मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मराठी भाषेचे सौंदर्य पहा… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ मराठी भाषेचे सौंदर्य पहा… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

इलेक्ट्रिकच्या  दुकानवाल्याने फलकावर लिहिलं होतं..

” तुमच्या बुध्दीचा प्रकाश पडो ना पडो, आमच्या बल्बचा नक्की पडणार “.. 

 

इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलं वाचून माझं मन भरून आलं ..

“आपला कुणी फॅन नसेल तर आमच्याकडून एक घेऊन जा “..

 

चहाच्या टपरीवर असाच फलक होता..

” मी साधा माणूस आहे पण चहा मात्र खास बनवतो..”

 

एका उपाहारगृहाच्या  फलकावर वेगळाच मजकूर होता  ..

” इथे घरच्यासारखं खाणं मिळत नाही, आपण बिनधास्त आत या..” 

 

पाणीपुरीवाल्यानं लिहिलं होतं..

” पाणीपुरी खाण्यासाठी मन मोठं नसलं तरी तोंड मात्र मोठं हवं ” ..

 

फळं विकणाऱ्या माणसाने तर कमालच केली. ..

“तुम्ही फक्त पैसे देण्याचे कर्म करा, फळं आम्ही देऊ “.. 

 

घड्याळाच्या दुकानदाराने अजब मजकूर लिहिला होता  ..

” पळणाऱ्या वेळेला काबूत ठेवा, पाहिजे तर भिंतीवर टांगा किंवा हातात बांधा..”

 

ज्योतिषाने फलक लावला होता आणि त्यावर लिहिलं होतं…..

” या आणि फक्त १०० रुपयांत आपल्या आयुष्याचे पुढील एपिसोड बघा …”

 

आणि आमच्या ग्रुपवर लिहिले होते …… 

इथे दररोज येऊन तर बघा

सर्व अडचणी विसरून जाल… 

संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले 

मो 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सखी सासूबाई… – लेखिका – सुश्री यशश्री रहाळकर☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सखी सासूबाई… – लेखिका – सुश्री यशश्री रहाळकर☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

सासूबाईंनी सोडलाय केव्हाच, सासूपणाचा तोरा

त्यांच्यासाठी बांधीन म्हणते, आता वडाला मी दोरा – 

 

पार करायचंय आपल्याला, आपल्यातील एका पिढीचं अंतर

तुम्ही एक पाऊल मागं घ्या, मीही एक पुढे टाकीन नंतर –

 

माझा पिझ्झा पास्ता, तुम्ही कौतुकानं चाखायचा

तुमचा उपमा उप्पीट मी, आडव्या हातानं चापायचा –

 

माझ्यासोबत पहा कधीतरी, तुम्ही मुव्ही थ्री डी

तुमच्यासाठी नेसेन मीही, काठपदराची साडी –

 

सुनेची नसावी अरेरावी, सासूची नसावी सत्ता

नाहीतर मुलाची होते सुपारी, सासू खल सून बत्ता –

 

तुमच्या आजारपणाचा काळ, मी मायेनं सावरायचा

मी केला पसारा तर, तुम्ही प्रेमानं आवरायचा –

 

मतभेद होतीलही आपले कधीतरी, वादविवादही होणार

टोमण्यांचे तीर नको, आपण सामंजस्याची भूमिका घेणार –

 

आपल्याला आयुष्यभर बांधून ठेवते, नात्याची एक रेशमी दोरी

तुमचा जो बाळकृष्ण, तोच माझा सखा श्रीहरी – 

 

तलम उंची पैठणीसारखं, आपलं नातं विणू या

अनुभवाच्या सोनेरी तारांत, मायेचं रेशीम गुंफू या –

 

आई-मुलीचा खोटा मुलामा नको, दिखाव्याचे नसावे कारण

बनू जिवलग सखी एकमेकींच्या, नात्याला बांधू मैत्रीचं तोरण —–

 

कवयित्री :  सुश्री यशश्री रहाळकर

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महाविष्णूंना प्रिय आठ पुष्पे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ महाविष्णूंना प्रिय आठ पुष्पे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

सुधा मूर्ती यांना त्यांच्या आजोबांनी एक श्लोक शिकवला होता. त्यात, भगवान महाविष्णूंना प्रिय असलेली आठ पुष्पे कोणती याची माहिती दिली होती. आजोबांनी अर्थासकट सांगितलेला श्लोक सुधा मूर्ती यांच्या बालमनावर ठसला. ती शिकवण आयुष्यभर आपल्या आचरणात आणून सुधा मूर्तींनी विष्णूभक्तीत कायमस्वरूपी आठ पुष्पे अर्पण केली. ती आठ पुष्पे कोणती, ते आपणही जाणून घेऊ या.

अहिंसा प्रथमं पुष्पम्

पुष्पम् इन्द्रिय निग्रहम् ।

सर्व भूतदया पुष्पम् 

क्षमा पुष्पम् विशेषत:।

ध्यान पुष्पम्

दान पुष्पम् 

योगपुष्पम् तथैवच।

सत्यम् अष्टविधम् पुष्पम्

विष्णु प्रसिदम् करेत ।।

अर्थ : –

१. जाणते-अजाणतेपणी हिंसा न करणे, अर्थात अहिंसा, हे पहिले पुष्प,

२. मनावर नियंत्रण ठेवणे हे दुसरे पुष्प,

३. सर्वांवर प्रेम करणे हे तिसरे पुष्प,

४. सर्वांना क्षमा करणे हे चौथे पुष्प,

५. दान करणे हे पाचवे पुष्प, 

६. ध्यान करणे हे सहावे पुष्प, 

७. योग करणे हे सातवे पुष्प,

८. नेहमी खरे बोलणे, सत्याची कास धरणे हे आठवे पुष्प आहे.

जो भक्त भगवान महाविष्णूंना ही आठ पुष्पे अर्पण करतो, तो त्यांच्या कृपेस पात्र होतो. 

ही सर्व पुष्पे कुठे सापडतील? तर आपल्या देहरूपी वाटिकेत ! या सर्व गोष्टी आपल्या वागणुकीशी निगडित आहेत. म्हणून मोठे लोक नेहमी सांगतात, ‘आचार बदला, विचार बदलेल.’ कोणतीही कृती, विचारपूर्वक केली पाहिजे. आपले विचार चांगले असले, तर हातून वाईट काम, चुकीचे काम घडणारच नाही. कोणावर हात उगारणार नाही, अपशब्द बोलणार नाही, अतिरिक्त माया, संपत्ती गोळा करणार नाही, अनावश्यक गोष्टी साठवणार नाही, मनात कोणाबद्दल द्वेष ठेवणार नाही. कोणाही प्राणिमात्राचा, जीवांचा दु:स्वास करणार नाही. ध्यान, दान, योग याबाबतीत सदैव तत्पर राहीन आणि शाळेतली शिकवण म्हणजे `नेहमी खरे बोलेन.’

देवाच्या आपल्याकडून किती साध्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करता आल्या, तर संपूर्ण आयुष्यच सार्थकी लागेल. तर मग तुम्ही कोणकोणती पुष्पे अर्पण करणार ?

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 2 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 2 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

(सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता.)

(शिपाई मान डोलावत अदबीने निघून गेला. ‘आपल्याला केवढा मोठ्ठा मान दिला जातोय’ असं वाटून जगतापचीही छाती फुगली! त्या आनंदातच तोही परतला.) इथून पुढे —

दोघेही गेल्यावर गणपतरावांनी अक्षरश: झडप घालून ते पत्र हातात घेतलं. आपल्या गुरूंचं पत्र ! आपल्या देवाचं पत्र !! साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पत्र !!! — गेले चार दिवस या-त्या सगळ्या लोकांच्या आणि सगळ्या नेत्यांच्या शुभेच्छा येत होत्या. पण आपली नजर लागली होती ती केवळ याच पत्राकडे. कित्येकदा वाटलं होतं की धावत जावं तात्यारावांकडं आणि सांगावं.. —

– ‘तात्याराव… तात्याराव बघा ! मी मेयर झालोय तात्याराव ! या विद्वज्जनांच्या पुणे नगरीने हिंदूमहासभेच्या बाजूने कौल दिलाय ! तात्याराव, तुमचे हिंदूराष्ट्राचे स्वप्न साकारण्याच्या मार्गात आज अजून एक पाऊल पुढे टाकलंय आपण ! आणि त्या पावलात कणभर का होईना पण तुमच्या या शिष्याचा वाटा आहे …  या गणपत नलावड्याचा वाटा आहे, तात्याराव !’

— आणि ज्यावेळी येणाऱ्या संदेशांपैकी एकही संदेश तात्यारावांचा निघत नव्हता, तेव्हा कसे खट्टू झालो होतो आपण ! नुसत्या आठवणीनेच गणपतरावांना एखाद्या लहान बालकासारखे हसू फुटले !

त्याभरातच थरथरत्या हातांनी त्यांनी ते पत्र एकवार भाळी लावले. मग हलक्या हातांनी त्यांनी ते फोडले. आत सावरकरांनी स्वहस्ते लिहिलेला कागद ! पत्राच्या सुरुवातीस सावरकरांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे लिहिलेल्या ‘श्रीराम’ कडे त्यांनी किंचित काळ डोळे भरून पाहिले. सावरकरांची छबी दिसली असावी बहुतेक गणपतरावांना त्यात ! ते अधीर होऊन वाचू लागले —

“प्रति श्री. गणपत महादेव नलावडे यांस,

सप्रेम नमस्कार.

पुण्याची धुरा आता समर्थ हातात आलीये म्हणायची ! तुम्ही ही नवस्वीकृत भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडालच, यात मला किंचितही शंका वाटत नाही. तुम्हाला या जबाबदारीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !

खरं म्हणजे मी तुमची क्षमाच मागायला हवी. पत्र पाठवायला अंमळ, नव्हे बराचसा उशीरच झालाय. पण काय करू ! तुम्हाला माझे हे भाषाशुद्धीचे धोरण तर ठाऊकच आहे. ज्यांच्याशी भांडायचं त्याच इंग्रजीला आपल्या देशी भाषांचा भ्रतार बनवायचं? तेही आपल्या देशी भाषा स्वत:च अतिशय संपन्न आणि सामर्थ्यवान असताना? आपणच परकीय शब्द घुसडून आपल्या वैज्ञानिक आणि अर्थवाही भाषेचे व शब्दांचे मूल्य का म्हणून उणावून घ्यायचे? …. जिथं स्वकीय भाषांतील प्रतिशब्द उपलब्ध आहेत, तिथे ते योजायलाच हवेत. तिथे इंग्रजीचे वा ऊर्दू-फारसीसुद्धा अन्य कुणाही परकीय भाषेचे भलते लाड नकोतच ! मात्र जिथे शब्दांना प्रतिशब्द उपलब्ध नाहीत, तिथेही देववाणी संस्कृतला शरण जात सोपे, सुटसुटीत आणि अर्थवाही शब्द शोधणे व ते बोलीभाषेत रुळवणे, हे देखील आपले तितकेच महत्वाचे असे राष्ट्रीय कर्तव्य आहे !

उदाहरणार्थ – ते ‘स्कूल’ म्हणतात, मला त्यासाठी ‘शाळा’ हा पर्याय सुचतो.

ते ‘हायस्कुल’ म्हणतात – त्याला आपण ‘प्रशाला’ म्हणू शकतो.

ते ज्याला ‘टॉकीज’ अथवा ‘सिनेमा’ म्हणतात, त्यासाठी ‘बोलपट’ अथवा ‘चित्रपट’ असे दोन शब्द सुचताहेत मला – यातला कोणता शब्द वापरायचा ते तेवढे ठरवायचे.

‘अप-टु-डेट’ला ‘अद्ययावत’ म्हणता येईल,

‘ऍटमॉस्फिअर’ला ‘वायुमान’ म्हणता येईल,

‘पोलिस’ला ‘आरक्षी’ म्हणता येईल.

‘तारीख’ला ‘दिनांक’ म्हणता येईल. असे बरेच काही…

मात्र माझे घोडे या ‘मेयर’ शब्दाच्या तटावर अडले होते. त्यासाठी पर्यायी शब्द काही सुचत नव्हता आणि तुम्हाला ‘मेयर’ म्हणून शुभेच्छा देणे मनाला पटत नव्हते. आता काहीच सुचणार नाही, असे वाटत असतानाच एक शब्द स्फुरला — ‘महापौर .

साधारण मोठ्या गावाच्या प्रमुखास ‘मेयर’ म्हणतात. अश्या मोठ्या गावांच्या मागे ‘पूर’ लावायची आपल्याकडे पद्धत आहे. अगदी वैदिक काळापासून आहे. आणि अश्या ‘पुरा’त राहाणाऱ्या रहिवाश्यांना म्हणतात, ‘पौरजन’. तुम्ही या पुणे नामक ‘पुरा’चे प्रमुख आहात…  प्रथम नागरिक. त्याअर्थी तुम्ही झालात – महापौरजन ! आणि त्याचेच सुटसुटीत रूप आहे – ‘महापौर’!

असा अर्थपूर्ण शब्द सापडल्या-सापडल्या ताबडतोब पत्र लिहावयास घेतले आणि ताबडतोब धाडलेसुद्धा ! तेव्हा, महापौर गणपतराव नलावडे, तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!”

खाली दिनांक आणि सावरकरांची घुमावदार स्वाक्षरी होती!

— पत्र वाचत असतानाच गणपतरावांचे मन सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता, यांच्यासमोर नत झाले होते. भानावर येताच गणपतराव धावत-धावत आपल्या कार्यालयाबाहेर आले. त्यांना असे आलेले पाहून बाहेर उभे असलेले लोक चमकलेच. शिपाई बिचारा गोंधळून उभा राहिला. तिकडे कुठेच लक्ष न देता त्यांनी दारावर लावलेली पाटी उतरवण्याची खटपट चालू केली.

“काय झालं सायेब”, शिपायाने बावरून विचारले.

“तू लागलीच पळ आणि नवी पाटी बनवायला टाक. अश्शीच नक्षी हवीये अगदी ! फक्त त्यावर लिहिलेलं हवंय — “ गणपत महादेव नलावडे, महापौर “! — समजलं? जा लवकर ”, असे म्हणून त्याच्याकडे वळूनदेखील न पाहाता गणपतरावांनी पाटी उतरवण्याचे काम सुरूच ठेवले !

शिपाई बिचारा काहीच न समजून जागीच उभा होता. बेट्याला काय कल्पना की, तो एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला होता !

हो, सावरकरांनी मराठी भाषेला अजून एक चिरंतन टिकणारी आणि लवकरच सर्वमान्य होणारी देणगी दिली होती ! आज एका शब्दाचा जन्म झाला होता !!

— समाप्त — 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 1 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 1 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

(सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता.) 

दारावर मोठ्ठ्या, सोनेरी अक्षरात पाटी डकवलेली होती – 

— “गणपत महादेव नलावडे, मेयर“!

गणपतरावांनी एकवार पाटीकडे नजर टाकली आणि आत, कार्यालयात प्रवेश करते झाले. गेले चार दिवस रोज ही पाटी पाहात होते ते. पुण्याचे मेयर होऊन बरोब्बर चारच दिवस तर झाले होते त्यांना ! बरं कार्यालयात टेबल-खुर्च्या आणि इतर साधनं आहेत, म्हणून त्याला कार्यालय म्हणायचं फक्त. नाहीतर गेल्या चार दिवसांपासून अक्षरशः पुष्पभांडार झालंय त्याचं. हाऽऽ पुष्पगुच्छांचा ढीग ! हार-तुरे, शुभेच्छापत्रे, भेटवस्तू तर वेगळ्याच ! 

गणपतरावांनी खिन्नपणे एकवार सगळ्याकडे नजर टाकली. गणपतरावांना सारंच निरर्थक वाटत होतं.

जागेवर बसल्या-बसल्या न राहावून त्यांनी शिपायाला हाक मारली. तोही धावतच आला.

“जी…?”

“ही एवढीच पत्रं आलीयेत का रे…?”

“व्हय जी!”

“नीट आठवून सांग… एखादं पत्र म्हणा, पाकीट म्हणा वा गुच्छासोबत येते तशी चिठ्ठी म्हणा; नजरेतून सुटली तर नाही ना तुझ्या?”

“न्हाई जी. म्या सोत्ताच तर डाकवाल्याकडनं सारी घेऊन लावून ठेवली हितं!”

यावर गणपतरावांचा चेहरा पडला असावा. कारण, शिपायाने ताबडतोब विचारले– 

“कोन्ता खास सांगावा यायचा हुता का?”

“नाही नाही… काही नाही. जा तू.”

“सायेब, माज्याकडनं काई चूक झाली का?”

“नाही नाही… अरे खरंच तसं काही नाही. जा तू.”

गणपतराव चांगलेच वरमले. ‘ आपण जरा अतीच तर करत नाही ना,’ असंही क्षणभर वाटून गेलं त्यांना.

शिपाई बावळटासारखा चेहरा करून जायला लागला. तशी गणपतरावांनी त्याला थांबवलं. म्हणाले,

“अरे ऐक… आता मी जरा काम करत बसणार आहे. आज काही कुणाच्या भेटी-गाठी ठरलेल्या नाहीत ना…? ठीक आहे तर ! आता कुणालाच आत सोडू नकोस.”

“जी” म्हणून शिपाई निघून गेला. 

‘आपण स्वत:च करावी का चौकशी?’, गणपतरावांच्या मनात येऊन गेलं. पण ‘नको नको. ते बरं दिसणार नाही’, असं म्हणून त्यांनी तो विचार झटकला आणि समोरच्या कामाकडे लक्ष द्यायला लागले. 

हळूहळू तो विचार मागे पडला. त्यानंतर चांगले दोन-एक तास गणपतरावांनी स्वत:ला कामातच बुडवून घेतलं. समाधीच लागली होती जणू त्यांची.

गणपतरावांची समाधी भंगली ती कसल्याश्या कोलाहलाने. सुरुवातीचे एक-दोन क्षण काही समजलंच नाही. नीट लक्ष देऊन ऐकायला लागले तेव्हा जाणवलं की, त्यांच्या कार्यालयाच्या दाराशीच दोन व्यक्ती वाद घालतायत. गणपतरावांनी जागेवरूनच, “काय चाललंय रे? कोण आहे?” असं विचारलं. त्याबरोबर शिपाई धावतच आत आला. मागोमाग एक कार्यकर्त्यासारखा दिसणारा मनुष्यही आत शिरला. ते पाहून शिपायाच्या कपाळाला नकळतच आठ्या पडल्या. पण साहेबांसमोर चिडणं बरं दिसणार नाही म्हणून तो काही बोलला नाही. गणपतरावांनी इशाऱ्यानेच ‘काय झालं?’ असं विचारलं. त्यावर शिपाई सांगू लागला,

“सायेब पाहा ना, तुमीच म्हनले होते ना कुनालाच आत सोडू नको म्हनून. तर ह्ये सायेब ऐकेचनात. काय तर म्हने, टपाल द्यायचंय. म्या म्हनलं, टपालच हाय नव्हं, मंग द्या की माझ्यापाशी मी द्येतो सायबास्नी नंतर. तर म्हनले की, न्हाय, म्हासभेच्या हापिसातून आलोय न् म्हत्वाचा सांगावा हाय. तुमालाच द्यायचा म्हंत्यात…”

गणपतरावांनी आलेल्या व्यक्तीला एकवार आपादमस्तक न्याहाळलं. हिंदूमहासभेच्या कार्यालयातून आल्याचं सांगतोय हा माणूस, पण मग आपण कधी पाहिल्यासारखं का वाटत नाहीये याला?

त्यांचे भाव ओळखून तो समोरचा तरुण मघाशीच्या भांडणाचा लवलेशही न दाखवता उत्साही स्वरात सांगू लागला,— “ मी रविंद्र जगताप. राजापूरला असतो. नुकताच मुंबईला आलोय शिकायला. राजापूरला असल्यापासून महासभेचं काम करतो मी. आज कामानिमित्त पुण्यात येणार होतो. तर काल संध्याकाळीच तात्यारावांनी बोलावून घेतलं..”

— ‘तात्याराव? बॅ. सावरकर?’ हा उल्लेख होताच गणपतरावांनी कान टवकारले ! जगतापच्या ते यत्किंचितही लक्षात आलं नाही. त्याचा ओघ चालूच होता,

“…मी म्हटलं, देईन की त्यात काय ! आता साक्षात स्वा. सावरकरांनी काम सांगितलेलं. त्यांची सेवा करण्याची संधी म्हणजे साक्षात स्वातंत्र्यलक्ष्मीचीच सेवा करण्याची संधी की ! घेतलं पत्र आणि आलो इकडे ! तर हे महाशय आत सोडेचनात ! साहेब कामात आहेत म्हणे ! आता मला सांगा, सावरकरांच्या निरोपापेक्षा अजून कोणतं काम महत्वाचं असणार आहे? घ्या…!!!” – असं म्हणून जगतापने पत्र गणपतरावांच्या दिशेने सरकावले. 

गणपतरावांच्या हाताला हलकासा कंप सुटला होता. परंतु तसं जाणवू न देता त्यांनी ते पत्र हातात घेऊन एका बाजूला ठेवले आणि जगतापकडे वळून म्हणाले,

“जगतापसाहेब, चहा घेता ना?”

“छे छे साहेब, चहा नको. घाईत आहे मी जरा. बाहेर मित्र वाट पहात थांबलेयत. ते काय… ते पुण्यात नवा आहे ना मी. कार्यालय माहिती नव्हतं मला.”

यावर गणपतराव म्हणाले, “हरकत नाही. पुढच्यावेळी आलात तर चहाला जरुर या !” मग शिपायाकडे मान वळवून म्हणाले, “ पुढच्यावेळी हे आले तर अडवू नकोस रे यांना. पाहुणे आहेत आपले !”

शिपाई मान डोलावत अदबीने निघून गेला. ‘आपल्याला केवढा मोठ्ठा मान दिला जातोय ’ असं वाटून जगतापचीही छाती फुगली ! त्या आनंदातच तोही परतला.

– क्रमशः भाग पहिला 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कूर्मजयंती निमित्त —… ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ कूर्मजयंती निमित्त — ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहे. – मंदिराच्या बाहेर कासव असण्याचे महत्त्व —

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. कासवाला श्री विष्णूकडून तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते. कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे. कासव हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.

काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्‍णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

कासवाचे गुण

१) कासवाला ६ पाय असतात, तसेच माणसाला ६ शत्रू असतात.

काम ,क्रोध ,मोह ,लोभ ,मोह आणि मत्सर 

कासव हे सर्व सोडून नतमस्तक होते.  त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडून मंदिरात यावे 

२) कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातून प्रेम देवून वाढवते. त्याच प्रमाणे देवाने आपल्यावर कृपा दृष्टी ठेवावी ही भावना आहे. 

३) कासव आपल्या अष्ट अंगांनी नमस्कार करते.  त्याप्रमाणे आपण पण करावा यांकरीता कासव मंदिरात असते.

४) कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते, त्याप्रमाणे मंदिरात देवासमोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही, हे कासव आपल्याला शिकवते.

कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ

कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ ‘ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते ‘, असा आहे.

आपणास माहिती आहे का की कासव (मादी) ही आपल्या पिल्यांना कधीच दूध पाजत नसते.  तिने आपल्या पिल्लाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लाचे पोट भरते

— त्या प्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे वात्सल्य भावनेने पाहावे, ज्यामुळे न मागता आपल्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्या, या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते.

कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहेत. श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते.

– इदं न मम

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ गीता आणि ज्ञानेश्वरी – ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

वाचतांना वेचलेले

 ☆ गीता आणि ज्ञानेश्वरी – ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

” गीता आणि ज्ञानेश्वरी यात काय फरक आहे?” सखीने प्रश्न विचारल्यावर मी तिच्याकडे बघतच बसले.

” विचार करून सावकाश उत्तर दिलेस तरी चालेल. ” सखीने उदार मनाने मला सवलत दिली.

मी म्हणाले, “गीता आणि ज्ञानेश्वरी यात आई मुलीचे नाते असावे. निश्चित फरक मला सांगता येणार नाही पण ज्ञानेश्वरी मराठी भाषेत असल्याने, तिची भाषा गीतेपेक्षा अलीकडची असल्याने, अधिक विस्तृत असल्याने संकल्पना अधिक स्पष्ट होतात आणि मनाला अधिक तृप्तता येते. ज्ञानेश्वरी वाचनाने वेगळा दृष्टिकोन गवसतो. “

सखी: “उदाहरण दे. “

हिचं डोकं आहे की प्रश्नपत्रिका हा प्रश्न गिळून, मनात ठेवून मी म्हटले, ” भुंगा आणि कमळ म्हटले की काय आठवते?”

सखी: “कमळातील मधाचा मोह झाल्याने भुंगा रात्रभर कमळात अडकून पडतो. “

मी: “बरोबर. आपल्याला आजवर हेच सांगितले गेले आहे. गीताही सांगते की अपेक्षा हे दुःखाचे, बंधनाचे मूळ कारण आहे. पण असे असेल तर भ्रमर वृत्ती चांगली मानली गेली नसती. हे उलगडताना माऊली म्हणतात, कोणत्याही गोष्टीचा अर्थ लावताना सर्व बाजूने विचार करायला हवा.

भ्रमराला लाकडातून बाहेर यायचा मार्ग सापडत नाही म्हणून लाकूड पोखरून बाहेर येतो. लाकूड पोखरणाऱ्या भुंग्याला कमळ पोखरणे अशक्य नाही. परंतु लाकूड आणि कमळ यातील भेद तो जाणतो. रात्र सरेल, सकाळ झाली की पाकळ्या उमलतील आणि आपण मुक्त होऊ, हे त्याला माहीत असते.

जी गोष्ट आपोआप होणार आहे, त्यासाठी विनाकारण कष्ट घ्यायचे, अस्वस्थ व्हायचे कारण नाही. काही कर्म करावी लागतात, तर काही साध्य होण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. काही वेळा कष्ट घ्यावे लागतात तर काही वेळा धीर धरावा लागतो. कृती आणि संयम यापैकी कधी काय करायचे, ते कळणे म्हणजे ज्ञान. गीतेचा कृतीवर भर आहे, तर ज्ञानेश्वरीचा संयमावर, सद्सद्विवेकबुद्धीवर आहे.

ज्या कमळातील मकरंद खाल्ला, त्याला छेद देणे अयोग्य आहे. कमळाच्या कोमल सहवासात राहणे, सकाळ झाली की निघून जाणे, जास्त संयुक्तिक आहे.

गुळाला मुंगळा चिकटून राहतो त्याप्रमाणे पाकळी उमलल्यावर भुंगा कमळाला चिकटून रहात नाही. पोखरत नाही ही कृतज्ञता आणि निघून जातो ही अलिप्तता, दोन्ही गोष्टी माणसात असतात, त्यासाठी फक्त आत्मचिंतन करण्याची गरज असते.

आत्मचिंतन का करावे? हे सांगताना माऊली म्हणतात की प्रत्येक माणसाचा उपजत कल ओळखण्यासाठी आत्मचिंतन करावे. त्यासाठी एका जागी डोळे मिटून काहीही न करता सातत्याने, नियमित शांत बसावे. काहीच न करणे म्हणजे बाह्य गोष्टीकडे आकर्षित न होता स्वतः च्याच मन म्हणजे भावना आणि बुद्धी म्हणजे विचारांकडे लक्ष केंद्रीत करावे. निसर्ग ही खूप मोठी शक्ती आहे, पुरेसा वेळ दिला तर आपल्याला वैश्विक शक्तीशी जोडते.

कमळ म्हणजे बुद्धी,

भ्रमर म्हणजे मन,

पाकळ्या म्हणजे चक्षु,

रात्र म्हणजे अज्ञान,

सकाळ म्हणजे मोक्ष असाही अर्थ होतोच.

प्रत्येक गोष्टीच्या अनेक मिती असतात. सर्व मिती लक्षात येणे, माणसाला शक्य नाही.

पण माणूस जी प्रतिक्रिया देतो त्यावरून त्याचा कल लक्षात येतो.

ध्यान करावे हे गीता सांगते, का करावे हे ज्ञानेश्वरी सांगते.

माणूस एखाद्या शब्दाचा काय अर्थ घेईल, हे त्याच्या धारणाशक्तीवर अवलंबून असते. म्हणून लोकांकडे, बाह्य जगाकडे लक्ष न देता स्वतः च्या प्रेरणेकडे लक्ष द्यावे, हे ज्ञानेश्वरी वाचून कळते.

गीता बुद्धीला खाद्य पुरवते आणि ज्ञानेश्वरी मनाला ताब्यात ठेवायला शिकवते.

पूर्ण टाळून मनाने त्याचा विचार करण्यापेक्षा थोडा अनुभव घेऊन मनाने अलिप्त व्हावे, हा भ्रमर वृत्तीचा अर्थ माऊली सांगतात.

कृतीपेक्षा कल्पना माणसाला जास्त अधोगतीला नेते.

गीता भक्ती शिकवते. डोळ्यांना दिसते त्यावरून, एकच बाजू जाणून निष्कर्ष काढू नये, ही सबुरी ज्ञानेश्वरी वाचतांना येते.

गीता वाचली की छान वाटते, अहंकार सुखावतो. ज्ञानेश्वरी वाचल्यावर आपल्याला काहीच माहीत नाही, ही जाणीव होते. शब्द वाचता येतात पण अर्थ कळण्यासाठी मनन करावे लागते, ही जाग ज्ञानेश्वरी वाचून येते.

गीता शास्त्र असेल तर ज्ञानेश्वरी त्याचा वापर कसा करायचा ते सांगते.

सकारात्मक विचार करायला गीता शिकवते. नम्र रहायला ज्ञानेश्वरी शिकवते.

“काय करावे” ते गीता सांगते. “कसे करावे” हे ज्ञानेश्वरी वाचून कळते.

….

संग्रहिका : डॉ. भारती माटे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मला भावलेले अध्यात्म… ☆ प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

📖 वाचताना वेचलेले 📖

मला भावलेले अध्यात्म… ☆प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

       अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.

       अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.

       अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे. 

       अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागण.

       अध्यात्म म्हणजे वेदा बरोबरच  वेदना वाचता येणे. 

       अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.

       अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.

       अध्यात्म म्हणजे मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे.

       अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे.

       अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे.

       अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे.

       अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.

        अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे.

        अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे. 

        अध्यात्म म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे.

        अध्यात्म म्हणजे गरजुवंतांना यथा शक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे. 

        अध्यात्म म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव अंगी असणे.   

अध्यात्म म्हणजे …. 

          साधं………

          सोपं……..

          सरळ………

         आणि  निर्मळ ……….असणं – दिसणं आणि वागणं. 

आहार या विषयावर अनेक विद्वानांची मते सर्वश्रुत आहेत  आणि प्रत्येक जाती धर्मात यावर मत भिन्नता आहे माझ्या मते वैचारिक शाकाहारच असणे हेच अध्यात्म आहे महत्त्वाचे.   

        अध्यात्म म्हणजे फक्त पूजा – पाठ, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर……

        अध्यात्म म्हणजे केलेली पूजा – पाठ, प्रार्थना आणि भक्ती या प्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे.

        अध्यात्म म्हणजे राष्ट्रपुरुष आणि  राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे.   

थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत नित्य  कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडणे.

संग्राहिका –  सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ …Mother’s Day म्हणजे… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ …Mother’s Day म्हणजे ….  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

जिने बोट धरून पाटीवर अक्षर गिरवण्यास शिकवले… तिला मोबाईलवर टाईप करायला शिकवणं म्हणजे …Mother’s Day

लहानपणी आपल्या जिभेचे चोचले ज्या आईने पुरवले….. *तिला एखाद्या तांराकित हाॅटेल मध्ये दिलखुलास ट्रीट देणं म्हणजे…*,

…Mother’s Day

लहानपणी साडीच्या निर्‍या करायला जिच्याकडून शिकलो, ..त्या आईला केव्हातरी जीन्समध्ये पाहण्याची गंमत म्हणजे …. …Mother’s Day

ज्या आईने आपल्या चेहरा अगदी पुस्तकासारखा वाचून काढला … तिला या टेक्नोसॅव्ही जगात FB शी ओळख करून देणं म्हणजे … …Mother’s Day

बाबांची नजर चुकवून जिने साखरेच्या डब्यात साठवलेले पैसे आपल्यासाठी withdraw केले त्या आईला ATM..मधून पैसे काढायला शिकवणं म्हणजे … …Mother’s Day

जिचा हात पकडून आपण भरभर जिने उतरलो, आणि चढलो,…तिला आताच्या ESCALATOR …वरून सांभाळून घेऊन जाणं म्हणजे…. …Mother’s Day

Best wishes to  wonderful and powerful mother 

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एकटेपणा…” – लेखक : श्री ऐश्वर्य पाटेकर ☆ प्रा.भारती जोगी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “एकटेपणा…” – लेखक : श्री ऐश्वर्य पाटेकर ☆ प्रा.भारती जोगी ☆

‘थिंक पॉझिटिव्ह’ नावाचा एक दिवाळी अंक आज लायब्ररीत हाती आला.. आणि याची थीम आहे “एकटेपणा”.  पूर्ण अंक याच विषयाला वाहिलेला आहे. 

या दिवाळी अंकातील “एकटेपणातून बाहेर येण्याचा रियाज !” हा श्री ऐश्वर्य पाटेकर यांचा लेख वाचनात आला. सदर लेखक हे पहिल्या युवा साहित्य अकादमी पुरस्कार चे मानकरी आहेत, आणि त्यांची ‘भुईशास्त्र’ आणि ‘जू’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.  त्यांच्या या लेखातील एक सुंदर भाग खाली देत आहे. 

*********

“मला आमच्या इथं गावातील बिया वाल्या बाईची गोष्ट आठवते. बिया वाली बाई. सतत बिया गोळा करत असायची. म्हणजे तेच तिचं आयुष्यभराचं काम होऊन गेलं होतं. जिथे बी खोचली तिथं झाड उभं राहायचं.  हा तिचा हात गुण होता की झाडा -कोडावरची माया? माहित नाही. 

मी तिला माझ्या लहान वयापासून पहात आलो. ती सारखी बिया गोळा करायची. तिने पेरलेल्या  बियांमधून किती झाडे उगवून आली, याची मोजदाद कशी करणार? अगणित झाडं.  ज्या झाडाकडे बोट दाखवलं ते झाड बियावाल्या बाईनेच लावलेलं असायचं.  म्हणजे तसं पाहायला गेलं तर उगवून आलेल्या एकूण एक झाडांवर तिची मालकी होती. पण तीने तशी कुठल्याच झाडावर मालकी सांगितली नाही. 

बियावाल्या बाईला मूलबाळ काही झालं नाही. त्याचेही तिला कधी काही वाटलं नाही.

 तिला एकदा आई म्हणाली होती,

“आत्याबाई, तुम्हाला मुलबाळ झाले असतं तर आता नातू -पणतू तुमच्या अंगाखांद्यावर खेळले असते!”

तेव्हा तिचे उत्तर होतं, “नाही झालं तेच बरं! नाहीतर ही झाडा-कोडाची पोरं कुणी सांभाळली असती? ” 

” कसा जन्म जावा ओ आत्याबाई तुमचा?”

तेव्हा ही बिया वाली बाई म्हणाली,  “जसा तुझा भाकरी थापत थापत जाणार तसा माझी झाडे लावता लावता! हा आता मला सांग तुझ्या भाकरी कुणी मोजल्या का? माझी झाडं मात्र मोजली जातात. तुला काय वाटलं मला मुलाची आस नव्हती? 

होती ग.. पार झुरणीला लागले होते. त्यावेळेला माझी आत्या आली मदतीला धावून. तिलाही मूलबाळ नव्हतं. तिने मला एक बी दिली.  म्हणाली, आपली कूस आपण नाही उजवू शकत मात्र मातीची तर उजवू शकतो ना…

दिलेली बी जेव्हा मी आळ्यात लावली तर चौथ्या-पाचव्या दिवशी मातीवर आलेला हिरवा पोपटी कोंब पाहून मी हरकले. जणू मीच बाळंत झाले. मग नादच लागला.. 

अन तसही, किती लेकरा बाळावाल्या आया बाया होत्या माझ्या भवतीच्या. पण आज त्या एकट्याच उरल्या. मी तरी माझ्या झाडांसोबत आहे. 

माझ्या या लेकरा बाळांना पाय नाहीत,  हे एका अर्थी बरंच झालं.! त्यामुळे ते मला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. “

*********

खूप अंतर्मुख केलं बियावाल्या बाईंच्या या छोट्याश्या कथेने.   

…….

वर उल्लेखलेल्या बियावाल्या बाईंना अशिक्षित, अडाणी कसं म्हणायचं?  एकटेपणाच्या जाळ्यात सापडू नये यासाठी 3 सूत्र नकळत आपल्या वागण्यातून देऊन जातात त्या…

पाहिलं सूत्र म्हणजे, “आपल्यातील पॅशन ओळखा, त्यात व्यस्त रहा”,  

दुसरं, “आपलं दुःख कुरवळणं थांबवून, जे आहे त्यातही माझ्या दृष्टीने कसं चांगलंच होतंय असा दृष्टिकोन ठेवा”

आणि तिसरं, खूप महत्वाचे सूत्र म्हणजे, “आपण लावलेल्या झाडांवर कधीही आपली मालकी सांगू नका,  थोडक्यात, detach राह दुसऱ्यांसाठी काही करण्याची सेवावृत्ती अंगी असू द्या.”

लेखक : श्री ऐश्वर्य पाटेकर

माहिती संकलक : प्रा. भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares