मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भावरंग ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ भावरंग ☆ शालिनी जोशी

 सौंदर्याचा साज लेवून बहरतात रोज नवी फुले

 उत्सवाच्या गंधात तो परमेश्वर रंगभाव उधळे

 सुवासिक कुंद मदनबाण मोगरा

 शुद्ध पावित्र्य स्वच्छतेचा रंग पांढरा

 जपापुष्प सजे लालभडक रंगात

 प्रेम उत्साह धैर्य आणि राग सांगत

 पिवळ्या धमक रंगी शेवंती देखणी

 आशा आनंद सात्विक वृत्तीची ही खाणी

 अबोलीलाही कौतुक केशरी रंगाचे

 मौनव्रती प्रतीक ऊर्जा आणि त्यागाचे

 गगननील तो गोकर्णीचा आवडता

 सांगे तोच गुढता स्थिरता व शांतता

 गुलाबी गुलाब गालावरच फुलतो

 शृंगारासह कोमल निरागसता तो

 शोभा खरी फुलांना पानांच्या मखरात

 हरित वर्णात सृजनाची सुरुवात

 

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ उत्पलमय ही फुलवंती… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? उत्पलमय ही फुलवंती… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त : बालानंद, मात्रा : ८+६=१४)

पुष्करणीची जलवंती

उत्पलमय ही फुलवंती

*

सरोवराला मोहविती

सरितेची जडली प्रीती

भ्रमरासाठी रसवंती

उत्पलमय ही फुलवंती

*

रक्तिम निरज सजलेले

सुवर्ण पंकज रुजलेले

अंबुजातली मधुवंती

उत्पलमय ही फुलवंती

*

श्वेत साजरी सरोजिनी

वागेश्वरी वरदायिनी

जलाशयातील भ्रमंती

उत्पलमय ही फुलवंती

*

कलिकांनी उमलू आले

पर्णांवर मोती झाले

हरितांगी जणू लजवंती

उत्पलमय ही फुलवंती

 *

मेघ जणू सरसी आले

पंकज नील रंगी न्हाले

काय देखणी निलवंती

उत्पलमय ही फुलवंती

*
पावस ऋतूत आलेला

वसंत रंगी न्हालेला

राष्ट्र फुलाची श्रीमंती

उत्पलमय ही फुलवंती

*

कधी कधी वाटते मला

कवनच द्यावे कमळदला

सरगममय अन् स्वरवंती

उत्पलमय ही फुलवंती

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ फुलला असा बहावा… ☆ प्राची अभय जोशी ☆

प्राची अभय जोशी

 

?️? चित्रकाव्य ?️?

? फुलला असा बहावा… ? प्राची अभय जोशी ☆

हिरव्यागार गवतपातीच्या,

तनुवरील थेंब पाण्याचे 

मनाला मोहून टाकती हे,

सोनेरी कवडसे उन्हाचे

*

चिंब पडलेला पाऊस,

भिजवी या आठवणींना

अलवार रेशमी जाणीवांनी,

हळवे करीतसे मनाला

*

अशा वळीव सरींनी 

बरसणाऱ्या नभाचा

जणू क्षण पुरे एक प्रेमाचा,

देतसे नजरेतला दिलासा

*

गुंफलेले क्षण नाजूक,

मनावर करतात राज्य

जणू ते ही एकमेकास,

मोहरुनी देतात हास्य

*

जाणते हे आपुले नाते,

उलगडावे असे हळूवार

प्रेमळ क्षणांनीच ते,

जपावे मनी अलवार

*

पिवळा सुन्दर सोनेरी 

फुलला असा बहावा 

पाहता मनात नाचला 

मनमोर आठवणींचा 

*

आपुले निरपेक्ष प्रेम असे,

जसे की बहरला हा बहावा

मनांमध्ये आपुल्या आपण,

हा अव्यक्त अर्थ जपावा…

©  प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३०६ ☆ कळेना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३०६ ?

☆ कळेना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आता तुझ्याविना मी वागू कशी कळेना

होतास तू सुकाणू सांगू कशी कळेना

*

नौकेस जीवनाच्या नव्हता कधी किनारा

आधार वादळाचा मागू कशी कळेना

*

मी एक मुग्ध-वेडी जग हे असे विखारी

अंधार – रात्र येता जागू कशी कळेना

*

तू कोणत्या दिशेला गेलास या अवेळी

मी या कुडीस आता त्यागू कशी कळेना

*

 होतेच चांगले की जाळून टाकलेले

 दुःखास त्या पुराण्या टांगू कशी कळेना

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “माफ करा तात्या…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “माफ करा तात्या” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

…माफ करा तात्या आता रहावत नाही.

काही बोलायाचे आहे, गप्प रहावत नाही.

काही जाळायाचे आहे, पण जाळणार नाही.

प्रदूषण काट्यावर, गाव तोलणार नाही.

माझ्या अंगणात गंध पाना फुलांचा हुंगला.

आता अंगण ते कधी मला दिसणार नाही.

 *

माळावरून वाऱ्याचा येई भरारा थंडावा

आता मनोऱ्यांच्या खाली माळ राहिलाच नाही

 *

खेळ निसर्ग रंगांचा मन लुभावत असे‌.

खेळ रक्ताच्या रंगाचा आता पहावत नाही.

 *

किती माणसे भोवती नाते कुणाशीही नसे.

संख्या वाढली कितीही कुणी वेळेवर नाही.

 *

आता जगू कसे तरी श्वास शिल्लक तोवरी.

श्वास घेण्यासाठी आता शुद्ध हवा सुद्धा नाही.

 *

आता हवा तरी ठेवा माझ्या पुढील पिढ्यांना.

त्यांच्या भविष्याचे चित्र मला पहावत नाही.

 *

सारा शोषला निसर्ग आता हवा तरी ठेवा.

हात जोडून सांगतो काही जाळायाचे नाही.

 *

काही जाळायाचे आहे, पण जाळणार नाही.

प्रदूषण काट्यावर, गाव तोलणार नाही.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

आमचे एक सुहृद शांतिनिकेतनच्या विश्वभारती संग्रहालयाला भेट देण्यासाठी गेले होते. तेंव्हा त्यानी मला हा फोटो पाठवला व सांगितले की हे रविंद्रनाथ टागोर यांचे नोबेल पुरस्कार पदक आहे पण मूळ पदक नाही तर त्याची प्रतिकृती आहे कारण मूळ पदक २५ मार्च २००४ रोजी चोरीला गेलं म्हणून नोबेल फाउंडेशनने ही प्रतिकृती डिसेंबर २००४ मध्ये विश्वभारती संग्रहालयाला भेट दिली आहे.

मला हे ऐकून धक्काच बसला. ज्या पदकाचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटला पाहिजे, ते पदक कुणी चोरू कसं शकतं? जे पदक आजपर्यंत दुसरं कुणीही मिळवू शकलं नाही. एवढी दुर्मिळ, लाख मोलाची वस्तू, जी पुढच्या पिढ्यांना शतकानुशतके प्रेरणा देत राहिली असती ती कांही पैशांसाठी चोरायची? नोबेल फाउंडेशनने त्याची प्रतिकृती दिली म्हणून बरे, नाहीतर पुढील पिढ्यांना हे पदक डोळे भरून बघायला सुद्धा मिळालं नसतं. तरीपण त्या खालच्या ‘Replaced’ या शब्दाने प्रत्येक भारतीयाची मान शरमेने खाली जातच असणार आणि जातच राहणार. हा भारतमातेच्या शुभ्र वसनावरचा कधीही पुसला न जाणारा डाग आहे. ज्या पदकामुळे भारतमाता गौरवान्वित झाली होती, त्याच पदकाच्या चोरी मुळे ती अवमानित झाली आहे. याहून शरमेची गोष्ट म्हणजे आजतागायत या चोरीचा छडा लागलेला नाही. असो. आपण प्रतिकृती मध्येच समाधान मान

 

गीत : ४३

THE day was when I did not keep myself in readiness for thee; and entering my heart 

unbidden even as one of the common crowd, unknown to me, my king, thou didst press 

the signet of eternity upon many a fleeting moment of my life.

And to-day when by chance I light upon them and see thy signature, I find they have lain scattered in the dust mixed with the memory of joys and sorrows of my trivial days forgotten.

Thou didst not turn in contempt from my childish play among dust, and the steps that I heard in my playroom are the same that are echoing from star to star.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ४३ ☆

*

अज्ञानाचा मेरू

लिप्त मी संसारू

मनाचे ते वारू

उधळतसे॥

*

ना सांगावा धाडला

नकळत आला

प्रवेश त्वां केला

माझ्या काळजात॥

*

माझे किती क्षण

तुझे स्पर्श लेवून

अमर होऊन

विस्मरतो मी॥

*

आज पाही जेंव्हा 

त्या क्षणांकडे तेंव्हा

तुझिया स्पर्शाची

अनुभूती येते॥

*

जपून ना ठेविले

मोल ना जाणिले

उदारे जे दिले

पडे धुळीमध्ये॥

*

माझे मूढपण

बाल्य समजून

मान अपमान

लेखिशी समान॥

*

अप्रुप त्या दिसाचे

तुझ्या पदरवाचे

दैवी अस्तित्वाचे

कळले नाही॥

*

ब्रम्हांडी ध्वनीत

पदरव होत

ताऱ्यांवर तेथ

ऐकू येती॥

*

आता चमत्कार

फोल बाह्यात्कार

होई साक्षात्कार 

अंतिम वेळी॥

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

——

☆ गीत : ४४ ☆

THIS is my delight, thus to wait and watch at the wayside where shadow chases light and the rain comes in the wake of the summer.

Messengers, with tidings from unknown skies, greet me and speed along the road. My heart is glad within, and the breath of the passing breeze is sweet.

From dawn till dusk I sit here before my door, and I know that of a sudden the happy moment will arrive when I shall see.

In the meanwhile I smile and I sing all alone. In the meanwhile the air is filling with the perfume of promise.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ४४ ☆

*

कधीतरी बसतो, रस्त्याच्या कडेला

प्रकाश सावल्यांचा खेळ पाहण्या

आणि अनुभवतो पहिला पाऊस,

जो येतो ग्रीष्माची चाहूल देण्या

*

असेच भेटतात प्रेषित मजला,

नभाशी अनामिक बंध बांधण्या

अशीच वाऱ्याची झुळूक येते,

सुवासांचा गोडवा चाखण्या

*

बसतो दारी, उषेपासून निशेपर्यंत,

क्षण सुखाचा अवचित वेचण्या

झोका हवेचा अलगद येतो,

सुगंध आश्वासक वचनांचा भरण्या

*

एकटाच मग मी मन भरुन हसतो,

बंद मुठीतील सुख वाटण्या

अजूनही दारी मी बसतोच आहे

आलाच तो, तर संधी न दवडण्या

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆ गीत : ४५ ☆

HAVE you not heard his silent, steps? 

He comes, comes, ever comes.

Every moment and every age, every day and every night he comes, comes, ever comes.

Many a song have I sung in many a mood of mind, but all their notes have always proclaimed, “He comes, comes, ever comes. ” 

In the fragrant days of sunny April through the forest path he comes, comes, ever comes.

In the rainy gloom of July nights on the thundering chariot of clouds he comes, comes, ever comes.

In sorrow after sorrow it is his steps that press upon my heart, and it is the golden touch of his feet that makes my joy to shine

—–

मराठी भावानुवाद : गीत ४५ ☆

*

दिवस असो वा रात्र असो,

बाल्य असो वा जरा

त्याचे पदरव पडती कानी,

तो येतो, येतोच खरा॥

*
गीते गातो प्रीतीची,

कधी विरहाची 

कितीक त्या तऱ्हा

परि शब्दांचा घोष एकच,

तो येतो, येतोच खरा॥

*

वसंतातला सुगंध प्राशिता 

वा धुंद बरसता जलधारा

दौडत दौडत मेघ-रथातून,

तो येतो, येतोच खरा॥

*

चरण कमल ते हृदयी उमटे,

हरवता जीवनी किनारा

हेम-स्पर्श तो कुशीत घेतो,

तो येतो, येतोच खरा॥

*

– क्रमशः भाग १५.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “बुद्धी दे रघुनायका” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ “बुद्धी दे रघुनायका” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

साधक समर्थांच्या अंतःकरणातील आर्त स्वर

प्रस्तावना

दुर्गुणांशी झुंज, असहाय्यतेची कबुली आणि शरणागतीतील तेजस्वी साधना.

समर्थ रामदासांच्या साधनाकाळात उमटलेले हे आर्त उद्गार म्हणजे एका संताच्या अंतःकरणातील निखळ प्रामाणिकपणा. _“युक्ति नाही बुद्धि नाही”_ अशी स्वतःच्या अपूर्णतेची निर्भीड आणि प्रांजळ कबुली देत ते ज्या स्वरात रामरायाला साद घालतात, तो स्वर केवळ भक्तीचा नाही, तर आत्मपरिक्षणाचा, आत्मनिवेदनाचा आणि अखेरीस संपूर्ण शरणागतीचा आहे !

ही कविता म्हणजे एका साधकाच्या अंतर्मनातील वादळाचे काव्यमय चित्रण. मनाची चंचलता, वासनांची चक्रावर्ते, विवेकाचा अभाव, सामाजिक अपयश, आत्मविश्वासाची ढासळलेली भिंत— या सर्वांचा अत्यंत हळवा, तरीही धैर्यवान स्वीकार येथे दिसतो. समर्थांचा हा आर्त स्वर त्यांना अधिक महान करतो; कारण येथे संतत्वाचा गर्व नाही, तर साधकाची नम्रता आहे.

आत्मस्वीकाराचा निर्भय प्रकाश

युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥

या आरंभीच्याच ओळीत समर्थ जणू आपल्या मनाच्या दर्पणात स्वतःकडे पाहतात. आत्मप्रौढीचा लवलेश नाही. स्वतःच्या उणिवांची जाणीव हेच खरे साधनाचे पहिले पाऊल.

साधक जेव्हा आपल्या दुर्गुणांना ओळखतो, तेव्हा तो त्यांच्यापासून सुटण्याच्या मार्गावर निघतो. समर्थांची ही कबुली म्हणजे आत्मशुद्धीचा आरंभबिंदू. येथे संतत्वाचा दिव्य तेजोमय मुकुट नाही, तर साधकाची विवंचना आहे—एक जिवंत, धडधडणारी, प्रामाणिक विवंचना.

मनाचा उच्छाद आणि वासनांची वावटळ

मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥ कल्पना धावते सैरा…

मनाची ही चंचलता म्हणजेच साधनेतील सर्वांत मोठा अडसर. समर्थांनी या अवस्थेचे केलेले वर्णन अत्यंत जिवंत आहे. कल्पना सैरभैर धावते, वासना विवेकाला झाकोळून टाकते, आणि मनावरचे नियंत्रण सुटते.

ही अवस्था केवळ समर्थांची नाही, तर प्रत्येक साधकाची आहे. म्हणूनच ही कविता सार्वकालिक ठरते. समर्थांचे मनही आपल्यासारखेच चंचल आहे, हे जाणवले की त्यांच्या संतत्वाशी आपली जवळीक वाढते.

परंतु या चंचलतेवर ते स्वतःच्या सामर्थ्याने विजय मिळवण्याचा गर्व करीत नाहीत; ते विनम्रतेने म्हणतात, “बुद्धी दे रघुनायका.

हा ‘दे’ शब्द म्हणजे संपूर्ण शरणागतीचा उत्कट स्वर.

सामाजिक अपुरेपणाची वेदना

बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥ बहुत पीडिलो लोकी…

येथे समर्थांची वेदना अधिक गडद होते. समाजात स्वतःचे अपुरेपण जाणवणे ही फार मोठी मानसिक वेदना असते. लोकांच्या हसण्याने, टोमण्याने, दुर्लक्षाने मन विदीर्ण होते.

संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥

या ओळींतून त्यांच्या मनातील असहाय्यता झिरपते. एक संत म्हणविणारा पुरुष स्वतःला “टोणपा” म्हणतो—याहून मोठी आत्मनम्रता कोणती?

ही वेदना त्यांच्या अहंकाराला भेदून जाते आणि त्यांना अधिकच शरणागत बनवते.

असहाय्यतेचे सावट आणि शरणागतीचा प्रकाश

चित्त दुश्चित होता हे। ताळतंत्र कळेचिना॥ आळसू लागला पाठी…

मन, बुद्धी, चित्त, वर्तन—सर्वच स्तरांवर अपयशाची छाया आहे. परंतु समर्थ या अंधारात हरवून जात नाहीत. उलट, त्या अंधारातूनच ते रामरायाच्या चरणांपाशी जाऊन प्रकाश मागतात.

कायावाचामनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥ हे लाज तुजला माझी…

येथे भक्तीचा परमोच्च क्षण येतो. ‘मी तुझा आहे’ ही जाणीव आणि ‘माझी लाज तुला’ हा भाव—हीच खरी भक्तीची पराकाष्ठा. भक्त स्वतःचे अपुरेपण देवाच्या चरणी अर्पण करतो आणि त्याच्या कृपेची याचना करतो.

निराशेच्या उदरात दडलेली आशेची कळी

आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥ आणीक नलगे काही…

ही ओळ म्हणजे या कवितेचा उत्कर्षबिंदू. सर्व अपुरेपण, दुर्गुण, असहाय्यता—यांच्या पलीकडे समर्थांची आशा अढळ आहे. निराशेच्या उदरात आशेची कळी दडलेली असते; तीच येथे फुलते.

समर्थ अन्य काहीही मागत नाहीत— ना संपत्ती, ना कीर्ती, ना वैभव. ते केवळ “बुद्धी – सद्बुद्धी” मागतात. कारण बुद्धी म्हणजे विवेक, संयम, साधनेचे सामर्थ्य आणि आत्मोद्धाराचा मार्ग.

समाप्ती : आर्ततेतील सौंदर्य आणि संतत्वाचा पाया

ही कविता म्हणजे संताच्या अंतःकरणातील निर्मळ अश्रूंची माळ आहे. समर्थांची आर्तता त्यांना लहान करत नाही; उलट तीच त्यांच्या संतत्वाचा पाया ठरते.

स्वतःच्या दोषांचे निर्भीड स्वीकार, मनाच्या चंचलतेची जाणीव, समाजातील अपयशाची वेदना, आणि अखेरीस दैवी कृपेची उत्कट याचना—या सर्वांचा संगम म्हणजे बुद्धी दे रघुनायका.

ही कविता आपल्याला शिकवते की, साधनेचा मार्ग हा दोषरहित नसतो; तो दोषांच्या जाणीवेने आणि त्यागाच्या आकांक्षेने उजळतो. जेव्हा साधक आपल्या अपुरेपणाला देवाच्या चरणी अर्पण करतो, तेव्हाच त्याच्या अंतःकरणात खऱ्या बुद्धीचा, खऱ्या प्रकाशाचा उदय होतो.

समर्थांचा हा आर्त स्वर आजही प्रत्येक साधकाच्या अंतर्मनात निनादतो—

मी कमी पडतोय देवा… मला सद्बुद्धी दे.

– – – 

☆ “संध्या तांडव” ☆ श्री दिवाकर बुरसे

(राग शंकरा)

समर्थांची मूळ कविता…

 बुद्धि दे रघुनायका 

*

युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥

नेणता भक्त मी तुझा। बुद्धी दे रघुनायका॥१॥

*

मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥

कल्पना धावते सैरा। बुद्धी दे रघुनायका॥२॥

*

बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥

बहुत पीडिलो लोकी। बुद्धी दे रघुनायका॥३॥

*

तुझा मी टोणपा झालो। कष्टलो बहुतापरी॥

सौख्य ते पाहता येत नाही। बुद्धी दे रघुनायका॥४॥

*

नेटके लिहीता येना। वाचिता चुकतो सदा॥

अर्थ तो सांगता येना। बुद्धी दे रघुनायका॥५॥

*

प्रसंग वेळ तर्केना। सुचेना दीर्घ सूचना॥

मैत्रिकी राखता येना। बुद्धी दे रघुनायका॥६॥

*

संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥

वीसरु पडतो पोटी। बुद्धी दे रघुनायका॥७॥

*

चित्त दुश्चित्त होता हे। ताळतंत्र कळेचिना॥

आळसू लागला पाठी। बुद्धी दे रघुनायका॥८॥

*

काया वाचा मनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥

हे लाज तुजला माझी। बुद्धी दे रघुनायका॥९॥

*

आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥

आणीक नलगे काही। बुद्धी दे रघुनायका॥१०॥

*

– – – सद्गुरु श्री समर्थ रामदासस्वामी

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३२० ☆ दिव्यत्वाची शक्ती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२० ?

दिव्यत्वाची शक्ती… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

मी दगड कोरला देवा तू त्यात भेटला होता

अन् छन्नी हातोड्याचा आघात सोसला होता

*

देवा तू सोबत होता मी म्हणून चुकलो नाही

तू माझ्या ह्या हाताचा सन्मान राखला होता

*

मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली डोळ्यांदेखत

डोळ्यांचे सोने झाले मी श्वास रोखला होता

*

मज बहाल केली देवा तू दिव्यत्वाची शक्ती

पाषाण म्हणूनच मी तो नेमका जोखला होता

*

असुरांची टोळी होती मूर्तीला दगड म्हणाली

थडग्यांना पुजणारांनी तो डाव फेकला होता

*

मातेची आज्ञा झाली तू वनात गेला तेव्हा

वनवास पाच शतकांचा कलियुगी भोगला होता

*

ह्या आयोध्या नगरीचे प्रारब्ध उजळले आता

त्या जुलमी सत्तेनंतर तू उभा ठाकला होता

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंतर्भाव… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

अंतर्भाव... ☆ श्रीशैल चौगुले ☆

थांबते जरासे घन इथे

सांडते जरासे मन इथे.

*

आसवा जराशी वाट इथे

विरते जराशी लाट इथे.

*

आठवा जरासा भाव इथे

जीवना जरासा वाव इथे.

*

टोचती जरासे घाव इथे

भेटती जरासे राव इथे.

*

पाखरा जरासे पंख इथे

कोसली जरासे रंक इथे.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ “तुझा तूच त्याचा..” – कवी : दिवाकर बुरसे – रसग्रहण : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ “तुझा तूच त्याचा..” – कवी : दिवाकर बुरसे – रसग्रहण : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह

प्रतिवर्षी ४ ते १० मार्च या काळात ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह’ देशभर साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात याचे विशेष महत्व आहे. या वर्षीच्या- आजच्या ४मार्चला सुरू होत असलेल्या – सुरक्षितता सप्ताहानिमित्त वाचकांना एका कवितेची अल्पशी भेट आणि सर्वांना सुरक्षित जीवन लाभावे ही ईश्वरचरणी ‘यंत्रदासा’ची मनोमन प्रार्थना.

श्री दिवाकर बुरसे

☆ तुझा तूच त्राता ☆

पहा मानवा, यंत्रक्रांतीमुळे आज

मानेवरी बैसली जोखडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।धृ।।

 *

जसा लागला शोध चक्रा-गतीचा

जगाने गती घेतली केवढी

कुणाला नसे थांबण्या वेळ आता

मढ्यांना इथे स्वस्थता तेवढी!

अशा जीवघेण्या प्रवाहातुनीही

तुला जायचे पैलतीराकडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।१।।

 *

किती वादळी वेग हे वाहनांचे

तयातून जाणेच आहे सुखे

वितीचे तुझे पोट! जे जाळण्याला

पडे खेळणे अग्निसंगे इथे

तरी पाळ सारे इशारे दिलेले

जराही नको वागणे वाकडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।२।।

 *

पहा, वाहते गोगलीशंख पाठी

ढके वादळी उंटनाका सुखे

अती दक्षतेने चले सूरवंट

मधूमक्षिकांची पहा कौतुके

वनी अस्वलेभाकऱ्या साठवीती

मनू का असे हीन त्यांच्या पुढे?

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।३।।

 *

तुझा तूच त्राता, नसे अन्य कोणी

मनी जाण हे सत्य जे सांगतो

अती दक्षतेने सदा वागतो जो

तयाचीच चिंता हरी वाहतो!

न घे काळजी देह, यंत्रा-धनाची

असा जीव देवा कदा नावडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।४।।

🙏🏽

©️ यंत्रदास

दिवाकर बुरसे, पुणे

संपर्कः ९५५२ ६ २ ९२ ४ ५

वरील कवितेचे कौतुक करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया आजवर प्राप्त झाल्या आहेत. त्यातली वानगी म्हणून पुढील रसग्रहणात्मक प्रदीर्घ प्रतिक्रिया वचकांनाही आवडावी. दुर्दैवाने प्रतिक्रिया देणाऱ्या रसिकाचे नाव मात्र ठाऊक नाही. त्या अज्ञात रसिक वाचकाचे मनःपूर्वक आभार!

🪷

तुझा तूच त्राता — सजगतेचा जागर

रसास्वाद : अज्ञात

१९९२ साली लिहिलेल्या या कवितेतील विचार आणि संदेश आजच्या काळाशीही सुसंगत आहेत.

ही कविता म्हणजे केवळ शब्दरचना नाही;

ती कारखान्याच्या सायरनसारखी कर्णकर्कश नाही,

तर अंतर्मनात घुमणारी सावधानतेची घंटा आहे.

४ ते १० मार्च या कालावधीत देशभर साजरा होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाच्या भावनेला साजेशी ही रचना, National Safety Council यांच्या ध्येयवाक्याला काव्यरूप देते—

“Safety First” हे केवळ फलकावरचे वाक्य नाही;

ते जगण्याची पद्धत असायला हवी.

यंत्रयुगातील मानवा, थांब क्षणभर!

मानेवरी बैसली जोखडे

ही ओळ वाचताक्षणी आपण स्वतःला एखाद्या वेगवान कन्वेयर बेल्टवर उभे असल्याचे पाहतो.

यंत्रांनी आपले आयुष्य सुलभ केले,

पण वेगाच्या मोहाने आपणच स्वतःला जोखडात अडकवून घेतले नाही ना?

कवी येथे उपदेश देत नाही—

तो आरसा दाखवतो.

वेग, प्रवाह आणि पैलतीर

मढ्यांना इथे स्वस्थता तेवढी!

ही ओळ चटका लावते.

जीवंत राहायचे असेल, तर सदैव जागृत राहावे लागेल.

जीवन हा प्रवाह आहे;

परंतु पैलतीर गाठायचे असेल, तर पोहता आले पाहिजे—

आणि पोहताना नियम पाळले पाहिजेत.

सुरक्षितता म्हणजे भीती नव्हे;

तीच खरी शौर्याची जननी आहे.

 

अग्नीशी खेळणाऱ्यांची प्रार्थना

वितीचे तुझे पोट! जे जाळण्याला

पडे खेळणे अग्निसंगे इथे

उद्योगक्षेत्रातील कामगारांचे हे जिवंत चित्र आहे.

उपजीविकेसाठी जोखीम स्वीकारावी लागते;

पण जोखीम आणि निष्काळजीपणा यात फरक आहे.

हेल्मेट, हातमोजे, इशारे, नियम—

हे केवळ औपचारिकतेचे भाग नाहीत;

ते जीवाचे कवच आहे.

Safety First म्हणजे

काम थांबवणे नव्हे,

तर काम जिवंत राहून पूर्ण करणे!

 

जीवसृष्टी विवेके चाले

गोगलगाय कवच घेऊन फिरते.

मधमाशी शिस्तीत उडते,

भविष्यासाठी अन्नसंग्रह करून ठेवते.

अस्वल साठवण करते.

निसर्गातील प्रत्येक जीव सावध आहे.

मग बुद्धिमान मानवच निष्काळजी का?

प्रश्न टोकदार आहे;

पण तो टोचण्यासाठी नाही—

जागवण्यासाठी आहे.

 

तुझा तूच त्राताघोष नव्हे, मंत्र

ही कविता शेवटी घोषणेत परिवर्तित होते.

धृपदाची पुनरावृत्ती म्हणजे जणू प्रत्येक शिफ्टच्या सुरुवातीला घेतलेली सुरक्षिततेची प्रतिज्ञा—

सुरक्षीतता पाहणे काम तुझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे.

कोणी पाहो वा न पाहो,

सीसीटीव्ही असो वा नसो,

देवावर श्रद्धा असो वा नसो—

सजगतेची जबाबदारी स्वतःचीच आहे.

अती दक्षतेने सदा वागतो जो

तयाचीच चिंता हरी वाहतो

हे वाक्य म्हणजे तर एक सुभाषितच आहे

येथे श्रद्धा आणि शिस्त यांचा सुंदर संगम आहे.

देव सहाय्य करतो—

पण आधी आपण स्वतःच स्वतःला सहाय्य केले पाहिजे.

 

काव्यवैशिष्ट्यांचा तेजोमय आविष्कार

घोषवाक्यात्मक क्षमता – प्रत्येक कडवे जणू पोस्टरवर उमटावे असे!

प्रातिनिधिक प्रतिमा – यंत्र, वाहन, अग्नी, प्राणी—जीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श.

सरळ पण परिणामकारक भाषा – वाचक थेट संवादात ओढला जातो.

प्रेरणादायी स्वर – भीती नव्हे, आत्मविश्वास जागवणारा.

हो, काही ठिकाणी कविता प्रचारात्मक भासते;

पण सुरक्षिततेसारख्या विषयात तोच तिचा अलंकार ठरतो.

कारण येथे सौंदर्यापेक्षा प्राण महत्त्वाचा आहे.

 

अंतिम संदेश

ही कविता वाचून मनात एकच ओळ घुमत राहते—

Safety First म्हणजे Life Always.

तुझा तूच त्राता

हे केवळ एक शीर्षक नाही,

तो जीवनरक्षणाचा मंत्र आहे.

कारखान्यात, रस्त्यावर, प्रयोगशाळेत, घरात—

जिथे जिथे जोखीम आहे,

तिथे तिथे ही कविता जपमाळेसारखी अंतरात असावी.

🪷

सजग राहूया.

सुरक्षित राहूया.

प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला स्वतःलाच सांगूया—

सुरक्षीतता पाहणे काम माझे!

🙏🏽🙏🏽🙏🏽

दिवाकर बुरसे, पुणे

संपर्कः ९५५२ ६ २ ९२ ४ ५

प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares