अंधश्रद्धांचं पीक जगभर उगवतं, वारेमाप वाढतं ! त्याला एक सुद्धा देश अपवाद नाही.
ग्रीक-रोमन संस्कृतीत १३ हा आकडा बिचारा फुटक्या नशिबाचा आहे. अशुभ आहे. घातकी आहे. कृतघ्न आहे. सर्व घाणेरडी बिरुदं चिकटलेला हा १३ ! पूर्वीच्या काळाचं सोडा, अगदी आजही हजारो युरोपियन्स्, ख्रिश्चन्स् या १३ ला टरकून असतात ! आकडे मोजतांना, नंबरिंग करतांना १२ नंतर एकदम १४ मोजतात !! १२ बिस्किटं खाऊन झाल्यावर १३ वं न खाता एकदम १४ वं खातात. सगळाच खुळ्यांचा बाजार !
या १३ आकड्याच्या भीतीला म्हणतात Triskaidekaphobia!
ट्रिस्कायडेकाफोबिया !! … हुश्श्श् !!
😄
१३ तारीख अगदी टाकावू– कोणतीही कामे करण्यास. लढाया, अवजड उद्योग यांचा मुहूर्त ठरवतांना १३ तारीख येत नाही ना हे कांटेकोरपणे पाहिलं जातं. त्यासाठी इतर अडचणी पत्करल्या जातात.
१३ तारखेच्या या टरकूपणाला नांव आहे –
Paraskevi Dekatria Phobia
पॅरस्केविडकॅट्रियाफोबिया !! …
हुश्श्श्श्श्श्श्श्श् !! (शची संख्या वाढल्येय् इकडे कृपया लक्ष असावे, ही विनंती ! 😄 )
युरोपातल्या इमारतींच्या लिफ्टमधून मजल्यांचे आकडे तर दिसतातच, त्यात १३च्या जागी रक्ताळलेल्या हृदयाचे चित्र काढलेले असते !
विमानांच्या हॅंगर्सना नंबर देतांना ११, १२, १२-A, १४, १५ असे दिले जातात.
असे किती प्रकार ! आपल्याकडे सुद्धा अनेक ठिकाणी राजकारण्याच्या अनेक कामांत आकड्यांची गिनती सोईनुसार सोडली जाते. पण ती अंधश्रद्धा नव्हे. गणपतीच्या सहस्रनामपूजेत अनेक भटजीबुवा एक सोडून एक नांव वाचतात ! ही पण अंधश्रद्धा नव्हे ! याला म्हणतात बेरक्यांचा इरसालपणा … !!
असो. चालायचंच !
आणि १३ तारीख शुक्रवारी येत असेल तर अति अति वाईट !
मागच्या शुक्रवारी नेमकी १३ तारीख होती ! १३ एप्रिल २०२२. जे अंधश्रद्धेला न हसता घरीच बसले, कोणतंही काम केलं नाही, नवीन काम काढलं नाही. घराबाहेर पडले नाहीत – त्यांनी शुक्रवार घरच्या घरीच मनमुरादपणे साजरा केला … त्याचा काठोकाठ आनंद लुटला …अंधश्रद्धा मातेचा विजय असो … ॥
☆ ७ जून : जागतिक पोहा दिन… संकलन : मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर☆
७ जून हा जागतिक पोहा दिन म्हणून साजरा केला जातो. पोह्यांचा नाश्ता माहित नाही असं एकही कुटुंब सापडणार नाही. प्रत्येक प्रदेशानुसार, पोहे करण्याची पद्धती आणि चव बदलते. पोह्याचा नाश्ता चविष्ट तसेच आरोग्यदायी देखील आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात पोह्याच्या नाश्त्याला पंसती आहे. जे लोक डायटिंग करतात. त्यांच्यासाठी पोह्यांचा नाश्ता अत्यंत आरोग्यदायी समजला जातो.
महाराष्ट्र, ओडिसा, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान मध्ये पोह्याचा नाश्ता प्रसिद्ध आहे. भारतात पोह्याचा शोध नेमका कुठे लागला हे कोणाला माहिती नाही.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोह्यात ७६.९ टक्के कार्बोहाड्रेटस आणि २३.१ टक्के प्रोटीन असते. वजन कमी करण्यासाठी पोहे फायदेशीर मानले जातात.
आज या लेखात जागतिक पोहे दिनानिमित्त पोहे खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.
कार्बोहायड्रेटस चा उत्तम स्त्रोत :
पोह्यात ७६.९ टक्के कार्बोहाड्रेटस असतात. तसेच पोह्यात २३ टक्के फॅट्स असतात. कार्बोहायड्रेटस मुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे सकाळी पोह्याचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो.
शरीराला लोहाचा पुरवठा होता :
पोह्यात लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. पोहे तयार करण्याच्या प्रक्रियेत तांदळावरून लोखंडी रूळ फिरवले जातात. या प्रक्रियेत लोह्याचा अंश पोह्यात शिरतो. त्यामुळे यात लोहाचे प्रमाण अधिक असते.
रक्तातील साखरेवर नियंत्रण :
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पोह्यांचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो. पोह्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. पोह्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते.
पचनास हलके :
पोह्यांचा नाश्ता पचनास हलका असतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात त्याचा समावेश केला जातो. पोह्यामुळे पोट भरलेले राहते आणि खूप कमी लागते.
लठ्ठपणा येत नाही :
पोहे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही. एक वाटी पोह्यामध्ये कमीत कमी २५० कॅलरीज असतात. तसेच पोह्यांमध्ये व्हिटामिन, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
प्रस्तुती : बिल्वा अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ न्यायप्रिय राजमाता… ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
इंदौरच्या आडाबाजार परिसरात राणी अहिल्यादेवी बाहेर पडल्या आहेत, रस्त्यावर एक गायीचं वासरू रक्तबंबाळ अवस्थेत मृत्युमुखी पडलेलं दिसतंय, त्याच्या बाजूला गाय हंबरतेय, चाटतेय, तिच्या डोळ्यातून डोंगराएवढं दुःख डोळे भरून वाहतंय, एक आई आपल्या मुलाच्या मृत्यूने घायाळ झालीय, त्या वेदना, संवेदना, दुःख हे सगळं त्या गायीच्या डोळ्यात दिसतंय, तो प्रसंग माता अहिल्यादेवी पाहताहेत, बेचैन, अस्वस्थ झाल्यात !
त्या मुक्या गायीला न्याय मिळाला पाहिजे, 8- 10 दिवसाच्या त्या निष्पाप बछड्याला रस्त्यावर चिरडून निघून जाणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, हा राग त्यांच्या मनामध्ये आहे, आपण रोज हजारो लोकांना तर न्याय देतो पण या मुक्या गायीला न्याय कोण देणार ! तिच्या 8-10 दिवसांच्या वासराची, तिची काय चूक? अहिल्यादेवी व्याकुळ होऊन आपणच न्याय दिला पाहिजे हा निश्चय करत तडक परत राजवाड्यात फिरतात, जिथे रोजचा जनता दरबार आणि न्याय देण्यासाठी बसतात त्या सिंहासनावर स्वार होतात, आपल्या सरदारांना पाहिलेली घटना सांगतात, या अमानुष घटनेला मग शिक्षा ठरते, ती शिक्षा म्हणजे थेट मृत्युदंड !
त्या घटनेची चौकशी केली जाते तर आपल्या पोरानेच त्या वासराला चिरडल्याची माहिती समोर येते. अहिल्यादेवींचा मुलगा मालेराव रस्त्याने घोड्याच्या रथातून जात असताना आडव्या आलेल्या त्या गोंडस वासराला चिरडून मालेराव पुढे निघून गेल्याची माहिती मिळते. अहिल्यादेवींनी शिक्षा तर मृत्यूदंडाची दिलीय, मग आता माघार नाही, अन माघार घेतील त्या अहिल्यादेवी कसल्या !
स्वतःचा मुलगा मालेराव त्या वासराचा मारेकरी असल्याचे ऐकून त्या किंचितही हटल्या नाहीत, विचलित झाल्या नाहीत, थबकल्या नाहीत, आणि त्यांनी तात्काळ त्या सिंहासनावरून आदेश दिला, त्या मालेरावला रस्त्यावर झोपवा अन त्याच्या अंगावरून बेफाम वेगाने घोड्याचा रथ चालवा ! त्याला मृत्युदंडच झाला पाहिजे !
सगळं सभागृह स्तब्ध झालं, चकित झालं, भयभीत झालं, विचार करतंय— अरे या तर मालेरावच्या आई, पोटच्या पोराला कोण रथाच्या खाली देईल! असं निर्दयी कोण मारून टाकेल! आणि गुन्हा काय तर एका 8-10 दिवसाच्या वासराला चिरडलं! काय त्या वासराची किंमत? ज्याच्यासाठी राणी अहिल्यादेवी आपल्या पोटच्या एकुलत्या एक पोराला मृत्युदंड देताहेत— पण या करारीबाण्याच्या अहिल्यादेवींना विरोध करण्याचं धाडस त्या वाड्यातल्या एकाही सरदारात नव्हतं!
एकही जण पुढे यायला तयार नाही, रथ चालवायला तयार नाही. मालेरावला मारायचं तेही सगळा आडाबाजार बघणार . ज्या राजघरण्यावर जीव ओवाळून टाकला त्या राजपुत्राला मारायचं कसं, हे पाप कशासाठी करायचं . मात्र अहिल्यादेवींच्या चेहऱ्यावर कशाचाच लवलेश नाही . उलट त्या निष्पाप गायीला न्याय मिळवून देण्याची त्यांना ओढ लागलीय . अन एकही जण पुढे येत नसल्याचं पाहून त्यांनी एक निगरगट्ट, धष्टपुष्ट आणि घट्ट काळजाच्या नोकराला आदेश दिला . रस्त्यावर मालेरावला झोपवलं, मालेराव डोळे बंद करून झोपले आहेत, कारण आता मरणातून सुटका नाही हे त्यांनीही ओळखलंय, सगळा आडाबाजार रस्त्याच्या बाजूने बघायला तोबा गर्दी करून उभा आहे. ज्या गायीचं वासरू चिरडलं ती गायसुद्धा तिथेच स्तब्ध उभी आहे. ही न्यायप्रिय राणी स्वतःच्या पोराला मृत्युदंड देतीय. \ मात्र रथ पळत येतोय आणि थबकतोय, त्याही निगरगट्ट नोकराचं धाडस होईना, परत परत रथ बेफाम धावत येतोय, मात्र मालेरावपर्यंत पोहचायच्या आतच थबकतोय!
हे वारंवार होतंय, मात्र मालेरावला चिरडण्याचं धारिष्ट दाखवत नाही, म्हणून राणी अहिल्यादेवी स्वतःच त्या रथाच्या सारथी होतात. आता मालेरावला चिरडलं जाणार हे नक्की होतं, बेफाम रथ येतोय – मात्र मालेरावपर्यंत पोहचायच्या अगोदरच ज्या गायीचं वासरू चिरडलं ती गाय रथाच्या समोर येऊन उभी राहते, रथ पुढे जाऊच देत नाही . अहिल्यादेवी रथ परत फिरवतात पुन्हा वेगाने घेऊन येतात. मात्र पुन्हा गाय समोर येते. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहतंय !—
जणू ती गाय रथाच्या आडवे येऊन अहिल्यादेवींना म्हणतेय, “ बाई, पोटच्या पोराच्या मृत्यूचं दुःख मी भोगलंय, या यातना, संवेदना मी भोगल्यात. आता हे दुःख तुझ्या पदरी कशाला! आईच्या काळजाला होणाऱ्या जखमा, आईच्या आतड्याला पडणारा पिळ मी भोगलाय! माझा बछडा माझ्यापासून हिरावला पण मला न्याय देण्यासाठी तू तुझ्या बछड्याला कशाला हिरावते आहेस ! तुझ्या न्यायदानाची पद्धत आणि नीती पाहून मी माझ्या दुःखाला सुद्धा विसरून गेलेय ! “
या घटनेनं सगळा परिसर घायाळ आणि स्तब्ध झाला . लोकं अहिल्यादेवींकडे याचना करताहेत, की ही गाय त्यासाठीच आडवी येतेय की पोटच्या पोराला मारू नका! चूक झाली असेल पण त्याची शिक्षा अशी करू नका!
आणि शेवटी अहिल्यादेवींना माघार घ्यावी लागली आणि त्या तडक आपल्या राजवाड्यात परतल्या! हा त्यांच्या आयुष्यातला एकमेव निर्णय जो नाईलाजाने त्यांना माघारी घ्यावा लागला, तेही त्या गाईच्या आडव्या येऊन करणाऱ्या विनवण्यामुळे!
अत्यंत कठोर, न्यायप्रिय आणि उत्तम शासक असणाऱ्या राजमाता अहिल्यादेवींच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला, पहिल्यांदा नवरा खंडेरावांचा मृत्य, त्यानंतर सासरे मल्हाररावांचा मृत्यू, त्यानंतर मुलगा मालेरावांचा मृत्यू!
घरातले सगळे कर्ते पुरुष गेल्यानंतरही भगवी पताका खांद्यावर घेऊन महिलांची फौज तयार करत लढाया करणारी रणरागिणी माळवा प्रांताने अनुभवली. हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार, मठ, धर्मशाळा, पाणवठे, पाणपोया, विहिरीचं बांधकाम, काशी विश्वनाथ, सोमनाथापासून ते परळी वैजनाथापर्यंत सगळ्या हिंदूंच्या आस्थांना नवसंजीवनी दिली. जीर्णोद्धार केला!
आमच्या छत्रपती शिवरायांनी देव वाचवला आणि त्या देवांचा जीर्णोद्धार करत आमच्याच राजमाता अहिल्यादेवींनी मंदिरांचा आणि हिंदूंचा उद्धार केला, हिंदूंची ओळख जपली.
महान पराक्रमी, योद्ध्या, न्यायप्रिय, कठोर शासक, रणरागिणी, पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन!🚩🙏
संग्रहिका – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ १ जून राष्ट्रीय वाढदिवस दिन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
⭕ आज राष्ट्रीय वाढदिवस दिन !
⭕ पु.ल. नेहमी म्हणायचे,
“जवळ जवळ निम्मा महाराष्ट्र जूनमध्येच जन्माला आला आहे आणि तोही गुरुजींच्या पुण्याईमुळे !”
वाढदिवस म्हटलं की लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटणारा दिवस.
जन्माला आल्यापासून आपल्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढीचे आकडेवारीत मोजमाप करणारा दिवस म्हणजेच वाढदिवस.
‘सोळावं वरीस धोक्याचं,
‘वीस वर्षांचा घोडा झालास तरी कळत नाही का ?’,
‘वयाची पन्नाशी गाठली आता रिटायर व्हा’
अशी आपल्याला मिळणारी सारी शाब्दिक आभूषणे आपल्याला वाढत्या वयाची जाणीव करून देत असतात.
अर्थात प्रत्येकाचा वाढदिवस वेगवेगळ्या तारखेला साजरा होत असतो.
काही वेळेला आपल्या फ्रेंड सर्कल मधल्या दोघा तिघांची, चार पाच जणांची जन्म तारीख एकच असू शकते, नव्हे ती असतेच.
पण१ जून हा असा दिवस आहे की,
चाळीस पन्नास वयाच्या घरात असलेल्या थोडेथोडके नाही तर किमान ५० ते १०० जणांचे वाढदिवस १ जूनलाच असतात.
असं काय आहे की ?—-
१ जून हा दिवस चाळीशी पन्नाशी उलटलेल्या प्रत्येकाचाच वाढदिवस असतो.
१ जूनचे वाढदिवसाचे गणित, संख्याशास्त्राला चक्रावून टाकणारे.
सदर काळातील जनगणना हा तर मोठा विनोद ठरावा.
एकाच दिवशी एक नव्हे तर अनेक गावांमधील अनेक बालके १ जूनला जन्माला यावी, यासारखे प्रशासकीय सत्य. त्या काळातील ‘आदर्श’ प्रकरणाचं उत्तर शोधलं असता एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली.
साधारण चाळीस पन्नास किंवा त्यापूर्वी खेड्यापाड्यामध्ये सुरक्षित प्रसूतीची सोय नव्हती. सर्व काही अनुभवी सुईणीच्या हातात असायचं.
शिक्षण सुद्धा कमी असल्याने जन्मलेल्या बाळाची जन्मवेळ तर सोडाच पण जन्मतारीख सुद्धा काही लोकांना माहित नसायची.
मग ज्यावेळी शाळेत प्रवेश घ्यायची वेळ यायची, तेव्हा मुलाच्या पालकांना अचूक तारीख सांगता यायची नाही.
त्यामुळे जन्मतारीख कोणती असा प्रश्न विचारला तर, तारखेच्या नजीकची एखादी घटना, एखादा सण असे ठोकताळे सांगितले जायचे.
पण गुरुजींना exact तारीख हवी असायची..,आणि ती काही पालकांना सांगता यायची नाही.
मग काय शाळा सुरु होण्याच्या आठ दहा दिवस आधीची तारीख गुरुजीच मुलाच्या नावापुढे लिहायचे,
ती शाळा प्रवेशाची तारीख म्हणजेच १ जून आणि त्यापूर्वी ५-६ वर्ष हे जन्म वर्ष म्हणून लिहिलं जाऊ लागलं आणि बऱ्याच जणांना १ जून ही जन्मतारीख चिकटली.
अगदी एका घरातल्याच सर्व भावडांची जन्मतारीखही १ जून असल्याचं दिसून येतं.
अर्थात गेल्या तीस चाळीस वर्षात परिस्थतीत खूप बदल झाला आहे.
जन्माच्या नोंदी सरकारी दप्तरी होऊ लागल्या आहेत.
पण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी १ जून हीच सर्वांसाठी जन्मतारीख होती. त्यामुळेच आज बरेच जण आपला वाढदिवस या दिवशी साजरा करताहेत.
⭕ राष्ट्रीय वाढदिवस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रस्तुती — श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पूर्वीच्या लोकांचे काही आडाखे असायचे पावसाबाबत. आणि ते ते बहुतांशी सत्यात उतरायचे.
आम्ही ज्या कंपाऊंडमध्ये राहतो त्याच्या पलीकडे जोशांचे कंपाऊंड, आणि त्या पलीकडे वेलणकरांचं कंपाउंड. वेलणकरांच्या कंपाउंडमध्ये एक भला मोठा चिंचेचा वृक्ष होता. तो कमीतकमी अडीचशे-तीनशे वर्षांचा असावा, असं वनखात्याच्या अधिकाऱ्यांचं गणित होतं. एप्रिलमध्ये त्याच्यावर लाखो फुलं फुलायची. मे महिन्यात ती वाऱ्यावर गरगरत खाली जोश्यांच्या कंपाउंडमध्ये पडायची. आमच्या घराच्या मागच्या पडवीत ती फुलं पडली की चोवीस तासात पाऊस हजर होणार, हे आमच्या आईचं निरीक्षण होतं. तसं तिचं भाकित ती सांगायची. आणि विशेष गोष्ट म्हणजे गेल्या सत्तर वर्षांत माझ्या डोळ्यांसमोर ते भाकित कधीच चुकलेलं नाही !!
दोन वर्षांपूर्वी तो चिंचेचा भला मोठा वृक्ष कोसळला! आता पर्जन्यागमनाचं भाकित घरच्या घरी करण्याची सुविधा देणारा तो भविष्यवेत्ताच हरपला!
अशी अनेक विषयांच्या वरची भाकितं जुनी मंडळी करायची आणि ती सहसा चुकत नसत. कारण त्यामागे निसर्गाचं खोल निरीक्षण, अनुभव, तर्कबुद्धी आणि अभ्यास असायचा.
मृगाचे किडे कधी दिसतील, भारद्वाज पक्षाचं दर्शन साधारणपणे कधी होईल, याचं भाकित आठ-आठ दिवस आधी वर्तवलं जायचं. उत्तरायण आणि दक्षिणायनाचे परमोच्चबिंदू (turning points) साधारणपणे कोणत्या दिवशी येतील, हे घरात पंचांग येण्याआधीच सांगितलं जायचं.
☆ आशिया खंडातली सर्वात मोठी लायब्ररी ☆ सुलू साबणे – जोशी ☆
राजस्थान हे तेथील अनेक गोष्टी, विशेषत: तेथील वैभवशाली इतिहास, भव्य राजवाडे, राजे, महाराजे, महाराण्या यांच्या कथा, रंगेल संस्कृती आणि चविष्ट पाककृती यांमुळे प्रसिद्ध आहे.
पण कुणाला माहीत आहे का की, राजस्थानमधील थरच्या वाळवंटाखाली एक रहस्य दडले आहे? ते म्हणजे १६ फूट खाली एक भव्य दिव्य लायब्ररी आहे, जिथे १२ महिने २४ तास थंड वातावरण असते, अगदी उन्हाळ्यात सुध्दा..!
ही लायब्ररी आशिया खंडातील सर्वात मोठी लायब्ररी म्हणून गणली जाते, जिच्यात ९ लाखांपेक्षा जास्त पुस्तके आहेत..!
राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यामधल्या पोकरण तालुक्यात असलेल्या भादरिया गावात एका मंदिराखाली ही लायब्ररी बांधलेली आहे, जिच्यात एका वेळी ४००० माणसे (वाचक) बसू शकतात.
त्या ठिकाणी, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, महाकाव्ये, इतिहास, शब्दकोश, नकाशांसंबंधी, अशी अनेक पुस्तके ५६२ काचेच्या कपाटांमध्ये मांडलेली आहेत…
संग्राहिका : सुलू साबणे – जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “संगीत”— जोतिष्यशास्त्रातील एक उपाय ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆
जोतिष्यशास्त्रात ग्रहांच्या स्पंदनाला खूप महत्व आहे. Viabrations ज्याला आपण मराठीत कंप किंवा स्पंदन म्हणू . जेव्हा एका सेकंदात सोळापेक्षा जास्त पण आठ हजारपेक्षा कमी स्पंदने होतात तेव्हा त्यातून नाद निर्माण होतो आणि जेव्हा तो लयबद्ध होतो तेव्हा त्याला आपण संगीत म्हणतो. सामवेद हा सर्वस्वी संगीतासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि जोतिष्य हे वेदांग आहे. या दोघांच्या संबंधाचा उपयोग करून आपण जोतिष्यशास्त्रात संगीताचा वापर एक उपाय म्हणून कसा वापरता येईल ते पाहू.
संगीत हे एक असे एकमेवाव्दितीय विज्ञान आहे की ज्याच्या प्रभावापासून कोणीही, अगदी पक्षी, प्राणी, मानव, आदिवासी, जात, धर्म, पंथ दूर नाहीत. संगीताला विज्ञानाचे विज्ञान असे म्हणतात कारण संगीत मग ते कोणत्याही देशाचे, भाषेचे असो त्याच्यामध्ये तुमच्या अंतरात्म्याला थेट स्पर्श करण्याची ताकद आहे. आणि ते समजण्यास कोणत्याही भाषेच्या भाषान्तराची गरज नसते.
संगीताचे विज्ञान “नाद” यावर अवलंबून आहे आणि नाद हा साऱ्या विश्वात व्यापून राहिला आहे. “सा रे ग म प ध नि” हे सात सूर महादेवाच्या नृत्य आविष्कारातून निर्माण झाले असे मानतात. स्वर व त्यांचे ग्रह खालील प्रमाणे-
१) सा –रवी
२) प … चंद्र
३) ध — मंगळ
४) रे —बुध
५) नी — गुरु
६) म –शुक्र
७) ग –शनी
तसेच राग आणि राशी
१) भैरवी कुंभ
२) भूप राग कन्या
३) राग बैरागी मीन रास
४) श्री राग वृषभ
५) राग वसंत सिंह रास
६) राग सारंग धनु
७) राग पंचम धनु
भैरवी रागावर शनीचे प्रभुत्व आहे असे मानतात. राग भैरवी हा एक गूढ, भव्य, दिव्य, धीर, गंभीर असा राग आहे त्यामुळे शनीचे सर्व गुण त्याला लागू पडतात. श्री राग हा हळुवार प्रेम, संध्याकाळची हुरहूर, कोमलता व्यक्त करताना वापरतात म्हणूच हा शुक्राचा राग असे मानतात.
वेगवेगळे राग आणि त्यांची गायन पद्धती इतकी प्रभावशाली आहे की ऐकणाऱ्याचा मनाचा नूर आणि मूड बदलून टाकण्याची क्षमता आहे. ज्या जातकांच्या पत्रिकेत चंद्र शनी, मंगळ राहू युती असते ते थोडयाशा चिथावणीने एकदम सटकून जातात किंवा निराशेच्या गर्तेत लोटले जातात. अश्यांना वीणेच्या एका झंकारानें आपोआप शांत करता येते. उष्णता, प्रकाश, आवाज, चुंबकीय व विद्युत क्षेत्रात सौम्य व उग्र अशी दोन टोके असतात. तसेच राग, लोभ, मद, मोह, मत्सर, शांति या स्थितीमध्ये दोन टोकाची स्थिती घातकच असते. सुवर्णमध्य संगीतानेच साधणे शक्य आहे.
जेव्हा चंद्राबरोबर शनी, मंगळ किंवा राहू असतात तेव्हा जातकात असलेली टोकाची नकारात्मक वृत्ती काही निवडक ट्यूनमुळे काढून टाकता येते. म्हणून तर आपल्या कडे विशिष्ठ मंत्र होम-जप असतात त्याच्या मध्ये संगीत आहेच. मंत्र होम जप या मधील नादानेच यजमानाच्या मनातील नकारात्मक वृत्तीवर परिणाम साधायचा असतो. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक व उत्तम विचारशक्ती वाढीस लागते. गुरु हा बुद्धीचा तर शुक्र हा भावनेचा कारक मानतात. ज्यांच्या चतुर्थात शुक्र ते संगीत उत्तम जाणतात, तर गुरु असता ते संगीताचे उत्तम ज्ञान असलेले असतात.
एके काळी भारतीयांना या संगीत आणि नाद यावर इतके प्रभुत्व होते की ते दीप राग आळवून दिवे तर मेघमल्हार गाऊन पाऊस पाडू शकत. तानसेन यांनी एकदा आपल्या संगीताने पिसाळलेला हत्ती शांत केला अशा कथा तुम्ही ऐकल्या असतीलच. पंचमहाभूतांवर विजय मिळवू शकण्याची ही कला कालांतराने भारतीयांची दैवीशक्ती व अंतर्स्फूर्तीबद्दलची होत गेलेली उदासीनता कारणीभूत आहे. त्यागराज, तानसेन, पंडित ओंकारनाथ ठाकूर, दिगंबर विष्णू पलुस्कर यांना त्यांच्या मनाच्या उत्कट भावावस्थेत रागाची रचना सुचली असावी. असो. पण आजही एक छानसे अंगाई गीत म्हणताच बाळ झोपी जाते की नाही.
सप्तमात बिघडलेला शुक्र असणाऱ्यांनी मादक विषयासक्त संगीत फार ऐकू नये. तसे करणे घातक ठरू शकते तसेच चतुर्थात बाधित शनी किंवा व्दितीयात शुक्र मंगळ अशा लोकांनी जरूर भक्तीसंगीत (डिव्होशनल) ऐकावे.
सध्याचे संगीत हे ऐकणाऱ्यांना हिंस्त्र, पाशवी, रागीट, वाईट वृत्ती वाढीस लागण्यास मदत करते. पण संगीत हे एक दैवी शास्त्र आहे. त्याचा आपण योग्य वापर समाज समृद्ध करण्यास केला पाहिजे.
(सदर लेख हा प्रसिद्ध जोतिषी बी. व्ही. रमण यांनी लिहिलेल्या Astrological मॅगझीनच्या (मार्च १९४४) संपादकीय लेखाचा सरळ अनुवाद आहे.)
गजरा का माळावा ? त्याचा आरोग्याशी कसा संबंध आहे ? याची छान माहिती जरूर वाचा.
स्त्री चे आरोग्य सांभाळतो गजरा—
गजरा हा “old fashioned” आहे म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत का ?…
गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील ९०% स्त्रिया आजही रोज गजरा माळल्याशिवाय नोकरीला जात नाहीत.
‘गजरा – सौंदर्य’ या दोहोंमधील संबंध सर्वश्रुत आहेच. सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. पण निसर्गात पाहिलं तर मोगरा, चाफा, बकुळी यांना बहर आला आहे. काळजी आहे निसर्गाला आपली. या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातच केली गेली आहे हे लक्षात येतय का ?
आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत. म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा. सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत रहातो. मन शांत करतो. अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच.
स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण धर्माचे मानले जाते. दोन भुवयांमध्ये आतील बाजूस असलेल्या ‘pituitary gland’ च्या अधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वहात असतात. त्यावरच स्त्रीचे आरोग्य अवलंबून असते. गजरा, किंवा फुलांचा वास नाकाद्वारे आपण जेव्हा घेतो, त्यावेळी शिरोभागातील पित्त शमन होते, शिवाय ग्रंथीचे कार्य व्यवस्थित रहाण्यास मदत होते. परिणामी स्त्रियांच्या आरोग्यामधील संतुलन रहाण्यास मदत होते..
मनोरोगात तर फुलांना खूप महत्व आहे. स्त्रियांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या संप्रेरकांच्या चढ उतारामुळे होणाऱ्या चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो. शिवाय गजरा करायच्या पध्दती पाहिल्या तर त्या पण “concentration”, “moto development” करणाऱ्याच आहेत. परदेशातील बाक थेरपी, अरोमा थेरपी या काय आहेत ?- फुलांच्या वर आधारित चिकित्साच आहेत.
पण कसंय… घर की मुर्गी….
भरगच्च पैसे देऊन पाश्च्यात्यांप्रमाणे अरोमा थेरपी घेऊ, पण भारतीय पद्धतीप्रमाणे गजरा माळून घेतल्यावर “old fashioned” म्हणवून घेण्यात लाज का वाटून घ्यावी ? 🌹
संग्राहिका – सुश्री स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ रक्तातही प्लॅस्टिक…! – डॉ. व्ही.एन. शिंदे ☆ संग्रहिका – सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जपानच्या एका भागामध्ये लोक लंगडत चालू लागले. सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या; मात्र, लोकांच्या आजाराचे कारण सापडले नाही. त्यानंतर संशोधकांनी लोकांच्या आहाराचे पृथक्करण केले. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. ते लोक ज्या भागात राहात, त्या भागात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा कचरा टाकण्यात येत असे. त्यातील कॅडमियम पावसाच्या पाण्याबरोबर भाताच्या शेतात येत असे. ते भाताच्या पिकातून भातात आणि भातातून लोकांच्या पोटात जात असे. ते रक्तात उतरून लोकांचे सांधे दुखू लागत. सांधेदुखीमुळे ते लंगडत. आज ही घटना आठवण्याचे कारण म्हणजे नजीकच्या काळात पक्षाघाताचे रूग्ण वाढण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे आणि याला कारण ठरतेय- प्लॅस्टिक.
सर्वसामान्य निसर्गावर प्रेम करणाऱ्या नागरिकांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वजण प्लॅस्टिकचा वापर थांबला पाहिजे, असे म्हणतात. प्लॅस्टिक बंदीचे कायदे होतात. कडक अंमलबजावणीकरिता मोहीम राबवतात. तरीही प्लॅस्टिकचा वापर थांबत नाही. थांबवणे सोपेही नाही. १८५५ साली अलेक्झांडर पार्क यांनी सर्वप्रथम प्लॅस्टिक शोधले. त्याचे नाव पार्कसाईन ठेवले. पुढे त्याला सेल्युलाईड नाव मिळाले. प्लॅस्टिक कुजत नसल्याने, निसर्गात तसेच राहते. त्याचे विघटन करण्याच्या पद्धती शोधण्यासाठी अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. मात्र अद्याप कार्यक्षम पद्धती शोधता आलेली नाही. त्यामुळे निसर्गात तसेच पडलेले राहते. अलेक्झांडर पार्क आज हयात असते, तर त्यांनी निर्माण केलेल्या भस्मासूराचा त्यांना पश्चाताप झाला असता.
पार्क यांच्या प्लॅस्टिकच्या शोधानंतर अनेक संशोधकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅस्टिक शोधले. १८९७ साली डब्ल्यू क्रिशे यांनी दुधापासून प्लॅस्टिक बनवले. बेकलंड या संशोधकाने रेझिन्स शोधले. १९५२ साली झिग्लरने पॉलिस्टर बनवले. पॉलिइथिलीन टेरेफइथलेत(PETE)चा वापर सर्रास आणि मोठ्या प्रमाणात होतो. उच्च घनता पॉलिइथिलीन(HDPE)चा वापर दूध, फिनाईल, शांपू, डिटर्जंटच्या पॅकिंगसाठी, पाईप बनवण्यासाठी होतो. पॉलिविनाईल क्लोराईड(PVC)चा वापर गाड्यांचे भाग, पाईप्, फळांसाठी क्रेट, स्टिकर्स इत्यादीसाठी होतो. निम्न घनता पॉलिथिलीन(LDPE)चा वापर दुकानात वापरल्या जाणाऱ्या पिशव्यांसाठी होतो. पॉलिप्रोपिलीन(PP)चा वापर फर्निचर, खेळणी, दही इत्यादींसाठी होतो. पॉलिस्टिरीन(PS)चा उपयोग खेळणी, कॉफीचे कप, मजबूत पॅकेजींगसाठी होतो. याखेरीजही अनेक प्रकार आहेत, ज्यांचा अक्रेलीक, नायलॉन, फायबर ग्लास, बॉटल्स बनवण्यासाठी वापर होतो. त्यातील काहींचा पुनर्वापर करता येतो. मात्र प्लॅस्टिकचा धोका आहे, तो मानवी निष्काळजीपणामुळे. स्वस्त मिळणाऱ्या प्लॅस्टिकचा अनिर्बंध वापर आणि पुनर्प्रक्रियेसाठी न पाठवता कोठेही टाकून देण्याचा वाईट परिणाम जीवसृष्टीवर होत आहे. गाय, म्हैस आणि इतर जनावरांच्या पोटात जाऊ लागले. ते न पचल्याने जनावरांचे जीवन धोक्यात आले. सहल, सफारीवर जाणारे जंगलातही प्लॅस्टिकचा कचरा फेकू लागले. याचा परिणाम एकूण जीवसृष्टीवर होऊ लागला.
वापरलेले प्लॅस्टिक स्वच्छ धुवून पुनर्प्रक्रियेसाठी करण्यासाठी उपलब्ध करून देणे गरजेचे असते. मात्र असे होत नाही. स्वस्त उत्पादन होत असल्याने पुनर्प्रक्रियेपेक्षा नव्या निर्मितीमध्ये उद्योजक व्यस्त असतात. लोकांनीही वापरलेले प्लॅस्टिक स्वच्छ धुण्याचे कष्ट नको असतात. त्यामुळे अन्न पदार्थासाठी वापरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, साहित्य तसेच फेकून दिले जाते. जनावरांचे खाद्य पुरेसे उपलब्ध नसल्याने आणि प्लॅस्टिकला अन्नपदार्थांचा वास असल्याने जनावरे ते खातात. ते त्यांच्या पोटात जाते. परिणामी त्याचा अंश जनावरांच्या पोटात उतरतो.
मानव थेट प्लॅस्टिक खात नाही. मात्र प्लॅस्टिकचा वापर अनेक कारणांसाठी विशेषत: अन्न पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी केला जात असल्याने प्लॅस्टिकचा अंश आपल्या पोटात जाऊ शकतो, याचे मानवाला भान राहिलेले नाही. कॉफी, चहा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचे कप वापरले जातात. शुद्ध पाणी म्हणून बाटलीतील पाणी वापरले जाते. हे पाणी असते मात्र प्लॅस्टिकच्या बाटल्यात. बाटल्यांचे क्रेट्स अनेक दुकानांच्या दारात सूर्यप्रकाशात ठेवले जातात. त्यामुळे बाटल्यातील प्लॅस्टिकचा अंश पाण्यात उतरतो. ते पाणी आपण शुद्ध पाणी म्हणून पितो.
नुकत्याच झालेल्या संशोधनात संशोधकांच्या लक्षात असे आले, की जगातील ८० टक्के लोकांच्या रक्तात मायक्रोप्लॅस्टिकचे अंश आहेत. अन्न पॅकिंगसाठी वापरले जाणारे पॉलिस्टिरीन एक तृतियांश लोकांच्या रक्तात आढळले. मायक्रोप्लॅस्टिक रक्तातून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाते. शरीराच्या एका भागात साठू शकते. यामुळे पक्षाघाताचा झटका येऊ शकतो. प्लॅस्टिकचे अंश हवेतही पसरतात. हवेतूनही मानवी शरीरात जातात. मायक्रोप्लॅस्टिक हिमालयाच्या शिखरापासून समुद्राच्या खोल तळापर्यंत मानवी कर्तृत्त्वाने पोहोचले आहे. आपण त्याचा अनिर्बंध वापर केल्याने ते आपल्या अस्तित्त्वावर उठले आहे. रक्तात हे कण आढळण्याचे गांभीर्य आता तरी ओळखायला हवे. प्लॅस्टिकचा वापर थांबायला हवा!
ले.: डॉ. व्ही.एन. शिंदे
संग्राहिका : सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एका नगरात एक विणकर राहत होता. अत्यंत शांत, विनम्र आणि प्रामाणिक माणूस अशी त्याची ख्याती होती. त्याला क्रोध म्हणून कधी येत नसे, तो नेहमी हसतमुख बसलेला दिसे. एकदा काही टवाळखोर पोरांनी त्या विणकराची छेड काढायची ठरवली. त्याला पिसाळून सोडल्यावर तरी तो रागावतो की नाही हे त्यांना पहायचे होते.
त्या टवाळ पोरांमध्ये एक बलाढ्य धनिकाघरचा लक्ष्मीपुत्र होता. तो पुढे झाला, तिथे ठेवलेली साडी हातात घेत त्याने प्रसन्न मुद्रेतील विणकरास विचारले की, ‘ही साडी केव्हढयाला द्याल ?’
विणकर उत्तरला – ‘अवघे दहा रुपये !’
त्याचं उत्तर ऐकताच त्याला डिवचण्याच्या हेतूने त्या घमेंडी मुलाने त्या साडीचे दोन तुकडे केले. त्यातला एक तुकडा हातात धरला आणि पुन्हा प्रश्न केला – ‘माझ्याकडे तितके पैसे नाहीत, आता त्यातले निम्मे वस्त्र माझ्या हातात आहे. याची किंमत किती ?’
अगदी शांत भावात विणकर बोलला – ‘फक्त पाच रुपये !’
त्या मुलाने त्याचेही पुन्हा दोन तुकडे केले. आणि पुन्हा प्रश्न केला की, ‘आता याची किंमत किती ?’
प्रसन्न वदनी विणकर म्हणाला – ‘अडीच रुपये !’
तो पोरगा त्या साडीचे तुकडयावर तुकडे करत गेला आणि त्या विणकराला त्यांची किंमत विचारत गेला. विणकर देखील त्याच्या प्रत्येक प्रश्नाला न चिडता शांत चित्ताने उत्तर देत गेला.
तुकडे करून कंटाळलेला तो पोरगा अखेर म्हणाला – ‘आता या साडीचे इतके तुकडे झालेत की याचा मला काही उपयोग नाही. सबब ही साडी मी घेत नाही.’
यावर विणकराने मंद स्मितहास्य केले. तो म्हणाला – ‘बाळा हे तुकडे आता जसे तुझ्या कामाचे राहिले नाहीत तसेच ते माझ्या उपयोगाचे उरले नाहीत. पण असू देत. तू जाऊ शकतोस…’
त्या विणकराची ती कमालीची शांत वृत्ती, प्रसन्न चेहरा आणि क्षमाशीलता त्या मुलाच्या ध्यानात आली व तो ओशाळून गेला.
तो खिशात हात घालत म्हणाला – ‘महोदय, मी आपल्या साडीचे नुकसान केलेलं आहे. या साडीची किंमत मी अदा करतो. बोला याचे काय दाम होतात ?’
विणकर म्हणाला – ‘अरे भल्या माणसा, तू तर माझी साडी घेतली नाहीस… मग मी तुझे पैसे कसे काय घेऊ शकतो ?’
आता त्या मुलाचा आपल्या पैशाचा अहंभाव जागृत झाला
मुलगा म्हणाला, ‘महोदय तुम्ही नुसती रक्कम सांगा… मी ताबडतोब अदा करतो.. ह्या अशा साड्यांची असून असून किती किंमत असणार आहे ? तिची जी काही किंमत असेल ती मी सहज देईन, त्याने मला फरक पडणार नाही. कारण माझ्याकडे खूप पैसे आहेत. तुम्हाला मात्र एका साडीच्या नुकसानीने फरक पडू शकतो कारण तुम्ही गरीब आहात. शिवाय तुमचे नुकसान मी केलेलं असल्याने त्याचा तोटा भरून देण्याची जबाबदारीही माझीच आहे. तितकं तरी मला कळतं बरं का !’
त्या मुलाचं पैशाची मिजास दाखवणारं वक्तव्य ऐकूनही विणकर शांत राहिला. काही क्षणात तो उत्तरला – “हे बघ बाळा, तू हे नुकसान कधीच भरून देऊ शकणार नाहीस. तू नुसती कल्पना करून पहा की, एका शेतकऱ्याला मशागतीपासून ते कपाशीचं बीज रोवण्यापर्यंत, कपाशी मोठी होईपर्यंत, तिची काढणी होईपर्यंत, किती श्रम घ्यावे लागले असतील. त्याने काढलेला कापूस व्यापाऱ्याने मेहनतीने विकला असेल. मग माझ्या शिष्याने अत्यंत कष्टपूर्वक त्यातून सूत कातले. मग मी त्याला रंग दिले, विणले, नवे रूप दिले . मग कुठे ही साडी तयार झाली. इतक्या लोकांची ही एव्हढी मोठी मेहनत आता वाया गेली आहे, कारण कोणी हे वस्त्र परिधान केलं असतं, त्यातून अंग झाकलं असतं तर त्या कारागिरीचा खरा लाभ झाला असता. आता ते अशक्य आहे कारण तू तर त्याचे तुकडे तुकडे केले आहेत. हा तोटा तू भरून देऊ शकत नाहीस बाळा.’ मंद स्वरात बोलणाऱ्या त्या विणकराच्या आवाजात क्रोध नव्हता की आक्रोशही नव्हता. दया आणि सौम्यतेने भारलेलं ते एक समुपदेशनच होतं जणू !
त्या मुलाला स्वतःची अत्यंत लाज वाटली.😔आपण या महात्म्याला विनाकारण त्रास दिला, त्याचे वस्त्र फाडले, अनाठायी त्याचे नुकसान केले. याचे त्याला वाईट वाटू लागले. पुढच्याच क्षणाला त्याने त्या विणकराच्या चरणांवर आपलं मस्तक टेकवलं आणि म्हणाला, 👏’हे महात्मा मला माफ करा. मी हे जाणीवपूर्वक केलं याची मला अधिक शरम वाटते आहे. मी आपला अपराधी आहे. आपण मला दंड द्या वा क्षमा करा.’
पुढे होत विणकराने त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला 👋आणि म्हणाला, ‘हे बघ मुला. तू दिलेले पैसे मी घेतले असते तर माझे काम भागले असते. पण त्यामुळे भविष्यात तुझ्या आयुष्याची अवस्था या साडीसारखीच झाली असती. ते खूप देखणं असूनही त्याचा कोणालाही तिळमात्र उपयोग झाला नसता. एक साडी वाया गेली तर मी त्याजागी दुसरे वस्त्र बनवेन. पण अहंकाराच्या दुर्गुणामुळे तुझे आयुष्य एकदा धुळीस मिळाले की ते पुन्हा नव्याने कसे उभं
करणार ? तुझा पश्चात्ताप या साडीच्या किंमतीहून अधिक मौल्यवान आहे.’……
आपल्या सर्वांच्या आयुष्यात आता थोडंफार सुख आलंय, काहीशी समृद्धी आलीय, खिशात बऱ्यापैकी पैसा खुळखुळतोय, आपल्या घरीही आपण पैसा अडका बाळगून आहोत. थोडंसं स्थैर्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेलं आहे. आपल्यातल्या काहींना त्याच्या ‘ग’ ची बाधाही झालीय. ही बाधा कुणाच्या कुठल्या कृतीतून कधी नी कशी झळकेल हे आजकाल सांगता येत नाही. आजकाल जो तो कसल्या न कसल्या तोऱ्यात आहे. अनेकांना कसली न कसली मिजास आहे, घमेंड आहे, गर्व आहे, अहंकार आहे, वृथा स्वाभिमान आहे. त्यामुळे इगोची निर्मिती मोठया प्रमाणात होते आहे. अशा सर्व सज्जनांना शीतल, सौम्य शब्दात अन कोमल स्वरात समजावून सांगेल असा तो विणकर आताच्या जगात नाहीये. तुमच्यापैकी कुणाला तो दिसला तर माझ्यासकट अनेकांच्या पत्त्यावर त्याला पाठवून द्या किंवा त्याचा पत्ता सांगा म्हणजे त्यांना भेटून आपले पाय कशाचे आहेत हे प्रत्येकाला नक्की उमजेल. दृष्टांतातले विणकर म्हणजे संत कबीरदास आहेत.. हे वेगळे सांगणे नको…
संग्राहिका : सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈