सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
२० मार्च : जागतिक चिमणी दिवस — तीन कविता ☆ श्री आशिष बिवलकर, श्री प्रमोद वामन वर्तक आणि शुभदा भा. कुलकर्णी ☆
(या निमित्ताने वेगवेगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या तीन कविता.)
☆☆☆☆
श्री आशिष बिवलकर
( १ )
दार बंद करून,
चिऊताई बसली |
कळत नाही,
का बर ती रुसली |
*
ओसरीवर रोज नाचणारी,
आता ती दिसेनाशी झाली |
पूर्वापार माणसाळलेली,
माणसांपासून दूर गेली |
*
एक घास चिऊचा, एक काऊचा
भरवत पिढ्यानपिढ्या वाढल्या |
चिऊताई तुझ्या गोष्टी ऐकत,
लहानाच्या मोठ्या झाल्या |
*
काळ बदलत गेला,
फ्लॅट संस्कृतीत कुठं राहिली ओसरी |
तुझेच घरटे हिरावले आम्ही,
भूतदयेचे संस्कार सगळेच ते विसरी |
*
तुझा चिवचिवाट ऐकायला,
मनाची फुरसतच ती राहिली नाही |
चार दाणे तुला टाकायचे असतात,
सुचतच नाही आता मनाला काही |
*
असेल तिथे सुरक्षित रहा,
नामशेष मात्र नकोस होऊ |
चूकचूक करते पाल मनी,
चित्रात तरी उरशील का गं चिऊ?
☆
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
☆☆☆☆
श्री प्रमोद वामन वर्तक
(२)
निघे शुचिर्भूत होण्या
सात चिमण्यांची फौज,
लक्ष ठेवती त्यांच्यावर दोघी
रोखून आपली नजर तेज!
*
पंख चिमुकले बुडवून जलात
घेती आनंद स्नानाचा मनमुराद,
अंग शहारता गार पाण्याने
झटकून टाकती पाणी क्षणात!
*
उरे बोटावर मोजण्या इतकी
यांची संख्या बघा आजकाल,
येत्या ग्रीष्मात पाण्यावाचून
आपण त्यांचे टाळूया हाल!
आपण त्यांचे टाळूया हाल!
☆
© श्रीप्रमोद वामन वर्तक
मो 9892561086
☆☆☆☆
सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)
(३)
चिऊताई आली नाचत
माझ्या दारी अंगणात
या ग सा-या खेळायला
करू म्हणे गंमत जंमत
*
छान आहे इथे सारे
हिरवी हिरवी झाडे
पाना -पानातून लहरते
हवेहवेसे मंद वारे |
*
शांत सुंदर मंत्रांचा
नाद कानी निनादतो
जगतांना माणसाला
संदेश देऊया मैत्रीचा |
*
कवयित्री : शुभदा भा. कुलकर्णी.
मो. ९५९५५५७९०८/
☆
© शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री विनायक कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ जसा मनाचा विचार असतो… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆
[वृत्त..वनहरिणी [मात्रा८+८+८+८=३२]]
☆
चार असतो जसा मनाचा तशी आपली असते दृष्टी
वास्तवतेचे भान विसरते कल्पनेतली दिसते सृष्टी
होकारार्थी भाव हरपतो नकारतेची कूस उजवते
असून नाती अवतीभवती एकांताची होते वृष्टी
*
जे नाही ते दिसते सारे डोळ्यांवरती असून पट्टी
आभासांच्या आकारांशी घट्टच जाते जमून गट्टी
दुर्जनतेशी छान मित्रता सज्जनतेशी वैर लाभते
स्नेहासमवे विरह येतसे सौजन्याशी होते कट्टी
*
साधकबाधक विचारांमध्ये सुरूच होते जंगी मुष्टी
भला असूनी जीव बिचारा उगाच होतो दुःखी कष्टी
उघड करावे विवंचनेला कशास नुसती गुंतागुंती
सत्संगाची साथ लाभता सुधारणेला मिळेल पुष्टी
☆
© श्री विनायक कुलकर्णी
मो – 8600081092
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ || तुही व्हावेस शहाणे || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆
☆
तुम्ही थांबाल तिथेच, मला मात्र वाहायचे
माझ्या प्रिय कठड्यांनो, तुम्हा नाही कळायचे
*
तुम्हा वाटेल आनंद, पाय रोवून थांबण्या
मला हौस वेगळीच, नवा प्रदेश पाहण्या
*
तुम्हा भोवती नांदेल, पाना फुलांचा संसार
माझ्या सोबती राहिल, सारा गाळ निरंकार
*
कधी भरती अहोटी, वेगवेगळा आकार
टचकन ओले करी तुम्हा, तेवढाच उपकार
*
तुही व्हावेस शहाणे, जरा माणसा यातून
वर कठोर कठडा, आणि वाहता आतून
☆
कवी : म. ना. देशपांडे
(होरापंडीत मयुरेश देशपांडे)
+९१ ८९७५३ १२०५९
https://www.facebook.com/majhyaoli/
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ ॥ निर्वाण षटकम्॥ – मराठी भावानुवाद : आद्य शंकराचार्य ☆ भावानुवादक : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆ ☆ ☆ ☆
मनो बुद्ध्यहंकारचित्तानि नाहम् न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे
न च व्योम भूमिर् न तेजॊ न वायु: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥
*
न च प्राण संज्ञो न वै पञ्चवायु: न वा सप्तधातुर् न वा पञ्चकोश:
न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायू चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥
*
न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ मदो नैव मे नैव मात्सर्य भाव:
न धर्मो न चार्थो न कामो ना मोक्ष: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥
*
न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खम् न मन्त्रो न तीर्थं न वेदा: न यज्ञा:
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥
*
न मृत्युर् न शंका न मे जातिभेद: पिता नैव मे नैव माता न जन्म
न बन्धुर् न मित्रं गुरुर्नैव शिष्य: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥
*
अहं निर्विकल्पॊ निराकार रूपॊ विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्
न चासंगतं नैव मुक्तिर् न मेय: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥
*
भावानुवाद ::
निर्वाण षटक
मन, बुद्धी मी ना अहंकार चित्त
कर्ण ना जिव्हा, नाही नासा न नेत्र
व्योम न धरित्री, नसे तेज वायू
चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||१||
*
न मी चेतना ना असे पंचवायू
नसे पंचकोष मी ना सप्तधातू
मी वाचा न हस्त ना पादोऽन्य गात्र
चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||२||
*
न संतापी द्वेषी नसे लोभ मोह
नसे ठायी मत्सर ना मी मदांध
धन-धर्म-काम ना मी मोक्षातीत
चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||३||
*
न मी पुण्य-पाप न सौख्य न दुःख
नसे मंत्र, तीर्थ न वेद ना यज्ञ
नसे अन्न वा ना भरविता न भोक्ता
चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||४||
*
मज मृत्युभय ना न जाणे मी जाती
मला ना पिता-माता मी तर अजन्मी
नसे बंधू स्नेही गुरु शिष्य नसती
चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||५||
*
विकल्पाविना मी न आकार मजला
मी सर्वव्यापी इन्द्रियात वसला
बंध मला ना मज नाही मुक्ती
चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||६||
☆ ☆ ☆ ☆
मराठी भावानुवाद © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 244 – विजय साहित्य
☆ गझल – आकाश भावनांचे…! ☆
☆
आकाश भावनांचे गझले तुझ्याचसाठी,
हे विश्व आठवांचे मतले तुझ्याचसाठी…!
*
आकाश बोलणारे जमले तुझ्याचसाठी,
हे पंख, ही भरारी, इमले तुझ्याचसाठी…!
*
माणूस वाचताना, टाळून पान गेलो.
काळीज आसवांचे, तरले तुझ्याचसाठी..!
*
सारे ऋतू शराबी, देऊन झींग गेले
प्याले पुन्हा नव्याने, भरले तुझ्याचसाठी..!
*
हा नाद वंचनांचा , झाला मनी प्रवाही
वाहतो कुठे कसा मी?, रमलो तुझ्याच साठी..!
*
जखमा नी वेदनांची,आभूषणे मिळाली
लेऊन साज सारा, नटलो तुझ्याचसाठी..!
*
काव्यात प्राण माझा, शब्दांत अर्थ काही
प्रेमात प्रेम गात्री, वसले तुझ्याचसाठी..!
*
आयुष्य सांधताना,जाग्या अनेक घटना
हे देह भान माझे हरले तुझ्याचसाठी…!
*
कविराज रंगवीतो, रंगातल्या क्षणांना
चित्रात भाव माझे, उरले तुझ्याचसाठी..!
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सौ. वंदना अशोक हुळबत्ते
कवितेचा उत्सव
☆ रंगांचं रूप… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
☆
रंग विस्कटलेला समाज
होळीचा रंग उधळतोय
बेगडी संस्कृती
परंपरा जोपासतोय
*
रंग येतील ही……
गळ्यात गळे घालून
घ्यावी लागेल त्यांची
अस्मिता तपासून
*
रंग स्वतःमध्ये रंगलेले
कोणी ओरबडले…
वेगळे केले…..
विभागात वाटून दिले
*
रंग झाले
अक्राळविक्राळ
आक्रमक
घोषणा देणारे
आपले गट पोसणारे
*
भिती वाटते
रंगाना आपलं म्हणणं
त्यापेक्षा सोयीचे असेल
रंगहिन असणं
☆
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
मो.९६५७४९०८९२
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ रंगपंचमी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
रंगू दे
रंगात तुझिया
शाश्वत अशा
आत्मानंदात….
*
रंगू दे
रंगात तुझिया
बोधाच्या अशा
नितळ झ-यात…
*
रंगू दे
रंगात तुझिया
उत्कट अशा
निर्व्याज प्रेमात…
*
रंगू दे
रंगात तुझिया
सेवा, त्यागाच्या
निर्भेळ वृत्तीत…
*
रंगू दे
रंगात तुझिया
मी ने व्हावे वजा
सदैव राहो शून्यात…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ संत तुकाराम महाराज… ☆ श्री सुजित कदम ☆
☆
माघ मासी पंचमीस
जन्मा आले तुकाराम
जन्मदिन शारदेचा
संयोगाचे निजधाम…! १
*
ऋतू वसंत पंचमी
तुकोबांचा जन्मदिन
जीभेवर सरस्वती
नाचतसे प्रतिदिन…! २
*
साक्षात्कारी संत कवी
विश्व गुरू तुकाराम
संत तुकाराम गाथा
अभंगांचे निजधाम…! ३
*
सतराव्या शतकाचे
वारकरी संत कवी
अभंगात रूजविली
भावनांची गाथा नवी…! ४
*
जन रंजले गांजले
त्यांना आप्त मानियले
नरामधे नारायण
देवतत्व जाणियले…! ५
*
तुकोबांची विठुमाया
कुणा कुणा ना भावली
एकनिष्ठ अर्धांगिनी
जणू अभंग आवली…! ६
*
सामाजिक प्रबोधन
सुधारक संतकवी
तुकोबांचे काव्य तेज
अ*भंगात रंगे रवी…! ७
*
विरक्तीचा महामेरू
सुख दुःख सीमापार
विश्व कल्याण साधले
अभंगाचे अर्थसार…! ८
*
केला अभंग चोरीचा
पाखंड्यांनी वृथा आळ
मुखोद्गत अभंगांनी
दूर केले मायाजाल…! ९
*
एक एक शब्द त्यांचा
संजीवक आहे पान्हा
गाथा तरली तरली
पांडुरंग झाला तान्हा..! १०
*
नाना अग्निदिव्यातून
गाथा प्रवाही जाहली
गावोगावी घरोघरी
विठू कीर्तनी नाहली…! ११
*
जातीधर्म उतरंड
केला अत्याचार दूर
स्वाभिमानी बहुजन
तुकाराम शब्द सूर…! १२
*
रूजविला हरिपाठ
गवळण रसवंती
छंद शास्त्र अभंगाचे
शब्द शैली गुणवंती..! १३
*
दुष्काळात तुकोबांनी
माफ केले कर्ज सारे
सावकारी पाशातून
मुक्त केले सातबारे….! १४
*
प्रपंचाचा भार सारा
पांडुरंग शिरावरी
तुकोबांची कर्मशक्ती
काळजाच्या घरावरी…! १५
*
कर्ज माफ करणारे
सावकारी संतकवी
अभंगात वेदवाणी
नवा धर्म भाषा नवी…! १६
*
प्रापंचिक जीवनात
भोगियले नाना भोग
हाल अपेष्टां सोसून
सिद्ध केला कर्मयोग…! १७
*
परखड भाषेतून
केली कान उघाडणी
पांडुरंग शब्द धन
उधळले सत्कारणी…! १८
*
अंदाधुंदी कारभार
बहुजन गांजलेला
धर्म सत्ता गुलामीला
जनलोक त्रासलेला…! १९
*
साधी सरळ नी सोपी
अभंगाची बोलगाणी
सतातनी जाचातून
मुक्त झाली जनवाणी…! २०
*
संत तुकाराम गाथा
वहुजन गीता सार
एका एका अभंगात
भक्ती शक्ती वेदाकार…! २१
*
सांस्कृतिक विद्यापीठ
इंद्रायणी साक्षीदार
प्रवचने संकीर्तनी
पांडुरंग दरबार…! २२
*
संत साहित्यांची गंगा
ओवी आणि अभंगात
राम जाणला शब्दांनी
तुकोबांच्या अंतरात. २३
*
साक्ष भंडारा डोंगर
कर्मभूमी देहू गाव
ज्ञानकोश अध्यात्माचा
नावं त्याचे तुकाराम…! २४
*
सत्यधर्म शिकवला
पाखंड्यांना दिली मात
जगायचे कसे जगी
वर्णियले अभंगात…! २५
*
युग प्रवर्तक संत
शिवराया आशीर्वाद
ज्ञानगंगा विवेकाची
तुकोबांच्या साहित्यात…! २६
*
सांप्रदायी प्रवचनी
नामघोष ललकार
ज्ञानदेव तुकाराम
पांडुरंग जयकार…! २७
*
नाना दुःख सोसताना
मुखी सदा हरीनाम
झाले कळस अध्याय
संतश्रेष्ठ तुकाराम…! २८
*
तुकोबांच्या शब्दांमध्ये
सामावली दिव्य शक्ती
तुका म्हणे नाममुद्रा
निजरूप विठू भक्ती…! २९
*
नांदुरकी वृक्षाखाली
समाधीस्थ तुकाराम
देह झाला समर्पण
गेला वैकुंठीचे धाम…! ३०
*
फाल्गुनाच्या द्वितीयेला
पुण्यतिथी महोत्सव
संत तुकाराम बीज
अभंगांचा शब्दोत्सव..! ३१
☆
© श्री सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ होळी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
देतोय काळ आता काही नवे इशारे
नकळत हळूहळू हे बदलेल विश्व सारे
*
जोमात युद्ध आता लढतील माणसे ही
मदतीस लाख त्यांच्या असतील ती हत्यारे
*
स्वीकारुनी गुलामी जनता करेल सौदै
लपवील दैन्य सारे ठेवून बंद दारे
*
टोळ्या करून जनता लुटतील सर्व नेते
तेथेच गुंड तेव्हा करतील ना पहारे
*
मोक्यावरील जागा बळकावतील धनको
सामान्य माणसांचे जळतील ना निवारे
*
होईल एकतेची रस्त्यात छान होळी
ठरतील आगलावे जातीतले निखारे
*
लाचार होत पृथ्वी जाईल ही लयाला
पाहून या धरेला रडतील चंद्र तारे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈