मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘अन्न हे पूर्णब्रह्म‘ ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ अन्न हे पूर्णब्रह्म ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

एका लग्नाला गेलो होतो . जेवणाचा तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते . युनिफॉर्म घातलेल्या  सुंदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या . 

पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला …. हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो ….. 

तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .

सौ. ने हात खेचत म्हटले ” अहो जरा दमाने घ्या , मिळते म्हणून सर्व घेऊ नका , मग फेकून द्याल ” 

मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली . थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले ….. अधिक काही खाववेना . नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो . रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता …..

माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला—-

“सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??”

अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले . 

” ही तुमची डिश आहे ना ?? “

” होय,” मी परत उत्तरलो .

” हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ??  म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल ” 

मी चकित झालो . थोडा रागही आला . त्याच रागात बोललो, ” अहो थोडे राहिले अन्न ? काय हरकत आहे .

नाही अंदाज आला .म्हणून काय घरी न्यायचं ?? “ 

” रागावू नका ” तो गोड हसत म्हणाला .“ हे मोठ्यांच लग्न आहे . पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला . हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे . बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही . कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ . आमची 25 माणसे .  पण तरीही अन्न उरणारच . आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न !! त्याचे काय ??  राग मानू नका . पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार  दिवस आम्ही मेहनत करतोय , उत्कृष्ट प्रतीची भाजी , मसाले खरेदी केले. आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तम प्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत…. होय ,त्यासाठी आम्ही  मागू तेवढे पैसे तुम्ही  दिलेत हे मान्य आहे . पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत . आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा …..म्हणून आम्ही ही शक्कल लढवली , हॉटेलमध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता…….. का ???  कारण तुम्ही पैसे मोजलेले असता.  मग इथे का नाही ??  कारण ते दुसऱ्याने दिले म्हणून का ?? “

” आणि हो , यातील काहीही यजमानांना माहित नाही . हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका . पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा, नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा .” 

मला काही सुचेना काय बोलावे . थोडी लाजही वाटली आणि पटतही होते —-

खरेच भारतातच काय, आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकताहेत आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय …. 

इतक्यात सौ .म्हणाली  “बरोबर बोलताय भाऊ , यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे , तेव्हा करण्याला किती वेदना होतात . द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला . आता रात्रीचे जेवण होईल . मेहनत , इंधन सर्व काही वाचेल .

 थोड्या वेळाने आम्ही  वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो ….

(आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता…. 

एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच…. 

पण भूभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही )  

 

—अन्नावाचून , अन्न पिकवता आत्महत्या करतोय … 

अन्न हे पूर्णब्रम्ह  ते वाया घालवू नका.  🙏

 

संग्राहक : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नाती  स्पेशल !! ☆ प्रस्तुति – सुश्री वृषाली मोडक ☆

?वाचताना वेचलेले ?

☆ नाती  स्पेशल !! ☆ प्रस्तुति – सुश्री वृषाली मोडक ☆

(A nice poem on Relationships)

सुख ओरबडण्याच्या शर्यतीत

सामील होऊ नका

आपलं काही चुकतंय का ?

थोडं तपासून तर बघा

 

प्रेम , त्याग , सहनशीलता

ठेवावीच लागेल

आपल्या माणसाशी नातं तोडून

कसं काय भागेल ?

 

कौतुक करणारं असेल तर

मोठं होण्याला अर्थ असतो

लाखोंचं इंटेरियर करून सुद्धा

माणूस का उदास दिसतो ?

 

सुबत्तेच्या विळख्या मधे

खरंच सापडू नका

आपलं काही चुकतंय का ?

थोडं तपासून तर बघा

 

जगाशी मैत्री करतांना

मूळं  का उपटावीत

दूरचे जवळ घेतांना

सख्खे दूर का लोटावीत ?

 

पाणी आणि मृगजळ यातला

फरक लक्षात घ्या

नातं तोडणाऱ्या अहंकाराला

तिलांजली द्या

 

इतरांच्या सुखदुःखात

सामील व्हावच लागेल

तरंच  सोनेरी महाला मध्ये

तुमचं मन लागेल

 

मृत्यू जवळ दिसल्या नंतर

उपयोग काय ‘ नाती ‘ आठवून ?

जन्मभर का जगायचं

प्रेम आणि अश्रू गोठवून

 

आयुष्य फार छोटं आहे

दिवस भुर्रकन उडून जातील

Whats app , Face book वरून

फक्त ” R I P ” चे मॅसेज येतील

 

रक्ताच्याच नात्या मधील

काही डोळ्यात पाणी असेल

तुमच्या लेकरां-बाळा जवळ

काका , आत्या , मावशीच असेल

 

मतभेद जरी असतील काही

बसून , बोलून संपऊन टाका

ताठरपणा सोडून देऊन

बहीण , भावाला मारा ” हाका “

 

Week end ला मॉल मध्ये

Aim less भटकू नका

आपलं काही चुकतंय का ?

थोडं तपासून तर बघा

 

मनाचं रंजन करण्यासाठी

माणूसच लागत असतो

संपत्ती कितीही असली तरी

” गप्पाची भीक ” मागत असतो

 

नशिबाने मिळालेली

प्रेमळ नाती तोडू नका

आपलं काही चुकतंय का ?

थोडं तपासून तर बघा .

 संग्राहिका- वृषाली मोडक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सत्यवान, सावित्री आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने— श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुति – सुश्री गीता पटवर्धन ☆

?वाचताना वेचलेले ?

☆ सत्यवान, सावित्री आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने— श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुति – सुश्री गीता पटवर्धन ☆

(पुरोगाम्यांना कारल्याचा रस.)  

सावित्री सत्यवान , करवा चौथ या सारख्या प्रथांच्या मध्ये पुरुष प्रधान आणि स्त्री शोषण संस्कृती शोधणाऱ्या निर्बुद्ध आत्म्याच्या साठी… 

सावित्री ही राजकन्या. अत्यंत सुंदर, अत्यंत गुणवान तितकीच बुद्धिमान सुद्धा. तिच्या सौंदर्याची आणि बुद्धिमत्तेची कीर्ती अशी पसरली असते की तिच्याशी विवाह करण्याचे प्रस्ताव देव सुद्धा नाकारतात, ते पण या भीतीने की आपण तिच्याशी विवाह करण्यास पात्र नाहीत म्हणून.

अशा सावित्रीचा जीव सत्यवानावर जडतो. सत्यवानाचे वडील हे राजे असतात परंतु त्यांचे राज्य हरण होते. त्यांना अंधत्व येते आणि आता सत्यवान लाकडे तोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतो. अशा सत्यवानाशी विवाह करायचे सावित्री ठरवते. नारदमुनी तिला त्याचे आयुष्य लग्नाच्यानंतर एकच वर्ष आहे या शापाची पूर्वकल्पना देतात, तरीही ती अविचल राहते आणि त्याच्याशीच विवाह करते.

इथे एक पराकोटीची बुद्धिमान आणि सुंदर राजकन्या जिची अभिलाषा देवांना सुद्धा आहे आणि त्याच वेळी आपण तिच्या पात्रतेचे नाहीत याची कल्पना असल्याने ते तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव सुद्धा नाकारतात, हे दोन्ही सत्य समजून घ्या.. 

त्यानंतर तिला सत्यवान आवडतो आणि ती त्याला वरते. इथे मुलीला स्वतःचा वर निवडण्याची मुभा होती हे सुस्पष्ट होते. आज सुद्धा जिथे ऑनर किलिंग होतात तिथे हे समजणे अत्यंत आवश्यक आहे. 

जुन्या काळात बऱ्याचदा असा प्रश्न येत असे– तुम्हाला बुद्धिमान पुत्र हवा असेल तर अल्पायु असेल. मंदबुद्धी चालणार असेल तर दीर्घायू होईल. त्याच प्रमाणे सावित्रीच्या समोरही प्रश्न निर्माण होतो. तिच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेमुळे तिचा विवाह अशक्य होऊन बसला असतो. त्यावेळी सत्यवान आवडला आहे पण तो अल्पायु आहे हे समजते. 

परंतु अल्पकाळ का होईना आपल्याला मनोवांच्छित पतीचा सहवास प्राप्त होईल म्हणून सावित्री त्याच्याशी लग्न करते. त्यात तिची गुणग्राहकता दिसते आहे. 

नंतर यम ज्यावेळी त्याचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागतो, ती त्याच्याशी शास्त्रार्थ करते आणि त्याच्याकडून तीन वरदान मिळवते. यमाशी शास्त्रार्थ करणारे फक्त दोनच जण आहेत– एक नचिकेता आणि दुसरी सावित्री ( एक स्त्री आणि एक बालक. आपण या दोघांना सुद्धा अजाण समजतो ). 

ती पहिल्या वरदानात सासऱ्यांच्यासाठी नेत्र मागते. दुसऱ्या वरदानात त्याचे राज्य मागते आणि तिसऱ्या वरदानात पती मागून घेते. 

ती पहिल्यांदा आपल्या कुलाच्या हिताचा विचार करते. यमाने तिला पुढील वरदान दिले नसते तर तिचे सहगमन झाले असते. मग त्या दोघांच्या पश्चात वृद्ध आणि अंध सासऱ्याला नेत्र मिळणे आवश्यक , राज्य मिळणे आवश्यक, इतका विवेक तिचा त्या क्षणी सुद्धा जागा असतो. 

सावित्रीची ही बुद्धिमत्ता आणि आपल्या कुलाप्रती असणारा समर्पण भाव हा आजच्या तरुणींनी आत्मसात करण्याच्या सारखी गोष्ट आहे.

आपल्याला आवडलेला पुरुषच पती म्हणून निवडणे आणि त्याच्यासह संसार करण्यासाठी साक्षात मृत्यूशी सुद्धा आपली बुद्धी पणाला लावून शास्त्रार्थ करण्याचे धाडस आणि बुद्धिमत्ता असणारी स्त्री, म्हणून सुद्धा आपण सावित्री कडे पाहू शकतो. 

राजकन्या असणारी सावित्री आपल्या वडिलांच्याकडून आर्थिक मदत सुद्धा घेऊ शकली असती. परंतु ती मदत स्वीकारत नाही. नवऱ्याच्यासह झोपडीत सुखाने संसार करते. आपल्या आवडत्या पुरुषाच्यासाठी तडजोड करणे ती स्वीकारते, पण मनाविरुद्ध आणि गुणहीन असा नवरा स्वीकारत नाही. तिचा स्वाभिमानी स्वभाव हा गुण सुद्धा आत्मसात करण्यासारखा आहे. 

आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचे निर्णय स्वतः घेणे आणि त्याच्या परिणामांची सुद्धा संपूर्ण जबाबदारी घेणे, समोर आलेल्या परिस्थितीसमोर हतबल होऊन हातपाय न गाळता आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर त्या समस्येवर मात करणे, हे एक व्यक्ती म्हणून सावित्रीचा विकास किती परिपूर्ण झाला आहे याचे निदर्शक आहे. 

जर वटसावित्रीची आपण पूजा करणार असलो तर प्रत्येक स्त्रीला या कथेतील हा सगळा भाग ज्ञात असणे आवश्यक आहे. या कथेतून यमाच्या तावडीतून नवऱ्याला सोडवून आणणे हा भाग गौण आहे. एक व्यक्ती म्हणून आयुष्यातील सगळे निर्णय स्वतः घेणे, त्याच्या परिणामांची कल्पना असूनही आपल्या तत्वांशी तडजोड न करणे आणि ज्यावेळी सर्वस्व पणाला लावायची वेळ येईल त्यावेळी त्या पातळीवरील त्यागाच्यासाठी सुद्धा उद्युक्त असणे, हे दैवी गुण ही कथा आपल्याला आत्मसात करायला प्रेरित करते.

ही कथा प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलीला असे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रेरणास्त्रोत म्हणून सांगितली पाहिजे. ही कथा प्रत्येक पुरुषाने, आपल्याला सावित्रीसारखी गुणवान पत्नी हवी असेल तर आपल्याला सुद्धा तितके चांगले लोकोत्तर गुण आत्मसात करायला हवे हे ध्यानात घेण्यासाठी वाचली पाहिजे.  

यातील स्त्रीचे शोषण आणि पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व शोधून काढणारे लोक महान आहेत. या कथेत पुरुषप्रधान संस्कृतीचे अवशेष शोधणाऱ्या लोकांना माझा प्रश्न :— ज्या प्रमाणे सावित्री स्वतःला हवा तो वर निवडते आणि त्या पुढील घडणाऱ्या घटनाक्रमाची जबाबदारी घेते, इतके स्वतंत्र आणि परिपक्व तुम्ही तुमच्या मुलीला वाढवले आहे का? तिने तसे वागले तर तुम्हाला चालेल पटेल का ? तुम्ही तुमच्या मुलीला तितके स्वातंत्र्य दिले आहे का ?—-

लेखक : श्री सुजीत भोगले

संग्राहिका : सुश्री गीता पटवर्धन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 15 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 15 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

[ २२ ]

 आषाढाच्या घनदाट सावलीत,

 नीरव पावलांनी,

 सर्व पहारेकऱ्यांना चुकवून जाणाऱ्या

 शांत रजनीप्रमाणे तू जातोस.

 

सतत भिरभिरणाऱ्या पूर्व वाऱ्याकडं

दुर्लक्ष करून, प्रांत: समयानं

आपले डोळे मिटून घेतले आहेत.

सतत दक्ष असणाऱ्या निळ्या आभाळावर

एक जाड पडदा पसरला आहे.

रानं गाणी गायची थांबली आहेत..

आणि घराची दारं- कवाडं बंद आहेत

या निर्मनुष्य रस्त्यावर तूच एक वाटसरू आहेस.

 

 हे जीवलग मित्रा,

 माझ्या घराचे दरवाजे सतत उघडे आहेत

 एखाद्या स्वप्नासारखा विरून दूर जाऊ नकोस.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोत्र म्हणजे काय ?.☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ गोत्र म्हणजे काय ?.☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

गोत्र म्हणजे काय ?

धार्मिक विधी करताना बऱ्याच वेळा `आपले गोत्र काय ` असा प्रश्न गुरुजी विचारतात तेव्हा ` गोत्र म्हणजे काय `असा

प्रतिप्रश्न करणारे देखील असतात, अशावेळेला पूर्वजांपैकी कोणी एक पुरुष असे उत्तर देऊन वेळ मारुन नेणारेही  काही जण असतात. पण तसे नसून गोत्र ही वैदिक धर्माने दिलेली देणगी आहे. जन्मवंश शास्त्र दृष्ट्या अत्यंत सूक्ष्मस्तरीय एक मानवशाखा आहे.

“धर्मसिंधु” ग्रंथामध्ये गोत्राचे लक्षण पुढील प्रमाणे दिलेले आहे—

`तत्र गोत्र लक्षणम् – विश्वामित्रो जमदग्निर्भरद्वाजो$थ गौतमः ।

अत्रिर्वसिष्ठः कश्यप इत्येते सप्तऋष्यः ॥ ‘

विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ,आणि कश्यप हे सात ऋषी आहेत. व आठवे ऋषी अगस्त्य हे

होत. यापैकी प्रत्येक ऋषीचे आपत्य म्हणजे गोत्र होय. त्या त्या ऋषींच्या नावांना गोत्र असे म्हणतात.

प्रमुख गोत्र व त्यांची प्रवरे

१ अत्रि : आत्रेय -आर्चासन -श्यावाश्व

२ अघमर्षण : वैश्वामित्र -अघमर्षण-कौशिक

३ आंगिरस : आंगिरस -आंबरीष -यौवनाश्व

४ आयास्य : आंगिरस -आयास्य -गौतम

५ आर्ष्टिषेण : भार्गव – च्यावन -आप्न्वन – आर्ष्टिषेण -अनूप

६ उपमन्यु : वासिष्ठ -इंद्रप्रमद -आभ्रद्ववसु

७ कण्व : आंगिरस -आजमीढ -कण्व

८ कपि : आंगिरस -आमहीयव -औरुक्षयस

९ काश्यप  : काश्यप  -अवत्सार -नैधृव( काश्यप ) -अव्त्सार -असित

१० कुत्स : आंगिरस -माधांत्र -कौत्स

११ कौंडिण्य : वासिष्ठ -मैत्रावरुण -कौंडिण्य

१२ कौशिक : वैश्वामित्र –अघमर्षण -कौशिक

१३ गार्ग्य : आंगिरस -शैन्य -गार्ग्य

१४ जामदग्न्य : भार्गव – च्यावन -आप्न्वन -और्व -जामदग्न्य

१५ नित्युन्द : आंगिरस – पौरुकुत्स्य -त्रासदस्यु

१६ नैध्रुव : काश्य्प -अव्त्सार – नैध्रुव

१७ पाराशर :वासिष्ठ -शाक्त्य -पाराशर

१८ बादराण : आंगिरस -पौरुकुत्स्य -त्रासदस्यु

१९ बाभ्र्व्य : वैश्वामित्र -देवरात -औदास

२० बिद : भार्गव – च्यावन -आप्न्वन-और्व – बिद

२१ भारव्दाज : आंगिरस बार्हस्पत्य -भारव्दाज 

२२ मित्रायु :भार्गव – च्यावन -देवोदास

२३ मुद्ग् गल : आंगिरस -भार्ग्याश्व -मौद्ग्गल्य

२४ यस्क : भार्गव वैतहव्य -सावेतस

२५ रथीतर :आंगिरस -वैरुप -रथीतर

२६ वत्स : भार्गव – च्यावन -आप्न्वन-और्व -जामदग्न्य

२७ वासिष्ठ : वासिष्ठ -इंद्रप्रमद -आभ्रद्ववसु

२८ विष्णुवृद्ध :आंगिरस -पौरुकुत्स्य -त्रासदस्यु

२९ वैश्वामित्र : वैश्वामित्र -अघमर्षण -कौशिक

३० शांडिल्य : शांडिल्य -असित -देवल

३१ शालाक्ष : वैश्वामित्र -शालंकालय -कौशिक

३२ शौनक : भार्गव -शौनहोत्र -गार्स्तमद

प्रवर म्हणजे काय ?

गोत्रांची संख्या अगणित असली तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली आहे. प्रत्येक गोत्रांना प्रर्वतक ऋषी असतात. काही गोत्रांना एक, काही गोत्रांना दोन, काही गोत्रांना तीन ते पाचपर्यंत प्रवर्तक असतात. या प्रवर्तक ऋषी गणांना प्रवर असे म्हणतात.

काही समाजामध्ये आजही सप्रवर विवाह वर्ज केला जातो. तसेच उपनयन प्रसंगी बटूस गोत्र प्रवर ,स्वतःची वेदशाखा,

सूत्र, स्वतःचे नक्षत्र व चरण नाम यांची माहिती करुन दिली जाते.

ही माहिती शेयर करण्याचे कारण म्हणजे आपले पूर्वज आणि आपली हिंदू संस्कृती किती संपन्न होती ह्याचे हे छान उदाहरण आहे…..

जेनेटिक्सचा अभ्यास करणाऱ्यांनी हे मान्य केलेले आहे की एका गोत्रात लग्न केल्यामुळे अनेक आजार ( जेनेटिकली ट्रांसमिटेड डिसीज ) होऊ शकतात आणि आपल्या पूर्वजांनी जे नियम घालून दिले आहेत ते योग्य आहेत…..

त्यातील बऱ्याच गोष्टीची उकल जेनेटिक्सवाले आता करत आहेत …

आपली हिंदू संस्कृती अतिशय पुढारलेली आहे . त्यामुळे योग्य अभ्यास करून मगच त्यावर टीका करा….

धन्यवाद ………….

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार”… सुमित्र माडगूळकर ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ “देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार”… सुमित्र माडगूळकर ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

डिसेंबर १९७७…. कोयना एक्सप्रेस धडधडत निघाली होती …

गीतरामायणाचे जनक सीताकांत लाड खिडकीतून बाहेर पाहत होते…. अनेक आठवणी मनात दाटून आल्या होत्या. पंचवटीच्या प्रांगणातील आठवणींनी मन भरून येत होते …गीतरामायणाचे ते भारलेले दिवस..लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद…रेकॉर्डिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत गदिमांकडून गीत मिळवण्यासाठी झालेली धावपळ.. पंचवटीच्या दारात प्रभाकर जोगांना पाहून “आला रे आला ,रामाचा दूत आला.. आता गाणं घेतल्याशिवाय तो काही जाणार नाही..” असे ओरडणारे गदिमा. 

त्यांच्या समोर हसत खिदळत बागडणारे … गीतांचा तगादा लावल्यावर गदिमांच्यातले लहान मूल म्हणत होते…. 

” गीताकांत स. पाड ,पिडाकांत ग. माड …नाही कशाचीच चाड, मी ही भारलेले झाड…मी ही भारलेले झाड…. “

आपल्या लाडक्या मित्राला शेवटचा निरोप देऊन दोन मित्र सीताकांत लाड व गदिमांचा ‘नेम्या’ (नेमिनाथ उपाध्ये) परतीच्या प्रवासाला निघाले होते.. गदिमांबरोबर लहानपणापासून असलेल्या  ‘नेम्या’ ला प्रत्येक स्टेशनावर आपल्या अण्णाच्याच आठवणी येत होत्या.. रात्री अपरात्री किर्लोस्करवाडीला उतरल्यावर तीन मैल चालत कुंडलचे प्रवास … गारठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीत उबेसाठी स्मशानात घालवलेल्या त्या भयानक रात्री … तेथे केलेले मुक्काम… शंकराच्या भूमीत गदिमांनी धडाधडा केलेले ‘शिवलीलामृताचे’ प्रवचन.. अगदी आठवणींच्या आधी जाते जिथे मनाचे निळे पाखरु- क्षणार्धात गतस्मृतीत भरारी घेत होते.

‘मिरज’ स्टेशनच्या आधी लांबून काही अस्पष्ट स्वर येते होते… कोणीतरी गात होते …. एकदम खड्या आवाजात…

“उद्धवा अजब तुझे सरकार…. “

एक आंधळा भिकारी गात गात पुढे सरकत होता .. 

गाडीच्या कम्पार्टमेन्टमधे काही कॉलेजियन्सचा ग्रुप रमी खेळत बसला होता … बोचऱ्या थंडीला ‘बुढा मर्कट’ ब्रँडची साथ होतीच… मैफल रंगात आली होती. 

त्यांच्यापैकीच एकजण ओरडला “अरे साल्यांनो,गदिमा सुरु झालाय ! ऐका की !”

या आवाजाने अर्धवट झोपेत असलेला कोपऱ्यातला घोंगडी पांघरून बसलेला म्हाताराही कान टवकारून उठून बसला… 

भिकाऱ्याने खड्या आवाजात परत सुरुवात केली… 

” झाला महार पंढरीनाथ “… 

“एक धागा सुखाचा” …” इंद्रायणी काठी” … भिकारी गात होता …

नेम्या व लाड खिडकीजवळील आपल्या जागेवरून आनंद घेत होते.. पल्लेदार आवाज.. त्यात काहीसे उच्चार दोष. … शब्द – ओळी वरखाली झालेल्या .. 

पण आधीच ‘रम’लेली मंडळी अजून गाण्यात रमून गेली होती.. 

त्या युवकांपैकीच कोणीतरी फर्माइश केली “म्हण .. आणखी म्हण … पण फक्त गदिमांच हं !” 

भिकारी म्हणाला ” त्यांचीच म्हणतो मी साहेब,दुसरी नाही. या लाइनीवर खूप खपतात .. कमाई चांगली होते.. त्यांना काय ठावं, त्यांच्या गीतांवर आम्ही कमाई करतो म्हणून .. “

गरीब भिकाऱ्याचा स्वर थोडा हलल्यासारखा वाटला….आवंढा गिळून भिकारी म्हणाला….

” ते गेले तेव्हा दोन दिवस भीक नाही मागितली साहेब !… ” 

या आंधळ्या गरिबाला कोठून कळले असावे आपला अन्नदाता गेला-रेडिओवरून ?,गदिमा गेले तेव्हा महाराष्ट्रात अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नव्हत्या .सगळेच शांत होते,डब्यातल्या सगळ्यांनी आपापल्या परीने त्याचा खिसा भरला… तो पुढे सरकत होता… 

गदिमांचा तो आंधळा भक्त गातच होता..

तूच घडविसी, तूच फोडिसी, 

कुरवाळिसी तू तूच ताडीसी

न कळे यातून काय जोडीसी

देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार 

विठ्ठला, तू वेडा कुंभार….

हळू हळू त्याचा आवाज परत अस्पष्ट होत गेला.. कोयना एक्सप्रेसची धडधड परत वाढत गेली.. तरुण मंडळी परत आपल्या कामात ‘रम’माण झाली.

म्हटले तर काहीच घडले नव्हते … म्हंटले तर खूप काही घडून गेले होते… 

एका महाकवीच्या हृदयाची स्पंदने …. एका भिकाऱ्याच्या हृदयाची स्पंदने… जणू काही फरक राहिलाच नव्हता… काही दिवसांपूर्वी अनंतात विलीन झालेले ते कोण होते?.. 

सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हृदयात स्थान मिळवणारा असा महाकवी आता परत होणार नव्हता…

 – सुमित्र माडगूळकर 

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई…! ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

? वाचताना वेचलेले ?

☆ आई…! ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆ 

इयत्ता पाचवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर वर्ग शिक्षकांनी त्यांना कशी ‘आई’ आवडते यावर निबंध लिहायला दिला.

प्रत्येकाने आपल्या आईचे कौतुक करणारे  वर्णन लिहिले.

राहुलच्या मजकुरात त्याने शिर्षक लिहीले – “ऑफलाइन आई…!”

मला “आई” पाहिजे, पण “ऑफ लाईन” पाहिजे.

मला एक “अशिक्षित” आई हवी आहे, जिला “मोबाईल” कसा वापरायचा हे माहित नाही पण माझ्या बरोबर सर्वत्र जाण्यासाठी ती उत्सुक असेल.

मला “जीन्स” आणि “टी-शर्ट” घातलेली “आई” नको तर छोटूच्या आईसारखी साडी नेसलेली “आई” हवी आहे.  मी जिच्या मांडीवर डोके ठेवून बाळाप्रमाणे झोपू शकतो अशी आई पाहिजे .

मला “आई” हवी, पण “ऑफलाइन” हवी. तिला “माझ्यासाठी” आणि माझे बाबांसाठी “मोबाईल” पेक्षा  “जास्त वेळ” असेल.

ऑफलाईन “आई” असेल तर बाबांशी भांडण होणार नाही.

जेंव्हा मी संध्याकाळी झोपायला जाईन तेंव्हा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी ती मला एक गोष्ट सांगेल.

आई, तू ऑनलाइन पिझ्झा मागवू नको, घरी काहीही बनव. मी आणि बाबा आनंदाने खाऊ.

मला फक्त ऑफलाइन “आई” पाहिजे आहे.

इतकं वाचून मॉनिटरचा हुंदका  संपूर्ण वर्गात ऐकू आला.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि वर्ग शिक्षिकेच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.

आयांनो, आधुनिक रहा पण आपल्या मुलाचे बालपण जपा, ते मोबाईल च्या नादाला लागून हिरावून घेऊ नका! ते परत कधीच येणार नाही. 

संग्राहिका – माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ यम सुद्धा परत गेला — ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ ☆ यम सुद्धा परत गेला — ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

गुरूजींना न्यायला आलेला यम सुध्दा परत गेला…!!

 

काल आमच्या शाळेत वेगळंच प्रकरण घडलं,

गुरुजींना न्यायला देवानं यमाला अर्जंट धाडलं.

 

न विचारताच यम घुसला डायरेक्ट गुरुजींच्या वर्गात,

चला गुरुजी आपल्याला जायचं आहे स्वर्गात.

 

एका मिनीटात तुम्हाला येणार आहे अटॅक,

तुमचा जीव माझ्या मुठीत येईल मग फटॅक.

 

यमाचं बोलणं ऐकून गुरुजी लागले रडू,

खूप दिवसांनी घेतलाय रे यमा हाती खडू.

 

कोरोनाने पोरांची शाळा होती बंद,

आजच्या दिवस घेऊ दे त्यांना शिकण्याचा आनंद.

 

फक्त एक कविता दाखवतो त्यांना गाऊन,

मग जा खुशाल तू माझे प्राण घेऊन.

 

ठीक आहे म्हणत यम वर्गाबाहेर बसला,

गुरुजींचा डान्स पाहून तोही फार हसला.

 

यमालाही आठवलं त्याचं बालपण,

दाटून आला गळा त्याचा, गहिवरलं मन.

 

आजच्या दिवस एक्स्ट्राचा घ्या म्हणला जगून,

उद्या येतो म्हणत यम गेला आल्या पावली निघून.

 

दुसऱ्या दिवशी सकाळीच यम झाला हजर,

गुरुजींचीही पडली त्याच्यावरती नजर.

 

काहीही म्हण यमा अर्जंट आहे काम,

केंद्रावर जाऊन येतो तोवर जरा थांब.

 

सर्वेक्षणाची फाईल साहेबांस येतो देऊन,

किरकोळ रजेचा अर्जही येतो जरा ठेवून.

 

करायच्या आहेत अजून तांदळाच्या प्रती,

पोरांचीही काढायची आहेत बँकेमधे खाती.

 

आकारिकचं काम पण घेतलंय काल हाती,

डोक्यामध्ये नुसती गणगण, काय आणि किती?

 

शेवटचे हे आठ दिवस थांब यमा मित्रा,

तोवर माझ्या मिटवतो भानगडी ह्या सतरा.

 

शेवटची ही संधी गुरुजी आज नक्की देईन,

पुढच्या सोमवारी प्राण घ्यायला मी पुन्हा येईन.

 

गुरुजींच्या डोक्याला आलं कुटुंबाचं टेन्शन,

आपण गेलो तर काय होईल? आपल्याला नाही पेन्शन.

 

म्हणता म्हणता उगवला शेवटचा तो सोमवार,

शाळेकडे गुरुजी झाले स्कूटरवरती स्वार.

 

तेवढ्यात गुरुजींच्या आलं काहीतरी ध्यानात,

गुरुजी थेट घुसले एका कपड्याच्या दुकानात.

 

यम म्हणाला, गुरुजी आज इकडं कसं काय?

तेवढ्यात गुरुजींनी धरले यमाचे ते पाय.

 

गणवेषाचं तेवढं लावू दे आज मार्गी,

आजचा दिवस थांब, उद्या जाऊ आपण स्वर्गी.

 

काय राव गुरुजी तुम्ही रोजच आहे बिझी,

तुमच्या अशा वागण्यानं ड्युटी धोक्यात येईल ना माझी.

 

आजच्या दिवस यमा, घे रे गड्या समजून,

किर्द दुरुस्ती, दाखल्याचेही काम आहे पडून.

 

उदयापासून सुरु आहे CO साहेबांचा दौरा,

कामाभोवती फिरतोय बघ गुरुजी नावाचा भोवरा.

 

परवापासून खेळायची आहे टॅगची पण इनिंग,

पुढच्या आठवड्यात घ्यायचं आहे गणित पेटीचं ट्रेनिंग.

 

नंतर करायची आहे स्कॉलरशिपची तयारी,

लसीकरणाचीही पार पाडायची आहे जबाबदारी.

 

पोरांच्या परीक्षा, मग तपासायचे पेपर,

नवोदय मधे पोरं करायची आहेत टॉपर.

 

कामाच्या हया ताणाची डोक्यात झालीय भेळ,

आमच्याकडं नाही यमा मरायलाही वेळ..

 

खूप वाटतं फुलवावा ज्ञानाचा हा मळा,

कांदा मुळा भाजी आमची, खडू आणि फळा.

 

पोरांमधे जीव ओतून करतो आम्ही काम,

त्यांच्यामधेच दिसतो रहीम, त्यांच्यामधेच राम.

 

फुकट पगार म्हणणार्‍यांची वाटते भारी कीव,

हरकत नाही, आज माझा घेऊन टाक जीव.

 

यमाला आलं गलबलून सारं काही ऐकून,

तुम्हाला न्यायला गुरुजी आता येणार नाही चुकून.

 

वाटेल तेव्हा या गुरुजी उघडेन स्वर्गाचं दार,

सुंदर करा भारत आणि पोरं करा हुशार.

 

टाटा बाय बाय करत करत यम गेला निघून,

परत येण्याआधी तो घ्या ना छान जगून.

 

जगणं मरणं म्हणजे नाही काही वेगळं,

नरक आणि स्वर्ग इथंच आहे सगळं.

 

कामाशी काम करून घडवा नवा भारत,

कामाशिवाय इथं कुणी अमर नाही ठरत…!

 

— समस्त शिक्षक वर्गाला सविनय समर्पित —

 

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 14 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 14 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

[२१]

माझी नौका मला हाकारलीच पाहिजे

हाय रे दैवा!

किनाऱ्यावरचे ते सुस्त क्षण!

 

धरती पुष्पमय करून वसंताने

आपले काम केले आहे आणि

या कोमेजलेल्या निष्प्राण फुलांचे ओझे घेऊन

मी मात्र आळसावून थांबलो आहे.

 

लाटांचा खळखळाट वाढला आहे

किनाऱ्यावरच्या सावलीत

पिवळी पानं साद घालीत गळतायत

 

अरे! कुठल्या पोकळीत टक लावून बसलास?

दूरच्या किनाऱ्यावरून ऐकू येणाऱ्या

गीतांच्या ओळी तुला

भारून टाकीत नाहीत काय?

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मन… – कवयित्री : सुश्री मेघा देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ मन… – कवयित्री : सुश्री मेघा देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

मन वाभरं वाभरं 

देहा हातून फरार

किती बांधू दावणीला

स्थिर नाही घडीभर

 

देह श्रोत्यात बसला

मन आत बडबडे

ऐकू कुणाचे कळेना

दोघे घालती साकडे

 

मना हरणाचे पाय

देह हातावर घडी 

आज्ञा अन अवज्ञेची

आत चाले रेटारेटी

 

देह समजूतदार

बंद ठेवी सारी दारं

मन मांजर चोरटी

मनातल्या लोण्यावर

 

देह शिक्षित शहाणा

मन येड खुळं बेणं

देह हसे दुसऱ्याला

मन हसे स्वतःवर

 

देह चुलीपाशी रत

मन फिरे रानोमाळ

देही हिशेब नेटका

मनी कवितेची ओळ

 

देह टापटीप घडी

मन द्रौपदीचं वस्त्र

देहा लाज अतोनात

मन दत्त दिगंबर

 

देह घर आवरत 

मन आवरतं विश्व 

देह कार्यशील मग्न

मन आठवांत रत

 

देह जागच्या जागी

मन दूर दूर झरे

देह दिनचर्या घडी

मन वेल्हाळ पसरे

 

देह पाही याची डोळा

मना अलौकिक दृष्टी

देह पाही पान फूल

मनी मंतरली सृष्टी

 

देह संसार टुकीचा

मन पसारा अमाप

देह कपाटाचे दार

मन चोरखण आत.

 

देह जाचतो टाचतो

मन मखमल मऊ 

देह वचक दरारा

मन म्हणे नको भिऊ

 

देह जड जड भिंत

मन झिरपती ओल

देह रंग सजावट

मन गहराई खोल.

 

देह मन देह मन

जरी तळ्यात मळ्यात

देहा मनाचे अद्वैत 

भरी घडा काठोकाठ

कवयित्री – सुश्री मेघा देशपांडे 

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares