मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चारचौघे – त्यांची गोष्ट ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ चारचौघे – त्यांची गोष्ट ☆ शीला पतकी 

तुम्ही खूप छान लिहाल हो.. चार लोकांनी वाचलं पाहिजे ना? हां बरोबर आहे… चार लोक फार महत्वाचे असतात. चार या संख्येला अत्यंत महत्त्व आहे. ते चारधाम चार वेद हे मी सांगणार नाही माझा विषय जरा वेगळा आहे आणि वेगळा विषय मांडला ही आपली खासियत आहे. चार याबद्दल आपण काय काय बोलतो बघा 

लहानपणी आपण ऐकत होतो… अरे चार मुलं बघ ती कशी वागतात तस आपण करावं वागावे वर्गामध्ये चार चांगल्या मुलांची संगत धर… चार चांगली पुस्तकं…

वाच चार बुक शिकला तर जीवनाचे कल्याण होईल 

नाही समजलं तुला तर चार लोकांना विचारवं 

इथपासून प्रवास सुरू होतो मग कधी कधी असं ऐकायला लागतं 

 

चार चौघा जणांसारखा वाढवलं नाही तुम्हाला पाहिजे ते प्रत्येक वेळी देत गेलो म्हणजे यांनी खूप थाटात वाढवले आपल्याला…

लक्षात घ्या पुढे आपण हळूहळू मोठे मोठे होत जातो 

अरे घरात गोष्टीत लक्ष घाल तुला काय स्वातंत्र्य दिलय का? … चार माणसाची चर्चा करावी चार माणसांचा विचार घ्यावा मग पुढे पाऊल टाकावं… कुठल्यातरी चार फालतू मुलांमध्ये हिंडू नकोस…

 

अजून एक सूचना चार चार दिवस घराबाहेर जातो जातोस कुठे?

अरे बापरे हे मात्र अवघड आहे बर का… “अहो चार दिवस झाले मी ओरडते तुम्हाला गॅस संपतआलाय, संपत आलाय गॅसला नंबर लावा… तुमचं महिला कुठे लक्षात नसतं घरात मेलीने मी एकटीने मरायचं”

अगं कशी चालली आहेस… लग्नाला चाललीस ना… अंगावर दागिने घालावेत… चार लोक आम्हाला नाव ठेवतील…

चार माणसात कसं उठवून दिसायला पाहिजे आमची मुलगी चारचौघेत ऊठून दिसेल अशी आहे ईति वधू पिता अर्थात हे पूर्वी होतं…

चार हात कामाला लागले तर बघता बघता कामा संपतात एकमेका साहाय्य करू हा मंत्र…!

“चार माणसात आमची अब्रू काढू नका म्हणजे झालं” वैतागलेली घरची मंडळी!

“चारदा सांगून झालं पण ऐकलं तर खरं ना… “… टोमणा 

दोनाचे चार हात झाले की सुटले बाई मी एकदाची… वैतागलेली आई!

 

घरात भांडण झाल्यावर समजूतीच्या चार गोष्टी सांगताना, “चार भिंतीच्या आत गोष्टी आहे तोवर बरं असतं लोकांना काय त्या भिंतीनाही कान लावून लोक ऐकतात लक्षात ठेवा “अनुभवी सूचना

घरातल्या कर्त्याची सूचना तुझ्यापेक्षा चार पावसाळी जास्त पाहिलेत आम्ही… धाक! कार्ट बेरकी ते म्हणाल ते सगळे दुष्काळी होते.

चार पैसे कमवून आणायची अक्कल नाही निघालेत आम्हाला सांगायला पैसे मागितले की सुरुवात म्हणून मिळेल ते काम बघून पैसे कमवावे स्वतःच्या दोन पायावर उभे राहावे 

आयुष्यात चार माणसे जोडून घेता आली नाहीत कुणाशी न पटलेल्या माणसाबद्दल बोलताना हे वाक्य

हमखास 

 

चार चाकी गाडी घ्यायचे माझे स्वप्न होते ते माझ्या मुलाने पूर्ण केले हो मध्यमवर्गीय कृतार्थ बाप

आजी… अग हातात चार बांगड्या घालाव्यात बाळा बाईच्या जातीला असे भुंडे हात शोभत नाहीत.

भाऊसाहेब रिटायर झाला पण सगळं देऊन बसू नका चार पैसे आपल्या कनवटीलाठेवा… नटसम्राट सल्ला

 

एकत्र कुटुंब पद्धतीतला घरातला मोठा माणूस काका वगैरे… “चारचौघात आमचं नाक कापलं जाईल असं काही करू नका म्हणजे झालं शिकायला हरकत नाही पण नको ती थेर घरात नकोत.

काही परदेशात वगैरे जायला नको चार चौघासारखा आयुष्य जगा समाधानाने आपल्या देशात राहा वडीलकीचा सल्ला 

 

एकदा एका सुनेला सासू म्हणाली अगं चार बायकां सारखं रहावं आपण..! हे असले कपडे… कुंकू न लावणं… मंगळसूत्र मनगटाला बांधायला शोभत नाही…! त्यावर सून म्हणाली, “सासुबाई मी पाचवी बाई आहे ती आता जरा समजून घ्या चाराच्या पलीकडे जरा जाऊ द्या ना गाडी हाय का नाही गंमत 

 

शेवटी चार माणसे येतील एवढे तरी चांगलं वागा बाबांनो एक सामाजिक वाक्य 

 

बाहेर चार माणसं तर विचारतात का आणि घरात आमच्या डोक्यावर मिरे वाटतात मनातल्या मनात म्हणाले जाणारे वाक्य

 

काळजी आणि प्रेमापोटी पण वैतागलेला मुलगा… “बाबा चार लोकात जा जरा बसा बरं वाटेल तुम्हाला. घरात काय वाचता टीव्ही बघता… इत्यादी इत्यादी

 

असो अशा अनेक गोष्टी आहेत यामध्ये चार चा उल्लेख असतो तो का हे मला खूप दिवस कळले नव्हते आता तुम्हाला उत्सुकता मग आता कळले आहे का? थोडे पुढे जाऊयात

 

मी गणिताची शिक्षिका… एका बिंदूतून असंख्य रेषा जातात. दोन बिंदूतून एकच रेषा जाते. तीन बिंदू एक प्रतल निश्चित करतात म्हणजे सपाट पृष्ठ भाग… या साठी एसएससी बोर्डाच्या पेपर मध्ये पूर्वी आठवा प्रश्न टॅलेंट क्वेश्चन म्हणून असायचा त्यामध्ये विचारलं होतं सायकल ला स्टॅन्ड का लावतात? त्याचं उत्तर असं होतं की गोल चाकाचा टेकलेला एक एक बिंदू अधिक त्याच एक बिंदू दोन नुसत्या चाकावर सायकल उभी राहू शकत नाही पण स्टॅन्ड लावला की तिसरा बिंदू मिळतो आणि प्रतल निश्चित होते आणि स्टॅन्ड वर सायकल उभी राहते म्हणजे प्रतल निश्चितेसाठी तीन बिंदू लागतात.. इत्यादी इत्यादी… पण प्रतल निश्चितीसाठी तीन बिंदू लागत असले तरी ते बॅलन्स होण्यासाठी चार बिंदू गरजेचे असतात म्हणजे पलीकडच्या बाजूला जर अजून एक स्टॅन्ड लावला तर सायकल तिरकी उभी राहणार नाही ती सरळ उभी राहिल. मग सायकल सरळ उभी राहण्याचे स्टॅन्ड सुद्धा बाजारात मिळत होते ते पाठीमागच्या टाका चाकाला पायाने सरकून लावायचे असावयाचे. म्हणजे चार मुळे समतोल साधला जातो.

याचे एक उदाहरण मी एका मुलाखतीचा ऐकलं होतं मुलाखत होती सलीम जावेद या सुप्रसिद्ध लेखकाच्या जोडी पैकी सलीम यांची त्यांनी सांगितले की डायलॉग लिहिताना त्या वाक्यांमध्ये शब्दांचे समतोल साधणे अत्यंत गरजेचे असते तरच ते डायलॉग ठळकपणे लोकांच्या लक्षात राहतात याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले होते की दिवार मधला डायलॉग

मेरे पास माँ है… हा लिहिताना त्यांनी लिहिले होते मेरे पास गाडी है बंगला है तुम्हारे पास क्या है? इती अमिताभ… मेरे पास मा है शशी… मेरे पास मा है याला वजन येईना मग त्यांनी ऍड केलं… “मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बॅलन्स है तुम्हारे पास क्या है? “मग शशी कपूर शांतपणे म्हणतो, ” मेरे पास माँ है” प्रेक्षकांची शिट्टी आणि टाळ्या!

एका बाजूला तीन शब्द एका बाजूला एक त्या चार शब्दांमुळे त्या संपूर्ण डायलॉग ला वजन आलं आणि तो अजरामर झाला तर असं शब्दांना वजन आम्हाला द्यावं लागतं त्याचा बॅलन्स साधावा लागतो. हे सलीमजीने अनेक उदाहरण देऊन फार छान सांगितलं होतं

मला वाटतं हे चार माणसं काय म्हणतील? चार लोकांचा विचार घ्या… , चार माणसे तरी शेवटी येणार का? इथे सुद्धा बॅलन्सच असावा म्हणून नेहमी आपण चार आकडा वापरतो असे मला वाटते… बघा ना तुम्ही म्हणून बघा… सहा माणसं काय म्हणतील? … पाच माणसं तरी येतील का? … आठ माणसात आमच्या अब्रू घालू नको… मजा नाही यात… जे चार मध्ये आहे! अशा खूप गोष्टी आहेत. आठवा बघा आणि लिहा. चार माणसं वाचतील अशा अपेक्षांनी लिहले आहे पटलं तर घ्या आणि चार जणांना पुढे पाठवा…!

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जगू या – जिंकू या…” – लेखक : श्री संजय आवटे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “जगू या – जिंकू या…” – लेखक : श्री संजय आवटे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

सलमान खान हा काही विचारवंत वगैरे अभिनेता नव्हे. पण, त्याच्या एका मुलाखतीनं मला पार हादरवून टाकलं.

त्याला विचारलं गेलं होतंः “तुझं दुःख तू कोणाशी शेअर करतोस? “

तोवर पोरकट हसत जोक्स मारणारा सलमान एकदम थबकला. गंभीर झाला.

म्हणाला, “कोणाशीच नाही! कारण समजा मी माझ्या सहका-यांसोबत दुःख शेअर केलं, तर ते मला समजावतील. पण, खासगीत हसतील. माझा रडका चेहरा बघून खुश होतील. “

“माझ्या काही मित्रांशी मी ते शेअर करू शकतो. पण, मला भीती आहे की, त्यांना याचाच आनंद होईल की साक्षात सलमान आपल्याशी एवढं पर्सनल काही शेअर करतोय! ” 

“माझ्या खांद्यावर हात ठेऊन, मला समजावताना काही लोकांचा इगो सुखावेल. “

“आईसारखे काही खूप जवळचे लोक आहेत, ज्यांच्याशी मी हे शेअर करू शकतो. पण चिंता अशी आहे की, हे लोक त्यामुळे स्वतःच एवढे निराश होतील, की मला भीती वाटते. “

“त्यामुळे अद्याप तरी मला असं कोणी मिळालेलं नाही की ज्यांच्याशी मी माझं दुःख शेअर करू शकेन! “

***

मनातला हा अंधार खरंच कोणासोबत शेअर करायचा?

आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात अंधार आहे. पण, हा अंधार दाखवणारी कोणती ‘इमोजी’ नाही. तो व्यक्त करण्याची कोणाची तयारी नाही. तुझ्या अंधाराशी मी काही नातं सांगत नाही. आणि, माझ्या अंधाराशी तुझा जैव संबंध नाही!

आपल्याही नकळत या अंधाराचं मोठं साम्राज्य तयार झालं आहे, हे आपल्या गावीही नाही.

काही लोक निराश आहेत, खोल डिप्रेशनमध्ये आहेत, हे आपल्याला समजत नाही, असं नाही. पण, उलटपक्षी अनेकदा त्याचं ‘गॉसिप’ होतं, थट्टा होते आणि ‘बरं झालं, आपल्या रस्त्यातला एक स्पर्धक दूर झाला’, असंही लोकांना वाटतं.

तुम्हाला गंमत माहीत आहे? तुम्ही एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये निराश दिसलात, थकलेले जाणवलात तर लोकांना काळजीच वाटेल, असं नाही. ‘त्याला प्रमोशन नाही मिळत बरं का, बघितलंस ना चेहरा कसा रडवेला दिसत होता त्याचा’, असं गॉसिप होणारच नाही, असं नाही.

कला ही आनंदाची सर्जक शक्यता. पण, आनंदाचे झरे फुलवणा-या या क्षेत्रातले लोक तर एकमेकांचं जगणं संपवून टाकण्यासाठी कसे आणि किती टपलेले असतात, हे तुम्हाला अगदी सामान्य तबलावादकांपासून ते साहित्यापर्यंत आणि गायकांपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वदूर दिसेल. कुठलंच क्षेत्र इथं अपवाद नाही.

हा मानवी स्वभाव कसा आहे, तेच समजत नाही.

आपल्यासमोर आपला एखादा मित्र चालता चालता घसरून पडला, तरी ‘रिफ्लेक्स ॲक्शन’सारखे आपल्याला आधी हसू फुटते. मग आपण त्याला उठवण्यासाठी हात देतो!

मला आठवतं, लहानपणी आम्ही सगळेच मित्र सायकल शिकायचो. एखाद्यानं जरा भारीतली सायकल आणली असेल आणि थोडं स्टाइलमध्ये सायकल चालवत गावभर फिरत असेल तर “असा बाराच्या भावात पडावा लागतो ना…” अशी शुभेच्छा असायची!

माणसं दिसतात सोबत, पण किती जखमी करत असतात एकमेकांना! बोचकारत असतात. ओरबाडत असतात. घर नावाचं भारतीय प्रारूप हे तर ऊब कमी देतं आणि ऊर्जा अधिक शोषतं. नस्ते गुंते तयार करतं. सोपं जगणं क्लिष्ट करून टाकतं. कोणीच कोणाशी बोलत नाही. ‘डिप्लोमसी’ सुरू असते सगळी. जिथं ‘प्रेमात पडले’, हे पोरगी आईला सांगू शकत नाही, तिथं आणखी काय संवाद होणार? “माझ्याशी भांडायला, खुन्नस द्यायला मी काय भावकी आहे का त्याची? “, असं गावात सहजपणे बोललं जातं. अशा नात्यांचं काय करायचं?

आपल्यासारख्या आध्यात्मिक देशात तर हा भोंदूपणा भयंकर आहे. भौतिक गोष्टींचे आकर्षण नाही, असे म्हणायचे आणि प्रत्यक्षात मात्र त्यासाठी एकमेकांचा जीव घ्यायला सज्ज व्हायचे! प्रतिभा, प्रयत्न, प्राक्तन याच्या आधारावर प्रगती करण्याची आकांक्षा बाळगण्यात गैर काही नाहीच. पण, त्यासाठी माणसं खोडण्याची, भिंती बांधण्याची ही कसली विखारी विकृती?

अशा वेळी कोण कोणाशी बोलेल? संवाद कसा होईल?

जगणं हे मूलभूत आहे. प्रसिद्धी, पैसा, यश अशी आकांक्षा असू शकतेच, पण ते काही जगण्याचे प्रयोजन नाही. जगणे हेच जगण्याचे प्रयोजन आहे.

तुम्ही कलेक्टर आहात, स्टार आहात, मंत्री आहात, शिपाई आहात, उद्योजक आहात की शेतकरी आहात, यामुळे त्यात काही फरक पडत नाही.

मी बी. एस्सी (ॲग्री) केलं. आमच्याकडं सगळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे. माझ्या एकट्या बॅचचे पन्नासेक जण तरी आयआरएस, आयपीएससह क्लास वन ऑफिसर वगैरे असतील. काही ग्रामसेवक, काही कृषी पर्यवेक्षक, व्यावसायिक, एलआयसीत ऑफिसर, काही शेतकरीही. आमच्या बॅचचं ‘गेट टुगेदर’ दरवर्षी करायचं, अशी कल्पना दहा वर्षांपूर्वी पुढे आली. सुरूवातीच्या ‘गेट टुगेदर’मध्ये ‘वर्गवाद’ असायचा. डेप्युटी कलेक्टरला आपण ग्रामसेवकापेक्षा थोर असे वाटायचे. किंवा, त्याला नाही वाटले, तरी ग्रामसेवकाला न्यूनगंड असायचा. मग डीवायएसपी मोठा, सुपरवायझर बारका असे सगळे पोटभेद होते. गेल्या दहा वर्षांत सगळ्यांच्या लक्षात आलंय की यामुळं काही फरक पडत नाही, यार. तुझ्याकडे इनोव्हा असेल, माझ्याकडं बाइक असेल, पण त्यामुळं काय फरक पडतो? जगण्यातली धमाल महत्त्वाची. जगण्यावर हक्क प्रत्येकाचा आहे. टेरेस कोणाच्या मालकीचं असलं, म्हणून त्यावरून दिसणारं आकाश त्याच्या मालकीचं थोडंच आहे! आता अशी अवस्था आहे की आम्ही दोन वर्षांपूर्वी गोव्यात आणि गेल्या वर्षी दुबईत ‘गेट टुगेदर’ केलं, तेव्हा हे सगळे भेद मुळासकट उपटले गेले होते. ग्रामसेवक कमिशनरला ×××वर लाथ घालून बेडवरून उठवत होता!

आमचा एक मित्र कॉलेजात टॉपर होता. तो पुढं सायंटिस्ट वा आयएएस होणार, अशी आम्हाला खात्री होती. पुढं अगदी सामान्य मार्कांची पोरं एसपी, कमिशनर वगैरे झाली. हा मात्र गायक झाला. आर्थिक आघाडीवर यथातथाच राहिला. पण, तहानभूक हरपून गाताना तो केवढा देखणा दिसतो! पहिल्या भेटीत सगळ्यांनाच त्याच्या नव्या रुपाचा धक्का बसला. आता मात्र आमच्या ‘गेट टुगेदर’चा खरा ‘हीरो’ तो असतो! टॉपर असताना या ‘चष्मेबद्दू’ला कधीच हा सन्मान मिळाला नाही, जो त्याला आज मिळतो.

कोणाला काही त्रास होण्याचा, मदत हवी असण्याचा अवकाश, आमची सगळी फौज कोणत्याही मित्राला मदत करायला उभी असते. मैत्र हे असतं.

केशवसुत म्हणाले तेच खरं.

‘जग केवढं, ज्याच्या- त्याच्या डोक्याएवढं’ 

त्याचा पदाशी वा पगाराशी काही संबंध नाही. हे डोक रूंदावणं, मन विशाल करणं हेच गुपित आहे, तुमचं जग व्यापक करण्याचं. मग कळतं, जगण्यात मौज आहे. मुक्कामात नाही, प्रवासात गंमत आहे.

त्यासाठी आपलं जग तर बदलावं लागेलच, पण ‘माणूस’ म्हणून हा भवतालही बदलावा लागेल. आपली जगण्याची गोष्ट आहे, तशी प्रत्येकाच्या जगण्याची गोष्ट आहे. ती समजून घ्यावी लागेल. त्यासाठी कोणाच्या पश्चात नाही. त्याच्याशी थेट बोलावं लागेल. कोणाच्या शेतातला बांध जेसीबीनं उद्ध्वस्त करण्यापेक्षा या सीमा प्रश्नावर एकमेकांशी बोलावं लागेल.

“गैरों से कहा तुमने,

गैरों से सुना तुमने!

कभी हम से कहा होता,

कभी हम से सुना होता! “

हीच तर सल आहे.

तेव्हा, बोलू एकमेकांशी आणि मुख्य म्हणजे, एकमेकांशी बोलण्याचा अवकाश जिवंत ठेऊ. नाहीतर, सुशांतसारखे काही आत्महत्या करतील, उरलेले रोज मरत-मरत दिवस काढतील.

हे जग सुंदर करायचं असेल आणि ‘जगणेबल’ करायचं असेल, तर आधी छान निखळ माणूस व्हावं लागेल. माणसांची निरपेक्ष सोबत करावी लागेल. तुम्ही कोणावर प्रेम करता, तेव्हा तुम्ही स्वतःवरही प्रेम करायला शिकता. तुम्ही कोणावर विश्वास ठेवता, तेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास अढळ होत जातो. तुम्ही कोणाशी बोलता, तेव्हा स्वतःशीच बोलत असता! आपल्यामुळं कुणाचा गेम झाला, यापेक्षा आपल्यामुळं कोणाच्या चेह-यावर हसू फुललं, याचा आनंद किती थोर असतो! हेच तर जिंकणं आहे!

मी आहे यार, कारण तू आहेस. आपण आहोत.

सोबत राहू, असेच.

जगू या, जिंकू या!

Love u All

 

लेखक : श्री संजय आवटे 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९९ आणि १०० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९९ आणि १०० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

 श्लोक क्र. ९९ – – 

जगी धन्य वाराणसी पुण्यरासी ।

तयेमाजि जाता गती पूर्वजांसी ।

मुखे रामनामावळी नित्यकाळी ।

जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ।।९९।।

अर्थ : वाराणसी अर्थात काशीक्षेत्र पुण्याने परिपूर्ण असल्याने खरोखरच जगात धन्य आहे. तिथे गेल्यानंतर तेथील पुण्यप्रभावामुळे आपल्यासह आपल्या पूर्वजांना गती मिळते. मुखाने सदैव श्रीरामांचे नाम घ्यावे असा उपदेश भगवान शंकर तिथे आपल्या कानात करतात.

(पुण्यरासी – पुण्याने परिपूर्ण/भरलेले, गती – मृत्यूनंतर सद्गती अथवा मुक्ती मिळणे) 

विवेचन : या श्लोकात रामनामाचे महत्व स्पष्ट करताना समर्थांनी काशीक्षेत्राचे उदाहरण दिले आहे. आपल्याकडे काशीक्षेत्र सर्व तीर्थांमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. त्यावरून ‘ काशीस जावे नित्य वदावे ‘ अशी म्हण आपल्याकडे पडली आहे. म्हणजे प्रत्यक्ष काशीला जायला जमले नाही तरी मला काशीला जायचे आहे असे नेहमी म्हणत राहावे. यावरून काशीक्षेत्राचे महत्व आपल्या लक्षात येईल. आपल्याकडे भाविकांमध्ये अशी समजूत आहे की काशीला गेल्यानंतर आपल्याला आपल्या अंतकाळी उत्तम गती प्राप्त होते. केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पूर्वजांना देखील उत्तम गती मिळते. म्हणून ईश्वरावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आपण आयुष्यात एकदा तरी काशीला जावे अशी इच्छा असते. पूर्वीच्या काळी तर वृद्ध माणसे काशीला जात असताना तिकडेच देह ठेवला तर मुक्ती मिळाली असे समजत असत. तशी इच्छा मनात धरून बरीचशी मंडळी काशीला जात असत. आजही बऱ्याच भाविकांची तशी श्रद्धा आहे.

वरील श्लोकात दुसऱ्या ओळीत आलेला ‘ जाता ‘ हा शब्द दोन अर्थांनी घेता येतो. पहिला अर्थ म्हणजे काशीला गेल्यानंतर असा घेता येतो तर दुसरा अर्थ काशीला देह ठेवल्यानंतर असा घेता येतो. कोणताही अर्थ घेतला तरी काशी क्षेत्राचा महिमा अपरंपार आहे हे लक्षात येते. काशीला भगवान शंकरांचे मंदिर ‘ काशी विश्वनाथ ‘ म्हणून प्रसिद्ध आहे. देवाधिदेव महादेवाचे हे स्थान द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे असे मानले जाते. इथे येणाऱ्या प्रत्येक जीवाला भगवान शंकर स्वतः ‘ मुखाने सतत रामनाम घ्या ‘ ही आपल्या हिताची गोष्ट तेथे कानात सांगतात असे म्हटले जाते.

थोडक्यात म्हणजे समर्थांनी या ठिकाणी पुन्हा एकदा भगवान शंकरांचे उदाहरण देऊन रामनामाचे महत्व स्पष्ट केले आहे. ज्या काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्याने मोक्ष प्राप्ती होते असे आपण मानतो, ते भगवान शंकर स्वतः रामनाम घेतात आणि आपल्यालाही रामनाम घेण्याचा उपदेश करतात. तुम्ही काशीला जा किंवा जाऊ नका. पण मुखाने सतत रामनाम घ्या. तेच तुमच्या हिताचे आहे ही गोष्ट समर्थांनी इथे आपल्या मनावर ठसवली आहे. सातत्याने आपण रामनाम घेत गेलो तर आपला देह, आपले मन पवित्र, शुद्ध आणि स्वच्छ होईल. तेच काशीक्षेत्र होईल.

स्वसंवाद

१. भौतिकदृष्ट्या ‘काशीला’ जाण्याची ओढ असण्यासोबतच, मी माझ्या अंतःकरणात रामनामाची ‘पुण्यरासी’ (काशी क्षेत्र) निर्माण करण्याचा प्रयत्न करतो का?

२. जीवाला उत्तम गती प्राप्त होणे म्हणजे केवळ मृत्यूनंतर मिळणारे सुख नसून, चालू आयुष्यात रामनामाच्या अनुसंधानात राहून जन्माचे सार्थक करणे आहे, हे मला पटते आहे का?

३. “काशी विश्वनाथ स्वतः प्रत्येक जीवाच्या कानात रामनामाचा उपदेश करतात, ” हे ऐकल्यावर माझ्या दैनंदिन जीवनात रामनाम आदराने घेण्याची माझी वृत्ती अधिक दृढ झाली आहे का?

४. ‘पूर्वजांना गती मिळणे’ आणि स्वतःचा उद्धार करणे यासाठी विनामूल्य आणि अत्यंत सोपे असणारे रामनाम घेण्यासाठी मी रोज किती वेळ शांत चित्ताने देतो?

===== 

 श्लोक क्र. १०० – –

यथासांग रे कर्म ते हि घडेना ।

घडे धर्म ते पुण्य गांठी पडेना ।

दया पाहता सर्वभूती असेना ।

फुकाचे मुखी नाम ते हि वसेना ।।१००।।

अर्थ :  पुण्य प्राप्तीसाठी आपण जे कर्म करतो, ते यथासांग घडत नाही. जे काही कर्म आपण त्यासाठी करतो, त्यात काहीतरी उणीव राहिली तरी पुण्य पदरी पडत नाही. सर्व प्राणिमात्रांबद्दल मनात दयेचा भावही उपजत नाही. हे सगळे समजण्यासारखे असले तरी फुकटचे असलेले भगवंताचे नाम देखील मुखात येत नाही.

 विवेचन : समर्थांनी लिहिलेला हा शंभरावा श्लोक विशेष आहे. मानवी प्रवृत्तीवर समर्थांनी अचूक बोट ठेवले आहे. माणूस सगळेच साध्य करण्याच्या मागे लागतो. संसार करता करता पुण्यप्राप्ती व्हावी काही धर्मकार्य करतो. परंतु धार्मिक कार्य करताना त्यात बऱ्याच वेळा काहीतरी उणीव राहून जाण्याची शक्यता असते. ते यथासांग, यथाविधी पार पडेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे त्यातून आपल्या गाठी काही पुण्याचा संचय होईल अशी अपेक्षा करणाऱ्या यजमानाच्या पदरी फारसे काही पडत नाही. त्यातच अलीकडच्या काळात धार्मिक कार्ये विधिवत करण्यापेक्षा त्यात ते जास्त देखणे आणि भव्य कसे होईल याकडे लक्ष असते. त्यातून अमाप खर्च केला जातो. आलेली पाहुणे मंडळी, त्यांचे आहेर इत्यादी गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावे लागते. ही कोणाला अतिशयोक्ती वाटली तरी वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत यजमानांचे लक्ष धार्मिक कार्यात कमी आणि इतर ठिकाणीच जास्त अशी अवस्था होते.

सर्वाभूती ईश्वर असे आपण मानतो. ज्ञानेश्वरीत तर ज्ञानेश्वर माउली ‘ जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत ‘असे म्हणतात. असे केले तरी त्या त्या रूपातील असणाऱ्या ईश्वराचीच पूजा आपल्या हातून घडते. सगळ्या संतांची चरित्रे या दृष्टीने आदर्श आहेत. संत एकनाथांनी तृषार्त गाढवाला पाणी पाजून त्याचा आत्मा शांत केला. ज्ञानदेवांनी सर्वांभूती एकच ईश्वर आहे हे नुसते सांगितले नाही तर रेड्याच्या मुखी वेद वदवून ते सिद्ध केले. पण आपण सामान्य माणसे. आपल्याकडून ‘ सर्वभूती दया ‘ हे तत्व देखील नीट पाळले जात नाही. प्राणिमात्रांचे तर सोडून द्या पण घरातील नोकर, मोलकरीण यांच्याशी तरी आपण समभावाने वागतो का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

समर्थ म्हणतात, इथपर्यंतही ठीक आहे. समजण्यासारखे आहे. पण हे मना, अरे रामनाम किंवा भगवंताचे नाम घेण्यासाठी तर काही खर्च करावा लागत नाही ना? त्यासाठी कोणतेही धार्मिक विधी किंवा खर्च करावा लागत नाही. त्यात काही न्यून किंवा उणीव राहील अशी शक्यता देखील नाही. असे असूनही हे जीवा तू फुकटचे असे भगवंताचे नाम का घेत नाही? संत सोयराबाई म्हणतात, ‘ सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. ‘ हेच आपणही करायला हवे.

स्वसंवाद :: 

१. माझ्या हातून होणारी धार्मिक कृत्ये ही केवळ बाह्य प्रदर्शनासाठी होतात की त्यात अंतःकरणाची खरी शुद्धता आणि विधीवरील निष्ठा असते?

२. ज्ञानेश्वर माऊलींच्या “जे जे भेटे भूत” या वचनाचा आदर मी माझ्या दैनंदिन जीवनात माझ्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांशी आदराने वागून करतो का?

३. धार्मिक विधीत काहीतरी उणीव राहून जाण्याची भीती असते; पण ज्या नामात कोणतीही उणीव राहण्याची शक्यता नाही, ते विनामूल्य असणारे रामनाम मी आवडीने घेतो का?

– क्रमशः श्लोक ९९ आणि १००

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मिले सुर मेरा तुम्हारा ssss … लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ मिले सुर मेरा तुम्हारा ssss … लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्मिता सुहास पंडित ☆

“मिले सुर मेरा तुम्हारा ssssss” 

 – – या अजरामर गाण्याचं बाळंतपण

 “मिले सूर मेरा तुम्हारा ssssss” हे गाणे माहीत नाही असा एकही भारतीय नसेल. इतकं हे गाणं सगळ्यांच्या हृदयात वसलेलं आहे. हे गाणे जितके श्रवणीय तितकीच त्याच्या निर्मितीची कहाणी देखील अद्भुत आहे.

झालं असं की, पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या मनात एक विचार आला की, तरुणांना विशेषतः लहान मुलांना प्रेरित करणारे आणि एकतेचा संदेश देणारे एखादं गाणे तयार करून ते दूरदर्शनवरून सर्वत्र पोचवावे. ज्यातून “मेरा भारत महान” ही संकल्पना तर सर्वत्र जाईलच शिवाय प्रत्येकाला यात आपला प्रांत सामावून घेईल. त्यांच्या इच्छेनुसार मग एक प्रस्ताव तयार करण्यात आला आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याकडे हे गाणे कंपोज करण्यासाठी आले.

संपूर्ण फिल्म इंडस्ट्री एकत्र आली. या एकूणच गाण्याची व ते कसे कसे आणि कुठे कुठं शूट करायचे, यात कुणाकुणाला घ्यायचे इत्यादींची संकल्पना सुरेश मलिक आणि प्रसिद्ध ऍड फिल्ममेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांची आहे. विशेषतः यातील सिनेकलाकार यांच्या तारखा मिळवताना त्रास होईल असा या जोडगोळीचा अंदाज होता मात्र एकूण एक कलाकारांनी अगदी हव्या त्या तारखा यांना दिल्या त्यामुळे जवळपास पूर्ण फिल्म इंडस्ट्री यात दिसते.

विश्वविक्रमी गाणे – १५ ऑगस्ट १९८८ रोजी दूरदर्शनवरून हे गाणे प्रथमच रिलीज करण्यात आले. याचे संगीतकार अशोक पत्की. भैरवी रागातील या गाण्याचे गीतकार होते प्रसिद्ध कवी पियूष पांडे. भारतातील प्रमुख अशा चौदा भाषेत प्रथमच असं हे गाणं तयार झालं असून तोही एक विश्वविक्रम आहे. हिंदी, काश्मीरी, पंजाबी, सिंधी, उर्दू, तामिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम, बांगला, आसामी, उडिया, गुजराती आणि मराठी भाषेत दोन दोन ओळी रचल्या गेल्यात.

लता दीदीची एन्ट्री – खरं तर सुरुवातीला यातील गायिकेच्या आवाजातील सर्व ओळी भारतरत्न लता मंगेशकर गाणार असं ठरलं होत. मात्र जेव्हा गाणे रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टुडिओ बुक करण्यात आला, तेव्हा नेमक्या लतादीदी परदेशात होत्या. त्यामुळे मग कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात ते गाणे सुरुवातीला रेकॉर्ड करण्यात आले. मात्र गाणे रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी लता दीदी भारतात परतल्या. त्यांना हे गाणे रेकॉर्ड झाल्याचे कळले. त्यांनी स्टुडिओत जाऊन ते गाणे ऐकले आणि म्हणाल्या, “पंडितजी… मला ही संधी सोडायची नाहीय. काहीतरी जुळवून आणा. मी आजच रेकॉर्डिंगसाठी वेळ देते. ” 

आता पंचाईत झाली. कारण त्यामुळे कविताजीचे नाव आणि गायन वगळून तिथं दीदीचे बसवायचे… कविताजी नाराज झाल्या खऱ्या पण मन मोठं करून त्यांनी यासाठी आनंदाने होकार दिला. याबद्दल दीदी इतक्या ज्येष्ठ असूनही त्यांनी कविताजी यांचे आभार मानले आणि मग लतादीदी तिरंगी ध्वज रंगाचा पदर असलेली पांढरी साडी परिधान करून स्टुडिओत आल्या आणि त्यांच्या स्वरात हे गाणे रेकॉर्ड झाले. मात्र परस्पर सामंजस्याने नंतर असं ठरलं की कविताजी यांनीही मेहनत घेतलेली आहे तर किमान एक दोन ओळी त्यांच्या पण असू द्यात! त्याप्रमाणे मग गाण्यात शबाना आझमीच्या तोंडी असलेल्या ओळी या कविता यांच्या आहेत तशाच ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.

प्रसिद्ध धबधबा – या गाण्यात सुरुवातीला पं. भीमसेनजी ज्या धबधब्याजवळ उभे राहून गाणे गाताना दिसतात तो कोडईकनाल पम्बर फॉल्स आहे! हाच तो धबधबा आहे जिथं लिरील साबणाची त्या काळात सुपर हिट झालेली जाहिरात शूट करण्यात आली होती. त्यामुळे त्याला नंतर “लिरिल फॉल्स” असेच नाव पडले!

ताजमहाल शूटिंग किस्सा – या गाण्यातील एका कडव्यात ताजमहाल दिसतोय जो एरियल व्ह्यू स्टाईलने शूट करण्यात आला आहे. खरेतर वर्ल्ड हेरिटेज जाहीर झालेल्या वास्तूच्या भोवती असं एरियल शूट करण्याची परवानगी नसते. मात्र कैलाशजी याना तसेच शूट हवे होते मग प्रॉडक्शन टीमसह भीमेसनजी यांनी थेट एयर मार्शल यांची भेट घेऊन इच्छा सांगितली. शिवाय हा प्रोजेक्ट खुद्द पंतप्रधान यांच्या मनातला आहे हेही सांगितलं आणि त्यानंतर परमिशन मिळाली. इतकंच नव्हे तर भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरमधून ते एरियल व्ह्यू शूट घेण्यात आलं.

गाण्यातील एका कडव्यात पाण्यात हत्ती खेळताना दिसतात, ते शूटिंग केरळ येथील पेरियार नॅशनल पार्कमधील असून हत्तीही तिथलेच आहेत. यासाठीही वन विभागाने तातडीने हालचाल करून सर्व त्या परवानग्या दिल्या. नाहीतर अशा रिझर्व्ह पार्क मध्ये शूटिंगला परवानगी नसते.

दोन महत्वाच्या रेल्वे – या गाण्यात दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या रेल्वे दिसतात. त्या दोन्ही पूर्ण देशभरात प्रसिद्ध अशा रेल्वे आहेत. पहिली आहे ती कलकत्याची मेट्रो रेल्वे आणि दुसरी आहे आपल्या महाराष्ट्राची शान असलेली डेक्कन क्वीन! तनुजा जेव्हा मराठी ओळी गाताना दिसतात त्यावेळी ही रेल्वे येते! महाराष्ट्रातील हे शूटिंग कामशेत जवळील आहे. आहे नं अभिमानाची गोष्ट!

कोरस मंडळींचा मोठेपणा – या गाण्यात सर्वात शेवटी भारताच्या नकाशाच्या आकारात अनेक माणसे उभी असलेली दिसतात न ते सगळं शूटिंग मुंबईच्या फिल्मसिटीत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा कोरस शॉटसाठी माणसे पुरवणारी एजन्सी असते त्यांनी नेहमीप्रमाणे पैसे ठरवून माणसे बोलावली. शूटिंग झालं आणि शूट झाल्यावर लोकांना कळलं की ते किती मोठ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहेत आणि देशासाठीचे हे गीत आहे म्हटल्यावर त्यातल्या एकानेही एक रुपयाही मानधन घेतलं नाही. तसेच यातील एका ओळीत शाळेतील लहान मुले तिरंगी गणवेशात एकत्र धावत येतात त्याचे शूटिंग उटी येथील बोर्डिंग स्कूल मध्ये झाले आहे.

स्वतःचे कपडे वापरणारे कलाकार – गाण्यात एका सीनमध्ये अमिताभ, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती आहेत. या तिघांचे शूटिंग भल्या सकाळी एका बंगल्याच्या खाजगी बागेत करण्यात आले आणि अवघ्या दहा मिनिटात तो सीन वन टेक शूट झाला. विशेष म्हणजे यात त्यांच्या अंगावर जे कपडे आहेत ते त्यांचे त्यांचे स्वतःचे आहेत. अन्यथा इतरवेळी शूटिंगवाल्याकडून कपडे पुरवले जातात. ज्याला बऱ्यापैकी खर्च येतो मात्र या तिघांनी त्याला नम्र नकार देऊन स्वतःचे कपडे आणले होते.

कमल हसन यांची ऐनवेळी एंट्री – दाक्षिणात्य प्रसिद्ध गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे या गाण्यातील दोन ओळीचे रेकॉर्डिंग होते. त्यावेळी स्टुडिओत अचानक कमल हसन आले. ते कसे काय आले इथं? असं विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, “माझे गुरु आहेत बालमुरलीकृष्ण… त्यामुळे त्यांचे गाणे रेकॉर्ड होताना पाहावे म्हणून आलोय”. यावर कैलाशजी म्हणाले की, “संध्याकाळी या ओळीचे शूटिंग आहे समुद्र किनारी तर वेळ असेल तर या की तिथेही” आणि कमल हसन तिथं नंतर पोचले आणि चक्क त्यांनाच शूटिंग मध्ये सहभागी करून घेण्यात आले आणि अशारितीने ऐनवेळी त्यांची एंट्री यात झाली.

जगाच्या पाठीवर प्रथमच असे काहीतरी – एकतेचा संदेश देणाऱ्या या गाण्यात जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी दिसतात. जगाच्या पाठीवर प्रथमच एका गाण्यासाठी हे घडलं आहे. फिल्म लाईन, क्रीडा, गायक, वादक, चित्रकार, कार्टूनिस्ट, फिल्म निर्माता, आर्किटेक्ट, टेलिव्हिजन होस्ट असं सगळं सुंदर मिश्रण यात जुळून आले आहे. एखाद गाणं इतकं अजरामर का होतं… त्या मागे किती काय काय घडत असत अन कितीजणांचे कष्ट असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसतं. ते माहीत असावं म्हणून हा पोस्ट प्रपंच!

थोडक्यात सांगायचे तर… असं गाणं पुन्हा होणे नाही!!

 

लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अहंकार… ☆ दीपा नारायण पुजारी ☆

दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ अहंकार…  ☆ दीपा नारायण पुजारी ☆

संस्कृत मध्ये अहं म्हणजे मी. अर्थात अहंकार म्हणजे मी पणा. मी करतो तेच बरोबर असा विचार जिथं येतो, तिथं त्या क्षणापासून मीपणा पोसला जाऊ लागतो.

जी व्यक्ती अशी अहंकारी असते ती, स्वतःच्या विचारांना मतांना जास्त महत्त्व देते. इतरांचं मत, विचार किंवा त्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन समजून घेऊ शकत नाही. अशी व्यक्ती दुसऱ्यांना कमी लेखू लागते. कोणालाही न जुमानता आपण करतो तेच बरोबर असं वाटू लागतं. समोरच्या व्यक्तीला किरकोळ मानून त्या व्यक्तीकडं, दुर्लक्ष करणं सुरू होतं. दुसऱ्यांच्या भावनांचा विचार न करण्याची वृत्ती हे एक या मागचं कारण आहे. स्वतः विषयी अभिमान वाटणं हे जसं नैसर्गिक, तशी अहंकार ही देखील नैसर्गिक भावना आहे. स्वतःच्या यशाचा अती गर्व, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ कसा हे सांगण्याची धडपड या गोष्टीतून ही भावना वाढीस लागते. काही वेळा असुरक्षितता, सतत आपलंच कौतुक व्हावं ही अपेक्षा अशा गोष्टींमुळे ही भावना मोठी होते. कधी कधी संपत्ती, रूप, बुद्धिमत्ता याला कारणीभूत ठरतात; तर कधी नोकरीत, कुटुंबात अधिकारामुळे आलेला गर्व वाढीस लागतो, तट्ट फुगतो आणि अहंकाराच्या फुग्यात रूपांतरित होतो.

आपणच तेवढे हुशार आपल्याला कोणाची गरज नाही मी समर्थ आहे अशा धुंदीत ही माणसं वावरत असतात. स्वतःच्या नजरेत स्वतःला मोठे समजू लागतात. अचानक कधीतरी या माणसांची फजिती होते. कुणालाही न विचारता मोठे मोठे व्यवहार करताना फाजील आत्मविश्वासनं मोठे निर्णय घेतले जातात. हितचिंतकांना बेदखल केले जाते. परंतु हा निर्णय चुकीचा ठरला तर फजिती होऊ शकते मोठे संकट उडवू शकते.

गर्व किंवा अहंकार हा माणसाचा शत्रू आहे. अहंकाराने उद्ध्वस्त झालेल्या माणसांची अनेक उदाहरणं आहेत. अहंकार हा षड्रिपुंपैकी एक रिपू आहे. शक्ती, बुद्धी, संपत्ती, रूप याचा माणसाला अभिमान जरूर असावा पण त्या अभिमानाचं रूपांतर गर्वात किंवा अहंकारात होणार नाही याची काळजी घेणं जरुरीच आहे आणि महत्त्वाचं आहे.

अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करत राहायला हवा. त्यासाठी अंगी नम्रता हा गुण बाणवायला पाहिजे. नेहमी नम्र राहायला हवं. इतरांचं ऐकून घ्यायला हवं. सतत शिकण्याची वृत्ती ठेवायला हवी. आपली चूक झाली असेल, तर ती मान्य ही करायला हवी. दुसऱ्यांचा वेगळा दृष्टिकोन समजून घेतला तर, आपलीही समज वाढते. अहंपणा कमी करण्यास ही गोष्ट उपयुक्त ठरते.

विजय माझाच होणार, मीच जिंकणार, माझंच बरोबर असा हेका धरू नये. प्रत्येक वादात मीच बरोबर असं होणार नाही. कधी कधी दुसरा जिंकू शकतो, तर कधी समोरच्याचं म्हणणं ऐकून वाट वाद मिटवणं जास्त फायदेशीर ठरतं. असे समोपचारानं वागणं जमलं तर अहंकार कमी होण्यास मदत होते.

“जै जगा धाकुटे होईजे | तै जवळीक माझी ||” असे ज्ञानोबा म्हणतात.

जगाला मी जितका लहान आहे असे वाटेल तितके जग माझ्या जवळ येईल. समाजात मिसळायला, लोकांना आपलंस करायला पाहिजे असेल, तर आपण आधी लहान व्हायला हवं. साधेपणा अंगात असेल तर लोक संपत्ती वाढते. लोकसंग्रह वाढतो. अहंकाराचा लवलेश जिथे नाही तिथे, आपुलकी वाढ वाढते. जवळीक वाढते, स्नेहभाव वाढतो हाच खरा ज्ञानजन्य निरहंकार होय.

शरीराची तसेच मनाची कामं प्रकृतीच्या नियंत्रणाखाली चालतात. पण अहंकाराच्या आधीन गेलेला माणूस स्वतःला सर्व गोष्टींचा कर्ता समजतो. असा माणूस स्वतःला दु:खाच्या खाईत लोटून देतो. हे दु:ख नको असेल तर, भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील हा श्लोक आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः।

अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते॥

© दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “राखीची गोष्ट…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

? मनमंजुषेतून ?

☆ राखीची गोष्ट☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

सांगतो. जरा वेगळीये. म्हणूनच तर तुम्हाला सांगायचीय. महिनाभरापूर्वीची गोष्ट. लेकीच्या पाच सहा मैत्रिणी आल्या होत्या आमच्या दुकानात.. इंडियन आर्मीसाठी एखादी स्पेशल राखी आहे का हो तुमच्याकडे? त्यातल्या एकीनं विचारलं. मला कन्सेप्ट आवडली. मी लगेच सूरत ला आमच्या सप्लायरला काॅल लावला. त्यालाही कन्सेप्ट आवडली. तिरंगा, आर्मी टँक आणि स्टेनगनधारी वीर जवान असं डिझाईन असणारी तिरंगा राखी आलीये या वर्षी मार्केटमधे.. त्यावर ‘वीर जवान, देश की शान’ असं लिहलंय… लोकांनाही खूप पसंत पडत्येय ही राखी.

लेक खूप मागे लागलीये. तिच्या पाच सहा मैत्रिणींचा ग्रुप जायचाय तिकडे जैसलमेरला. खरं तर काजल राखी घेऊन जायचीये. तीच ती आर्मीवाली राखी. काजलचे आई बाबाही आहेत बरोबर. तिचे बाबा रिटायर्ड कर्नल कृष्णप्रकाश सिन्हा. आर्मीवालं घराणं आहे त्यांचं. प्रत्येक पिढीत एक तरी आर्मीत आहेच. ग्रेट.

तर काय सांगत होतो? परमिशन्स, रिझर्व्हेशन्स वगैरे सगळे सोपस्कार झालेत. माझाच धीर होत नव्हता. काल कर्नलसाहेबांचा फोन आला. “बच्ची की चिंता मत करो, हम है ना! “. मी कशाला नाही म्हणतोय…?

लेक खुष. लेक खुष तर तिचा बाबाही खुष.

आत्ता लेकीचा फोन आला होता. जाम एक्सायटेड होती.

ती काय म्हणाली ते ऐका.. “बाबा, आज सकाळी जेसलमेरला पोचलो. तिथून चाळीस किलोमीटरवर आहे ही चेकपोस्ट. इकडेतिकडे नुसतं वाळवंट. रणरणतं ऊन. चाळीसच्या वर टेम्परेचर. वाळूत रेघ मारावी तसलं तारांचं फेन्सींग. पलीकडे नापाक पाकिस्तान. तिथल्या प्रत्येक गोळीच्या टप्प्यात होतो आम्ही. मोस्ट थ्रिलींग. असं वाटलं स्टेनगन घ्यावी, धडधड फायर करावं आणि Let’s close the matter forever”

“280 किलोमीटरच्या आसपास पसरलेली बाॅर्डर आहे इथली. 150 च्या आसपास चेकपोस्ट. काही ठिकाणी दलदल, चिखल. दिवस, रात्र, ऊन, पाऊस नो एक्स्यूझ. 24×7 चा खरा इथं समजला. ऑलवेज ऑन ड्यूटी.

बाबा मोस्ट शाॅकींग… आम्ही राख्या घेवून गेलेलो. उडालोच. काजलचा भाऊ नाही मोठी बहीण होती तिथं. राखी नाव तिचं. तिच्यासारख्या अजून 399 होत्या तिथं. 400 जणींची बटालियन आहे ही. या बटालियनचं नावच कसलं भारीये. ‘सीमा भवानी’. आम्ही राखीताई आणि तिथल्या काही जणींना औक्षण केलं. राखी बांधली. मिठाई भरवली. दे वेयर व्हेरी हॅप्पी. दुर्गा होती प्रत्येक जण. मर्दानी. प्रहारी. पलीकडच्या बाजूला ओरडून सांगितलंय. ‘चड्डीत रहायचं, नाहीतर… ‘ बाबा, आयुष्यात विसरणार नाही आजचा दिवस… “

तासाभरानं मी कर्नलसाहेबांना फोन लावला. मनापासून थँक्स म्हणलं. ते गहिवरून बोलत होते.

’93 की बात है. कश्मीर में पोस्टींग थी हमारी. अनंतनाग के पास एक सर्च ऑपरेशन चालू था. पंडित के घर को अॅटॅक किया था, मिलिटंटस् ने. आधा घंटा फायरिंग चालू था. दो को मारा. दो भाग गये भौxxके. घर के अंदर घुसे तो सब खत्म हुआ था. पूरी फॅमीली लाल रंग की होली खेल चुकी थी. बेचारा बाप आखरी सास गिन रहा था. कपाट के अंदर तीन साल की बच्ची को छिपाया था. इसे संभालो’ बोल के 

वो बाप मर गया. मैं भी बाप हूँ. गोद ले लिया वो नन्हीसी परी को.. वही हमारी बडी बेटी राखी. ‘

शाॅक्ड मी होतो आता. राखीची गोष्ट. मी कधीच ऐकली नव्हती. जो रक्षण करतो तो भाऊ. आता रक्षण करणारी बहिण सुद्धा. राखीचा धागा किती स्ट्राँग आहे, ते समजलं आज. सीमेवरच्या एका तरी ‘जवाना’ला नाहीतर ‘सीमाभवानी’ला राखी पाठवायलाच हवी. वुई केअर, वुई रिस्पेक्ट, वुई सॅल्यूट. हा राखीचा धागाच देश बांधून ठेवतोय. सॅल्यूट इंडियन आर्मी. सलाम नमस्ते! येणाऱ्या 

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साठा उत्तराची कहाणी… ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ साठा उत्तराची कहाणी☆ उज्ज्वला केळकर

श्रावणातला मनोहारी निसर्ग बघून बालकवी म्हणतात, ‘श्रावण मासी हर्ष मानसी. ’ श्रावणात, केवळ लेखक कवींनाच हर्ष होतो, असे नाही, तर जनसामान्यांच्याही मनात हर्ष दाटून येतो. त्याचं कारण, या महिन्यात अनेक सण, समारंभ, उत्सव येतात. रोजच्या दैनंदिन जीवनातील चाकोरीपेक्षा, काही वेगळं करताना, नवा उत्साह, नवचैतन्य, नवी उर्जा निर्माण होते.

माझ्या लहानपणी मी या सण-समारंभाच्या कहाण्या माझ्या आजीला वाचून दाखवायची. उदा. नागपंचमीची, दिव्याच्या आवसेची, जीवतीची, शीळासप्तमीची. याशिवाय प्रत्येक दिवसाची कहाणी असे. मला वाचायला त्या खूप आवडत. बाहेरच्या सारखे गूढ, अद्भूत वातावरण कहाणीत असे. त्या मनोरंजकही होत्या, तशाच बोधप्रदही असत. प्रत्येक कहाणीतील कथा वेगळी. त्यांची सुरुवात असे, एक आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण. किंवा एक राजा होता. मग त्या कथेत एक वसा सांगितलेला असे. म्हणजे वागण्याचा नियम. वसा करणार्‍याला सुख मिळे. तो मोडणार्‍याला दु:ख, संकटे भोगावी लागत. आशा किती तरी कहाण्या. प्रत्येक कहाणीची कथा वेगळी, पण प्रत्येक कहाणीचा शेवट असे, ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ सपूर्ण. कहाणी कोणतीही असो, तिचा शेवट याच वाक्याने होत असे.

त्यावेळी मी आजीला विचारायची, ही ‘साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ सपूर्ण’ म्हणजे काय? तिला काही सांगता आले नाही. त्यानंतर मी मोठी होत गेले. खूप काही ऐकलं, वाचलं, पण ‘साठा उत्तरीचं कोडं काही सुटलं नाही. अनेक भाषेच्या अभ्यासकांना, विचारवंतांना, संशोधकांना विचारलं, पण मला काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही.

शेवटी एक प्रयत्न म्हणून गुगल बाबाला विचारले. त्यांनी सांगितले, ‘साठा उत्तरी म्हणजे, साठ उतारे असलेली कहाणी म्हणजे कथा. ’. ती पाचा उत्तरी म्हणजे, ’ पाच उतार्‍यात सांगितली. ’ म्हणजे मोठ्ठी लांबलचक कहाणी, थोडक्यात… पाच उतार्‍यात सांगितली.

‘पाचा उत्तरी सुफळ सपूर्ण’ म्हणजे मोठ्ठी कहाणी ऐकून जे पुण्य, फळ लाभेल, ते, ही थोडक्यात सांगितलेली कहाणी ऐकूनही लाभेल. तोच तत्त्वबोध लहान कहाणी ऐकूनही होईल.

लोक हो, मला हे पटलं. तुम्हाला ते पटतय का, बघा!

 

© उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक अल्पप्रसिद्ध ‘परमवीर’ योद्धा! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ एक अल्पप्रसिद्ध ‘परमवीर’ योद्धा! ☆ श्री संभाजी बबन गायके 

एक अल्पप्रसिद्ध ‘परमवीर’ योद्धा!

 – – रावणाच्या लंकेत पराक्रम गाजवणारे ‘राम’स्वामी परमेश्वरन!

२५ नोव्हेंबर, १९८७. साडे पाच वाजले होते… पहाटेचा अंधार संपत आला होता. रात्री दीड वाजल्यापासून या ठिकाणी अंधारात सापळा रचून, डोळ्यांत तेल घालून बसलो होतो… सर्वांची बोटं ट्रिगरवरच होती. काल संध्याकाळी पक्की खबर आली होती… याच गावात असलेल्या एका घरात अतिरेक्यांनी हत्यारांची मोठी खेप उतरवून घेतलेली आहे. त्यानुसार मी कॅप्टन डी. आर. शर्मांना PATROLING PARTY घेऊन जाऊन खात्री करून घ्यायला पाठवले होते. कॅप्टन शर्मा आणि त्यांचे वीस जवान त्या घराच्या जवळ पोहोचताच, त्यांच्यावर त्या घराजवळ असलेल्या एका मंदिराच्या गच्चीवरून तुफान आणि अचूक गोळीबार झाला! त्यात काही जवान जखमी झाले. कॅप्टन शर्मा तिथून काहीसे मागे आले आणि त्यांनी बटालियन हेडक्वार्टरला संदेश दिला की, ते गाव LTTE अर्थात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलमच्या ताब्यात असून त्यांचे संख्याबळ अधिक असून त्यांची हत्यारे आधुनिक आणि प्रभावी आहेत!

मी कॅप्टन शर्मांना तिथेच सुरक्षित जागी थांबून राहण्याचे आदेश दिले आणि निवडक सैनिकांची एक मोठी तुकडी घेऊन घटनास्थळाकडे त्वरीत कूच केले. तिथे पोहोचायला मला रात्रीचा दीड वाजला. कारण अंतर बरेच होते, रस्त्यात जंगल होते, त्यामुळे सावधानतेने जाणे गरजेचे होते.

आम्ही तिथे पोहोचलो तर त्या भागात एकदम स्मशान शांतता होती. त्या घराच्या जवळ एक ट्रक उभा होता. आम्ही त्या घराला वेढा घातला आणि सकाळी उजाडताच कारवाई करण्याची योजना आखली. पण सकाळी साडेपाच पर्यंत काहीही झाले नाही. त्या घरातून काहीही हालचाल झाली नाही. त्या घरात कुणीही नव्हते, हत्यारेही नव्हती. त्यामुळे आम्ही तिथून परतण्याचा निर्णय घेतला… काही अंतर चालतो न चालतो तोच… आमच्यावर तिथून अगदी जवळच असलेल्या जंगलातून जोरदार गोळीबार सुरु झाला. HMG अर्थात हेवी मशीन गन, एके-४७, हातगोळे इत्यादी शस्त्रांनी आमच्या तुकडीवर प्राणघातक हल्ला झाला! पहिल्याच फेरीत आमचे सुमारे दहा बारा जवान धारातीर्थी पडले!

मी कॅप्टन शर्मांना तिथूनच गोळीबाराला उत्तर देण्याचे आदेश देत ज्या जंगलातून हल्ला सुरु होत्या त्याच्या मागच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला… कारण अजून तसे उजाडले नव्हते… आहे त्या अंधाराचा फायदा घेत, थोड्या लांबच्या रस्त्याने जाऊन शत्रूवर मागून प्रहार करण्याची माझी योजना होती. त्यानुसार मी माझ्या वीस सैनिकांना घेऊन निघालो. गोळीबाराचा आवाज येत होता, त्या दिशेने गेलो… एवढ्यात अंधारातून माझ्या छातीवर रायफल टेकवली गेली… मोठा आवाज झाला आणि त्या रायफलमधून सुटलेली एक गोळी माझ्या बरगड्या फोडत छातीत घुसली… तो धातूचा लालबुंद तापलेला गोलाकार गोळा… खोलवर घुसला… मांस जाळत, चिरत! रक्ताची चिळकांडी उसळली… डोळ्यांपुढे अंधारी आली… आई, बाबा, पत्नी डोळ्यांसमोर दिसू लागली… आता त्यांची कधीही भेट होणार नाही! लष्करात आलो तेंव्हाच समजलं होतं… कुठल्या तरी गोळीवर आपले नाव निश्चित लिहून ठेवले गेले असेल तर त्या गोळीला रोखू शकणार नाही कुणीच. आणि तशी गोळी बनली नसेलच तर मात्र मला काहीही होणार नव्हतं. मरण तर काय कुठेही, कसेही येतेच. देशसेवेत आले मरण तर सोन्याहून पिवळे! माझ्या हातातली रायफल गळून पडली त्या प्रहाराने… पण त्याच उजव्या हाताने मी ती माझ्यावर डागली गेलेली रायफल, तिची नळी पकडली आणि जोर लावून माझ्याकडे खेचली… ती रायफल धरणारा दचकून मागे सरला… त्याला कल्पनाच नव्हती की ज्याला आपण छातीत गोळी घातली आहे… तो असं काही करेल! मी वायूवेगाने रायफल पेलली… ट्रिगर दाबला आणि समोरच्याच्या छाताडात एक नव्हे, दोन नव्हे… सलग पाच-सहा गोळ्या मारल्या… त्याच्या तोंडून मोठी किंकाळी आणि शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या… धूर निघाला! आणि तो धाडकन कोसळून पडला!

आता अतिरेक्यांनी हल्ल्याचा वेग वाढवला तसा मी ही आहे त्या जागेवरून माझ्या तुकडीला जोरजोरात सूचना देत राहिलो.. माझ्या महार रेजिमेंटची युद्ध घोषणा दिली… बोल… हिंदुस्तान की जय! श्रीलंकेत माझ्या भारताचे, हिंदुस्तानचे नाव त्या जंगलात गुंजत राहिले… माझे जवान लढत राहिले… काही वेळाने आपल्या मदतीसाठी आणखी सैनिक तिथे पोहोचले… मी रक्तबंबाळ… घायाळ… घरच्या, घरातल्यांच्या… माझ्या मायभूमीच्या आठवणीत डोळे मिटले… ते कायमचेच! १३ सप्टेंबर २०२६ रोजी ८० वर्षांचा झालो असतो!

आमचे मूळ गाव केरळमधल्या कोट्टयमजवळचे रामपूरम. आमचे कुळ किलीमंगलम नावाचे. वडील शंकरनारायनन आणि आई जानकी पोटासाठी मुंबईत येऊन राहिले आणि इथेच १३ सप्टेंबर, १९४६ रोजी माझा जन्म झाला. माझे शालेय शिक्षण आणि विज्ञान शाखेतील पदवी शिक्षण सायन येथील SIES अर्थात साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळा-महाविद्यालयात झाले. घरची लष्करी पार्श्वभूमी नसतानाही मी देशाच्या सेवेसाठी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. आणि The Officers’ Training School, Chennai (जी आता Officers’ Training Academy म्हणून ओळखली जाते) मधून १९७२ या वर्षी लष्करी अधिकारी म्हणून प्रशिक्षित झालो. मला १५, महार रेजिमेंटमध्ये नेमण्यात आले. पुढील आठ वर्षे मी या रेजिमेंटमध्ये राहिलो. आम्हांला भारताच्या ईशान्येकडील राज्यांत देशविरोधी शक्तींचा मुकाबला करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ती मी यथाशक्ती पार पाडली. ‘बोलो, हिंदुस्तान की जय! ’ ही आमची युद्ध घोषणा आणि ‘यश सिद्धी’ हे आदर्श वाक्य आहे. मला माझी मातृभाषा मल्याळम तर येत होतीच, पण माझी जन्मभूमी असलेल्या मुंबईची मराठीही अवगत होती आणि… तमिळ सुद्धा! माझे सैनिक मला ‘पारी साहेब’ म्हणत… परमेश्वरन आडनावामुळे असेल बहुदा! लष्करी अधिका-यांनी नेहमी पुढे राहून नेतृत्व करावे, अशा विचारांचा मी होतो… त्यामुळे ईशान्येत अनेक अतिरेकीविरोधी मोहिमांत मी नेहमी आघाडीवरच राहिलो! ‘१५, महार’ मधून मला पुढे ‘५, महार’ मध्ये पाठवले गेले.

श्रीलंका आपला शेजारी देश… केवळ १८. ६ समुद्री मैल किंवा किलोमीटर्सच्या भाषेत ३४. ५ किलोमीटर्स एवढेच अंतर. या देशाशी आपला संबंध अगदी पुराण काळापासूनचा आहे. पुढे तमिळनाडूमधून मोठ्या संख्येने शेतमजूर श्रीलंकेत स्थायिक व्हायला गेले. श्रीलंकेतील बहुसंख्य ‘सिंहली’ समुदाय आणि मूळच्या भारतीय पण आता श्रीलंकेत कित्येक पिढ्यांपासून स्थायिक झालेल्या समुदायामध्ये संघर्ष पेटला. तमिळ लोकांपैकी काहींनी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम अर्थात L. T. T. E. ही सशस्त्र संघटना स्थापन केली आणि श्रीलंका सेनेशी गृहयुद्ध सुरु केले. काही राजकीय उद्दिष्ट लक्षात घेऊन भारताने श्रीलंका आणि तमिळ बंडखोर यांच्यात परस्पर शांतता राखण्यासाठी श्रीलंकेत ‘शांतिसेना’ अर्थात IPKF इंडियन पीस कीपिंग फोर्स’ पाठवायचे ठरवले. ५४ व्या पायदळ डिविजनमध्ये ८, महार रेजिमेंटही या शांतिसेनेचा एक भाग बनली… आणि मला या रेजिमेंटमध्ये जबाबदारी देण्यात आली… मला तमिळ भाषा येत होती ही बाबही लक्षात घेतली गेली असावी… श्रीलंकेत तमिळ भाषिक आहेत.. त्यांच्याशी संवाद साधायला माझ्या भाषा ज्ञानाचा उपयोग झाला!

भारतीय लष्कर जो आदेश देईल तो प्राणपणाने पाळण्याची आपल्या सैनिकांची परंपरा आहे… मी ही याला अपवाद नव्हतो! जो देशाविरोधात, देशाच्या लष्कराच्या विरोधात शस्त्र हाती घेईल… तो आमचा शत्रू हे सैनिकांचे धोरण आणि प्रशिक्षण असते… बाकी राजकीय, धार्मिक, सामाजिक बाबी आम्ही शिपाईगडी ध्यानात घेत नसतो!

आरंभी श्रीलंकेतील तमिळ जनतेने शांतिसेनेचे स्वागत केले. परंतु पुढे दुर्दैवाने त्यांनीच भारतीय लष्करावर हल्ले करायला सुरुवात केली. शेजारी राष्ट्रांपैकी काही राष्ट्रं श्रीलंका लष्कराला तर काही राष्ट्रं तमिळ बंडखोरांना शस्त्रपुरवठा करू लागली. शांतिसेनेचे काम असल्याने सुरुवातीला भारतीय लष्कर युद्धाच्या तयारीनिशी श्रीलंकेत गेलेच नव्हते. त्यामुळे आधुनिक, मोठी शस्त्रे सोबत नेण्याचा प्रश्नच नव्हता… आणि इथेच खरी समस्या उभी राहिली!

परंतु उत्तम प्रशिक्षण, शौर्याच्या जोरावर भारतीय सैनिकांनी तमिळ बंडखोरांवर बाजी उलटवली… परंतु त्यासाठी ११७१ सैनिकांना प्राणार्पण करावे लागले आणि ३५०० पेक्षा अधिक सैनिक जायबंदी झाले!

मला माझ्या शौर्याबद्दल भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार ‘परमवीर चक्र’ मरणोत्तर जाहीर करण्यात आला. परकीय भूमीवर भारतीय सैन्यातून कामगिरी करीत असताना एखाद्या सैनिकास दिले गेलेले हे तसे पहिलेच ‘परमवीर चक्र’! १९६१ मध्ये कांगो देशातील कटंगा येथे संयुक्त राष्ट संघाच्या आंतरराष्ट्रीय सैनिकांचा समावेश असलेल्या शांतिसेनेत अतुलनीय पराक्रम गाजवल्याबद्दल कॅप्टन गुरुबचनसिंग सलारिया साहेबांना मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ प्रदान करण्यात आले होते. आपला देश युद्धात सहभागी नसताना परदेशातल्या युद्धभूमीवर पराक्रम गाजवल्याबद्द्ल ‘परमवीर चक्र’ मिळवणारा केवळ दुसराच सैनिक ठरलो होतो. तसेच ‘परमवीर चक्र’ मिळवलेला OTAचा माजी विद्यार्थी म्हणून मी आजवर एकमेव आहे!

परंतु… पण… त्याचं काय झालं… माझ्या शौर्याची देशात फार काय सुरुवातीला तर अजिबातच चर्चा झाली नाही. कुसुमाग्रजांनी नेमकं म्हणून ठेवलं आहे… स्तंभ तिथे ना कुणी बांधला… पेटली न वात!

त्यावेळचं भारतातील राजकीय, सामाजिक वातावरण, आंतरराष्ट्रीय संबंध या व अशा अनेक कारणांमुळे अगदी २०२५ पर्यंत माझ्या किंवा श्रीलंकेत भारतीय सैनिकांनी ‘ऑपरेशन पवन’ (१९८७-१९९०) मध्ये दिलेल्या ११७१ बलिदानांचा अधिकृत स्मृतिदिन कुठे पाळला जात नव्हता! श्रीलंकेत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचे, काही अधिका-यांचे मृतदेह भारतात आणले जाऊ शकले नाहीत!

‘परमवीर चक्र’ विजेता म्हणून माझ्या कुटुंबास विशेष आर्थिक लाभही दिला गेला नाही… किंबहुना ‘परमवीर चक्र’ विजेता म्हणून माझे नावही काही फारसे प्रसिद्ध नव्हते! श्रीलंका सरकारने मात्र २००८ मध्ये कोलंबो येथे IPKF Memorial निर्माण केले!

२०१८ मध्ये OTA मधले ३७ सेवानिवृत्त लष्करी अधिकारी-मित्र एकत्र आले. त्यांनी सात लाख रुपयांचा निधी गोळा केला आणि महार रेजिमेंटच्या सैनिक-अधिका-यांनी त्यात एक लाखाची भर घातली आणि माझा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारला… रायफल हाती आहे माझ्या! OTA मधल्या Drill Square ला माझे नाव देण्यात आले आहे. मी याच ठिकाणी इतरांची सरावाची वेळ संपली तरी March-Pastचा सराव करीत असे. त्यावेळी नेमके भारत-पाक युद्ध सुरु झाले होते, काही प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण सोडून निघूनही गेले… पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम राहिलो! देशासाठी मरण पत्करणे ही एक भावना आहे. मात्र सैनिक युद्धात शत्रूला मारायलाच जात असतात… मरायला नव्हे! परंतु या प्रयत्नांत मरण आलेच तर ते हसत हसत स्वीकारण्याचीही तयारी असते सैनिकांची! अशा सैनिकांच्या बळावरच तर देश टिकून राहतात… देशाच्या सीमा सुरक्षित राहतात! सैनिक होण्यासाठी काही किंमत चुकवावीच लागते… आणि त्याबद्दल सैनिकांची काहीही तक्रार नसते!

२३ जानेवारी, २०२३ रोजी अंदमान-निकोबार मधील एका बेटाचे माझ्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘रामस्वामी बेट’ असे नामकरण करण्यात आले! मागील वर्षी २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये तत्कालीन सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी साहेबांनी भारतीय लष्कराच्या वतीने माझ्या आणि ऑपरेशन पवन मध्ये धारातीर्थी पडलेल्या सर्व सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुष्पचक्र वाहिले! माझी पत्नी लेखिका, कवयित्री श्रीमती उमा परमेश्वरन उपस्थित होती. ही परंपरा आता सुरु राहील! सैनिकांचा राजकारणाशी काहीही संबंध नसतो, ते केवळ पगार मिळतो म्हणून नोकरी करीत नाहीत.. किंबहुना सैन्यातील सेवा ही नोकरी नव्हेच… तो एक करार असतो आत्म्याने देशाशी केलेला… आणि हा करार प्राण देऊनही पाळला जातोच!

(ऑपरेशन पवन मध्ये महाराष्ट्राचे, मराठा लाईट इन्फंट्री, महार रेजिमेंट यांच्या विविध तुकड्यांमधील तसेच अन्य काही विभागातील सुमारे ८५ पेक्षा अधिक सैनिक हुतात्मा झाले. यांपैकी शिपाई प्रभाकर बयाजी पत्रे आणि हवालदार पांडुरंग काकफळे, सुबेदार सीताराम पाटील (गढवाल रायफल्स) यांना मरणोत्तर वीरचक्र पुरस्काराने तर लान्स नायक मिलिंद कांबळे, यांना मरणोत्तर सेना मेडलने सन्मानित करण्यात आले. या यादीत नाईक श्रीधर विठ्ठल कुरणकर(गढवाल रायफल्स) हेही मराठी नाव आढळते ज्यांना मरणोत्तर वीर चक्र आणि सेना मेडल मिळाल्याचा उल्लेख आहे. इंटरनेटवर शहीद उपवन मध्ये ही सर्व नांवे आहेत. असो.

जय हिंद… जय हिंद की सेना.

(हा लेख संपूर्णपणे अराजकीय आहे)

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अग्नी किंवा तेज ऊर्जा ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ जल ऊर्जा (Water Energy) ☆ विभावरी कुलकर्णी ☆

मिळवण्यासाठी किंवा आपल्या शरीरातील जलतत्त्व संतुलित करण्यासाठी व मनाला शांत करण्यासाठी प्रभावी पद्धत आहे. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. जल ऊर्जा हे निसर्गाशी जोडलेली शांतता आणि भावनांवर नियंत्रण मिळवून देणारी असते.

जल ऊर्जेचे फायदे:

मानसिक शांती:

पाण्या सारखा प्रवाहीपणा आपल्या विचारात येतो. त्या मुळे मनातील गोंधळ कमी होतो. व एकाग्रता वाढण्यास मदत होते.

पाण्यासारखी स्थिरता आणि शांतता मिळण्यास मदत होते.

तणावमुक्ती: मज्जासंस्था शांत होते. आणि मानसिक ताण कमी होतो. ही ऊर्जा स्नायुंमधील ताण कमी करुन शरीराला शिथिल (Relax) करते. त्यामुळे गाढ झोप लागण्यास मदत होते.

सर्जनशीलता:

मन स्पष्ट आणि शांत झाल्यामुळे कल्पकतेत वाढ होते. मनाला नवीन दृष्टी मिळते.

भावनिक समतोल: भावनांचे नियमन करण्यास आणि नकारात्मकता कमी करण्यास मदत होते. जलतत्व हे भावनांशी संबंधित असते. या मुळे राग, भीती, तणाव या सारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. आणि मन स्थिर होते.

लवचिकता

पाणी जसे पात्रा प्रमाणे आकार धारण करते त्या प्रमाणे ही ऊर्जा जीवनातील बदल स्वीकारण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता वाढवते.

अंतर्मनाची शुद्धी

पाणी जसे अशुद्धी धुवून टाकते, त्या प्रमाणे ही जलऊर्जा मनातील जुन्या नकोशा आठवणी, दुःख, नकारात्मक विचारांचे ओझे स्वच्छ करुन मन हलके करते.

अंतर्ज्ञान

ही ऊर्जा अंतर्ज्ञानाशी (Intuition) जोडलेली असते.

सकारात्मक ऊर्जा वाढणे

या ऊर्जे मुळे शरीरातील ऊर्जा केंद्रे (चक्र) संतुलित होतात.

टीप: हे ध्यान रात्रीच्या वेळी किंवा शांत वातावरणात करणे अधिक फलदायी मानले जाते, जेणेकरून मन अधिक एकाग्र होऊ शकते.

समाप्त — 

©  विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन व हिलिंग मास्टर,  समुपदेशक,  सांगितोपचारक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ अकाऊंट क्लोज्ड…  – लेखक : श्री संजय मानके ☆ प्रस्तुती – वर्षा राजाध्यक्ष ☆

वर्षा राजाध्यक्ष

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अकाऊंट क्लोज्ड…  – लेखक : श्री संजय मानके ☆ प्रस्तुती – वर्षा राजाध्यक्ष 

संध्याकाळचे सहा वाजले होते. बाल्कनीत बसून हातातला चहाचा कप पेलताना जनार्दनरावांचे डोळे उगाचच शून्यात दाटले होते. नेहमीप्रमाणे मनात विचारांचे वादळ सुरू होते—गेल्या महिन्यात मुलगा-सुनेने स्वतंत्र राहण्याचा घेतलेला निर्णय, काल रस्त्यात भेटूनही न बोलता निघून गेलेला जुना मित्र, आणि दोन वर्षांपूर्वी ज्या नातेवाइकाला अडीअडचणीत मोठी आर्थिक मदत केली त्यानेच नंतर फिरवलेली पाठ!

 मी आयुष्यभर लोकांसााठी काय काय नाही केलं? पण बदल्यात मला काय मिळालं? फक्त उपेक्षा आणि अपमान… जनार्दनराव स्वतःशीच पुटपुटले. त्यांच्या छातीत एक ओळखीची जाळणारी व्यथा जागी झाली.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात जनार्दनरावांचे जुने स्नेही आणि अभ्यासू लेखक ‘वपु’ उभे होते.

“काय जनार्दन, कसला विचार चालू आहे? चेहरा एवढा पडलेला का? ” वपुंनी आत येत विचारले.

जनार्दनरावांनी उसासा टाकला, “काय सांगू वपु, लोकांच्या वागण्या-बोलण्याचा फार त्रास होतो आजकाल. ज्यांच्यासाठी आयुष्य घासले, तीच माणसे अशी विचित्र वागतात. अपमान करतात, दुर्लक्ष करतात. उपकारांचे विस्मरण झाले आहे सगळ्यांना. “

वपु थोडे हसले. त्यांनी खिशातून एक छोटी वही काढली आणि समोरच्या टेबलावर ठेवत म्हणाले, “जनार्दन, एक सांगू? आपण या जन्मात येतो ते कोणाच्या अपेक्षा पूर्ण करायला नाही, तर आधीच्या कुठल्यातरी जन्माची परतफेड करायला! आपण प्रत्येकाचे मनात एक ‘खाते’ उघडून बसलोय. आणि समोरच्याने आपल्या इच्छेनुसार वागावे, अशी अपेक्षा ठेवतो. “

“पण वपु, त्रास तर होतोच ना? ” जनार्दनराव काकुळतीला येऊन म्हणाले.

“त्रास तेव्हाच होतो, जेव्हा आपण ते खाते अजून चालू आहे असे मानतो, ” वपु शांतपणे समजावून सांगू लागले, “तुम्ही दृष्टिकोन बदला. मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत? समजा, एखादी जुनी परतफेड होती, ती या जन्मात पूर्ण झाली. तुमच्या उपकारांची कोणाला आठवण राहिली नाही? समजा, ते खाते आता पूर्ण झाले. बँकेत शिल्लक संपली की पासबुकावर कसा ‘अकाऊंट क्लोज्ड’चा शिक्का मारतात? बस, तसेच मनातल्या या माणसांच्या नावावर ‘अकाऊंट क्लोज्ड’चा शिक्का मारा आणि त्यांच्या नावाचे पासबुक जाळून टाका! “

जनार्दनराव थबकले. वपुंचे शब्द थेट त्यांच्या मनाचा ठाव घेत होते.

वपु पुढे म्हणाले, “आपले मन जेवढे बलदंड असते ना जनार्दन, तेवढेच ते लवचीकही असते. आजवर तुम्ही मनाच्या हुकुमात राहिलात, त्याच्या भावनांची गुलामी केलीत. आता त्या मनाला सांगा—’बाबा रे, आजपासून मी तुला मुक्त करत आहे. ‘ परतफेडीचा हिशेब या जन्मात संपवल्याशिवाय सुटका नाही. मग कशाला विचारता परमेश्वराला की मला का जगवलंस? जे घडतंय, ती केवळ परतफेड आहे, हे स्वीकारा. “

जनार्दनरावांनी डोळे मिटले. मनातल्या गच्च साचलेल्या आठवणींकडे ते एका वेगळ्या नजरेने पाहू लागले. मुलगा दूर गेला—’अकाऊंट क्लोज्ड! ‘ मित्राने दुर्लक्ष केले—’अकाऊंट क्लोज्ड! ‘ नातेवाइकाने फसवले—’अकाऊंट क्लोज्ड! ‘

आश्चर्य म्हणजे, एकेक खाते बंद झाल्याची भावना मनात येताच, छातीत वर्षानुवर्षे साचलेला तो जाळणारा भार हळूहळू हलका होऊ लागला.

वपु उठले, त्यांनी जनार्दनरावांच्या खांद्यावर हात ठेवला आणि मिश्किलपणे म्हणाले, “हा प्रयोग करून बघा जनार्दन, आणि किती खाती फटाफट बंद होतात याची प्रचिती घ्या. अगदी उद्या मीसुद्धा तुम्हाला रस्त्यात भेटलो आणि ओळख दाखवली नाही, तर तुमच्या पासबुकात माझी एकच एन्ट्री होती, असं समजा आणि माझी फाइलही बंद करा! “

वपु निघून गेले. जनार्दनराव पुन्हा बाल्कनीत येऊन उभे राहिले. आता संध्याकाळचा वारा त्यांना शांतवत होता. मनात दुःखाची किंवा रागाची कोणतीही भावना शिल्लक नव्हती.

 अनेक वर्षांनंतर आज जनार्दनरावांनी एक दीर्घ, मोकळा श्वास घेतला. कारण, त्यांच्या मनातील नकारात्मकतेची सर्व पासबुके आज खरोखरच जळून खाक झाली होती!

 

लेखक: श्री संजय मानके

प्रस्तुती: वर्षा राजाध्यक्ष

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares