☆ मराठी साहित्य – विविधा ☆ भारताचा नदीजोड प्रकल्प – भाग – 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(लोकनेते राजारामबापू जन्मशताब्दी निमित्त मराठी वि न परिषद इस्लामपूर यांच्यातर्फे घेतलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)
१) उत्तर हिमालयीन नद्यांचा जोड .
गंगा यमुना मेघना यांचे प्रवाह पश्चिमेकडे वळवून कालवा व जलाशय बांधावेत अशी कल्पना आहे .ब्रह्मपुत्रेचे तर आपण फक्त 25 टक्केच पाणी वापरतो. बरेचसे पाणी वाया जाते .नदी प्रवाह वळविला तर पूर नियंत्रणाबरोबर वीज निर्मिती व सिंचनवाढ होईलच .त्याच बरोबर त्याचा फायदा नेपाळ आणि बांगलादेशलाही होईल. हिमालयीन घटकांसाठी 14 अंतर दुवे योजिले आहेत .
घागरा –यमुना /सारडा- यमुना / यमुना –राजस्थान/ राजस्थान –साबरमती / कोसी– घागरा –कोसीमेची / मानस –संकोष / टिस्टा– गंगा / जोगिगोपा– टिस्टा –फरक्का / गंगा –दामोदर– सुवर्णरेखा / सुबरनरेखा– महानदी / फरक्का –सुंदरबन/ गंडक –गंगा / सोनमधरण– गंगा जोडव्याच्या दक्षिण उपनद्या—– या योजनेपैकी बरेचसे अभ्यास पूर्ण झाले आहेत.
२) द्विपकल्प घटक.
या घटकाचे पुन्हा उपभाग केले आहेत.
अ) पहिल्या टप्प्यात गोदावरी– महानदी —कृष्णा आणि कावेरी कालव्याद्वारे जोडल्या जातील .या नद्यांच्या काठावर धरणे बांधून त्याचा उपयोग दक्षिण भागासाठी केला जाईल.
ब) दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या उत्तर आणि तापीच्या दक्षिणेकडून पश्चिमेकडील काही नद्या जोडल्या जातील. याचा उपयोग मुंबईला आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात सिंचनासाठी होईल.
स) तिसऱ्या टप्प्यामध्ये केन आणि चंबळ जोड ,हा मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागासाठी उपयुक्त ठरेल.
द) चौथा टप्पा हा पश्चिम घाटातील अनेक पश्चिमवाहिनी नद्यांना, कावेरी आणि या पूर्व वाहिनी नद्याना सिंचनासाठी जोडल्या जातील .द्वीप घटकांच्या अंतर्गत आणखीही जोड विचाराधीन आहेत.
3) इन्ट्रास्टेट घटक.
महानदी — गोदावरी हा 800 किलोमीटर लांबीचा प्रकल्प तिस्ता –महानंदा –सुवर्णरेखा नद्यांमधून भूतान कडून आंध्र मधील गोदावरी पर्यंत उद्भवणाऱ्या संकोषा नदीला जोडेल .अलमट्टी– पेन्नर– नागार्जुनसागर — सोमासिला जोडाचा खर्च कमी होण्यासाठी वेलीगोंडा बोगद्याने श्रीशैल्यम ते सोमासिला जलाशयात रूपांतर केले. पांबा — अंजकोविल , पार– तापी — नर्मदा– परबती –काळी, सिंध –चंबळ, पोलावरम– विजयवाडा, श्रीशैल्यम– पेन्नर हे वापरात आहेत .दमणगंगा —पिंजल ,कट्टलई– वैगाई– गंदर, केन –बेतवा ,नेत्रावती–
हेमावती ,बेटी –वरदा वगैरे जोड प्रकल्पांपैकी ,काहींचे अभ्यास पूर्ण झाले आहेत. पेन्नयार– शारंगपाणी हा इन्ट्रास्टेट नसला तरी बिहारने सहा, महाराष्ट्राने 20, गुजरात, ओरिसा, तामिळनाडू, झारखंड यांनीही जोडणी प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. बियास– सतलज तसेच पेरियार — वायगई जोड पूर्ण झाले आहेत.
अशा या महाकाय प्रचंड खर्चाच्या, पण खूप मोठ्या फायद्याच्या प्रकल्पां बद्दल अनेक टीकाकारांनी शंका व्यक्त केल्या . पूर नियंत्रणासाठी दुसरे पर्याय वापरावेत. पर्यावरणाला धोका पोहोचेल .काही भागातील जमिनीची क्षारता वाढेल. अनेक कुटुंबे विस्थापित होतील . जैवविविधतेवर परिणाम होईल. नदी शंभर वर्षांनी पात्र बदलते, मग याचा काय उपयोग ? प्रस्ताव खूप महाग आहे .त्यामुळे आरोग्य, शिक्षण ,रस्ते या क्षेत्राकडे निधी कमी होईल.
जागतिक स्तराचा विचार करता असे प्रकल्प किती फायदेशीर झाले आहेत याची अनेक उदाहरणे सांगता येतील. डँन्यूब कॅनॉल, उत्तर समुद्र आणि अटलांटिक महासागर– काळा समुद्र जोड, जगातील सर्वात मोठा जिन्शा नदीपासून सहाशे किलोमीटर लांबीचा, 63 बोगद्यांसह , युनान प्रांतातला प्रकल्प, यांगत्से –येलो जोड , स्पेन मधील चार नद्यांची खोरी जोड, मरे –डार्लिंग जोड ,अमेरिकेतील इलिमाँय नद्या, तलाव, आणि मिसिसिपी नदीमार्गे मेक्सिको पर्यंत 540 किलोमीटर लांब, टेनेसी –टाँबी ७३७७कि.मी. जलमार्ग , गल्फ इंस्ट्राकोस्टल — फ्लोरिडा ते टेक्सास १७००कि.मि.चा जलमार्ग हे सर्व प्रकल्प फायदेशिर व यशस्वी झाले आहेत.नदीजोड प्रकल्प राज्यांतर्गत राबविण्याचे धोरण राज्य सरकारने यापूर्वीच स्वीकारून शिक्कामोर्तब झाले आहे .1979 पर्यंत भारताने 600 हून अधिक धरणे बांधली आहेत. उल्हास, वैतरणा ,नारपार ,दमणगंगा, खोऱ्यातील 360 अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी गोदावरी कडे वळवून ,मुंबई कोकण आणि दुष्काळी मराठवाड्याकडे त्याचा फायदा दिला जाणार आहे.
पन्नास वर्षापूर्वी राजारामबापूंच्या कारकिर्दीत ते कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर या दुष्काळी भागांसाठी खुजगाव धरणासाठी आग्रही होते. त्यावेळी शिराळा ,वाळवा तालुक्यात पाण्याचे साठे होते. त्यावर राजकारण झाले आणि ते न झाल्यामुळे राज्याचे नुकसान झाले. तेव्हा त्यांचा आग्रह मानला असता तर, त्या भागाचा पन्नास वर्षापूर्वीच विकास झाला असता. अटल बिहारी वाजपेयी, विश्वेश्वरय्या ,करुणानिधी यांनीही देशातील अनेक समस्यांवर” नदी जोड प्रकल्प “हाच उपाय असल्याचे सांगितले.
गेल्या आठ-पंधरा दिवसातील देशातील चित्र पाहिले तर अर्धा देश ,अर्धा महाराष्ट्र पुराने व्यापला गेला. कृष्णेच्या खोऱ्यातील 12 धरणे कोल्हापूर ,सातारा ,आणि सांगली जिल्ह्यात येतात. पुरामध्ये तिन्ही जिल्ह्यांचे अपरिमित नुकसान झाले. जमिनी ,माणसे, जनावरे ,घरे पुरात वाहून गेली. याउलट काही भाग पावसाच्या प्रतीक्षेत राहिला . माणगंगेचे पात्र कोरडे राहिले अशावेळी ‘नदीजोड प्रकल्पाची’ महती आणि गरज आपल्या लक्षात येते.
जागतिक स्तरावरील यशस्वी आणि फायदेशीर उदाहरणांचा विचार करता ,आपण त्यांचे अनुकरण ,त्यांचे तंत्रज्ञान स्वीकारायला काय हरकत आहे? हा एक महाकाय आणि प्रचंड खर्चिक प्रकल्प आहे ,हे मान्य आहे .पण त्यासाठी केवळ ही सरकारची जबाबदारी नसून, राष्ट्र विकास डोळ्यासमोर ठेवून, प्रत्येक नागरिकानी, उद्योगपतीनी काही अंशी वाटा उचलायला काय हरकत आहे ? गंगा —कावेरीचे स्वप्न साकार झाले तर भारत याच शतकात महासत्ता होईल अशी अपेक्षा करूया——–
☆ भारतातील पहिली महिला वैमानिक – सुश्री सरला ठकराल ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
वयाच्या १६ व्या वर्षी तिचं लग्न झालं. लग्नानंतर तिला एक मुलगीही झाली तरी ती वयाच्या २१ व्या वर्षी भारतातील पहिली महिला वैमानिक झाली. वयाच्या २४ व्या वर्षी ती विधवा झाली तरी खचली नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात तिने आपल्या कर्तुत्वाचा ठसा शेवटपर्यंत उमटवलाचं. कोण होती ही महिला ?
” लग्नानंतर माझ्या करिअरचं काय होणार ? ” असा प्रश्न पडलेल्या फेसबुकवरील हजारो महिलांना आज हा लेख सादर समर्पण.
१९३० चा तो काळ होता. मुलगी १६ वर्षाची झाली म्हणजे ती थोराड झाली असा सार्वत्रिक समज होता. साहजिकच सरलाच्या आई वडिलांनीही तिचं लग्न वयाच्या १६ व्या वर्षीच लावून दिलं आणि ती सरला शर्मा झाली. अखंड भारतातील लाहोरमध्ये ती राहत होती. तिचा नवरा पायलट होता. शिवाय घराण्यातील एकूण ९ माणसे पायलट झाली होती. त्यामुळेच असेल कदाचित तिने एक भव्य स्वप्न पाहिलं- आपणही एक दिवस पायलट व्हायचं. ज्या काळात स्त्रिया कारही चालवत नव्हत्या त्या काळात विमान चालवायचं स्वप्न पाहणं म्हणजे अशक्य कोटीतली गोष्टच होती. त्यात ती एका मुलीची आई झाली होती. आता तिचं ते स्वप्न पूर्ण होणं केवळ अशक्यच होतं. परंतु ज्यांच्याकडे भव्य स्वप्न असतात ते लोक कुठल्याही अडचणींनी कधीच खचून जात नाहीत. उलट त्यांच्यातील इर्ष्या त्यांना अधिक प्रेरित करत राहते. सरला शर्मासुद्धा आपल्या निश्चित ध्येयापासून मुळीच ढळली नाही. नवऱ्याचं प्रोत्साहन होतंच पण त्याहीपेक्षा तिच्या सासऱ्यांनी दिलेलं प्रोत्साहन तिला लाख मोलाचं वाटलं.
जेव्हा ती वयाच्या २१ व्या वर्षी देशातील पहिली महिला वैमानिक झाली तेव्हा तिची मुलगी ४ वर्षाची होती आणि त्यावेळी तिने साडी नेसून विमान चालवलं होतं. त्यामुळे देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. तब्बल एक हजार तासाचा विमान उड्डाणाचा अनुभव तिच्या पाठीशी होता. त्यामुळे साहजिकच तिला ग्रुप ‘ए’ परवाना मिळाला. प्रवासी वाहतुकीचा परवाना मिळवण्यासाठी ग्रुप ‘बी’ परवाना मिळवणं आवश्यक होतं. तिने त्याचीही तयारी सुरु केली. दुर्दैवाने त्याचवेळी तिच्यावर आभाळच कोसळलं. एका अपघातामध्ये तिच्या पतिचं निधन झालं. तरीही ती आपल्या ध्येयापासून ढळली नाही. आपण कमर्शिअल पायलट व्हायचच हे तिचं स्वप्न होतं. पण त्याच वेळी दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला आणि तिचं स्वप्न त्या वणव्यात जळून खाक झालं. युद्धामुळे ट्रेनिंग देणारी ती संस्थाच बंद पडली. दोन मुलींना घेऊन ती लाहोरहून दिल्लीला आली आणि तिने दुसरं लग्न केलं. सरला शर्माची सरला ठकराल झाली.
स्वप्न भंग झालं तरी नाउमेद न होता ती पेंटिंग शिकली. फाईन आर्ट मध्ये तिने डिप्लोमा मिळवला. ती ज्वेलरी डिजाईन आणि कपडे डिजाईनचा व्यवसाय करू लागली. त्यातही तिने नेत्रदीपक यश मिळवलं.ज्या काळात महिलांना शिक्षण घेणंही कठीण होतं त्या काळात सरला आपल्या करिअरचा विचार करायची. वयाच्या अखेरच्या घटकेपर्यंत त्या आपल्या व्यवसायात मग्न राहिल्या. वयाच्या ९५ व्या वर्षी २००९ मध्ये त्यांचं निधन झालं. वयाच्या अखेरपर्यंत त्या कार्यरत राहिल्या.
सरला ठकरालनी देशातील लाखो महिलांना एक नवी वाट दाखवली. त्या काळात फक्त चूल आणि मुल म्हणजेच संसार समजणाऱ्या देशातील महिलांनी आज वैमानिक क्षेत्रात देशाचा झेंडा अटकेपार नेऊन फडकावालय. गेल्या ५ वर्षात परवाना मिळालेल्या ४२६७ वैमानिकांपैकी तब्बल ६२८ महिला वैमानिक आहेत. महिलांची जागतिक टक्केवारी केवळ ३ टक्के असताना भारतीय महिलांनी १४.७ टक्केची मजल गाठून सरला ठकराल यांच्या कर्तुत्वाला एक प्रकारे सलामच केल्याचे म्हणावं लागेल. महाराष्ट्राच्या सौदामिनी देशमुख या देशातील तिस-या महिला वैमानिक ठरल्या. त्यांनी बोईंग ७३७ आणि एअर बस ३२० चालवून देशातील महिलांची मान गर्वाने ताठ केली.
मित्रानो, आज हा लेख आपल्या घरातील महिलांना आवर्जून वाचायला द्या. कदाचित तुमच्या घराण्याचं नाव काढणारी उद्याची सरला ठकराल किंवा सौदामिनी देशमुख तुमच्या घरातही असू शकेल.
संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग पहिला ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆
एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये ! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत आहे. ही सर्व प्रतिभा त्या त्या कवींची आहे. मराठी भाषेबद्दल आदर वाढविणाऱ्या या प्रयोगाबद्दल सर्वांचे आभार—-
—–मकरंद करंदीकर
विंदा करंदीकर यांची मूळ कविता (जी मुळात लईभारी हे 🙂 ). मराठीच्या बहिणी असलेल्या अनेकानेक भाषांमधे.
☆ मराठी साहित्य – विविधा ☆ भारताचा नदीजोड प्रकल्प – भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(लोकनेते राजारामबापू जन्मशताब्दी निमित्त मराठी वि न परिषद इस्लामपूर यांच्यातर्फे घेतलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)
गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती ।
नर्मदे,सिंधू, कावेरी जलेस्मीन संनिधिं कुरू।।
दररोज देवाची पूजा करीत असताना देवाजवळच्या तीर्थाच्या कलशात आपण सर्व नद्यांना आवाहन करतो. त्यांना त्या कलशामध्ये पाहतो. यावरूनच समजत, नद्यांना महत्व किती आहे ते. देशातील लहानमोठी प्रत्येक नदी आपली जीवनदायिनी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये नद्यांनाही देवत्व दिलं आहे. त्यांना आपण माता, मैय्या, माई असंही म्हणतो. गंगा ही तर सर्वश्रेष्ठ अध्यात्मिक, पौराणिक, भावनिकदृष्ट्या ही तिचं महत्त्व खूप आहे, की माणसाला शेवटच्या क्षणी गंगाजल तोंडात घालतात. पवित्र जल देशाच्या दक्षिणेपर्यंत पोचल तर, त्या तिर्था साठी, काशी हरिद्वारला जाण्याची गरज नाही. आज तंत्रज्ञानाच्या युगात तेही शक्य आहे. आणि त्यासाठी उपाय “नदी जोड प्रकल्प.”
भौगोलिकदृष्ट्या भारत हा एक खंडप्राय देश आहे. येथील भिन्नभिन्न ठिकाणी हवा, पाणी, लोकसंख्या, चालीरीती वेगवेगळ्या आहेत. देशाचा 35 टक्के भाग दुष्काळी, 33 टक्के भाग गंभीर दुष्काळ प्रवण आणि उत्तरेकडील भाग संपन्न असल्याचे दिसून येते. एकूणच विकासाचा सारासार विचार करता हे सगळं ‘पाणी’ या एका निकषावर अवलंबून आहे. व्यावहारिकदृष्ट्या देशातील जास्तीत जास्त भाग समपातळीवर, समान विकास यावा यासाठी सर्वोत्तम उपाय “नदी जोड प्रकल्प.”
भारताच्या लोकसंख्येत दर वर्षी 15 दशलक्ष संख्येने वाढ होते. अन्नधान्याची मागणी वाढते. पाण्याचे दुर्भिक्ष वाढते. भूजल पातळी खाली जाते. ऊर्जेची मागणी वाढते. दक्षिणेकडील राज्यात बऱ्याच भागात लहरी पावसामुळे पिके अपयशी होतात. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात. त्यासाठी जलसंपत्ती व्यवस्थापन व ‘नदीजोड’ हा आश्वासक आणि खात्रीचा उपाय आहे .आणि ती या काळाची गरज आहे.
ऐतिहासिक विचार करता, एकोणिसाव्या शतकात इंग्रज इंजिनियर ऑर्थर कॉटन यांनी दक्षिण पूर्व भागातील दुष्काळ कमी व्हावा व तिकडून आयात निर्यात करण्याच्या उद्देशाने नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला होता. 1970च्या दशकात के एल राव यांनी “राष्ट्रीय जलग्रीड” प्रस्ताव मांडला. २०13 पर्यंत अनेक प्रस्ताव होऊनही सर्व थंडच राहिले. 1999 नंतर सुरेश प्रभुंनी त्याचा अभ्यास केला. आणि’ ‘नदी जोड’ विचारांचे पुनर्जीवन झाले.
“नदीजोड प्रकल्प” हा नागरी अभियांत्रिकी प्रकल्प आहे. पूरप्रवण क्षेत्रातील जास्तीचे पाणी जलाशयात साठवून, ते दुष्काळी भागातील नद्यांतून सोडावे हा या प्रकल्पाचा मूळ हेतू आहे. देशातील 37 नद्या या ठिकाणी जोडणे, 3000 जलाशय आणि चौदाशे 90 किलोमीटर लांबीचे कालवे काढावे लागतील. त्यामुळे प्रचंड प्रमाणावरील जमीन ओलिताखाली येईल. मोठ्या प्रमाणावर (४०००मे.वँ.) इतकी वीज निर्मिती होईल. उत्तरेकडील पुराचे दुष्परिणाम सोडवून, दक्षिणेकडील पाणीटंचाई दूर होऊन, हरितक्रांती होईल. वनीकरण वाढेल. पर्यावरण संतुलन होईल. रोजगार वाढेल. स्वस्त असणारी जलवाहतूक वाढेल. सर्वत्र सुजलाम-सुफलाम होईल.
नदीजोड प्रकल्पचा विचार करता, त्याचे तीन भाग केले आहेत.
१) उत्तर हिमालयीन चौदा नद्यांचा जोड.
२) दक्षिण द्वीपकल्प नद्यांचा जोड.
३) इंट्रा-स्टेट सदतीस नद्यांचा जोड.
अशा आराखड्याचे व्यवस्थापन जलसंपदा मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय जलविकास (N. W. D. A.). संस्थेद्वारे केले जात आहे.
स्वातंत्र्य दोन प्रकारचे असते . १) शारिरीक २) मानसिक.
आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रजांच्या मगरमिठीतून मायभू, आपली माती मुक्त झाली. १५० वर्षे आपण त्यांचे गुलाम होतो.
त्यांच्या तालावर नाचत होतो.. नाचणे भाग होते, त्याला पर्याय नव्हता. ते आपले मालक व आपण त्यांचे गुलाम होतो. त्यांची प्रत्येक आज्ञा आपल्याला इच्छा असो वा नसो पाळावी लागत होती. इतक्या वर्षात ते सारे आपल्या अंगवळणी पडले होते.
सवईचे झाले होते, आपल्या नसानसात , मनात मुरले होते.
ते देश सोडून.. ही भूमी सोडून गेले .. पण त्यांच्या काळात जी मनोभूमी, आमची तयार झाली होती .. तिचे काय..? ती इतक्या सहजा सहजी जाणार होती काय ..? नाही. ही मानसिक गुलामगिरी.. सवयी इतक्या सहजासहजी जात नसतात. ते गेल्या नंतर त्यांनी जी व्यवस्था किंवा घडी बसवली होती तिच चांगली होती.. त्यांचे राज्य चांगले होते असे म्हणणारे लोक खूप होते. कारण स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जादूची कांडी फिरावी तशी लगेच सुव्यवस्था निर्माण होईल अशी लोकांची अपेक्षा होती .. ते एवढ्या मोठ्या देशात लगेच कसे शक्य होते? दारिद्र्य, अज्ञान, जुन्या रूढी परंपरा हे आमचे मोठे शत्रू होते, अजूनही आहेत .. ते लगेच जाणे शक्य नव्हते.
शिवाय त्यांनी मुरवलेले मानसिक अंपगत्व होतेच .म्हणजे बघा .. भूमी स्वतंत्र झाली होती. पण आमची मानसिक गुलामगिरी तशीच होती नि आहे. देशाने आम्हाला आचार, विचार, लेखन स्वातंत्र्य दिले आहे तरी आम्ही त्या मानसिक अवस्थेतून पूर्ण बाहेर पडलो आहोत का? आमची अवस्था आजही “.. ना .. घरका ना.. घाटका “अशी आहे. एकच उदा. इंग्रजी भाषा. इंग्रजी काय किंवा इतर कोणत्याही भाषा… जास्त भाषा बोलता आल्या तर उत्तमच. पण आपली मातृभाषा हीच सर्वश्रेष्ठ भाषा असते ह्या विषयी कुणाचे ही दुमत असू नये.इंग्रजी एक भाषा म्हणून शिकायला हवीच पण .. इतर देश पहा .. आपलीच मातृभाषा वापरतात.
आपल्याला मात्र इतक्या वर्षांनंतरही नक्की काय करावे सुचत नाही .. टिळक, गांधी काय इंग्रजी माध्यामात शिकले होते? हेच ते मानसिक अंपगत्व आहे. त्यांचे सूट, बूट, टाय..
अहो, अतिशय थंड प्रदेशातून ते आले होते. आम्ही भर उन्हाळ्यात लग्नकार्यात सूट घालून घामाघूम होत मिरवतो हेच ते मानसिक अपंगत्व .. आजकाल आम्हाला जमिनीवर बसताच येत नाही .. सवयी घेतल्या .. गुलाम झालो. म्हणून स्वातंत्र्य मिळाले तरी आम्ही अजून स्वतंत्र झालो आहोत का?
ह्याचा प्रत्येक भारतीयाने विचार करणे गरजेचे आहे.
या विषयावर खूप काही बोलता व लिहिता येईल पण तरी माझ्या मतांशी सहमत व्हावेच याची गरज नाही.कदाचित माझे लिखाण विषयाला सोडून झाले असे वाटल्यास ते मुक्त चिंतन समजावे ही विनंती …
(पूर्वसूत्र- बबन्याच्या डोळ्यांपुढे ऑपरेशनचे पैसे अंधारातल्या काजव्यांसारखे चमचमत होते. त्या पैशातून औषधपाणी करून जनीला माणसात आणायची आणि निदान दहा-पंधरा दिवस पुरेल एवढा बाजार झोपडीत भरायचा एवढंच स्वप्न उरात दडवून, आदल्या रात्रीच्या उपाशी पोटाने बबन्या सकाळीच रस्त्याला लागला होता. त्याच्या डोळ्यांत स्वप्नं भिरभिरत होती, पण घडणार होतं विपरीतच…!)
मान टाकल्यासारखा दिवस उजाडला, तसाच मावळूही लागला. रोजच्यासारखी दुपार तापलीच नाही. राख धरलेल्या निखाऱ्यासारखा सूर्य दिवसभर थंड आभाळांत पडून राहिला होता.तो विझून जावू लागला, तसं आभाळ विव्हळू लागलं. सांज झाली, आणि आसूड ओढल्यासारख्या विजा कडाडू लागल्या. संकटाची दवंडी पिटत वारा घोंगावू लागला. स्वतःचा जीव वाचवीत धुळीचे लोट पळू लागले.
घरासमोरची आवराआवर करून दार पटाटा लावली.अंगात संचार व्हावा तशी झाडं घुमू लागली.
वानरांनी जीव मुठीत धरून फांद्यांना मिठ्या मारल्या. पक्षांचे पुंजके घरट्यात लपले. पानांबरोबर ती जड घरटीही झुलू लागली. ऐन मुहूर्ताला आभाळ उरी फुटून रडू लागलं.त्याच्या अश्रूंचा महापूर आल्यासारखं पाणी कोसळू लागलं. अख्खं गाव पाण्यानं चिंब झालं. महार वाड्यात पेटू लागलेली चुलाणी पेटण्यापूर्वीच विझू लागली. पावसाच्या सड्यानं सादळून गेली. पावसानं जोर आणखी वाढवला तशी जनी धास्तावली.
फडक्यात बांधून ठेवलेलं दोन भाकरींचं पीठ झाडून घेऊन त्या वेळी ती भाकरी थापत होती. भुकेने कासावीस होऊन शिन्यानं भोकाड पसरलं. त्याच्या पाठीत धपाटा घालायला उठण्यासाठी दात ओठ खात जनीनं जमिनीला रेटा दिला, तेव्हा मांडीवर झोपलेल्या झीप्रीची झोप उडून ती रडायला लागली. झपाटून पटापटा मुके घ्यावेत तसं काकणं वर सारून जनीनं झीप्रीच्या इवल्याशा पाठीत धपाटे हाणले, आणि तिला जमिनीवर भिरकावलं. शेकून झालेल्या धुरकट भाकरीचे दोन तुकडे थाळीत टाकून तिने थाळी शिन्यासमोर सरकवली. आणि हात लांब करून झीप्रीला पुन्हा कवटाळून घेतलं. झीप्रीचा घाबरलेला जीव पाणी शिंपडल्यासारखा शांत झाला.
जनीच्या पुढे आता फक्त कसंबसं एकाच भाकरीचं पीठ शिल्लक होतं. तिने भाकरी थापली. शेकली. भाकरीचा तो चंद्र दुरडीत अलगत उभा ठेवला.तिच्या दिवसभराच्या भुकेल्या पोटात त्याच्या खरपूस वासानं आगडोंब उसळला.तिने आवंढा गिळला. आणि ती चुलाणं विझवायला लागली.
‘आता बबन्या आला की आर्धी आर्धी भाकर दोघांनी संगट खायची ‘असा विचार तिच्या मनात आला, तेवढ्यात झोपडीबाहेर कुणाचीतरी पावलं वाजली.
‘बबन्याचअसनार …’ जनी हरकली. झिपरीला सावरत ती दाराशी आली. समोर सादळलेला मिट्ट काळोख होता. त्यात बबन्या दिसेचना. तिने डोळे फाडून पाहिले तेव्हा खूप वेळाने तिला त्या अंधारात अंधुक दिसू लागलं. …समोर बबन्या नव्हताच. शिरपा न् सदा उभे होते. आख्खे भिजलेले. गुडघ्यापर्यंत चिखल माखलेले…
“ह्ये न्हाईत. ह्यो पाऊस मुडदा कोसळतुय न्हवं का कवा ठावनं. कुटं आडकून पडल्यात द्येवालाच ठाव..”
शिरपा न् सदाला काय बोलावं सुचेचना. देवाच्या साक्षीनं घडून गेलेलं आक्रित आठवून शिरपा न् सदा अजूनही कासावीस होते. धीर गोळा करून मग शिरपाच बोलू लागला आणि व्हय व्हय करत सदा भेदरल्या अवस्थेत मान डोलवत राहिला. सगळं ऐकून जनी शक्तीच गेल्यासारखी मटकन् खालीच बसली. मनातल्या धुवांधार पावसानं तिचे डोळे चिंब भिजून वाहू लागले. पण आरडून ओरडून रडायचं भान न् त्राण तिच्या भुकेल्या शरीरात नव्हतंच. भाकरीचा तो चंद्रही आता वास हरवलेल्या अवस्थेत विझलेल्या चुलीपुढं दुरडीत मान टाकलेल्या बेवारशासारखा थंड पडला होता..! सकाळी जाताना मागं वळून हात हलवणारा बबन्या तिच्या ओल्या नजरेसमोर तरळत राहिला आणि बबन्यासाठी काकुळतीला आलेल्या जनीचं मन वेडंपीसं झालं. मघाशी भोकाड पसरून रडणाऱ्या त्या आभाळासारखं ते खदखदू लागलं. झिप्रीला तिथंच जमिनीवर टाकून देहभान विसरल्याअवस्थेत ती चिखलपाण्यातून धावत सुटली ..वेशीच्या दिशेने..!
सांज झाली, तेव्हा आत्ता बबन्या येईल म्हणून जनी सादळलेल्या चुलीत जाळ लावून भाकरी थापत होती तेव्हा तिकडे पावसात अडकलेला बबन्या वेशीवरच्या झाडाखाली उभा होता. शिरपा आणि सदा त्याच्या बरोबरच होते. पावसाचा जोर वाढला आणि झाडाखालीही पाणी ठिबकायला लागलं तसं शिरपा न् सदानं शाळेच्या आडोशाला धाव घेतली. शाळेच्या आवारात पोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बबन्या त्यांच्याबरोबर आलेलाच नाहीय. तो झाडाखालीही दिसेना. नजर लांब करून पहायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जाणवलं की वेशीवरच्या मारुतीच्या देवळात कसलीतरी झुंबड उडालीय. ऑपरेशन करून आलेल्या बबन्याला त्यांच्यामागे शाळेपर्यंत इतक्या लांब पळता येईना तेव्हा त्याने जवळच असलेल्या मारुतीच्या देवळाकडे धाव घेतली होती. पाऊस चुकवायला म्हणून देवळाच्या पायरीवरून तो थोडा वर सरकला आणि..आणि तिथं पावसामुळे आधीच देवळात आश्रयाला थांबलेले गावकरी भडकले. ‘हे म्हारडं देवळात आलंच कसं..’ म्हणून ओरडू लागले. आदल्या रात्रीपासून उपाशी असलेला आणि ऑपरेशनच्या वेदनांनी कळवळणारा बबन्या हात जोडून गयावया करीत होता.
“पान्यात भिजाय लावू नगा..’ म्हणत त्यांचे पाय धरायला तो पुढे झाला तसा गावकऱ्यांच्या गर्दीतला एक जण पुढे झेपावला.
“या म्हारड्यानं द्येव बाटिवला” म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवायला लागला. ते पाहून बाकीच्यांचीही भीड चेपली. तेही एकामागोमाग एक करीत पुढे आले. बबन्याला धक्के देत त्यानी भर पावसात त्याला देवळापुढच्या चिखलात ढकलला. कुणीतरी जवळचा एक दगड उचलला आणि नवीन दिशा मिळाल्यासारखे एकेक करत सगळेच खाली वाकले. बबन्यावर दगडं बरसायला लागली. हातातल्या काठ्यांचे वार सुरू झाले. बबन्या गुरासारखा ओरडत होता. हातापाय आवळत मार चुकवायचा व्यर्थ प्रयत्न करीत होता. रक्ताळलेल्या बबन्याचे मासांचे लगदे लोंबू लागले तसे गावकरी दमून थांबले. मोठ्ठं यज्ञकर्म पार पडल्याच्या समाधानात पांगून गेले. मग पाऊसही थकून थांबला. शाळेच्या छपराखालून शिरपा न् सदा वेशीपर्यंत आले तोवर रक्ताळलेला बबन्या मारुती समोर चिखला सारखाच थंड पडला होता..!
…..जनी धावत धापा टाकत वेशीपर्यंत आली तोवर तिथे बबन्याजवळ चिटपाखरूही नव्हतं.वेशीवरच्या देवळात नाही म्हणायला मारुती मात्र उभा होता…!
जनी बबन्याला आणि त्या देवालाही जाग यावी म्हणूनच जणू धाय मोकलून आक्रोश करीत राहिली…!!
जुन्या घरातून नवीन घरात शिफ्ट करतांना काय नेऊ, काय नको या द्विधा मनस्तितीतून जात होतो. देव्हारा हालवताना मन गलबललं. देव्हाऱ्यातील सगळे देव एका जागी डब्यात ठेवून, खाली देव्हाराही हलवला.
दोघांचेही बाबा फोटोतून आमच्या हालचालीवर नजर ठेवून होते. तिचे बाबा, माझे बाबा. दोघेही जिगरी दोस्त.“ ते फोटो गावी नेऊ. राहू देत तो पर्यन्त इथे.” ही म्हणाली. मीही आग्रह नाही केला.
सामान सुमान आता व्यवस्थित लावून झालंय. देव्हारा पण छान सजलाय. लहानसा लामणी दिवा लटकताना खूपच शोभून दिसतोय. हा दिवा आणि विठ्ठल रखुमाईची ‘कटेवरी कर’ वाली मूर्ती पंढरपूरी खरेदी केलेली. सासरेबुवा महिंद्रातून रिटायर झाल्यावर आम्हा सर्वांना पंढरपूर यात्रा घडवली होती त्यांनी. स्वखर्चाने.
“अरे! विठोबा रखुमाई कुठाय? देव्हारी तर नाहीये. गेली कुठे. घेताना तर सर्व सान थोर देवताना एकत्र घेतलेलं. गेली कुठे?”——अचानक हिच्या गालावरून अश्रू ओघळले. जोरजोरात हुंदके देत हिला रडताना पाहून मीही हादरलो. रडू आवरून तिला बोलतं केलं—. “ आपल्या दोघांच्या वडिलांना मागे ठेऊन आलो आपण. त्याचीच ही परिणती. विठोबा रखुमाई दोघही रुसलीत आपल्यावर.”
——लागलीच जुन्या घरी जाऊन दोघांही बाबांना सम्मानपूर्वक नवीन घरी आणलं!
पुनः शोध. विठूरखुमाईचा. रखमाय रुसलेली ऐकलेलं. इथे तर दोघेही आमच्या दोघांवर रुसलेली. सहन होत नव्हतं. अस्वस्थता वाढत होती, आणि आज शेवटी त्या कटेवरी कर घेतलेल्या दोघांच दर्शन झालं एकदाचं. गणेशाच्या विश्वास बसणार नाही एवढ्या लहान तस्विरीच्या मागे लपले होते विठुराया, सहकुटुंब! आमच्या कन्या रत्नाचं आगमन होण्यासाठी थांबले होते जणू, प्रगट व्हायचे!
की दोघांच्याही जन्मदात्यांना मागे ठेऊन आल्यामुळे रुसलेले जगत्पिता!—-तो विठुरायच जाणो.
☆ नागपंचमी : मूळ संदर्भ ☆ संग्राहक – सौ.स्वाती घैसास ☆
नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापासी(सर्प)असंख्य वर्षांपासून लावेल गेलेला आहे. परंतू या सणाला याहून वेगळे आणि वैशिष्टयपूर्ण असे संदर्भही आहेत—–
भारतात नाग हे “टोटेम” असणारे पाच पराक्रमी नाग-राजे होऊन गेले •••
१• अनंत (शेष) नाग
२• नागराजा वासुकी
३• नागराजा तक्षक
४• नागराजा कर्कोटक
५• नागराजा ऐरावत
नागपंचमी ह्या पाच नागराजांशी संबधित आहे. ह्या पाचही नाग-राजांची स्वतंत्र गणतांत्रिक (republican) स्वरुपाची राज्ये होती. यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते.
त्यानंतर दुसरा नागराजा म्हणजे वासुकी नागराजा. हा कैलास मानसरोवरापासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता.
तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच प्लेटो, अँरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत.
चवथा नागराजा कर्कोटकाचे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते.
पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) याचा भंडारा प्रांत, जो आजही पिन्गालाई एरीया म्हणून ओळखला जातो.
ह्या पाचही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा एकमेकांच्या राज्याला लागून होत्या. हे पाचही नागराजे मृत्यू पावल्यानंतर, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नागवंशीय लोक “नागराजे स्मृति अभिवादन” —“नागपंचमी” म्हणून दरवर्षी साजरा करीत असत.
कालांतराने या राजांच्या “ स्मृती-पूजना”ला जाणते-अजाणतेपणाने वेगळेच वळण लागले आणि आत्तासारखी नागपंचमी रूढ मानण्यात येऊ लागली. आर्थिक परिस्थितीमुळे गरीब बहुजन वर्ग कागदी नाग नरसोबा ट्रेंडकडे आकर्षित झाला, कारण त्यांच्या पूजेतून पुण्य मिळते हे बहुजनांच्या मनमेंदूमध्ये बिंबवले गेले. त्याचाच परिणाम म्हणून ‘नाग नरसोबा’ आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि अशी ही आता साजरी केली जाणारी नागपंचमी रूढ झाली आणि “ नागलोकांची पंचमी “ लुप्त झाली. आज नागाला दूध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला आहे. तरीपण बहुजन समाज आजही घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलेला नाही. हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होत.
आज जरी नागपंचमी ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिध्द असली तरी त्याबाबतची ऐतिहासिक वस्तूस्थिती वेगळीच आढळते. म्हणूनच बहुजनांनी धार्मिक परिघाच्या बाहेर येऊन, नागपंचमी अशी सणाच्या स्वरूपात साजरी करण्याबरोबरच, “बहुजन नागराजे” यांच्या स्मृतीलाही आवर्जून अभिवादन करावे.
संग्राहक – स्वाती घैसास
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ स्वातंत्र्य संग्रामात भारतीय स्त्रियांचे योगदान – भाग दुसरा ☆ सौ. दीपा नारायण पुजारी☆
आपण प्रत्यक्ष लढाईत, सशस्त्र चळवळीत महिलांनी घेतलेला सहभाग बघितला. अहिंसक चळवळीतही हजारो स्त्रियांचा सक्रिय सहभाग होता. सशस्त्र क्रांतिकारक गटामध्ये प्रचारपत्रके वाटणे, भूमिगतांना खाणे पुरवणे अशी कामे त्या करीत. यात बंगाली मुलींच्या साहसकथा रोमाहर्षक आहेत.
‘शांती घोष ‘ आणि ‘सुनीती चौधरी ‘ या दोन तरुण मुलींनी टीपर जिल्हा मॅजिस्ट्रेट स्टिफन्स याची गोळ्या झाडून हत्या केली. हा बंगाली मुलींवर अत्याचार करत होता..
६ फेब्रुवारी १९३२ . . कलकत्ता विद्यापीठात दिक्षान्त समारंभात भाषण करणाऱ्या सर स्टॅनली जॅक्सन यांच्यावर ‘बीना दास’ हिने गोळी झाडली. हे पिस्तुल ‘कल्पना दास’ हिने अन्य मुलींच्या कडून पैसे गोळा करून खरेदी केलं होतं.
‘कल्पना दास ‘आणि ‘प्रीतीलता वाडेदार’ बालपणीच्या मैत्रिणी. ‘ ईश्वर आणि राष्ट्र’ यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचं व्रत त्यांनी घेतलं होतं. २४ सप्टेंबर १९३२ ‘प्रीतीने’ पहाडताली क्लबवर हल्ला केला.इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून सायनाईड प्राशन केले. प्रीतीलता गेली, परंतु स्रियांची ताकद लोकांना समजली.स्री बदलत गेली. स्वतः तून बाहेर पडली. प्रगतीच्या पथावर पुढे जात राहिली.
महाराष्ट्र ही मागे नव्हता.नरगुंद नावाच्या एका छोट्या संस्थानातील राण्यांनीही ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्र उचलले व त्या शहीद झाल्या.इ. स. १८८५ मध्ये कॉंग्रेस ची स्थापना झाली. त्यानंतर काही वर्षांनी महिला कॉंग्रेसच्या अधिवेशनाला जाऊ लागल्या. ‘श्रीमती कादंबिनी गांगुली’ हिने प्रथम व्यासपीठावर जाऊन बोलण्याचे धाडस केले. ” महिला म्हणजे कचकड्याच्या बाहुल्या नाहीत. आम्ही पुतळे बनून राहणार नाही” या बोलामुळे स्रियांची अबोल भावना बोलकी झाली. हळूहळू त्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात आपले विचार मांडू लागल्या.
महाराष्ट्रातील नाशिक शहरात स्वदेशीची शिकवण देणारी एक महिला सभा होती. स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या वहिनी ‘येसूवहिनी’ सभेच्या संस्थापिका होत्या. सावरकर बंधू अंदमानच्या काळकोठडीत शिक्षा भोगत होते. अभिनव भारत या संघटनेतील बहुतेक कार्यकर्ते तुरुंगात होते. त्यांच्या बायकांना बंडखोरांच्या बायका म्हणून पोलिस त्रास देत. सासरची व माहेरची माणसं ही त्यांना सरकारी भयामुळं जवळ करीत नव्हती. ‘येसू वहिनींनी’ ‘आत्मनिष्ठ युवती संघ’ नावाची संघटना स्थापन केली. या स्रियांनी स्वदेशी चे व्रत घेतले आणि त्याचा प्रसार केला. त्याच काळात
काळाच्याही पुढे जाऊन त्यांनी हातात काचेच्या बांगड्या घालण्याचे सोडले! साखर परदेशी म्हणून ती ही सोडली. ‘कवी विनायक’ यांच्या देशभक्तीपर कवितांवर सरकारने बंदी घातली होती. त्यांचा तोंडी प्रसार केला. ‘यमुनाबाई सावरकर’ ऊर्फ ‘माई सावरकर,’ वि. दा. सावरकर यांच्या पत्नी, या देखील आपल्या घरातील वातावरणाला
साजेशा काम करीत होत्या. त्या रत्नागिरी येथे सावरकरांच्या समाज सुधारक कार्यक्रमात सहभागी होत. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हळदीकुंकू सारखे कार्यक्रम आयोजित करत. स्पृश्य अस्पृश्य भेद मानीत नसत.
विसाव्या शतकात पहिली जगप्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक ‘भिकाईजी रुस्तुम कामा.’ मादाम कामांनी झोपडपट्टी पासून समाजसेवेला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी घर सोडले. फ्रान्स मध्ये राहून भारतीय क्रांतिकारकांना मदत करण्याचे काम त्यांनी केले.
‘कुमारी बलियाम्माने’ दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींनी सुरू केलेल्या सत्याग्रहात भाग घेण्यासाठी स्त्रियांचे पथक तयार केले.लाहोरच्या ‘राणी झुत्शीने’ दारुच्या दुकानांवर निदर्शने केली. परदेशी कपड्यांच्या होळ्या पेटवल्या.
म. गांधींनी भारतीय महिलांना तिच्या शक्तीची जाणीव करून दिली. गांधीजींच्या विचारांनी भारुन ‘अवन्तिकाबाई गोखले’ यांनी चंपारण्यात सत्याग्रह केला. हिंद महिला समाजाची स्थापना करुन महिलांना कॉंग्रेसच्या विधायक कामासाठी संघटित केले. एक जानेवारी एकोणीसशे नऊ रोजी ‘सरलादेवी चौधरी’ यांनी ‘वंदेमातरम’ ची घोषणा करुन नववर्ष साजरे केले. ‘हंसा मेहता’ यांनी सायमन कमिशनला विरोध केला. ‘Poet Nightingale of India’, म्हणजेच ‘सरोजिनी नायडू’ दांडीयात्रेत सहभागी झाल्या. त्या पहिल्या महिला राज्यपाल होत.
बारुआ, अरुणा असावी, उषा मेहता, पद्मजा नायडू, अशी अगणित नावं!! भारतीय इतिहासाच्या आभाळातील या स्वयंप्रकाशीत तारका आहेत. आजही त्या आदर्श ठरतात.
या सर्व हसत हसत आत्मसमर्पण करणाऱ्या माऊलींनी एक तेजस्वी पथ आपल्या साठी तयार केला. कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतील या ओळींनी या तेजस्विनींना आदरांजली द्यावीशी वाटते.