मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी दिनदर्शिका – My Calendar…” भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “माझी दिनदर्शिका – My Calendar…” भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर

(यावरून मनवाला गाडी विकण्याकरता काय काय सोपस्कार करावे लागले असतील, हे सहज लक्षात येईल. माझी दिनदर्शिका जर असती, तर असे प्रसंग खूपच सोपे नक्कीच होतात.) 

इथून पुढे – – –

आजकाल बहुतेकांकडे एक पेक्षा जास्त गाड्या असतात. कुठल्या गाडीचे पीयूसी कधी ड्यू आहे, हे लक्षात ठेवणे नक्कीच सोपे नाही. रस्त्यावर पीयूसी तसे फार कमी वेळा पोलिसांकडून चेक होते, आणि आपण कधी वेळेवर, कधी उशिरा असे ते करतच असतो. पण केंव्हातरी आपले पीयूसी नाही आणि रस्त्यावर पीयूसी चेक होणे, अशी सांगड घडते आणि आलीया भोगासी म्हणत १००० रु दंड भरावा लागतो. माझी दिनदर्शिका जर असती, तर असा दंडाचा प्रसंग कधी येणार नाही, हे नक्की.

अशी ही यादी खूप मोठी होणार, हे यावरून सहज लक्षात येते.

काय आहे ही माझी दिनदर्शिका किंवा My Calender?

नवीन वर्ष सुरु झाले, कि २ – ३ तरी कॅलेंडर आपल्या कडे येतातच. त्यापैकी जरा मोकळी जागा असलेले मोठे कॅलेंडर आता माझी दिनदर्शिका किंवा My Calender म्हणून आपण तयार करायचे आहे.

वर्षभरात काय काय महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, कुठली कुठली पेमेंट करायची आहेत, आणि त्यांची काय तारीख आहे, हे बघून कॅलेंडर वर त्या त्या महिन्याच्या पानावर तशी एंट्री करायची आहे.

साधारणपणे सगळ्यांनाच लागू असणाऱ्या गोष्टी अशा असू असतात –

*घराचा कार्पोरेशन टॅक्स भरणे * सगळ्या वाहनांची पीयूसी ड्यू डेट *सगळ्या वाहनांची इन्शुरन्स ची ड्यू डेट 

*मोबाईल रिचार्ज ची ड्यू डेट *मेडिकल क्लेम करण्याच्या तारखा *टाटा स्काय इ. चे रिन्यू करणे

*डॉक्टरांच्या अँपॉईंटमेंट्स / मेडिकल चेक अप च्या तारखा (स्वतःच्या, बायकोच्या / नवऱ्याच्या, घरातल्या इतरांच्या)

*इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे (स्वतःचे, बायकोचे / नवऱ्याचे ऍज अप्लिकेबल)

* टीडीएस सर्टिफिकेट / इंटरेस्ट सर्टिफिकेट आणणे

*80 C खाली टॅक्स रिबेट घेण्याकरता पीपीएफ वगैरे मध्ये पैसे भरणे / डोनेशन्स देणे 

*बँकेमधे पीपीएफ खाते असेल, तर ते सुरु ठेवण्याकरता दरवर्षी काही थोडी रक्कम भरावी लागते 

*जिवंत असल्याचा दाखल घेणे आणि एलआयसी / बँक / ऑफिस इ ठिकाणी जमा करणे

*बँक किंवा इतर कुठल्या एफडी मॅच्युअर होत आहेत का?

*एमएसीबी चे बिल / लँड लाईन चे बिल / पेपर बिल / दूधबिल / घरात कामाला येणाऱ्यांची पेमेंट्स / —-

प्रत्येकाच्या व्यापाप्रमाणे हि यादी लहान / मोठी होणार, हे आलेच.

समजा आपल्या गाडीच्या इन्शुरन्स ची तारीख २० एप्रिल आहे. एप्रिल महिना सुरु झाला. आपण कॅलेंडर चं पान उलटलं, कि समजेल ड्यू डेट २० एप्रिल आहे. आपण त्याप्रमाणे रिन्यू केले आणि आता पुढची रिन्यूअल डेट पुढच्या वर्षीच्या २० एप्रिल ला असणार. आता अशा नोंदी डिसेंबर च्या पानावर मोकळ्या जागेत करून ठेवायच्या. आणि कॅलेंडर बदललं कि त्या कॅरी फॉरवर्ड करायच्या.

काही महत्वाच्या गोष्टी किंवा काही पेमेंट ही काही वर्षांच्या गॅप नंतर करायची असतात. जसे –

*ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू (आपले / बायकोचे – नवऱ्याचे / –)

*वाहनांचे रजिस्ट्रेशन रिन्यू करणे * डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड च्या एक्सपायरी डेट्स 

*म्युचवल फंड बंद करणे वगैरे *घर भाड्यानी दिले / घेतले असल्यास रीतसर भाडेकरार 

*पासपोर्ट / व्हिसा रिन्यू करणे (आपला / बायकोचा – नवऱ्याचा / –) * आधार कार्ड / पॅन कार्ड मधे काही बदल करणे

प्रत्येकाच्या व्यापाप्रमाणे आणि आवाक्याप्रमाणे हि यादी पण लहान / मोठी होणार, हे आलेच.

हे करतांना ही सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला बघायचीच आहेत, आपल्या नजरेखालून घालायची आहेत आणि आवश्यकतेप्रमाणे तशी कॅलेंडर वर नोंद करायची आहे.

सिनियर सिटिझन्स यांच्याकरता अजून एक महत्वाची गोष्ट काही वर्षांच्या गॅप नंतर जरूर बघायची आहे / रिव्ह्यू करायची आहे, आणि ती म्हणजे आपले मृत्युपत्र म्हणजे विल आणि निरनिराळ्या इन्व्हेस्टमेंट्स / मालमत्ता या करता दिलेली नॉमिनेशन्स. बदलत्या परिस्थितीप्रमाणे यामध्ये वेळोवेळी बदल करणे गरजेचे असू शकते. काही वेळा बँकांची सॉफ्टवेअर बदलतात आणि त्या प्रोसेस मध्ये दिलेली नॉमिनेशन्स गायब होतात. काही गृहरचना संस्थांमध्ये माणूस गेल्यावर लक्षात येते, कि, नॉमिनेशन भरलेला सही / शिक्का असलेला फॉर्म घरी पण नसतो आणि सोसायटीच्या दप्तरात पण नसतो. मृत्युपत्र बऱ्याच जणांनी केलेलेच नसते किंवा केलेले असले, तर कुठे ठेवले आहे ते घरच्यांना माहित नसते. अशा घटना घडलेल्या आहेत, आणि नंतर पुढे काय होते, ते सांगायला नको. काही वर्षांपूर्वी सत्तरी नंतर सगळ्यांना वाटायचे, कि आता आपले खरे नाही, मृत्युपत्र वगैरे करायला पाहिजे. “आपले खरे नाही” असे वाटण्याचे वय आता चाळीशी – पन्नाशी पर्यंत खाली आले आहे. थोडक्यात म्हणजे हि कागदपत्रे सगळ्यांनीच करणे गरजेचे आहे. आणि मधून मधून रिव्ह्यू करणे पण गरजेचे आहे. आणि हे करतांना आपल्या जोडीदाराला विश्वासामधे घेणे गरजेचे आहे. आणि अशा रिव्ह्यू करता उपयोगी येणार आहे, माझी दिनदर्शिका.

माझी दिनदर्शिका किंवा My Calender मध्ये अजून एक महत्वाची नोंद करायची आहे आणि ती म्हणजे आपल्या जवळच्यांचे आणि परिचितांचे वाढदिवस आणि लग्न झालेले असल्यास लग्न दिवस. आजकाल फेसबुक आणि व्हॉटस्अप मुळे तांत्रिक शुभेच्छांची देवाण घेवाण यांत्रिक पद्धतीने आपोआपच सुरु होते. पण यामध्ये आपले सगळेच जण कव्हर होतील असे जरूर नाही. आपल्या कुठल्याही ग्रुपमध्ये बायकोचे नाव असेलच, असे काही जरूर नाही. आणि तो वाढदिवस आणि तो लग्न दिवस विसरून पण चालत नाही. म्हणून नवीन कॅलेंडर आले, कि त्यावर या सगळ्या नोंदी करून ठेवायच्या, आणि त्या त्या दिवशी फोन करून / मॅसेज करून आपल्या मनातल्या शुभेच्छा दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या.

कुणाकडे चालू महिन्यात किंवा काही महिन्यांनंतर डोहाळ जेवण आहे / लग्न आहे / बारसं आहे / काही कार्यक्रम आहे, अशा नोंदी आपण माझी दिनदर्शिका मध्ये करायच्या आहेत. कुठले गाण्यांचे कार्यक्रम / नाचांचे कार्यक्रम / मुलांच्या शाळेचे कार्यक्रम, अशा नोंदी पण आपण My Calender मधे करायच्या आहेत.

आजकाल सगळेच जण हेल्थ कॉन्शस असतात, वजन कॉन्शस असतात, वगैरे वगैरे. त्याकरता आठवड्यात ५ दिवस फिरायला जाणार, ३ दिवस व्यायाम करणार, खाण्यावर काही बंधने, पिण्यावर पण काही बंधने, असे बरेच संकल्प आपण वर्षाच्या सुरवातीला करतो. आणि पुढे त्याचे काय होते, हे आपण जाणतोच. आता या सगळ्या नोंदी My Calender वर केल्या तर, “जे ठरवले – ते पूर्ण केले”, म्हणजेच संकल्पपूर्ती ही स्टेज गाठणे सहज शक्य आहे.

कुणाला असंही वाटू शकतं, कि या सगळ्या नोंदी थोड्या कॉन्फिडेन्शियल आहेत आणि सगळ्यांना दिसू नयेत. या करता माझी दिनदर्शिका आपल्या बेडरूम मधे लावता येते आणि हॉल मध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना आवडतील अशी सुंदर सुंदर चित्र असलेलं कॅलेंडर लावता येते.

पहिलं कॅलेंडर करायला थोडा वेळ लागणार, हे नक्की. पण पुढची कॅलेंडर तयार करणे खूप सोपे असणार आहे, कारण थोडे छोटे मोठे बदल करत, मागचीच ‘री’ पुढे ओढायची, इतके हे काम सोपे असणार आहे, हे नक्की. पाहिली माझी दिनदर्शिका किंवा My Calender भिंतीवर लागलं, कि घरातले सगळेच म्हणू शकतील —

I simply can not miss any event in the year because I have “My Calender”.

मी वर्षातली कुठलीही घटना विसरणे, हे अशक्यप्राय आहे, कारण माझ्याकडे आहे “माझी दिनदर्शिका”.

– समाप्त –

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तिळगुळ समारंभ… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ तिळगुळ समारंभ… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

आमच्या बिल्डिंगचा तिळगुळ समारंभ छान झाला. या आठवड्यात संक्रांतीचे हळदीकुंकू म्हणून बऱ्याच जागी बोलविले होते. काळया रंगाच्या साड्यांना अगदी बहर आला होता. काळया रंगाची पैठणी पासून ते विविध प्रकारच्या साड्या बघायला मिळाल्या. ••••

काही जणींचा ड्रेसिंग सेन्स खूप छान असतो. प्रसंगानुरूप परिधान, त्यावर मॅचिंग इतर Accessories घालून त्या छान तयार होतात. व‌ स्वतः ला छान carry करतात. अशा स्टायलिश बायका नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. याकरिता आवड पाहिजे, ती समज पाहिजे, हौस तर असायलाच पाहिजे. व सर्व व्यवस्थित करताही आले पाहिजे. •••••

मला अशा बायका खूप आवडतात. आपला स्त्री म्हणून ‘सजण्याचा ‘ जन्मसिद्ध अधिकार त्या व्यवस्थित उपयोगात आणतात. स्त्री जन्माचा आनंद भरपूर उपभोगतात. मला नेहमीच कौतुक वाटतं त्यांचे. •••• 

आज अनिता कडे हळदीकुंकू आहे. आमच्या बिल्डिंगच्या सर्वच मैत्रिणीना आमंत्रण आहे. रेहाना व तिच्या सासूबाई. पल्लवी आपल्या सासूबाईं बरोबर, जोशी काकू, कुलकर्णी काकू आल्या. तसेच अजून अशाही बर्याच बायका होत्या ज्या आपल्या आयुष्याच्या प्रवासात आता एकट्याच आहेत. त्यांचे जोडीदार त्यांना सोडून गेले आहेत. प्रकृतीचा नियमच आहे तो. मानावाच लागतो. कोणी आधी कोणी नंतर साथ सोडणार हे आधीच ठरलेलं असते. •••प्रकृतीच्या नियमाप्रमाणे वागावेच लागते. पण याचा अर्थ आयुष्याचा आनंद कमी करणे नव्हे. नेहमी आनंदी राहण हा प्रत्येक स्त्री पुरुषाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. ••••

म्हणतात ना ••••

“जीवन तब कठिन लगता है, जब हम स्वयं को बदलने की बजाय परिस्थितियों को बदलने का प्रयास करते‌ हैं।”•••

अनिता तशी अगदी साधी मुलगी. फॅशन, स्टाईल तिच्या आसपासही फटकत नाही. पण विचारांनी खूप श्रीमंत व आधुनिक. नेहमी काही तरी वेगळा विचार करणार. •••••

आज हळदीकुंकवाला तिने सर्वांना आग्रहाने बोलविले होते. रेहाना, पल्लवी च्या सासूबाई म्हणाल्या पण ••••अग आम्ही येऊ पुन्हा कधी. आज तुम्ही सर्व मुली enjoy करा. आज हळदीकुंकवाच्या निमित्ताने तुम्ही सर्व किती तरी दिवसांत भेटणार अहात तेंव्हा मजा करा. पण अनिता कुठे ऐकते कोणाचे?? तीने सर्वांना संध्याकाळी चार वाजता यायचा आग्रह ‌केला. ••••

सर्व जण पाच दहा मिनिटांच्या अंतरावर पोचल्याच. आज अनिता च्या मुलाचे ‘बोरन्हाण ‘ चा कार्यक्रम ही आहे. अनिता ने रेहाना च्या सासूबाई, आम्ही सर्व त्यांना ‘अम्मी’ म्हणतो. त्यांना मदतीला घेतले. सर्व ‘आजी पार्टी ‘ ला मागे अर्ध गोलाकार पद्धतिने बसविले व त्यांच्या समोर अनयचा ‘बोरन्हाण’ कार्यक्रम केला. मुलांनी मनसोक्त लूटालूट केली. •••••

माझ्या मुलाला सर्व आजींचे खूप खूप आशिर्वाद मिळु दे असं म्हणाली अनिता. ••

अनिताचे विचार म्हणजे सकारात्मक शक्ति. सर्वांना एकत्र घेऊन कसे पूढे जायचे??? हे ती उदाहरणासह प्रस्तुत करते. ते ही एकदम ‌‌confidently, सहजतेने. तिच्या विचारांनी दुसऱ्यांना वेगळा विचार करण्याची प्रेरणा मिळते. सुरवात नेहमी स्वतः पासून करायची हेही ती दाखवून देते. एकत्र असणं हा एक सामुहिक आनंद आहे. तो घेता व देता आला पाहिजे. ••••

“खुशी देना ही खुशी पाने का अधिकार है”।”

“आनंद हा संसर्गजन्य रोग, जेवढा जास्त पसरविता येईल तेवढा पसरविता आला पाहिजे. ” थोड्या ‘हटके चालीरीती’ सहज सुरू करता आल्या पाहिजेत. ••••

गृप मधील आधुनिक परिधानात आलेल्या बायका कडून ही खूप शिकता येते. नवीन फॅशनस कळतात. ती एक कलाच आहे सर्वांना नाही जमत. पण त्यांना बघून शिकता नक्की येते. आधुनिक विचार ही कळतात. सध्या कोणत्या फॅशनस ‘IN ‘आहेत तेही कळत. •••••

एकंदरीत हळदीकुंकू म्हणजे जूनी संस्कृती, संस्कार आहेतच. बरोबर एकत्र येणे, भेटणे, गप्पा मारणे, आपल्या दोस्ती ला मजबूत करणे, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणे, म्हणजे गम्मत जम्मतच. काही तरी नवीन शिकणे पण होते. अनिता सारखा वेगळा विचार करता आला पाहिजे. व तो कृतितही उतरवता आला पाहिजे. प्रसंगानुसार आपला विचार अमलात आणता आला पाहिजे. तो सहजपणे प्रस्तुत करता आला पाहिजे. जास्त काही न बोलता सर्वांसमोर आदर्श ठेवता आला पाहिजे. ••••

काही गोष्टीं / विचार बदलणे गरजेचे आहे. फक्त बोलून आपले विचार सांगणारे खूप लोक असतात. पण एक पाऊल पूढे येऊन ते कृतित उतरविण्यारे कमी असतात. सकारात्मक बदल करणे म्हणजेच प्रगती करणे होय. ••••

हळदीकुंकू छान झाले. जोशी आजींनी संक्रांतीचे महत्त्व सांगितले. त्याबद्दल माहिती दिली. नंतर अत्तर, गुलाबपाणी, चाफ्याचे फूलं, तिळगुळ, बोर शेंगा असलेली ओटी, व वाण म्हणून तुळशी रोप. अगदी आनंदाने विचारांनी समृद्ध होऊनच मी घरी परतले.

अशा प्रकारे तिळगुळ समारंभ छान संपन्न झाला. •••••

लक्षात आले, •••

“वाणी और विचार ये दोनों प्रोडक्ट हमारी खुद की कंपनी के होते हैं।

जितनी क्वालिटी और गुणवत्ता अच्छी रखेंगे उतनी ही उनकी कीमत ज्यादा बढेगी । “

” We always work for better tomorrow. Let’s work for better today “.

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३७ व ३८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३७ व ३८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

 नारद भक्ती सूत्र क्र. ३७ आणि ३८.

भक्तीसूत्र ३७ – – 

लोकेऽपि भगवतगुणश्रवणकीर्तनात् ॥३७॥

अर्थ :- साधकाने प्रपंचातील कामे करताना, लोकांमध्ये वावरताना भगवंताच्या गुणांचे श्रवण आणि कीर्तन करावे म्हणजे भक्ति संपन्न होते.

विवेचन:

मागील छत्तिसाव्या सूत्राचेच हे अधिक स्पष्टीकरण आहे असे म्हटले तरी चालेल. तेथे ‘भजन’ असे पद आहे. भजनात श्रवण-कीर्तनादिकाचाही अंतर्भाव होतो. लोकव्यवहारात भक्ती उत्पन्न होण्याकरिता भगवद्‌गुण श्रवण-कीर्तनादि साधनाचा अवलंब केला जातो. सत्संगतीत श्रद्धापूर्वक हरिगुण श्रवण-कीर्तनादिकानेच अंतःकरणात भगवतभाव निर्माण होतो व प्रेमवृद्धी होत असते. असा सर्व भक्तिमान पुरुषाचा अनुभव आहे.

आज संवादाची अनेक साधने उपलब्ध आहेत. माध्यम कोणतेही असले तरी त्याचा मुख्य हेतू ‘सुसंवाद’ हाच असतो आणि तोच असायला हवा. येत्या काळात आणखी काही साधनांची भर यात पडू शकेल. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ‘श्रवणकला’ अपरिहार्य राहील, यात दुमत असणार नाही.

दैनंदिन व्यवहार पाहिला तर लोकांची ऐकून घेण्याची क्षमता आज खूप क्षीण होत चालली आहे असे लक्षात येते. सध्या वैयक्तिक जीवनात आणि सामाजिक जीवनात एक गोष्ट लक्षात येते की एकतर लोकं पूर्णपणे ऐकत (श्रवण) नाहीत किंवा त्यांना ऐकायचेच नसते. आपलं लोकांनी ऐकावं असे प्रत्येकाला वाटते, परंतु दुसराही असा विचार करीत असेल, हे त्याच्या ध्यानातच येत नाही. याचा परिणाम असा होतो की लोकं स्वतःला व्यक्त करायचे टाळतात आणि त्यांच्या मनात अनेक बऱ्यावाईट गोष्टीं साचत जातात. जरा, आजूबाजूला डोळे उघडे ठेवून पाहिले तर याचे दुष्परिणाम प्रत्येकाला नक्कीच जाणवतील, काही जणांनी याचे चटके भोगलेही असतील, सहनही केले असतील.

– – सांगण्याचा मुद्दा असा आहे की जो मनुष्य शांतचित्ताने, पूर्ण एकाग्र होऊन श्रवण करतो, *त्याच्या मनाचा तळ आणि मनाच्या तळाशी असलेला मळ दोन्हीही अगदी स्वच्छ होऊन जाते*. उत्तम श्रोता असलेला मनुष्य कोणताही विषय सहज समजून घेऊ शकतो आणि त्यामुळे त्याची लौकिक आणि पारलौकिक जीवनात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. नज्याला साधक व्हायचे आहे, त्याने आधी ऐकायला शिकावे. काय ऐकायचे? कसे ऐकायचे? कोणाचं ऐकायचे याचा विचार आपण पुढील लेखांत करू. जाता जाता एक वाक्यावर आपण चिंतन करू. *’समोरचा मनुष्य जे बोलतो ते ऐकायलाच हवे परंतु तो जे बोलू शकत नाही ते सुद्धा ऐकता यायला हवे. ‘*

– – मनुष्याला भगवंताने दोन कान आणि एक तोंड दिले आहे. कान ऐकण्याचे एकच काम करते, परंतु एकमेव असलेले तोंड बोलणे आणि खाणे अशी दोन कामे करीत असते. मनुष्याने दोन्ही कानांनी नीट लक्षपूर्वक ऐकावे आणि त्यानुरूप उत्तम अशी कृती केली जावी अशी भगवंतांची ईच्छा असावी. परंतु, सामान्यपणे मनुष्य बरेचवेळा नीट ऐकत नाही आणि जिथे त्याचा स्वार्थ साधला जाईल, तीच कृती करतो. यामुळे जरी तत्काळ फायदा होत असला तरी मनुष्याच्या पूर्ण आयुष्याचा विचार केला तर ते घातक ठरण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मनुष्याने ‘अवधान’ देऊन ऐकावे आणि आपल्या सद्गुरूंना भूषण वाटेल अशी कृती करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी ‘विवेका’ची कास धरावी. जो मनुष्य प्रत्येक गोष्ट विवेकाने करतो, तो मनुष्य यशस्वी होतो असे सर्व संत सांगतात.

*”ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधून घ्यावें ।*

*असार तें जाणोनि त्यागावें । या नांव श्रवणभक्ति।।”*

(दा. 4. 1. 29)

भगवदगुण श्रवण हे अनेक अंगाने होत असते. कीर्तीश्रवण, चरित्रश्रवण, लीलाश्रवण, अवतारकथाश्रवण, भजनश्रवण, इ. नवविधा भक्तीमध्ये श्रवणभक्ती ही प्रथम सांगितली आहे. संसारातही एखाद्या वस्तूचे नाम व त्या वस्तूचे विशेष गुण याचे ज्ञान त्या त्या वस्तूचा वाचक जो शब्द त्याच्या श्रवणानेच होते. त्या वस्तूच्या ठिकाणी अनुकूल बुद्धी असली म्हणजे त्या वस्तूचे प्रेम निर्माण होते, म्हणून कथाश्रवणानेच भगवदभक्ती निर्माण होत असते.

*”तरी अवधान एकले दीजें । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।।*

(ज्ञा. 9. 1)

श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात, *’अहो श्रोते हो, तुम्ही एकवेळ श्रवणाकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका. *

“ज्ञाना’ची ईश्वर असलेली आपली ज्ञानेश्वरमाऊली आपल्याला कळकळीने सांगत आहेत की श्रोते जनहो अवधान देऊन ऐका. अवधान म्हणजे कोणतेही कार्य करण्यासाठी प्राण्याने केलेली देह-मनाची सिद्धता होय. अवधानात जाणिवेचे केंद्रीकरण असते आणि इष्ट विषय जाणिवेच्या केंद्रस्थानी आणला जातो. थोडक्यात, अवधान देणे म्हणजे नीट लक्ष देऊन ऐकणे.

– – *मनुष्य अवधान देऊन ऐकायला शिकला तर त्याच्या जीवनातील ५०% समस्या कमी होतील असे वाटते. आपण ‘अवधानी’ होण्याचा प्रयत्न करू. *

जय जय रघुवीर समर्थ।

भक्तिसूत्र ३८ – – 

मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत्कृपालेशाद्वा ॥ ३८ ॥

अर्थ : प्रामुख्याने पराभक्ती ही केवळ सत्पुरुषांच्या कृपेमुळेच किंवा भगवंताच्या अल्पशा, अंशात्मक कृपेमुळेच प्राप्त होत असते.

विवेचन :

मागील चौतिसाव्या सूत्रात त्या भक्तिप्राप्तीची साधने आचार्यगुण सांगतात असे सांगून पुढील सूत्रातून विषयत्याग, संगत्याग, अव्यावृत भजन, भगवद्‌गुण-श्रवण, कीर्तनादि साधनांचा अनुवाद केला आहे. जेव्हा अनेक साधने सांगितली जातात तेव्हा त्यांत गौणमुख्यभाव निर्माण होतो, मग या साधनांत श्रेष्ठ व मुख्य कोण, असा संशय आला असता या अडतिसाव्या सूत्रात त्याचे उत्तर देतात. ही मागील साधनेही तत्त्वतः अमुख्यच आहेत. मुख्य साधन महात्मे जे संत त्यांची कृपा अथवा भगवतकृपेचा अंश का होईना पण तो प्राप्त होणे हे आहे. जे जे भक्तिमान पुरुष म्हणविले गेले ते महात्म्यांच्या कृपेने किंवा भगवत्कृपेनेच प्रेमभक्तीचे अधिकारी बनले. इतर सर्व साधनांना फलद्रूप होण्याकरितादेखील महात्म्यांची कृपा लागते.

शेतकऱ्याने धान्य पिकविणे आणि साधकाने भगवंत प्राप्तीसाठी साधना करणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत असे मला वाटत नाही. दोन्ही ठिकाणी फळ अपेक्षित आहे. जो हाडाचा शेतकरी आहे, तो अन्य फुटकळ गोष्टीत वेळ न घालवता, आपल्या जमिनीची पुरेशी मशागत करतो. पावसाचा अंदाज घेऊन उत्तम अशा बियाण्याची पेरणी करतो. आवश्यक ती खते पुरवितो, शेतात मध्येच उगवणारे तण काढतो. बांधबंदिस्ती करतो. पाखरांपासून शेताची राखण करतो. पीक चांगले येईल या एका आशेने देवावर विश्वास ठेवून तो हे सर्व काही करीत असतो. जमिनीत पेरलेले बियाणे नक्की रुजेल असा त्याचा विश्वास असतो. यातील एक पाऊस सोडला तर बाकीच्या गोष्टी सर्वसाधारणपणे त्याच्या हातात असतात. भगवंत योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाऊस पाडतो, तेव्हा शेतकऱ्याला मुबलक आणि उत्तम प्रतीचे धान्य मिळते असे म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. परमार्थ साधनेत सुद्धा हेच सूत्र उपयोगी पडते. साधक साधना नेटाने करू शकतो, पण त्यावर पाऊस रुपी कृपेचा वर्षाव करणे हे निव्वळ त्याच्या कृपेमुळेच शक्य आहे. अनेक साधकांचे चरित्र अभ्यासले तर आपल्याला सहज लक्षात येईल.

सर्वश्रेष्ठ भक्त प्रल्हादाचे चरित्र आपण पाहू. बाळ प्रल्हाद नारायण नारायण असा जप करीत असे. त्याच्या पित्याने त्याला अनेक वेळा, अनेक प्रकारे छळले. त्याने ते सर्व छळ अत्यंत शांत राहून सोसले. मग भगवंताला दया आली आणि मग तो स्तंभातून प्रगट झाला. अमुक एक गोष्ट केली की भगवंत प्रगट होतो, दर्शन देतो असे सांगता येणार नाही.

माता शबरी भगवंत येणार म्हणून आपली कुटी सजवत होती, आपल्या घरासमोरील पायवाट झाडून ठेवत होती. असे करता करता ती वृद्ध झाली, मग एक दिवस प्रभू श्रीराम तिच्या कुटीत आले. तिच्या हातची उष्टी बोरे खाल्ली.

महर्षी नारद एक गोष्ट इथे अधोरेखित करतात, ती म्हणजे सत्संगती. काहीही झाले तरी साधकाने सत्संगती सोडू नये. आणि आजच्या भीषण कलियुगात नामासारखी शुद्ध संगत असूच शकत नाही असे सर्व संत सांगतात.

संत तुकाराम महाराज म्हणतात,– –

“नाम घेता वांयां गेंला । ऐसा कोणे आईकिला ॥१॥ 

सांगा विनवितो तुम्हांसी । संत महंत सिद्ध ॠषी ॥२॥ 

नामे तरला नाही कोण । ऐसा द्यावा निवडून ॥३॥ 

सलगींच्या उत्तरा । तुका म्हणे क्षमा करा ॥४॥”

(संदर्भ~ अभंग क्रमांक २२७३. सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था.) 

जय जय रघुवीर समर्थ!

– – नारद भक्तीसूत्र ३७ आणि ३८..

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कालिया-मर्दनासाठी मृत्यूच्या डोहात उडी घेणारा वीर!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “कालिया-मर्दनासाठी मृत्यूच्या डोहात उडी घेणारा वीर!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

पासष्ट वर्षांच्या आजी श्रीमती रत्ना राय यांना त्यांचा नातू सुट्टीवर घरी येणार आहे, असं वाटतं आहे. घरची कर्ती माणसं त्याला विमानतळावर घ्यायला गेलीत… असं तिला सांगण्यात आलंय. एप्रिल, २००३. याच महिन्याच्या तिस-या आठवड्यात येतो म्हणून त्यानं कळवलं होतं… पण एक तातडीची मोहीम पूर्ण करायचा आदेश आल्याने आता शेवटच्या आठवड्यात ‘येईन’ असं कळवलं आहे. संजोग त्याचं नाव. सिक्कीम राज्यातल्या नामची जिल्ह्यातल्या बूमतार गावात ही राय मंडळी राहतात. रत्ना राय यांची कन्या भारती त्यांच्या धाकट्या सूनबाई. परंतू त्यांच्या धाकट्याचं अकाली निधन झालं होतं. त्यानंतर भारती यांनी नेपाळी वंशाच्या कमल छेत्री यांच्याशी पुनर्विवाह केला. हा आंतरराज्य विवाह म्हणता येईल असा विवाह. रेल्वे कर्मचारी असलेले कमल संजोग आणि मुलगी संजीता यांना भारती यांच्या पदरात टाकून देवाघरी निघून गेले. त्यावेळी संजोग केवळ दोन वर्षांचे होते. संजोग आणि संजीता यांचा सांभाळ सरकारी वकील असलेल्या मोठ्या काकांनी, जे. बी. राय यांनी केला.

संजोग धाडसी खेळांत वाकबगार होते. नामची येथील सरकारी महाविद्यालयात बी. ए. च्या दुस-या वर्षात असतानाच ते काकांच्या विरोधाला न जुमानता वर्ष २००१ मध्ये ११, गोरखा रेजिमेंटमध्ये जवान म्हणून त्यांच्या वयाच्या अठरा-साडे अठराव्या वर्षी भरती झाले… अंगभूत शौर्य, धाडस, साहस या गुणांना लष्करातच वाव मिळेल, असे संजोग यांचे पक्के मत होते… आणि भविष्यात ते खरे ठरले! दोन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर रेजिमेंटमध्ये स्थिरावत असताना त्यांना आणखी काही विशेष करून दाखवण्याची प्रबळ इच्छा झाली. मनात शौर्याचे धगधगते अग्निकुंड पेटते असणा-या आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या अतिशय बलवान असलेल्या सैनिकांचे एक स्वप्न असते… स्पेशल फोर्सेस मध्ये कमांडो बनणे. यासाठी अतिशय म्हणजे अक्षरश: अतिशय खडतर परीक्षा, प्रशिक्षण पार करावे लागते… आणि ‘बलिदान’ बॅज ‘कमवावा’ लागतो. संजोग छेत्री यांनी ही कमाई केली! एकतीस मार्च २००१ रोजी संजोग छेत्री ९, पॅराशूट रेजिमेंट, स्पेशल फोर्सेस मध्ये कमांडो म्हणून मोठ्या अभिमानाने रुजू झाले.

 स्पेशल फोर्सेस जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेक्यांविरोधात सातत्याने मोहिमेवर असते. बावीस एप्रिल, २००३चा दिवस होता. काश्मिरात बर्फवृष्टी होऊन गेलेली होती. टेहळणी करणा-या हेलिकॉप्टरला काश्मिरातील, पीर पंजाल पर्वतराजीनजीकच्या पूंछ भागातल्या सुरनकोट येथील एका जंगलातल्या उंच टेकडीवरील एके ठिकाणी एका गुहेपर्यंत उमटलेली असंख्य पावलं नजरेस पडली. काळजीपूर्वक योजना आखली गेली. वीस कमांडोज या SAD (Search & Destroy) मोहिमेसाठी निवडण्यात आले… पॅराट्रूपर संजोग छेत्री या तुकडीत होतेच. काका टॉप नावाच्या जिथून भारतीय सैनिकांच्या हालचाली दिसू शकतील अशा एका गुहेत सुमारे तेरा-चौदा अतिरेकी लपून बसल्याची खबर होती. जणू विषारी सर्पच. यांना शोधून ठेचून काढायला हवेच… मोहिमेचे नाव ठरले… ऑपरेशन सर्पविनाश!

पण या कालिया-मर्दनासाठी सैनिकांना अदृश्य अशा डोहात उडी घ्यावी लागते. अतिरेकी लपले आहेत, अशा ठिकाणापासून खूप अलीकडे वाहने थांबवून पायी त्या जागेकडे निघावे लागते. मोहीम गुप्त ठेवावी लागते. वाटेत लागणारी गावे, त्यांतील अतिरेक्यांचे प्रशंसक, साहाय्यकर्ते यांना गाफील ठेवत मोहीम राबवावी लागते. यात कित्येक किलोमीटर्स बर्फात, अंधारात, डोंगर-दरीतून, घनदाट झाडीतून चालत जावे लागते… सोबत शस्त्रांचे ओझे असतेच! शत्रूच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणाला सा-या बाजूंनी वेढा घालावा लागतो…

 संजोग छेत्री त्या गुहेच्या दिशेने आपल्या इतर साथीदारांसह सावध पावले टाकीत निघाले. गुहेच्या पुढे बरीच मोकळी जागा होती.. या जागेत दगडधोंडे, गवत होतेच. कमांडोज गुहेपासून शंभरेक यार्ड्स वर पोहोचलेले असतानाच गुहेत लपलेल्या सर्पांना गरुडांचा सुगावा लागला! पाकिस्तानातून प्रचंड शस्त्रसाठा घेऊन आलेले अतिरेकी… त्यांनी तुफान गोळीबार आरंभला… अंदाधुंद. वेढ्यात असलेल्या अन्य कमांडोजच्या जीवाला धोका उत्पन्न झाला… संजोग यांनी स्वत: निर्णय घेतला… थेट भेट गनिमांना! ते कोपर-गुडघ्यांवर रांगत-रांगत ते शंभर यार्ड अंतर गुहेच्या अगदी तोंडाशी पोहोचले… गुहेत बसून आरामात गोळीबार करणा-या अतिरेक्यांच्या समोर संजोग यमराज बनून उभे ठाकले… गुहेतून एक अतिरेकी गोळीबार करीतच बाहेर पडला… बिळातून पहिला सर्प जणू! कमांडो संजोग यांचा नेम चुकणार नव्हताच. त्याच्या पाठोपाठ दुसरा बाहेर निघाला… त्याचीही तीच गत झाली! पण गुहेच्या आतून अकरा रायफली धडाडत होत्या… शेकडो गोळ्या! त्यांतील अनेक गोळ्यांनी संजोग यांच्या देहाचा वेध घेतला… कालिया मर्दनासाठी आलेला बालकृष्ण कोसळला! अतिरेक्यांनी तरीही त्यांच्यावर काही फैरी झाडल्या… निश्चितीसाठी! आतला एक जण आता बाहेर पडला… निपचित पडलेल्या या देहाचा हात हलला… कमरेला लावलेला सुरा (आर्मी नाईफ/खुखरी) उपसला गेला… देह उभा ठाकला… तिस-या अतिरेक्याचा मृत्यूदूत! रक्तबंबाळ झालेल्या या देहानं त्या अतिरेक्यावर मरणाची झडप घातली… त्याच्या नरडीचा घोट घेतला आणि मगच पुन्हा धरणीमातेच्या मांडीवर मस्तक ठेवलं… (२६ जून, १९८२ ते २२ एप्रिल, २००३) आणि त्या केवळ वीस वर्षे, नऊ महिने आणि सत्तावीस दिवसांचे आयुष्य जगलेल्या देहातील आत्म्याने परलोकीची वाट धरली!

 उरलेले अकरा अतिरेकी बाहेर पडून पांगले… संजोग छेत्री यांच्या बलिदानाने पेटून उठलेले कमांडोज आता त्यांना काहीही झाले तरी जिवंत ठेवणार नव्हतेच. त्यांनी त्यांपैकी दहा सर्पांचा विनाश केला… अकरावा पाकिस्तान-प्रशिक्षित सर्प जिवंत धरला! एकूण तेरा अतिरेकी त्यांच्या ‘आखरी अंजाम’ पर्यंत पोहोचवले गेले! हे साप देशाच्या आतल्या भागांत शिरले असते तर?

 सर्पविनाश मोहिमेत २००३ मध्ये सुमारे १०० अतिरेक्यांचा विनाश करण्यात आपल्या सैनिकांना यश लाभले. पण यांत अनेक सैनिक आणि नागरीकांना आपले प्राण द्यावे लागले. या सर्वांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी एप्रिल महिन्यात या भागात ‘हिल काका स्मृती दिन’ पाळण्यात येतो.

 ‘अशोक चक्र’… शांतता काळात सैनिक, नागरिक यांना दिला जाऊ शकणारा, परमवीर चक्राच्या दर्जाचा, सर्वोच्च पुरस्कार पॅराट्रूपर संजोग छेत्री यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला तो दिवस होता १५ ऑगस्ट, २००३! संजोग छेत्री यांच्या भगिनी संजीता यांनी भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचे सुप्रीम कमांडर, तत्कालीन राष्ट्रपती महोदय डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेब यांच्या हस्ते आपल्या शूर भावाच्या वतीने ‘अशोक चक्र’ पदक स्वीकारले!

 सैनिकांची दुनियाच न्यारी! इथे जखमा अभिमानाने मिरवल्या जातात! किती शौर्य पदके, पुरस्कार मिळवले यांच्या आकडेवारीचा अभिमानाने उल्लेख केला जातो, हौतात्म्य पत्करलेल्या बहाद्दर सैनिकांच्या स्मृती जतन करून ठेवल्या जातात. ९, पॅराशूट रेजिमेंट (स्पेशल फोर्सेस) ने इतर अनेक सन्मान प्राप्त केलेले आहेतच… पण तब्बल चार ‘अशोक चक्र’ पुरस्कार त्यांनी पटकावलेले आहेत! संजोग छेत्री, मेजर सुधीर वालिया साहेब, कॅप्टन अरुण सिंग जसरोटीया साहेब आणि लान्स नाईक मोहन गोस्वामी साहेब यांना मरणोत्तर हा सन्मान प्राप्त झाला आहे. संजोग छेत्री यांचा आदर्श समोर ठेवून सिक्कीमचा एच. शेर्पा नावाचा तरुण २०२४ मध्ये एन. डी. ए. मध्ये निवडला गेला… त्याने संजोग छेत्री यांच्या बलिदानातून प्रेरणा घेतली! ‘अशोक चक्र’ प्राप्त करणारे सर्वांत कमी वयाचे सैनिक म्हणून संजीव छेत्री यांची आजवरच्या इतिहासात नोंद आहे! आपले हे कोवळे तारुण्य भारतमातेच्या चरणी अपर्ण करणा-या संजोग छेत्री यांना प्रणाम.

हा लेख तरुणांना वाचायला मिळेल, असा प्रयत्न केला गेला तर बरे! जय हिंद.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भविष्याने शिकलेला सर्वात मोठा धडा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “एकदा वाचून पहाच!!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

एकदा वाचून पहाच!!

 

जपानमध्ये वर्षभरापेक्षा जास्त काळ राहणाऱ्या एका भारतीयाने एक गोष्ट पाहिली..

त्याचे जपानी मित्र अतिशय नम्र, सभ्य आणि मदत करणारे होते,

पण त्यातील एकानेही त्याला कधी घरी बोलावले नाही…

ना चहासाठी, ना साध्याभेटीसाठी.

 

तो भारतीय थोडा आश्चर्यचकित झाला आणि दुखावला गेला.

एके दिवशी त्याने आपल्या एका जपानी मित्राला विचारले,

“तुम्ही इतके चांगले, प्रेमळ आहात… तरीही मला का कधीच घरी बोलावत नाही? ”

 

त्या जपानी मित्राने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं –

“आम्हाला भारतीय इतिहास शिकवला जातो… पण प्रेरणा म्हणून नाही, 

तर सजगता म्हणून. ”

 

तो भारतीय थक्क झाला..

“सजगता? भारतीय इतिहास सावधानतेसाठी शिकवला जातो? का?”

 

जपानी मित्र म्हणाला,

“सांग बरं, इंग्रज जेव्हा भारतात राज्य करत होते, तेव्हा किती इंग्रज असतील?”

भारतीय म्हणाला, “कदाचित… दहा हजार?”

 

जपानीने गंभीर चेहऱ्याने मान हलवली, आणि विचारलं — “आणि त्या वेळी भारतात किती भारतीय होते? ”

“सुमारे ३० कोटी, ” भारतीय म्हणाला.

 

जपानी शांतपणे म्हणाला —

“मग सांगा, अत्याचार कोणी केला? भारतीयांवर चाबकाचे फटके कोणी मारले? गोळ्या कोणी झाडल्या? ”

 

तो पुढे म्हणाला —

“जेव्हा जनरल डायरने जालियनवाला बागेत गोळीबाराचा आदेश दिला, ट्रिगर कोणी दाबला? इंग्रज सैनिकांनी? —

— नाही… ते भारतीय सैनिकच होते. ”

 

“कोणत्याही भारतीयाने जनरल डायरकडे बंदूक का उगारली नाही? एकाने पण का नाही? ”

— — “तुम्ही ज्याला गुलामी म्हणता, ती शरीराची नव्हती… ती आत्म्याची होती. ”

 

भारतीय गप्प उभा राहिला, डोळ्यात पाणी.

 

जपानी मित्र पुढे म्हणाला —

“मध्य आशियातून आलेले मुगल किती होते? काही हजार? आणि तरी त्यांनी शतकानुशतके राज्य केलं…

.. ते बलाच्या जोरावर नव्हे, तर तुमच्याच लोकांच्या नम्रतेवर, त्यांच्या विश्वासघातावर. ”

— — “तुमच्याच लोकांनी धर्म बदलला, तुमच्याच लोकांनी आपल्या बहिणींचं, मुलींचं त्यांच्याशी लग्न लावून दिलं.

— — तुमच्याच लोकांनी तुमचे नायक इंग्रजांच्या हाती दिले.

— — चंद्रशेखर आझाद कुठे लपले आहेत हे इंग्रजांना कोणी सांगितलं?

— — भगतसिंहांना फाशी देणं इतकं सोपं होते का? पण तुमच्याच लोकांनी पाठ फिरवली”

 

… “तुम्हाला बाहेरून शत्रूंची गरजच नाही. तुमचे स्वतःचे लोकच सत्तेसाठी, पदासाठी, थोड्याशा फायद्यासाठी तुम्हाला वारंवार धोका देतात.

म्हणूनच आम्ही भारतीयांपासून थोडं अंतर ठेवतो. ”

 

… “जेव्हा इंग्रज हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये आले, तेव्हा एकाही स्थानिकाने त्यांच्या सैन्यात प्रवेश केला नाही.

पण भारतात? — तुम्ही त्यांच्या सैन्यात भरती झालात, त्यांची सेवा केली, त्यांना खुश करण्यासाठी स्वतःच्याच लोकांना मारलं. ”

 

… “आणि आजही तुम्ही बदलले नाही…

थोडीशी मोफत वीज,

एक बाटली दारू,

एक चादर दिली की

तुमचा मत, तुमचा आत्मा,

सगळं विकत घेता येतं. ”

 

… “तुमची निष्ठा देशाशी नाही, तर तुमच्या पोटाशी आहे. ”

… “तुम्ही घोषणा देता, आंदोलन करता, पण जेव्हा देशाला तुमच्या त्यागाची गरज असते, तेव्हा तुम्ही कुठे असता?

तुमची पहिली निष्ठा अजूनही तुमचे घर, कुटुंब आणि पैशाशी आहे — देश आणि धर्म नंतर. ”

 

इतकं बोलून तो जपानी शांतपणे निघून गेला,

आणि तो भारतीय तिथेच उभा राहिला —

डोळ्यांत लाज, मनात वेदना ठेऊन…

 

– – – _पुढच्या भारतीयाला पाठवा… कदाचित बदल घडेल

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- हाकेच्या अंतरावर आलेल्या प्रकाशन समारंभाचा आनंद हिरावून घेणारी ही परिस्थिती निर्माण व्हायला निमित्त ठरलेली आमच्या जी. एम्. मॅडमची व्हिजीट मला त्या अस्वस्थतेत एखाद्या भयंकर संकटासारखीच वाटत राहिली! .. पण प्रत्यक्षात मात्र ती माझ्यासाठी ‘त्या’नेच घडवून आणलेली इष्टापत्तीच ठरणार होती हे मला कुठे माहित होतं? )

याच आमच्या जी. एम्. मॅडम या आधी कांही वर्षांपूर्वी इथे या झोनल ऑफिसलाच डी. जी. एम्. म्हणून कार्यरत होत्या आणि इथूनच जी. एम्. म्हणून प्रमोट झाल्यावर त्यांचं पोस्टींग ‌सेंट्रल ऑफिसला झालेलं होतं. अर्थात या गोष्टीला चारएक वर्षं उलटून गेलेली असली तरी मी तेव्हा कोल्हापूर रिजनमधे असल्याने अनेकदा त्यांची रिजनल ऑफिसला व्हिजीट व्हायची. तेव्हा होणाऱ्या ब्रॅंच मॅनेजर्स मिटिंग्जमुळे आणि एरवीही ब्रॅचेस् मधील महत्त्वपूर्ण मॅटर्ससंबंधात ब्रॅंचमॅनेजर्सशी त्यांचा अधूनमधून थेट संपर्कही असल्याने आमच्यापैकी अनेकांना त्या व्यक्तिगत पातळीवर ओळखायच्याही. त्यामुळेच त्यांचा अॅप्रोच, स्वभाव आणि त्यांची कामाची पध्दत आम्हाला नवीन नव्हती. त्या एवढ्या स्ट्रीक्ट होत्या की आमच्या ब्रँच व्हिजीटला त्या येणार असतील तेव्हा तर त्या येणार या कल्पनेचंच प्रचंड दडपण यायचं. पारशी माणसांचं वरवर फटकळ वाटणारं थेट बोलणं तरीही मनातल्या एका कोपऱ्यात ते जपत असलेलं मेणाचं मऊपण सुरुवातीची कांही वर्षे मी मुंबईत काम केल्याने जवळून अनुभवलेलं होतं. मॅडमसुध्दा छोट्या छोट्या कारणानेही खूप चिडायच्या, संतापाच्या भरात कांहीही बोलायच्या, त्यांचं तरबत्तर होत केलेलं फायरींग ऐकणाऱ्यासाठी चाबकाच्या फटक्यासारखंच असायचं. तरी त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो आणि राग उतरला कीं त्या लगेचच शांतही होतात हेही मला अनुभवाने माहित झालेलं होतं! त्यामुळे आणि यावेळी आमच्यामधे वखरेसाहेबांसारखा शाॅक अॅब्साॅर्बर असल्यानेही त्यांच्या यावेळच्या या आकस्मिक व्हिजीटचं मला फारसं दडपण वाटत नव्हतं. तरीही सगळं सुरळीत पार पडावं यासाठी मी प्रयत्नशील होतोच.

त्या आल्या आणि पाचेक मिनिटातच येथील आमच्यासारख्या फर्स्ट लाईन विभागप्रमुखांना वखरे साहेबांनी इंटरकॉम करून केबिनमधे बोलावून घेतलं. आम्ही सर्वजण आत पोचेपर्यंत आमचे डी. जी. एम्. श्री. वखरेसाहेब यांच्याबरोबर मॅडमची प्राथमिक चर्चा सुरूही झालेली होती. मॅडमनी आमच्याकडे ओझरता कटाक्ष टाकून आम्हाला बसायची खूण केली. पाठोपाठ सर्वांसाठी चहाही आला. चर्चेला अर्धविराम देत चहा घेता घेता त्यांनी आम्हा सर्वांची औपचारिक चौकशी करून आम्हाला निरोप दिला आणि मग त्यांच्या मीटिंगचं असणारं थोडंफार दडपडही त्याच क्षणी विरून गेलं. पण आम्ही सर्वजण केबिनचं दार ढकलून बाहेर पडणार एवढ्यांत त्यांच्या नेहमीच्या परिचित अशा दरडावणीच्या स्वरांत त्यांनी आम्हाला थांबायला सांगितलं आणि हाताने आत यायची खूण केली. केबिनमधलं तोवर नाॅर्मल वाटणारं वातावरण अचानक बदललं. वखरेसाहेब कांहीसे गंभीर होत काय झालं असावं याचा अंदाज घेत मॅडमकडे पहात राहिले.

” मैं सिटी और कॅंप ब्रॅंचको व्हिजीट करने जा रही हूॅं| थोडी देरमे वापस आऊंगी| तब बाद मे एकेक को देख लू़ंगी|.. ” काय होतंय आम्हाला समजेचना. कसं रिअॅक्ट व्हावं, काय बोलावं ते न समजून आम्ही एकमेकांकडे पहात राहिलो. आणि दुसऱ्याच क्षणी.. “तब तक एंजाॅय करोs.. ” म्हणत गंमत केल्यासारखं स्वत:वरच खूष होत त्या खळखळून हसत राहिल्या. आणि एकदम तो स्वीच आॅफ करून.. “देखो… मैं क्या कह रही थी.. ” म्हणत त्यांनी आपला मोर्चा वखरेसाहेबांकडे वळवला. आम्ही वळून जायला लागलो तेव्हा अतिशय सौम्य शब्दांत “बाद मे इन सबको दोपहरकी मिटिंग के बारेमे बता देना.. ” म्हणाल्या.

ते ऐकलं आणि त्या दुपारच्या मीटिंगचं दडपण सोबत घेऊनच आम्ही बाहेर पडलो. आपापल्या केबिनमधे आलो. मॅडमचा हा समोरच्याला कसलाच अंदाज बांधता न येणारा स्वभाव माझ्या परिचयाचा असला तरी मलाही थोडं दडपण जाणवू लागलं होतं ते कसलाच अजेंडा समोर नसताना मीटिंगमधे अचानक काय विचारलं जाईल याचंच. तेवढ्यांत इंटरकॉमची रिंग वाजली. फोनवर टेलिफोन ऑपरेटर बोलत होती.

” तुम्हा सर्वांसाठी साहेबांचा निरोप आहे. ते मॅडम बरोबर ब्रॅंच व्हिजिटसाठी बाहेर पडलेयत. तासाभरात दोघे परत येतील. त्यानंतर लगेचच सर्व डिपार्टमेंटल हेडस् सोबत मॅडमची लंच मीटिंग होईल आणि त्यांच्या टूर प्रोग्रॅम प्रमाणे त्या कोल्हापूर व्हिजीटसाठी निघतील. “

निरोप स्पष्ट होता. पण हातात मिटिंगची पूर्वतयारी करण्याइतका वेळही नव्हता. मीटिंगमधे जे प्रश्न विचारले जातील त्यांना स्वत:च्या अक्कलहुशारीने जमतील तेवढी समाधानकारक उत्तरं देत वेळ मारून न्यायची आणि त्या बोलतील ते ऐकून घ्यायची तयारी ठेवायची एवढंच माझ्या हातात होतं. तरीही क्षणाचाही वेळ न दवडता माझ्या डिपार्टमेंट संदर्भातल्या सर्व अद्ययावत माहितीच्या नोंदी मी भराभर आवश्यक त्या फाईल्स मागवून घेत माझ्या डायरीत नोंद करून घेतल्या आणि ‘आलिया भोगासी.. ‘ सादर व्हायला तयार झालो. तेवढ्यात घाईघाईने आलेला शिपाई माझ्या केबिनचं दार ढकलून आत येत वखरे साहेबांचा निरोप सांगून गडबडीने निघून गेला.

मॅडम आणि वखरेसाहेब ‘ब्रॅंच व्हिजीट’ आवरून परतीच्या वाटेवर होते आणि आम्हा सर्वांना दहा मिनिटांनी खाली पोर्चमधे येऊन थांबायचा तो निरोप होता! तिथून आम्हाला रिसिव्ह करून त्या दोघांच्या कार्समधूनच ते आम्हाला जवळच्याच हाॅटेलवर लंच मिटिंगसाठी घेऊन जाणार होते.

एखाद्या झंझावातासारख्या भिरभिरत राहिलेल्या या सगळ्या सकाळपासूनच्या घटनाक्रमात दोन दिवसांच्या हाकेच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या माझ्या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचं व्यवधान मीच त्याला दूर ढकलून दिलेलं असावं तसं मनाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात गुपचूप पडून राहिलेलं होतं..!

आम्ही सर्वजण ब्रिफकेस हातात घेऊन ठरल्याप्रमाणे पोर्चमधे येऊन उभे राहिलो. त्यानंतर पाचच मिनिटांत दोन्ही कार्स झोकदार वळण घेत आमच्याजवळ येऊन अलगद थांबल्या आणि आम्हाला आत घेऊन दुसऱ्याच क्षणी रस्त्यावरच्या गर्दीत मार्गस्थही झाल्या!

माझ्या हाकेची वाट पहात सकाळपासून मनात एका कोपऱ्यात निपचित पडून राहिलेलं प्रकाशन समारंभाचं ते व्यवधान मॅडमच्या यापूर्वी आमच्या कधीच अनुभवास न आलेल्या छान, आनंदी मूडमधल्या गप्पा सुरू होताच निर्माण झालेल्या निश्चिंतपणाच्या स्पर्शाने जाग आल्यासारखं उभारून वर आलं. मी क्षणभर विचलीत झालो खरा पण तरीही त्याला अलगद दूर करत मी स्वत:ला सावरलं.

ती लंच मिटींग अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सुरू झाली. मॅडमचा इतका आनंदी, प्रसन्न आणि मिष्किल मूड मी प्रथमच अनुभवत होतो. कसले प्रश्न नाहीत, उपदेशाचे डोस नाहीत, आरडाओरडा नाही, दमदाटी नाही… कामं, पेंडिंग मॅटर्स, टारगेटस् कश्शाकश्शाचे पुसटसेही उल्लेख नाहीत. मॅडमचं हे रूप मला अनोळखीच होतं. आजवरच्या मी अॅटेंड केलेल्या यापूर्वीच्या त्यांच्या असंख्य मिटींग्जमधला मॅडमचा थयथयाट आठवून तर या समोरच्या मॅडम म्हणजे त्यांचं मायावी रूपच असावं असंच वाटू लागलं. पण ते तसं नव्हतं. त्या त्याच होत्या! आज त्या प्रसन्नचित्त होत्या आणि कांहीशा हळव्याही झाल्या होत्या! त्याला कारणही तसंच होतं! त्या आता लवकरच दुसऱ्या एका राष्ट्रीयकृत बॅंकेच्या एम्. डी. पदाचा कार्यभार स्वीकारणार होत्या! हे सांगताना त्यांचा वरवर दिसणारा कडक आणि संतापीपणाचा मुखवटा आज त्यांच्याही नकळत गळून पडला होता! अर्थातच त्यामुळे त्या अतिशय मनापासून अगदी मोकळेपणाने बोलत होत्या!

बोलण्याच्या ओघात बॅंकिंग इंडस्ट्रीत येऊ घातलेल्या, संबंधित सर्वांवरच दूरगामी परिणाम करायला निमित्त ठरू शकणाऱ्या, आणि आमच्यासारख्या प्रत्येक स्टाफचं आयुष्य सावरू किंवा विस्कळीतही करू शकणाऱ्या अनपेक्षित अशा प्रचंड वादळाचं सूतोवाचही त्यांनी केलं आणि आम्ही सर्वजण सावध झालो!

मी त्यांचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत असताना त्यातलं गांभीर्य आणि त्याचं महत्त्व मला लगेच जाणवलं नव्हतं हे खरं पण हळूहळू माझ्या मनातल्या नकळत सुरू झालेल्या विचारचक्राला वेग द्यायला तेच निमित्त ठरणार होतं आणि लगेचच माझ्या उर्वरीत आयुष्यालाही एका अनोख्या वळणावर आणून उभं करणार होतं! !

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी दिनदर्शिका – My Calendar…” भाग – १ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “माझी दिनदर्शिका – My Calendar…” भाग – १ ☆ श्री सुधीर करंदीकर

मित्रमैत्रिणी, नातेवाईक, सहकारी, आणि काही खास खास जणांकडून आलेल्या नव वर्षाच्या शुभेच्छांमुळे सगळ्यांचेच हे चालू झालेले नवे वर्ष छानच सुरु झालेले असणार. नवीन वर्ष सुरु झालं, कि, सगळ्यांच्याच घरामधल्या एक – दोन भिंतींची, “आता जुने कॅलेंडर काढा आणि नवीन येऊ द्या” अशी कुणकुण सुरु होते. कालनिर्णय सारखी कॅलेंडर बाजारात विकत मिळतात, त्यांना खूप मागणी असते. यामध्ये मराठी महिन्यांची पण संपूर्ण माहिती असते, त्यामुळे आपले सणवार, तिथी वगैरे बघता येते. बहुतेक बँकांची आणि काही कंपन्यांची पण छान छान कॅलेंडर असतात आणि त्यापैकी पण काहींमध्ये आपले सगळे सणवार दिलेले असतात. नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर साधारण पहिल्या १० – १५ दिवसांमधे सगळ्यांच्या घरात जुनी कॅलेंडर जाऊन नवीन आलेली असतात. कॅलेंडरची ऍलर्जी असणारी पण काही घरे असतात. काही घरांमध्ये नवीन कॅलेंडर लावण्याचा उत्साह खूप असतो, पण ३ – ४ महिने उलटले, कि कॅलेंडर कुठला महिना दाखवत आहे, आणि कुठला महिना चालू आहे, यांचा काही ताळमेळ नसतो. हा लेख वाचल्यानंतर सगळेच कॅलेंडरच्या बाबतीत सतर्क होतील, हे मात्र नक्की.

कॅलेंडरचं चालू महिन्याचं पान समोर आलं, कि, या महिन्यात एकादशी कधी आहे? चतुर्थी कधी आहे? असे उपास करण्याचे दिवस समजतात. गणपती कधी आहेत / नवरात्री कधी आहेत / दिवाळी – दसरा, असे सगळे मोठे सण समजतात. चालू महिन्यात बँक हॉलिडेज कधी आहेत / सुट्या कधी आहेत / शनिवार – रविवार ला जोडून सुटी आहे का? अशा सगळ्या गोष्टी डोळ्यासमोरून घालता येतात आणि काही छोटे – मोठे प्लॅनिंग करता येते, आणि ते वेळेवर पूर्ण पण करता येते.

यांच्याशिवाय वर्षभरात अशी पण बरीचशी कामे असतात, कि, जी त्या-त्या महिन्यात किंवा त्या-त्या दिवशी किंवा त्याआधीच पूर्ण करावी लागतात. नाहीतर भुर्दंड बसू शकतो. आणि मनस्ताप पण होऊ शकतो.

माझा मित्र पुराणिक गेल्या वर्षी २० मे ला नोकरीमधून निवृत्त झाला. ऑफिस कडून छान सेंड ऑफ झाला, घरच्यांनीपण साठीचा मोठा कार्यक्रम केला आणि त्याचे रिटायर्ड लाईफ सुरु झाले. मध्यन्तरी एक दिवस हा बाईक वर चांदणी चौकातून चालला होता. इथल्या स्थानिक संस्कारांमुळे हेल्मेट नव्हतेच. पोलिसांनी हात करून गाडी थांबवली. आणि लायसेन्स मागितले. हा जरा रिलॅक्स झाला. म्हणजे हेल्मेट – नाही हे कारण नाही, लायसन्स चेक करणे सुरु असेल. यानी खिशामधून पाकीट काढलं आणि लायसन्स पोलिसाच्या हातात दिलं. म्हणजे आता लायसन्स परत घ्यायचं आणि सुटायचं.

पोलीस : साहेब, लायसन्स स्वतः बघा आणि मग दाखवा. गाडी साईड ला लावून या.

मित्र : लायसन्स माझंच आहे.

पोलीस : तुमचंच आहे साहेब, तारीख पण बघा 

मित्राची ट्यूब पेटली. रिटायर झालो त्याच दिवशी मुदत संपली आहे. आणि रिन्यू चे जाम विसरलो.

पुढे काय झाले असेल, ते सुज्ञास सांगणे न लगे.

माझी दिनदर्शिका जर असती, तर असे प्रसंग नक्कीच टळतात.

माझा मित्र गणेश पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाला. कंपनीचे काही फंड आणि इतर पैसे त्याची कंपनी एलआयसी मध्ये जमा करते आणि आपल्याला ऍन्युइटी करून देते, जेणेकरून लाईफ लॉंग आपल्याला पेन्शन सारखे पैसे मिळत राहतात. काही प्रकारच्या ऍन्युइटी करता दर वर्षी विशिष्ठ तारखेच्या आत जिवंत असल्याचे प्रमाणपत्र एलआयसी कडे पाठवावे लागते. स्कीम व्यवस्थित सुरु झाली. सुरवातीला आपण दर महिन्याला पैसे जमा होत आहेत हे बघतो, नंतर दर महिन्याला बघणे होत नाही आणि तशी जरूर पण भासत नाही. गेल्या वर्षी त्याच्या लक्षात आलं, कि, ५ -६ महिने एलआयसी चे, पैसे जमा झालेलेच नाहीत. ऍन्युइटी मुंबईच्या ऑफिस ची होती. तिथे फोन लावला. आपल्याकडे आपल्या कामाकरता सरकारी कार्यालयात फोन लागणे हे एक दिव्यच असते. कायम एंगेज टोन येत राहतो. असंख्य वेळा ट्राय केल्यानंतर रिंग वाजते पण कुणी फोन उचलत नाही. मग असंख्य वेळा ट्राय केल्यानंतर केंव्हातरी तिथली रिसेप्शनिस्ट फोन घेते आणि तिथल्या कन्सर्न्ड माणसाला रिंग जाते, बराच वेळ पुढची रिंग वाजत असते आणि फोन कट होतो. या दिव्यामधून बाहेर पडल्यावर गणेशचा फोन लागला आणि समजलं, कि, जिवंत असल्याचा दाखला न पाठवल्यामुळे पेमेंट बंद झाले आहे. नंतर सगळे सुरळीत होण्याकरता किती फोनाफोनी / किती वेळ लागला असेल, ते – सुज्ञास सांगणे न लगे.

मोबाईल रिचार्ज करण्याची वेळ जवळ आली, कि, त्या कंपन्यांचे सारखे रिमायंडर यायला सुरुवात होते. काही वेळा तर रिचार्ज केल्यानंतर पण रिमायंडर येणे सुरु असते. असे रिमायंडर जिवंतपणाचा दाखला मागण्याकरता का येत नाहीत, असा विचार मनात येणे साहजिक आहे, पण अजून तरी येत नाहीत, हे सत्य आहे. परदेशात मात्र तशी सोय आहे. माझा एक मित्र स्वीडन मध्ये रहातो. याच विषयावर त्याच्याशी बोलतांना तो म्हणाला —

मित्र : तुमचे कुठलेही पेमेंट / डॉक्युमेंट ड्यू असेल तर तुम्हाला त्या ऑफिसकडून रिमायंडर हमखास येते. जिवंतपणाचा दाखल ड्यू असेल तर, त्या ऑफिस कडून मेसेज येतो – “सर / मॅडम, तुम्ही आहात ना? असाल तर कसे आहात? हसताय ना? वगैरे, वैगेरे. जर असाल, तर जिवंतपणाचा दाखला अमुक अमुक तारखेपर्यंत जरूर पाठवा. तुमच्या दीर्घायुष्याकरता आमच्या शुभेच्छा! दाखला आला नाही, तर काय ते आम्ही समजून घेऊ आणि योग्य ती प्रेयर पण तुमच्याकरता करू.

माझी दिनदर्शिका जर असती तर गणेश वर असा प्रसंग आला नसता, हे नक्की.

आवडो – न – आवडो, आपल्या सगळ्यांना इन्कम टॅक्स रिटर्न हे दर वर्षी भरावेच लागते. टॅक्स मध्ये जास्तीत जास्त वजावट मिळावी याकरता सगळेच प्रयत्नशील असतात. वजावट घेण्याचा एक महत्वाचा मार्ग म्हणजे ८० सी खाली वजावट मिळवणे. माझा एक मित्र आहे द्वारकादास, स्वतः सीए आहे आणि टॅक्सची प्रॅक्टिस करतो. त्यालाही रिटर्न भरावे लागते. गेल्या वर्षी रिटर्न भरतांना त्याच्या लक्षात आलं, कि यावर्षी पीपीएफ मध्ये पैसे भरायचे राहिले आहेत. गडबडीमुळे किंवा विसरल्यामुळे, लक्षात राहिले नाही आणि बाजूला ठेवलेले पैसे पीपीएफ मधे भरायचे राहिले, त्यामुळे दीड लाखावर मिळणारी वजावट त्याच्या स्वतःच्या अक्कलखाती पडली. माझी दिनदर्शिका जर असती तर असा प्रसंग नक्कीच आला नसता.

माझी एक मैत्रीण आहे मनवा. तिच्याकडे बऱ्याच वर्षांपूर्वी घेतलेली इंडिका होती. सहा वर्षांपूर्वी तिनी ऑटोमॅटिक गाडी घेतली आणि इंडिका सोसायटीच्या व्हिजिटर्स पार्किंग मधे सुस्तावली. गेल्या वर्षी सोसायटीनी वापरात नसलेल्या गाड्या हलवाव्या अशी नोटीस लावून सगळ्यांना तशी विनंती केली. मनवाला कल्पना आवडली. इंडिका विकून टाकावी म्हणून तिनी एजंट ना गाठलं.

एजंट : तुम्ही गाडीचे कागद, इन्शुरन्स, पीयूसी सगळे ओरिजिनल घेऊन या.

मनवानी कागद शोधायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं, कि गाडीचे ओरिजिनल कागद कुठेतरी मिसप्लेस झाले आहेत, कुठे ठेवल्या गेले आहेत, हे इतक्या मोठ्या गॅप नंतर आठवणे मुश्किल होते. नशिबानी गाडीमध्ये झेरॉक्स होते. एजंट कडे गेल्यावर समजलं कि गाडीचं रजिस्ट्रेशन ३ वर्षांपूर्वीच संपले आहे.

एजंट : मॅडम, आधी ग्रीनटॅक्स, पेनल्टी, वगैरे भरावे लागेल, इन्शुरन्स काढावा लागेल. गाडी पासिंग करता आरटीओ मध्ये न्यावी लागेल. त्याकरता गाडी रिपेअर आणि चकाचक करून घ्या. ओरिजिनल कागद नसल्यामुळे तुम्हाला सही करायला स्वतः आरटीओ मध्ये एक दिवस यावे लागेल. साधारण पंधरा हजार खर्च येईल. हे सगळे झाले, कि मग गाडी विकण्याची कागद पत्र तयार करू.

यावरून मनवाला गाडी विकण्याकरता काय काय सोपस्कार करावे लागले असतील, हे सहज लक्षात येईल.

माझी दिनदर्शिका जर असती, तर असे प्रसंग खूपच सोपे नक्कीच होतात.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉ. बेनझीर तांबोळी… लेखिका – ॲड. शैलजा मोळक ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ डॉ. बेनझीर तांबोळी… लेखिका – ड. शैलजा मोळक ☆ श्री जगदीश काबरे ☆

डॉ. बेनझीर तांबोळी 

आज हिंदू – मुस्लीम धर्मात जाणीवपूर्वक निर्माण केल्या जाणाऱ्या द्वेषमूलक वातावरणात मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून कार्यरत असणारे डॅा. बेनझीरडॅा. शमसुद्दीन तांबोळी या उभयतांना गेल्या विसेक वर्षापासून मी ओळखते. काही माणसांचा, त्यांच्या विचारांमुळे व कृतीमुळे प्रचंड आदर वाटतो अशा काही मंडळींपैकी ही एक जोडी. ज्या जमातीविषयी अनेक लोक समाजात विविध गैरसमज पसरवत असतात, त्याच जमातीतील डॅा. बेनझीर तांबोळी यांचा शैक्षणिक व सामाजिक आलेख पाहता त्यांच्याविषयीचा आदर अधिक दुणावतो.

एम ए (इंग्रजी), एम ए (मराठी), एम. एड, सेट, पीएच डी. हा त्यांचा शैक्षणिक प्रवास.

डॉ. बेनझीर तांबोळी यांचा शिक्षण, साहित्य, समाजप्रबोधन या क्षेत्रात सातत्यपूर्ण सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांचे आईवडिल शिक्षकी पेशातील असल्याने त्यांना सुशिक्षित, मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबात वाढताना खुले, प्रोत्साहनात्मक वातावरण लाभले. परंतु परंपरावादी कुटुंबात झालेल्या पहिल्या विवाहानंतर झालेला तलाक, त्यातून निर्माण झालेली वैयक्तिक आणि कौटुंबिक अस्थिरता व कटू अनुभवामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. व्यक्तिगत मानसिक ताण, नातेवाईक आणि समाजाचा दबाव तसेच भविष्यातील अनिश्चितता यांना तोंड देत त्यांनी स्वतःला पुन्हा उभं केलं. आईवडीलांनी दिलेल्या शैक्षणिक वातावरणामुळे त्यांनी धाडसाने या दरम्यान रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन केले. स्वावलंबनाची ओढ आणि योग्य निर्णयक्षमता यामुळे त्यांची पुढची वाटचाल सुकर झाली. कितीही कठीण प्रसंग आले, तरी त्याला टक्कर देण्याची हिंमत, खंबीर मानसिकता, आत्मविश्वास आणि शिक्षणामुळेच मिळते तसेच ‘आर्थिक स्वावलंबन स्वतःचा आवाज बळकट करते’ ही त्यांची धारणा कठीण काळातील अनुभवातूनच घडली आहे. त्यांचा स्वभाव मुळातच लढणारा असल्याने त्याचा फायदा त्यांना झाला.

कालांतराने सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे सध्याचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांची साथ आणि सहकार्यामुळे त्यांचे शैक्षणिक आयुष्य अधिक दृढ होत गेले. बी. एड. , एम. एड. , सेट परीक्षा आणि पीएच. डी. या टप्प्यांवर त्यांचा त्यांना कायम पाठिंबा मिळाला. विवाहानंतर स्वतःला मूल न होऊ देण्याचा निर्णय त्यांनी खूप विचार करून घेतला जो कुटुंबातील अनेकांना रुचणारा नव्हता. तरीही त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. पतीची योग्य साथ त्यांना मिळाली.

आंतरधर्मीय विवाहाच्या निमित्ताने अनेक तरुण तरुणी भावनिकतेने जोडले गेले आहेत. त्यातून त्यांचा एक मोठा परिवार तयार झाला आहे.

अध्यापन आणि भाषा अभ्यासाची आवड असल्यामुळे त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रकल्पांमध्ये काम केले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि अन्य महाविद्यालयांमधील अध्यापन, तसेच एमकेसीएलच्या शैक्षणिक उपक्रमांमधील सहभाग या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडल्या गेल्या. इंग्रजी, मराठी आणि शिक्षणशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणासोबतच भाषा कौशल्य विकसनावर त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे आहे. विविध परीक्षांसाठी प्रभावी प्रश्ननिर्मिती कशी करावी व सर्वंकष मूल्यमापन यावर शिक्षकांसाठी त्या विशेष मार्गदर्शन करतात. तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांत भाषांतर, मुद्रित शोधन व संपादन त्या अचूक करतात. सुरुवातीला कोल्हापूर येथे त्यांनी इंग्रजी भाषा व साहित्य या विषयाचे अध्यापन केले. त्यानंतर त्या पुण्यात आल्यावर त्यांचा शैक्षणिक व सामाजिक कामाचा परिघ वाढत गेला. पुण्यात त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाशी अध्यापक म्हणून जोडल्या गेल्या. दूरदर्शन, आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमात त्या चर्चा व परिसंवाद यात सहभागी होतात. विविध विषयांवर त्या व्याख्याने व लेख लिहितात.

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कामामुळे त्यांची स्वतःची ओळख निर्माण झाली. त्या विविध कामात कायम सक्रिय आहेत. मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या फातिमाबी शेख मुस्लीम महिला मंच आणि हमीद दलवाई शैक्षणिक उपक्रम यामाध्यमातून त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. मुस्लीम समाजातील पारंपरिक प्रश्न आणि आजचे वास्तव, मुस्लीम महिलांचे अधिकार आणि मुस्लीम समाजातील अपेक्षित सकारात्मक बदल, मुस्लीम महिलांच्या शैक्षणिक – सामाजिक समस्या, तोंडी तलाकसारखे प्रश्न, तसेच वंचितांच्या शैक्षणिक अडचणी यांसारख्या विषयांवर त्यांनी अनेकांगी कार्य केले आहे. विविध नियतकालिके, विशेषांक, वर्तमानपत्रे यामध्ये त्या प्रासंगिक लेखन करत असतात. मुस्लीम सत्यशोधक पत्रिकेचे संपादन सहाय्य आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या द्विखंडात्मक इतिहासाच्या संपादनात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रभावशाली शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणशास्त्र शब्दकोश ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. समान नागरी कायदा – अपेक्षा व वास्तव, तिमिरभेद ही दोन पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. त्यांचा मुस्लीम प्रश्नावरील अनुवादित कथा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर साहित्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न हाताळले आहेत. प्रबोधनाची व परिवर्तनाची कास धरल्याने त्या सर्वधर्मीय चळवळी व संघटना यांच्याशी निगडीत आहेत.

सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे उपक्रम, बकरी ईदनिमित्त रक्तदान अभियान, संविधान साक्षरता अभियान यांसारख्या समाजप्रबोधन व जनजागृतीपर उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. मुस्लीम सत्यशोधक मंडळ प्राधान्याने जोडीदाराच्या निवडीचे स्वातंत्र्य, आंतरधर्मीय–आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देते. याविषयावर कार्य करणाऱ्या विविध राज्यातील संघटनांचे ‘चयन’ हे राष्ट्रीय संघटन उभे राहिले आहे. पुणे, लखनौ, कोलकाता, हैद्राबाद याठिकाणी झालेल्या परिषदांच्या समन्वयात महत्त्वपूर्ण जबाबदारी घेऊन यानिमित्त प्रकाशित करण्यात येणाऱ्या स्मरणिकेचे संपादन त्यांनी केले आहे. त्या करत असलेले काम हे देशव्यापी आहे. ध्येयवादी प्रामाणिक प्रयत्नातून समाजासाठी चाललेली त्यांची ही वाटचाल अनेकांना दिशादर्शक आहे. त्यांना नवी दिल्ली येथे साहस सन्मान, दौंड येथे जागर सन्मान, पुणे येथे सेवाव्रती महिला पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले आहेत.

आजच्या सामाजिक परिस्थितीत समाजात शांतता व सलोखा राखण्यासाठी डॅा. बेनझीर तांबोळी यांच्यासारखे अनेकजण कार्यरत आहेत. त्यांचे कार्य समजून घेणे व ते इतरांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.

आयुष्यात आलेल्या काही समस्या व संघर्ष यावर मात करून डॅा. बेनझीर यांनी केलेली आपली शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक वाटचाल ही लक्षणीय आहे. अशा या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..! !

लेखिका – ड. शैलजा मोळक

(लेखक, कवी, संपादक, प्रकाशक)

अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान, पुणे. मो. 9823627244

प्रस्तुती – श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वो फिर नहीं आते” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “वो फिर नहीं आते” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

काय समर्पक लिहिलंय ना गुलजार यांनी…. *वो फिर नहीं आते…. * आयुष्यभर अगदी कशीही, कुठेही आपल्याला अनेक माणसं भेटतात, आपलीशी वाटतात, मनात घर करतात, आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. काळ आपली गती स्विकारतो आणि या रामरगाड्यात ती एकाएकी हरवून जातात.

आयुष्याचा सुवर्णकाळ आपण ज्यांच्यासोबत घालवला ती माणसं आता कदाचित् संपर्का पलिकडे पोहोचली असतात. मोबाईलमधे त्यांचा नंबर असूनही *“मीच का? ”* या आपल्या अहंकाराला बळी पडलेली असतात. कोणे ऐकेकाळी आपल्या प्रत्येक क्षणावर आपलेपणाचा अधिकार गाजवणारी, आपल्या आनंदात आनंद मानणारी, मनातलं सगळंच आपल्याला सांगणारी, काहीही बोललं तरीही आपल्यालाच येऊन बिलगणारी हिच माणसं आता नजरेलाही दिसेनाशी झालेली असतात. त्यांना आपण कायम आपल्या चालू वर्तमानकाळात ठेवायला हवं…. संपर्कात रहायला हवं.

अहो वाद घालायलाही संवादाची गरज असतेच ना? …. तो संवाद अविरत चालू रहायला हवा. कधी आपल्या नावाचा एखादा फोन… एखादा मेसेज… नाहीतर स्व-लिखित पत्रच त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं.

ही माणसं काळी का गोरी, श्रीमंत का गरीब, आपली का परकी अशी नसतात. त्या सुवर्ण मुद्रा असतात. नियतीने दिलेला आशिर्वाद अन् प्रसाद म्हणून भरभरुन वाटलेला…

त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेला तो सुवर्ण काळ तुम्ही आजही जगताय का? ती माणसं आजही संपर्कात असतील आणि तो काळही तुम्ही उपभोगत असाल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. कारण तो काळ किंवा ती माणसं ….. परत येत नाहीत हो ….. *“वो फिर नहीं आते……”* हि अशी अवचित माणसं भेटण्यापेक्षा ती लाभणंच जास्त महत्वाचं. आयुष्याची गाडी वेगाने पुढे हाकताना अशीच लाभलेली काही जीवाभावाची माणसं *“मी”* पणाचा पडदा थोडा बाजूला करून वेळ काढून, पुन्हा निरखून पाहायला हवीत … त्यांची विचारपूस करायला हवी, त्यांना समजून उमजून आपल्या आयुष्यात ठरवून आणायला हवं. एकदा का ती काळाच्या पडद्याआड गेली कि ती परत येत नाहीत हो.

गगनाला भिडलेल्या, फुलांनी लगडलेल्या झाडाखाली उभं राहिलं कि ते झाड आपल्यावर न सांगता त्या फुलांचा वर्षाव करतं. तशीच आनंदवर्षाव करणारी हि माणसं फुलाची पाकळी नि पाकळी वेचावीत अगदी तशीच वेचायला हवीत.

*फूल खिलते हैं, लोग मिलते हैं मगर*

*पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं*

*वो बहारों के आने से खिलते नहीं*

*कुछ लोग एक रोज़ जो बिछड़ जाते हैं*

*वो हजारों के आने से मिलते नहीं*

*उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम*

*वो फिर नहीं आते…* 

माणसं हि अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांना मनापासून जपायला हवं. भावनाशून्य या जगात जगताना आपण थोडं भावनाप्रधान व्हायला हवं.

ओळख जितकी जूनी तितकी मैत्री घट्ट होत जाते. नात्यात सहजता येते. या मनापासून जपलेल्या नात्याला जेव्हा आपण बुद्धीच्या जोरावर तोलून पाहतो तेव्हा काहीतरी खटकतं, अनेक तर्क-वितर्क निघतात, शंका उत्पन्न होतात, राईचा पर्वत होतो, गुंतागुंत वाढवणारे गैरसमज निर्माण होतात आणि…

ही मैत्री नावाची नाव अनेक विचारांच्या सागरात हेलकावे खाताना दिसते. वेळीच हे सगळे विचार पुसून टाकून मनाची पाटी ज्याला कोरी करता आली तो तरलाच म्हणायचं. डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतातच असं नाही ना. अहो आपणहून घट्ट धरुन ठेवलं तर कदाचित् थोडंसं गळेल, पण तुटणं मात्र टळेल.

*आँख धोखा है, क्या भरोसा है*

*दोस्तों शक दोस्ती का दुश्मन है*

*अपने दिल में इसे घर बनाने न दो*

*कल तड़पना पड़े याद में जिनकी*

*रोक लो रूठ कर उनको जाने न दो*

*बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम*

*वो फिर नहीं आते…* 

आपल्या सगळ्यांचच आयुष्य फार गजबजलेलं आहे. कुणालाही जराही उसंत नाही. आपल्याला सगळ्यांनाच यशस्वी व्हायचंय… पुढे जायचंय … ठरवलेलं धेय गाठायचंय. आपल्या भोवती शोभेल अशी एक महागडी चौकट उभी करायचीय. पण ती उभी करताना… पुढे जाताना गवसलेली हि आपली माणसं … आपल्या जवळची ही माणसंच नसतील तर…यशाचं शिखर गाठल्यावर मिळालेलं यश साजरं करायला, तोंडभरुन कौतुक करायला, शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्यायला जवळ आपलं असं कुणीतरी हवं ना…. नसेल तर…. खूप प्रयत्न करून मिळालेलं हे यश, त्या सोबत आलेली सुबत्ता सगळंच मातीमोल ठरेल… नाही का?

आयुष्य खरंच खुप सुंदर आहे. न मागता भरभरून मिळालेलं फक्त थोडे कष्ट घेऊन जपता आलं पाहिजे. अगदी माणसं सुद्धा… कायमची आपल्याशी बांधता आली पाहीजेत. आपल्या मनापासून त्यांच्या मनापर्यंत..

शरीरावरच्या जखमा दिसतात हो, मनावरच्या दिसत नाहीत एवढंच.

उत्तरार्धात मागे वळून पाहताना तो पुढे येणार्या प्रत्येक टप्यावर दिसली पाहिजेत हीच ती सुंदर माणसं… तुमच्या पाठीशी वटवृक्षासारखी अगदी खंबीर उभी.. सुंदर, निखळ, हसऱ्या चेहऱ्याची…

 सच कहा है किसी ने…

*… वो फिर नही आते… *

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाहुणा… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ पाहुणा… ☆ सौ शालिनी जोशी

हरिपाठाच्या बाविसाव्या ओवीत संत ज्ञानेश्वर म्हणतात,

हरिविण जन्म तो नर्कची पै जाणा l यमाचा पाहुणा प्राणी होय ll

येथे यमाचा पाहुणा म्हणजे काय असा प्रश्न पडतो. पाहुणा याचा सामान्य अर्थ आपण अतिथी, अभ्यागत किंवा प्रसंगी विशेषी घरी आलेली किंवा बोलावलेली व्यक्ती असा घेतो. यम तर मृत्यूदेवता मग तिच्याकडे कोण पाहुणा म्हणून जाणार?  आणि तिथे आदर सत्कार तरी असला?  आपल्या घरी जे असेल ते आपण आल्या गेल्याला देतो. त्यात त्यांनी समाधानी असाव ही इच्छा असते. पण यम तर कर्माप्रमाणे फळ देणारा आणि पापाचा घडा भरल्यावर मृत्यू लोकातून यमलोकात नेणारा. म्हणजे हा पाहुणचार यम देईल ती शिक्षा भोगण्याचा आहे. पाप संपेपर्यंत शिक्षा भोगायची मग परत मृत्यू लोक, परत यमलोक. अशा या येरझाऱ्या म्हणजे यमाचा पाहुणचार.

तर याच हरिपाठाच्या सत्ताविसाव्या ओवीत संत ज्ञानेश्वर म्हणतात,

तीर्थी भाव धरी रे करूणा l शांती त्या पाहुणा हरी करी ll

मनापासून तीर्थयात्रा करणाऱ्याच्या अंतःकरणात हरिकृपेने करुणा व शांती पाहुण्या होऊन येतात. म्हणजे त्याच्याकडे मुळात नसलेले गुण शांती आणि करुणा त्याला तीर्थयात्रेमुळे प्राप्त होतात.

ज्ञानेश्वरीत संत ज्ञानेश्वर म्हणतात,

शांताचिया घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा l

पाहुणेरा म्हणजे पाहुणा. मुळात शांतरसात असलेल्या अकराव्या अध्यायात काही वर्णने अद्भुत रसातील आहेत. मुळात नसताना या अध्याया पुरता डोकावला आहे, म्हणून अद्भुत रस पाहुणा. या दोन तीन उदाहरणावरून लक्षात येतं पाहुणा याचा अर्थ किती व्यापक आहे. तो व्यक्तिपुरता मर्यादित नाही. कोणतीही कायम नसलेली गोष्ट मग ती सजीव, निर्जीव, भावना असली तरी, जेव्हा नवीन येते किंवा व्यक्त होते तेव्हा ती पाहुणा होते. म्हणून एखादा डास, ढेकूण जरी अचानक दिसला तरी आपण त्याला पाहुणा म्हणतो. हे त्रासदायक पाहुणे.

कावळा दाराबाहेर ओरडला की पाहुणा येणार अशी अंधश्रद्धा आहे. पूर्वी सुट्टीत मामा, मावशीकडे जाणे ते पाहुणे म्हणून. तसेच लग्नआदि समारंभासाठी येणारे सर्व पाहुणेच. यावरून पै पाहुणे, पाहुणेरावणे असे जोडशब्द तयार झाले. लग्नाला आलेल्या पाहुण्याला काही वेळा वधू वर दोन्ही कडचे लोक ओळखत नाहीत. त्यामुळे दोन्हीकडून दुर्लक्ष होते. बिचाऱ्याला जेवणही मिळत नाही. म्हणून म्हण पडली ‘दोन्हीकडचा पाहुणा उपाशी’. एक पाहुणा आला तर घरातले वातावरण बदलते. म्हणून म्हणतात ‘एक पाहुणा तर घर पाहुणे’ किंवा ‘व्याही पाहुणा आला तर रेडा दुभत नाही’. अशा कितीतरी म्हणी तयार झाल्या.

काव्यातही या पाहुण्याला स्थान आहे.

येता पाऊस पाहुणा आलं हिरवं उधाण l येथे पाऊस पाहुणा झाला.

विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा l येथे विठ्ठलच पाहुणा होतो.

आज ये अंगणा पाहुणा गोजिरा l अंगणात येणारा पक्षीच पाहुणा होतो.

भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा l भगवंतालाच पाहुणा केला.

कायसेनि पाहुणेरू क्षीरसागरा l क्षीरसागराला कशाचा पाहुणचार?

गणपतीलाही दीड ते अकरा दिवसाचा पाहुणा म्हटले जाते. म्हणजे कुणाला पाहुणा म्हणाव याला काही बंधन नाही. मग शाळेत कार्यक्रमाला बोलावलेल्या अध्यक्षांनाही पाहुणे म्हणतात. सरकारी अधिकाऱ्यालाही सरकारचा पाहुणा म्हणतात. अशा प्रकारे विचार करायला गेलं तर नेहमीच्या वापरात या शब्द ‘पाहुणा’. पण अर्थ सांगायला गेलं तर विस्तार आवरत नाही. असे हे मराठी भाषेचे वैभव म्हणावे लागेल.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares