सुश्री नीलांबरी शिर्के
मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पहावा.. बहावा — विषय एकच.. चित्रे तीन.. काव्ये तीन १. सुवर्णधुंद — विभावरी कुलकर्णी २. लावण्यशोभा — डॉ. ज्योती गोडबोले ३. बहावा फुलला — डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆
चित्रकाव्य
पहावा.. बहावा — विषय एकच.. चित्रे तीन.. काव्ये तीन १. सुवर्णधुंद — विभावरी कुलकर्णी २. लावण्यशोभा — डॉ. ज्योती गोडबोले ३. बहावा फुलला — डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆
☆
विभावरी कुलकर्णी
(१ )
☆ सुवर्णधुंद… ☆
रात्रीच्या गर्द अंधारात,
नक्षत्रांचे लेणे ल्याला,
अमलतास हा सुवर्णतेजाने,
बघा कसा न्हाऊन निघाला…
*
काळ्याभोर नभाच्या खाली,
पिवळ्याधमक फुलांचे झुंबर,
गच्च दाटला पिवळा रंग हा,
जणू धरतीवर उतरले अंबर…
*
कोवळी मोहक सुवर्ण वर्षा,
मनास देई अनोखी साद,
स्तब्ध शांत या निशेमध्ये,
जागृत झाला हा उन्माद…
*
पानगळीच्या शुष्क फांदीवर,
फुलांचे हे वैभव ल्यावे,
माणसानेही आयुष्यात असेच,
कष्टातून ‘सुवर्ण’ होऊन फुलावे…
☆
© विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
☆☆☆☆
डॉ. ज्योती गोडबोले
(२)
☆ लावण्यशोभा… ☆
☆
पिवळा जर्द तरु असा बहरला, सौंदर्य त्याचे पहा
गालिचा जणु अंथरून बघतो, लावण्यशोभा अहा…
*
भंडारा उधळीत येई जणु तो, मल्हारि भेटी जसा
सृष्टीला बहु हर्ष होई करुनि, शृंगार सारा असा…
*
टपटप वर्षत ही फुले चिमुकली, बहरून येतो जरी
अल्पायुष्य मिळे तया तरिही तो, चिंता कधी ना करी…
☆
© डॉ. ज्योती गोडबोले
☆☆☆☆
डाॅ. मधुवंती कुलकर्णी
(३)
☆ बहावा फुलला… ☆
☆
ग्रीष्माचा तो चटका पाहून
असह्य झाली अवघी धरती
थेंब टपोरे येतिल कधी ते
वाटे आशा उगाच झुरती
*
थोडी हिरवळ पाहून नेत्री
तरंग उठती अवघ्या गात्री
गार सावल्या शोधत आल्या
तरूतळी पण उदास धात्री
*
एके दिवशी उजाडताना
पक्षी करती किलबिलाट मग
उघडताच लोचने पृथेने
दिसते सुंदर पीतवर्ण जग
*
कोण उमलले आकाशी या
तरूही गाती आनंदाने
घुंगुर काठी वाजत कैसी
वाऱ्याची का शीळ खुशीने
*
अचंबित ती होता ऐसी
सुगंध वहातो फुलाफुलांतुनि
फुलत “बहावा “सांगत येई
पाऊस नाचे मृद्गंधांतुनि
(असं म्हणतात की बहावे फुलले की महिन्याभरात पाऊसकाळ येतो.)
☆
© डॉ. मधुवती कुलकर्णी
बेंगलोर
दूरध्वनी ९४०३००६४३६.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अस्सा संसार सुखाचा बाई.. + संपादकीय निवेदन – राधिका भांडारकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆
सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
राधिका भांडारकर
💐 अ भि नं द न 💐
साहित्य संवेदना प्रस्तुत ‘कवितेचे पान’ या साहित्यिक उपक्रमांतर्गत कवयित्री राधिका भांडारकर यांची अस्सा संसार सुखाचा बाई ही कविता सर्वोत्कृष्ट काव्यरचना म्हणून निवडण्यात आली आहे.
राधिका भांडारकर या आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका आहेत. त्यांचे ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन!
आपली लेखणी अशीच साहित्याचे अर्थपूर्ण विश्व समृद्ध करत राहो, हीच सदिच्छा व शुभेच्छा ❄️❄️
💐 हार्दिक अभिनंदन! 💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
पुरस्कार प्राप्त काव्य
कवितेचा उत्सव
☆ अस्सा संसार सुखाचा बाई… ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
☆
माझा डाव मजेत मी खेळेन
पिसून आलेले पत्ते नीट लावेन…
कशाला ढुंकावे शेजरच्या डावात
असेनाका तिथे एक्क्यांची खैरात..
दोघांनी पाळावे हेच सूत्र जीवनी
नाते प्रेमाचे जपावे असे मनोमनी..
तुझे माझे कोण्या कारणे करावे
तुझ्यात माझ्यात अहं भेद नसावे…
होतील ही मतभेद नि भांडणे
मनी असू द्यावे सुखाचे नांदणे..
बंधने कधी नसावीत लादलेली
असावीत ती स्वानंदे पेललेली..
स्वातंत्र्य अभिव्यक्ती सदा जपावी
सुखाची हीच गुरुकिल्ली मानावी..
‘मीच का?’ प्रश्न दोघात न यावा
संसार दोघांचा सावरून घ्यावा..
एकमेकांचा सन्मान हाच महत्त्वाचा
विरोधातही आदर व्हावा विचारांचा..
नाते इतके लवचिक असावे
प्रेमातले काटेही कधी न बोचावे…
नाही जिथे संशय उथळ आततायी
असा संसार होईल सुखाचा बाई..
☆
© राधिका भांडारकर
वाकड, पुणे
मो.९४२१५२३६६९
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “भक्ती…” ☆ मंजुषा सुनीत मुळे☆
मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “भक्ती…” ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆
*
निळे नि सावळे.. दाटले आभाळ
त्यावर बगळ्यांची.. डुले ही माळ…
*
चांदणी एकली.. हळू उजळे
जणू देव्हाऱ्यात.. दीप पाजळे…
*
अवचित मातीचा.. गंध दरवळे
पूजेसी जाहले.. सज्ज हे सगळे…
*
राहिली आता.. नैवेद्य वाटी
भावभक्ती फक्त.. पुरे त्यासाठी…
*
प्रकटे मेघात.. कृष्ण सावळा
विठू सावळा.. की राम सावळा…
*
मनी जरी रूप.. वेगवेगळे
परब्रह्म नभी.. एकवटले…
*
सावळे गोजिरे.. रूप साजिरे
होई प्रसन्न नि.. कृपा पाझरे…
*
चिंब भिजावे.. भक्तांनी त्यात
जपावी भक्ती ती.. नित्य मनात…
☆
© मंजुषा सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २९३ – श्री नृसिंह स्तवन…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # २९३ – विजय साहित्य
☆ श्री नृसिंह स्तवन ☆
(स्वरचित स्तवन)
☆
जळी, स्थळी, काष्ठी, सदा देव राही.
कुठे देव तुझा, विचारोनी पाही.
प्रल्हाद भक्तांसी, बहू गांजवीले
परी नारसिंहे, पहा वाचवीले. १
*
छळी लेकराला, अहंकारी तात
तिथे धाव घेई, करण्यासी मात
करी त्राही त्राही, स्तंभी लाथ मारी.
तिथे प्रगटला, हा उग्रावतारी. २
*
सहाय्यासी आले, हरीरुप नामी
वनराज अर्धे, नरसिंह धामी.
असे पीत केशी, बलदंड काया
पीळदार बाहू, खदिरांग छाया. ३
*
विरंची प्रसादे, दैत्य मातलेला
तयाचेच पोटी, भक्त गांजलेला
अन्याय जुलूमी, साही सान थोर
हिरण्यकश्यपू, करी जाच घोर. ४
*
अक्राळ विक्राळ, प्रकटे अरूपी
शार्दूल विक्राल, नरसिंह रुपी
दिवसाही नाही, न आलासे रात्री
पहा धावतो हा, नरसिंह गात्री. ५
*
पशू नृप ऐसा, जणू काल भासे
मूर्त अग्नी ज्वाला, अकस्मात श्वासे
नखाग्रे जयाची, करी दिव्य शस्त्रे
आला सांज काली, परजीत अस्त्रे. ६
*
तैलात रक्षेत, जलात रक्षेत
रक्षेत हरी हा, पुरवीत हेत
मही मातलेला, पहाण्यासीआला
प्रल्हाद रक्षणी, अवतार झाला. ७
*
तिन्ही लोकी गर्जे, गर्जना जयाची
कंपीत धरणी, धारणा भयाची
जया गांजवीले, तया तारण्याला
पहा सिंह आला, रिपू मारण्याला. ८
*
पहा उंबऱ्याते, हरी बैसलासे
गर्वांध रिपूला, नखे फाडलेसे
वरदान खासे, पूर्णत्वास नेले
अहंकारी दैत्या, झणी नष्ट केले. ९
*
नमो नारसिंहा, नमो विष्णू रुपा,
अवतार घेशी, विशेषी स्वरुपा.
जसा पावलांसी, दयाळा अनंता
तसा पाव आता, समस्ता दिगंता. १०
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३१३ ☆ आहे तर आहे… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # ३१३
☆ आहे तर आहे… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
तो नाही माझा तरी पण
आकर्षण… आहे तर आहे
ही प्रीती कसली,
खुळा मोहाचा क्षण …आहे तर आहे
गोपाळा आहेस
वेणूच्यानादा मध्ये बुडलेला
मातीची नांगरण करण्या
संकर्षण… आहे तर आहे
येथे नाही राहिले–
कोणावाचूनी कोणाचे रे
आयुष्या, नशिबी अटळशी
ही वणवण.. आहे तर आहे
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मुग्ध बालिका… ☆ ज्योती कुळकर्णी ☆
ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ मुग्ध बालिका… ☆ ज्योती कुळकर्णी ☆
☆
साठ अन अधिक पाच तरुण का वयमान असे?
वासनांध तू तुझ्यात शिरला हैवान असे
*
दूध दातही पडले नव्हते अशी बालिका
किती कोडगा! मुग्ध कोवळी खुडली कलिका
*
तू कोणाचा बाप भाउही नाही का रे!
तिच्यात तुजला नात भासली नाही का रे!
*
हलकट पाजी नीच शब्दही अपुरे पडती
जंगलातले पशू याहुनी बरे वाटती
*
फाशीही तुज पडेल शिक्षा कमीच आता
माणुसकीचे श्राद्ध घातले मारत बाता
☆
© ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्द-प्रारब्ध… ☆ श्रीशैल चौगुले ☆
श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ शब्द-प्रारब्ध... ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
घाव जिव्हारी लागतील तेंव्हा
काळजातले ते फक्त शब्द दे
आसवांची शाई करुन तेंव्हा
कवितेस तुझेच प्रारब्ध दे.
मिटतील शंका आयुष्यातील
सौंदर्य भावनांनाही शब्द दे
स्पंदनात उमटतील आठव
थांबणार्या लेखणीस प्रारब्ध दे.
दुःख कधी नसतेच ते कसले
अक्षरांना झेलण्या पुन्हा शब्द दे
असावे-नसावे नाते जन्मातले
गझलेत सामावते प्रारब्ध दे.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वाढलेला मुक्काम – चित्र एक.. काव्ये दोन श्री प्रमोद वामन वर्तक आणि सुश्री नीलांबरी शिर्के ☆
चित्रकाव्य
(१) बुद्धीला ताळमेळ नाही… (२) निरक्षर चोर ? (३) माया पुस्तकांची… >> चित्र एक.. काव्ये तीन
श्री आशिष बिवलकर, श्री प्रमोद वामन वर्तक आणि सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
श्री आशिष बिवलकर
(१ )
☆ बुद्धीला ताळमेळ नाही… ☆
*
दारूचा ट्रक उलटला,
लुटायला उडते झुंबड |
पुस्तकांचा ट्रक उलटला,
बघाया कुणा नाही सवड |
*
विश्वगुरु म्हणून पूर्वजांनी,
जपली ज्ञानाची ग्रंथसंपदा |
बख्तियार खिल्जीने जाळले,
सहा महिने जळत होते नालंदा |
*
पुस्तकं ग्रंथ वाचायला,
कोणाकडे आता वेळ नाही |
रद्दी म्हणून बघायचीच दृष्टी,
बुद्धीला आता ताळमेळ नाही |
*
कपाटात अडगळीत स्थान,
हीच मोठी शोकांतिका आज |
वागावे कसे, घडावे कसे,
कशाचीही ना उरलीय लाज |
*
‘वाचाल तर वाचाल,’
या उक्तीला ना उरला अर्थ |
घड्याळाच्या काट्यावर सारं,
जीवन होतं चाललय व्यर्थ |
☆
कवी : श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मोबाईल – 9518942105
☆☆☆☆
श्री प्रमोद वामन वर्तक
(२)
☆ निरक्षर चोर ? ☆
*
नवे नाहीत अपघात
आपल्या सगळ्यांना
पण या अपघाताचा
वेगळाच पहा नमुना
*
धन शब्द साहित्याचे
सारे विखरे रस्त्यावर
लुटण्या अक्षरांची पुंजी
आला नाही कोणी चोर
*
अपघातग्रस्त ट्रकात
असती जर कां वारुणी
समस्त लोकांच्या उड्या
पडल्या असत्या झणी
*
आता तरी मान्य करा
वाचन संस्कृती लोपली
“हातातल्या जादूगाराने”
पुस्तकांवर मात केली
पुस्तकांवर मात केली
☆
© श्री प्रमोद वामन वर्तक
मानपाडा, ठाणे (प.) ४००६१०
मो – ९८९२५६१०८६
☆☆☆☆
वर्षा बालगोपाल
(३)
☆ माया पुस्तकांची… ☆
*
सरिता पुस्तकांची व्याकुळ झाली
मुलांना भेटण्या रस्त्यावर आली
मुलांची ममता का आटून गेली
नजर पडूनही कीव न आली ||
*
शिकवले घडविले ज्या मातेने
उच्च पदी गेला तुम्ही ज्या वाटेने
त्या मातेची, वाटेची, साद ना ऐकली
नजर पडूनही कीव न आली ||
*
एका आठवास हृदयी धरावे
एका आठवास उचलोनी घ्यावे
ईच्छा ही साधीच तुला न कळली
नजर पडूनही कीव न आली ||
*
आपला न कोणी नुरला का त्राता
पोरकी नदी बोलकी झाली आता
उरफाटी जनरीत नुरे वाली
नजर पडूनही कीव न आली ||
*
नका करू चिंता माझ्या लेकरांनो
गाडले जाऊ असे ऐका बांधवांनो
जरी आज तुम्ही कीव नाही केली
वन पुस्तकांचे देईल सावली ||
☆
© वर्षा बालगोपाल
मो 8830084184
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जो उठतो तो… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ जो उठतो तो… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
जो उठतो तो म्हणतो सावर
ज्याचे त्याचे वाळूचे घर
*
पाणवठ्यावर जातो येतो
नाही भरली अर्धी घागर
*
मनकवडा ही नाही ठरला
होता फसला तो हसण्यावर
*
तरल्या नावा पाण्यावर ती
वादळ वारा सरल्या नंतर
*
अंदाजाने पुरता डुबला
नजरे मधले चुकले अंतर
*
फसवाफसवी करणारांची
भाषा असते अतिशय सुंदर
*
धंदा होतो छान खरोखर
हाताखाली नसता नोकर
*
अपयश केव्हा आले जर तर
दैवा वरती फोडू खापर
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






















