☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. २. ☆ प्रा.भारती जोगी ☆
दुर्गाबाई दामोदर चाफेकर
२२ जून… हा दिवस म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील धगधगते पान! त्या पानावरील होमकुंड म्हणजे आपल्या सशस्त्र क्रांतीने पेटविणा-या चाफेकर बंधूंच्या अभिमानास्पद योगदानाचं तेजाळलेलं दर्शन!!
१८९७ मध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीमध्ये तपासणीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्लेग कमिशनर कॅप्टन रॅंड आणि त्याचा सहकारी आयर्स्ट यांच्यावर गोळ्या झाडून केलेला वध! ही घटना इतिहासातील पानावर कोरली गेली. नंतर १८ एप्रिल १८९८ रोजी मोठे बंधू दामोदर चाफेकर यांना फाशीची शिक्षा झाली. स्वातंत्र्य यज्ञात बलिदान दिलेला हा हुतात्मा!!
पण… त्याच होमकुंडात, समिधा म्हणून सतत स्वतः ला समर्पित करत राहिलेल्या… पण साधा नामोल्लेख च काय पण… साधं नाव देखील माहीत नसलेल्या अशा… उपेक्षित आणि अलक्षित स्त्रियांपैकी एक… स्वातंत्र्यवीराची पत्नी… दामोदर चाफेकरांची अर्धांगिनी *दुर्गाबाई*!!
दुर्गाबाई पिंपरी जवळील *मेंढ-याचे तळे* येथील होळकर घराण्यातील! एक हसरी, मिश्किल स्वभावाची मुलगी! गाणेही उत्तम गात असे. सणासमारंभात जमलेल्या नातेवाईकांना एकत्र करून नाच-गाणी करत असे. थोडक्यात काय तर एक हसता-खळाळता, उत्फुल्ल, निर्मळ निर्झर! अतिशय नाजूक अशी बाला! गंमत म्हणजे तिला शीळ देखील वाजवता येत असे.
ही अशी भरभरून जगणारी दुर्गा, १७ व्या वर्षी दामोदर चाफेकर यांच्याशी विवाह संपन्न होऊन चाफेकरांच्या घरात मोठी सून बनून प्रवेशली आणि दुर्गा… दुर्गा *बाई* बनली… आणि बघता-बघता तिच्यातली अल्लड, खेळकर, खुशमिजाज दुर्गा तिच्या बाईपणाच्या कोशात गुरफटून जणू अस्तित्व हीन झाली. दामोदर रावांच्या अगदी विरुद्ध स्वभावाच्या प्रवाहाविरुद्ध न वाहता, त्याच प्रवाहात स्वतः ला पूर्णपणे सामावून घेत, जीवन प्रवाह वाहता ठेवला तिनं!
दामोदर चाफेकरांना फाशी झाली. दुर्गाबाई आणि धोंडीराम नामे त्यांचा पुत्र मागे राहिले. दामोदर चाफेकरांचे, चाफेकर बंधूंचे नाव स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अमर झाले. पण इतिहासात अशा प्राणांची आहुती देऊन अमर झालेल्यांच्या कुटुंबियांचे… पत्नी, मुलांचे काय झाले असेल, हा विचार ही आम्हां आयते स्वातंत्र्य उपभोगणा-यांच्या मनात ही येत नाही, ही खरी शोकांतिका आहे.
रॅंड आणि आयर्स्ट चा खून झाल्यावर ३ महिन्यांच्या आत… दोघांच्याही श्रीमतींना आणि मुलांना स्पेशल, वार्षिक पेन्शन सुरू झाले. ऑन ड्युटी मारले गेले म्हणून खास वाढीव दराने पेन्शन सुरू झाले. पण…
दामोदर चाफेकर… जे… खरं म्हणजे देशासाठी ड्युटी करून फासावर चढले, त्यांच्या पाठीशी घरी राहून ऑन ड्युटी राहूनही, दुर्गाबाई आणि त्यांच्या मुलाला कोणतेही पेन्शन मिळाले नाही. १८९७ मध्ये त्या फक्त १७ वर्षांच्या होत्या. त्यानंतर त्या १९५६ पर्यंत… म्हणजे ६० वर्षे जगल्या. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही त्या ९ वर्षे जगूनही ना त्यांना कोणते पेन्शन मिळाले, ना, पती स्वातंत्र्य सैनिक असल्याचे ताम्रपट मिळाले!
हीच ती खरी खंत! विचार करावा अशी बाब!! शेवटी होमकुंडात किती आणि कोणत्या समिधा जळल्या… कुणी पाहिल्या ना????
उपवास आपल्याला काही नवीन नाही. उपवास करण्याची अनेक कारणं, आणि प्रकार सुध्दा आहेत. अगदी ठराविक दिवशी, ठराविक वारी, ठराविक देवांच्या नावाने उपवास करण्याची किंवा तो सांगण्याची पध्दत आहे.
काही वेळा आपण उपवास करतो, काही वेळा तो घडतो, तर काहीवेळा मोडतो सुध्दा. कोणता उपवास कोणत्या पध्दतीने करायचा हे काही वेळा आपणच ठरवतो.
सकाळी उपवासाचे ठरलेले म्हणजे आपणच ठरवलेले पदार्थ खायचे व रात्री तो सोडायचा. सोडायचा म्हणजेच खायचे. उपवास करायचा तरी खायचे, आणि सोडायचा तरी खायचेच. फक्त या खाण्याच्या पध्दती आपल्या आणि आपल्या सोयीनुसार.
मग कोणी सकाळी उपवासाचे पदार्थ खातात, कोणी सकाळपासून रात्रीपर्यंत काहीच खात नाहित. कोणी फक्त फलाहार घेतात. तर कोणी फक्त द्रवपदार्थ. यात चहा, काॅफी, दूध, ताक, सरबत याच पोटभरेपर्यंत सेवन असत. पण असतो उपवास.
काही उपवास हे आठवड्यात, महिन्यात सातत्याने येतात, तर काही वर्षात एकदाच येतात. नवरात्रात करायचे वर्षात एकदाच पण सलग काही दिवस असतात. तर हरतालीका, वडपौर्णीमा या सारखे काही फक्त महिलाच करतात. यातही नवरात्रात केले जाणारे उपवास परत करणारा आपल्या पध्दतीने करतो. म्हणजे नवरात्र असे पर्यंत सकाळ संध्याकाळ उपवासाचेच खायचे. किंवा सकाळी उपवासाचे खायचे, व रात्री नेहमीचे. किंवा उपवासाच्या सगळ्या दिवसात रोज रात्री ठराविक पदार्थच जसे डाळ आणि दशमीच खायची.
यातही नेहमीच्या डाळ दशमीत लसूण, कांदा घातल्याशिवाय चव येत नाही अस म्हणत असलो तरी उपवास सोडतांना मात्र लसूण, कांदा खायचा नाही, कारण उपवास.
काहि धार्मिक कार्यक्रमात तर फक्त ते कार्य संपेपर्यंतच उपवास असतो, आणि मग नेहमीचे असले तरी खास जेवण. पण ते धार्मिक कार्य संपेपर्यंत मधल्या काळात खायचं ते उपवासाचच.
यात धार्मिक कार्याला हजेरी लावणारे उपवासाचे, व उपवासाला न चालणारे दोन्ही पदार्थ खातात. अस ऊपवासाबद्दल अनेक पध्दतीने सांगीतल तरी सगळा प्रकार खाण्याबद्दलच जाणवतो आणि खाण्याच्या बाबतीत थोडा गोंधळ उपवास न करणार्यांचा कदाचित होतो.
हे सगळ उपवास पुराण, उपवास, तो करण्याची पद्धत, वेेळ, वार, दिवस, खायला चालणाऱ्या किंवा लागणाऱ्या गोष्टी बर्याच आणि वेगळ्या आहेत. अशाच अनेक गोष्टी ऊपवास… आणि… या आणि नंतर जाणवल्या.
हे आणि म्हणजे दुसरं काहिही नाही. सध्या सुरु असणाऱ्या निवडणूकांच्या तयारीतली युती, महायुती, आघाडी, महाआघाडी, बंडखोरी, अपक्ष यांची चर्चा. ही युती, महायुती, आघाडी, महाआघाडी सुध्दा राष्ट्रीय पातळीवर वेगळी, स्थानिक पातळीवर वेगळी. काही ठिकाणी स्वबळाचा नारा, तर कुठे मैत्रीपूर्ण लढत. कुठे विरोधकांशीच हात मिळवणी. तर कुठे हातातला हात काढून घ्यायची तयारी. आम्हाला सत्ताच हवी अस काही नाही आम्ही विकासासाठी लढतो. अस म्हणतांना सगळ्या हालचाली असतात त्या सत्ता मिळवण्यासाठिच.
आमच्यात मतभेद असतील, पण मनभेद नाहीत. आमच्या समविचारी व्यक्तींसाठी आमचे दरवाजे उघडे आहेत अस म्हणतांना चर्चा मात्र बंद दाराआड. याच उघड्या ठेेवलेेल्या दाराने कोणी बाहेर जाणार नाही याचीही काळजी. आम्ही उमेदवारी देतांना राजकारण करणार नाही अस म्हणतांना उमेदवार मात्र राजकारण करणारा, करु शकणाराच लागतो. यात कस लागतो तो निष्ठावान असणारे, आणि निष्ठावान म्हणून घेणारे यांचा. यातले काही निवडून येतात, तर काही निवडून, निवडून आणावे लागतात. कुठे भावनिक साद घातली जाते, तर कुठे भावनेच्या आहारी जाऊ नका याचा नारा असतो. संघर्ष मिटवून एकत्र येण्याचा जल्लोष केला जातो, पण विभक्त होण्याची कारणं गुलदस्त्यातच राहतात.
अनेक वर्षांपासून आपसात संघर्ष असणारे रात्रीतून एकत्र येतात. तर घरोबा असणारे रात्रीतून बाहेर पडतात. हे सगळ सोयीनुसार, सोयीच्या ठिकाणी सोयीस्कर सुरु होत. उपवास करण्याच्या अनेक पध्दती असतील तशाच राजकारणाच्याही अनेक पध्दती आहेत अस म्हणाव लागेल.
परवा एक गंमतच झाली. हरियाणा येथे रहाणारे माझे स्नेही श्री. बलजीत गढवाल ‘भारती’ यांचा मला एक मेसेज आला. खरं तर त्यांचा माझा अलीकडे दोन-तीन वर्षात संपर्क नव्हता. मेसेजचा साधारण आशय असा होता, ‘मी एक पुस्तक काढतोय. ‘लेखक का लिहितात? सुमारे 150 लेखकांकडून मी याबद्दल लेख मागवले आहेत. तुम्हीही तुमचे विचार कळवा. तुम्ही का लिहिता? आणि तुमच्या लेखनप्रवासाबद्दलही लिहा. ’ मेसेज वाचला आणि मी विचारातच पडले. खरंच! मी आत्तापर्यन्त विचारच केला नव्हता, मी का लिहिते? मनात आलं की मी आपली लिहित सुटायची. आता मात्र मी विचार करू लागले, आपण का लिहितो? एकूणच लेखक का लिहितात?
‘लेखक का लिहितात? ’ या विचाराभोवती मन रेंगाळताना, थोडा पूर्वसूरींचा धांडोळा घ्यावासा वाटला. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास या संतांनी काव्यरचना केली, ती ’लोककल्याणासाठी’, त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तीचा अनावर उमाळा मनात दाटून आल्यामुळे तो व्यक्त करण्यासाठी. त्यानंतरच्या काळात पंत कवींनी काव्यलेखन केले, ते आपल्या विव्द्त्तेचं प्रदर्शन करून कीर्ती मिळवण्यासाठी. त्यापुढील टप्प्यावर तंत कवींनी काव्ये रचली, ती एक तर वीरश्रीच्या चेतनेसाठी पोवाडे आणि मनोरंजनासाठी लावण्या. नंतरच्या ब्रिटीश काळात, लो. टिळक, आगरकर, म. गांधी, म. फुले यांनी लेखन केलं, ते लोकजागृतीसाठी. स्वातंत्र्याची आकांक्षा, समाज सुधारणा, अंध:श्रद्धेला विरोध, जाती-जातीत आणि स्त्री-पुरुषातील समानता, स्त्री शिक्षणाची गरज आणि महत्व इ. उद्देशाने लेखन केले जात होते. पुढे पुढे लेखनाची आणखीही एक धार यात येऊन मिसळली. इंग्रजी शिक्षणाबरोबरच, इंग्रजी वाङ्मयाचाही परिचय झाला आणि त्या अनुकरणातून पारलौकिक विषयांबरोबर लौकिक विषयांकडेही लेखकांचे मन ओढ घेऊ लागले. आपला परिसर, नातेवाईक, परिचयातले, कल्पनेतले विषय यावर लेखन होऊ लागले.
लेखनातले हे सारे टप्पे मनात येतायेताच, मन विचार करू लागले, ‘आज लेखक का लिहितात? ‘ मी माझ्या एका नावलौकिक असलेल्या मैत्रिणीला विचारले, ‘ तू का लिहितेस? ‘ ती म्हणाली, ‘आपण का बोलतो? दुसर्याला काही तरी सांगावसं वाटतं म्हणून! . मीही नेमकी त्याच कारणासाठी लिहिते. ‘ तिचं हे उत्तर ऐकलं आणि मला ‘खूल जा सिम सिम’ म्हंटल्यावर आलिबाबाची गुहा उघडावी, तसं वाटलं. बरोबर! मीदेखील नेमकी याच कारणासाठी लिहिते. व्यक्त होण्याची अनावर ऊर्मी मनात दाटून येते आणि लेखणी कागदावर लिहिती होते. आपण काही पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं, अनुभवलेलं असतं. ते दुसर्याला सांगावसं वाटतं. पण ते सगळं जसंच्या तसं सांगितलं जातच असं नाही. कधी त्यात काट-छाट होते. कधी भर पडते. कधी वाटतं, हा किंवा ही आत्ता असा न वागता, तशी वागली असती तर? परिस्थिती कशी बदलली असती? मग मनात अनेक विचार, कल्पना रुंजी घालू लागतात. मग त्या वेगळ्या शक्यतांच्या आधारे कविता, कथा, कादंबर्या निर्माण होतात. घटितातून अघटिताची पुनर्मांडणी होते. हीच लेखकाची नवनिर्मिती असते. अनुभव प्रत्यक्षच घ्यायला हवा, असे नाही. कल्पनेच्या पातळीवरही घेता येतो.
घटितातून अघटिताची पुनर्मांडणी केलेल्या माझ्या ‘जन्म’ शीर्षकाच्या कवितेचे उदाहरण मी इथे देते. एकदा क्युरेटीन करायचं म्हणून मी दवाखान्यात अॅडमिट होते. मला ऑपरेशन टेबलवर झोपवले होते. अॅनॅस्थेसिस्ट येणार म्हणून त्यांची वाट बघत सगळे बाहेर थांबले होते. रूममध्ये मी एकटी. भिंतींवर अनेक शो केसेस. त्यात सर्जरीची हत्यारे, वेगवेगळ्या सुर्या, कात्र्या, चिमटे वगैरे… मला एकदमच वस्तुस्थितीचं वर्णन करणारी कविता सुचू लागली. त्याचं सर्वसाधारण स्वरूप असं –
घटका भरत आलेली
जीवघेणी कळ
मस्तक भेदून गेलेली.
ललाटीची रेषा,
वाट हरवून बसलेली.
घड्याळाची टिक टिक
जिण्याचा तोल साधत
सांडत असलेली.
एवढ्यात डॉक्टर आले. मला अॅनॅस्थेशिया दिला गेला. क्युरेटीन झाले. मी शुद्धीवर येऊ लागले. डोक्यात तीच कविता…
ईथरची बाधा, नसानसातून
शरीरभर भिनलेली….
डोळ्यापुढची वर्तुळे
लाल… हिरवी.. पिवळी… निळी…
काळवंडत गेलेली…
कोसळत्या काळोखात होणार्या
पांढर्या शुभ्र ठिपक्यांच्या
लयबद्ध हालचाली.
पाजळत्या रक्तपिपासू हत्यारांची
लांबच लांब पसरलेली
अशुभ सावली.
… तेव्हा मी काही बाळंतीण होणार नव्हते, पण मला कवितेचा शेवट सुचला…
संज्ञा बधीर होताना, सारं सारं दूर सरतय.
रक्तात उमलणार्या, गुलबकावलीचं हसू,
लाटालाटांनी मनभर उसळतय. अणूरेणू व्यापून उरतय.
जणू ते गुलबकवलीचं फूल म्हणजे बाळ, आता माझ्या हातात येणार आहे…..
– – अशी ही वास्तव आणि कल्पनेची सरमिसळ. दवाखान्यातून घरी येताना मी बाळ नाही, पण कविता घेऊन आले.
वास्तवाचं प्रभावी वर्णन करण्यासाठी योग्य, उचित शब्दकळा निवडतानाही कल्पनेची देणगी लगतेच आणि तितकाच अभ्यासही हवा.
– – एकदा एका संस्थाभेटीने मला दोन कथा दिल्या. संस्थेचं नाव करुणा निकेतन क्रेश. क्रेश म्हणजे संगोपनगृह. मी डी. एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा अशा अनेक संस्था असत. एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले.
तिथे असलेल्या मदतनीस बाई आम्हाला क्रेशची माहिती सांगत होत्या. क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आसपासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्यांची मुले येत. त्या बोलत असतानाच तिथे एक दीड – पावणे दोन वर्षाची, नुकतीच चालायला लागलेली मुलगी लडखडत आली आणि खाली बसून त्या मदतनीस बाईंच्या पायाला तिने मिठी मारली. त्यांनी तिला उचलून कडेवर घेतले. मग म्हणाल्या, ‘क्रेशने अॅडॉप्ट केलेली ही पहिली मुलगी. एका लेप्रसी झालेल्या भिकारी दांपत्याची ही मुलगी. सिस्टर मारियाच्या मनात ही मुलगी भरली. त्यांनी त्या भिकारी दांपत्याला संगितले, की ‘आम्ही तुमच्या मुलीला सांभाळू. तिला खूप शिकवू. तिला चांगलं जीवन जगायला मिळेल. पण आमची एक अट आहे. तुम्ही तिला आपली ओळख अजिबात द्यायची नाही. बघा. तिचं कल्याण होईल. ’.. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. थोडं एकमेकांशी बोलले. त्यांना वाटलं असणार, निदान मुलीला तरी आपल्यासारखी भीक मागत जगायला नको. त्यांनी नन मारियाची अट मान्य केली. आम्ही हिला खूप शिकवणार आहोत. डॉक्टर करणार आहोत आणि पुढे उच्च शिक्षणासाठी जर्मनीला पाठवणार आहोत. ’ एव्हाना त्यांनी त्या मुलीला आपल्या दुसर्या मैत्रिणीकडे सोपवले होते आणि त्या पुढे माहिती सांगू लागल्या. पण माझं तिकडे लक्षच नव्हतं.
माझं मन त्यावेळी, ती लहान मुलगी, तिचे लेप्रसी झालेले आई-वडील, त्या मुलीला डॉक्टर करून जर्मनीला पाठवायचे क्रेशचे लोक बघत असलेले स्वप्न, यातच गुंतून गेले होते आणि मनात कुठे तरी कथा आकार घेऊ लागली होती.
क्रेशच्या कार्याची माहिती त्या पुढे सांगू लागल्या. क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आसपासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्यांची मुले येत. सकाळी ८ वाजता मुले येत. तिथे त्यांना दूध, नाश्ता दिला जाई. शिक्षण, दुपारचे जेवण, पुन्हा शिक्षण, खेळ, गाणी, चित्रे काढणे, सगळं तिथे करायला मिळे. दुपारी बिस्किटे, फळे वगैरे दिली जात. संध्याकाळी ६ वाजता मुले आपआपल्या घरी जात.
तिथल्या मदतनीस क्रेशबद्दलची माहिती सांगत होत्या. ‘ इथल्या मुलांना जर्मनीतील काही लोकांनी दत्तक घेतले आहे. त्यांचा खर्च ते करतात. तिथल्या मुलांना खेळणी पाठवतात. चित्रे पाठवतात. ग्रीटिंग्ज पाठवतात. आम्ही ते सगळं मुलांना देतो पण इथे खेळायला. बघायला. त्यांना खेळणी वगैरे घरी नेऊ देत नाही. आपल्या घराचे फोटोही मुलांचे दत्तक पालक पाठवतात. पत्रे पाठवतात. त्यांनी मग आम्हाला अशी काही पत्रे, खेळणी, ग्रीटिंग्ज दाखवली.
त्या दिवशी त्या क्रेशमध्ये आणखी एक कार्यक्रम होता. थंडीचे दिवस होते. त्यामुळे तिथे मुलांसाठी त्या दिवशी चादरी वाटण्यात येणार होत्या. प्रमुख व्यवस्थापिका रेमंड मॅडमनी त्या दिवशी मुलांच्या आयांना बोलावून घेतले होते. हॉलमध्ये सगळे जमले. दोघे शिपाई सोलापुरी चादरींचे गठ्ठे घेऊन आले.
प्रार्थना, सर्व उपस्थितांचे स्वागत झाले. प्रभू येशूची शिकवण, तो सगळ्यांकडे कसा कनवाळू दृष्टीने बघतो, असं सगळं बोलून झालं. मुलांच्या परदेशातील पालकांनी चादरीचे पैसे दिल्याचे सांगितले गेले. तिथे चादरी वाटप सुरू झाले आणि माझ्या मनात कथा साकारू लागली. त्या दिवशी मी घरी आले ती दोन कथांची बीजे घेऊन. एक ‘तहान’ आणि दुसरी ‘पांघरूण. ’
प्रथम ‘तहान कथेविषयी. मी माझ्या कथेत ती लहान मुलगी, जस्मिन, डॉक्टर झालीय, असं दाखवलं. तिथून कथेची सुरुवात. ती मोठी होत गेली, तसं तिला कळलं, आपण लेप्रसी झालेल्या भिकार्याची मुलगी आहोत. चर्चपुढे बसलेले ते भिकारी. तिला येता जाता त्यांना न्याहाळायचा, यापैकी आपले कोण आई-वडील असतील ते शोधण्याचा छंद लागतो. आज ती जर्मनीला निघालीय. तिचा निरोप समारंभ होतोय. स्टेजच्या पुढल्या भिंतीवर एक मोठे पोस्टर आहे. येशू ख्रिस्त कुणा शिरमोणी नावाच्या पापी महिलेच्या ओंजळीत पाणी घालतोय. खाली लिहिलं आहे. त्याने दिलेल्या पाण्याने जो तहान भागवतो, त्याला तहान लागत नाही. (वरील पोस्टर मी मिशन हॉस्पिटल – मिरज इथे पाहिलं होतं. ते कथेत इथे वापरलं) जस्मिनला वाटतं, आपण कळायला लागल्यापासून त्याने दिलेल्या पाण्यानेच तर तहान भागावतोय. पण आपल्याला खूप खूप तहान लागलीय. आपले खरे आई-वडील कोण आहेत, हे जाणून घेण्याची तहान. ती निघते. टॅक्सीत बसता बसता त्या भिकार्यांकडे जाते. त्यांच्या थाळीत, वाडग्यात हाताला लागतील तसे पैसे टाकते. मनोमन म्हणते, ‘माझ्या अज्ञात माता-पित्यांनो, मला आशीर्वाद द्या. टॅक्सी निघून जाते. चार विझू विझू झालेले डोळे टॅक्सी दृष्टिआड होईपर्यंत त्या दिशेने बघत रहातात.
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २५ आणि २६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. २५ – –
मना वीट मानू नको बोलण्याचा ।
पुढे मागुता राम जोडेल कैचा? ।
सुखाची घडी लोटता दुःख आहे ।
पुढे सर्व जाईल काही न राहे ।।२५।।
अर्थ : हे मना, माझ्या या बोलण्याचा—एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्याचा—तू कंटाळा मानू नकोस. कारण तसे झाले तर ज्या भगवंतप्राप्तीसाठी तू प्रयत्न करीत आहेस, तो राम तुला कसा प्राप्त होईल? या संसारात सुख-दुःखाचे चक्र अखंड सुरू असते. सुखाचा क्षण संपला की दुःख येतेच. आणि शेवटी ज्याला तू सुख मानतोस तेही नाश पावणारेच आहे—काहीही शाश्वत राहात नाही.
विवेचन : या श्लोकात समर्थांची लोककल्याणाची विलक्षण तळमळ पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवते. आपण वारंवार सांगत असलेला उपदेश ऐकून लोकांना कंटाळा येऊ शकतो, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच ते प्रेमाने सांगतात—
“माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस. ”
आपल्या व्यवहारातही असेच घडते. कोणी आपल्या हितासाठी एखादी गोष्ट सांगितली, उपदेश केला तर तो आपल्याला लगेच पटत नाही. उलट, आपले भले व्हावे या उद्देशाने स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तीपासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करतो. अशा व्यक्तीबद्दल अनेकदा नकारात्मक मत तयार केले जाते—
“तो खूप स्पष्टवक्ता आहे”, “तो नेहमी नकारात्मकच बोलतो”, “त्याचे ऐकले तर व्यवहार कसा करायचा? ”
परंतु सत्य हे असे आहे की अप्रिय पण हितकारक बोलणारा माणूस दुर्मिळ असतो, आणि त्याचे ऐकणारा त्याहूनही दुर्मिळ!
संसारात सुख आणि दुःख यांचे चक्र अखंड चालू असते. सुखाचा काळ संपला की दुःख येणारच—ही अटळ गोष्ट आहे. एखादा माणूस मोठ्या पदावर पोहोचतो—आमदार, खासदार किंवा मंत्री होतो. पण त्या सत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी करण्याऐवजी तो स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. सत्तेची नशा चढते. परंतु एक दिवस सत्ता जाते, आणि त्याला वास्तवाला सामोरे जावे लागते.
एखाद्या उद्योगपतीचा भरभराटीला आलेला व्यवसाय अचानक तोट्यात जातो. जोपर्यंत सुख आपल्या वाट्याला असते, तोपर्यंत आपण त्यातच रमून जातो. त्या सुखात इतके गुंततो की परमेश्वराची आठवणही होत नाही. आपल्याला वाटते—हे सुख कायम राहील.
परंतु हे सर्व प्रारब्धावर अवलंबून असते. जसे सुख आपल्या कर्मानुसार मिळते, तसेच दुःखही भोगावे लागते. सुख-दुःखाचे हे चक्र, जन्म-मरणाचा हा फेरा—कोणालाही टाळता येत नाही.
म्हणूनच, जर आपल्याला या चक्रातून मुक्त व्हायचे असेल, तर परमेश्वराशी नाते जोडणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी जो कोणी आपल्याला सत्य, श्रेयस्कर आणि हितकारक मार्ग दाखवेल, त्याचे बोलणे कंटाळा न करता ऐकणे गरजेचे आहे.
अर्थात, अशी शिकवण संतच देऊ शकतात. समर्थांसारख्या संतांच्या वचनांमध्ये गूढार्थ, अनुभव आणि करुणा दडलेली असते. त्यांचे प्रत्येक शब्द आपल्याला योग्य दिशेने नेणारे असतात.
खरा साधक कधीच त्यांच्या बोलण्याचा कंटाळा करत नाही; उलट तो त्या मार्गावर निष्ठेने चालत राहतो.
स्वसंवाद ::
माझ्या हितासाठी कोणी सत्य सांगितले तर मी ते खुलेपणाने स्वीकारतो का?
सुखाच्या काळात मी परमेश्वराला विसरतो का, की त्याचे स्मरण ठेवतो?
सुख-दुःख हे क्षणभंगुर आहे याची जाणीव ठेवून मी जीवनाकडे पाहतो का?
संतांचे किंवा हितचिंतकांचे मार्गदर्शन मी मनापासून ऐकतो आणि आचरणात आणतो का?
– – – –
श्लोक क्र. २६ – –
देहे रक्षणाकारणे येत्न केला ।
परी सेवटी काळ घेऊनि गेला ।
करी रे मना भक्ती या राघवाची ।
पुढे अंतरी सोडी चिंता भवाची ।।२६।।
अर्थ: मनुष्य आपल्या देहाचे रक्षण व्हावे म्हणून खूप प्रयत्न करतो, त्याची काळजी घेतो. परंतु शेवटी काळ (मृत्यू) त्याला घेऊन जातोच. म्हणून हे मना, तू राघवाची भक्ती कर आणि मनातील संसाराची (भवाची)चिंता सोडून दे.
विवेचन : मागील श्लोकात समर्थांनी सुख-दुःखाच्या चक्राचे वास्तव आपल्यासमोर ठेवले. या श्लोकात त्याच विचाराला पुढे नेत ते देहाभिमानाचे वास्तव आपल्यासमोर मांडतात.
आपण आयुष्यभर देहाच्या रक्षणासाठी झटत असतो. देहबुद्धी इतकी प्रबळ असते की देहसुखालाच आपण खरे सुख मानतो. शरीराला आनंद मिळावा म्हणून माणूस विविध भोग-विलासात रमतो. काही जण तर केवळ खाणे-पिणे आणि मौजमजा हाच जीवनाचा उद्देश समजतात.
पूर्वी चार्वाकांनीही “यावत् जीवेत् सुखं जीवेत्” असा भोगवाद मांडला होता. आज अनेकजण नकळत त्याच विचारसरणीचा स्वीकार करताना दिसतात.
पण येथे समर्थांचा हेतू देहरक्षणाला नाकारण्याचा नाही. देहाची काळजी घेऊ नये असे ते म्हणत नाहीत. उलट, देह ही एक मौल्यवान देणगी आहे.
“शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्”. शरीर हेच धर्मसाधनेचे पहिले साधन आहे.
म्हणून देहाची योग्य काळजी घेणे आवश्यकच आहे. निरोगी आयुष्य जगणे, जीवनाचा आनंद घेणे हेही चुकीचे नाही. परंतु याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की हा देह नश्वर आहे आणि एक दिवस तो सोडून जावेच लागणार आहे.
वेदकाळातील ऋषींनीही आपल्या निरोगी दीर्घायुष्याची कामना केली, पण मिळालेल्या त्या आयुष्याचा उपयोग त्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी आम्ही करणार आहोत असे स्पष्ट सांगितले.
आपल्या जीवनात आपले काहीतरी ध्येय असते. आस्तिक व्यक्ती परमेश्वर प्राप्तीसाठी झटते तर नास्तिक किंवा बुद्धिवादी मंडळी मानवसेवा, समाजसेवा, वैज्ञानिक प्रगती यासारख्या गोष्टींना आपल्या आयुष्याचे ध्येय मानतात. परंतु बरेचदा आपण मात्र ध्येय बाजूला ठेवून देहासाठीच अधिक वेळ खर्च करतो.
माणूस स्वतःच्या देहाबरोबरच संसाराची, घरदाराची, मुलाबाळांची चिंता करीत राहतो. पण प्रारब्धानुसार जे घडायचे ते घडणारच असते. म्हणून समर्थ सांगतात
– – – “करी रे मना भक्ती या राघवाची”
श्रीरामाबद्दल बोलताना समर्थ नेहमी “या राघवाची” भक्ती करावी असे म्हणतात. त्यांचे आराध्य दैवत असलेला श्रीराम जणू त्यांच्यासमोर उभा आहे. त्या राघवाची असे ते कधीही म्हणत नाहीत. समर्थांसाठी श्रीराम हे केवळ तत्त्व नाही, तर सजीव अनुभव आहे. जणू समोर उभा असलेला ईश्वर!
म्हणूनच ते आपल्याला सांगतात की बाबारे, संसाराची चिंता करण्याऐवजी मनाला राघवाच्या स्मरणात गुंतव. एकदा का मन त्याच्याकडे लागले, की मग संसाराची चिंता आपोआप कमी होत जाते. आणि हळूहळू अशी भावना दृढ होते की राम कर्ता आहे, सर्व काही त्याच्याच कृपेने घडते आहे.
अशी श्रद्धा निर्माण झाली की मन हलके होते, चिंता निवळते आणि जीवन अधिक शांत, समाधानी बनते.
स्वसंवाद ::
मी माझ्या देहाची काळजी घेताना त्यालाच अंतिम सत्य मानून चालतो का?
जीवनाचे खरे ध्येय लक्षात ठेवून मी देहाचा उपयोग करतो आहे का?
संसाराच्या चिंतेत मी इतका गुंततो का की परमेश्वराचे स्मरण विसरतो?
माझ्या मनाला राघवाच्या नामस्मरणाची सवय लागली आहे का?
काही लोक असे आहेत, जे सकाळी मोबाईल हातात घेतल्यावर आपल्या गृप्समध्ये पहिला मेसेज Good morning चा टाकतात. बरोबर एखाद गुलाबाचे फूल पण पोस्ट करतात. खरतर हा एक अभिवादन करायचा प्रकार आहे.
मी कधी कोणाला Good morning चा मेसेज पाठवत नाही. गुलदस्ता पाठवत नाही. आणि कोणी मेसेज पाठवला तर मी उत्तरही देत नाही. मला हे उगीचच, waste of time, काय गरज आहे या सगळ्याची? अस वाटत. बहुतेक यात माझा उद्धटपणा दिसतो.
काहीच रिसपोन्स मिळत नसल्यामुळेच, पूढे असे मेसेज मला येत नाहीत. कदाचित फारच शिष्ठ आहेत या असा शिक्का पण माझ्या नावावर मारला जात असावा.
वर्तमानपत्रात एक लेख वाचल्यावर या Good Morning msg कडे बघायचा माझा दृष्टिकोन बदलला. आता हा असा मेसेज किती महत्वाचा असू शकतो. हे लक्षात आल. दृष्टिकोन बदलला की विचार बदलतात. हे खरय.
आता एका वेगळ्या अर्थाने Good morning msg पटला.
Are you dead? हा लेख वाचला.
चीनमध्ये हा app वापरणारे बरेच लोक आहेत. आजकाल फॅमिलीच्या नावाखाली जास्तीत जास्त 3 जणांची संख्या असते. त्यातील मुलगा/ मुलगी शिक्षणासाठी, लग्न झाल्यावर दूर गेले की फॅमिलीत फक्त 2 जण उरतात. जसजस वय वाढत तस ज्येष्ठांच्या समस्यांना तोंड देत, एक वेळ अशीही येते की दोघांपैकी फॅमिलीत एकच उरतो.
आधीच्या काळात एका मुलाला वाढवायला आजूबाजूचे अनेक लोक असायचे. घरातच कमित कमि आठ दहा जण असायचे. आता तर हम दो हमारे दो हा हिशोब पण गेलाय, आता एकच.. किंवा मुल नकोच. आता DINK चा जमाना आहे (double income no kids), मग एकटे राहणार्यांचा नंबर वाढणारच. त्यात 996 कल्चर.
9 to9 job, मग इतक काम केल्यावर दोन दिवस आराम, भटकंतीत. 6 days busy. त्यामुळे आजूबाजूला राहणार्या लोकांशी संबंध नाही, भेटीगाठी नाही, बोलण नाही. शेजारी कोण. राहतय? हे सुद्धा खूपदा माहित नसत. social life as such नाहीच.
अशा वेळेस त्यांच्या घरात काय घडलय/ काय घडतय? हे कळायला मार्ग नाही. त्यात privacy च्या नावाने वागण्या बोलण्यात मोकळीक नाही. विदेशी राहणार्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय, तेही एक मोठ कारण आहेच.
आज single/ एकटे राहणार्यांची संख्या वाढतेय. त्याला कारण अनेक आहेत.
नोकरीमुळे दुसर्या शहरात जाणे, डायव्होर्स झाल्यावर, लग्न करायचे नाही, अशा विचारांचे पण बरेच आहेत. ऑफिस मधून घरी आल्यावर ही conference calls. Work culture अस झालय की आई-वडीलां बरोबरही बोलायला वेळ मिळत नाही. त्यामुळे
एकटेपणा ही समस्या फक्त जेष्ठांचीच आहे अस राहिलेल नाहिये.
एका समृद्ध घरात एकटी राहणार्या वृद्ध स्री चे प्राण गेले, हे कळल केंव्हा? तर आठवड्याभरानंतर. या दरम्यान कधी कोणी फोन केला, रिंग गेली, फोन उचलला नाही… अस कदाचित झाल असेल. तर बाहेर गेल्या असतील अशी आपली समजूत करून, या बाबतीत कदाचित लक्ष दिल गेल नसेल.. काय नक्की झाल असाव? माहित नाही. पण कळल मात्र आठ दिवसांनी. हे बरोबर आहे का?
Are you dead?
या app ला CHINA मध्ये छान response मिळाला/ मिळतोय.
एकटे राहणार्यांनी फक्त रोज तेथे एक बटन दाबायचे असते. आणि
मी आहे
I am there , I am in
ही सूचना द्यायची. जर लगातार दोन दिवस हे बटन operate झाल नाही, तर काही problem असावा.
अस लक्षात येईल. त्या app वर registration करताना, काही महत्वाचे, तुमच्या नातेवाईकांचे फोन. नंबर नक्की घेतले असतीलच. त्यानुसार पूढचे काम करण सोप होईल.
मधून मधून वर्तमान पत्रात, TV वर या संदर्भात काही भयानक बातम्या ऐकायला वाचायला मिळतात.
भारतात या app ची गरज आहे का?
आज भारतात 5% लोक एकटे राहतात.
ही संख्या वाढतच चाललीय.
आज तरी या प्रकारचा App भारतात नाही.
याप्रश्नावर काहीउपाय आहे का?
मला वाटत
जर आपला एक गृप असला, मग तो मित्र/मैत्रीणींचा, आपल्या आजूबाजूला राहणार्या लोकांचा, ऑफिस मधला, समवयस्क मैत्रीणींचा, कोणताही असू शकतो.
त्या गृपवर फक्त
Good Morning msg रोज टाकायचाच असा नियम ठरवला तरी हा प्रश्न सुटू शकतो. नाही का?
आज खासकरून जेष्ठांसाठी अनेक संस्था काम करतायेत.
UP मध्ये 112 वर फोन केला तर लगेच मदद मिळते. तर केरळमध्ये एकटेपणा घालवायला Listener parlours.. Manglore मध्ये sathi Shifts आहेत.
एकटे राहणाऱ्यांच्या मनात… मला काही झाल तर लोकांना कळेल का? केंव्हा कळेल? हा प्रश्न भेडसावतोच.
काळजी कमी करण्याच एक रहस्य समजून घ्याव. उगीच कल्पनेत काळजी करत बसण्यापेक्षा काही तरी निर्णय घ्यावा. व्यक्त व्हाव.
जस शरीरात वेदना झाल्या की आपण डोॅक्टरकडे जातो, तसेच मनात काळजी / शंका / भीती असेल तर ती वेळेवर समजून व्यक्त होण आवश्यक आहे.
वेळेवर घेतलेल्या correct decision मुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो.
No need to worries.
म्हणून रोज good morning चा मेसेज गृपमध्ये पाठवणे हा सरळ साधा सोपा उपाय चांगला आहे. सहज करण्यासारखाही आहे.
आयुष्यातील चुका जरी खोडता येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात.
मी माझी चूक सुधारणार…
आजपासून मी good morning लिहिणार आणि अशा मेसेजला उत्तरही नक्की देणार.
खिशातून ५०रुपयांची एक नोट जरी पडली तरी कावराबावरा अन् बेचैन होणारा माणूस आयुष्याची ५० वर्षे उलटली तरी, त्याच्यात परिवर्तन येत नाही, बिनधास्तच वागतो! काय दुर्दैव आहे!
स्मशानभूमीची सुरक्षा तपासणी किती कडक आणि मजबूत असते, हे तर विचारूच नका साहेब! अहो, पैसा तर फार दूरची गोष्ट आहे, इथे श्वासही सोबत घेऊन जाऊ देत नाहीत! तुम्ही कितीही मोठे किंवा तुमची थेट वरपर्यंत ओळख असली तरीही!
माणूस खाली बसून पैसे आणि संपत्ती मोजतो: काल किती होते आणि आज ते किती वाढले आहेत आणि वरती तो हसणारा माणसाचे श्वास मोजतो : काल किती होते आणि आज किती उरले आहेत!
तर चला, उरलेले आयुष्य अवशेष बनण्यापूर्वी त्याला विशेष बनवूया!
पासबुक आणि श्वास बुक. दोन्ही रिकामे असल्यास भरावे लागतात. पासबुकात ‘रक्कम’ आणि श्वासबुकात ‘सत्कर्म’.
म्हणून
`एकमेकांचा आदर करा. चुका विसरा. अहंकार टाळा.
आयुष्य आहे तोपर्यंत हसत हसत घालवा. रडून वा भांडून तरी काय साध्य होणार?
जीवनाचे सार:
जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे.
रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत, पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही.
रोजचा प्रवास आहे, पण प्रत्यक्षात आपल्याला कुठही जायचं नाही.
ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही.
बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत.
ड्यूटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं.
मित्रांनो, जीवन सुंदर आहेच, फक्त आहे त्याचा मनमुराद आनंद घ्या. काही घेऊन गेला नाहीत, तरी सगळ्यांच्या मनात राहून जा. हेच जीवन आहे.
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : प्रफुल्ला शेणॉय
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“कॅलेंडर नेहमी तारीख बदलत राहते, पण एक दिवस अशी तारीख येते जी कॅलेंडरच बदलून टाकते. म्हणून संयम ठेवा, प्रत्येकाची वेळ येणार असते.” ही ओळ केवळ प्रेरणादायी वाक्य नाही, तर मानवी जीवनाच्या सामाजिक आणि मानसिक गतीमानतेचे अत्यंत सूचक रूपक आहे. माणसाचे दैनंदिन जीवन हे सवयी, दिनक्रम, आणि पुनरावृत्ती यांमध्ये अडकलेले असते. प्रत्येक दिवस सारखाच वाटतो, परिस्थिती बदलत नाही असे भासते, आणि त्यामुळे निराशा किंवा हताशा निर्माण होण्याची शक्यता वाढते. पण इतिहास आणि समाजजीवन आपल्याला सतत दाखवत असते की, या सतत चालणाऱ्या “तारीख बदलण्याच्या” प्रक्रियेतच एखादा क्षण असा येतो, जो संपूर्ण प्रवाह बदलून टाकतो. हा बदल वैयक्तिक स्तरावरही असू शकतो—जसे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य एका निर्णयामुळे पूर्णपणे बदलते किंवा सामाजिक स्तरावरही, जिथे एखादी घटना संपूर्ण समाजाच्या विचारसरणीत परिवर्तन घडवते. येथे मला मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनातील एका विविक्षित घटनेची आठवण होते. अजून ते महात्मा व्हायचे होते तेव्हाची गोष्ट आहे ही. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असताना एका खटल्यासाठी प्रिटोरियाला जात असताना डरबन रेल्वे स्टेशनवर एका गोऱ्या माणसाने गांधींकडे पहिल्या वर्गाचे तिकीट असूनही तो काळा माणूस आहे म्हणून त्यांच्या सामानासकट त्यांना प्लॅटफॉर्मवर धक्के मारून फेकले होते. तो क्षण गांधीजींच्या जीवनातला वळणबिंदू होता. कारण त्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या विरोधात सत्याग्रहाचे हत्यार उपसून स्वातंत्र्याच्या लढ्यात झोकून दिले. हा क्षण म्हणजेच गांधीजींचा महात्मा होण्याचा क्षण होता. त्यांच्या जीवनात ती तारीख अशी होती की जिने कॅलेंडरच बदलून टाकले.
दुसरी गोष्ट अशी की, माणसाला जर यश मिळवायचे असेल तर त्याने संयम ठेवायची आवश्यकता असते. पण मानवी मन हे तात्काळ परिणामांची अपेक्षा ठेवते. मेहनत केल्यावर लगेच यश मिळावे, संघर्ष केल्यावर लगेच बदल दिसावा, अशी अपेक्षा असते. पण वास्तवात बदल हा संथ प्रक्रियेतून घडत असतो. ही संथता अनेकदा माणसाला खचवते, त्याचा आत्मविश्वास कमी करते. अशा वेळी “तुझीही वेळ येईल” हा आशावाद मनाला उभारी देतो. मात्र, या आशावादाची एक मर्यादाही आहे. केवळ वेळ येईल म्हणून निष्क्रिय राहणे, किंवा सर्व काही नशिबावर सोडणे, ही मानसिकता घातक ठरू शकते. तेव्हा संयम म्हणजे केवळ थांबणे नव्हे, तर सतत प्रयत्न करत राहण्याची तयारी आणि अपयशाला सामोरे जाण्याची ताकद होय.
समाजातील असमानतेमुळे अनेक लोक आर्थिक, शैक्षणिक किंवा सामाजिक कारणांमुळे मागे पडलेले असतात. त्यांच्यासाठी “एक दिवस येईल” ही कल्पना आशेचा किरण ठरते. पण दुसरीकडे, हीच कल्पना सत्ताधाऱ्यांकडून किंवा प्रभावशाली गटांकडून लोकांना शांत ठेवण्यासाठीही वापरली जाऊ शकते. “तुमची वेळ येईल” असे सांगून वर्तमानातील अन्याय, विषमता किंवा शोषण याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. त्यामुळे या वाक्याकडे अंध आशावाद म्हणून न पाहता, त्यामागील वास्तव समजून घेणे गरजेचे आहे.
शेवटी, हे वाक्य जीवनातील परिवर्तनाच्या शक्यतेवर विश्वास ठेवायला शिकवते, पण त्याचबरोबर तो बदल घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतीची जाणीवही करून देते.
थोडक्यात काय तर, कॅलेंडर बदलणारी तारीख आपोआप येत नाही; ती घडवावी लागते. म्हणूनच संयम आणि प्रयत्न यांचा समतोल साधणे हीच या विचाराची खरी किल्ली आहे.
५ वी ते ११ वी म्हणजे मॅट्रिक पर्यंत सरकारी शाळेत शिक्षण झाले. शाळेची फी माझ्या आठवणी प्रमाणे 13 आणे होती. शाळा घरापासून बऱ्यापैकी लांब होती. शाळेत चालत जायचे आणि चालत परत यायचे. सायकल, रिक्षा हे आटोक्या बाहेरचे होते. व्हॅन हा प्रकार अस्तित्वातच नव्हता.
शाळेत जाण्याकरता दोन हाफ पॅन्ट आणि दोन बुशशर्ट, आणि इतर वापरण्याकरता एक जास्तीची हाफ पॅन्ट आणि शर्ट एवढेच कपडे असायचे.
बूट मोजे हा प्रकार आमच्या ऑटोक्या मधला नव्हता. साधी चप्पल असायची.
पण यामध्येच आम्ही मस्त असायचो आणि एन्जॉय करायचो. घराच्या आसपास राहणारे मित्र पण असेच मस्त एन्जॉय करायचे.
घरी कोणी पाहुणे आले तर जाताना ते खाऊ करता म्हणून चार आणे (आत्ताचे 25 पैसे) द्यायचे.
ते मी जपून ठेवायचो. आणि भाऊबीजे करता त्याच पैशांमधून मामे बहिणी करता छोटं खेळणं घेऊन यायचो.
तेव्हा टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. आपापसांमध्ये संवाद असायचे, विनोद असायचे, फिरक्या घेणे असायचे. आणि त्यामध्ये एक वेगळीच मजा असायची आनंद असायचा.
अशा खूप मजेशीर आठवणी आहेत. खरा आनंद घरच्या सगळ्यांशी छान संवाद, योग्य शिस्त, घरचे जेवण, महिन्यात एखादा घरी केलेला गोड पदार्थ यातच असतो.
असं वाटतं अधून मधून त्या भूतकाळातून एक मस्त फेरफटका मारून यावा आणि तो आनंद पुन्हा पुन्हा घ्यावा.
नात्यांची वीण ही रेशमाच्या धाग्यासारखी असते, जितकी मऊ आणि सुंदर, तितकीच नाजूक.
… आयुष्य जगत असताना अनेक माणसे भेटतात, काही मनात कायमचे घर करतात, तर काही जीवाभावाचे सोबती बनतात. पण कधी कधी काळाच्या ओघात किंवा परिस्थितीच्या फेऱ्यात हीच हवीहवीशी वाटणारी नाती अचानक दुरावतात. एखादा छोटासा गैरसमज, बोलता बोलता तोंडातून गेलेला एखादा चुकीचा शब्द किंवा केवळ एका क्षणाचा राग, वर्षानुवर्षांच्या प्रेमावर मिठाचा खडा टाकतो आणि सुरू होतो एक न संपणारा अबोला. खरे तर अशा वेळी मनाच्या एका कोपऱ्यात दोघांनाही एकमेकांची ओढ असते. जुन्या आठवणी आठवून मन भरून येतं, साध्या साध्या गोष्टींतून एकमेकांची उणीव भासते, पण संवाद मात्र खुंटलेला असतो. या दुराव्याचं सर्वात मोठं कारण असतं ‘अहंकार ‘म्हणजेच इगो. मी का वाकू? मी का आधी बोलू? मी वयाने मोठा आहे तर त्यानेच आधी यायला हवं, किंवा मी लहान असूनही मला सन्मान मिळाला नाही, अशा विचारांचे काहूर मनात माजलेले असते.
मोठेपण आणि लहानपण या तराजूत जेव्हा आपण नात्याला तोलतो, तेव्हा नात्याचं वजन आपोआप कमी व्हायला लागतं. आपण हे विसरतो की, नाते टिकवण्यासाठी कोणाचे तरी वयाने मोठे असण्यापेक्षा मनाचे मोठे असणे जास्त महत्त्वाचे असते.
कोणतेही नाते पुन्हा पूर्ववत करायचे असेल, तर अहंकाराची भिंत पाडावीच लागते. समोरचा माणूस आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, याचा विचार केला की इगोची किंमत शून्य होऊन जाते. चूक कोणाचीही असो, पण जर ते नाते आपल्यासाठी अनमोल असेल, तर पुढाकार घेण्यात कसलीच लाज वाटायला नको. कधी कधी ‘सॉरी’ म्हणण्याने आपण लहान होत नाही, उलट ज्याला आपल्या सुखापेक्षा समोरच्या व्यक्तीची साथ जास्त महत्त्वाची वाटते, तोच खरा मोठा असतो.
अबोला हा नात्यातला सर्वात मोठा शत्रू आहे, तो केवळ अंतर वाढवतो. त्याऐवजी समोरासमोर बसून, मनमोकळेपणाने बोलल्यास मोठमोठे डोंगरही विरघळून जातात. नाती ही जपून ठेवायच्या वस्तू नसून ती जगण्याची अनुभूती आहे.
– – आयुष्याचा प्रवास तसा छोटा आहे, त्यात रुसवे-फुगवे आणि अहंकार घेऊन चालण्यापेक्षा प्रेमाची शिदोरी सोबत असलेली केव्हाही चांगली. जर तुम्हाला वाटत असेल की एखादं नातं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, तर मग उशीर करू नका. ‘मोठा ‘ किंवा ‘छोटा ‘हा विचार बाजूला ठेवा आणि मनाच्या मोठेपणाने संवादाचा हात पुढे करा. कारण गेलेली वेळ आणि तुटलेली माणसं पुन्हा मिळवणं कठीण असतं. एखाद्याला गमावून पश्चात्ताप करण्यापेक्षा, स्वतःचा इगो बाजूला सारून त्या नात्याला पुन्हा एकदा फुलायला मदत करणं, हेच खऱ्या समृद्ध आयुष्याचं लक्षण आहे.