मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘राग मेघ…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘राग मेघ…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

काही दिवसांपूर्वी मी माझी ” मल्हार महुडे ” ही कविता रसग्रहणासाठी आपल्याला पाठवली होती.

त्या कवितेतील पाऊस धिंगाणा घालत येणारा आषाढातला पाऊस होता. त्यातले मेघ ” झिंगल्यापरी डोंगर माथ्यावर धडका मारणारे, मत्त गजांसारिखे होते. ”

आताचा हा पाऊस रिमझिमणारा, हळवा आहे. त्याची संतत धार चालू आहे. अशा वेळी एखाद्या विरही नववधूच्या मनाची काय अवस्था असेल बरे!माझ्या या ” मेघ” कवितेतूनच समजून घ्या ना!

मेघ  दिवाकर बुरसे 

सय येई पाहुन मेघ नवा

घननीळ सावळा सवे हवा।। ध्रु।।

 *

प्रजक्त बहरले चोहिकडे

तरुतळी केशरी सडे सडे

शंकासुर डुलतो बघ भगवा

घननीळ सावळा सवे हवा ।।१।।

 *

वेलीवर डुलती कळ्या, फुले

डोहात निळ्या डुलती कमळे

उधळतो गंध हिरवा मरवा

घननीळ सावळा सवे हवा ।।२।।

 *

या निळ्या घनातुनि नीर गळे

झेलती परांवर त्या बगळे

जाहला चिंब बघ विहगथवा

घननीळ सावळा सवे हवा।।३।।

 *

कानावर येई सूर निळा

ऐकून दाटतो उगा गळा

वा-यास गवसला छंद नवा

घननीळ सावळा सवे हवा ।।४।।

 *

घन निळासावळा गगनखुळा

जणु गालावरला तीळ निळा!

तो चुंबाया साजण हळवा

घननीळ सावळा सवे हवा ।।५।।

 *

ही कुंद हवा करि धुंद जिवा

हा अनुभव अगदी नवा नवा

वाटतो तरीही हवा हवा!

घननीळ सावळा सवे हवा ।।६।।

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गादी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “गादी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

काल शेजारच्यांनी चांगल्या तीन चार नवीन गाद्या करून रिक्षेने आणल्या. या गाद्यांवर त्यांचा मुलगा आनंदाने एखाद्या राजासारखा राजेशाहीथाटात बसला होता. आणि…

गादी या शब्दावर मी भाळलो आणि लोळलो सुध्दा. कशाकशाच्या संदर्भात हा शब्द वापरतो हा विचार आला… राजेशाही, किंवा घराणेशाही. धार्मिक, आध्यात्मिक, किंवा संत परंपरेची. झोपायची, आणि अगदी जुन्या गोष्टीत असणारी पानाची गादी. पण तरीही गादी म्हंटलकी डोळ्यासमोर पहिल्यांदा येतात त्या दोन गाद्या. एक राजघराण्यातली, आणि दुसरी अर्थातच आपली नेहमीची झोपायची. पानाची गादी हा शब्द बहुतेक जुने लेखक आणि सिनेमा यांच्या बरोबरच ईतिहास जमा झाला. वरच्या पैकी पानाची गादी सोडली तर सगळ्या प्रकारच्या गादींना ईतिहास आहे. पानाच्या गादीचाही ईतिहास असला तर तो इतरांबरोबर आपलाही असेल. राजघराण्यातला गादीला अर्थातच घराण्याचा, आणि आपल्या गादीला (कदाचित) घोरण्याचा.

राजघराण्यातल्या गादीवर आदराने बसवलं जात. डोक्यावर छत्र असत आणि शेजारी हातातल्या भल्या मोठ्या पंखाने वारा घालायला कोणीतरी. (म्हणजे असंच पाहिलं किंवा दाखवलं आहे.) आणि आपण मात्र अंगावर पांघरूण घेतलं असेल तर ते ओढून, आणि प्रसंगी ओरडून उठवतो. लगेेच उठला नाही तर… वर फिरणारा आणि वारा घालणारा पंखा कधीकधी मुद्दाम बंद केला जातो. आदर आणि बसवणं हे राजघराण्यातल्या गादीबद्दल असतं. तर कोणत्याही प्रकारचा आदर न ठेवता गादीवरुन उठवणं हे आपल्या गादीबद्दल. राजगादीवर बसल्यावर वारा घातला जातो, तर गादीवरुन उठवण्यासाठी वारा बंद केला जातो.

राज गादीवर बसल्यावर जयजयकार किंवा स्तुतीसुमनं ऐकायला मिळत असावीत. आम्हाला किंवा आम्ही गादीवरून उठवतांना आवाज सुरुवातीला कदाचित गोड निघाला नाही तरी काढण्याचा प्रयत्न असतो, पण ठराविक वेळेनंतर तो आवाज गोड वाटणरच नाही याचीच काळजी घेतो. स्तुती आणि सुमनं याचा संबंध नसतो. असतो तो सुस्ती घालवण्याचा खटाटोप.

राजगादीवर बसल्यावर अनेक बाबतीत बरेच चांगले सल्ले दिले जातात. आपल्या गादीच्या बाबतीत ऊठा आता हाच सल्ला असतो. हल्ली मुलांना झोपा आता असा सल्लाही द्यावा लागतो, पण ऊठा आता हाच जवळचा वाटतो.

राजघराण्यातल्या गादीवर व्यक्ती बसली कि तीला, व्यक्ती आणि गादी दोघांना वजन प्राप्त होतं. किंमत असते. आपली गादी किती किलोची आहे यावरुन गादीचच वजन व सोबत किंमत सांगितली जाते. आपल्याला आणि वजनालाही किंमत नसते. राजघराण्यातली गादी ही त्याच व्यक्तीची आणि गादीच असते. आपली मात्र सिंगल, डबल, नुसत्याच कापसाची, किंवा ब्रँडेड असते. तर राजघराण्याच्या गादीला त्यांचाच आणि आपलाच असा ब्रॅड असतो.

काय लागतं या गादीसाठी… म्हंटल तर बरंच काही… नाहीतर काहीही नाही. गादी कोणती, कधी, कशासाठी मिळणार यावर अवलंबून असतं.

राजघराण्याच्या गादीला त्या घराण्यात एकतर जन्म घ्यावा लागतो, किंवा दत्तक तरी जावं लागत. कर्तुत्व (असेल तर…) नंतरसुध्दा सिध्द करता येत. (अपवाद असु शकतात. काही घराणी आहेत. जे आजही कर्तृत्वाच्या शोधात आहेत. पण तरीही गादीवर आहेत असं वाटतं.)

धार्मिक, आध्यात्मिक, संत परंपरेच्या ठिकाणच्या गादीवर बसायला पावित्र्य, संस्कार, बौध्दिक व वैचारिक बैठक व पात्रता लागते. कर्तुत्वासोबत वक्तृत्व असाव लागतं. वाचन, मनन, चिंतन लागत. संस्कृती माहीत असावी लागते व तीचा अभिमान असावा लागतो. रितीरिवाजाची जाण असावी लागते. आणि अंगी नम्रता आणावी लागते. आणि हे सगळं आलं की बोलणं चांगलच वाटतं, कारण अहंकार नसतो.

राजघराण्यात कधीकधी गादीवरचा माणूसच बदलतो. यासाठी दगाफटका पण होतो. आपल्या बाबतीत मात्र तस नसतं. आमच्या गादीला या सगळ्यांची गरज असेलच असं नाही. फक्त ती व्यवस्थित राहण्यासाठी अधूनमधून तीला कडक ऊन मात्र दाखवावं लागतं. आणि याचवेळी आम्ही गादीवरच फटके मारतो. यात कोणताही दगा नसतो. काहीवेळा तर गादीच बदलतो.

राजघराण्यातल्या गादीवर बसल्यावर ती व्यक्ती बसल्या गादीवरुन आपलं राज्य विस्तारण्याचा प्रयत्न करते. आमचा संसार विस्तारला की आम्हाला नवीन गादीचाच विचार करावा लागतो. आणि देह विस्तारला तर असलेल्या गादीवरच तो पसरावा लागतो. म्हणजे राज्य पसरवणं, आणि आपण पसरणं यासाठी गादी लागते हे महत्वाच.

गादीवर बसवण्याचा समारंभ व सोहळा असतो. मुहूर्त पण असतो. यात मंत्रोच्चार असतात. गादीवरुन उठवण्याचा सोहळा रोजच असतो, आणि मंत्रोच्चार नसले तरी उच्चार मात्र वरच्या स्वरात असतात. आणि मुहूर्त पाहणार आहे का अशी विचारणा असते.

राजगादीवर आल्यावर कारभार पहावा लागतो. आणि सगळे कारभार आटोपले की आम्ही गादीवर येतो. अगोदर घरातल्या गाद्या सकाळी गुंडाळून ठेवल्या जात होत्या. आता सिंगल, डबल बेड आल्यामुळे त्या चोवीस तास पसरलेल्याच असतात. आणि आमच्या सोयीच्या वेळेने आम्ही त्यावर पसरतो.

वरच्या सगळ्या गाद्या या द्रृश्य स्वरुपात असतात. पण याशिवाय न दिसणारी एक गादी आहे जी आमच्या चांगल्या वाईट सवयींबद्दल असते. या गादीला फार जूनी किंवा फारतर मागच्या पिढीची परंपरा असते. आणि त्याचा ऊल्लेख गादी चालवतोय असाच होतो.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गोष्ट इंग्लिश बोलण्याची…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “गोष्ट इंग्लिश बोलण्याची…” ☆ श्री मंगेश मधुकर

 झालं असं की,

रुटीन वर्किंग डे, केबिनमध्ये साहेब लॅपटॉपवर काम करत होते. इतक्यात दारावर टकटक झाली.

“सर, आत येऊ”

“कोण !! शांतामावशी, या या, बरेच दिवसांनी… ”

“नमस्कार सर, बरे हात ना”

“मस्त, मजेत, नेहमीसारखा. तुम्ही कशा आहात. ”

“बरी हाय. रिटायर झाले. रिकामं बसून करमत नाही. हापिसची लय आठवण येते. ”

“चालायचंच, आज इकडं काय काम?”

“या बाजूला आलते म्हणून समद्याना भेटायला आले. ”

“चांगलं केलंत. चहा घेणार”

“थोड्या टायमानं. नवीन बाई झाडूपोचा, साफसफाई नीट करती ना”

“हो, करतीये पण तुमच्याइतकी चांगली नाही. हळूहळू शिकेल. ” 

“तुमचे आनी हापिसचे लई उपकार हायेत. माज्यासारक्या अडण्याच्या हाताला काम दिलं. इत तीस वर्स काम केलं. चुका झाल्या तरीबी सांबाळून घेतलं. या कामानं घर चाललं. पोरी शिकल्या. नोकरीलापण लागल्या. ”

“तुम्ही सुद्धा फार मेहनत घेतलीत. आता आराम करा. पोरी काळजी घेतील. ”

“सर, धाकटी सोबत आलीये”

“मग बोलवा की आत”मावशीनी मुलीची ओळख करून दिली.

थोडया वेळानं निरोप घेऊन निघालेल्या मावशी परत आल्या – – 

“सर, माजी पोरगी इंग्लिस बोलते”

“अरे वा, चांगलयं की”

“तसं न्हाई. यक इनंती. नाय म्हणू नगा”

“मावशी, बोला!!”

“तुमी माज्या पोरीशी इंग्लिसमध्ये बोला. ” 

मावशींची अनपेक्षित मागणी ऐकून साहेबांना हसायला आलं. मुलगी मात्र गडबडली. प्रचंड ऑकवर्ड झालेल्या तिनं आईकडं पाहत डोळे वटारले.

“रिलक्स, आईसाठी आपण बोलू या. टेंशन घेऊ नकोस. टेल मी अबाऊट युवरसेल्फ”साहेबांच्या बोलण्यानं मुलीला धीर आला. तिनं अडखळत इंग्लिशमध्ये सुरवात केली. साहेबांच्या सोप्या प्रश्नांना आत्मविश्वासानं उत्तरं दिली. हे इंग्रजी संभाषण चालू असताना अचानक मावशी जोरजोरात टाळ्या वाजवायला लागल्या. साहेब आणि मुलगी दोघंही आश्चर्याने मावशीकडे पाहत होते.

“मावशी, पोरगी हुशार आहे. इंग्लिश चांगलं बोलते. ”साहेब म्हणाल्यावर मावशीचे डोळे घळघळा वहायला लागले.

“माप करा, सर. जरा येडयासारखी करतेय. ”मावशी 

“असं काही नाही. ”साहेब.

“जास्त येळ घेत नाई. माज्यासाठी आजचा दीस लई मोठा हाय. समदा जनम गरीबीत. दारुड्या नवऱ्याचा नावापुरता आधार. पोरींना शिकवून हापिसर बनवायचं हेच डोक्यात व्हतं. आज पोरीला इंग्लिस बोलताना पाहिल्यावर लई लई भारी वाटलं. ”मावशीना खूप भरून आलं. घाईगडबडीत नमस्कार करून बाहेर गेल्या. मोठ्या साहेबांसोबत पोरगी इंग्लिस बोल्ली म्हणून सगळ्या ऑफिसला मावशींनी समोसा-बर्फीची पार्टी दिली.

… तसं पहायला गेलं तर खूप साधी घटना परंतु मावशींसाठी आयुष्याची लढाई जिंकल्याची भावना होती. स्वप्नपूर्तीचा आनंद फार मोठा असतो.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अंश… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ अंश… ☆ राधिका भांडारकर ☆

आपुली आपण करी जो स्तुती। तो एक पढत मूर्ख।। 

– – असे संत रामदासांनी सांगून ठेवले आहे. त्यामुळे स्वतःबद्दल, स्वतःच्या प्रतिमेबद्दल नेमके काय बोलावे, बोलावे की न बोलावे, या संभ्रमात मी आहेच.

स्वतःबद्दल खरे सांगणारी एकच वस्तू आहे. आणि ती म्हणजे आरसा. आरसा खोटे बोलत नाही. पण आरशातली प्रतिमा ही सुद्धा बाह्यरंगी असते ना? आरसा फार तर सांगेल, “तू गोरी नाहीस, तुझे डोळे जरा जास्तच मोठे आहेत, केस आता पांढरे होत चाललेत, रागावलेली दिसतेस, खूश दिसतेस. वगैरे वगैरे. पण अंतरंगातली वादळं, तत्वं आरसा कशी टिपणार? फार फार तर तुम्ही जसे आतून असता, त्याचा तुमच्या चेहऱ्यावर परिणाम होतो आणि तो परिणाम, आरशातली प्रतिमा टिपू शकेल असे तूर्तास म्हणूया.

तर स्वप्रतिमा… मी कोण? कशी आहे मी? अगदी “कोsहम” सारखाच हा प्रश्न आहे नाही का? 

आपण आणि आपली समाजातील प्रतिमा ही तंतोतंत जुळणारी असते का? हाही एक प्रश्न आहे. माझ्याबद्दल माझ्या भवतालचे स्नेही म्हणतात, कशी हसतमुख, बिनधास्त आहे, रोखठोक आहे, आत एक बाहेर एक असे मुळीच नाही, वातावरणात एक सहज चैतन्य आणते, एकेका वाक्याला सगळ्यांना हसवते, या वयात ही किती उत्साही आहे वगैरे वगैरे. या सर्व स्तुतिसुमनांनी माझी छाती नक्कीच फुलते. अंगावर मुठभर मासही चढते (लाक्षणिक अर्थाने—नाहीतर त्याची गरज काय?) अगदी हळुवार मोरपीस फिरते. पण जेव्हां मी माझ्या अंतरंगात हळूच बुडी मारते तेव्हां जाणवते— हसतमुख, बिनधास्त, विनोदी ही विशेषणे माझ्यासाठी खरंच योग्य आहेत का?

मला प्रचंड राग येतो. खूप चिडचिड होते माझी. समोरच्या माणसाचे चांगलेच लोणचे घालावे असेही वाटते. बिनधास्त तर मुळीच नाही. जी व्यक्ती काटेकोरपणे वेळ पाळण्यासाठी धडपडत असते ती बिनधास्त कशी असेल? आणि कसली रोखठोक बोलते? ” जाऊदे! याला बोलून काय उपयोग आहे? उगीच तोंडाची वाफ दवडा” या विचाराने मी कितीतरी वेळा गप्पच बसते. माझं विनोदी बोलणं हे ही माझ्या विसंगत मानसिकतेतून आलेलं असतं.

मनात ज्वाळा पेटलेल्या असतात.

मला खूप वेळा जाणवतं, आपल्याला वाटत असतं की आपण असं असावं, असं बनावं, म्हणजे मितभाषी, शांत, सोशिक, शालीन, नम्र वगैरे वगैरे. पण अशा असणाऱ्या लोकांबद्दलही मला नेमकं काय वाटतं तेही मी सांगू शकणार नाही. कधी कधी हीच माणसं मला अगदी पचाक आणि बावळटही वाटतात. मग मी त्यांच्यासारखं का असावं? थोडक्यात एका खिशात तलवार आणि दुसऱ्या खिशात बासरी अशी काहीतरी संमिश्र प्रतिमा आहे माझी, माझ्या मनातली. मी चांगली, मी वाईट, मी अशीही, मी तशीही पण “अशी मी अशी” मी नक्कीच नाही.

माझ्या एका प्रोफेसर मैत्रिणीबरोबर मी एक दिवस गाडीवरची पाणीपुरी खात होते. छान अटोपशीर ड्रेसेस वगैरे आम्ही घातले होते. मस्त मजेत होतो.

“भैय्या थोडा तेज बनाओ, ज्यादा मीठा नही मंगता “वगैरे बिनधास्त हिंदी बडवत होतो. खाता खाता प्रोफेसर मैत्रीण म्हणाली, ” अग! माझ्या एखाद्या स्टुडंटने असे मला पाहिले तर त्याचे माझ्याविषयी काय मत होईल?”

म्हणजे ती माझी मैत्रीण आणि प्राध्यापक या दोन प्रतिमांमध्ये चक्क विभागलेली होती. त्यावेळीही माझ्या मनात आले मग “मी कोण?” मीही बँकेत उच्चपदस्थ होते मग माझ्या मनात असा विचार का नाही आला?

माझ्या आईचे एक म्हणणे असायचे, नाटकाला जाताना साडीच नेसायची.

.. खरोखरच आपल्या प्रतिमा अशा घटकांमध्ये दुभंगलेल्या असतात. या मुद्द्याचा विचार करताना मी जेव्हा माझ्या खऱ्या प्रतिमेंशी येऊन थांबते किंवा मी माझ्या प्रतिमेला शोधत बसते तेव्हा एकच जाणवते, मूळात मी तशी खडूस, स्वान्तप्रिय, स्वतःशीच संवाद साधणारी, अत्यंत अनसोशल, मात्र निसर्गप्रेमी, गंभीर प्रवृत्तीची एक अत्यंत कंटाळवाणी व्यक्ती असावी. कोण जाणे मीच मला अजूनही सापडलेली नाही. खट्टी की मिठी? “मी कोण?”चा शोध अजूनही चालूच आहे. आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत चालूच राहणार.

पण त्यादिवशी गॅलरीत झोपाळ्यावर निवांत बसले होते. संध्याकाळ होत होती. मावळत्या सूर्याने आकाशात सुरेख रांगोळी काढली होती. नजरेसमोर उंचउंच इमारतीच होत्या. त्यातून दिसणारे आकाशाचे हे रंगीन तुकडे मी न्याहळत होते. माणसे आणि वाहनांची गर्दी बघत होते. एका यांत्रिक विश्वाची चाललेली धावपळ, दमछाक निरखत होते आणि या संपूर्ण भौतिक पार्श्वभूमीवर मला एका काहीशा दूरच्या रिकाम्या रस्त्याच्या वळणावर मस्त नारिंगी फुले अंगावर पांघरून ऐटीत उभा असलेला सुंदर “गुलमोहर” दिसला. आणि माझ्या अंतरंगात एक हलकासा तरंग उमटला.

“कोण मी”?… खरं तर याच विश्वाचा फक्त एक अंश मी..

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सोपं नसत हो sssss – -” कवयित्री : डोमिनर (पोलंड) मराठी अनुवाद : भरत यादव ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “सोपं नसत हो sssss – -” कवयित्री : डोमिनर (पोलंड) मराठी अनुवाद : भरत यादव ☆ संकलक / प्रस्तुती : डॉ. धनंजय देशपांडे

प्रतिभावंत स्त्रीवर प्रेम करणं सोपं नसत हो sssss 

 

सोपं नसतं हो 

प्रतिभावंत स्त्रीवर प्रेम करणं !

कारण तिला पसंत नसते 

जी हुजुरी”

झुकत नसते ती कधी जोवर नात्यांमध्ये प्रेमाची भावना असत नाही

तुमच्या प्रत्येक हां ला हां आणि ना ला ना म्हणणे तिला मान्य नसतं

कारण ती शिकलेलीच नसते 

नकली धाग्यात नाती गुंफणे!!

तिला ठाऊक नसते सोंगाढोंगाच्या

पाकात बुडवून

आपले म्हणणे मान्य

करवून घेणे!!

तिला तर ठाऊक असते बेधडक

खरे बोलत जाणे!!

फालतू चर्चेत पडणे,

तिच्या स्वभावात बसत नाही

मात्र तिला ठाऊक असते 

तर्कशुध्दपणे आपला विचार कसा मांडायचा ते

ती वेळोवेळी दागदागिने, कपडेलत्ते 

यांची मागणी नाही करत

ती तर सावरत असते स्वतःला आपल्या आत्मविश्वासाने

सजवत असते आपले व्यक्तिमत्व ती

निरागस स्मितहास्याने

तुमच्या चुकांविषयी ती तुम्हांला

अवश्य बोलणार!! 

पण अडचणीच्या काळात तुम्हाला सांभाळून पण घेणार

तिला तिची गृहकर्तव्ये नक्की माहित आहेत

तसेच आपल्या स्वप्नांना पूर्ण करणेदेखील माहित असत!! 

कुठल्याही निरर्थक गोष्टींना मानणे तिला जमत नाही 

पौरुषापुढे ती नतमस्तक नाही होत,

झुकते जरुर 

पण ते तुमच्या निःस्वार्थ प्रेमापुढे

आणि या प्रेमासाठी आपलं सर्वस्व

उधळून देऊ शकते!!

धैर्य असेल निभावण्याचे तर आणि तेव्हाच 

अशा स्त्रीवर प्रेम करावे!!

कारण कोसळत असते आतून ती दगाफटका नि कपटाने,

आणि पुरुषी अहंकाराने,

जी पुन्हा जोडली जाऊ शकत नाही

कुठल्याही प्रेमाखातर…!

कवयित्री डोमिनैर (पोलंड)

मराठी अनुवाद : भरत यादव 

संकलन : डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८५ आणि ८६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८५ आणि ८६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ८५ – – – 

भजा राम विश्राम योगेश्वरांचा ।

जपू नेमिला नेम गौरीहराचा ।

स्वये नीववी तापसी चंद्रमौळी । 

तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ।।८५।।

अर्थ : योगेश्वरांचे विश्रांतीस्थान असलेले रामनाम जपा. प्रत्यक्ष गौरीहर म्हणजे शंकर देखील नित्यनेमाने आपला ठरलेला रामनामाचा जप पूर्ण करतात. या नामजपाने भगवान शंकरांना देखील शांती मिळते. असा हा श्रीराम अंतकाळी आपली सुटका करील.

विवेचन : रामनामाचे महत्व सांगताना समर्थ म्हणतात की रामनाम हे योग्यांचा विश्राम म्हणजे विश्रांती आहे. इथे समर्थांनी त्यासाठी ‘ योगेश्वर ‘ शब्द वापरला आहे. या शब्दाचे तीन अर्थ घेता येतात. पहिला अर्थ जो समर्थांना अपेक्षित आहे तो म्हणजे योगेश्वर भगवान शंकर. आपण श्रीकृष्णाला देखील योगेश्वर म्हणतो. पांडुरंगशास्त्री आठवले तर आपल्या स्वाध्यायात श्रीकृष्णाला ‘ योगेश्वर भगवानच ‘ म्हणतात. हा दुसरा अर्थ. आणि तिसरा अर्थ म्हणजे जे योगी साधक आहेत, तप करणारे आहेत ते. तेव्हा यातील कोणत्याही अर्थाने योगेश्वर शब्द घेतला तरी सर्व श्रेष्ठ पुरुष शेवटी रामनामाचाच आश्रय घेतात. रामनाम हे त्यांचे विश्रांतीस्थान आहे हेच यातून स्पष्ट होते.

श्रीकृष्ण देखील रामनामाचा जप करत असत असा पुराणात उल्लेख आहे. कलियुगात रामनाम हेच तारक आहे असे त्यांनी युधिष्ठिराला सांगितले होते. श्रीकृष्ण आणि श्रीराम दोघेही विष्णूचेच अवतार. त्यांच्यामध्ये भेद नाही. पण कलियुगात भक्तीचा सोपा मार्ग म्हणून श्रीकृष्णांनी रामनाम घेण्याचा उपदेश केला आहे. राम, कृष्ण आणि शंकर यांच्यातही भेद नाही. जसे भगवान शंकर रामनामाचा जप करीत असतात तसेच श्रीराम देखील भगवान शंकराचे पूजन करीत असतात. शंकराचार्यांनी याच अद्वैत सिद्धांताचे प्रतिपादन केले होते. परमेश्वर एकच आहे. आपण त्याचे जे कोणते नाम घेऊ, त्यावर आपली दृढ श्रद्धा हवी.

भगवान शंकरांसारखा योगिराणा देखील नित्यनेमाने श्रीरामांचे नामस्मरण करतो. आपल्या नामस्मरणाचा जो नेम आहे, त्यात खंड पडू देत नाही. तपस्वी आणि मस्तकावर चंद्र धारण करणाऱ्या भगवान शंकरांचा दाह रामनामानेच शांत झाला. रामनाम हेच त्यांचे विश्रांतीचे ठिकाण आहे. तिथेच ते रमतात. आपणही या रामनामाचे नित्यनेमाने स्मरण करावे. रामनामाची जीवाला सवय असली तरच अंतकाळी आपल्या मुखात रामनाम येईल. रामनामामुळे आपली ऊर्जा ऊर्ध्वगामी होते. विकारांमुळे आपली ऊर्जा अधोगामी होते. आयुष्यात जाणीवपूर्वक जर नियमितपणे रामनाम घेतले तर अंतकाळी देखील मुखातून तेच बाहेर पडेल. गोंदवलेकर महाराज म्हणतात, ” रामनाम ही अंतकाळी आपल्या मुखातून बाहेर पडणारी शेवटची गोष्ट असली पाहिजे. ” असे नाम आपल्या मुखात अंतकाळी आले तर श्रीराम आपली या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करील.

स्वसंवाद :: 

१. ज्याप्रमाणे श्रेष्ठ योगेश्वरांचे ‘रामनाम’ हे विश्रांतीस्थान आहे, तसे माझे मन संसाराच्या धावपळीतून थकल्यावर रामनामात विसावा शोधते का? 

२. वेगवेगळ्या देवांमध्ये किंवा पंथांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करून मी माझे चित्त कलुषित करतो आहे, की सर्वांभूति एकच तत्त्व पाहण्याचा प्रयत्न करतो? 

३. माझ्या दैनंदिन जीवनातील विकारांमुळे माझी ऊर्जा ‘अधोगामी’ (खाली) जात आहे की नामस्मरणामुळे ती ‘ऊर्ध्वगामी’ (सकारात्मकतेकडे) प्रवास करत आहे? 

४. गोंदवलेकर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, “रामनाम ही अंतकाळी मुखातून निघणारी शेवटची गोष्ट असावी” यासाठी मी आजपासूनच नामस्मरणाचा ‘नित्यनेम’ आणि त्याची गोडी मनाला लावली आहे का?

== == == == == == == 

श्लोक क्र. ८६ – – – 

मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।

सदानंद आनंद सेऊनि राहे ।

तयावीण तो सीण संदेहकारी ।

निजधाम हे नाम शोकापहारी ।।८६।।

अर्थ : विश्राम म्हणजे विश्रांती कुठे आहे तर ज्याच्या मुखात रामनाम आहे तेथेच ! ज्याच्या मुखी रामनाम आहे असा मनुष्य अखंड आनंदाचे सेवन करीत असतो. रामनामाशिवाय अन्य काही करणे म्हणजे व्यर्थ शिणवणे आणि संदेह उत्पन्न करणारे आहे. नाम हेच निजधाम असून ते सर्व शोक हरण करणारे आहे.

(सदानंद – अखंडित आनंद, सीण – शीण/कष्ट/ताप, संदेहकारी – संशय निर्माण करणारा, शोकोपहारी – शोक/दुःख हरण करणारा)

विवेचन :  रामनामाचे महत्व वर्णन करताना समर्थ म्हणतात की ज्याच्या मुखी हे रामनाम आहे त्याला त्या ठिकाणी शांती, समाधान आणि आनंद या गोष्टी प्राप्त होतात. विश्राम म्हणजे विश्रांती. विश्राम शब्दातही ‘ राम ‘ आहे. आपण आनंद मिळावा म्हणून किंवा विश्रांती मिळावी म्हणून आयुष्यभर केवढी खटपट करत असतो ! घर, पत्नी, मुलेबाळे ही सर्व आनंदाची ठिकाणे आहेत असे आम्ही सांसारिक मानतो. तिथेच विश्रांती मिळते असे समजतो. विश्रांतीसाठी काही लोक निसर्गरम्य ठिकाणी जाऊन राहतात. व्यावहारिक दृष्ट्या हे सर्व बरोबरच आहे. परंतु ज्याला अध्यात्मसाधना करायची आहे, अशा व्यक्तीने अंतर्मुख होऊन या बाह्य गोष्टींकडे दुर्लक्षच करणे श्रेयस्कर.

कोणत्याही प्रापंचिक माणसाचा संसाराचा अनुभव संपूर्णपणे सुखद आहे असे होत नाही. तो तिथे सुख शोधू पाहतो पण क्षणिक सुखाचे काही क्षण सोडले तर त्याला दुःख आणि विषादाचीच प्राप्ती होते. मात्र ज्याच्या मुखात रामनाम आहे किंवा भगवंताचे नाम आहे असा माणूस कितीही विपरीत परिस्थिती असली तरी विचलित होत नाही. त्याचा आनंद सुखाने वाढत नाही किंवा दुःखाने कमी होत नाही. म्हणून तर भगवंताच्या नामात असलेले संत एका अनोख्या मस्तीत राहताना आपल्याला आढळतात. त्यांच्या मुखावर तेज असते, ते अंतर्यामी असणाऱ्या आनंदामुळे विलसत असते. हा आनंद अखंडित असतो. ‘ आनंदाचे डोही आनंद तरंग ‘ अशी संतांची अवस्था असते ती याचमुळे.

प्रापंचिक माणूस कधी कधी केवळ नामाने मला भगवंताची प्राप्ती खरंच होईल का अशी शंका घेतो. हा संशय वाढत गेला की नामस्मरणावरील त्याचा विश्वास कमी होऊ लागतो. तो पुन्हा विषयविकारात अडकतो. तिथे आनंद शोधू लागतो. पण त्याची ही खटपट व्यर्थ शिणवणारी असते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

” नामपरते तत्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशील झणी । 

ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनि श्रीहरी जपे सदा ।।”

गोंदवलेकर महाराज म्हणतात, ” नामातच भगवंताचा वास आहे. ” म्हणून नाम हेच निजधाम आहे. आपल्याला स्वस्वरूप जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी नाम हेच साधन आहे. परमेश्वर वेदांनाही अगम्य आहे म्हणजे वेदही त्याला पूर्णपणे जाणू शकत नाहीत. तो आपल्या कल्पनेपलिकडे आहे. पण नामात त्याचा वास आहे. म्हणून आपण नाम घ्यावे. वैखरी, मध्यमा, पश्यन्ती आणि परा या वाणीच्या चार अवस्था आहेत. अखंड नामस्मरण करीत राहिल्याने एक वेळ अशी येते की आपले नाम परा वाणीपर्यंत पोहोचते. नामस्मरण अखंड सुरु राहते. देहाला सुखदुःखे जाणवत नाहीत. माणूस त्याच्यापलीकडे जातो. तो अखंड आनंदाचे सेवन करतो.

स्वसंवाद :: 

१. मी ज्या घर, कुटुंब किंवा निसर्गरम्य ठिकाणी ‘विश्रांती’ शोधत आहे, ती मला कायमची शांतता देऊ शकते का ?

२. “केवळ नामाने भगवंत मिळेल का?” अशा ‘संदेहकारी’ (संशयी) विचारांमुळे मी माझे नामस्मरण अर्धवट सोडून पुन्हा संसाराच्या चक्रात तर अडकत नाहीये ना ? 

३. माउलींनी हरिपाठात म्हटल्याप्रमाणे, “वाया आणिक पंथा जाशील झणी” हे ठाऊक असूनही माझे मन इतर निरर्थक मार्गांवर का भटकत असते ? 

४. माझे नामस्मरण केवळ वरवरच्या ‘वैखरी’ वाणीत सुरू आहे, की ते माझ्या अंतर्मनाचा ठाव घेऊन ‘परा’ वाणीपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्नशील आहे?

– क्रमशः श्लोक श्लोक ८५  आणि ८६ 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका कोंकणी ब्राह्मणाची कहाणी.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ एका कोंकणी ब्राह्मणाची कहाणी.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

 दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन

पहिल्या महायुद्धात बर्लिन शहरावर बॉम्ब टाकणाऱ्या कोकणी ब्राह्मणाची कहाणी 

पहिला भारतीय वैमानिक म्हणजे दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन.. यांचा जन्म १० जुलै १८८३ रोजी रत्नागिरी येथे झाला. ‘दत्तू’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दत्तात्रयांचे शिक्षण पाचवी इयत्तेपर्यंतच झाले. परंतु त्यांच्या खोडकर व हट्टी स्वभावामुळे त्यांचे वडील लखूतात्या यांनी त्यांना घराबाहेर काढले. *

दत्तूचे नामकरण

दत्तू चालत कोल्हापूरला गेले आणि तिथून विनातिकीट मुंबईला पोहोचले. तिथे त्यांनी ‘मस्जिद बंदर’ येथे सहा महिने रेल्वे हमाल म्हणून काम केले. त्यानंतर ते माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये ‘वायरमन’ म्हणून रुजू झाले आणि पुढे ‘इंजिन ड्रायव्हर’ बनले. नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी आपले आडनाव बदलून ‘अँग्लो-इंडियन’ पद्धतीचे केले – ‘डी. लॅकमन पॅट’ (D. Lacman Pat) असे नामकरण केले. एके दिवशी अचानक, मुंबई बंदरात उभ्या असलेल्या ‘स्ट्रान्स फेल्स’ (Strance Fells) या जर्मन जहाजावर ते चढले आणि तपासणीच्या वेळी कोळशाच्या गोणीत लपून बसले. जहाज समुद्रात दूर गेल्यावर, त्यांनी जर्मन कॅप्टन हेन्रिक ज्योडेल यांची मनधरणी केली आणि वायरमन व इंजिन-देखभाल (maintenance) करण्याचे काम मिळवले. हेन्रिक त्यांना पासपोर्टशिवाय जर्मनीला घेऊन गेले आणि हॅम्बर्ग येथे त्यांना ‘मरीन इंजिनिअरिंग’चे प्रशिक्षण दिले. त्यानंतर दत्तू स्कॉटलंडला गेले आणि ‘ओशन किंग’ (Ocean King) या जहाजावर मरीन इंजिनिअर म्हणून रुजू झाले. 

मरीन इंजिनिअर ते पायलट

*१९११ मध्ये हे जहाज लिव्हरपूल आणि न्यूयॉर्क दरम्यान अनेकदा ये-जा करत असे. त्यांच्या इंजिनिअरिंगच्या कामावर खूश होऊन, १९१२ मध्ये त्यांना ‘तुकाराम’ या जहाजावर इंजिन बसवण्यासाठी मुंबईला पाठवण्यात आले. १९१४ मध्ये जेव्हा पहिले महायुद्ध सुरू झाले, तेव्हा दत्तू ब्रिटनच्या ‘वॉर ऑफिस’मध्ये (युद्ध कार्यालयात) गेले आणि त्यांनी ‘अँब्युलन्स कोअर’मध्ये (रुग्णवाहिका पथकात) काम मिळवले. त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांना ‘ससेक्स’ ब्रिगेडमध्ये ‘सैनिक’ म्हणून बढती देण्यात आली. तिथे त्यांना अत्याधुनिक शस्त्रे, बंदुका आणि तोफा चालवण्याचे प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष रणांगणावर लढण्यासाठी फ्रान्सला पाठवण्यात आले. पुढे त्यांची ‘रॉयल एअर फोर्स’मध्ये (हवाई दलात) निवड झाली. तिथे त्यांनी मालवाहू (कार्गो) आणि बॉम्बर विमाने चालवण्याचे कौशल्य आत्मसात केले आणि ते एक कुशल वैमानिक बनले. दाट धुक्याचा फायदा घेत दत्तू यांनी थेट बर्लिनवर बॉम्बफेक केली. शत्रूच्या ‘अँटी-एअरक्राफ्ट’ (विमानविरोधी) तोफांचा मारा चुकवत त्यांनी मोठी खळबळ उडवून दिली आणि थेट ‘कैझर पॅलेस’वर बॉम्ब टाकले. बर्लिनवर बॉम्बफेक करणारे जगातील पहिले ‘बॉम्बर पायलट’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. किंग जॉर्ज पाचवे यांनी स्वतः दत्तू यांच्या कोटावर लष्करी सन्मान आणि शौर्यपदक लावून त्यांचा गौरव केला. त्यांना ‘स्वर्ड ऑफ मिलिटरी ऑनर’ (लष्करी सन्मानाची तलवार) देऊन सन्मानित करण्यात आले. *

पायलट दत्तूच्याआयुष्यातील भाग्यवान क्षण

*या समारंभानंतर, दत्तू यांनी इंग्लंडच्या राजाला सांगितले की त्यांचे खरे नाव दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन आहे आणि ‘डी. लॅकमन पट’ (D. Lacman Pat) हे अँग्लो-इंडियन नाव धारण करूनच ते सैन्यात दाखल झाले होते. हे ऐकून राजाने अतिशय आनंदाने आणि कौतुकाने उद्गार काढले – “आमच्या हवाई दलात एक मर्द मराठा तरुण!” आणि त्यांनी दत्तू यांच्यावर चुकीचे नाव धारण केल्याबद्दल (impersonation) कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले. ही घटना २४ एप्रिल १९१९ रोजी घडली. त्यांची ‘लेफ्टनंट’ या पदावर पदोन्नती झाली आणि त्यांना दरमहा बाराशे रुपये इतका भरघोस पगार मिळू लागला! दत्तू उत्स्फूर्तपणे उद्गारले – “हा माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्यवान क्षण आहे!”* 

१९२१ मध्ये भारतात परत

*१९२१ मध्ये मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नरनी दत्तू यांना ‘शाही पाहुणे’ (Royal Guest) म्हणून आमंत्रित केले. दत्तू रत्नागिरीला परतले आणि त्यांनी अमरावतीच्या चंद्रताई शेवडे यांच्याशी विवाह केला. १९३० मध्ये ते निवृत्त झाले. त्यांच्या साहसी कामगिरीची माहिती २५ मार्च १९१९ रोजी ‘लंडन गॅझेट’मध्ये प्रकाशित झाली. लंडनची वर्तमानपत्रे आणि ‘ग्राफिक’ (Graphic) या नियतकालिकाने १३ मे १९१९ रोजी त्यांचे सविस्तर चरित्र प्रसिद्ध केले. प्रसिद्ध मराठी दैनिक ‘केसरी’नेही १३ मे १९१९ रोजी दत्तू यांच्या पराक्रमाचा सविस्तर वृत्तांत दिला. रत्नाकर शिवराम वाशीकर आणि अनंत लक्ष्मण मराठे यांनी लिहिलेले ‘इंडियाज फर्स्ट पायलट’ (India’s First Pilot) हे पुस्तक १८ ऑक्टोबर २००३ रोजी प्रकाशित झाले. दुसरे महायुद्ध (१९३९) – १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि लंडनहून आलेल्या आदेशानुसार, दत्तू यांच्यावर दिल्ली येथे ‘ऑल इंडिया मिलिटरी, नेव्हल अँड एअर फोर्स अकादमी’ (सर्व-भारतीय लष्करी, नौदल आणि हवाई दल अकादमी) स्थापन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. दत्तू यांनी या अकादमीमध्ये अनेक भारतीयांना प्रशिक्षण दिले. *

कर्करोगामुळे निधन

*१८ ऑक्टोबर १९४३ रोजी कर्करोगामुळे दत्तू यांचे निधन झाले. त्यांची पत्नी आणि मुलगा नागपूर येथे स्थायिक झाले. त्यांचे नातू – प्रभाकर पटवर्धन हे मुंबईतील कांदिवली येथे आपला स्वतःचा अभियांत्रिकी व्यवसाय चालवत आहेत. जे. आर. डी. टाटा यांचा उल्लेख नेहमीच ‘भारताचे पहिले वैमानिक’ असा केला जातो. त्यांनी १९२७ मध्ये विमान चालवले होते; परंतु त्याआधीच, १९१४ मध्ये दत्तात्रय पटवर्धन यांनी ‘बॉम्बर पायलट’ (बॉम्बफेकी विमानाचे वैमानिक) म्हणून इतिहास घडवला होता. त्यामुळे, त्यांनाच ‘भारताचे पहिले वैमानिक’ म्हणून सन्मानित केले जाणे आवश्यक आहे. * 

समस्त मराठी जनांना ही अभिमानास्पद गोष्ट आहे. 

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कसे घडले हे ?…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “कसे घडले हे ?…” – कवी : अज्ञात ☆ शोभा जोशी

भारताच्या संयुक्त कुटुंब प्रणालीला तोडण्याची कटकारस्थानं:

“कुटुंबं तुटली, की बाजार फुलतो” — हा केवळ एक विचार नाही, तर एक संपूर्ण नीती आहे.

आधुनिकतेकडे वाटचाल की लपवलेली गुलामी?

भारताची खरी ताकद काय होती?

मुघल आले, ब्रिटिश आले, अनेक परकीय आक्रमणकर्ते आले — पण एक गोष्ट अखंड राहिली — आपली संयुक्त कुटुंब प्रणाली.

हीच होती आपली खरी “Social Security”

ना पेन्शनची गरज, ना एकटेपणा, ना मानसिक आजारांचा कहर.

मग पाश्चिमात्य जगाला ही व्यवस्था का नकोशी वाटू लागली?

पश्चिमी देश म्हणजे वसाहतवादी — त्यांचा सर्वात मोठा धर्म म्हणजे बाजार.

पण भारतासारख्या देशात, जिथे लोक सुख-दुःख सामायिक करतात, कमी खर्च करतात, आणि सामूहिक विचार करतात— इथे त्यांचे उत्पादने विकली जाऊ शकत नव्हती.

मग एक हुशार योजना आखली गेली:

“कुटुंबं फोडा, माणसं एकटी करा, आणि प्रत्येकजण ग्राहक होईल. “

हा हल्ला कसा झाला?

माध्यमांनी संयुक्त कुटुंबांना दाखवलं:

* “भांडखोर”,

* “ओझं”,

* “प्रगतीला अडथळा”,

तर लहान कुटुंबं (nuclear families) दाखवली:

* “स्वातंत्र्य”,

* “आधुनिकता”,

* “स्वबळावर उभं राहिलेली”.

लक्षात ठेवा:किती TV मालिकांमध्ये सासू-सुनांच्या भांडणांचा शेवट “वेगळं होणं” हाच उपाय म्हणून दाखवला जातो?

 ग्राहकवाद (Consumerism): 

जेव्हा प्रत्येक जोडपं वेगळं राहायला लागलं:

* 1 कुटुंब = 4 घरे

* 1 TV = 4 TV

* 1 स्वयंपाकघर = 4 स्वयंपाकघरे

* 1 कार = 4 स्कूटर + 2 कार

बाजार तेजीत आला, पण समाज ढासळला.

या “सांघिक हल्ल्याचे” भारतात परिणाम काय झाले?

सामाजिक अधोगती:

* ज्येष्ठ मंडळी आता “ओझं”

* मुले एकटी (आणि स्क्रीनमध्ये हरवलेली)

* नातेवाईक “उपलब्धच नाहीत”

* संस्कारांचं स्थान आता “इन्फ्लुएन्सर्स” ने घेतलं आहे

मानसिक आरोग्याचा संकोच:

* पूर्वी आजी-आजोबांशी जे बोललं जातं, ते आता “काउंसलर” कडे जातं

* जेव्हा प्रेमातून एकटेपणा सुटायचा, तो आता उपचारांनी कमी करावा लागतो

 बाजाराचे फायदे:

* प्रत्येक समस्येसाठी एक प्रॉडक्ट

* प्रत्येक भावनेसाठी एक अ‍ॅप

* प्रत्येक सणासाठी “ऑनलाईन ऑर्डर”

“सबस्क्रिप्शनने संस्कारांची जागा घेतली आहे. “

 आजचा प्रश्न — आपण काय होत आहोत?

 “आधुनिकतेच्या” नादात आपण:

 * संयुक्त कुटुंबं म्हणालो “जुनाट”

* आईवडील झाले “अडथळे”

* कुटुंबं झाली “नको असलेली भावना”

* नातेसंबंध झाले “अनफॉलो”

 पण विचार केलाय का?

 * Amazonला फायदा होतो तेव्हा तुम्ही दिवाळीत एकटे खरेदी करता, कुटुंबासोबत बसत नाही.

* Zomato कमावतो तेव्हा तुम्ही आईच्या हातचं अन्न टाळता.

 * Netflix चालतो तेव्हा तुम्ही आजीच्या गोष्टी टाळता.

 

 उपाय: अजूनही वेळ गेलेली नाही

 संयुक्त कुटुंबं “ओझं” नाहीत, ती “मूल्यवान संपत्ती” आहेत.

* मुलांना ग्राहक म्हणून नव्हे, तर संस्कारित माणूस म्हणून वाढवा.

* ज्येष्ठांना घराबाहेर काढू नका — त्यांचा अनुभव Google पेक्षा श्रेष्ठ आहे.

* * सण “खरेदीसाठी” नव्हे, तर उत्सवासाठी साजरे करा.

अ‍ॅप्स नव्हे, प्रेम वाढवा— म्हणजे एकटेपणा आपोआप कमी होईल.

 

  निष्कर्ष:

 “पश्चिम जगाने व्यापारासाठी कुटुंबं फोडली, आणि आपण ‘आधुनिक’ होण्यासाठी आपली ओळख विकली. “

 आता थांबण्याची, विचार करण्याची आणि आपल्या संस्कारांकडे परतण्याची वेळ आली आहे — नाहीतर पुढची पिढी ‘संयुक्त कुटुंब’ म्हणजे काय, ते समजून घेण्यासाठी Google वापरेल.

 कवी : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्वर्ग-फूल… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ स्वर्ग-फूल नीलांबरी शिर्के 

रात्रीच उघडते दार

गंधास येतसे बहर

किती हा बाई !!

*

ब्रम्हाच घडवी जणू

गंध अणू रेणू

तयाचा बाई !!

*

भवताल स्वर्ग होतसे

फुल हे वेगळे कसे

भासते बाई !!

*

भोवती स्वर्ग भासतो

परागी ब्रम्हा वसतो

वाटते बाई !!

*

दिसता हे स्वर्ग-फूल

पाहता पडते भूल

हात जोडले जाई !!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आनंद वारी… ☆ शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – आनंद वारी ? शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

पाऊले चालली 

पालखी संगती

ज्ञानोबा माऊली 

मुखे नाम घेती

*

आनंदाचा कंद

हरी नाम छंद

सारे वारकरी 

नाचले ही धुंद..

*

असूनी संसारी

केले पुण्य भारी

म्हणूनी घडली

आनंदाची वारी..

कवयित्री : शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड – पुणे, मो.९५९५५५७९०८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares