मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९८ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- माझी स्वेच्छानिवृत्ती आणि त्याचे मंजुरीपत्र हे विषय माझ्यापुरते मी पुसूनच टाकले होते. पण ते खोटं ठरवणारं, मला अचंबित करणारं वास्तव वखरेसाहेबांच्या केबिनमधे माझी वाट पहातेय याची मला पुसटशीही कल्पना नव्हती.

 आज इतक्या वर्षांनंतरही त्यातला थरार मी विसरू शकलेलो नाहीय.

 मी त्यांच्या केबिनमधे जाताच वखरेसाहेबांनी माझं हसतमुखानं स्वागत केलं होतं.

 “यु आर व्हेरी लकी मिस्टर लिमये. गेम वॉज व्हेरी टफ. बट यू हॅव वन इट.” ते म्हणाले होते.)

आज दिवसभर काय घडत होतं ते त्यांच्याकडून ऐकताना माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. ‘अतर्क्य’ म्हणजे काय याचा प्रत्यय मला प्रत्येक क्षणी येत होता. सहजासहजी घडूच न शकणारं बरंच कांही दिवसभरात घडून गेलं होतं !!

माझ्या कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ, त्यात व्यत्यय आणण्यासाठीच अचानक ठरली असावी अशी आमच्या जी.एम्. मॅडमची ती व्हिजीट, त्यादरम्यान मॅडमनी सूतोवाच केलेली नव्याने येऊ घातलेली ‘स्वेच्छानिवृत्ती’ची गोल्डन शेकहॅंड स्कीम आणि त्याच अनुषंगाने माझ्या आयुष्यांत येऊ पहाणारी अनोखी वळणं न् पुढे त्यात प्रत्येकवेळी निर्माण होत गेलेली अनिश्चितता…!

वखरेसाहेब सांगत होते ते ऐकताना हे सगळंच अधांतर अतिशय अनपेक्षितपणे हळूहळू विरून गेलंय असंच मला वाटतं राहिलं. कारण जे घडलं होतं ते अतिशय अनपेक्षित आणि नेमकं मला हवं तसंच!!

आज पंचवीस वर्षं उलटून गेल्यानंतरही त्या संध्याकाळचे ते क्षण मी विसरूच शकत नाहीय.माझ्या अनोख्या भविष्यकाळासाठी माझ्या संपूर्ण आयुष्यालाच सकारात्मक कलाटणी देणारी ती संध्याकाळ माझ्यासाठी उर्वरीत आयुष्यातली नवी पहाटच ठरली होती..!

वखरेसाहेबांनी सांगितलं त्यानुसार नागपूर रिजनल मॅनेजर श्रीवास्तव साहेब अकोला ब्रॅंचमधील बुडीत कर्जांमधे घोळ घालून ठेवलेल्या आधीच्या मॅनेजर इतकंच नंतर चार्ज घेतलेल्या मलाही जबाबदार ठरवू पहात होते आणि सर्व सुरळीत होईपर्यंत मला स्वेच्छानिवृत्तीसाठी आवश्यक असणारी ‘क्लीनचिट’ द्यायला टाळाटाळ करीत होते.३१ डिसेंबर ही सदर योजनेच्या अंमलबजावणीची अखेरची तारीख उजाडली तेव्हा माझा एकट्याचाच अर्ज अजूनही पेंडिंग असल्याचं लक्षात येताच एम्.डी.आॅफीसने तिथे सर्वांना धारेवर धरलं होतं.मी पुढे चालून आलेली एक सुवर्णसंधी हातून निसटूनच गेलीय हेच गृहित धरुन सगळं नाईलाजाने स्विकारलं होतं त्याचवेळी तिकडं सेंट्रल आॅफिस पातळीवर मात्र या प्रकरणाला अचानक हे वेगळंच वळण लागलं. तिथे हे प्रकरण थेट स्वत:च्या ताब्यात घेतलं ते नेमकं मला व्यक्तिशः ओळखणाऱ्या जी.एम्. मॅडमनीच. आणि दुसऱ्याच क्षणी वखरेसाहेबांच्या फोनचा रिंगटोन! अकोला ब्रॅंचमधील चिघळलेल्या प्रश्नाची सविस्तर पार्श्वभूमी मॅडमनी त्यांच्याकडून समजून घेतली आणि थेट श्रीवास्तव साहेबांना फोन करुन कडक शब्दांत याप्रकरणातील त्यांच्या कॅज्युअल अॅप्रोच आणि टाईम किलींग टॅक्टीजवर ताशेरे ओढत ‘ लिमयेनी तिथे अल्पकाळात प्रतिकूल परिस्थितीत जे कांही काम केलंय त्याचं पूर्ण रेकाॅर्ड झोनल व सेंट्रल आॅफिसमधे सुरक्षित आहे’ असं त्यांना स्पष्ट शब्दात बजावून ‘ घ्याल तो निर्णय पूर्ण जबाबदारीने घ्या आणि त्याच्या परिणामांना सज्ज रहा’ असं त्यांना बजावलं.

पुढच्या पंधरा-वीस मिनिटातच मला क्लीनचीट देणारा फॅक्स श्रीवास्तव साहेबांनी सेंट्रल आॅफीसला पाठवला होता आणि त्याची एक प्रत वखरेसाहेबांकडे.

वखरेसाहेब काय किंवा या जी.एम्.मॅडम काय, या सर्व घटनाक्रमात तिथं दुसरं कुणीही असतं तर? हे असंच या क्रमाने घडलं असतं? सगळं योगायोगानेच घडावं तसंच घडत गेलेलं असूनही त्या मागचा सूत्रधार मात्र ‘तो’च होता. त्या शिवाय हे सगळं असंच घडणं शक्य तरी होतं का? माझ्या आयुष्यातल्या अशा असंख्य बिकट वाटांवरच्या प्रत्येक अंधाऱ्या वळणावर मला लख्ख प्रकाशवाट दाखवणाराही ‘तो’च तर होता!

“सोs..टूमारो वील बी ए लास्ट डे आॅफ युवर सर्व्हिस लाईफ. विश यू आॅल द बेस्ट!” वखरेसाहेबांचे शब्द ऐकून मी दचकून भानावर आलो.स्वप्नवत वाटावेत असे त्यांचे ते शब्द मला भानावर आणतानाच आतून हळवं करून गेले.

“नका काळजी करु.सगळं व्यवस्थित होईल. मी आहे ना?” या त्यांच्याच शब्दांनी कांही दिवसांपूर्वीच मला आश्वस्त केलं होतं आणि आज त्यांचेच शब्द मला आनंदाने नव्या हव्याहव्याशा अशा अनोख्या वाटेवर निश्चिंतपणे मार्गस्थ व्हायचे संकेत देत होते!!

“थॅंक्यू व्हेरी मच सर..थॅंक्स फाॅर एव्हरीथिंग..”

माझा आवाज भरून आला होता. कसंबसं स्वतःला सावरत मी त्यांचे आभार मानले आणि जाण्यासाठी उठलो.

“बसा. हॅव अ कप आॅफ टी वुईथ मी..” ते मनापासून म्हणाले.

आज पंचवीस वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या संध्याकाळपर्यंतचे हे असे सगळे क्षण आपसूकच माझ्या मनात अलगद जपले गेलेयत. कारण माझा अनोखा भविष्यकाळ खऱ्या अर्थाने कृतार्थ करण्यासाठी माझ्या संपूर्ण आयुष्यालाच अतिशय रेखीव अशी सकारात्मक कलाटणी देणारी ती संध्याकाळ माझ्या उर्वरित आयुष्यासाठी एक नवी पहाटच ठरली होती!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “यशामागे काही रहस्य वगैरे नसते…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? विविधा ?

☆ “यशामागे काही रहस्य वगैरे नसते…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

काल खूप दिवसांनी सागर‌ भेटला. मला आवडतो तो मुलगा. खूप positive एकदम शांत. मी त्याला गुरुजीच म्हणते कारण तो माझे मोबाईल चे सर्व doubts शांतपणे clear करतो. नेहमी प्रोत्साहन देतो.

काकू येईल तुम्हाला, असं म्हंटल की माझा पण उत्साह वाढतो.

एका कंपनीचा मालक आहे तो. त्याचे चांगले दिवस खूप कष्टानंतर आले आहेत. स्पष्ट ध्येय, कष्ट, धैर्य, clear thought process व घरच्यांचा सहयोग, हीच यशाची गुरुकिल्ली आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

चांगली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्वतः चा व्यवसाय सुरू करणे, ही धमक आजकाल नवीन मुलांमधे दिसते. त्या प्रवासात येणारे चढ- उतार calculated risk लक्षात घेतलेली असतेच. तरीही सर्व आपण विचार केल्याप्रमाणेच होते असे नसते ना. दुसरे, म्हणजे स्थिरस्थावर व्हायला किती वेळ लागेल?? हे निश्चित नाही. आयुष्याची तरुणाईची महत्वाची वर्षें तीच, कामाची तीच, परिवाराची मजा करायची वेळ पण तीच. म्हणजे संकल्प, त्याग, घरच्यांचे सहकार्य तर हवेच. बरोबर आयुष्याच्या गणिताकडे पण लक्ष द्यायचे आहे. सर्व गोष्टींचा balance सांभाळुन काम करायचे. कुठे थांबायचे ?? कुठे रेघ ओढायची ???हे समजले पाहिजे. व तसे वागताही आले पाहिजे. कुठे लक्ष द्यायचे ??व कुठे दुर्लक्ष करायचे ??हे ही ठरविता आले पाहिजे. पडलो तर उठून उभा राहिन ही धमक व आत्मविश्वास पाहिजे. ‌व अशा वेळेस घरच्यांचा विश्वास व आधार हवाच. .

काही लोकांना सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचार करून त्यांची क्रमवार मांडणी करता येते. तीच यशाची पहिली पायरी असते असं नाही की ते खूप हुशार असतात. पण त्यांना हे नक्की माहित असतं. केंव्हा काय करायचे.

विचार स्पष्ट असले व स्वतः वर विश्वास असला तरच ते करता येते. दुसरं म्हणजे यश आणि अपयशाकडे बघायचा त्यांचा योग्य दृष्टिकोन असतो. यशाची कारणे व अपयशाचे बरोबर विश्लेषण करता येते त्यांना. अशी माणसे blame game खेळत नाही. सर्व जबाबदारी स्वतः वर घ्यायची हिम्मत ठेवतात. लहान सहान गोष्टींवर लक्ष देत नाही. व घाबरत तर त्याहून नाही. कोणाचे ऐकायचे व कोणाचे नाही हे त्यांना छान जमते.

यशस्वी माणसे खूप चतुर असतात.  ते focussed असतात. शिस्तप्रिय असतात. कोणत्याही कामात मदत लागतेच, तेंव्हा योग्य लोकांची निवड करणे हे महत्त्वाचे, कारण आयुष्याला चांगले वळण मिळायला चांगल्या वेळेची नाही तर चांगल्या माणसांची गरज असते.  

टीम management, योग्य कार्य पध्दती, कर्मचाऱ्यांचे आपापसातील संबंध, थोडक्यात आपल्या टीम ला एक मोठा परिवार समजून ज्याला काम करणे जमते, तो अर्धी लढाई तर तेथेच जिंकतो.

रोज रात्री दुसऱ्या दिवशी चे planning व दिवस संपला की त्याचे विश्लेषण ही सवय असली, तर वेळ वाया जात नाही. व योग्य दिशेने प्रवास होतो. विचारांना योग्य दिशा देता येते. सर्वात सुक्ष्म पण ताकदवर काही असेल‌ तर ते आपले विचार असतात. परिवर्तन आणण्याची अफाट शक्ती असते त्यांच्यात. संधी चालून येत नसते. ती शोधायची असते व मिळताच त्याचे सोने करता आले पाहिजे.

सर्व सामान्य माणसांची परिस्थिती साधारण सारखीच असते. झेप घेण्याची तयारी, मेहनत करण्याची प्रबळ इच्छा असली तर कदाचित वेळ लागेल पण यश नक्कीच. मिळते.  

गीतेतही सांगितले आहेच जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल.

आजचा दिवस चांगला जाणार या विचाराने जर दिवसाची सुरवात केली तर कठिण प्रसंगाचा सामना करायचे बळ आपल्या विचारांतच मिळते.

आज सागर बरोबर गप्पा मारताना चर्चेत बऱ्याच गोष्टी कळल्या. ‘ Positivity ‘ खऱ्याखुऱ्या अर्थाने समजली नवीन पिढी बद्दलचा माझा आदर अजूनच वाढला.

नवीन पिढी हुषार आहे. त्यांचे विचार, risk घेण्याची तयारी, आपल्या कामाचे ज्ञान व अभ्यास खरच कौतुकास्पद आहे.

बदलत्या जगाबरोबर धावणे जमते त्यांना. आपला मार्ग ते स्वतः आखतात. अनुभवाने श्रीमंत होतात. अशी मुले रोज नव्याने आयुष्य जगतात.

सागर सारखी मुले सध्या चालू असलेल्या ‘आत्मनिर्भर भारत ‘ या मोहिमेत आपले योगदान देत आहेत.

“जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी ही थांबवू शकत नाही.”

म्हणतात ना

“यशामागे काही रहस्य वगैरे नसते. प्रचंड कष्ट व योग्य नियोजन आणि अपयशातून जिंकायची वृत्ती त्यातुन हे साध्य करता येते.”

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “साडेतीन शहाणे…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “साडेतीन शहाणे…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

साडेतीन म्हटल्यावर नकळतच तोंडातून शहाणे असाच पुढचा शब्द बाहेर पडतो. किंवा साडेतीन शहाणे अस म्हंटल्यावर पेशवाई व सोबत सखारामपंत बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस हीच नांव डोळ्यासमोर येतात.

पेशवाईच्या अगोदर किंवा नंतर अशा प्रकारची माणसं नव्हती किंवा नाहीत अस नाही. पण पेशवाई आणि हिच नांव साडेतीन शहाणे असा ऊल्लेख झाल्यावर येतात.

राजेशाही, पेशवाई संपली. राज्य, संस्थानं जाऊन देश, व प्रादेशिक प्रदेश म्हणजे राज्य उदयास आली. याच बरोबर वेगवेगळे पक्ष आणि त्या पक्षातल्या खंबीर नेतृत्वाची माणसं समोर आली. काहिंंनी खंबीरपणे पक्षाच नेतृत्व केलं. तर आपण खंबीर असल्याच्या बळावर काहींनी वेगळा पक्ष, गट तयार केला. तसंच काही घराणी आणि घराण्यातली काही माणसं कर्तुत्ववान असल्याच दाखवत त्यांना पुढे आणण्याचा अटोकाट प्रयत्न सुरु झाला, व तो अजूनही काही प्रमाणात बर्‍याच ठिकाणी सुरु आहे. आणि हीच राज्य, पक्ष, आणि कुटुंबातील काही माणसं पाहिली की परत आठवण होते ती साडेतीन शहाणे या शब्दाची.

पेशवाई काळातले साडेतीन शहाणे यांचा ऊल्लेख नक्की कोणत्या अर्थाने (म्हणजे चांगले का कारस्थानी) करतात हे ठामपणे सांगता आलं नाही तरी ते नक्की कोण आणि त्यातले पूर्ण आणि अर्धे शहाणे कोण हे पक्क होतं. या माणसांची आज एक उद्या अर्धा अशी अदलाबदल नव्हती. पण आज जाणवणाऱ्या साडेतीन शहाण्यांच तसं वाटत नाही.

कारण आज जो पूर्ण शहाणा वाटतो तो कदाचित उद्या अर्धा शाहणाच वाटेल, किंवा शहाणा या यादितही नसेल. तसेच सध्या एकाच पक्षात, राज्यात, घराण्यात या प्रकारचे लोक असल्याच बोललं जातं. सत्तेसाठी किंवा विरोधासाठी एकत्र येण्याचा कल दिसतो. यासाठी धर्म, जात, भाषा, ऊत्सव या (साडेतीन) गोष्टिंचा आधार घेतलेला दिसतो. काहीवेळा खरंच याच गोष्टिंना आधार देण्याची, व यांचा आधार घेण्याची गरज आहे याची जाणीव होते. तर काही वेळा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी याचा वापर केला असं वाटतं. मग यासाठी एकत्र आलेल्या लोकांमधे या प्रकारचे साडेतीन शहाणे सत्तेेसाठी, विरोधासाठी एकत्र असल्याचा सुर निघतो. या एकत्र आलेल्या साडेतीन शहाण्यांचे परत आपले आपले साडेतीन शहाणे असल्याची चर्चा होते. आणि या साडेतीन शहाण्यांची साखळी किंवा संख्या वाढत जाते असं वाटलं तरी जनमानसात सगळ्यांचा ऊल्लेख साडेतीन शहाणे असाच होतो. आणि बर्‍यचदा त्यात उपहास, टिंगलच जाणवते.

यातला एखादा मुळातच अर्धा असतो. पण आपणच पूर्ण असल्याच्या विश्वास त्याला वाटतो. लोक आपल्यामागे फिरतील असा भ्रम त्याच्या मनात निर्माण झाल्याने मग तो तळ्यात मळ्यात करतो. आणि तो येऊन मिळाल्याने अगोदर संख्येने तीन असणारे व्यावहारिक द्रृष्ट्या साडेतीन झाल्याची चर्चा सुरू होते. विचारांप्रमाणे या चर्चेत गांभीर्य, उपहास, विनोद सगळच जाणवतं.

मुहूर्तांंमधे साडेतीन मुहूर्त, देेवस्थानात साडेतीन शक्तीपीठं हे शब्द कायम वापरले जातील. तसंच शहाणे हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला तरी साडेतीन शहाणे असा वापर यापुढे सुध्दा होत राहील असं वाटत.

 ©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘संपूर्ण शरणागतीचे तत्वज्ञान’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘संपूर्ण शरणागतीचे तत्वज्ञान’ ☆ श्री दिवाकर बुरसे

प्रपत्ती : संपूर्ण शरणागतीचे तत्त्वज्ञान

भक्ती, तत्त्वज्ञान आणि कृपायोगाचा दिव्य संगम

 प्रस्तावना : अहंकारापासून अनंताकडे

मानवी जीवनाच्या आध्यात्मिक प्रवासात एक असा टप्पा येतो की जिथे साधकाला स्वतःच्या प्रयत्नांची मर्यादा जाणवते. त्याच्या अध्यात्मप्रवासात एक क्षण असा येतो की प्रयत्नांची शिडी संपते आणि कृपेचे आकाश सुरू होते.

ज्ञान, कर्म, साधना, तपस्या — या सर्व मार्गांनी प्रयत्न करताना अखेरीस मनाला उमगते की अंतिम सत्य प्राप्त करण्यासाठी अहंकाराचा सर्वस्वी त्याग आणि परमेश्वरावर संपूर्ण विश्वास अत्यावश्यक आहे. याच अवस्थेला भारतीय ‘ विशिष्ठाद्वैत तत्वज्ञान’ परंपरेत “प्रपत्ती” असे म्हणतात.

संस्कृतमधील “प्र + पत्” या धातूपासून सिद्ध झालेला हा शब्द पूर्णपणे शरण जाणे, स्वतःला अर्पण करणे असा अर्थ व्यक्त करतो.

भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाचे प्रसिद्ध वचन या तत्त्वज्ञानाचे सार सांगते —

“सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।

अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥”

(भगवद्गीता १८. ६६)

या एका श्लोकात प्रपत्तीचा संपूर्ण आध्यात्मिक अर्थ सामावलेला आहे.

 

१. प्रपत्ती : तात्त्विक संकल्पना

प्रपत्ती म्हणजे स्वकर्तृत्वाचा अभिमान सोडून परमेश्वराच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवणे.

भक्तीमार्गात ही अवस्था तेव्हा येते जेव्हा साधकाला स्वतःच्या मर्यादा स्पष्ट जाणवतात. त्या क्षणी तो म्हणतो —

“मी नाही; सर्व काही तूच. ”

या भावनेचे वर्णन करताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, “आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥” माणूस स्वतः काही करीत नाही; करणारा खरा परमेश्वरच आहे.

 

२. रामानुजाचार्य आणि प्रपत्तीचा मार्ग

आचार्य रामानुज (१०१७–११३७) यांनी प्रतिपादित केलेल्या विशिष्टाद्वैत वेदान्तात प्रपत्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

त्यांच्या मते जीव आणि परमेश्वर यांचे नाते शेष–शेषी असे आहे —

जीव हा परमेश्वरावर अवलंबून असलेला अंश आहे.

रामानुजाचार्यांच्या “शरणागति गद्य” या ग्रंथात ते परमेश्वराला विनवतात —

“नारायण! तव पादारविन्दयोः शरणं प्रपद्ये।”

ही केवळ प्रार्थना नसून पूर्ण आत्मसमर्पणाची अनुभूती आहे.

 

३. प्रपत्तीची सहा अंगें

या परंपरेत शरणागतीची सहा लक्षणे सांगितली आहेत —

“अनुकूल्यस्य संकल्पः प्रतिकूलस्य वर्जनम् ।

रक्षिष्यतीति विश्वासो गोप्तृत्ववरणं तथा ।

आत्मनिक्षेपकार्पण्ये षड्विधा शरणागति: ॥”

या सहा अंगांमध्ये प्रपत्तीचे संपूर्ण स्वरूप दिसते.

अनुकूलस्य संकल्पः — ईश्वराला अनुकूल तेच आचरण करणे

प्रतिकूलस्य वर्जनम् — प्रतिकूल गोष्टींचा त्याग

रक्षिष्यतीति विश्वासः — परमेश्वर रक्षण करील हा दृढ विश्वास

गोप्तृत्ववरणम् — त्यालाच पालनकर्ता मानणे

आत्मनिक्षेपः — पूर्ण आत्मसमर्पण

कार्पण्यम् — स्वतःची दीनता स्वीकारणे

 

४. भक्तिमार्गी संतपरंपरेतील प्रपत्ती

संतपरंपरेत प्रपत्तीचा भाव अत्यंत सजीवपणे व्यक्त झाला आहे. दासबोधात समर्थ रामदासस्वामी म्हणतात,

“आपण मिथ्या साचा देव । देव भक्त अनन्यभाव ।… या नाव आत्मनिवेदन ॥”

(४. ९. २२)

रामरायाकडे समर्थ मागणे काय मागतात पहा, “मजविण तू मज दे रे राम!

 मीराबाईंचं ईश्वराशी हे एकरूप होणं पहा…

“लाली मेरे लालकी जिथ देखूं तिथं लाल

लाली देखन मै गयी, मै ही होगई लाल! “

तुकाराम महाराज म्हणतात,

“घालुनिया भार राहिलो निश्चिंती ।

……….

खुंटले सायास आणिक या जीवां ।

धरिले केशवा पाय तुझे ॥

तुज वाटे आता करी रे अनंता ।

तुका म्हणे संता लाज माझी ॥”

 

संत एकनाथ महाराज म्हणतात,

” अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता ।

चरणी जगन्नाथा चित्त ठेले ॥

माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ ।

अनाथांचा नाथ जनार्दन ॥

एका जनार्दनी एकपणे उभा ।

चैतन्याची शोभा शोभतसे ॥ “

 

५. प्रपत्ती आणि कृपायोग

प्रपत्तीचा मार्ग हा केवळ साधकाच्या प्रयत्नांवर आधारित नाही; तो ईश्वरकृपेवर आधारित आहे. भक्त सतत प्रेमपूर्वक भजन करतो, तेव्हा परमेश्वर स्वतः त्याला मार्ग दाखवतो.

श्रीवैष्णव तत्त्वज्ञानात मोक्ष हा केवळ साधकाच्या साधनेचा परिणाम नसून परमेश्वराच्या निरपेक्ष कृपेचा प्रसाद मानला जातो. प्रपत्ती म्हणजे त्या कृपेचे द्वार उघडणारी अंतःकरणाची अवस्था होय.

 

६. प्रपत्तीचे आध्यात्मिक सौंदर्य

प्रपत्ती म्हणजे पलायन नव्हे; ती आहे अहंकारावर मात करून अनंताशी एकरूप होण्याची प्रक्रिया.

जेव्हा भक्त म्हणतो —

“मी तुझा आहे; तूच माझे सर्वस्व आहेस. ”

तेव्हा त्या क्षणी भक्त आणि भगवान यांच्यातील भेद विरघळतो, द्वैत विरते!

 

७. आत्मनिवेदन आणि प्रपत्ती

नवविधा भक्तीतील ‘आत्मनिवेदन’ आणि रामानुजाचार्यांची ‘प्रपत्ती’ हे दोन्ही पूर्ण शरणागतीचे सिद्धांत आहेत, पण त्यांची तात्त्विक चौकट, रचना आणि पायऱ्यांमध्ये स्पष्ट भेद आहे.

 

आत्मनिवेदनची व्याख्या:

नवविधा भक्ती ही भगवद्गीतेच्या भक्तियोगावर आधारित नऊ पायऱ्यांची प्रक्रिया आहे, ज्यात नववी पायरी ‘आत्मनिवेदन’ आहे. यात भक्त स्वतःचा देह, मन, धन, कर्तृत्व आणि फळ—सर्वस्व भगवंताला समर्पित करतो, “मी तुझाच” ही श्रद्धा दृढ पणे अंतःकरणात बाळगतो. यात ईश्वरावर संपूर्ण विश्वास आणि स्वातंत्र्य-अहंकाराचा पूर्ण त्याग करून वाट्याला आलेल्या सुख-दुःखाला त्याचीच इच्छा मानणे हे मुख्य आहे.

 

प्रपत्तीची व्याख्या:

रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैत वेदांतात प्रपत्ती ही शरणागतीची प्रक्रिया आहे, जी कर्म-ज्ञान-भक्तींपेक्षा थेट परमेश्वरकृपेवर अवलंबून आहे. यात वर उल्लेखिलेली सहा अंगे आहेत: अनुकूल कर्मांचा संकल्प, प्रतिकूलांचा त्याग, रक्षकत्वाचा विश्वास, गोप्तृत्वस्वीकार, कार्पण्य (असहाय्यता) आणि आत्मनिक्षेप (आत्मार्पण). ही संरचित, शास्त्रोक्त पद्धत मोक्षासाठी एकमेव साधन मानली जाते

 

साम्याचे मुद्दे:

दोन्ही सिद्धांतांचा केंद्रबिंदू “पूर्ण समर्पण” हा आहे—अहंकारत्याग, ईश्वरकेंद्रित जीवन, कृपेवरील अवलंबन आणि स्वतःचे सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण. भावार्थाने ही एकाच अध्यात्मिक सत्याची दोन रूपे दिसतात.

 

भेदाचे मुद्दे:

भावतत्त्वाने दोन्ही जवळजवळ समान आहेत, पण शास्त्रीय रचना, परंपरा आणि तात्त्विक चौकटीमुळे हे वेगळे सिद्धांत मानले जातात. त्यांना एकच म्हणता येत नाही.

 

८. उपसंहार : समर्पणातच अनंत

मानवी जीवनात ज्ञान, साधना, तपस्या आणि कर्म यांना महत्त्व आहे. परंतु या सर्व प्रयत्नांचा अंतिम अर्थ तेव्हाच उमगतो जेव्हा साधकाला समर्पणाची अनुभूती प्राप्त होते.

 

प्रपत्ती म्हणजे प्रयत्नांचा पराभव नव्हे;

ती आहे अहंकारावरचा विजय होय.

भक्ताच्या अंतःकरणात जेव्हा ही जाणीव उमलते —

“देवा, मी तुझा आहे. ”

तेव्हा परमेश्वरही जणू त्याला अश्वासक उत्तर देतो —

“हो, तू माझाच आहेस.”

अशा या दिव्य संवादातच भक्तीचा परमोच्च क्षण जन्म घेतो.

आणि त्या क्षणी साधकाला उमगते —

समर्पणातच स्वातंत्र्य आहे,

आणि शरणागतीतच मोक्ष आहे!

 

त्वमेव माता च पिता त्वमेव

त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव

त्वमेव सर्वं मम देवदेव ॥

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देवाचे दर्शन…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “देवाचे दर्शन…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

कुणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराज यांचे घर शोधत शोधत फार लांबून आला होता.

नाथांच्या दारात आल्यावर त्याचा अवघा शीण निघून गेला.

त्याच्या मनात एक अधीरता, उत्कटता दाटून आली होती. मं

घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ब्राह्मणाने त्यांचे पाय धरले.

हात जोडून तो नाथांना म्हणाला की,

“नाथबाबा,

मला_भगवंताचं,

श्रीकृष्णाचं दर्शन घडवा. “

एकनाथ महाराज यांना काहीच समजेना.

हा कोण कुठला ब्राह्मण?

आपली व त्याची ओळख पण नाही,

त्याला मी कोठे रहातो?

हे पण माहीत नाही.

माझे घर शोधत शोधत तो आलाय.

तेवढ्यात तेथे गिरीजादेवी (नाथांच्या पत्नी) आल्या.

त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे, ते ऐकले होते.

नाथांनी त्याला उठवून जवळ घेतले.

पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता.

“नाथबाबा, मला भगवंताचे,

श्रीकृष्णाचे दर्शन घडवा. “

त्या ब्राह्मणाची नजर घराचा कानाकोपरा शोधत होती.

नाथांनी त्याला मंचकावर बसवले.

स्वत:च्या हाताने त्याचे पाय धुतले.

तोपर्यंत गिरीजादेवींनी गूळपाणी आणले.

ते पाहून त्या ब्राह्मणाचे ढमन भरून आले.

तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला की,

“नाथबाबा, मला १५ दिवसांपूर्वी दृष्टांत झाला.

भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले की,

‘मी एकनाथ महाराज यांच्या घरात गेली 12 वर्ष झाली श्रीखंड्याच्या रूपात रहात आहे.

आता माझी येथून जायची वेळ झाली आहे.

तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल तर तू एकनाथ महाराज यांच्या घरी ये. ‘

नाथबाबा,

मला सांगा ना, 12 वर्ष तुमच्या घरात भगवान रहात होते.

ते कोठे आहेत? “

हे ऐकून गिरिजादेवींची शुद्ध हरपली.

नाथ देहभान विसरले.

प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या १२ वर्षांपासून पाणी भरत होता.

आपल्याला त्याने साधी ओळख पण दिली नाही.

इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन १५ दिवस अगोदर त्याला सांगितले.

तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो, असे सांगून निघून गेला होता.

नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले.

गिरिजादेवी भानावर आल्या.

मग श्रीखंड्याच्या आठवणी मनात येऊ लागल्या.

ते श्रीखंड्याचे साधेपण,

त्याची प्रत्येक हालचाल,

शांतपणे आपले काम करणे

काल जातानाचे त्याच मुग्ध हसणे.

नाथांचे डोळे भरून वाहू लागले.

त्यांनी ध्यान लावले.

त्यांना समजले की,

खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, व्दारकेचा राजा आपल्या घरात पाणक्या बनून गेली १२ वर्ष रहात होता.

इकडे गिरीजादेवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती.

दोघांनीही एकमेकांकडे पाहिले.

गिरीजादेवी मनात म्हणत होत्या की….. ‘चोर, माखनचोर, चितचोर..

बारा वर्ष आमच्या जवळ राहिलास पण कळूनही दिले नाहीस.

इतक्या वर्षात तू

 आमच्यावर अपार माया केलीस. ‘

नाथ खांबाला धरून ऊठले.

त्यांनी रांजण पाहिला,

त्याला स्पर्श केला.

श्रीखंड्यान बारा वर्षं खांद्यावरून वाहिलेली कावड पाहिली, तिला स्पर्श केला.

नाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.

श्रीखंड्या जिथे जेवायला बसायचा,

जिथे विश्रांती घ्यायचा

नाथ श्रीखंड्याचा स्पर्श जेथे जेथे झाला होता,

तेथे तेथे हाताने स्पर्श करू लागले.

गिरीजादेवींनी तर डोळ्यांतील अश्रूंनी,

श्रीखंड्या जिथे बसत असे, तेथली जमीन अक्षरशः भिजवून काढली.

कंठ दाटून आला.

त्यांनी आकाशाकडे बघितले.

आणि त्या म्हणाल्या की,

“हे भगवंता,

सगळीकडे तूच आहेस,

डोळ्यांत तूच, देहात तूच,

अंतर्बाह्य तूच आहेस.

आमच्या घरात श्रीखंड्याच्या रूपात तूच राहत होतास.

आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजलो.

आम्हाला क्षमा कर देवा

_श्रीकृष्णा…..

पण तू जर खरोखरच श्रीखंड्याच्या रूपात आमच्याकडे गेली १२ वर्ष रहात होतास, हे खरे असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंड्याची खूण दे….. “

काय आश्चर्य…..

त्याबरोबरच रांजण दुथडी भरून वाहू लागला,

जोरात वारा सुटला कोपऱ्यातली श्रीखंड्याची घुंगूरकाठी त्या वाऱ्याने पडली.

घुंगरांचा आवाज झाला.

त्या घुंगूरकाठीला एक भरजरी शेला बांधलेला होता.

त्या शेल्यातून केशर- कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडेच व्यापून उरला.

तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता.

तो आ वासून हे बघत होता.

भगवान श्रीकृष्णाने त्याची पण इच्छा पूर्ण केली होती.

आपल्या सगळ्यांची अवस्था पण तीच असते.

देव कुणाच्या तरी रूपात

आपल्या आसपास रहात असतो.

आपली सेवा करत असतो.

आपल्याला मदत करत असतो.

आणि आपल्याला हे माहीत नसते.

कळते तेव्हाच,

जेव्हा ती व्यक्ती निघून जाते.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मीराबेन☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ मीराबेन ☆ शालिनी जोशी

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे समर्थन करण्यासाठी आपला देश सोडून आलेली मीराबेन.हिचे मूळ नाव मॅडलीन स्लेड. जन्म २२ नोव्हेंबर १८९२. वडील ब्रिटिश नेव्हीत ऑफिसर होते. सर एडमंट स्लेड वडिलांचे नाव आणि फ्लोरेंन्स आईचं नाव. एका सुस्थितीतल्या ब्रिटिश कुटुंबातल्या मॅडलीनला लहानपणापासून निसर्ग व घोडेस्वारीची आवड.तसेच संगीताची ही आवड होती.पियानो आणि संगीत मैफलीत भाग घेत असे. एकदा त्यासंबंधी कामासाठी जर्मनीला गेली असता रोलॅंडने लिहिलेल्या  महात्मा गांधी यांच्या चरित्राविषयी कळले. दुसरे ख्रिस्त आणि विसाव्या शतकातील महान व्यक्तिमत्त्व असे त्यांचे वर्णन ऐकून ती भारावली.

इंग्लंडला परत आल्यावर रोलँड ने लिहिलेले गांधी चरित्र वाचले. आणि गांधीजींची शिष्य होण्याचे, जीवन त्यांना समर्पित करण्याचे ठरविले. त्यासाठी तयारी म्हणून आधी साबरमती आश्रमातील साहित्याचा अभ्यास केला. मांडी घालून बसणे शिकली. आहारात बदल केला. शाकाहार स्वीकारला मांस व मद्याचा त्याग केला. सुत कातणे,लोकर विणकाम शिकली. इंग्लंडमध्ये यंग इंडियाची सदस्य झाली.  भगवत् गीता, ऋग्वेद वाचण्याचा अभ्यास केला.

१९२५ मध्ये गांधींची संपर्क साधून त्यांच्या आश्रमात राहण्याची परवानगी मागितली. भारतात येऊन गांधींना भेटल्यावर गांधींनी ‘तू माझी मुलगी होशील’ असे म्हणून तिला ‘मीराबेन’ नाव दिले. आपले जुने जीवन ती विसरली.१९२५ च्या भारतीय काँग्रेसच्या पहिल्या वार्षिक सभेला त्या उपस्थित राहिल्या. साबरमती आश्रमात सुतकताई, विणकाम, स्वयंपाक, स्वच्छता अशी कामे त्या करत. गुजराती व मराठी शिकल्या. साबरमतीत स्वतःने विणकाम केंद्र सुरू केले. रवींद्रनाथ यांच्या शांतिनिकेतनला भेट दिली.१९३१ च्या गोलमेज परिषदेसाठी गांधींबरोबर केल्या. गांधीना अटक झाल्यावर त्यांनाही अटक झाली. आर्थर रोड आणि साबरमती तुरंगात राहावे लागले.

इंग्लंडमध्ये जाऊन सरकारला पटवून दिले की, भारत देश चालवायला समर्थ आहे. ब्रिटिश वसाहत वादामुळे ग्रामीण उद्योगांचा विनाश होतो. उच्च कर लादले जातात. भारत छोडो चळवळीत गांधी व कार्यकर्त्यांबरोबर त्यांनाही अटक झाली. दोन वर्षे पुणे येथे आगाखान पॅलेस मध्ये होत्या. नंतर हरिद्वार येथे किसान आश्रम स्थापला. गो संरक्षणाचे काम केले. भारताच्या स्वातंत्र्याची संबंधित सिमला परिषद, संविधान सभा, भारताची फाळणी आणि गांधीहत्येच्या त्या साक्षीदार होत्या. स्वातंत्र्यानंतर शेती, दुग्ध व्यवसाय, वनसंरक्षण, पर्यावरण या क्षेत्रात काम केले. पुढे १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाल्या. १९८२ मध्ये मृत्यू झाला. त्यापूर्वी १९८१ मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. त्यांनी काही पुस्तके लिहिली स्वतःचे चरित्र, गांधींची मीरेला पत्रे इ. अशा प्रकारे एका सुखवस्तू  ब्रिटिश घरातील मुलगी आपले पूर्वीचे नावासकट सर्व विसरली आणि भारतीय नेत्याची कार्यकर्ती व मुलगी म्हणून राहणे पसंत केले. सगळेच अतर्क्य !

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १३ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १३ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

गाथेतून उमजणारी गीता(३)

अर्जुनाला रणभूमीवर माझ्याच नातेवाईकांना मी कसे मारू असा जेव्हा भ्रम झाला त्यावेळी, माता, पिता, बहीण, बंधू, भार्या, अपत्ये ही सर्व नाती कशी असत् आहेत, आणि मी- कृष्ण हेच कसे परब्रह्म आहे याचा उपदेश श्रीकृष्णाने गीतेत केला. त्याच परमतत्वानुसार

तुकाराम महाराज सर्व मोह पाशातून मुक्त झाले आहेत. म्हणून ते म्हणतात,

बाप मेला न कळता/ नव्हती संसाराची चिंता/

विठू तुझे माझे राज्य/ नाही दुसऱ्याचे काज/

बाईल मेली मुक्त झाली/ देवे माया सोडविली/

पोर मेले बरे झाले/ देवे माय विरहित केली/

माता मेली मज देखता/ तुका म्हणे हरली चिंता/

ज्या ज्या गोष्टी असत् आहेत, त्याचा विनाश अटळ आहे हे सत्य स्वीकारण्याची शक्ती जेव्हा अंगी येते, तेव्हाच सत् ची, परमतत्वाची, परब्रम्हाची ओळख पटते. त्याचवेळी जिवा शिवाचे ऐक्य होऊ शकते.

जोपर्यंत माणूस संसार बंधनात अडकून पडलेला आहे, तोपर्यंत त्याला संसाराचे भय असते. एकदा का त्याला संसार हा भासच आहे याची खात्री पटली की तो भव भयापासून मुक्त होतो. महाराज आता संसारातून पूर्णपणे निवृत्त झाले आहेत. त्यांना कसल्याही भोगाची आसक्ती राहिली नाही. म्हणून ते देवाजवळ बोलतात,

 भोगावरी आम्ही घातला पाषाण/ मरणा मरण आणियेले/

 विश्व तू व्यापक काय मी निराळा/ कशासाठी बळा येऊ आता/

 काम सारुनिया काढावे बाहेरी/ आणूनी भितरी काय ठेवू/

 तुका म्हणे काही नेणे लाभ हानी/ असेल तो धनी राखो वाडा/

मी गुणातीत आत्मा आहे. मला देह दुःख नाही अशा भूमिकेचा दगड भोगांच्या डोक्यावर ठेवून मी मरणाचा अंत केला आहे. देवा तू जर विश्वव्यापक असशील, तर मी त्यापेक्षा निराळा नाही. अशा परिस्थितीत मला वेगळेपणाचा खटाटोप करण्याची काय जरूर आहे? तू आणि मी एकच आहोत. लाभ किंवा हानीची परवा तू असताना मी का करावी? मी काही लाभ हानी जाणत नाही, जो या देहाचा धनी असेल तोच त्याचे रक्षण करेल.

याचसाठी तुकाराम महाराज त्यांच्या गाथेतून साधकांना विठ्ठलाच्या चिंतनाचे महत्त्व सांगतात.

 काय नोहे केले/ एका चिंतीता विठ्ठले/

 सर्व साधनांचे सार/ भवसिंधू उतरी पार/

 योगयागतपे/ केला त्याने अमुपे/*

 तुका म्हणे जपा/ मंत्र त्रीअक्षरी सोपा/

एका विठ्ठलाच्या चिंतनाने काय मिळत नाही? हा भव सिंधू पार करण्यासाठी विठ्ठल हा त्रि अक्षरी मंत्र पुरेसा आहे. योग, याग, साधना वगैरे गोष्टींची काहीही आवश्यकता नाही.

सर्वतोपरी देहाभिमान शून्य होणे म्हणजेच योग आणि तप आहे. तोच परमार्थ आहे. ज्यावेळी देहाभिमान नाहीसा होईल त्याचवेळी जन्ममृत्युरूपी येरझार थांबेल.

योग तप याची नावे/ गणित व्हावे अभिमाने/७

 करणे ते हेचि कर/ सत्य बरा व्यापार/

 तरी खंडे येरझार/ निधे भार देहाचा/

जेव्हा विषयसुख गोड वाटते, तेव्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडून किती यातना भोगाव्या लागतात याचे वर्णन महाराज त्यांच्या या अभंगात करतात.

 विषयाचे सुख /येथे वाटे गोड/

 पुढे अवघड/ यमदंड/

 मारिती तोडिती/ जोडीतील निष्ठुर/

 यमाचे किंकर/ बहु साल/

 असिपत्र तरुवर/ खैराचे इंगळ/

 निघतील ज्वाल/तैल पाकी/

 तप्तभूमीवरी/ चालविती पायी/

 अग्निस्तंभ बाही/ कवटाळविती/

 म्हणूनी तुका येतो काकुळती/ पुरे यातायाती गर्भवास/

क्षणिक विषयसुखाचे भोगावे लागणारे परिणाम किती भयंकर आहेत याची कल्पना तुकारामांच्या या अभंगातून आपल्याला येते.

एका नामात हरी वसलेला आहे, परंतु आपल्यासारखी सामान्य माणसे देहातच सर्व सुख आहे असे मानतात व त्यामुळे परब्रम्हप्राप्ती आपल्यापासून दूर पळते.

देह हा सादर पहावा निश्चित/ सर्व सुख येथे नाम आहे.

आपल्याला मिळालेल्या देहाकडे आदराने जरूर पहावे, परंतु एक परब्रह्म, एक नामच सर्व सुखाचे साधन आहे.

लटक्या संसारात माणूस अडकतो. लोभ, मोह इत्यादी षड्रिपूंच्या जाळ्यात सापडतो. त्याला हरिनामाचा विसर पडतो. खूप पैसा जमवण्याची धडपड करतो. शेवटी या क्षणभंगुर देहाचा नाश होतो आणि बापाने ठेवलेल्या पैशांवरून दोन भावांचे आपसात भांडण लागते.

 लटीकियाच्या आशा/ होतो पडिलो वळसा/

 होऊनिया दोषा/ पात्र मिथ्या अभिमाने/

 बारावी उघडली दृष्टी/ नाहीतरी होतो कष्टी/

 आक्रंदते सृष्टी/ मात्र या चेष्टांनी/

 मरणाची नाही शुद्धी/ लोभी प्रवर्तली बुद्धी/

 परती तो कधी/ घोड्याची ना माघारी/

 साचवुनी मरे धन/ लावी पोरांची भांडण/

 नाही नारायण / तुका म्हणे स्मरला.

 संसारी माणसाची अशी ही शोककथाच आहे.

आता हा पुढील अभंग पहा.

 येथे नाही उरी आले अवतार/ येरे ते पामर जीव किती/

 विषयाचे झणी व्हाल लोलिंगत/ जेवलीया अंत नलगे भंग/

 वाहून या भार कुंथसील ओझे/ नवे तेचि माझे थीता त्याग/

 तुका म्हणे कैसी नव्हे त्याची लाज/ संती केशी-राज साधियाला/

या अभंगात तुकाराम महाराज प्रापंचिकाला उपदेश करीत आहेत. या ठिकाणी अवतार हा शब्द नारायणाच्या मत्स्य, कुर्म आदी दशावतारांना उद्देशून आला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की जिथे हे अवतार सुद्धा राहिले नाहीत तिथे सामान्यांची काय कथा? विषयाची आसक्ती माणसाला कुठे नेईल त्याचा काही नेम नाही. जे खरोखर आपले नाही, त्याचे ओझे खांद्यावरून विनाकारण वाहून हे माणसा तू स्वतःला कष्ट देऊ नकोस. त्यामुळे स्वहिताचा त्याग होईल. केशव हाच परमात्मा आहे, त्याला साध्य करण्यातच स्वहित आहे.

स्वतः तुकाराम महाराज निःसंग होऊन अहोरात्र गोविंदाचे पोवाडे गात होतेच आणि लोकांनाही भवभयापासून मुक्त व्हावे यासाठी ते सावध करीत होते. विठ्ठलाचे नाव वाचेत असल्यामुळे विषयात अडकलेल्या तुकारामांना  योग्य मार्ग सापडला. कृष्णाने अर्जुनाला गीतेत हेच सांगितले होते की तू कृष्ण भावना भावित होणे जरुरीचे आहे.

क्रमशः… १३

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- “नेमक्या कोणत्या थकीत कर्ज खात्यांमध्ये मी वसुलीसाठी आवश्यक तो पाठपुरावा योग्य पध्दतीने केलेला नाही हे त्यांनी निदर्शनास आणून द्यायला नको कां? सरसकट आरोप करून ते समाधानकारक स्पष्टीकरणाची अपेक्षाच कशी करू शकतात सर? ‘अकोला ब्रँचचा मी चार्ज घेण्यापूर्वीची तिथल्या गलथान कारभाराची नेमकी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगू कां? ‘ असं तेव्हा मी विचारलं होतं ना सर, ते यासाठीच.. ” मी म्हंटलं.

“तुम्ही जे कांही सांगणार होतात ते मला जरूर सांगा. पण या सगळ्याचं विनाकारण दडपण नका घेऊ. होईल सगळं व्यवस्थित. मी आहे ना? ” वखरेसाहेब म्हणाले.

वखरेसाहेबांच्या या शब्दांमधून जणू ‘तो’च मला आश्वस्त करतो आहे असंच वाटत राहिलं…!

पण पुढे घटनाच अशा घडत गेल्या की कांहीतरी विपरीत होणार असल्याच्या आशंकेने माझं मन सैरभैर होऊ लागलं..! )

इथून स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठीचे अर्ज फाॅरवर्ड झाले त्याला चारसहा दिवस उलटून गेले होते. त्या अर्जांची छाननी करून अर्ज स्वीकृती, अस्वीकृती किंवा त्यांचे प्रलंबन याबाबतचे निर्णय सेंट्रल आॅफिसमधील संबंधित डिपार्टमेंटने तात्काळ म्हणजे ३१ डिसेंबर अखेर कोणत्याही परिस्थितीत घ्यायचे होते. तसे सख्त आदेश एम. डी. आॅफीस कडून त्यांना देण्यात आले होतेच. त्यानुसार तिथे युध्दपातळीवर सर्व कामे सुरूही झाली होती. त्यामुळे रोजच्या इनवर्ड मेलमधे पुणे रिजनमधील स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्यांची मंजूरीपत्रे रोज टप्प्याटप्याने येऊही लागली होती. अर्थात नाॅर्मल रूटीनमधे मलाही अर्ज स्वीकारल्याचं पत्र अपेक्षित होतंच. तरीही अकोला ब्रॅंचमधील थकीत कर्ज खात्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नामुळे जो अडसर निर्माण व्हायची शक्यता होती त्यामुळे फार तर चार दोन दिवस उशीरा मंजुरीपत्र येऊ शकेल असं मला वाटलं होतं. पण झालं भलतंच. मी नागपूर रिजनल आॅफीसला पाठवलेल्या सविस्तर उत्तरानंतर मला त्यांच्याकडून खरंतर पुढे कसलीही विचारणा किंवा अधिक स्पष्टीकरणाची मागणी आलेली नव्हती. तरीही एकेक दिवस उलटत चालला पण या बाबतीतली माझी प्रतीक्षा मात्र संपली नाहीच. वखरेसाहेब गेले चार दिवस ब्रॅंचेस् व्हिजीटच्या पूर्वनियोजित टूरवर होते त्यामुळे नेमकं काय करावं मला सुचेना. वाट पहाण्याशिवाय पर्यायच नव्हता. तो टूर प्रोग्राम संपवून साहेब आॅफिसला आले ते ३० डिसेंबरला. त्यांच्या अनुपस्थितीतल्या महत्त्वाच्या पेंडिंग मॅटर्सचा निपटारा करण्यात दिवसभर ते पूर्णत: व्यस्तच होते त्यामुळे त्यांना श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती.

एकदा वाटलं त्याना भेटावं आणि सांगावं सगळं. निदान मनातली चलबिचल तरी कमी होईल. पण मलाच ते योग्य वाटेना. ते टूरवरून दमून आले होते. पुन्हा दिवसभर कामांचं दडपण. ते चिडले नक्कीच नसते पण तरीही..? माझ्या समोरचा प्रश्न माझ्या जीवनमरणाचा नाहीये हे मी स्वत:ला समजावलं आणि मनातले ते उलटसुलट विचार झटकून टाकले. ३० डिसेंबरचा दिवस असाच कोरडेपणाने उलटूनही गेला!

३१ डिसेंबर २००० चा दिवस उजाडला. त्यादिवशीही इनवर्ड मेलमधे माझ्यासाठी कांहीच नव्हतं!

अखेर परतीचे दोर असे पूर्णत: कापलेच गेले होते. आता यापुढे अधांतरी लटकत नाही रहायचं. जे समोर आलंय ते आहे तसं स्वीकारून पुढं जायचं आणि तेच आपल्या हिताचं असणाराय असा विचार केला आणि मन एकदम शांत झालं. आता माझा अर्ज प्रलंबित तरी रहाणार किंवा थेट नाकारला तरी जाणार हे जवळजवळ ठरल्यातच जमा होतं. यापैकी कांहीही झालं तरी ते माझ्यावर अन्याय करणारंच होतं. तरीही त्यानंतर नेमकं जे कांही होईल त्यानुसार तेव्हा काय करायचं करायचं ते वखरेसाहेबांशी बोलून ठरवता येईल असा विचार केला. वखरेसाहेबांची अशी आठवण झाली आणि सकाळपासून आपण त्यांना भेटलोच नव्हतो हेही लक्षात आलं. आज अर्जमंजूरीचा अखेरचा दिवस. त्यांना माझ्याबाबतीतल्या या अडचणीची पूर्वकल्पना असूनही त्यांनी गेल्या पंधरा दिवसांत त्याबाबत कांहीच केलं नाहीय यामागेही कांहीतरी कारण असणारच ना? त्यांच्यामागेही इतर अनेक व्यवधानं होती त्यात ते हा विषय विसरलेही असतील कदाचित. कांहीही असो पण जे व्हायचं ते आता होऊन गेलंय. आमचा लंचब्रेक झाला. मी सोबत आणलेला माझा डबा उघडला. तोंडात घास घेताना हात अडखळला. आपला इथला अन्नाचा शेर अद्याप संपलेला नाहीय असा विचार मनात आला न् मग माझं मलाच हसू आलं. आपण किती वरवरचा विचार करत असतो असंच वाटत राहीलं. जे कांही घडणार आहे ते तोच घडवणार आहे, मग आपला अन्नाचा शेर कुठं आणि किती दिवस हे ठरवणारे आपण कोण?

माझं खाणं आवरलं. शिपायाने सर्व्ह केलेला चहा घेऊन मी माझ्या टेबलावरची पुढची फाईल समोर ओढली तेव्हाच इंटरकाॅमची रिंग वाजली. फोन रिसेप्शनिस्टचा होता. ‘जस्ट अ मिनिट’ म्हणत तिने तो बंद केला. कदाचित वखरेसाहेबांनी आपल्याला बोलावलं तर नसेल? असंही वाटून गेलं पण ते तेवढंच. कारण माझी स्वेच्छानिवृत्ती आणि त्याचे मंजूरीपत्र हे विषय माझ्यापुरते मी पुसूनच तर टाकले होते! पण.. ते खोटं ठरवणारं, अचंबित करणारं वास्तव वखरेसाहेबांच्या केबिनमधे माझी वाट पहातंय याची मला पुसटशीही कल्पना नव्हती!

आज इतक्या वर्षांनंतरही त्यातला थरार मी विसरू शकलेलो नाहीय.

मी केबिनमधे जाताच वखरेसाहेबांनी माझं हसतमुखाने स्वागत केलं.

“काॅंग्रच्युलेशन्स अॅण्ड आॅल द व्हेरी बेस्ट.. ” ते म्हणाले.

त्यांचे प्रसन्नचित्ताने मला अशा शुभेच्छा देणं माझ्यासाठी त्याक्षणी वास्तव नव्हे तर स्वप्नवतच वाटत राहिलं.

“बसा.. ” ते म्हणाले.

“यू आर् व्हेरी लकी मिस्टर लिमये. गेम वाॅज व्हेरी टफ. बट यू हॅव वन इट.. “

” म्हणजे..? ” मी न समजून विचारले.

“मिस्टर श्रीवास्तव, अवर नागपूर रिजनल मॅनेजर वाॅज नाॅट रेडी टू गीव्ह क्लीनचीट टू यू. तुमच्या Voluntary retirement साठी it was a big obstacle.. ” ते म्हणाले.

पण मग हा तिढा असा अचानक सुटला कसा हेच मला समजेना.

” तुम्ही नका दडपण घेऊ. होईल सगळं व्यवस्थित. मी आहे ना..? ” कांही दिवसांपूर्वीचे मला आश्वस्त करणारे वखरे साहेबांचे शब्द मला आठवले. ते केवळ माझी समजूत घालण्यासाठी बोललेले वरवरचे शब्द नव्हते याची ग्वाही आज दिवसभरात काय घडलं ते त्यांच्याकडून ऐकताना मला प्रत्येक क्षणी जाणवत होतं!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पत्र लेखन + अभिनंदन – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌺  अ भि नं द न  🌺

कर्मयोगिनी महिला संस्था, पुणे यांनी ‘पत्रलेखन स्पर्धा’ आयोजित केली होती. या स्पर्धेत आपल्या समुहातील साहित्यिका विभावरी कुलकर्णी यांच्या पत्रलेखनास प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ई-अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे विभावरी कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐💐

आजच्या अंकात वाचूया त्यांचे प्रथम पुरस्कार प्राप्त रचना – “पत्रलेखन…”

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆

🔅 विविधा 🔅

☆ पत्रलेखन ☆ विभावरी कुलकर्णी

(प्रथम पुरस्कार प्राप्त)

****

आदरणीय मॅडम,

सप्रेम नमस्कार.

आज तुम्ही आमच्यात देहरूपाने नसलात, तरी तुमची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. आपली पहिली भेट झाली तेव्हा जणू काही जन्मांतरीचे ऋणानुबंध असावेत, असा भास झाला होता. तुमच्या भेटीमुळे कोड्यासारखे गुंतागुंतीचे वाटणारे माझे आयुष्य एखाद्या सुंदर फुलासारखे उलगडत गेले. तुम्ही मला आयुष्याचा खरा उद्देश समजावून सांगितलात आणि त्यामुळेच मला जीवनाची एक नवी दिशा सापडली.

आज मी जी काही यशस्वी ‘रेकी मास्टर’ आहे, ते केवळ तुमच्यामुळेच. तुम्ही दिलेली दीक्षा, तुमची शिकवण आणि तुम्ही करून घेतलेली प्रात्यक्षिके माझ्या यशाचा पाया ठरली. तुमच्या मार्गदर्शनाखाली मी विविध ध्यानाचे (Meditation) प्रकार शिकले. तुमच्या सान्निध्यात आल्यावरच मला जाणीव झाली की माझी ज्ञानाची झोळी किती रिकामी होती. प्रत्येक शिष्याला समान वागणूक आणि समान ज्ञान देण्याची तुमची वृत्ती आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी होती.

रेकीचा खरा अर्थ आणि या पवित्र प्राणशक्तीचा उपयोग कसा करावा, याचे पूर्ण ज्ञान तुम्ही मला दिलेत. पंचमहाभूते, त्यांची उपयुक्तता आणि त्यांची ऊर्जा कशी प्राप्त करावी, हे तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून शिकवलेत. रेकीचा उगम आणि त्यामागचे शास्त्र तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले की, त्यामुळेच मला आज समाजसेवेची संधी प्राप्त झाली आहे. तुम्ही दिलेल्या शिकवणीचा उपयोग मी आज लोकांसाठी करत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत.

कृतज्ञतेत कसे राहावे, आभार मानण्याचे महत्त्व काय असते, चराचर सृष्टीशी स्वतःला कसे जोडून घ्यावे आणि भूतदया कशी असावी, सर्वात राहून अलिप्त कसे असावे, लोभ – मोह दूर कसे ठेवावेत, निरपेक्ष वृत्तीने सेवा कशी करावी.

हे संस्कार तुम्ही माझ्यावर बिंबवलेत. आजही एखादा कठीण प्रसंग समोर उभा ठाकला की, तुमच्या नोट्स आणि तुमची शिकवण मला मार्ग दाखवते. आजही मनातल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या आठवणींतून मिळतात. आपल्यात गुरु-शिष्या पलीकडचे एक अतूट नाते निर्माण झाले होते. आपण दोघींनी मिळून मेडिटेशनवर एक पुस्तक लिहायचे ठरवले होते, पण काळाने ती इच्छा अपूर्णच ठेवली.

तुमची शिकवण आणि तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहेत, याची मला खात्री आहे. ते आशीर्वाद असेच कायम लाभोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

सदैव आपल्या कृतज्ञतेत,

तुमची शिष्या,

विभावरी

—–

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आकाश कवेत, पाय मात्र जमिनीवर… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

🔅 विविधा 🔅

☆ आकाश कवेत, पाय मात्र जमिनीवर… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

१९९२ मध्ये भारत सरकारने जे आर डी टाटा यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी किताब देऊन त्यांचा सन्मान केला. ही आनंदाची बातमी त्यांना रतन टाटा यांनी कळवली. ही बातमी ऐकल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली, ती त्यांचे मोठेपण दर्शवणारी आहे. ते म्हणाले, ” O my God, why I am selected for this honour? आपण हे थांबवण्यासाठी काही करू शकतो का? भारतात इतरही अनेक महान लोक आहेत जे भारतरत्न या किताबास पात्र आहेत. मी असे काय मोठे केले? मी जे काही माझ्या आयुष्यात केले ते माझे कर्तव्यच होते. मी ते उत्तम प्रकारे पार पाडले एवढेच! मी देशाला विमानसेवा दिली आणि मूल्याधारीत उद्योगसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला. पण म्हणून मी एवढ्या मोठ्या सन्मानाला पात्र आहे का? “

पदव्यांसाठी, पुरस्कारांसाठी हव्यास करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही प्रतिक्रिया आहे. आज प्रत्येक जण मोठेपणाला हपापलेला असतो. मी इतरांपेक्षा किती श्रेष्ठ, मला किती समजते हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतो. कधी कधी हे दाखवण्याच्या प्रयत्नात ती व्यक्ती केविलवाणी दिसते हेही खरेच! राजकारण हे खरे तर समाजसेवेचे क्षेत्र. परंतु या क्षेत्रात काम करणारे समाजसेवेच्या उद्देशाने अभावानेच येतात. बहुतेकांना सत्ता किंवा पद हवे असते. ते नाही मिळाले तर ते वाटेल त्या थराला जाण्यासाठी कमी करत नाही हे आजकाल आपण पाहतो आहोत. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून दुसऱ्या पक्षात असे सारखे पक्षांतर सत्तेसाठी सुरू राहते.

ज्याप्रमाणे जेआरडी टाटा यांनी त्यांना भारतरत्न पुरस्कार भारत सरकारने जाहीर केल्यानंतर प्रतिक्रिया दिली ती पाहून म्हणावेसे वाटते की खरोखर अशा व्यक्ती धन्य होत. भारताचे भूषण होत. कोणतीही अपेक्षा न बाळगता अशा व्यक्ती आपले कर्तव्य निरलसपणे करीत राहतात.

असेच आणखी एक उदाहरण आठवते. १९५२ सालची गोष्ट आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांनी जर्मनीतून इस्रायलमध्ये स्थलांतर केले होते. त्यावेळी इस्रायलचे पहिले अध्यक्ष चॅम वेजमेन यांचे नुकतेच निधन झाले होते. अशावेळी आईन्स्टाईन यांना इस्रायलचे दुसरे अध्यक्ष होण्याबद्दल विचारण्यात आले. त्यांच्यासारख्या अत्यंत बुद्धिमान व्यक्तीने इस्रायलचे अध्यक्ष व्हावे अशी जनतेची इच्छा होती. वास्तविक जर्मनीतून आलेल्या एका अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा हा फार मोठा सन्मान होता. परंतु आईन्स्टाईन यांनी अत्यंत नम्रपणे ही ऑफर नाकारली. ते आपल्या उत्तरात म्हणाले, ” तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे. त्यासाठी आपला मनापासून आभारी आहे. परंतु त्याचबरोबर मला हेही आपल्याला सांगितले पाहिजे की आपण जे पद मला देऊ करत आहात त्या पदावर बसण्याची माझी पात्रता नाही. कारण गुंतागुंतीच्या अशा मानवी संबंधांच्या क्षेत्रात मला फारसं कळत नाही. त्या विषयाचा मी कधी अभ्यासही केला नाही. मला गणितात आणि भौतिकशास्त्रात थोडीफार गती असेल पण माझी मनापासून अशी इच्छा आहे की त्याच क्षेत्रात मी आणखी परिश्रम करावेत आणखी अभ्यास करावा. “

महान व्यक्ती खरोखरच महान का असतात त्याचे उत्तर म्हणजे मला वाटतं वर आईन्स्टाईन यांनी दिलेली प्रतिक्रिया. नाहीतर आपल्याला एखादे पद मिळावे म्हणून आपण किती आसुसलेले असतो. आपल्याला कोणत्याही विषयात गती आहे आणि आपल्याला कोणतेही काम जमू शकते अशा विचाराने सत्तेकडे किंवा पदांकडे धाव घेणाऱ्यांची सध्या कमतरता नाही. परंतु जेव्हा अशा अयोग्य किंवा अपात्र व्यक्ती पदावर येतात तेव्हा ते त्या पदाला न्याय देऊ शकत नाहीत हे आपण पाहतो.

रामकृष्ण परमहंस, संत गाडगेबाबा, विनोबा भावे, साने गुरुजी यांच्यासारखी थोर मंडळी कोणालाही आपल्या पाया पडू देत नसत. वास्तविक ते काय किंवा आणखी इतर संत काय यांची योग्यता खरोखरच फार मोठी! पण त्यांचे म्हणणे असे असायचे की वाकायचंच असेल तर त्या सर्वशक्तिमान अशा परमेश्वरापुढे वाका. इतरांपुढे नाही. दुसऱ्याला आपल्यापुढे वाकायला लावून काहीच साधत नाही. वाकायला लावणाऱ्याचा अहं वाढत जातो आणि वाकणाऱ्याच्या मनात कमीपणाची भावना!

आम्हाला तर आमच्या कोणी पाया पडले तर केवढा आनंद होतो! आमचा अहम सुखावतो! मला किती लोक नमस्कार करतात हे आपण इतरांना अप्रत्यक्षपणे दाखवून देतो आणि आपण किती मोठे आहोत हेही त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. अर्थात सगळेच असे असतात असे नाही. काही जण ज्यांच्या पुढे वाकावे किंवा नम्र व्हावे अशा योग्यतेचे असतातच!  

या सगळ्या थोर व्यक्तींनी दाखवून दिले आहे की, ‘पद’ माणसाला मोठे करत नाही, तर ‘कर्तृत्व’ आणि ‘नम्रता’ या गुणांमुळे माणूस मोठा होतो. कवी दत्ता हलसगीकर आपल्या कवितेत म्हणतात

“आभाळाएवढी उंची ज्यांची, त्यांनी थोडे खाली झुकावे,

मातीत मळले जन्म ज्यांचे, त्यांना जरा उचलून घ्यावे…”

महाराष्ट्राच्या मातीतील संतांनी तर ही ‘उंची’ प्रत्यक्ष जगून दाखवली. संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर हातात खराटा घेऊन स्वच्छतेचे कार्य केले. लोक त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे, पण ते स्वतः मात्र गरिबांच्या झोपड्यांत जाऊन त्यांना ‘उचलून धरण्याचे’ काम करत राहिले. त्यांनी सत्तेच्या सावलीलाही स्पर्श केला नाही. तर दुसरीकडे साने गुरुजी यांनी आपल्या साध्या राहणीतून आणि उच्च विचारांतून समाजाला माणुसकीचे धडे दिले. त्यांनी कधीही राजकीय पदाची अभिलाषा धरली नाही, उलट मातीत मळलेल्या कष्टकरी वर्गाला स्वाभिमान मिळवून दिला.

आज आपण पाहतो की, कोणत्याही छोट्या पदासाठी लोक एकमेकांचे पाय ओढतात. ‘आधी सिद्धी आणि मग प्रसिद्धी’ हे जीवनाचे सूत्र आहे. यशाचा मंत्र आहे. पण याचा विसर पडल्यामुळे केवळ नावासाठी आणि प्रसिद्धीसाठी धावणारी माणसांची शर्यत दिसते. खरी श्रेष्ठता आधी ‘सिद्ध’ करण्यात असते. मग प्रसिद्धी आपोआपच मिळते. ‘ न मागे तयाची रमा होय दासी ‘ असे म्हटले जाते. ज्यांच्याकडे खरोखरच ‘उंची’ असते, त्यांना ती ओरडून सांगावी लागत नाही; ती त्यांच्या नम्रतेतूनच झळकत असते.

शिखरावर जाणे महत्त्वाचे आहेच, पण त्याच वेळी पाय जमिनीवर असणे हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे. कारण जमिनीवर पाय असतील तरच माणसाला दुसऱ्याची वेदना समजते आणि आकाशाचा आवाका उमजतो. या सगळ्या व्यक्तींच्या कवेत आकाश होते पण पाय मात्र जमिनीवर होते.

कविवर्य बा भ बोरकर यांच्या ‘लावण्यारेखा’ या कवितेतील या ओळी मला फार आवडतात. ते म्हणतात

जीवन त्यांना कळले हो

मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो.

****

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares