सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “कुटुंबात एकट्याला सुख घेण्याचा अधिकारच नसतो” ☆ सुश्री शीला पतकी ☆
आज एक खूप छान वाक्य ऐकलं “कुटुंबात एकट्याला सुख घेण्याचा अधिकारच नसतो”
वाक्य दिवसभर मनात घोळत होतं. सगळ्या कृती चालल्या होत्या पण डोक्यात कुठेतरी वाक्य आणि त्याचे अर्थ लावले जात होते. ह्या एका वाक्याने कुटुंबाची व्याख्याच केली होती…. कुटुंब म्हणजे सगळीच सुखदुःख सगळ्या घटकांनी वाटून घ्यायची… सर्वांनी आनंद घ्यायचा.. सर्वांनी दुःख भोगायची… सर्वांनी कष्ट करायचे… सर्वांनी एकमेकाची काळजी करायची….. सर्वांनी एकमेकांवर प्रेम करायचं…. ! कितीतरी गोष्टी एका वाक्यात दडलेल्या होत्या…. किती खरं आहे ना… !
कुटुंब म्हटल्यावर त्यात सगळे घटक आले मग त्यातला एखादाच घटक ऐश्वर्य बघतोय सुख घेतोय आणि बाकीचे दुःखाच्या वाटेवर हे शक्यच नसतं….. त्यावरून एक प्रसंग आठवला…. अगदी लहानपणीचा! .. आम्ही जिथे राहत होतो त्या वाड्यात खाली दुकान होतं दुकानातून दुपारी एक पैशाचे चुरमुरे एक पैशाचे डाळ आणली. शेंगा घरातल्याच होत्या त्याला तिखट मीठ मसाला लावला साधारण दोन वाटीचा चिवडा तयार झाला. आम्ही चार भावंड म्हणजे मोठे दोन होते पण ते आमच्यापेक्षा खूप मोठे होते. वाटावाटी आमच्या चौघात चालायची. घराला एक छोटी गॅलरी होती तिथे बसून पातेल्यातच ते चुरमुरे खायला सुरुवात केली. आईला हे कळलं तीने चांगलीच कान उघाडणी केली. “वाटून खाण्यात सुख असत हे असं चोरून खाण्यात नव्हे यानंतर हे पुन्हा घडता कामा नये जे खाल ते सगळेजण वाटून खा. वाटून खाण्यातला आनंद उपभोगा” त्या अडाणी बाईला जीवनाचा खरा आनंद कसा घ्यायचा हे ठाऊक झालं होतं. कारण आपल्या गरिबीतही चतकोर भाकरी दुसऱ्याला द्यावी ही वडिलांची शिकवण होती.
कुटुंबात चांगला संस्कार असल्यामुळे वडिलांची जुनी गिरणी बंद पडली तरी आम्ही सगळे मिळून कष्टाला तयार होतो. मोठी बहिण कॉलेजात होती ती एका ठिकाणी तीस-पस्तीस रुपये मिळत अशा ठिकाणी नोकरी करत होती. दोन नंबरची बहीण एका शाळेत 25 रुपयात काम करत होती. मी शिकवण्या करत होते पंधरा-वीस रुपये मिळायचे. धाकटा भाऊ ग्रंथालयात काम करायचा दहा रुपये पगार होता. सगळ्यांनी मिळून कमवल्यामुळे पैशाची किंमत कळाली होती. घर चालवण्यासाठी आपण कुटुंबाला मदत करतो हा अभिमान वाटत होता. मी शाळेत नोकरीला लागले तेव्हा मला साडेतीनशे रुपये पगार होता. साधारण जून महिन्यात पाऊस पडायला सुरुवात व्हायची त्यावेळेस सेवासदन शाळेसमोर असलेल्या बेकरी मधून सगळ्या भावंडांसाठी पट्टीची खारी घेऊन जाताना खूप आनंद वाटायचा. एक रुपया मध्ये पाव किलो खारी येत होती. शाळा सुटल्यावर पावसाळी वातावरण असायचं. 6 पर्यंत घरी पोहोचायचं. सगळेच घरी आलेले असायचे आणि आई सगळ्यांना मस्त गरम आल्याचा चहा करायची पेटवलेल्या स्टोव्ह भोवती आम्ही मस्त गोल करून बसायचो मग त्या विशिष्ट चहाच्या भांड्यात चहा उकळायचा तो वास… दूध टाकल्यानंतर येणारा वास.. स्टोव्हचा तो घssssर् असा येणारा आवाज… कप बशीची किणकिण.. खारीचा पुडा सोडल्यावर येणारा खमंग वास आणि सगळ्यांनी मिळून चहात बुडवून खाल्लेली ती खारी. जगातल्या एका सगळ्यात मोठ्या सुखाचा अनुभव आम्हाला मिळत होता.. कारण आम्ही सगळी भावंड आणि आई वडील एकत्र होतो ते कुटुंब होतं आमचं! कोणी आजारी पडला कि काळजी घेणं… आजारी माणसाजवळ सातत्याने कोणीतरी बसणं… त्याला खाऊ घालणं…. डॉक्टरांकडे जाऊन औषध आणणं. खरं तर त्याचं गांभीर्य कळत नव्हतं पण ही सगळी काम आम्ही प्रेमाने करत होतो इतके मात्र नक्की.
कुणी पास झाला की वडील मुलींसाठी गजरा घेऊन यायचे तेच त्याचं मोठं बक्षीस गजऱ्याचा सुगंधात कुटुंबाचा प्रेम ओवलेल असायचं. सगळ्या घरभर त्याचा घमघमाट असायचा. मग जरा सवडीने त्याच्यासाठी वडील काहीतरी भेटवस्तू घेऊन द्यायचे. दिवाळीचे कपडे सगळ्यांना एकसारखे. वह्या पुस्तकांची खरेदी सगळ्यांची मिळून त्यातही काटकसरीने केलेल्या रद्दीच्या वह्या… सगळ्यांनाच नवी पुस्तके शक्य नसायची जुनी पुस्तकं वाइंडिंग करून घ्यायचे पण एखाद्याला एखाद पुस्तक नवीन मिळालं की त्या कोऱ्या पुस्तकाचा सुगंध मात्र सगळ्या भावंडांनी पुन्हा पुन्हा घ्यायचा त्या सुगंधाच सुख काही अलौकिक होतं.
कुटुंबात आई आजारी पडल्याचे मला आठवतच नाही काय जादू होती ठाऊक नाही पण त्या माऊलीने कधीही अंथरूण धरलं नाही सगळ्यांच्या सुखासाठी ती अविरत राबली! आमच्या परीक्षांच्या आधी अभ्यासाला उठवत राहिली. आम्ही जागत राहिलो तर आम्हाला मध्ये चहा करून देत राहिली. मोठ्या बहिणी ही काळजी घ्यायच्या. केंद्राच्या परीक्षांना भावंड सोडवायला यायची.. दोन पेपर असतील तर मधल्या वेळचा डबा घेऊन यायचे किती छोट्या छोट्या गोष्टीतनं सुख मिळाला ना? .. आज माझ्या शेजारी राहणाऱ्या मुलींना मी म्हटलं अग काहीतरी खाऊन जा तर त्या म्हणतात नाही आम्ही ऑर्डर केले ते आम्हाला कॉलेजच्या मिळेल धन्य वाटते. मला एक मिळालेले चॉकलेट मी आणि माझा भाऊ अर्ध वाटून घेत असू हे सगळं माझ्याच घरात होत असं नाही तर हे असं अनेक घरात असायचीच.
कुटुंबाच्या कर्त्याबद्दल आदर होता. धाक होता, जाणीव होती. आईच्या कष्टाची कदर होती, तिच्या नुसत्या डोळ्यात धाक असायचा, तिने कधी शब्दांचा वापर केला नाही. आपली मुलं गुणी निघावीत यासाठी प्रत्येक आई बाप आपल्या सुखाचा त्याग करत होते त्यामुळे नकळत मुलं ही एकमेकांसाठी त्याग करायला शिकली. बहिण भावाच्या वेळा कोणी नडू दिल्या नाहीत ज्याला ज्याची गरज त्या त्या ठिकाणी मनुष्यबळासह जमेल तेवढी आर्थिक मदत एकमेकांना करीत गेलो.
आज सकाळच्या त्या त्या एका वाक्याने मला पुन्हा एकदा जाणीव दिली. किती सत्य होतं नाही का कुटुंबातल्या एकाला सुख घेण्याचा अधिकार नसतोच! सुख हे वाटून घ्यायचं असतं तर त्याची लज्जत वाढते टिकते. ती जाणीव खूप वर्धिष्णु आहे. जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं त्या सुखाची किंमत कळत जाते. उत्तम शिक्षण मिळावं म्हणून कोणीतरी केलेल्या त्याग, कोणाच्या लग्नासाठी पैसा गोळा करायचा म्हणून केलेले अफाट कष्ट या अनेक गोष्टी आज खूप समाधान देऊन जातात त्या कुटुंबात वाटून घेतलेल्या सुखाचे परिवर्तन आज समाधानात झाले आहे…… आणि आजची कुटुंब व्यवस्था पाहिली की मन चिंतीत होतं. खूप पैसा आहे कोणाची कुणावर जबाबदारी नाही सगळे स्वतंत्र घटक! तात्कालीक सुख खूप आहेत पण स्मरणात राहील असं समाधान यांना मिळेल की नाही शंका आहे आज त्या वाक्यानं पुन्हा एकदा कुटुंबात कुटुंबासाठी त्याग केलेल्या व्यक्तींची जाणीव झाली आणि मनापासून पटलं कुटुंबात सुख घेण्याचा अधिकार एकट्याला नसतोच….. ! तुम्हालाही असंच वाटतं ना मंडळी.. ! !
शब्दांकन : सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈













