहिली महिला संत कवयित्री आहेत. त्यांच्या काव्यरचनांना सवळी किंवा जवळीका म्हणतात. हा प्रकार धवळा प्रकारात येतो. धवळा हा महानुभव पंथातील धार्मिक विधींचा एक भाग आहे.

५) अमृता प्रीतम 

१९१९ मध्ये सध्याच्या पाकिस्तान पंजाब मध्ये जन्म झाला. फाळणीच्या वेळी त्या भारतात आल्या. १९३६ मध्ये त्यांनी ‘अमृत लेहरन’ नावाचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला. त्याच वर्षी त्यांचा विवाह प्रीतम सिंग यांच्याशी झाला व त्या अमृता कौर च्या अमृता प्रीतम झाल्या. फाळणीपूर्वी त्यांनी लाहोर रेडिओ स्टेशन वर पण काम केले होते. स्वातंत्र्यानंतर सामाजिक कार्यात सहभाग होता. त्यांची ५० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या पुस्तकांचा अनेक देशी-विदेशी भाषात अनुवाद झाला आहे. त्यामुळे त्या विदेशातही तितक्याच प्रसिद्ध आहेत. १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ‘सुनेहे’ या कविता संग्रहास व १९८२ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार ‘कागज ते कॅनव्हास’ या कविता संग्रहास मिळाला आहे. दोन्ही पुरस्कार मिळवणारी ती पहिली महिला कवयित्री आहे.

६) रमाबाई रानडे 

रमाबाई रानडे या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. महिला हक्कांसाठी लढणाऱ्या आणि शेवटपर्यंत हेच कार्य करीत राहिल्या. पहिल्या सार्वजनिक कामात सहभागी होताना, त्यांना पती न्यायमूर्ती रानडे, यांनी भाषण लिहून दिले होते. पण त्यानंतर मात्र त्यांनी इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांत आपली भाषणे स्वतः लिहायला सुरुवात केली. त्या लेखिका नसल्या तरी मराठीतून आत्मचरित्र लिहिणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या नावाने त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे.

७) राससुंदरी देवी 

अंदाजे १८०९ मध्ये त्यांचा जन्म पबना जिल्ह्यात कोटाजिया गावात झाला. त्या बंगाली असून त्याकाळच्या प्रथेप्रमाणे शाळेत जाऊ शकल्या नाहीत. शिक्षणाची आवड असल्याने त्या चोरून मिशनरी शाळेत जायच्या. अशाप्रकारे त्यांनी बंगाली भाषेची अक्षरे शिकून घेतली.

‘अमर जीवन’ हे त्यांनी आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे प्रकाशन १८७६ मध्ये झाले. हे बंगाली साहित्यातील तसेच भारतीय, पहिले ज्ञात आत्मचरित्र म्हणून ओळखले जाते. या आत्मचरित्राचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात १६ लहान गद्य रचना व दुसऱ्या भागात १५ लहान गद्य रचना आहेत व दोन्ही मध्ये एक एक कविता आहे. त्या तशा लेखिका नसून त्यांची ही एकमेव रचना आहे.

८) सावित्रीबाई फुले 

यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये झाला. त्या समाजसुधारक, शिक्षण तज्ञ व कवयित्री होत्या. त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी पुण्यात मुलींची शाळा सुरू केली. १८५४ मध्ये ‘काव्य फुले’ व १८९२ मध्ये ‘बावनकशी’ व ‘सुबोध रत्नाकर’ हे कविता संग्रह प्रकाशित झाले. ‘सावित्रीबाईंची गाणी’ असेही एक पुस्तक प्रसिद्ध आहे. ‘ज्योतिबांची भाषणे’ या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले. तसेच गृहिणी मासिकातही त्यांचे लेख यायचे. प्रगत काळातील त्या पहिल्या महिला कवयित्री आहेत.

९) लल्लेश्वरी देवी 

१३१७ ते १३२० च्या दरम्यान यांचा जन्म श्रीनगर मधील एका छोट्याशा गावात ब्राह्मण परिवारात झाला. सासरी खूप त्रास असल्यामुळे त्यांनी सासरचे घर सोडले व संत श्रीकंठ महाराजांकडून दीक्षा घेतली. त्यांच्या काव्यशैलीला वाख म्हणतात. हा काश्मिरी भाषेतील एक छंद आहे. त्यात चार ओळींमध्ये कवी आपल्याला जे सांगायचे आहे ते लिहितो. तिच्या वाखांमधून तिने धार्मिक अढी कमी केल्या. जाती व धर्म या पलीकडे भक्तिमार्ग आहे हे पटवून दिले. १३९२ मध्ये त्यांचा देहांत झाला तरी आज सुद्धा काश्मीरमध्ये हिंदूंबरोबर मुसलमान सुद्धा लल्लेश्वरी देवीला मानतात.

– भाग ५.

☆

संकलनकर्ता – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares