मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्णाचे कर्णाला उत्तर… – मूळ बंगाली लेखक: अज्ञात – मराठी अनुवाद: श्रीमती स्वाती दाढे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कृष्णाचे कर्णाला उत्तर… – मूळ बंगाली लेखक: अज्ञात – मराठी अनुवाद: श्रीमती स्वाती दाढे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

हे आजच पोस्ट करतीये, कारण अशी परिस्थिती उद्भवू नये, म्हणून आजपासूनच दक्ष राहूयात.

आज १६ ऑगस्ट. सकाळच्या वेळी रस्त्यातला कागद-कचरा गोळा करणाऱ्या त्या तरुणाची चौकशी करण्याच्या हेतूने कुतूहलाने मी त्याला विचारले, “नाव काय तुझं?”

तो क्षणभर उभा राहिला, हसला, म्हणाला, “खुदिराम..” आणि पुढे जाऊन कागद वेचत वेचत निघून गेला.

त्याच भर दुपारी पाहिलं, पोस्ट ऑफिसच्या समोरच्या कचराकुंडीत हात घालून तोच तरुण काहीतरी शोधत होता. थांबून विचारले, “काय शोधतोस खुदिराम?”

उत्तर मिळालं, “खुदिराम नाही… मी प्रफुल्ल …” माझ्याकडे बघून निरागसपणे हसला आणि कचरा चिवडण्याचे काम काळजीपूर्वक करू लागला. मी अवाक.

दुपारनंतर पुन्हा तो दिसला, तशाच एकाग्रपणे कचरा निवडत असलेला. मी विचारले, “प्रफुल्ल, चहा घेणार?”

तेव्हा माझ्याकडे आश्चर्याने बघत तो म्हणाला, “माझं नाव कानाईलाल…” आणि हसला निरागसपणे.

आता मात्र माझा विस्मय आणि कुतूहल वाढले. मी त्याच्याबद्दल चौकशी करू लागलो. तर कळले —

प्रत्येक वर्षी पंधरा ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे १६ ऑगस्टला हा वेडा अचानक अवतीर्ण होतो. कुठून येतो, नाव काय, कुणालाच माहीत नाही. या गल्लीतून त्या गल्लीत, या रस्त्यावर, त्या रस्त्यावर, या वळणावर, त्या चौकात… कचराकुंडीत, गटाराच्या कडेला… सकाळपासून रात्रीपर्यंत कचऱ्यात काहीतरी शोधत फिरत असतो. पार शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत, खांद्यावर पोतं घेऊन, उपाशी पोटी वणवणत असतो हा वेडा..!

संध्याकाळी घरी परतताना मोठ्या रस्त्याच्या वळणावर गोंधळ ऐकून थांबून बघू लागलो. लोकांची हीss गर्दी. एकाला विचारले, “काय झालं?”  एकजण म्हणाला, “एका चोराला धरलंय लोकांनी …”

शंका येऊन गर्दी हटवत पुढे जाऊन बघितलं, दिव्याच्या खांबाला बांधलेला तोच – सकाळचा खुदिराम, भर दुपारचा प्रफुल्ल आणि नंतरचा कानाईलाल…! शेजारी मालानं खच्चून भरलेलं पोतं, जे सकाळी रिकामं होतं.

एकजण म्हणाला, “या पोत्यात चोरलेल्या वस्तू आहेत … बघा, बघा…”

कसंतरीच वाटलं मला. त्याला दुखऱ्या स्वरांत विचारलं, “का चोरी करतोस?”

तो निरागस आणि निर्विकार हसला, आधीसारखाच. बाकी काहीच उत्तर दिलं नाही त्यानं.

लोकांना कसबसं थांबवून मी पोत्याचं तोंड खोललं. मातीत उलटं केलं. त्यातून बाहेर पडले… फाटलेले, तुटलेले, दुमडलेले, मोडलेले प्लास्टिकचे आणि कागदाचे तिरंगे झेंडे..! होय, फक्त आपले तिरंगे! आपला राष्ट्रीय अभिमान असलेले, स्वतंत्र भारताचे तिरंगी झेंडे!! रस्ता, कचराकुंडी, गटारं… जिथं दिसतील तिथून उचलून पोत्यात भरलेले..!

हे सर्व बघताच लाजिरवाणी होत गर्दी पांगली. डोळ्यांत दाटून आलेले पाणी आवरून भराभर त्याला बांधलेली दोरी सोडली. माझ्या तोंडाकडे पहात त्याच निष्पाप भावनेने म्हणाला, “कोणाच्या तरी पायांखाली येऊन तुडवले जाऊ नये म्हणून…!” हसला आणि खाली वाकून परत एकेक तिरंगा हळुवारपणे पोत्यात भरत राहिला … तो वेडा.

तो… खरंच वेडा?

मी स्तंभित होऊन उभा…पायांना खिळा ठोकल्यासारखा… अपार वेदना, दु:ख, लाज यांजबरोबर प्रेम, आदर आणि विस्मय डोळ्यांत, मनात दाटलेल्या अवस्थेत मी उभाच …!

मूळ बंगाली लेखक: अज्ञात

अनुवाद : श्रीमती स्वाती दाढे

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “श्रीराम आणि श्रीकृष्ण…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “श्रीराम आणि श्रीकृष्ण…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

हे दोघेही भारतीय इतिहासातील दोन अतुल्य महानायक आहेत.

एकाने ‘अयोध्या ते रामेश्वर’पर्यंतचा

तर दुसऱ्याने ‘द्वारका ते आसाम’पर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे सांधत, गेली हजारो वर्षे ह्या भारतभूमीला संस्कारांच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे.

तसं तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे, नाही का?

एकाने जन्म घेतला तो रणरणत्या उन्हात आणि तोही भरदुपारी, तर दुसऱ्याने जन्म घेतला तो मुसळधार पावसात आणि तो ही मध्यरात्री!

एकाचा जन्म राजमहालात तर दुसऱ्याचा जन्म कारागृहात!

साम्य म्हणाल तर दोघांच्याही हातून पहिल्या मारल्या गेल्या त्या राक्षसिणीच…..

एकाकडून त्राटिका आणि दुसऱ्याकडून पुतना!

शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे हे त्यांच्या मनमिळाऊ मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जाते.

ज्यांच्यामुळे यांच्या चारित्र्याला वेगळे वळण लागले, त्या दोघी म्हणजे कैकेयी आणि गांधारी या एकाच प्रांतातल्या…

ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्या दोघांनीही आनंदाने स्वीकारले.

एकाने सुग्रिवाला त्याचे राज्य मिळवून दिले. तर दुसऱ्याने युधिष्ठिराला!

एकाने लोकापवादाखातीर पत्नीचा त्याग केला. तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला.

एकाने वडिलांचे शब्दासाठी आणि क्षात्रधर्मासाठी कुटुंबीयांचा त्याग करत वनवास स्वीकारला. त्यात गैर मानले नाही. तर दुसऱ्याने क्षत्रियधर्मासाठीच कुटुंबीयांवर शस्त्र उगारण्यासदेखील गैर मानले नाही.

एकाने जन्मभूमीला स्वर्गासम मानले. तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवले.

एकाने अंगदाकरवी शिष्टाई करुन तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जाऊन शिष्टाई करत युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला.

एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली. तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली.

एकाने झाडामागून बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली. तर दुसऱ्याने झाडामागून बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातूनच मृत्यू पत्करला.

पहिला Theory…. आहे. तर… दुसरा Practical आहे.

दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या ह्या व्यक्तिरेखा गेली हजारो वर्षे नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत आपल्या चारित्र्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता ह्या देशापुढे ‘दीपस्तंभ’ बनून उभे आहेत आणि इथून पुढे देखील असेच रहातील.

जय श्रीराम… जय श्रीकृष्ण!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ श्रावणमासी खेद मानसी – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ श्रावणमासी खेद मानसी – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एक वास्तव

खूप छान विडंबन…….

*

श्रावणमासी खेद मानसी

हिरवळ गेली कुणीकडे?

शहरे भरली इमारतींनी

डांबर फरश्या चहुकडे।।

*

मनु बदलला अणु फोडला

निसर्गातही बदल घडे

श्रावणमासी तो मौजेचा

पाऊस आता कुठे पडे ? ।।

*

राने तुटली, कुरणे हटली

उजाड हे डोंगरमाथे

सुंदर हरणी हिरव्या कुरणी

कुठे कशी मग बागडते? ।।

*

सुवर्ण चंपक अजुनी फुलतो

रम्य केवडा दरवळतो

नगरनिवासीजन हौसेस्तव

बाजारी विकला जातो ।।

*

थकून भागून घरी परतती

ललना सायंसमयाला

हर्ष न उरतो ह्रदयी त्यांच्या

देवदर्शना निघण्याला ।।

*

प्रदुषणाने जीवन अवघे

होऊनी गेले संत्रस्त

कुठे कुणाच्या वदनी वाचू

श्रावण महिन्याचे हे गीत ।।

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भाजलेल्या शेंगा” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “भाजलेल्या शेंगा” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

मित्रांनो, आपण रोज जीवन जगतो… पण बऱ्याचदा आपल्या जगण्यातली गोडी हरवलेली असते. कारण? कारण आपण पावलोपावली नाराज होतो, आणि तेही अशा बारीक सारीक गोष्टींवरून, ज्या क्षणभरात विसरून टाकायला हव्या होत्या. पण त्या मनात कुठेतरी खोलवर कायमस्वरुपी घर करून राहतात… आणि मग सारा दिवस, कधी कधी संपूर्ण आयुष्य नाराजीतच जातं!

कधी एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा मनासारखी घडली नाही म्हणून, कधी कोणी हसून बोललं नाही म्हणून, कधी एखाद्यानं साधं ‘थॅंक यू’ बोललं नाही म्हणून, कधी एखाद्यानं आपलं मत नाकारलं म्हणून, कधी चुकून कुणीतरी विसरलं म्हणून…. या अशा कितीतरी गोष्टींवरुन आपण सतत नाराज होत असतो.

खरंच विचार करा मित्रांनो, यातून काय मिळतं हो?

मानसशास्त्र सांगतं, माणसाचं मन म्हणजे एक ‘कंटेनर’ आहे. ते सतत आठवणी, प्रसंग, भावना साठवत जातं. पण त्यात नेमकं काय साठवायचं, हे आपल्यावर असतं. जर प्रत्येक छोटीशी नकारात्मक गोष्ट आपण गोळा करत राहिलो, तर मन हे डस्टबिन होऊन जातं. पण जर त्याऐवजी आपण एखाद्याचं हसू, एक छोटासा गोड क्षण, एखाद्यानं दिलेलं प्रेम लक्षात ठेवलं, तर हेच मन ‘गार्डन’ होऊन जातं.

नाराज राहणे ही एक सवय असते. हो, सवयच. आणि तीही फार हळूच लागते. ती सवय वाढत जाते आणि मग आनंदाची दारं हळूहळू बंद व्हायला लागतात. कारण नाराज मन आनंदाला श्वास घ्यायलाच देत नाही.

कधी बसमध्ये कुणीतरी आपल्याला धडकून गेलं, कधी एखाद्यानं फोन नाही उचलला, कधी मित्रांनी आपल्याशिवाय प्लॅन केला, कधी घरात कुणी आपल्या कामाची दखल घेतली नाही, अशा रोजच्या कितीतरी बारीक सारीक गोष्टी असतात ज्यामुळे आपण आपल्या मनातल्या ‘मी’ला दुखावतो.

पण आपण एक गोष्ट मात्र विसरतो- ती म्हणजे सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष देणं, आपल्याशीच प्रेमानं वागणं, आपल्याला केंद्रस्थानी ठेवणं असा काही सृष्टीचा नियम नाही. प्रत्येकाला आपलं आयुष्य, आपली जबाबदारी, आपले स्वभाव आणि मर्यादा असतात.

मानसशास्त्र सांगतं – “Perception is projection. ” आपण जसं पाहतो, तसं आपल्याला दिसतं. जर आपण सतत दोष बघत राहिलो, तर जगात सगळं चुकीचं वाटेल. पण जर आपण क्षमाशीलतेनं पाहिलं, तर समजूत आणि प्रेम हे खूप सोपं होऊन जातं.

मन म्हणजे एखाद्या बाळासारखं असतं. त्याला शिकवायला लागतं. रोज थोडं थोडं. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण ठरवलं पाहिजे- “आज मी कुणावर नाराज होणार नाही. “

आणि तसं रोज करत गेलं, की मनातला नाराजीचा अंधार तुटतो आणि आनंदाचा अन् समाधानाचा लख्ख प्रकाश उमलतो.

मित्रांनो, आनंद ही अवस्था नसते, तर ती वृत्ती असते. ती आपण ‘घडवायची’ असते. कोणी चुकलं, दुर्लक्ष केलं, अपमान वाटावा, असं वागलं तर स्वतःला एकच प्रश्न विचारावा-

“यामुळे मी नाराज राहिलो, तर काय साधणार आहे? ”

अशावेळी एक छोटा श्वास घ्या, डोळे मिटा, आणि स्वतःलाच सांगा- “मी क्षमा करतो. मी मुक्त होतो. ”

माफीत खुप शक्ती असते. माफ करणं म्हणजे दुसऱ्याला काहीतरी देणं नव्हे तर ते स्वतःला शांतता देणं आहे. कारण प्रत्येक नाराजी, राग, खंत ही आपल्या मनावर एक ओझं टाकत असते. जोपर्यंत नाराजी, राग आपल्या मनात आपण साठवून ठेवतो, तोपर्यंत आपण त्या ओझ्याखाली दबलेले असतो… आपल्याला अजिबात मोकळं वाटत नाही… मात्र जेव्हा आपण माफ करतो तेव्हा आपण त्या गोष्टीच्या गुंत्यातून स्वतःला अलग करतो आणि तेव्हाच खरं सुख, खरी मोकळीक अनुभवायला लागतो.

आपण खूश राहणं ही काही इतर कोणाच्या वागण्यावर अवलंबून असणारी गोष्ट नाही… खूश राहण्याचा कंट्रोल आपल्याकडेच असावा असे वाटत असेल, तर त्याबाबत मनाला शिस्त लावणे गरजेचे असते.

शिस्त ही की-

✩ गोष्टी personally न घेणं

✩ दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याची तयारी ठेवणं.

✩ आणि स्वतःला सतत सांगणं, “माझा आनंद माझ्या हातात आहे! तो इतरांवर अवलंबून नाही. “

जगात प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवतो. जर आपण एखाद्यामुळे दुखावलो गेलो, तर त्याने आपली सहनशक्ती वाढते. जर कुणी दुर्लक्ष केलं, तर त्यातून आपण ‘स्वतःकडे’ वळतो. आणि ही ‘स्वतःकडे’ वळण्याची वाट, हीच खरी आत्मशांतीची वाट असते.

कधी कधी मनातला एक छोटासा विचारसुद्धा जीवन बदलवण्यास कारण ठरतो.

जसं “काहीही झालं तरी, मी आजही सुखात आहे, समाधानी आहे. “

हा विचार संपूर्ण दिवस सकारात्मक प्रकाशाने भरून टाकतो.

थोडक्यात,

आनंद मिळवायचा नसतो, तो घडवायचा असतो.

राग विसरायचा नसतो, तो सोडायचा असतो.

नात्यांत परिपूर्णता शोधायची नसते, तर स्वीकाराची जागा तयार करायची असते.

आणि या सगळ्याचं मूळ आहे आपल्या मानसिकतेत. ती आपण घडवू शकतो. हळूहळू, रोज थोडी थोडी. कारण मन घडतं… आपल्याच हातांनी. ते फुलवायचं की बिघडवायचं, हे आपणच ठरवायचं.

चला तर मग आजपासून नाराजीला सुट्टी देऊया… कारण, आता आपण ‘खूश’ राहायला शिकतोय!

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “जन्म” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

 ? वाचतांना वेचलेले ?

☆ “जन्म” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर

जन्म दिलास माणसाचा

हाच एक जन्म जिथून

मार्ग खुला मोक्षाचा

*

दिलंस एक मन त्यात

अनेक विचारांचा वावर

आणि म्हणतोस आता

या विचारांना आवर

*

दिलेस दोन डोळे

सौंदर्य सृष्टीचे बघायला

आता म्हणतोस मिटून घे

आणि बघ तुझ्यातल्या स्वतःला

*

नानाविध चवी घेण्यास

दिलीस एक रसना

आणि आता म्हणतोस

अन्नावर ठेवू नकोस वासना

*

जन्मापासून नात्यांच्या

बंधनात अडकवतोस

बंध सगळे खोटे असतात

असं आता म्हणतोस

*

भाव आणि भावनांचा

इतका वाढवतोस गुंता

आणि मग सांगतोस

व्यर्थ आहे ही चिंता

*

संसाराच्या रगाड्यात

पुरता अडकवून टाकतोस

म्हणे शांतपणे ध्यान कर आता

अशी कशी रे मजा करतोस?

*

मेजवानीने भरलेले ताट

समोर बघून उपास करायचा

हाच अर्थ का रे

सांग बरं मोक्षाचा?

*

वर बसून छानपैकी

आमची बघ हो तू मजा

पाप आणि पुण्याची

मांड बेरीज आणि वजा

*

माहीत नाही बाबा मला

मिळेल की नाही मोक्ष

तू जवळ असल्याची फक्त

पटवून देत जा साक्ष……

 

कवी: अज्ञात

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आपलं ‘लिमिटेड’ पण सुखाचं जग… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

सौ. स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ आपलं ‘लिमिटेड’ पण सुखाचं जग... लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

सध्या वय 50, 55 +, 60 वर्षे असलेल्या सर्व लोकांना देवानं खूप काही भरभरून दिलं आहे.

आपल्या पिढीला विधात्याचे विशेष आशीर्वाद प्राप्त आहेत..

▪️आपण कधी जीव खाऊन पळत शाळेतून क्लासेसना गेलो नाही.

▪️शाळा सुटल्यावर छान रमत गमत, खेळत घरी गेलो आहोत..

▪️आपण आपल्या खर्‍या मित्रमैत्रिणींसोबत खेळलो – नेट फ्रेंड्स सोबत नाही..

▪️तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी सेफ होते – आपल्याला कधी बिसलेरी घ्यावी लागली नाही..

▪️आपण चार जणांत एकाच ग्लासातून उसाचा रस प्यायलो – पण आजारी नाही पडलो..

▪️आपण रोज पोटभर भात खाऊनही कधी जाड, स्थूल नाही झालो..

▪️आपण कितीदा अनवाणी फिरलो – तरी कधी पायांना दुखापत झाली नाही..

▪️आपल्याला निरोगी राहण्यासाठी कधी कॅल्शिअम घ्यावे लागले नाही..

▪️आपली खेळणी आपणच बनवली – दोन रिकाम्या काडेपेट्यासुध्दा आपल्यासाठी गाडी, फोन किंवा पिस्तूल बनायच्या..

▪️आपला भरपूर वेळ आपल्या पालकांसोबत आनंदाने गेला..

▪️आपल्या जवळ मोबाइल, फेसबुक फ्रेंड, काँप्युटर, इंटरनेट वगैरे नव्हते – कारण आपल्या जवळ खरेखुरे मित्र-मैत्रिणी होते..

▪️आपण मित्रमैत्रिणींच्या घरी कधीही जायचो, खेळायचो, तिथेच जेवायचोही – आपण कधी फोन करुन येऊ का म्हणून विचारले नाही..

▪️आपण एक अद्भुत रसायन आहोत. कारण आपणच आहोत एक अशी पिढी, ज्यांनी आपल्या पालकांच्या आज्ञा पाळल्या आणि तरी खूप मस्तीही केली…

▪️आपण भले स्पेशल नसू; पण ‘लिमिटेड एडिशन’ तर नक्कीच आहोत..

▪️आपली एकच पिढी अशी आहे, ज्यांनी कमी श्रीमंतीत बालपणाचा मनमुराद आस्वाद घेतला, खरे तारूण्य अनुभवले – आणि आता उतार वयात आधुनिक विज्ञानाचाही आनंद घेत आहोत…

▪️आपणच फक्त “कमतरतेतली गंमत आणि मुबलकतेतली जंमत” अनुभवली..

आणि शेवटी…..

आठवतंय का…. आपण ‘मदर्स, फादर्स डे’ कधी साजरा केल्याचं??

नाही ना?

कारण आई वडीलच आपलं जग होतं….

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Buy Nothing! … लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ Buy Nothing! … लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

निशा कामाहून घरी येताना सायकलच्या दुकानात थांबली. तिच्या आठ वर्षाच्या मुलाला नवी सायकल घ्यायची होती. निळ्या रंगाची, गिअर असलेली फॅन्सी सायकल व हेल्मेट घ्यायचं होतं. पण दुकानातील अनेक प्रकारच्या महागड्या सायकली बघून ती गोंधळून गेली.

बॅास्टनजवळच्या एका छोट्या गावात तिनं व रविने संसार थाटला होता. दोघेही IT मधे काम करत होते. सेलवर गोष्टी आल्या, की पैसे वाचतात, म्हणून ती बऱ्याच गोष्टी घेऊन ठेवत असे. घरात हळूहळू करत इतकं सामान जमलं की कपाटं कमी पडत. पर्सेस, चपला, बूट, फ्लावरपॅाटस्, खरी व खोटी फुलं, फुलझाडे, पुस्तकं, कॉफी मेकर, कपडे, टोप्या, फ्रेम्स, खेळणी अशा हजारो गोष्टींनी घर भरून वाहत होतं.

ती सायकली बघत असताना दोन बायकांची कुजबुज तिच्या कानावर आली. एवढे पैसे पाच वर्षाच्या मुलाच्या सायकलवर नको टाकायला! ‘बाय नथिंग’कडे नक्की मिळेल लहान मुलांची सायकल. तिने कान टवकारले.. ती बाई म्हणाली की मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हाच मोठी सायकल घ्यावी.

तोपर्यंत ‘बाय नथिंग’!

तिने त्यांना ‘बाय नथिंग’हा काय प्रकार आहे, विचारलं. त्या म्हणाल्या, “हा पत्ता व फोन ‘बाय नथिंग’चा.. रिबेका भेटेल तिथे. ती सगळी माहिती देईल. “

निशा कुतूहलाने ‘बाय नथिंग’चा पत्ता शोधत गेली. एका ५० वर्षाच्या हसऱ्या चेहऱ्याच्या बाईनं तिचं स्वागत केलं.

“माझं नाव रिबेका. वेलकम टू बाय नथिंग! ” ती म्हणाली.

निशानं विचारलं “बाय नथिंग हा नक्की काय प्रकार आहे?”

रिबेका चष्मा नाकावर आणत म्हणाली,” हा फेसबुक ग्रूप मी व माझ्या मैत्रीणींनी सुरू केला. माझी सहा-सात वर्षांपूर्वी पैशाची फार चणचण होती. मी मला लागणाऱ्या गोष्टी कोणी काही काळापुरत्या देतील का, असं लोकांना विचारायला सुरूवात केली. अगदी जेवणसुध्दा दिलं लोकांनी! माझी परिस्थिती सुधारल्यावर मी हा ग्रूप जीवनावश्यक गोष्टींसाठी बनवला.

ह्या लोकल बाय नथिंग ग्रूपमध्ये हजाराहून जास्त मेंबर्स आहेत. मेंबरशिपसाठी अगदी नॅामिनल पैसे घेतात व काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर हजार लोकांमध्ये कुणाकडे तरी असतेच. ती गोष्ट वापरा व काम झालं की परत करा.

अजिबात काहीही खरेदी करण्याची जरूरी नाही. तुम्ही जी गोष्ट वापरत नसाल ती ज्याला हवी त्याला द्या आणि तुम्हाला हवी ती एखाद्याकडून घ्या. यानं पैसा तर वाचतोच; पण जगातील कचरा कमी होतो. पर्यावरण सुधारते, ओळखी होतात. पर्सनल हायजीनसाठी लागणाऱ्या गोष्टी फक्त विकत घ्या. आपल्या गावाचा हा जसा ग्रूप आहे तसे अनेक गावात हे ग्रूप आहेत. जवळजवळ १६ लाखाहून जास्त मेंबर्स आहेत सध्या! “

निशानं फेसबुक बाय नथिंग ग्रूप तिथेच जॅाईन केला व निळी, गिअरची सायकल आहे का, विचारले. लगेच ३०-४० उत्तरं व सायकलींचे फोटो आले. तिने त्यातून एक सायकल निवडली. सात गियरची! लोक एकमेकांची बेबी क्रिब्ज, बीच चेअर्स, व्हील चेअर्स, मुलांची खेळणी, पुस्तकं वगैरे हजारो गोष्टी एकमेकाकडून घेत होते. देवाण घेवाण एक पैसा न वापरता होत होती, त्यामुळे भांडणं नव्हती!

रिबेका म्हणाली, ”माणसांकडे लक्ष द्यायला शिकायचं. वस्तूवरचं प्रेम कमी करायचं! एवढं लक्षात ठेवायचं.”

‘हे विश्वची माझे घर’चा खरा अनुभव घेत तिनं निळी सात गिअरची सायकल घेतली व ती घरी आली. रवी थक्क झाला.

निशाच्या डोक्यात रिबेकाचे शब्द घुमत होते..

“कशासाठी जमवायचं एवढं? बरोबर थोडंच नेणार आहे?”

निशानं एक एक करत तिच्या संग्रही असलेल्या अनेक गोष्टी बाय नथिंग फेसबुक ग्रूप वर पोस्ट केल्या. अनेकांना त्या वापरायला द्यायला सुरूवात केली. आता तिच्या गावात बऱ्याच ओळखी झाल्या आहेत. विचारांची देवाण घेवाण होत आहे. भारतापासून लांब रहात असताना एखादी मावशी, काकू, दादा भेटत राहतात तिला हल्ली. नाती जुळत आहेत.

माणूस आयुष्यभर गोष्टी जमवत राहतो. जाताना यातलं काहीही बरोबर नेता येणार नाही हे माहीत असूनही! त्यापेक्षा स्नेह, मैत्री, दुवा जमवण्याचा तिनं निश्चय केला आहे!

आपणही ‘बाय नथिंग’ तत्त्व आचरणात आणूया ना?

Give something

Grow something

Create something

Donate something

Buy Nothing!

 

लेखिका: श्रीमती ज्योती रानडे

प्रस्तुती: श्री. मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तरूणाई…” – लेखक: श्री श्रीरंग खटावकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “तरूणाई…” – लेखक: श्री श्रीरंग खटावकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

मॉर्निंग वॉकला गेलो होतो. तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूने आवाज आला.

“काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे? “

खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं आणि गर्रकन मान वळवली. तळ्याच्या काठावर आठ दहा, सत्तर- ऐंशीच्या घरातले तरुण बसलेले, आणि बरमुडा आणि टी शर्ट घालून येणाऱ्या मन्याकडे बघून फिदीफिदी हसत होते.

मन्या त्यांना म्हणाला, ” हसा लेको. ज्याची जळते त्यालाच कळते. यु एस ला गेलो होतो, येताना कवळीच विसरलो. पाठवलीय मुलानं कुरियरनी पण अजून आली नाहीये. तीन दिवस झाले पेज खातोय. तुम्हाला काय होतंय खोटे दात काढायला. “

तेवढ्यात एक लेंगा आणि सदरा घातलेले आजोबा उठले आणि लटक्या रागानं म्हणाले, ” खोटे दात काय रे? हे बघ” म्हणत बोळकं उघडलं, तर टेडी बिअरसारखे दोन दात लुकलुकत होते, बाकी सगळं वाळवंट!

“दात दोनच असले तरी कडक बंदीचा लाडू खातो अजून. “

“खातोस की चघळतोस रे? “

ख्या ख्या, करून सगळे हसले.

“नान्या, चघळतोस तू लेका. काल घरी जाताना चार शेंगदाणे तोंडात टाकलेस, ते संध्याकाळी देवळात आलास तरी चघळतंच होतास. ह्ये ह्ये ह्ये. “

“हाट, ते साखरफुटाणे होते देवळातले! “

असे मस्त संवाद चालू होते.

मग नादच लागला मला रोज त्यांच्या गप्पा ऐकण्याचा.

जवळपास पाच सहा महिने झाले असतील, मला त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता. पण कधी कोणाची कुरबुर ऐकली नाही.

फक्त नोटबंदी झाली त्यावेळेस, नाना तावातावाने भांडले होते, “शिंच्या त्या मोदीने माझं पितळ उघडे पाडलंन. बायको पासून लपवून ठेवलेले दोन हजार रुपये काढायला लाविलें हो. “

“मॅग, लपवायचे कशाला म्हणतो मी! मी बघ निघताना बायको पुढे रोज भिक्षांदेही करतो, ठेवते २०/२५ रुपये हातावर, तेवढीच आपली विडी काडीची सोय! काय? “

एक दिवस अचानक सगळाच्या सगळा ग्रुप गैरहजर!

त्यानंतर माझ्या कामामुळे मला दोन तीन दिवस जमलं नाही, चौथ्या दिवशी गेलो तर सगळे हजर!

त्यातल्या तात्यांना विचारलं, “काय हो परवा कोणीच आला नाहीत? “

तर थेट अंतु बर्व्या स्टाईल उत्तर नानांनी दिले, ” अरे, मन्याची ट्रान्सफर झाली ना! त्यालाच सोडायला गेलो होतो. “

“कुठे? “

“अरे कुठे म्हणून काय विचारतोस? स्वर्गात!

त्याच्या महायात्रेला गेलो होतो सगळे! “

“काही म्हणा. मन्या भाग्यवान हो! लेक अमेरिकेतून येतो काय, हाटीलात जाऊन पार्टी करतात काय, घरी येऊन झोपतो काय, आणि मुलगा उठवायला गेला तर हा मन्या केव्हाच गेलेला, स्वर्गाचं दार वाजवायला, रंभेच्या मागं! “

बाकी सगळे खिन्नपणे हसले.

मी म्हटलं, ” तात्या इतकं लाईटली घेताय? “

“अरे तू, आता आलास, आधी आम्ही सव्व्हीस जणं होतो, आता बाराच उरलोय! तेही ऐशी-नव्वदीचे! विकेटी पडायच्याच रे. आणि म्हणून रडायचं कशाला, दोन दिवस दुःख वाटतं, पण जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून सोडून देऊन आपलं रुटीन चालू करायचं! “

एकदम काहीसं आठवून मला म्हणाले, ” तू केटरिंग करतोस ना रे! तुझा नंबर दे, मन्याच्या मुलाला देतो, तेराव्याची ऑर्डर देईल तुला! “

मी डोक्याला हात लावला. ते बघून अजून एक आजोबा म्हणाले, ” अरे, आपल्या सगळ्यांच्याच मुलांना देऊया याचा नंबर. वर्षभरात अजून दोन-चार तरी विकेट पडणार! ” ख्या ख्या ख्या!

दोन दिवसांनी मी जरा घाईत होतो. तेवढ्यात तात्यांनी हाक मारली, ” ओ केटरर, जरा इकडे या, आज संध्याकाळची ऑर्डर घेणार का पार्टीची? “

“पार्टी? “

“अरे, नान्याच्या सेंच्युरीला फक्त अकरा वर्ष उरलीत! “

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मला म्हणाले, “एवढा कसा बावळट रे? आज नान्याचा एकूणनव्वदावा प्रकटदिन आहे.

फार काही नको. मस्तपैकी लुसलुशीत उपमा, आणि चहा. बारा प्लेट. “

“बास. एवढंच ना? दिलं! “

“आणि हो, कडक बुंदीचे पाच लाडू! आज बघतोच कसा खातो ते. आणि हो! उपमा जास्त तिखट नको हो, हिरड्या झोंबतात नंतर. आणि त्यात उडदाची डाळ बिलकुल नको, कवळीखाली जाऊन बसते, मग जीव जातो काढताना! “

संध्याकाळी ऑर्डर द्यायला गेलो आणि चकित झालो, सगळे थट्टा मस्करी करीत बसले होते. मन्याच्या फोटो समोर काही चाफ्याची फुलं होती, आणि मोठमोठ्यांदा गाणं चालू होतं.

“जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना! “

मला बघून सगळे थांबले. तात्या पुढे झाले. उपम्याची मूद एकेका बशीत वाढून घेतली, चहा कपांत ओतला. सगळे उभे राहिले आणि “लॉंग लिव्ह नान्या, थ्री चिअर्स फॉर नाना, हिप हिप हुरर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे! ” करत चहाचे कप, एकमेकांवर आदळून पुन्हा दुसरं गाणं सुरू!

मी काहीशा संभ्रमावस्थेत घरी आलो आणि विचार करू लागलो, आज आपण आपल्या कट्ट्यावर भेटतो, पण आपल्या आयुष्याच्या तिन्हीसांजेला असेच हसतमुख, इतकेच जिंदादिल असू का? ह्या म्हाताऱ्यांइतकीच तरुणाई आपल्यात असेल?

असायलाच हवी!

आणि एकदम त्यांच्या पार्टीतलं मी निघतानाचं गाणं ओठावर आलं,

“कल खेल में, हम हो न हो

गर्दिश में तारे रहेंगे सदा

भूलोगे तुम, भूलेंगे वो

पर हम तुम्हारे रहेंगे सदा

रहेंगे यहीं, अपने निशाँ,

इसके सिवा जाना कहाँ

जी चाहे जब हमको आवाज़ दो

हम हैं वहीं, हम थे जहाँ

अपने यहीं दोनों जहां

इसके सिवा जाना कहाँ

जीना यहाँ मरना यहाँ,

इसके सीवा जाना कहा! “

 

लेखक: श्री श्रीरंग खटावकर

प्रस्तुती: श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चिपाड…” लेखिका: सौ. संगीता चव्हाण ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “चिपाड…” लेखिका: सौ. संगीता चव्हाण ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

 — अस्तित्वाचा गहिरा क्षण

पानगळ आणि चिपाड — दोघंही जमिनीवर येतात. पण दोघांची कथा मात्र वेगळी असते.

पानगळीच्या पानाला कोणी हात लावलेला नसतो. त्याच्या आत एक ऋतू उतरतो, एक वेळ येते. ते आपली चक्रपूर्ती करून हळूहळू गळून पडतं. कुणी ते फेकलेलं मानत नाही. ते जमिनीशी एकरूप होतं.

पण चिपाड… ही गोष्ट वेगळी आहे. त्याला जाणीवपूर्वक हात लावून, आतला सारांश काढून घेतला जातो. रस उपसून घेतला जातो. मग उरलेलं निरुपयोगी मानून फेकलं जातं. चिपाड हे नैसर्गिक चक्राने पडलेलं नसतं — ते फेकलं गेलेलं असतं.

माणसाच्या आयुष्यात, समाजाच्या रचनेत, अगदी आपल्या नात्यांतसुद्धा अशी चिपाडं तयार होत असतात. उपयोग होईपर्यंत गोडगोड बोलणं, जवळ घेणं — आणि ज्या क्षणी उपयोग संपतो, तेव्हा बाजूला सारून टाकणं. हाच आहे चिपाड होण्याचा दुःखद, बोचरा अर्थ.

घराबाहेर पडल्यावर अशा कितीतरी कहाण्या कानावर पडतात. वर्षानुवर्षं संसार हाकलेली एखादी स्त्री — कधी सासरच्या घरात, कधी स्वतःच्या मुलांत, वापरली जाते. तिचं प्रेम, तिची सहनशक्ती, तिची निरपेक्षता — सगळं उपसून घेतलं जातं. आणि नंतर एखाद्या वळणावर तिचं अस्तित्वच विसरलं जातं. जणू काही उपयुक्तता संपली म्हणून तिला कोपऱ्यात ढकललं जातं. त्या क्षणी ती स्त्री मनाने, आत्म्याने चिपाड झालेली असते.

किंवा एखादा कर्मचारी — तीस चाळीस वर्षं एका कंपनीत प्रामाणिकपणे काम केलेला. ज्याच्यावर विभाग चालत होता, जो विश्वासाचं प्रतीक होता — त्याच्यावर एके दिवशी बदलाची गदा येते. ‘नवीन माणूस हवा आहे’, ‘सिस्टम नवी करतोय’, ‘आता वेळ झालीय’ — या वाक्यांच्या आडून त्याला एक दिवस बाहेरचं दार दाखवलं जातं. आणि तो मनात एकच प्रश्न घेऊन उरतो — मी इतकी वर्षं इथे कोण होतो? केवळ एक उपयोगी माणूस? की जिवंत माणूस?

अगदी नात्यांतसुद्धा ही गोष्ट दिसते. प्रेमाच्या सुरुवातीला एखादा माणूस दुसऱ्याला हवाहवासा वाटतो. त्याच्या शब्दांचा, त्याच्या सहवासाचा गोडवा घेतला जातो. पण हळूहळू जेव्हा त्या व्यक्तीकडून नवं काही मिळणार नाही, असं वाटतं, तेव्हा त्याचं अस्तित्वच बोथट केलं जातं. मनातून, आठवणीतून, संवादातून. त्या माणसाच्या आत एक गुपित वेदना तयार होते — ‘मी फक्त उपयोगासाठी होतो का? ‘

चिपाड होण्यामागे हीच खरी वेदना आहे — वापरल्याचं भान. मी माझं सर्वस्व दिलं आणि शेवटी फक्त रिकामं शरीर, रिकामं मन उरलं — हा भाव किती खोलवर जखम करतो, हे केवळ त्या अवस्थेत गेलेल्या माणसालाच कळतं.

आता प्रश्न उरतो — आपण चिपाड का होतो? आणि हे टाळता येत नाही का?

हो — टाळता येतं. पण त्यासाठी एक अंतर्बाह्य जागरूकता लागते. आपलं मूल्यमापन दुसऱ्यांच्या वापरावर आधारित ठेवायचं नाही. स्वतःच्या गरजांना, भावनांना, स्वत्वाला अधोरेखित करायचं. ‘मी कोण आहे’ हे रोज नव्यानं आठवत राहायचं. आणि सर्वात महत्त्वाचं — आपल्या रसाचा झरा केवळ इतरांसाठी वाहू न देता, स्वतःसाठी राखून ठेवायचा.

कारण जेव्हा आपल्याकडे स्वतःसाठी काही उरतं, तेव्हा आपल्याला कोणीच चिपाड करू शकत नाही.

म्हणूनच — स्वतःला चिपाड होऊ देऊ नका. आणि कोणालाही चिपाड करून फेकूही नका. हेच एक मोठं माणूसपण असेल.

पण ज्या वेळेस असं वाटतं की आपण आधीच चिपाड झालोय — वापरून, झिजून, टाकून दिल्यासारखं वाटतं — त्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते : राखेतूनही नवे अंकुर फुटतात.

चिपाड झालेल्या अवस्थेला आपण अंतिम सत्य मानून बसलो, तर तोच आपला शेवट ठरतो. पण जर त्या अवस्थेकडे पाहताना आपण स्वतःला विचारलं — “माझ्यात अजून काय उरलं आहे? ” — तर नकळत आपण एक नवीन उगम शोधू लागतो.

कधी तो उगम एका छोट्या छंदातून उगमतो,

कधी निसर्गाच्या कुशीत नव्याने रुजतो,

कधी अपूर्व अशा पुस्तकाच्या पानातून जागा मिळतो,

कधी अंतर्मनाच्या खोल ध्यानातून आपल्याला नव्याने गंध सापडतो.

कारण कोणत्याही चिपाडाच्या आत एक बियाणं दडलेलं असतं. फक्त त्याला थोडासा स्नेह, थोडीशी ऊब, थोडासा आत्मविश्वास देणं आवश्यक असतं.

आपणच आपल्याला ही ऊब देऊ शकतो.

कोणीतरी बाहेरचं देईल, ह्या आशेवर जगणं म्हणजे पुन्हा वापरून घेण्याचा खेळ सुरु करणं.

आपण ठरवलं, की “माझं अस्तित्व केवळ इतरांच्या उपयोगासाठी नाही — मी माझ्या आनंदासाठी, माझ्या उत्कर्षासाठी आहे” — तर त्या क्षणापासून चिपाड होण्याचा खेळ संपतो. आणि त्या जागेवर एक नवा रस तयार होतो — फक्त स्वतःसाठी वाहणारा.

हा प्रवास फार हळू आहे, फार अंतर्मुख आहे — पण एकदा का सुरू झाला, की तो आयुष्याला एक नवा वास देतो.

म्हणूनच —

तुम्हाला जर आज चिपाड झाल्यासारखं वाटत असेल, तर थांबा.

थोडा श्वास घ्या.

मनाच्या गाभ्यात पहा — अजून काही उरलंच आहे.

तिथूनच एक नवा अंकुर फुटेल — जो या वेळेस स्वतःच्या मातीवर उगम घेईल.

त्याला कोणी वापरू शकणार नाही.

कारण या वेळेस तो स्वतःसाठी उमललेला असेल.

 

लेखिका : सौ. संगीता चव्हाण

प्रस्तुती: सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खूप छान वाटतंय” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “खूप छान वाटतंय” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

*

बालपणी ज्यांना चिऊ काऊ चे घास भरवले,

आज ते मला, आई, खाऊन बघ. छान आहे, म्हणून

आपल्या घासातला घास भरवतात..

खूप छान वाटतंय..

 

इवल्याशा पाठीवरचं दप्तर मी उचलून घेई,

आज माझ्या हातातले ओझे उचलायला धावत येतात..

खूप छान वाटतंय..

 

ज्यांची बोटं धरुन अक्षरांशी ओळख करून दिली,

आज ते माझी नवीन टेक्नोलॉजीशी ओळख करुन देतात..

किती मजा वाटते आहे..

 

ज्यांना हात धरुन रस्ता ओलांडला,

आज ते माझा हात धरुन रस्ता ओलांडतात,

हातांची अदलाबदल कधी झाली कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

चालताना उड्या मारु नकोस रे, पडशील, असं म्हणणारी मी..

आणि आज, आई, हळू. पुढे खड्डा आहे म्हणणारे ते,

एवढा प्रवास कधी झाला कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

रिक्षाने जाताना त्यांना आतल्या बाजूला बसवणारी मी..

आज जागा केव्हा बदलल्या, समजलंच नाही..

पण खूप छान वाटतंय

 

प्रयत्न करून बघ, शिकवलंय ना मी तुला, असे म्हणणारी मी आणि आज… सोपंय ग, एकदा शिकलीस की येईल तुला, असे सांगणारे ते….

किती गंमत वाटते आहे..

 

ज्यांचाबरोबर बडबड गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या, आज ते आई, हे गाणं ऐकलंस का, बीट्स आवडतील बघ तुला, असं म्हणतात तेव्हा काय सांगू काय वाटतं….

लय भारी वाटतंय..

 

शाळेच्या पिकनिकला जाताना, बस मध्ये बसवून देणारी मी आणि आज मी प्रवासाला जाताना मला बसमध्ये बसवणारे ते..

शब्द तेच, काळजी तीच, भूमिका बदलल्या

किती मस्त वाटतंय. |

 

त्यांना काही होत असेल तर, घाबरणारी मी आणि मला जरा बरं नसलं तर, कासावीस होणारे ते..

किती कृतकृत्य वाटतंय..

 

लहानपणी त्यांचा अनाठायी हट्ट कसा चुकीचा आहे, हे सांगणारी मी, आज माझे एखादे मत कसे चुकीचे आहे, हे माझे मन न दुखावता मला पटवण्याचा प्रयत्न करतात..

किती अभिमान वाटतो..

 

मुले घरात दिसली नाहीत तर, कासावीस होणारे बाबा आणि आज, हे काय, बाबा अजून आले नाहीत म्हणणारी मुलं..

परत शब्द तेच, काळजी तीच, भूमिका कधी बदलल्या समजलंच नाही..

इवलेसे गळ्यात पडणारे हात, आज आधार द्यायला खंबीर झाले..

खूप छान वाटतंय..

नकळत संस्कार घडले,

नकळत भूमिका बदलल्या,

नकळत त्यांच्यात एक संवेदनशील पती आणि हळूवार पिता आकार घेऊ लागला..

खूप धन्य वाटतंय..

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती:सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares