मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नोकरीमधली एक मजेशीर आठवण (टेल्को फौंड्री)…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “नोकरीमधली एक मजेशीर आठवण (टेल्को फौंड्री)…” ☆ श्री सुधीर करंदीकर

 – – रॉबर्ट यांचा विश्वास!

नोकरीमधला सगळ्यात मोठा पिरियड मी तेव्हाच्या टेल्को मधे चिंचवडला फौंड्री या विभागामधे काम केले. फौंड्री म्हणजे इथे लोखंडाचा रस तयार करतात आणि तो रस निरनिराळ्या साच्यांमधे ओतून गाड्यांना लागणारी कास्टिंग तयार करतात. मी मेंटेनन्स म्हणजे मशीन ची दुरुस्ती आणि देखभाल ह्या विभागात काम करत होतो. त्यामुळे माझ्याकरता ८ तासांची म्हणजे एक शिफ्ट ची नोकरी असा प्रकार नव्हता. बऱ्याच वेळा २ किंवा ३ शिफ्ट पण थांबावं लागायचं. एकदा शॉपमध्ये मेजर ब्रेक डाऊन आल्यामुळे, मी सलग ५ शिफ्ट शॉप मधे काम केले आहे. म्हणजे आज सकाळी कामावर गेलो आणि दुसऱ्या दिवशी रात्री १२. ३० घरी आलो. तेव्हा घरी फोन करून काही कळवण्याची सोय पण नव्हती. बायकोला माहित असायचं, कि हे आले नाहीत म्हणजे कंपनीमधे आहेत, आणि काळजीचे काही कारण नाही. जास्त थांबल्याचा फायदा म्हणजे नंतर कॉम्पेन्सेटरी ऑफ घेता यायचा.

लोखंडाच्या रसाची हाताळणी सतत होत असल्यामुळेअसुरक्षितता, मशीनचे कर्कश्य आवाज, आणि शॉपमधे चांगल्यापैकी एक्झॉस्ट सिस्टीम असूनही खूप धूळ, असे वातावरण कायमच शॉपमधे असायचे. पण सवय झाल्यानंतर त्याचे काही वाटायचे नाही.

लोखंडाचा रस करण्याकरता आमच्याकडे १२ टन क्षमतेच्या तीन विजेच्या भट्टी होत्या. अजून सुधारणा करण्याकरता ४० टन क्षमतेची होल्डिंग फर्नेस घेण्याचे मॅनेजमेंट ने ठरवले. आपली ८ फूट बाय ८ फूट खोली असते, तेवढी मोठी ही भट्टी असणार होती. १९७८ चा पिरियड होता. त्याप्रमाणे स्वीडन मधल्या ASEA या कंपनीवर ऑर्डर निघाली. भट्टीचे सगळे सामान आले. आणि भट्टीची उभारणी करण्याकरता स्वीडनचे इंजिनियर श्री निमीनन इथे आले. उभारणी करण्यात त्यांच्याबरोबर काम करण्याची मला छान संधी मिळाली. कधी कधी निमीनन यांना कार मधून हॉटेल मध्ये सोडणे किंवा तिथून ऑफिस ला आणणे हे काम माझ्याकडे यायचे. कार मध्ये बसल्यावर ते डोळे मिटून बसायचे, कां? तर, रस्त्यावरचा बेशिस्त ट्रॅफिक बघून त्यांना टेन्शन यायचे. ते म्हणायचे, स्वीडन मध्ये कोणीही कुठलाही ट्रॅफिक नियम कधीच मोडत नाही. त्यामुळे रस्त्यावर एकदम सुरक्षित वाटते. इथे अगदीच विरुद्ध आहे. मी चूप व्हायचो, काय उत्तर देणार!

निमीनन यांचे उभारणीचे काम संपले. आणि ते परत गेले. भट्टी सुरु करण्याकरता कमिशनिंग इंजिनियर ही वेगळी व्यक्ती येते. त्याप्रमाणे ASEA कंपनीचे जर्मनी मधले श्री रॉबर्ट इथे आले. कारमधून ऑफिस समोर उतरल्यावर ते बॅगेतून एक नवीनच घेतलेली कॅप काढायचे आणि डोक्यावर घालायचे. त्यावर समोरच्या फ्लॅप वर ASEA असे लिहिलेले होते. शॉपमध्ये काम करतांना त्यांच्या डोक्यावर ती कॅप कायम असायची. त्यांच्याबरोबर पण काम करण्याची मला छान संधी मिळाली. त्यामुळे शिकायला पण भरपूर मिळाले. म्हणता म्हणता रॉबर्ट यांचे काम संपले, भट्टी व्यवस्थित सुरु झाली, तिचा वापर पण सुरु झाला. रॉबर्ट यांची परत जाण्याची वेळ जवळ आली.

त्यावेळी श्री चौधरी साहेब हे फौंड्री चे मुख्य होते. रॉबर्ट यांच्या जाण्याच्या दिवशी सकाळी ११ वाजता चौधरी साहेबांनी स्पेशल मिटींग बोलावली. सगळ्या डिपार्टमेंट्स चे मुख्य, संबंधित स्टाफ, यांनां बोलावले होते. अर्थात मी पण त्यामधे होतोच. श्री रॉबर्ट पण हजर होते. ऑफिस च्या कॉन्फरन्स हॉल मधे मोठा अंडाकृती टेबल आहे. दोन्ही टोकांना एक एक खुर्ची आहे आणि दोन्ही बाजूला साधारण ८ – ८ खुर्च्या आहेत. आणि बाजूनी पण मागच्या भागात खुर्च्या आहेत. महत्वाची मिटिंग असल्यामुळे ११ ला हॉल पॅक झाला. चौधरी साहेब पहिल्या चेयर वर बसले होते आणि त्यांच्या डाव्या बाजूला श्री रॉबर्ट बसले. त्यांच्या बाजूला श्री सेठीसाहेब, राजाराव, के एस राव, नाडगर, देवधर, शेखर अशी सिनियर मंडळी होती. आणि दुसऱ्या साईडला श्री होडीवाला, इक्बाल सिंग, कोपरकर, बसूतकर, गद्रे, ताराबादकर ही सिनियर मंडळी बसली होती. माझा नंबर टेबलच्या दुसऱ्या टोकाच्या म्हणजे चौधरी साहेबांच्या बरोबर समोर दुसऱ्या टोकाच्या च्या खुर्चीवर लागला.

चौधरी साहेबांनी आधी फर्नेस च्या उभारणीचा उल्लेख केला आणि श्री निमीनन यांचे आभार मानले. फर्नेस व्यवस्थित सुरु करून दिल्याबद्दल श्री रॉबर्ट यांना पुष्पगुच्छ आणि गिफ्ट देऊन त्यांचे आभार मानले. आता रॉबर्ट यांचे काम संपले आहे आणि आज दुपारी ते आपल्या मायदेशी परत जाणार आहेत असे सांगितले. त्यांच्या संपर्कात राहून सगळ्यांनी आवश्यक ती माहिती घेतली असणार आहेच. पण अजून कुणालाही काही लास्ट मोमेन्ट शंका असतील, तर त्या त्यांनी श्री रॉबर्ट यांना आज जरूर विचाराव्या, जेणेकरून आपल्या सगळ्यांना फर्नेसचा वापर करतांना यापुढे काहीही अडचण येणार नाही. पुढचे नियंत्रण त्यांनी रॉबर्ट यांच्याकडे दिले.

श्री रॉबर्ट : (रॉबर्ट जर्मनी मधे रहात असूनही इंग्रजी छानच बोलायचे) माझ्या कामात सगळ्यांनीच मला छान सहकार्य केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. माझे सगळेच काम खेळीमेळीच्या वातावरणात छानच झाले. माझ्या राहण्याची आणि इथे रोज जाण्या-येण्याची पण व्यवस्था खूपच छान होती. चौधरी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शंका जरूर विचारा —

(सगळ्यांना वाटले की आता लोक शंका विचारतील आणि रॉबर्ट उत्तरे देतील)

पण रॉबर्ट यांनी एकदम गुगली टाकली. त्यांनी स्वतःच्या डोक्यावरची ASEA लिहिलेली कॅप हातात घेतली आणि टेबलवरून ती माझ्याकडे भिरकावली. कॅप बरोब्बर माझ्यासमोर येऊन थांबली.

रॉबर्ट : Karandikar, This cap is for you and cap is now yours.

रॉबर्ट : (सगळ्यांना उद्देशून) चौधरी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शंका जरूर विचारा, पण त्यांना मी उत्तरे देणार नाही, माझ्या वतीने मिस्टर करंदीकर उत्तरे देतील.

मी स्वतःला चिमटा काढून जागे असल्याची खात्री करून घेतली. माझ्या बाजूला बसलेल्यांनी हात मिळवून माझे अभिनंदन केले.

प्रश्नोत्तरे सुरु झाली. सगळ्यांनीच सहभाग घेतला. थोड्याच वेळात चहा आणि बिस्किटे आली. १ वाजता मिटिंग संपली. सगळ्यांनी रॉबर्ट यांना बाय बाय केले आणि आम्ही जेवायला कँटीन मध्ये गेलो.

असा आणि इतका विश्वास कोणी अनोळखी परदेशी माणूस आपल्यावर दाखवू शकतो, हा एक आगळा वेगळा आणि स्फूर्तिदायक अनुभव आज मला मिळाला. (मी मनात देवाचे आभार मानले आणि फौंड्री चे आभार मानले, आणि रॉबर्ट यांचे आभार मानले)

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रद्धा… ☆ तृप्ती कुलकर्णी ☆

तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

श्रद्धा…☆ तृप्ती कुलकर्णी

‘श्रद्धा’ ही जगण्यातली ॲबस्ट्रॅक्ट भावना आहे असं मला वाटतं. आपण कुठल्यातरी गोष्टीवर श्रद्धा ठेवतो म्हणजे नक्की काय करतो? श्रद्धा ही फक्त सगुण उपासने पुरतीच मर्यादित नाही. ईश्वर हे जर आपण मोठं तत्व मानलं तर ते ठराविक रूपात, ठराविक आकारात ठराविक प्रकारेच व्यक्त होईल याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे जर आपण त्या शक्तीवर विश्वास ठेवला तर ती शक्ती म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट भावनेसारखीच वाटू लागते. एखाद्या कृतीतून, एखाद्या विचारातून आपण त्या भावनेशी जोडले जातो आणि मग नंतर मात्र ती भावना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात पण मूर्त रूपात आपल्याला जाणवायला लागते. ती दृष्टी आपली असते ते व्हिज्युअलायझेशन आपलं असतं. सगळ्यांना ते त्या प्रकारेच जाणवेल असं म्हणता येत नाही. त्याला कधी आपण प्रचिती आली असं म्हणू शकतो कधी दृष्टांत झाला असा म्हणू शकतो किंवा आणखीन काही. पण ती असते अमूर्त. आपण जशीच्या तशी आपल्याला आलेली अनुभूती दुसऱ्याला दाखवू शकत नाही. कारण प्रत्येकाचं मन त्यातला भावना आणि त्याचं या ईश्वरी शक्तीशी जोडलं जाणं हे वेगळ्या प्रकारे असतं. एका झाडाच्या सगळ्या फांद्या जशा एकसारख्या नसतात हे आपण समजतो त्याचप्रमाणे एका भावनेच्या प्रगटीकरणाची अनेक रूपं असू शकतात. हेही जाणून घेतलं की ईश्वरी शक्ती आहे /नाही अमुक एक रूपात आहे किंवा नाही हे सगळे वाद निरर्थक आणि व्यर्थ वाटू लागतात.

कधी कधी प्रश्न पडतो माणसाला या शक्तीचं इतकं आकर्षण का आहे? जेव्हा जेव्हा या प्रश्नाचे उत्तर सोडवण्याचा माझ्यापरीनं प्रयत्न करते तेव्हा जाणवतं की स्वामी समर्थ असे म्हटल्यानंतर जी एक मनात प्रबळ भावना येते ती स्वामीत्वाची असते. माणसाला स्वामित्व हवं असतं पण ते त्याला मिळण्यासाठी कुठेतरी कनेक्ट होणं गरजेचं असतं. ते कनेक्शन देणारी कुठलीही गोष्ट त्याच्यासाठी विशेष आणि आदरणीय असते. स्वामींच्या चरणी लीन होत असताना आपल्या जगण्यातल्या अनेक समस्या दूर होऊन आपल्याला त्यांचं स्वामित्व मिळावं आणि त्यासाठी त्यांनी कृपा करावी हा साधा विचार मनात असतो. म्हणजे एकूण जर आपल्या श्रद्धेच्या पाठीमागचं कारण सच्चेपणाने शोधायला गेलो तर अनेकदा ते जगण्यावरचं स्वामित्व मिळवणं असतं. कारण खूपदा अशा अनेक गोष्टी घडतात ज्या आपल्या हातात नसतात, त्यांच्यावर नियंत्रण नसतं. अशा वेळी स्वतःवर नियंत्रण आणि परिस्थितीवर नियंत्रण या दोन्हीचा संयोग साधण्यासाठी ही श्रद्धा कामी येते. काही प्रसंग काही घटना यातून पुन्हा पुन्हा जेव्हा आपल्याला हा दिलासा मिळतो, तेव्हा आपली श्रद्धा अधिकाधिक बळकट होत जाते.

आज स्वामी प्रगट दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाला ही श्रद्धा मिळो आणि त्याच्या मनोकामना पूर्ण होऊन सर्व काही मंगल होवो या शुभेच्छा! बाकी मला सगुण आणि निर्गुण दोन्ही रुपात स्वामी तितकेच आपलेच वाटतात.

© तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “धर्मसंकट!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “धर्मसंकट!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

सुभेदार.. – मेजर सेंगर साहेब – कारगिल युद्धातील विजयाचे प्रातिनिधिक चित्र

मेजर बाळू मोहारे

“ब्रावो, तुम नीचे चले जाव… यह मेरा हुकुम है! ” 

मोहिम आता शेवटच्या टप्प्यात आली आहे… हे एवढं १९५ मीटर्सचं अंतर चढून गेलं… दोन रात्रींत की… भारतीय सैन्याचे शूर जवान पाकिस्तानी खंदकांमध्ये घुसून हाहा:कार माजवणार आणि शत्रूला तिथून हुसकावून लावणार हे निश्चित होतं… ही सैन्यचौकी परत भारताच्या ताब्यात येणार हेही निश्चित होतं. आणि असं असताना सर्वांत पुढे असणा-या सैनिकाला मोहिमेचे प्रमुख लष्करी अधिकारी आज्ञा देत आहेत… माघारी फिर!

 “नाही, साहेब! मी माघारी नाही जाणार मोहिम अर्धवट सोडून! ” ब्रावो निर्धाराने म्हणाला!

 तो पर्वत त्याच्या मागील बाजूने पाच हजार फूट उंच वर चढून जायचं होतं. खरं तर पुढच्या बाजूने चढत जाणे सोपे आणि कमी वेळ घेणारं होतं… पण या बाजूने वर चढण्याचं धाडस करणं म्हणजे मरणाला स्वत: हाक मारण्यासारखं! कारण कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने अतिरेक्यांच्या वेशात घुसखोरी करून भारताची काही ठिकाणं काबीज करून ठेवलेली होती. अनेक तरुण वीरांच्या प्राणांची बलिदाने देत देत ही सर्व ठिकाणं पुन्हा हस्तगत करण्याची मोहीम सुरु होती. या ठिकाणांपैकी हा पर्वत एक अतिशय अवघड आणि उंच पर्वत होता. शत्रू पर्वताच्या त्या उंच शिखरावर खंदक बनवून बसला होता.. आणि शत्रूच्या सैनिकांची संख्या होती दोनशेपेक्षा अधिक. आणि शस्त्रसज्जता खूप आधी, नियोजनपूर्वक करून ठेवलेली होती. उंचीवर असल्याचा फायदा घेत पाकिस्तान वरून भारतीय फौजांवर थेट आणि अचूक गोळीबार करू शकत होता. आणि म्हणूनच ही पोस्ट पाकिस्तानच्या हातून परत हिसकावून घेणं अनिवार्य झालं होतं!

 मेजर साहेबांनी निवडक वीस जवान सोबत घेतले. योजना तयार होतीच. पण योजना कागदावर जेवढी सोपी वाटत होती तेवढीच अंमलात आणायला महाकठीण. या बाजूने कधीच कुणी वर चढून येऊ शकणार नाही, अशी खुद्द शत्रूचीच खात्री होती. कारण, चढण भयावह सरळसोट. त्यात बर्फ. पाय ठेवण्यात किंचित चूक म्हणजे हजारो फूट खाली कोसळून मृत्यू ठरलेला. इथून वर चढण्याचा विचार कोण करेल?

 हा विचारच नव्हे तर कृतीही करू शकणारी एक सेना जगात आहे… भारताची… हिंद की सेना! एक प्रचंड वळसा घेत सेना निघाली. प्रत्येकाच्या खांद्यावर जगण्यासाठी, झोपण्यासाठी आणि लढण्यासाठीचं सारं अत्यावश्यक साहित्य… वजन खूप.. किमान चाळीस किलो तर निश्चित! एखादा ग्राम जरी वजन कमी नेता यावं म्हणून खाद्यपदार्थांची वेष्टने सुद्धा काढून टाकलेली होती… कारण शरीर त्याच्यावर लादलेल्या प्रत्येक ग्रामचा हिशेब मागत राहतं चालताना, डोंगर चढताना. पायांत खास बर्फातले बूट… बर्फातून वाट काढायची होती… आणि विरळ हवेतील प्राणवायू शक्ती लावून शरीरात ओढून घ्यायचा होता.

 सारा प्रवास रात्रीच्या अंधारात… तशी चंद्रप्रकाशाची थोडीसी सोबत मिळायची पण ती थोडीशीच. चालताना चंद्रप्रकाशही धोक्याचाच होता. वरून जर शत्रूने खाली पाहिले आणि त्याला हालचाल दिसली तर प्राण वाचणार नाहीत असा गोळीबार होणार. दिवसा चालण्याचा प्रश्नच नव्हता. दिवस उजाडू लागला की पांढ-या रंगाचा पोंचू म्हणजे पावसाळ्यात घालतात तसा कोट अंगावर घ्यायचा आणि काहीही हालचाल न करता बर्फात पडून राहायचं… बर्फ मरणाचं थंड… तापमान दर्शवणारा पारा खाली खाली सरकतो आहे. लपण्यासाठी आडोसा कुठेच नाही… सर्वजण जमेल तिथे झोपून जात… पण झोप केवळ म्हणायला… दिवसभर वेळ घालवण्यासाठी गप्पा आणि हास्यविनोद… दबक्या आवाजातले! मोहिमेच्या मुख्य दोन-तीन जणांनी तर ठरवून टाकलं… पुढे आयुष्यात याच जागी यायचं आणि दिवस असाच काढायचा! मरणाच्या वाटेवर चालत असताना भविष्यकाळाचा विचार केवळ शूरच करू जाणे! तसं मोहिमेवर निघताना कमांडर साहेबांनी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या प्रिय व्यक्तीच्या नावे एक पत्र लिहून द्यायला सांगितलं होतं. जो कुणी मोहिमेवरून परतू शकणार नाही, त्याच्या घराच्या पत्त्यावर हे पत्र पोहोचवले जाणार होतं!

 रात्रीचे चालणं आणि दिवसा बर्फात एखाद्या दगडासारखं पडून राहणं… असं पाच-सहा दिवस चाललं. मुख्य पर्वत लागला तेंव्हा एका रात्रीत शे-सव्वाशे मीटर्सच प्रवास होई… पुढे चालणारे… नव्हे बर्फाच्या पहाडाला स्वत:चं शरीर चिकटवून वर वर जाणारे दोन जवान. अत्यंत अनुभवी आणि कुशल. त्या पर्वतीय भागाची खडानखडा माहिती असलेले जुने जवान. कमरेला दोर. एका हातात टोकदार कुदळ-कु-हाड. खांद्याच्या थोडंसं वर बर्फात कु-हाड टोचायची… मग दुस-या हातातली कु-हाड टोचायची… त्या कु-हाडीवर शरीराचं वजन पेलायचं… एक पाय खालच्या किंचितशा कपारीवर टेकवायचा… पहाडाच्या छातीत खिळा ठोकायचा… त्यात दोर ओवायचा… दोर खाली सोडायचा… त्या दोराला धरून खाली थांबलेले सैनिक वर चढणार… असे एक पाऊल वर टाकायचे म्हणजे घरच्या सपाट बागेत पंधरा मिनिटे सलग फावडे मारण्याइतके श्रम. कोपरापासून हात थंडीने आकडून जायचे. म्हणून एका वेळी एकाने एकएकदा दोर लावण्यासाठी वर जायचे… असे दोघे जण आळीपाळीने हे काम पार पाडीत होते… अजून वरून शत्रूने पाहिले नव्हते! या प्रवासात किती विश्रांती मिळाली असेल? काय खाल्ले असेल? शरीरधर्म कसा पार पाडला असेल? कुटुंबियांची किती आठवण आली असेल? शेवटच्या पत्रात काय लिहिलं असेल? शत्रू संख्येने किती आहे हे माहीत नाही… मोहिमेचा शेवट कसा होईल हे ठाऊक नाही! पण सैनिकांची पावलं थबकली नव्हती!

 वाटेतल्या एका विशिष्ट जागी जवळचं इतर साहित्य ठेवलं गेलं… कारण ते घेऊन वर चढणं कठीण जात होतं. दोर लावून झाला की परत यायचं आणि हे साहित्य सोबत आणण्यासाठी जोडी जोडीने जायचं आणि यायचं. हे अंतर सुमारे दीडशे मीटर्स होतं. एकेदिवशी हे सामान परत आणायला गेलेल्या सैनिकांच्या जोडीच्या हालचाली शत्रूने टिपल्या… त्यांना आपले सैनिक दिसले नाहीत… पण एके ठिकाणी काही खुणा दिसल्या असाव्यात… त्यांनी त्या जागी बॉम्बगोळे टाकले. ते दोघेही सैनिक जबर जखमी झालेच असावेत!

 आता पुढे आलेले अधिकारी आणि एक डॉक्टर त्यांच्या B. F. N. A. (Battle Filed Nursing Assistant) सह मागे पळत निघाले… बर्फात पळणं म्हणजे जमेल तेवढं वेगात चालणं. तेवढ्यात ते दोघे सैनिक यांच्याकडेच येताना दिसले… पुढे असणा-या सैनिकाच्या हातातून रक्ताची धार लागलेली होती.. दुसरा सैनिक त्याच्या काही पावलं मागे होता… डॉक्टर पुढे झाले आणि त्या सैनिकाचा हात हातात घेऊ लागले… तेवढ्यात त्या सैनिकाने डॉक्टरांना जोरात मागे ढकलले… आणि म्हणाला… ”साहब… पिछे वाले मेरे बडी को देखो… उसके सिर में घाव हुआ है! ”

डॉक्टर आणि नर्सिंग असिस्टंट मागे धावले… बॉम्बचा एक तुकडा त्या सैनिकाच्या डोक्याला खोलवर जखम करून गेला होता… रक्त वाहत होतं… त्याही गडबडीत नर्सिंग असिस्टंटने त्या सैनिकाच्या डोक्यावरचे त्या जखमेवरचे केस काढले… आणि एखाद्या सुसज्ज ऑपरेशन थिएटर मध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स घालतात तसे अचूक, नीटस टाके घातले… त्यामुळेच त्या सैनिकाचे प्राण वाचणार होते. सैनिकांनाच नर्सिंगचे प्रशिक्षण दिले जाते… रक्तस्राव थांबवणे, रुग्णाला स्थिर करणे, उपचारासाठी तिथून हलवणे अशी कौशल्ये सैनिकांना अवगत असतात. सफाईदारपणे रायफलचे ट्रिगर्स दाबणारी खडबडीत बोटं एखाद्या विणकर पक्ष्यासारखे नाजूक, अचूक टाके घालतात हे विशेषच म्हणावे लागेल.

 आता केवळ १९५ मीटर्स अंतर उरलं… ते चढून गेलं की थोडी सपाट जागा येईल. तिथं शत्रूचे खंदक असतील… शत्रू आरामात खंदकाच्या खोलीत खोलवर बसून गोळीबार करीत असेल… आणि आपण त्यांच्यावर तुटून पडायचं!

 शेजारच्या पहाडांवरून आपले इतर सैनिक आपल्या या बहादरांचा प्रवास पाहू शकत होते… श्वास रोखून. शत्रूला गुंतवून ठेवण्यासाठी आपल्या तोफा खालून वर मारा करीत होत्याच पुढच्या दिशेने… यांना मागून वर चढता यावं अशासाठी ही योजना होती. ही शेवटची चढण चढायला आरंभ करण्याच्या वेळी, म्हणजे अंधार पडायच्या बेतात असताना या मोहिमेच्या प्रमुखाला वरिष्ठ पातळीवरून वायरलेस मेसेज आला… ”ब्रावोला परत पाठवून द्या! त्याच्या घरी आणिबाणीची वैद्यकीय परिस्थिती उदभवली आहे. त्याचे घरी असणे अत्यावश्यक आहे! ”

 ब्रावो बर्फाच्या एका कड्याखाली वर चढायला सुरुवात करण्याआधी थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून बसला होता… साहेबांनी त्याच्याकडे पाहिलं… त्याच्या चेह-यावर नेहमीचं एक हास्य होतं… पण त्या हास्याच्या थराखाली एक पुसटशी चिंताही दिसली! सैन्यात बारा-पंधरा वर्षांची सेवा झालेला ब्राव्हो… गावाकडे कुटुंब… आई-वडील, पत्नी. आदर्श मुलगा आणि प्रेमळ पती म्हणून गावात याची ओळख. एक शल्य मात्र मनाला टोचणी लावून होतं… पदरी अपत्य नव्हतं. पत्नी दोनदा आई होण्याच्या अगदी जवळ असतानाच वैद्यकीय कारणांनी घात केला… आणि अपत्यसुख दूर गेलं.

 आणि आज मोहिमेच्या प्रमुख साहेबांना बेस वरून मेसेज आला आहे… पत्नी त्याच अवस्थेत आहे… यावेळी तिच्या जीवाला खूप धोका आहे! या मोहिमेच्या प्रमुखांसमोर एक यक्षप्रश्न उभा राहिला. मोहिम महत्त्वाची आहे… हा सैनिक महत्त्वाचा आहे… त्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानेच इथवर दोर लावत लावत आपल्या दलाला सुरक्षित आणलं आहे… आता तर एक दोन रात्रीचीच चढण शिल्लक आहे! पण हा ब्रावो तर जीवाला जीव देणारा… तहान-भूक हरपून याने काम केलं आहे! आता याच्या पत्नीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हा तिच्याजवळ तिच्या या निकराच्या प्रसंगी असला पाहिजे… कारण घरी म्हातारे आई-वडील… अशावेळी आपलं माणूस जवळ असावं!

 मोठ्या काळजाच्या प्रमुखाने त्याही स्थितीत एक निर्णय घेतला… ब्रावोने त्याचं काम चोख बजावलं आहे… आता आम्ही उरलेलं काम करू! ते म्हणाले, ”ब्रावो… निघ. घरच्या मार्गाला लाग. इथून खाली जाणं तुलनेने सोपे आहे… वर यायला पाच दिवस लागले… खाली जायला दोनच दिवस लागतील… सोबत एक बडी देतो… जा… वहिनीला तुझी जास्त गरज आहे! ”

 यावर ब्रावो एखाद्या लहान मुलासारखा हमसून हमसून रडू लागला! ते पाहून प्रमुख अधिका-याचेही डोळे भरून आले! अंधार होऊ लागला होता… चढण सुरु करायला पाहिजे… वेळ गमवता कामा नये. पण ब्रावो काही केल्या तयार होईना… म्हणाला… ”साहेब, आपण अगदी जवळ आलोय… दोन रात्रींत पोहोचू वर. या मोहिमेत सहभागी होण्याचे भाग्य लाभावं म्हणून स्वयंस्फूर्तीने तुमच्या दलात आलो… कारण मला माहित आहे… मी डोंगर सफाईदारपणे चढू शकतो… माझा उपयोग होईल मोहिमेत! ” 

 यावर साहेब म्हणाले, ”ब्रावो, तुझी तर वार्षिक रजाही तू घेतली नव्हतीस. आता संधी आहे आणि गरजही. जा तू! ” त्यावर ब्रावो उत्तरला… ”अशा स्थितीत रजेचा विचारही मनाला शिवला नाही, साहेब! ” “हा तर माझ्या रेजिमेंटच्या इज्जतीचा सवाल आहे… नाम, नमक और निशान! ”

 “साहेब, माझ्या सोबतीने आळीपाळीने दोरी लावण्यासाठी वर चढणा-या माझ्या बडीच्याअल्फाच्या पायांना मोठ-मोठे फोड आलेत… मी त्याला सांगितलं आहे… इथून पुढची सर्व चढण मी एकटा चढेन आणि दोर लावेन! ”

 हे बोलणे सुरु असताना ज्याच्या पायांना फोड आलेले आहेत, असा त्याचा बडी, अल्फा पुढे झाला आणि त्यानेही ब्रावोची समजूत काढायला सुरुवात केली… एक एक क्षण पुढे जात होता… मोहिमेला उशीर होत होता!

 सहका-याचे वाक्य पुरे होण्याआधीच ब्रावो एखादा स्फोट व्हावा तसा ओरडून म्हणाला… ”मला मूल झालंच आणि त्याने मला विचारलं… तुम्ही तुमच्या सहका-यांना ऐन लढाईत सोडून घरी निघून का आलात? तर त्याला मी काय सांगू? ” 

 सर्वच शांत झाले… प्रत्येकाच्याच मनात हाच सवाल होता. सर्वच जण एकमेकांसाठी जीवाला जीव देणारे सैनिक. कुटुंबांपेक्षा जास्त सहवास लाभलेले वीर. कित्येक मरणं अनुभवलेली पहाडी मनं.

 यात अर्धा पाऊण तास गेला… शेवटी प्रमुखांनी… Its an order, Bravo! असं म्हटल्यावर जड पावलांनी ब्रावो तिथून खाली जायला तयार झाला… त्यानेच लावलेल्या दोरावरून खाली खाली घसरत चालला… एखादी निर्जीव वस्तू असावी तसा!

 इकडे दोन रात्री चढण चढत चढत सैन्य वर पोहोचले… आता केवळ काही मीटर्स अंतर राहिले होते… शत्रूचे खंदक आणि आपल्या सैनिकांत… प्रमुखांनी कवर फायर साठी बेसला मेसेज दिला… तिथून मेसेज आला… नो गन फायर! युद्ध थांबवण्याचा आदेश आला होता… Cease-fire घोषित झाले होते. भारताने ऑपरेशन विजय पूर्ण केले होते. पराभूत पाकिस्तानी सैन्य त्या पर्वतावरून खाली उतरायला सुरुवातही झाली होती!

 इकडे याच वेळी ब्रावो घरी पोहोचला होता… त्याने साहेबांना मेसेज केला… ”साहेब, बाळ-बाळंतीण सुखरूप! मी बाप झालो! ” 

 घरची काळजी बाजूला ठेवत मोहिमेत सहभागी झालेला, डोंगराएवढी समस्या असतानाही डोंगर चढत राहण्यासाठी अडून बसलेला सैनिक, मोहिमेची काळजी असतानाही सहकारी सैनिकाच्या कौटुंबिक समस्येची काळजी वाहणारे कमांडिंग ऑफिसर, मोहिमेतले प्रमुख अधिकारी… या सर्वच गोष्टी अलौकिक! या सर्वांचीच जणू दैवानेच धर्म संकटातून सुटका केली होती!

(प्रस्तुत कहाणी कारगिल युद्धादरम्यान घडलेली आहे. मेजर दीपेंद्रसिंग सेंगर (सेवानिवृत्त) यांनी त्यांच्या एका भाषणात ही कथा सांगितली होती. सैनिकी पद्धतीनुसार त्यांनी त्यावेळी ब्रावो, अल्फा ही नांवे वापरली होती. ही नावे म्हणजे रेडीओ सिग्नल्स असतात. पण पुढे Monks and warriors नावाच्या podcast मध्ये त्यांनी ब्रावोच्या नावाचा उल्लेख केला आहे… सुभेदार मेजर बाळू मोहारे (निवृत्त)! आणि त्यांचे छायाचित्रसुद्धा दाखवले आहे.)

© श्री संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शास्त्रस्तुती… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

✦ शास्त्रस्तुती… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆

ज्ञान, अनुशासन आणि मुक्तीचा दिव्य प्रवास

शास्त्र म्हणजे काय

शास्त्र या शब्दाचा उगम आणि अर्थवैभव

‘शास्त्र’ या शब्दात ‘शास’ हा मूळ धातू आहे. संस्कृत भाषेतील ‘शास’ धातूला ‘ष्ट्रन्’ प्रत्यय लावून ‘शास्त्र’ हा शब्द निर्माण झाला आहे. ‘शास’ या धातूचा अर्थ— उपदेश करणे, शासन करणे, अनुशासित करणे असा आहे.

म्हणूनच ‘शास्त्र’ म्हणजे—

जे मार्गदर्शन करते, अनुशासन घडवते आणि जीवनाला योग्य दिशा देते ते शास्त्र. 

 

*शास्त्राची तात्त्विक व्याख्या*

भारतीय वैचारिक परंपरेनुसार शास्त्र म्हणजे केवळ संग्रहग्रंथ नव्हे; तर ते क्रमबद्ध, सुसूत्र आणि जीवनदर्शी ज्ञान आहे.

 

प्राचीन व्याख्या सांगते—

“शासनात् शंसनात् शास्त्रम्”

म्हणजे जे अनुशासन करते आणि ज्ञानाची ओळख करून देते ते शास्त्र. तसेच—

“शास्ति च त्रायते च शास्त्रम्”

म्हणजे जे योग्य-अयोग्याचा निर्णय शिकवते आणि अज्ञानापासून रक्षण करते ते शास्त्र.

 

*शास्त्र : ज्ञानाचे संरचित रूप*

कोणत्याही विषयाचे क्रमबद्ध, तर्कसुसंगत आणि अनुभवाधिष्ठित ज्ञान म्हणजे शास्त्र.

– – या अर्थाने शास्त्रे अनेक असली तरी भारतीय तत्त्वज्ञानात विशेष मान्यता असलेली षट्दर्शने अशी आहेत—

न्याय, योग, सांख्य, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत (उपनिषदे)

यांखेरीज—

वेद, पुराणे, स्मृतिग्रंथ, तसेच अर्थशास्त्र, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र, नाट्यशास्त्र, छंदशास्त्र, आयुर्वेद इत्यादींचाही शास्त्रांत समावेश होतो; परंतु _त्यांचे प्रामाण्य हे श्रुति आणि वेदांताधिष्ठित तत्त्वांवर आधारित असणे आवश्यक मानले गेले आहे. _

 

*शास्त्रांचे प्रामाण्य : अनुभव, तर्क आणि आचार*

भारतीय तत्त्वज्ञानात शास्त्र हे आंधळ्या श्रद्धेचे नव्हे, तर प्रज्ञेच्या जागृतीचे साधन आहे.

शास्त्रांचा पाया उभा आहे—

श्रुति (अध्यात्मिक परंपरा)

युक्ति (तर्कबुद्धी)

अनुभूति (प्रत्यक्ष अनुभव)

शास्त्र सांगते, पण त्याची सत्यता आचरणातून अनुभवल्याखेरीज ज्ञान परिपूर्ण होत नाही.

म्हणूनच शास्त्र हे—

_वाचनापुरते नसून, जीवन जगण्याची कला शिकवणारे मार्गदर्शक आहे. _

 

*शास्त्र आणि विवेकबुद्धी*

शास्त्राचा खरा उद्देश मनुष्याला विचारस्वातंत्र्य आणि विवेक प्रदान करणे हा आहे, अंधानुकरण नव्हे.

ते शिकवते—

सत्य आणि असत्य यातील भेद.

नित्य आणि अनित्य यातील भेद

आत्मा आणि अनात्म याची ओळख

परंतु—

शास्त्राचा अभ्यास जर केवळ वादासाठी झाला, तर तो ज्ञान न राहता अहंकाराचे साधन बनतो.

म्हणूनच शास्त्राध्ययनासाठी आवश्यक आहेत—

विनय, श्रद्धा आणि चिंतनशीलता

 

*शास्त्र आणि साधकाची भूमिका*

नम्र विद्यार्थ्याने, ज्ञानेच्छु साधकाने आणि सूज्ञ व्यक्तीने शास्त्रांचा आदर करावा. त्यांचा सखोल अभ्यास करावा. उथळपणे त्यांना नाकारू नये. एखादा विचार पटला नाही तर

शास्त्राला दोष देण्यापूर्वी स्वतःच्या तर्काची चिकित्सा करावी.

बहुधा दोष आपल्याच आकलनात असतो, आणि सखोल विचारांती हे उमगते आणि मन नम्रतेने शास्त्रापुढे नतमस्तक होते.

 

*कालपरत्वे शास्त्रांचे पुनर्वाचन*

काळ बदलतो, परिस्थिती बदलते; परंतु शास्त्रातील मूलतत्त्वे शाश्वत असतात. त्यातील काही दृष्टांत, उदाहरणे, तपशील कालबाह्य होऊ शकतात; परंतु तत्त्वे मात्र चिरंतन सत्य असतात.

म्हणूनच प्रत्येक युगात शास्त्रांचे

नव्या दृष्टिकोनातून पुनर्वाचन आवश्यक ठरते.

 

*शास्त्र : कुमार्गापासून सन्मार्गाकडे*

थोडक्यात—

जे ज्ञान माणसाला कुमार्गापासून दूर नेऊन सन्मार्गावर आणते, त्याचे कल्याण करते—तेच शास्त्र.

शास्त्र हे—

जीवनाला दिशा देते

मनाला स्थैर्य देते

बुद्धीला स्पष्टता देते

 

*समारोप : प्रकाशाचा अखंड स्रोत*

शास्त्र म्हणजे केवळ अक्षरांचा संग्रह नाही; ते जीवनाचा दीपस्तंभ आहे.

शास्त्र —

अज्ञानातून ज्ञानाकडे नेते

अस्थिरतेतून स्थैर्याकडे नेते

मर्यादिततेतून अमर्यादतेकडे नेते

म्हणूनच—

शास्त्र हे नुसते वाचायचे नसते—ते जगायचे असते,

ते नुसते समजायचे नसते—ते आत्मसात करायचे असते.

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई-वडिलांनी ठेवलेली मौल्यवान ठेव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुचिता पंडित ☆

सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

आई-वडिलांनी ठेवलेली मौल्यवान ठेव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  सुचिता पंडित ☆

भाऊ-बहिणी म्हणजे केवळ नातं नसतं…

त्या आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी जपून ठेवलेल्या सर्वांत मौल्यवान ठेवी आहेत. याची आपल्याला फार उशिरा जाणीव होते. फक्त सख्खी भावंडं नाहीत तर चुलत, मावस, मामे, आत्ते सर्व भावंडांसाठी हे खरं आहे.

आम्ही लहान असताना भाऊ-बहिणी आमचे सर्वात जवळचे सवंगडी होते. दररोज, आम्ही एकत्र खेळत होतो आणि गोंधळ घालत होतो आणि बालपणीचा काळ एकत्र घालवत होतो. आयुष्यात पुढे जाऊन आम्ही एकमेकांपासून दूर जाऊ… अशी पुसटशीसुद्धा कल्पना आमच्या मनाला कधी शिवली नाही.

मोठे होत गेलो तसे आयुष्याला पंख फुटले…

स्वतःचे वेगळे जीवन सुरू झाले, आपापल्या संसारात रमलो, जबाबदाऱ्यांच्या गर्दीत हरवून गेलो. दिवस, महिने, वर्षं सरकत गेली आणि कधी नकळतच भाऊ-बहिणींच्या भेटी ‘कधीतरी’ या शब्दात अडकून राहिल्या.

आज आम्ही क्वचितच भेटतो, पण मनातल्या आठवणी मात्र अजूनही रोजच भेटायला येतात…

आमचे आई-वडील हा एकमेव दुवा होता, ज्याने आम्हा सर्वांना जोडले.

ज्यांच्या प्रेमाच्या एका धाग्याने आम्हा सगळ्या भावंडांना एकत्र बांधून ठेवलं होतं.

नंतर मात्र आपण वेळेची वाटच पाहत राहतो… हळूहळू म्हातारे होईपर्यंत. तेव्हाच लक्षात येतं की आई-वडील आपल्याला सोडून गेले आहेत, आणि आजूबाजूची नाती एकेक करत कमी होत चालली आहेत आणि नेमकं तेव्हाच आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला हळूहळू मायेची किंमत कळायला लागते.

मी नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये १०१ वर्षांचा मोठा भाऊ त्याच्या ९६ वर्षांच्या धाकट्या बहिणीला भेटायला गेला होता. दोघांमध्ये शब्द कमी पण भावना अनावर झाल्या होत्या. थोड्या वेळानंतर जेव्हा दोघे वेगळे होणार होते, तेव्हा धाकट्या बहिणीने कारचा पाठलाग केला आणि तिच्या भावाला २०० युआन दिले आणि त्याला काहीतरी छान खाण्यास सांगितले. तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच दोघांनाही अश्रू अनावर झाले. ते दृश्य बघताना शेवटी असं वाटतं… जणू ते भाऊ बहीण मनोमन एकमेकांना हेच आश्वासन देत असावेत की कदाचित ह्या जन्मात पुन्हा भेट नाहीच झाली, तर पुढच्या जन्मात मात्र आपण नक्कीच एकमेकांना भेटू…

असे काही नेटिझन्स होते, ज्यांनी टिप्पणी केली की एवढ्या मोठ्या वयात भाऊ आणि बहिणी भेटणे खरोखरच खूप भाग्याचे लक्षण आहे.

होय, आपण म्हातारे झाल्यावरच आपल्याला कळते की या जगात आपल्याशी कोणीतरी रक्ताने बांधलेलं असणे किती महत्त्वाचे आहे. तेव्हा संपत्ती, मान-सन्मान, यश सगळं मागे पडतं.

जेव्हा तुम्ही म्हातारे असाल आणि तुमचे आई-वडील दोघेही या जगातून निघून गेलेले असतील, तेव्हा या विशाल, गर्दीच्या जगात तुमचे भाऊ बहिणीच सर्वात जवळचे लोक असतात.

मित्र काळाच्या ओघात दूर जाऊ शकतात… मुलं मोठी होतात… तीही आपापल्या विश्वात रमून दूर निघून जातात. पण आयुष्याच्या संध्याकाळी, जेव्हा हाताला हात हवा असतो, तेव्हा खर्‍या अर्थाने साथ देत उरतात ते फक्त दोनच आधारस्तंभ —

तुमचा जीवनसाथी आणि तुमचे बहीण-भाऊ…

आपण कितीही म्हातारे झालो, तरी सर्व भाऊ-बहिणी एकत्र जमू शकणे हा एक मोठा आनंद आहे.

त्यांच्या सहवासात वयाचं ओझंही हलकं होतं आणि आयुष्याच्या संध्याकाळी मनाला उबदारपणाची कधीच कमतरता भासणार नाही.

त्यांच्या सहवासात आम्ही कोणत्याही अडचणींना घाबरणार नाही. म्हणूनच, वृद्धापकाळ येण्याआधीच…

कृपया, आपल्या भाऊ आणि बहिणींशी जुळवून घ्या, नाती जपा! कारण ही रक्ताची नातीच शेवटपर्यंत साथ देतात.

भूतकाळात काहीही अप्रिय घडलं असलं तरीही… भाऊ बहिणींनी एकमेकांशी अधिक सहनशील, अधिक समजूतदार आणि अधिक क्षमाशील असले पाहिजे.

अशी कोणतीही गाठ नाही, जी भाऊ बहिणीच्या नात्यात बांधता येत नाही.

अशी कोणतीही ढाल नाही, जी भाऊ बहिणीच्या नात्यातून काढली जाऊ शकत नाही.

भाऊ बहिणींनी कधीही जुने हिशेब मांडू नयेत, कधीही जुनी नाराजी मनात बाळगू नये.

थोडे अधिक परस्पर अवलंबित्व, थोडं अधिक परस्पर पालनपोषणाने भाऊ बहिणीचे संबंध दिवसेंदिवस अधिक चांगले आणि अधिक घट्ट होतील… कारण या जगात, आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी ठेवलेली ही सर्व नातीच सर्वात मौल्यवान ठेवी आहेत.

 

 शेवटचा प्रश्न…

 एकुलते एक मुलं lucky की lonely?

 आपल्या सोयीसाठी आजची पिढी स्वातंत्र्य, करिअर, आर्थिक सुरक्षितता, आरामदायी जीवन यांचा विचार करते…

 परंतु भविष्यातील माणसं जगात येऊ न देणं… हे खरंच योग्य आहे का…?

 समाज हळूहळू एकाकी, स्वार्थी आणि नात्यांपासून दूर जात तर नाही ना?

 मुलं म्हणजे आपल्या जीवनाचा पुढचा अध्याय.

 पण कधी शांतपणे आपण स्वतःला विचारतो का?

 आपल्या मुलाच्या आयुष्यभराच्या एकटेपणाचा हिशोब आपण भरू शकणार आहोत का?

 आपण मागे काय सोडून जाणार आहोत?

 आपण ज्या Western world ची आंधळी नक्कल करतो, तोच पश्चिमेकडचा समाज आज पुन्हा ४–५ मुलांना जन्म देण्याकडे वळतोय.

 कारण त्यांनी अनुभवलेय –

मोठी घरे, प्रचंड पैसा, प्रगत सुविधा असूनही त्यांच्या मुलांचं आयुष्य एकाकी, नैराश्यग्रस्त आणि संस्कृतिहीन होत चाललं आहे.

 ते आता म्हणतात —

“We lost families in the race for freedom. ”

 आपण इथे आहोत, कारण कुणीतरी आपल्याला जन्म देण्याचं धाडस केलं.

हजारो वर्षे आपल्या पूर्वजांनी दुष्काळ, रोगराई, युद्ध, गरीबी, अपमान, कष्ट अशा कितीतरी संकटांना तोंड देऊन आपल्याला जगवले.

आज काही जोडपी जाणीवपूर्वक “मुलंच नको” असा निर्णय घेत आहेत.

पण हा निर्णय फक्त त्या दोन व्यक्तींचा नसतो…

तो परिणाम करतो सर्व समाजावर, आपल्या गौरवशाली संस्कृतीवर आणि येऊ घातलेल्या अनेक पिढ्यांवर…

कृपया आजच्या आपल्या संस्कृतीच्या शिलेदारांनी शांत मनाने सारासार विचार जरूर करावा…

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: सुचिता पंडित

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनकवडा राम… आत्माराम… ☆ अपर्णा परांजपे ☆

अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ मनकवडा राम… आत्माराम… ☆ अपर्णा परांजपे

ब्रह्म वाक्य आहे हे असं जर मी म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही याची खात्री आहे!

मुळात हे आत्मचिंतन असल्याने स्व वर केंद्रित आहे. बुद्धी ही दोन प्रकारची आहे.

१ देहबुद्धी (अज्ञान, मर्यादित बुद्धी)

२: आत्मबुध्दी (ज्ञान, अंतिम सत्य)

मग पहिला स्व जाणणारी बुध्दी समजून उमजून बदलवून दुसऱ्या स्व मध्ये प्रतिष्ठित करणे सोपं कसं असेल? म्हणून सगळा गोंधळ, अस्वस्थता, अस्पष्टता असते हे खरे, हे “जीवाचे” लक्षण आहे. पण

जीव जीवच राहून सुखी झाला असता तर सगळे प्रश्न मिटले असते. मर्यादित रुप हे अमर्याद स्वरूपाचा अंश असल्याने त्याची तळमळ शांत होत नाही व खरे समाधान मिळत नाही, जोपर्यंत तो स्वतः अमर्याद होत नाही. हाच अमर्याद स्व म्हणजे दुसरा स्व!

दुसरा स्व ही आपणच आहोत फक्त पहिला स्व ओळखून नव्या स्व ची ओळख धारण करणे ही ” घटना घडणे” म्हणजे खरा चमत्कार आहे.

देह रूपाने जन्म मिळाला हाही चमत्कारच आहे पण तो दृश्य आहे. या देहाचा आधार, चैतन्य म्हणजे आत्मा त्या आत्म्याचे स्वरूप परमात्म्याचा अंश आहे, हे जाणवणे म्हणजे “जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा” या महावाक्याचा स्वानंद अनुभवणे आहे! म्हणून हा खरा “दैवी चमत्कार” आहे!

मर्यादित रुपात स्वतः प्रतिष्ठित झालेला आत्माराम ओळखण्यासाठी त्याचीच माया अडथळा करते, परीक्षा घेते, जे आवश्यक आहे सगळे मनाचे खेळ उघड करते व मनाला स्व कडे वळवते. जीवनानुभव घेत घेत, सत्संग, सत्संगती, सद्ग्रंथ सापडणे ही सद्गुरू कृपा आहे. मार्गदर्शन मिळाल्याशिवाय मार्ग कळणार कसा?

 वेगवेगळ्या पध्दतीने दुसऱ्या स्व ची ओळख व्हावी असा प्रयत्न स्वतः सद्गूरु करतात हीच त्यांची कृपा आहे. आत्मनिष्ठ सद्गूरु च आत्म्याची ओळख करून देतात. मग मर्यादित स्व अमर्याद स्व मध्ये परिवर्तित होतो. महादेव हे देवांचे देव आहेत. त्याच्या मुखातून आलेली कथा पार्वती मातेसोबत शुकाने श्रवण केली व अमरत्व प्राप्त झाले. अश्या गोष्टी जीवनाचा आधार ठरतात.

रामाशिवाय शिव नाहीत

शिवाशिवाय राम नाहीत…

भगवान शंकरांचे जीवन बघितले तर..

भगवान शंकरांना ‘देवाधिदेव’ महादेव म्हटले जाते. महादेवांचे एक रूप तांडव करणाऱ्या ‘नटराजा’चे आहे, तर दुसरे रूप एका महान ‘महायोगी’चे आहे. ही दोन्ही रूपे रहस्यांनी भरलेली आहेत. शिवशंभूंना ‘भोलेनाथ’ असेही म्हणतात. जिथे एकाच व्यक्तिमत्त्वात इतके विविध पैलू आहेत, तिथून आपण आपल्या जीवनासाठी प्रेरणा नक्कीच घेऊ शकतो.

वाईटाचा नाश करणे

ब्रह्मा हे उत्पत्तीसाठी आणि विष्णू हे सृष्टीच्या रचनेसाठी ओळखले जातात, तर शिव हे विनाशासाठी ओळखले जातात. शिवाचे हे रूप कदाचित भीतीदायक वाटू शकते, परंतु प्रगतीसाठी एखाद्या वाईट गोष्टीचा किंवा अनिष्ट प्रथांचा नाश होणे अत्यंत आवश्यक असते. शिव याच परिवर्तनासाठी ओळखले जातात.

शांत राहून स्वतःवर नियंत्रण मिळवणे

शिवापेक्षा मोठा कोणीही योगी झालेला नाही. एखाद्या परिस्थितीत स्वतःला गुंतवून न घेता, अलिप्त राहून त्या परिस्थितीवर पकड ठेवणे सोपे नसते. महादेव एकदा ध्यानाला बसले की संपूर्ण जग इकडे-तिकडे झाले तरी त्यांचे ध्यान कोणीही भंग करू शकत नाही. शिवाचे हे एकाग्र रूप आपल्याला जीवनातील गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यास शिकवते.

नकारात्मक गोष्टींना सकारात्मकतेने स्वीकारणे

समुद्रमंथनातून जेव्हा विष बाहेर आले, तेव्हा ते पिण्याची कोणाचीही तयारी नव्हती. अशा वेळी महादेवांनी स्वतः ते विष (हलाहल) प्राशन केले आणि त्यांना ‘नीलकंठ’ हे नाव मिळाले. या घटनेतून हा मोठा धडा मिळतो की, आपणही जीवनातील नकारात्मक गोष्टी पचवून घ्याव्यात, पण त्याचा परिणाम ना स्वतःवर होऊ द्यावा, ना इतरांवर.

जोडीदाराबद्दल आदर

हिंदू मान्यतेनुसार महादेव हे एक आदर्श जोडीदार मानले जातात. जर पार्वतीने त्यांना प्राप्त करण्यासाठी वर्षानुवर्षे तपश्चर्या केली, तर शिवानेही त्यांना आपली ‘अर्धांगिनी’ बनवून पूर्ण सन्मान दिला. म्हणूनच ३३ कोटी देवांमध्ये केवळ शिवांनाच ‘अर्धनारीश्वर’ म्हटले जाते.

सदैव समान भाव ठेवणे

शिवाचे संपूर्ण रूप पाहिले तर असा संदेश मिळतो की, ज्या गोष्टी आपण साध्या डोळ्यांनी पाहणेही टाळतो, त्या त्यांनी सहज स्वीकारल्या आहेत. म्हणूनच त्यांच्या लग्नाला भूतांची टोळी आली होती आणि अंगाला राख लावलेल्या भोळ्यानाथांच्या गळ्यात साप लटकलेला असतो. वाईट कशातच नसते, फक्त एकदा तुम्हाला ते स्वीकारता आले पाहिजे.

 तिसरा डोळा उघडणे

शिवांना ‘त्र्यंबक’ म्हटले जाते कारण त्यांना तिसरा डोळा आहे. तिसरा डोळा म्हणजे बोध किंवा अनुभूतीचा एक वेगळा आयाम (Dimension) खुला होणे. दोन डोळे फक्त भौतिक जग पाहू शकतात, पण तिसरा डोळा अंतर्मनात पाहतो. या ज्ञानामुळे तुम्ही जीवनाकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकता. त्यामुळे कोणत्याही ठरवलेल्या वाटेवर चालण्यापूर्वी स्वतः विचार करा आणि गोष्टी समजून घ्या.  

स्वतःचा मार्ग स्वतः निवडणे

शिवांची जीवनशैली असो वा त्यांचे कोणतेही अवतार, ते प्रत्येक रूपात पूर्णपणे वेगळे आहेत. मग ते तांडव करणारे नटराज असोत, विष प्राशन करणारे नीलकंठ असोत, अर्धनारीश्वर असोत किंवा लवकर प्रसन्न होणारे भोलेनाथ असोत. ते प्रत्येक रूपात जीवनाला एक योग्य दिशा दाखवतात.  

आपली ग्रंथसंपदा अथांग आहे! त्यातील एखादा कण जरी वेचता आला व त्याची प्रचिती घेण्यासाठी बुद्धी चा निश्चय झाला व तसे आचरण करता आले तर आणि तरच मानवी जीवनाचे कल्याण आहे म्हणून च चिंतन केले

मनकवडा राम… आत्माराम त्याचच खरा आधार व साक्षीदार ही तोच!

जे घडतंय व घडेल ते त्याच्या कृपेने घडणार तर मायिक शब्दांना काय स्थान?

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

कृतज्ञ मी कृतार्थ मी 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”आज महिना अखेर…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आज महिनाअखेर …” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

31 March  “Today is account closing day.” 

… पण आमच्यासारख्या सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या ज्येष्ठांसाठी प्रत्येक महिन्याचाच शेवटचा दिवस खास असतो. त्या दिवशी पेंशन बॅंकेत जमा होते ना. म्हणून. महत्वाचा, आनंदाचा, आधार देणारा दिवस.

… आयुष्यभर इमानदारीने काम केल्यानंतर सरकारने दिलेली पोचपावती म्हणजे पेन्शन.

महिन्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी पहाटे पहाटे मोबाइल वर *टिंग* * असा आवाज ऐकला, म्हणजे ती पेन्शन बॅंकेत जमा झाल्याची सूचना असते. एरवी या *टिंग* चां त्रास होतो. हा आवाज अजिबात आवडत नाही. पहाटे पहाटे तर अजिबातच नाही. पण या दिवशी हा आवाज कानाला खूप गोड वाटतो. हा आवाज ऐकायला मन आतुर असत. जीव भांड्यात पडतो.

नेहमीचेच ठरलेले माझे डायलॉग स्वतः बरोबरच सूरू होतात.

बरंय बाई!! दर महिन्यात न चुकता ही पेन्शन येते. किती का असेना, पण आपल्या हक्काचे पैसे मिळतात. किती आधार आहे या पैशांचा.

देवा!! धन्यवाद बाबा तुला. एवढी एक चांगली सोय केली आहेस आमची. मानाने जगता येत. आता आम्ही रिटायर्ड झालेलो असलो, तरी पैसा लागतोच ना. नाही तर अजून किती दिवस नोकरी केली असती??

We are retired from Work असलो तरी, Not retired from Fun.

मार्च महिना तसा मोठाच, लांबलचक. संपता संपत नाही. असं मनाशीच मी म्हंटल. खरं तर आता रिटायर्ड होऊन दहा वर्षे झाली. आता महिना काय आणि वर्ष काय?? सुरू झाले काय आणि संपले काय?? रोजच्या जीवनात काही विशेष बदल होत नाही. तसं बघितलं तर विशेष काही घडलेलही नसत.  

उद्या नवीन महिना सुरू होणार म्हणजे सर्वांना  घरी येणाऱ्या मावशींना पैसे द्यायचे आहेत. बाकी बिल भरायची आहेत. आता सर्व कामे ‘ on line ‘ होतात, म्हणून दहा मिनिटात सर्वांना पैसे देणे होऊन जाते. उरलेले पैसे आपल्यासाठी पुरेसे असतात. ते पैसे बघता मी सहज म्हणते,

” बहुत पैसे हैं, अपने पास । “

आता काही अगदी पुर्वी सारख राहील नाही. मुलं घरात असताना, त्यांच्या शिक्षणाच्या वेळी, किराण्याची मोठ्ठी यादी तयार होत असे. नोकरी सांभाळून सर्व करताना घरात सर्व सामान व्यवस्थित असलं, तर रोजची कामे सहज सुरळीत होतील, या विचाराने जास्त सामान आणून ठेवणे. हा उद्देश असायचा.

आता घरी दोघेच असल्याने काही सामान नसले तरी चालते. घाई तर अजिबात नसते. बाहेर जाऊ तेंव्हा आणू, तेही लक्षात राहिलं तर.

तेंव्हा आम्हाला असा किती पगार मिळायचा?? त्यात घर खर्च, मुलांची शिक्षण, घराचे हप्ते, सणवार, औषध पाणी यानंतर असे किती पैसे वाचायचे??

बरं!! आता प्रत्येकाचे आयुष्य ‘life span’ ही वाढले आहे. मग पैसा पण जास्त लागणार ना. जमलेला पैसा किती दिवस पुरतो.??

तरी बरं आमच्या सारखे मध्यम वर्गीय लोक मनाने काटकसरीच असतात.

निवृत्ती नंतरच्या काळ ज्येष्ठांसाठी थोडा नाजूकच असतो. पैसा जवळ असला तर स्वतः वर विश्वास राहतो. आधीच मनाने नाजूक अवस्थेतून जात असताना जर त्यांच्या वाट्याला घरच्याच लोकांकडून दुर्लक्ष झाले, तर ही भावना खूप मानसिक त्रास देणारी आहे.

म्हणून ही पेन्शन, हा शेवटचा दिवस महत्वाचा.

आज ३१ मार्च, आज पहाटे *टिंग* काही वाजले नाही. क्षणभर जीव घाबरला. मनात आलं अरे!! काही नवीन सरकारी नियम बदलले तर नाही.??

लगेच लक्षात आलं,

 अरे!!! आज 31 St March

“Today is account closing day.” 

उद्या किंवा परवा पहाटे टिंग नक्की वाजणार.

आज मोबाईल ने मात्र छान टोमणा मारला.

कमाल का ताना दिया मोबाईल ने

हमेशा मेरे *टिंग* को कर्कश कहने वाले,

आज बड़े बेताब हो रहे हो उसी *टिंग* को सुनने के लिए।

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हडळ…!!!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हडळ…!!!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(बुडख्याकडचा (देठाकडचा) भाग हातानंच पिळून तटदिशी तोडला आणि अख्खी मेथीची गड्डी तिनं अक्षरशः हातानं कुस्करुन कढईत टाकली. ना निवडणं, ना साफ करणं, ना देठ काढणं…! )

इथून पुढे – – 

मेथी गरम तेलात पडली, अगोदरच खमंग तळला गेलेला तांबूस लसूण जणू मेथीची वाट बघत होता. मेथीची आणि त्याची कढईत भेट झाल्यावर ‘छिस्स’ असा आवाज आला. हा आवाज मी अजून विसरलो नाही. विसरूच शकत नाही.

यानंतर तिने पुन्हा उलथन घेतलं, त्याच पदराला पुसलं. भाजी हलवली आणि त्यावर मीठ टाकलं. कढईतूनच चिमटीत धरून तिनं ही भाजी माझ्या हिरव्यागार भाकरीवर टाकली. मी तिच्याकडे नुसता पहात होतो.

माझ्या गालावरून खरबरीत हात फिरवत म्हणाली, ‘खा ल्येकरा खा. सकाळधरनं उपासी हायस बाबा… ‘

… यानंतर मी त्या गरमगरम भाजी भाकरीवर तुटून पडलो. मला आठवतं, मी त्यावेळी दोन भाकरी आणि सगळी भाजी फस्त केली होती. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ याची प्रथमच जाणीव झाली. पोट तुडूंब भरलं होतं, मनही!

मी सहज पाहिलं. काठवठीत तिच्यापुरत्या असणाऱ्या पिठाच्या सर्व भाकऱ्या मी खाल्ल्या होत्या. फडक्याखाली आता भाजी शिल्लक नव्हती, डब्यात अजून पीठ शिल्लक असेल की नाही ते मला माहीत नव्हतं. मला माझीच लाज वाटायला लागली.

… गंमत अशी की पोट भरल्यावरच लाजेची जाणीव होते, उपाशीपोटी नाही.

चुलीजवळ बसून मला घाम आता होता. मी तिच्याजवळ जात म्हणालो, ‘मावशी, आता तू काय खाशील? ‘

… आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिला मावशी म्हटलं असावं. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागलं. गरागरा फिरणारे डोळे कुठेच ठरत नव्हते, हुंदका येत होता. त्यालाही ती दाबत होती. तिने ओठ मुडपले होते. त्यातूनही एक दात डोकावत होताच. मला जवळ घेत पुन्हा त्याच पदरानं माझ्या कपाळावरचा तिनं घाम पुसला. या पदरातून मला वास आला, शेणानं सारवलेल्या जमिनीचा, उखळात चेचलेल्या लसणाचा, डोक्याला लावलेल्या तेलाचा, माझ्याच घाबरट घामाचा आणि तिच्यातल्या पान्हा फुटलेल्या आईचा!

या पदरानं मी सुगंधी झालो. आता मला तिची भीती वाटत नव्हती.

जगात आपलं म्हणून कुणीही नसलेली एक समाजात टाकलेली बाई तिच्याही नकळत आई होऊन गेली.

पदरालाही किती पदर असतात ना? वरवर फाटका दिसणारा पदर किती मजबूत असू शकतो?

… प्रत्येक आई-मुलाचं नातं, पदरापासून सुरु होतं… पदराशी संपतं..! या दोन पदरांतला काळ म्हणजे आयुष्य!

आयुष्यात मला अशी बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी पुन्हा कुठंही मिळाली नाही.

इंटरनॅशनल कंपनीत काम करताना अनेकानेक फाईव्ह स्टार हॉटेलात राहिलो. जेवलो. मेनूकार्डवर व्हेजच्या रकान्यात शोधून शोधून मी मलई मेथी, बादशाही मेथी, लबाबदार मेथी, शाही मेथी, कोफ्ता, कश्मिरी मेथी रोल यासारखे अनेक पदार्थ खाल्ले असतील. छे!

स्टारवाल्या हॉटेलात फक्त स्टारच असतात, पण मायेचा चंद्र नसतो.. चांदणं नसतं. दुधाचेही गुणधर्म वाढवायला कोजागिरीचा शीतल चंद्रच लागतो. चकाचाँद करणारे भगभगीत दिवे इथे काय कामाचे? कोणत्याही पदार्थाला कसलीच चव नसतेच मुळी!

चव उत्पन्न होते ती करणाऱ्याच्या मनातून… करणाऱ्याचा भाव शुद्ध असला की कोणतीही अशुद्धी त्या पदार्थाता दुषित करत नाही. संपूर्ण स्वच्छता पाळून शिव्या देत केलेलं पंचपक्वान्नंही बाधतंच, पण कसलीही स्वच्छता न पाळता मनाच्या गाभाऱ्यातनं जेव्हा माया, तेल आणि मिठात सोडली जाते तेव्हा मेथीची ती भाजीही अमृत होऊन जाते.

लोक याच मायाळू मावशीला हडळ म्हणायचे, का तर तिचा चेहरा भेसूर होता.

आपण चेहरा आणि कपड्यांवरून माणसाबाबत आडाखे तयार करतो. बऱ्याच वेळा ते चुकतात. चेहऱ्यावर रंग लावून कलाकार मंडळी नाटक करतात.

– – पण कोणताही रंग न लावता ‘नाटकं’ करतात काही मंडळी, त्यांना काय म्हणावं?

– – एखाद्याचं कौतुक करायला पटकन शब्द सापडत नाहीत, भांडताना मात्र झटपट त्यांना ते आठवतात. याला काय म्हणायचं?

– – ज्यांना आपण आयुष्यभर ‘चुकीची माणसं’ समजत असतो, तेच आपल्याला कधीतरी ‘बरोबर अर्थ’ समजावून सांगतात. मग ते चुकीचे कसे काय?

– – दुसऱ्याच्या चुका या चुका, पण आपल्या चुका म्हणजे ‘अनुभव’ असं कौतुकान सांगणाऱ्यांना काय म्हणावं?

– – – असे दुटप्पीपणानं वागणारे लोकच मग एखाद्या व्यक्तीवर ‘हडळ’ म्हणून शिक्का मारतात. एखाद्याला बहिष्कृत करतात.

या मावशीला मी गावाकडे गेल्यावर अधूनमधून भेटायचो. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असताना एकदा भेटायला गेलो होतो.

वय झालं होतं. खंगून खाटेवर पडली होती. आताशा तिला दिसत पण नव्हतं. वयानुरूप चेहरा आणखी भेसूर झाला होता… जवळ कुणी जायचंच नाही.

– – मी भेटायला गेलो. स्मरणशक्ती ढासळलेली.

तिनं ओळखलं नाही. काही आठवणी करून दिल्या. मेथीच्या भाजीची आठवण सांगितली. मान वळवुन पुन्हा एकदा ती तशीच हसली, जशी मेथीची भाजी खायला घालताना हसली होती पूर्वी… गूढ.. गालातल्या गालात!

‘काय आणून देऊ म्हातारे तुला? ‘ मी हातात हात घेऊन प्रेमानं विचारलं. ठिगळ लावलेल्या अंगावर चुकून पडलंय असं वाटायला लावणाऱ्या लुगड्याकडे तिनं क्षीणपणानं बोट दाखवलं.

‘लुगडं? ‘ मी बरोबर ओळखलं.

मी झट्दिशी उठलो. घरी जाऊन माझ्या आजीची दोन-चार लुगडी घेऊन येण्यासाठी..

तिने हातानंच खूण करत कुठे चाललास असं विचारलं. मी ही खुणेनंच सागितलं, ‘लुगडं घेऊन येतो…! ‘

तिनं मला परत खुणेनच जवळ बोतावलं. मी खाली वाकलो. ती. कानाजवळ येऊन एकेक शब्द तोडत बोलली, ‘जुनं तुज्या आजीचं लुगडं मला नगो, नव्वंकोरं आन तुज्या पैशाचं.. घडी मीच मोडनार… मरनाऱ्या मान्साला जुनं दिऊ न्हाई काई… माज्या पोरानं मला नवं लुगडं आनलं, ह्येजातच माझा आनंद… ‘ हे बोलून ती पुन्हा गूढ हसली.

– – तिचं बोलणं ऐकून मी शहारलो. स्वतःच्या मरणाविषयी इतकी अतिप्तता..!

बरं तिनं कसं ओळखलं ती मरणार आहे ते…?

मी विद्यार्थीदशेत… नवं लुगडं आणायला माझ्याकडे कुठले पैसे त्यावेळी? पण पुढच्यावेळी आलो की घेऊन येईन असे सांगून मी उठलो होतो.

पुढे काही वर्षांनी डॉक्टर झाल्यावर पुन्हा गावी गेलो. गाव चांगलंच सुधारलं होतं.

म्हातारीचं घर मात्र पडून गेलं होतं. पत्रे गंजले होते, ज्या खाटेवर ती झोपायची ती खाट तुटून पडली होती, एका कोपऱ्यात लोळागोळा होऊन… गाव खरंच सुधारलं होतं.

– – शेजारी उभ्या असणाऱ्या एकाला खुणेनं विचारलं, ‘म्हातारी कुठंय? ‘ तंबाखूची पिंक टाकत तो म्हणाला होता, ‘कोन? ती हाडळ व्हय? आरं ती मेली की कवाच… कोन नव्हतं तिला… ‘

पुढचं मला ऐकूच आलं नाही.

कोण नव्हतं तिला? कसं सांगू…?

ती मेली नाही… माझ्या मनात ती कायम जिवंत आहे…!

कोण कसं नव्हतं? मी होतो की तीचा, मनातून तिनं मुलगा मानलं होत मला?

… आई होऊन ती गेली. मलाच मुलगा होता आलं नाही..!!!

प्रत्येकवेळी आपलं मुल भेटत होतं, म्हणून ती तशी गूढ हसली असेल का?

यानंतरही मी अनेकवेळा गावाला गेलो. पण गल्लीत फिरताना हे पडकं घर मी टाळतो.

मला भीती वाटते आणि लाजही!

… पटकन् समोर येऊन ती दे माजं नवकोरं लुगडं अशी पटकन पुढ्यात येऊन मागेल ही भीती… आणि मी तिला ते कधी देऊ शकलो नाही याची लाज.

डॉक्टर झाल्यानंतर पैसे होते रग्गड माझ्याकडे. पण एक लुगडं घेण्याइतकाही मी श्रीमंत नव्हतो, त्या अर्थानं मी ही गरीबच की!

माणसाकडं पैसा असला की तो श्रीमंत होतो असं नाही…! या पैशानं जेव्हा कुणाचा दाह कमी होतो, वेदना कमी होतात, तेव्हा त्या पैशाची ‘लक्ष्मी’ होते. नाहीतर नुसतेच तो कागद किंवा वाजणारी नाणी. खिशात लक्ष्मी असेल तो खरा श्रीमंत.. बाकीचे नुसतेच धनिक!

नोटा आणि नाण्यांचे धनी!!

तिच्या पडक्या घराला तोक *हाडळीचं घर* म्हणतात, मी त्याला आईचं स्मारक समजतो.

– – ती गेली. माझ्या डोक्यावर एका न पेलणाऱ्या लुगड्याचं ओझं ठेवून गेली.

– – तिच्या घराजवळनं जाताना मी नजर चोरतो, एखादा देणेकरी असल्यासारखा…

पण का कोण जाणे…? त्या पडलेल्या घराकडं तरीही पाय वळतातच… आणि उगीचच भास होतो. तुटलेली ती जीर्ण खाट… माझ्याकडे बघत मंद मंद हसते आहे. गालातल्या गालात.. तसंच गूढ..!!!

… आणि मी पाय ओढत एकटाच मी तिथून चालायला लागतो, कुढत… आई नसलेल्या एखाद्या बेवारशासारखा…!!!

– समाप्त –

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १. ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १. ☆ प्रा.भारती जोगी ☆

सगुणाबाई जनार्दनराव पेशवे 

समिधाच सख्या या!! …

” मी सगुणाबाई! नाही ना ओळख लागत? नावही नाही आठवंत ना? बरोबरंच आहे ना… इतिहासाच्या कुठल्या पानात गडप झाले, जमा झाले, हरवले कुणास ठाऊक!

 आता मीच देते ओळख करून…

मी… *सगुणाबाई*! थोरल्या बाजीरावांची धाकटी सून… जनार्दन रावांची पत्नी. सुंदर, गोरीपान आणि विशेष म्हणजे… शिकलेली!

सातारच्या भिडे सावकारांची मी कन्या, वयाच्या ५व्या वर्षी १० वर्षाच्या जनार्दन रावांची पत्नी बनून पेशव्यांच्या घरात आले. आणि जाणवले की बाई गं, मला तर इथे अनेक एकाहून एक अशा मातब्बर सासू आणि जावांमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचयं!

गंमत वाटली ना, अस्तिवाचं टिकवणं तेव्हाही होतं… हे वाचून! पण खरंयं ते!

पण हाय रे दैवा! अस्तित्व टिकवून ठेवीन म्हणंत असतांनाच… अचानक कर्नाटक च्या मोहिमे वरून परततांना जनार्दन रावांना टायफॉइड झाला, आणि मी १०व्या वर्षीच विधवा झाले हो! *बालविधवा* हा शिक्का कपाळावर, आणि लाल आळवण अंगावर! सौभाग्य म्हणजे काय? हे देखील कळले नव्हते, आणि बालविधवा म्हणजे काय? हे तरी कुठे माहिती होतं??

तुम्हाला सांगते… सासर-माहेर दोन्हींची श्रीमंती… पण… सौभाग्याची श्रीमंती हिरावून नेली ना नियतीने! नव-याचा केवळ १४ व्या वर्षी मृत्यू… त्यामुळे एकही पराक्रम नावावर नाही… त्यामुळे मी अभिमानाने मिरवावं असं कुठलंही पद, प्रतिष्ठा किंवा सत्ता ही नाही. जगायला कुठलं कारण ही नाही. मग काय… मरेपर्यंत जगावं लागणार, म्हणून मग विरक्ती ची वाट धरली, बालवयातच! हो! कारण… बालविधवा म्हणजे… *समिधा*!! मूक, मौन, शांत जळंत राहणा-या! त्यांत कुठला आलायं ना ओलावा?

पण एक आधार मिळाला, वेळ घालवायला… *ग्रंथवाचन*! वेगवेगळ्या ठिकाणाहून ग्रंथ मागविले,

दुर्मिळ ग्रंथ संग्रह केला. भरपूर वाचन केले. पोथी-पुराणे ही वाचली. तीर्थक्षेत्री च्या तीर्थ यात्रा ही केल्या.

तुम्हाला एक गंमत सांगते… इतिहासाने माझी नोंद नाही घेतली, पण माझ्या दुर्मिळ ग्रंथ संग्रहाची मात्र नोंद आहे… कदाचित… अ क्षर असा अ क्षय साठा… म्हणून तरला की काय??

असंच वैराग्य युक्त, वैराण आयुष्य आणि वय सरंत होतं… वर्षा-वर्षानी पुढं-पुढं!! कुटुंबातील अनेक मृत्यू या डोळ्यांनी बघितले, पचवले… मायाळू सासू काशीबाई, पित्यासमान नानासाहेब, भावासमान सदाशिव राव, नारायण राव… एक ना अनेक!

पण तुम्हाला सांगते… माधवराव आणि रमाबाईंचं आकस्मिक जाणं… नाही पेलवलं गेलं हो! हा चटका नाही साहता आला. मग खूपच एकटेपण आलं… प्रकृती बिघडली… खालावतच गेली… आणि साता-याजवळ वडूज गावी, वाड्यात… कायमची विसावले मी!

आणि… आणि… पेशवाईतील…

 *पहिली बालविधवा*… इतिहास जमा झाली… एक समिधा निमाली.!

– लेख क्र. १.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पाळणा हलणार की नाही? ☆ अर्चना मुळे ☆

अर्चना मुळे

 ? इंद्रधनुष्य  ?

☆ पाळणा हलणार की नाही? ☆ अर्चना मुळे☆

 – एक सामाजिक प्रश्न

एक काळ असा होता की, आई होताना सामाजिक, कौटुंबिक सक्ती असायची. ‘मुलगाच हवा’ हा हट्ट अनेक तरूणीना जाळणारा, विहिरीत ढकलणारा, माहेरी परत पाठवणारा, निराशा, औदासिन्य, ताणतणाव देणारा होता. मूल हवंच आणि मुलगाच हवा यामधल्या ‘च’ ने त्या काळातील मूल न होणार्‍या किंवा मुलगा न होणार्‍या तरूणींचा प्रचंड मानसिक छळ केला. त्या काळातील ‘मूल हवंच’ या विचारामागे शेतात आणि घरात राबण्यासाठी हात हवे असणे. वृद्धापकाळासाठीचा आधार तयार करणे. मृत्यूनंतर मुलाकडून अग्नी मिळाला तरच मोक्षप्राप्ती होते या कल्पनेनुसार सद्गती मिळवणे. अशी काही कारणं होती. मुलांचा सांभाळ हा सहज व्हायचा. तेव्हा एकल पालकत्व, द्विपालकत्व असा काही प्रकार नव्हता. एकत्र कुटुंबपद्धतीत मुलं हसत खेळत मोठी व्हायची. सामाजिक पालकत्व असायचं. मुलांचा खर्च एकत्रितपणे केला जायचा. त्यामुळे पालकत्व निभावताना तणाव नसायचा. मुलांची संख्या कितीही वाढली तरी फारशी अडचण नसायची. ‘ज्याने दिली चोच तो भरेल पोट’ असंही म्हटलं जायचं. मूल नसणं म्हणजे पाप होतं. शाप होता. त्यापेक्षा मुलांना जन्म देऊन सन्मानपूर्वक जगणं किंवा स्वत:ची सामाजिक प्रतिष्ठा टिकवणं यालाच महत्त्व दिलं जायचं.

काळ बदलला. मानवी संस्कृती – मानवी मूल्ये बदलली. जगण्याची व्याख्या बदलली. सावित्रीच्या लेकी शिकू लागल्या. कर्तृत्वाने मोठ्या होऊ लागल्या. ‘मुलगी झाली तर चालेल’ हा विचार समाजात रुजायला लागला. पूर्वीचा ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव! ‘ हा आशीर्वाद मागे पडायला लागला. आताच्या जोडप्यांच्या कुटुंबाच्या उंबरठ्यावर ‘मूल नकोच’ हा शांतपणे, जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय स्तब्ध उभा आहे.

काही वर्षापूर्वी ‘मूल का नाही’ हा प्रश्न विचारला जायचा. आता ‘कशासाठी मूल हवंय’ असा प्रश्न विचारला जातो. मूल नको हा काही नगण्य लोकांचा विचार नाही. तो सामाजिक कल बनला आहे. या विचाराकडे गांभीर्याने बघणं अपेक्षित आहे.

विवाहानंतर दीप आणि निला दोघं पुण्यात स्थायिक झाले. दोघंही आय टी कंपनीत नोकरी करत आहेत. त्यांच्या लग्नाला पाच वर्षे झाली तरी त्यानी अजून मुलाचा विचार केलेला नाही. ते म्हणतात, “शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेडणं, स्वत:चं छोटंसं घर घेणं यात १०-१२ वर्षे निघून गेली. आता बाळाचा विचार केला तर नैसर्गिकपणे गर्भधारणेत अडचणी आहेत. डाॅक्टरनी सुचवलेले इतर पर्याय शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रासदायक आहेत. त्यातूनही बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतलाच तर आम्ही बाळाला वेळ देऊ शकणार नाही. त्याला पाळणाघरात ठेवणं आम्हाला पटत नाही. नातेवाईकानी आम्हाला स्वार्थी म्हटलं. जबाबदार्‍या नको आहेत असंही म्हटलं. पण आम्ही ठरवलं. लोक म्हणतात म्हणून आम्ही बाळाला जन्म देणार नाही. त्याला उत्तम असं आयुष्य आम्ही देऊ शकत नाही. तर जन्माला घालून त्याच्यावर अन्याय करण्याचा आम्हाला अधिकार नाही. म्हणून आम्ही बाळाला जन्म न देण्याचा निर्णय जबाबदारीने, दोघांच्या विचाराने जाणीवपूर्वक घेतला आहे. “

– – अशी ही पिढी.. या विषयावर जेन झी मोकळेपणाने बोलतात. त्यानी आणखी काही कारणं सांगितली.

नोकरी व्यवसायात खंड पडण्याची भीती – आर्थिक स्वावलंबनाच्या हेतूनेच प्रचंड मेहनतीने शिक्षण पूर्ण केलेलं असतं. नोकरी मिळालेली असते. त्यानंतर थोडं स्थिरस्थावर होतं न होतं तो लगेच बाळाचा विचार करू शकत नाही. नोकरीमुळे बाळाची जबाबदारी नीट पार पाडू शकत नाही. नोकरी तर सोडूच शकत नाही. कारण एकदा खंड पडला तर प्रगती खुंटेल. आणि पुन्हा पहिल्यापासून सुरूवात करावी लागेल. अशी भीती या पिढीला वाटते.

आर्थिक ओझं – एक चांगला पालक होऊ शकतील की नाही याची भीती असते. उत्तम शिक्षण, उत्तम भौतिक सुखं देण्यात ते कमी पडतील असं त्याना सतत वाटत असतं. मुलांचं संगोपन हे आर्थिक ओझं वाटतं. चोवीस तास पालकत्वाची जबाबदारी पेलणं खूप कठीण आहे. या चिंतानीच पालक न होण्याचा निर्णय घेतला जातो.

दूषित पर्यावरण – स्वच्छ हवा, पाणी, अन्न मिळणं अशक्य आहे. आपण मुलाना कोणत्या प्रदूषित वातावरणात ढकलत आहोत याची जाणीव तरूणाना आहे. आम्हालाच जे मिळत नाही, ते आम्ही मुलाना कुठून देणार असाही विचार ही जोडपी करताना दिसतात.

शारीरिक – मानसिक आरोग्य – आजूबाजूचं वातावरण, शैक्षणिक ताण, मित्रांचा दबाव या सगळ्यात मुलं कितपत आरोग्यपूर्ण जगतील ही शंका येते. मुलांना निरोगी आयुष्य देणं ही जबाबदारी पालकांची असते.

उशिरा होणारी लग्नं – आजकाल लग्नाचं सर्वसाधारण वय तीस वर्षे झालं आहे. त्यानंतर गर्भधारणा किंवा प्रसूती यामधली गुंतागुंत वाढू शकते. धोका पत्करायला नको म्हणूनही अपत्यहीन राहण्याचा निर्णय घेतला जातो.

‘मुलगाच हवा’ पासून ‘मूलच नको’ हा प्रवास म्हणजे आधुनिक दर्जेदार जीवनशैली, बदलत जाणारी कौटुंबिक, सामाजिक मूल्ये आणि आर्थिक स्थैर्य याचा प्रभाव असं म्हणावं लागेल. सामाजिक नियमांची चौकट कधीच ओलांडली गेली. आता ‘पाळणा हलणं’ हा वैयक्तिक निर्णय झाला आहे. आधी आपण तर नीट जगू, मग नव्या जीवाला या जगात आणायचं की नाही ते ठरवू असं म्हणणारी ही पिढी आहे.

अपत्यप्राप्तीचा बदलता दृष्टिकोन-

पूर्वीचा काळ – या काळात अपत्य प्राप्तीचा मुख्य उद्देश वंश वाढवणे.. हे कौटुंबिक, सामाजिक कर्तव्य आहे असं मानलं जायचं. मुलांना भविष्यातील आर्थिक आधार समजलं जायचं. तेव्हा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी एकत्र कुटुंबात विभागली जायची. मातृत्व हेच स्री जीवनाचं सार्थक मानलं जायचं. अपत्यप्राप्ती न होणं हा सामाजिक अपमान होता. लग्नानंतर मूल होणं नैसर्गिक पण अनिवार्य होतं. अपत्याकडे म्हातारपणाची काठी म्हणजेच आधार म्हणून बघितलं जायचं.

आधुनिक काळ – या काळात अपत्य प्राप्तीचा उद्देश हा वैयक्तिक आनंद मानला जातो. मूल होऊ देण्याचा निर्णय हा स्वेच्छेने घेतलेला असतो. जबाबदारीची जाणीव असते. मुलांच्या संगोपनासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. संगोपनाचा खर्च मोठा असतो. विभक्त कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे मुलांच्या पालनपोषणाचा ताण पालकांवर असतो. पालक स्वत:चं करिअर, आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वत:ची ओळख निर्माण करण्याला महत्त्व देतात. स्वेच्छेने मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतात. स्वत:च्या म्हातारपणाची काठी स्वत:च होतात. त्यासाठी आर्थिक तरतूद करूनच निर्णय घेतात.

पूर्वी नशीबाने, देवकृपेने मुलं व्हायची. आज निश्चयाने मुलं होतात. आधुनिक जोडपी सर्व आव्हानांचा विचार करतात. मानसिक तयारी करतात. मूल होणं ही आजच्या जोडप्यांची गरज नाही. मूल होऊ देण्यात कोणतीही जबरदस्ती ते ओढवून घेतच नाहीत. नवीन जोडप्याना बाळ न होण्यात अपूर्णत्व वाटत नाही. बाळाला जन्म देण्याचा निर्णय म्हणजे जाणीवपूर्वक स्वीकारलेलं पूर्णत्व असं त्यांना वाटतं. जबाबदार्‍या नको आहेत. स्वातंत्र्य हवंय असं काही नाही. न जन्मलेल्या बाळाचा ते प्रामाणिकपणे विचार करतात. त्यांच्या घरातला पाळणा रिकामा राहिला तरी त्यांचं जग अनेक सुखानी भरलेलं असतं. हेच आधुनिक सामाजिक सत्य आहे. जबाबदारीच्या जाणीवेतून स्वेच्छेने पालकत्व स्वीकारणे ही सजगतेची नांदी आहे. पण मूल होऊच न देणार्‍यांची संख्या वाढते आहे. म्हणूनच ‘पाळणा हलणार की नाही? ‘ हा सामाजिक उंबरठ्यावरचा प्रश्न झाला आहे.

© अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares