मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एका काऊंसेलरची डायरी… लेखिका : श्रीमती सुचित्रा पोकळे ☆ प्रस्तुती : श्रीमती रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ एका काऊंसेलरची डायरी… लेखिका : श्रीमती सुचित्रा पोकळे ☆ प्रस्तुती : श्रीमती रेखा जांबवडेकर 

सासू आणि सून… अतिशय नाजूक पण अनोखं नातं.

एक स्त्री लग्न करून एका नवीन घरात पदार्पण करते. घराच्या कानाकोपऱ्यात, भिंतींवर, वस्तूंवर तिचा हात फिरतो आणि परकं म्हणता म्हणता ते हळूहळू तिचं स्वतःचं कधी होऊन जातं, हे तिलाही कळत नाही. त्या घरातली माणसं तिची होतात. त्या घराचे नोकरचाकर तिचे होतात. त्या घरातलं अंगण तिचं होतं, अंगणातली झाडं तिची होतात. झाडांची पानं फुलंही तिची होतात.

या सगळ्यावर ती खूप प्रेम करत असते आणि म्हणून ती ते आपलं स्वतःचं मानत असते.

मग हळूहळू ‘माझं’ चे रूपांतर ‘स्वामित्वा’मध्ये होऊ लागतं. कधीकधी ही स्वामित्वाची भावना इतकी प्रबळ होते की आपल्या राज्यात दुसर्‍यांचं आगमन हा उगाचच ‘शिरकाव’ वाटू लागतो.

आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल ही ‘दुसरी’ व्यक्ती कोण? हो बरोबर ओळखलंत… सून.

काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक सासूबाई आल्या. म्हणाल्या, “मला मदत करा, मी खूप गुंतत चालले आहे. या विचारातून कशी बाहेर पडू कळत नाहीये. “

मी म्हटलं, “मला नीट सांगाल का? “

त्या म्हणाल्या, “दोन महिन्यापूर्वी माझ्या मुलाचं लग्न झालं. नवीन सून घरात आली आणि लगेच लॉकडाउन सुरू झालं. नवीन जोडप्याला कुठे फिरायलाही जायला मिळालं नाही. त्यांना दोघांना एकमेकांना वेळही देता आला नाही. मला खरंच त्याचे वाईट वाटतेय; पण का कुणास ठाऊक, पण मला बरेही वाटतेय की आपला मुलगा आपल्या सोबतच राहिला. सूनही बरोबर राहील. ते एकमेकांना वेळ देतील; पण मलाही त्यांच्यासोबत वेळ घालवता येईल. सुरुवातीला ठीक वाटलं; पण नंतर नंतर आत कुठेतरी तुटल्यासारखं वाटायला लागलं, अहो… काहीतरी सुटल्यासारखं वाटतेय. आपलं राज्य गेलं, आपला डाव संपला असं काहीसं वाटायला लागलं आहे. सूनबाई छान आहे. घराला अगदी आपलंसं केलं तिने थोड्याच दिवसात. पण मला तेच खटकतंय अहो… का असं?

तिची विचार करण्याची पद्धत वेगळी, तिचं राहणीमान वेगळं, तिचं जेवण बनवण्याची पद्धत वेगळी, घर लावणं, सजवणं याची पद्धत वेगळी. ती सगळं करते; पण तिच्या पद्घतीने. मला हे पचवणं थोडं कठीण जातंय. माझं लेकरू आता माझं राहिलं नाही, माझं घर आता माझं राहिलं नाही, असे काहीसे विचार आताशा मनात यायला लागले आहेत. डोकं भणभणतं अहो माझं. मला सांगा माझं कुठे चुकतंय… “

मी म्हटलं, “पहिले तुम्ही शांत व्हा बरं. इतकं काही झालेलं नाहीये आणि तुमचं इतकंही काही चुकलेलं नाहीये.

मला एक सांगा तुमच्याकडे बाग आहे? त्या बागेत झाडं तुम्ही स्वतः लावली. बरोबर? तुम्ही ती रोपटी कुठूनतरी आणून तुमच्या अंगणात लावली असतील ना? “

त्या अगदी उत्साहाने म्हणाल्या, “हो तर… एक एक रोपटं मी स्वतः आणून आमच्या बागेत लावलं आहे. “

मी म्हटलं, “तुम्ही झाडांना पाणी घालता, खत घालता म्हणजे नक्की कुठे घालता? झाडाला की मातीला? “

त्या म्हणाल्या, “मातीला. “

मी विचारलं, “का? मातीला का घालता? थेट त्या रोपट्यांना का नाही घालत? “

त्या म्हणाल्या, “अहो, मातीला पाणी घातलं, तर त्या रोपट्यांच्या मुळांना ती पकडून ठेवेल आणि मग ते रोपटं छान रुजेल ना. मातीत खत घातलं तर ते अन्न मुळातून झाडाला पोहोचेल ना. “

मी म्हटलं, “अगदी बरोबर आहे;पण म्हणजे त्या दुसरीकडून उपटून आणलेल्या छोटयाशा रोपट्याला आपल्यात सामावून घेण्याची जबाबदारी मातीची आहे आणि म्हणून त्या मातीला आपण खतपाणी घालून तेवढं सक्षम करतो. बरोबर? “

त्या क्षणभर गप्प होत्या. कदाचित त्यांना त्यातला मथितार्थ कळत होता.

मी पुढे म्हणाले, “आपल्या घरात येणारी दुसर्‍या घरची मुलगी ते रोपटं आहे आणि आपण माती. आपली जबाबदारी पहिली. तिची जबाबदारी असतेच, यात शंकाच नाही आणि आपल्या संस्कृतीत ती निभावण्याचे धडे तिच्याकडून लहानपणापासूनच गिरवून घेतलेले असतात. पण मग तरीही हे रोपटं रुजायला वेळ का लागतो? कारण माती कधीकधी आपला धर्म सोडून वागते. मातीचा धर्म आहे रोपट्यांचे पोषण करून त्यांच्या मुळांना आपल्यात सामावून घेणे, स्वतःला घट्ट करून, त्या छोटया छोटया नाजूक मुळांना घट्ट पकडून त्यांना वाढण्यास, रोपट्याचे वृक्षात रूपांतर होण्यास मदत करणे.

माती कधीही असा विचार नाही करत की ही माझी हद्द आहे, इथे दुसरं कुणी आलेलं मला चालणार नाही. “

त्या हसल्या आणि म्हणाल्या, “समजतंय मला. “

मी त्यांना हसून म्हणाले, “अहो, आपण फक्त कर्म करायचं, धर्म निभवायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कायम लक्षात असू द्यायचं की आपण सून आपल्या मुलाचा संसार फुलवण्यासाठी आणत आहोत, तर ती तेच करणार आणि आपण तिला ते फुलवण्यासाठी मदत करायची आहे कारण आता आपली भूमिका बदलली आहे, आता आपला धर्म मातीचा आहे. ”

 मला त्यांना एवढंच सांगून चालणार नव्हतं. हे समजवलेलं शेवटपर्यंत टिकावं म्हणून मला त्यांच्यावर थोडे औषधोपचार करणं जरुरी होतं.

आपलं मूल, आपलं घर आपलं राहिलं नाही, ही काहीतरी तुटल्याची, काहीतरी मागे सुटल्याची भावना, त्यातून येणारा एकटेपणा, एकटेपणातून आलेले नैराश्य, विचारांचा गुंता, भविष्याची चिंता, आपण असे का वागतो, असे वाटून येणारा अपराधीपणा आणि या सगळ्यामुळे जडलेला निद्रानाश या सगळ्यावर त्यांना औषधं दिली.

त्या जाता जाता मला म्हणाल्या, “तुम्ही या मातीला नुसतं खतपाणीच घातले नाही, तर तिला तिचा धर्मसुद्धा शिकवलात. “

मी त्यांना म्हणाले, “याचे श्रेय कदाचित माझ्या आईला जाईल, कारण लहानपणापासून मी तिला माती होऊन दुसर्‍यांना सामावून घेताना पाहिले आहे. “

लेखिका: श्रीमती सुचित्रा पोकळे

प्रस्तुती: श्रीमती रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘वय हे मनाला असतं…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘वय हे मनाला असतं…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

वय हे मनाला असतं. शरीराला वय असतं, असं मला वाटत नाही.

मी आपल्याला एक उदाहरण सांगतो.

पंडित सातवळेकर होते – ज्यांनी वेदांचं भाषांतर केलं.

त्यांना जेव्हा शंभरावं वर्ष लागलं तेव्हा मला असंच मनात आल की ह्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे, तर आपण त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करुन यावं. म्हणून मी पारडीला गेलो.

शंभरावं वर्ष लागलेल्या माणसाला भेटायला जायचं आहे म्हणून मनाची तयारी करुन गेलो. आजारी असतील, आपण दोन मिनिटांत नमस्कार करावा, ‘बरं वाटतंय ना, काळजी घ्या’ वगैरे सांगावं आणि परतावं अशा विचाराने गेलो होतो. पण मी ज्यावेळेला गेलो त्या वेळेला बघतो, तर ते तिथे त्यांच्या छापखान्यामध्ये वेदांच्या शेवटल्या खंडाच्या पुस्तकाची प्रुफं तपासत बसले होते.

तुमच्यापैकी जे कोणी लेखक असतील त्यांना प्रुफं तपासणं म्हणजे काय आणि तीसुध्दा संस्कृतची म्हणजे काय ते कळेल. ते काळजीपूर्वक तपासत बसले होते.

मी नमस्कार वगैरे केला. मला म्हणाले, “मी वाचलं आहे तुमचं साहित्य”.

मी घाबरलोच एकदम. “असलं काही लिहिण्यापेक्षा बरं लिहा” असा शाप देतात की काय असं मला वाटलं. पं. सातवळेकर हे माझं साहित्य वाचत असतील, असं मला कधीही वाटलं नव्हतं. ते वाचत असल्यामुळे त्यांना विनोदबुध्दी आहे – म्हणजे तारुण्य आहे हेही माझ्या ध्यानात आलं.

ते म्हणाले “आता काय आहे, ही प्रुफं करेक्ट करत आहे. हे काम एकदा झालं (हे शंभराव्या वर्षी) की वेदातले सुंदर वेचे आपल्या तरुण पोरांना माहीत नाहीत, ते मी निवडून काढणार आहे आणि या निवडक वेच्यांचा एक ग्रंथ तयार करणार आहे. त्यात पुढली आठ-दहा वर्ष जातील”.

शंभराव्या वर्षी पुढल्या आठ-दहा वर्षांचा कार्यक्रम त्यांच्या हातात होता. पुष्कळ वेळेला आपण म्हातारे अशासाठी होतो, की तुम्ही जगताय कशासाठी या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाही. फक्त आर्थिक उत्पादनासाठी, महिना पगारासाठी हे उत्तर काही आपलं आपल्यालाच समाधान देत नाही. कशासाठी जगतो त्याला एक उदात्त अशा प्रकारचं काहीतरी प्रयोजन जीवनाला लागतं…

(पं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्तीसमारंभात पुलंनी केलेल्या भाषणातून)

दादा धर्माधिकारी म्हणतात, तारुण्याचे तीन ‘त’ कार आहेत. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. जर या तीन गोष्टी आपल्यात असतील तर वय ही फक्त एक संख्या उरते. पं. सातवळेकरांच्या बाबतीत हेच असावं. म्हणून १०० व्या वर्षी पुढील आठ वर्षांचे नियोजन त्यांच्याकडे होते.

अशा या अलौकिक व्यक्तिमत्त्वांसाठी सहस्र नमन.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘पेन्शन…’ – लेखक: श्री. अमोल अ. पवार ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘पेन्शन…’ – लेखक: श्री. अमोल अ. पवार ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै 

सकाळीसकाळी, बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडत, हुज्जत घालत होती. तिचा आवाज इतका कर्कश होता, की बँकेतले स्टाफही क्षणभर थबकले. ती निराधार योजनेतील तिची पेन्शन मागत होती. पण यादीत तिचे नाव नव्हते. कारण शासकीय टेक्निकल त्रुटीमुळे तिचे नाव वगळण्यात आले होते.

गावातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत अमरनाथची नुकतीच बदली झाली होती. टापटीप राहणीमान, नाकासमोर काम आणि समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलण्याची सवय असलेला हा तरुण, पहिल्याच दिवशी बँकेच्या गडबडीत गोंधळून गेला होता.

तिचं एकच म्हणणं होतं, “तुम्हीच खाताय माझे पैसे. “

अमरनाथने स्टाफकडून विचारपूस केली. उत्तर मिळालं, “तिचं दर महिन्याचं हेच नाटक आहे. कधीही येते, भांडते, ओरडते आणि मग निघून जाते. ”

पण दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळेच घडले.

दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पुन्हा आली, अमरनाथने कॅश काऊंटर घेतले होते.

ती लाईनमध्ये उभी राहिली आणि तिचा नंबर आला तेव्हा पुस्तक दिले आणि ती भांडणाच्या तयारीत उभी राहिली.

अमरनाथने तिला काही न बोलता पाचशे रुपयांच्या नोटा काढून दिल्या.

ती क्षणभर गोंधळली.

मग त्या पैशांकडे पाहून डोळे लुकलुकत म्हणाली, “माझी पेन्शन थटवता व्हय… आज कशी दिली? येत नाय म्हणायचं, अन आता कसली दिली? ”

सगळा स्टाफ अचंबित झाला. पण कुणाला काही कळले नाही.

त्यानंतर दर महिना ती म्हातारी वेळेवर बँकेत येऊ लागली. पेन्शन घेऊन जाऊ लागली.

एक वर्ष, दीड वर्ष सरले. दर महिन्याला ती आली, लाईनीत उभी राहिली, पुस्तक दिले, आणि तिच्या हक्काच्या पेन्शनचे पैसे अमरनाथकडून घेत राहिली.

अमरनाथने एकदाही तिला खरे सांगितले नाही की ते पैसे त्याच्या पगारातून जात आहेत.

त्या दरम्यान त्यांची चांगली ओळख झाली. अमरनाथ तिचं पुस्तक घेताना हसून म्हणायचा, “आज्जी, येतेय की नाही आता शासनाकडून पेन्शन… तुमचा दरारा सगळ्यांच्यावर आहे” आणि ती काहीबाही बडबड करत पैसे घेऊन जायची.

दोघांत चेष्टा मस्करी चालू लागली.

परंतु, एके दिवशी अमरनाथ बँकेत नव्हता.

ती आली, लाईनीत उभी राहिली.

पुस्तक दिले.

पण स्टाफने तिला सरळ सांगितले.

तिचं खातं बंद झाले आहे…!

तिला राग आला आणि ती अजून बडबड करू लागली.

“तो साहेब कुठंय? तो दर महिन्याला देतो मला माझी पेन्शन! “आणि आता आज काय झालं..

स्टाफने सांगितलं,

“अमरनाथ साहेबांचा आज अपघात झालाय. ते गंभीर जखमी झालेत. आणि कराडच्या दवाखान्यात आहेत. “

म्हातारी काही बोलली नाही. गप्प बसली. दुसऱ्या दिवशी ती परत आली. पुन्हा विचारलं.

“पैशे आले नाहीत आणि नेहमीचे अमरनाथसाहेब पण आले नाहीत. ” ती दंगा करू लागली.

मुख्य साहेबांनी तिला केबिनमध्ये बोलावलं. आणि खरे सांगितले.

“आज्जी, तुमची पेन्शन सरकारकडून गेल्या दीड वर्षांपूर्वीच बंद झाली आहे. अमरनाथ साहेब दर महिन्याला तुम्हाला त्यांच्या पगारातून तुमची पेन्शन द्यायचे. आणि आता त्यांचा अपघात झालाय. बेशुद्ध आहेत. ऑपरेशनसाठी तीन चार लाख लागणार आहेत. “

तिचा चेहरा पडला. ती काहीही बोलली नाही. शांत मान खाली घालून उभी राहिली. तिचे डोळे भरून आले आणि ती तिथून निघून गेली.

त्याच रात्री कराडच्या हॉस्पिटलमध्ये अमरनाथचे ऑपरेशन करायचे होते. खर्च – चार लाख येणार होता.

घरात वडील नव्हते.

एक आई, एक लहान बहीण.

दोघीही रडत होत्या.

स्टाफ आणि साहेबांनी साडेतीन लाख त्यांच्या हातात दिले आणि त्यांना मदत केली. ऑपरेशन झाले. काही दिवसांनी अमरनाथ शुद्धीवर आला. हालचाल झाली. बोलू लागला. आईने साहेबांनी मदत केल्याचे सांगितले. त्याला खूप अभिमान वाटला की सर्वांनी मदत केल्यामुळे आपल्याला अमोल जीवदान मिळाले आहे. त्यांचे उपकार विसरता येणार नाहीत.

एक महिना गेला. तो बँकेत येऊ लागला.

काम सुरळीत सुरु झाले.

पेन्शन वाटपाचा दिवस आला.

अमरनाथ काउंटरवर होता. आणि ती म्हातारी पुन्हा आली.

पुस्तक दिलं.

आजारपण, औषधाचा खर्च व कामावरील सुट्टीमुळे अमरनाथकडे तिला द्यायला पैसे नव्हते.

तो म्हणाला, “आज्जी, आज आले नाहीत पैसे… पण इथे दाखवतेय की उद्या नक्की येणार आहेत… ” त्याचं बोलणं अडखळलं. त्याच्या डोळ्यांत अपराधीपणा दिसत होता.

म्हातारी काही बोलली नाही.

ती सरळ आत काऊंटरमध्ये गेली. आणि एका क्षणात अमरनाथला घट्ट मिठी मारली. व जोरजोरात रडू लागली. त्याला काहीच कळले नाही.

सगळा स्टाफ बाहेर आला. आश्चर्याने सगळे बघत होते.

साहेब केबिनमधून बाहेर आले, पुढे येऊन म्हणाले, “आता सांगतो अमरनाथ…

हिला सगळं कळलं आहे. तू तिला तुझ्या पगारातील पैसे देत होतास, हे जेव्हा तिला कळलं तेव्हा अपघातानंतर तुझं ऑपरेशनच्या वेळी एका तासात हिने तिचं घरातील सोनं गहाण ठेवून साडेतीन लाख रुपये माझ्याकडे आणून दिले.

आणि एक अट घातली – हे तुला सांगायचं नाही. आम्ही मान्य केलं. पण आज ती थांबू शकली नाही. तू तिला दर महिन्याला मदत करत होतास. आणि तिला समजल्यावर तिने कसलाही विचार न करता तिच्या आयुष्याची शिदोरी तुला देऊन तुझा जीव वाचवला. “

अमरनाथचे डोळे भरून आले. त्याने त्या म्हातारीला घट्ट मिठी मारली आणि दोघे आज्जी-नातू रडू लागले.

अमरनाथ म्हणाला “आज्जे, का एव्हढं केलंस माझ्यासाठी.. “

आज्जी रडत म्हणाली, ” मी परकी असली तरी तू आज्जीसारखं माझ्यावर प्रेम केलंस… मला दीड वर्ष पेंशन देत हुतास. मग मी माझ्या नातवाला अशी दवाखान्यात तडपडत ठेवेन का रे बाळा….!”

पण सगळा बँकेचा माहोल भावनिक झाला.

सगळेजण रडत होते.

कधी कधी आपलं दिलेलं प्रेम आणि केलेली मदत नकळत आपल्या आयुष्यात मोठं काही परत घेऊन येतं. कर्माच्या हिशेबात एकही रुपया कमी-जास्त राहत नाही. जीवन अमोल आहे.

दिलेलं आपल्याकडे परत येतंच – त्यामुळे कर्मावर विश्वास ठेवून कर्म चांगले करत रहा.

लेखक: श्री. अमोल आ. पवार

प्रस्तुती: श्री. ब्रह्मानंद पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलं आणि काम… – लेखिका: सौ. अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ वजनकाटा ठेवला झाकून – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

परवा आमच्या घरी एक सुशिक्षित महिला तिच्या तरुण मुलीला घेऊन आली होती. त्यांच्या ओळखीच्या एका महिलेला महिला मदत केंद्रात काही काम मिळेल का, याची चौकशी करण्यासाठी त्या आल्या होत्या. त्या दुरून आल्यामुळे मी त्यांच्यासाठी पोहे भिजवले.

दोघी मायलेकी स्वयंपाकघरात येऊन बसल्या. त्या मुलीला म्हणाल्या, “काकूंना मदत कर.” मी मोठ्या कौतुकाने त्यांच्या मुलीसमोर कोथिंबीर ठेवली आणि तिला निवडायला सांगितली.  कांदा चिरताना सहज त्या मुलीकडे पाहिलं, तर ती दोन्ही हातात कोथिंबिरीची काडी धरून खाली-वर पाहत होती. मी तिच्याकडे पाहत आहे हे लक्षात आल्यानंतर तिने विचारले,

“काकू, ट्विग्ज ठेवायच्या की फक्त पानं ठेवायची?”

“तू घरी जशी निवडतेस, तशीच निवड.”

मी म्हणाले. मग त्या मुलीने तिच्या आईकडे पाहिलं.

दोघीही मायलेकी ‘दृष्टादृष्ट विजये होआवेजी…’ अशा अद्भुत पद्धतीने एकमेकींकडे बघू लागल्या. मग मी पुढे होऊन डाव्या हातात एक काडी घेतली आणि  कोवळ्या देठांसह पाने तोडून तिला कोथिंबीर कशी निवडायची, ते दाखवले. मी दोन-तीन दांड्या तोडून दाखविल्यानंतर तिने लक्षपूर्वक पाहिले आणि म्हणाली,

“ओह… ओक्के…”

मग ती अत्यंत सावकाश आणि काळजीपूर्वक कोथिंबीर निवडू लागली.

“अहो मॅडम, आम्ही तिला घरातले कोणतेच काम करू देत नाही. तू फक्त तुझा अभ्यास कर, असे आम्ही तिला सांगितले आहे…”

तिची आई अभिमानाने मला म्हणाली.

मुलीला घरातले काम करू न देण्यात कसला अभिमान आहे, ते मला समजत नाही.

पंधरा वर्षाच्या त्या मुलीला साधी कोथिंबीर निवडता येत नाही, याचे मला खरोखर आश्चर्य वाटले. माझा मुलगा पाचवीत असल्यापासून व्यवस्थित कोथिंबीर निवडतो. तो काही रोज कोथिंबीर निवडत नाही, पण त्याला कशी निवडायची ते पाहून पाहून माहीत आहे.

विशिष्ट क्षेत्रात अत्यंत उच्च दर्जाचे करिअर किंवा कौशल्य असणाऱ्या व्यक्तींकडून कोथिंबीर निवडण्याची अपेक्षा ठेवू नये; परंतु सामान्य कुटुंबातल्या सामान्य मुला-मुलींना हे कौशल्य यायला काही हरकत नसावी, असे वाटते.

काही जीवनावश्यक कौशल्ये योग्य वेळी मुला-मुलींना शिकवली पाहिजेत. इथे लिंगभेद न करता सगळी कामे दोघांना आली पाहिजेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्यांना भाकरी करता येत नाही अशा अनेक महिला मला माहीत आहेत. भाकरी करता येणे, हे जगातले सर्वोच्च कौशल्य नव्हे. पण स्वतःला खाण्यापुरता स्वयंपाक करता येणे निश्चितच गरजेचे आहे.

आमच्या ओळखीतल्या एका उच्चभ्रू आणि सुशिक्षित कुटुंबात त्यांच्या मुलासाठी मुलगी पाहणे सुरू आहे. त्यांचा मुलगा पुण्यात शिकला आणि चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे. बाहेर एकटा राहिल्यामुळे त्याला स्वयंपाक आणि घरातली कामे चांगली करता येतात, असे त्याच्या आईने सांगितले. त्यांनी मोठ्या शहरातल्या काही कमावत्या मुली पाहिल्या. पण त्या मुलींनी ‘घरातली कामे करण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही,’ असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे त्याची आई आता खेड्यावरच्या कमी शिकलेल्या मुली शोधत आहे.

मुलगा असो किंवा मुलगी, आयुष्यात घरातली सगळी कामे कधी ना कधी करावीच लागतात. स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी स्वयंपाक करण्यात किंवा इतर कामे करण्यात काही कमीपणा आहे असे मुलींना का वाटत असावे?

मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी दैनंदिन कामे कितीही क्षुल्लक वाटली तरी ती महत्त्वाचीच असतात. शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि स्वातंत्र्य मिळाले, म्हणून या कामांचे महत्त्व कमी होत नाही.

टापटीप, नीटनेटकेपणा, घरगुती स्वच्छता याचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही. सुशिक्षित आणि अशिक्षित दोघांनाही याची सारखीच गरज आहे. कमावत्या मुलींनी घरातली कामे करण्यात काही कमीपणा आहे, अशी विचित्र विचारधारा पाहिली की आश्चर्य वाटते.

महात्मा गांधींनी ‘नई तालीम’ ही शिक्षण पद्धती सुरू केली होती. इथे विद्यार्थ्यांना अन्न पिकविण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत  सर्व प्रकारचे जीवनावश्यक शिक्षण द्यावे, असे त्यांचे मत होते. कुठलेही काम कमी दर्जाचे नाही आणि कुठल्याही कामाची लाज वाटते कामा नये, असा त्यापाठचा विचार होता.

पूर्वी जिल्हा परिषद शाळांना ‘जीवन शिक्षण विद्या मंदिर’ असे नाव दिले जायचे.

जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत कौशल्ये सर्वांनी शिकली पाहिजेत, अशी यामागची विचारधारा होती. आपण कितीही उच्च-अत्युच्च शिक्षण घेतले तरी भूक लागल्यावर पटकन दोन पोळ्या करून खाता यायला पाहिजेत. डाळ, भात, खिचडी करता आली पाहिजे.

“आम्ही आमच्या मुलींना अजिबात काम सांगत नाही.” असे आजकाल अनेक आया बोलताना आढळतात. पण “आम्ही आमच्या मुलींना अजिबात मोबाईल वापरू देत नाही,”  असे बोलणारी मात्र एकही आई सापडत नाही. दिवसाचे 24 तास कुणीच अभ्यास करत नसते. यांच्या मुली अखंड मोबाईलमध्ये मुंडी खुपसून बसलेल्या यांना चालतात. घरातली कामे करताना मात्र चालत नाहीत‌.

मुला-मुलींच्या हातात आयते ताट द्यायचे, इथपर्यंत ठीक आहे; पण जेवल्यानंतर ताट सिंकमध्ये नेऊन टाकावे, एवढे पण यांना जमत नसेल तर ही काही यांच्या उज्वल भविष्याची नांदी नाही.

सगळ्यात शेवटचा आणि गंभीर प्रश्न- या सगळ्या मुली श्रीमंत घरात गेल्या, तर नोकर चाकर ठेवू शकतात किंवा कामासाठी अत्याधुनिक मशीन्स वापरू शकतात. पण या स्वतःच कमी कमावत असतील किंवा मध्यमवर्गीय कुटुंबात राहायची वेळ आली, तर या काय करणार? त्यातही त्या अजिबात कमावत नसतील आणि गरिबीत राहायची वेळ आली तर ‘आम्हाला कामाची सवय नाही,’ असे म्हणून यांचा निभाव लागेल का?

भविष्यात कधीतरी स्वतःचा संसार सुरू केल्यानंतर जर यांना घरातली कामे करायची अशीच लाज वाटत राहिली तर त्यांचं कुटुंब चालणार कसे? आपल्या मुलांनी कामच करायचे नाही, असल्या कुठल्यातरी भ्रामक कल्पनांच्या आहारी जाऊन आपण नवीन पिढीचे नुकसान तर करत नाही ना, याचा प्रत्येक पालकाने शांतपणे विचार केला पाहिजे.

लेखिका: श्रीमती अमृता खंडेराव.

प्रस्तुती: श्रीमती प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “परतवारी…” – लेखिका:सौ.नीलिमा लेले ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “परतवारी…” – लेखिका:सौ.नीलिमा लेले ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सुमेधाबाई घराला कुलूप लावून बाहेर पडल्या.रोजच काही बाहेरची कामे करुन थोडंसं चालून परत घरी जायचं, हा शिरस्ता होता त्यांचा .

त्यांच्या मनात आलंच, आज लायब्ररीत गेल्यावर ग्रंथपाल म्हणणारच आहेत ,अहो किती उशीर ?वेळेवर पुस्तके परत करा .

त्या म्हणाल्या , सॉरी हं! पाहुणे होते त्यामुळे जमलं नाही .

त्यांच्या मनात आलं, माझा ७० वा वाढदिवस म्हणून सगळे जमा झाले होते हे कुठे त्यांना सांगा .

 त्या म्हणाल्या, “अहो हे पुस्तक वाचायचं राहिलं.’परतवारी’. न वाचता परत करवेना .

अहो ,पंढरपूरच्या वाटेवरील  ज्ञानोबा माऊलींच्या  वारीवर सारेच भरभरुन लिहितात पण पंढरपूरहून आळंदीला परत जाताना त्या पालखीबरोबर  परतीची पण १० दिवसाची परतवारी असते हे माहीतच नव्हतं हो कधी .”

ग्रंथपाल म्हणाले, “हो बऱ्याच जणांचा अभिप्राय आहे, छान आहे पुस्तक असा. ठीक आहे होतो उशीर एखादेवेळेस. चालायचंच.”

 

त्या दुसरी पुस्तके घेऊन बाहेर पडल्या .

आता थोड्या वेळ  चालावं म्हणून त्या समोरच्या पार्कात शिरल्या .

चालताना तेच होतं डोक्यात ,या लेखकाला इतकी कष्टाची परतवारी का करावीशी वाटली असेल?

आपल्याला हे माहीतच नव्हतं .

 त्यांच्या मनात आलं, मीही १५ वर्षांपूर्वी एकदा मैत्रिणीबरोबर वारीचा अनुभव घेतलाय की.घरात काय कौतुक सगळ्यांना माझं तेव्हा!अगदी  नवऱ्यासकट

मुलांनीही  वारीच्या वाटेवरील प्रत्येक गावात कुणी ओळखीचं आहे का शोध घेतले. फोन नंबर मिळवले. मला कुठेही कसली अडचण येऊ नये म्हणून . बरोबर  तयारी किती, काळजीने प्रत्येकाच्या सूचना किती!

पण एकदा अनुभव घ्यायचाच होता.

मग एका चांगल्या दिंडीत पैसे भरलेच होते आणि तरीही वाटलं तरी प्रत्येक गावात कुणी ना कुणी ओळखीचे होतेच .

आणि तसाही  गावोगावी पालखीचा काय थाट असतो!प्रत्येक मुक्कामी लाखभर  लोक असतात . वारकऱ्यांसाठी सारा गाव अक्षरश: सेवेला असतो. अगदी चहा, जेवण, औषधांपासून रात्री दमल्यावर पायाला तेल चोळून देण्यापर्यंत सारे सेवा करतात.

आणि हे दरवर्षी असतं.

त्या वारीला  सुधीर महाबळांनी ऐश्वर्य वारी म्हटले आहे आणि परत वारीला वैराग्य वारी .

कारण परतीच्या प्रवासात ४००/५०० च लोक असतात वारीबरोबर .

चालताना आपण एकेकटे असतो .

वाटेवरच्या  गावात त्यावेळेस कसलीही सेवा पुरविली जात नाही .

जिथे पालखी उतरलेली असते तिथे थोडीफार सोय होते .

जो प्रवास जाताना २०/२२ दिवसांचा असतो तो परतताना फक्त १०  दिवसांचा असतो त्यामुळे मुक्कामाचे थांबे पण निम्मे होतात .

रोज ३५ किलोमीटर चालायचं. रात्री  १/२ वाजताच चालायला सुरुवात करायची.

कुठे मिळेल तिथे टेकायचं काय मिळेल ते खायचं .

आता कोणीही नसतं आपल्या स्वागताला .

त्यामुळे इथे स्वार्थ अहंकार  गळूनच पडतात.म्हणून याला त्यांनी वैराग्यवारी म्हटले आहे .

वाचताना सुद्धा मन हरवून गेले त्या वातावरणात .

ते वाचल्यानंतर मनात आलं ,

खरच आपला जीवनप्रवास म्हणजे पण एक वारीच आहे की .जिथे सुरुवातीचा संसाराचा काळ … ,मी त्याला आनंदवारी म्हणेन ….किती सुखसोयी ,किती मानसन्मान, किती कोडकौतुक .

कितीही कष्ट पडले तरी रात्री येणारी  सुखाची झोप आपली होती .

रोज सांजवात लावताना तुळशीजवळ दिवा लावताना हात जोडले की देवाचा वरदहस्त  आहे आपल्या माथ्यावर याची जाणीव व्हायची. 

पण आता गाडी उताराला लागेल तेव्हा ती परतवारीच म्हणावी लागेल .

आरोग्य जे पूर्वी टिकून रहात होतं ते वेगाने आपलं आसन हलवतंय, याची जाणीव होईल  . 

आपल्या आनंद वारीत आपल्या आजूबाजूला अनेक हात आपल्या हातात होते.

त्यांच्यासमवेत रस्त्यावरील प्रवास  कसा आनंदात गात व्यतीत होत होता . 

आता एकेक हात हातातून निसटतोय .

 

परतवारीत माऊलींच्या पादुका आपल्या स्थानी परत नेण्याचे कर्तव्य असते ते भक्तीने निभावलेले असते .

 तसंच आपले सारे करणारे मदतीचे हातही फक्त कर्तव्य म्हणूनच आपली पालखी उचलतील .

 

खाण्यापिण्याचे आता लाडही  होणार नाहीत  कारण आपली वैराग्यवारी सुरु होणार आहे .

त्यात आपसूकच शरीराच्या गरजा कमी होतील. जिभेचे चोचले कमी करावे लागतील .

 

त्या  परतवारीत जसं जीवनाचं प्रखर वास्तव नजरेत आलं लेखकाच्या,तसं आता आपल्यालाही हळूहळू ही प्रखर जाणीव होत राहील .

 

पण म्हणून कुणी वारी, परतवारी थांबवत नाही .

आयुष्यातील सारे टप्पे पूर्णपणे  जगल्याशिवाय मुक्ती नाही, हे वास्तव आहे .

मग जे जगायचे ते या सुंदर  जीवनावरील प्रेमाने, त्याने दाखवलेल्या आनंदवारीतील अनेक अनुभवातून समजलेल्या त्या शक्तीचे  भक्तीभावाने ऋण मान्य करण्यासाठी तरी आनंदवारीबरोबर परतवारीही तेवढ्याच आनंदाने करायला हवी .

 

वारीमध्ये लाखो लोक असतात, तेव्हा भजन कीर्तन आणि आजूबाजूला कोलाहलअसतो. पण परतवारीत बरोबर कोणीही नसते.

 पालखीच्या आगे मागे  चालत रहायचे.

रात्रीच्या पहाटेच्या नीरव शांततेत  गहिऱ्या निसर्गाचे, पक्षांचे ,पायाखाली वाजणाऱ्या पानांचे ,अंधाराचे ,शांततेचे जे  अनुभव येतात ते माणसाला अंतर्मुख करतात, असे लेखकाने म्हटले आहे .

 

आपल्या आयुष्यातील परतवारीमध्ये पण आपण एकटेपणाच्या संगतीत  पहाटेच्या नीरव शांततेत एकट्यानेच मार्गी चालताना

असे अंतर्मुख करणारे क्षण आपणही  अनुभवणार आहोतच .

 

वारीबरोबरच परतवारीही  असते आणि इतक्या कष्टातही ती करणारेही असतात, हे कळल्यापासून तर खरंच ही वारी आणि परतवारी  म्हणजे सुद्धा जगण्याचं शिक्षण देणारे ,वारीचा आनंद घेतल्यावर परतीच्या प्रवासात मनाला समजावून हसत हसत वास्तव स्वीकारायला लावणारे ,

आपल्या मनाला शिस्त लावणारे ,

तरी परत परत ओढ लावणारे

विद्यापीठच आहे हे मान्यच झाले मला,

असं म्हणत त्यांनी समोर पाहिले .

कधी घर आलं कळालंच नाही, असं म्हणत सुमेधाबाई पर्समध्ये किल्ली शोधायला लागल्या .

लेखिका:सौ.नीलिमा लेले

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मुलं खरंच बदललीत का?…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “मुलं खरंच बदललीत का???” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

मुलं खरंच बदललीत का??? ”

“मुलं बदललीत… आजकालच्या पिढीला आई-वडिलांची किंमत राहिली नाही” — असं म्हणणं आपण वारंवार ऐकतो. पण खरंच मुलं बदललीत का? की त्यांच्या आयुष्याची परिस्थिती इतकी बदलली आहे, की त्यांना बदलणं भागच पडलं आहे?

पूर्वीचं जीवन निराळं होतं. घर मोठं होतं, शेती हा मुख्य व्यवसाय होता, सर्वजण एका छताखाली राहत होते. घरातली वयोवृद्ध आई-वडील एक कोपऱ्यात असायचे, तरी त्यांचं अस्तित्व घरातल्या प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचं असायचं. पण आज?

शहरातल्या छोट्या फ्लॅटमध्ये, तीन खोल्यांतच सगळी कोंडी. ऑफिस, मुलांचं शिक्षण, गृहिणींचं काम, आणि आई-वडिलांची सेवा — सगळं एका साच्यात बसवायचं म्हटलं की खरच शक्य होत का. त्यात च आईवडिलांना गावी राहायची सवय असेल तर त्यांना इकडे करमत ही नाही.

आजचं युग तंत्रज्ञानाचं आहे. सगळं काही झपाट्याने बदलतंय — महागाई, स्पर्धा, अपार खर्च. वयोमानानुसार औषधांची गरज वाढते, पण त्या औषधांचा खर्च आणि दवाखान्यांची फी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. सरकारी रुग्णालयात सोयी नाहीत, आणि खासगी दवाखान्यात उपचार अतिशय महाग झाले आहेत. ब्लड टेस्ट, एक्सरे एमआर आय हे सगळ करायचं असेल तर ते सर्व खूप च खर्चिक आहे. कुठून आणणार ही मुलं. त्यातल्या त्यात ज्यांना पेन्शन आहे त्यांचं ठीक आहे. पण पेन्शन नसेल तर….

लोक म्हणतात आईवडिलांनी नाही का चार मूल सांभाळली. खरे आहे ते. पण लहान मुलांना एव्हढा दवाखाना लागत नाही.

या सगळ्यातून एक मुलगा किंवा सून, खऱ्या अर्थानं हतबल होतात. त्यांच्यात भावना आहेत, त्यांनाही वाटतं की आईवडिलांचं योग्य सांभाळ करावा, त्यांना आधार द्यावा. पण वास्तव ही वेगळीच कहाणी सांगतं.

कामाच्या वेळा, आर्थिक अडचणी, जागेची कमी, आणि वाढती जबाबदारी यामुळं त्यांचीही चिडचिड होते. ते अपयशी नाहीत, पण परिस्थितीमुळे थकलेले असतात.

म्हणून, याआधारे विचार केल्यास, मुलं बदलली आहेत असं म्हणण्याऐवजी,

“परिस्थिती बदलली आहे, आणि त्यात सगळ्यांनाच जुळवून घ्यावं लागतंय, ”

असं म्हणणं जास्त योग्य ठरेल.

माणूस वयाने मोठा झाला की त्याला औषधापेक्षा माणसांची साथ हवी असते. घर छोटं असलं तरी मन मोठं असेल, तर आईवडील त्यातही मावत असतात. आणि मुलं अपुरी असतात असं नाही — त्यांना फक्त समजून घ्यायला हवं.

शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं:

“नात्यांना दोष देण्यापेक्षा, परिस्थिती समजून घ्या… माणूस मनाने जवळ आला, की जागेचा प्रश्नच उरत नाही!”

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सगळं उभं आहे पण… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

 

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ सगळं उभं आहे पण… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सगळं उभं आहे… पण माणूसपण…

… कोसळत चाललंय

आजच्या जगात आपण पाहिले तर भौतिक प्रगती आणि विकासाची एक अकल्पित लाट आलेली आहे. उंचच उंच इमारती, वेगवान तंत्रज्ञान, एका बटणावर उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधा, जगाच्या पाठीवर कुठेही संपर्क साधण्याची क्षमता – या सर्व गोष्टी खऱ्या अर्थाने ‘उभ्या’ आहेत. आर्थिक समृद्धीचे आकडे वाढत आहेत, नवनवीन शोध लागत आहेत आणि मानवी जीवनातील अनेक कष्ट कमी झाले आहेत. शिक्षण, आरोग्य, दळणवळण यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपण मैलाचे दगड पार केले आहेत. एकंदरीत पाहता, बाह्यतः जग खूप मजबूत आणि स्थिर उभे असल्याचे दिसते.

परंतु, या भौतिक विकासाच्या गडद छायेत एक गंभीर आणि चिंताजनक सत्य लपलेले आहे: ‘माणूसपण कोसळत चाललंय’. माणूसपण म्हणजे केवळ मानवी शरीराचा अस्तित्त्व नव्हे, तर ती भावना, संवेदना, सहानुभूती, नैतिकता, परोपकार आणि दुसऱ्यांबद्दलची आत्मीयता होय. हीच माणुसकी आज हळूहळू नाहीशी होत असल्याचे दिसत आहे.

माणूसपण कोसळण्याची कारणे आणि लक्षणे:

स्वार्थ आणि व्यक्तिवाद:

आधुनिक समाजात ‘मी आणि माझे’ या विचाराने मूळ धरले आहे. स्पर्धा आणि भौतिक ध्येयांच्या मागे धावताना लोक एकमेकांपासून दुरावत आहेत. दुसऱ्यांच्या गरजा, दुःख आणि अडचणींकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती वाढत आहे.

संवादहीनता आणि दुरावा:

तंत्रज्ञानाने जगाला जोडले असले तरी, माणसा-माणसांतील प्रत्यक्ष संवाद कमी होत आहे. कुटुंबातील सदस्यही एकमेकांशी संवाद साधण्याऐवजी मोबाईल फोनमध्ये गुंतलेले दिसतात. या आभासी जगात खरी नाती आणि भावनांची कदर कमी होत आहे.

संवेदनशीलता हरवणे:

रस्त्यावर एखादा गरीब किंवा गरजू व्यक्ती दिसल्यास अनेकदा लोक दुर्लक्ष करतात. अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी धावून येणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. दुसऱ्यांच्या दुःखावर सहज प्रतिक्रिया न देण्याची, किंवा त्याकडे संवेदनहीनपणे पाहण्याची प्रवृत्ती वाढत आहे.

नैतिक मूल्यांची घसरण:

प्रामाणिकपणा, सचोटी, वचनबद्धता यांसारखी नैतिक मूल्ये दुय्यम ठरवली जात आहेत. भ्रष्टाचार, फसवणूक आणि अनैतिक मार्गांनी प्रगती साधण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसते, ज्यामुळे सामाजिक विश्वास कमी होत आहे.

गरिबी आणि विषमतेकडे दुर्लक्ष:

एकीकडे प्रचंड पैसा आणि समृद्धी दिसत असताना, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात गरिबी, उपासमार आणि वंचितता आहे. या विषमतेकडे समाजाचे डोळे झाकले जात आहेत, आणि ‘माझे काम झाले’ ही भावना वाढत आहे.

नैसर्गिक आपत्ती आणि माणुसकी:

जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात, तेव्हा माणुसकी जागृत होते, पण ती अल्पकाळ टिकणारी असते. त्यानंतर पुन्हा दैनंदिन जीवनातील धावपळीत आपण माणुसकी विसरून जातो.

आज खऱ्या अर्थाने आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण ज्या भौतिक प्रगतीचा अभिमान बाळगतो आहोत, ती जर माणुसकीच्या पायावर उभी नसेल, तर ती कितीही उंच असली तरी ती कधीही कोसळू शकते. इमारती कितीही मजबूत असल्या तरी, आत राहणारे लोकच जर संवेदनाहीन असतील, तर त्या इमारतींना काय अर्थ?

‘सगळं उभं आहे’ हे सत्य आहे, पण हे केवळ बाह्य स्वरूप आहे. खरा धोका ‘माणूसपण कोसळत चाललंय’ यात आहे. माणुसकी जपण्यासाठी आपल्याला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. लहानसहान कृतीतून, संवादातून, सहानुभूतीतून आणि परोपकाराच्या भावनेतून आपण या कोसळणाऱ्या माणूसपणाला पुन्हा उभारी देऊ शकतो. अन्यथा, भविष्यात आपण केवळ यांत्रिक आणि भावनाशून्य जगाचे नागरिक बनून राहू, जिथे ‘सगळं उभं असेल’, पण ‘माणूस’ मात्र कोसळलेला असेल.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ द टर्न ऑफ टाईड… – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ द टर्न ऑफ टाईड… – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

आर्थर गॉर्डन या लेखकाने त्यांच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित ‘द टर्न ऑफ टाईड’ नावाची एक सुंदर कथा लिहिली आहे.

त्यांच्या जीवनात एकदा खूप निराशेचा कालखंड आला. शेवटी त्यांना वैद्यकीय मदत घ्यावी लागली… शारीरिक दृष्टीने ते तंदुरुस्त असल्याचे पाहून उपचार करणारे डॉक्टर म्हणाले…

‘‘मी तुमच्यावर उपचार करायला तयार आहे. बरे व्हाल याची खात्रीही देतो. पण माझ्या पद्धतीने उपचार घेण्याची मनाची तयारी हवी. ’’ 

गॉर्डन तयारच होते…

त्यांना चार चिठ्ठ्या देऊन डॉक्टर म्हणाले,

‘‘या चार चिठ्ठ्या घेऊन सकाळी समुद्रावर जा. सोबत खाण्याकरिता काही घेऊन जा. पण पुस्तक, वृत्तपत्र, रेडिओ नको. दिवसभर कोणाशीही बोलायचे नाही. या चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या वेळी चिठ्ठ्या उघडायच्या आणि त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करायचे. ’’ 

दुसरे दिवशी सकाळी गॉर्डन बीचवर गेले…

सकाळी नऊ वाजता त्यांनी एक चिठ्‌ठी उघडली…

त्यावर लिहिले होते… ‘ऐका.’ 

काय ऐकायचे…? त्यांना प्रश्‍न पडला…

ते एका निर्मनुष्य जागी नारळाच्या झाडीत जाऊन बसले… एकाग्रपणे लाटांचा आवाज ऐकणे सुरू केले…

झाडीतून वाहणारी हवा…

मध्येच समुद्रावरून येणारा वारा,..

विभिन्न पक्षांचे आवाज,..

दूरवर आकाशात चित्कार करत उडणार्‍या पक्षांचे आवाज… ,

अशा किती तरी गोष्टी त्यांना हळूहळू स्पष्टपणे ऐकू येत होत्या…

जणु काही स्वतःचे अस्तित्व विसरून ते निसर्गाशी एकरूप होत होते…

भाग आहोत, हे त्यांना जाणवले…

मनातला सर्व कोलाहल थांबला… एका प्रगाढ शांततेचा त्यांना अनुभव येत होता…

बारा कधी वाजले त्यांना कळलेही नाही…

दुसर्‍या चिठ्‌ठीची वेळ झाली होती…

त्यावर लिहिले होते,… ‘मागे वळून पहा. ’ 

त्यांना काय करायचे कळले नाही. पण सूचनांचे पालन करायचेच होते. त्यांनी विचार करणे सुरू केले….

भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोर आला… आई-वडिलांचे निरपेक्ष प्रेम,.. बालपणीचे सवंगडी,.. कट्‌टी आणि क्षणात होणारी दोस्ती,.. त्या हसण्या-रडण्यातील सहजता,.. अकृत्रिम वागणे,.. इंद्रधनुष्यी आयुष्याच्या त्या सुखद आठवणीत ते रमले….

भूतकाळातले आनंदाचे क्षण ते पुन्हा जगले….

आज दुरावलेल्या माणसांनीही कधीकाळी किती प्रेम केले होते, हे आठवून त्यांचा ऊर भरून आला…

आपण बालपणातली निरागसता हरवून बसलो. संबंधात कृत्रिमता, दिखावूपणा, औपचारिकता जास्त आली.

… या विचारात असतानाच त्यांनी तिसरी चिठ्‌ठी उत्सुकतेने उघडली…

त्यात लिहिले होते, ‘‘आपल्या उद्दिष्टांची छाननी करा. ’’

गॉर्डन म्हणतात, ” मी स्वतःला विद्वान समजत असल्यामुळे सुरुवातीला याची मला गरज वाटली नाही. पण मी सखोल परीक्षण केले… आपले उद्दिष्ट काय..?

यश, मान्यता, सुरक्षितता ही काही महत्त्वाची उद्दिष्टे असू शकत नाहीत… ” त्यांच्या लक्षात आले, मनात उद्दिष्टांच्या बाबतीत स्पष्टता नसेल तर सर्वच चुकत जाते…

सायंकाळ होत आली होती. सूर्य अस्ताला जात होता. त्यांनी चौथी चिठ्‌ठी उघडली.

त्यात लिहिले होते, ‘‘सर्व चिंता, काळज्या वाळूवर लिहून परत ये. ’’ 

त्यांनी एक शिंपला घेतला… आणि ओल्या वाळूवर सर्व चिंता सविस्तर लिहिल्या… आणि ते घरी जायला निघाले… समुद्राला भरती येत होती… त्यांनी मागे वळून पाहिले.. , एका लाटेने लिहिलेले सर्व पुसले गेले होते….

गॉर्डन म्हणतात, त्या दिवशी माझा पुनर्जन्म झाला…

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माणुसकीचं दुकान … – लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ माणुसकीचं दुकान … – लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

ते रोजच्याप्रमाणे किराणा दुकान बंद करून गल्लीमध्ये थोडं पाय मोकळे करायला निघाले होते. इतक्यात एक गोड, कोवळी हाक आली —

“काका… काका…”

ते वळाले.

७-८ वर्षांची एक चिमुरडी, धापा टाकत त्यांच्याकडे धावत येत होती.

“काय झालं गं… एवढी धावत आलीस? “

काकांनी थोड्या थकलेल्या पण प्रेमळ स्वरात विचारलं.

“काका… पंधरा रुपयांचे तांदूळ आणि दहा रुपयांची डाळ घ्यायची होती… “

मुलीच्या डोळ्यांत निरागसता आणि गरज दोन्ही स्पष्ट दिसत होती.

काकांनी मागे वळून आपल्या दुकानाकडे पाहिलं.

“आता दुकान बंद केलं गं… सकाळी ये, मिळेल. “

“पण आता हवी होती… “

तिने हळू आवाजात सांगितलं.

“लवकर यायचं होते ना ग… आता सगळं आवरून ठेवलंय. “

त्यांनी सौम्य पण व्यावसायिक स्वरात सांगितलं.

मुलगी गप्प झाली. नजर खाली घालून बोलली,

“सगळी दुकानं बंद झालीत. आणि घरी पीठही नाही… “

हे ऐकून काकांचं काळीज सुन्न झालं. क्षणभर ते शांत राहिले.

“तू आधी काआली नाहीस गं? “

“बाबा आत्ता घरी आलेत… आणि घरी… “

ती थांबली, बहुतेक अश्रू रोखत होती.

काकांना काही विचारायचं नव्हतं आता. त्यांनी तिच्या डोळ्यांत पाहिलं, आणि न बोलता खिशातून दुकानाची चावी काढली.

दुकान उघडलं, आवरलेलं सामान बाजूला ठेवलं आणि डाळ तांदूळ न तोलता थेट थैलीत टाकून दिलं.

ती थैली घेताना म्हणाली,

“थॅंक यू काका… “

“काही नाही गं… आता घरी नीट जा. “

त्या रात्री ते झोपू शकले नाहीत. त्या मुलीचं चेहरा, तिची हतबलता आणि ती एक ओळ 

“घरी पीठही नाही… “

ती सातत्याने त्यांना अस्वस्थ करत राहिली.

त्यांना स्वतःचं बालपण आठवलं.

रिक्शा चालवणारे बाबा, दुसऱ्यांच्या घरात काम करणारी आई… पाण्यात भिजवलेली पोळी खाल्लेली रात्र…

“आज माझ्याकडे दुकान आहे, कमाई आहे… पण माणूसकी आहे का? “

स्वतःला त्यांनी विचारलं.

दुसऱ्या दिवशी दुकान उघडल्यावर त्यांनी एक फलक लावला,

“तुम्हाला गरज असेल आणि पैसे नसतील, तरी संकोच करू नका. हक्काने मागा..

ही उधारी नाही, माणुसकी आहे. “

आणि बाजूला एक डबा ठेवला..

“जर तुम्हाला कुणाला मदत करायची असेल, तर या डब्यात पैसे टाका. “

सुरुवातीला लोक चकित झाले. पण हळूहळू समजलं… हे प्रसिद्धीसाठी नाही, ही मनापासून माणुसकीसाठी केलेली गोष्ट आहे.

एक आठवड्यानंतर तीच मुलगी पुन्हा आली… या वेळेस आपल्या लहान भावासोबत.

“काका, बाबांनी काही पैसे दिले आहेत… मागच्या वेळेस जे घेतलं होतं, त्याचे पण पैसे यातून घ्या. “

“नाही ग, त्या दिवशी जे दिलं होतं, ते माणुसकीचं होतं. त्याचा हिशोब नसतो. “

मुलगी हसली. फलक वाचला आणि म्हणाली

“बाबा म्हणाले की ते रोजंदारी करून आले की, या डब्यात पैसे टाकतील.. जेणेकरून इतरांनाही मदत होईल. “

त्या दिवशी दुकानदाराच्या डोळ्यांत पाणी आलं.

खरंच, “नेकी कधी वाया जात नाही. ”

हळूहळू त्या दुकानाचं नाव पसरू लागलं —

“माणुसकीचं दुकान. “

गल्लीतल्या आजीबाई, एकटे राहणारे वृद्ध, रोजंदारी करणारे मजूर… आता तिथून सन्मानाने सामान घेत.

सक्षम लोक त्या डब्यात थोडे थोडे पैसे टाकत जातात.

शाळेतली मुलं आपला गुल्लक फोडून त्यात पैसे टाकू लागली.

हे दुकान आता केवळ व्यापाराचं ठिकाण नव्हतं, ते एक विश्वासाचं मंदिर बनलं होतं.

नंतर एका स्थानिक पत्रकाराने ही गोष्ट प्रसिद्ध केली…

“जिथे नफा नाही, गरज महत्त्वाची.. वाचा माणुसकीच्या दुकानाची गोष्ट”

ही बातमी व्हायरल झाली. अनेक सोशल मीडिया पेजेसनी त्यावर व्हिडीओ बनवले.

लोक लांबून या दुकानाला बघायला येऊ लागले.

पण दुकानदाराने कधीही त्याचा फायदा घेतला नाही.

“जर एका मुलीच्या उपाशी पोटानं मला बदललं, तर कदाचित हे दुकान इतरांनाही बदलू शकेल. “

ती मुलगी आता रोज शाळेत जाते.

दुकानदाराने तिच्या शिक्षणाची फी गुप्तपणे भरली.

एक दिवस तिचे बाबा म्हणाले

“त्या दिवशी तुम्ही केवळ तांदूळ आणि डाळ दिली नव्हती, माझ्या मुलीला विश्वास दिला की जगात अजूनही चांगले लोक आहेत. “

आजही त्या दुकानाबाहेर तो फलक आहे —

“तुम्हाला गरज असेल आणि पैसे नसतील, तरी संकोच करू नका. “

आणि त्या डब्यात रोज कुणीतरी शांतपणे काहीतरी टाकून जातं…

ही गोष्ट एका चिमुरडीची आहे, पण हे एक मोठं परिवर्तन बनलंय.

“बदल बाहेरून नाही होत… तो आपल्या अंतःकरणातून सुरू होतो. “

लेखिका : सुश्री ज्योती निंबाळकर 

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणसं..!!!” – लेखक – श्री दिनेश हसबनीस ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणसं..!!!” – लेखक – श्री दिनेश हसबनीस ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात कि ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात!!!

१) रायगड १००० वेळा चढून जायचा संकल्प गायक श्री सुरेश वाडकरांनी केला आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत. सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्ष्यांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसादही देतात. 

२) श्री जेधे नावाचा तरुण २७ जानेवारी आणि १६ ऑगस्टला एक गोणी घेऊन बाहेर पडतो आणि रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. सायंकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला एक हार घालतो, नमस्कार करतो आणि ती डम्पिंग ग्राउंडवाल्यांच्या ताब्यात देऊन येतो. हे सगळं कशासाठी तर तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून…!!! कचऱ्यातून आपलं अन्न काढतो असे समजून कुत्रे त्याच्यावर भुंकतात. तो हे काम करतो तेव्हा वेडा वाटतो. त्याला ह्यातून काही मिळत नाही, तरीही तो कर्तव्य समजून दोन दिवस काम करतो.

३) डोंबिवलीतही एक वेडे आजोबा आहेत… रेल्वे रूळ ओलांडायला कितीही मनाई केली, दंड केला तरी घाईत असणारे प्रवासी रूळ ओलांडतातच. आजच्या जीवनशैलीमध्ये इतकी धावपळ आहे की प्रसंगी जीवावर उदार होऊन जगावे लागते. पण डोंबिवलीमध्ये एक आजोबा आहेत, ते काय करतात तर जिथून अनेक लोक रेल्वे रुळांवर शिरतात तिथे सकाळी आडवे उभे राहतात. दोन्ही हात लांब पसरवून ते रेल्वे रुळाकडे येणाऱ्यांना अडवतात. मधेच दोन्ही हात जोडून विनंती करतात की “रूळ ओलांडू नका, पुलावरून जा”. पण समोर लोकल लागली असल्यामुळे अनेकजण त्यांचे हात बाजूला करून रुळावरून धावत सुटतात. डोंबिवली हे तर मृत्यू समोर उभा असेल तरी धावणार शहर! तिथे ह्या आजोबांचं कोण ऐकणार…? तरीही आजोबा नेहमी येऊन उभे राहतात. त्यांना माहित आहे की आज हे रूळ ओलांडतील, पण तसे करणे धोकादायक होते, इतके तरी मनात येईलच. आज रूळ ओलांडले तरी उद्या घरातून लवकर निघतील आणि पुलावरून सुरक्षितपणे जातील. 

४) मुंबईच्या लोकलमधून फिरणारा एक असाच “वेडा” सिंधी दिसतो.

दिसायला खरंच गबाळा आहे. पण काम फार मोलाचं करतो. ऐन उन्हाळ्यात जेव्हा सगळी लोकल तापते, जीव तहानेने व्याकुळ होतो तेव्हा हा सिंधी डब्यात चढतो. त्याच्या हातात दोन मोठ्या थैल्या असतात. थैली उघडतो आणि आपल्या चिरक्या आवाजात “जलसेवा” असे ओरडत तो डब्यामध्ये फिरू लागतो. त्यावेळी त्याने थंड पाणी आणले आहे हे पाहून प्रवासी सुखावतात. पाणी पिऊन तृप्त होतात. एकदा एकाने ह्या त्याला बोलतं केलं होतं. त्याने सांगितलं,

“आम्ही सिंधी लोक तहानलेल्याला पाणी देणं ही झुलेलालची सेवा समजतो.” आम्ही उल्हासनगरमध्ये खूप प्रॉडक्ट निर्माण केले. ते विकून पैसे कमावले. पण आम्ही कधी पाणी विकलं नाही. पण, अब वक्त बदल गया…, आता प्यायला मोफत पाणी मिळत नाही, खरीदना पडता है.

५) एका दैनिकात एका वाचकाने लिहिले होते की, मी आता ७२ वर्षांचा आहे. ह्या ७२ वर्षात मी एकदाही मातृभूमीवर थुंकलो नाही..!!!

किती छोटी प्रतिज्ञा केली ह्या माणसाने. जमिनीवर न थुंकण्याची! आज घडीला भारतातील प्रत्येक भाषेत एक वाक्य भाषांतरित झाले आहे आणि ते म्हणजे; थुंकू नका…!!! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकणे जास्तच घातक बनले होते! प्रत्येकाने वरील माणसासारखा “वेडा” विचार केला तर स्वच्छतेवर होणार प्रचंड खर्च वाचेल. 

६) शर्मा नावाचा एक असाच वेडा आहे. तो कुठेही चारचौघात गप्पा मारताना ऍसिडिटी टाळण्याचे उपाय सांगतो – जेवल्यावर लगेच झोपू नका, अति तिखट खाऊ नका. जेलुसील, रॅनटॅक घेण्यापेक्षा डाळिंबाचा रस किंवा कोकमाचा रस प्या, असे उपाय सुचवतो.

सतत मानसिक ताण असलेल्या व्यक्तीला हमखास ऍसिडिटी होते. म्हणून मानसिक ताण असणाऱ्यांनी कोणती योगासने करावीत हे भर रस्त्यावर करून दाखवतो. 

म्हणून ह्या माणसाला “ऍसिडिटी मॅन” नाव पडलं आहे. कोणाची ओळख असो वा नसो हा माहिती सांगितल्याशिवाय राहत नाही. हे सगळं तो का करतो? तो स्वतः एका मोठ्या कंपनीत केमिकल इंजिनिअर आहे. काही मित्रांना ऍसिडिटी होते हे पाहून ह्याने उपाय शोधले. त्यांना करायला लावले. त्यांचा त्रास कमी होताच ह्याने इतरांना सांगायला सुरुवात केली. रसायनशास्त्र शिकून पैसे मिळवून झाले, आता समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करायचा असे त्याला वाटते. वरवर पाहता हा वेडेपणाच आहे. पण ज्याला सतत आम्लपित्ताचा त्रास होतो त्याला शर्मा हवाहवासा वाटतो. 

७) असेच एक आहेत डॉ. भरत वटवानी. पती-पत्नी दोघेही सायकिऍट्रिस्ट आहेत. एकदा त्यांना एक भिकारी दिसला. तो गटारीचं पाणी पीत होता. वटवानींनी त्याला आधी प्यायला शुद्ध पाणी दिलं. मग त्यांना कळलं की हा मुलगा गावातून शहरात आला असून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. पण मानसिक संतुलन बिघडले आणि तो शहरभर भिकाऱ्यासारखा फिरू लागला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला त्याच्या घरी पाठवले. पुढे वटवानी पती-पत्नी रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक मानसिक रुग्णांवर स्वतःच्या खर्चाने उपचार करत गेले. म्हणून त्यांना Ramon Magsaysay पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. 

— — ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते.अशी ही बिघडलेली माणसे आहेत. आपल्याला समाज, मातृभूमी, आपला देश खूप काही देत असतो. कृतज्ञता म्हणून आपणही खारीचा वाटा द्यायला हवा हा विचार त्यामागे असतो. अशा वेड्या माणसांमुळेच जग सकारात्मक बनतं. 

…… आपणही पृथ्वीतलावर आलो, भारतात जन्मलो. ह्या समाजाचे, मायभूमीचे पांग फेडण्यासाठी थोडा वेडेपणा करायला हवा.

ही अशी वेडी मंडळी पाहिली की शहाणी माणसे खुजी वाटू लागतात. त्यांचं काम समजून घेतल्यावर लक्षात येतं की, ते जे करतात ती माझीही जबाबदारी आहे. 

एक अभंग आहे….;

“आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना”

नीट वाचलं की समजतं;

आम्ही “बी घडलो, “

तुम्ही “बी घडाना

माहिती संकलन : श्री दिनेश हसबनीस

पत्रकार नागपंचमीचे शिराळा. 

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares