मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पिक्चर रस्त्यावरचा…अनामिक ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ पिक्चर रस्त्यावरचा…अनामिक ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

आमच्या मित्राने रस्त्यावरच्या पिक्चरच्या पडद्याचा फोटो टाकला आणि मन जवळ जवळ 40 वर्षं मागे भूतकाळात गेलं. असंख्य आठवणींचा कल्लोळ  झाला. साले काय दिवस होते. माझे जे अनुभव आहेत, तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील!  त्यांच्यासाठी खास हा लेख.

आमच्या लहानपणी  तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणपती उत्सव व नवरात्रोत्सव  हे रस्त्यावरच्या पांढऱ्या पडद्यावर  बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नसत. मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो त्याच्या. त्याकाळी रात्री रस्त्यावर किंवा मैदानात  बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत. मुख्य म्हणजे फुकट असायचे. खर्च मंडळातर्फे केला जायचा. दिवसा सायकलवर  फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे, फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे. आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या. मग तारीख लक्षात ठेऊन जायचो. कधी विसरलो की हळहळ वाटायची. एकाच दिवशी दोन तीन ठिकाणी पूजा असली, तर मग चांगला सिनेमा जिथे असेल तिथे जायचे. तो संपला की दुसरीकडे जायच। तिकडे जेवढा मिळेल तेवढा बघायचा. गणपतीमधे 10 दिवस रोज सिनेमा असायचा. सिनेमा बघतांना मधेच पाऊस यायचा. मग आडोशाला पळायचं. प्रोजेक्टर वर छत्री नाहीतर ताडपत्री धरली जायची. त्याकाळी गणपतीत फार पाऊस असायचा. पण एखादी सर आली की थांबायचा. सत्यनारायणाच्या पूजा असतील तिथे जायचे. 

आम्ही कुठे कुठे जायचो, कसेही कुठेही बसायचो, रस्त्यावर बसायचो गोणपाट घेऊन, नाहीतर टॉवेल टाकून. अगदीच काही मिळालं नाही तर वर्तमानपत्र टाकून. किंवा नुसतेच डायरेक्ट रस्त्यावर बसायचो! त्यामध्ये कधीही लाज किंवा कमीपणा वाटला नाही आणि कोणी वाटून घेतला नाही. घरच्यांनीही कधी विरोध केला नाही.

प्रोजेक्टरचा सिनेमा बघणे ही खूप मजेशीर गोष्ट असायची! गंमत म्हणजे पडद्याच्या  एका  बाजूला लेडीज बसायच्या. तिथेच नेहमी प्रोजेक्टर असायचा आणि सगळे  जेन्टस नेहमी अपोझिट साईडला!  त्यामुळे सगळे उलटे दिसायचे, हिरोईनची साडी गुजराथी पद्धतीने नेसल्यासारखी वाटायची. सगळ्या ऍक्शन उलट्या दिसायच्या, फायटिंग उलट्या हाताची बघायची. हे सगळं नको असेल, तर बायकांच्या साईडला सर्वात शेवटी उभं राहून बघायचं. नाहीतर कडेला रेतीवर नाही तर खडीवर बसून बघावं लागायचं. ती खडी खाली टोचायची. जेवढं लांब बसू, तेवढा सिनेमा छोटा दिसायचा. म्हणून पुढे बसायचं सिनेमा बघतांना भरपूर डास चावायचे, मुंग्या चावायच्या. तरी सुद्धा नेटानं बसायचं. प्रोजेक्टर वाल्याची बडदास्त ठेवावी लागायची. त्याला चहा नाष्टा असायचा. मंडळाचे पदाधिकारी आणि पाहुणे यांच्यासाठी खुर्च्या मांडायच्या. त्यांना  टेबल फॅन असायचा. त्यांचा खूप हेवा वाटायचा!

त्यावेळी सिनेमा चालू असतांना कधी प्रोजेक्टर खराब व्हायचा तर कधी लाईट जायचे.  मग बोंबाबोंब. मधेच उंदीर किंवा घूस घुसायची, नाहीतर कुत्रे घुसायचे. मग नुसती पळापळ. स्थानिक पोरांच्या मारामाऱ्या व्हायच्या.आजूबाजूचे लाईट बंद करायला लागायचे. पिक्चर स्टार्ट करतांना रीळ लावल्यावर 6/5/4/3/2/1असे आकडे स्क्रीनवर यायचे. तेव्हा ते आकडे मोजत ओरडायचो. एक रीळ संपलं की दुसरं लावायचं… काही वेळा पिक्चरचा आवाज आणि चित्र यांचा मेळ जमत नसे. तेव्हा विचित्रच वाटायचं  ऍक्शन आधी आणि आवाज नंतर! तरी तसाच सिनेमा बघायचो.  

सिनेमांत चांगल्या डायलॉगला, फायटिंगला, गाण्याला टाळ्या शिट्ट्या मिळायच्या! मग परत रिवाइंड करून वन्स मोअर! इन्कार सिनेमातील मुंगळा गाण्याला तर तीन चार वन्स मोअर मिळायचे. तेवढ्या वेळा रिवाइंड. पडद्यावर लव्ह सीन आला की पोर बोंब मारीत … सोड सोड म्हणून ओरडत!!

केश्तो, असित सेन, मेहमूद, असरानी, जगदीप, राजेंद्रनाथ, यांच्या कॉमेडीला जाम दाद मिळायची. गाण्यावर लोक रस्त्यात नाचायचे. शम्मी, देव,  ऋषीं, अमिताभ, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांच्या पिक्चरला खूप गर्दी व्हायची. सगळे डायलॉग पाठ असायचे लोकांचे. शोले, जंजीर, दीवार, रोटी कपडा और मकान, ज्वेलथीफ, जंगली, अदालत, दामाद, चितचोर, जॉनी मेरा नाम, तिसरी मंझिल, वो कौन थी, कालीचरण — किती नांवं घेऊ! हे सिनेमे थिएटरमध्ये एक-दोनदा आणि रस्त्यावर  असंख्य वेळा बघितले!

मराठी पिक्चर ब्लॅक व्हाईट असायचे. दामुअण्णा, शरद तळवलकर, राजा गोसावी, निळू फुले, सूर्यकांत, रमेश देव, अशोक सराफ, दादा कोंडके, रवींद्र महाजनी, सीमा, चित्रा, रेखा, जयश्री गडकर, रंजना, उमा  यांचे पिक्चर असायचे. सासुरवाशीण सिनेमा बघतांना ललिता पवार आणि निळू फुले यांना बायका चक्क शिव्या द्यायच्या. त्यावेळी ती दोघं तिथे आली असती तर त्यांनी नक्कीच मार खाल्ला असता, अशी परिस्थिती असायची.

आठवणीत रमायला झाले की मन उचंबळून येते डोळे पाणावतात. कितीतरी सिनेमे बघितलेले आठवतात.

गेले ते दिन गेले — !!

रस्त्यावर बघितलेल्या पिक्चरची मजा आता मल्टिप्लेक्सला शेकडो रुपये मोजून पण येणार नाही. आणि खिशातून पांच पैशाचे चणे दाणे खाण्याची चव फ्रेंच फ्राईजला, बर्गर आणि पॉप कॉर्नला सुद्धा येणार नाही.आताच्या मुलांना ही मजा अनुभवायला कधीच मिळणार नाही.

गेले ते दिवस. राहिल्या फक्त आठवणी !!

लेखक – अनामिक

संग्राहक – सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वप्न पिंपळ… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ स्वप्न पिंपळ… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

पिंपळा !

पानगळीच्या रुपानं 

तुला वरदान लाभलंय 

न पुरी होऊ शकणारी स्वप्नं 

आपोआप गळून पडण्याचं  

आणि —

काही काळानं 

पुनः नव्या असोशीनं 

स्वप्नांचं मातृत्व ल्यायण्याचं 

पण —

या तुझ्या लेकराचं काय.. 

उभ्या आयुष्यात एखादाच बहर  

अखेरचीच पानगळ .. 

त्यामुळे .. 

मी वृद्ध होण्याआधी 

माझी स्वप्नं पूर्ण कर .. 

नाहीतर .. 

नाहीतर इतक्या सगळ्या 

स्वप्नांना पुरुन उरणारं 

वृद्धत्व कुठून आणू मी ——— 

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पुरुषमाणूस आणि बाईमाणूस… ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ पुरुषमाणूस आणि बाईमाणूस… ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

ज्या घरात बाई नाही त्या घरातला पुरुष म्हणतो, “घरात कोणी बाईमाणूस नसेल तर घराला घरपण येत नाही!

एखादं अवघड काम नाईलाजाने अंगावर घेतांना, घरातली एकटीच बाई म्हणते, “निपटायचं कसं हो सगळं? घरात कोणी पुरुषमाणूसच नाही ना!

ज्या घरांत नवरा-बायकोचा संसार गुण्यागोविंदाने चालू आहे त्या घरातलं बाईमाणूस आणि पुरुषमाणूस असं दोघेही म्हणतात की , वर्षातून निदान पंधरा-वीस दिवस तरी कुठे तरी एकटंच जाऊन रहावं!

ज्या घरांत नवरा-बायकोचा संसार तसा गुण्यागोविंदाने चालू नसतो त्या घरातलं पुरुषमाणूस विचार करत असतं की, घरांतलं बाईमाणूस निदान महिन्याभरासाठी माहेरी कां जात नाही?

तर बाईमाणूस विचार करत असतं की, “हल्ली घरातल्या या पुरुषमाणसाला पूर्वीसारखं ऑफिसच्या कामासाठी आठ-दहा दिवससुद्धा बाहेरगांवी कां बरं जायला लागत नाही?

माणूसप्राणी हा असाच आहे. रोजच्या कामांपासून, – अगदी आवडत्या कामांपासून, माणसांपासून सुद्धा – त्याला चार क्षण विरंगुळा हवा असतो. पण अनेकदा तसे क्षण येतच नाहीत. आणि तो चेहेर्‍यावर न दाखवता मनांतून काहीसा निराशच होतो.

पण आश्चर्याची गोष्ट अशी – घरातला संसार गुण्यागोविंदाने चालू असो किंवा नसो, विरंगुळ्याचे क्षण लाभलेले असोत किंवा नसोत, एक माणूस हरपला की दुसरा माणूस कोसळतो ! बधिर होतो ! भुतासारखा जगतो! खरं तर आता सारे क्षण विरंगुळ्याचे असायला हवेत !   पण तसं होत नाही. आता प्रत्येक क्षण भकास असतो ! माणूस हे खरोखरच न सुटलेलं अवघड कोडं आहे !

अखेर हे माणसांचं जग आहे. प्रत्येक माणूस आपली आपली भूमिका जगत असतो. त्यातून कोणाचीही सुटका नाही!!!

मग ‘बाईमाणूस’ काय आणि ‘पुरुषमाणूस’ काय !!

© सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आपण आपली आई… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

परिचय

शिक्षण – BAMS PGDPC

खाजगी वैद्यकीय व्यवसाय व मानसशास्त्रीय समुपदेशक

छंद – वाचन, लिखाण, समतेचा विचार मांडणं, आनंदी जगण्यासाठी करिअर व सहजीवन समुपदेशन

 ? मनमंजुषेतून ?

☆ आपण आपली आई… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

सगळे म्हणत होते तेव्हा

खूप जणांचे फोनही आले..

प्रत्यक्ष भेटून हेच बोलले

मेसेजवर मेसेज मिळाले

आम्ही आई आहोत तुझी

आम्ही आई होऊ तुझी

आई गेली तेव्हा…!

आपल्यालाही खरं वाटू लागतं

आपणही विश्वासून जातो.

प्रत्येक माणसातल्या आईपणावर..!

काही दिवसांनी कळून चुकतं ..

आई माणूस असते पण.. 

माणसं, माणूस होऊ शकतील

पण कुणाची आई होता येईल 

इतकं शक्य आई होणं नसतंच मुळी..!

एवढं अथांग, खोल प्रेम.. 

इतका जिव्हाळा, इतकी काळजी,

इतकं जीवापाड जपणं

सर्वस्व पणाला लावून पिल्लांना वाढवणं

स्वतः  विस्कटली तरी मुलांच जगणं उभं करणं

त्याग समर्पणात आनंदी होणं…!

एखाद्या प्रति कसं शक्य होईल..!

आई ही एकमेवाद्वितीयच..!

केवळ आपली आणि आपलीच..!

या अलौकिक नात्याला पर्याय नसतो..!l

आॕक्सीजनशिवाय गुदमरणं होईल, अगदी तसं..

 

मग ठरवलं—-

 

आपल्यातल्या आईला आपल्यासाठी साद घालायची..!l

आपणच आपली आई व्हायचं..!

स्वतःच्याच केसातून, गालावरुन स्वतः हात फिरवायचा..!

माया माया करत मनातून गोंजारायचं..!

स्वतःच रात्री अंगाई गीत गायचं..!

आपल्याच कुशीत आपण शिरायचं..!

आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलत राहायचं..!

आपणच आपली आई व्हायचं…!—

 

स्वतःवर मनापासून प्रेम करायचं…!

आपणच आपली आई व्हायचं…!

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दे डाय रिच…!!— जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

श्री विनय माधव गोखले

 ? मनमंजुषेतून ?

☆ दे डाय रिच…!!— जयंत विद्वांस ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

(नकुशा मालमत्ता )

एकीकडे तरुण पिढी स्थावर मालमत्तांपासून दूर चालली आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठ अजूनही स्थावर मालमत्तामध्ये मनाने गुंतून पडलेले आहेत. फक्त स्वत:साठीच राहायला घर नव्हे, तर आपल्या मुलांसाठीसुद्धा घरे ज्येष्ठांनी घेऊन ठेवली आहेत. ज्यांची पुढची पिढी महाराष्ट्राच्याही बाहेर नव्हे तर परराष्ट्रात आहे, अशांसाठीसुद्धा पालकांनी आपल्या आयुष्यातील पै-पै जमवून घरे घेतली आहेत. त्यांच्यापुढील पिढय़ांना या घरांमध्ये काडीचाही रस नाही. या मालमत्तांकडे बघण्यासाठी वेळ नाही. पुढची पिढी खूप व्यवहारी आहे.

माझे एक अशील वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी वारले. पत्नीचे आधीच निधन झाले होते. एक मुलगा लंडनमध्ये आणि दुसरा न्यूझीलंडमध्ये रहातो. त्यांचे त्या देशाचे राष्ट्रीयत्व आहे. दोघांनाही वडिलांनी घेतलेल्या घरामध्ये स्वारस्य नव्हते. वडिलांनी इच्छापत्रानुसार सर्व मालमत्ता दोन्ही मुलांत समप्रमाणात देण्याचे लिहून ठेवले होते. मी इच्छापत्रानुसार व्यवस्थापक होतो. दोन्ही मुलांना सर्व मालमत्ता आपल्या नावावर करून घेण्यास, नंतर विकण्यास वेळ नव्हता. दोघांनी माझ्या नावाने कुलमुखत्यार पत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) बनवून दिले. सर्व मालमत्ता विकून येणारे पैसे विशिष्ट खात्यात जमा करून त्यांच्या देशात पाठवण्यास सांगितले. 

ज्येष्ठ नागरिक आपल्या वास्तूंमध्ये भावनात्मकदृष्टय़ा गुंतलेले असतात, तशी तरुण पिढी नसते.

एका क्लाएंटने त्यांच्या निवृत्तीपश्चात राहण्यासाठी कोकणात घर बांधले होते. आई-वडिलांच्या पश्चात त्या मालमत्तेच्या सात/बारा उताऱ्यावर नावे लावण्यास मुलांना वेळ नव्हता. खेडय़ात जाऊन सरकारी अधिकाऱ्यांबरोबर कागदपत्रांची पूर्तता करणे कटकटीचे वाटत होते. हे सोपस्कार करून मिळणाऱ्या पशांमध्ये रस नव्हता. कारण त्यांचे उत्पन्न भरपूर होते. म्हणून वडिलांनाच त्यांच्या पश्चात, कोठे आड जागी घर बांधले म्हणून दूषणे देत होते.

आपली पारंपरिक दुसरी गुंतवणूक सोने-नाणे आणि चांदीच्या वस्तूंमध्ये असते. आणि ती सांभाळणे जोखमीचे असल्याने ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली जाते. बँकेत ठेवल्याने त्याचा वापर संपतो आणि लॉकरचे भाडे व लॉकरसाठी द्यावी लागणारी ठेव रक्कम यांनी आपण बँकेला श्रीमंत करत असतो.

आमच्या लहानपणी सोन्याचा भाव अमुक होता. आज तो इतका वाढला, असे आपण म्हणतो. आपण मधली वर्षे मोजत नाही. सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये दीर्घ मुदतीत परतावा फक्त सात टक्के असतो. वस्तू घडणावळ आणि वस्तू मोडताना होणारी घट विचारात घेतल्यास तो अजून कमी होतो. तसेच होणाऱ्या नफ्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो तो वेगळाच.

सोन्या-चांदीतली गुंतवणूक ही खूपदा भावनात्मक जास्त असते. त्याचा व्यावहारिक विचार केला जात नाही.

 मग सोने घेताना शुद्ध सोने घेऊन ठेवण्याऐवजी मुली-सुनांसाठी दागिने किंवा नातवंडांसाठी दागिने या स्वरूपात केली जाते. खूपदा जुन्या पद्धतीचे दागिने नवीन पिढीस आवडत नाहीत. मग ते मोडून नवीन डिझाइनचे बनविले जातात. यात पुन्हा घट आणि घडणावळ जाते. 

आज बाजारांत फेरफटका मारल्यास सर्वात जास्त दुकाने मोबाइलची.  नंतर सोने-चांदी, कपडेलत्ते, ओषधे, खाण्याचे पदार्थ यांची असतात. त्या तुलनेत वाणसामानाची फार कमी असतात. ज्यात नफा प्रचंड ती दुकाने जास्त. स्वाभाविकपणे त्यात ग्राहकाचा फायदा कमीच होणार. 

नवीन पिढी जोखीम नको म्हणून खरे दागिने घालण्यापेक्षा खोटे घालणे पसंत करते. शेवटी खोटे जास्तच चकाकते. 

सोन्याची मागणी चीन आणि भारत देशात सर्वात जास्त आहे. इतर देशांत सोने दागिन्यांच्या स्वरूपात फार थोडय़ा प्रमाणात खरेदी केले जाते. गुंतवणूक म्हणून इतर देशांत सोने शुद्ध स्वरूपात बाळगले जाते. बाजारातील सोन्याच्या भावातील चढ उतारानुसार त्याची खरेदी-विक्री केली जाते.

गुंतवणुकीच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. जुन्या योजनांचा परतावा पुढील काळात अजून कमी होण्याची शक्यता आहे. तो वेळीच समजून घ्या व पर्यायी गुंतवणूक योजना निवडणे क्रमप्राप्त ठरेल.

तिसरी भावनात्मक गुंतवणूक मुलांचे उच्चशिक्षण.

 मुलांच्या उच्चशिक्षणासाठी आपल्या हौस-मौजेवर काट मारून प्रसंगी कर्ज काढतात. मुलं नोकरीला लागली की ते कर्ज फेडतात. मुलं परदेशात असतील तर हे कर्ज खूपदा आई-वडीलच फेडतात. याच्या पुढे जाऊन काही ज्येष्ठ आपल्या नातवंडांसाठी शिक्षणाची सोय म्हणून आयुर्वमिा पॉलिसी किंवा इतर गुंतवणूक करत असतात.

 असेच एका ज्येष्ठ क्लाएंटला गुंतवणूक करताना विचारले, 

‘‘काका, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढले. आता नातवासाठी गुंतवणूक का करता?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस खूप वाढतोय. तेवढीच नातवाच्या शिक्षणासाठी माझी थोडीशी मदत.’’ 

मी त्यांना म्हटले, ‘‘नातवाच्या शिक्षणासाठी गरज किती रकमेची असेल, याचा अंदाज आहे का? आणि तुमच्या मुलाने नातवाच्या शिक्षणासाठी यापूर्वीच ‘एसआयपी’ गुंतवणूक सुरू केली आहे. ती रक्कम त्याच्या शिक्षणासाठी भरपूर होईल. नातवाच्या नावाने लाखभर रुपये ठेवण्यापेक्षा तुम्ही दोघे चांगल्या पर्यटनाला जाऊन या.’’ 

त्यावर ते म्हणाले, ‘‘ही रक्कम नातवाच्या वाढदिवसाची भेट म्हणून आता तरी गुंतवा. नंतरच्या वेळचे नंतर पाहू.’’

आपली मानसिकता कशी आहे– आपल्याला मुलांकडून पैसे घ्यायला- त्यातसुद्धा लग्न झालेल्या मुलीकडून पैसे घ्यायला कमीपणा वाटतो. पण नातवंडांची सोय पाहणे जबाबदारीचे वाटते.

आयुष्यभर मुलांचा विचार केला आणि म्हातारपणी नातवंडांचा विचार करता.

– आपले आयुर्मान वाढते आहे. आपले खर्च वाढते आहेत. याचा विचार करा. कायम दुसऱ्यांचा विचार करण्यात स्वत:ची हौस-मौज विसरू नका. आयुष्य स्वत:साठी जगा.

 असे म्हणतात की *भारतीय लोक आयुष्यभर गरिबीत (कष्टांत) राहतात आणि पुढल्या पिढीला श्रीमंत करतात.. 

दे डाय रिच!*

— जयंत विद्वांस

(लेखक सेबीद्वारे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सीएफपी पात्रताधारक आहेत.)

संग्राहक : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जिवलग झोपाळा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆जिवलग झोपाळा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

झोपाळ्यावर कधी लिहीन असे वाटले नव्हते मला. लहानपणापासूनचा तो जिवलग मित्रच होता आमचा.

माझ्या माहेरी, खूप मोठा, शिसवी लाकडाचा गुळगुळीत मोठा झोपाळा माजघरात होता.

मोठा वाडा होता आमचा. शाळेतून आलो की दप्तर टाकले की बसलोच झोपाळ्यावर.

खाणे तिथेच.पुस्तके वाचणे तिथेच. माझ्या शाळेतल्या मैत्रिणी झोपाळ्यावर बसायलाच माझ्या घरी यायच्या.

माझी आजी फार हौशी. तिने छान गादी करून घेतली होती झोपाळ्याच्या मापाची.

मग तर मी रात्री झोपाळ्यावरच झोपू लागले. पायाने झोका घेत, अशी सुंदर झोप लागायची.

आजी आणि आई, दुपारची कामे झाली की टेकायच्या झोपाळ्यावर. मग त्यांचे दुपारचे निवडणे, टिपणे, शिवणे सगळे काही झोपाळ्यावरच.

माझ्या वडिलांना भारी हौस होती सगळ्या गोष्टींची. त्यांनी झोपाळ्याला चकचकीत पितळी कड्या बसवून घेतल्या होत्या. ते झोका फक्त अगदी हळू,फक्त मागे पुढे करत. आमच्या सारखा जोरात, आढ्याला पाय टेकतील असा झोका त्यांना आवडत नसे. आम्ही काय त्यांना दाद देणार.

ते गेले की चढाओढीने जोरात झोके घेत असूच. आमच्या गल्लीतली सगळी मुलं, मुली आमच्या घरी संध्याकाळी येत.

आमची खूप भांडणेही होत, झोपाळ्यावर बसण्यासाठी. तो बिचारा तरी एका वेळी किती मुलांना बसवणार ना.

मग आजी म्हणायची, ”अरे, भांडू नका– थोड्या थोड्या वेळाने सगळे बसा हं.”

ती भांडणे मिटायचीही लगेच. मग आजी सगळ्यांना छान खाऊ द्यायची.अजूनही मैत्रीण भेटली की विचारते,

“अग  तुमचा झोपाळा आहे का ग अजून.काय भांडायचो ना आपण.”

 मला आठवते, मराठीच्या पुस्तकातल्या कविता, झोपाळ्यावर बसून,जोरजोरात ओरडून म्हटल्यामुळे लगेच पाठ होत.

माझे मामे भाऊ उल्हास उदय पण, केवळ झोपाळा आवडतो म्हणून  आमच्याकडे राहायला येत.

असेच दिवस मजेत जात होते. मी मग मेडिकल कॉलेजला गेले. तिथला अतिशय मोठा,  आणि न संपणारा

अभ्यासही  मी झोपाळ्यावर बसूनच केला. मला आठवते, दुसऱ्या दिवशी आमची viva असली की रात्र रात्र जागून मी झोपाळ्यावरच वाचत असायची.वडील मला चहा करून देत  आणि मायेने म्हणत,” अग झोप जरा. होईल परीक्षा छान तुझी.’ माझ्या पोटात त्या व्हायवा चा मोठा गोळा आलेला असे. आई म्हणायची,”अग  मस्त देशील बघ तुझी ओरल।झोप जरा.”

बघता बघता मी डॉक्टर झाले. सासरही माझं फार सुंदर होतं. खूप मोठी टेरेस होती त्या घराला–प्रशस्त ,ऐसपैस.

माझ्या वडिलांनी  मला हौसेने, त्या गच्चीत, मोठा झोपाळा बसवून दिला. मला तर ब्रम्हानंद झाला.

 माझी तान्ही मुलगी रात्री जागायची.तिला घेऊन मी कितीतरी रात्री झोपाळ्यावर काढल्या आहेत.

तीही त्या संथ लयीत लगेच झोपून जायची.

माझे हॉस्पिटल सुरू झाले. एखादी खूप अवघड  प्रसूती करून आले की  रात्री अपरात्री सुद्धा मी  झोपाळ्यावर  बसून चहा घेऊन तो शीण घालवत असे.

माझ्या धाकट्या मुलीलाही असेच झोपळ्याचे वेड होते. शाळेतून आली की मला शोधत ती गच्चीवरच येई.

मग तिच्या लहान विश्वातली सगळी गुपिते, रुसवे-फुगवे, झोपाळ्यावर बसून मला  सांगितल्याशिवाय  तिला चैन नाही पडायचे. मोठ्या लेकीला नाही फारसा आवडायचा झोपाळा. पण तरी तीही,समोर खुर्ची घेऊन बसायची मी मात्र झोपाळ्यावरच. डॉक्टर नवराही घरी आला की समोर बसून कॉफी पीत, आम्ही इतक्या गप्पा मारत असू की  बस. तोच एक निवांत वेळ असे आम्हाला आमच्यासाठी असा.

मग माझ्या बहिणीही यायच्या लाडक्या भाचीशी खेळायला. ताई हॉस्पिटलमध्ये असली तरी भाची आनंदाने लाडक्या मावश्याबरोबर खेळत असे. त्याही तिला घेऊन गाणी म्हणत बसत झोपाळ्यावर.

_दिवस भराभर पुढे गेले.आम्ही गावाबाहेर बंगला बांधला. मी टेरेसवर छान झोपाळा बसवून घेतला.

मुलीही लग्न होऊन परदेशात गेल्या. माझ्या बहिणींचीही लग्ने झाली. सुदैवाने त्यांनाही मोठी घरे मिळाली.

हौसेने  प्रत्येकीने आपापल्या घरी झोपाळा बांधलाच.

अजूनही आम्ही एकमेकींकडे गेलो की म्हणतो, झोपाळ्यावर बसूया ग बाई. त्याशिवाय गप्पाना रंगत येत नाही.

 माझी झोपाळा वेडी मुलगी  अमेरिकेला गेली. त्यांनी स्वतः चे  छान मोठे घर बांधले. खूप मोठे बॅकयार्ड आहे तिचे.

तिने  खूप छान झोपाळा घेतला तिथे. मी तिकडे गेल्यावर बघितला. मला अतिशय आनंद झाला.

तिची लहान मुलगी आणि मी, तासनतास झोपाळ्यावर बसून गोष्टी  ऐकत असू. आजी,गोष्ट सांग ना मला मराठी, असे म्हणत ती मला झोपाळ्यावरच घेऊन जायची. वंशपरंपरा झोपाळ्याचे वेड तिच्यातही उतरलेय.

परवाच मी आमच्या पूर्वी राहत होतो त्या लक्ष्मी रोडवर गेले होते. तिथे मैत्रीण भेटली. म्हणाली ,” आहे का ग अजून तो झोपाळा तुमचा ?”

म्हटले, ” नाही ग हेमा, वडिलांनी वाडा विकला ना आमचा,झाली की ग वीस वर्षे. पण आम्ही मात्र झोपाळा बांधलाच आहे आमच्या घरात. वडिलांचा झोपाळा धाकट्या बहिणीने फार्म हाऊस वर नेला. खूप मोठे फार्म  हाऊस आहे तिचे. तिकडे तो रुबाबात अजूनही झुलतोय. आमच्या आई वडिलांची माया आम्हाला देत.”

हेमाच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाली,” निदान  तुमच्या झोपाळ्याला भेटायला तरी स्वातीच्या फार्म हाऊसला आलेच पाहिजे.”

 आम्ही तिघी बहिणी स्वातीच्या फार्म हाऊसवर आवर्जून जातो.आणि झोपाळ्यावर बसूनच चहा,जेवणही तिथेच घेतो. आमचे अतिशय गोड सज्जन मेहुणे आम्हाला बसल्या जागी चहा कॉफी पुरवतात.

आम्हा बहिणींचे झोपाळा वेड सर्वानाच माहीत आहे आता.

—-झोका घेताना,असा भास  होतो की समोर आमचे आईकाका बसलेत आणि त्यांच्या सुखी असलेल्या लेकींकडे कौतुकाने डोळे भरून बघत आहेत.—–

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पदर, मदर आणि सदरा… ☆ योगिया ☆

? मनमंजुषेतून ?

☆ पदर, मदर आणि सदरा… ☆ योगिया ☆

(मातृ दिवस निमित्तची कविता)

आई वेगळी आणि आईचा पदर वेगळा.

खरं तर आईची ओळख झाली आणि

मग नऊ महिन्यांनी पदराची ओळख झाली.

पाजताना तिनं पदर माझ्यावरून झाकला

आणि मी आश्वस्त झालो

तेव्हा पासून तो खूप जवळचा वाटू लागला…

आणि मग तो भेटतच राहिला…आयुष्यभर…

 

शाळेच्या पहिल्या दिवशी तो रुमाल झाला

उन्ह्याळात कधी तो टोपी झाला

पावसात भिजून आल्यावर तो टॉवेल झाला

खावून घाईत खेळायला पळताना तो नँप्कीन झाला

प्रवासात तो कधी शाल झाला…

बाजारात भर गर्दीत कधी आई दिसायची नाही

पण पदराच टोक धरून मी बिनधास्त चालत राहायचो…

त्या गर्दीत तो माझा दीपस्तंभ झाला

गरम दूध ओतताना तो चिमटा झाला

उन्हाळयात लाईट गेल्यावर तो फँन झाला

 

निकालाच्या दिवशी तो पदर माझी ढाल व्हायचा

बाबा घरी आल्यावर…चहा पाणी झाल्यावर

तो पदरच प्रस्ताव करायचा….

छोटूचा रिझल्ट लागला…चांगले मार्क पडले आहेत

एक-दोन विषयात कमी आहेत

पण आता अभ्यास करीन अस तो म्हणलाय..

बाबांच्या सुऱ्याची सुरी होताना

मी पदरा आडून पाहायचो

 

हाताच्या मुठीत पदराच टोक घट्ट धरून….

त्या पदरानीच मला शिकवलं

कधी-काय अन कस बोलावं

तरुणपणी पदर जेव्हा बोटाभोवती घट्ट गुंडाळला

त्याची खेच बघून तिसऱ्या वेळी आईने विचारलंच

“कोण आहे तो…नाव काय??”

लाजायलाही मला पदरच  चेहऱ्यापुढे घ्यावा लागला

 

रात्री पार्टी करून आल्यावर…जिन्यात पाऊल वाजताच

दार न वाजवताच… पदरानेच उघडलं दार

कडी भोवती फडकं बनून…कडीचा आवाज दाबून

त्या दबलेल्या आवाजानेच दिली शिकवण नैतिकतेची

 

पदराकडूनच शिकलो सहजता

पदराकडूनच शिकलो सौजन्य

पदराकडूनच शिकलो सात्विकता

पदराकडूनच शिकलो सभ्यता

पदराकडूनच शिकलो सहिष्णुता

पदराकडूनच शिकलो सजगता

काळाच्या ओघात असेल

अनुकरणाच्या सोसात असेल किवा

स्व:ताच्या शोधात असेल

साडी गेली…ड्रेस आला…टाँप आला..पँन्ट आली

स्कर्ट आला…छोटा होत गेला

प्रश्न त्याचा नाहीच आहे…

प्रश्न आहे तो

आक्रसत जावून गायब होवू घातलेल्या पदराचा

खरं तर सदऱ्यालाही फुटायला हवा होता पदर….

– योगिया

(ygokhale@hotmail.com / ९८८१९०२२५२)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घर…! ☆ सुश्री माधुरी परांजपे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ घर…! ☆ सुश्री माधुरी परांजपे ☆

मी घर बांधतो घरासारखं

आणि

हा पक्षी माझ्याच घरात घर बांधतोय त्याच्या मनासारखं

 

मी विचारलं त्याला , “बाबारे, ना तुझ्या नावाचा सात बारा,

न तुझ्या नावाचं मुखत्यार पत्र!”

 

तर म्हणतो कसा,

 

“अरे सोपं असतं का कुणाच्या घरात जागा करणं

आणि कुणाच्या मनात घर करणं”

 

माझं घर तर काड्यांचं आहे.

तुझं घर माडीचं आहे!

 

नात्यांची घट्ट वीण, विणत गेली नाही, तर

माडीचं घरसुद्धा काडीमोलाचं असतं!

 

मला नेहमी वाटायचं माझ्यामुळेच त्या पक्ष्यांचं घर झालं.

आता वाटतंय.

त्याच्यामुळेच माझं विचारांचं प्लास्टर पक्क झालं.

 

आता त्याचा चिवचिवाट माझ्यासाठी पसायदान असते.

तो डोळे झाकून घरट्यात बसला, की

समाधिस्त आणि समृद्ध वाटतो.

 

त्या पक्षाने शिकवलं मला…

 

एका घराची दोन घरं होण्यापेक्षा

घरात घर करुन राहाणं

आणि

दुसऱ्याच्या

मनात घर करुन राहाणं कधीही चांगलं…….

 

संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ईद मुबारक….आणि म्हैशाळवेसचा अब्दुल्ला…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? मनमंजुषेतून ?

☆ ईद मुबारक….आणि म्हैशाळवेसचा अब्दुल्ला…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

मिरजेतल्या किल्ल्याच्या कमानीतून म्हैशाळ वेसेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला अब्दुला चाचाचं लाकडी फळ्यांचं सुबक असं दुकान होतं.दुकानाच्या मागेच त्याची वखारही होती. तिथून जरा पुढच्या वळणाला असणाऱ्या झोपडपट्टीत आम्ही रहायचो.त्याच्या दुकानातून आम्ही कधी कधी वरक्या तर कधी गोळ्या विकत घ्यायचो.वखारीतनं जळण घेऊन जायचो. उंचपूरा,गोरापान आणि देखणा असणारा अब्दुल्ला अजूनही आठवतो.त्याचा लांबलचक सदराही त्याच्यासारखाच असायचा.

त्याची आठवण ईद दिवशी नेहमीच येत राहते. बकरी ईदच्या दिवशी अब्दुलाच्या घरी बकरं कापलं जायचं. त्याची खबर आमच्या झोपडपट्टीत पोहचायची. आम्ही गल्लीतली पोरं भगुलं घेऊन अब्दुल्लाच्या घरी जायचो.अब्दुल्ला मूठ मूठभर मटण प्रत्येकाच्या भगुल्यात द्यायचा. मटण बघून तिथच तोंडाला पाणी सुटायचं.कावळ्या कुत्र्यांना जपत आम्ही असं जिथं तिथं मिळणारं मूठ मूठ मटण घरी घेऊन यायचो.असं मूठ मूठभर मिळालेल्या डल्ल्यांनी झोपडपट्टीतली ईद हरखून जायची.कधी कधी अब्दुल्लाच्या घरातनं शिरकुरमा पण मिळायचा.तो ही आम्ही तांब्यातनं, कुणी भगुल्यातनं घरी न्यायचो.अब्दुला असं प्रत्येकाला भरल्या अंतकरणानं दानत देऊन पाठवायचा.     

आमच्या झोपडपट्टीत अशी प्रत्येक सणाला मज्जा असायची. कधी बिर्याणी आणि घट्ट जिगरीचा सुगंध झोपडपट्टीत दरवळत रहायचा. आमच्या झोपडीच्या पुढच लैलाभाभीची झोपडी होती.तिचीही आम्हा भावंडावर विशेष माया होती. नेहमी स्वच्छ व नीटनेटकी राहणारी गव्हाळ रंगाची,सुबक नाकेली आणि सडपातळ असणारी लैलाभाभी.तिच्या कडूनही या दिवसात काय बाय मिळत रहायचं.चोंगे,रोट आणि गुलगुल्यानं; तर कधी मलिद्यानं असं ज्या त्या सणात मिळणाऱ्या पदार्थांनी आमची पोटं गच्च भरायची. डोल्यांच्या दिवसात तडतडणाऱ्या ताशात दंगून जायचो. आमच्या झोपडीच्या पुढेच कत्तलीच्या रात्रीचा खेळ असायचा.अठरापगड जाती धर्मांच्या सणांनी  आमची झोपडपट्टी अशी घट्ट बांधली गेली होती. ‘सलाम अलेकुम ‘, ‘रामराम ‘ आणि  ‘जयभिम’ च्या वातावरणात लहानपणी वावरताना एकोपा जपलेली माणसं जिथं तिथं मोठ्यामनानं हसतमुखी आणि समाधानी भावनेनं आमच्या झोपडपट्टीत नांदत होती.

…… लहानपणी ईद दिवशी आमच्या झोपडपट्टीतली पोटं भरणाऱ्या अब्दुल्लाची आठवण आजही कधी त्या भागातून जाताना येते.अब्दुल्लाच्या वखारीतनं ढलप्याचं जळण आणि चहासाठी वरक्या घेऊन जातानाचे दिवस आठवत राहतात. अब्दुल्लानं दिलेल्या मूठ मूठभर मटणाची आणि शिरकुरम्याची आठवण येत राहते. आता अब्दुल्ला काय करतो.. कसा दिसतो माहीत नाही. पण उंचपुऱ्या, गोर्‍यापान आणि देखण्या अशा अब्दुल्लाचा चेहरा मात्र विसरता म्हणता विसरता येत नाही. अशा या माणसातला माणूस म्हणून भावलेल्या- अब्दुल्लाला मनापासून सलाम अलेकुम म्हणत दुवा द्यावासा वाटतो…….!

(माणसातली माणसं….. संग्रहातून)

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर..

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुम्ही सुंदर आहात…हे स्वतःला कळू द्या..!! ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ तुम्ही सुंदर आहात…हे स्वतःला कळू द्या..!! ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

(सर्व महिला वर्गाला समर्पित.)

जेव्हा सगळं घर रडत असतं,

तेव्हा तुम्ही सावरता,

जेव्हा घरभर पसारा होतो,

तेव्हा तुम्ही एकट्याच आवरता,

राहून जातं या सगळ्यात…

स्वतःला भेटणं,

केस विंचरणं, लिपस्टिक लावणं,

आणि पावडर लावून नटणं..!

तुमचं हसणं महत्त्वाचं आहे,

ते असच फुलू द्या,

तुम्ही सुंदर आहात…

हे स्वतःला कळू द्या..!

 

डोळ्याखाली काळे डाग,

चेहऱ्यावरती रिंकल्स,

पांढरे झालेले केस

आणि गालावरती पिंपल्स,

असू द्या हो,

एक धाडसी आई आहात तुम्ही,

साऱ्या जगाशी लढता,

एकावेळी एक नाही,

दहा दहा कामे करता,

या घाईत तुमचा मोर्चा…

स्वतःकडेही वळू द्या,

तुम्ही सुंदर आहात…

हे स्वतःला कळू द्या..!

 

स्ट्रेस आहे कामाचा,

हवं आहे प्रमोशन,

किराणा संपत आलाय,

त्याचं वेगळच टेन्शन,

वाढदिवस, एनिवर्सरी…

सारं लक्षात ठेवता,

अगदीच कॉल नाही…

पण आवर्जून मेसेज करता,

तुमच्या कौतुकानं कूणी…

जळलं तर जळू द्या,

पण तुम्हीं सुंदर आहात..

हे स्वतःला कळू द्या…!

 

वेळेत खा, वेळेत झोपा,

जरा जपा स्वतःला

तुमच्यामुळेच आहे…

घरपण तुमच्या घराला,

नको सतत साऱ्यांची मन जपणं,

“खुप छान असतं…

कधीतरी आपणं आपल असणं”

असा थोडासा “me time”  

तुम्हालाही मिळू द्या…

तुम्ही सुंदर आहात…

हे स्वतःला कळू द्या..!!!

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares