मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – राणी वेलू नचीयार – लेख क्र. ६ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – राणी वेलू नचीयार  – लेख क्र. ६. ☆ प्रा.भारती जोगी ☆

स्वातंत्र्य दिन जसजसा जवळ येऊ लागतो तसतसं मनात आठवणींचे मोहोळ उठतं! ब्रिटिश राजवटीचं दाटलेलं, दाट, गर्द सावट; लाखों-करोडोंनी स्वातंत्र्य प्राप्तीच्या धगधगत्या यज्ञकुंडात केलेलं जीवांचं समर्पण!! अनेक स्मरणीय, काही मात्र विस्मृतीत! काहींचं बलिदान लक्षणीय, तर काही अलक्षित!! पण बलिदान मात्र सगळ्यांचंच! ते व्यर्थ नाहीच! पण तरीही इतिहासात नोंद न झालेल्या अशा अनेक स्त्री हुतात्म्यांच्या प्रेरणा स्त्रोतांच्या झाकोळलेल्या कर्तृत्वाला नव्याने झळाळी देण्याचा हा प्रयत्न!

राणी वेलू नचियार

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील रामनाथपुरम च्या राज परिवारात जन्मलेली एकुलती एक कन्या. जन्मजात विलक्षण प्रतिभेचं लेणं लेऊन आलेली! पित्याने तिचं लालन-पालन राजकुमारासारखंच केलेलं. अस्त्र, शस्त्र, तलवारबाजी, तिरंदाजी, भाला फेक, लाठी चालविणे, आदि सर्व युद्धकलेत पारंगत झालेल्या *वेलू* ने, ‘सिलंबम’ या तामिळी मार्शल आर्ट मध्ये ही कुशलता प्राप्त केली होती.

युद्धकला प्रविण वेलू नचियार ने तमीळ, तेलगू, मल्याळी, फ्रेंच, उर्दू… या भाषांवर ही प्रभुत्व मिळवले होते. हे कमी होतं म्हणून की काय तिने महान अशा तामिळ ग्रंथांचे वाचन करून ही, आपलं व्यक्तित्व बहुपेडी, बहुआयामी, बहुश्रुत बनवून स्वतः ला राज्याची उत्तराधिकारी म्हणून सिद्ध ही केले.

वयाच्या १६ व्या वर्षी राजा शशीवर्मा यांचे सुपुत्र… *मुत्तू वेदुंगानाथ थेवर* यांच्याशी विवाह झाला. वेलू आपल्या जीवनसाथी ची ख-या अर्थाने ‘ संगिनी’ सिद्ध झाली. वेळोवेळी आपल्या पतीची… मित्र, सल्लागार, एक विश्वासू सहयोगी सिद्ध झाली ती! पण दुर्दैवाने ईस्ट इंडिया कंपनी ची नजर शिवगंगा वर पडली, त्यांनी १७७२ मध्ये शिवगंगा वर आक्रमण केले. एक *विध्वंसक युद्ध* म्हणून इतिहासात नोंदलं गेलेलं हे युद्ध! निर्दयता आणि नृशंसता याची हद्द पार केली इंग्रज सैनिकांनी! अगदी वृद्ध, महिला, बालके ही नाही सुटली त्यांच्या हिंसाचारातून! वेलू नचियार च्या पतीला ही हौतात्म्य प्राप्त झाले.

वेलू आणि तिची कन्या वेल्लाची स्वतः ला सुरक्षित वाचवंत, तामिळनाडूतील डिंडिगुल येथील जंगलातील एका सुरक्षित जागी जाऊन पोहोचल्या आणि तेथेच वास्तव्य केले.

आपलं राज्य परत मिळविण्याची जिद्द, महत्वाकांक्षा, या राणीला स्वस्थ बसू देईना. तिचा आत्मविश्वास तिला आतून सारखा *लढ, आगे बढो*… अशी साद घालत होता.

वेलू नचियार ने कंबर कसली. आपली अस्त्र-शस्त्र विद्येतली पारंगतता पणाला लावायचं ठरवलं आणि आसपासच्या महिलांना गोळा करून त्यांच्यात देशाचं रक्षण करण्याचं स्फुल्लिंग चेतवलं या *समिधेने*! स्वातंत्र्य लढ्याच्या धगधगत्या होमकुंडात स्वतः ला समर्पित करणा-या अशा अनेक महिलांची सांगड घालंत, जणू एक *मोळीच बांधली* तिने! स्त्रियांना स्वतः तलवारबाजी, निशाणे बाजी सातत्याने ८ वर्षे शिकवत राहिली, तयारी करीत होती ती युद्धाची!

तिने त्यांना सैन्य रणनीती शिकवली. राणी वेलू नचियार चा हा मार्ग अतिशय खडतर होता. एकटीने बांधलेली सांगड तिला योग्य वेळी अर्पण करायची होती. पण दुर्दैवाने त्या त्याग आणि बलिदानासाठी, स्वातंत्र्य मंत्रोच्चारांनी सिद्ध आणि सिक्त समिधांमधील एक समिधा जिला युद्धा आधीच… राणीच्या शोधात आलेल्या इंग्रज सैनिकांना तिचा ठाव-ठिकाणा सांगितला नाही म्हणून हौतात्म्य पत्करावं लागलं! ती होती ऊदइयाल… राणीची मानसकन्या! जिने जणू काही आपल्या प्राणांचे बलिदान देऊन, मातृ वंदना दिली आणि ही समिधा निमाली!!

मग तिच्या वीर गती प्राप्ती च्या स्मरणार्थ राणीने स्थापिली एक नारी सेना… आणि तिला नाव दिले उदयियाल!!

एका समिधेच्या समर्पणाने चेतविलेल्या अनेक समिधा गोळा झाल्या… देश प्रेमाने बांधलेल्या, भारलेल्या, एकजुटीने!!

राणीने त्यांचं सेनापतीपद सोपवलं… तिच्या दुस-या मानसकन्येला… विश्वासू, तीक्ष्ण बुद्धी, वीरांगनेला… कुयिली ला!! आणि मग सुरू झाली युद्धाची तयारी!!

राणी वेलू नचियार… आपलं राज्य परत मिळविण्यासाठी ज्या योजना मोठ्या योजकतेने आखत होती, त्यांत एक महत्त्वाचा भाग म्हणजे तिने म्हैसूर च्या राजाला हैदरअली ला पत्र लिहून केलेली भेटीची विनंती!

राजाने ही तिचे अगदी राणीचा आब, इतमाम, आणि स्वाभिमान कायम राखणारं असं सन्मानित स्वागत केले. तिचे आतिथ्य ही केले. राणीने ही आपल्या उर्दू भाषेत संवादी होत, त्याला खूप प्रभावित केले. त्यानंतर हैदरअली ने राणीला मदत करण्याचे नुसते वचन नाही दिले, तर प्रत्यक्षात ४०० पौंड आणि ५००० सैनिकांची फौज ही दिली. इतकंच नाही तर असं म्हणतात की, राजाने त्यांच्या या आगळ्या, पवित्र, आणि एकाच ध्येयासाठी झपाटलेल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून महालात एक मंदीर ही बांधले.

अशी ही युद्धाची तयारी ८ वर्षे चालली होती. आणि शेवटी तो दिवस आला. ज्याची वाट राणी आणि तिची नारी सेना… रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग… असं म्हणंत त्या प्रसंगाची वाटच बघत होती.

दस-याचा दिवस उजाडला! शिवगंगा किल्ल्यात देवी राजराजेश्वरी चं मंदीर! प्रतिवर्षी दसरा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने स्त्रिया येत. तशाच आल्या. स्त्रियांसाठी मंदिराचा दरवाजा उघडला गेला. मंदिराजवळच इंग्रजांचे शस्त्रागार असल्याची खबर नारी सेनेच्या सेनापती ला… *कुयिली ला* आधीच लागलेली. त्याच क्षणी तिच्या मनात एक विचार, विजेच्या लोळासारखा शिरला. त्याचा तिने कुणाला थांगपत्ता ही नाही लागू दिला.

तिच्या विचारांत ते विद्युल्लतेचं तेज झिरपू लागलं हळूहळू!!!

मंदिराचा दरवाजा उघडला… उदायल नारी सेना साधारण वेषात… फुला-फळांच्या टोपलीत; हत्यारे लपवून आत प्रवेशल्या. दस-याचा क्षणी *कुयिली* ने क्षणाचाही विचार न करता… एक क्षण ही न दवडता… सेनेला आपल्या अंगावर पूजेसाठी आणलेल़ सगळं तूप ओतायचा जणू हुकूमच दिला… आणि तशी कार्यवाही होताच… तिने आग लावली स्वतः ला! पापणी लवायच्या आत… आगीचे लोळ उठले… कुयिलीने उडी घेतली थेट शस्त्रागारात… आणि कानठळ्या बसविणा-या, एकामागोमाग एक होणा-या स्फोटात, संपूर्ण शस्त्रागार राख झाले… आणि त्यातच

इतिहासातला पहिला आत्मघातकी मानवी बॉंब… कुयिली… एक जळती, तेज:पुंज, पवित्र उद्देशाने भरलेली, आणि भारावलेली समिधा समर्पित झाली, त्या अग्नी दाहात!

नाही कुठेच नोंद फारशी… आणि तिच्या दहनभूमी वर नाही चिरा नाही पणती

अशा या दोन समिधा आपल्या जुडीत, सांगडीत बांधून घेणा-या तिस-या समिधेने… राणी वेलू नचियार ने मग… सर्वशक्तीनीशी शिवगंगा किल्ला काबीज केलेल्या इंग्रजांवर हल्ला बोल करून… आपल्या युद्ध कौशल्याने आणि रणनीती ने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. आणि शेवटी विजयश्री माला तिच्या गळ्यात पडली. त्यानंतर राणी ने १० वर्षे राज्य केले. राजा हैदरअली शी असलेली मैत्री थेट पर्यंत टिकवून ठेवली. त्याचा मुलगा *टिपू सुलतान* वर ही सख्ख्या भावासारखं प्रेम केलं. आणि नंतर आपल्या लेकीच्या हाती राज्य सोपवून ही पती निधनानंतर, सतत जळंत, धगधगंत, प्रज्वलित राहून, प्रजा हितासाठी स्वतः चं जळंत राहणं, प्रज्ज्वलन टिकवून ठेवणारी ही समिधा ही १७९६ मध्ये निमाली!!

राणी वेलू नचियार ला प्रजा वीर मंगईवीर महिला या नावाने संबोधायची. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई च्या जवळ जवळ ७५ वर्षे आधीचा हा वेलू चा संघर्ष! त्यामुळे ती एका अर्थाने राणी लक्ष्मीबाई ची प्रेरणा स्त्रोत च ठरते!

२००८ मध्ये भारतीय पोस्ट खात्याने तिच्या सन्मानार्थ एक पोस्टाचे तिकीट काढलं!

 वेलू नचियार आजही… साहस, रणनीती, आणि नेतृत्व याचा आदर्श आहे महिलांसाठी!!

पण तरीही… भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक दुर्लक्षित नायिका च ठरतीये! समिधांच्या सांगडीतल्या या… उदयियाल, कुयिली आणि वेलू नचियार… तिनही समिधांना कोटी कोटी प्रणाम!

स्मृतीतल्या संपुटीत जपूयात ही त्रिपुटी… आणि म्हणूयात ना… तव स्मरण सतत स्फुरणदायी आम्हां घडो! 

– लेख क्र. ६.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पनीर : नीर-क्षीर विवेक!…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“पनीर : नीर-क्षीर विवेक!… ☆ श्री संभाजी बबन गायके 

जग जवळ आलं नव्हतं तेव्हा ज्याने त्याने आपापल्या हवामानाला, परिस्थितीला आणि उपलब्धतेला साजेल असं भोजन विकसित केलं आणि त्यामुळे सारं काही व्यवस्थित सुरु होतं.

भारतही याला अपवाद नव्हता. भारतातील राज्ये, जिल्हे एकमेकांच्या जवळ आल्याने अन्न आणि खाद्यसंस्कृतीमध्ये संकर होण्यास वेळ लागला नाही!

१९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि त्याच वर्षी देश-विभाजन झाल्याने देशांतर्गत, विशेषत: पंजाब, हरयाणासारख्या राज्यांतून देशाच्या इतर भागांत स्थलांतर वाढले. पुढे रस्ते वाहतूक वाढल्यामुळे एका राज्यातील माल दुस-या राज्यांत पोहोचवणारी वाहतूक व्यवस्थाही वाढली. पंजाबमधील चालकांना प्रवासात पंजाबबाहेर पडल्यावर पंजाबी खाद्यपदार्थ मिळेनासे झाले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवर यथावकाश ढाबा नावाची व्यवस्था आली. आणि या डाब्यावरूनच महाराष्ट्र आणि इतरही राज्यांच्या खाद्यान्नगृहांत पनीर नावाचा पदार्थ पोहोचला आणि रूढ झाला! अर्थात, स्वत:च्या खाद्यसंस्कृतीचा हिरीरीने पुरस्कार करणा-या दाक्षिणात्य राज्यांनी मात्र पनीर काय किंवा रोटी काय हे असलं अजिबात स्वीकारलेलं नाही… अपवाद Maggieचा… अर्थात तिखट शेवई! मात्र दक्षिणेने त्यांचे इडली(इटली नव्हे! ), दोसई, मेदू (मेंदू नव्हे! ) वडई हे स्वस्त पदार्थ देशाच्या सर्वच भागांत किंमती वाढवून पोहोचवले.

 पनीर १६व्या-१७व्या शतकात मुघालांच्या, अफगाणांच्या माध्यमातून भारतात पोहोचले. मुघलांचा वावर आरंभी उत्तर भारतात अधिक असल्याने तिकडे पनीर जेवणात अधिक असे. हे पनीर तयार करण्याची पद्धत तशी साधी. गरम दूध लिंबाचा रस किंवा दह्याचे विरजण घालून हेतूपुरस्सर नासवायचे. (याला उत्तरेत दूध ‘फाडणे’ म्हणतात!) या प्रक्रियेत तयार झालेले दहीसदृश मिश्रण त्यातील पाणी काढून टाकून कपड्यातून गाळून घ्यायचे व त्या मिश्रणावर जड वस्तू ठेवल्या की मिश्रण एकजीव आणि विशिष्ट पातळीपर्यंत घट्टही होते, ज्याच्या वड्या, हव्या त्या आकाराचे तुकडे पाडता येतात! हे तुकडे मग मसाल्याच्या मिश्रणात शिजवले की महाग पदार्थ तयार! याचाच एक अर्थ असा की, पनीरफक्त दुधापासूनच तयार करता येते!

खपते ते विकायला ठेवले जाते, या न्यायाने सर्वत्र हॉटेल्स, खानावळी, मेजवान्या यांत पनीर वापरून पंजाबी तेलकट, तुपकट ग्रेवी नावाच्या घट्ट द्रवात आकंठ बुडालेल्या पनीरचे लालसर तुकडे महागड्या दराने विकले जाऊ लागले. जुन्या पिढीला हे लाल पनीर म्हणजे लाल भोपळ्याचे तुकडे वाटत असत! असो.

पुढे पुढे पनीरचे इतर पदार्थ प्रसिद्ध झाले… पनीर पसंदा तर आहेच, पण पनीर चिल्ली (चिल्ली नव्हे… चिली म्हणजे मिरची! ), पनीर बुर्जी, पकोडे आणि काय काय!

आता मुख्य प्रश्न. पनीरची मागणी वाढली. पण ते ज्याच्यापासून तयार करतात त्या दुधाचे उत्पादन कुठे वाढले? एक किलो पनीर तयार करायला म्हशीचे पाच ते सहा लिटर्स दूध लागते. म्हशीच्या दुधाचा दर किमान ७५ रुपये लिटर आहे. म्हणजे साधारण पावणे तीनशे रुपयाचे दुध लागेल. पुढचा खर्च निराळा. मग हे पनीर सुमारे साडेपाचशे रुपयांना विकले जाते. म्हणजे इथेच सरळ दोनशे रुपयांचा घाटा आहे. वर मागणीनुसार पनीर बनवायचे तर इतर उपयोगासाठी दूधच शिल्लक राहणार नाही. असे असूनही बाजारात मुबलक प्रमाणात पनीर उपलब्ध आहे. मोठमोठ्या कंपनी पनीर कसे बनवत असतील ते असोत, पण हॉटेलांत मिळणारे पनीर हे analog प्रकारचे असते. यांत दूध नसते. दुधाची पावडर असू शकते. पाम तेल, रासायनिक खाते आणि अन्य काही पदार्थ वापरून हे पनीर तयार होते. त्यामुळे त्याची किंमत कमीच असावी, पण यामुळे पनीरच्या पदार्थांची किंमत मात्र जादाच असते. यामुळेच हॉटेलवाल्यांना परवडते आणि पनीर सगळ्यांना पुरते सुद्धा!

हे analog पनीर आरोग्याला लगेचच हानी करत नाही म्हणून सर्वांचे बरे चालले आहे. हे पनीर सातत्याने खाल्ल्याने पचनसंस्था, मूत्रपिंडे यांचे काही आजार होऊ शकतात, असे वैद्यकीय मत दिसते.

शासनाने नुकतेच ‘आम्ही हे पनीर वापरतो’ असे ग्राहकांना लेखी स्वरूपात कळवायला सांगितले आहे.. म्हणजे बिलवर उल्लेख, मेन्यू कार्डमध्ये उल्लेख करायला सांगितले आहे!

मुळात स्थानिक परिस्थिती, वातावरण, हवामान यांवर आपल्या पूर्वजांनी खाद्यपदार्थ संस्कृती उभारली आहे. संस्कृतीमध्ये केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी विकृती येत असेल तर मग प्रकृती ठीक कशी राहील?

पाहूयात… शासनाच्या या निर्णयाचे पुढे काय होतं ते. तोवर हॉटेलमधील गर्दी आणि त्या गर्दीत पालकांच्या पुढे जाऊन पनीर order करणारी पोरं “अंकल… मुझे एक पनीर टिक्का मसाला! असं ओरडत राहतील. (टिक्का हे तीखा म्हणजेच तिखट या शब्दाचा खास दाक्षिणात्य उच्चार! ) 

अस्सल आणि analog पनीर कसे ओळखायचे याचे शेकडो विडीओज नेटवर उपलब्ध आहेत. खाण्याआधी विचार करावा, हे उत्तम! दक्षिण दावणगिरी डोसा भाजताना संबंधित कारागीर त्यावर मूठ मूठभर लोणी फेकत असतात… ते लोणी गोकुळातून येत असेल तरच अस्सल असावे, अशी परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे sandwich इत्यादीवर भसाभसा खिसले जाणारे चीज मस्त असेल का? असल्यास ते विक्रेत्यांना कसे परवडते? असा सवाल उरतोच. टमेटो sauceच्या नावाखाली काय सुरु आहे ते समजत नाही. आंबा रस, आंबा सरबत किती भरपूर उपलब्ध असते ना? असो. याबाबत तुम्हीच संशोधन करा आणि द्या order!

(अस्सल पनीर तयार करणारे उत्पादक, ते विकणारे विक्रेते, त्याचे चवदार पदार्थ करून विकणारे हॉटेलचालक यांना नमस्कार! माझ्यासारख्या सामान्य खाद्यप्रेमींसाठी लिहिले आहे. इतरांनी ‘कृपया विवेक से काम लें!)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कसा सापडला कार्व्हर?” – लेखिका: प्रसन्ना ठाकूर पानसे ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “कसा सापडला कार्व्हर?” लेखिका: प्रसन्ना ठाकूर पानसे ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

पुस्तकामागच्या गोष्टी

एक होता कार्व्हर 

 प्रत्येक पुस्तकाच्या निर्मितीची काही ना काही गोष्ट ही असतेच. मराठी मनावर गेली 45 वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाच्या निर्मितीमागे ही काही रंजक गोष्टी आहेत..

 राजहंसप्रकाशन

पुस्तकाच्या सुवर्ण महोत्सवी आवृत्तीनिमित्त खास काही आठवणी तुमच्यासाठी..

प्रसन्ना ठाकूर पानसे.

त्याचं झालं असं की आपल्या मुलांना रात्री झोपताना गोष्टी सांगाव्यात, यासाठी वीणाताई व त्यांचे पती (चंद्रकांत गवाणकर) नवनवीन पुस्तकं शोधत. एके दिवशी त्यांचे पती कार्व्हरवरचं इंग्रजी पुस्तक घेऊन आले. वीणाताईंनी त्यातल्या गोष्टी रात्री झोपताना मुलांना सांगायला सुरुवात केली. नेहमी गोष्टी सांगताना झोपणारी मुलं टक्क जागी राहिली.. आई.. पुढे काय झालं गं त्याचं? असं विचारत मुलांचे डोळे झरू लागले.. हे डोळे झरणे, मुलांना इतकी उत्कटता वाटणं, हा ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाचं मूलस्थान सापडण्याचा क्षण होता..

‘तारांवरी पडावा केव्हा चुकून हात,

विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा, “

या चिं. त्र्यं. खानोलकर (#आरती_प्रभू)च्या ओळींप्रमाणे वीणाताईंच्या हाती गंधार सापडला होता…

त्यानंतर अनेक इंग्रजी पुस्तकं, संदर्भ ग्रंथ वाचत वीणाताई माहिती मिळवू लागल्या. आई आणि मुलांच्या गोष्टीतलं हे पुस्तक कागदावर येत गेलं. ही नव्या प्रवासाची नांदी होती… बाकी सोपस्कार आपोआप होत गेले. लिखाणाचे कागद माजगावकरांच्या ‘माणूस’पर्यंत पोहोचले.

मधल्या काळात काही घडामोडी घडल्या आणि ‘माणूस’ या मासिकाच्या दिवाळी अंकासाठी ‘कार्व्हर’ या विषयावर लिहायचं ठरलं. दिवाळीचा मूड लक्षात घेता संपूर्ण दिवाळी अंकात कार्व्हरची संघर्षगाथा मांडावी का? #मराठी माणसाला सातासमुद्रापारचा कार्व्हर आपलासा वाटेल का? अशा अनेक शंका माणूसचे संस्थापक श्री. ग. माजगावकर आणि दिलीप माजगावकर यांच्या मनात आल्या. प्रयोगावर भर देणार्‍या ‘माणूस’ मांसिकाने वेगळी वाट चोखाळायची ठरवली. दिवाळीचा संपूर्ण अंक ‘कार्व्हर’ या विषयावरच निघाला. ऐन दिवाळीत हा अंक उजळून गेला.

तो अतिशय लोकप्रियही ठरला. कित्येक महिने वाचकांची अभिप्रायाची पत्रं ‘माणूस’च्या कार्यालयात येत होती. सुरुवातीलाच ‘कार्व्हर’ला अशी अफाट लोकप्रियता मिळाली.

१९८१ मध्ये यावर पुस्तक काढायचं ठरलं. #दुर्गाभागवत यांनीही या सुमारास ‘कार्व्हर’वर लिहिलं होतं. पण आपल्यापेक्षाही वीणा गवाणकर यांना तो (कार्व्हर) सहजतेने उमगलाय, लिखाणाचा सूर सापडलाय, तेव्हा वीणाताईंनीच हे पुस्तक लिहावे, असा आग्रह दुर्गाबाईंनी धरला. एक लेखकानं दुसऱ्या लेखकाला समजून घेतलं तर किती उत्तम साहित्यकृती जन्माला येते याचं हे उत्तम उदाहरण.

दरम्यानच्या काळात #पुल देशपांडे यांना वीणाताईंनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. ते म्हणाले,

“हे पुस्तक लोकप्रिय ठरेल. पुस्तक स्वतःच्या पायांवर चालणारं आहे. त्याला कुणाच्या प्रस्तावनेच्या कुबड्यांची गरज नाही. “. त्यांच्या पत्रातील मजकूर मलपृष्ठावर छापण्याची परवानगी वीणाताईनी मागितली. त्यांनी उदारमनाने ती दिली. पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीवर ते पत्र छापलेलं आहे.

पुलंपासून सामान्यातल्या सामान्यांपर्यंत सर्व वयोगटातल्यांना सातासमुद्रापारचा ‘कार्व्हर’ आपला वाटू लागला. त्याच्या कथांनी मराठी माणसाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले, त्याच्या संघर्षातून प्रेरणा मिळू लागली. अपयश आलं, एकटं वाटलं, की हातात ‘कार्व्हर’चं पुस्तक येऊ लागलं. ते कधी मित्र बनलं तर कधी मार्गदर्शक (सेल्फ हेल्प बुक) झालं. मराठी माणसाच्या घराघरात हृदयात विराजमान झालं.

#अक्षरधारा च्या रसिकाताई राठिवडेकर सांगतात, की ‘कार्व्हर’ हे पुस्तक विकलं जात नाही, असा दिवस जात नाही.

बघा बरं. आजच्या पुस्तक आल्यानंतरच्या ४५ वर्षानंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. जेव्हा पुस्तक माणसाच्या मनामनात पोहोचतं, त्याला ते आपलं वाटतं, तेव्हा ती कलाकृती फक्त लेखकाची राहात नाही, तर आपल्या सर्वांची बनते. खरं सांगायचं तर लेखकाच्या आयुष्यात यापेक्षा आनंदाचा क्षण तो कोणता?

राहून राहून वाटतं या ‘कार्व्हर’ नावाच्या माणसाचं. तो बिचारा आयुष्यात स्वतःचं असं काही घेऊन आला नाही. आई ज्यानं पाहिली नाही, जन्मगाव नातलग कोणी नसलेलं ‘मेरी’चं पोर आयुष्यभर सर्वांना भरभरून देत गेलं. किती भाग्यवान ते अमेरिकेचे लोक.

आणि हो. ‘कार्व्हर’नं लेखिका प्रकाशकांनाही भरभरून दिलं. वीणाताईंनी त्यानंतर १५ पुस्तकं लिहिली आणि ती लोकप्रियही झाली. ‘#राजहंसप्रकाशन’ च्या गौरवशाली वाटचालीतलं ‘कार्व्हर’ हे मानबिंदू ठरलं. लेखक- प्रकाशक दोघांनी पुस्तकविक्रीतून मिळालेला मोठा भाग समाजासाठीही अर्पण केला.

आता चौथी -पाचवी पिढी ‘कार्व्हर’ वाचते. जेन झी लाही हे पुस्तक आपलसं वाटतंय… गेल्या 45 वर्षात

आजूबाजूचा समाज, समाजमाध्यमं बदलली, पण ‘कार्व्हर’ची लोकप्रियता सर्व वयोगटात कायम आहे.

‘कार्व्हर’ हा ‘कार्व्हर’ होता. एकमेवाद्वितीय होता, हे मान्य करावंच लागेल. आज अनेकदा आपल्या आयुष्यात प्रचंड निराशेचे, उदासीनतेचे क्षण येतात. सारं काही संपलं, असं वाटतं. त्या क्षणी या पुस्तकाचं कोणताही पान उघडलं आणि वाचलं की आपण पुन्हा सकारात्मक विचारांकडे वळतो.

कधीतरी वाटतं, या ‘कार्व्हर’वर #चित्रपट किंवा #नाटक अशी कलाकृती तयार व्हायला हवी होती.. पण नंतर

मनात विचार आला.. काहींच्या आयुष्यात, संघर्षात इतकी नाट्यमयता असते की चित्रपट फिका वाटावा. नाटकातली आभासी नाट्यमयता कमी पडावी.

या पुस्तकात वीणाताईंनी अनेक शब्दांपलीकडच्या गोष्टी मांडल्या आहेत. आपल्या मनात त्याचं चित्रीकरण होत राहतं. वाचताना प्रत्येकाच्या मनात त्याचा त्याचा म्हणून ‘कार्व्हर’ सापडत जातो.. अणि तो चिरंतन राहो..

* * * *

लेखिका: प्रसन्ना ठाकूर पानसे

प्रस्तुती: उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नर्मदा स्नान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “नर्मदा स्नान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

काही गोष्टी आपण वाचतो, किंवा पडद्यावर पाहतो सुध्दा. पण अशा गोष्टींचा प्रसंंग व त्याचा संबंध आपण अपल्याशीच लावायचा प्रयत्न केला तर… पाण्यात डुंबलेली म्हैस, किंवा तिला वा हत्तीला तलावात किंवा नदीवर नेऊन घातलेली आंघोळ… हे आपण वाचल, पाहिलं असेल. आपल्या बाबतीत मात्र…

आंघोळ हा आपला नेहमीचा शब्द. पण हिच आंघोळ पवित्र समजल्या जाणाऱ्या नदीत केली तर त्याच आंघोळीला स्नान म्हणावस वाटतं, किंवा आपण म्हणतो. असच स्नान करायच भाग्य नर्मदा ऊत्तर वाहिनी परिक्रमा करतांना पदरात पाडून घेतलं. खरतर आंघोळ करतांना पोहायला वापरतात तशी अर्धी चड्डी अंगावर असल्याने स्नानाच भाग्य पदरात पडलं म्हणण्यापेक्षा ते पवित्र पाणी अंगावर ऊडवून वाहून घेतलं. आणि अशी आंघोळ करतांना मला वर सांगितलेल्या म्हशीची आणि हत्तीची आठवण झाली.

गरुडेश्वरला आमचा एक दिवस मुक्काम होता. जवळूनच नर्मदा वाहात होती. चला तुम्हाला नर्मदा स्नान करवतो, अस म्हणत मला जे सोबत घेऊन गेले होते त्यांनी जवळपास आग्रहच धरला. मला तो रस्ता, व नर्मदेच्या काठावर असलेल्या त्या गोट्यांवरुन चालतांना त्रास होईल म्हणून मी अगोदर आढेवेढे घेतले. पण नर्मदेच ते वाहतं पाणी मनाला स्वस्थ बसू देत नव्हत. प्रवासाचा आला नसला तरी जाणवणारा शीण घालवायची ईच्छा होती. परत नदीवर आंघोळीचा आनंद कधी मिळेल? हा पण विचार होता. तो जवळचा वाटणारा पण बर्‍यापैकी लांब असणारा उताराचा, कच्चा, ओबडधोबड आणि गोट्यांनी भरलेला रस्ता त्या दोघांनी माझ्या दोन्ही हाताला धरून पार केला.

एखाद्या गिर्यारोहकाला अवघड चढणीचा चढ चढून शिखर सर केल्यावर जेवढा आनंद होत असेल तेवढाच आनंद मला तो खडकाळ रस्त्याचा ऊतार पार केल्यावर झाला. कदाचित मी पहिलाच असेल ज्याला चढाईचा नाही तर उतरण्याचा आनंद झाला असेल…

आणि मग मला सहज बसता येईल अशा खडकावर हा दगड (मी) त्यांनी बसवला. मी खडकावर बसल्यावर, आलो, आणि बसलो असा नि:श्वास मी सोडण्याच्या ऐवजी सोबतच्या दोघांनीच सोडला असावा. आणि मग ते दोघंजण दोन बाजूला ऊभे राहून त्यांच्या ओंजळींनी माझ्या अंगावर जमेल तसं, जमेल तितकं, जमेल त्या बाजूंनी मनसोक्त पणे पाणी उडवत होते आणि स्वत:ही स्नान करत होते.

आणि म्हशीला किंवा हत्तीला आंघोळ घालतांनाचा वाचलेला, पाहिलेला प्रसंग डोळ्यासमोर तरळला.

स्नान तर झालं. पण प्रसंग येवढ्यावरच थांबला का… नाही. मी बसलो तेव्हा तो खडक पूर्ण कोरडा होता. पण त्यांनी अंगावर पाणी उडवल्यावर थोडावेळ ते गार पाणी अंगावर छान वाटलं. पण नंतर…

नंतर मात्र मला काहितरी बर्‍याच प्रमाणात चावायला लागलं. त्या खडकाच्या फटिंमधे कोळ्यासारखे बारीक किडे बरेच होते. त्यांच्या घरात पाणी शिरल्याने ते भराभर बाहेर आले, व माझ्या अंगावर चढले आणि चावायला लागले. मी त्या परिस्थितीत जमेल तस पटकन ऊठायचा प्रयत्न केला, पण सगळाच भाग ओला झाल्याने पाय सरकायची भिती वाटत होती. कसातरी दोघांचा आधार घेत पाण्यात ऊभा राहिलो, परत त्यांनी थोडं पाणी अंगावर ऊडवलं आणि त्या त्रासातून मी आणि ते किडे दोघंही बाहेर पडलो.

पण जी ऊतरण ऊतरल्यावर आनंद झाला होता, ती परत त्याच पध्दतीने चढायचा प्रश्न होताच. पण परतण्याशिवाय पर्याय नव्हता. आता मी मनातच म्हटलं, चला गिर्यारोहणाचा आनंद घेऊ…

हे नर्मदा स्नान बराच क्षकाळ स्मरणात राहील ते स्नान केल्यामुळे नाही, तर चावलेल्या किड्यांमुळे. आणि म्हशीला किंवा हत्तीला घालतात तशी आंघोळ आपल्याला कोणीतरी घातल्यामुळे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”वेगळी वाट” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “वेगळी वाट” ☆ संध्या बेडेकर ☆

माझी ताई खूप हुशार. शिक्षण म्हंटल तर खूप नाही. पण स्मार्ट व नेहमी उत्साही, काही तरी वेगळे करणार. नेहमीच वेगळा विचार करणारी बदलत्या जगाबरोबर चालणारी “जून ते सर्वच सोनं ” असा समज व नवीन “आधुनिक सर्वच चांगलं किंवा खराब” या दोन्ही चा बरोबर विचार करून नवीन विचार मनात रुजवणे, तिला सहज जमत. एकतर विचार सरणी उत्तम, स्पष्ट, कुठेही ‘ confusion ‘नसते. तिच्या विचारात काल्पनिक भितीला कुठे जागाच नसते. जमलं तर उत्तम. नाही तर काही तरी केल्याचे समाधान. यश मिळेल, नाही तर अनुभव तर नक्कीच मिळेल ना. हा अनुभव कुठे तरी कामी येईल. असा विचार करणारी.

थोडी बिनधास्त, लोकांचा जास्त विचार न करणारी. त्यामुळे तिच्या कामात येणारे अडथळे कमी असतात. लोकांना भेटणे. त्यांचे विचार जाणून घेणे. व त्यावर विचार करणे जमते तिला. तिच्या प्रत्त्येक गोष्टी चे logic असते तिच्याजवळ. ते सांगताना भरपूर आत्मविश्वास सुंदर, योग्य शब्दात मांडणी, व आवाजात माधुर्य असतं. त्यामुळे तिचे विचार सहज पटतात. आपल्या मैत्रिणींमधे ती सर्वांची आवडती आहे. तिच्या गृप मधे विचारांना चालना देणे, दिशा देण्याचे काम ती छान करते. तिच्या घरी कामाला येणाऱ्या बायका खूप खूष असतात.  काकू!! तुमच्याशी बोलून छान वाटत. अस म्हणतात. थोडक्यात तिचे विचार पटतात.

“अहो!! असं करून बघा तर, नक्की जमेल तुम्हाला. व आवडेलही. “हे तिचं ब्रीद वाक्य.

तिचे म्हणणे, आपलं व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले विचार, आपले बोलणे. तुमच्या बोलण्यात तुमचे विचार झळकतात. चेहऱ्यावर कपड्यांवर थोड्या वेळाकरिता लोक भाळतात. तुमचे कौतुक करतात. यापेक्षा चांगले सशक्त विचारांचा प्रभाव जास्त वेळ राहतो.

“Branded कपडे नसलेत तरी चालेल, Branded विचार असावेत असं ती नेहमी म्हणते. ”

विचार वेगळे असावे. नवीन असावे. थोडे चौकटीच्या बाहेर चे असावे. सर्वांना प्रोत्साहित करणारे असावे. व मुख्य म्हणजे सहज अंमलात आणता येतील असे असावे. ती ‘ वेगळी वाट ‘ नेहमी शोधावी.

कोणतीही वेगळी वाट धरायला वेगळा विचार मनात आला पाहिजे. विचार पटणारा असावा. जीवनात, आपल्या कार्य पध्दतीत सहज ‘ adjust ‘ होणारा असावा. जास्त बदलाव न करता एखादे काम करायला मन सहज तयार असते. वर्षानुवर्षे एकाच विचार पद्धतीने आपण काम करतो. अगदी रोजच्या स्वयंपाकात ही बदल करायला सुध्दा खूप जण तयार नसतात. काय माहिती आवडेल का‌? असा विचार करून ते पूढे पाऊल टाकायला धजत नाही. आणि वेगळ्या वाटेने जायची इच्छा मनात येण्याआधी सर्व दरवाजे बंद करतात.

वेगळ्या वाटेवर थोडं चालून तर बघावं. हा विचार मनात येणे म्हणजेच जून्या बंधनातून स्वतः ला मुक्त करणे आले.  वर्षानुवर्षे असलेल्या सवयीला मुरड घालावी लागेल.  तेंव्हाच नवीन काही तरी घडेल. आपल्या क्षमतेनुसार, असे प्रयोग करायला काय हरकत आहे. नवीन उर्जेचा संचार होईल. स्वतः बद्दल अभिमान वाटेल. एक चांगली गोष्ट दुसरी चांगली गोष्ट करायला प्रेरित करेल. कमी त कमी काही तरी केल्याचे समाधान मिळेल.

एकदा ताईने सांगितले. म्हणाली  मला आठवत, आम्ही थाइलॅंडला जायचे ठरविले. तेथे पॅरा ग्लायडिंग हे टूर मधे करविणार होते. जेंव्हा पासून टूरचे ‘ booking ‘ झाले होते, मी रोज म्हणायचे, मी अजिबात करणार नाही. मला नाही जमणार. पण त्यावेळेस एका सत्तर वर्षांच्या बाईंनी अगदी सहज केले. व तिला बघून मी पण केले. आणि खूप आनंद झाला. काही तरी नवीन ‘ adventure ‘केल्या मुळे आत्मविश्वास वाढला. व मागच्या दोन महिन्यांत वाटणाऱ्या काल्पनिक भिती ने मी माझा वेळ, फक्त माझाच नाही, घरच्या सर्वांचाच वेळ किती खराब केला. त्याचे वाईट वाटले. तेंव्हा पासून ठरविले कुठे ही नाही म्हणायचे नाही.

सांगायचा उद्देश हा की, उगीच घाबरणे हा स्वभाव असतो. पण स्वतःला समजाविणे हे काम केल्यास, वेगळ्या वाटेने जाणे नक्की जमेल‌.

म्हणतात ना “Age is just a number. ”

काही तरी वेगळं कोणत्याही वयात करता येत. फक्त मी काय आहे?? आणि मी काय करू शकते??? या दोन्ही मधील ‘gap’. भरता आला पाहिजे.

“आता काय झालं सर्व. , देवाने जसे आयुष्य दिले तसे जगावे. , आता या वयात काय राहील आहे? हातापायांत त्राण राहिले नाही. त्यामुळे रोजचा दिवस जसा उगवेल तसा काढायचा. “हे असे विचार म्हणजे सर्व दरवाजे बंद करणे. नवीन विचारांना डोक्यात शिरूच द्यायचे नाही. अपयशाच्या भिती ने तडजोडीचे आयुष्य जगण्यात काय मजा??”

शांत बसून दिवस घालविणे, म्हणजे जून्या घटना त्याही आपल्या बरोबर जे चूक झाले, वाईट झाले, ते उगाळत बसायचे. कारण असेच विचार मनात लगेच येतात. आपणच आपल्या विचारांना ती संधी देतो. व स्वतः ला दुःखी, असहाय समजत जातो.  .

वयामानाप्रमाणे हे सर्व होणारच आहे. पण बुध्दी जागृत आहे ना. अनुभव पाठीशी आहे. रिकामा वेळही आहे. प्रत्त्येक गोष्ट करायला धावायची गरजही नाही. तेंव्हा मी या सद्य परिस्थितीत काय करू शकते??? हा विचार मनात आला, तर दहा गोष्टी सहज सूचतात. त्यातील एक निवडून करणे. म्हणजेच वेगळी वाट शोधणे होय.

कुठे तरी वाचलेलं एक वाक्य मला खूप आवडतं

“The greatest lesson I have learned in life is that I still have lot to learn. ”

जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत राबराब राबणे, म्हणजे आयुष्य जगणे नव्हे. स्वतः च्या समाधानासाठी, आनंदाने जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य जगणे होय.

वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत. नवीन वेगळे रस्ते शोधले पाहिजेत.

म्हणतात ना,

“आयुष्य म्हणजे मानलं तर मौज.

नाही तर आहेतच समस्या रोज. “

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तिला पाहिले मी… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ “ तिला पाहिले मी… ☆ राधिका भांडारकर ☆

नऊ आठची गाडी स्थानकात आली होती. ती ब्रिजच्या पायर्‍यांवरून धावत धावत हातातली पर्स आणि काही किरकोळ सामान सांभाळत कशीबशी गाडीपाशी येउन आत शिरली.

तेव्हाच तिला मी पाहिलं. जराशी उंच, सावळीच पण तजेलदार, सडपातळच पण भरीव वक्षस्थळे असलेली ती कशी माझ्या नजरेतच बसली. सुंदर नव्हती पण काहीतरी अपील होता तिच्यात. आणि काहीसे पिंगट आणि जरासे मोठे डोळे.

सारंच क्षणात हृदयाला भेदून गेलं होतं.

घंटी बज गयी. पण पुढे काय?

अरेच्चा! चढता चढता तिच्या मनगटावरचं घड्याळ निसटलं आणि त्याच क्षणी गाडी सुटली. मी ते घड्याळ उचललं.

दिवस खरोखरच सुंदर गेला. मनातल्या मनात तिचा विचार करताना आणि तिला पाहतानासुद्धा.

दुसर्‍या दिवशी नउ आठला मी रेल्वे स्थानकावर. ती आधीच आलेली होती.

निळी शिफॉनची साडी. त्यातून जाणवणारी तिची बारीक कमर आणि झिरपणारं पातळ पोट. मनात वाहणारे सगळे स्त्रोत बांधून ठेवले. तिच्या जवळ गेलो.

“हे घड्याळ. तुमचंच ना? काल गाडीत घाईघाईने चढत असताना निसटलं तुमच्या हातावरून. ”

तिनं अक्षरश:माझ्या हातून ते घड्याळ झपाट्याने घेतलं.

“अय्या! how sweet of you! खूप थँन्क्स. ”

धडधडत गाडी आली आणि गेलीही.

 

कसं आहे ना? आयुष्य म्हणजे सिनेमा,

कादंबरी, कथा काही नसते.

त्यादिवशी तिला मी पाहिले. ती मनात बसली. ती बेचैनी अनुभवली.

 

पन्नास वर्षानंतरही ती डिलीट नाही झालेली. आहे अजूनही मनात आहे. जशी पाहिली होती तशीच.

सध्या ती काय करत असेल?

कधीकधी गुपचूप चुपके चुपके मी उगीचच तिला फेसबुकवर शोधतोही.

एकमात्र वाटते, अशा मूर्खपणातही 

मनातला एक चोरटा रोमँटिक कोपरा ताजा राहतो.

माझ्यासारख्या सभ्य, संस्कारशील, निष्ठा सांंभाळणार्‍या संसारी व्यक्तीसाठी.

©  राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४१ आणि ४२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४१ आणि ४२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ४१ — 

बहु हिंडता सौख्य होणार नाही |

सीणावे परि नातुडे हीत काही |

विचारे मना अंतरा बोधवीजे|

मना सज्जना राघवी वस्ती कीजे|४१|

अर्थ:  समाधान किंवा आनंद प्राप्त व्हावा म्हणून खूप हिंडले किंवा फिरले तरी समाधान होणार नाही. त्याने नाहक श्रम मात्र होतील पण हाती काही लागणार नाही. म्हणून हे मना, तू नीट विचार करून स्वतःची समजूत घाल आणि भगवंतापाशीच कायमचा आश्रय घे.

(नातुडे – साध्य होत नाही/ हाती लागत नाही, अंतरा – अंतर्मन)

विवेचन : हा अतिशय अर्थगर्भ असा श्लोक आहे. “बहु हिंडता सौख्य होणार नाही “या ओळीचे तीन प्रकारचे अर्थ घेता येतात. आपल्या जीवनात आनंद मिळावा, समाधान प्राप्त व्हावे म्हणून आपण वणवण हिंडत असतो. व्यंकटेश स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे “अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा. ” आपल्या उपजीविकेसाठी सुद्धा आपण आयुष्यभर वणवण करत असतो. उपजीविकेसाठी, पोटासाठी धावपळ करणे हे समजू शकते. हा पहिला अर्थ घेता येईल.

दुसरा अर्थ असा सांगता येतो की परमार्थात सुद्धा माणसे खूप भटकत असतात पण त्यांच्या हाती फारसे काही लागत नाही. मन:शांती नाही, अनेक गोष्टी मनासारख्या घडत नाही म्हणून लोक बाबा, बुवांकडे हिंडत असतात. देवालये, नाना प्रकारची तीर्थक्षेत्रे, तीर्थयात्रा माणूस आयुष्यभर करत राहतो. पण तीर्थक्षेत्री जाऊन सुद्धा तो कोरडाच राहतो. या ठिकाणी एक पौराणिक कथा आठवते.

महाभारतातील युद्ध नुकतेच संपलेले असते. युद्ध संपले असले तरी भीम, अर्जुन आपण युद्धात कसा पराक्रम केला त्याच्याच गोष्टी करीत असतात. हे सगळे ऐकताना श्रीकृष्ण तेथे उपस्थित असतो आणि त्याला हे सगळे ऐकताना गालातल्या गालात हसू येते. युद्धात झालेल्या नरसंहारामुळे धर्मराज युधिष्ठिर अस्वस्थ झालेला असतो. त्याच्या मनात मनःशांतीसाठी तीर्थयात्रेला जायचे असते. तो तीर्थयात्रेचा विषय काढताच भीम आणि अर्जुनही तीर्थयात्रेला जाण्यासाठी तयार होतात. नकुल सहदेव तर तयारच असतात. कृष्ण त्यांना म्हणतो, ” माझे एक काम करा. मी तुम्हाला एक लिंबाची काडी देतो. तुम्ही ज्या ज्या तीर्थक्षेत्री जाल, त्या त्या ठिकाणी त्या काडीलाही तुमच्याबरोबरच स्नान घाला आणि लवकरात लवकर परत या. ”

पांडव मग हरिद्वार, ऋषिकेश इ ठिकाणी तीर्थयात्रा करून परत येतात. कृष्ण मग भीमाला म्हणतो की मी तुला ती लिंबाची काडी दिली होती, ती परत आणलीस का, तिला स्नान घालत होतात ना? मग भीम ती काडी घेऊन येतो. कृष्ण त्याला म्हणतो, ‘ आता या काडीला तुम्ही सगळ्या तीर्थक्षेत्री स्नान घातल्यामुळे ती पवित्र आणि गोड झाली असेल. तेव्हा तू ती खाऊन टाक. ‘ त्यावर भीम म्हणतो, ‘ केशवा, आमची चेष्टा करतोस का? कितीही स्नान घातले तरी लिंबाची काडी गोड कशी होईल? ‘

तेव्हा कृष्ण ते निमित्त करून त्यांना समजावून सांगतो की आपल्या मनाचेही तसेच आहे. नुसती तीर्थयात्रा केल्याने आपण पवित्र आणि मन शांत होत नाही. त्या ठिकाणी शरीरशुद्धी बरोबरच मनातील पापे, वाईट वासना सुद्धा नष्ट झाल्या पाहिजेत. आपले मन जर पवित्र आणि शुद्ध असेल तर तीर्थाला जाण्याची सुद्धा गरज नाही. समर्थ आपल्याला या श्लोकात हीच गोष्ट समजावून सांगतात.

तिसरा अर्थ सर्वात महत्त्वाचा वाटतो. तो हा की हिंडत राहणे म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून हिंडत राहणे. विषयवासनांमुळे पुन्हा पुन्हा जन्म घेणे, मृत्यू पावणे आणि पुन्हा जन्म घेणे हे चक्र सुरू राहते. यालाच समर्थ बहु हिंडता सौख्य होणार नाही असे म्हणतात. कारण यातून कोणतेही हीत साध्य होत नाही. अनेक जन्म घेऊनही मुक्ती मिळणार नाही, ईश्वर प्राप्ती होणार नाही. जीवात्मा मात्र जन्ममृत्यूच्या या चक्रात भरडून निघतो.

मग अंतिम समाधान किंवा सौख्य कुठे मिळेल? तर ते एका परमेश्वराच्याच ठायी आहे. आपण विचार करून आपल्या मनाला या गोष्टीचा बोध करून दिला पाहिजे. आणि त्या राघवाच्या ठिकाणीच आपले मन कायम स्वरूपी एकाग्र केले पाहिजे. “सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर.. “असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते यासाठीच!

स्वसंवाद :: 

१) मी आयुष्यात कशासाठी सर्वाधिक वणवण केली? पैशासाठी, यशासाठी की मनःशांतीसाठी? त्यातून खरे समाधान मिळाले का?

२) लिंबाची काडी स्नानाने गोड होत नाही. माझ्या बाह्य धार्मिक कृतींमागे अंतर्मनाची शुद्धी आहे का?

३) तीर्थयात्रा, उपवास, पूजापाठ या गोष्टी मी करतो. परंतु माझ्या मनातील वाईट विचार, राग, मत्सर कमी झाले आहेत का?

४) जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती हे आपले अंतिम ध्येय आहे. माझ्या दैनंदिन जगण्यात या ध्येयाची जाणीव मला असते का?

– – – –

श्लोक क्र. ४२ – – –

बहुतांपरी हेचि आता धरावे |

रघुनायका आपुलेसे करावे|

दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे|

मना सज्जना राघवी वस्ती कीजे|४२|

अर्थ : हे मना, तुला वेगवेगळ्या प्रकारे सांगून झाले. आता ही एकच गोष्ट लक्षात ठेव की रघुनायकाला म्हणजे रामाला तू आपलेसे कर. तो अनाथांचा नाथ आहे असा त्याचा लौकिक सर्वत्र गाजतो आहे. तेव्हा तू मनाने भगवंतपाशीच कायमचा निवास कर.

(बहुतांपरी – वेगवेगळ्या प्रकारे, धरावे – लक्षात ठेव, तोडर – पायातील किंवा हातातील एक अलंकार/तोडा/तोरड्या)

विवेचन : सगळ्या गोष्टींचा (आपल्या कर्तव्याचा किंवा स्वधर्माचा नव्हे) म्हणजे माया, मोह इत्यादींचा त्याग करून भगवंताला शरण जावे हे वेगवेगळ्या प्रकारे सांगून झाले असे समर्थ आपल्याला सांगतात. इथे बहुतांपरी या शब्दाचे दोन अर्थ घेता येतात. पहिला अर्थ म्हणजे नाना परीने, निरनिराळ्या प्रकारे. जी लहान मुले ऐकत नाहीत त्यांना आपण निरनिराळ्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तसेच समर्थ देखील आपल्याला हे वेगवेगळ्या शब्दात समजावून सांगतात. चांगल्या गोष्टी या परोपरीने पुन्हा पुन्हा सांगून मनावर ठसवाव्या लागतात. तसेच समर्थ या ठिकाणी करतात परंतु अशा गोष्टींनाही एक मर्यादा असते. म्हणून ते निर्वाणीचे सांगतात की आता तू रघुनायकाला म्हणजे भगवंताला आपलेसे कर.

बहुतांपरी या शब्दाचा दुसराही अर्थ असा घेता येतो की परमेश्वराचे जे अनेक भक्त झाले, त्यांच्याप्रमाणे तू वाग आणि परमेश्वराला आपलेसे करून घे. रामायणातील कैकयी, रावण यासारखी काही मोजकी पात्रे वगळली तर बहुतेक इतरांनी श्रीरामांना भक्तीने आपलेसे करून घेतले आहे. हनुमान, बिभीषण, शबरी, गुहक असे अनेक जण त्यांचे भक्त होते. सुदामा, कुंती, द्रौपदी, पांडव, विदुर यासारखी अनेक मंडळी श्रीकृष्णाची भक्त होती. त्यांनी श्रीकृष्णाला आपलेसे करून घेतले होते. श्रीकृष्ण त्यांना आपला सखा, मित्र, बंधू, मार्गदर्शक, तारणहार असे सगळे काही वाटत होता.

रावणाला श्रीरामांबद्दल सर्वांनी सांगितले. परंतु त्याला ते कधी आपलेसे वाटले नाहीत. त्याला स्वसामर्थ्याचा अहंकार होता. पांडवांना श्रीकृष्ण जसा आपला वाटला, तसा दूर्योधन आणि अन्य कौरवांना कधी वाटला नाही. ज्यांना ज्यांना भगवंत आपला वाटला नाही, त्यांचा मार्ग चुकला. ते नको त्या मार्गाने गेले आणि शेवटी त्यांचा विनाश झाला.

जसा अहंकारी माणूस व्यवहारातही कोणाला आवडत नाही. तसा तो भगवंताला सुद्धा आवडत नाही. अहंकार हा अध्यात्मात फार मोठा शत्रू आहे. म्हणून आपण आपला सर्व अहंकार टाकून भगवंताला शरण जावे आपल्याला तो आपलासा वाटला पाहिजे.

तो ‘ दीनानाथ ‘ आहे, हे त्याचे ब्रीद सर्वत्र गाजते आहे. इथे आपण ‘दीनानाथ ‘या शब्दाचा अर्थ केवळ दीनदुबळ्यांचा नाथ असा न घेता शरणागताला आश्रय देणारा असा घ्यायचा आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर भगवंताशिवाय ज्यांना आपले दुसरे कोणी नाही असे वाटते अशांचा तो नाथ आहे. संत मीराबाई म्हणतात, ” मेरे तो गिरीधर गोपाल दूसरो न कोई. ” तेव्हा हे मना तू केवळ एका राघवाचा म्हणजेच भगवंताचा आश्रय घे.

भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, तर भगवंताशी जोडलेले एक जिव्हाळ्याचे, आत्मीय असे नाते आहे. ज्याला भगवंत “आपला” वाटतो, त्याचा जीवनप्रवास सुकर होतो. आणि ज्याने भगवंताला “आपलेसे” केले, त्याला दुसऱ्या कोणत्याही आधाराची गरज उरत नाही.

स्वसंवाद ::

१) माझे भगवंताशी नाते कसे आहे? त्यात प्रेम, समर्पण भाव आहे का? की ते गरजेपोटी आहे?

२) माझ्या स्वभावातील अहंकार मला जाणवतो का? तसे असेल तर तो कमी करण्यासाठी मी काय करतो?

३) संकटाच्या वेळी खरोखर एकमात्र भगवंतच मला तारील असा त्याच्यावर विश्वास ठेवतो का? (क्रमशः)

– क्रमशः श्लोक ४१ आणि ४२.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एशो हे बॉयशाख…  – लेखक : श्री कौस्तुभ आजगावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ एशो हे बॉयशाख…  – लेखक : श्री कौस्तुभ आजगावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

हल्लीच झालेल्या बंगाली नववर्षाच्या निमित्ताने हे गाणं परत आठवणीत आलं – _एशो हे बॉयशाख, एशो एशो_.

एशो, एशो, एशो हे बॉयशाख

(ये वैशाखा)

तापोशोनिश्वासोबाये मूमुर्शुरे दाओ उराये,  

बॉत्सॉरेर आबॉर्जोना दूर होये जाक जाक जाक

(हे वैशाखा, जीर्ण झालेलं सारं काही तुझ्या तापस निःश्वासाने उडवून दे. जुन्या वर्षाचा सारा कचराही (त्या बरोबर) दूर होऊ दे.)

जाक पुरातन स्मृती, जाक भूले जावा गीती

जाक अश्रुबाष्पो सुदूरे मिलाक

(जुन्या अडगळसदृश आठवणी जाऊ देत,

जुनी, ओझं झालेल्या भावनांची गाणीही जाऊ देत,

अश्रूंची वाफ होऊन ती दूर जाऊ दे)

मुछे जाक ग्लानी, घुचे जाक जोरा

ओग्निस्नाने शुचि होक धॉरा 

रॉशेरॉ आबेशॉराशी शुष्को कोरी दाओ आशि

(ग्लानी, मरगळ जाऊ दे,

जरा/वार्धक्य/थकवा अदृश्य होऊ दे

अग्निस्नानाने धरा पावन होऊ दे)

आनो आनो आनो ताबो प्रालयेरो शांख

मायार कुज्जटि-जाल जाक दूरे जाक जाक जाक

(आण तुझा प्रलयसूचक शंख,

मायेच्या धुक्याचा हा पडदा दूर कर)

– – – वैशाखाचं स्वागत करणारं गीत. रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं.

मराठी वाचकाला वैशाखवणव्यापासून ते मर्ढेकरांच्या “जगास तोवर वैशाखाच्या मृगाविनाही मृगजळ चढते” या ओळीपर्यंतचा वैशाख परिचयाचा आहे. दुर्गाबाईंच्या ‘ऋतुचक्र’मधला सूर्याच्या आगीत भाजून निघालेला, पण अंगावर नाद-रूप-सुगंधाची सौंदर्यचिन्हं धारण केलेला वैशाख आपण अनुभवलाय.

… याच वैशाखाचं रवींद्रनाथ स्वागत करतात ते नवीन वर्षाचा पहिला महिना म्हणून.

त्यामुळे वैशाखाच्या ऊष्ण निःश्वासाबरोबर जुनं सारं मरणालागुनी जाऊ दे, जुन्या वर्षाचा सारा कचरा निघून जाऊ दे अशा ओळी येतात. आता नव्या वर्षाची नवी गाणी गायची आहेत, म्हणून जुन्या आणि ओझं झालेल्या आठवणी, दुःखं, जुनी झालेली गीतं सोडायची आहेत.

जाक अश्रुबाष्प सुदूरे मिलाक

(उष्णतेमुळे) अश्रूंची (दुःखाची) वाफ होऊन ते दूर जाऊ दे.

ग्लानी, नैराश्य, हतबलता सारं मागे जाऊ दे.

आणि पुढच्या कडव्यात ही ओळ येते.

अग्निस्नाने शुचि होक धरा!

… वैशाखाच्या या सृष्टी भाजून काढणाऱ्या उष्णतेला रवींद्रनाथ अग्निस्नान म्हणतात आणि म्हणून, वैशाखाच्या या पावकस्वरूपी अग्निस्नानाने ही धरा, हे जग पावन होऊ दे, ही प्रार्थना.

किती सुंदर कल्पना. सारं जुनं जाळून नव्या सर्जनासाठी सृष्टी नव्याने उभी करणारा वैशाख.

… फार वेगळा आणि अतिशय सुंदर असा वैशाखाचा अनुभव मला हे गीत देऊन गेलं.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : कौस्तुभ आजगांवकर

(रवींद्रनाथ – वैशाख)

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फ्रीजला पण स्वभाव असतो.. ” – लेखिका : विनया रायदुर्ग ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “फ्रीजला पण स्वभाव असतो.. ” – लेखिका : विनया रायदुर्ग ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक 

असे म्हणतात की एखाद्या घराची परीक्षा त्या घराच्या फ्रिजवरून होते… माझी आजी फ्रिजला आळशी कपाट म्हणायची. तिला वाटायचे की ज्या वस्तू नीट ठेवायच्या नसतील, त्या कोंबण्यासाठी असतो हा फ्रिज.

त्याच्या पुढे जाऊन मला असे वाटते की फ्रिज हा घरच्या घडामोडींचा आणि वातावरणाचा द्योतक असतो.

माझ्या निरीक्षणात आलेले विविध प्रकारचे फ्रिज:

आळशी फ्रिज:

या फ्रिजमध्ये काय सापडेल, याचा नेम नसतो. या फ्रिजमधले पदार्थ तिहार जेलच्या कैद्यांसारखे बाहेर पडायची वाट बघत असतात… आणि एकमेकाना तू इथे कधीपासून आहेस हा प्रश्न विचारताना आढळतात. फाशीची शिक्षा मिळूनही प्रत्यक्षात ती मिळेपर्यंत वाट बघणाऱ्या कैद्यांप्रमाणे बसलेल्या एक्सपायरी डेट गेलेल्या बाटल्यांपासून कधीही घरचे लोक भेटायला न येणाऱ्या कैद्यांसारख्या दुर्लक्षित काही दिवसापूर्वीच्या उरलेल्या शिळ्या अन्नापर्यंत सर्व प्रकार असतात इथे! काही जन्मठेप मिळालेल्या भाज्या निर्विकारपणे ‘सडत’ पडलेल्या असतात.

हा फ्रिज जेलरच्या थंड डोक्याने या सर्व गोष्टींना सामावून घेत असतो!

टापटीप फ्रिज

या फ्रिजमध्ये सर्व वस्तूंना ध्रुवबाळासारखे स्वतःचे स्थान असते. प्रत्येक डब्याला स्वतःचे झाकण असते. भाज्यांच्या ट्रे मधल्या भाज्या फ्लॅट संस्कृतीप्रमाणे बंद डब्यात बसलेल्या असतात. त्यांना शेजारच्या भाजीचा “गंध” देखील नसतो.

बॅचलर फ्रिज

हा फ्रिज सहसा रिकामाच असतो. भाड्याच्या घरात घरमालकांनी ठेवलेल्या या फ्रिजमध्ये हॉटेल रूमच्या फ्रिजसारख्या फक्त बाटल्या मात्र असतात. कधी काळी येऊन गेलेल्या आईने जाताना पुसून गेल्यावर त्या फ्रिजची कोणी विचारपूस अथवा घासपूस केलेली नसते.. जाताना आईने करून ठेवलेली लोणची मुरंबे सांभाळत आईची आठवण काढत हा फ्रिज बसलेला असतो. कधी काळी अचानक आलेल्या गर्लफ्रेंडला किचनमधील पसारा दिसू नये म्हणून वस्तू कोंबण्यासाठीही याचा उपयोग होतो.

नवविवाहित फ्रिज

हा फ्रिज उत्साहाने आणि तरुणाईने सळसळत असतो. घरच्या जुन्या वस्तूंच्या बरोबरीने सुपर मार्केटमध्ये मिळणारी एक्झॉटिक फळं आणि फ्रोझन पदार्थांची रेलचेल असते या फ्रिजमध्ये. सगळे नवे पदार्थ या फ्रिजमध्ये स्वतःचे स्थान शोधत असतात. काचेच्या नव्या कोऱ्या बाटल्यांमध्ये शेजारी शेजारी चिकटून बसलेली ऑलिव्ह ऑइलमध्ये केलेली लोणची पाहून जुनी मुरलेली लोणची नाक मुरडत असतात.

NRI फ्रिज

इतर कुठल्याही फ्रिजपेक्षा गच्च भरलेला हा फ्रिज कायम आपला कंफ्युज्ड असतो. माहेरून आणलेली पिठं, मसाले, पापड, लोणची एकीकडे सांभाळताना दुसरीकडे मुलांच्या आवडीचे चीज, पिझ्झा, जेली प्रकारही तो लीलया सांभाळत असतो… मात्र जास्त जागा कुठल्या पदार्थांना द्यायची या संभ्रमात असतो. अगदी त्या घरच्या गृहिणीसारखा… तोच संभ्रम.. मुलांची आवड सांभाळताना आपली आवड मात्र फ्रीझरमध्ये गोठवणारा!

ज्येष्ठ नागरिक फ्रिज

या सर्वात केविलवाणा असणारा… एकेकाळी मुले मोठी होत असताना भरलेल्या या फ्रिजला आता पुन्हा दोघेच राहत असताना आलेलं रिकामपण खायला उठत असते. एकेकाळी चॉकलेटनी भरलेल्या कप्प्यांची जागा आता इन्सुलिन इंजेक्शनच्या पेनांनी घेतलेली असते. आईस्क्रीमऐवजी फ्रीझरमध्ये मुलांनी भारत भेटीत दिलेला सुकामेवा असतो.. सणावारांना मुलांच्या आठवणीसारखाच हमखास बाहेर येतो तो. भाजीचा ट्रे रिकामा असतो, कारण विरंगुळा म्हणून रोजची भाजी रोज संपवली जाते. उमेदीच्या काळातली वेळेची तारांबळ आता नसल्याने त्या ट्रेला काही कामच नसते.

कसाही असो मात्र फ्रिजला प्रत्येक घरात मानाचे स्थान असते. जुना असो व नवा, हा जर बंद पडला तर साऱ्या घराचे चैतन्य थंड पडते!

लेखिका : विनया रायदुर्ग

प्रस्तुती : शशी नाडकर्णी-नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘काळाच्या भाळावरील निळा टिळा : शनि’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘काळाच्या भाळावरील निळा टिळा : शनि’ ☆ श्री दिवाकर बुरसे

आमावास्या, शनिवार आणि शनिजयंतीच्या दुर्मिळ त्रिपेडी संगमातून उलगडणारा विश्व, पुराण आणि कर्मतत्त्वाचा गूढ महोत्सव

१६ मे २०२६. वैशाख अमावास्या. शनिवार. आणि शनिजयंती.

कालगणनेच्या अथांग पटावर क्वचितच उमटणारा हा योग — जणू वेळेने स्वतःच्या कपाळावर निळा तिलक धारण केलेला दिवस!

भारतीय संस्कृतीत काही दिवस हे केवळ पंचांगातील अंक नसतात; ते सामूहिक स्मृतीतील गूढ दीपस्तंभ असतात. हा दिवस तसाच — गंभीर, चिंतनशील आणि आत्मपरीक्षणाला बोलावणारा.

शनिचे नाव उच्चारताच अनेकांच्या मनात भीती दाटते. पण शनी म्हणजे भय नव्हे;

शनी म्हणजे शिस्त.

शनी म्हणजे दंड नव्हे;

तर कर्मांचे निर्विकार प्रतिबिंब.

“जिथे इतर ग्रह झंकारत आहेत,

तिथे शनी हा गंभीर मंद्रनाद आहे.”

 

सूर्यमालेतील निळा संन्यासी

सूर्यापासून सातव्या क्रमांकावर विराजमान असलेला शनी हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा महाकाय ग्रह. गुरुच्या नंतरचा विराट अधिपती. पृथ्वीपेक्षा जवळजवळ नऊ पट मोठा!

त्याचा व्यास सुमारे १,२०,५०० किलोमीटर. इतका प्रचंड की त्यात पृथ्वीसारखे शेकडो ग्रह सामावू शकतील.

परंतु त्याचे खरे वैभव त्याच्या भोवतीच्या वलयांत आहे.

“नभाच्या कपाळी कोणी

रुपेरी वर्तुळांची रेघ ओढली?”

शनीभोवती फिरणारी बर्फ, धूळ, खनिजे आणि सूक्ष्म खडकांनी बनलेली वलये म्हणजे विश्वातील सर्वात अद्भुत दृश्यांपैकी एक. वैज्ञानिक त्यांना “रिंग्स” म्हणतात; भारतीय कविमनाला मात्र त्यांना “शनीची दिव्य किरीटमाला” म्हणावेसे वाटते.

त्या वलयांकडे पाहताना वाटते —

“विधात्याने एखाद्या तपस्व्याच्या जटांभोवती

हिमकणांची रुद्राक्षमाळ गुंफली आहे.”

किंवा जणू —

“काळाच्या अथांग जलधीवर

अनंततेची वर्तुळे उमटली आहेत…”

शनीभोवती चौदा मुख्य वलये आणि हजारो सूक्ष्म कड्यांची रचना आहे. लोकपरंपरेत “चौदा कडींचा शनी” अशीही प्रतिमा आढळते — अनंत वलयांच्या त्या गूढ विस्ताराचीच ती काव्यमय छाया.

पृथ्वी आणि शनी : दोन टोकांची कथा

पृथ्वी — जल, वनराई, चैतन्य आणि जीवनाची धावपळ.

शनी — थंडी, अंधार आणि गंभीर शांततेचा अधिपती.

“पृथ्वीवर जीवन धावते;

शनीवर काळ ध्यानस्थ बसतो.”

पृथ्वीवर एक वर्ष पूर्ण व्हायला ३६५ दिवस लागतात; तर शनीवर एक वर्ष पूर्ण व्हायला जवळजवळ २९.५ पृथ्वीवर्षे!

याच मंद गतीमुळे त्याचे नाव पडले शनैश्चरशनैः शनैः चरति इति शनैश्चर

म्हणजे — “जो हळू हळू चालतो तो शनी.”

तो धावत्या ग्रहांचा अधीर अधिपती नाही;

तो संथ सावल्यांचा सम्राट आहे.

शनीच्या वातावरणात मुख्यतः हायड्रोजन आणि हिलियम वायू आहेत. त्याचे तापमान उणे १७० अंश सेल्सिअसपर्यंत घसरते.

घन पृष्ठभाग नाही; सर्वत्र वायूंचे अथांग साम्राज्य.

तिथले वारे इतके प्रचंड असतात की पृथ्वीवरील वादळेही त्यांच्या पुढे बालखेळ वाटावीत.

 

पुराणातील कृष्णवर्णीय तपस्वी

भारतीय पुराणांनुसार शनी हा सूर्यदेव आणि छाया (संवर्णा) यांचा पुत्र.

सूर्याची प्रखरता आणि सावलीची गंभीरता — या दोन टोकांच्या मिलनातून जन्मलेला देव!

त्याचा भाऊ यम. बहीण भद्रा.

एक मृत्यूचा न्यायाधीश; दुसरा कर्मांचा.

कथेनुसार, शनीच्या जन्मावेळी त्याची माता कठोर तप करीत होती. त्या तपाच्या प्रभावाने बालक शनी कृष्णवर्णीय झाला. सूर्याने संशयाने त्याच्याकडे पाहिले, आणि शनीच्या कटाक्षाने सूर्यालाच क्षीणता जाणवली.

“त्याच्या नेत्रांत क्रोध नव्हता;

तिथे फक्त कर्मांचा आरसा होता.”

शनीचे वाहन — कावळा.

हातात दंड.

वेष गंभीर.

स्वभाव कठोर; पण अन्यायी नव्हे.

“शनीची दृष्टी जाळत नाही;

ती आडोशांनाही वितळवते.”

 

शनीच्या लीला आणि लोककथा

हनुमंत आणि शनी

लोककथेनुसार, रावणाने ग्रहांना बंदी बनवले होते. हनुमंताने त्यांची सुटका केली. तेव्हा प्रसन्न होऊन शनीने वर दिला —

“जो तुझी भक्ती करील, त्याला माझ्या पीडेचा त्रास कमी होईल.”

म्हणूनच शनिवारी मारुतीपूजनाची परंपरा दृढ झाली.

 

राजा विक्रमादित्याची कथा

नवरत्नांमध्ये श्रेष्ठत्वावरून झालेल्या वादात विक्रमादित्याने शनिला कमी मान दिला. शनिदशा सुरू होताच राजाला राज्य, वैभव, प्रतिष्ठा सर्व गमवावे लागले. अनेक संकटांतून गेल्यावर अखेरीस शनीने त्याची परीक्षा पूर्ण झाल्याचे घोषित केले.

ही कथा सांगते —

“शनी अहंकार मोडतो;

पण पात्रता घडवतो.”

 

ज्योतिषातील कर्मफलदाता

भारतीय ज्योतिषशास्त्रात शनीला “कर्मांचा लेखाधिकारी” म्हटले जाते.

तो विलंब करतो; पण अन्याय करत नाही.

जन्मकुंडलीत शनी ज्या भावात असेल, त्या क्षेत्रात संघर्ष, संयम आणि परिपक्वता निर्माण होते.

 

साडेसाती : भीती की बोध?

जेव्हा शनी जन्मराशीच्या मागील, जन्मराशीतील आणि पुढील राशीत अडीच अडीच वर्षे भ्रमण करतो, तो काळ “साडेसाती” म्हणून ओळखला जातो.

लोक त्याला घाबरतात; पण अनुभवी ज्योतिषी म्हणतात —

“शनी देतो ते उशिरा देतो;

पण दिलेले टिकाऊ असते.”

तो मकर आणि कुंभ राशीचा स्वामी.

तुला राशीत उच्च, मेषेत नीच.

श्रम, लोखंड, तेल, कारखाने, न्याय, कारागृह, तत्त्वज्ञान, वैराग्य, श्रमिक — या सर्वांचा कारक ग्रह म्हणजे शनी.

“शनीची चाकरी आणि लोखंडाची भट्टी —

दोन्ही माणसाला तावूनसुलाखून काढतात.”

 

भारतीय मनातील शनी

भारतीय जनमानसात शनीविषयी भीती आणि भक्ती यांचे विलक्षण मिश्रण दिसते. शनिवारचे तेलदान, काळे तीळ, कावळ्यांना अन्न, शनीमंदिरातील प्रदक्षिणा — या केवळ धार्मिक कृती नाहीत; ती सामाजिक श्रद्धाप्रतीकेही आहेत.

कारण शनी हा राजांचा नव्हे, तर श्रमिकांचा देव मानला जातो.

गरीब, उपेक्षित, श्रमजीवी आणि पीडित यांच्याशी करुणेने वागणे — हीच खरी शनिभक्ती, असा लोकविश्वास आहे.

“काळ, कर्म आणि कठोर करुणेचा कारभारी —

हाच शनी.”

 

आमावास्या, शनिवार आणि शनिजयंती : त्रिसंगमाचे गूढ

आमावास्या म्हणजे अंतर्मुखतेची रात्र.

शनिवार म्हणजे कर्मपरीक्षणाचा दिवस.

आणि शनिजयंती म्हणजे न्यायदेवतेच्या अवताराची स्मृती.

या तिन्हींचा संगम म्हणजे आत्मपरीक्षणाची सुवर्णसंधी.

हा दिवस देवाला प्रसन्न करण्यापेक्षा स्वतःला प्रामाणिकपणे पाहण्याचा आहे.

“विश्वात काही तारे तेजाने स्मरले जातात;

पण शनीसारखे काही ग्रह

शांत अंधाराने लक्षात राहतात.”

शनी : भयाचा नव्हे, बोधाचा ग्रह

शनीची भीती वाटण्याचे कारण त्याचा कोप नसतो;

तर आपल्या कर्मांबद्दलची अस्वस्थता असते.

जो सत्यप्रिय, श्रमशील, संयमी आणि न्यायी असेल, त्याच्यासाठी शनी हा कृपादाता आहे.

“जळून सोनं शुद्ध होतं,

तसंच दुःखातून माणूस.”

आणि म्हणूनच —

शनी म्हणजे शिक्षा नव्हे — शुद्धीकरण.

शनी म्हणजे अंत नव्हे — अंतरंगाचा आरंभ.

 

उपसंहार

त्या दूर निळसर ग्रहाकडे पाहताना, त्याच्या वलयांत आपल्यालाच वेढून ठेवणारे काळाचे चक्र दिसते. सूर्याच्या तेजात जो ग्रह सावलीसारखा फिरतो, तोच मानवाला प्रकाशाचा खरा अर्थ शिकवतो.

नभात तो निळा दिसतो,

पण त्याचा खरा रंग कर्मांचा आहे.

“सावल्यांच्या सिंहासनावर

निळा न्यायाधीश बसला;

कर्मांच्या कणाकणांचा

हिशेब काळाने जपला.

मंद चालतो शनी,

पण चुकत नाही पाऊल;

कर्मांच्या शेतात उगवतो

न्यायाचा निळा फुलोरा…”

 

शनीचा  वैदिक मंत्र-

ॐ शन्नोदेवीर-भिष्टयऽआपो भवन्तु पीतये शंय्योरभिस्त्रवन्तुनः।

शनीचा पौराणिक मंत्र-

नीलांजनसमाभासं रविपुत्र यमाग्रजम्

छायामार्तण्डसंभूत तं नमामि शनैश्चरम् ॥

शनीचा गायत्री मंत्र-

ॐभगभवाय विद्महैं मृत्युरुपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यात्।

शनीचा तांत्रिक मंत्र-

ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।

 शनिदोष निवारण मंत्र-

ॐ त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम।

 🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares