☆ महावस्त्राचे पदर – भाग ५ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
‘आजोबा’ (सुरकुत्यांमधील शहाणपण)
’नात्यांचं महावस्त्र’ विणताना आपण आतापर्यंत आईची ‘मायेची पैठणी’, बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’ आणि आजीच्या ‘संस्कारांची शिदोरी’ अनुभवली. या महावस्त्राला अधिक बळकट, समृद्ध आणि आदरयुक्त बनवणारा, कुटुंबाचा भक्कम पाया असणारा आणि अनुभवाचा समृद्ध सुवर्णकळस चढवणारा पुढचा महत्त्वाचा पदर म्हणजेच ‘आजोबा’! आजोबा हे नातं म्हणजे वात्सल्य आणि शिस्तीचा एक अद्भूत सुवर्णमध्य आहे. ते कुटुंबासाठी केवळ एक ज्येष्ठ व्यक्ती नसतात, तर ‘वात्सल्याची सावली आणि संस्कृतीचा वारसा’ असतात, ‘अनुभवाचे संचित आणि सुरकुत्यांमधील जिवंत शहाणपण’ असतात.
मी आजी-आजोबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींना समृद्धीचे ‘महावृक्ष’ म्हणतो. जंगलातील वृक्ष आपण सगळ्यांनी पाहिले असतील. एक वृक्ष मोठा होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. कितीतरी उन्हाळे-पावसाळे त्यांनी पाहिलेले असतात; वादळ, वारा, पाऊस स्वतःच्या अंगावर झेललेला असतो. झाडाचे वय कसे काढतात, हे आपण विज्ञानातून शिकलो आहोत. झाडाच्या खोडाचा जेव्हा आडवा छेद घेतला जातो, तेव्हा त्यावर दिसणारी वर्तुळाकार वलये जेवढी जास्त, तेवढे त्या झाडाचे वय अधिक आणि ते झाड तेवढेच जुने व समृद्ध मानले जाते. अशाच सुरकुत्या जेव्हा आजोबांच्या अंगावर आपल्याला दिसतात, तेव्हा त्या केवळ वयाचे लक्षण नसून त्यांच्या समृद्ध आयुष्याचं आणि अथांग अनुभवाचं दर्शन घडवणाऱ्या असतात.
त्यांचं हे मोठेपण व्यक्त करणारे ‘पितामह’ आणि ‘मातामह’ हे अतिशय सार्थ व वजनदार शब्द आपल्या संस्कृतीत आहेत. वडिलांपेक्षाही ज्यांचं स्थान वरचं आहे, अशी आदरणीय व्यक्ती म्हणजे पितामह! आईचे वडील आणि वडिलांचे वडील म्हणजेच आपले आजोबा. महाभारत काळात भीष्मांना ‘पितामह’ म्हणून ओळखलं जायचं आणि त्यांचा केवढा आदर त्या काळातली सगळी मंडळी करायची, हे आपण जाणतोच. आजी-आजोबांचे छत्र आणि त्यांची निर्मळ, अपार माया ज्यांना लहानपणी लाभली, ती मुलं खरोखरच खूप भाग्यवान! आई-वडिलांपेक्षा देखील संस्कारांचं खरंखुरं बाळकडू आजी-आजोबांकडून नातवंडांना मोठ्या प्रमाणात मिळतं आणि त्यामुळेच त्यांचं व्यक्तिमत्त्व नकळत समृद्ध होत जातं.
आजोबांच्या चेहऱ्याकडे कधी आपण निरखून पाहिलं आहे का? त्यांच्या चेहऱ्यावरच्या आणि हातावरच्या प्रत्येक सुरकुतीत आयुष्यातील संघर्षाचा, कष्टाचा आणि यशाचा एक मोठा इतिहास दडलेला असतो. त्यांनी अनुभवलेलं जग, पाहिलेले ऋतूंचे बदल आणि आयुष्यात आलेले चढ-उतार हे संपूर्ण कुटुंबासाठी एखाद्या मार्गदर्शक दीपस्तंभासारखे असतात. जेव्हा संपूर्ण कुटुंब किंवा प्रपंच एखाद्या वैचारिक वादळात सापडतो, काय निर्णय घ्यावा हे सुचत नाही, अशा वेळी आजोबांचा एक शांत, धीरगंभीर शब्दही सगळ्या वादळाला शांत करतो आणि घरातील प्रत्येकाला जगण्याचं बळ देऊन जातो.
शिस्त आणि हट्टाचा सुवर्णमध्य म्हणजे आजोबा! काळाचा एक काळ असा असतो जेव्हा हेच आजोबा आपल्या मुलांसाठी (म्हणजे आजच्या आई-वडिलांसाठी) अत्यंत कडक, करारी आणि शिस्तप्रिय ‘बाबा’ असतात. त्यावेळी त्यांचा घरात एक वेगळाच दरारा असतो. पण जेव्हा घरात नातवंडं जन्माला येतात, तेव्हा त्या जुन्या करारी शिस्तीचं रूपांतर एका अथांग, मुलायम मायेत कसं होतं, हे पाहणं निसर्गाचा एक चमत्कारच आहे. म्हणतात ना, ‘मुद्द्लापेक्षा व्याज जास्त प्रिय असतं’, आजोबांच्या बाबतीत हे तंतोतंत खरं ठरतं.
मला आजोबांचं प्रेम दुर्दैवाने स्वतःच्या बालपणात लाभू शकले नाही; कारण माझे वडिलांचे वडील आणि आईचे वडील हे दोघेही माझा जन्म होण्याआधी, फार पूर्वीच देवानघरी गेले होते. परंतु आजोबा म्हणून माझ्या वडिलांचे जे निस्सीम प्रेम असायचे, ते माझ्या मुलांना मात्र भरभरून लाभले, याचा मला आनंद आहे. माझे वडील जेव्हा वारले, तेव्हा त्यांचे वय ८८ वर्षे होते. त्यांनी नातवंडांवर मायेची पाखर घालत त्यांना खूप प्रेम लावले. माझा मुलगा तर त्यांच्यावर अतिशय जीव लावायचा आणि त्यांच्याबद्दल त्याला प्रचंड आदर होता; तो त्यांना आदराने नेहमी ‘सरकार’ म्हणून हाक मारायचा!
माझी मुलगी लहान असताना जेव्हा घरात ‘गुलाबाई’ बसवायची, तेव्हा तिचे लाड पुरवण्यासाठी आजोबा बाजारातून कौतुकाने वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ घेऊन यायचे. आजोबा म्हणून लाभलेले त्यांचे ते भरभरून प्रेम आणि मायेची ऊब माझी मुलं आजही विसरू शकत नाहीत. आजोबा असण्याचं आणि नातवंडं खेळवण्याचं हे कौतुक प्रत्येक घराचे भाग्य वाढवत असतं.
आई-वडिलांचा ओरडा खाणाऱ्या, अभ्यास न केल्यामुळे किंवा हट्ट केल्यामुळे शिक्षा भोगणाऱ्या नातवंडांना हक्काची पाठराखण आणि संरक्षणाची भक्कम ढाल मिळते ती फक्त आजोबांच्यामुळेच! जेव्हा आई-बाबा मुलांवर रागावतात, तेव्हा आजोबा ढाल बनून मध्ये उभे राहतात. ते केवळ नातवंडांचे लाड करत नाहीत, तर वेळप्रसंगी मुलांची (आई-बाबांची) सुद्धा प्रेमळ शब्दांत कानउघाडणी करतात. “आम्ही तुम्हाला यापेक्षा जास्त मारलं असतं तर तुम्ही आज इथे नसता, मुलांना प्रेमाने शिकवा,” हा त्यांचा हक्काचा सल्ला घरातील वातावरण पुन्हा आनंदी करून जातो. घराचे, नात्यांचे आणि अगदी वास्तूचे जे सूक्ष्म कोने-कोपरे आई-बाबांना समजत नाहीत, ते आजोबांच्या एका शब्दाने उलगडतात.
आजोबा हे आपल्या संस्कृती आणि मूल्यांचा जिवंत दुवा आहेत. रामायण-महाभारताच्या गोष्टी, जुने लोकव्यवहार, नात्यांमधील ओलावा, कौतुकाचे कौटुंबिक रीतीरिवाज आणि संस्कारांची खरीखुरी शिदोरी नातवंडांपर्यंत पोहोचवण्याचं काम आजोबा अगदी सहजतेने, हसत-खेळत करतात. त्यांच्या ओसरीवर किंवा बैठकीत बसून घालवलेला वेळ हा केवळ खेळ नसतो, तर मुलांच्या नकळत त्यांच्या कोऱ्या मनावर घडणारं एक समृद्ध सुसंस्कारी विश्व असतं. आई-बाबा आपल्याला या जगात कसं जगायचं, कसं कमवायचं हे भौतिक ज्ञान देतात; पण आजोबा आपल्याला आपल्या मातीशी, आपल्या मुळांशी आणि परंपरेशी घट्ट जोडून ठेवतात.
निर्मळ मैत्रीचे हक्काचे ठिकाण म्हणजे आजोबा! वयाचे अथांग अंतर विसरून, आपल्या पांढऱ्या केसांची पर्वा न करता, नातवंडांच्या बालविश्वात लहान मूल होऊन रमेलेले आजोबा हे जगातले सर्वात उत्तम मित्र असतात. कधी ते नातवंडांबरोबर बुद्धिबळ खेळून त्यांना बुद्धिबळाचे डावपेच आणि धडे देतात, तर कधी त्यांना आनंद देण्यासाठी स्वतः घोडा बनून पाठीवर बसवतात. संध्याकाळच्या पाऊलवाटेवर त्या चिमुकल्या हातांचे बोट धरून चालताना जगाची ओळख करून देणारे आजोबा हे प्रत्येक घरातलं एक हळवं आणि अत्यंत आदरयुक्त पान असतं.
घरातल्या या वटवृक्षाचे कौतुक फक्त घरापुरते मर्यादित नसते. समाजात, ओळखीच्या माणसांमध्ये किंवा गावात जेव्हा चारचौघे एकत्र येतात, तेव्हा आजोबा आपल्या नातवंडांच्या गुणांचे, त्यांच्या छोट्या-छोट्या यशाचे कौतुक एवढ्या मोठ्या अभिमानाने सांगतात की, ऐकणाऱ्यालाही त्यांच्या भाग्याचा हेवा वाटावा. नातवंडांचे गुण सांगताना त्यांच्या डोळ्यांत चमकणारा तो सार्थ अभिमान कोणत्याही पदवीपेक्षा मोठा असतो.
कधी कधी मनात अशी शंका येते की, आपण भौतिक सोयी-सुविधा मिळवून खरंच प्रगती करत आहोत का? कारण आज एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, बदलत्या कौटुंबिक चौकटीमुळे हे चित्र खूपच बदलले आहे. एकत्र कुटुंब पद्धती जाऊन ‘विभक्त कुटुंबे’ आली आणि शहरीकरणाच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये आजची लहान मुले आजोबांच्या या अथांग मायेला मुकत चालली आहेत. आजी-आजोबांमुळे भक्कम असणाऱ्या घराच्या भिंती आज केवळ एक पोकळ डोलारा म्हणून उभ्या राहत आहेत की काय, असे मला वाटते.
आज ‘आजी-आजोबा’ म्हटले की अनेकांना थेट ‘वृद्धाश्रम’ डोळ्यांसमोर येतो. याला समाजाची प्रगती म्हणायचे की अधोगती? हा खरोखरच विचार करण्यासारखा गंभीर प्रश्न आहे. नात्यांचा हा भक्कम पदर आज काळाच्या ओघात विरत चाललेला आहे. मुले आजोबांच्या वात्सल्याच्या छायेला मुकत आहेत, ही आजच्या काळातील सर्वात मोठी हानी आहे. ‘नटसम्राट’ चित्रपटात किंवा नाटकात आजी-आजोबांचे आपल्या नातवंडांवर किती अथांग प्रेम असते, ते पाहून डोळे हमखास ओलावतात; परंतु आजकालच्या जगात घरात नातवंडांवर जीव लावणारी अशी ज्येष्ठ माणसे देखील काहींना नकोशी झालेली दिसतात.
घराला घरपण आणि नात्यांच्या या महावस्त्राला भक्कम आधार देणारा हा ‘आजोबा’ नावाचा पदर संपूर्ण घराला आपल्या मायेच्या धाग्यात घट्ट बांधून ठेवतो. हा पदर जेवढ्या सन्मानाने आणि आदराने घरात जपला जाईल, तेवढा आपला समाज आणि आपली पुढची पिढी अधिक सुदृढ व सुसंस्कारी होईल.
“गप्प बैस ग काय कटकट लावली आहेस सकाळपासून, इथे आधीच टेन्शन कमी आहे का,..? तुला जी भाजी वाटते ती कर… मी काही म्हणणार नाही…” तो खेकसला तिच्यावर तशी आवंढा गिळून बळच हसु चेहऱ्यावर आणत ती स्वयंपाक घरात आली… “चालेल त्यांना भोपळ्याची भाजी..” असं कापऱ्या आवाजात म्हणाली.
सासुबाईला बाहेरचा त्याचा कडाडणारा आवाज ऐकू आलाच होता. त्याचा चहा घेऊन त्याच बाहेर गेल्या. त्याच्या जवळ बसत म्हणाल्या, “सध्याच्या परिस्थितीमुळे आर्थिक ताण आहेत ह्याची तिलाही जाणीव आहे, म्हणून तर गेल्या दोन महिन्यात तुला रुपया न मागता स्वतःच्या भिशीचे पैसे ती घरात वापरतीये. पैठणी भिशीतून तरी घेऊ म्हणत अगदी रंग देखील ठरवला होता तिने, पण तुझ्यावरचं आर्थिक संकट बघुन माघार घेतली, तो पैसा घरात वापरला. तिची छोटीशी सन्मानाची नोकरी ह्या कोरोनाने गेली, नाहितर हातभार लावतच होती ना ती संसाराला.. आणि अगदी रस्त्यावर, उघड्यावर येण्यासारखी परिस्थिती नाही झाली ए आपली… हम्म, सगळे शानशोक बंद झाले पण ते तसे अन्न, वस्त्र,निवारा ह्या तीन गरजांव्यतिरिक्त होते… मग आहे त्यात समाधान मानायचं सोडून चिडचिड करून जगण्यातली मजा का घालवतोस रे….?” म्हणत आई जरा रागावली त्याला..
तितक्यात राजुचा फोन वाजला. तो उठून बाल्कनीत गेला. मिस कॉलच होता तो. आता त्याला कॉलबॅक करणं आवश्यक होतं, कारण बांधकामाच्या साईटवरचा तो अगदी खास माणुस होता. पण गेल्या दोन महिन्यापूर्वी एका साईटवर काम करताना हॅण्डग्रँडर हातातुन निसटून पूर्ण गुढघ्याला वळसा घालून गेलं होतं. रक्ताची कारंजी उडाली होती, आणि राजू त्यादिवसापासून कामावर नव्हता… बायकोने फतवाच काढला होता.. लंगडत, धडपडत कामावर जायचं नाही, तर पूर्ण बरं वाटेल तेंव्हाच जायचं.. त्यामुळे ह्या दोन महिन्यांत भेट नव्हती… त्याची खरंतर फार गरज होती कामावर, खुप विश्वासू होता.. बहुतेक हा कामावर येईल आता म्हणूनच फोन असेल.. असा विचार करत त्याला कॉलबॅक केला, “हॅलो बोल राजू,.. येतोस कामावर आज??”
तिकडून आवाज आला..”सर कामावर दोन दिवसात येईल, पण आज मला थोडे पैसे पाहिजे.. उद्या मदर्स डे आहे.. पोरगा त्याच्या आईसाठी भेटकार्ड बनवत होता तेंव्हा मला कळलं. मला आईला साडी घ्यायची आहे. थोडे पैसे देता का,..?”
त्याचं वाक्य पुर्ण होण्याच्या आत हा हसायला लागला… “अरे राजा, तूझ डोकं आहे ना ठिकाण्यावर, अरे.. तुझी आई दोन वर्षांपूर्वी वारली ना, मग कोणाला गिफ्ट घेतो तू,..?”
राजू तिकडून म्हणाला, “हसु नका साहेब, ह्या दोन महिन्यात माझी बायको माझी आई झाली होती.. लहान लेकरासारखं तिनं माझं सगळं केलं… अगदी खाऊ सुद्धा घातलं.. तिनं पाच पाच घरं जास्त भांडे घासायची कामं घेतली… माझ्या कमाईची तिनं भरपाई केली… मला कुठलाही ताण घेऊ दिला नाही… आता मी पूर्ण बरा झालोय सर… आपल्या त्या साईटचं काम मीच पूर्ण करील, पण मला थोडे पैसे द्या.. बायकोला सेमी पैठणी घेऊन देतो.. पैठणी नाही पण सेमिपैठणी तरी घालायची आहे तिला, आणि खुप फोटो काढायचे स्वप्न आहे तिचं… मित्राचं घरगुती दुकान आहे, म्हणाला, ‘तू ये, देतो तुला..’ मला तीन हजार द्या सध्या… आपलं काम पन्नासच ठरलेलं आहे ना, मी नक्की करीन ते पूर्ण, आणि आईला नाही कधी साडी घेऊ शकलो पण आता ह्या बाईत गावलेल्या आईला तरी घेऊ द्या… साईटवर येऊ का पैसे घ्यायला..?”
गडबडत हा म्हणाला, “हो तासाभरात ये..” म्हणत याने फोन ठेवला.. आणि सहज बाल्कनीत नजर फिरवली… छोट्या छोट्या कुंड्यात, वाफ्यात बराच भाजीपाला लावलेला होता.. वेलाला दोडकी, कारली लटकत होती… कडीपत्ता हवेवर डोलत होता.. आपण एकदिवस ओरडलो होतो… ‘किती खर्च करता त्या भाजीपाल्यावर,..?’ त्याचं हे उत्तर होतं. त्याकडे आपलं लक्ष पण नाही, राजु सारखा माणुस तिची किती किंमत करतो आणि आपण हिला किती गृहीत धरतो… आई म्हणते तसं इतकीही आपली परिस्थिती बिकट नाही, फक्त मन बाहेरच्या परिस्थितीने गडबडलं आहे… आपण उगाच ह्या घरच्यांना धारेवर धरतोय…
तो विचार करत होता तेवढ्यात आईने हाक मारली… “डबा तयार आहे रे….”
निघताना तो हळूच आईला म्हणाला, “हिने भिशी कोणत्या रंगाच्या पैठणीसाठी लावली होती गं?… आणि तुझ्याकडे होती ना एक पैठणी..”
आई म्हणाली, “अरे मला मेलीला आता ह्या कॉटन शिवाय काही सहनही होत नाही म्हणून तुझ्या ताईने पळवली ती तुझ्या लग्नाआधीच, नाहीतर हिला दिलीच असती की मी… आणि माझी जांभळी होती रे, तिला हिरवीगार पैठणी घ्यायची आहे… आता कधी योग येतो की बिचारीला,….?”
साईटवर राजु वाटच बघत होता… ह्याने पैसे दिले आणि म्हणाला, “राजा मलाही घेऊन चल ना त्या दुकानात… मलाही बघू दे साडी, आईला आणि बायकोला घेतो…”
सेमीपैठणीतून राजाने लाल रंग निवडला. ह्याने पण हिरवा रंग घेतला. आईला कॉटनची साडी घेतली. दुकानाबाहेर पडताना त्याने पाणावलेल्या डोळ्यांनी राजाचे आभार मानले, “आई तर आहेच माझी, पण बायकोतली आई शोधून दिलीस तू,..”
दुसऱ्या दिवशी दोघी सोफ्यावर बसवल्या.. औक्षण करून त्यांच्या डोक्यावर फुलं टाकत म्हणाला… “हॅप्पी मदर्स डे.. मला माहित आहे आई तुला हि पाश्चिमात्य पद्धत आवडत नाही, मनात प्रेम तर असतंच पण मला वाटतं प्रेम व्यक्त करायला ठरवलाय एखादा दिवस तर काय हरकत आहे ना, आणि तो हि आईसाठी आहे… सेलिब्रेशन घरात तर करतोय…” म्हणत त्याने साड्या दोघींसमोर धरल्या…
तिला तर खूपच आवडला तो हिरवागार रंग… आईचे तर डोळे पाणावले, “अरे मला कशाला आणत बसला..?”
त्याने आईला जवळ घेतलं, “आई, सुनेसाठी मला समजवणारी ग्रेट आई आहेस तू,.. तुला तर पाहिजेच, आणि राणीसरकारची भिशी सगळा घराचा खर्च पेलतीये तर त्यासमोर तर हि छोटीशी भेट आहे… पण पुढच्या वेळी अगदी ओरिजनल पैठणी घेईल मी तिला.. आणि ते हि ‘मदर्स डे’ ला,.. कारण बघ ना, ती बायको असली तरी… मला मुलासारखं समजुन तर पटकन सावरून धरलंय तिने… आपले अहंकार बाजूला सारून जी बाई नवऱ्यावर प्रेम करू शकते ना आई ती त्याची बायकोतली आई असते…”
आईने त्याच्या डोक्यावर हात फिरवला… “अरे प्रत्येक स्त्री मध्येच हे आईपण असतं रे…”
तितक्यात राजुने व्हिडीओ कॉल केला. “साहेब तुमचे आभार. आमची आई एकदम खुश आहे बघा…”
ती कष्टाने रापलेली त्याची बायको त्या साडीत आनंदी दिसत होती… आईने तिचं फोनवर कौतुक केलं. नवऱ्याने आपला समाजात वाढवलेला सन्मान बघुन ती आणखीनच खुलली…
फोन ठेवला तर समोर ती पैठणी नेसुन आली. त्याला ती आताही आपल्या आईसारखी दिसली, अगदी शांत, समाधानी, आनंदी… गॅलरीत बहरलेल्या हिरव्यागार बागेसारखी .. ..
☆ “माझी वारी ! माझा अनुभव !” – लेख क्र. ७ ☆ श्री संभाजी बबन गायके☆
☆
दिंडी अशी वाटचाल करते!
पंढरपूर जर समुद्र आहे अशी कल्पना केली तर या समुद्राला येऊन मिळणा-या दिंड्या या नद्या म्हटल्या पाहिजेत. ज्ञानोबाराय गंगा, तुकोबाराय यमुना तशाच इतर संतांच्या दिंड्या जणू लहान-मोठ्या नद्या, ओढे म्हणावेत अशा. पंढरीनगरीमध्ये प्रवेश करण्याआधी सुमारे पाच-आठ मैलांवर वाखरी नावाचं छोटं गाव आणि मोठं माळरान लागतं. दिंड्यांचे हे सर्व प्रवाह या ठिकाणी एकजीव होतात. ज्ञानदेव-निवृत्तीनाथ-मुक्ताई येथेच एकमेकांना भेटतात. सोपानदेव तर माउलींच्या सोबतच चालत आलेले असतात. तिकडून तुकोबारायही या मेळ्यात सामील होतात. दुपारचा उभे रिंगण सोहळा याच माळावर रंगतो. पंढरी डोळ्यांना दिसत असते. थकलेल्या पावलांच्या मनातून थकवा आता नाहीसा झालेला असतो. आता केवळ प्रतीक्षा उरलेली असते.
रिंगण सोहळा म्हणजे वारीतील लष्करी शिस्तीचा परिपाठच असतो जणू. यानंतर पावले पंढरीच्या दिशेने चालायला लागतात. अंतर तसे इतर मुक्कामांच्या मानाने अगदीच कमी असले तरी सर्व प्रवाह एकत्रित झाल्याने दिंड्या रात्री उशीरापर्यंत पंढरीत पोहोचत असतात. अनेक दिंड्या मुख्य मंदिरापासून काहीशा दूरवर मुक्कामी असतात राहुट्या ठोकून. ज्यांच्या गावच्या धर्मशाळा पंढरीनाथाच्या मंदिराच्या परिसरात आहेत, त्यांना तसे सोयीचे जाते. आता पंढरपूरचा विस्तार चारही बाजूंनी झालेला आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांनी पंढरपूर परिसरात जागा विकत घेऊन स्वत:च्या धर्मशाळा उभारल्या असून त्यांची बांधकामे दानशूर लोकांच्या आर्थिक साहाय्यातून होत असतात. धर्मशाळांत स्वयंपाकाची स्वतंत्र व्यवस्था असते. त्यासाठी लागणारी भांडी, शिधाही दान स्वरूपात प्राप्त होत राहतो. वारीत दिंडीच्या भोजनाचा खर्च करण्याला पंगत देणे असे म्हटले जाते. द्वादशीला दिली जाणारी पंगत विशेष महत्त्वाची समजली जाते. या दिवशी सूर्योदयापूर्वीच एकादशीचा उपवास सोडून भोजन करण्याचा संकेत आहे. त्यामुळे द्वादशीला अगदी भल्या पहाटे स्वयंपाकाची तयारी सुरु केली जाते.
परंतू एका वारक-याचा इथपर्यंतचा प्रवासही समजून घेण्यासारखा असतो. गावातील किंवा आसपासच्या काही गावांतील वारकरी मंडळी एकत्र येऊन दिंडीची स्थापना करतात. या दिंडीस परिसरात होऊन गेलेले संत, अध्यात्मिक गुरु, ग्रामदैवत यांचे नाव दिलेले असते. ही दिंडी संबंधित पालखी सोहळ्याकडे नोंदवावी लागते. त्यानुसार सोहळा व्यवस्थापन या दिंडीला नोंदणी क्रमांक देतात. या नावाचे फलक तयार करून ते दिंडीच्या वाहनांवर लावले जातात. सोहळ्यात जे रथ चालतात त्या रथाच्या लगेचच लागून पुढे चालणारी दिंडी ही रथापुढे क्रमांक एक अशी ओळखली जाते. तिच्या पुढची क्रमांक दोन अशा क्रमाने इतर दिंड्यांना क्रमांक मिळतात. तसेच रथामागील दिंड्यांच्या बाबतीत होते. रथामागे लगेच असणारी दिंडी ही रथामागे दिंडी क्रमांक अशी ओळखली जाते. या दिंड्या याच क्रमाने वारीत चालाव्यात असे शिस्तीसाठी अपेक्षित असते. आणि ही शिस्त पाळण्याचा प्रयत्न नेटाने केला जातो. सोहळ्याचे चोपदार ही शिस्त पाहतात.
सोहळ्यापुढे चौघड्याचे वाहन असते. तुतारी वादक असतात. मानाचा अश्व असतो. त्यासाठी खास गणवेशधारी स्वार नेमलेले असतात. पालखी रथ ओढण्यासाठी बैलांच्या जोड्या वापरल्या जातात. आणि हा मान आपल्या बैलांना मिळावा, यासाठी शेतकरी बांधव भक्तीभावनेने चढाओढ करतात.
पालखी जागेवरून पुढे जाण्यासाठी निघण्यापूर्वी शंखनाद केला जातो. चोपदारांच्या हातात मानदंड असतो. त्या दंडाच्या इशा-यावर थांबणे, पुढे जाणे या क्रिया होतात.
पालखी रथापुढे दिंड्या क्रमाने उभ्या राहिल्या की चोपदार सूचना आणि इशारा देतात. यात पालखी कुठे विसावा घेणार आहे, कुठे मुक्काम करणार आहे, किती वाजता प्रस्थान ठेवणार आहे, याची माहिती दिली जाते. रात्रीच्या मुक्कामासाठी पालखी तळावर पोहोचल्यानंतर समाज आरती होण्यापूर्वी पालखी प्रमुख, चोपदार दिंड्यांना सूचना देतात, हरवल्या-सापडलेल्या वस्तूंची यादी वाचून दाखवली जाते, पूर्वी पोस्टखाते दिंडीमध्ये पोस्टकार्ड्सही पोहोचवत असे. म्हणजे दिंडी क्रमांक आणि नाव लिहिलेले पत्र गावातील पोस्ट ऑफिसमध्ये द्यायचे… पोस्टखाते वारीमार्गावर ज्याठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी सोहळा प्रमुखाकडे ही पत्रे नेऊन देत असे. दिंडीत चुकलेल्या व्यक्तींच्या नावांचाही पुकारा केला जातो. अशावेळी एखाद्या दिंडीला काही सूचना द्यायच्या असतील, तक्रार नोंदवायची असेल अशावेळी संबंधित दिंडीमधील लोक टाळांचा गजर करीत राहतात. तो ऐकून सोहळा प्रमुख त्यांच्याशी तेथेच संपर्क साधतात. त्यानंतरच आरती म्हटली जाते. आणि मगच वारकरी आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणांकडे जातात. पालखीतील पादुकांचा मुक्काम खास उभारण्यात आलेल्या तंबूत किंवा गावातील मंदिरात असतो. स्थानिक लोक या ठिकाणी पादुकांचे दर्शन घेऊ शकतात. गावकरी लोक वारकरी मंडळीची भोजनाची व्यवस्था करतात. पालखी तळावर सोहळ्यातर्फे मुक्कामाच्या जागी कीर्तन आयोजित केले जाते.
इकडे दिंडीमधील वारक-याचा दिनक्रम साधारण असा असतो. पहाटे लवकर उठून आपापली वळकटी व इतर साहित्य दिंडीच्या वाहनात ठेवायचे. आजचे आंघोळीचे कपडे, आवश्यक वस्तू, अल्पोपाहाराचे पदार्थ सोबत घ्यायचे. मुक्कामाच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या समुद्यासाठी प्रात:र्विधीसाठी जागा उपलब्ध नसते. यामुळे बरेच वारकरी लवकर उठून पालखीच्या मार्गावर बरेच अंतर पुढे चालत जातात. पूर्वी पालखी मार्गावर शेती, मोकळ्या जागा, विहिरी, तळी इत्यादी भरपूर असे. पुढे चालत गेलेले वारकरी योग्य ठिकाण शोधून आंघोळ, अल्पोपहार उरकून आपल्या दिंडीची प्रतीक्षा करीत रस्त्याच्या कडेला थांबून राहतात. आंघोळीसाठी वापरलेले कपडे शक्य होतील तिथे धुवून वाळायला घातले जातात. गावातून रथ निघाल्यानंतर आपण जिथे बसलेलो असू तिथपर्यंत आपली दिंडी येण्यास बराच अवकाश मिळतो. आपल्या दिंडीचे विणेकरी आणि इतर सभासद चालत येत असतात. आपण सोहळ्याच्या रथाच्या मार्गावरची माती कपाळाला लावायची आणि वाटेवर पाऊल टाकायचे. रथ, रथापुढे चालणारा अश्व आपल्याला भेटेल तिथे नमस्कार करून घ्यायचा आणि वाट चालायला लागायची.
कोणताही मोठा पालखी सोहळा एकावेळी सलग तास-दीड तासापेक्षा जास्त वेळ सलग चालत नाही. वाटेत अनेक गावे लागतात. स्थानिक नागरिक पालखीच्या दर्शनार्थ मार्गावर मोठ्या संख्येने उभे असतात. त्यांच्यासाठी काही क्षण रथ थांबवला जातो. वाटेत विसावा घेण्याच्या जागा ठरलेल्या असतात. त्यामुळे रथ ओढणारे बैल, चालणारे वारकरी यांना अल्प विश्रांती मिळत राहते. दुपारच्या भोजनाच्या ठिकाणी दिंडीची वाहने आधीच येऊन थांबलेली असतात. आपल्याकडील पिशवी या वाहनांत ठेवायची. दुपारचे भोजन उरकायचे आणि थोडे पुढे चालत जाऊन विश्रांतीसाठी जागा शोधायची. काही वेळाने रथ निघतो… आपली दिंडी शोधायची आणि सामील व्हायचे. दिवसभर आपण आणि दिंडी यांची गर्दीमुळे चुकामुक झालेली एकवेळ चालते. पण दिवसाच्या शेवटी मात्र दिंडी सोडून चालत नाही. प्रचंड गर्दी असते. दिंड्यामध्ये शिस्तबद्ध वाटचाल असते. कुणी कुणाला मध्ये शिरू देत नाही. अन्यथा माणसांची चुकामूक होऊ शकते. अंधार पडू लागलेला असतो.. त्यामुळे आपापल्या दिंडीसोबत चालत राहिले की मुक्कामाची जागा शोधण्याची वेळ येत नाही… आपल्या दिंडीच्या चोपदारांच्या मार्गदर्शनानुसार झपाझप चालत राहायचे की झाले! दिंडीच्या वाहनातून आपली वळकटी खाली घ्यायची, आपल्या ठरलेल्या तंबूत, राहुटीत वळकटी घालायची आणि क्षणभर विश्रांती घ्यायची. काही वेळाने रोजच्या नियोजनाप्रमाणे प्रवचनाचा कार्यक्रम असतो. तो झाल्यावर पंगती पडतात. रात्रीच्या अंधारात, गर्दीत तंबूपासून दूर गेले की पुन्हा तो तंबू आणि दिंडी सापडणे अवघड होऊन जाते… कारण सर्वच तंबू सारखेच भासतात. रात्री अनोळखी लोकांना कुणी त्यांच्या तंबूत आश्रय देईलच असे नसते. अशावेळी पोलिसांची मदत घ्यावी लागते. जेवण उरकल्यावर ज्यांना आवड, सवड असेल असे नेमाचे लोक दिंडीच्या मुख्य तंबूत जमतात. इथे भजनाची व्यवस्था असते. वारकरी रात्री उशीरपर्यंत अभंग गात बसतात… याला जागर म्हणतात… रात्र पुढे सरकत जात असते… कुठे ना कुठे भजन सुरूच असते… दमलेले वारकरी झोपून जातात. काही मुक्काम तर अक्षरश: स्मशानांच्या बाजूलाही असतात. माळरान असते, काटेकुटे असतात, अंधार असतो… पण शारीरिक थकवाच इतका असतो की कशाचाही विचार मनात येत नाही. हल्ली मोबाईल आणि इतर साधने आहेत. पूर्वी तारीख आठवत नसे, वेळ समजत नसे. घरची आठवण येत नसे. काही संपर्काचे साधनही नसे… आणि ते बरेच होते. हल्ली मोबाईलमुळे चार्जिंगची काळजी वाढली आहे!
आणखी एक गोष्ट वारकरी करतात. जसजसा सोहळा पंढरपूरजवळ जात राहतो, काही ठिकाणी दोन दोन दिवस मुक्काम पडतो अशावेळी काही वारकरी मिळेल त्या वाहनांनी पंढरपूरला पोहोचतात. दर्शन घेतात आणि पुन्हा मुक्कामाच्या जागी परततात. कारण यात्रा काळात विठ्ठलदर्शन करायला प्रचंड मोठी बारी लागते. नेमाचे वारकरी मात्र दोन दोन दिवस बारीत उभे राहून दर्शन करूनच माघारी फिरतात! काही ज्येष्ठ वारकरी पुढील चार महिने अर्थात चातुर्मासानिमित्त तिथेच मुक्कामी राहतात. तर काही गुरु पौर्णिमेच्या काल्याचा प्रसाद घेऊनच घरी परततात.
पंधरा-अठरा दिवस घरापासून दूर राहिलेले वारकरी मात्र द्वादशीचा उपवास सोडला रे सोडला की काहीही करून घरी परतण्याचा प्रयत्न करतात. माघारी जाणारे दिंडीची काही वाहने, एस. टी. बसेस एकदम भरभरून जातात… संसाराची ओढच तशी असते. पूर्वी बहुसंख्य वारकरी शेतकरी वर्गातून आलेले असत. शेतीची कामेही डोक्यावर असत. पुढे नोकरदार मंडळी, व्यावसायिक लोकांना रजेचा प्रश्न असतो. पुण्याच्या आसपासच्या गावांत राहणा-या काही जणांना अगदी आळंदी किंवा देहूपासून वारीत सहभागी होता येत नाही. अशी मंडळी मग पुण्यापासूनच्या पुढच्या मुक्कामी दिंडीत सामील होतात! हे अनेक दृष्टीने सोयीचे ठरते.
काही लोक दरवर्षी एक एक मुक्काम चालतात. म्हणजे सासवड येथे आपले वाहन आधीच पाठवायचे किंवा येताना वाहन व्यवस्था पहायची. पुण्यातून सासवडला चालत जायचे. सासवडवरून रात्री पुण्यात माघारी यायचे. पुढील वर्षी सासवडला रात्री पोहोचायचे. वाहन पुढील मुक्कामी पाठवायचे… सासवड ते जेजुरी चालत जायचे व रात्री पुण्यात परत यायचे! लोक अशा नानाप्रकारे वारीत सहभागी होत असतात.
वारीपूर्वी चालण्याचा सराव केलेला बरा असतो. अंगमेहनत, दूर अंतर चालणे इत्यादीची सवय असलेल्या शेतकरी, ग्रामीण भागातील वारका-यांना वाटचालीचे फारसे श्रम वाटत नाहीत, म्हणून आजही नव्वदी, शंभरी गाठलेले ग्रामीण भागांतील वारकरी भेटू शकतात. शहरी लोकांना मात्र सराव आवश्यक असतो. दूरचे अंतर सलग चालण्यासाठी पादत्राणे योग्य निवडावी लागतात. त्यांचा सराव पायांना करून घ्यावा लागतो.. अन्यथा त्रास होऊ शकतो! नेहमीची औषधे सोबत ठेवणेही श्रेयस्कर ठरते! प्रत्येक दिंडी खर्चासाठी ठराविक शुल्क अर्थात भिशी आकारते. वारी तशी सोपी आहे… मानसिक तयारी मात्र पाहिजे!
अर्थात परिस्थितीनुसार परंपरा, पद्धती निरनिराळ्या असू शकतात.
आपल्याला मदत करणाऱ्याचे अभिवादन करण्यात किंवा त्यांना धन्यवाद देण्यात आपण (म्हणजे बरेच जण) नेहमीच चिक्कूपणा करत असतो, कदाचित त्यात स्वतःचा आपण कमीपणा समजतो.
आपण ऑटो रिक्षा ने प्रवास करतो, उतरल्यावर मीटर बघून पैसे देतो, आणि व्यवहार पूर्ण करतो आणि चालायला लागतो. आपण थोडासा पॉज घेतला आणि विचार केला, तर लक्षात येईल कि काहीतरी मिसिंग आहे. वेड्यावाकड्या ट्रॅफिक मध्ये ड्रायव्हर नी आपल्याला आरामदायी होईल अशी रिक्षा चालवली, आपल्याला त्यांनी सुरक्षितपणे आपल्या इच्छित स्थळी पोहचवले, त्याबद्दल बोलून आणि मनापासून त्यांना धन्यवाद द्यायला काय हरकत आहे. थोडं कौतुक करायला काय हरकत आहे. पुढच्या वेळेस असं करून बघा आणि ड्रायव्हरच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघा.
आपण रस्त्याच्या बाजूला हातगाडीवर शहाळ्याचं पाणी पितो, पैसे देतो आणि पुढे निघतो. तोंडाला शहाळ्याचा एक वेगळाच गोडवा आलेला असतो आणि पोट पण शांत झालेले असते. शहाळ सोलायला चांगलंच कठीण असतं आणि हाताला चाकू लागण्याची भीती असतेच असते. शहाळी विकणारा प्रेमानी शहाळं सोलून त्यामध्ये स्ट्रॉ ठेवून आपल्या हातात देत असतो. शहाळं पिऊन झाल्यावर – दादा, धन्यवाद. शहाळ एकदम गोड होतं. असं त्यांचं अभिवादन करायला काय हरकत आहे.
मंडळी, धंदा म्हटलं की शहाळं सोलून देणं आणि आपण पैसे देणं, हे व्यवहार तर होतच असतात. पण अभिवादन केल्यामुळे समाधानाची देवाण-घेवाण पण होत असते. आणि यामुळे समोरच्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य हमखास उमटतं आणि तेच आपल्याला एक वेगळच समाधान देऊन जातं.
आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या घडामोडींमध्ये आपला नेहमीच अनेक लोकांशी संबंध येतो, ज्यांच्या सेवांचा आपल्याला उपयोग होत असतो. चांगल्या कामाबद्दल समोरच्याचं कौतुक करणं, त्यांचे आभार मानणे, ह्या गोष्टी म्हटलं तर खूपच छोट्या असतात, पण त्या आपल्या आणि समोरच्याच्या चेहऱ्यावर आनंद आणतात आणि आपल्या मनाला एक वेगळचं समाधान देत असतात.
निर्जीव वस्तूंचं कौतुक करण्यात किंवा त्यांना धन्यवाद देण्यात पण एक वेगळाच नक्की आनंद असतो. आपण रोज सकाळी झोपून उठतो, उठल्यावर बाथरूम टॉयलेट वगैरे क्रिया सुरू होतात. पण बेड जवळ दोन मिनिट थांबून, बेडवरची चादर नीट करून / पांघरूण घडी करून, बेडला नमस्कार केला आणि म्हटलं – तुझ्यामुळे मला छान विश्रांती घेता आली, माझा कालचा दिवसभराचा थकवा पूर्ण गेला आणि आता मी आजच्या रुटीन करता एकदम फ्रेश आहे. खूप खूप धन्यवाद.
असं केल्यावर बघा मन किती प्रसन्न होतं आणि छान समाधान मिळतं.
आपली पॉझिटिव्हिटी वाढवण्याकरता मनाचे समाधान हे उत्तम खत आहे, असं जाणकार मंडळी सांगतात. आणि — Life without positivity is big Zero
☆ भारतीय विद्यार्थ्यांचा एक निर्भेळ विजय… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर☆
☆
मी अनेक वर्षे JEE भौतिकशास्त्र शिकवले आहे. तो पेपर तीन तासांत हुशार मुलांनाही थकून टाकतो.
ही परीक्षा पाच तास सिद्धांत आणि पाच तास प्रयोगशाळेतील कामाची आहे, आणि या पाच जणांनी त्यात जवळजवळ परिपूर्ण गुण मिळवले.
खरं तर काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो.
आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड ही शालेय भौतिकशास्त्राची जागतिक स्पर्धा आहे. ही ५६ वी आवृत्ती होती.
ही स्पर्धा कोलंबियातील बुकारामंगा येथे ५ ते १२ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
३८१ विद्यार्थी. ८५ हून अधिक देश. त्यातील प्रत्येक जण आपापल्या देशातील सर्वोत्तम भौतिकशास्त्राचा विद्यार्थी होता.
भारताने पाच मुलांना पाठवले होते.
… ते पाचही जण सुवर्णपदक घेऊन परत आले.
त्यांची नावे आहेत:
पुण्याचा कनिष्क जैन. इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाळे. दिल्लीतील द्वारका येथील ऋषित गर्ग. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया. अहमदाबादचा स्वरित जोशी.
आपण शंभर क्रिकेटपटूंना त्यांच्या टोपणनावाने ओळखतो, पण या मुलांपैकी एकालाही नाही.
त्या निर्भेळ विजयामुळे भारत संयुक्तपणे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. चीन, रशिया, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत बरोबरी साधली.
हे असे देश आहेत जे विज्ञान शिक्षणात प्रचंड पैसा आणि राष्ट्रीय अभिमान ओततात.
– – – आपण त्यांच्या बरोबरीने उभे आहोत.
आता, परीक्षा नेमकी कशी होती ते पाहूया.
दोन पेपर्स. प्रत्येक पाच तासांचा.
सैद्धांतिक पेपरमध्ये तीन प्रश्न होते.
– – एक पॅरामॅग्नेटिक कूलिंगच्या थर्मोडायनॅमिक्सवर. एक ओझोनच्या फोटोआयनायझेशनवर. एक इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन जोड्यांच्या डायनॅमिक्सवर.
– – प्रायोगिक पेपर हा प्रयोगशाळेत आणखी पाच तासांचा होता, ज्यात द्रवांमधील उष्णता हस्तांतरण आणि थर्मोडायनॅमिक प्रक्रियांचा अभ्यास करायचा होता.
… याचा अर्थ असा की, तुम्हाला अशी उपकरणे दिली जातात जी तुम्ही कधीही पाहिलेली नसतात, आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा प्रयोग तयार करावा लागतो, स्वतःची मोजमापे घ्यावी लागतात, चुका दुरुस्त कराव्या लागतात आणि अचूक उत्तरापर्यंत पोहोचावे लागते.
बहुपर्यायी प्रश्न नाहीत. कोणतेही शॉर्टकट नाहीत. पॅटर्न ओळखण्याची सोय नाही. एकतर तुम्हाला भौतिकशास्त्र समजते किंवा तुम्ही तिथे पाच तास बसून राहता.
एचबीसीएसईच्या मते, भारतीय विद्यार्थी सिद्धांतामध्ये जवळपास परिपूर्ण आणि प्रात्यक्षिकांमध्येही उत्कृष्ट होते.
आता, आयपीएचओमधील (IPhO) भारताचा हा २७ वा सहभाग होता.
या सर्व वर्षांमध्ये, सुमारे ४४ टक्के भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण, ४१ टक्क्यांनी रौप्य, तर १० टक्क्यांनी कांस्य पदक जिंकले आहे.
– गेल्या दहा वर्षांत, प्रत्येक भारतीय विद्यार्थी पदक घेऊन घरी परतला आहे. ६२ टक्के सुवर्ण, ३८ टक्के रौप्य.
– गेल्या दशकात एकही विद्यार्थी रिकाम्या हाताने परत आलेला नाही.
– – एका वर्षात पाच सुवर्णपदके जिंकण्याची घटना फक्त दोनदाच घडली आहे. या वर्षी आणि २०१८ मध्ये.
तर हे कोणी उभारले?
हा कार्यक्रम *एचबीसीएसई, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र* द्वारे चालवला जातो. हे टीआयएफआरच्या (TIFR) अंतर्गत येते, जे अणुऊर्जा विभागाच्या अखत्यारीत येते.
ते संपूर्ण प्रक्रिया चालवतात.
– एक राष्ट्रीय परीक्षा, त्यानंतर एक राष्ट्रीय ऑलिम्पियाड, मग एक कठोर निवड आणि प्रशिक्षण शिबिर, आणि देशातील प्रत्येकातून, पाच मुले विमानात बसतात.
– या टीमचे नेतृत्व एचबीसीएसई-टीआयएफआरचे प्राध्यापक अन्वेश मजूमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या डॉ. लीना जोशी यांनी केले.
– वैज्ञानिक निरीक्षकांमध्ये आयआयएसईआर कोलकाताचे प्राध्यापक आनंद दासगुप्ता आणि *रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर कॉलेजच्या निशा केळकर* यांचा समावेश होता.
होय. रत्नागिरी. महाराष्ट्रातील एका किनारपट्टीच्या शहरातील महाविद्यालय.
हे सार्वजनिक शिक्षण असे काहीतरी करत आहे, जे खाजगी कोचिंग इंडस्ट्री स्वतःच्या बळावर कधीच करू शकली नसती.
कोचिंग इंडस्ट्री एका गोष्टीत खूप चांगली आहे. तुम्हाला एखादी ज्ञात समस्या वेगाने सोडवायला शिकवणे.
जेईई आणि नीट याच गोष्टीला पुरस्कृत करतात, आणि मी हे प्रेमाने म्हणत आहे कारण मी त्या जगाचा एक भाग होतो.
पण ऑलिम्पियाडच्या प्रश्नपत्रिकेचा कोणताही ज्ञात प्रकार नसतो.
तिथे शॉर्टकटचा कोणताही धडा नसतो. तुम्हाला वाचवणारी कोणतीही सूत्रपत्रिका नसते.
तुम्हाला कधीही न पाहिलेल्या समस्येसोबत बसावे लागते आणि विचार करावा लागतो.
तो एक पूर्णपणे वेगळाच स्नायू आहे.
– – – आणि एक सरकारी अनुदानित केंद्र गेल्या २७ वर्षांपासून भारतीय किशोरवयीन मुलामुलींमध्ये ही प्रतिभा शांतपणे घडवत आहे.
तर हो, अभिमान बाळगा. तोही मोठ्याने.
एचबीसीएसईने (HBCSE) हेही सांगितले की, भारतातील सुमारे ६४ टक्के ऑलिम्पियाड पदक विजेते पुढे पीएचडी करतात. पण केवळ ३२ टक्के पदक विजेतेच भारतात स्थायिक होतात.
… मी हे क्षण खराब करण्यासाठी सांगत नाहीये.
या मुलांचे देशावर काहीही देणे लागत नाही.
त्यांना मिळालेला प्रत्येक पर्याय त्यांनी स्वतःच्या मेहनतीने मिळवला आहे.
… पण यातून आपल्याला एक गोष्ट कळायला हवी. ही प्रतिभा शोधण्यात आपण उत्कृष्ट आहोत.
तिला प्रशिक्षण देण्यात आपण उत्कृष्ट आहोत. पण तिला राहण्यायोग्य जागा देण्यात आपण अजूनही तितके चांगले नाही.
अभिनंदन कनिष्क, रिद्धेश, ऋषित, श्रेष्ठ आणि स्वरित.
… या वर्षी एका भारतीयाने केलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी ही एक आहे आणि देशातील बहुतांश लोकांना याबद्दल कधीच कळणार नाही.
☆
लेखक : अज्ञात
(भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या एका शिक्षकाकडून आलेला संदेश)
प्रस्तुती : रेखा जांबवडेकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ “जय प्रकाश के नवगीत ” के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “कोल्हू का बैल”।)