मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “गण गण गणात बोते – –” ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “गण गण गणात बोते – –” ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री सुधीर करंदीकर

गण गण गणात बोते – – 

माघ वद्य सप्तमी – – शेगावचे श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन. या वर्षी आज, म्हणजे ८ फेब्रुवारी रोजी हा प्रकट दिन साजरा होत आहे. त्या निमित्ताने काही – – 

‘गण गण गणात बोते’… शेगांवचे श्री गजानन महाराज यांनी सर्व भक्त मंडळींना हा एकच मंत्र दिला होता 

… महाराज स्वतः या मंत्राचा सतत जप करत असत आणि त्याप्रमाणे तो आचरणात आणत असत.

कुठलाही मंत्र म्हटला, की, त्यामध्ये दोन गोष्टी अपेक्षित असतात… एक म्हणजे ध्यानस्थ बसून त्या मंत्राचा नित्यनियमाने जप करणे. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे, नित्य जप करण्याबरोबरच त्या मंत्राचा अर्थ समजवून घेणे आणि त्याप्रमाणे आपले आचरण बदलणे आणि ठेवणे.

महाराजांचे आपण बरेच भक्तगण ‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा नित्य जप करत असतो. असा जप केल्यामुळे आपलं चित्त एकाग्र होतं, आणि त्यामुळे जप करणाऱ्यांना मानसिक शांतता नक्कीच मिळते.

– – पण बऱ्याच जणांना या मंत्राचा अर्थ माहीत नसतो, त्यामुळे तो आचरणात आणणे दूर राहते. आणि त्यामुळे आपली वैचारिक पातळी / अध्यात्मिक पातळी उंचावण्याकरता या अतिशय साध्या आणि आचरणांत आणायला अतिशय सोप्या अशा मंत्राचा उपयोग करण्याला आपण मुकतो.

आपल्याला समजेल, असा या मंत्राचा अर्थ जर आपल्याला समजला, तर तो आचरणात आणणे सोपे असते. आणि मग आपण मनात तसं ठरवलं, तर आपली वाटचाल त्या दिशेनी सहजपणे होऊ शकते.

– – या मंत्राचा अर्थ सांगतात तो असा :- जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये. भगवान सर्वत्र आहेत आणि सर्व सत्ता भगवंतात आहे.

हा सांगितलेला अर्थ वाचून मला किंवा सगळ्यांना समजेल असा अर्थ लक्षात येत नव्हता. आणि त्यामुळे मंत्र आचरणात कसा आणायचा हे लक्षात येत नव्हते… म्हणून मी प्रत्येक शब्दाचा सर्व बाजूंनी अर्थ लक्षात घेऊन या मंत्राद्वारे महाराजांना काय सांगायचे असेल व ते सगळ्यांना कसे समजेल, असा या मंत्राचा अर्थ मी लिहून काढला.

– – मला या मंत्राचा सोपा अर्थ दिसतो तो असा —

(पहिला) गण = कुणीही व्यक्ती, कुणीही प्राणी

(दुसरा) गण = शिव म्हणजेच ईश्वर म्हणजेच देव

गणात = हृदयात

बोते = बघा

– – म्हणजे सगळ्या व्यक्तींमध्ये / प्राण्यांमध्ये ईश्वर आहे हे लक्षात घ्या आणि ही जाणीव ठेवा. आणि मग त्याप्रमाणे आपली वागणूक ठेवा. सगळ्या व्यक्ती; म्हणजे आपण स्वतः पण त्या मधे येतो, म्हणून स्वतःमध्ये पण ईश्वर आहे, हे पण लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

आपण ज्या व्यक्तीशी बोलतोय किंवा ज्या व्यक्ती विषयी बोलतोय, त्या व्यक्तीमध्ये ईश्वर आहे, हे जर आपल्या प्रत्येकाला उमगलं, तर आपण त्या व्यक्तीशी खोटं बोलू शकणार नाही / नाटकीपणाने बोलू शकणार नाही / त्याच्यावर आरडाओरडी करू शकणार नाही / त्याला घालून पाडून बोलू शकणार नाही / त्याला फसवू शकणार नाही / त्याला खोटी आश्वासने देऊ शकणार नाही / कुठेहि भेसळ करू शकणार नाही / भ्रष्टाचार करू शकणार नाही. यामुळे सगळेच नातेसंबंध / मैत्रीसंबंध आणि व्यवहार स्वच्छ होतील, आणि राहतील.

आपण अनेक मंदिरांची यात्रा करतो, देवांची पूजा करतो, देवांचे सण साजरे करतो, पण आपल्याला देवदर्शन कधीच होत नाही. कारण देवळातला देव म्हणत असेल, इथे तू माझ्यासमोर हात जोडतो आहेस / माझ्या आरत्या करतो आहेस आणि बाहेर गेल्यानंतर तू लोकांना म्हणजेच मला (कारण सगळ्याच व्यक्तींमधे देव आहे) फसवतो आहेस / लोकांना म्हणजेच मला शिवीगाळ करत आहेस, तुला मी कस काय दर्शन देणार आणि तुझ्यावर कसा प्रसन्न होणार !

समोरच्या व्यक्ती मधे देव आहे हे जर आपल्याला मनापासून पटलं, तर आपलं आचरण आपोआपच भक्तासारखं होईल आणि मग देव स्वतः आपल्या दाराशी दर्शन देण्याकरता येईल हे नक्की. पुराणकाळात अशी उदाहरणे भरपूर आहेत.

आता दुसरा भाग म्हणजे, स्वतःमधे देव आहे, हे जर आपल्या मनात रुजलं तर एक गोष्ट सहज लक्षात येईल, की, आपले स्वतःचे शरीर हेच त्या देवाचे मंदिर होते. देवाचे वास्तव्य जागृत ठेवायचे असेल तर ते मंदिर म्हणजेच आपण आपले शरीर आणि मन हे दोन्ही स्वच्छ आणि पवित्र ठेवायलाच पाहिजे. आणि हे अगदी सोपे आहे. आपण याकरिता काय करायला पाहिजे –

रोज आपल्या शरीराची बाहेरून स्वच्छता करायला पाहिजे. नियमित व्यायाम, नियमित फिरणे, नियमित प्राणायाम, आपल्या आवडी / छंद जपणे, चांगले खाणेपिणे, वेळेवर झोपणे आणि उठणे, हे करायलाच पाहिजे. आपली घरची / बाहेरची कामे, नोकरी, व्यवसाय, हे सगळे नेहेमीच मन लावून करायलाच पाहिजेत. सगळ्यांशी प्रेमानी बोलणे / वागणे / कायम चेहेरा हसरा ठेवणे, यामुळे मन स्वच्छ राहते. कुणाही कडून अपेक्षा न ठेवणे यामुळे पण मन स्वच्छ राहते.

तुकाराम महाराजांचं याच विषयावर एक सुंदर भजन आहे – 

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर

देव देहात देहात, का हो जाता देवळात

तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना II

गजानन महाराजांच्या मंत्राचा सोपा अर्थ आता लक्षात आला असेलच.

 – – चला तर मग आपण सगळेच जण आजपासून आचरणात आणूया –

गण गण गणात बोते l

गण गण गणात बोते l

 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आत्मविश्वास व धाडस… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ आत्मविश्वास व धाडस… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

काय गंमत असते पहा..

असाधारण बुद्धिमत्ता, उच्च शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या बहुतांशी लोकांचे मन कायम शंका, भीती आणि संशयांनी भरलेले असते. त्यामुळे ते सुरक्षिततेचा मार्ग पसंत करतात आणि मोठी जोखीम घेणे टाळतात. परिणामी, त्यांचे संपूर्ण आयुष्य निर्धोक चाकरी (नोकरी) करण्यात व्यतीत होताना दिसते. याउलट, अनेक वेळा दिसते की साधारण बुध्दिमत्ता व शैक्षणिक गुणवत्ता असलेले अथवा ज्यांनी गमवायला जीवनात फारसं काही कमावलेलं नसलेले, जास्त विचार न करता प्रचंड आत्मविश्वासाने एखाद्या व्यवसायात उतरून त्यात यश मिळवतात व कालांतराने उच्च शिक्षित लोकांना आपल्याकडे कामाला ठेवून त्यांच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाच्या जोरावर व्यवसायाला नव्या उंचीवर नेतात.

कारण कोणत्याही माणसाचा आत्मविश्वास पर्वतालाही हलवू शकतो. हे केवळ एक सुभाषित नसून, ते एक सत्यवचन आहे… असाधारण बुद्धिमत्ता असलेल्या व उच्चशिक्षित व्यक्तींकडे अनेकदा ‘ॲनालिसिस पॅरालिसिस’ (Analysis Paralysis) ही समस्या दिसून येते. ते प्रत्येक परिस्थितीचा इतका सखोल विचार करतात की, शेवटी कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे ज्ञानाचा साठा मोठा असतो, त्यामुळे त्यांना प्रत्येक संभाव्य धोका स्पष्टपणे दिसतो. ‘चुकीचा निर्णय घेतला तर काय होईल?’, ‘अपयश आले तर समाजात मान कसा राहील?’अशा अनेक शंका त्यांच्या मनात घर करतात. ही गमावण्याची भीती (Fear of Loss) त्यांना सुरक्षित ठेवते, पण त्याच वेळी त्यांना मोठे काही साध्य करण्यापासून रोखते. सुरक्षित नोकरीचा मार्ग त्यांना निश्चित उत्पन्न आणि सामाजिक प्रतिष्ठा देतो, पण उद्योजकतेचे किंवा धाडसाचे मोठे फळ मिळवण्याची संधी ते गमावून बसतात. अन् दुसरीकडे, साधारण बुध्दीमत्ता व शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या व्यक्तींकडे गमावण्यासाठी फारसे काही नसते. त्यांच्यासाठी प्रत्येक नवीन प्रयत्न ही एक संधी असते, धोका नव्हे. त्यांच्यातील आत्मविश्वास शंकांना मनात जागा देत नाही. ते परिस्थितीचा अतिविचार न करता थेट कृती (Action) करण्यावर भर देतात. अन् व्यवसायात यश मिळवतात.

व्यवसायात किंवा जीवनातील इतर क्षेत्रांत यश मिळवण्यासाठी केवळ ज्ञानाची नव्हे, तर लवचिकता (Flexibility), बाजाराचे निरीक्षण, संवाद कौशल्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धोका पत्करण्याची तयारी (Risk Taking Ability) आवश्यक असते. हे गुण औपचारिक शिक्षणातून नव्हे, तर जीवनाच्या अनुभवातून आणि आत्मविश्वासातून माणसात रुजतात. यामुळेच जगभरात अनेक यशस्वी उद्योजक पाहायला मिळतात, ज्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिले किंवा ज्यांच्याकडे उच्च पदव्या नव्हत्या, पण त्यांनी केवळ आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे व्यावसायिक साम्राज्य उभे केले. त्यांच्याकडे काम करणाऱ्या अनेक व्यक्ती उच्चशिक्षित असतात, कारण या उद्योजकांनी केवळ आत्मविश्वासाच्या बळावर योग्य लोकांना योग्य कामासाठी नेमण्याची कला आत्मसात केलेली असते.

थोडक्यात शिक्षण आणि ज्ञान महत्वाचे आहे, पण जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि धाडस यांचे महत्त्व अधिक आहे !

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ धबाबा लोटती धारा… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ धबाबा लोटती धारा… ☆ सौ शालिनी जोशी

काल धबधब्याचा फोटो पाहिला. तेव्हा आठवण झाली शिवथरघळच्या धबधब्याची. प्रत्यक्ष पाहून बरीच वर्षे झाली असली, तरी मला त्यात समर्थांचे रूप दिसते. समर्थ ज्यांचे वर्णन ‘धबाबा लोटती धारा l धबाबा तोय आदळे l’ असे करतात. त्यांचा ‘धबाबा ‘हा शब्द मनावर ठसतो. यातून धबधबा पाहून वाटणारे आश्चर्य, अखंड ओघ आणि त्याचा जोर सर्वच व्यक्त होते. त्या धबधब्यासारखाच धीर, गंभीर, बळकट, ताठ, कुणापुढे न झुकणारे, उद्योगी समर्थांचे व्यक्तिमत्व आणि त्या जलौघाप्रमाणे त्यांच्या शब्दांचा ओघ.

ही जलाची टांगसाळ, तर समर्थांची वाणी ही शब्दांची टांकसाळ. त्यांच्या साहित्यातील एकाच गोष्टीचे वर्णन करणाऱ्या अर्थपूर्ण व नादयुक्त शब्दांचा ओघ हा धबधब्यातील पाण्यासारखा वाटतो. दासबोधातील प्रत्येक अध्यायात एका शब्दासाठी ५०/६० सुद्धा प्रतिशब्द किंवा त्यासंबंधी शब्द रचना आहेत. उदाहरणार्थ संतांचे वर्णन करताना दासबोधात समर्थ म्हणतात.

संत आनंदाचे स्थळl संत सुखची केवळl नाना संतोषाचे मुळl ते हे संतl संत विश्रांतीची विश्रांतीl संत तृप्तीची नीज तृप्तीl नातरी भक्तीची फलश्रुतीl ते हे संतl संत धर्माचे धर्मक्षेत्रl संत स्वरूपाचे सत्पात्रl ना तरी पुण्याची पवित्रl पुण्यभूमीl संत समाधीचे मंदिरl संत विवेकाचे भांडारl नातरी बोलीजे माहेरl सायोज्यमुक्तीचेl संत सत्याचा निश्चयोl संत सार्थकाचा जयोl संत प्राप्तीचा समयोl सिद्धरूपl मोक्षश्रिया आलंकृतl ऐसे हे संत श्रीमंतl जे समर्थपणे उदारl अत्यंत दानशूरl

असे हे वर्णन समजून घेताना आपलीच दमछाक होते. समर्थांनी दासबोधाची रचना शिवथरघळला केली. कदाचित त्या धबधब्याकडे पाहूनच अशी ओघवती रचना त्यांना सूचली असावी. त्यांची अखंड जागृत प्रतिभा पाहून तो ओघ डोळ्यासमोर येतो.

धबाबा लोटती धाराl

धबाबा तोय आदळेl

समर्थांच्या प्रतिभेला शतशः प्रणामl🙏

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक आई “वरती”… एक आई “खालती”…  ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ एक आई “वरती”… एक आई “खालती”… ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

एक आई “वरती”.. एक आई “खालती”

खरेतर प्रत्येकाला तीन आई असतात.

एक जिने जन्म दिला 

दुसरी धरणी माता 

तिसरी भारतमाता!

तिन्ही श्रेष्ठच, . पण तरी जन्मदात्री आई बद्दल विशेष स्थान आपल्या जीवनात नेहमीच असते. जोवर ती असते तोवर आपण खूप निवांत असतो. आपल्यातील खोडकर मूल जपण्याचे काम आईच तर करते. मात्र ज्याक्षणी ती आपल्याला सोडून वर निघून जाते त्या क्षणी आपण अचानक “मोठे” झाल्याचे जाणवते. “पोरका” या शब्दाचा अर्थ कळायला लागतो.

असाच मला तो कळला जेव्हा आई “सोडून” गेली. खूप दिवस एकाकी होतो.

सामाजिक कामात मन गुंतवून घेत घेत त्या एकाकीपणातून थोडाफार बाहेर आलो, पण तरी तिची सर येणे शक्य नव्हते. मात्र एक दिवस अचानक एका मातेची ओळख झाली तीही सोशल मीडियावरच. “बाबा आमटे विचारधारा” नावाचा एक ग्रुप आहे. जिथं सामाजिक काम करणारे विविध लोक एकत्र आलेत. तिथं भेटल एक दाम्पत्य… श्री व सौ अनुश्री भिडे… वास्तव्य ठाणे. (मुंबई)

श्री भिडे नामांकित बँकेतून निवृत्त झालेले. दोघांशी परिचय वाढला. आणि त्यातूनच एक दिवस थेट ते मला भेटायला ऑफिसवर पुण्याला आलेले. आणि त्यानंतर स्नेहधागा अधिक बळकट झाला. अतिशय प्रेमळ असं हे दाम्पत्य. अक्षरशः लखपती असूनही निगर्वी… आणि अत्यन्त साधी राहणी. “वरणभातवाले आम्ही लोक” असं ते म्हणत. यात सगळं आलं.

मात्र दुर्दव असं की भिडेकाका अचानक “वर” गेले आणि माउली एकटी पडली. पन्नास साठ वर्षाचा सहवास होता त्यामुळे माउली फारच दुःखात… त्याकाळात जमेल तसे त्यांच्या सोबत राहून त्यांना सावरत होतो. त्याही मन मोकळं करायच्या.

हळूहळू सावरल्या. त्यांना सांगितलं की, “काका आहेतच सोबत… फक्त ते आता तुमच्या वाढीव सामाजिक कामातून लोकांना दिसतील. तर अशी काम करायला घ्या आता”

त्यांनीही ते मनावर घेतलं. आणि कळलं तर तुम्हालाही वेड लागेल इतकं मोठं काम त्या करत गेल्या. काही एनजीओ बद्दल मी जेव्हाही पोस्ट करायचो तेव्हा त्याचा निरोप यायचा की “त्या संस्थेचा” नम्बर आणि पत्ता पाठवा. आणि तात्काळ त्या तिथं जाऊन जमेल तशी मदत करायच्या.

एक झलक सांगतो. मराठी इंग्रजी भाषेविषयी सोप्या भाषेत एक पुस्तक प्रज्ञा (माझी एफबी फ्रेंड) हिने लिहिलेले. हल्ली पुस्तक विकत घेऊन वाचणे कमी झालेय हे सर्वाना माहित आहे. मात्र अनुश्रीताईनी काय करावं? ते पुस्तक घराघरात गेले पाहिजे म्हणून चक्क दीड लाख रुपयांची ती पुस्तके खरेदी करून लोकांना वाटून टाकली. नंतर नंतर तर प्रज्ञा फक्त यांच्यासाठी पुस्तक काढतेय अशा आवृत्या निघत गेल्या.

कोण करत कुणासाठी इतकं?

एकदा मी त्यांना म्हटलं पण, “अहो, सगळं उधळून टाकताय… तुम्हालाही वृद्धपण आहे. औषधपाणी दवाखाना आहे. त्याची तरतूद ठेवा की “

तर म्हणाल्या… “त्याची का काळजी करू? तुमच्यासारखे आहेत की”

काय बोलणार यावर? महिन्याला लागतात मला किती दहापाच हजार पुरतात असं म्हणत बाकी सगळी पेन्शन त्या समाजासाठी खर्च करून टाकतात. आजवर किती खर्च केले यावर मी विचार केला तर कैक लाख रुपये माझ्याच समोर यांनी देणग्या देऊन समर्पित केलेले आठवले. काय म्हणावं अशा माउलीला?

मधेच कधीतरी त्यांच्याकडून फोटो येतात अन मी कपाळावर हात मारतो. कुठंतरी दूर डोंगर दऱ्यात कुणीतरी शाळा चालवत असत तिथं या जाऊन मुलाला पाटीपुस्तक दप्तर ड्रेस देऊन आलेल्या असतात. तर कधी सेवा सहयोग या संस्थेच्या कामात स्वतःला गाडून घेतात. मलाही त्यात ओढून घेतात. आणि नकळत त्या कार्याला बळकटी आणतात.

नुकताच ठाण्यात माझे सायबर क्राईम वरचे लेक्चर होते. त्यांना हे कळलं आणि तडक मेसेज आला “मी येतेय”

मी म्हटलं, “अहो तो कार्यक्रम त्या सोसायटीच्या लोकांसाठी आहे फक्त”

तर म्हणाल्या, मला तुला भेटायच आहे. मी येणार 

आणि खरेच त्या आल्या. त्या सोसायटीत त्यांची एक मैत्रीण राहत होती. तिच्यासोबत या आल्या. ज्याचे लेक्चर आहे त्यांची ही व्यक्ती जवळची आहे असं कळल्यावर संयोजकांनी त्यांना पुढच्या पहिल्या रांगेत बसायला सांगितलं असणार मात्र त्यांनी नकार देऊन शांतपणे मागे कुठेतरी बसून पूर्ण लेक्चर ऐकलं आणि सम्पल्यावर मग येऊन भेटल्या.

त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की मलाही गहिवरून आलं. जणू आपलं लेकरू किती मोठं काम करतंय, लोकांना सायबर जागृत करतंय… हा त्यांना आनंद! मीही जवळ जाऊन घट्ट मिठी मारली. तेव्हा तिथं जमलेले बाकीचे लोक पाहायला लागले माझ्याकडे… मी त्यावेळी म्हणालो… “हि माझी आई आहे”

त्यावर सगळे कौतुकाने यांच्याकडे पाहायला लागले. त्या थोड्याश्या लाजल्या पण! कारण त्यांना कदाचित मी असं काहीतरी म्हणेल असं वाटलं नव्हतं. “काय हे” अशा अर्थने त्यांनी विचारलं पण! मी म्हंटल… “त्यात काय? एक आई वर आहे पण खाली तुम्हीच तर आहात”

यावर मात्र त्या मोकळेपणी हसल्या. आणि आजवर मला अहोजाहो म्हणणाऱ्या त्या ताई त्याक्षणापासून अरेजारे बोलून मलाही सुख देऊ लागल्या.

*

डॉ. डीडी क्लास : ज्यांना आई आहे त्यांना कदाचित कळणार नाही पण ती नसताना आपण जास्त एकाकी होतो. आहे तोवर तिची तितकी किंमत ठेवत नाही. गेल्यावर पोकळी निर्माण होते ती मात्र भरून निघत नाही. मात्र तुम्ही “बालक” म्हणून कार्यरत राहिलात तर नक्की तुम्हालाही जशी मला हि अनुआई मिळाली तशी तुम्हालाही मिळू शकते आणि पोरकेपण कमी होते. पहा जरा अवतीभोवती… नक्की अशी कुणीतरी दिसेल तुम्हाला! त्यासाठी शुभेच्छा!

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डिग्री हरली.. आणि… लेखक : डॉ. सुजीत पाटील ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ डिग्री हरली.. आणि… लेखक : डॉ. सुजीत पाटील ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

डिग्री हरली… आणि… — — डिग्री हरली… आणि… आजीचा ‘सुरकुतलेला हात’ जिंकला!

काल ओपीडीत एक गंमत झाली.

लसीकरणाची (Vaccination) गर्दी होती. कोलाहल, रडारड आणि पालकांची धावपळ… हे ओपीडीचं नेहमीचंच चित्र!

पण एका ६ महिन्यांच्या बाळाने मात्र कहर केला होता. इंजेक्शन टोचल्यावर त्याने जो टाहो फोडला, तो थांबता थांबत नव्हता.

त्याचे आई-बाबा दोघेही ‘वेल-एज्युकेटेड’, कॉर्पोरेट विश्वातले.

ते बिचारे जिवापाड प्रयत्न करत होते.

आई महागडी, रंगबेरंगी ‘Rattle Toys’ वाजवत होती…

बाबांनी लेटेस्ट आयफोनवर ‘Cocomelon’ लावलं होतं…

पण बाळ? बाळ कशालाच दाद देत नव्हतं!

बाळाचा रडून निळा झालेला चेहरा बघून त्या आई-बाबांच्या चेहऱ्यावरचा तणाव वाढत होता. त्यांची हतबलता, त्यांची धडधड (Anxiety) स्पष्ट जाणवत होती.

आणि गम्मत बघा…

तीच धडधड त्यांच्या स्पर्शातून बाळापर्यंत पोहोचत होती, ज्यामुळे ते अजूनच बिथरत होतं.

तेवढ्यात कोपऱ्यात बसलेल्या ‘आजी’ (त्या बाळाची आजी) हळूच उठल्या.

त्यांनी पुढे होऊन सूनबाईंच्या हातातून बाळाला आपल्या कडेवर घेतलं.

त्यांनी ना ॲप वापरलं, ना गाणं लावलं.

त्यांनी फक्त बाळाला आपल्या पदराशी घट्ट धरलं…

त्यांचा तो ‘सुरकुतलेला पण मायेने उबदार’ हात बाळाच्या पाठीवरून फिरला…

आणि कानात त्या काहीतरी पुटपुटल्या (कदाचित एखादी विसरली गेलेली अंगाई असेल! ).

आणि मॅजिक!

जे बाळ १५ मिनिटांपासून आई-बाबा, खेळणी आणि टेक्नॉलॉजी असतानाही अजून बिथरत होतं…

ते आजीच्या खांद्यावर डोकं टेकताच अवघ्या ३० सेकंदात शांत झालं.

आणि हुंदके देत चक्क गाढ झोपी गेलं!

त्या तरुण आई-बाबांनी एकमेकांकडे बघितलं. डोळ्यात एकच प्रश्न होता— “हे कसं झालं? “

 

एक डॉक्टर म्हणून सांगतो, उत्तर साधं आहे.

आजी-आजोबांच्या स्पर्शात तुमच्यासारखी ‘भीती’ किंवा ‘Anxiety’ नसते.

तिथे असतो एक शांत, ‘ठाम विश्वास’—

“काही नाही रे राजा, सगळं ठीक होईल… मी आहे ना! “

हा विश्वास गुगलवर नाही मिळत.

हे ॲमेझॉनवर ऑर्डर नाही करता येत.

 

तुम्ही मुलांसाठी इंटरनॅशनल स्कूल आणि ब्रँडेड कपडे नक्की घ्या.

पण आजारपणात कपाळावर फिरणारा हात आणि भीती वाटल्यावर लपण्यासाठी हक्काची कुशी…

हे फक्त घरातली ही ‘जुनी माणसं’च देऊ शकतात.

ज्यांच्या घरात ही ‘जुनी झाडं’ अजून उभी आहेत, त्यांची सावली जपा.

कारण एकदा हे झाड उन्मळून पडलं, की ते पुन्हा लावता येत नाही!

तुमच्या लहानपणी असा ‘जादुई स्पर्श’ कोणाचा होता? आजी की आजोबा?


लेखक : डॉ. सुजित भरत पाटील

बालरोगतज्ज्ञ, पुणे

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “८० वर्षांच्या सुदैवी जीवनाचे ४४ मंत्र…” – लेखक :डॉ. वाडा ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “८० वर्षांच्या सुदैवी जीवनाचे ४४ मंत्र…” – लेखक :डॉ. वाडा ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

[डॉ. वाडा (वय ६१ वर्षे) हे वृद्धांच्या मानसिक आजारांवर उपचार करणारे तज्ज्ञ आहेत.]

८० वर्षांच्या सुदैवी जीवनाचे ४४ मंत्र

  1. सतत हलत राहा.
  2. राग आला तर खोल श्वास घ्या.
  3. शरीर कडक होऊ नये म्हणून पुरेशी हालचाल करा.
  4. उन्हाळ्यात ए. सी. वापरत असाल तर अधिक पाणी प्या.
  5. डायपर (वृद्धांसाठी) वापरल्याने हालचाली अधिक सोप्या होतात.
  6. जास्त वेळा चावल्याने मेंदू आणि शरीर अधिक सक्रिय राहते.
  7. विस्मरण वयामुळे नसते, तर मेंदूचा वापर कमी केल्याने होते.
  8. खूप औषधे घेण्याची गरज नाही.
  9. रक्तदाब आणि साखर अनावश्यकरीत्या कमी करण्याची गरज नाही.
  10. एकटे राहणे म्हणजे एकाकीपणा नव्हे; ती शांततेत घालवलेली वेळ असते.
  11. आळस करणे लाजिरवाणे नाही.
  12. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. (जपानमध्ये वयोवृद्धांनी लायसन्स परत देण्याची मोहीम चालू आहे.)
  13. जे आवडते ते करा; जे नकोसे वाटते ते करू नका.
  14. वय वाढले तरी नैसर्गिक इच्छा कायम राहतात.
  15. कुठल्याही परिस्थितीत घरातच बसून राहू नका.
  16. जे आवडते ते खा; थोडं जाड असणं वाईट नाही.
  17. प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करा.
  18. जे लोक आवडत नाहीत, त्यांच्याशी संबंध ठेवू नका.
  19. टी. व्ही. सतत पाहू नका.
  20. आजाराशी लढा देण्याऐवजी त्याच्यासह जगायला शिका.
  21. “जेव्हा गाडी डोंगरावर पोचते, तेव्हा रस्ता दिसतो” — हे वृद्धांसाठी आनंदाचे जादुई सूत्र आहे.
  22. ताजी फळे आणि सॅलड खा.
  23. अंघोळ १० मिनिटांपेक्षा जास्त करू नका.
  24. झोप येत नसेल तर स्वतःला जबरदस्तीने झोपायला लावू नका.
  25. जे आनंद देतात, अशा क्रियाकलापांमुळे मेंदू अधिक सक्रिय राहतो.
  26. जे वाटते ते बोला. जास्त विचार करू नका.
  27. शक्य तितक्या लवकर “कौटुंबिक डॉक्टर” ठेवा.
  28. फार सहनशील किंवा हट्टी बनू नका; ‘धाडसी वृद्ध’ होणेही वाईट नाही.
  29. कधी कधी मत बदलले तरी चालते.
  30. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात स्मृतिभ्रंश (डिमेंशिया) हा देवाचा आशीर्वाद असतो.
  31. शिकणे थांबवले तर माणूस वृद्ध होतो.
  32. कीर्तीची लालसा बाळगू नका; जे आहे ते पुरेसे आहे.
  33. निरागसता ही वृद्धांची शोभा आहे.
  34. जसे काम कठीण, तसे ते अधिक रोचक असते.
  35. सूर्यप्रकाशात बसणे आनंद देते.
  36. इतरांना उपयोगी पडणारी कामे करा.
  37. आजचा दिवस सुखात घालवा.
  38. इच्छा म्हणजे दीर्घायुष्याचे गुपित.
  39. आनंदाने जगा.
  40. सहजपणे श्वास घ्या.
  41. जीवनाचे तत्त्व तुमच्या स्वतःच्या हातात आहे.
  42. प्रत्येक गोष्ट शांतपणे स्वीकारा.
  43. आनंदी लोक सर्वांना आवडतात.
  44. हसू हे भाग्य घेऊन येते.

वय वाढणे ही मर्यादा नाही — ती एक देणगी आहे.

योग्य दृष्टिकोन आणि साध्या सवयींमुळे साठीनंतरची वर्षे जीवनातील सर्वात समृद्ध वर्षे ठरू शकतात.

वय वाढणे हे भयाने नाही तर कृतज्ञतेने, सन्मानाने आणि शहाणपणाने स्वीकारा.

☆  

लेखक: डॉ. वाडा

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # अडला हरी गुगल सर्च करी… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # अडला हरी गुगल सर्च करी… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“आता तुझ्या पुढे बघ हद्दच झाली म्हणायची! … आम्ही सांगून सांगून थकलो बाबा तुला! … अरे तुझ्या पेक्षा चार पावसाळे आम्ही जास्तच बघितलेत कि रे.! .. या या डोक्यावरची कौलं उडून गेली.. केस गळून गळून टक्कलं पडलयं ते उगाच नाही! … आपल्या घराण्यातील वाडवडिलांनी घालून दिलेल्या रितीभाती, चांगले संस्कार, आचार पाचार आम्ही तंतोतंत पाळले, अंमलात आणले म्हणून तर आजची भरभराटीची लखलखती दिवाळी आलेली घरंदारं तुम्हा सर्वांना दिसतायेत… अर्थात त्याला अथक विविध श्रमाचं आणि प्रयत्नांची तेलवात करत गेलो तेव्हा कुठे… आपल्या घरीदारी, अंगणी उजेडी राहिले उजेड होऊन ते काय उगाच… समाजात वावरताना चांगलं बघा, चांगलं ऐका नि चांगलं बोला… हाच परवलीचा मंत्र होता तो यशाच्या सिद्धीकडे नेणारा… आणि चक्क त्याला तू डावलसं… आम्ही सांगितलेल्या चार हिताच्या गोष्टींना तू वाटाण्याच्या अक्षता लावल्यास! … कसे होणार तुझं पुढं याचीच चिंता लागून राहिलीय बघ आम्हाला? … अरे तुझं चाललयं काय? … आणि हातातल्या त्या मोबाईल मध्येच तुझं सगळं लक्ष लागून राहिलयं! … एव्हढं त्यात काय पाहतोस? ऐकतोस? काहीतरी टाईप करतोस, कुणाला पाठवतोस? … कुणाशी तरी बोलतोस आणि तेही त्या फोनच्या माध्यमातून… तुझं स्व:ताशीच बोलणं, ते हातवारे करणं हे अनाकलनीय असतयं बघ.. कशा कशाचीच शुद्ध बुद्ध नसते तुला… संवाद म्हणजे काय? तो कशाशी खातात हेच तुला ठाऊक नाही.. सतत स्व:ताशीच स्वगत बोलतोस… त्या मोबाईलच्या वेड्या नादानच एक दिवस तुला नक्की खरंच वेड लागणार बघ… त्यावेळेची तुझी भयानक स्थिती मला पाहवणार नाही म्हणूनच मला ते डोळ्यासमोर दिसू नये यासाठी या हाताने आताच डोळे झाकून घेतलेत बघ.. तू मेंटल, वेडा झाला आहेस, आयुष्यातून उठला आहेस हे ऐकायला देखील पडायला नको म्हणून आतापासूनच कान झाकून घेतलेत बघ आणि कुणी मला विचारलच कि त्याला वेळीच वठणीवर आणण्यासाठी चार साम, दाम, दंडाची भाषा बोलला असतात तर आज हा वाया का बरं गेला असता असा प्रश्नाला मी किती जणांना उत्तरे देत बसायचं म्हणून एकदाच तोंडावर हात ठेवून ‘ मौनं सर्वं साधये’तला अनुसरून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत बसतो… अरे आता तरी बोल काहीतरी तू असा का वागतोस ते? … “

” अगं कपी! बघं ना गं ही आता बिनकामाची आऊटडेटेड म्हातारी माणसं कसं माझं डोकं पकवतायेत ते… नॉस्टॅल्जिक झालेत ते.. गुजरा हुआ जमाना आता नही दुबारा.. हेच त्यांना कळतच नाही.. उलट ऊठसूट आपलंच रडगाणं सारखं चालू ठेवत बसलेत… आणि मला सारखं उचकवत राहिलेत… मी कितीतरी वेळा त्यांना समजावून सांगितले हा जनरेशन गॅप आहे तो कधीच मिटायचा नाही… जे कालपर्यंत चांगलं नाही म्हणून सांगत होता तेच आता सर्वाधिक चांगल वाटतयं.. आणि आमच्या तरुणाईला जे जे दिसेल आवडेल ते सगळं चांगलचं असतयं बरं… यावर आमच्या फ्रेंड सर्कल मधे चर्चा तर होतेच.. चॅटींग, सर्फिंग तर सेकंदाला चालूच असते… शेअरिंग इज केअरिंग हा फंडा तर सगळ्या बाबतीत आम्ही वापरत असतो… नुसतं जुने ते सोनं म्हणून कवटाळून बसत नाही तर त्याचबरोबर नवे नवे फंडे शोधून काढून त्याचं मार्केटिंग करतो… नव्या विचारांचा जल्लोषात स्वागत करतो जे मनाला पटतं तेच स्विकारतो.. जे पटणारं नाही त्याचा सार्वजनिकपणे रस्त्यावर उतरून निषेध करतो… कुपमंडूक वृत्ती झटकून टाकलीय आम्ही.. आता कुप स्वच्छ झाले आहे आणि मंडूक स्वतंत्र झाला आहे.. स्व:ताच्या कुवतीनुसार तो दाही दिशेला उड्या मारत जाऊ शकतो… जगाच्या क्षितिजाच्या कक्षा विस्तारल्या गेल्या त्याला… ओपन स्पेस ग्लोबल हिच खरी शाळा आहे आमची… नव्या विचारांच्या पाखरांच्या पंखाना दिव्य स्वप्नांचे पंख लाभलेत.. ते मुक्त आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात… पंतोजींच्या शाळातून आता ज्ञान मिळण्याचे दिवस मागे पडले… नवे तंत्रज्ञान ज्ञानाचा खजानाच घेऊन उभे ठाकले आहे.. घेता घेशील किती एका मेंदूने… ॲंड्राॅईड फोनवर एक की दाबायचा अवकाश कि धाडधाड माहीती रूपी ज्ञानाचा पाऊसच पडतो… ना भारंभार वह्या पुस्तकांचे ओझे वाहण्याची कटकट ना कसल्याही क्लासचे झंझट… ना राहिले गुरू, ना गुरूकुल आता ए. आय. च्या मदतीने गुगलच झालाय महागुरू… एका दिव्य कामगिरीने, प्रसिद्धीने वलयांकित झालेला मला तुम्ही बघाल तेव्हा देखील तुमची अशीच स्थिती असेल… अचंबित झाल्याने डोळ्यानीं विस्फारून बघायचं ते विसरून जाल, शब्दाने बोलताच येणार नाही.. लोक खरचं उदो उदो करतायेत याचा स्वताच्या कानावर विश्वास बसणार नाही..

पूर्वी कसं तुमच्या वेळी म्हणायचे अडला हरी गाढवाचे पाय धरी… तसं आताच्या काळात अडलेला हरी गुगलं सर्च करी… आणि नाही का ते गाव करील ते राव काय करील… तसचं जे जे गुगल करील ते ते गाव करीलच करील!

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ६ … ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ६ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सगुण भक्ती

परमेश्वर चराचरात व्याप्त असून तो निर्गुण निराकार आहे असे म्हटले जाते, परंतु सर्वसामान्य माणसाला परमेश्वराच्या रूपात काहीतरी वस्तूची आवश्यकता असते. तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे वेड लागलेला एक सर्वसामान्य प्रापंचिक माणूस. त्यामुळे त्यांची भक्ती सगुण भक्ती होती. त्यांचे परमेश्वराच्या रूपाचे वर्णन करणारे कितीतरी अभंग आपल्याला त्यांच्या गाथेत वाचावयास मिळतात.

सुंदरते ध्यान/ उभे विटेवरी/

 कर कटावरी/ ठेवोनिया//

 तुळशीहार गळा/ कासे पितांबर/

 आवडे निरंतर /हेचि ध्यान//

 मकर कुंडले /तळपती श्रवणी/

 कंठी कौस्तुभ मणी/ विराजित//

 तुका म्हणे माझे/ हेचि सर्व सुख/

 पाहिन श्रीमुख/आवडीने//

 या ओळी वाचल्या की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर विठोबाचे एक काल्पनिक रूप उभे राहते व आपोआपच हात जोडले जातात.

 सदा माझे डोळा/ जडो तुझी मूर्ती/

 रखुमाईच्या पती सोयरिया//

 गोड तुझे रूप/गोड तुझे नाम/

 देई मज प्रेम/ सर्वकाळ//

 विठू माऊलीये /हाचि वर देई/

 संचरोनी राही/ हृदयामाजि//

 तुका म्हणे काही/ न मागे आणिक/

 तुझे पायी सुख/सर्व आहे//

मनाची अशी अवस्था केवळ तुकारामांचीच नव्हे तर सर्व भक्तांची होते.

वेगवेगळ्या शब्दात महाराज विठ्ठलाचे वर्णन करतात.

 राजस सुकुमार /मदनाचा पुतळा/

 रवी शशीकळा/लोपलिया//

 कस्तुरी मळवट /चंदनाची उटी//

 रुळे माळकंठी/ वैजयंती/

 मुगुट कुंडले /श्रीमुख शोभले/

 सुखाचे ओतीले/ सकळही//

 कासे सोनसळा/ पांघरे पाटोळा/

 घननिळ सावळा/ बाईयानो//

 कर कटावरी / तुळशीच्या माळा/

 ऐसे रूप डोळा/ दावी हरी//

 *गरुड पारावरी/ उभा राहिलासी/७

 आठवी मानसी/ तेची रूप//

 झुरोनी पांझरा/ होऊ पाहे आता/

 येई पंढरीनाथा /भेटावया//

 तुका म्हणे माझी/ पुरवावी आस/

 विनंती उदास/ करू नये//

विठोबाची अशी मूर्ती तुकाराम महाराजांच्या कल्पनेत आहे आणि ते रूप पाहण्यासाठी ते अतिशय उतावीळ झाले आहेत. ते गोपींच्या भूमिकेतून आपल्याबरोबरच्या गोपींना (भक्तांना) श्रीकृष्णाच्या(विठ्ठलाच्या) रूपाचे वर्णन करतात. येथे मूळ गोपी म्हणजे त्यांचे मन

आणि सख्या म्हणजे इंद्रियांच्या प्रवृत्ती असे रूपक या वर्णनात आहे.

संत तुकाराम महाराजांनी परमेश्वराचे कनवाळू रूप वर्णन केले आहे. जो खरा भक्त परमेश्वराची सेवा करतो, त्या भक्ताचा परमेश्वर कायम ऋणी असतो, भक्ताचे ऋण परमेश्वर सदा फेडतोच. कसे ते या खालील अभंगातून पहा.

भक्तऋणी देव/ बोलती पुराणे/

 निर्धार वचने/ साच करी//

 मागे काय जाणो/आईकिली वार्ता/

 कबीरासाते जाता/घड्या वाटी//

 माघारीया धन/ आणिले घरासी/

 मेघे केला त्यासी/ त्याग तेणे//

 नामदेवाचीया /घरासी आणिले/

 तेणे लुटीयेले/ द्विजा हाती//

 प्रत्यक्षासी काय /द्यावे हे प्रमाण/

 एकोबाचे ऋण /फेडियेले//

 बीज दळूनिया/ केली आराधना/

 लागे नारायणा/ परणे ते//

कबीराने जेव्हा ब्राह्मणाच्या रूपात वस्त्रासाठी भीक मागत असलेल्या माणसाला(देव) अर्धे वस्त्र दिले, तेव्हा देवाने कबीराच्या घरी जाऊन ऋण फेडले. नामदेवाने जेव्हा त्याच्या जवळची कापडे उघड्या दगडांवर पांघरली, तेव्हा त्याची किंमत देवाने त्याच्या घरी आणून दिली. एकनाथाचे कर्ज भगवंताने स्वतः फेडले.

या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वर निर्गुण, अव्यक्त असला तरी हातात चक्र, गदा घेऊन तो भक्तांना स्वतःच्या हृदयाशी ठेवतो आणि दुर्जनांचा संहार करतो.

 अव्यक्त ते आकारले/ रूपा आले गुणवंत/

 तुका म्हणे पुरवी इच्छा/ जया तैसा विठ्ठल//

सगुणाची पूजा म्हणजे, सगुण रूप हे माध्यम आहे. त्या माध्यमाद्वारे भक्त परमेश्वराची पूजा, सेवा करू शकतो.

गाथेतील हा अभंग पहा.

 केला मातीचा पशुपती/

 परी मातीसी काय महती? //

 शिवपुजा सिवासी पावे/

 माती मातीमाजि सामावे//

 तैसे पूजिती आम्हासी संत/

 पूजा घेतो भगवंत//

 केला पाषाणाचा विष्णू/

 परि पाषाण नव्हे विष्णू//

 विष्णु पूजा विष्णूसी अर्पे/

 पाषाण राहे पाषाण रूपे//

 केली काशाची जगदंबा/

 परी कासे नवे अंबा//

 पूजा अंबेची अंबेला घेणे/

 कासे राहे कासेपणे//

तुकाराम संत आहेत. शास्त्र पंडित नव्हेत. म्हणून ते सगुण पूजा मानतात. ते प्रश्न विचारतात की जर अवघे विश्व ब्रह्मरूप आहे, मग प्रतिमेतही ब्रह्म असायलाच हवे. प्रतिमाही देवच आहे. ब्रह्मा वाचून रिक्त असे काहीच नाही, मग दगडाच्या किंवा धातूच्या मूर्तीत ब्रह्म कसे नसेल.

ते असेही म्हणतात की त्यांना परमेश्वराची खूप स्तुती करायची आहे, परंतु स्तुती करण्यास त्यांची वाणी कमी पडते. कारण परमेश्वराच्या स्वरूपाच्या एकेका केसावर  हजारो ब्रम्हांडाची घडामोड होत आहे.

 स्तुती करू तरी/ नवे ची या वेदा/

 तेथे माझा धंदा /कोणीकडे//

 परी हे वैखरी /गोडाली सुखे/

 रसना रसमुखे/ इच्छितसे//

परमेश्वराच्या रूपाचे वर्णन करणे अशक्यप्राय आहे. त्याची अनंत रुपे आहेत परंतु ज्याचा जसा भाव असेल तसे त्याच्या इच्छेनुरूप भगवंत सगुण रूप धारण करतो.

 तुज वर्णी ऐसा तुजविण नाही/

 दुजा कोणी तीही त्रिभुवनी//

 सहस्त्रमुखे शेष शिणला बापुडा/

 चिरल्या धडा जिंव्हा त्याच्या//

 अव्यक्ता अलक्षा अपारा आनंदा/

 निर्गुणा सच्चिदानंदा नारायणा//

 रूप नाम घेसी आपल्या स्वइच्छा/*

 होसी भाव तैसा त्या कारणे//

 तुका म्हणे जरी दावीसी आपणा/

 तरीच नारायणा कळो येसी//

 तुकाराम महाराजांच्या परमेश्वर प्राप्तीच्या तळमळीतून पांडुरंगाचे सगुण रूप त्यांच्यासमोर… साकार झाले आहे.

 क्रमशः… १ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ Retired from work, not from fun… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ Retired from work, not from fun… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

आज अनिताकडे पार्टी आहे. तिच्या आणि अजयच्या ओळखीच्या पाच फॅमिलीज् येणार आहेत. त्यामुळे सकाळपासून तयारी सुरू आहे. ••••

पहिल्यांदाच सर्वांना घरी बोलविण्याचा बेत तिने ठरविला. नाहीतर महिन्यातून एकदा सर्व मित्र बाहेर हॉटेलमध्ये भेटतात, गप्पा टप्पा मारतात, आणि रिचार्ज होऊन घरी येतात. हॉटेल असेच शोधतात जेथे मुलांना मस्ती करायला भरपूर जागा असेल. ••••

 या सर्व कार्यक्रमात आजी आजोबा घरीच राहतात, त्यांना रात्रीचे बाहेर जाणे, उशीरा जेवणं तेवढं झेपत नाही.. यावेळेस अनिता अजयने घरीच बोलविण्याचा प्लान ठरविला ज्या परिवारात आजी आजोबा आहेत त्यांनाही आमंत्रण दिले. ••••

सर्वांच्या सोयीनुसार दुपारच्या जेवणाचा बेत ठरविला आपल्या मनोरंजनाची पद्धत थोडी बदलावी, असं तिच्या मनात होतं. •••••

घरचे जेष्ठ, ••••••

*Retired from work जरी असले तरी They are not retired from Fun. *••

असं तिचं मत आहे. नेहमी आपण बाहेर जातो, ते काहीही तक्रार न करता घरी राहतात. येताना आपण त्यांच्या आवडीचे आइस्क्रीम आणले, तरी अगदी आनंदाने ते त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी खातात.

त्यांचे बाहेर जाणं कमी झालेलं आहे. बदल change प्रत्येकाला आवडतोच. ••••

आपण आपल्या पद्धतीत थोडा बदल केला तर त्यांना पण आपल्यात सामावून घेता येईल. हा विचार अनिताच्या मनात होताच. •••

खरंतर दोन चार दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेनं हा बदल करण्याचा विचार अजून दृढ झाला. •••

परवा आजोबांचे चार मित्र त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला म्हणून घरी आले तर अनिताच्या मुलीने म्हणजे प्रियाने खाडकन आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला. हे असे वागणे योग्य नाही. खरंतर पंधरा वर्षांच्या प्रियाने सर्व आजोबांना हसून नमस्कार करणे आणि त्यांना पाणी आणून देणे एवढ तरी नक्कीच अपेक्षित होतं. ••••

बरं!! आजच्या मुलांना लेक्चर देऊन चालत नाही. ऐकतील की अजून बिथरतील सांगता येत नाही. ••••

मुलांना आपल्या पेक्षा लहान मोठे सर्वांबरोबर व्यवस्थित वागता आलं पाहिजे. थोडं बहुत काम करायची सवयही असलीच पाहिजे. आज समोर दिसणाऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ••••

तेंव्हा घरी गेटटूगेदर करायचे तिने ठरविले. ••••

जेंव्हा तिने हा विचार आपल्या मैत्रिणींमध्ये मांडला, तेंव्हा सगळ्यांना तो एकदम पटला असं झालं नाही. वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. •••••

*अग! ते खूप बोलतात. * आपल्याला फ्रीली बोलता येणार नाही. * त्यांच्या कडे लक्ष द्यावे लागते. * आपला अर्धा वेळ त्यातच जाईल. *मग रोजच्या सारखच होणार ना, * बदल कुठे झाला?? * त्यांना लवकर जेवायचे असते. * रात्री चे झेपत नाही वगैरे वगैरे.

अनिता म्हणाली, ••••

अग!! आपण थोडा बदल करून तर बघू. माझ्या घरी सुरुवात करू. अग!! जमेल सर्व. मी करते तयारी. त्यांना ही बरं वाटेल. मुलांनाही मदतीला घेऊ. ••••

*रश्मी*. कशी बशी या प्लान साठी तयार झाली. ••••

आज देशपांडे आजी आजोबा, कुलकर्णी आजी आजोबा, जाधव आजोबा, आणि देशमुख आजी आनंदात होते. आणि थोडे आश्चर्य चकितचही होते. ••••

मुलांबरोबर लग्नाला जाणे, एखाद्या कार्यक्रमात जाणे, यांची त्यांना सवय आहे. पण मुलांबरोबर त्यांच्या मित्रांच्या पार्टीला जायचे होते. उत्साह तर होता बरोबर थोडं टेंशन ही होत. ••••

पार्टी छान झाली. सर्वांनी enjoy केलं. लहान मुलांनी खूप धमाल केली. बरोबर त्यांची मदतही झाली. आजी आजोबांकडे लक्ष द्यायचे काम त्यांनी छान केले.

सिनीयर्स ची आपापसात छान ओळख झाली. गप्पा झाल्या. यंग जनरेशन च्या मनसोक्त गप्पा रंगल्या. हॉटेल पेक्षा हे option छान आहे. छान हातपाय पसरून गप्पा मारता येतात. हे सर्वांना पटलं.

फॅमिली गेटटूगेदर छान रंगल. ••••

दुपारच्या चहा नंतर अंताक्षरी चा कार्यक्रम झाला. तरूण वर्ग, बच्चा पार्टी, आणि आजीआजोबा गृप असे तीन गट होते. सर्वांनी धमाल केली. आजी आजोबांनी जूनी गाणी छान म्हंटली. •••

अगदी अंगाई गीत, मंगलाष्टक तर 

*जा मूली जा दिल्या घरी तू सुखी रहा.

*केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर

*घट डोईवर, घट कमरेवर •••

शेवटचं देशपांडे आजींचे गाणं ऐकून तर सर्वांच्या डोळ्यात पाणीच आले. गाण होत ••••

**घरात हसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे. •••**

शेवटी देशपांडे आजोबा म्हणाले, ••••

 **धन्यवाद मुलांनो, आज तुमच्यात सामिल केल्याबद्दल. आज खूप दिवसांनी नवीन गाणी ऐकायला मिळाली. आम्ही दहा वर्षांनी लहान झालो. ••••

Hope, We hv not troubled you. •••

बाकी प्रियाने सर्वांसाठी चहा केला. त्याच तर खूपच कौतुक झालं. •••

 अनिताने ज्या उद्देशाने हे पाऊल उचलले, त्याची सुरुवात योग्य दिशेने झाली आहे हे तिच्या लक्षात आले. ••••

 

म्हणतात ना •••

समज आणि समजूत यापैकी एक गोष्ट जरी माणसाजवळ असली तरी प्रश्न सहज सोडविता येतात. •••

माणसाने वेळेसोबत चालावे. काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे. ••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सोलापूरी शेंगाचटणी…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “सोलापूरी शेंगाचटणी…” ☆ सुश्री शीला पतकी 

श्री सिद्धरामेश्वर ग्रामदैवत असलेल्या या गावावर त्यांच्या कृपेमुळे सुख शांती आणि त्याबरोबर समाधान नांदते आहे. ज्यांना सुख शांती आणि समाधान हवे होते ते सोलापुरात राहिले. ज्यांना सुख हवे होते ते बिचारे सोलापूर सोडून गेले. सोलापूरकर बे वापरत असला तरी बेरकी नाही तो खूप मायाळू कनवाळू माणुसकी असलेला आहे.

 इथल्या खाद्य संस्कृतीत अग्रक्रमाने येणारा पदार्थ म्हणजे शेंगादाण्याची चटणी स्वयंपाक घरातील हे दैवत! जेवताना बाकी काही नसलं तरी चालेल पण शेंगादाण्याची चटणी पानात असलीच पाहिजे! हा इथला नियम. सोलापूरची शेंगदाण्याची चटणी ही जातीपाती धर्मात भेद करत नाही. तुम्ही सोलापुरी म्हणल्यावर तुम्ही कोणत्याही जातीचे धर्माचे असा तुमच्या घरात आणि पानात शेंगाची चटणी हवीच हवी. या शेंगाचा चटणीने सोलापूरला जगात मार्केट मिळून दिले आहे.

पानांमध्ये मीठानंतर डाव्या बाजूला विराजमान होण्याचा मान या चटणीला तसेच उजव्या बाजूची भाजीची जागा भरून काढण्याचा सन्मान सुद्धा तिचाच… भाजीची जागा भरून काढणे हे तिचेच काम. सोलापुरी माणसाला न्याहरीला शिळी

 भाकरी दही किंवा तेल शेंगाची चटणी कांदा एवढे पदार्थ झाले की तो कुठे हॉटेल हुडकणार नाही. दोन पोळ्या दुधात कुस्करून त्याबरोबर शेंगाची चटणी तोंडी लावणारे अनेक जण तुम्हाला सोलापुरात मिळतील. शाळेतल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या डब्यात तेल चटणी पोळी हा पदार्थ कॉमन आहे. 70% पोरांच्या डब्यात तेल चटणी पोळी मिळणारच!

खूप वर्षापूर्वी माझी आत्ये बहीण पुण्यावरून आली प्रवासात म्हणून तिने दोन पोळ्या आणि चटणी आणली होती त्या चटणीत अर्धवट कुटलेले शेंगदाणे तिखट आणि मीठ एवढे पदार्थ होते त्यातल्या कुठल्याही पदार्थाची एकमेकांशी गट्टी नव्हती ती मला म्हणाली, ” शेंगाची चटणी खा खूप छान झाली” मी म्हणलं, ” याला तुम्ही शेंगाची चटणी म्हणता? ” मग आमच्या घरातली उखळी चटणी तिला खाऊ घातली त्यानंतर मात्र असंख्य वेळा सोलापूर जाताना ती आपल्या मामीकडे हट्ट करून उखळी चटणी घेऊन जात असे उखळी चटणी म्हणजे उखळात कांडून कांडून त्याला तेल सुटल्यावर.. त्याचा एक वेगळा सुगंध येतो… खमंगपणा वाढतो. शेंगादाणे खूप बारीक होत नाहीत पण एकमेकात मिसळून जातात आणि त्याला उखळाचा आकार प्राप्त होतो त्याला आम्ही मुद्दा चटणीही म्हणतो आता मुद्दा असा आहे ही चटणी तेल सुटल्यामुळे मुद्दा झालेले असते. एका घरात तर मी तिचे लाडू बनवलेले पाहिले शेंगाच्या चटणीचे लाडू…? काय कल्पना आहे ना त्यांच्याकडून हे लाडू पुण्याला असलेल्या त्यांच्या माहेरी पाठवले जात. माझ्या गावाकडून माझ्या काकूचा फोन येई” काय पाठवू तुला खायला “तेव्हा मी सरळ सांगायची सहा भाकरीचे एक गाठोडे पाठवा तेही अगदी पांढऱ्या स्वच्छ फडक्यात बांधून, डबा नको पहिल्या दोन भाकरी शेंगाची चटणी म्हणजे एका भाकरीवर शेंगाची चटणी आणि त्याच्यावर झाकल्यासारखी दुसरी भाकरी दोन भाकरी मध्ये तुरीच्या डाळीचा पेंडपाला आणि वरच्या दोन भाकरी मध्ये हळद मोहरी घातलेले बाट्याचे कैरीचे लोणचे… अहाहा या वर्णनाने सुद्धा तोंडाला पाणी सुटत. त्या शेंगाच्या चटणीच्या सहवासाने स्नेहमय झालेली ती भाकरी अप्रतिम चवीची असायची. मुळात शेंगाची चटणी करताना शेंगा मध्यम आचेवर खरपूस भाजल्या पाहिजेत त्यातच खमंगपणा उतरला पाहिजे मग याची टरफले काढून योग्य प्रमाणात तिखट मीठ थोडेसे जिरे हा ऑप्शन आहे भरपूर लसूण इथे मात्र काटकसर नाही असे टाकून हे मिश्रण उखळातच कांडावे लागते तेव्हा त्याला सोलापुरी चटणी म्हणतात. या चटणीला मिक्सरचा आधुनिकपणा मानवत नाही आणि ती चवही त्याला येत नाही आणि मग कुटून कुटून तेल सुटल्यावर काढलेली चटणी म्हणजे सोलापुरी शेंगा चटणी!

शेंगाची चटणी हे पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक आहे…

वाटलं ना थोड अवघड वाक्य! पण मी असं ऐकलेलं आहे आणि पाहिलेलं सुद्धा आहे की पानात शेंगाची चटणी नाही म्हणून ताट भिरकावून देणारे पुरुष होते. त्यामुळे बायका आवर्जून डबाभर शेंगाची चटणी करून ठेवीतच कारण ती जर संसारातला सलोखा सांभाळत असेल तर कशाला भानगडीत पडा…? हा सुज्ञपणा सोलापुरी बायकांमध्ये होता. मी एका लग्नाला गेले होते खेडेगावात त्या ठिकाणी एका मोठ्या टोपल्यात शेंगाची चटणी करून ठेवलेली होती कोपऱ्यात टोपलवर कांदे होते आणि एका चटईवर पातळ कडक भाकरी होत्या… हा लग्नातला कुणीही आल्यानंतर केला जाणारा पहिला पाहुणचार! खेडेगावात अख्खा गाव त्या लग्नात असतो तेव्हा गावातल्या कोणीही यावं आणि शेंगा चटणी बरोबर भाकरी खाऊन जावं अशी तेव्हाची परिस्थिती होती

शेंगाच्या चटणीला पहिलं मार्केट मिळून दिलं ते नसले यांच्या चटणीने नसले यांची शेंगाची चटणी प्रसिद्ध पावली. सोलापुरात आलेला माणूस चादरीबरोबर शेंगाच्या चटणीची पाकीट घेऊन जात असे आता नसल्यांच्या चटणी बरोबर “सुंदर चटणी” जी लकी चौकात मिळते त्यांचं पॅकिंग खूप छान असतं तेच छान पिशवी देतात बरोबर त्यामुळे तिचा पुडा कॅरी करायला सोपा पडतो. शिवाय सोलापुरी तिखटपणा न खपणार्‍या माणसासाठी कमी तिखटाच्या, सपक… असे अनेक प्रकारे त्यांच्याकडे मिळतात. त्याचप्रमाणे लक्ष्मी मार्केटच्या जवळ पूर्वी जिथे चुरमुऱ्याची दुकान होती तिथेही वेगवेगळे मसाले आणि त्याबरोबर प्रामुख्याने मिळणारी चटणी खूप चविष्ट असते. पेठे यांची चटणी प्रसिद्ध होती परंतु नसले पासून मात्र शेंगाच्या चटणी चे बाजारी मार्केट वाढले आता अनेक धाब्यावर सुद्धा तुम्हाला शेंगाची चटणी मिळते. शेंगाची चटणी पार अमेरिकेपर्यंत पोहोचली आणि आता ते काय फार अवघड नाही सोलापूरचे अनेक लोक आता अमेरिकेत सुद्धा स्थायिक झालेले आहेत तरीही सोलापूरी माणसाला अजूनही त्याचा म्हणावा तसा ब्रँड जमलेला नाही. सोलापुरात येणारा प्रत्येक माणूस चादरी घेऊन जातो तसाच सोलापुरी शेंगादाणा चटणी घेऊन जातोच जातो. सोलापूरहून जाणारा माणूस आपल्या नातेवाईकांना भेट म्हणून शेंगदाणे चटणी घेऊन चालला आहे.

माझ्याकडे एक मुंबईच्या गायनॅकॉलॉजिस्ट आल्या होते त्यांना मी कडक भाकरी शेंगाची चटणी आणि मेथी ची तोडलेली भाजी दिली त्यांचा मुंबईवरून दुसरे दिवशी फोन आला की कसं खायचं? मी म्हणाले, “भाकरीच्या मध्ये शेंगाची चटणी घ्या त्याच्यावर दही घाला कडेकडेने भाकरी शेंगाच्या चटणी लावून खा मध्यावर याल तेव्हा तो भिजलेला तुकडा इतका अप्रतिम लागतो त्याची चव जेवणानंतर तासभर तरी रेंगाळत राहते आणि मध्ये मध्ये तुम्हाला तोडून निवडून दिलेली कच्ची मेथी तोंडी लावा”. तासाभराने त्यांच्या मिस्टरांचा फोन आला ते डॉक्टर आहेत “शीलाताई एका अप्रतिम पदार्थाचे मी आज सेवन केले आणि तृप्त झालो ही किमया शेंगाच्या चटणीत आणि कडक भाकरीत आहे पण भाकरीतला कडकपणा सोलापुरी माणसात मात्र अजिबात नाही तो खूप प्रेमळ आहे तो कोणत्याही अनोळखी माणसावर विश्वास ठेवून त्याला घरात घेतो चहा पाजतो आणि त्याच्या पाहुण्याच्या घरापर्यंत नेऊन सोडतो.

कर्नाटक जवळ असल्यामुळे शेंगाच्या चटणीची बॅडगी मिरचीशी जवळीक वाढली आहे त्यामुळे त्याला एक वेगळा लालपणा पण येतो त्यामुळे तिचे सौंदर्य वाढले आहे. पण कोल्हापुरी लवंगी मिरचीचा ठसका लागलेला शेंगादाणा डोळ्यात पाणी आणल्याशिवाय सोडत नाही अशा सर्व तिखट प्रकारच्या चटण्या सुद्धा यात उपलब्ध असतात तर अशी ही सोलापुरी शेंगा चटणी हिला कोणत्याही प्रकारची भेसळ मान्य नाही उगीच तीळ शेंगादाणा चटणी खोबरे शेंगादाणा चटणी असे कोणतेही प्रकार प्रयोग म्हणून सुद्धा करू नयेत ती शुद्ध आणि सात्विक आहे बरं…!

डिसेंबर महिन्यापासून सोलापुरात सुरू होणाऱ्या हुरडा महोत्सवात याचे स्थान अनन्यसाधारण आहे शेंगाच्या चटणी शिवाय चव नाही हिरव्यागार लुसलुशीत हुरड्या शेजारी तांबडीलाल सोलापुरी शेंगा चटणी मांडली की हुरड्याची चव आणि त्याचे सौंदर्य दोन्ही वाढते. हुरड्याचे मार्केटिंग करताना हुरड्याच्या थाळीचे जे चित्र टाकतात त्यात हुरड्या बरोबर असलेल्या शेंगा चटणीचे फोटो अत्यंत भुरळ पाडणारे आकर्षक असतात. अर्थात कुणाच्याही शेतात जाऊन हुरडा खाऊन येणार्या आमच्या पिढीला हे मार्केटिंग तितकेसे बरे वाटत नाही. पण काळ

बदललाय. चलता है…!

एका माझ्या वाचकाने सुचवलं याच्यावर लिहा हो… म्हणून हा लेखन प्रपंच खर तर प्रत्येक वाचकाला एक शेंगाचटणीचा पुडा द्यावा असं मला खूप वाटतं पण इथून ते शक्य नाही ना मंडळी… हा लेख वाचल्यानंतर बाजारात जा शेंगा चटणी घेऊन या तेल चटणी पोळी खा आणि तृप्त व्हा.

चटणी आवडली तर पुढे पाठवा ते ते सुद्धा थोडी चव चाखतील ना माझी काहीच हरकत नाही…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares