मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ म्हातारा एसटी ड्रायव्हर… – लेखक : श्री प्रकाश फासाटे ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ म्हातारा एसटी ड्रायव्हर… – लेखक : श्री प्रकाश फासाटे ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

नाशिकच्या आगारातून नाशिक श्रीरामपूर एसटी निघाली. मी थेट श्रीरामपूर पर्यंत तिकीट काढले होते.

प्रवास मग तो कोणताही असो, तुम्हाला खूप काही शिकवतो, अनुभव देतो, विचार करायला लावतो.

बाहेर जोरदार पाऊस चालू होता, त्याही परिस्थितीत एसटी अगदी वेळेवर सुटली, तिला शहरातून बाहेर पडायला थोडा वेळ लागला कारण एक तर पावसाचे दिवस आणि त्यात रस्त्यावर भयंकर वाहने…!!

एसटी शहरातून बाहेर पडली. थोड्याच वेळात वेगाने सिन्नरच्या बाजूला निघेल असे सर्वांना वाटले. त्या एसटीने मात्र अतिशय संथ गतीमध्ये सिन्नर गाठले.

एसटीमध्ये बसलेले बहुतेक प्रवासी हे संगमनेर, प्रवरानगर आणि श्रीरामपूरचे होते, तिचा अतिशय हळू असलेला वेग पाहून आता प्रवाशांमध्ये कुजबूज सुरू झाली. एसटीमध्ये बसलेलं काही तरुण मुलांच टोळक होत, इतरही काही लोक बसलेले होते. पण सगळ्यांचा सूर एकच, एसटी खूप हळू चाललीय.

प्रत्येक जण एसटीच्या चालणाऱ्या संथ वेगामुळे थोडा नाराज झाला होता.

अगदी मलाही जाणवत होतं की एसटीचा वेग खूपच हळू आहे, पण मला अशी काही घाई नव्हती, माझ्यासाठी तो वेग योग्य होता इतकाही काही कमी नव्हता.

लोकांचा चाललेला चर्चेचा विषय बघून मी एक उत्सुकता म्हणून ड्रायव्हर कडे बघितले.

ड्रायव्हरची ती पाठमोरी आकृती मला दिसली. साधारण 55 ते 60 च्या आसपास वय असलेली ती व्यक्ती होती. डोक्याला पूर्ण टक्कल पडलेले होते, बिचारा गाडी चालवताना वाकला होता, त्याच्या खाकी शर्ट मधून दिसणाऱ्या दोन हातांवरून मला त्याच्या बारीक शरीरयष्टीची कल्पना आली.

जशी एसटी पुढे चालली होती, लोक ड्रायव्हर बद्दल एकमेकांत बोलत होते, मी सगळ्यांच्या चर्चा ऐकत होतो, प्रत्येकाचे वैयक्तिक मत मला ऐकू येत होते.

गाडीचा वेग मात्र अगदी तसाच होता. काही गाडीतील लोक वैतागले सुद्धा…!!!

तेवढ्यात त्या टोळक्यातील एक जण उठला आणि ड्रायव्हरच्या कॅबिन कडे गेला.

“अहो काका, गाडीला थोडा वेग द्या ना. हया वेगाने गेलो तर आपण खूप उशिरा पोहचू. ” तो मुलगा ड्रायव्हरला जाऊन भिडला.

ड्रायव्हरने त्या मुलाकडे बघितले आणि मान हलवली. त्यावेळी मला ड्रायव्हरचा चेहरा दिसला. त्याचा चेहरा मला थकलेला वाटला.

पुढे दोन तासाने गाडी चहा नाश्त्यासाठी थांबली. आम्ही सगळेजण उतरलो होतो, ते दोघेही वाहक आणि चालक आमच्यापासून दूर बसून चहा नाश्ता घेत होते, इकडे मात्र त्या तरुण टोळक्यांची ड्रायव्हर बद्दल टीका आणि त्यांची चेष्ठा करण्याचे काम चालूच होते.

मी त्यांच्या बाजूलाच बसलो होतो.

आता मात्र त्यांच्या टिकेने मर्यादा सोडली. एक जण त्यांना म्हातारा ड्रायव्हर म्हणत होता, तर दुसरा टकल्या म्हणत होता.

हे ऐकून मला मनातून खूप वाईट वाटले.

काही का असेना, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसाचा आदर हा राखलाच पाहिजे. आपण आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तीबद्दल असं बोलतो का?

आपण पैसे देऊन तिकीट घेतले म्हणजे आपल्याला वैयक्तिक टीकेचे अधिकार मिळतात असं नाही.

पण त्या तरुण पिढीला कोण समजावून सांगणार होतं? त्यांच्या चर्चेमध्ये आपण नाक खुपसणे म्हणजे वादाला तोंड फुटणार, तेव्हा शांत राहणेच उत्तम…

पुढे गाडीचा वेग काही वाढला नाही. त्याच वेगात भर पावसामध्ये गाडी श्रीरामपूर कडे निघाली होती.

एसटी बाभळेश्वर स्थानक सोडून श्रीरामपूर जवळ आली. एसटीमध्ये आता मोजकेच आठ-दहा लोक उरले होते. ड्रायव्हरला नाव ठेवणारी त्या तरुण मुलांची टोळी काही संगमनेरला उतरली आणि काही प्रवरानगरला…

मी आणि काही प्रवासी आम्ही नाशिकपासून सोबत होतो.

संध्याकाळचे पाच वाजले, पाऊस जवळपास उघडला होता. मावळतीच किंचित ऊन पडलं होतं. रस्त्यावर आणि एसटी स्टँडवर लोकांची गजबज दिसत होती. समोर जागा असल्यामुळे मी बाभळेश्वरला पुढे येऊन बसलो.

एसटीने श्रीरामपूर स्थानकात प्रवेश केला. माझं सहज लक्ष ड्रायव्हर कडे गेलं, ड्रायव्हर हुंदके देऊन रडत होता. सुरुवातीला मला त्यांच्या रडण्याचे कारण समजलेच नाही.

त्याचं लक्ष समोर होत, आणि समोर जे दृश्य होतं ते पाहून मी गहिवरून गेलो.

बँड पथकाच्या 20 लोकांनी गाडीच्या दुतर्फा दोन रांगा केल्या होत्या. गाडी ज्या ठिकाणी उभी राहणार होती त्या ठिकाणी हे सगळे उभे होते.

तेवढ्यात तीस वर्षाचा अगदी नवीन कपडे घातलेला एक युवक बाहेरून ड्रायव्हरच्या केबिनच्या दरवाजापाशी आला.

हे मी सगळं आतून बघत होतो. त्यांनी हळूहळू गाडी थांबवली आणि बंद केली, गाडीतच आपल्या पायातल्या चपला काढल्या आणि स्टेरिंग ला हात जोडून नमस्कार केला, संपूर्ण गाडीला हात जोडले, वरच्या बाजूला असलेल्या देवांच्या दोन फोटोंना त्यांनी हात जोडले आणि स्टेरिंग वर डोकं ठेवून ढसढसा रडायला लागले, त्यांच्या दोन्ही डोळ्यात पाणी होते.

बाहेर एका स्वरात सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं.

त्यांच्या मुलाने कॅबिनचा दरवाजा उघडला, वडिलांना खांद्यावर घेतलं आणि संपूर्ण गाडीला एक फेरी मारली.

गाडीच्या समोर त्यांची पत्नी, दोन सुना, मुलगा, मुलगी, जावई सगळा परिवार त्यांच्या स्वागतासाठी नवीन कपडे घालून उभा होता.

बँड पथकाने त्यांचं अतिशय भव्य स्वागत केल. गाडीच्या समोर उभे असलेल्या प्रत्येक नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी होत.

मुलाने वडिलांना खांद्यावर घेऊन पूर्ण गाडीला फेरी मारल्यानंतर गाडीच्या समोर ठेवलेल्या एका पाटावर उभे केले.

हा क्षण बघून माझ्या डोळ्यात कधी पाणी आलं मला कळलेच नाही, तो एक भावनिक क्षण होता.

काका आज निवृत्त झाले होते.

आज त्यांच्या कामाचा शेवटचा दिवस होता.

पाटावर उभ्या असलेल्या काकांचे त्यांच्या बायकोने पाय धुतले. सर्वांनी त्यांना ओवाळले, प्रत्येक जण त्यांच्या गळ्यात एक हार टाकत होता, त्यांना शाल आणि श्रीफळ भेट देत होता, त्यांच्या डोळ्यातील अश्रू मात्र थांबत नव्हते, त्यांना आता गहिवरून आलं.

तेवढ्यात स्थानकाचे मुख्य अधिकारी त्या ठिकाणी आले. त्यांच्या हस्ते त्या काकांचा सत्कार करण्यात आला. कुटुंबातील सर्वजण अभिमानाने त्यांच्याकडे बघत होते.

स्थानकाच्या मुख्य अधिकाऱ्याने सांगितले “, सोनवणे काकाकडून त्यांच्या संपूर्ण नोकरीच्या काळात एकही अपघात झाला नाही, ही त्यांच्यासाठीच नाही तर स्थानकासाठी सुद्धा अतिशय गौरवाची बाब आहे. ” काकांनी मात्र अतिशय नम्रपणे हात जोडले.

कोणतेच काम छोटे किंवा मोठे नसते. त्या कामावरची निष्ठाच तुम्हाला छोटे किंवा मोठे बनवते.

तो क्षण बघून मलाही राहवले नाही. समोरच्याच दुकानातून एक चांगले भिंतीवरचे घड्याळ गिफ्ट म्हणून मी पॅक करून घेतले, आणि त्या गर्दीत काकांच्या हातात ठेवले, त्यांचे दर्शन घेतले. ही व्यक्ती मला परत कधीच भेटणार नव्हती, परंतु त्यांच्या कामावरच्या निष्ठेतून मात्र मी खूप काही शिकणार होतो.

चालक, खरोखर एक देवाचाच अवतार असतो मग तो कोणताही का असेना, त्याच्या भरवशावर आपण निश्चिंत प्रवास करतो, अगदी बिनधास्त झोपतो, हा आपण त्यांच्यावर ठेवलेला विश्वास असतो आणि ते सुद्धा विश्वासाला पात्र ठरतात आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारे सोनवणे काका सारखे कित्येक लोक असतात.

ते सगळे निघून जोपर्यंत मी तिथेच थांबलो.

त्यांच्या जीवनाचा एक टप्पा संपला होता, दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार होती.

लेखक :  श्री प्रकाश फासाटे

मोरोक्को.

 +212661913052

प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तुमची मैत्री कुठे होती?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “तुमची मैत्री कुठे होती?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

उद्धवाने कृष्णाला विचारलेला कठोर प्रश्न: “तुमची मैत्री कुठे होती? ”

महाभारत युद्धानंतर उद्धवाने श्रीकृष्णासमोर तो प्रश्न ठेवला, जो आजही आपल्या सर्वांच्या मनात उमटतो. हा संवाद केवळ एक कथा नसून, जीवन जगण्याचा एक अत्यंत गहन ‘मॅनेजमेंट लेसन’ आहे.

“हे माधवा! तुम्ही म्हणता, की खरा मित्र तोच, जो न मागता मदत करतो. मग पांडवांबरोबर असे का घडले?

युधिष्ठिरांना जुगार खेळण्यापासून तुम्ही का थांबवले नाही?

त्या फाशांना धर्मराजाच्या बाजूने का वळवले नाही?

आणि द्रौपदीचा सभेत अपमान होत असताना, तिच्या चीरहरणाची पराकाष्ठा होईपर्यंत तुम्ही वाट का पाहिली?

हीच का तुमच्या मैत्रीची व्याख्या? ”

भगवान मंद स्मित करून म्हणाले,

“उद्धवा, संसारात विजय त्याचाच होतो ज्याच्याकडे विवेक असतो.

दुर्योधनाकडे विवेक होता—त्याने स्वतः न खेळता शकुनीला पुढे केलं. युधिष्ठिरही विवेकाने वागून, स्वतःऐवजी मला खेळायला सांगू शकले असते. सांग, जर माझ्यात आणि शकुनीत खेळ झाला असता, तर विजय कुणाचा झाला असता?

धर्मराजांनी मला विनंती केली होती, की बोलावल्याशिवाय सभेत यायचे नाही.

त्यांना स्वतःचा पराभव माझ्यापासून लपवायचा होता. मी त्यांच्या त्या विनंतीच्या मर्यादेत बांधला गेलो आणि बाहेरच उभा राहिलो. ते हरत गेले, पण मला आठवण्याऐवजी फक्त आपल्या नशिबालाच दोष देत राहिले.

द्रौपदीला जेव्हा सभेत ओढून आणले गेले,

तेव्हाही तिचा स्वतःच्या शक्तीवर आणि पांडवांवर विश्वास होता. पण ज्या क्षणी तिने स्वतःवरील आधार सोडून, पूर्ण शरणागतीने हाक मारली—

‘हे हरि! अभय दे, कृष्णा! ’—

त्या क्षणीच मी प्रकट झालो. सांग उद्धवा, उशीर माझ्याकडून झाला होता की तिच्या पुकारण्यात? ”

उद्धवाने टोचून विचारले,

“म्हणजे तुम्ही फक्त बोलावल्यावरच येता? शांतपणे सगळं पाहत राहता? ”

कृष्ण म्हणाले,

“उद्धवा, सृष्टी कर्मफलाच्या नियमावर चालते.

मी हस्तक्षेप करत नाही; मी केवळ साक्षी आहे. प्रत्येक क्षणी तुमच्याजवळ उभा राहून तुम्हाला पाहतो—हाच माझे धर्म आहे. ”

उद्धवाने पुन्हा प्रश्न केला,

“वा! म्हणजे आम्ही पाप करत राहायचे आणि तुम्ही फक्त पाहत बसायचे? ”

तेव्हा भगवानांनी मर्म सांगितले:

“उद्धवा, ज्या क्षणी तुला हे जाणवेल की ‘मी’ तुला पाहतो आहे,

त्या क्षणी तू कोणतेही चुकीचे कृत्य करू शकशील का?

मनुष्य पाप तेव्हाच करतो, जेव्हा त्याला वाटते की त्याला कोणीही पाहत नाही.

युधिष्ठिरांची चूकही हीच होती. “

उद्धव निरुत्तर झाले.

हा संवाद आपल्याला हे शिकवतो की—

ईश्वराची अनुपस्थिती पाप नाही,

तर ईश्वराच्या उपस्थितीचे विस्मरण हेच पापाचा खरं मूळ आहे.

जर आपण प्रत्येक क्षणी त्याला आपल्या सोबत अनुभवले,

तर जीवन आपोआप दिव्य होऊन जाईल.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘अडगळ : जिथे घर गोंधळतं, तिथे भविष्यही अडखळतं’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘अडगळ : जिथे घर गोंधळतं, तिथे भविष्यही अडखळतं’ ☆ श्री दिवाकर बुरसे

जपानी 5S आणि भारतीय वास्तुशास्त्र यांचा आध्यात्मिक–व्यवस्थापकीय संवाद.

१. घर : एक सजीव व्यवस्था

घर म्हणजे केवळ विटा, सिमेंट आणि भिंती नाहीत.

घर ही एक व्यवस्था (System) आहे— श्वास घेणारी, आठवणी साठवणारी, ऊर्जावहन करणारी.

जसं एखाद्या संस्थेत व्यवस्थापन बिघडलं, की उत्पादन थांबतं,

तसंच घरातील ऊर्जेचा प्रवाह अडखळला, की आयुष्य विस्कटायला लागतं,

आणि या बिघाडाची सुरुवात होते—

अतिशय शांतपणे, कणाकणानं,

एखाद्या कोपऱ्यात साचणाऱ्या अडगळीतून.

२. अडगळ : वस्तू नव्हे, अडकलेली चेतना.

भारतीय वास्तुशास्त्रात अडगळ हा शब्द फार खोल अर्थ घेऊन येतो.

ती केवळ जुनी, जीर्ण वस्तू नसते—

ती असते थांबलेली चेतना.

न वापरलेले कपडे,

बंद पडलेली मोडकी घड्याळे,

बिघडलेली, बंद पडलेली यंत्रे,

गळकी, फुटलेली, पोचलेली भांडी,

कोपऱ्यात विसरलेली रद्दी,

या सगळ्या गोष्टी एकच गोष्ट सांगतात :

इथे काळ थांबला आहे.

जिथे काळ थांबतो,

तिथे प्रगती थांबते.

३. राहू : व्यवस्थेतील अदृश्य बिघाड

ज्योतिषशास्त्रात राहूला ‘छायाग्रह’ म्हटलं जातं.

तो दिसत नाही, पण त्याचे परिणाम खोलवर असतात.

राहू म्हणजे—

भ्रम, गोंधळ,

दिशाहीनता,

अचानक अडथळे,

व्यसने,

फसवणूक,

मानसिक अंधार.

व्यवस्थापनाच्या भाषेत सांगायचं, तर राहू म्हणजे System Noise –

जो हळूहळू निर्णयक्षमता, स्थैर्य आणि स्पष्टता नष्ट करतो.

राहूला आवडतो—

अंधार,

ओलावा,

गोंधळ,

न वापरातली जागा.

म्हणूनच अडगळ म्हणजे राहूसाठी सुपीक जमीन!

४. अडगळ साचली की काय घडतं?

अडगळ वाढलेल्या घरांत काही गोष्टी वारंवार दिसतात—

मन अस्वस्थ राहणं,

निर्णय घेताना गोंधळ,

पैसा येऊनही न टिकणं,

अचानक खर्च, कर्ज, फसवणूक,

नात्यांत संशय, दुरावा

त्वचारोग, ॲलर्जी, हार्मोनल तक्रारी, व्यसनाधीनता.

वास्तु–ज्योतिष हे योगायोग मानत नाही.

ते म्हणतं—ही अडकलेल्या ऊर्जेची लक्षणं आहेत.

५. जपानकडून आलेली : 5S

आधुनिक जपानने व्यवस्थापनासाठी एक साधं पण प्रभावी सूत्र दिलं—

5S.

कारखाने, कार्यालये, रुग्णालये यांचं रूप बदलणारी ही संकल्पना सांगते – जागा स्वच्छ ठेवा,

मांडणी स्पष्ट ठेवा,

नियम पाळा,

शिस्त जोपासा.

आणि इथेच एक विलक्षण जाणिव होते—

हे सगळं भारतानं जीवनपद्धती म्हणून फार पूर्वीच स्वीकारलेलं होतं.

६. Seiri : वैराग्याची पहिली पायरी

Seiri म्हणजे वर्गीकरण—

जे नको, ते सोडून देणं.

भारतीय अध्यात्मात यालाच ‘वैराग्य’ म्हणतात.

जे उपयोगी नाही,

जे केवळ ओझं आहे,

ते सोडून देणं—ही पहिली ‘मुक्ती’.

वास्तुशास्त्र सांगते—

अडगळ हटवणे हेच सर्वांत मोठे पूजन आहे.

७. Seiton : व्यवस्था म्हणजे सौंदर्य

Seiton म्हणजे योग्य मांडणी.

प्रत्येक गोष्टीला तिची जागा.

ही केवळ शिस्त नाही—

ही ऊर्जेची शिस्त आहे.

जसं संस्थेत प्रक्रियांची स्पष्टता असली, की काम सुरळीत चालतं,

तसं घरात मांडणी नीट असेल, तर जीवनाचा प्रवाह मोकळा राहतो.

८. Seiso : स्वच्छता म्हणजे शुद्धी

जपानी तत्त्वज्ञानात स्वच्छता म्हणजे

केवळ साफ करणं नव्हे,

तर घाण होण्याची कारणं नष्ट करणं.

भारतीय परंपरेत— मीठ,

कापूर,

धूप,

प्रकाश,

वायुविजन

हे सगळे ऊर्जाशुद्धीचे उपाय आहेत.

राहू प्रकाशात टिकत नाही.

९. Seiketsu आणि Shitsuke : नियमातून संस्कार

नियम पाळले गेले,

तर ते संस्कार बनतात.

शिस्त म्हणजे दबाव नव्हे—

ती स्पष्टतेतून येते.

घर स्वच्छ ठेवण्याची सवय,

मन स्वच्छ ठेवण्याची सवय,

नात्यांत पारदर्शकता ठेवण्याची सवय—

यातूनच राहू शांत होतो.

१०. स्टोअर रूम : ऊर्जेचं केंद्र की अंधारकोठडी?

अंधार, ओलावा आणि अस्ताव्यस्तपणा असलेली स्टोअर रूम ही वास्तुशास्त्रात राहूचे मंदिर मानली जाते.

जर स्टोअर रूम ठेवायचीच असेल, तर— प्रकाश,

हवा,

सुवास,

आणि नीट मांडणी

अनिवार्य आहे.

११. निष्कर्ष : अडगळ काढणं म्हणजे जीवन व्यवस्थापन

हा लेख अंधश्रद्धा पसरवत नाही.

तो एक सूक्ष्म निरीक्षण मांडतो—

जिथे घर अडकतं,

तिथे मन अडकतं.

जिथे मन अडकतं,

तिथे निर्णय अडकतात.

आणि जिथे निर्णय अडकतात,

तिथे भविष्य अडखळतं.

म्हणूनच—

“ज्या घरात अडगळ असते,

त्या घरात भविष्य अडकते. ”

अडगळ काढली की— ऊर्जा वाहू लागते,

मन हलकं होतं,

व्यवस्था सुस्पष्ट होते.

राहू शांत होतो,

आणि जीवन पुन्हा एकदा

सुरळीत श्वास घेऊ लागतं.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दोष हा कुणाचा? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ दोष हा कुणाचा? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

एका हाॅटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारच्या टेबलावर चार मुली बसल्या होत्या. त्यांचं जेवण आटोपलं. वेटर ने बडीशेपचा बाऊल समोर ठेवला. चारही मुलींनी टिश्यू पेपरमध्ये बचकभर बडीशेप भरून घेतली आणि ती पुरचुंडी पर्समध्ये टाकली. आजूबाजूच्या १०० माणसांमध्ये असूनही आणि चांगल्या कुटुंबातल्या असूनही असं करताना त्यांना काहीही वाटलं नाही.

अनेक काॅलेजवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मी हाॅटेल्समधून चमचे चोरतानाही पाहिलं आहे. विमानातून प्रवास करताना काही मंडळी अक्षरश: ओंजळी भरभरून चाॅकलेट्स किंवा टाॅफीज् घेतात. काही रेल्वे प्रवासात पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना दिल्या जातात. अनेकजण दोन-दोन किंवा तीन-तीन बाटल्या सुद्धा घेतात. रेल्वे प्रवासात (केवळ त्या प्रवासापुरतेच मिळणारे) टर्किश नॅपकिन्स सर्रास बॅगेत भरतात. साॅस किंवा साखरेची ट्रॅव्हलिंग पाऊचेस न विचारता उचलणे, टीबॅग्ज उचलणे, टिश्यू पेपर्सचा गठ्ठाच उचलणे हे प्रकार माणसं अगदी बिनधास्त करतात.

एकदा एका ट्रेक ला गेलो होतो आणि एका रिसाॅर्टवर राहिलो. तिथं आलेल्या एकानं शॅम्पूचे सॅशे आणि साबणाच्या छोट्या वड्यांचा बाॅक्सच उचलून नेला. एका सुशिक्षित, जाणत्या बाईंनी लाॅबीमध्ये सहज म्हणून वाचण्याकरिता ठेवलेली दोन मॅगेझिन्स उचलली आणि पर्समध्ये घातली. हा प्रकार आजूबाजूची माणसं, हाॅटेल व्यवस्थापनातले कर्मचारी पाहत होते. पण कुणी काही विरोध केला नाही.

घराजवळच्या हाॅट चिप्स च्या दुकानात गेलो होतो. दोन मुली आल्या. त्यांनी सात-आठ प्रकारचे वेफर्स टेस्ट करून पाहिले आणि काहीही खरेदी न करता निघून गेल्या. दुकानाचा मालक म्हणाला, “ऐसे तो बहोत लोग आतें हैं, सब के सब पढें-लिखे और अच्छे घर के ही होतें हैं । पता नहीं, ऐसा क्यूॅं करतें हैं? ” 

रस्त्यावरच्या एखाद्या फळविक्रेत्याकडे गेलात आणि फळं खरेदी करायची असतील तर एखादं फळ चवीपुरतं चाखायला देतो. काहीजण स्वत:च हात पुढं करून सात-आठ फळं तर उभ्या-उभ्या सहजच मटकावतात. चणे विक्रेते किंवा चुरमुऱ्यांची भट्टी चालवणाऱ्यांना तर हा अनुभव दररोज शंभरदा येत असेल. माणसं अगदी स्वत:चा हक्क असल्यासारखा हात घालतात.

मंडईत गेलो होतो. कैऱ्या विकणाऱ्या एका वयस्कर विक्रेतीसमोर एक काकू उभ्या राहिल्या. विक्रेतीनं भाव सांगितला आणि कैरीची एक फोड कापून त्यांच्या हातावर ठेवली. कैरीची फोड खात-खात काकू एक अक्षरही न बोलता निघून गेल्या. आम्ही दोघेही शेजारीच उभे होतो. तो प्रसंग पाहून आम्हालाच कसंतरी झालं.

चांगली शिकली-सवरलेली माणसं अशी का वागत असतील? आपण परदेशातल्या लोकांकडून त्यांची भाषा, राहणीमान, कपडे, फॅशन्स हे सगळं घेतलं, पण सार्वजनिक आयुष्यात ती माणसं किती संतुलितपणे वागतात, हे आपण नाही स्वीकारत..!

कॅरीबॅगसाठी दुकानदारांशी हुज्जत घालणारी सुशिक्षित जनता मी पाहतो, तेव्हा मला त्यांच्या सुशिक्षितपणाचाच अर्थ लागत नाही. नुसतंच बाह्यरूप पाॅश करून आपण सुशिक्षित असल्याचा आभास निर्माण करत राहण्याच्याच कृत्रिम देखाव्याच्या चक्रात माणसं अडकली आहेत का?

हा बिनबुडाचा सुशिक्षितपणा केवळ अशा चोऱ्या-माऱ्या आणि उचलाउचलीचे उद्योग करून थांबत नाही. उघडपणे सामाजिक नियम मोडण्यातही हा वर्ग आघाडीवर आहे.

पेट्रोलपंपावर मोबाईल फोनवर गप्पा मारणे, एटीएम सेंटरमध्ये गाॅगल्स, स्कार्फ किंवा टोपी घालून जाणे, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर खुशाल धूम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात बिनदिक्कतपणे थुंकणे, या गोष्टी करून माणसं नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करत असतात?

नामवंत काॅलेजेसमध्ये शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी पार्किंग आणि नो पार्किंगमधला फरकही ओळखू शकत नाहीत का? सुशिक्षित माणसं मुद्दामच झेब्रा क्राॅसिंगवरच गाडी का थांबवतात? शिकली-सवरलेली माणसं बसस्टाॅप सोडून भर रस्त्यावर गर्दी करून बसची वाट का पाहतात? खिशात पैसे असूनही बस कंडक्टर ला फसवून विनातिकीट प्रवास का करतात?

लक्ष्मी रस्ता हा जसा बाजारपेठेचा रस्ता आहे तसं ते माणसांच्या अतरंगीपणाची लक्षणं पाहण्याचंही एक ठिकाण आहे. माणसं रस्त्यातच आपली भलीमोठी चारचाकी गाडी थांबवून दुकानासमोर उतरतात आणि ड्रायव्हर ती गाडी रस्त्यातच उभी करून, काचा वर करून, आतमध्ये एसी लावून बसलेला असतो. बाकीची वाहतूक कोलमडून जाऊन याच्या नावानं शंख करत असते, पण हा एकदम कूल..!

माणसं कुल्फी घेतील आणि काड्या रस्त्यावरच टाकतील. मक्याचं कणीस घेतील, उरलेला भाग रस्त्यावरच टाकतील. प्लास्टिकच्या ग्लासात काॅर्नभेळ घेतील, रिकामा ग्लास रस्त्यावरच टाकून मोकळे.. याच रस्त्यावर मोबाईल फोनवर बोलत रस्ता क्राॅस करणारे अनेकजण दिसतील. नो एण्ट्री तून वाहने चालवणारे अनेकजण दिसतील. ही सगळी मंडळी लौकिकार्थानं किमान ग्रॅज्युएट तरी निश्चित असतात. पण, सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं आणि कसं वागू नये, असा कुठला पेपर त्यांच्या कोर्समध्ये नसतो, त्यामुळे त्या विषयाचा त्यांना गंध नसतो. त्यामुळे, सार्वजनिक जीवनात सगळे नापास!

अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या आहेत, तिथले खाद्यपदार्थ विक्रेते संध्याकाळी व्यवसाय संपला की, सांडपाणी थेट रस्त्यावर टाकून देतात. त्यामुळे तो रस्ता अस्वच्छ, चिकट होतो, माशा घोंगावतात. पण सार्वजनिक ठिकाणचं त्यांचं हे वागणं आपण कुणीही मनावर घेत नाही.

 भर रात्री बारा वाजता झोपलेल्या जगाला जागं करून वाढदिवस साजरा करणारा एक नवीन वर्ग तयार झाला आहे. ही मंडळीसुद्धा सुशिक्षित असतात. अनेकदा काॅलेजात शिकत असतात. पण, भर रात्री केकच्या दुकानाबाहेरच टोळकं जमवून ज्याचा वाढदिवस आहे अशा उत्सवमूर्तीच्या तोंडाला, डोक्याला येथेच्छ केक फासून, त्याला दारू पाजून लाथाबुक्क्यांनी बदडून काढणे, त्याच्या डोक्यात अंडी फोडणे असे प्रकार करतात. हे सगळं चांगलं वागणं आहे का? आणि एकविसाव्या शतकातल्या समाजाला हे शोभतं का?

ही मंडळी असं का वागतात, याला काहीही उत्तर नसतं. अशी कितीतरी लोकोत्तर व्यक्तिमत्त्वं आपल्याला ठायीठायी दिसतील. ही माणसं उघडपणे चोऱ्या करतात, गरिबांना नाडतात, त्यांना त्रास देतात, स्वत:च्या वागणुकीनं इतरांचं सार्वजनिक आयुष्यही पार खराब करून टाकतात. आपण यावर कधी आक्षेप घेतला आहे का? लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल पण स्वत:च्या ताटातलं मुसळ दिसणार नाही.

गाय दूध देते तेव्हा ते चांगलंच असतं. पण, आपण ते नीट तापवलं नाही तर ते नासणारच. म्हणून, मग आपण गायीला दोष देणार का? तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दही कळकलं तर दोष दह्याचा नसतो आणि भांड्याचाही नसतो, दोष दही तांब्याच्या भांड्यात ठेवणाऱ्याचा असतो.

आपण नेहमी प्रशासनाकडे, सरकारकडेच बोटं दाखवत राहू, आरोप करत राहू. सरकारकडून आपल्या अपेक्षा फार मोठ्या असतात, पण साध्या साध्या गोष्टी जपण्यातही आपण स्वत: कमी पडतो. स्वत:ला पारखलं आणि स्वत:च्या वागण्यातले दोष दूर करायचं ठरवलं तर प्रगतीला सुरूवात होईल.. सगळं मळभ जाऊन आभाळ स्वच्छ होईल..!

समाजाने स्वत: पुढाकार घेऊन या साध्या साध्या गोष्टी सुधारल्या तरी ‘अच्छे दिन’ नक्कीच येतील…!

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ औषध तुमचे आहे, पण कायदा त्यांचा आहे! – लेखक : डॉ. मंथन शेठ ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ औषध तुमचे आहे, पण कायदा त्यांचा आहे! – लेखक : डॉ. मंथन शेठ ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय रुग्णांसाठी एक धोक्याची घंटा. **

गेल्या आठवड्यात एक बातमी माझ्या मनात घोळत राहिली. तीव्र पाठदुखीने त्रस्त असलेला एक सामान्य भारतीय नागरिक, भारतात त्याच्या डॉक्टरांनी लिहून दिलेले **ट्रॅमाडॉल** हे औषध घेऊन परदेशात गेला. विमानतळावर त्याला थांबवण्यात आले. चौकशी करण्यात आली. तपासणी झाली. आणि काही मिनिटांतच तो ‘रुग्ण’ वरून ‘आरोपी’ बनला. आज ती व्यक्ती तुरुंगात आहे.

त्याचा तस्करी करण्याचा कोणताही हेतू नव्हता.

तो अंमली पदार्थ विकत नव्हता.

तो फक्त आपली वेदना कमी करण्यासाठी औषध घेऊन जात होता.

पण त्या देशात, **ट्रॅमाडॉलला अंमली पदार्थ म्हणून वर्गीकृत केले आहे**.

यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो:

आपल्यासाठी ‘उपचार’ असलेले औषध दुसऱ्या देशात **गुन्हा** ठरू शकते, हे आपल्याला खरोखरच माहीत आहे का?

देश बदलतात, कायदे बदलतात. औषधे बदलत नाहीत.

भारतात आपण औषधांकडे खूप सहजपणे पाहतो. डॉक्टर ती लिहून देतात, आपण मेडिकल स्टोअरमधून विकत घेतो, घरी ठेवतो आणि प्रवासातही सोबत नेतो. समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा आपण असे गृहीत धरतो की **भारताचा कायदेशीर दृष्टिकोन जगभर लागू होतो**. वास्तविक, भारताचे औषध नियंत्रण कायदे वेगळे आहेत; यूएई, जपान, सिंगापूर, सौदी अरेबिया, कतार, इंडोनेशिया – प्रत्येक देशाचे कायदे वेगळे आहेत.

भारतात जे औषध **शेड्यूल एच** किंवा **डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न मिळणारे औषध** आहे, ते इतरत्र **अंमली पदार्थ** किंवा **मानसिक स्थितीवर परिणाम करणारा पदार्थ** मानले जाऊ शकते. कायदा औषधाकडे पाहत नाही – तो **धोक्याकडे** पाहतो.

अशी अनेक औषधे आहेत, पण **ट्रॅमाडॉल** हे एक उत्तम उदाहरण आहे. भारतातील लाखो रुग्ण ते वापरतात. तथापि, यूएई, इजिप्त, इंडोनेशिया आणि सौदी अरेबियामध्ये ते एक **ओपिओइड अंमली पदार्थ** आहे. केवळ जवळ बाळगल्यास तुरुंगवास होऊ शकतो. अलीकडील प्रकरणात, त्या व्यक्तीकडे फक्त १०-१५ गोळ्या होत्या. कोणताही व्यावसायिक हेतू नव्हता. तरीही कायद्यासाठी, **केवळ औषधाचे अस्तित्व पुरेसे होते**.

“माझ्या डॉक्टरांनी ते लिहून दिले आहे, माझ्याकडे प्रिस्क्रिप्शन आहे” हा युक्तिवाद परदेशात चालत नाही. अनेकांना वाटते की, “माझ्याकडे प्रिस्क्रिप्शन असेल, तर कोणतीही अडचण येणार नाही. ” पण अनेक देशांमध्ये, प्रिस्क्रिप्शन असूनही, ते औषध बेकायदेशीर असू शकते. का? कारण ते देश अशा औषधांकडे **मादक पदार्थांचा गैरवापर, अवैध व्यापाराचे धोके, तस्करी, सार्वजनिक सुरक्षेला धोका आणि नशा** या दृष्टिकोनातून पाहतात. कायदा तुम्हाला रुग्ण म्हणून पाहत नाही—तो तुम्हाला **नियंत्रित पदार्थाचा ताबा बाळगणारा** म्हणून पाहतो.

कोणत्या औषधांमुळे भारतीय प्रवासी सर्वाधिक अडचणीत येतात?

**होय—हा एक रेड अलर्ट आहे. परदेश प्रवासाला जाण्यापूर्वी ही औषधे काळजीपूर्वक तपासा. **

भारतीय प्रवाशांना अनेकदा अशा काही औषधांमुळे त्रास होतो, जी भारतात सामान्यपणे वापरली जातात, परंतु अनेक देशांमध्ये ती **मादक, नियंत्रित किंवा बेकायदेशीर** मानली जातात.

* **ट्रॅमाडॉल**: भारतात एक सामान्य वेदनाशामक औषध, परंतु अनेक देशांमध्ये मादक पदार्थ म्हणून वर्गीकृत आहे. केवळ जवळ बाळगल्यास तुरुंगवास होऊ शकतो.

* **कोडीन-आधारित खोकल्याची औषधे**: भारतात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात, परंतु अनेक देशांमध्ये ओपिओइड औषधे म्हणून नोंदणीकृत आहेत आणि व्यसन लावणारे पदार्थ म्हणून त्यांच्यावर कठोर नियंत्रण आहे.

* **अल्प्राझोलम**: चिंता आणि झोपेसाठी वापरले जाते; अनेक देशांमध्ये सायकोट्रॉपिक औषध मानले जाते आणि सरकारी परवानगीशिवाय ते सोबत आणणे गुन्हा ठरू शकते.

* **डायझेपाम**: झोप आणि स्नायू शिथिल करण्यासाठी दिले जाते; अनेक ठिकाणी नियंत्रित औषध म्हणून वर्गीकृत आहे, ज्यासाठी विशेष परवानगी आवश्यक आहे.

* **झोलपिडेम**: निद्रानाशासाठी भारतात सर्रास वापरले जाते, परंतु काही देशांमध्ये ते पूर्णपणे **प्रतिबंधित** आहे.

* **प्रेगॅबॅलिन**: मज्जातंतूंच्या वेदना आणि डायबेटिक न्यूरोपॅथीसाठी वापरले जाते; अनेक देशांमध्ये प्रतिबंधित आहे आणि विशिष्ट मर्यादा व परवानगीशिवाय बेकायदेशीर आहे.

* याव्यतिरिक्त, काही **ADHD औषधे** जी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनसह भारतात कायदेशीर आहेत, ती अनेक देशांमध्ये पूर्णपणे **बेकायदेशीर** आहेत.

आणि दुर्दैवाने, यापैकी अनेक औषधे आपल्या घरांमध्ये सहज आढळतात. ही फक्त काही उदाहरणे आहेत—ही संपूर्ण यादी नाही.

विमानतळावर काय होते?

तुमच्या सामानाची तपासणी केली जाते. जर एखादे औषध सापडले आणि त्याचे नाव मादक पदार्थांच्या यादीत असेल, तर तुम्हाला बाजूला नेले जाते. त्यानंतर चौकशी होते. मग तपास. अटक. आणि त्यानंतर, कायदेशीर प्रक्रिया सुरू होते.

तुम्ही कदाचित स्पष्टीकरण द्याल:

“मला वेदना होत होत्या. ”

“कृपया माझ्या डॉक्टरांशी बोला—हे त्यांचे प्रिस्क्रिप्शन आहे. ” पण कायद्याचा फक्त एकच प्रश्न असतो:

**“हे औषध आपल्या देशात कायदेशीर आहे का? ”**

जर उत्तर “नाही” असेल, तर बाकी सर्व काही निरर्थक ठरते.

एक डॉक्टर म्हणून मी हे का लिहित आहे?

माझ्या क्लिनिकमध्ये मी दररोज अनेक रुग्णांना भेटतो. मी त्यांच्या चिंता, द्विधा मनःस्थिती, कथा आणि संघर्षांचे ऐकतो. बरेच जण म्हणतात:

“डॉक्टर, आम्ही आमच्या मुलीला भेटायला दुबईला जात आहोत, ” किंवा

“आम्ही काही महिन्यांसाठी आमच्या मुलासोबत राहायला अमेरिकेला जात आहोत. ”

आणि त्यासोबतच, ते मला झोपेच्या गोळ्या, मज्जातंतूंची औषधे, वेदनाशामक औषधे सोबत घेऊन जाण्यासाठी लिहून देण्यास सांगतात. पण कोणीही एकदाही विचारत नाही:

**“हे औषध तिथे कायदेशीर आहे का? ”**

हे अज्ञान सर्वात मोठा धोका आहे. फक्त पाच मिनिटांत तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता.

परदेश प्रवासापूर्वी पाळायची पाच पावले:

**गुगलवर शोधा. **

उदाहरणार्थ:

“युएईमध्ये ट्रॅमाडॉल कायदेशीर आहे का? ”

प्रत्येक औषध आणि प्रत्येक देशासाठी असे करा.

**दूतावासाच्या वेबसाइटला भेट द्या. **

**“प्रतिबंधित औषधांची यादी”** शोधा.

**शंका असल्यास, औषध बदला. **

तुमच्या डॉक्टरांना अधिक सुरक्षित पर्यायाबद्दल विचारा.

**डॉक्टरांचे पत्र/प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवा**

इंग्रजीमध्ये, ज्यामध्ये औषधाचे **जेनेरिक नाव** नमूद केलेले असेल.

**औषधे मूळ पॅकेजिंगमध्ये ठेवा. **

सुट्या गोळ्या किंवा स्ट्रिप्स सर्वात संशयास्पद दिसतात.

लक्षात ठेवा:

औषध शरीराचे रक्षण करते—पण चुकीच्या देशात, तेच औषध तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकते. परदेश प्रवास म्हणजे फक्त तिकिटे आणि व्हिसा नाही; तर तो कायदा समजून घेण्याबद्दल देखील आहे.

जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी परदेश प्रवास करत असेल, तर कृपया त्यांना हा लेख वाचायला सांगा. एक छोटीशी माहिती आयुष्यभराच्या त्रासापासून वाचवू शकते.

कारण **औषध तुमचे आहे, पण कायदा त्यांचा आहे. **

****

लेखक : डॉ. मंथन शेठ 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बीबीसी मराठीचा पहिला आवाज – लेखिका : सुश्री जान्हवी मुळे – संकलक : श्री संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ बीबीसी मराठीचा पहिला आवाज – लेखिका : सुश्री जान्हवी मुळे – संकलक : श्री संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

वेणूताई चितळे : १९४२ मधला बीबीसी मराठीचा पहिला आवाज

(जन्म. २८ डिसेंबर १९१२)

वेणू चितळे हे असंच एक प्रभावी व्यक्तिमत्त्व. १९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान बीबीसीनं मराठीतून प्रसारण सुरू केलं होतं. तेव्हा वेणू चितळे लंडनहून मराठीत आणि इंग्रजीतही बातम्या द्यायच्या.

सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीच्या काळात एका मराठी मध्यमवर्गीय मुलगी शिक्षणासाठी परदेशात जाते, बीबीसीसाठी वृत्तनिवेदन आणि वार्तांकन करू लागते, तेही युद्ध ऐन भरात असताना… हे सारंच आज रोमांचक वाटतं.

वेणूताईंचा जन्म १९१२ सालचा. वेणू जेमतेम सहा वर्षांची असताना त्यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर मोठ्या भावंडांनीच त्यांचा सांभाळ केला.

आधी पुण्यात हुजूरपागा आणि मग मुंबईला सेंट कोलंबा शाळेत वेणूताईंचं शिक्षण झालं.

वेणूताईंचं कुटुंब परंपरा जपणारं पण पुढारलेल्या विचारांचं होतं. कॉम्रेड विष्णू (भाई) चितळे आणि चितळे अॅग्रो प्रॉडक्ट्सची स्थापना करणारे श्रीकृष्ण चितळे हे त्यांचे बंधू.

मुंबईच्या सेंट कोलंबा शाळेतच वेणूताईंना एक जीवाभावाची मैत्रीण मिळाली – जोहाना अॅड्रियाना क्विन्टा ड्यू प्री म्हणजेच क्विनी.

क्विनी खरं तर वेणूताईंची शिक्षिका, पण दोघींच्या वयांत फारसं अंतर नव्हतं.

क्विनीच्या सल्ल्यानंच वेणूताईंनी पुढे शिकण्याचं ठरवलं आणि विल्सन कॉलेजलाही अॅडमिशनही घेतली. पण याचदरम्यान वेणूताईंच्या घरी त्यांच्या लग्नाविषयी चर्चा होऊ लागली.

वेणूताईंच्या कन्या ज्योत्स्ना दामले आपल्या आईच्या आठवणी सांगतात, “एका ज्योतिषानं ‘हिचं लग्न बहिणीसाठी त्रासाचं ठरेल’ असं भाकित केलं. तेव्हा बहिणीवरच्या प्रेमापोटी तिनं लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. “लग्न नाही करायचं, तर पुढे काय? असा प्रश्न उभा राहिला.

तेव्हा क्विनीनं तरुण वेणूला इंग्लंडला नेण्याची तयारी दाखवली. घरच्यांनीही विरोध केला नाही.

क्विनीनं वेणूताईंना पाश्चात्य संस्कृतीची ओळख करून दिली, पण त्यांची भारतीय मुळं जपण्याचाही सल्ला दिला. १९३४ साली वेणू इंग्लंडला रवाना झाल्या. तिथं त्यांनी आधी माँटेसरीचा कोर्स केला आणि मग लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्येही दाखल झाल्या.

पण याच सुमारास दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. मग भारतात परतण्याऐवजी वेणूताईंनी इंग्लंडमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. वेणूताईंवर दीर्घ अभ्यास आणि लेखन करणाऱ्या डॉ. विजया देव यांनी त्याविषयी अधिक माहिती दिली.

“त्यांच्या या निर्णयामागचं कारण काही पत्रांतून स्पष्ट होतं. ज्या देशानं आपल्याला नवी दिशा दिली, त्या लोकांचं आपण काही देणं लागतो, या भावनेतून वेणूताईंनी स्वयंसेवक म्हणून काम करण्याचं ठरवलं. तेही साडी, गमबूट आणि वर जड हेल्मेट अशा अवतारात. “

“त्या काळात वेणूताई अधूनमधून भाषांतराचं कामही करत असत. त्यांचा एक लेख पाहून माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यानं वेणूताईंना बीबीसीमध्ये धाडलं. “

१९४० साली वेणूताई बीबीसीमध्ये दाखल झाल्या. आवाज, बोलण्याची आणि लिहिण्याची शैली पाहून वेणूताईंना लगेचच प्रसारणाचं काम देण्यात आलं. १९४२-४३ दरम्यान बीबीसीच्या ईस्टर्न सर्व्हिसनं अनेक भारतीय भाषांत प्रसारण सुरू केलं. त्यात मराठीचाही समावेश होता. वेणूताई प्रामुख्यानं याच विभागासाठी काम करत असत.

प्रख्यात लेखक जॉर्ज ऑरवेल या विभागाचे प्रमुख होते. वेणूताईंचं वृत्तनिवेदन, इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व याचं त्यांनीही कौतुक केलं आहे.

ऑरवेलसह टी. एस. इलियट, मुल्कराज आनंद, बलराज सहानी, प्रिन्सेस इंदिरा कापुरथळा, झेड. ए. बुखारी अशा मातब्बरांसोबत काम करण्याची संधी वेणूताईंना मिळाली.

बीबीसीवरून प्रसारित होणाऱ्या ‘रेडिओ झंकार’ या मराठी कार्यक्रमाची आखणी, लेखन, निवेदन, अशी कामं वेणूताई करत असत. वेणूताई मराठीतून युद्धाच्या बातम्या देत असत आणि इंग्रजीतूनही वृत्तनिवेदन करत असत. ‘इंडियन रेसिपीज’, ‘किचन फ्रंट’ सीरीजद्वारे त्यांनी ब्रिटिशांना भारतीय खाद्यपदार्थांची ओळखही करून दिली.

त्या एक मन लावून काम करणारी, बुद्धिमान, सौम्य मुलगी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्यात एक घरगुतीपणा होता. सर्वांशी त्या खेळीमेळीनं वागत.

राजकीय विचारांच्या बाबतीत त्यांची मतं कोणत्याही एका विचारसरणीकडे झुकलेली नव्हती, असं मुल्कराज आनंद यांनी ‘सखे सोयरे’ पुस्तकासाठी लेखिका विजया देव यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

इंग्लंडमध्ये असतानाही वेणूताईंना मायदेशातल्या परिस्थितीचीही जाणीव होती. त्यामुळंच वेणूताई इंडिया लीगसाठी काम करू लागल्या.

व्ही. के. कृष्ण मेनन यांची ही संघटना ब्रिटनच्या नागरिकांमध्ये आणि परदेशातील भारतीयांमध्ये भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रसार करत असे.

त्याशिवाय वेणूताई ‘ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स’मध्येही सहभागी झाल्या. या परिषदेतच वेणूताईंची विजयालक्ष्मी पंडित यांच्याशीही मैत्री जुळली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर वेणू चितळे मायदेशी परतल्या, त्या कायमच्याच. त्यानंतर वेणूताईंनी दिल्लीत विजयालक्ष्मी पंडित यांची मदतनीस/सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली.

दिल्लीतल्या वास्तव्यादरम्यान वेणूताई फाळणीनंतर पंजाबातून आलेल्या निर्वासित स्त्रिया आणि मुलांच्या छावणीतही काम करत असत.

वेणू चितळे यांची पहिली कादंबरी ‘इन ट्रान्झिट’ ही १९५० साली प्रकाशित झाली. त्या काळात एखाद्या मराठी लेखिकेनं इंग्रजीत लिखाण करणं हेही अप्रूपच होतं.

त्याच वर्षी, ३९ वर्षांची असताना वेणूताईंनी गणेश खरे यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि वेणू चितळेची सौ. लीला गणेश खरे झाली.

गणेश यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यांच्या मुलांनाही वेणूताईंनी आपलंसं केलं. लग्नानंतरही वेणूताईंनी ‘इनकॉग्निटो’ ही आणखी एक कादंबरी लिहिली. नवशक्तीसारखी विविध वृत्तपत्रं आणि मासिकांत त्या स्तंभ, लेख लिहित असत. ऑल इंडिया रेडियोवरूनही त्यांच्या काही श्रुतिका प्रसारित झाल्या.

पण बराच काळ घरापासून दूर राहिलेल्या वेणूताईंनी मग घरालाच आपलं विश्व बनवलं आणि संसाराला जास्त प्राधान्य दिलं.

इंग्लंडमधल्या, खास करून बीबीसीमधल्या दिवसांचा मात्र वेणूताईंना कधीच विसर पडला नाही. वेणूताईंची लेक नंदिनी आपटे यांना त्या इंग्लंडमधल्या आठवणी सांगत असत. आईनं सांगितलेल्या आठवणींची उजळणी करताना नंदिनी आपटे म्हणाल्या,

“ऐन युद्धाच्या धामधुमीत इंग्लंडमधलं जीवन सोपं नव्हतं. कधी कधी खंदकात राहून काम करावं लागे, हे ती आम्हाला सांगायची. तिला मोठ्ठ्या आवाजाचा खूप त्रास व्हायचा. दिवाळीतले फटाकेही चालत नसत. कारण ते तिला युद्धाची आठवण करून द्यायचे. “

आयुष्यभर संघर्ष आणि युद्ध पाहिलेल्या वेणूताईंच्या लिखाणात आणि बोलण्यात त्या संघर्षानंच एक वेगळी संवेदनशीलताही आणली.

डॉ. विजया देव यांनी वेणूताईंच्या आयुष्याचं नेमक्या शब्दांत असं वर्णन करून ठेवलं आहे.

“वेणूताईंचा स्वभाव मुद्दाम काही वेगळं करून दाखवायचं असा नव्हता. पण आयुष्याला सामोरं कसं जायचं याचं शहाणपण त्यांच्याकडे होतं. जे वाट्याला आलं, त्याला त्या अतिशय सकारात्मकरित्या सामोऱ्या गेल्या. “

“मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. हे असं जगता आलं पाहिजे. ” असे डॉ. विजया देव यांनी वेणुताईंबद्दल लिहिलं आहे.

लेखिका : सुश्री जान्हवी मुळे 

संकलक : श्री संजीव वेलणकर

पुणे. मो ९४२२३०१७३३

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शून्य मार्क…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “शून्य मार्क” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

रशियाच्या शिक्षण पद्धतीत परीक्षेचा कमाल गुण ५ असतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे—एखाद्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका पूर्णपणे कोरी दिली तरी त्याला २ गुण दिले जातात.

मॉस्को विद्यापीठात शिकायला गेलो, तेव्हा पहिल्याच दिवशी हे कळल्यावर मी अक्षरशः चकित झालो. मला ते अजिबात तर्कसंगत वाटले नाही.

कोणी काहीही लिहिले नाही, तर त्याला शून्यच मिळायला नको का?

कुतूहलापोटी मी माझे प्राध्यापक डॉ. थिओडोर मेद्रायेव यांना विचारले,

“सर, एखादा विद्यार्थी काहीही लिहित नाही, तरी त्याला २ गुण देणे कसे योग्य आहे?”

डॉ. मेद्रायेव हसले. शांत आणि विचारपूर्वक आवाजात ते म्हणाले,

“शून्य म्हणजे अस्तित्वच नसणे. एखादी व्यक्ती प्रयत्न करत असताना ती शून्य कशी असू शकते? जरा विचार कर—फक्त वर्गात येण्यासाठीही विद्यार्थी किती प्रयत्न करतो. कदाचित पहाटे उठून, कडाक्याच्या थंडीत, लांबचा प्रवास करून, बस-ट्राम-ट्रेनमध्ये उभा राहून तो इथे आला असेल.

उत्तरपत्रिका कोरी असली तरी तो आला, याचा अर्थ त्याने प्रयत्न केला आहे. मग मी त्याला शून्य कसा देऊ?”

ते पुढे म्हणाले,

“कदाचित तो उत्तर लिहू शकला नसेल. पण म्हणून त्याचे सगळे प्रयत्न मिटवून टाकायचे का?

रात्रभर जागून केलेला अभ्यास, घेतलेली वही, उघडलेली पुस्तके, केलेली धडपड—हे सगळे आपण दुर्लक्षित करायचे का?

नाही रे, माझ्या मुला. माणूस कधीच शून्य नसतो.

आपण शून्य देतो, तेव्हा आपण त्याचा आत्मविश्वास चोरतो, त्याच्या आतली जिद्द विझवतो.

आणि शिक्षक म्हणून आपले काम विद्यार्थ्यांना पुन्हा-पुन्हा उभे राहायला मदत करणे आहे—त्यांना शरण जायला भाग पाडणे नाही.”

मी शांतपणे ऐकत राहिलो. त्या क्षणी माझ्या आत काहीतरी हलले.

तेव्हाच मला उमगले—

शिक्षण म्हणजे केवळ गुण देणे किंवा उत्तर तपासणे नाही.

शिक्षण म्हणजे माणसाला जिवंत ठेवणे, प्रयत्नांची दखल घेणे, आशा जपणे.

शून्य गुण अनेक विद्यार्थ्यांसाठी जणू मृत्यूची घंटा ठरतात.

त्या कागदावरचं शून्य त्यांना घाबरवतं, त्याची शिकण्याची आवड संपवतं आणि हळूहळू शिक्षणाबद्दल चीड निर्माण करतं.

पण शिक्षकाची जबाबदारी वेगळी आहे.

ती म्हणजे प्रोत्साहन देणं, धीर देणं, आणि म्हणणं—”तू करू शकतोस. पुन्हा प्रयत्न कर.”

रिकाम्या उत्तरपत्रिकेसाठीही किमान गुण देण्याचा अर्थ असा असतो—

“तू शून्य नाहीस.

तू महत्त्वाचा आहेस.

तुझ्यात क्षमता आहे.

तू अपयशी झालेला नाहीस—फक्त यावेळी  यश मिळाले नाही.पुन्हा प्रयत्न कर.”

हेच खरे शिक्षण आहे.

विद्यार्थ्यांचे भविष्य शिक्षकांच्या हातात असते.

जर शिक्षक थोडे अधिक माणुसकीने पाहू लागले,जर त्यांनी आकड्यांपलीकडे प्रयत्न पाहायला शिकलं,तर अनेक निराश विद्यार्थी पुन्हा स्वप्न पाहण्याचे धाडस करतील.

मला वाटते ही गोष्ट फक्त रशियापुरती मर्यादित राहू नये.

ती जगभरातील शिक्षकांपर्यंत पोहोचायला हवी.

कारण—

शून्य गुण म्हणजे शिक्षणच नाही,

तर अनेकदा एखाद्याचा प्रवास संपवणे.

जोपर्यंत एखादी व्यक्ती प्रयत्न करत आहे,

तोपर्यंत तिला किमान आश्वासन तरी मिळायलाच हवे,

किमान मान्यता तरी मिळायलाच हवी.

— रशियात शिक्षण घेणाऱ्या एका अज्ञात विद्यार्थ्याने लिहिलेली ही गोष्ट एखाद्या आदर्श शिक्षकासोबत जरूर शेअर करा.

कदाचित ती आपल्या शिक्षण व्यवस्थेत एखादा छोटासा, पण अर्थपूर्ण बदल घडवेल.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शिक्षणाचा खेळखंडोबा” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “शिक्षणाचा खेळखंडोबा☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतात शिक्षणव्यवस्थेची आज जी दुर्दशा दिसून येते, ती केवळ प्रशासकीय अपयशापुरती मर्यादित नसून ती खोलवर रुजलेल्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचे आणि सामाजिक दांभिकतेचे लक्षण आहे. शिक्षण हे दीर्घकालीन गुंतवणुकीचे क्षेत्र असल्यामुळे त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत, आणि म्हणूनच येनकेन प्रकारेण सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक अल्पकालीन फायद्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या राजकीय व्यवस्थेला शिक्षण कधीच प्राधान्याचे वाटले नाही. परिणामी परीक्षा वेळेवर न होणे, प्रश्नपत्रिका फुटणे, मोठ्या प्रमाणावर कॉपी होणे, निकाल विलंबाने लागणे आणि अभ्यासक्रमाचा आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान व जागतिक ज्ञानव्यवस्थेशी ताळमेळ न बसणे या समस्या दशकानुदशके टिकून आहेत. या सगळ्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर, संशोधनाच्या गुणवत्तेवर आणि देशाच्या बौद्धिक भांडवलावर होतो. या शैक्षणिक अपयशाचा एक महत्त्वाचा राजकीय पैलू म्हणजे शिक्षणावरील सार्वजनिक खर्च. भारतासारख्या तरुण लोकसंख्येच्या देशात वैज्ञानिक संशोधनासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक टक्क्याहून कमी आणि एकूण शिक्षणासाठी अडीच टक्क्यांपेक्षा कमी खर्च होणे हे केवळ आकडेवारीचे अपयश नाही, तर धोरणात्मक दृष्टी अभावाचे द्योतक आहे. ज्या देशांनी ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था उभारल्या, त्यांनी शिक्षण आणि संशोधनाला केंद्रस्थानी ठेवले. भारत मात्र ‘महासत्ता’ होण्याच्या घोषणा देतो, पण त्या घोषणांना आवश्यक असलेली शैक्षणिक पायाभूत गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करतो. त्यामुळेच दर्जेदार संशोधन, नवोन्मेष आणि उच्च दर्जाचे विद्यापीठीय वातावरण परदेशात अधिक उपलब्ध असल्याने लाखो भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जातात आणि अनेकदा तिथेच स्थायिक होतात. ही प्रक्रिया ब्रेनड्रेनला प्रोत्साहन देणारी असून ती बौद्धिकदृष्ट्या देशाला कमकुवत करणारी आहे.

शिक्षणावर सरकारचा वाढता हस्तक्षेप हा या संकटाचा आणखी एक गंभीर पैलू आहे. शिक्षण संस्थांना स्वायत्ततेऐवजी नियंत्रणाखाली ठेवण्याची मानसिकता ही लोकशाही समाजासाठी घातक ठरते. कोणते विषय शिकवायचे, इतिहासाची मांडणी कशी करायची, कोणते ज्ञान ‘भारतीय’ आहे आणि कोणते ‘परकीय’ आहे, अशा राजकीय सूचनांमधून शिक्षणाला वैचारिक चौकटीत बंदिस्त केले जाते. यामुळे प्रश्न विचारण्याची, शंका उपस्थित करण्याची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याची क्षमता कमी होते. याच पार्श्वभूमीवर विशिष्ट धर्माशी निगडित पौराणिक संकल्पनांना अभ्यासक्रमात स्थान देणे, पौराहित्याचे अभ्यासक्रम आखणे, गोशाळा किंवा गोमुत्रावरील संशोधनाला मोठ्या प्रमाणात अनुदान देणे, ही पावले वैज्ञानिक संशोधनाच्या मूळ तत्त्वांनाच आव्हान देणारी ठरतात. अशा प्रकारचा छद्म-विज्ञानाचा पुरस्कार हा केवळ शैक्षणिक अधोगतीचा नाही, तर समाजाच्या विवेकबुद्धीच्या ऱ्हासाचाही संकेत आहे.

या सगळ्यात सामाजिक स्तरावर दिसणारी दांभिकता अधिक चिंताजनक आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणणारा, आर्थिकदृष्ट्या सक्षम वर्ग स्वतःच्या मुलांसाठी परदेशातील उत्तम शिक्षणसंस्था निवडतो, पण देशांतर्गत शिक्षणव्यवस्थेच्या अधोगतीविरोधात ठोस भूमिका घेत नाही. एकीकडे राष्ट्रवाद, देशभक्ती आणि सांस्कृतिक अस्मितेच्या घोषणा दिल्या जातात, तर दुसरीकडे स्वतःच्या पुढील पिढीसाठी देशातील शिक्षणव्यवस्थेवर विश्वास ठेवला जात नाही. ही विसंगती सामाजिक जबाबदारीच्या अभावाची आणि वैचारिक दारिद्र्याचे प्रतीक आहे. शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी जेव्हा समाजाकडून दबाव येत नाही, तेव्हा राजकीय सत्ताधाऱ्यांनाही बदल करण्याची गरज वाटत नाही. एकूणच पाहता, भारत महासत्ता होण्याच्या आकांक्षा आणि त्याची शैक्षणिक वास्तवता यांच्यात प्रचंड दरी आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणपद्धतीचा समावेश, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षणाला मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ, संशोधन संस्थांना स्वायत्तता आणि शिक्षणाची राजकीय-धार्मिक हस्तक्षेपापासून मुक्ती हे मूलभूत बदल झाले नाहीत, तर ‘ज्ञानाधारित भारत’ ही संकल्पना केवळ भाषणांपुरती मर्यादित राहील. अशा परिस्थितीत महासत्तेचे स्वप्न पाहणे म्हणजे वास्तवाशी फारकत घेऊन कल्पनाविलासात रमण्यासारखेच ठरेल, आणि ही किंमत शेवटी संपूर्ण समाजालाच मोजावी लागेल. पण कोण लक्षात घेतो?

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “… आणि लोणचे ग्लॅमरस झाले…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “… आणि लोणचे ग्लॅमरस झाले…” ☆ सुश्री शीला पतकी 

आपल्या मराठी भाषेत विशेषणाची अगदी रेलचेल आहे. रंग असेल तर लाल भडक, पिवळा धमक, पदार्थ असेल तर खमंग ढोकळा, खुसखुशीत चकली, चमचमीत भेळ वगैरे, यांनी काय बरे होते. उदा. भेळ म्हंटल्यावर नॉर्मल चिरमुऱ्यांची भेळ. चमचमीत भेळ म्हटले कागदात वरपर्यंत ढीग लावलेली वरून बारीक शेव त्यावर मिरची कैरीची फोड हे चित्र उभे करण्याची ताकद या विशेषणांमध्ये असते. पण काही शब्द हे स्वयंभू असावेत विशेषणांशिवाय परिणाम साधतात. लोणचे हे त्यापैकीच एक. लोणचे शब्द उच्चारला की तोंडाला पाणी सुटते. वेगळे विशेषण लावायची त्याला गरज नसते. तसे आंबट, गोड खारट, तिखट अशा सगळ्या चवीचे मिश्रण असले तरी त्यातली प्रत्येक चव स्वतंत्र अनुभवता येते. खरे तर या चवी लोणच्यात प्रमाणापेक्षा थोड्या जास्तच वापरल्या जातात. पण एकत्र मुरल्यावर त्या जी काय चव धारण करतात त्याला तोड नाही.

वर्षभर टिकणारे कैरी, लिंबू, आवळा, माईंमुळं, करवंद, मिरची, बाळ कैरीचे लोणचे.

तात्पुरते भाज्यांचे लोणचे. उत्तरेकडे मोहरीच्या तेलातील लोणची, दक्षिणेकडील वेगळ्या मसाल्यातील लोणची असे अगणित प्रकार आपल्या भारतात पहायला मिळतील.

पानात मिठाच्या खालोखाल डाव्या बाजूला विराजमान होणारे लोणचे, चटणी आणि कोशिंबीर.

पण लोणच्यामुळे पान देखणे दिसायला लागते. वाढायला सुरुवात केल्यावर चटणी किंवा कोशिंबीर कोणी चाखून बघत नाहीत. तो मान लोणच्याचा. लोणचे बोटावर घेऊन चाखल्याशिवाय राहवत नाही.

लोणचे काय करते तर, सगळ्या चवी आपल्या मुखात स्त्रावयला लागतात आणि आपली जेवणाची इच्छा वाढवतात. हे झाले शास्त्र.

पण लौकिक अर्थी काय काय करते बघूया

एखादी भाजी चांगली झाली नसेल, तर बायकोला न दुखवता नवऱ्याच्या मदतीला धाऊन जाते.

मुलांच्या आवडीची भाजी नसेल तर उपयोगी येते. अचानक पाहुणे आले तर भाजी सोबत पुरवठा म्हणून येते.

शेजाऱ्यांची वाटी आली असेत तर त्यात काय घालून द्यायचे तर लोणचे.

शिवाय पराठे, धपाटे, थालीपीठ, मुगाची खिचडी यां पदार्थांची रंगत लोणच्याशिवाय नाही, की लग्नाची पंगत ही नाही.

संध्याकाळी बरणीतून काढायचे नाही, तिन्ही सांजेला कुणाला देऊ नये, माहेरवाशिणीना लोणचे देऊ नये अशाही काही याच्या मान्यता आहेत.

भात, भाकरी खाऊन पोटाची भूक भागते पण जिभेची तृप्तता करण्याचे सामर्थ्य लोणच्यातच.

असे हे लोणचे इतके वर्ष घरगुती विषय होता. पण मध्यंतरी आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी यांचा लोणचे घालतानाचा एक व्हिडिओ वायरल झाला. तोही छान भारतीय बैठकीत अगदी घरगुती साध्या कपड्यात. अगदी आपण घरी असतो तशा.

.. त्या व्हिडिओ मध्ये त्यांचा साधेपणा दिसत होताच – – पण त्याचसोबत – – 

… एरवी घरात बरण्यामध्ये साठवलेले, गरजेपुरते बाहेर काढले जाणारे साधे लोणचे मात्र त्यादिवशी ग्लॅमरस झाले…

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अस्थिहीन जिव्हा आणि भिक्षापात्रे !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ “अस्थिहीन जिव्हा आणि भिक्षापात्रे !” ☆ श्री संभाजी बबन गायके

निसर्गाने हाड नसलेला जीभ नावाचा एक महत्त्वाचा अवयव निर्माण केला तो बोलणे सुलभ व्हावे म्हणून. हा अवयव लवचिक असल्याने त्यातून कोणत्याही शब्दांचा उच्चार करता येतो. पण असे असले तरी काहीही बोलू नये, असे अपेक्षित असते. जिभेला हाड असते तर जीभ मन मानेल तशी वळली नसती.. म्हणून तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? असं रागावून विचारले जाते. अर्थात, आपल्या जिभेला हाड आहे, असे समजून जीभ वापरली पाहिजे. हा संकेत पाळला नाही तर या जिभेच्या शब्दाने ऐकणाऱ्या माणसाला बोलणाऱ्याचे हाड मोडायची इच्छा होऊ शकते!

गेल्या तीन दिवसांत अशा अनेक जिभा वळवळत आहेत. आणि दुर्दैवाने ही वळवळ बघावी आणि ऐकावी लागत आहे! 

पूर्वी समाजमाध्यमे म्हणजे रेडिओ आणि वर्तमानपत्र आणि पुढे फार फार तर दूरदर्शन असा कारभार होता.

आता माळरानावर जाऊन बोंब मारायला पाटलाची परवानगी लागत नसल्याने सर्वांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा साक्षात्कार झाला आहे! 

यात आघाडीवर आहेत ते इलेक्ट्रॉनिक मिडिया मधील अधिकृत आणि स्वयंघोषित वार्ताहर. वार्तेचे हरण (हरिण नव्हे!) करणारे म्हणजे बातमी शोधून, हुडकून ती हरण करून, पळवून घेऊन जाणारे ते वार्ताहर. पण म्हणून काहीही पळवून न्यावे का?

ज्या विषयाचे तांत्रिक ज्ञान आपल्याला नाही, तसे ते इतरांनाही नसावे, अशा आविर्भावात ही मंडळी बोलत असतात. घटनास्थळ आणि विमानतळ यांत कित्येक किलोमीटर्स चे अंतर होते, असे सांगणारे प्रतिनिधी दिसले! सामाजिक विषयांवर उत्तम live येणारे काही विमानविद्येवर तुफान बोलताना दिसले!

फेसबुक, यूट्यूब व्हिडिओ यांच्या माध्यमातून बरेच पैसे मिळू शकतात, हे आता सर्वांना ठाऊक झाले आहे. Likes जितक्या जास्त तेवढे पैसे मिळण्याची शक्यता अधिक असाच हिशेब असल्याने येनकेन प्रकारे लोकांनी like करावे, comment करावे, share करावे, असा प्रयत्न होणे साहजिकच आहे. पण त्यासाठी भिक्षापात्र अवलंबणे कितपत योग्य आहे? हे लाजिरवाणे जिणे जळाले तरी चालेल का?

अमूक व्यक्तीला अमूक पदी नेमावे असे कुणाला वाटते आणि कुणाला वाटत नाही? या पोस्टवर लोक सहज व्यक्त होतात, कारण सध्या हा विषय ऐरणीवर आहे. खरं तर, चितेची राख थंड होण्याआधीच या चर्चा सुरू केल्या जातात, हेच दुर्दैवाचे आहे! एखाद्या पोस्ट वर आपण नाही म्हटले किंवा होय म्हटले तर कोण ऐकेल? या संख्येवर निर्णय होणार आहे का? हा काय अधिकृत surevy आहे का? पण अशा पोस्ट्स वर हजारो comments दिसतात!

खरेच भक्त असाल तर या संताच्या, नेत्याच्या फोटोला like कराल… अशी गळ घातली जाते! 

बारामती विमान अपघातसदृश भलतेच व्हिडिओ अपलोड केले जात आहेत, लोक उत्सुकतेपोटी हेही व्हिडिओ खरे म्हणून पहायला जातात! 

आणि व्हिडिओवाला म्हणतो… हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा… कारण youtube वाले अर्धवट व्हिडिओ पाहिला गेला की पैसे देत नाहीत. म्हणून हे लोक आमटीत पाणी घालत राहतात.

लोकांना बीभत्स बघण्याची चटक लागली आहे. आणि त्याचाच फायदा घेत विविध व्हिडिओ share होत आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीचा छिन्नविछिन्न देह बघण्याची इच्छा का व्हावी. त्याची शेवटची हीच प्रतिमा आपल्याला मनात कोरायची असते का? 

अपघात नव्हे घातपात हे ठासून सांगणारे सर्वाधिक आहेत. नशीब याबाबतीत तरी बहुमतावर काही निर्णय होत नाही ते!

आणखी एक… श्रद्धांजली वाहताना… मला त्यांचे राजकारण आवडत नव्हते, मतभेद होते, मतभेद असू शकतात, अशी पुस्ती जोडायला लोक कमी करत नाहीत! केवळ श्रद्धांजली वाहिली असती तर तुम्हांला लोकांनी त्यांचे अनुयायी म्हटले असते, अशी भीती वाटते का?

शोक करणाऱ्या व्यक्तीचे close ups का हवे असतात छायाचित्रकारांना? तुमच्या भावना काय आहेत हे शोकमग्न नातेवाईकांना विचारणे कितपत शहाणपणाचे आहे? 

यावर उपाय म्हणजे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत राहणे… पण हे शक्य होत नाही! आणि यामुळेच सर्वांचे छान चालले आहे! 

आजवर झालेल्या अपघातांच्या रीतसर चौकशा झालेल्या आहेत, पण त्यांचे निष्कर्ष कुणी पहात नाहीत. जनरल कमेंट म्हणजे आपलं मनाला वाटेल ते बोलून मोकळं होणं लोक पसंत करतात. फेसबुक, व्हॉट्सॲप मुळे हे बोलणं एकाच वेळी अनेकांना ऐकावे, वाचावे लागते! दिशाभूल करणारे मथळे, फोटो आणि व्हिडिओ यांची आजकाल चलती आहे. कृपया विवेक से काम लें! असे म्हणावेसे वाटते!

‘लोक जैसा ओक धरवेना’ असे तुकोबाराय म्हणून गेलेत, ते खरेच! असो.

झाले ते वाईट झाले एवढे मात्र खरे आहे !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares