मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “समग्र जिम कार्बेट” – लेखक : जिम  कार्बेट – मराठी अनुवाद : सुश्री वैशाली चिटणीस ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “समग्र जिम कार्बेट” – लेखक : जिम  कार्बेट – मराठी अनुवाद : सुश्री वैशाली चिटणीस ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : “ समग्र जिम कॉर्बेट “.

लेखक : जिम कॉर्बेट 

अनुवाद : वैशाली चिटणीस 

प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन 

पृष्ठे: ८९०₹

मूल्य: ९९९₹ 

एडवर्ड जेम्स कॉर्बेट ऊर्फ जिम कॉर्बेट (इ. स. २५ जुलै १८७५ ते १९ एप्रिल १९५५) हे एक निसर्गअभ्यासक व निष्णात शिकारी म्हणून विश्वविख्यात आहेत.

जिम कॉर्बेट यांनी जंगली प्राण्यांच्या जीवनक्रमाचा सखोल अभ्यास तर केलाच, पण असंख्य फोटोग्राफ्स, अनेक पुस्तके या द्वारा शहरी माणसाला वन्य जीवनाबद्दल -निसर्गाबद्दल सज्ञान केलं. एकूणच, जिमने निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकली. इतकेच नव्हे तर, माणसाला निसर्गाच्या अधिकाधिक जवळ नेलं!

ब्रिटीश राजवाटीत मनोरंजनासाठी शिकार करण्याच्या रूढ पद्धतीला जिम कॉर्बेट यांनी आव्हान दिलं! त्याहीपुढे जाऊन जंगली प्राण्यांच्या संरक्षणार्थ कायदे केले जावेत, यासाठी त्यांनी भारतात जे काही प्रयत्न केले, त्याला तोड नाही. त्याची दखल अवघ्या जगाला घ्यावीच लागली.

मूळचे शिकारी असलेल्या द्रष्ट्या जिम कॉर्बेट यांना प्रकर्षाने जाणवले की, जंगलातील नैसर्गिक वाघांची आणि इतर मोठ्या वन्य जिवांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून त्यांनी बंदुकीऐवजी कॅमेरा वापरून वाघ आणि इतर वन्य जीव टिपले. फक्त नरभक्षक झालेले वाघ आणि बिबटे यांची शिकार त्यांनी केली. १९०७ ते १९३८ या काळात सुमारे १, ५०० लोकांना मारणाऱ्या डझनभर वाघ आणि बिबट्यांना त्यांनी मारले.

नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती व निरीक्षणे जिमने पुस्तक रुपाने प्रकाशित केल्या. एकूण १९ नरभक्षक वाघ आणि १४ नरभक्षक बिबट्यांची शिकार जिम यांनी केली.

चंपावतच्या नरभक्षक वाघाने ४३६ लोक तर पानारच्या नरभक्षक बिबट्याने ४०० लोकांचे बळी घेतले होते. या आणि अशाच इतर नरभक्षकांविषयी आणि जंगलातील त्यांच्या इतर अनुभवांविषयी जिम यांनी लिहिलेली सर्व पुस्तके जगभर गाजली. जगातील सुमारे २७ भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली.

कॉर्बेट यांचा जंगली जनावरांबाबतचा अभ्यास व अंदाज दांडगा होता. हे लक्षात घेऊन १९२५ मध्ये नरभक्षक प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटीश शासनाने त्यांना खास बोलावून घेतलं. त्यावेळी गढवाल-रुद्रप्रयाग परिसरात नरभक्षक वाघ व बिबळ्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला होता. तीनशेच्या वर नरबळी घेऊन देखील या प्राण्यांचा बंदोबस्त होत नव्हता! या पार्श्वभूमीवर कार्बेट यांनी सरकारने देऊ केलेल्या सुविधा व स्थानिक लोकांच्या सहाय्याने गढवाल-रुद्रप्रयागच्या विस्तीर्ण क्षेत्राची नाकेबंदी केली आणि तिथल्या नरभक्षक प्राण्यांना ठार मारण्यात यश मिळवलं!

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात देखील युद्धसराव करणाऱ्या जवानांना तिथल्या निसर्ग निरीक्षणाचे धडे देऊन कॉर्बेट यांनी प्रशिक्षित केलं! यासाठी कैसर-इ-हिंद आणि स्टार ऑफ ब्रिटिश एम्पायर या पदव्या देऊन ब्रिटीश सरकारने त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला.

खिळवून ठेवणारं लेखन करणारा साहित्यिक आणि निष्णात शिकारी म्हणून कॉर्बेट प्रसिद्ध आहेतच, पण त्याशिवाय त्यांच खरं योगदान हे आहे की, त्यांनी वन्य प्राण्यांच्या संरक्षणाखातर केलेल्या प्रयत्नांमध्ये आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जंगलतोडीमुळे वनस्पती व कित्येक प्राण्यांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर असताना त्यांच्या संरक्षणार्थ सरकारने खास कायदे केले पाहिजेत, अशी मागणी करुन कॉर्बेट यांनी त्यासाठी स्वतः प्रयत्न केले. कुमाऊं क्षेत्राचं अभयराण्य व्हावं, अशी जिम यांची मोठ्या प्रमाणावर इच्छा होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं! १९३६ मध्ये रामगंगा खोऱ्याचा परिसर राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर केला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नैनीताल परिसरातील स्वतःची सर्व मालमत्ता जन्माने आयरिश असलेल्या जिम कॉर्बेट यांनी भारतालाच अर्पण केली आणि आपल्या कर्मभूमीतच कमाऊं जनतेच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी अखेरपर्यंत मदत करीत राहिले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन भारत सरकारने १९५७ मध्ये कुमाऊं परिसरातल्या राष्ट्रीय उद्यानाला जिम कॉर्बेट यांचं नाव देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.

जिम कॉर्बेट वंशाने भारतीय नसले, तरी त्यांचा जन्म भारतातल्या नैनितालमध्ये झाला आहे. तसंच आपल्याला ते ‘वाघांचा शिकार करणारा शिकारी’ म्हणून परिचित असले, तरी ‘शिकार करण्याचा आनंद घेणारा शिकारी’ या घट्ट, निष्ठुर चौकटीत या माणसाला बंदिस्त करता येत नाही. उलट जंगलं, प्राणी, निसर्ग आणि त्याचाच भाग असलेली माणसं असं तो सगळं एकसंध पाहतो. शिकार करतानाची जिम कॉर्बेटची तन्मयता जितकी लोभस आहे, तितकीच त्या प्राण्याबाबतची आत्मीयताही! म्हणूनच या थरारक कथा रूढार्थाने आपल्याला हिंसक भावनेचा प्रत्यय देत नाहीत. उलट त्या माणसातला निसर्ग जागा करणार्या किंवा शाबूत ठेवणार्या कथा आहेत.

या पुस्तकामधल्या बहुतेक गोष्टी नरभक्षक वाघांसंदर्भातल्या आहेत. त्यामुळे वाघ नरभक्षक का होतात, हे सांगणं क्रमप्राप्त ठरतं.

परिस्थिती वाघाच्या नियंत्रणाबाहेर जाते, तेव्हा कोणताही वाघ परिस्थिती अनुरूप आहार स्वीकारतो. थोडक्यात सांगायचं, तर तो स्वतःहून नरभक्षक झालेला नसतो, तर तसं होणं त्याच्यावर लादलं गेलेलं असतं. परिस्थितीमुळे वाघ नरभक्षक होतात, हे अधिक स्पष्ट करून सांगायचं, तर दहापैकी नऊ प्रकरणांमध्ये वाघ जखमांमुळे, तर एका प्रकरणामध्ये वृद्धापकाळामुळे नरभक्षक झाल्याचं आढळलं आहे. शिकारीदरम्यान शिकाऱ्यांनी निष्काळजीपणे केलेल्या गोळीबारामुळे वाघाला जखमा झाल्याचं दिसून आलं आहे. अशा वेळी संबंधित शिकाऱ्याने माग काढत जाऊन त्या जखमी वाघाला कायमचं वेदनामुक्त करणं गरजेचं असतं, पण शिकाऱ्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाघ नरभक्षक झाल्याचं नरभक्षक वाघाशी संबंधित एका प्रकरणामध्ये निदर्शनास आलं. त्याचबरोबर साळिंदराची शिकार करताना वाघाला झालेल्या जखमांमुळे तो नैसर्गिक पद्धतीने शिकार करू शकत नसल्याने नरभक्षक झाल्याचंही आढळून आलं आहे. ‘माणूस’ हे काही वाघाचं नैसर्गिक अन्न नाही, पण वृद्धत्वामुळे किंवा जखमांमुळे वाघ जेव्हा शिकार करू शकत नाही, तेव्हा तो जगण्यासाठी नाइलाजाने माणसाची शिकार करून त्यावर गुजराण करायला सुरुवात करतो.

या कथा आजही आपल्याला इतकं वेधून का घेतात? कारण पांढरपेशा जगण्यातला चूक-बरोबरचा फास आणि तो आवळण्यासाठीचे गळे या कथांना ठाऊक नाहीत. यांच्या ठायी नर्मविनोद आहे, पण त्यांना उपेक्षा करणं माहीत नाही. त्या उघड्या तोंडाच्या गोष्टी आहेत. राग-लोभासहित माणसातला निसर्ग आणि निसर्गासकटचा माणूस पोटात घेणार्या गोष्टी आहेत. म्हणूनच त्या वाघांच्या शिकारीच्या उत्कंठेसाठी वाचल्या जात असल्या, तरी निश्चितच फक्त वाघांपुरत्या मर्यादित राहत नाहीत… स्वतःतल्या खोल जंगलात उतरायला त्या आपल्याला भाग पाडतात.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘लोक आणि लौकिक’ – श्री जयवंत दळवी ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆

श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘लोक आणि लौकिक’ – श्री जयवंत दळवी ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆ 

पुस्तक : लोक आणि लौकिक

— — अमेरिकन जीवनावरील खुसखुशीत लेखसंग्रह 

लेखक : जयवंत दळवी 

प्रकाशन – मॅजेस्टिक प्रकाशन 

चौथी आवृत्ती २०१६ 

किंमत १०० रुपये 

……..

अमेरिकी माहिती खात्याच्या कामानिमित्त अमेरिकेत तीन-चार महिने फिरण्याच्या योगामुळे आलेले अनुभव, तेथील भेटलेली माणसे, त्यांचे स्वभाव अत्यंत खूमासदार पद्धतीने लेखक जयवंत दळवी यांनी ज्या लेखसंग्रहात केले आहे, ते पुस्तक म्हणजेच ‘लोक आणि लौकिक’.

अमेरिका हे प्रगत राष्ट्र आजही सर्वसामान्यांच्या कुतुहलाचा विषय. तेथील आधुनिक प्रगतीचा जनजीवनावर कसा प्रभाव पडला असेल, त्याविषयी प्रत्येकाच्या मनात औत्सुक्य असणारच. या पुस्तकात सामान्य अमेरिकन माणसांचे स्वभाव, त्यांची दैनंदिनी, नाविन्याची आस याविषयी सुंदर रेखाटन लेखकाने केले आहे. एकूण १३ लेखांमधून अगदी विमान प्रवासापासून ते अमेरिकन पाहुणचारासह सांस्कृतिक व राजकीय क्षेत्राविषयी खुमासदार लेखन केले आहे.

प्रथमच विमान प्रवास करताना आलेले अनुभव मांडताना त्यांची विनोदी शैली वाचकाला हसविते. विमान प्रवास म्हणजे सामान्य माणसासाठी एक उत्सुकता, तेवढीच जीवाची भिती आणि असे असूनही प्रवासातील सर्व अनुभवांचा आस्वाद घेण्याची इच्छा याचे सुंदर वर्णन केले आहे. वॉशिंग्टनमध्ये फिरताना लेखकाला पदोपदी मुंबईतील जनजीवन आठवते. अमेरिकेतील प्रत्येक घरातील कुणी ना कुणी दुस-या महायुद्धाचा अनुभव घेतल्यामुळे सहानुभुतीचे लोण घरी आणले आहे. त्यामुळे प्रत्येक अमेरिकन इतरांना मदत करायला सदा तत्पर असतो.

कोणतंही काम सुरू करण्याआधीच ते संपेल कसं? याचा विचार अमेरिकन करतात. येथे प्रत्येकाच्या पायाला भिंगरीची गती आहे. शेती, कारखाने, वाहतूक, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्राचा लेखकाने उल्लेख केला आहे.

जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र असूनही अमेरिकन साधेपणाची लेखकाने पदोपदी अनुभूती घेतली. अगदी अमेरिकेचे व्हाईट हाऊसही याला अपवाद नाही. येथील सामान्य अमेरिकन म्हणतो, “एकूण हवी ती व्यवस्था व सोय होत आहे ना! मग रुबाब आणि थाटमाट हवा कशाला? ” प्रतिष्ठेची बेगड ते कधीच लावून घेत नाहीत. तेवढीच अमेरिकन लोकांना नाविन्याची आवडही आहे. लेखकाने अमेरिकन व्यक्तीचित्रणे आपल्या शैलीत हुबेहूब साकारली आहेत. अमेरिकन कुटुंबाच्या पाहुणचाराचेही वर्णन या पुस्तकात केले आहे.

अमेरिकन शेती व तेथे काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवन या वर्णनातून तेथील शेती व पशुपालन व्यवसायाच्या प्रगतीचे दर्शन होते. ‘अमेरिकन न्हावी’ व ‘अमेरिकन म्हाता-या’ हे व्यक्तिचित्रणात्मक लेख वाचताना लेखकाची विनोद बुद्धी अधिकच नजरेत भरते.

अमेरिकन रंगभूमीचाही आस्वाद लेखकाने घेतला. ब्रॉडवे या अमेरिकन नाट्यसृष्टीच्या माहेरघराचे वर्णन आपल्या लेखात त्यांनी केले आहे. तेथील लोकशाहीवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.

निरनिराळ्या देशातून अमेरिकेत स्थायिक झालेल्या लोकांनी आपली संस्कृती अमेरिकेत रुजवली. त्यामुळेच अनेक संस्कृतींचा संगम येथे पाहायला मिळतो. या संस्कृतीचा लेखकांना आलेला अनुभव आपल्याला वाचायला मिळतो. असे हे अमेरिकन प्रवास वर्णन म्हणजे विनोदाची फोडणी असून आपणही ते नक्की वाचा.

परिचय : श्री. गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर, मु. पो. माळगाव, बागायत, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.

मोबा. 9420738375, ई-मेल gurutamhankar@gmail. com

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

आजीव सदस्य, कोमसाप मालवण 

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “स्पेस ट्रॅव्हल” -लेखिका : श्री अच्युत गोडबोले आणि सुश्री आसावरी निफाडकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “स्पेस ट्रॅव्हल” -लेखिका : श्री अच्युत गोडबोले आणि सुश्री आसावरी निफाडकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : स्पेस ट्रॅव्हल 

लेखक : अच्युत गोडबोले, आसावरी निफाडकर 

पृष्ठे : ३२४

मूल्य : ४००₹ 

सध्या ‘स्पेस’ म्हणजेच अंतराळ या विषयाचं अनेकांच्या मनात कुतूहल वाढल्याचं बघायला मिळतं आहे. भारतात या चर्चाची सुरुवात झाली ती ‘मंगलयान’च्या यशामुळे! त्यानंतर ‘चांद्रयान’ मोहिमांमुळे! या दोन्ही मोहिमांमुळे भारताचं नाव जगभर गाजलं. आपलंच काय पण संपूर्ण जगभराचं लक्ष भारताच्या इस्रोनं आपल्याकडे खेचलं! !

माणसाला ‘स्पेस’विषयी कित्येक शतकांपासून आकर्षण आहेच. १८ व्या शतकापासून तिथे नेमकं काय आहे, हे शोधण्याच्या ओढीनं झपाटलेल्या संशोधकांनी प्रयत्न सुरू ठेवले; तर त्याही आधीपासून कथाकरांनी आपल्या कथांमधून सुंदर स्वप्न रंगवून दाखवायला सुरुवात केली. त्यातली काही स्वप्नं प्रत्यक्षात उतरली, तर काही प्रत्यक्षात उतरतील, अशी आशा निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात रूपांतर होताना आपण आता बघणार आहोत.

‘स्पेस’ अर्थात ‘अंतराळ’ माणसासाठी फार परकं राहिलं नाही. प्लेटो म्हणाला तसं –

‘Astronomy compels the soul to look upwards and leads us from the world to another. ‘ – Plato

प्लेटोचं हे वाक्य आज खरं वाटतं. माणूस अंतराळात डोकवला आणि संपूर्ण जगालाच एक वेगळं जग दाखवण्यात यशस्वी झाला. ‘स्पेस’ ही एक भन्नाट गोष्ट आहे. त्यात किती रहस्यं दडली आहेत कोण जाणे? पण आपण ती सगळी रहस्यं नुसती शोधून काढण्याचाच नाही, तर तिथे जाऊन राहण्याचा घाट घालतोय. या प्रयत्नांविषयीचं हे पुस्तक आहे.

या पुस्तकात, अंतराळ म्हणजे काय, अंतराळात जाण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाच्या उदय झाला, रॉकेटविषयी थोडीशी माहिती, अंतराळ प्रवासाची सुरुवात कशी आणि का झाली? , यादरम्यान काय काय झालं? या इतिहासात कोण कोणत्या शिलेदारांचा सहभाग होता आणि आहे? मोहिमा कशा पार पाडल्या गेल्या, त्यांच्याविषयी थोडीशी माहिती आणि भविष्यातल्या मोहिमांविषयीची माहिती असं सगळंच या पुस्तकात वाचायला मिळणार आहे. याशिवाय, इस्रोच्या अनेक मोहिमा आपण यशस्वी होताना बघितल्या आहेत. त्यांच्याविषयीची तसंच इस्रोच्या आगामी मोहिमांविषयीची माहितीही या पुस्तकात आहे.

‘अंतराळ’ हा अगदी आदिमकाळापासूनच माणसाच्या कुतूहलाचा विषय आहे. तिथली रहस्यं उलगडण्याआधीपासूनच माणसाच्या कल्पनेत तिथे जाण्याची, विशेषतः चंद्रावर जाण्याची स्वप्नं दिसायला लागली. ती अनेक कथा-कादंबऱ्यांमधून मांडली जात असताना त्या कल्पना सत्यात उतरण्याची आशाही निर्माण व्हायला लागली. रशिया आणि अमेरिका या देशांनी अंतराळात आणि अगदी चंद्रावर पाऊल ठेवलं आणि एका वेगळ्याच पर्वाला सुरुवात झाली. अंतराळ संशोधनात अनेक देशांनी रस दाखवला. त्यात भारतही होता. भारताने या क्षेत्रात आपली अतुलनीय क्षमता दाखवून दिली आहे.

आज आपण चंद्रावरच काय; पण त्याही पलीकडे जाण्याची तयारी करतो आहोत. अंतराळात फक्त जाऊन परत येण्याचाच नाही, तर तिथे मानवीवस्ती करून राहण्याच्या दिशेनं पावलं पडताहेत. मानवी स्वप्नं सत्यात उतरण्याच्या या प्रवासाचा भूतकाोहिमांचा आढावा घेणारं आणि भविष्यातल्या पुस्तक म्हणजे स्पेस ट्रॅव्हल.

अनुक्रमणिका : 

१. अवकाश म्हणजे काय?

२. ‘रॉकेट’ची रचना

३. रॉकेटची गोष्ट

४. स्पेस एजन्सीजचा उदय

५. स्पेस वॉरची सुरवात

६. अमेरिकेच्या मोहिमा

७. अपोलो

८. उडत्या प्रयोगशाळा

९. दुर्घटना

१०. इस्रो (ISRO)

११. भारतीय अंतराळ संशोधक

१२. समारोप

पुस्तक सर्वच स्तरातील लोकांसाठी, तसेच भेट देण्यासाठी उपयुक्त.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “बँकिंग क्लासरुम – भाग १ व २” – लेखक : श्री विद्याधर अनासकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “बँकिंग क्लासरुम – भाग १ व २” – लेखक : श्री विद्याधर अनासकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : बँकिंग क्लासरुम – भाग १ व २.

लेखक : श्री विद्याधर अनास्कर

पृष्ठे : २४४+२३२= ४७६

मूल्य : ६५०₹ (दोन्ही भागाचे) 

प्रकाशक : सकाळ प्रकाशन 

शिक्षणाचा प्रसार आता सर्वदूर झाला आहे. उच्च शिक्षितांची संख्या वाढत चालली आहे. त्यांचे पुस्तकी ज्ञान त्यांच्यासाठी खचितच अभिमानास्पद असेल. पण खूप शिकलेली मंडळी प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात वा व्यवहारात यशस्वी होतातच असे नाही. ‘अर्थसाक्षरते’चा अभाव, हे त्यामागील एक मुख्य कारण असते. सध्या आर्थिक फसवणुकीच्या बातम्या जवळपास रोज वाचायला, पाहायला मिळत आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. शहरात शिक्षितांचे प्रमाण अधिक असूनही हे घडते, कारण आर्थिक बाबींविषयी असलेले त्यांचे अज्ञान; हे होय!

हे चित्र प्रबोधनाच्या माध्यमातून बदलावे, यासाठी काही व्यक्ती, संस्था सातत्याने प्रयत्न करत आहेत. विद्याधर अनास्कर हे त्यांतील एक ठळक नाव. त्यांनी बँकिंग साक्षरतेबद्दल जणू एक चळवळच सुरू केली आहे. या क्षेत्राचा त्यांचा केवळ अभ्यास नाही, तर ते गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बँकिंगमध्ये प्रत्यक्ष कार्यरत आहेत. ‘उद्यम विकास सहकारी बँक, ‘ ‘विद्या सहकारी बँक, ‘ ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, ‘ अशा अनेक बँका आणि आर्थिक संस्थांमध्ये त्यांनी उच्चपदांवर काम केले आहे आणि करत आहेत. याखेरीज ‘नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन बँक्स, ‘ ‘महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशन, ‘ ‘रिझर्व्ह बँक’ यांच्याशी संबंधित कामांतही त्यांनी आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांनी बँक साक्षरतेविषयी केलेल्या लिखाणाला सखोल अभ्यासाची आणि दीर्घ अनुभवाची दुर्मीळ जोड मिळाली आहे.

सामान्यांमध्ये बँकिंग साक्षरतेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या ‘बँकिंग साक्षरता प्रतिष्ठान’ या धर्मदाय संस्थेच्या माध्यमातून ते शालेय स्तरापासून अर्थसाक्षरतेचा प्रसार करत आहेत.

बँकेच्या कामकाजाविषयी लोक जागरूक व्हावेत, त्यांचे अज्ञान आणि गैरसमज दूर व्हावेत, यासाठी श्री. अनास्कर यांनी दैनिक ‘सकाळ’मध्ये २०१० पासून सदर लिहिण्यास सुरुवात केली. त्यांचे हे लेखन तब्बल सात वर्ष सुरू होते. याच प्रकारे अन्य एका नियतकालिकातही त्यांनी दीर्घ काळ सदर चालवले. या वृत्तपत्रीय लेखनाचे संकलन म्हणजे ‘बँकिंग क्लासरूम : भाग १’ आणि ‘ भाग २’ ही पुस्तके होय.

वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि श्री. अनास्कर यांनी दिलेली उत्तरे, असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. बँकिंगसंदर्भात कोणाही सर्वसामान्य व्यक्तीला जेवढे प्रश्न पडू शकतात, त्यांपैकी बहुतांश मुद्द्यांचे शंकासमाधान या ‘बँकिंग क्लासरूम’ मध्ये हमखास होते, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. कर्ज, तारण, जामीनदार, जप्ती, मालमत्तेचे लिलाव, न वटणारे चेक, बँकांचा ‘नॉन- परफॉर्मिंग ॲसेट्स’ (एनपीए), ठेवींचे मुदतपूर्व रोखीकरण, खातेदाराची ‘केवायसी’ यांसह विविध विषयांवरचे पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे एकंदर बँकिंग व्यवस्थेचे अंतरंग नेमकेपणाने उलगडून दाखवतात.

वाचकांच्या प्रश्नाला उत्तरे देताना अनास्कर यांनी ती अत्यंत सरळ व सोप्या भाषेत देत, त्यामधील कायदेशीर भाषेचे जडत्व टाळले आहे. रिझर्व्ह बँक अथवा सहकार खात्याचे नियम सांगताना त्यामागील उद्देशही विषद करण्याची त्यांची शैली अफलातून आहे. त्यांची अनेक उत्तरे, न्यायालयीन प्रक्रियेत तज्ज्ञांचे मत (Expert Opinion) म्हणूनही नोंदवली गेली आहेत. केवळ वर्तमानपत्रांमधून लिखाण करून ते थांबले नाहीत; तर यू-ट्यूब, टीव्ही चॅनेलस, रेडिओ इत्यादी माध्यमांद्वारेही बँकिंग साक्षरतेचे कार्य ते अव्याहतपणे करत आहेत. या पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर त्यांची लेखमाला एकत्रित स्वरुपात आल्याने त्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांना त्वरित उत्तरे उपलब्ध होतील.

या पुस्तकाचे वाचन-मनन, अभ्यास करणारी सर्वसाधारण व्यक्तीही त्यातून मिळालेल्या ज्ञानाच्या बळावर तिच्या मित्रपरिवारात तज्ज्ञ समजली जाईल, एवढे हे पुस्तक माहितीसंपन्न आहे. फक्त वाचक नव्हे, तर बँकिंग क्षेत्रात काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांनाही ‘बँकिंग क्लासरूम’ मार्गदर्शक ठरू शकेल. हे पुस्तक सलग वाचणे, यात आनंद आहेच; पण ते प्रश्नोत्तर स्वरूपात असल्याने, पुस्तकाची उजळणी करताना कोणतेही पान उघडून वाचन सुरू केल्यास, त्यात मागचा -पुढचा संदर्भ जुळण्याची गरज भासत नाही. प्रत्येक प्रश्न आणि त्याचे उत्तर, हे जणू एक छोटे प्रकरणच आहे.

बँकेचे सेवक, खातेदार, कर्जदार, जामीनदार, ठेवीदार, तसेच बैंकिंगविषयी जिज्ञासा असणारी कोणतीही व्यक्ती.. या सर्वांसाठी ही ‘बँकिंग क्लासरूम’ निश्चित उपयुक्त ठरेल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी” – लेखक : श्री जगदीश काबरे ☆ परिचय –  सुश्री मीनल केळकर ☆☆

सुश्री मीनल केळकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी” – लेखक : श्री जगदीश काबरे ☆ परिचय –  सुश्री मीनल केळकर ☆

पुस्तक : वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी

लेखक : जगदीश काबरे 

प्रकाशक : लोकायत प्रकाशन 

संपर्क क्र. : 8484977899

मूळ किंमत : ₹ 220 

सवलत किंमत : ₹ 200

विज्ञान हा फक्त प्रयोगशाळेतील संशोधनाचा भाग नाही, तर ते आपल्या आजूबाजूच्या जगातही आहे. –चंद्रशेखर वेंकट रमण (भारतीय नोबेल पारितोषिक विजेते)

मानवी संस्कृतीचा इतिहास हा तसे पाहता वैज्ञानिक प्रगतीचाच इतिहास आहे. चाकाच्या आणि अग्नीच्या शोधातच आधुनिक विज्ञानाचे बीज आहे. ह्या बीजातून विज्ञानाचा विशाल वृक्ष विस्तारला. तो अजूनही विस्तारतोच आहे. असंख्य अशा ज्ञानशाखा या वृक्षावर फुटल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान मानवापुढे मांडीत आहेत. परंतु इतर वृक्षांप्रमाणे ह्या वृक्षावरही एक आगंतुक पण निरुपयोगी असे बांडगूळ उगवले आहे. ते बांडगूळ आहे छद्म विज्ञानाचे, अध्यात्माचे आणि अंधश्रद्धेचे.

‘वैज्ञानिक दृष्टी आणि सृष्टी’ या पुस्तकातून वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? भावना दुखावण्याचा रोग, सुशिक्षित की नुसतेच शिक्षित?  गर्भसंस्कार, ज्योतिष, वास्तुशास्त्र, पितृपक्ष, पौर्णिमा, देव नावाची संकल्पना या पौराणिक अंधश्रद्धांबरोबरच आधुनिक अंधश्रद्धा कोणत्या? कालगणना, मृत्यू आणि जीवन, वाद, वितंड आणि चर्चा अशा विविध विचारांवर चिंतन केलेले आहे. वाचकाला वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगण्यासाठी उद्युक्त करणारे हे पुस्तक वाचनीय आहे.

परिचय : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “छोट्या अणूची मोठी गोष्ट” – लेखक : श्री दिलीप बर्वे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “छोट्या अणूची मोठी गोष्ट” – लेखक : श्री दिलीप बर्वे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

 

पुस्तक : छोट्या अणूची मोठी गोष्ट

लेखक : श्री दिलीप बर्वे 

पृष्ठे : १०४

मूल्य: १७०₹ 

श्री. दिलीप बर्वे आपल्या मनोगतात म्हणतात….

“ लहानपणी ‘भीमरूपी महारूद्रा… ‘ हे समर्थांनी रचलेले मारुती स्तोत्र तोंडपाठ असे. त्यात मारुतीचे वर्णन – “अणूपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे. ” ही ओळ म्हणतांना मला कुतूहल वाटे.

आईला विचारलं की ‘अणू म्हणजे काय गं?’ – ‘अरे, म्हणजे सूक्ष्म अगदी लहान आणि ब्रह्मांड म्हणजे अतिशय मोठा, प्रचंड ‘ 

नंतर जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजात अॅटम इलेक्ट्रॉन वगैरेचा अभ्यास सुरू झाला. अॅटमचे विघटन केले तर प्रचंड ऊर्जा निर्माण होते हे ही अभ्यासात आले.

दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा, नागासाकीवर अणुबॉम्ब अमेरिकेने टाकला आणि अक्षरशः ब्रह्मांड हादरून गेले. (तेव्हा लक्षात आले की समर्थ किती थोर होते. अणूचा संबंध ब्रह्मांडापर्यंत जोडला होता.)

हिरोशिमा-नागासाकी अणू स्फोटाला आज मितीला ८० वर्षे होत आली. आजही अणू शब्द उच्चारला तरी सामान्य माणसाला भीती वाटते.

मात्र आपण लक्षात घ्यायला हवे की आताचे युग हे अणुयुग आहे. अणूपासून सुटका नाही. घाबरून लांब जाऊन चालणार नाही.

मुबलक वीज हवी तर अणुशक्ती, वाळवंटात शुद्ध भरपूर पाणी हवे तर अणू, चांगली भरघोस पिके हवीत, रसदार भरपूर फळे हवीत, तर अणू अनेक दुर्धर रोगांवर निदान, उपचार हवे असतील, तर अणू थोडक्यात अणुशक्तीला शरण जायला हवे. अणूची भिती काढून टाकायला हवी.

जैतापूरला जगातले सर्वात मोठे अणुवीज केंद्र सुरू व्हायचे आहे, प्रकल्पाचा करार होऊन १५ वर्षे होऊन गेली. पण अजूनही प्रकल्प कागदावरच आहे. कारण सामान्य जनतेला वाटणारी भिती.

जपानने अणूचा विध्वसंक अनुभव घेतला. पण भिती बाजूला ठेवून त्याच जपानमध्ये २५ पेक्षा जास्त अणुवीज केंद्र कार्यरत आहेत. हे लक्षात घ्यायला हवे.

शास्त्रीय जगतातील बहुतेक सर्व अणुशास्त्रज्ञ आता ‘शांतते करिता अणू’ या प्रकरणाच्या वाचनाने मनातील भिती निश्चित जाईल अशी मला आशा आहे. “ 

– – – या पुस्तकाच्या लेखकांचे वरील मनोगत वाचल्यावर पुस्तकाचा आणखी वेगळा परिचय करून देणे मला गरजेचे वाटत नाही.. बरोबर ना ? अतिशय आवश्यक असणारी ही माहिती सर्वांना असायला हवी असे वाटते.. लहानथोर सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे मी नक्कीच म्हणेन.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “परीसस्पर्श (लेखसंग्रह)” – लेखक : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – श्री दादासाहेब दापोलीकर (सुमंत जुवेकर) ☆

श्री ‘दादासाहेब दापोलीकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “परीसस्पर्श (लेखसंग्रह)” – लेखक : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – श्री दादासाहेब दापोलीकर (सुमंत जुवेकर)  ☆

पुस्तक : परीसस्पर्श (लेखसंग्रह) 

(आदरणीय, स्पृहणीय, अनुसरणीय अशा शब्दचित्रांचा परामर्श.. !!)

लेखक – डॉ. निशिकांत श्रोत्री

मो ९४०४३२०५९३

प्रकाशक – स्मिता टाईपसेटर्स, पुणे

पृष्ठसंख्या – १५४

मूल्य – ₹ २००/-

काही स्मृतिचित्रे सातत्याने आपल्या मनाच्या चलभूमीवर परीसरूप घेऊन जीवनाला, अंतरंगाला सोनियाची झळाळी देतात. अशाच काही परीसांचे हे आलेख आपल्या हाती लेखक सुपूर्त करत आहेत.

सहज सोपी समजणारी रचना, प्रत्येकाच्या स्वभावातील बारकावे, प्रत्येकाची वागण्याची आणि व्यक्त होण्याची लकब हे सर्व वाचताना उत्कंठा वाढत जाते. लेखकाच्या आयुष्यातील ह्या सर्व व्यक्तिमत्वाशी आपण नकळत जोडले जातो.

यांत वापरलेली संवादशैली, योग्य आणि अचूक ठिकाणी पेरलेली वचने, गाणी, म्हणी यांचा चपखल वापर यामुळे हे पुस्तक वाचनीय, प्रेरणीय, संग्रहणीय झाले आहे.

पुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ श्री. हेमंत सरदेसाई यांनी मोठ्या परिश्रमाने केल्याचे दिसून येते.

१) परीसस्पर्श : मराठे सर

मराठे सरांचे करडे व्यक्तिमत्व लेखाच्या सुरुवातीला असलेल्या संवादातूनच जाणवते. करडी शिस्त असलेले, विद्यार्थ्यावर मनापासून प्रेम करणारे मराठे सर म्हणजे विलक्षण संतापी व्यक्ती. हुशार, निवडक विद्यार्थी गोळा करून त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचे चीज व्हावे म्हणून शिकविण्याचा वेडा ध्यास. लेखकांचाही रात्री ९ ते ११ चालणाऱ्या विशेष वर्गात समावेश होता.

सरांना एक सवय होती. सतत खारे दाणे खाण्याची. त्यांचा अखेरदेखील या सवयीमुळे कठीण झाला होता. शेवटच्या दिवसात सरांची सेवा करावयास मिळाल्याचे भाग्य लेखकांना लाभले आहे. लेखाचा शेवट अतिशय हृद्य झाला आहे. सरांचे ऋण अखेरपर्यंत फेडू न शकल्याची खंत ते व्यक्त करतात.

२) गुरुमहर्षी : बाबासाहेब शिरोळे

झूलॉजीसारखा कठीण विषय सोपा करून शिकविणे हे त्यांचे कसब. विषय विलक्षण सोपा करून शिकवण्यासाठी दैनंदिन जीवनातील दाखले देत. त्याच्या जोडीला सक्रिय अभिनयही असे.

एखादे विशिष्ट पुस्तक संदर्भ म्हणून वापरत नसल्याने लेखक श्रोत्री सर शिरोळे सर शिकवत असताना त्याच्या मनापासून नोट्स काढत असत. सरांकडून त्या वेळेवारी तपासूनही घेत असत. शिरोळे सरांनी कधीही लेखकाच्या जिज्ञासू वृत्तीला तडा जाऊ दिला नाही. तथापि ते उत्तर कसे शोधायचे याचे मार्गदर्शन केले. यातूनच लेखकांनी स्वावलंबनाचा धडा आत्मसात केला.

हिमालय हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. हिमालयाशी संबंधित नऊ विषयावर त्यांची व्याख्यानमालाही असे. सरांनी सर्प या विषयीदेखील विशेष संशोधन केले होते. त्याबाबत गाढा अभ्यास होता. अध्यात्म आणि संत साहित्य यावर त्यांची विशेष व्याख्यानेदेखील होत.

३) दुधावरची साय : दादा भट 

लक्षवेधक सुरुवात हे लेखकाच्या हातचं कौशल्यच आहे. मातृभूमीचा झालेला विरह करुण रसात आवेगाने मांडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या कवितेने लेखाची सुरुवात झाली आहे.

आपल्या लहानग्या कोवळ्या वयातील नातवाला जाज्वल्य देशभक्तीचा पाठ देणारे आजोबा श्री दादा भट यांच्याविषयी लेखकांनी या स्मृतीचित्रात वर्णिले आहे. लेखकांचे आजोबा हे हाडाचे शिक्षक. शिकणारे विद्यार्थी कोण, त्यांची आकलन शक्ती आणि शिकवण्यामागील उद्देश याची पुरेपूर जाण ठेवून ज्ञान देणारे दादा हे लेखकांच्या लेखनामागची प्रमुख प्रेरणा आहेत.

त्यांच्या मॅट्टिकच्या उत्तरपत्रिका या अंतिम निकालानंतर सूचनाफलकावर लावल्या होत्या. असा आदर्श शिक्षक आणि विद्यार्थी रूपात असलेले दादा हे लेखकाचे सर्वात लाडके शिक्षक होते. आदर्श शिक्षकासोबत ते लेखकही होते. त्यांनी लिहिलेली इतिहासाची पुस्तके ही त्याकाळी पाठ्यपुस्तक म्हणून वापरली जात होती.

आपल्या सर्व मुलांना उत्तम संस्कार देऊन त्यांना आदर्श नागरिक घडविणे हा त्यांचा ध्यास होता. काळानुसार आवश्यक बदल करणे या प्रगत विचारांनां त्यांचा पाठिंबा होता. कोणतेही ज्ञान, कौशल्य प्राप्त करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो.

४) तत्त्वनिष्ठ : श्री. न. ना. भिडे सर 

शास्त्र आणि भाषा यांचे अचूक, सखोल ज्ञान असलेले श्री भिडे सर हे आहेत या पुस्तकातील आणि लेखकाच्या जीवन मार्गावरील महत्त्वाचे परिस. स्वभाव शांत, डोळे कमालीचे तेजस्वी, अमोघ वाणी आणि पेहरावात अतिशय साधेपणा, विस्तीर्ण गौरवर्णीय भालप्रदेशावर भूमध्यावर रेखलेली लाल रंगाची चंद्रकोर विशेष लक्ष वेधून घेत होती. लेखकाला घडलेले परिसाचे हे प्रथमदर्शनी वर्णन आपल्या वाचकांच्या डोळ्यासमोर सहज चित्र निर्माण करते.

योग्य आणि परिश्रमी, होतकरू विद्यार्थ्यांना अधिक बहुश्रुत आणि परिपूर्ण बनविण्यासाठी ते विशेष संस्कृत वर्गाचे आयोजन करीत असत. वर्गाला सुरुवात करण्यापूर्वी ते सर्व विद्यार्थ्यांना आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शनास घेऊन जात. अपेय पान, सामीष आहार आणि अनैतिक वर्तन यापासून दूर राहावे, अशी शपथ ते त्या समाधीसमोर विद्यार्थ्यांना घ्यायला लावत असत. शिक्षणाबरोबरच उच्च प्रतीचे सात्विक संस्कारही त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिले.

५) दिलदार : डॉक्टर अच्युत उमराणीकर

अत्यंत विद्वान, तत्वनिष्ठ, कामाप्रती एकनिष्ठ आणि आपले सर्वस्व वाहणारे सर श्रोत्री सरांसाठी एक प्रसन्न, दिलदार व्यक्तिमत्व. विद्यार्थ्यांमधील त्यांना त्याप्रमाणे जबाबदारी देणे आणि त्यांना गुणसंपन्न करणे हा त्यांचा ध्यास. म्हणूनच लेखक श्रोत्री सरांचे वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच पदवी मिळण्यापूर्वी उमराणीकर सरांनी त्यांचे मीरा हॉस्पिटल सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर एका दिवसाकरता दिली होती.

लेखकांच्या कुटुंबात एक हेलावून टाकणारी घटना घडली. लेखकांची वहिनी धनुर्वाचाचे निमित्त होऊन सव्वा वर्षाच्या लहान मुलीला सोडून अचानक निघून गेली. त्यावेळी सर्व घर अतिशय दुःखात होते. या कठीण प्रसंगी डॉक्टर स्वतः लेखकांच्या घरी आले आणि धनुर्वाताचा लसीकरणाचा कार्यक्रम उरकला. असे हे पितृतुल्य उमराणीकर सर. आपुलकीच्या पोटी लहानथोर भाव रुजत नाही, हे तत्त्वज्ञान या प्रसंगातून लेखकाला शिकावयास मिळाले.

पदवीत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही करणे हा जणू डॉक्टरांचा छंदच. पुणे ऑब्सटेट्रिक अँड गाय्नॉलॉजिकल सोसायटी सरांच्या अखेरपर्यंत अर्ध्या वचनात होती तरीही उमराणीकर सरांनी याचा कधीही स्वतःसाठी फायदा करून घेतला नाही. शेवटपर्यंत दिलदार आणि तत्वनिष्ठ हीच ओळख लेखकांच्या मनावर कायमची कोरली गेली.

६) देवमाणूस : देव सर

स्मृतीचित्राची सुरुवात वेधक प्रसंगाने करून देणे हे लेखकाचे गाढे वैशिष्ट्य. हाडाचे शिक्षक, अभिनय आणि रसाळ वाणीद्वारे पाठाची ओळख करून देणारे, अतिशय तन्मयतेने शिकविणारे, मोकळेपणाने आपुलकीचे संवादाचे नाते ठेवणारे प्रेमळ स्वभावाचे देवसर.

एखादा विषय नीट करावा म्हणून देखील त्यांनी आगळ्या पद्धती शोधून काढल्या होत्या. जसे की इंग्रजी शिकवताना काही नियम बनवले होते जे प्रत्यक्ष पुस्तकात दिलेले नसत. पण विद्यार्थी हमखास तेथे चुका करत. यासाठी त्यांनी काही बापजन्माचे नियम शोधून काढले होते,

सदैव हसतमुख राहणे आणि सहवासातील इतरांना देखील हसवणे हा स्वभाव. एखादा विषय विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावा यासाठी विलक्षण आटापिटा. असे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्व.

७) मायेचा आधार : लिली कामत मॅडम

लिली कामत मॅडम म्हणजे जणू मायेची अवीट गोडीच. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी शिकण्याची धडपड पाहून त्यांना स्नेहाने मार्गदर्शन करणाऱ्या लिली मॅडम. लेखकाची झालेली पहिली ओळख मायेचा आधार होऊन आयुष्यभरासाठी सावली झाली. लेखकांची अभ्यासातील सखोल रुची पाहून त्यांना अनेक गोष्टी स्वतः समजावून सांगितल्या. बारकावे लक्षात आणून दिले. लिली मॅडम खरेच अत्यंत प्रेमळ आणि दयाळू होत्या.

अनेक उत्तम गुणांची खाण असलेल्या लिली मॅडम खरेच लेखकाच्या शैक्षणिक जीवनातील थोरली बहिण आहेत, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये..

८) कलाकार : डॉ. शिरीष दड्डी

“देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे”

ज्या हातांनी रुग्णांवर उपचार करावेत त्याला नवीन जीवनदान द्यावे त्याच हातांनी अतिशय सुंदर कलाकृती घडावी. प्लॅस्टिक सर्जरीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारे दड्डी सर म्हणजे हरहुन्नरी नव्हे तर हाडाचे कलाकार होते हे निश्चित.

जितकी मोहकता, कलाकुसर त्यांनी तयार केलेल्या शिल्पामध्ये तेवढेच देखणे आणि राजबिंडे व्यक्तिमत्व. बुद्धिमत्ता आणि कलात्मकता यांचा अनोखा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात जाणवत असे. आणि म्हणूनच कौशल्यपूर्ण शिकवण्यामुळे आणि लोभस व्यक्तिमत्त्वामुळे विद्यार्थी प्रभावित होत असत. अशीच एक प्रभावित झालेली विद्यार्थिनी विनया फडके ही त्यांच्या आयुष्याची जोडीदारीण झाली.

इंटर्नशिपसाठी लेखक जेव्हा ठाण्याच्या रुग्णालयात दाखल झाले तेव्हा उपचार व शस्त्रक्रिया यात आलेल्या अडचणी विषयी लेखक दड्डी सरांना पत्र पाठवून विचारीत असत. दड्डी सर तत्काळ त्याला समर्पक आणि योग्य उत्तर पाठवत असत. आपल्या विद्यार्थ्याला क्षणोक्षणी मदत करणारे, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे दड्डी सर हाडाचे कलाकार होते.

ख्यातनाम कुशल प्लास्टिक सर्जन नावारुपाला आलेले दड्डी सर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले होते.

९) परिसहुनीही थोर : डॉ. अपर्णा निशिकांत श्रोत्री

जीवनमार्गावर साथ करणारी सहचारिणी असो की सहचारी.. तिच्यामुळेच जीवनाला अर्थ प्राप्त होत असतो. तो किंवा ती जीवनात येणे फार मोठे भाग्य असे समजले जाते.

वैद्यकीय व्यवसाय उत्तम करणे सांभाळणारे डॉक्टर निशिकांत श्रोत्री लिखित परीसस्पर्शी या स्मृतीचित्रातील हे अखेरचे सुगंधी पुष्प आहे डॉक्टर सौ. अपर्णा निशिकांत श्रोत्री यांचे.

वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रोत्री मॅडम घरी आल्यावर मात्र प्रेमळ पत्नी, कर्तव्यदक्ष सून या भूमिकेत सहजच शिरत असत. केवढी ही विशेषता. त्यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य ती सांगड घालत घराण्याची परंपरा जपली.

स्वतःचा वैयक्तिक व्यवसाय जपत असताना आपण या समाजाचे काही देणे लागतो ही भावना अखेरपर्यंत मनात रुजत होती. जे नवीन ज्ञान असेल ते आत्मसात करायची विलक्षण पिपासा होती. मातृत्वाच्या सुरक्षिततेसाठी ज्ञान आणि कौशल्य यांचा उपयोग केला. प्रसूतीशास्त्र आणि त्या क्षेत्रात अपर्णा मॅडमनी अनेक महत्त्वपूर्ण शोध कार्य केले.

कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या अपर्णा मॅडम यांची घोडदौड अत्यंत वाखाणण्याजोगीच! विविध देशात होणाऱ्या परिषदांमध्ये निबंध सादर करण्यासाठी त्यांना निमंत्रणे येऊ लागली. त्यांची कीर्ती आणि कर्तृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले होते तरीही नम्रतेचा वसा घेतलेल्या अपर्णा मॅडम आपल्या दैनंदिन कामात आणि जबाबदारीमध्ये तितक्याच उत्साहाने वावरत असत. तेथे कधीही, कसलीही कसूर केली नाही.

तपस्वीनी, कलायोगिनी, मधुरभाषिणी, प्रेम मोहिनी अपर्णा, लेखक श्री श्रोत्री सरांच्या जीवनातील निरंतर संजीवन आहे. कौशल्य, सहजता, प्रेमळपणा, धाडस, साहस, खंबीरता अशा एक न अनेक गुणांनी बहरलेले हे केवळ एक पुष्प नव्हे तर हा सुगंधी ताटवाच!

– – – डॉ श्रोत्री यांनी वयाच्या ८०व्या वर्षीदेखील लेखन जगतात दाखविलेला हा उत्साह खरोखरीच स्तिमित करणारा आहें. वैद्यक व्यवसायामध्ये एमडी डीजी ओ आणि अशा अनेक पदव्या धारण करणारे डॉक्टर श्रोत्री साहित्याच्या प्रांतातही अत्यंत आवडीने आणि सहजतेने मुसाफिर करतात. डॉक्टरांचा व्यासंग फार मोठा आहे.

लेखक डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी लिहिलेला परीसस्पर्श हा लेखसंग्रह ह्याचं बोलक्या स्मृतिचित्रांचा अनोखा पुष्पस्तबक. वाचकांनी ह्या स्तबकातील हवे तें पुष्प हाती घ्यावे, मनमुराद गंध घ्यावा… वाचन करता करता उमलत जाते शब्दपाकळी आणि तें स्मृतिचित्र आपल्या मनावर नकळत कोरले जाते.. ज्या व्यक्तीमुळे लेखकांच्या जीवनाचे सोने झाले, त्या साऱ्या परीसांनी साकारलेले हे वाचनीय पुस्तक म्हणजे परीसस्पर्श.

परिचय : श्री दादासाहेब दापोलीकर (सुमंत जुवेकर) 

https://dadasahebdapolikar. wordpress. com या ब्लॉगवर वाचनासाठी उपलब्ध आहें.

संपर्क – ९९६७८४०००५ ईमेल – dadasahebdapolikar@gmail. com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “आमच्या आयुष्यातील काही आठवणी” — लेखिका : श्रीमती रमाबाई रानडे  ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आमच्या आयुष्यातील काही आठवणी” — लेखिका : श्रीमती रमाबाई रानडे  ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

पुस्तक : आमच्या आयुष्यातील काही आठवणी  

लेखिका : श्रीमती रमाबाई रानडे 

प्रकाशक : समन्वय प्रकाशन, कोल्हापूर 

प्रमुख वितरक- अजब डिस्ट्रीब्युटर्स, शाहूपुरी, कोल्हापूर.

हे पुस्तक म्हणजे रमाबाई रानडे यांनी महादेव गोविंद रानडे यांच्यावर लिहिलेले काहीसे आत्मचरित्रासारखे आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या विषयी समग्र माहिती देणारे असे पुस्तक आहे. या पुस्तकातील घटनांचा कालावधी 19 व्या शतकातील आहे. ज्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळणे ही गोष्ट समाजाच्या अंगवळणी पडलेली नव्हती. घरातील स्त्रियाच स्त्रियांना शिक्षणासाठी विरोध करत असत. रमाबाईंनी या पुस्तकात पतीचा उल्लेख ‘स्वतः’ असा केला आहे. ‘स्वत:’ नी रमाबाईंना धुळाक्षरापासून शिकवण्यास सुरुवात केली. तेव्हा घरातील इतर बायका त्यांना नावे ठेवत असत. ‘स्त्रीला शिक्षणाची गरजच काय? त्यांना गरजेपुरते संसाराचे ज्ञान असले की बास! अशा वृत्तीमुळे रमाबाईंना खूप जाच सहन करावा लागला.

पण पतीच्या इच्छेनुसार त्या शिकत गेल्या.

आर्य महिला समाजाच्या पंडिता रमाबाई तेव्हा सभेमध्ये व्याख्याने देत असत. त्यांचे सर्वांना कौतुक होतेच.

रानडे यांनी आपल्या पत्नीला त्यांच्या संपर्कात आणले. शिकण्यास प्रवृत्त केले. पतीच्या आज्ञेत राहून रमाबाईंनी आपला अभ्यास चालू ठेवला. पहाटे किंवा रात्री उशिरापर्यंत त्या अभ्यास करत व दिवसभर काम करत. महादेव गोविंद रानडे यांची ज्या ज्या ठिकाणी बदली झाली तिथे पतीबरोबर त्या गेल्या आणि त्यांनी पतीला साथ दिली. घरातील सर्व आश्रित विद्यार्थी, स्वयंपाकी वगैरे लोकांना सांभाळून घेत संसार सांभाळला.

ताई सासुबाई नणंद तसेच इतर वडील बायकांना त्या मान देऊन वागत असत, तरीही त्यांच्या शिक्षण घेण्याच्या विरुद्ध या सर्व स्त्रिया होत्या. पण रमाबाई त्याबद्दल ‘स्वतः’कडे तक्रार करीत नसत. स्वतः रानडे स्वभावाने करारी, सुसंस्कृत, न्यायी असे होते. रानडे यांची तब्येत बिघडल्यावर रमाबाईंनी त्यांची खूप शुश्रुषा केली हेही या आठवणींतून कळते.

त्यातच स्वतः रमाबाईनाही काही आजार झाला. रमाबाईंचे ऑपरेशन करायचा निर्णय देताना रानडे यांचे मन कातर झाले होते. पण ऑपरेशन सुखरूप पार पडले, तेव्हा माधवरावांना हायसे वाटले.

अहमदाबाद, जयपुर, कलकत्ता असा प्रवास करत ही सर्व मंडळी सिमला येथे गेली होती. सिमला मध्ये चार महिने मुक्काम केला, तसेच हरिद्वारलाही गेले. हरिद्वार, हून लाहोर, अमृतसर असे मुक्काम करत अहमदाबाद मार्गे परत पुण्यात आले. मद्रास कडे एक महिनाभर राहून जबलपूर, प्रयाग, काशी, कलकत्ता असाही प्रवास केला. त्यानंतर 1891 मध्ये ते करमाळ्याला आले. परंतु तोपर्यंत रानडे यांची प्रकृती बिघडू लागली होती. पुण्यात आल्यावर प्रायश्चित्त वगैरे घेणे या गोष्टींचा त्यांना मानसिक त्रास झाला. प्लेगच्या साथी मध्ये त्यांनी पुण्यातील मुक्काम हलवला व महाबळेश्वरला गेले. 1899 साली त्यांची तब्येत बिघडतच चालली. सप्टेंबर मध्ये आजार पण वाढले. त्यांना Angina Pectoris हा आजार झाला होता. सप्टेंबर 1900 मध्ये त्यांची जीवन यात्रा संपली…

रमाबाईंच्या लिखाणातून आपल्याला तत्कालीन समाज रिती, परंपरा यांचे दर्शन होते. तेव्हाची सामाजिक स्थिती, स्त्रियांची अवस्था तसेच प्रवासाच्या अडचणी वगैरे अनेक गोष्टी कळतात. रमाबाई अतिशय हुशार होत्या. त्यांचा स्वभाव करारी आणि कर्तव्यनिष्ठ होता. पतीची सेवा करताना अजिबात कुचराई केली नाही. पतीच्या शिकवणीने शिकून तयार झालेल्या रमाबाईंचे हे चरित्र म्हणजे तत्कालीन परिस्थितीचा काळाचा आरसा आहे असे मला वाटते.

ही कादंबरी रोजनिशी स्वरूपात लिहिल्यासारखी आहे किंवा एक प्रकारे आत्मचरित्र लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न असेल! 19 व्या शतकातील पुणे ऐतिहासिक दृष्ट्या कसे होते तेही या कादंबरीत आपल्याला दिसून येते. ही कादंबरी वाचताना मला त्या काळातील बऱ्याच सामाजिक गोष्टींचा उलगडा झाला! आता आपण स्त्रियांचे शिक्षण हा विषय अगदी सहजगत्या बोलतो. उलट स्त्रिया शिक्षणामध्ये कांकणभर पुढेच आहेत असे दिसते. पण जेव्हा स्त्री शिक्षण घेणे अवघड होते त्या काळात महर्षी धोंडो केशव कर्वे, आनंदीबाई जोशींचे पती गोपाळराव, तसेच म. गो. रानडे, वगैरे सुधारकांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले आणि त्या बाबतीत स्वतः कार्य केले!

कादंबरी वाचनीय आहे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ब्रँड काटदरे” – लेखिका : सुश्री अपर्णा वेलणकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ब्रँड काटदरे” – लेखिका : सुश्री अपर्णा वेलणकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : ब्रँड काटदरे

लेखिका : अपर्णा वेलणकर

प्रकाशक : रोहन प्रकाशन 

पृष्ठ: २५०₹

एक ‘ब्रँड’ घडतो, त्याची कहाणी – – 

सध्याचा काळ हा भारतीय उद्योजकांसाठी खूपच उत्साहवर्धक आहे. व्यवसाय छोटा असो की मोठा; तो टप्प्याटप्याने वाढत जातो. व्यवसायाची वाढ ही कधीच एका सरळ रेषेत होत नाही. ही वाढ वळणावळणाने होते. त्यालाच ‘ए’ कर्व्ह असंही म्हटलं जातं. व्यवसायाची सुरुवात झाल्यानंतर काही वर्षांत एक वेळ येते जेव्हा तुम्हाला टप्पा ओलांडावा लागतो. त्यानंतर दुसरा टप्पा, त्यानंतर तिसरा टप्पा असा हा प्रवास असतो. यात अडचणी येतात, चढ उतार येतात, खूप अनुभव मिळतो. त्या सगळ्यांचा विचार करून पुढचा टप्पा गाठायचा आणि तोही पार करायचा असतो.

काटदरे फुड्सचा प्रवासही असाच वळणावळणाचा, रोचक आणि थक्क करणारा आहे. १९५८ मध्ये छोट्या गावातल्या एका स्वयंपाक घरात या व्यवसायाची सुरुवात झाली. तीन पिढ्यांनी त्याला खतपाणी घातलं आणि आज ‘काटदरे’ हा ब्रँड तयार झाला आहे. गेल्या ६७ वर्षातल्या अनुभवाचं संचित म्हणजे हे पुस्तक. त्यामुळेच त्याला एक वेगळं महत्त्व आहे. अशा प्रकारचं अनुभवाचं डॉक्युमेंटेशन होणं हे नव्या पिढीतल्या वाचकांसाठी आणि विशेषतः उद्योजकांसाठी साठी मोलाचं ठरणार आहे.

एखादा ब्रँड कसा घडतो हे ज्यांना जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल. प्रत्येक वेळी फक्त यशच सांगायचं नसतं तर झालेल्या चुकाही सांगाव्या लागतात, सांगायच्या असतात. मागच्या लोकांनी केलेल्या या चुकांपासून पुढल्या पिढीतले लोक शिकतात आणि त्यांचं नुकसान टळतं. आपण चार गोष्टी सांगितल्या तर दुसऱ्यांकडूनही आणखी चार गोष्टी कळतात. त्यामुळे मोकळेपणाने अनुभव शेअर केले गेले पाहिजेत. ज्ञान दिल्याने वाढतं असं आपल्या संस्कृतीत सांगितलंय; ते निःसंशय खरं आहे.

या पुस्तकात काटदरे उद्योगाच्या प्रवासातला संघर्षाचा काळ, झालेल्या चुका, त्या चुकांपासून घेतलेले धडे आलेलं अपयश, कसोटीचा काळ याबद्दल विस्ताराने आणि अगदी मोकळेपणाने लिहिलं आहे. या मोकळेपणाचं अभिनंदन यासाठी की प्रत्येकाने त्याच त्याच चुका करायच्या नसतात. जुन्या चुका टाळून नव्या चुका करायला संधी द्यायची हा या पुस्तकात सांगितलेला मंत्र खूप महत्त्वाचा आहे.

चढ-उतार हा व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे. कितीही कठीण काळ आला तरी आपल्या सचोटीचा मार्ग सोडायचा नाही. आडमार्गाने जायचं नाही. ग्राहकांच्या विश्वासाला तडा जावू द्यायचा नाही. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट सोसण्याची तयारी ठेवायची. आव्हानांचं संधीत रूपांतर करत मार्गक्रमणा करणं हाच शाश्वत यशाचा मार्ग असतो, हे काटदरे फूडसने घेतलेल्या भरारीचं खरं गमक आहे. सध्याचा काळ हा शॉर्टकटचा आहे. सगळ्यांना कमी श्रमात, कमी वेळेत जास्त यश हवं आहे. जास्त पैसे हवे आहेत. अशा काळात हे पुस्तक नवी वाट दाखवणारं ठरेल.

काळानुसार बदलणं, नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करणं, नव्या सिस्टिम्स आणणं हे ज्या पद्धतीने काटदरे यांनी केलं ते उद्योग करणाऱ्या प्रत्येकाने शिकण्यासारखं आहे. व्यवसायात यश मिळवायचं असेल तर काही गोष्ट आवश्यक असतात.

उत्तम टीम

वर्क कल्चर

नव्या तंत्रज्ञानाचा वापर

सेल्स/मार्केटिंगची अभिनव पद्धत

पॅकेजिंग

ग्राहक केंद्रित सिस्टिम्स

या प्रत्येक गोष्टीत काटदरे यांनी जे प्रयोग यशस्वी केले, राबवले, कामगारांचं परिवर्तन घडवलं त्यांच्या या अनुभवांमधून सगळ्यांना खूप काही-शिकण्यासारखं आहे. हे पुस्तक फक्त काटदरेंची प्रेरक कहाणी नाही तर ज्यांना उद्योगात यायचं आहे, जे उद्योग करत आहेत, ज्यांना मोठी झेप घ्यायची आहे, आव्हानांचं संधीत रूपांतर करायचं आहे अशा सगळ्यांना मार्गदर्शक ठरणारी ही एक रोमांचक यशोगाथा आहे.

– – ‘ उद्योजकतेच्या प्रवासात उद्योजकाकडे अनुभवाची खूप मोठी शिदोरी जमा होते. या पुस्तकाच्या रूपाने काटदरे कुटुंबाने आपली शिदोरी सर्वांसाठी खुली केली आहे. त्यातलं काय घ्यायचं? किती घ्यायचं? आणि त्याचा आपल्यासाठी कसा उपयोग करायचा हे प्रत्येकावर अवलंबून आहे. मनःपूर्वक शुभेच्छा! ‘

– डॉ. आनंद देशपांडे

संस्थापक, पर्सिस्टंट सिस्टिम्स आणि देआसरा फाउंडेशन

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “काकासाहेब चितळे.. सहवेदनेतून समृद्धीकडे” -लेखक : सुश्री वसुंधरा काशीकर – भागवत ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “काकासाहेब चितळे.. सहवेदनेतून समृद्धीकडे” -लेखक : सुश्री वसुंधरा काशीकर – भागवत ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : काकासाहेब चितळे.. सहवेदनेतून समृद्धीकडे 

लेखिका : वसुंधरा काशीकर – भागवत

पृष्ठे: २६८

मूल्य: ४९९₹

काकासाहेब चितळे – सहवेदनेतून समृद्धीकडे हे पुस्तक म्हणजे एका दूरदृष्टी असलेल्या उद्योजकाचे आणि सहृदयी समाजसेवकाचे प्रेरणादायी जीवनचरित्र आहे. चितळे उद्योगसमूहाचे आधारस्तंभ असलेले काकासाहेब चितळे (दत्तात्रय भास्कर चितळे) यांनी केवळ एक मोठा व्यवसायच उभा केला नाही, तर आपल्या कार्यामुळे समाजाच्या आणि अनेक व्यक्तींच्या जीवनात समृद्धी आणली.

या पुस्तकातून काकासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडतात :-

प्रेरणादायी उद्योजक : भिलवडीसारख्या छोट्या गावातून सुरुवात करून सातासमुद्रापार पोहोचलेल्या चितळे डेअरीच्या यशामागे काकांचा कसा मोलाचा वाटा होता, हे समजते. त्यांनी केलेले कठोर परिश्रम, त्यांची व्यवसायातील दूरदृष्टी आणि आधुनिक दृष्टिकोन यातून कशी धवलक्रांती घडली, याचा अनुभव येतो.

समाजकारण आणि संवेदना : दुष्काळग्रस्त आटपाडीला चारा छावण्यांसाठी मदत असो, अंधश्रद्धेतून लोणारी समाजाला दुग्धव्यवसायाकडे वळवणे असो, वा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी युरोपमध्ये थेट निर्यात व्यवस्था उभी करणे असो, काकांनी नेहमीच समाजाच्या विकासाला प्राधान्य दिले.

माणुसकीचे दर्शन : कर्जाने ग्रासलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला मदत करणे, होतकरू तरुणांना बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना उद्योजक बनवणे, वाचनालयाच्या विकासासाठी केलेले कार्य, स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी घेतलेले क्रांतिकारी निर्णय – अशा अनेक प्रसंगांतून त्यांच्यातील संवेदनशीलता आणि माणूसकी अधोरेखित होते.

कला आणि अध्यात्म : केवळ उद्योजकच नव्हे, तर कलासक्त आणि सश्रद्ध व्यक्ती म्हणून काकासाहेब कसे होते, हे या पुस्तकातून अनुभवता येते. धार्मिक स्थळांची जपणूक वा शास्त्रीय संगीताला दिलेले प्रोत्साहन, यातून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.

कौटुंबिक मूल्ये : चितळे कुटुंबातील परंपरा, त्यांचे नातेसंबंध आणि कुटुंबातील प्रत्येकाच्या जडणघडणीत काकांचा कसा महत्त्वाचा वाटा होता, हेही वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळेल.

काकासाहेब चितळे – सहवेदनेतून समृद्धीकडे हे पुस्तक केवळ एक चरित्र नसून, ते उद्यमशीलता, सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि दूरदृष्टीचा एक अनुपम पाठ आहे. हे पुस्तक तुम्हाला प्रेरणा देईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करेल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares