आडस — माझी रत्नागिरी.. – श्री प्रशांत शेलटकर संग्राहक – श्री विद्याधर फाटक
??
आज एका मित्राबरोबर फोनवर बोलताना सहज बोलून गेलो..’ काय आडस’ आहे रे ! त्याने मला विचारलं.. काय म्हणालास.? मी म्हटलं..काही नाही..काही नाही.
फोन झाला..आणि डोक्यात या अफलातून शब्दांची डिक्शनरी चालू झाली. हे काही खास शब्दप्रयोग रत्नागिरीचे. आडस्’ म्हणजे झकास,उत्तम. ‘वड्स’ म्हणजे एकदम मस्त. ‘गडगा’ म्हणजे कंपाऊंड वॉल. एखाद्याला ‘रेटवला’ म्हणजे पराभूत केला. मिसळ ‘रेटवली’ म्हणजे यथेच्छ खाल्ली. पाऊस ‘रेमटवून’ पडला म्हणजे धो धो पडला. ‘आयझो’ म्हणजे ‘ओ माय गॉड’. ट्रॅफिकमध्ये ‘फुगलो’ म्हणजे अडकलो. ‘किचाट’ म्हणजे गडबड, गोंधळ, गोंगाट. एखादा ‘सरबरीत’ असणे म्हणजे डोकं कमी असणे. एखादा ‘सोरट’ असतो म्हणजे डॅम्बीस असतो.
असं म्हणतात दर दहा मैलांवर भाषा बदलत असते. आपली मराठी भाषा तर इतकी उत्तुंग आणि अचाट आहे की तिला व्याकरणाच्या चौकटीत बसवणं अशक्यप्राय गोष्ट आहे. आपल्या भाषेचा लहेजा औरच आहे. कोंकणातच चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कुडाळ इथे भाषेचा बाज वेगळा असतो. मालवणी भाषा हा अजून वेगळा प्रकार. एक प्रकारचा हेल कोंकणात भाषेला असतो. एखाद्याला काही सांगितलं आणि तो आश्चर्यचकित झाला की नुसतं ‘हल्’ असं डोळे मोठे करून बोलेल, किंवा प्रेमाने ‘मेलास तू’ असं म्हणेल. तुला ना चांगला चोप दिला पाहिजे असं नं म्हणता ‘ तुला फोकटवला पाहिजे’ असं म्हणतात!
हे व असे अनंत शब्दप्रयोग नियमित वापरले जातात. यांची कुठल्याही डिक्शनरीमध्ये नोंद नसावी. भाषा ही संवादाचे माध्यम जरी असली, तरी भावना उत्कटपणे या हृदयातून त्या हृदयात पोहोचणं महत्वाचं असतं आणि लेखी भाषेपेक्षा बोलीभाषा हे काम प्रभावीपणे करत असते. आणि असे शब्द हे काम ‘आडस्’ करत असतात, नाही का?
??#आडसमाझीरत्नागिरी❤️
साभार फेसबुक वाल – मुळ लेखक श्री प्रशांत शेलटकर, रत्नागिरी
संग्राहक – श्री विद्याधर फाटक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
काही शब्दच असे असतात की ते ऐकणार्याच्या मनावर जादु करतात. कुणी छोटसं काम केलं आणि पटकन् त्या व्यक्तीला “धन्यवाद” म्हणून कृतज्ञता व्यक्त केली की त्या आदान प्रदानात गोडवा राहतो.
या लाॅकडाउनच्या काळात माझ्यासारख्या वय झालेल्या महिलेला अनेकांनी मदत केली.कुणी किराणा आणून दिला ,कुणी फळे भाज्या ,किरकोळ औषधे,रोख पैसे …वजने उचलली ..एक ना अनेकप्रकारे सहायता केली. मी त्यांची नुसतीच आभारी नाही तर ऋणी आहे…
आतापर्यंतच्या आयुष्यात माझ्यावर फार संकटे आली अथवा अशा काही समस्या ऊभ्या राहिल्या असे सुदैवाने झाले नाही ..एक सुरक्षित अन् नाॅर्मलच आयुष्य जगले!!
पण हा लेख लिहीत असताना माझ्या मनात आले, संकट म्हणजे नक्की काय? त्याची व्याख्या काय?—–
तुम्हाला प्रचंड तहान लागली आहे आणि तुमच्या जवळ प्यायला पाणी नाही, त्यावेळी कुणीतरी तुम्हाला त्याच्या जवळची पाण्याने भरलेली बाटली देउन तुमची तहान भागवतो तो क्षण सर्वोच्च कृतज्ञतेचाच असतो!
तुम्हाला त्वरेने कुठेतरी जायचे आहे आणि त्याच वेळी टॅक्सी रिक्षा बस वाल्यांचा संप आहे ,पण कुणी ओळखीचे अथवा अनोळखी तुम्हाला स्वत:च्या गाडीतून सोडतात तेव्हा त्या उपकाराची परतफेड फक्त “धन्यवाद!!” या सर्वसमावेशक शब्दानेच होऊ शकते!!
संकट मोठं नसलं तरी मदतीची गरज कशी कशा स्वरुपात हे परिस्थिती ठरवते..
माझे प्रिय पपा गेले तेव्हां आम्ही जळगावला राहत होतो! मला खूप उशीरा कळवलं! वेळेत ठाण्याला कसं पोहचायचं? मला पपांचं अंत्यदर्शन तरी मिळेल का? प्रचंड दु:खाने मी बुद्धीहीन झाले होते! दोघांनाही —मी आणि माझे पती —जाणं आवश्यक होतं! शिवाय माझ्या मिस्टरांना मला अशा अत्यंत भावनिक प्रसंगी एकटीलाच जाऊ द्यायचं नव्हतं..मग लहान मुलींना कुठे ठेवणार?
त्यावेळी आमचे जीवलग मित्र डाॅ. गुप्ता आणि अलका यांनी सर्वतोपरी मदत केली .अतिमहत्वाच्या कोट्यामधुन रेल्वेची तिकीटं आणून दिली. मुलींची जबाबदारी घेतली .माझी बॅगही भरण्यात मदत केली .स्टेशनवर सोडायला आले.त्यावेळी ए टी एम वगैरे नव्हतच! पैशाचं एक पुडकंही त्यांनी माझ्या बॅगेत टाकलं! माझे पती त्यांना म्हणालेही “पैसे आहेत अरे…!””असु दे! लागतील..”
प्रश्न पैशांचा नव्हता!! त्यामागची भावना महत्वाची..
—-मैत्री, प्रेम, प्रसंगाचं गांभीर्य समजुन दाखवलेलं औचित्य याचं मोल होऊच शकत नाही.. त्यासाठी धन्यवाद हे शब्दही तोकडे आहेत!!
अगदी अलीकडे दोन वर्षापूर्वी माझी गुडघेरोपणाची शस्त्रक्रिया झाली !आम्ही दोघच ! मुलं परदेशात .माणूसबळ नाहीच. शिवाय कुणाला कशाला त्रास द्यायचा? निभावुन नेऊ आपले आपणच!!– पण प्रत्यक्ष आॅपरेशनच्या दिवशी माझ्या नणंदेचा मुलगा सुन हजर..पुढची सगळी सुत्रं त्या दोघांनी हातात घेतली..माझी जाऊही सोबतीला आली. ही सगळी माझ्या प्रेमाची माणसं ऊत्स्फुर्तपणे आली ..माझ्या सेवेखातर.. सगळं सुरळीत पार पडलं. आज जेव्हां मी बिना वेदनेचं पाऊल ऊचलते तेव्हां या सर्वांच्या प्रेमाचंच बळ एकवटलेलं असतं!!—यांचे आभार कसे मानु? किती अपुरे आहेत शब्द!!
खरं सांगु? मला माझ्या आयुष्यांत असे हाक मारल्यावर धावणारे मित्र मैत्रीणी, प्रियजन, नातेवाईक लाभले, म्हणून मी परमेश्वराचेच आभार मानते!!
ईश्वरचरणी मी माझी कृतज्ञता ,भावपूर्णतेने व्यक्त करते….!!!
☆ 15 आॕगस्ट … माझाही स्वातंत्र्य दिन !!! – भाग १ ☆
15 ऑगस्ट !!! ही नुसती तारीख नव्हे, आपणा सर्व भारतीयांच्या मनावर सुवर्णाक्षराने कोरलेला हा अभिमानाचा दिवस ! याच तारखेला एकेवर्षी भारत स्वतंत्र झाला होता… आणि एकेवर्षी मी सुद्धा ! भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता आणि मी माझ्याच !
सुरुवातीला एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये मी महाराष्ट्र प्रमुख होतो. महिन्याचं उत्पन्न … 4-5 लाख !
पण यांतही समाधानी नव्हतो ! —-भरपूर पैसे कमावणे, वर …वर… वर जाणे …आणखी वरचे पद मिळवणे—–घर गाडी बंगला घेणे—-आज महाराष्ट्र प्रमुख आहे, उद्या भारताचा प्रमुख होणे—– जमलंच तर परवा जगातील काही देशांचासुद्धा प्रमुख होणे—-जग जिंकायला निघालेला सिकंदर होतो मी !–फरक इतकाच, तो सिकंदर घोड्यावर होता, आणि दिडशहाणा मी… गाढवावर !—–
हे गाढवही मीच होतो आणि गाढवावर बसलेला दीडशहाणाही मीच !
एके दिवशी, आयुष्याच्या वाटेत भेटलेल्या भीक मागणाऱ्या एका आजोबांनी दीडशहाण्या सिकंदराची नशा उतरवली—-!—-माणूस म्हणून जगण्याचं सूत्र सांगितलं—-!
ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॕचरोपॕथी आणि इतर कुठल्याही पॕथीपेक्षा Sympathy आणि Empathy (अनुभुती आणि सह अनुभुती या पॕथी वापरणं, हे माणूस असल्याचं लक्षण असतं—- हे त्यांनी माझ्यावर ठसवलं—-!
डोंगरावर चढणार्या माणसाचे पाय ओढून त्याला पाडण्यापेक्षा, जमिनीवर पडलेल्या एखाद्या निराधाराचे हात ओढुन त्याला उभं करणं यातच खरा पुरुषार्थ असतो—-पुरुषार्थाची ही व्याख्या त्यांनी मला नव्यानं सांगितली—!
ते खरंतर भिक्षेकरी नव्हते, ते उच्चशिक्षित होते. या गोड व्यक्तीमधून मधुर रस चावून चावून ओरबाडून घेऊन, उसाच्या चोयटीसारखं त्यांच्या भाऊबंदांनी त्यांना रस्त्यात फेकलं होतं !
बाबांनी सांगितलेल्या त्या बाबी त्यावेळी कानात उतरल्या होत्या… पण मनात नाही… !
मी धावत होतो शर्यतीत—!शर्यतीची नशा होती —!!
पैसे… पद… प्रतिष्ठा … मी एकेक गड जिंकत चाललो होतो… पण मन भरत नव्हतं !
हे सगळं कमावून झाल्यावर, एके दिवशी भेटायला गेलो त्यांना… आणि समजलं, की मला मुलगा समजणारे “ते” बाबा बेवारस म्हणून रस्त्यावर “मेले”——!
हो–मेले —स्वर्गवासी होणं, कैलासवासी होणं, आणि देवाघरी जाणं ही प्रतिष्ठितांची मक्तेदारी …!
——“मेला” हा शब्द प्रतिष्ठा नसणाऱ्यांसाठीच ठेवणीत ठेवलाय !
ते मरुन गेले… आणि जातांना भिका-यांच्या डाॕक्टरला जन्माला घालुन गेले—–!
मी त्यांचा मुलगा म्हणून जिवंत असूनही ते बेवारस म्हणून गेले—-!
मी अंतर्मुख झालो !——
ज्यांनी त्यांना रस काढून हाकलुन दिलं होत, त्या लोकांत आणि माझ्यात फरक काय ?
पूर्वी ऐकलेले त्यांचे विचार आता कानातून मनात उतरायला लागले—- Heart पासून हृदयात यायला लागले… !
त्यांच्या विचारांचं मनन चिंतन व्हायला लागलं, माझ्याही नकळत—- ! —
आणि या दीड शहाण्या सिकंदराची नशा पूर्ण उतरली !
जग जिंकण्यापेक्षा, जगातला “माणूस” जिंकावा, किंवा माणुसकीचं “जग” जिंकावं…!
—उतरलेल्या नशेनं हेच शिकवलं !
आणि, हा दीड शहाणा सिकंदर त्या गाढवावरून उतरला, आणि 14 ऑगस्टला त्याने या इंटरनॅशनल संस्थेचा राजीनामा दिला.
आणि—- 15 ऑगस्ट 2015 ला “ भिकाऱ्यांचा डॉक्टर “ म्हणून तो रस्त्यावर आला… !
स्वतःच स्वतःवर लादलेल्या गुलामगिरीतुन तो मुक्त झाला… !
मीच स्वतः स्वीकारलेल्या ‘पद-पैसा-प्रतिष्ठा ‘ या शर्यतीतून मी स्वतंत्र झालो तो दिवस होता
15 आॕगस्ट 2015 —— म्हणुन हा माझ्या दृष्टीने माझाही स्वातंत्र्य दिन… !
—–या अगोदर असलेले सर्व दिवस माझ्यासाठी पैसा असूनही “दीन” होते—- 15 आॕगस्ट 2015 नंतर ते पैसा नसुनही “दिन” झाले !
जवळचे लोक म्हणतात… हरलास तू आभ्या !—-
नाही! अजिबात नाही —–
शर्यतीत किती धावायचं ? कसं धावायचं ? यापेक्षा कुठं थांबायचं … ? हे कळणं जास्त महत्वाचं !
योग्य ठिकाणी हरावंच लागतं… !
कुठं आणि कधी हरायचं हे ज्याला कळतं तो कायम जिंकतो !—-
कारण शर्यतीत धावणाराला हे कधीच कळत नाही… की शर्यत लावणारा स्वतः कधीच पळत नाही.
एखाद्याला आपल्या पुढं जाताना बघूनही आपल्याला आनंद झाला तर समजावं—-आपण आत्ता खरे “मोठे” झालो—-बाकी वय बीय सारं झुठ !!!
वय फक्त केस पांढरे करण्यापुरतं येतं—–जेव्हा ते मन शुभ्र करेल—तेव्हा त्याची किंमत—-!
पटणार नाही काहींना, आयुष्यात वेळ आली की Detach होणचं योग्य……..
असं म्हणतात, साठी नंतर ही प्रक्रिया सुरु करावी. अलिप्त म्हणजे separation नाही, aloof नाही, कुठलीही गोष्ट मनाला लावून नं घेणे….. ज्या गोष्टी जशा आहेत, त्याचा स्वीकार करणे, खोटी आशा बाळगू नये……
एक लक्षात असावे, माणसाचा स्वभाव बदलत नाही, स्वभावाला औषध नाही, खरं आहे…..
त्याचा मोठया मनाने स्वीकार करावा, ते बदलण्याचा प्रयत्न पण करू नये…… Detach….
मुलगा /मुलगी परदेशी आहेत…. हो.. त्यांची सारखी भेट होणार नाही, प्रत्यक्ष होणं शक्य नाही, हे मनाला सांगणे….. अलिप्त……
आपली स्थावार जंगम Property, खूप कष्टाने उभी केलेली, मान्य….. पण आता उपभोग घेण्याची शक्ती नाही, आसक्ती नाही, त्यावर शांतपणे विचार करून निर्णय घेणे…. Disconnect
आपल्या घरामध्ये खूप वस्तू असतात, कधी Marketing tricks मुळे तर कधी पत्नीचा, मुलांचा आग्रह… खरं सांगा आशा कित्येक वस्तू आपल्या घरात असतात, खरं आहे नं…. आपण वापरत नाही पण जपून ठेवतो, May be emotional attachment…..
कल्पना करा, लग्नानंतर छोट्या घरात संसार झाला नं, आता घर मोठं आहे, खूप साधने आहेत, पण माणसं दोन… काय करायचं… अशा वेळी Detach होणं चं महत्वाचं….
हे झालं निर्जीव वस्तूंबद्दल.. आता सजीव माणसं चेक करू या…….
काही वर्षांपूर्वी कोणाच्याही आयुष्यात आपण डोकावणे, स्वाभाविक होतं, कारण व्यक्ती वेगळ्या होत्या, सगळं स्वच्छ मोकळ्या आकाशा सारखं होतं…. आज परिस्थिती बदलली आहे मित्रांनो, विचार share होतं नाही, कोणी सल्ला मागत नाही, काही नं पटणाऱ्या गोष्टी विचारता येत नाही…. Detach….
रिक्त होण्यात सुख आहे मित्रांनो, दुःखाला delete करायला यायला पाहिजे, खूप कठीण आहे, मान्य, मग पूढे नाही जाऊ शकत…….
अशा वेळी कृष्णा चे चिंतन करावे…
त्याने कधीही मागे वळून बघितलं नाही…. कधी वाटलं नसेल का कृष्णाला कि देवकीला घट्ट मिठी मारावी आणि चार क्षण तिच्या कुशीत घालवावे…?
कधी गोकुळात जाऊन गोपिकांच्या घागरी फोडाव्या, मनसोक्त बासरी च्या मंद आवाजात सगळं विसरून जावं……..
मान्य आहे, कृष्ण परम परमेश्वर होता ??… आपण कृष्ण होऊ शकत नाही.. अशक्य… आयुष्यात जर कधी अलिप्त व्हायचं असेल तर कृष्ण आठवा…. तो स्फूर्ती देईल……..
मुलं लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात रमतात… काय गैर आहे, काही नाही, ते जर त्यांचे कर्तव्य पार पाडीत असतील तर तक्रारीला जागा नसावी…. पण माझं ऐकावं हा हट्ट बरा नाही… निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी असते, मान्य, पण जबरदस्ती नको….. लागू द्या ठेचं… शिकेल मुलगा,/मुलगी…
लहानपणी आई म्हणायची, तुला कळणार नाही आता, एकदा बाप झाला की कळेल….. किती साध्या भाषेत एवढं मोठं तत्वज्ञान आईच सांगू शकते…..
अलिप्त होण्यात सुख आहे…. पाऊस पडल्यानंतर नीरभ्र आकाशा सारखं मन स्वच्छ होईल मित्रांनो……
वाईट भावना, वाईट विचार कोलमडून जातील आणि स्वछंद आनंदाचा अनुभव प्राप्त होईल…
मनात प्रेम, सहानुभूती राहणार, पण गुंतणे नाही….
जिथे व्यक्ती गुंतते, तिथे राग, लोभ, येणार….हे मळभ दूर झाले की सर्व छान, स्वच्छ, निर्मळ……….
एका वाळवंटात एक चिमणी रहात होती. ती खूप आजारी होती, तिला पंख नव्हते, तिच्याकडे खाण्यापिण्यासाठी पण काहीच नव्हते आणि रहायला घरही नव्हतं.
एके दिवशी एक कबूतर तेथून जात होतं. चिमणीने त्या कबुतराला थांबवलं व विचारलं, “तू कुठे जात आहेस?” कबूतराने उत्तर दिलं, “मी स्वर्गात जात आहे.”
ती आजारी चिमणी म्हणाली, “कृपा करून माझा त्रास कधी संपणार या बद्दल माहिती मिळवशील का?” कबूतर म्हणालं, “नक्कीच, मी तपास करेन.” आणि कबुतराने त्या आजारी चिमणीचा निरोप घेतला.
कबुतर स्वर्गात पोहोचलं आणि प्रवेश द्वारावरील देवदूताला आजारी चिमणीचा निरोप सांगितला.
देवदूत म्हणाला, “तिच्या जीवनातील पुढील सात वर्षे तिला असाच त्रास सहन करावा लागेल व तिच्या आयुष्यात कोणताच आनंद नसेल.”
कबूतर म्हणालं, “हे ऐकून तर ती आजारी चिमणी अजूनच निराश होईल. यावर तुम्ही काही उपाय सांगू शकता का?”
देवदूत म्हणाला, “मी सांगतो तसा तिला जप करायला सांग – परमेश्वरा, तू मला जे काही दिलं आहेस, त्याबद्दल मी तुझी आभारी आहे, धन्यवाद.”
सात दिवसानंतर जेव्हा कबुतर तिथून जात होतं तेव्हा त्याने बघितलं की ती चिमणी खूप आनंदी आहे. तिच्या शरीरावर पंख फुटले होते, वाळवंटात एक लहानसे झाड उगवले होते, जवळंच पाण्याचा तलावसुद्धा तयार झाला होता आणि ती चिमणी आनंदाने गात होती, नाचत होती.
हे सर्वं पाहून कबूतर आश्चर्यचकित झालं. कारण देवदूताने सांगितलं होतं की पुढील सात वर्षे त्या चिमणीच्या आयुष्यात कोणताच आनंद नसेल. ह्या कुतूहलाने कबूतर परत स्वर्गाच्या दरवाजावर असलेल्या देवदूताला भेटयला गेलं.
कबुतराने त्याचे कुतूहल देवदूताला सांगितलं. देवदूताने उत्तर दिलं, “होय, हे सत्य आहे की पुढील सात वर्षे त्या चिमणीच्या आयुष्यात कोणताच आनंद नव्हता. परंतु प्रत्येक क्षणी चिमणी, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते”, हा जप करीत होती. म्हणून तीचं जीवन बदलून गेलं.
ती जेव्हा गरम वाळूवर पडत असे, तेव्हा म्हणत असे, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते.”
जेव्हा ती उडू शकत नसे तेव्हा ती म्हणत असे, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते.”
जेव्हा तिला तहान लागत असे आणि आजुबाजूला पाण्याचा थेंब सुद्धा नसे तेव्हा सुद्धा ती हेच म्हणत असे की, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते.”
परिस्थिती कोणतीही असो चिमणी हाच जप आळवित असे म्हणून तिची त्रासदायक सात वर्षे, सात दिवसात बदलून गेली.”
जर आपण लक्षपूर्वक पहिलं तर, आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे आपल्याला सापडतील जेव्हा कृतज्ञतेच्या भावनेने परिस्थितीला पूर्णपणे बदलून टाकले, इतकेच काय एखाद्याचे संपूर्ण जीवन देखील.
जर का आपणसुद्धा प्रत्येक प्रसंगी, “हे देवा, तू मला जे काही दिले आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो”, हा जप करु शकलो तर त्यात आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे.
ही गोष्ट आपला दृष्टिकोन, आपल्या जवळ काय नाही पासून आपल्या जवळ काय आहे पर्यंत बदलण्यास मदत करते.
उदाहरणादाखल आपले डोके दुखत असताना जर आपल्या उर्वरित आरोग्याबद्दल आपण देवाचे आभार मानले की, “माझे बाकीचे शरीर पूर्णपणे निरोगी ठेवल्याबद्दल तुमचे आभार” तर आपली डोकेदुखी सुद्धा फारशी त्रास देत नाही.
चला तर मग मिळालेल्या सर्वं आशीर्वादांबद्दल परमेश्वराचे आभार मानूया.. त्यामुळे आपल्या जीवनात नक्कीच सुखद बदल घडून येईल.
संग्राहक – श्री सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
आपलं मन एक अजब रसायन आहे. इंद्रीय म्हणावं तर दिसत नाही, पण त्याशिवाय आपण जगूही शकत नाही. किती विचित्र गोष्ट आहे ना ? विचार करणारं, विचाराला चालना देणारं आपलं मन आपल्या ताब्यात ठेवलं तरच आपले जीवन सुसह्य होते. अर्थात ते विचारही सुसंगत हवेत. सध्याची परिस्थिती बघता हे कितपत जमेल हे कळत नाही. रोज कोरोनाच्या विपरीत बातम्या, ओळखीच्या-अनोळखीच्या लोकांच्या मृत्युंच्या बातम्या कळून आपण भयकंपित होतो. आपले विचारही त्याच मार्गावर जातात. प्रत्येकजण मरणाच्या भीतीने घाबरलेला आहे. निराधार, असुरक्षित वाटतंय. या सर्वातून बाहेर पडायला काहीतरी उपाय करायलाच हवा ना.
एक साधं उदाहरण घेऊयात. कपडे धुतल्यावर त्याला इस्त्री करतो. का तर त्यावरच्या सुरकुत्या जाऊन कपडा कडक, साफसुतरा व नीटनेटका दिसावा म्हणून. अहो आपलं मनही तसंच आहे. कोरोनाच्या, मरणाच्या भीतीच्या सुरकुत्याच आपल्या मनावर पडल्यात. आता त्या काढायच्या तर मनालाही, पर्यायाने विचारांनाही इस्त्री करायलाच हवी. तुम्ही विचाराल हे कसं करणार ? अहो सोप्पं नाहीच ते. मनातले विचार सकारात्मक करणे फार अवघड आहे. त्याला तसाच कडक स्टार्च केला तर या धकाधकीत आपण सुरक्षित राहू. आता स्टार्च म्हणजे आपले विचार बदलायचे.
आपलं मन हट्टी असतं हे सगळ्यांना माहीत आहे. जी गोष्ट करायची नाही असं ठरवलं तरी तीच गोष्ट करण्याकडे मन धावत राहतं. जे विचार मनात आणायचे नाहीत असं आपण ठरवतो नेमके तेच विचार आपला पिच्छा पुरवतात. ज्याचं मन संयमी असतं त्याला ते सहज जमतं. पण सर्व सामान्य माणूस त्याच्या आहारी जातो. अशा वेळेस त्याने स्वत्वाचा विचार करावा. मग त्यांने अध्यात्म, योगशास्त्र, मनो:ध्यान याचा आधार घ्यायला हवा. मन:शांतीने विचारात ठामपणा येतो. मन एकाग्र करता येते. एखादी श्रध्दा कामी येते. सांगोपांग विचार करून आपण आपलं वागणं बदलू शकतो. भीती, असुरक्षितता, निराधार असल्याची भावना निग्रहाने दूर करू शकतो. या सगळ्या क्रिया म्हणजेच आपल्या विचारांना केलेला ” स्टार्च ” !.
या स्टार्चने आपले विचार स्पष्ट, साफ, सकारात्मकतेने भरलेले होतात. आणि असं झाल्यावर कुठल्याच विचारांनी भ्यायचे कारणच उरत नाही ना.
मग काय, करणार ना तुम्ही ही स्टार्च तुमच्या विचारांना ?
कोणतेही काम सांगा, हिच्याकडे,त्यावर माणसे,आणि उत्तर तयार असते.
बरं ,यात तिला मोठेपणाही नको असतो.
पण मदत करण्याची हौस—
हसू येईल सांगितले तर,
पण हिच्या मदतीचा लोकांना त्रास होतो.
कसे म्हणताय?
ऐका तर।
लेकाचे लग्न विशूने हौसेने केले.
सूनबाईना वेगळा फ्लॅट आधीच घेऊन ठेवला होता.
सूनबाई घरी प्रवेश करायच्या आधीच , विशूने, आपल्या हौसेने, घर अगदी मस्त लावून टाकले.
सूनबाईने बघितले, आणि म्हणाली, मला हा नको होता फ्रीज. आणि मला हा रंग नाही आवडत भिंतींना. मला तरी विचारायचे ना आधी.
झाले। एवढा खर्च, कष्ट करूनही दोघीही नाराजच.
तरी विशूची जित्याची खोड जात नाही.
ती इतकी भाबडी आहे ना,की, समोरचा रागावूही शकत नाही.
सहज वीणा म्हणाली, बाई ग परवा केळवण करणार आहे, 10 माणसे यायची हेत. ,काही सुचत नाही बघ, काय मेनू करू,आणि कसे करू.
विशूने तिला न विचारता, तिच्या समोरच एका बाईना फोन केला, आणि मेनूही सांगून मोकळी झाली.
वीणा म्हणाली, अग हे काय,। मी आहे ना इथे,मला विचार की. पैसे मी देणारे ना.
आणि तुला कुणी सांगितलं मला बाई हवीय ? मी बघीन काय करायचे ते–
ते विशूच्या गावीही नव्हते.. हल्ली लोक तिला बोलवेनासे झालेत.
आली की सर्व सूत्रे हाती घेतलीच म्हणून समजा.
भिडस्त लोकांना हे आवडत नाही पण बोलताही येत नाही.
तिलाही फटके कमी नाही बसत,या स्वभावाचे.
कामवालीच्या उनाड मुलाला हिने नोकरी लावून दिली.
4 दिवसात मालकाचा हिलाच फोन। बाई कसला मुलगा दिलात–.गेला की काम सोडून।
विचारले कामवालीला, तर फणकाऱ्याने म्हणाली, “काय व बाई. असली नोकरी देतात व्हय? दुधाच्या पिशव्या टाकायच्या- तर कोण तिसऱ्या तर कोण 5व्या मजल्यावर राहत्यात। पोराचे पाय दुखले, दिली सोडून नोकरी “.
विशू हतबुद्ध झाली, शेजारच्या मुलीचे लग्न जमता जमत नव्हते.
विशूच्या ओळखीचा एक मुलगा होता. हिने लगेच, त्या मुलीला, त्याचे स्थळ सुचवले.
दोघे, भेटले, बोलले.
ती मुलगी विशूला म्हणाली, “काकू, कसला मुलगा, सुचवलात हो. सगळे एकत्रच राहतात. केवढी माणसे, घरात. आणि त्याला पगारही माझ्यापेक्षा कमी. नका बाई असले मुलगे सुचवू.”
असं स्वतःचा रंग कोरडाठाक असलेली पाटी, कुठल्या तरी भिंतीवर, दुसऱ्या कुणीतरी तिला लावलेला गळफास घेत, मूकपणे ओरडून ज्या वस्तूकडे अंगुलीदर्शन करत असते, त्या वस्तूला, तिथून येणाऱ्या, जाणाऱ्या लोकांपैकी नव्वद टक्के लोकं बोटं लावून, खोटं ठरवायचा का प्रयत्न करतात, हा एक संशोधनाचा विषय नक्कीच होईल ! हुश्श !!!!
वरील पल्लेदार (का रंगतदार ?) वाक्य मराठीत असलं तरी, आपण त्याचा अर्थ नीट कळण्यासाठी परत एकदा वाचावं, अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे ! आणि आपण जर वरील वाक्य एका दमात वाचलं असेल तर, आपल्या चेहऱ्यावरचा रंग उडाला असण्याची शक्यता आहे ! म्हणजे आता मजा बघा कशी आहे, एखाद्याची चोरी पकडल्यावरच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो, असंच काही नाही ! या माझ्या विधानाशी आपण अ-सहमत होऊन उगाच रंगाचा बेरंग करणार नाही, असं मी माझ्या चेहऱ्यावरचा रंग न उडवता म्हणतोय ! आता, तो खरंच उडालाय का नाही याची सत्यता, असत्यता आपणास करायची असेल तर (स्व खर्चाने) सध्या मी रहात असलेल्या सिंगापूरी येऊनच करावी लागेल, त्याला माझा नाईलाज आहे ! आता सिंगापूरचा विषय निघालाच आहे म्हणून तुम्हाला एक सांगतो, जसे आपण आपल्या बंगलोरला (का बेंगलूरू ?) “गार्डन सिटी” म्हणतो, तसंच इथले लोकं सिंगापूरला “सिटी ईन द गार्डन” असं अभिमानाने म्हणतात ! या सार्थ नावांतच, किती अर्थ आणि हिरवाई भरलेली आहे, हे सुज्ञास सांगणे न लगे !
सांगायचा मुद्दा काय, तर रंगांच आकर्षण, सांनां पासून थोरां पर्यंत सगळ्यांनाच असतं. ढोबळ मानाने जगनमान्य असलेल्या सप्त रंगांपैकी, या नां त्या कारणाने प्रत्येकाचा एखादा रंग जास्त आवडता, जवळचा असतो किंवा फार फार तर त्याच्या खालोखाल आवडणारा दुसरा एखादा रंग पण असू शकतो !
दर वर्ष सहा महिन्यांनी (स्वतःच्या) बायको बरोबर साडी खरेदीला जाण्याचा योग, माझी रंगांची चॉईस चांगली असल्यामुळे येतो ! असंच एकदा शहाड्यांच्या का आठवल्यांच्या दुकानात, नक्की आठवत नाही, साडी खरेदीला गेलो असतांना (माझ्या सारख्या रिटायर्ड माणसाच्या बायकोच्या साडी खरेदीची उडी, याच दुकानाशी संपते ! “रूप संगम” “पानेरी” “पल्लरी” वगैरे डिझायनर साड्या विकणाऱ्या दुकानात आम्ही बाहेरूनच विंडो शॉपिंग करण्यात धन्यता मानतो !) सौ ने तिथल्या सेल्समनकडे “लहरी रंगाच्या साडया आहेत का ?” अशी विचारणा केली. तिचा तो प्रश्न ऐकून माझ्या चेहऱ्यावरचा रंग थोडासा उडाला, पण त्या सेल्समनने स्वतःच्या चेहऱ्याचा रंग न बदलता अगदी हसत हसत “आहेत ना, कालच नवीन स्टॉक आलाय !” अशी लोणकढी मारून आमच्या समोर त्या लहरी रंगांच्या साड्यांचा ढीग ठेवला, आता बोला ! त्या सेल्समनचे ते वागणे बघून माझ्या चेहऱ्याचा रंग आणखी उतरला ! कारण त्या वेळे पर्यंत लोकांच्या फक्त लहरी स्वभावाच्या रंग दर्शनाचा अनुभवच फक्त माझ्या गाठीला होता ! असो !
एखादा रंग दुसऱ्यावर खुलून दिसतो म्हणून, आपल्या रंग रूपाचा विचार न करता, त्याच रंगाचा शर्ट किंवा साडी नेसून स्वतःच हस करून घेण्यात काय हशील ! पण म्हणतात ना, पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना, हेच खरं ! आणि किती झालं तरी आपले दुसरे कुठले अंगभूत रंग उधळून, लोकांना त्रास देण्यापेक्षा स्वतःच्या आवडीचे रंग परिधान करणे, हे केव्हाही सगळ्यांच्या दृष्टीने श्रेयस्करच, नाही का ?
सामान्यपणे सात रंगात जरी जगातल्या रंगांची वर्गवारी झाली असली, तरी काही नव नवीन रंगांचा शोध स्वतःला रंगारी म्हणवणारे लोकं, नित्य नेमाने लावत असतात ! हे रंगारी एवढ्यावरच न थांबता, त्याला स्वतःच्या बुद्धिमत्ते प्रमाणे नांव देवून (का ठेवून?) मोकळे पण होतात ! जसं, आपल्या स्वतःच्या उपवर मुलीचे स्थळ सुचवतांना, मुलीचे आई वडील, तिचे वर्णन “नाकी डोळी निट्स, रंग – निमगोरा किंवा गव्हाळ किंवा सावळी” असा करतात. आता निमगोरा किंवा गव्हाळ असे रंग (ऑफिशियली) अस्तित्वात आहेत का नाही, हे मला खरंच ठाऊक नाही ! पण या दोन रंगांची उत्पती त्यांच्या नावासकट अशाच कुठल्या तरी उपवर मुलीच्या मातेकडून किंवा पित्याकडून फार वर्षां पूर्वीच झाली असण्याची दाट शक्यता आहे ! आता आपल्या सारखी चाणाक्ष माणसं, अशा तऱ्हेच्या रंगांच्या वर्णनातली मेख बरोब्बर ओळखतात, हे मी काय वेगळे सांगायला का हवे !
काही काही रंगांचा वापर हा साऱ्या दुनियेत ठराविक कारणासाठीच केला जातो, हे आपल्याला ठाऊक आहेच !
उदाहरणार्थ, लाल रंग धोक्याची सूचना देण्यासाठी किंवा हिरवा रंग धोका (तात्पुरता) नाही आहे हे कळण्यासाठी ! तसंच पांढरा रंग हा शरणगताचा मानला जातो ! काळा रंग काही जणांचा आवडता असला, तरी सर्व सामान्यपणे तो अशुभ मानतात ! हे रंगांचे ठोकताळे कोणा रंगाऱ्याच्या डोक्यातून आले, हा सुद्धा दुसरा संशोधनाचा विषय होऊ शकतो !
पूर्वी माझ्या पिढीत, प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमी मंडळी नेहमी गुलाबी रंगाचा वापर करीत असत ! पण हल्ली या गुलाबी रंगाची जागा, लाल रंगाच्या गुलाबाने सुद्धा घेतल्याचे माझ्या चाणाक्ष नजरेने ताडले आहे ! बहुदा सांप्रतकाळी, अशा प्रेमात पुढे मिळणाऱ्या/होणाऱ्या धोक्याची जाणीव आधीच झाल्यामुळे, हा रंग बदल झाला असावा, अशी मी माझ्या मनाची सध्या तरी समजूत करून घेतली आहे ! आजकाल प्रेमाच्या रंगात आकंठ रंगलेली प्रेमी मंडळीच ही माझी समजूत खरी का खोटी, यावर जास्त प्रकाश टाकू शकतील !
रोजच्या आयुष्यात वेग वेगळ्या रंगांचे किती महत्व आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही ! पण आपल्या रोजच्या जीवनातील एक साध उदाहरण द्यायच झालं तर, पूर्वी असलेला कृष्ण धवल दूरदर्शन संच आता कधीच कालबाह्य होऊन त्याची जागा, रंगीत दूरदर्शन संचाने नुसतीच घेतली नाही, तर त्याने आपल्या मनाचा पण पूर्ण ताबा घेवून, इथे ठाण मांडल्याचे आपण सध्या अनुभवत आहोतच ! फक्त त्याच्या आकारमांनात (खिशाला परवडण्याच्या प्रमाणात, आपल्या हॉलची साईज लक्षात न घेता ) बदल झाला आहे इतकंच !
“रंगूनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा” असं, या गीताचा आधार घेवून कोणी म्हणत असेल तर म्हणू दे ! त्यांना त्यांचा रंग लखलाभ ! पण आपण मला विचाराल, तर साऱ्या दुनियेचा रंगारी, जो हातात अदृश्य कुंचला घेवून वर बसला आहे त्याला आपण कदापि विसरून चालणार नाही ! त्याच्या मनांत येते तेव्हाच तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, त्याला हवे तेच रंग, नित्यानेमाने भरत असतो आणि काढून घेत असतो ! एखादा रंग आपल्याला जास्त आवडतो म्हणून त्याने तो सतत आपल्याला द्यावा, असं आपल्या मनांत कितीही असलं तरी, तो रंग कधी आणि किती द्यायचा हे त्याचा तो अदृश्य कुंचलाच ठरवतो ! आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, की आपल्या हातात फक्त आपल्या घराचा रंग जुना झाल्यावर तो बदलायचा, एव्हढेच असते ! आणि त्या वरच्या रंगाऱ्याने त्याच्या मर्जी नुसार आपल्या आयुष्यात बहाल केलेल्या रंगातच कायम समाधान मानायचं असते !
शेवटी, फक्त प्रार्थना करणेच माझ्या हातात असल्यामुळे, आपल्या सगळ्यांवरच, आपापल्या आवडणाऱ्या रंगांची कायम उधळण कर, हीच माझी त्या वरच्या रंगाऱ्याला हात जोडून विनंती !
कोपरा ..प्रत्येकाच्या घरातला ,अंगणातला ,समाजातला मंदिरातला आणि देशातलासुद्धा ! प्रत्येक कोपऱ्याला त्याचं त्याचं स्वतःचं असं एक स्थान अन कामही असतं .बघा , घराच्या एका कोपऱ्यात चूल असायची अन तिथं जळणासाठीचा कोपरा असायचा ,कोपऱ्यातील जळण संपलं की मग तो स्वच्छ झाडायचा अन मग दुसरा भारा तिथं रचायचा! बरेचदा घरधणीन या कोपऱ्यात भिशी पुरून ठेवायची व पै पै टाकत रहायची कारण हा कोपरा फक्त तिचाच असायचा तिथं सहजासहजी कुणी जात नसे .
पूर्वीच्या काळी म्हणजे फार नाही वीसेक वर्षांपूर्वीपर्यन्त घराच्या एका कोपऱ्यात मडक्यांची उतरंड असायची ,सर्वात मोठं मडकं खाली टेकू देऊन ठेवायचं मग त्यापेक्षा लहान लहान असं करत उतरंड रचलेली असायची . या मडक्यात राखेत ठेवलेला बी बेवळा ,बिबा , हळकुंड अन असच किडुक मिडुक काही बाही ठेवलेलं असायचं ,जेव्हा नड असेल तेव्हा त्या वस्तू उतरंडीतून हळूच काढायच्या कधी मधी मधल्या अधल्या लोटक्यात चिल्लर साठायची -पाच ,दहा ,पंचवीस ,पन्नास पैशांची !
शेतकऱ्याच्या घरात एक कोपरा असायचा अवजारांचा … जिथं कुदळ ,खोरं ,पाटी ,जनावरांची दावी ,बैलांच्या घुंगुरमाळा अन असंच काहीसं …बाजूच्या कोपऱ्यात जातं, अन उखळ मुसळ अन सूप.
एक कोपरा देवाचा ..जिकडं जास्त वर्दळ नसेल अश्या ठिकाणी देवाचा कोपरा असायचा. फक्त घरातील देवपूजा करणारी जेष्ठ अन म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांचा तिकडं वावर असायचा .एकूण काय तर कोपऱ्यातल्या वस्तूंचं काम झालं की कोपऱ्यातच विश्रांती घेत. कितीही महत्त्वाच्या असल्या तरी घरातल्या मध्यभागी त्यांना स्थान नसते .
आधुनिक घरातले कोपरे आता शो पिस चे किंवा तत्सम वस्तूंचे असतात किंवा वास्तुशास्त्रां प्रमाणे विशिष्ट वस्तूंसाठीच म्हणजे अमुक कोपऱ्यात कमळ ठेवा तमुक कोपऱ्यात लाल दिवा लावा अश्या पद्धतीने !
मंदिराच्या कोपऱ्यात असतात खणा -नारळांचे ढीग ,हार तुऱ्यांचे ढीग आशाळभूत पणे कुणीतरी उचलून योग्य ठिकाणी ठेवण्याच्या प्रतीक्षेत !
अंगणाच्या कोपऱ्यात पूर्वी असायचे रहाट अन आड ,तुळस , न्हाणी अन कपडे -भांडी धुण्याची जागा. आता अंगणच आकसले त्यामुळे आड मुजला अन तुळस शोपिस झाली !
समाजाचेही असे विविध कोपरे असतात …महत्वाच्या व्यक्ती ,देशाच्या विकासात हातभार लावणाऱ्या किंवा खूप काही करून साधे जीवन जगणाऱ्या समूहाचे कोपरे, दुर्लक्षित लोकजीवनाचे कोपरे , प्रवाहात नसणाऱ्या समूहाचे कोपरे ..हे लोक तिथेच जन्मतात ,वाढतात अन मरतातही ! ते मध्यभागी कधीच येत नाहीत विशिष्ट कोपऱ्यातून !
देशाच्या कानाकोपऱ्याचेही असेच असते कुठल्या कोपऱ्यात काय काय घडत असते पण सगळेच उजेडात येत नसते प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी लपून राहतेच !
आपल्या मनाच्या कोपऱ्याचेही असेच आहे ना ? बघा, प्रत्येक कोपऱ्यात काही न काही नक्कीच असते ,छान छान आठवणी ,मनावर अधीराज्य करणारी माणसे ,काही दबलेली स्वप्ने ,काही पुसट झालेल्या आठवणी ,काही अपुरी स्वप्ने , राग ,द्वेष ,असूया ,भूतकाळ ,भविष्यकाळ ,सुविचार ,कुविचार ,देव अन सैतानसुद्धा !
ज्या कोपऱ्याचे प्राबल्य अधिक तो कोपरा मनावर ,शरीरावर ,जीवनावर अधिराज्य घडवतो ;म्हणजे असं ,सैतानाचा कोपरा प्रबळ असेल तर माणूस सैतानासारखा वागतो, कुविचारांचा असेल तर मनात नेहमी दुसऱ्यांच वाईटच येणार ,सुविचारांचं प्राबल्य अधिक असेल तर माणसाचे आचार विचार शुद्ध होणार अन देवाचं प्राबल्य अधिक असेल तर माणूस देवगुणी होतो .
ज्याच्या मनाचे कोपरे लखलखीत तो माणूस सदा उत्साही ,आनंदी आणि आशावादी असतो .
प्रत्येकानेच मनातली द्वेष ,अहंकार ,असूयेचीअडगळ काढून ,चिंतेच्या जाळ्या झाडून तिथे चांगुलपणाचे दिवे लावले तर मन लक्ख उजळून मंदिर होईल ,अन जीवन उजळून जाऊन माणुसकीचे दिवे प्रत्येक कोपऱ्यात लागतील …
☆ चेक पोस्ट ड्युटी..शब्दांकन शीतल चव्हाण ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆
(काळजाला हात घालणारा प्रसंग)
—-चेकपोस्ट अंकली…सोबत संजय जाधव सर… दुसऱ्या दिवशी पोलिसांनी काय मनावर घेतलं कुणास ठाऊक?..पण दुसऱ्या दिवशी सगळ्याच गाड्यांची झडती घेतली… पण तेवढ्यात सुध्दा लोकं डोळा चुकवून सटकत होती,…आणि जी अडवली जात होती त्यांच्या हातात हमखास दवाखान्याची फाईल…म्हणजे गेल्या 5 वर्षात जेवढी सांगलीला दवाखान्यात गेली नसतील ना.. तेवढी ह्या लॉकडाउनच्या काळात दवाखान्यात गेली….कुठून कुठून…,कधीच्या अन कुणाच्या फाईली हुडकून काढल्या कुणास ठाऊक?
ह्याच गडबडीत एक तरुण मुलगा येऊन माझ्यासमोर उभा राहिला….साधारण वीस बावीस वर्षाचा असेल…त्याला वाटलं आम्ही सुध्दा पोलिसच आहोत की काय !…म्हणाला “साहेब, बहिणीकडे चाललोय,पलूसला…प्लिज ..जाऊ दे.” जाधव सरांनी विचारलं.. ,”का चाललाय?”..त्यावर त्यानं जे उत्तर दिलं त्यावर आम्ही दोघेही खूप हसलो… म्हणाला, ” ते बहिणीला सांडगं, पापड, कुरुड्या आणि चटणी द्यायला चाललोय, उन्हाळ्याचं.”…मी हसत हसतच त्याला खुळ्यात काढलं,.. म्हटलं “लेका तुला काय कळतंय का?.. इथं काय चाललंय?..दुनिया थांबलीय अक्की..अन तुला कुरुड्याचं पडलंय होय!!”.. तसा त्याचा चेहराच पडला..”नाही साहेब, तसं नाही.. खरं प्लिज मला जाऊ दे”… मी त्याला पोलिसांकडे जायला सांगितलं.” जा..त्यांची घे जा परवानगी”. त्यानं पोलिसालापण हीच विनवणी केली… पोलिसांनी देखील सुरुवातीला त्याला शिव्याच घातल्या.. आणि परत जायला सांगितलं…तसा तो त्यातल्या एका पोलिसाच्या पायाशीच वाकला,..आणि ढसाढसा रडायला लागला….”साहेब प्लिज, मला जाऊदे, … नाहीतर माझ्या बहिणीचं काही खरं नाही… प्लिज मला माझ्या बहिणीसाठी तरी सोडा,….मी येताना परत इथं थांबतो,… त्यावेळी मला काय शिक्षा द्यायची ते द्या.”…. त्याच्या एवढ्या विनवणीवर आम्ही सगळेजण अवाक झालो…. त्या पोलिसाने त्याला जवळ घेऊन विचारलं…,”असं का म्हणतोयस”..त्यावर त्यानं रडतच उत्तर दिलं,…”साहेब ,दरवर्षी बहिणीला इकडूनच सगळं द्यावं लागतं,.नाहीतर सासरची लोकं तिला खूप त्रास देतात ओ….यावर्षी हे उन्हाळ्याचं द्यायला जरा उशीर झालाय तर दाजी तिला रोज फोडून काढा लागल्यात.” …. भयाण वास्तव… तो भाऊ आमच्यासमोर मांडत होता…. एका पोलीस मित्रानं त्याला सांगितलं….”अरे एक तारखेनंतर जा की लेका”.… तो नाही म्हणाला,..” कारण आज जर इथून परत गेलो तर घरात आई बाच्या जीवाला पण घोर लागेल… गेली महिनाभर त्या दोघांना सुध्दा बहीणीची खूप काळजी लागलीय….”
एक निवृत्तीला झुकलेले पोलीस काका होते…. त्यांच्या डोळ्यांत मात्र टचकन पाणी आलं…. बहुधा त्यांनाही एखादी लेक असावी… कारण त्या पोलिसाच्या वेशात भावुक झालेला बाप मला स्पष्ट दिसत होता…. सगळे पोलीस बंधू भगिनी, आम्ही क्षणभर शांत झालो होतो…. एरव्ही निर्ढावलेल्या चेहऱ्याच्या सर्व पोलिसांच्या डोळ्यांत पाणी साचलं होतं.… अन माझ्या साठलं होतं…. त्या पोलीस काकांनी त्याला स्वतःच्या गाडीवर बसवलं.. आणि म्हणाले..”चल, माझ्याबरोबर.. आपण दोघे मिळून तुझ्या बहिणीला हे सगळं देऊन येऊ.”….परत त्याला भीती.. पोलिसाला बघितल्यावर सासरची खवळतील अन परत बहिणीबाबत काही विपरीत घडायला नको…. म्हणून त्याने परत हात जोडून एकट्यालाच जाऊ द्यायची विनवणी केली….त्या पोलीस काकांनी त्याला धीर दिला.. “अरे मी समोर येणार नाही.. तू बाहेरच्या बाहेर दे आणि ये.. मी थांबतो अलीकडच्या चौकात.”..…एवढं ऐकल्यावर त्या मुलाने पोलीस काकांना घट्ट मिठीच मारली अन ओक्साबोक्शी रडू लागला……पोलीस काकांनी त्याला धीर देत गाडीवर पाठीमागे बसवलं.. त्या पिशव्या ,डबा ,,बरणी घेऊन तो पोलिसाच्या गाडीवर बसला आणि गाडी स्टार्ट झाली.. नजरेआड होईपर्यंत मी आणि जाधव सर त्या गाडीकडे पाहत होतो.. अगदी भरल्या डोळ्याने… पोलीस वेशातील एक बाप चालला होता.. ..एका लेकीकडे…..आणि एक भाऊ चालला होता एका बहिणीकडे…..फक्त नी फक्त तिचे अश्रू पुसण्यासाठी……
आज परत माझ्या मनात असंख्य प्रश्न काहूर माजवून गेले…..त्रास देवून गेले… ..तरीही आजूबाजूला अशी परमेश्वराची रूपं पाहायला मिळाली अन मी भानावर आलो….. आज परत मला कळेना कुणाला परमेश्वर म्हणू?….त्या भावाला?….त्या बहिणीला?….की त्या पोलीस काकांना?…..पण तो आहे एवढं मात्र नक्की.. कोणत्या ना कोणत्या रुपात तो तुम्हाला भेटावयास येतो… कदाचित आज देखील …
खरं सांगू… परमेश्वराने आपल्याला ” माणूस ” या पदावर पोस्टिंग केलंय.. पण आपण आपली पोस्ट विसरत चाललोय ….तसं विसरून नाही जमणार…. ती सतत चेक करावी लागेल आपल्याला…आपली माणूस ही पोस्ट… कदाचित ह्यालाच चेकपोस्ट म्हणतात बहुतेक…. . आज खऱ्या अर्थाने मी चेकपोस्टवर ड्युटीला होतो…..
थेट चेकपोस्टवरून…
शब्दांकन… शीतल चव्हाण, जयसिंगपूर
संग्राहक – श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈