☆ फुलपाखरे… कवी : श्रीशैल चौगुले – रसग्रहण : अविनाश शिंदे ☆ प्रस्तुती – श्रीशैल चौगुले ☆
☆
☆ फुलपाखरे ☆
☆
इवली पिवळी फुलपाखरे
पिवळ्याशा दगडफुलांवर
सुंदर बागडती ईथे-तिथे
वारा ओला झेलीत दलांवर.
*
पाती गवताची दवात मस्त
कधी वनात भ्रमण अनेक
ओहोळकाठी माळरानी कधी
मोहित मना फसवी अनेक.
*
स्पर्श होता भिरभिरती भारी
रंग हाताला लावून उडती
पुन्हा बेभान पाठलाग त्यांचा
गवसणेचा हेतु ना घडती.
*
भाव अंतरी असेच जीवनी
स्वप्नांच्या हृदयी फुलपाखरे
एकही न मनासारखे यश
रंग स्मृतींचे ते हरे-भरे.
श्रीशैल चौगुले.
श्रीशैल चौगुले यांची ‘फुलपाखरे’ ही कविता अत्यंत निसर्गरम्य, संवेदनशील आणि मानवी भावनांची सखोल उकल करणारी एक अप्रतिम रचना आहे.
कवितेच्या पहिल्याच कडव्यात पिवळ्या दगडफुलांवर बागडणारी पिवळी फुलपाखरे आणि ओला वारा झेलणारी त्यांची नाजूक पंखे यांचे अतिशय जीवंत आणि दृश्यमान चित्र उभे राहते. शब्दांमधून निसर्गाचा ताजेपणा स्पष्टपणे जाणवतो.
‘ओहोळकाठी’, ‘माळरानात’, ‘दवात मस्त गवताची पाती’ यांसारख्या शब्दांमुळे कवितेला एक निसर्गदत्त सौंदर्य प्राप्त झाले आहे. फुलपाखरांचा मागोवा घेताना मनाची होणारी मोहिनी आणि भ्रमंती कवीने खूप सुंदर टिपली आहे.
फुलपाखराला स्पर्श करताच ते हाताला रंग लावून भिरभिरत उडून जाणे आणि त्याच्या मागे बेभान होऊन धावणे… हा बालपणीचा किंवा मानवी स्वभावाचा नित्याचा अनुभव कवीने अतिशय साध्या पण प्रभावी शब्दांत मांडला आहे.
कवितेचा शेवट या रचनेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. केवळ निसर्गाचे वर्णन न राहता, कवीने फुलपाखरांची तुलना माणसाच्या ‘स्वप्नांशी’ आणि ‘इच्छांशी’ केली आहे. आयुष्यात मनासारखे यश पकडू पाहताना ते फुलपाखरासारखे निसटून जाते, पण हातात किंवा आठवणींत मात्र त्याचे ‘रंग’ कायम राहतात, हा तत्त्वज्ञानाचा धागा अतिशय अर्थपूर्ण व भावुक करणारा आहे.
थोडक्यात सांगायचे तर –
ही कविता बाह्य निसर्गाच्या सौंदर्यातून मानवी आयुष्यातील स्वप्न आणि सत्याचा सुंदर मेळ घालते. कवीची कल्पकता, लयबद्धता आणि भावोत्कटता कौतुकास्पद आहे.
रसास्वाद: अविनाश शिंदे
प्रस्तुती: श्रीशैल चौगुले
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈
☆ शतक महोत्सवी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
९ ऑगस्ट २०२६.
शतकमहोत्सवी अ.भा.मराठी साहित्य संमेलनानिमित्ताने
(हे मनोगत सर्व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी असून ते कुणाच्याही विरोधी नाही).
———
पुण्यात, शंभरावे अखिल भारतीय पातळीवरचे मराठी साहित्य संमेलन जानेवारी २०२७मध्ये संपन्न होत आहे.
२०२४ मध्ये केंद्र शासनाकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त मिळाल्यानंतर, मराठीची सध्याची स्थिती आणि उज्वल इतिहासाची चर्चा करण्यासाठीचे हे मोठे व्यासपीठ असणार आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर, या भाषेच्या विकासाची चर्चा सगळीकडं झडत असताना, इथं मी काही विचार मांडू इच्छितो.
प्राचीनता, समृध्द साहित्यिक वारसा आणि अद्वितीय सांस्कृतिक महत्व, अशा निकषांवर मराठीचे महत्व राष्ट्रीय पातळीवर या निर्णयाने मान्य केले आहे.
या चांगल्या निर्णयाने, केंद्राकडून मराठी भाषेच्या विकासासाठी भरीव आर्थिक मदत मिळणार आहे.यातून काही शैक्षणिक पदे निर्माण होतील अशी आशा वाटते.
यातून मराठी भाषेचा सखोल अभ्यास, संशोधन होऊ शकेल ह्या बाबी नक्कीच आनंददायक आहेत.
पण या सकारात्मक बाबींनी हुरळून जाण्याची गरज नाही.
मराठी भाषेचा विकास व्हावा, अशी इच्छा बाळगणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेतून काही मुद्दे स्पष्ट करतो.
व.पु.काळे एका ठिकाणी म्हणतात तसं, ‘स्काय इज द लिमिट’ असं वाक्य प्रचलित असलं तरी,प्रत्येकानं आपापलं आकाशाचा आवाका ओळखला पाहिजे, निश्चित केला पाहिजे.
सर्वसामान्य माणसाला या परिस्थितीत काय करणं शक्य होईल?
१) अगदी प्राथमिक शाळेपासून विद्यापीठापर्यंत ज्या अनेक संस्था आहेत, त्या शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची केंद्रं आहेत; जिथं सळसळत्या तरूणाईने भारलेले तरूण असतात.अशा केंद्रांतून वक्तृत्व, वादविवाद, चर्चासत्रे, निबंध अशासारख्या, तेथील तरूणांना सहभागी करून घेणारे लोकप्रिय उपक्रम/ स्पर्धांचे आयोजन करून, या तरुणाईच्या माध्यमातून मराठीवर सतत चर्चा घडवून आणता येईल.
अध्ययन आणि अध्यापन यांचे माध्यम हे मराठीतूनच करण्याचा आग्रह धरला जावा.या दृष्टीने संबंधित अभ्यासमंडळांनी अभ्यासक्रम/पूरक साहित्य हे सुलभ मराठीत तयार करण्याचा प्रयत्न करावा.
२) समाजात आर्थिक उलाढाली होणाऱ्या संस्था (उदा.बॅंका, सहकारी पतपेढ्या इ .),न्यायालये,विविध शासकीय,अशासकीय,निमशासकीय संस्था या नियमितपणे लोकांच्या जीवनाशी संबंधित असतात.
त्यांच्यातून लोकांना मदत आणि माहिती घेऊन लाभ घेण्याच्या दृष्टीने,त्यांच्यातील व्यवहार सोप्या, सुटसुटीत मराठीत होणे गरजेचे आहे.अनेक संस्थांचे तसे मराठीत व्यवहार चालतात. मात्र,’त्याची उपयुक्तता आणि लोकांना त्यात काही अडचणी वाटत नाही का? त्यात सातत्याने बदल’ करता येईल का? ‘यावर नेहमी स्थानिक लाभधारक लोकांकडून फिडबॅक घेणे आवश्यक आहे.
३) ‘बारा मैलावर भाषा बदलते ‘असं म्हणतात.
ठिकठिकाणच्या भौगोलिक,सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीतीनुसार विविध ठिकाणच्या बोलीभाषा बोलल्या जातात आणि बदलतातही.
या बोलीभाषा लोकांच्या संवादाचे जसे माध्यम असतात, तसेच ते संबंधित संस्कृतीचे प्रतिकही असतात.
भाषा ही काळानुसारही बदलते.बोलीभाषेची वैशिष्ट्ये,सामाजिक व्यवहारात त्यांचे स्थान, त्यांच्या प्रसारासाठी ज्ञात आणि अज्ञात व्यक्तिं/ संस्थांनी केलेले योगदान याचेही विविध स्तरांवर संशोधन झाले पाहिजे.
आपल्याकडे संशोधनालाही काही चौकटी असतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला त्याची भिती आणि पर्यायाने तिटकारा येतो आणि तो संशोधनापासून बाजूला रहातो.समाजातील प्रश्नांची उकल करण्याचे आणि
काही चमकदार बाबी शोधण्याचे ते उत्तम साधन असते, असा दृढ विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला तर, संशोधन ही त्याची आवड आणि छंद होईल. मराठी साहित्य विकासात त्याचा उपयोग करून घेता येईल.
आपल्याकडे छपाईचे तंत्र विकसित होत असताना, इथं पुण्यातल्या पेशव्यांची सत्ता होती. म्हणून त वापरतात ती मराठी भाषा ही ‘प्रमाण मराठी’ समजली जाऊ लागली. तरीपण इतर बोलीभाषा (उदा. मालवणी,अहिराणी इ.)
याही मराठीचे वैभव आहेत.
आज इंग्रजी ही जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा समजली जाते.मला वाटतं की, याचं एक कारण म्हणजे जगातील अनेक भागांत राज्य करताना, इंग्रजांनी ती सगळीकडे नेली .पण इंग्रजीत अनेक स्थानिक शब्दांचा आंतर्भाव आहे.आपल्याकडील ‘ट्रॅफिक जॅम’ हा शब्दही त्यापैकी एक असावा.
आजच्या सोशल मिडियाच्या काळात मराठी बोलताना, इतर भाषांची त्यात सरमिसळ झाली म्हणून ती अशुद्ध झाली किंवा तिच्यावर आक्रमण झाले असं समजणं चूक आहे.
जोवर मराठी माणूस जिवंत आहे,तोवर मराठीही
भिती नाही हेच खरं.
मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त मी एक कविता लिहिली होती.तिची आठवण येते ;
‘देशाच्या शीर्षनगरी
साहित्य संमेलन होताना,
संसदेच्या कोर्टात
न्याय मिळाल्याचा आनंद ओसंडून वहाताना,
उधळा गुलाल
होऊन बेभान,
ठेवा फक्त एक भान;
अमृताच्या पैजा जिंकणारी,
चामुंडराये करवियलेली
ही श्रीमंत भाषा
सरकारी हापिसातून झिरपू द्या,
इथल्या माणसांची तहान त्याने भागू द्या;
कोर्टातून, बॅंकांतून
आणि शाळा काॅलेजांतून ती खेळू द्या,
रडणा-यांचे डोळे
पुसणारे
ते हसरे फूल होऊ द्या!’
मराठी वापरा,मराठी वाढवा आणि मराठी वाचवा…
या निमित्ताने अजून दोन बाबींचा उल्लेख करणं मला आवडेल.
१) महाराष्ट्रातील लोकजीवनाच्या विद्यापीठाचे अनभिषिक्त निरक्षर कुलगुरू असा ज्याचा गौरव केला जातो,त्या पूज्य गाडगेबाबांच्या कीर्तनाचे वर्णन करताना एका अभ्यासक सांगत होते की,एखाद्या गावातील बाबांचे कीर्तन हा एक अवर्णनीय सोहळा असे.कुठेतरी पटांगणावर कंदिलाच्या किंवा पेट्रोमॅक्सच्या उजेडात बाबांच्या कीर्तनाला त्या गावच्या आजूबाजूलाच्या परिसरातील हजारो माणसं उपस्थित असत.अगदी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या कीर्तनात, तेव्हा खेड्यात लाईट असणं अशक्य.आणि म्हणून माईकही बहुतेक वेळा नसायचा. पण कीर्तनात मधूनमधून बाबा दोन्ही हात वर करून ‘गोपाला,गोपाला देवनकीनंदन गोपाला’ असं पालुपद म्हणत; तेव्हा तिथं हजर असलेली ती सर्व माणसंही मोठ्यांदा ते म्हणत. कीर्तनाच्या शेवटी बसलेल्या माणसांना विचारलं की,’इतक्या दुरून तुम्हाला बाबांचं कीर्तन ऐकायला येत नसेल तरी तुम्ही का येता?’
यावर त्यांचं उत्तर विलक्षण होतं.उत्तर होतं,”आम्ही गाडगेबाबांचं कीर्तन पहायला येतो”. कीर्तन ऐकता येतं हे आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत. पण कीर्तन पहाणं जो केवळ वाक्प्रचार नव्हता; तर ते आपलेपणाचं नातं सांगणारा जिव्हाळा होता.मराठी भाषेला नवीन वाक्प्रचार होता.
माझ्या माहितील एक कुटुंब सुट्टीत सिंहगडावर गेलं होतं.
सिंहगड;तिथं डोंगर, झाडी होतीच.
पायवाटही काहीशी ओबडधोबड होती.
गडावरून पायी उतरताना त्या कुटुंबातील छोटी मुलगी अचानक ओरडली,” आई,किंचोळा”.तिनं एक कीटक पाहिला होता.मात्र पाहिलेला किटक तिच्या शब्दांत किंचोळा होता.
माझ्यामते तरी तो नवीन शब्द असेल. अशी अनेक उदाहरणं आहेत की,जेथे सर्वसामान्य माणूस व्यवहारात नकळत नवनवीन शब्द/वाक्ये किंवा वाक्प्रचार निर्माण करतो.मला वाटतं यातून भाषा समृद्ध होत जाते.
अनेक शिक्षणसंस्थांतून, मराठी भाषेवर संशोधन सुरू आहे.त्यांनी अशा नवीन शब्दांना संकलित केलं तर हा चांगला उपक्रम असेल,
२) आणखी एक विचार.अर्थात अनेकजण ते बोलतातही. त्याचा पुनरूच्चार करतो इतकंच.
मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्यांनी नियमित नव्हे तर जमेल तसं काही कुटुंबांशी बोलावं आणि एकतरी मराठी पुस्तक विकत घेऊन ते वाचावं असा सल्ला द्यावा. त्यांनी
जमल्यास, त्यावर इतरांशी बोलावं.अगदी कुणाला शक्य नसेल तर, आपण जिथं काम करतो तिथं तरी फावल्या वेळात मराठी पुस्तकांवर चर्चा करता येईल.किंवा सोशल मिडीयावरूनही यावर इतर उहापोह करता येईल.मराठी न बोलल्या जाणाऱ्या कुटूंबात याची गरज काय? असा मुद्दा उपस्थित होईलही.अशा ठिकाणी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून, जगण्याच्या व्यवहारात मराठी वापरणं ही गरज आहे,हे त्यांना पटवून देऊन, त्यांच्या आवडीच्या विषयांतील लहान लहान पुस्तकं सुचवता येतील. अर्थात अशी सूचना करताना,कोणतीही राजकीय किंवा सांप्रदायिक विचारसरणीचा प्रचार करू नये हे पथ्य कसोशीने पाळावे.
काही मराठी भाषेतील समूहांवर याविषयी उत्तम उपक्रम सतत सूरू असतात.हे नक्कीच आनंददायक आणि अनुकरणीय आहेत. त्याच्या पटी वाढवल्या जाव्यात.
“काका मला तुमच्याशी थोडं बोलायचयं संध्याकाळी भेटाल का? ” ईशानचा फोन आला आणि मी मनांत म्हणालो, ही वेळ कधीतरी येणारच होती.
ठरल्याप्रमाणे आम्ही भेटल्यावर ईशान म्हणाला “काका शॉक न्यूज आहे. बाबा दुसरं लग्न करायचं म्हणताहेत. अहो काका! त्यांचं वय काय आणि काही वर्षांपूर्वीच आई गेली ते दुःख तिच्यावरच प्रेम, तिच्या आठवणी कुठे गेलं हे सगळं? काका लोकं काय म्हणतील! माझं लग्न ठरलंयहो! पण डिम्पल लग्नाची आहे तिच्या लग्नाचं बघायचं सोडून हेच बोहल्यावर चढायचं म्हणताहेत, हे काही बरोबर नाही! काय म्हणावं बाबांना, त्यातून आई बाबांचं लव्ह मॅरेज झालं होतं तुम्ही तिघं एका कॉलेजातले, आईबाबांची आणि तुमची आधीपासूनची मैत्री होती आई बाबांच्या प्रेमाला तुम्ही साक्षीदार आहात. मग मला सांगा आता कुठं गेलं बाबांचं आईवरचे प्रेम?
ईशानच्या लाह्या तडातड् फुटत होत्या. माझ्या मित्राचं सुधाकरच म्हणजे त्याच्या बाबांचं वागणं त्याला अजिबात पसंत नव्हतं. ईशानला शांत करणं अवघड होतं कारण प्रकरण बरच तापलं होतं. आता तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायची असं मी ठरवलं.
कारण सुध्याला कसंबसं लग्नासाठी तयार करून मीचं त्याला घोड्यावर बसवलं होतं आणि मुलांना समजावण्याची तयार करण्याची जबाबदारी त्याने माझ्यावर टाकली होती. ईशान चिडून मानमर्यादा सोडून पुन्हा पुन्हा म्हणत होता “कसलं खुळ आहे हे? म्हातारचळ लागलय का बाबांना?
आता मात्र मीही चिडलो “ईशान सांभाळून बोल ते बाबा आहेत तुझे. तुम्ही मुलं स्वतःचा विचार करता, लोकांचा विचार करता पण सुधाकरच्या मनाचा विचार कधी तुम्ही केला आहे का? तुमच्या व्यापात, मित्र मैत्रिणीत, पार्ट्यात तू आणि डिंपल मजेत असता तुझी बहीण तर सदा घराबाहेरच असते वहिनी गेल्यापासून तुमचं घर म्हणजे धर्मशाळाच झालीय. बाहेरचं पिझ्झा बर्गर खाऊन पोट भरलेलं असतं तुमचं, पण खाण्याचे हाल होतात ते तुमच्या बाबांचे. दिवसभर एवढ्या मोठ्या घरात तो एकटा असतो वहिनीच्या आठवणीत डोळे गाळण्यात दिवस जातो त्याचा.
तुझी आई अंथरुणावर होती तेव्हा तर खूप सेवा केली त्यानी बायकोची. आणि आता त्यांच्या आजारपणात पथ्य पाणी सांभाळणार, काळजी घेणार त्याच्या सुखदुःखात साथ देणारं जवळचं माणूस हवंच. निराशेच्या डोहातून आम्ही मित्रांनी बाहेर काढलंय त्याला, तेव्हा आली होती का बाहेरची लोकं? आणि तु म्हणतोस, लोकं काय म्हणतील. ” मी संतापून त्याला जाब विचारत होतो.
ईशानचा पारा खाली उतरत होता. तो म्हणाला, “तरी पण.. तरीपण काका. “. ईशान तुझा हा पण मागे घे. नीट ऐक उद्या तुझं लग्न झालं की तु परदेशात स्थायिक होण्याचं ठरवलं आहेस. जाशील तिकडचाच होशील, आता प्रश्न आला डिंपलचा ती लग्नाची आहे पण लग्नाला तयारच नाहीये. स्वातंत्र्याचा वारं तिच्या डोक्यात शिरलयं कारण तिच्या अपेक्षांचा डोंगर वाढतच चाललाय. अटीतटीचा मामला मिटतच नाहीय्ये.
सुधाकरने आणलेल्या स्थळांना धडाधड नकार देण्यात लग्नाचं वय सरतय आणि आता तर ती म्हणतेय मला लग्नच करायचं नाही. माझ्या म्हणण्याला पुष्टी जोडत ईशान म्हणाला. डिंपलचं मलाही काही कळत नाहीये. तिच्या काळजीने आई लवकर गेली.
त्याच्या बोलण्याचा धागा पकडून मी म्हणालो, “ईशान बेटा, पोरीच्या लग्नाची काळजी करून, परिस्थिती पुढे हात टेकले होते रे तुझ्या आईने, शेवटी ती माऊली वेगळ्याच विचारात गढली, रात्रंदिवस तिला फक्त सुधाकरची काळजी वाटायला लागली होती. आजारपणामुळे, भीषण भविष्यकाळ डोळ्यापुढे नाचत होता. तुझ्या बाबांची, सतत कसं होणार ही काळजी वाटत होती रे तिला.
आमच्या तिघांची मैत्री होती ना आधीपासून, त्या विश्वासाने एकदा वहिनी मोकळेपणी माझ्याजवळ म्हणाली, माझी शेवटची इच्छा आहे दीना, मी गेल्यावर ह्यांना एकटं राहू द्यायचं नाही त्यांचं दुसरं लग्न लावून देण्याचे वचन तुझ्याकडून मला हवं आहे
आणि ईशान त्या माऊलीच्या वचनात मी वचनबद्ध झालो.
बाळा आजच्या जगात खूप स्पर्धा आहे जो तो पुढे पुढे धावतोय. त्यात जवळची माणसं, आईवडिलांकडे बघायला, त्यांच्याजवळ बसायला, मनातलं जाणून घ्यायला कुणालाच वेळ नाहीये. वडीलधाऱ्यांच्या हळव्या मनाची, त्यांच्या मनातल्या काळजीची, एकटेपणाची खिल्ली उडवली जाते. तु समंजस आहेस. शांतपणे विचार कर. बाबांच्या बाजूने विचार केलास त्यांच्या मनाच्या हळव्या कोपऱ्यात डोकावून बघितलंस तर तुला कळेल, अजूनही ते तुझ्या आईच्या आठवणीत अडकले आहेत. पण आता काही इलाजचं नाहीय्ये अनंताच्या प्रवासाला गेलेली तुझी आई, परत न येणाऱ्या वाटेवरून पैलतीरी पोहोचलीय. पण सुधाकरचं काय! उभं आयुष्य पडलं आहे. तु यूएसला जाणार. डिम्पल लांब रहाणार कारण तिने सांगूनच टाकलयं ‘मी स्वतंत्र रहाणार आहे. कुणाच्यात मला अडकून पडायचं नाही. मग तुझ्या बाबांच्याकडे बघायला, सुखदुःखात, आजारपणात सोबत ही हवीचं नाही का!
ईशान तसा संस्कारी, भावनाप्रधान होता माणसाच्या मनाचं प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर उमटतं. नकळत त्यांचे डोळे पाणावले होते तो म्हणाला, ” काका इतका विचार आम्ही मुलांनी कधी केलाच नव्हता. आईबाबांशी कधी प्रेमाने बोललो नाही, त्यांच्याजवळ बसून त्यांच्या भावना प्रेम आम्ही कधी समजूनच घेतलं नाही. सतत बाहेरच वारं, मित्रमैत्रिणी पार्ट्या आणि पैशाच्या मागे धावताना फक्त स्वतःचाच विचार करून स्वार्थ साधलाय आम्ही. मला खूप पश्चाताप झाला आहे काका, तुम्ही झणझणीत अंजन घातलंतं माझ्या डोळ्यात.
आई तर आता नाही ह्या जगात पण हे लक्षात आलंय माझ्या, झालेली चूक मी सुधारणार आहे. बाबांना सुखी झालेलं बघायचे मला. तरुणपणी, माध्यान्हकाळी लागत नाही इतकी साथीदाराची सोबत आयुष्याच्या संध्याकाळी आवश्यक असते.
स्वार्थाच्या डोंगरावर चढताना पायथ्याशी असलेल्या आई-बाबांना आम्ही मुले विसरतो हे चुकलचं आमचं “
ईशान मनापासून, भरभरून बोलत होता. तो आता इतका उतावळा झाला होता की असं वाटलं हा पठ्ठया आत्ताच बाबांना बोहोल्यावर चढवतोय की काय असं मनांत आलं आणि हंसू फुटलं.
त्याच्यातला बदल मला जाणवला. माझं काम फत्ते झालं होतं. गड इतक्या लवकर ‘सर’ होईल असं वाटलं नव्हतं. तो पुढे म्हणाला, “काका केवढं मोठ्ठ काम केलंत. आमचे पाय तुम्ही जमिनीवर आणलेत. तुमचे विचार पटले मला. जग पुढे गेलयं. डिम्पलला पण हे पटेल. ती सोशल सुधारक विचारांची आहे.
आता एकच विनंती आमच्यासाठी नवी आई आणण्याचं काम तुमचं. मी यूएसए ला जाण्यापूर्वी लग्नाच्या तयारीला लागतो. माझ्या चेहऱ्यावर खट्याळ हंसू उमटलं पण त्या मिस्कील हास्या मागे दडलेलं गुपित मी त्याच्यापासून क्षणभर लपवलं. कारण सुधाकरसाठी आम्ही मित्रांनी आधीच एक जोडीदारीण शोधून ठेवली होती.
बाबांना भेटण्यासाठी, त्यांना मिठी मारण्यासाठी उतावळा झालेला लेक वळून म्हणाला. “काका पण माझी एक अट आहे माझं लग्न आधी होणार’ ते ऐकून मी चमकलो. मनात म्हणालो, आला का ह्याचा स्वार्थीपणा उफाळून ‘
माझ्या चेहऱ्यावरचा भाव ओळखून तो हसत म्हणाला, “आधी लग्न माझं मग बाबांचं अशी घोषणा मी का करतोय ते समजून घ्या काकामहाराज बाबांच्या लग्नात देवदेवक मी माझी बायको स्नेहा बसवणार. आणि नवीन पद्धत सुरू करणार. लग्न शास्त्र शुद्ध वैदिक पद्धतीने करूयात आपण. नव्या आईच्या बाबांच्या चेहऱ्यावर आनंद आणायचाय मला. आणि आमच्या नव्या पिढीला दाखवून द्यायचय, आपण आई-वडिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी त्यांचं मन जाणायला हवं त्यासाठी नवीन पायंडा पाडावा लागला तरी चालेल.
ईशानचा उत्साह बघून मलाही आनंदाच्या उकळ्या फुटल्या त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला जवळ घेऊन म्हणालो, ” बेटा ये हुई ना बात ‘पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा”
आता हा झेंडा घेऊन मला सुध्याला गाठायला हवं. तो अस्वस्थ होऊन येरझारा घालत असेल.
अरे पण! ईशान– तो तर केव्हाच पुढे पळाला होता. लग्नाची तयारी करण्यासाठी उतावळा झाला होता.
मंडळी विषय वेगळा आहे पण आशय मोठा आहे. जग सुधारलय, अशा गोष्टी घडल्यात, घडतील आणि सगळ्यांच्या सुखसोयीसाठी त्या घडाव्यात. असं झालं तर
आदरणीय डॉ. A. P. J. अब्दुल कलाम सर, माझे रोल मॉडेल, आदर्श व्यक्तिमत्व, माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, सच्च्या दिलाचे माणूस…!
त्यांच्यावर प्रेम करत नाही, असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही…!
त्यांना एकदा तरी भेटून त्यांच्या पायावर नतमस्तक व्हावे…
आयुष्यातल्या काही इच्छांपैकी ही एक इच्छा…!
… पण आभाळाएवढा माणूस, त्यांच्या पायापर्यंत सुद्धा पोहोचण्यासाठी माझे हात तोकडे पडले.
आदरणीय रतनजी टाटा सर यांच्याबाबतीतही असेच घडले. त्यांच्या नावे पुरस्कार मिळाला, परंतु त्यांची कधीही भेट होऊ शकली नाही.
आयुष्यातल्या या काही जखमा.. कधीही भरून न येणाऱ्या…!
यांची वैयक्तिक भेट आता आयुष्यात कधीही शक्य नाही, परंतु त्यांचे विचार आणि पुस्तकं यांनाच गुरु मानून मी तिथे नतमस्तक होतो
… पण अशी माणसं कुठेही जात नाहीत, शतकांनुशतके ती अमर असतात…!!!
असो…
“लेवा भ्रातृ मंडळ, पुणे” या संस्थेकडून एके दिवशी मला फोन आला, ‘मी पुरुषोत्तम पिंपळे बोलतो, आमच्याकडे एक कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आपले बुके आम्ही विकत घेऊ इच्छितो. ‘
भीक मागणाऱ्या लोकांनी भीक मागणे सोडून काम करावे, सन्मानाने जगावे, यासाठी आम्ही एक रोजगार केंद्र सुरू केले आहे. तिथे आम्ही विविध वस्तू बनवतो आणि त्याच्या विक्रीतून तेथील सर्व खर्च भागवतो. मोत्यांचे बुके हे त्यातलेच एक प्रॉडक्ट…
आनंदाने मी बुके पाठवून दिले.
पुन्हा एके दिवशी त्यांचा फोन आला, ‘ पिंपळे सर म्हणाले, ‘आमच्या कार्यक्रमात आम्ही तुमचा विशेष सन्मान करू इच्छितो, अमुक दिवशी अमुक वेळेला यावे. ‘
त्यांनी बोलावलेल्या दिवशी न टाळता येण्यासारखी बरीच कामं होती, मी त्यांना नम्रपणे माझी अडचण सांगितली, आणि पुढील वेळेला बघूया कधीतरी, पुढील वेळी नक्की येतो असं म्हणालो.
यावर ते म्हणाले, ‘ अहो डॉक्टर, कार्यक्रमाला डॉ. A. P. J. M. J. सलीम शेख सर येत आहेत, त्यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार देत आहोत. ‘
दोन सेकंदासाठी मनातल्या मनात प्रचंड लाटा उसळल्या.
डॉ. सलीम शेख सर म्हणजे आदरणीय कलाम सरांचे नातू (भावाच्या मुलाचे चिरंजीव), Dr. APJ Abdul Kalam International Foundation चे संस्थापक, रामेश्वरम येथील Dr. A. P. J. Abdul Kalam Mission of Life Gallery चे डायरेक्टर… आणखीही बरंच काही…!
… *आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय कलाम सरांच्या पवित्र, निर्मळ आणि शुद्ध सहवासाने पुनित झालेलं एक व्यक्तिमत्व…!!! *
.. अत्तराच्या दुकानात बसलेला माणूसही सुगंधी होऊन जातो…!
डॉ सलीम शेख सर यांना भेटून, आयुष्यात हरवलेला आदरणीय कलाम सरांचा सुवास आणि सहवास अशा रूपाने का होईना, पण मिळेल… सरांची भेट, मनाच्या गाभाऱ्यात झालेल्या जखमेवर हळुवार फुंकर तरी मारून जाईल…
या विचाराने सर्वच्या सर्व कामं बाजूला ठेवून गेलो.
मुख्य कार्यक्रमाआधी डॉ. सलीम सरांशी भेट झाली, काम समजल्यानंतर ते सद्गदित झाले, दूर उभ्या असलेल्या मला त्यांनी जवळ बोलावलं, छातीशी लावलं, पाठीवर हात ठेवून शाबासकी दिली, खांद्यावर हात ठेवून तुझ्यासोबत आहे म्हणाले…!
हेच ते हात असतील ना? जे कधीतरी इवले होते, आणि या हातांना आदरणीय कलाम सरांचा सुद्धा स्पर्श झाला असेल…?
.. या विचाराने मी रोमांचित झालो, मला काय वाटलं असेल, हे मी शब्दात सांगूच शकत नाही…
भेटीचा हा सुगंध मी श्वासात भरून घेतला, डोळ्यात साठवून घेतला…
मुख्य कार्यक्रम सुरू झाला, सरांच्या हस्ते माझा विशेष सन्मान झाला. सरांचे स्वागत करताना आयोजकांनी आमचा बुके सरांना भेट म्हणून दिला.
डॉ. A. P. J. M. J. सलीम शेख सर यांच्या हाती तो बुके पाहून मी पुन्हा रोमांचित झालो, हृदयातली धडधड वाढली…
आमच्या थरथरत्या वृद्ध अपंग हातांनी हे बुके बनवले होते, तेच बुके आज सरांच्या हाती होते, याच हातांना आदरणीय कलाम सरांचा स्पर्श झाला होता… आता श्वासाचा वेग वाढला…
भर सभेत, व्यासपीठावर, मी पुढे होऊन हा क्षण सरांच्या जवळ जाऊन कॅमेऱ्यात टिपला…
– – खरंतर मी प्रोटोकॉल मोडला होता, पण हे समजायला मी भानावर होतोच कुठं…???
डॉ सलीम सर गालातल्या गालात मंद हसले…
त्यांना माहीत होतं, निस्सीम भक्ती करणाऱ्या भक्ताच्या हातून अनावधानाने काही चूक घडली तर ती चूक नसते…!
आदरणीय कलाम सरांचा मी भक्त होतो हे त्यांना माहीत होते.
शक्यतो मोठी माणसं कार्यक्रमात मिळालेले बुके, शाल किंवा नारळ अशा गोष्टी घेऊन जात नाहीत, असा अनुभव आहे.
.. कार्यक्रम संपल्यानंतर मी सरांना हात जोडून म्हणालो, सर प्लीज हा बुके आपण घेऊन गेलात, तर आम्ही सर्वजण आपल्या ऋणात राहू…
मंद हसत ते म्हणाले, ‘ Offcourse, इतका सुंदर बुके मी इथे कसा ठेवेन? मी माझ्या ड्रायव्हर कडे आधीच तो दिला आहे, आणि त्यांनी तो व्यवस्थित गाडीत ठेवला आहे. मी तो घरी घेऊन जाणार आहे आणि चांगल्या ठिकाणी, इतरांना दिसेल अशा जागी ठेवणार आहे. ‘ ते सहज बोलून गेले.
… पण माझ्या डोळ्यात पाणी आलं…
माजी राष्ट्रपती, माझे दैवत, आदरणीय कलाम सर, यांच्या मूळ गावी, मूळ घरात, ज्या घराला आदरणीय कलाम सरांचा सहवास लाभला आहे, घर नव्हे जे एक मंदिर आहे, तिथे हा बुके सन्मानाने जाईल…
मी शहारलो…
भीक मागणे सोडून काम करू लागलेल्या आमच्या लोकांचा हा खऱ्या अर्थाने झालेला सन्मान होता…!
सर पुढील कार्यक्रमासाठी निघाले, भरलेल्या डोळ्यांनी सरांना निरोप दिला.
मला डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नव्हतं… वाटलं, ज्या डोळ्यांनी हे सर्व पाहिलं, त्या डोळ्यातल्या आठवणी हे अश्रू पुसून टाकतील…
पण नाही… दगडात कोरलेले शिलालेख सहजासहजी पुसले जात नाहीत.
सरांची भेट आणि अप्रत्यक्षरीत्या झालेला आदरणीय कलाम सरांचा स्पर्श आणि सहवास हा मनावर कोरलेला एक शिलालेख आहे, तो कधीही पुसला जाणार नाही.
… हा शिलालेख मी आयुष्यभर मिरवत राहीन…!!!
श्री पुरुषोत्तम पिंपळे सर आणि समस्त लेवा भ्रातृ मंडळ यांचा मी मनापासून ऋणी आहे…!!!
प्रत्येक परिवारात/ मोहल्ल्यात एक BBC /AIR news reader व्यक्ती असतेच. परिवारातील/ मोहल्ल्यातील सर्वांची सर्व माहिती घेणे. मग ती सर्वांना सांगणे.
एखादी बातमी चांगली / वाईट कोणाच्या कानावर पडली तर लगेचच…
त्यांना विचारूया.. म्हणजे BBC ला
खर काय ते कळेल… अस सहज लोकांच्या तोंडून निघत.
ALL INDIA RADIO वर बातम्या ऐकल्या की देश- विदेश खेलकूद, क्राइम, सोने-चांदीचे भाव, भाजी भावातील चढ-उतार सर्व कळत. BREAKING NEWS च्या नावाखाली अनेक बातम्या कानावर पडतात. कोण कोणाबरोबर पळून गेली, बाॅलीवूड, टाॅलीवूड च्या सर्व बातम्या किती खर्या किती खोट्या हे ऐकणार्याला आपल्या बुद्धीचा वापर करून ठरवायच असत. त्याकडे दुर्लक्ष करायच की लक्षात ठेवायच. हे ही ठरवायच असत.
जर चार बहीण भावांचा एक परिवार असेल तर त्यांच्या घरच्या, याच्या माहेरच्या, तिच्या सासरच्या, त्यांच्या मुलांच्या, जावयांच्या, चूलत, मावस भावडांचे परिवारही असतातच की. इकडच्या तिकडच्या अनेक बातम्या असतातच की.
मग ही BBC news reader आपल्या स्वभावानुसार, आपल्या आवडत्या नावडत्या लोकांना त्या बातम्या आधी एकत्र करणार, मग सांगणार. आवडत्या आणि नावडत्या लोकांना बातम्या सांगायची पद्धत, बातम्यांचा क्रम ब्रेकिंग न्युज वेगवेगळी असते. कोणाला काय सांगायच? काय नाही? याचा विचार करण्या एवढे हे हुशार असतात. कोणाचे कान भरायचे. याचा अभ्यास छान केलेला असतो. कोण कच्च्या कानाचे आहेत? हे सर्व लक्षात ठेवाव लागत.
मला असं कळलं… खर की खोटमाहित नाही… अस म्हणून एखादी फुलझडी सोडण सहज जमत त्याना.
मी फक्ततुम्हाला सांगतेय हं! कोणाला सांगू नका. हे वाक्यतर हमखाससर्वांनाच कधी न कधी म्हंटलेलच असत.
अशा लोकांचा मुख्य टाईम पास हाच असतो. आता फोन असल्यामुळे हे काम सोप्प झालय. आणि वेळ छान जातो.. इकडची बातमी तिकडे, तिकडची इकडे. यासाठी खूप मोठी डिग्री, ज्ञान लागत नाही. फक्त वेळ द्यावा लागतो.
एखाद्या/ एखादीला फोन करायच्या आधी त्यांच होमवर्क झालेले असत. कारण सांगितलेल्या गोष्टीचा प्रभाव पडायला पाहिजे ना. तरच तर उद्देश्य सफल होतो. त्या बातमीत किती मसाला टाकायचा, त्याला किती चरफरीत करायचे की गोड पदार्थ करायच हे फोन रिसीव करणार्या व्यक्ती बरोबर त्यांचे संबंध कसे आहेत? यावर अवलंबून असत.
कोणाच लग्न मोडल. कोणाच सूनेबरोबर पटत नाही, कोणाला दारूच व्यसन आहे.
आता व्यसनची डिग्री कमी जास्त करणे हे त्यांच्या सांगण्यावर, आवाजावर अवलंबून असत. Voice modulation जमते त्यांना. कधी कधी एखादी बातमी सांगताना असूरी आनंद ही त्यांच्या आवाजात जाणवतो. म्हणजे तसे ते हुशार असतात.
ही एक कला आहे सर्वांना जमतच अस नाही. त्यासाठी तो Interest, practice, रोज चार तास फोन करायची हौस असावी लागते. ऐर्यागैर्याचे काम नाही ते.
आपल्या घरापेक्षा दुसर्यांच्या घरात जास्त interest असावा लागतो.
मधून मधून स्वतः ची श्रीमंती, स्वतः ची हुशारी बोलायला विसरत नाहीत.. खूप बोलताना आपल्या घरच्या काही गोष्टी पण सांगून टाकतात. आणि स्वःतच मनोरंजनाचे पात्र बनतात.
काय आहे… रोज डेटा फ्री मिळतोच. मग स्वस्तातला हा छंद छान आहे.
उरलेला वेळ You tube च्या बातम्या, whats app वर आलेले मेसेजेस असतातच, ते forward करायचे. हा पण एक added छंद असतो.
हुशार माणसाला अशा लोकांशी सावधान रहाव लागत.
मला कधी कधी अशा लोकांच खूप कौतुक वाटत. किती वेळ, किती energy, खर्च करतात. त्यांचा फोन आला की लगेच लक्षात येत आज काही तरी विशेष ऐकायला मिळणार. त्यांच्याकडे वेळ भरपूर असतो. आपल्याकडे किती वेळ आहे हे बघून फोन घ्यायचा की नाही हे ठरवायच असत.
AIR / BBC च्या बातम्या ऐकून आपण नेहमी बोअरच होतो अस नाही, कधी कभी मजाही येते नाही का?
खरतर ही अशी माणस आपल्या आयुष्यात रंग भरतात.. म्हणजे प्रयत्न करतात. मनोरंजन करतात.
शोधून बघा तुमच्या परिवारात / मोहल्ल्यातही अशी एखादी व्यक्ती आहे का?? …
थोडा डेटा… खूप मजा… छंद किती स्वस्तआहे. कष्ट नको… ज्ञान नको… पलंगावर पडल्या पडल्या वेळ कसा मस्त जातो…
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९७ आणि ९८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ९७ – – –
मुखी नाम नाही तया मुक्ती कैंची ।
अहंतागुणे यातना ते फुकाची ।
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा ।।९७।।
अर्थ :ज्याच्या मुखी भगवंताचे नाम येत नाही त्याला मुक्ती कशी मिळणार? कर्तेपणाच्या अहंकारातून माणसाला विनाकारण यातना भोगाव्या लागतात. शेवटी मृत्यू येतो तो सुद्धा अत्यंत करुणाजनक. म्हणून सर्वानी भगवंताचे नाम घ्यायलाच हवे.
विवेचन : आयुष्यभर भगवंताचे नाम घ्यायचे नाही, भक्ती करायची नाही आणि अंतकाळी भगवंताने आपल्याला मुक्ती द्यावी अशी अपेक्षा करायची. पण काही केलेच नाही तर मुक्ती मिळेल कशी? मुक्तीची अशी अपेक्षा करणे म्हणजे शेतात धान्य पेरण्याचे श्रम करायचे नाहीत आणि आयते धान्य किंवा पीक आपल्या घरात येईल अशी अपेक्षा करण्यासारखेच आहे. आपल्याला आपल्या कर्तेपणाचा भयंकर अभिमान असतो. मी हे केले, मी ते केले. माझ्यामुळेच सगळे होते आहे असा अभिमान मनुष्य बाळगतो. पण शेवटी एक दिवस हा कर्तेपणाचा फुगा फुटतो. वृद्धापकाळी मुले, सुना विचारत नाहीत तेव्हा मनात निराशा घर करते. मी आयुष्यभर एवढे कष्ट केले, मुलांना शिकवून मोठे केले, त्यांचे लग्न केले. पण एवढे असूनही ते माझ्याकडे लक्ष देत नाहीत. आपण दुर्लक्षित आहोत ही भावना सर्वात जास्त अस्वस्थ करणारी असते.
गोंदवलेकर महाराज म्हणतात, ” देहाने कर्म करा, पण कर्तेपण स्वतःकडे घेऊ नका. कर्ता राम आहे असे म्हणा. ” आपले चुकते ते इथेच. आपण कर्तेपण रामाकडे देत नाही. म्हणून आपल्याला अपेक्षाभंगाचे दुःख भोगावे लागते. त्याशिवाय कर्तेपणाच्या धुंदीत भगवंताचे नाम घेतो कोण? निदान निवृत्त झाल्यावर तरी भगवन्नामात रमण्याची सवय लावून घ्यावी. ही सवय लागली तर संसाराचा मोह हळूहळू कमी होतो, आसक्ती कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत मृत्यू आला तरी तो सुखाचा होतो. पण ही सवय नसेल तर मृत्यूप्रसंगी देखील संसारातील आसक्ती कमी होत नाही. जो मनुष्य नाम घेत नाही त्याचा अंत दीनवाणा होतो. म्हणून समर्थ म्हणतात प्रत्येकाने देवाचे नाव घ्यावेच घ्यावे. समर्थ आपल्या एका अभंगात म्हणतात, ” काळ जातो क्षणक्षणा । मूळ येईल मरणा । काही धावाधाव करी । जंव तो काळ आहे दूरी ।।”
स्वसंवाद ::
१. माझ्या कुटुंबासाठी किंवा व्यवसायासाठी केलेल्या कष्टांमध्ये मी ‘मी केले’ हा कर्तेपणाचा अहंकार बाळगून विनाकारण मानसिक यातना तर ओढवून घेत नाहीये ना?
२. गोंदवलेकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, मी माझे कर्तव्य चोख पार पाडताना “या सगळ्याचा कर्ता-धर्ता तो प्रभू श्रीराम आहे” हा भाव मनात ठेवू शकतो का?
३. “मी मुलांसाठी एवढे केले तरी ते मला विचारत नाहीत” या विवंचनेत जगण्याऐवजी, मी आतापासूनच भगवंताच्या नामात रमून संसाराची आसक्ती कमी करण्याचा प्रयत्न करतोय का?
४. समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे जर काळ क्षणोक्षणी पुढे जात आहे आणि मृत्यू अटळ आहे, तर मग माझ्या उद्धारासाठी ‘देवराणा’ श्रीरामाचे नाव घेण्यास मी अजून उशीर का करत आहे?
=====
श्लोक क्र. ९८ – – –
हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।
बहु तारिले मानवदेहधारी ।
तया रामनामीं सदा जो विकल्पी ।
वदेना कदा जीव तो पापरूपी ।।९८।।
अर्थ :भगवंताच्या नामाने खरोखर पाषाणही तरले आहेत. रामनामाने अनेक माणसे तरून गेली आहेत. पण काही माणसांच्या मनात रामनामाबद्दल नेहमी विकल्प म्हणजे संशय असतो. असे जीव म्हणजे खरोखर पापी समजावे की ज्यांच्या मुखात रामनाम येत नाही.
विवेचन :रामनामाचे महत्व वर्णन करताना समर्थ म्हणतात की रामनामाने खरोखरीच पाषाण देखील तरले. पाषाण म्हणजे दगड. बुडणे हाच त्याचा धर्म आहे. जो त्याचा संग करील त्याला देखील तो घेऊन बुडतो. परंतु रामनामाची महती एवढी आहे की पाषाणाच्या या मूळ स्वभावात देखील अंतर्बाह्य बदल झाला. पाण्यात बुडणारा पाषाण चक्क रामनामामुळे पाण्यावर तरंगू लागला. या ठिकाणी रामायणातील सेतुबंधनाचा संदर्भ आहे. श्रीरामांना लंकेला जाण्यासाठी समुद्र उल्लंघून जायचे होते. पण जायचे कसे हा मोठा प्रश्न होता. अशा वेळी वानर सेनेतील नल, नील, जांबुवंत आणि हनुमान यांच्या साहाय्याने हा सेतू बांधण्यात आला. अर्थात यात प्रत्येकाचीच मदत झाली. अगदी खारीची देखील! रामनाम लिहिलेले दगड सागरावर तरंगू लागले आणि पाहता पाहता चक्क समुद्रावर पूल तयार झाला. हा पूल पार करून रामाची सेना लंकेला पोचली.
दगड हे रूपक आहे. या संसारसागरात ज्याने रामनामाचा आश्रय घेतला नाही असा मनुष्य देखील पाषाणासमानच आहे. पण जर तो रामनामाचा आश्रय घेईल तर या भवसागरातून तो निश्चितपणे तरून जाईल यात शंका नाही. रामनामाने तयार झालेला हा पूल माणसाला भवसागर पार करण्यासाठी मदत करेल आणि त्याच्या मदतीने तो निश्चितपणे परमेश्वरापर्यंत पोहोचेल यात शंका नाही. ‘ नाम आहे आदी अंती, नाम सर्व सार, आहे बुडत्याला नौका ठेवली आधार ‘ हे अगदी खरे आहे. म्हणून आपले सर्व कर्म नाममय झाले पाहिजे.
परंतु एवढे उदाहरण डोळ्यासमोर असूनही माणसाच्या मनात रामनामाबद्दल शंका असतात. खरेच रामनामात एवढे सामर्थ्य आहे का? नुसते रामनाम मला तारील का? असा माणूस नाम घेण्याचे टाळतो. रामनामाचे विस्मरण होणे हे पाप आहे. पण माणसाची देहबुद्धी अत्यंत प्रबळ असते. बाह्य दृश्यात त्याचे मन रमलेले असते. त्याची दृष्टी अंतराकडे म्हणजे आतमध्ये वळत नाही. अंतरात्म्याला तो जाणून घेऊ इच्छित नाही. अशा माणसाला वेद, पुराणे, शास्त्रे किंवा संतांनी कितीही समजावून सांगितले तरी त्याची खात्री पटत नाही. अशा माणसांच्या मुखी भगवंताचे नाम येत नाही. भगवंताचे नाम मुखी यायला देखील भाग्य लागते. पूर्व जन्मीच्या पापामुळे अशा व्यक्तींना भगवंताचे नाम घेण्याची बुद्धी होत नाही. पण ज्यांना कळते आहे त्यांनी तरी रामनाम अवश्य घ्यावे. कोणाच्या सांगण्याची वाट पाहू नये.
स्वसंवाद ::
१. ज्याप्रमाणे रामनामाने समुद्रावरील जड पाषाणही तरंगले, त्याप्रमाणे माझ्या मनातील संसाराचे जड विचार आणि चिंता दूर करण्यासाठी मी रामनामाची नौका धरली आहे का?
२. “नुसते नाम घेऊन काय होणार? ” अशा कुठल्यातरी ‘विकल्पाने’ (संशयाने) माझे मन घेरलेले आहे का? हा संशय दूर करण्यासाठी मी कधी नाम घेऊन अनुभव पाहीला आहे का?
३. सेतुबंधनातील खारीप्रमाणे, मी माझ्या आयुष्यात परमेश्वराच्या कार्यात किंवा सत्कर्मात माझा खारीचा वाटा उचलण्यास तयार असतो का?
४. माझी दृष्टी केवळ बाह्य दृश्य विश्वातील आकर्षणांमध्येच गुंतून पडली आहे, की मी माझ्या अंतरात्म्याला जाणून घेण्यासाठी कधी अंतर्मुख होतो?
संपूर्ण रामायणात शत्रुघ्न हा कधीच जास्त वर्णिला गेला नाही, तो दुर्लक्षितच राहिला…
रामरक्षेत व एकंदरीत रामकथे मध्ये शत्रुघ्नचा उल्लेख फार कमी आहे. शत्रुघ्नाच्या जीवनाचे चिंतन केले तर आपला अहंकार विसर्जित होईल. अनेकांना असे वाटते की, रामायणामधे शत्रुघ्नाने नेमके काय केले. रामकथे मध्ये जसे रामासोबत लक्ष्मणाचे नाव चिकटले, तसे भरतासोबत शत्रुघ्नाचे नाव चिकटले असे नाही. राम, लक्ष्मण, भरत यांच्यापाठोपाठ येणारे शेपटी सारखे नाव म्हणजे शत्रुघ्न नाही. रामकथेतही त्याचा फार जास्त उल्लेख नाही.
कधी कधी एखाद्या समारंभाचे फोटो बघताना माझ्या लक्षात येते की ज्याने काहीच कामे केली नाहीत असे अनेक चेहरे फोटोत आहेत. यांनी फक्त फोटोच्या वेळी उभे राहण्याचे काम केले. त्या वेळी माझे मन त्या लोकांचा शोध घेत असते, ज्यांना फोटो काढून घ्यायला सवड मिळाली नाही. ते फक्त कामच करीत राहिले.
म्हणून शत्रुघ्नच्या कार्याकडे आपले लक्ष थोडे वेधले पाहिजे. कल्पना करा की, दोघे भाऊ वनात आहेत. श्री भरत नंदिग्रामात आहेत. चौदा वर्षपर्यंत अयोध्येचे साम्राज्य सांभाळायचे आहे. ज्या साम्राज्याला राजा नाही असे राज्य सांभाळायचे आहे. राजनीतिशास्त्र कधी वाचले असेल. राजनीतिशास्त्रामधे राज्यावरचे सर्वात मोठे संकट अराजक हे आहे. म्हणून एखादा राजा मरण पावल्यावर त्याचा अग्निसंस्कार करण्यापूर्वी नवीन राजाचे नाव घोषित करावे लागते. राजनीतीप्रमाणे असा एकही दिवस नसावा, ज्या दिवशी राजा नाही. अयोध्येला चौदा वर्षे राजा नाही. पादुकांची सेवा करीत श्रीभरत नंदिग्रामात बसलेले आहेत. दोघे भाऊ वनात आहेत. वडील स्वर्गाला गेले. मग अयोध्येचे राज्य चौदा वर्षे कोणी सांभाळले? ज्या ठिकाणी राजा नाही अशा ठिकाणची सेना अस्ताव्यस्त होते. काही लोक विद्रोह करतात. मंत्रिमंडळ, सेना, राज्याचा कोश हे सगळे सांभाळणे सामान्य गोष्ट नाही.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात काय काय भयानक घटना घडल्या ते शिवचरित्रात वाचल्यास एखाद्या मोठ्या माणसाच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळणे किती अवघड असते ते लक्षात येईल.
शत्रुघ्नाला फक्त राज्य सांभाळायचे नव्हते. घरामध्ये असलेल्या सहा महिलांना सांभाळायचे आहे. प्रत्येकीची मनोवृत्ती भिन्न आहे. कौसल्यामाता रात्रंदिवस अश्रूपात करते आहे. कैकयीमाता अंत:करणातून दग्ध होती. तिला आता आपल्या कर्माचा पश्चात्ताप होतो आहे. ऊर्मिलेच्या नेत्रातील आसवांना खळ नाही. मांडवीचा पती भरत अयोध्येच्या जवळच नंदिग्रामात आहे. पण ती तिथे जाऊन पतीला भेटू शकत नाही. थोडा या परिस्थितीचा विचार करा. पण चौदा वर्षे इतक्या महिलांना सुखावत सांभाळणे ही सामान्य गोष्ट नाही.
शत्रुघ्नाचे जीवन यातच अर्पित आहे. सगळे कर्तृत्व या धाकट्या भावाचे आहे. अयोध्येचे संपूर्ण राज्य आणि सेना त्याने चौदा वर्ष सांभाळली. आणि एवढे करूनही चौदा वर्षांनंतर रामचंद्र परत आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शत्रुघ्न सर्वांत पुढे नाही. पुढे गुरुदेव वसिष्ठ जातात. नंतर रामांच्या पादुका घेऊन भरत जातो. भगवान राम परत आल्यानंतर सारे जण राम-भरत-भेटीचे वर्णन करतात. पण शत्रुघ्नाचे वर्णन कोणी करत नाही.
ही मंडळी फोटोकरता नाहीतच. पण ते फोटोत दिसत नाहीत, म्हणून त्यांनी काही काम केल नाही असे म्हणणे कृतघ्नपणा आहे.
एखादे उत्तम देवालय उभे असते. लोक त्या देवालयाच्या शिखराकडे पाहतात. भिंतीकडे पाहतात. सुंदर कलाकुसर पाहतात. पण हे सगळे मंदिर पायातल्या ज्या दगडांवर उभे असते त्या दगडांकडे कोणाचे लक्ष जात नाही. हे पायातले दगड जर विचार करतील की आपला फोटो कधीचं निघत नाही. फक्त मंदिराच्या कळसाचा निघतो, तेव्हा फोटोग्राफर आल्यावर आपण जमिनीतून बाहेर येऊ, तर ते मंदिर किती वेळ उभे राहील? इतके सुंदर मंदिर उभे आहे, कारण पायातले दगड स्वत:ला गाडून त्या ठिकाणी स्थिर आहेत.
म्हणून मला तर नेहमीच वाटते की पायामध्ये गाडल्या गेलेल्या पत्थरांचा प्रतिनिधी म्हणून देवाच्या मंदिरात प्रवेश करताना आपण पायरीला प्रणाम करतो.
त्याप्रमाणे रामायणाच्या मंदिरात प्रवेश करताना पहिला प्रणाम या शत्रुघ्नाला करणे फार आवश्यक आहे. कारण त्या पायाखालच्या दगडावर अयोध्येचे दिव्य वैभव उभे राहिले. आपल्या व्रताचे पालन करताना १४ वर्षात सिंहासनावर बसण्याचा क्षूद्र विचार शत्रुघ्नाच्या मनाला कधीही शिवला नाही. वनात राहून वनवासाचे नियम पाळणे सोपे आहे. नंदिग्रामात राहूनसुद्धा ते नियम पाळणे सापेक्षतेने सोपे आहे. पण रात्रंदिवस राजधानीत राहून आणि रोजच्या रोज सगळ्या राज्यव्यवहाराचा परामर्श घेऊन पुन्हा अंत:करणाने संन्यासी राहणे हे फार कठीण आहे. आणि एवढे सगळे करून शत्रुघ्न कुठेही मीपणा मिरवत नाही.
जेव्हा आपल्याला अमुक गोष्ट मी केली असा अहंकार होईल तेव्हा शत्रुघ्नाचे स्मरण करावे. त्या पायाखालच्या दगडाला आठवावे. म्हणजे आपली भारतीय संस्कृती कशी आत्मविलोपिनी आहे ते कळेल.
मी सगळी कामे व्यवस्थितपणे पूर्ण करीन. पण मला काहीही नको. आपल्याला हे जमेल का? *
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : शामला पालेकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ जीवनाचा प्रवास… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆
☆
हा असं वागला, तो तसं वागला,
कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो, याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरूवात करा.
या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख, अडचणी, नाहीत. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलंय. आपण तर साधारण मनुष्य आहोत. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत, हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो. कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोणी कसंही वागेना, आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे.
आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते. आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली, तरी घाबरून जाऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे. जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात, ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत.
जगणं कोणाचंही सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे, असं फक्त आपल्याला वाटत असतं. सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो.
आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो.
☆
ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली, तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे, त्याला अजूनही नोकरी नाही.
कृतज्ञ रहा.
*
ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले, तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत, पण यश मिळाले नाही.
कृतज्ञ रहा.
*
तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता, तोच रस्ता आहे, जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले.
कृतज्ञ रहा.
*
ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला, त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात, तरीही त्यांचे जीवन विसंवादात आहे.
कृतज्ञ रहा.
*
तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड, तुम्ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळाला, त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतला.
कृतज्ञ रहा.
☆
लेखक:अज्ञात
प्रस्तुती: स्वाती मंत्री
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब) शिक्षा- एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)
☆ लघुकथा – कसक ☆ श्री कमलेश भारतीय ☆
वह घर आया और रूठ कर दादी के पास पहुच गया। उसकी बाजू पकड कर बोला- दादी , फोन पर मेरी पापा से बात करवा दे।
– क्यों ?
– दादी , कहां रहता है , मेरा पापा ?
– वो तो काम के लिए दूर रहता है ।
– बुला उसे अभी ।
– क्यों ?
– मैं अभी जाॅय के साथ खेल रहा था । उसका पापा आया और हम दोनों को कार में घुमाने ले गया ।
– फिर क्या हुआ ?
– जब मेरे पापा के पास गाड़ी है, तो मैं जाॅय के पापा की गाडी में सैर क्यों करूं ?
– बेटे , तेरे पापा नहीं आ सकते ।
– कह दे फिर मैं उनसे बात नहीं करूंगा ।
-नहीं बेटे, ऐसे नहीं कहते ।
– बस फिर, करवा दे मेरी बात। वह अपनी जिद्द पूरी करके ही माना । उसके बाद सपनों में खो गया और पापा की गाड़ी में सैर करने निकल गया ।