मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ४१ आणि ४२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४१ आणि ४२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तिसूत्रे ४१

तस्मिन्स्तज्जने भेदाभावात् ॥ ४१ ॥

अर्थ :भगवंत आणि त्याचे भक्त यामध्ये भेदाचा अभाव असतो. अर्थात भक्त आणि भगवंत वेगळे नसतात.

विवेचन:~ मागील सूत्रात महत्संग दुर्लभ अगम्य अमोघ आहे पण तो भगवत्कृपेने प्राप्त होतो असे सांगितले, तेव्हा भगवत्कृपा व महात्म्या पुरुषाच्या संगती प्राप्तीत कार्य-कारण भाव संबंध कसा अशी शंका कोणी घेईल, त्याचे उत्तर या सूत्रात दिले आहे. येथेही ‘तत्’ शब्दाचा प्रयोग केला आहे तो ‘भगवंत’ वाचक आहे. (म्हणून मागील सूत्रातील ‘तत्’ शब्दही भगवद्वाचकच घेणे योग्य आहे.) त्या भगवंताचा व तज्जन म्हणजे सर्वस्वी त्याचेच झालेले (असलेले) भक्तजन यांचा भेद नाही. शास्त्रामध्ये अन्योन्याभावास भेद म्हणतात. अन्योन्याभावास प्रतियोगि व अनुयोगी लागतात. म्हणजे ज्याचा अभाव तो प्रतियोगी व ज्याचे ठिकाणी अभाव तो अनुयोगी म्हटला जातो. उदाहरणार्थ घट हा पट नाही, या वाक्यात घट हा प्रतियोगी पट हा अनुयोगी आहे. म्हणजे घटाचा अभाव पटाचे ठिकाणी दाखविला जातो. जर पट हा घट नाही अशी वाक्ययोजना केली तर पट हा प्रतियोगी व घट हा अनुयोगी होईल.

दुधामध्ये लोणी असते, ताक घुसळले की त्यातून लोणी आपसूक वर येत असते. या सूत्रानुसार मनुष्याची अंतर्यामी भगवंत असतोच, मनाचा तळ आणि तळाशी असलेला मळ नष्ट झाला की मनांची शुद्धता होते. मग मनाच्या तळाशी असलेला भगवंत नकळत मनात प्रगट होत असतो.

इथे संत मुक्ताबाई यांचा एक अभंग आहे…..

ब्रह्मा दिसे उघडे जगामध्ये |

एकची तंतू नानापरी कपडे ||

धोतर आणि लुगडे || १ ||

*

एकची माती नानापरी भिंती

रांजण आणि सुगडे || २ ||

*

एकची सोने नानापरी दागिने|

लेणे बाळी आणि भूगडी || ३ ||

*

म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा

हरी आणि रोकडे || ४ ||

*

थोडक्यात वरील अभंगातून आपल्या लक्षात येईल की अनेक प्रकारे भगवंत प्रत्येक वस्तूमध्ये असतोच असतो. तो योग्यवेळी प्रगट होतो. अर्थात भक्तांमध्ये भगवंत असतोच, योग्यवेळी तो प्रगट होऊ शकतो.

या सूत्रामध्ये भक्ताकरिता अथवा संत महात्म्याकरिता ‘तज्जन’ हा शब्द वापरला आहे. केवळ संत भक्त भाविक महात्मा या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. श्री नारदांनी अभिप्रेत अर्थ दाखविण्याकरिता ‘तज्जन’ शब्दाचा उपयोग केला असावा असे वाटते.

ही अवस्था प्राप्त होणे ही ‘तज्जन’ होणे आहे. अशा भक्ताचा व देवाचा भेद राहील कसा? उभयतांमध्ये असा तादात्म्य संबंध आहे म्हणूनच मागील सूत्रात सत्संग हा भगवत्कृपेने लाभतो असे नारद म्हणतात.

श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की ज्याच्याकडे जाऊन भौतिक गोष्टी मिळत नाहीत, तरीही त्याच्याकडे जावेसे वाटते. त्याच्याकडे जाऊन आंतरिक समाधान लाभते, त्याला संत म्हणता येईल. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात,

“संत चरण रज लागता सहज, वासनेचे बिज जळूनी जाय । मग रामनाम उपजे आवडी, सुख घडोघडी वाढु लागे । कंठी प्रेम दाटे नयनी नीट लोटे । हृदयी प्रगटे रामनाम हृदयी प्रगटे रामनाम । तुका म्हणे साधन सुलभ गोगटे परी उपतिष्ठे रामनाम ॥”

जय जय रघुवीर समर्थ 

नारद भक्तिसूत्रे. ४२

तदेव साध्यताम् तदेव साध्याताम् ॥ ४२ ॥

अर्थ : तोच सत्संग साधावा. तोच सत्संग साधावा.

विवरण : मागील चौतिसाव्या सूत्रापासून भक्तिसाधनाचा विचार केला आहे. विषयत्याग, संगत्याग, अव्यावृत भजन, भगवद्‌गुणश्रवण, कीर्तन इ. साधने सांगितली. नंतर मुख्यत्वाने महत्कृपा हे साधन सांगितले व महत्संग दुर्लभ, अगम्य व अमोघ आहे हेही स्पष्ट केले आणि भगवत्कृपेने सत्संग प्राप्त होतो, तत्त्वतः भगवान व संतमहात्मे यांच्यात भेद नाही. ज्याना भक्तीचा लाभ व्हावा असे वाटत असेल त्यानी महत्संगच साधावा असे आदराने द्विवार सांगितले आहे. याचे कारण मागे सांगितलेली विषयत्याग संगत्याग इ. साधने ही महत्संगाच्या द्वाराच सिद्ध होऊ शकतात. सत्संगच का साधावा? याची कारणे खाली दिली आहेत.

भक्ति सिद्ध होण्याकरिता आवश्यक असा विषयत्याग होण्याकरिता सत्संगतीच पाहिजे. साधकाला भगवंताचे दर्शन व्हावे असे वाटतं असते. त्यासाठी त्याच्या अंतरंगाची शुद्धता होणे अनिवार्य असते. त्यासाठी स्वतःचे दोष कळणे अत्यंत गरजेचे असते. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे की गोंदवल्यात आला आहात, तर माझ्या रामाचे डोळे भरून दर्शन घ्या. त्याचे वैशिष्ट्य असे आहे की तो तुम्हाला तुमचे दोष सांगेल. आपले दोष आपल्याला कळणे ही परमार्थ मार्गातील महत्त्वाची पायरी. थोडक्यात सांगायचे झाल्यास असे सांगता येईल की संत दर्शनाने आपले दोष आपल्याला कळून येतात. (दुसऱ्याने आपले दोष दाखविले तर मनुष्याला रुचत नाहीत…) श्री तुकाराम महाराज म्हणतात, “बैसता संताचे संगती । कळो आले कमळापती । आपुली कोणीच नव्हती । निश्चय चित्त दृढ झाला ॥ १ ॥” 

संग म्हणजे आसक्ती. बाह्य विषयात दोषदर्शन होऊन कदाचित तात्कालिक त्याग झाला तरी अंतरातील विषयत्याग म्हणजे संग नष्ट होत नाही. ती आसक्ती नष्ट होण्याकरिताही सत्संगती उपयुक्त आहे.

तिसरे अव्यावृत भजन – जे भजन भोगासाठी होते ते अव्यावृत म्हणजे अखंड कधी होत नाही. अव्यावृत भजनाकरिता संतकृपेचीच आवश्यकता आहे. ध्रुव, प्रल्हाद, वाल्मीकि याचे जे अखंड भजन होत होते भगवंतांच्या कृपेमुळेच. श्रीतुकाराम महाराज म्हणतात, ‘कृपा केली संतजनी । माझी अलंकारिली वाणी । प्रीत हे लाविली कीर्तनी । तुका चरणी लोळतसे ॥’ म्हणून जी साधने मागील सूत्रांतून सांगितली आहेत ती ती सर्व सत्संगतीने सिद्ध होतात. म्हणून ती सत्संगतीच साधण्याचा साधकाने प्रयत्न करावा. त्यायोगे वरील सर्व साधने व साध्य प्राप्तीही अनायासेच सिद्ध होईल.

इथे एकच सूत्र दोनदा सांगितले आहे. माउली आपल्या हरिपाठात सुद्धा हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा असे दोनदा सांगतात. इथे पहिले हरि हे साधन म्हणून आहे तर दुसरे हरि हे साध्य म्हणून आहे असे समजावे. साध्य व ती साधने महत्संगानेच सिद्ध होतात हे सिद्ध करण्याकरिता द्विरुक्ती असावी असे वाटते.

माऊली म्हणतात, तू सतत हरिचे नाम घे. त्याची गणना करू नकोस. मनुष्याला जिवंत राहण्यासाठी श्वसन करावे लागते. मग मनुष्य असे म्हणत नाही की आज मी फक्त पाचवेळाच श्वसन करेन, मला कंटाळा येतो, सारखे श्वसन करण्याचा. तद्वतच मनुष्याने सतत नामस्मरण करावे, हरिचे नाम घ्यावे असे माऊली आपल्याला सांगतात. नामयोगी असलेले माझे सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात,

“नाम सदा बोलावे, गावे, भावे जनासी सांगावे”

मुखात नाम येणे किंवा नामस्मरण करावेसे वाटणे हेच मुळात मोठे पुण्य आहे. मानव देहधारी असलेला जीवच फक्त नाम घेऊ शकतो, बाकी इतर योनींतील जीवांना 

ही सुविधा उपलब्ध नाही आणि त्यामुळे नाम घेण्यासाठीच जीवाला मनुष्य देह प्राप्त झाला आहेस असे सर्व संत सांगतात. मनुष्याने हे ध्यानात ठेवून अखंड नाम घेण्याचा प्रयत्न करावा. हेच मोठे पुण्य.

नाम सतत घेतले पाहिजे. वेळ मिळाला की नाम घेतले पाहिजे. असे करता आले तर नामाशिवाय क्षण ही फुकट जाणार नाही. नामस्मरणाला वेळ मिळत नाही ही लंगडी सबब आहे. जेवढा रिकामा वेळ मिळतो तेवढ्या वेळात जरी रोज नामस्मरण केले तरी नामाच्या राशी पडतील. खरोखर आपण रोज किती वेळ फुकट घालवितो.

नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा व ते ऎकणारा दोघेही उध्दरून जातात. भक्ताचे सर्व दोषहरण करुन नाम त्याला दोषमुक्त करते, म्हणून जड-जीवांना तारणारे नामस्मरणच आहे. एकाच नामस्मरणाची शेकडो-हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो.

म्हणून मनुष्याने पापपुण्याच्या हिशेबात न गुंतता नाम घेणे जास्त हिताचे.

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– – भक्ती सूत्र क्र. ४१ आणि ४२.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पारिजातक… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ पारिजातक सुश्री नीलांबरी शिर्के 

तुला भेटायला येताना वाटेत

प्राजक्ताच झाड भेटायच

आग्रहाने मला दोनचार फुल द्यायच

तीच फुले देऊन तुला

मी मुग्ध हसायची

प्राजक्ताची निर्मलता

तुझ्या वागण्या बोलण्यात असायची

फुल देणं नकळत घडत गेल

फुल घेता ,देता माझच

प्राजक्ताच झाड झाल

मिही लागले हळूहळू

पाना फुलांनी बहरायला

माझ्याला सुगंध लागला

वार्यावरती पसरायला

 

आता पारिजातक जातायेता

माझ्याकडे पहात मिस्किल हसतो

अभावितपणे माझ्याकडेच

दोन चार फुले मागत रहातो

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काटेकरांची मुलं…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “काटेकरांची मुलं…” ☆ सुश्री शीला पतकी 

बारा वाड्यांचा 60 घरांचा एक होता गाव

घड्याळ त्याचे नाव//

 

काटेकरांचे वेडे तीन भाऊ होते गावभर फिरणारे

मोठा ताशा बळ मधला मिंटो आणि लहान होता पळ पळ

 

तोच मोठा होता चपळ पळ पळ सतत पळायचा

बारा वाडे फिरल्यावर मिंटू एक घर चालायचा

मिंटो साठीला आला की ताशा भाऊ पाचघर हलायचा

 

पण फिरून नाही हं दमायचे

रात्र असो दिवस असो असो उन्हाळा पावसाळा

बारा घरांचा त्यांना लागला होता लळा

 

यांचं म्हणजे एक असतं वेळ म्हणजे वेळ

आणि शिस्त म्हणजे शिस्त

पाळायलाच पाहिजे ना

साऱ्या जगाची असते यांच्यावरच भिस्त

 

सगळीकडे यांचेच राज्य घर ऑफिस शाळा

रेल्वे एसटी विमान सुद्धा पाळतात यांच्या वेळा

आई-बाबांना यांचाच धाक

लोकलचतर चालते यांच्यावरच चाक

 

यांचा दर्जा कायम वरचा

भिंतीवर मनगटावर मोबाईलच्याही स्क्रीनवर

 

ग्रहावरही यांचीच हुकूमत

सूर्य ही उठतो वेळेवर

दिलेल्या कक्षेत मुकाट फिरतात

ग्रह तारे बिनदिक्कत

 

जन्म लग्न मृत्यू मुहूर्त सगळीकडे यांचाच गणित

अपरंपार महिमा यांचा भक्त यांचे अगणित

 

पण ठाऊक आहे का काय यांची गंमत

यांचे बाबा मागे बसूनपाहतअसतात जम्मत

बॅटरी वाले बाबा त्यांना देतात ऊर्जा म्हणून वेळेवर हलतोय त्यांचा प्रत्येक पूर्जा

 

धावणाऱ्याच्याही मागे असतो दडलेला एक बाप

तो असला की नाही चिंता, धावायचं पण नसतो डोक्याला उगाच ताप

 

मागे म्हणे आजीनं गाठोड्यात याला बांधलं

एका कवीने शोध शोधलं पण त्यालाही नाही सापडलं

 

आता नको शोधा शोध नको त्याचा मनस्ताप

काटे कुटुंबाला बांधून घ्या आणि सरळ चला बिनधास्त//

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्राजक्ता आहेच थोडा असा… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? प्राजक्ता आहेच थोडा असा… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

प्राजक्ता आहेच थोडा असा 

 कोवळ्या पाकळ्यांनी फुलणारा 

 वाऱ्याची हळूच झुळूक येता 

 हिंदोळ्यावर झुलणारा 

 रात्रीच्या अंधारात 

 शुभ्र फुलात डवरलेला 

 फांदी फांदीवर चांदणं जणू 

 अंगोपांगी मोहरलेला 

 *

 प्रभातीच धावतो खाली 

 अंगणाच्या ओढीने 

 सुगंधी शुभ्र गालिचा 

 भूमातेला घालतो लाडीगोडीने 

 *

 केशर कांती देठाने 

 रंगांची करतो उधळण 

 सडा पाहून प्राजक्ताचा 

 बेधुंद होते माझे मन 

 *

 हळूच सांगतो कानात 

 अलगद उचल हं मला 

 पाकळी जर तुटली माझी 

 काळजात दुखेल हो तुला 

 *

 सुगंधी जखमांना 

 घेऊन वावरशील कशी 

 तुटलेल्या पाकळीला सांग ना 

 मग सावरशील कशी 

 *

 श्रीहरीच्या चरण कमलावर 

 विनम्र भावे नतमस्तक होताना 

 त्याच्या इतकच व्हावं कोमल 

 प्राजक्ताला ओंजळीत घेताना 

 *

 क्षणात विरक्त होतो तो 

 सर्वस्वाचे दान देऊन 

 निर्माल्य होताना हा प्राजक्त 

 जातो गोड आठवणी ठेवून

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ देश आमुचा… ☆ सुश्री ज्योती कुलकर्णी ☆

सौ. ज्योती कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? देश आमुचा… ? ☆ सुश्री ज्योती कुलकर्णी ☆

(वृत्त : पादाकुलक) 

जय जवान हो जय किसान हो 

शास्त्रीजींचा होता नारा

हिंद देश हा आहे न्यारा

असे तिरंगा अम्हास प्यारा

*

पोशिंदा हा धान्य पिकवितो

हलधर येथे कष्ट करीतो

रक्षण अपुले करण्यासाठी 

जवान हाती शस्त्र धरीतो

*

चला शिकू या आपण काही

घेऊ थोडी जबाबदारी

मदत करू या पकडायाला 

दिसले जर का भ्रष्टाचारी

*

घेत काळजी प्रदूषणाची 

निसर्गापुढे सदाच वाकू

शत्रू सगळे मिळुनी शोधू

परकी शक्ती उखडू फेकू

*

विकास व्हावा सर्वांगाने

देशात हवी अम्हास शांती 

मतभेदाच्या तोडत भिंती

घडवू आपण नवीन क्रांती

कवयित्री : सुश्री ज्योती कुळकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्द मनीचे… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ शब्द मनीचे ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

मन दुखावले,

शब्द मूक झाले!

ओलावले डोळे,

संवाद न बोले!

*

अंतरात भाव,

निखळ प्रेमाचा!

शब्द शब्द माझा,

असे हृदयीचा!

*

नसे वाट सोपी,

खाच खळग्यांची!

कशी पार करू,

वेस विचारांची!

*

भाव भावनेचा,

खेळ निरंतर!

चालला मनात,

जीवनी दुस्तर!

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३१६ ☆ पेढे वाटू गावा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१६ ?

☆ पेढे वाटू गावा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

अधरावरती ओठ टेकता मधुर च्युइंगम व्हावा

या ओठांनी त्याच ठिकाणी कायम आश्रय घ्यावा

त्या मुरलीची घून ऐकुनी वेडी झाली राधा

मला वाटते तिच्याचसाठी शिकून घ्यावा पावा

 *

ओठ तसा तर मिटून आहे काही बोलत नाही

तरी अंतरी श्वास कसा हा तिचाच करतो धावा

 *

प्रीत सागरी संगम व्हावा याच्यासाठी आम्ही

नदी किनारी दिल्या सोडुनी दोन कागदी नावा

 *

पलंगासही आज लगडुनी मस्त चांदणे आले

मधुचंद्राच्या रात्री आम्ही कलश दुधाचा प्यावा

 *

वर्षभरातच हलो पाळणा चैतन्याचा येथे

उदरामधुनी तुझ्याच सखये छावा जन्मा यावा

 *

तुझ्या नि माझ्या अस्तित्वाची खूण वाढते आहे

आगमनाच्या नंतर आपण वाटुन खाऊ मावा

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काव्यदर्पण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ काव्यदर्पण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

भाव अंतरीचे उमटता मनी

साद हृदयात समेटतो ध्वनी.

दिशा नजरेत स्पंदनांचे शब्द

काव्य गुंफताना भावनांचे ऋणी.

 *

बंध रेशमांचे सोयरिक नवे

भेट आयुष्याची आठवण जुनी.

 *

ऋतू बहरात पाखरांची झेप

रंग  संसारात पंखवेल वेणी.

 *

ध्येय आभाळाचे गाठताना ओळ

धुंद  लेखणीची  भिजरी पापणी.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दु:ख बोलवेना… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दु:ख बोलवेना … ? श्री आशिष  बिवलकर ☆

खंदा सहकारी | गेलाय सोडून |

आक्रित घडून | गेलं आज ||१||

*

रिकाम्या खुर्चीस | होतेय वेदना |

दुःख बोलवेना | मुकी स्तब्ध ||२||

*

नि:शब्द चेहरे  | अश्रू ओघळती |

मिश्किल सोबती | दुरावला ||३||

*

क्रूर नियतीने | केला असा घात |

मालवली वात | नेतृत्वाची ||४||

*

चटका मनास | बसलाय आज |

व्यथित समाज | घटनेने ||५||

*

महाराष्ट्र बुडे | शोक सागरात |

हुंदका कंठात | वियोगाचा ||६||

*

दादा माणसाचा | ऐसा कैसा अंत |

हळहळ खंत | ह्रदयात ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

28/01/26

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

नाही कधीच केल्या मजबूत योजना मी

करतो खुशाल आहे खोट्याच वल्गना मी

स्वातंत्र्य आज आहे झालाय कैदखाना

सोसून खूप थिजलो तेथील यातना मी

 *

जमलेत गुंड सारे कोंडून मारणारे

थकलो करून आहे त्यांचाच सामना मी

 *

वैरी बनून मजला जखडून टाखणा-या

दडपून टाकल्या त्या सा-याच वासना मी

 *

झाले गुलाम सगळे विसरून हक्क त्यांचे

त्यांच्या कडून कसली घेतोय चालना मी

 *

शोधून ही ठिकाणा ज्याचा मला मिळेना

ठेवू उगा कशाला त्याचीच कामना मी

 *

ज्याच्यात प्रेम नाही आहेच दगड धोंडा

त्याच्या पुढे कशाची करतोय अर्चना मी

 *

मी क्रोध जाळताना झालो मलूल तेव्हा

विसरून सर्व गेलो माझ्याच भावना‌ मी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares