मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हुंकार… ☆ अर्चना गादीकर निकारंगे ☆

अर्चना गादीकर निकारंगे

? कवितेचा उत्सव ?

☆ हुंकार… ☆ अर्चना गादीकर निकारंगे ☆

☆

जमिनीच्पा अंकावर पडलेले ते पावसाच्या धारांनी उगवले होते हुंकार रुपात,

त्याज्य म्हणून पडलेले  हिरवागार रंग लेवून आले होते झोकात.

* 

एक मात्र तेव्हाचे ते आणि आत्ताचे फरक होता जमीन अस्मानाचा,

सत्य होते त्याज्य म्हणून दवडलेले स्रोत होता नवनिर्मितीचा.

 *

असा हा धरतीचा हुंकार पावसाळ्याच्या दिवसांतून जागोजागी दिसतो,

एका सुंदर सृजनाचा तो कारक ठरतो.

 ☆

© अर्चना गादीकर निकारंगे 

मो. न. ९८२०३५०४०८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २९ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २९ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

तुकारामांचा युक्तिवाद

दिवस रात्र विठू माऊलीचा ध्यास घेतलेल्या तुकाराम महाराजांची त्यांच्या देवाचे कधी दर्शन घडते आणि माऊलीच्या चरणी त्यांना कधी आसरा मिळतो अशी मनाची अवस्था झाली असताना त्यांनी त्यांच्या काही अभंगांतून खूप छान युक्तिवाद मांडला आहे. आज आपण असे काही अभंग पाहूया.

 नवां नवसांची/ झालो तुम्हासी वाणीची//

 कोण तुझे नाम घेते/ देवा पिंडदान देते//

 कोण होते मागे पुढे/ दुजे बोलाया रोकडे//

 तुका म्हणे पांडुरंगा/ कोणा घेतोसी वोसंगा//

देवाला उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात,

” अहो देवा, आम्ही तुमची नवसासायासाने झालेली दुर्मिळ मुले आहोत. आमच्या वाचून तुमचे नाव घेणारे दुसरे कुणी आहेत का? आम्ही नसतो तर तुमचे पिंडदान कोण करणार? तुम्हाला परखड शब्दात जाब विचारणारे, रोखठोक बोलणारे आमच्या शिवाय दुसरे कोणीतरी आहे का? पांडुरंगा, आम्ही जर तुमची मुले नसतो तर तुम्ही कोणाला तुमच्या पदरात घेतले असते? “

आहे की नाही महाराजांचा हा मस्त युक्तिवाद? आम्ही तुमचे भक्त नसतो तर देवच जसा एकटा पडला असता, ही पांडुरंगाची मुले आहेत म्हणून त्यांना माय बापाच्या अंगा खांद्यावर खेळण्याचा अधिकार आहे.

 आता हा दुसरा अभंग पहा.

 जेणे तुज जाले रूप आणि नाव/

 पतीत हे दैव तुझे आम्ही//

 नाही तरी तुज कोण हो पुसते/

 निराकारी तेथे एकाएकी//

 अंधारे ते दीपा आणियेली शोभा/

 माणिकाची प्रभा कोंदणाची//

 धन्वंतरी रोगे आणिला उजेडा/

 सुखी काय चाडा जाणावे त्या//

 अमृतासी मोल विषाचिया गुणे /

 पितळ तरी सोने उंच नीच//

 तुका म्हणे आम्ही असोनिया जाण /

 तुज देवपण आणियेले//

 रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन तुकाराम देवाला सांगतात, ” अरे देवा, आम्ही तुझे दास आहोत, भक्त आहोत म्हणून तुझी ओळख आहे. ” ते काय म्हणतात? आम्ही पतीत आहोत. आणि आमच्यासाठीच देवा तुम्ही हे रूप धारण केले आहे. म्हणून आम्ही पतीतच तुझे दैवत आहोत. आम्ही जर नसतो तर तुझ्या निराकार, निर्गुण स्थितीला कोणी मानले असते? जसे की, अंधार आहे म्हणून दिव्याच्या प्रकाशाची शोभा आहे. वैद्याला रोग्यामुळे प्रसिद्धी मिळते. जर सर्व लोक निरोगी असते तर वैद्याची गरजच काय? विषामुळे अमृताची गोडी आहे, आणि पितळ आहे म्हणून सोन्याला श्रेष्ठता प्राप्त झाली आहे. तसेच आम्ही पतीत आहोत, म्हणून तुझे हे सगुण सुंदर रूप आहे.

या अभंगातून तुकाराम महाराज एक प्रतिभावंत कवी होते असे आपल्याला दिसून येते. परमेश्वराला मनविण्याची ही मोठी चतुर बुद्धी त्यांच्याकडे नक्कीच होती.

माणूस मायेच्या जंजाळात अडकून पडला आहे, जी माया अत्यंत नीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात की देव खरंतर फार चांगला होता, परंतु या मायेने त्याला सुद्धा बिघडवले आहे. या मायेच्या संगतीत राहून देव लोकांना फसवण्याचे अनेक प्रकारचे खरे खोटे चाळे शिकला आहे. या मायेमुळे याच्यावर जगाचे कर्ज झाले म्हणून लोक याच्या नावाने हाका मारतात. ईश्वरा जवळ कोणी काही मागितले की ही माया ज्याचे त्याला मिळू देत नाही, उलट ती मागणाऱ्याला भ्रम निर्माण करण्याकरता त्याच्या अंगावर धावते.

थोडक्यात काय तर मायेत गुरफटलेल्या माणसाने ईश्वरालाही सोडले नाही, त्यालाच मायेच्या पाशात अडकविले. या कारणाने आम्हा भक्त मंडळींना परमेश्वराची भेट होत नाही.

हा फार मोठा सिद्धांत तुकाराम महाराजांनी सामान्य जनतेला पोट- तिडकीने सांगितला आहे.

 बहु होता भला/ परी या मायेने नासीला//

 बहु शिकला रंग चाळे/ खरे खोटे इचे वेळे //

 नव्हते आळविते कोणी/ तिने केला जग ऋणी//

 ज्याचे त्यासी नेदी देऊ/ तुका म्हणे धावे खाऊ//

विठ्ठलाची भक्ती करीत असताना वेद पठण केलेल्या पंडितांना ते मुळीच मानत नाहीत. ते म्हणतात,

पंडित म्हणता थोर सुख/

परी तो पाहता अवघा मूर्ख//

काय करावे घोकिले/

वेदपाठ वाया गेले//

वेदी सांगितले न करी/

समब्रह्म नेणे दुराचारी//

हा वेदींचा अनुभव/

तुका देखे जीव शिव//

एखाद्याला कोणी पंडित म्हणून संबोधिले तर त्याला त्याच्या विद्वत्तेचा अभिमान वाटतो पण विचारांती तो मूर्खच असतो. कारण नुसत्या वेदांची घोकंपट्टी करून त्याचा अर्थ कळत नसेल तर तो कसला पंडित? मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने त्याचे वेदपठण व्यर्थच आहे. वेदात सांगितले आहे की सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समत्वाने ब्रह्म विलसत असते, परंतु असा अनुभव येत नाही म्हणून असे पंडित हे खरंतर दुराचारीच. वेदातील मुख्य अनुभव म्हणजे जीव आणि शिव एकच असल्याचा अनुभव. तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष असा अनुभव आला आहे. त्यांच्या दृष्टीने खरा पंडित असा असतो.

पंडित तोची एक भला/ नित्य भजे जो विठ्ठला//

अवघे समब्रम्ह पाहे/ सर्वांभूती विठ्ठल आहे//

रिता नाही कोणी ठाव/ सर्वांभूती वासुदेव//

तुका म्हणे तोचि दास/ त्या देखिला जाती दोष//

तुकाराम महाराज म्हणतात की जो खऱ्या खुऱ्या भावाने विठ्ठलाची नित्यनेमाने भक्ती करतो, तोच खरा पंडित, कारण तो विठ्ठलाला सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समत्वाने पाहतो. तो हे जाणतो की वासुदेव सर्वत्र व्यापून आहे. रिकामे असे कोणतेच ठिकाण नाही. असा मनुष्यच खरा विठ्ठलदास आहे, त्याच्या दर्शनाने सर्वदोष नाश पावतात.

संत तुकारामांचे जनतेला हेच आवाहन आहे की, जन हो, हातात टाळ घ्या, वीणा घ्या, त्यांना विठ्ठल स्वरूप माना आणि विठ्ठल नामाचा मुखाने सतत गजर करा.

क्रमशः… २९

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तृषार्त… ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

सुश्री सुरेखा चिखलकर

? मनमंजुषेतून ?

☆ तृषार्त… ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

आयुष्याच्या काठावर उभे राहून,

रित्या लाटांकडे पाहत…

एक विरागी भावना घेऊन,

एकांत आणि शुष्क होऊन जगत,

मी अंतरातल्या वादळांना कवटाळत 

जोडत राहिले स्वतःची नाळ

या निशब्द झालेल्या जगाशी आणि मनाशीही,

अंतर्मनातील नात्यांना रिते करत,

एकटेपणाचा दुष्काळ उरात घेऊन,

उंबरठ्यावर अडकलेल्या आशेला विसावून…

निशब्दाच्या कुशीत समांतर,

प्रवास करावा म्हणते आता

अनंताचा… अनंताकडे,

आठवणींच्या खुणा अंगभर कोरून,

रुजून जावे मातीच्या त्या कणाकणात,

आणि प्रत्येकाच्या मनामनात…

कायमचे, अनंतकाळ…

☆

 © सुरेखा चिखलकर

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कवी आणि पाऊस… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कवी आणि पाऊस… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

☆

पावसाकडे प्रत्येक कवी कसा वेगवेगळ्या सुंदर नजरेने पाहतो… 

आणि कविता प्रत्येक पिढीनुसार  कशी तरुण होते… 

☆

नको नको रे पावसा

असा धिंगाणा अवेळी :

घर माझे चंद्रमौळी

आणि दारात सायली;

*

नको नाचू तडातडा

असा कौलारावरून :

तांबे-सतेली-पातेली

आणू भांडी मी कोठून?

☆

– इंदिरा संत 

कालचा पाऊस आमच्या 

गावात आलाच नाही,

आम्ही आसवांनी शेते भिजवली…

*

 – यशवंत मनोहर

☆
ए आई मला पावसात 

जाऊ दे ।

एकदाच ग भिजुनी 

मला चिंब चिंब होऊ दे ।।

मेघ कसे बघ 

गडगड करिती ।

विजा नभांतुन 

मला खुणविती ।

त्यांच्यासंगे अंगणात मज 

खूप खूप नाचु दे ।।

☆

– वंदना विटणकर 

☆

 नभं उतरू आलं,

चिंब थरथर वलं ।

अंग झिम्माड झालं,

हिरव्या बहरात ।।

अशा वलंस राती,

गळा शपथा येती ।

साता जल्मांची प्रीती,

सरंल दिनरात ।।

वल्या पान्यात पारा,

एक गगन धरा ।

तसा तुझा उबारा,

सोडून रीतभात ।।

नगं लागंट बोलू,

उभं आभाळ झेलू ।

गाठ बांधला शालू,

तुझ्याच पदरा ।।

 – शांताबाई शेळके

☆

भेट तुझी माझी स्मरते 

अजुन त्या दिसाची ।

धुंद वादळाची होती 

रात्र पावसाची ।।

कुठे दिवा नव्हता,

गगनी एक ही न तारा ।

आंधळ्या तमातुन वाहे 

आंधळाच वारा ।

तुला मुळी नव्हती बाधा 

भीतिच्या विषाची ।।

☆  

 – मंगेश पाडगांवकर

☆

मन चिंब पावसाळी 

झाडात रंग ओले । 

घनगर्द सावल्यांनी 

आकाश वाकलेले ।।

पाऊस पाखरांच्या 

पंखांत थेंब थेंबी । 

शिडकाव संथ येता 

झाडे निळी कुसुंबी ।। 

मन चिंब पावसाळी… 

 – ना. धों. महानोर

☆

ढग दाटून येईल,

झाड नवीन होईल…

☆

– अरुणाताई ढेरे

☆

मोकळा उदासीन वारा,

नभ भरून आले वरती,

गाण्याच्या जन्मासाठी,

अन मनात भिजते माती…

☆

–  अरुणाताई ढेरे

☆

आला आला वारा 

संगे पावसाच्या धारा ।

पाठवणी करा सया 

निघाल्या सासुरा ।।

 – सुधीर मोघे 

☆

नाही कधी का तुम्हास म्हटलं,

दोष ना द्यावा फुका ।

अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका ।।

लई गार हा झोंबे वारा ।

अंगावरती पडती धारा ।

वाटेत कुठेही नाही निवारा ।

भिजली साडी भिजली चोळी,

भवतील ओल्या चुका ।।

अन्‌ राया मला,

पावसात नेऊ नका ॥ 

 – (लावणी) – वसंत सबनीस

☆

थेंबांना सावरलेल्या,

त्या गवताच्या काडांचा,

पाऊस पडून गेल्यावर,

मी भिजलेल्या झाडांचा…

☆

लेखक : अज्ञात  

प्रस्तुती : श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वप्नात रंगले मी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – स्वप्नात रंगले मी… – ?  संगीता कुलकर्णी ☆

☆

स्वप्नात रंगले मी 

तुझ्यात हरवले मी

डोळ्यांत तुझंच चित्र 

मनात तुझीच ओढ

तुझ्या प्रेमाच्या रंगात रंगले मी

*

तुझ्या आठवांच्या रंगांनी

मनाच्या कोपऱ्यात सजल्या

नकळत प्रेमाच्या गंधांनी

पानाच्या कॅनव्हासवर

प्रेमाच्या ओळी रेखाटल्या 

*

तुझ्या नावाच्या नाजूक रंगांनी

शब्दही हरवून बसले

तू शब्दांत नव्हतास तू

भावांत दडलेला होतास

माझ्या प्रत्येक श्वासात 

अलगद मिसळलेला होतास

*
तू नसतानाही सोबत

शब्दही गाऊ लागले

मौनही बोलू लागले

तुझ्या आठवांच्या ओंजळीत

भाव सारे विसावले

*

तू नसतानाही सोबत 

तुझ अस्तित्व जाणवत होतं

मनाच्या खोल कप्प्यातून 

तुझ्यातच हरवत होतं

*

मीच माझ्या अंतरंगात

एक अनोखं गाणं झालं

ज्यात हरवणंही सुंदर वाटतं

आणि सापडणंही थांबतं

☆

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गोड गोड परी… ☆ शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – गोड गोड परी… – ? शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

☆

तुझ्या झाकल्या मुठीत 

सुंदर स्वप्नांचे मोती 

नको आणू डोळा पाणी 

गोड हांस ग परीराणी…

*

तुज अंगाई गाऊनी 

सटवाई जोजविते 

स्वप्नांच्या गावी नेऊनी 

खुदुखुदु हसविते…

*

कधी डोळा पाणी येता 

मायेने कुरवाळीते 

कधी सखीही होऊनी 

खेळ तुझा रंगविते…

*

गंमत गोष्टी सांगुनी 

अलगद झोपविते 

हळुवार फुंकरिनी 

तुजला ती जागविते…

☆

कवयित्री : शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड – पुणे, मो.९५९५५५७९०८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी माय मराठी… + संपादकीय निवेदन – सौ. दीप्ती कुलकर्णी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. दीप्ती कुलकर्णी

💐 अ भि नं द न 💐

महाराष्ट्र साहित्य परिषद, इचलकरंजी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांनी आयोजित केलेल्या काव्यस्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांना त्यांच्या ‘माझी माय मराठी’ या कवितेला उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.

श्रीमती कुलकर्णी यांचे ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे मन: पूर्वक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐

 आज त्यांची पुरस्कार प्राप्त कविता प्रकाशित करत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆ ☆

पुरस्कार प्राप्त कविता

? कवितेचा उत्सव ?

☆ “माझी माय मराठी” ☆ सौ. दीप्ती कुलकर्णी ☆

(काव्यप्रकार:अष्टाक्षरी)

☆

 माझी ही माय मराठी

अभिमाने येते ओठी||धृ||

* 

हर्षे कविताही येते

गीते नि भारुड गाते

पोवाड्यात ही रमते

ओव्यातुनी ती सजते ||१||

 *

विश्वी कथेच्या फुलते

शब्दा लेते नि खुलते

वास्तवास न्याय देते

आविष्कारे ती नटते ||२||

 *

कधी कादंबरी बने

शब्दांसवे ती डोलते

वेधकता  दाखविते

सर्वां काबिज करते ||३||

 *

लालित्येही ती मांडते

 संवादाने ती नटते

तेजोन्मेषे नि पांडित्ये

मोहिनीच ती घालिते ||४||

 *

सारस्वता जी स्फुरते

नाट्यातुनी प्रगटते

नवरसा दाखविते

विश्वासह ती स्पर्शते ||५||

☆

© सौ. दीप्ती कुलकर्णी

भ्र. ९५५२४४८४६१

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अथांग मुक्तधारा… कवयित्री : राजश्री पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ अथांग मुक्तधारा… कवयित्री : राजश्री पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

☆

प्रत्येकालाच कुठे जमते

सहज सुंदर बरसणे

​मनातली ओल जपत

पाऊस होऊन जगणे

 

​तो येतो तसाच

कोणताही मुखवटा न घालता

​धरेच्या कुशीत विरतो

स्वतःचे अस्तित्व न राखता

 

​आपण मात्र जगतो

हिशोबाच्या जगात भावनांच्या

​काठोकाठ भरूनही दाटतात

भिंती कोरड्या अहंकाराच्या

 

​पावसाकडे नसते कधी

भेदाभेदाची कोणतीच पट्टी

​तो सुवर्णमहालावरही बरसतो

आणि गरिबाच्या झोपडीवरही

 

​आपले प्रेम मात्र

शर्तींच्या चौकटीत अडकलेले

​माणसाचे दातृत्व नेहमी

स्वार्थाच्या तराजूत तोललेले

​

तो ढग होऊन येतो

आणि मुक्तहस्ते उधळतो

​आपण अमृताचा संचय करून

त्यालाच गळती लावतो

​

त्याच्या एका थेंबात

अंकुराचे प्राण हसतात

​आपल्या हजारो शब्दांत

नाते मात्र मुके राहतात

 

​निसर्गाचे हे देखणे रूप

कधीतरी माणसाला उमजावे

​पावसासारखे निखळ होऊन

फक्त देता देता उरावे…

☆

कवयित्री : प्रा. राजश्री पाटील

प्रस्तुती : सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चिगोरात तिंतिणी ही… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? चिगोरात तिंतिणी ही… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत (वर्ण संख्या १६ यति ८ व्या अक्षरावर))

☆

वसंताने आणलेली ग्रीष्मात बहरू येते 

चिगोरात तित्निणी ही रंगरूप नवे घेते ||ध्रु||

*

चिमण्याश्या लाल कळ्या पर्ण पाचूत सजल्या

सोनं पांढऱ्या पाकळ्या फुलोऱ्यात त्या रुजल्या

पाकळ्यांना छेडण्यास मधमाशी डंख देते

चिगोरात तिन्तिणी ही रंगरूप नवे घेते ||१||

*

दीर्घायुषी तरूवर दिसतात मनोहर

हरितपर्णिकामधे सजे फुलोरा सुंदर

चिंचबने फुलारली मोहक दिसती शेते

चिगोरात तिन्तिणी ही रंगरूप नवे घेते ||२||

*

कधी वाटे भरजरी अंगावरली शेलारी

शालू नेसून नवरी नटलेली दिसे न्यारी

गीत सुमधूर माझे चिंचेखाली मला नेते

चिगोरात तिन्तिणी ही रंगरूप नवे घेते ||३||

*

चिरमिर पानांच्या या अक्षताच पडतात

फुलोऱ्याची फुले त्यात पायघड्या घालतात 

छोटे छोटे डोकावती अम्लकीचे आकडे ते

चिगोरात तिन्तिणी ही रंगरूप नवे घेते ||४||

☆

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ शिवार पंढरी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “शिवार पंढरी…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

☆

मोटेचा आवाज | प्रवाह पाटाचा 

झुळूका वाऱ्याचा | पांडुरंगा ||१||

*
कांदा मुळा भाजी | गाते हिरवाई 

आमुची विठाई | काळी माय ||२||

*

टाळ मृदुंग ना | साथीला चिपळी 

औत बैल गळी | तालामध्ये ||३||

*

चंद्रभागा माझी | नाचते शिवारी

शिवार पंढरी| भासे जणू ||४||

*

वारी चालू वाटे | भेटावया तुला

म्हैस बैल गाया  |  साद घाली ||५||

*

सौख्य पंढरीचे | शिवारी खुलते

तुकोबा मनी ते | जनाबाई ||६||

*

पावसाच्या सरी | ओंब्या धान्य धरी

इथेच पंढरी | विसावली ||७||

*

सोनिया म्हणे हा | विठू मी पाहिला 

शिवारी थाटला | निसर्गात ||८||

☆

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares