☆ “जगणं ह्यालाच म्हणतात…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆
श्री आलोक सागर यांना शतशः नमन…
IIT दिल्ली येथून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी, ह्यूस्टन विद्यापीठातून पीएच. डी. , टेक्सास विद्यापीठातून पोस्ट डॉक्टरेट पूर्ण केलेले… आणि भारताचे माजी रिझर्व्ह बँक गव्हर्नर रघुराम राजन यांचे एकेकाळचे प्राध्यापक!
पण गेली तब्बल ३२ वर्षं, श्री आलोक सागर यांनी सर्व प्रकारचे सुख-सौख्य, प्रतिष्ठा आणि श्रीमंती दूर सारून, मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आदिवासी भागात राहायला सुरुवात केली आहे — तेही केवळ आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उत्थानासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी झगडण्यासाठी.
कोट्यवधींच्या मालमत्तेचे दिल्लीतील मालक असलेल्या श्री सागर यांची आई दिल्लीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमध्ये फिजिक्सची प्राध्यापक होती, वडील भारतीय महसूल सेवेत अधिकारी होते, आणि लहान भाऊ आजही IIT मध्ये प्राध्यापक आहे.
पण हे सर्व मागे टाकून श्री आलोक सागर संपूर्ण आयुष्य आदिवासी बांधवांसाठी समर्पित करून जगत आहेत. त्यांचे राहणे – एक साधी झोपडी, वेशभूषा – फक्त तीन कुर्ते, आणि परिवहनासाठी – एक सायकल, जेणेकरून निसर्गाला हानी पोहोचणार नाही.
अनेक भाषा जाणणारे श्री सागर आदिवासी बांधवांशी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधतात. त्यांना वाचन, लेखन, शिक्षण देतात आणि पर्यावरण जतनासाठी लाखो फलद्रूप झाडांचे रोपण त्यांनी त्यांच्या माध्यमातून करून घेतले आहे.
गर्द जंगलांमध्ये फिरत, सायकलवरून बिया गोळा करतात आणि त्या बिया आदिवासींना देतात, जेणेकरून ते स्वतःच्या जगण्यासाठी काहीतरी उत्पन्न तयार करू शकतील.
श्री आलोक सागर यांनी पद्म पुरस्कार नाकारला, कारण त्यांना त्याचा मोह नव्हता — त्यांना हवी होती केवळ माणुसकी आणि समाजसेवा.
श्री आलोक सागर यांच्या त्यागमयी जीवनाला व मानवतेच्या सेवेसाठी केलेल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम…
“अशा थोर व्यक्तिमत्त्वांमुळेच आजही माणुसकी शिल्लक आहे! ”
लेखक : अज्ञात
सुश्री शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ बेला आणि कल्याणी… लेखक – श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
☆
बेला आणि कल्याणी कोण होत्या?
माहिती नाही? तर ऐका…
बेला ही पृथ्वीराज चौहान यांची मुलगी होती आणि कल्याणी ही जयचंद यांची नात होती.
जेव्हा मोहम्मद गौरी आपल्या देशाला लुटून गजनीकडे परत गेला, तेव्हा गजनीचे सर्वोच्च काझी व मोहम्मद गौरीचे गुरु निजामुल्क यांनी त्याचे स्वागत आपल्या महालात केले आणि म्हणाले –
“या गौरी या! आम्हाला तुझा अभिमान आहे की तू हिंदुस्थानवर विजय मिळवून इस्लामचे नाव उजळवलेस. सांग, त्या ‘सोने की चिड़ीया’ हिंदुस्थानचे किती पंख कापून आणलास? “
“काझी साहेब! मी हिंदुस्थानातून सत्तर कोटी दिरहम किमतीचे सोने, पन्नास लाख चारशे मन सोने व चांदी, आणि याशिवाय मौल्यवान दागदागिने, मोती, हिरा, पन्ना, झरजरी वस्त्रे आणि ढाक्याची मलमल लुटून गजनीस आणली आहे. “
“खूपच छान! पण तिथल्या लोकांना काही धर्माचं शिक्षण दिलं की नाही? “
“खूप लोक इस्लाम स्वीकारले आहेत. “
“आणि बंदी लोकांचं काय केलं? “
“त्यांना गुलाम करून गजनीस आणलं आहे. आता तर गजनीत गुलामांची उघड विक्री सुरू आहे. प्रत्येकी गुलाम दोन किंवा तीन दिरहममध्ये विकले जात आहेत. “
“हिंदुस्थानातल्या काफिरांचे मंदिरे काय केलेस? “
“मंदिरे लुटून १७००० सोने-चांदीच्या मूर्ती आणल्या आहेत, दोन हजारांहून अधिक मौल्यवान दगडांची मूर्ती आणि शिवलिंग सुद्धा आणले आहेत आणि अनेक पूजास्थळे उद्ध्वस्त करून जाळून टाकली आहेत. “
थोडं थांबून काझी म्हणाला, “पण आमच्यासाठी काही खास तोहफा आणला आहेस का? “
“होय काझी साहेब, आणला आहे!”
“काय?”
“स्वर्गातील अप्सरांनाही लाजवेल अशी जयचंदाची नात कल्याणी आणि पृथ्वीराज चौहानची कन्या बेला.”
“तर मग वेळ कशाची वाट पाहतोस? “
“फक्त तुमच्या इशाऱ्याची. “
काझीची परवानगी मिळताच शाहबुद्दीन गौरीने कल्याणी आणि बेला यांना काझीच्या हरमात पाठवले. त्यांची अद्वितीय सौंदर्य पाहून काझी अचंबित झाला. त्याने दोघींना विवाहासाठी प्रस्ताव दिला. तेव्हा बेला म्हणाली –
“काझी साहेब! तुमची बेगम होणं आमचं भाग्य समजू, पण आमच्या दोन अटी आहेत. “
“बोला, बोला, काय अटी आहेत? तुमच्यासारख्या हूरांसाठी मी कोणतीही अट मान्य करायला तयार आहे. “
“पहिली अट म्हणजे लग्न होईपर्यंत आम्हाला अपवित्र केलं जाणार नाही. मंजूर आहे? “
“मंजूर आहे! दुसरी अट सांगा. “
“आमच्याकडे एक प्रथा आहे – मुलीच्या लग्नासाठी मुलाकडून आणि मुलासाठी मुलीकडून लग्नाची वस्त्रे येतात. त्यामुळे आम्ही आमचे आणि तुमचे लग्नाचे कपडे भारतभूमीतून मागवू इच्छितो. “
“मंजूर आहे!”
आणि मग, कल्याणी आणि बेलाने कविचंद यांच्याकडे एक गूढ पत्र पाठवून भारतभूमीतून लग्नाची वस्त्रे मागवली. काझीसोबत त्यांचा निकाह निश्चित करण्यात आला. रहमत तलावाच्या काठी नवे महाल बांधून लग्नाची तयारी सुरू झाली.
कविचंदांनी पाठवलेले कपडे घालून काझी विवाहमंडपात आला. कल्याणी आणि बेलानेही काझीने दिलेले कपडे परिधान केले होते. लग्न पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
तेव्हा बेलाने काझीला सांगितले –
“कलमा आणि निकाह वाचण्याआधी आम्हाला झरोक्यातून लोकांना दर्शन द्यायचं आहे. आमच्याकडे ही परंपरा आहे, आणि गजनीच्या लोकांनाही हे कळायला हवं की तुम्ही वृद्ध वयात स्वर्गातील सुंदर अप्सरांशी लग्न करत आहात. लग्नानंतर आम्हाला आयुष्यभर बुर्का घालावा लागेल, त्यामुळे सौंदर्य उघड नसेल. नकाबाआडचं सौंदर्य कसल्या कामाचं? “
“हो हो, का नाही? ” काझी म्हणाला आणि दोघींना घेऊन राजमहलाच्या कंगुर्यावर गेला. पण वर पोहोचतानाच काझीच्या उजव्या खांद्यावरून आग भडकू लागली, कारण कविचंदांनी त्या गूढ पत्रामधून अत्यंत तीव्र विषाने भिजवलेले कपडे पाठवले होते.
काझी जळत होता, वेड्यासारखा धावत होता, तेव्हा बेला म्हणाली –
“तूच ना गौरीला भारतावर आक्रमण करण्यासाठी भडकवलंस? आम्ही तुला ठार मारून आपल्या देशाच्या लुटीचा सूड घेतला आहे. आम्ही हिंदू कुमारिका आहोत, जिवंतपणी आमच्या शरीराला कुणी हात लावेल अशी हिम्मत नाही. “
इतकं बोलून दोघींनी महालाच्या कडेला उभं राहून एकमेकींच्या छातीमध्ये विषबुजलेल्या कटाऱ्या भोसकल्या आणि त्यांचे प्राणहीन शरीर त्या उंच छतावरून खाली कोसळले.
काझीही जळून फडफडत तडफडत मरण पावला.
भारताच्या या दोन शूर कन्यांनी परकीय भूमीत गुलामगिरीत असूनही दिलेला बलिदानाचा हा इतिहास अभिमानास्पद आहे.
पण कदाचित आपल्याला हे माहीतच नाही,
यात दोष तुमचा नाही की आमचाही नाही –
आपल्याला डाव्यांनी लिहिलेला खोटा इतिहास शिकवला गेला आहे. पण आता तरी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.
वंदे मातरम्
☆
लेखक : श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ
प्रस्तुती : श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ हे माहिती आहे का?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
अत्यंत स्वरूपसुंदर अभिनेत्री स्वरूप संपत ही ‘ये जो है जिंदगी’ या नितांत सुंदर मालिकेची नायिका आज जगातील पहिल्या दहा सर्वश्रेष्ठ शिक्षकांमध्ये एक आहे.
इंग्लंडमध्ये तिने Ph. D आणि तीही संपूर्ण शिष्यवृत्तीवर मिळवली आहे. १७९ देश, दहा हजार स्पर्धेतील सहभागी एकूण शिक्षक यातून तिची निवड झाली.
‘जीवनकौशल्ये’ यावर तिचे प्रभुत्व असून अनेक शाळांमध्ये तिने कार्यशाळा, शिबिरे व शिक्षकांना प्रशिक्षण देऊन एक अद्भुत कामगिरी केली आहे.
मिस इंडिया ही स्पर्धा तिने जिंकली व नंतर त्यांचे परेश रावल यांच्याबरोबर लग्न झाले.
फार चांगले आणि उच्च विचार व मुलांविषयी प्रचंड प्रेम आणि आस्था असलेली एक आई अशा शब्दात तिनी स्वतःचे वर्णन केले आणि ती तशी वागलीही आहे आणि वागतही आहे, हे अत्यंत विनम्र भावाने पण अभिमानाने ती सांगते.
परेश रावल यांनी ती Ph. D. करून आल्यावर तिला विचारले की,
“आता तु कोणते काम करणार आणि किती पैसे मिळवशील? “
हा प्रश्न विचारला असता तिने सांगितले की,
“इतके इतके पैसे मिळविन. “
तर परेश त्यांना म्हणाले,
“तू शिक्षक म्हणून काम करणार असशील, तर एकही पैसा घेऊ नकोस. आपल्याकडे पैसे भरपूर आहेत. “
…. आणि त्यांनी दाखवून दिले की, खरोखरच ती नुसती स्वरूपसुंदर नसून मनाने देखील तितकीच सुंदर आहे. हे तिने कृतीतून दाखवून दिले आहे.
आजतागायत तिने एकही पैसा न आकारता मोफत सर्व काही केले आहे. अत्यंत द्वाड मुले आणि एक वर्गात अजिबात न बोललेली मुलगी व तिच्यात त्यांनी केलेले परिवर्तन पाहून सर्व शिक्षक आश्चर्यचकित कसे झाले, हे मुळातून ऐकण्यासारखे होते.
Ph. D. साठी प्रवेश मिळाला, पण संपूर्ण शिष्यवृत्ती केवळ युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंना पत्र लिहून कशी मिळवली व त्यानंतरचा त्यांचा बेस्ट टिचर हा प्रवास त्यांच्याच शब्दातून ऐकण्यासारखा आहे.
– – एका मुलाखत घेणाऱ्या निवेदिकेने तिला प्रश्न केला की, लोकांचा असा समज असतो ना की, तुम्ही सिनेमा जगात वावरणाऱ्या, घरी नोकर-चाकर असतील, परेश रावळ यांच्या पत्नी आहात, तर तुम्हाला काय वाटते? वगैरे…
त्यांनी उत्तर दिले, ‘I am typical middle class Indian woman and I am above all Indian mother and I am proud of it’. तिने मुलांच्या शिक्षणासाठी जे बदल करायचे आहेत, त्यासाठी सरकारकडे प्रस्ताव दिले आहेत आणि त्यावर सरकार विचार करेल असा विचार देखील बोलून दाखवला. ही सर्व मुलाखत तिने मराठी भाषेत बोलून दिली हे विशेष.
एक अभिनेत्री, मिस इंडिया, ते डॉक्टरेट, एक जागतिक दर्जाची शिक्षिका आणि मुलांच्यात रमणारी एक आई अशी सर्वांगसुंदर स्त्री असा फार फार सुंदर प्रवास करत स्वतःबरोबर इतरांच्या जीवनात आनंद फलवणाऱ्या या स्वरूपसुंदर शिक्षिकेस शतशः प्रणाम.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ किसी राह में… किसी मोड पर… ☆ डॉ. धनंजय देशपांडे☆
हल्ली “रियुनियन” हा प्रकार (म्हणजे कार्यक्रम) होतात न – लहानपणीचे मित्र नंतर मोठे झाल्यावर एकमेकांचे पत्ते शोधून व्हाट्स ग्रुप करतात आणि नंतर कधीतरी ठरवून एक दिवस पिकनिकला जातात.
…. तर असाच एक ग्रुप पिकनिकवर येतो. मात्र यात एक थोडा बदल केलेला असतो की, प्रत्येकाने आपल्या जीवन साथीदाराला सोबत आणायचे.
सुरुवातीला याला काहीजण विरोध करतात. पण शेवटी हो ना हो ना करत करत सगळे तयार होतात आणि पिकनिक निघते.
शाळेतल्या त्यावेळच्या सर्वांच्या लाडक्या हेडमास्तर गुरुजींना चीफ गेस्ट म्हणून सोबत घेतलं जात.
*
वाटेत गप्पा गाणी जोक्स सुरु असतात. विशेषतः नवरा बायकोवरच्या जोक्सची संख्या जास्त असते. त्यातही खासकरून “बायका” विषयावर जास्त.
आणि शेवटी सगळेजण छान मूडमध्ये बुक केलेल्या रिजॉर्टवर पोचतात. बँगा वगैरे ठेवून झाल्यावर थोडं फ्रेश होऊन सगळेजण रिजॉर्टच्या त्या हॉलमध्ये जमतात. त्यावेळी हेडमास्तरांना भाषण करण्याची विनंती केली जाते.
ते म्हणतात, “आज मी भाषण करणार नाही पण तुमचा आग्रहच आहे तर इथे भिंतीवर एक बोर्ड आहे ते लक्षात आल्यावर वाटलं की एक गेम खेळूया”
सगळेजण एकदम खुश. “कसला गेम गुरुजी? ” विचारतात
“थांबा न एक मिनिट” असं म्हणून गुरुजी तिथल्या एका महिलेला उठवून समोर बोलावतात. आणि सांगतात की
“इथे बोर्डवर अशा तीस लोकांची नावे लिही, जे तुला आवडतात. ”
ती मग नावे लिहिते. त्यात सुरुवातीला आई वडील पती मुलं, इतर नातेवाईक मग शेजारी, ऑफिसातले सहकर्मचारी अशी यादी लिहिते.
गुरुजी तिला म्हणतात, “आता यातली अशी दहा नावे पुसून टाक जी फारशी आवडत नाहीत किंवा नसली तरी चालतील अशी”
ती मग ऑफिसातल्या दहा जणांची नावे पुसते.
गुरुजी आता सांगतात, “अजून दहा नावे पुसून टाक”
ती मग शेजारी लोकांची दहा लोकांची नावे पुसते.
गुरुजी : “आता शिल्लक दहा मधून अजून पाच पूस”
ती मग नातेवाईकाची पाच नावे पुसते.
आता शिल्लक राहतात तिचे आई, वडील, पती, आणि दोन मुले
गुरुजी : आता यातली २ नावे पूस
ती गोंधळते पण धीर करून स्वतःच्या आई वडिलांचे नाव पुसते
(आता हॉल मध्ये बसलेले सगळेच हळूहळू गंभीर होत जातात. कारण आता हा गेम राहिला नसून ती महिला जणू स्वतःचे मन समोर मांडत आहे असं लक्षात येत.)
गुरुजी : आता तीन नाव राहिली त्यातली दोन पुसुन टाक
ती थोड्या उदास मनाने दोन्ही मुलाची नावे पुसते.
**
शेवटी फक्त पतीचे नाव शिल्लक राहते. गुरुजी तिला हलकेच थोपटून शांत करतात.
हॉलमध्ये सन्नाटा.
शेवटी गुरुजी तिला विचारतात.
“आता सुरुवातीपासून तू जसे जसे नावे पुसत गेलीस त्यामागचा तुझा विचार सांग”
ती सांगू लागते, “सुरुवातीला मी ऑफिसातली नावे पुसली. कारण ते तर सतत बदलत असतात. नंतर मी शेजाऱ्याची नावे पुसली. कारण शेजारी सुद्धा आयुष्यभर तेच असतील असे नाही. तेही बदलत असतात किंवा आपण तरी घर बदलून दुसरीकडे जाऊ शकतो म्हणून ती पुसली.
नंतर नातेवाईकाची पुसली. कारण नात्याची असली तरी शेवटी ती लांबच असतात. कठीण प्रसंगी ते येतीलच असं नाही.
नंतर खूप धीर एकवटून आई वडिलांची नावे पुसली. कारण त्यांनी अतिशय छानपणे मला वाढवून कर्तव्य पार पाडलं आहे. समाधानी आहेत ते आणि कसलीच अपॆक्षा माझ्याकडून त्यांना नाही. सध्या दोघेही ऐशीच्या घरात आहेत. आज न उद्या त्यांची साथ सुटणार आहेच. म्हणून पुसली.
शेवटी मुलांची नावे मात्र काळजावर दगड ठेवून पुसली. कारण मुलं मोठी झाल्यावर त्यांना माझी गरज असेलच असे नाही किंवा कदाचित भविष्यात ते परदेशी सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे ती पुसली.
मात्र माझा पती शेवट्पर्यंत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहणार आहे. याची मला खात्री आहे. कारण तसे आमचे एकमेकांचे सहजीवन आहे. आणि विशेष म्हणजे या तुमच्या शाळेचे ते माजी विद्यार्थी आहेत. मी नाहीय. पण तुम्ही सर्वानी आम्हालाही सामावून घेतले. त्याचाच आनंद जास्त आहे. ”
असं म्हणून ती थांबली. पूर्ण हॉल मध्ये एकदम शांतता पसरली. आणि अचानक गुरुजींच्या टाळ्यांचा आवाज झाला. त्यात इतरांनीही त्याच्या टाळ्यांचा कडकडाट मिसळला.
*
गुरुजीं म्हणाले, “जी बाब हिने सांगितली ती खरीच आहे. त्याचप्रमाणे ते सर्व इथल्या पुरुषांनाही लागू असणार. त्याच्याही लिस्टमध्ये शेवटचं नाव पत्नीचेच असणार, याची मला खात्री आहे”
असं म्हणून गुरुजींनी खिशातून मोबाईल काढून त्यातून एक गाणं निवडून क्लिक केलं….
*
किसी राह में, किसी मोड़ पर
कहीं चल न देना तू छोड़ कर
मेरे हमसफ़र, मेरे हमसफ़र
मेरे हमसफ़र, मेरे हमसफ़र
किसी हाल में, किसी बात पर
कहीं चल न देना तू छोड़ कर
मेरे हमसफ़र, मेरे हमसफ़र
*
डॉ. डीडी क्लास : मात्र आयुष्याच्या प्रवासात काही कारणाने या “हमसफर”चा हात सुटला, मार्ग वेगळे झाले तरी आजवर एकत्र असताना छान जगलेले काही क्षण आठवून पुढे जात राहावे, ना की कटू आठवणी सतत सोबत ठेवत स्वतःला त्रास करून घ्यावा. कारण न जाणो पुढच्या एखाद्या वळणावर वेगळ्या भूमिकेतून ती हमसफर व्यक्ती समोर आली तर छानसे हसून दोन शब्द बोलता आले तरी पुरे….. त्यावेळी “कसा आहेस ” किंवा “कशी आहेस” इतकं म्हणत एखादी मस्त कॉफी घ्यावी अन “मिलते है ब्रेक के बाद” म्हणावं!
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २५ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्तीस्तोत्र २५.
सा तु कर्मज्ञानयोगेभ्योऽप्यधिकतरा ॥ २५ ॥
अर्थ : परमप्रेमा भक्ति कर्म, ज्ञान व योगापेक्षाही श्रेष्ठ आहे.
विवेचन: मानवाच्या उद्धाराकरिता शास्त्रादिकातून जी साधने सांगितली जातात त्याचे अधिकारपरत्वे तीन विभाग पडतात. कर्म, ज्ञान व योग.
काही लोकांना कर्ममार्ग श्रेष्ठ वाटतो. येथे कर्म म्हणजे ज्याच्या त्याच्या वाट्याला आलेले विहित कर्म, अर्थात त्याने स्वीकारलेला व्यवसाय आणि भरणपोषण होण्यासाठी करावी लागणारी सर्व कर्तव्य कर्म.
जीवाचा जन्म झाला की तो तात्काळ कर्म बंधनात अडकतो. दूध पिणे, रडणे, थोडा मोठा झाल्यावर रांगणे, पुढे शिक्षण, नोकरी, प्रपंच इतर अनुषंगिक कर्मे त्याची पाठ काही सोडत नाहीत आणि हे चक्र त्या मनुष्याच्या मृत्यूपर्यंत अव्याहत चालू रहाते. गीतेमध्ये भगवंत देखील म्हणतात की मी एक क्षण जरी कर्म करायचे थांबवले तर सृष्टीवर हाहाकार माजेल, पण भगवंत करीत असलेले कर्म आणि सामान्य मनुष्य करीत असलेले कर्म यात मूलभूत फरक आहे. मनुष्य प्रत्येक कर्म आसक्तीने, फळाची अभिलाषा मनात ठेऊन कर्म करीत असतो, तर भगवंत हे कर्तव्य म्हणून कर्म करीत असतात. थोडक्यात सांगायचे तर भगवंत किंवा संत हे परमात्म्याशी तादात्म्य पावलेले असतात आणि त्याची इच्छा म्हणून कर्म करीत असतात, तर सामान्य मनुष्य देहबुद्धी ने प्रत्येक कर्म करीत असतो आणि प्रत्येक कर्माच्या फलाशेने आपापली देहबुद्धी कमी करण्याऐवजी वाढवत असतो, हे मनुष्याच्या ध्यानातच येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, “मनुष्य आपल्याला भौतिक लाभ मिळावा म्हणून अनेक व्रतवैकल्ये, कुळाचार पार पाडत असतो. पण इथे सुद्धा लक्ष फळाकडे असल्याने त्याचे चित्त स्थिर रहात नाही. ” श्री. चंद्रशेखर गोखले यांनी एका चारोळीत हे अगदी मार्मिकपणे मांडले आहे.
देवळांत जाऊन माणसं
दुकानात गेल्यासारखी वागतात
चार-आठ आणे ठेवून
काही न काही मागतात
या अशा सवयींमुळे मनुष्याला ना कर्म केल्याचा आनंद मिळतो ना कर्मफळाचा लाभ!! म्हणून समर्थ म्हणतात,
येथासांग रे कर्म तेंही घडेना।
घडे धर्म ते पुण्य गांठीं पडेना।
आपल्या धर्मशास्त्रात ईश्वरप्राप्तीचे विविध मार्गआहेत. सामान्य माणसासाठी भक्ती मार्ग सांगितला गेला आहे. आपण नऊ प्रकारे भक्ती
करून देवाची प्राप्ती करून घेऊ शकतो. यातील नामस्मरण सोडले तर प्रत्येक भक्तीला काही न काही कर्मकांड करावे लागते. कर्म म्हटले की काही ना काही नियम असतातच. पण, बरेच वेळेला नियम पाळण्याच्या अट्टाहासापायी मनुष्य त्या
कर्मामागील मर्म विसरतो. आपले कर्म ‘पूजा’ न होता, आपली पूजा हेच कर्म’ होते. प्रत्येक कर्माला धर्मशास्त्रात विशिष्ठ फळ सांगितले आहे. देश, काल, परिस्थिती (आर्थिक किंवा सामाजिक) सोडली तरी आपण केलेल्या कर्मांत काही ना काही न्यून राहते आणि अपेक्षित फळ आपल्याला प्राप्त होत नाही. पुण्याचा लाभ न होता फक्त दमछाक आणि पैशाचा व्यय मात्र नक्की होतो. जगाला आपण किती ‘धार्मिक’ आहोत. हे मात्र यामुळे दाखविता येते. पण मुख्य उद्देश ‘चित्तशुध्दी’ बाजूला राहतोे आणि आपली ‘देहबुध्दी’ मात्र वाढते. घरातील मंगल कार्यात एखादा अयाचित भिकारी आला तर यजमान त्याला विशेष ‘दया’ दाखवून घरातून हाकलून देत असल्याचे आपण बघितले असेल. खर तर नामस्मरणानी विनासायास भगवंत भेटतोे, पण सोप्या गोष्टी मनुष्याला करायला आवडत नाही आणि कर्ममार्ग आचरता येत नाही. अशा सर्व गोंधळात मनुष्याच्या हातून उपयुक्त असे काहीच घडत नाही.
आता हे वाचून कोणाच्या मनात येईल की कर्म करायचेच नाही का? तर सर्व संत सांगतात की सुरुवात काम्य कर्मांनीच करावी. पण जसजशी साधना वाढेल, समज वाढेल तसतसे मनुष्याने आपले कर्म भगवंतांस अर्पण करायला शिकावे आणि अंतिम ध्येय मात्र ‘कर्मसंन्यास’ हेच असावे. थोडक्यात संत ज्याप्रमाणे स्वतःला भगवंतांचे उपकरण समजतात तसे आपण भगवंताला संपूर्ण शरण जावे आणि त्याच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून टाकावी, आपण भगवंताच्या हातातील बाहुले व्हावे.
जिहासा, जिज्ञासा, चिकित्सा, शोक, भय व अतृप्ती या चित्ताच्या सहजप्रेरणा आहेत. या जसजशा जागृत होतात, तसतशा इंद्रियांच्या व्यापारास उद्युक्त करतात. प्रेप्सा म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला हवी असे वाटणे, तर कधी कशापासून तिटकारा वाटून त्यापासून दुःख होणे, ती जिहासा. काहीतरी नवे ज्ञान मिळावे ही ज्ञानलालसा म्हणजे जिज्ञासा. काही तरी करावे असे वाटणे म्हणजे चिकित्सा. अनिष्ट गोष्टींचा मनात होणारा खेद म्हणजे शोक, भविष्यातील संकटाबाबत वाटणारी कातरता म्हणजे भय. कितीही विषयसेवन केले तरी समाधान न होणे म्हणजे अतृप्ती होय. आपल्या देहइंद्रियांचे जे जे व्यापार होतात ते याच सहज प्रेरणेमुळे. कोणत्याही कामात शुद्धता नसेल, ते नीट केले नसेल तर ते पापकर्मच ठरते. जे नित्य कर्म पूर्ण श्रध्देने केले जाते ते यथासांग म्हणता येईल. दुर्दैवानं हा रीपुंच्या आधीन होऊन मनुष्याचे ना कर्म धड होते नामस्मरण. म्हणून अट्टाहासाने प्रत्येक कर्म करतेवेळी त्यास नामाची जोड द्यावी. प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे यातून लाभ होत असतो, असे सर्व संत सांगतात.
ज्ञानमार्ग हाही श्रेष्ठ असा वेद, उपनिषदे, सूत्रादी ग्रंथातून सांगितला आहे. विना ज्ञानाचा मोक्ष प्राप्त होतच नाही असा उपनिषदाचा सिद्धान्त आहे. ज्ञानमार्ग हा सामान्य मनुष्यासाठी कष्टदायक सांगितला जातो. कारण त्यात अनेक गोष्टी येतात. अनेक नीतीनियम पाळून ज्ञान प्राप्त केले तर त्यातून अभिमान वाढण्याची शक्यता जास्त असते, असे सर्व संत सांगतात.
योगयागविधी येणे नोहे सिद्धी।
वायाचि उपाधी दंभ धर्म।।१।।
(माउलींचा हरिपाठ)
संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगात इतर साधनांचा निषेध करून भावभक्तीचे श्रेष्ठत्व व सत्संगतीची आवड प्रतिपादन करतात. श्री ज्ञानेश्वर माऊली यमनियमादी अष्टांग योग मार्गास नित्य नवा ‘अग्निप्रवेश’ असे म्हणतात.
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची प्रमुख आठ अंगे होत. हे सर्व पाळणे सामान्य मनुष्याला शक्य होतेच असे नाही. अनेक वेळा आपले ध्यान लागले असे मनुष्याला वाटते, परंतु त्यास त्यावेळी झोप लागलेली असण्याची शक्यता जास्त असते. थोडक्यात हा मार्ग तज्ज्ञ गुरूंच्या हाताखाली शिकण्याचा आहे. सामान्य मनुष्यासाठी नक्कीच नाही. याग म्हणजे यज्ञ. यज्ञाचा खर्च सामान्य मनुष्याला न परवडणारा… , समजा पैसे गोळा केले तरी त्यातून विधी विधानाप्रमाणे यज्ञ पार पडेल याची शाश्वती नाही, यास मुख्य कारण म्हणजे सद्यस्थिती. सध्या एकूणच धर्मावरील विश्वास क्षीण झाला आहे आणि यज्ञ करण्यास लागणारी साधन सामग्री मिळणेही मुश्किल झाले आहे. यज्ञ याग करायचे कशासाठी.? तर काहीतरी मिळण्यासाठी…. अर्थात सिद्धीच्या प्राप्तीसाठी… पुण्य वाढून स्वर्ग प्राप्ती होण्यासाठी..
अनेक प्रकारच्या सिध्दी आहेत. परंतु यापैकी कोणतीही सिध्दी प्राप्त होऊन कधीही मोक्ष मिळत नसतो…. स्वर्गलोक प्राप्त झाला तरी पुण्य संपल्यावर इथेच जन्म घ्यावा लागतो, नरदेह प्राप्त करावा लागतो आणि त्यानंतर साधना करून मोक्ष प्राप्ती करून घ्यावी लागते, असे सर्व संत सांगतात. या योग यागाचा एक विपरीत परिणाम असा होतो की मी अमुक यज्ञ केले, मी योगी आहे असा अहंकार मनुष्याला होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महायोगी चांगदेव महाराज.
सध्याचा काळ दिखाऊपणाचा आहे. त्यामुळे देहाचा रंग गोरा करणारी औषधे कोणताही गुण न येताही मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. जसा आहे तसा न राहता, आहे त्यापेक्षा वेगळा (अधिक चांगला) दर्शवण्याचा प्रयत्न करणे, याला दंभ असे म्हणतात. भगवी कफनी घातली की लोकं त्या भगव्या वस्त्राला भुलतात. हा दंभ होय आणि तसे आचरण करणे हा दंभधर्म होय.
संत एकनाथ महाराज याचे वर्णन करतात.
पोटीं नाहीं परमार्थ । धरोनियां अर्थस्वार्थ । स्वयें म्हणविती हरिभक्त । या नांव निश्चित भजनदंभू ॥
(ए. भा. अध्याय २३. २३०)
आदरणीय महिपतिबाबा आपल्या भक्तलीलामृत ग्रंथात म्हणतात,
जनसामान्यांसाठी नामजप हाच राजमार्ग सर्व संतांनी सांगितला आहे. समर्थ सुद्धा तेच सांगतात, “यथासांग रे कर्म तेही घडेना । घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना ॥” (मनाचे श्लोक १००). जगात ईश्वरप्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. अगदी सोप्या शब्दात सांगयचे झाले तर व्यक्ति तितक्या प्रकृती. जितकी माणसे तितके मार्ग. मागील शतकातील एक श्रेष्ठ संत श्रीरामकृष्ण परमहंस म्हणतात, “कलियुगात जीव अल्पायु असल्यामुळे आणि एकूणच काळ पूरक नसल्यामुळे अन्य मार्गांपेक्षा भक्तिमार्गच श्रेष्ठ आहे. ”
उत्तम भक्तांच्या लक्षणांत शुद्ध चित्त, शुद्ध भाव आणि आपपरभावाचा लोप ही प्रमुख लक्षणे सांगता येतील. पण सामान्य मनुष्यास ते तितके जमतेच असे नाही. त्यामुळे ना त्याला धड कर्म करता येते ना त्याला धर्म करता येतो, ना सर्वाविषयी भूतदया दाखविता येते. समर्थांनी व्यक्त केलेली ही खंत आहे. पण सर्वात सोपे, उपाधिरहीत असे नाम त्यास घेता येऊ शकते. म्हणून आपण सर्वांनी पुन्हा एकदा सश्रद्धेने नाम घेण्यास सुरुवात करू, अर्थात भक्तीमार्गच अधिक सुलभ म्हणगा येईल.
☆ “खरे देवदास्य अंगिकारलेली लक्ष्मी…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
भारतरत्न श्रीमती एम. एस. सुब्बुलक्ष्मी
खरे देवदास्य अंगिकारलेली लक्ष्मी!
ओम… शुक्लांबरधरंविष्णू शशिवर्णम चतुर्भुजं…
कौसल्यासुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते
उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमाह्निकम…
– – – तिच्या मुखातून उमटलेले हे शब्द आधुनिक ध्वनिमुद्रण आणि ध्वनिप्रक्षेपण सुविधेच्या मत्कारामुळे देशभरातल्या सर्वसामान्य लोकांच्या घरा-घरांत घुमू लागले तेंव्हा पहाटवेळा रोमांचित होऊ लागल्या! याला यावर्षी उणीपुरी ३० वर्षे पूर्ण होताहेत.
पण गाण्याची ही काही तिची पहिलीच वेळ नव्हती. १६ सप्टेंबर १९१६ रोजी जन्मलेली ही कन्या कुंजम्मा… म्हणजे गोड मुलगी म्हणून संबोधली जायची. तिच्या नावातला पहिला इंग्रजी M तिच्या जन्मस्थळाचे मदुराईचे नाव मिरवतो. तर S म्हणजे ष्णमुखावदिवू अर्थात सहा मुखांनी सुशोभित कार्तिकेय. स्त्री असूनही पुरुष देवतेचे नाव धारण करणारी ही कुंजम्माची माता. वीणा वाद्य खूप उत्तमरीतीने वाजवणारी कलाकार. सुब्बुलक्ष्मी म्हणजे धनाची देवी. जन्माने देवदासी अर्थात देवाच्या सेवेत काया-वाचा-मन आणि नृत्यगीताच्या माध्यमातून समर्पित जीवन.
आई, शक्तीवेल नावाचा एक भाऊ आणि वदिवंबल नावाची एक बहीण असे चौघांचे कुटुंब मदुराईत हनुमन्तायार कोईल गल्लीत राहायचे. समाजाने गरीब महिलांवर लादलेलं हे देवदास्य पुढे औपचारिकरीत्या संपुष्टात आले असले तरी देवदासी महिलांचा उदरनिर्वाह आरंभी प्रामुख्याने गायन, वादन आणि नृत्यावरच चालत असे. एम. एस. यांना शालेय शिक्षण फारसे लाभले नाही. मात्र गाण्याचे शिक्षण मात्र सहजी मिळाले… एक नवी देवदासी तयार होत होती. वयाच्या दहाव्या वर्षी एम. एस. ने पहिले सार्वजनिक गायन सादर केले आणि काहीच वर्षांत तिची पहिली ध्वनिमुद्रिकासुद्धा निघाली! अर्थात देशाच्या इतर भागांत एम. एस. ची कीर्ती पोहोचायला आणखी काही वर्षांचा अवकाश होता.
गोष्ट १९३२ मधली आहे. कुंभकोणम मध्ये महामखम महोत्सव सुरु होता. के. सुब्र्हमण्यम नावाचे चित्रपट दिग्दर्शक मुख्य आयोजक होते. मुख्य गायकांना यायला काहीसा उशीर होत असल्याचे बघून एम. एस. च्या मातोश्रींनी आयोजकांना गळ घातली आणि बालिका एम. एस. पहिल्यांदा हजारो लोकांसमोर गायल्या…. त्यादिवशी त्यांना आणखी एकदा गाण्याची संधी मिळाली… मोठमोठे गायक उपस्थित होते त्या मंचावर. एम. एस. चे नाव झाले!
मदुराईमधील मंदिरांचा आणि तिथल्या श्रीमंत पुरुषांचा आश्रय सोडून एम. एस. आणि त्यांची आई मोठ्या संधीच्या शोधात चेन्नई (तत्कालीन मद्रास) शहरात आल्या. चौदा वर्षांच्या सुब्बुलक्ष्मी त्यांच्या अंगभूत गायनकौशल्यामुळे आणि सौंदर्यामुळे लवकरच लोकांच्या नजरेत भरल्या. तिथल्या एका मोठ्या संस्थेसाठी गायल्यामुळे तर त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली. आनंद विकटन नावाच्या एका मासिकाने त्यांची मुलाखत प्रसिद्ध करण्याचे ठरवले. मुलाखत घेतली टी. सिवदासन नावाच्या एका व्यक्तीने. त्या मासिकाचे हे जाहिरात प्रतिनिधी त्यावेळेच्या इंग्रज सरकारविरोधात क्रांतिकार्य करीत असत आणि त्यासाठी त्यांना तुरुंगावासही घडला होता. सिवदासन यांनी मुलाखतीतून एम. एस. च्या पूर्वायुष्यातही डोकावले..
के. सुब्र्हमण्यम यांनी १९३८ मध्ये सेवासदनम नावाच्या चित्रपटात एम. एस. यांना संधी दिली आणि तो चित्रपट यशस्वी झाला.. आता कुंजम्मा अभिनेत्री झाल्या होत्या. तोवर सिवदासन यांनी एम. एस. यांच्याशी संपर्क वाढवला होता. त्यांनी एम. एस. यांना आणखी एका चित्रपटात संधी मिळवून देण्यात हातभार लावला… ‘शंकुतलाई’ नावाचा हा चित्रपट सिवादसन यांच्याच कंपनीने काढला होता… हाही चित्रपट चालला आणि एम. एस. मद्रासमध्ये सुस्थापित होण्याच्या मार्गावर अग्रेसर झाल्या!
दरम्यान एम. एस. यांच्या आईने त्यांचा विवाह एका श्रीमंत व्यक्तीशी करण्याचे ठरवले…. देवदासीपणाला जणू त्या शरण जाऊ पाहत होत्या… मात्र एम. एस. यांनी यावेळी बंड पुकारले…. तत्कालीन समाजव्यवस्थेतील छुप्या महिषासुराला या आधुनिक लक्ष्मीने दिलेले हे जणू आव्हानच होते!
…. सुब्बुलक्ष्मी यांनी ठाम नकार दिला.. पण तरीही मातोश्रींनी आग्रह सुरूच ठेवल्याने त्या थेट सिवदासन यांच्या घरी रहायला गेल्या…. हे एक मोठे धाडस होते. दोघांच्या वयात बऱ्याच वर्षांचे अंतर होते. शिवाय सिवदासन विवाहितही होते.. त्यांना दोन कन्याही होत्या! पुढे सिवदासन च्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांनी एम. एस. यांचेशी विवाहगाठ बांधली. आता एम. एस. एका प्रतिष्ठित माणसाच्या पत्नी झाल्याने देवदासीपणाचा शिक्का पुसला गेला. एम. एस. यांनी नारदाची भूमिका असणारा आणखी एक चित्रपट केला… त्यातही त्यांनी अभिनय आणि गाण्याची चमक दाखवली….
…… इथून पुढे एम. एस. यांचा मीरा होण्याकडे झालेला प्रवास विलक्षण ठरला! संत मीरा यांनी विषाचा प्याला केवळ भक्तीच्या जोरावर पचवला…. देवदासीपण, सामाजिक कुचंबणा, मनाविरुद्ध लग्न ठरवलं जाणं याला एम. एस. यांनी जोरदार विरोध केला…. आणि एका अर्थाने विषाच्या प्यालाच हाती घेतला….. ही मीरा बंडखोर निघाली… पण हिचे बंड स्वरांनी, भक्तीने पुरेपूर भरलेले होते… या स्वरांनी पुढे भक्तीसंगीताच्या जगतात प्रचंड इतिहास घडवला! मूळ दाक्षिणात्य भाषेत असलेल्या मीरा नावाच्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत एम. एस. मीरा बनल्या आणि पुढे जणू ख-याखु-या आयुष्यात त्या मीराच झाल्या! शास्त्रीय गायन करणा-या एम. एस. सुब्बुलक्ष्मी पुढे प्रामुख्याने भजन, भक्तीसंगीत गायिका व्हायच्या होत्या हे विधिलिखित होते!
सिवदासन यांनी पुढे स्वत:चे मासिक काढले परंतु ते लवकरच कर्जबाजारी झाले. कर्ज फेडण्यात त्यांना त्यांची मोठी संपत्ती विकावी लागली आणि ते भाड्याच्या जागेत राहण्यास गेले. आर्थिक परिस्थिती नाजूक झाली. पण त्याचवेळी प्रत्यक्ष भगवान बालाजी व्यंकटेश त्यांच्या साहाय्याला धावले असे म्हणावे, अशी घटना घडली… आध्यात्मिक क्षेत्रातील काही ज्येष्ठ लोकांनी देवस्थानला सुब्बुलक्ष्मी यांच्यावर आलेल्या आर्थिक संकटाची कल्पना दिली. पण देवस्थान थेट आर्थिक मदत देऊ शकणार नव्हते. त्यावर एक उपाय अंमलात आणावे असे ठरले. भजनाची ध्वनिमुद्रिका काढायची, विकायची आणि त्याचे मोठे मानधन सुब्बुलक्ष्मी यांना द्यायचे!
… बालाजी देवस्थानचे अधिकारी एम. एस. यांना भेटायला त्यांच्या घरी पोहोचले. देवस्थानला आर्थिक मदत व्हावी, यासाठी भजन, श्लोक असलेली ध्वनिमुद्रिका काढायची आहे, असे त्यांनी सांगितले. भगवान बालाजींची एक प्रतिमा त्यांनी भेट म्हणून सुब्बुलक्ष्मी यांना दिली. सुब्बुलक्ष्मी यांचे वय आणि एवढे मोठे जबाबदारीचे काम करणे अवघड आहे, जमणार नाही असे शिवदासन यांनी सांगितले… पण सुब्बुलक्ष्मी यांनी ही देवसेवा विनाविलंब स्वीकारली… पण सुब्बुलक्ष्मी यांनी पैसे घेण्यास स्पष्ट नकारच दिला! त्यांची आर्थिक स्थिती बिकट असताना त्यांनी केवळ परमेश्वराचे काम म्हणून पैशांना नकार दिला! पण खूपच आग्रह झाल्यावर, देवाचा प्रसाद म्हणून, अगदीच नाईलाज म्हणून त्यांनी त्यातील अगदी मोजकी रक्कम स्वीकारली. त्यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रिका ‘बालाजी पंचरत्नम’ खूप म्हणजे खूपच प्रसिद्ध झाली. त्यातून बालाजी देवस्थानला प्रचंड उत्पन्नही झाले. एम. एस. यांनी त्यांना मिळालेल्या मानधनाचा खूप मोठा भाग सेवाकार्यासाठी दान केला!
शास्त्रीय संगीत गायन ही त्यांची मूळची आवड आणि खासियत. मात्र कर्मधर्मसंयोगाने त्यांच्या गायनात भक्तीसंगीताचे प्रमाण अधिक राहिले… आणि त्यात त्या तल्लीनही होऊन गात. संसारिक समस्या, पूर्वायुष्य, पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थेत होणारी मानसिक कुचंबणा या गदारोळात त्यांना स्वत:लाही भक्तीसंगीत मन:शांती देत गेलं असावं. सिवदासन यांच्या राजकीय कार्यातील संबंध आणि सी. राजगोपालाचारी या मोठ्या नेत्याच्या सहकार्यामुळे असेल पण एम. एस. पुढे राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू यांच्याशी त्यांचा परिचय वाढला. वैष्णव जन तो आणि अशा अनेक भजनांच्या गायनामुळे एम. एस. म्हणजे सुंदर भक्तीसंगीत ही प्रतिमा अधिकाधिक ठळक होत गेली. त्यात त्यांची समरसता, चेह-यावरील सात्विक भाव, प्रभावी व्यक्तिमत्व आणि आवाजातील वेगळेपण यांमुळे त्यांची भजने लाखो घरांत अगदी पहाटेपासून ऐकली जाऊ लागली.
पुढे त्यांनी म्हणलेलं विष्णूसह्स्र्नाम आणि तत्सम धार्मिक मंत्र संपूर्ण देशात पोहोचले आणि गाजले. सलग चाळीस दिवस एम. एस. यांच्या घरी शास्त्रोक्त पद्धतीने विष्णू सहस्त्रनामाचा जप झाला… एम. एस. यांनी तो मन लावून ऐकला… आणि संपूर्ण तयारी झाल्यावरच त्यांनी ध्वनिमुद्रण केले. आज इतक्या वर्षांनंतरही जगात कुठे न कुठे तरी लाखो घरांत, मंदिरांत एम. एस. सुब्बुलक्ष्मी भक्तीगीते, श्लोक ध्वनीमुद्रिकामधून गात असतात… त्यांचा धीरगंभीर आवाज पहाटवेळा पवित्र करीत जातात. जगभरातील हिंदू धार्मिक लोकांना ही भजने, स्तोत्रे, मंत्र पाठ झाली… पाहिजे तेंव्हा ऐकता येऊ लागली!
आंतरराष्ट्रीय पातळीवरही एम. एस. गाजल्या. भारताच्या धार्मिक परंपरेच्या त्या जणू राजदूतच बनल्या. पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत कलानिधी पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, संगीत कलाशिखामणी, कालिदास सन्मान सारखे पुरस्कार त्यांच्यापर्यंत चालत आले… पण सर्वांत संस्मरणीय ठरला तो भारतरत्न पुरस्कार. संगीत क्षेत्रातील व्यक्तीला दिला गेलेला पहिला पुरस्कार त्यांना प्रदान केला गेला!
एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांनी त्यांना भजन गायनातून मिळालेल्या पैशांचा खूप मोठा भाग धार्मिक संस्थांना दान केला. पती शिवदासन यांनी त्यांच्या कारकिर्दीला त्यांना हवे तसे वळण दिले… खरं तर कोणत्याही कलाकाराला कुणी त्याच्या कलेत हस्तक्षेप केलेला भावत नाही. पण यानिमित्ताने आपल्या स्वरांतून देवाची सेवा होते आहे, दान करता येईल एवढे पैसे मिळत आहेत आणि समाजाची सेवा करता येते आहे.. हे लक्षात घेऊन एम. एस. यांनी सर्व कष्ट उपसले.
देवाच्या नामस्मरणाने त्यांच्या संपूर्ण चरित्रात पावित्र्य आले. अन्यथा त्या केवळ एक गायिका आणि फार तर अभिनेत्री म्हणून आणि एक देवदासीकन्या म्हणून जगल्या असत्या! पण भगवंत पतितपावन आहेत.. हे सिद्ध झाले!
‘देवदासी ते देवाची स्वरदासी’ हा सुब्बुलक्ष्मी ऊर्फ कुंजम्मा यांचा प्रवास मोठा प्रेरणादायी ठरला… परमेश्वराचे नामचिंतन त्यांना घडले आणि ते स्वर आजही जिवंत आहेत.
– – नवरात्री निमित्ताने या लक्ष्मीचा हा प्रवास थोडक्यात मांडला.
काल एका ध्येयवेड्या परिवाराशी गाठ पडली. सामान्य स्थितीत असलेला माणूसही जर समाजाप्रती सजग असेल तर तो किती उत्तुंग झेप घेऊ शकतो याचे हा परिवार म्हणजे जितेजागते उदाहरण आहे. या परिवाराला गरिबीचा तिटकारा असला तरी गरिबांच्या विषयी मात्र त्यांचे हृदय करुणेने ओथंबलेले आहे, याचा प्रत्यय ते करत असलेले कार्य पाहून आला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था, गौरगांव, ता. तासगाव संचलित माऊली बालाश्रम व वृध्दाश्रमही एक सामाजिक बांधिलकीची, लोककल्याणकारी चळवळ आहे. माऊली बालाश्रम व वृध्दाश्रम हे नाव उच्चारले की, माऊलीच्या हस्तस्पर्शाची ऊब मनाला जाणवते. हा आश्रम म्हणजे फक्त एक दगडाच्या चीऱ्यांनी निर्माण होणारी इमारत नाही, तर समाजातील जखमी आत्म्यांना दिलासा देणारे ते एक जिवंत मंदिर होणार आहे. शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, व्यक्तिविकास आणि कौशल्यविकास या पाच भक्कम स्तंभांवर उभारलेले हे ध्येयविधान समाजातील उपेक्षित, वंचित आणि निराधार घटकांना नवजीवन देण्याची हमी देत आहे. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना सुरक्षित आश्रय, उत्तम शिक्षण आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देणारी ही संस्था केवळ सेवाकार्यच करणारी नाही तर समाजाला दिलासा देणारे आश्वासन आहे. ऊसतोड कामगारांची लेकरं, निराधार व अनाथ बालकं, दिव्यांगांची लेकरं, एकल पालकांची मुलं – या सगळ्यांसाठी हा आश्रम म्हणजे काळोखातून उगवणाऱ्या प्रकाशाची किरणरेषा आहे.
जुगळाई मळा, गौरगांव येथे उभारण्यात येत असलेला हा आधुनिक निवासी आश्रम हे त्यांच्या कार्याचे ठोस प्रतिक आहे. इथे अनाथ, निराधार, दिव्यांग, ऊसतोड कामगारांची मुले, एकल पालकांची मुले अशा सर्व दुर्लक्षित गटातील बालकांना उबदार छत, उत्तम संस्कार आणि भविष्यासाठी आवश्यक शिक्षण देण्याचे ध्येय राबवले जाणार आहे. हा आधुनिक आश्रम त्यांच्या शिक्षणासाठी, व्यक्तिविकासासाठी, कौशल्यविकासासाठी आणि आरोग्यासाठी उभा राहणारा दिशादर्शक प्रकल्प ठरणार आहे. समाजात कोणताच आधार नसेल, कुटुंब नसेल, हातावर पोट असलेल्या पालकांची दारिद्र्याशी झुंज सुरू असेल तर अशा सर्व मुलांना हा आश्रम आईच्या मायेप्रमाणे कवेत घेणार आहे. केवळ मुलांचाच नाही, तर कुटुंबाच्या छायेशिवाय जगणाऱ्या वृद्धांसाठीही हा आश्रम एक आपलेपणाचा, समाधानाचा निवारा ठरणार आहे. ज्यांना कोणी आधार नाही, त्यांच्यासाठीही ही संस्था एक जिव्हाळ्याचे घर ठरणार आहे.
या उच्च ध्येयाला हृदयाशी कवटाळून झुंजार आणि प्रतिमा हे बहिण-भाऊ कामाला लागले आहेत. त्यांच्या डोळ्यांतली जिद्द, हृदयातली माया आणि समाजासाठीचा प्रखर विश्वास हे या कार्याचे खरे बळ आहे. आज अनेक जण समाजासाठी काहीच न करता फक्त तक्रारीच करत असातात. पण झुंजार आणि प्रतिमा यांनी मात्र कृतीचा मार्ग निवडला आहे. त्यांच्या हातून सुरू झालेल्या या कार्यात उद्याच्या सुदृढ समाजाचे स्वप्न आहे, मातीतल्या शेतकऱ्यांच्या अश्रूंना पुसण्याची ताकद आहे, आणि असंख्य जीवनांना नवसंजीवनी देण्याची उमेद आहे. या बहिण-भावाच्या अथक प्रयत्नांना आणि दूरदृष्टीला मनःपूर्वक सलाम. त्यांची ही वाटचाल केवळ समाजकार्यासाठी प्रेरणादायी नाही, तर प्रत्येकाला आपल्या क्षमतेनुसार योगदान देण्याची जाणीव करून देणारी आहे. म्हणूनच या समाजाचे आपण काही देणे लागतो असे समजणाऱ्या सजग व्यक्तींना मी आवाहन करत आहे की, त्यांनी या आश्रमाला सढळ हस्ते वस्तुरूपी वा रोख रकमेची देणगी देण्यासाठी पुढे यावे. (त्यांचा संपर्क क्रमांक :+91 9834018536) कारण त्यांचा हा प्रवास म्हणजे निराधारांच्या आशेचा, जिद्दीचा आणि सेवाभावाचा दीपस्तंभ ठरणारा आहे. समाजाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात ज्यांना कुठलाही आधार दिसत नव्हता, त्यांच्यासाठी हा आश्रम म्हणजे नवीन आयुष्याचे दरवाजे उघडणारा आहे. त्यांचे हे प्रयत्न काळाच्या ओघात महाराष्ट्रासाठी आणि देशासाठीही आदर्श ठरणार आहेत. त्यांच्या या उज्ज्वल कार्याला मनःपूर्वक सदिच्छा.
अश्विन पौर्णिमा… महर्षी वाल्मिकी जयंती….. त्यानिमित्त महर्षींना वाहिलेली ही आदरांजली…..
श्रीबुधकौशिक ऋषींनी रामरक्षा स्तोत्रात वाल्मिकींचे केलेले वर्णन किती समर्पक आहे!
कूजंतं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरुह्यकविताशाखां वंदे वाल्मीकि कोकिलम्।
भावार्थ:-
राम राम अशा मधुर अक्षरांनी कूजन करणाऱ्या, कवितारूपी शाखेवर बसलेल्या वाल्मिकीरुपी कोकिळास वंदन असो.
वाल्मिकींची स्तुती करणारे हे दुसरे सुभाषित पहा,
सदूषणोsपि निर्दोषः सखराsपि सुकोमलः।
नमःस्तसै कृतायेन रम्या रामायणी कथा।।
भावार्थ:-
‘दूषण (दोष, एक राक्षस) असूनही निर्दोष आहे, ‘खर’ (खरखरीत, एक राक्षस) असूनही जी कोमल आहे अशी रम्य रामयण कथा ज्याने रचली, केली त्याला (वाल्मिकींना) नमस्कार असो.
रामायणात ‘खर’ आणि ‘दूषण’ या नावाच्या दोन राक्षसांचा उल्लेख आहे. पंचवटीतील वास्तव्यात रामाने त्यांचा वध केला. वरील श्लोकात सुभाषितकाराने या राक्षसांच्या नावावर ‘श्लेष’ केला आहे. ‘श्लेषालंकार’ हे संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य आहे. जगातील अन्य कोणत्याही भाषेत इतका विपुल व समृद्ध श्लेष अभावानेच आढळतो. असो.
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।
यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम्।।
– – या श्लोकाद्वारे अनुष्टुप् छंदाचा आविष्कार करून ‛रामायण’ या लोकविलक्षण काव्याची रचना करणारे आद्यकवी महर्षी वाल्मीकि यांची आज (अश्विन पौर्णिमा) जयंती. या आद्यकवीला शतशः वंदन!
महर्षि वाल्मिकींच्या काव्यकर्तृत्वाला अभिवादन म्हणून कविवर्य भा. रा. तांबे यांनी रचलेली पुढील सुंदर कविता वाचनात आहे.
जय वाल्मीकी!
*
जय वाल्मीकी! तुज हें तर्पण;
तव चरणीं सर्वस्व समर्पण! ।।ध्रु।।
*
त्रिभुवनपति जो राम रघूत्तम
सुरनरकिन्नरनुत पुरुषोत्तम
हे वाङ्मयतरुकोकिल, निरुपम
त्या रामा तूं देशि रामपण ।।१।।
*
विधिहि शकेना द्याया कवणा
तीं दश वदनें देशि रावणा
राम यमाधिप दे ज्यां मरणा
अमर करिशि तो सुरारि रावण ।।२।।
*
अधनांचें धन, अबलांचें बल
अमंगलांचें श्रेयोमंगल
जन्मांधांचे लोचन निर्मल
दुर्वृत्तांचें दुरितनिवारण ।।३।।
*
हात दिला तूं किती बुडत्यांना!
धीर दिला किती तूं व्यथितांना!
उरीं लाविलें किती पतितांना!
जय भवनाविक पतितोद्धारण! ।।४।।
*
कालाच्या अति कराल दाढा
सकल वस्तुंचा करिति चुराडा
कालशिरिं झडे तुझा चौघडा
जय मृत्युंजय! जय कविभूषण! ।।५।।
*
भा. रा. तांबे
तमसा नदीवर स्नानाला जात असताना एका काममोहित क्रौंच मिथुनातील नराला बाण मारण्याचे क्रौर्य बघून महर्षिंच्या मुखातून बाहेर पडलेली ही शापवाणी……
“मा निषाद प्रतिष्ठां……. ”
शाप दिल्यानंतर महर्षिंना वाईट वाटले. आपली सारी तपश्चर्या वाया गेल्याचे दुःख झाले.
ते तसेच विचारमग्न अवस्थेत आश्रमात परतले. त्यांची विचारमग्न चर्या पाहून एका शिष्याने कारण विचारले, तेव्हा महर्षिंनी सारा वृत्तांत कथन करून आपल्या मुखातून निघालेली शापवाणीही पुन्हा सांगितली.
ते सांगत असताना त्यांच्या लक्षात आले की ह्या शापवाणीत काही छंद दडलेला आहे. महर्षींना त्या ही अवस्थेत आश्चर्य वाटले. हा योगायोग पाहून ते अधिकच विचारमग्न झाले… तेवढ्यात महर्षि नारद तेथे आले. घडलेला वृत्तांत वाल्मिकींनी नारदांना सांगितला. नारदांनाही आश्चर्य वाटले आणि त्यामागचा ईश्वरी संकेतही जाणवला. यावर चिंतन करून नारदांनी वाल्मिकींना रामकथा लिहिण्याचा समादेश दिला.
… त्या रचनेसाठी नव्याने गवसलेल्या या वृत्ताचा उपयोग करण्याचे महर्षिंनी ठरविले. ते वृत्त म्हणजेच ‘अनुष्टुप् छंद’. या वृत्ताचे द्रष्टेपण जाते आद्य कवी महर्षि वाल्मिकींकडे जगातील व रामायणातील पहिला अनुष्टुपातील श्लोक ‘मा निषाद प्रतिष्ठां…’
आद्यकवींनी रामायणासाठी हा सुलभ असा अनुष्टुप् छंद योजला. या नंतर बहुतेक सर्व महाकवींना आपल्या प्रदीर्घ रचनांसाठी हाच छंद सोईस्कर वाटला.
– – एका पंक्तीत आठ अक्षरे, पाचव्या अक्षरावर यति इ. यमक, अनुप्रासादि अलंकाराचा हट्ट नाही. सरळ लिहित रहा, वर्ण्यविषय संपेपर्यंत, असे साधे प्रवाही स्वरूप या वृत्ताचे. म्हणून सर्वांनाच तो सोईचा वाटला.
स्वा. सावरकरांनी अंदमानात जेव्हा महाकाव्य रचायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनीही हाच छंद निवडला.
पण वृत्तदर्पणातून शिकलेली लक्षणे त्यांना कारावासात काही केल्या नीट आठवेनात. संदर्भग्रंथ उपलब्ध नाहीत. मिळण्याची सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत काही पाठ असलेल्या श्लोकांवरून त्यांनी अनुष्टुपाची लक्षणे शोधून त्याप्रमाणे आपल्या रचना केल्या. पुढे काही सहस्र रचना झाल्यावर लक्षात आले की आपण केलेल्या रचनांमधे अनुष्टुप् छंदाच्या नियमाचा भंग झालाय. आठ ऐवजी आपण नऊ अक्षरांचे एक वेगळेच, पण अस्तित्वात नसलेले वृत्त नकळत योजले आहे! अपघात असला तरी ही एक वेगळी निर्मिती आहे. अपघाताने ज्या नव्या वृत्ताचा शोध लागला त्याला मग स्वा. सावरकरांनी “वैनायक वृत्त” असे नाव दिले.
– – सात सहस्त्र वर्षापूर्वी आद्य महाकवीने आम्हाला ‘अनुष्टुप्’ दिले तर एका अधुनिक महाकवीने ‘वैनायक’ दिले!
पुरंदर तालुक्यात, पालखी मार्गावर ‘वाल्हे’ नावाचे एक गाव लागते. या गावात वाल्या कोळ्याचा जन्म झाला. वाल्मिकींचे हे जन्मग्राम आहे असा येथील लोकांचा विश्वास आहे. तिथे वाल्मिकींचे मंदिरही आहे.
रामचरित्र सात सहस्त्र वर्षापूर्वीचे आहे. त्यावेळी महाराष्ट्रात दंडकारण्य होते. याच अरण्यात ‘वाल्हे गावचा वाल्या’ वाटमाऱ्या करीत होता.
☆ “सोनम वांग्याल – –” – हिन्दी लेखक : श्री दिलीप मिश्रा ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
(…सध्या सोनम वागचुंगची खूप चर्चा सुरू आहे, पण आधी त्यांच्या वडिलांविषयी, सोनम वांग्याल यांच्याविषयी थोडं जाणून घ्या…)
सन १९६५. फक्त २३ वर्षांचा एक तरुण पॅरामिलिटरी जवान. डोळ्यांत फक्त एकच स्वप्न तिरंगा सर्वात उंच शिखरावर फडकवायचा! सोनम वांग्याल यांनी एव्हरेस्ट सर केले. त्याच वर्षी त्यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री सन्मान मिळाला.
१९६५ मध्ये भारत आणि अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी एक गुप्त मोहिम सुरू केली. नंदा देवी प्लूटोनियम मिशन. चीनच्या अणु चाचण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नंदा देवीच्या उंच शिखरावर गुप्त उपकरण बसवायचं होतं. सोनम वांग्याल या मोहिमेचा भाग बनले. डोंगरांचा मुलगा स्वतःचा जीव धोक्यात घालून राष्ट्राच्या सुरक्षेसाठी उभा राहिला.
काळ पुढे गेला. १९८४ मध्ये जेव्हा लडाखमधील लोक अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा म्हणून रस्त्यावर उतरले, तेव्हा हाच सोनम वांग्याल त्यांच्या आंदोलनाचा नेता झाला. त्यांनी उपोषण सुरू केलं. तेव्हा देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. त्या स्वतः लेहला आल्या, संवाद साधला, संवेदनशीलतेनं बोलल्या आणि आंदोलनाला मार्ग दिला. एक उपाशी माणूस जिंकला, कारण त्याच्यासमोर सत्ता नव्हती तर संवेदना उभी होती.
मग १९९३ आले. सोनम वांग्याल इंटेलिजन्स ब्युरोचे असिस्टंट डायरेक्टर पदावरून सेवानिवृत्त झाले. आयुष्यभर त्यांनी राष्ट्राच्या सुरक्षेसाठी, राष्ट्राच्या सन्मानासाठी, राष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वतःला झोकून दिलं.
आणि आज? त्या देशाच्या सर्वोच्च सन्मानित वीराचा मुलगा सोनम वांगचुक जो शिक्षणासाठी, पर्यावरण सुधारासाठी लढला, जो स्वतःच्या लोकांसाठी उपोषणाला बसला; त्याला देशद्रोही ठरवलं जातं आहे.
किती विचित्र विडंबना!
ज्या वडिलांनी चीनच्या अणुबॉम्बवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतःचा जीव हातावर धरला, त्याच्याच मुलावर आज ‘चीन समर्थक’ असल्याचा संशय घेतला जातोय. ज्यांना वडिलांना पद्मश्री मिळाली; त्याच्या मुलाला देशद्रोहाची शिक्कामोर्तब मिळतंय. ज्या वडिलांच्या उपोषणाला इंदिराजींनी स्वतःच्या संवेदनशीलतेनं तोड दिलं; त्याच मुलाच्या उपोषणाला नरेंद्रजी सरकार पोलिसी बंदोबस्त आणि टीव्ही प्रचारयंत्रणेतून तोडत आहे.
ही फक्त सोनम वांगचुकची कहाणी नाही. ही त्या सत्तेची प्रतिमा आहे जी संवादावर नाही तर दडपशाहीवर उभी आहे. जी प्रश्न विचारणाऱ्याला शत्रू मानते. जी देशभक्तीच्या वारशालाही देशद्रोहाच्या फाइलमध्ये ढकलून देते.
हा नवा भारत आहे, जिथं देशाच्या सर्वात उंच शिखरावर तिरंगा फडकवणाऱ्या वीराचा मुलगा, लोकशाहीच्या जमिनीवर उभाही राहू शकत नाही…
हिन्दी लेखक :श्रीदिलीप मिश्रा
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈