मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जगण्यात राम हवा ! ☆ तृप्ती कुलकर्णी ☆

तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ जगण्यात राम हवा ! ☆ तृप्ती कुलकर्णी

आपण अनेकदा पूर्वीच्या पिढीकडून एक वाक्य ऐकलेलं असतं—“यात काहीच राम नाही. ” लहानपणी हे वाक्य ऐकताना त्याचा नेमका अर्थ कळत नसे; पण जसजसं आकलन वाढत गेलं, तसं या वाक्यामागचा आशय उलगडत गेला. “राम” म्हणजे नेमकं काय, आणि त्याच्या अभावाने जगणं अपूर्ण का वाटतं—या प्रश्नांची उत्सुकता मनात निर्माण झाली.

भारतीय संस्कृतीत प्रभू श्रीराम हे केवळ श्रद्धास्थान नाहीत, तर आदर्श जीवनमूल्यांचे प्रतीक आहेत. अनेक पिढ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेतली आहे. म्हणूनच “रामराम” म्हणत अभिवादन करण्याची परंपराही आपल्या संस्कृतीत रूढ झाली. म्हणजेच, “राम” हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे.

रामायणातून आपण श्रीरामांचे जीवन वारंवार ऐकले, पाहिले आणि वाचले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात स्नेह, साहस, संयम, सात्विकता, समर्पण आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम दिसतो. आयुष्यातील अनेक कठीण आणि वेदनादायक प्रसंग त्यांनी अत्यंत शांतपणे आणि धैर्याने स्वीकारले—वडिलांच्या वचनासाठी वनवास पत्करणे, राक्षसांशी लढणे, सीतेचे अपहरण आणि तिची सुटका, तसेच राज्यप्राप्तीनंतरही प्रजेच्या हितासाठी घेतलेले कठोर निर्णय. स्वतःकडे अपार सामर्थ्य असूनही त्यांनी अनेकदा स्वतःच्या भावनांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य दिलं. त्यांच्या जीवनातून माणसाने कोणत्या स्तरावर जगावं, याचं सूक्ष्म मार्गदर्शन मिळतं.

त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे नातेसंबंधांची जपणूक. राजा, पुत्र, भाऊ, पती आणि पिता या प्रत्येक भूमिकेत त्यांनी जबाबदारी, संवेदनशीलता आणि न्यायबुद्धी जपली. आजच्या काळातही, कुटुंब असो वा संस्था, नात्यांमध्ये संतुलन आणि विश्वास टिकवण्यासाठी हा दृष्टिकोन अत्यंत उपयुक्त ठरतो.

मानवी जीवन भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन पातळ्यांवर उभं आहे. या दोन्हींचा समतोल साधला, तरच जीवन अर्थपूर्ण होतं. आज तंत्रज्ञानामुळे आपलं जीवन अधिक सोपं आणि सुलभ झालं आहे; अनेक गोष्टी सहज उपलब्ध झाल्या आहेत. तरीही मनाच्या पातळीवर अस्वस्थता, असंतोष आणि तुटलेपणाची भावना वाढताना दिसते. कारण भौतिक प्रगतीच्या तुलनेत मन, भावना आणि आत्मिक जाणीवा यांच्याकडे पुरेसं लक्ष दिलं गेलेलं नाही.

यामुळेच व्यक्तीच्या आत विसंगती निर्माण होते—शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा हे जणू वेगवेगळ्या दिशांनी ओढ घेतात. विचार काही सांगतात, भावना काही अनुभवतात आणि कृती वेगळ्याच घडतात. परिणामी, मनात अस्वस्थता, मत्सर, लोभ, असुरक्षितता या भावना निर्माण होतात. स्वतःशीच तुटलेपण जाणवू लागतं.

खरं तर “राम” म्हणजे या सर्व स्तरांचं—शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा—संतुलित, सुसंवादी आणि एकात्म अस्तित्व. जेव्हा या चारही घटकांमध्ये सुसंगती असते, तेव्हा जीवनात शांतता, समाधान आणि स्पष्टता येते. पण आज आपण स्वतःपासूनच दूर जात असल्यामुळे हा “राम” हरवत चालला आहे.

हा हरवलेला “राम” पुन्हा मिळवण्यासाठी मानवी मूल्यांची जाणीवपूर्वक जोपासना आवश्यक आहे. त्याग, सेवा, समर्पण या गोष्टी आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवतात. पूर्ण निस्वार्थपणे जगणं जरी शक्य नसलं, तरी आपल्या कृतींमुळे दुसऱ्याचं नुकसान होणार नाही, शक्य असेल तिथे त्याला मदतच होईल, हा दृष्टिकोन आपण नक्कीच स्वीकारू शकतो. आपल्या गरजांबरोबर इतरांच्या गरजांचाही विचार करणं, आपल्या उपभोगावर मर्यादा ठेवणं—या साध्या गोष्टीही मोठा बदल घडवू शकतात.

तसंच, नैसर्गिक साधनसंपत्तीचा जपून वापर, शरीराला सक्रिय आणि निरोगी ठेवणं, तसेच तंत्रज्ञानाचा सजग वापर करणंही आवश्यक आहे.

थोडक्यात, शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्यातील सुसंवाद आणि संतुलन साधणं—यालाच “राम असणं” म्हणता येईल. आतल्या या रामाला जागं केलं, तरच आपल्या बाह्य जगण्यातही समाधान, स्थैर्य आणि अर्थपूर्णता अनुभवता येईल.

आपल्या प्रत्येकाला जगण्यात राम प्राप्त होवो या सदिच्छा!

© तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तू चालत रहा…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “डनिंग-क्रुगर इफेक्ट…” ☆ श्री आशिष मुळे ☆

– – – लिंबाचा रस तोंडावर फासून बँकेवर दरोडा घालणारा “मिस्टर इंडिया” आणि त्यातून जन्माला आला एक क्रांतिकारी सिद्धांत डनिंग-क्रुगर इफेक्ट!!!

१९९५ साली एका भरदुपारी पिट्सबर्गमध्ये *मॅकआर्थर व्हीलर* नावाच्या एका धिप्पाड माणसाने तोंडाला साधा रुमालही न बांधता दोन बँका लुटल्या, कारण त्याचा असा ठाम विश्वास होता की चेहऱ्याला लिंबाचा रस फासला की माणूस सीसीटीव्ही कॅमेऱ्याला ‘अदृश्य’ होतो. हे वाचताना आपल्याला हसू येईल, पण या एका ‘येडचाप’ घटनेने जागतिक मानसशास्त्राला ‘डनिंग-क्रुगर इफेक्ट’ नावाचा एक असा क्रांतिकारी सिद्धांत दिला, जो आज आपल्या सोशल मीडिया फीडपासून ते गल्लीतल्या राजकारणापर्यंत प्रत्येक ठिकाणी अगदी तंतोतंत लागू होतो.

****

कोणताही गुन्हेगार चोरी करताना आपला चेहरा लपवतो, पण व्हीलर महाशय चक्क कॅमेऱ्याकडे बघून हसत होते. त्यांना खात्री होती की लिंबाचा रस हा ‘इनव्हिजिबल इंक (अदृश्य शाई) म्हणून वापरला जातो, तर तो चेहऱ्याला लावला की आपला चेहराही अदृश्य होईल. त्यांनी घरी याचा प्रयोगही करून बघितला होता. तोंडाला रस फासून त्यांनी स्वतःचा पोलरॉइड फोटो काढला, पण नेमकं त्याच वेळी डोळ्यात रस गेल्याने त्यांनी डोळे गच्च मिटले आणि कॅमेरा हलला. फोटो कोरा आला आणि या महाशयांना वाटलं, “झाली की फत्ते! आता आपण मिस्टर इंडिया झालो! “

****

पण मुद्दा असा आहे की, व्हीलर हे काही पहिले किंवा शेवटचे ‘अतिशहाणे’ नव्हते. त्यांच्या या अजब पराक्रमाची बातमी जेव्हा कॉर्ननेल विद्यापीठातील डेव्हिड डनिंग आणि जस्टिन क्रुगर या दोन मानसशास्त्रज्ञांनी वाचली, तेव्हा त्यांना एक वेगळाच विचार सुचला. त्यांना प्रश्न पडला की, *एखादा माणूस स्वतःच्या अज्ञानाबद्दल इतका ‘कॉन्फिडन्ट’ कसा असू शकतो? * यातूनच १९९९ मध्ये जन्म झाला *डनिंग-क्रुगर इफेक्ट’चा! *

या सिद्धांतानुसार, ज्या व्यक्तीकडे एखाद्या विषयाचे ज्ञान किंवा कौशल्य अत्यंत कमी असते, तीच व्यक्ती त्या विषयात आपण ‘तज्ज्ञ’ असल्याचा सर्वाधिक आव आणते. सरळ सांगतो, अडाणी माणसाला आपण अडाणी आहोत हे समजण्यासाठी जेवढी बुद्धी लागते, तेवढीही त्याच्याकडे नसते. याला मानसशास्त्रात ‘मेटाकॉग्निशन’ची (Metacognition) कमतरता म्हणतात. म्हणजे स्वतःच्याच विचारांचे विश्लेषण करण्याची क्षमता नसणे.

****

आपल्या महाराष्ट्रात अशा नमुन्यांची अजिबात कमतरता नाही. लग्नाच्या पंगतीत एखादा काका भेटतोच, ज्याला इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धापासून ते शेअर मार्केट कोसळण्यापर्यंतच्या सगळ्या कारणांची ‘इनसाईडर’ माहिती असते. या काकांनी आयुष्यात कधी पासपोर्ट काढलेला नसतो किंवा डीमॅट खाते उघडलेले नसते, पण त्यांचा आत्मविश्वास एवढा दांडगा असतो की समोर बसलेला एखादा खरा अर्थतज्ज्ञही गप्प बसतो. हे मान्य करायलाच हवं की, *अज्ञान हे ज्ञानापेक्षा जास्त आत्मविश्वास निर्माण करतं. *

डनिंग-क्रुगर इफेक्ट हा आजच्या ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’च्या काळात अधिक धोकादायक झाला आहे. एखाद्या विषयावर दोन मिनिटांचा व्हिडिओ पाहिला की लोकांना वाटतं आपण त्या विषयात पी एच. डी. केली आहे. मग ते डॉक्टरला सर्जरी कशी करायची हे शिकवतात आणि इंजिनिअरला पूल कसा बांधायचा याचे सल्ले देतात. व्हीलरने चेहऱ्याला लिंबाचा रस लावला होता, हे लोक बुद्धीलाच अज्ञानाचा लेप लावून फिरत असतात.

****

डनिंग आणि क्रुगर यांनी त्यांच्या संशोधनात असे सिद्ध केले की, जे लोक खरोखर हुशार किंवा कुशल असतात, त्यांना उलट ‘इम्पोस्टर सिंड्रोम’ जाणवतो. म्हणजे, त्यांना सतत असं वाटतं की आपल्याला अजून खूप शिकायचं आहे किंवा समोरच्याला आपल्यापेक्षा जास्त समजतंय. याउलट, ज्यांना काहीच येत नाही, ते मूर्खपणाच्या शिखरावर बसलेले असतात.

****

विश्लेषकांच्या मते, या समस्येवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे *बौद्धिक नम्रता*.

आपण सर्वज्ञ नाही आहोत आणि आपल्याला एखादी गोष्ट माहित नसू शकते, हे मान्य करायला खूप मोठे काळीज लागते. मॅकआर्थर व्हीलरला जेव्हा पोलिसांनी अटक केली आणि सीसीटीव्ही फुटेज दाखवलं, तेव्हा तो आश्चर्याने उद्गारला होता, “बट आय वोअर द ज्यूस! ” (पण मी तर रस लावला होता! ). त्याच्यासाठी तो रस म्हणजे एक सुरक्षा कवच होतं, जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हतं.

आपल्या दैनंदिन जीवनातही आपण अनेकदा ‘लिंबू रस’ लावून वावरत असतो. कधी राजकारणाच्या चर्चांमध्ये, कधी ऑफिसच्या मिटिंगमध्ये, तर कधी कौटुंबिक वादात.

आपल्याला वाटतं आपण समोरच्याला व्यवस्थित बनवलंय किंवा आपल्याला सगळं समजतंय, पण प्रत्यक्षात आपला चेहरा कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत असतो. संशोधकांचा शोध असं सांगतो की, जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत नाही की “मला खरंच हे माहित आहे का? ” तोपर्यंत तुम्ही डनिंग-क्रुगर इफेक्टचे शिकार आहात.

****

आणखी एक गोष्ट म्हणजे, हा इफेक्ट फक्त मूर्ख माणसांपुरता मर्यादित नाही. अत्यंत बुद्धिमान माणसंही जेव्हा त्यांच्या क्षेत्राबाहेरील विषयात नाक खुपसतात, तेव्हा ते याच सापळ्यात अडकतात. एखादा मोठा शास्त्रज्ञ जेव्हा संगीतावर किंवा साहित्यावर अधिकाराने भाष्य करायला जातो आणि तिथे तो चुकतो, तेव्हा तो व्हीलरच्याच रांगेत उभा असतो. फरक फक्त एवढाच की व्हीलरने लिंबाचा रस लावला होता, हे लोक आपल्या पदव्यांचा रस लावतात.

****

भविष्यात काय होणार? तंत्रज्ञान वाढत जाईल, माहितीचा महापूर येईल, पण जोपर्यंत माणूस स्वतःच्या अज्ञानाचे मूल्यमापन करायला शिकत नाही, तोपर्यंत मॅकआर्थर व्हीलरचे वारसदार बँका लुटत राहतील किंवा सोशल मीडियावर कमेंट्समध्ये भांडत राहतील.

आश्चर्यकारक माहिती ही आहे की, व्हीलरने जेलमध्ये गेल्यावरही बराच काळ हे मान्य केलं नव्हतं की त्याची लिंबाची थिअरी चुकीची होती. त्याला वाटलं कॅमेऱ्यातच काहीतरी दोष असावा.

डनिंग-क्रुगर इफेक्ट हा केवळ एक वैज्ञानिक सिद्धांत नाही, तर तो मानवी स्वभावाचा एक आरसा आहे. हा आरसा आपल्याला सांगतो की, शहाणपणाची पहिली पायरी म्हणजे ‘आपल्याला काहीच माहित नाही’ हे समजणे.

****

शेवटी, व्हीलरच्या त्या लिंबाच्या रसाने त्याला तुरुंगात पाठवलं, पण जगाला एक मोठा धडा दिला. *पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती अत्यंत आत्मविश्वासाने चुकीची माहिती सांगताना दिसेल, तेव्हा चिडण्यापेक्षा फक्त स्मितहास्य करा. समजून जा की, समोरच्याने नकळत आपल्याला लिंबाचा रस चोपडला आहे आणि त्याला वाटतंय की तो जगाला दिसत नाहीये.

तुमच्या आजूबाजूला असा ‘लिंबू रस’ लावून फिरणारा एखादा इसम नक्कीच असेल, जो स्वतःच्या अज्ञानाच्या अंधारात मजेत जगतोय आणि आपण मात्र त्याच्या आत्मविश्वासाकडे बघून थक्क होतोय…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ सत्य आम्हा उमगले हो… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ क्षण सृजनाचा ☆

☆ सत्य आम्हा उमगले हो… ☆ श्री जगदीश काबरे ☆

माझ्या जवळचा मित्र आणि त्याची बायको हे भिन्न विचाराचे जोडपे आहे. बायको आस्तिक आहे तर मित्र नास्तिक. पण त्या दोघांमध्ये गेली तीस वर्षे कुठल्याही प्रकारचा विसंवाद झालेला नाही. कारण ते दोघेही आपापल्या विचारांचा एकमेकांवर दबाव टाकत नाहीत. त्यांच्यातील हा सुसंवाद मी नेहमीच बघत असतो आणि त्यातून मला त्यांच्याविषयी लिहावेसे वाटले, ते असे…

सत्य आम्हा उमगले हो –जगदीश काबरे

नास्तिक असुन तुला

दर्शनाला नेणारी मी,

माझ्या इच्छेखातर

येणारा तू…

 

हारफुलांचा भाव करत

ताट घेणारी मी,

दारातल्या भिक्षुकांना

मदत करणारा तू…

 

रांगेत पुढे जाण्यासाठी

धडपडणारी मी,

देवळाची सुबकता

न्याहाळाणारा तू…

 

डोळ्यांनी नमस्कारासाठी

तुला खुणावणारी मी,

देवळातले कोरीव काम

अनुभवणारा तू…

 

देवळातही चपलेची

काळजी करणारी मी,

गरजुने नेली असेल

असा विचार करणारा तू…

 

आस्तिक आहे मी

आणि नास्तिक तू,

आस्तिकतेचा भास मी

पण खरा आस्तिक तूच…

 

खरेच देव नक्की

कुणाला पावत असेल,

माझ्यासारख्या आस्तिकाला

की तुझ्यासारख्या नास्तिकाला?

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘संपूर्ण शरणागतीचे तत्वज्ञान’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘संपूर्ण शरणागतीचे तत्वज्ञान’ ☆ श्री दिवाकर बुरसे

प्रपत्ती : संपूर्ण शरणागतीचे तत्त्वज्ञान

भक्ती, तत्त्वज्ञान आणि कृपायोगाचा दिव्य संगम

 प्रस्तावना : अहंकारापासून अनंताकडे

मानवी जीवनाच्या आध्यात्मिक प्रवासात एक असा टप्पा येतो की जिथे साधकाला स्वतःच्या प्रयत्नांची मर्यादा जाणवते. त्याच्या अध्यात्मप्रवासात एक क्षण असा येतो की प्रयत्नांची शिडी संपते आणि कृपेचे आकाश सुरू होते.

ज्ञान, कर्म, साधना, तपस्या — या सर्व मार्गांनी प्रयत्न करताना अखेरीस मनाला उमगते की अंतिम सत्य प्राप्त करण्यासाठी अहंकाराचा सर्वस्वी त्याग आणि परमेश्वरावर संपूर्ण विश्वास अत्यावश्यक आहे. याच अवस्थेला भारतीय ‘ विशिष्ठाद्वैत तत्वज्ञान’ परंपरेत “प्रपत्ती” असे म्हणतात.

संस्कृतमधील “प्र + पत्” या धातूपासून सिद्ध झालेला हा शब्द पूर्णपणे शरण जाणे, स्वतःला अर्पण करणे असा अर्थ व्यक्त करतो.

भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाचे प्रसिद्ध वचन या तत्त्वज्ञानाचे सार सांगते —

“सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।

अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥”

(भगवद्गीता १८. ६६)

या एका श्लोकात प्रपत्तीचा संपूर्ण आध्यात्मिक अर्थ सामावलेला आहे.

 

१. प्रपत्ती : तात्त्विक संकल्पना

प्रपत्ती म्हणजे स्वकर्तृत्वाचा अभिमान सोडून परमेश्वराच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवणे.

भक्तीमार्गात ही अवस्था तेव्हा येते जेव्हा साधकाला स्वतःच्या मर्यादा स्पष्ट जाणवतात. त्या क्षणी तो म्हणतो —

“मी नाही; सर्व काही तूच. ”

या भावनेचे वर्णन करताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, “आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥” माणूस स्वतः काही करीत नाही; करणारा खरा परमेश्वरच आहे.

 

२. रामानुजाचार्य आणि प्रपत्तीचा मार्ग

आचार्य रामानुज (१०१७–११३७) यांनी प्रतिपादित केलेल्या विशिष्टाद्वैत वेदान्तात प्रपत्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

त्यांच्या मते जीव आणि परमेश्वर यांचे नाते शेष–शेषी असे आहे —

जीव हा परमेश्वरावर अवलंबून असलेला अंश आहे.

रामानुजाचार्यांच्या “शरणागति गद्य” या ग्रंथात ते परमेश्वराला विनवतात —

“नारायण! तव पादारविन्दयोः शरणं प्रपद्ये।”

ही केवळ प्रार्थना नसून पूर्ण आत्मसमर्पणाची अनुभूती आहे.

 

३. प्रपत्तीची सहा अंगें

या परंपरेत शरणागतीची सहा लक्षणे सांगितली आहेत —

“अनुकूल्यस्य संकल्पः प्रतिकूलस्य वर्जनम् ।

रक्षिष्यतीति विश्वासो गोप्तृत्ववरणं तथा ।

आत्मनिक्षेपकार्पण्ये षड्विधा शरणागति: ॥”

या सहा अंगांमध्ये प्रपत्तीचे संपूर्ण स्वरूप दिसते.

अनुकूलस्य संकल्पः — ईश्वराला अनुकूल तेच आचरण करणे

प्रतिकूलस्य वर्जनम् — प्रतिकूल गोष्टींचा त्याग

रक्षिष्यतीति विश्वासः — परमेश्वर रक्षण करील हा दृढ विश्वास

गोप्तृत्ववरणम् — त्यालाच पालनकर्ता मानणे

आत्मनिक्षेपः — पूर्ण आत्मसमर्पण

कार्पण्यम् — स्वतःची दीनता स्वीकारणे

 

४. भक्तिमार्गी संतपरंपरेतील प्रपत्ती

संतपरंपरेत प्रपत्तीचा भाव अत्यंत सजीवपणे व्यक्त झाला आहे. दासबोधात समर्थ रामदासस्वामी म्हणतात,

“आपण मिथ्या साचा देव । देव भक्त अनन्यभाव ।… या नाव आत्मनिवेदन ॥”

(४. ९. २२)

रामरायाकडे समर्थ मागणे काय मागतात पहा, “मजविण तू मज दे रे राम!

 मीराबाईंचं ईश्वराशी हे एकरूप होणं पहा…

“लाली मेरे लालकी जिथ देखूं तिथं लाल

लाली देखन मै गयी, मै ही होगई लाल! “

तुकाराम महाराज म्हणतात,

“घालुनिया भार राहिलो निश्चिंती ।

……….

खुंटले सायास आणिक या जीवां ।

धरिले केशवा पाय तुझे ॥

तुज वाटे आता करी रे अनंता ।

तुका म्हणे संता लाज माझी ॥”

 

संत एकनाथ महाराज म्हणतात,

” अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता ।

चरणी जगन्नाथा चित्त ठेले ॥

माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ ।

अनाथांचा नाथ जनार्दन ॥

एका जनार्दनी एकपणे उभा ।

चैतन्याची शोभा शोभतसे ॥ “

 

५. प्रपत्ती आणि कृपायोग

प्रपत्तीचा मार्ग हा केवळ साधकाच्या प्रयत्नांवर आधारित नाही; तो ईश्वरकृपेवर आधारित आहे. भक्त सतत प्रेमपूर्वक भजन करतो, तेव्हा परमेश्वर स्वतः त्याला मार्ग दाखवतो.

श्रीवैष्णव तत्त्वज्ञानात मोक्ष हा केवळ साधकाच्या साधनेचा परिणाम नसून परमेश्वराच्या निरपेक्ष कृपेचा प्रसाद मानला जातो. प्रपत्ती म्हणजे त्या कृपेचे द्वार उघडणारी अंतःकरणाची अवस्था होय.

 

६. प्रपत्तीचे आध्यात्मिक सौंदर्य

प्रपत्ती म्हणजे पलायन नव्हे; ती आहे अहंकारावर मात करून अनंताशी एकरूप होण्याची प्रक्रिया.

जेव्हा भक्त म्हणतो —

“मी तुझा आहे; तूच माझे सर्वस्व आहेस. ”

तेव्हा त्या क्षणी भक्त आणि भगवान यांच्यातील भेद विरघळतो, द्वैत विरते!

 

७. आत्मनिवेदन आणि प्रपत्ती

नवविधा भक्तीतील ‘आत्मनिवेदन’ आणि रामानुजाचार्यांची ‘प्रपत्ती’ हे दोन्ही पूर्ण शरणागतीचे सिद्धांत आहेत, पण त्यांची तात्त्विक चौकट, रचना आणि पायऱ्यांमध्ये स्पष्ट भेद आहे.

 

आत्मनिवेदनची व्याख्या:

नवविधा भक्ती ही भगवद्गीतेच्या भक्तियोगावर आधारित नऊ पायऱ्यांची प्रक्रिया आहे, ज्यात नववी पायरी ‘आत्मनिवेदन’ आहे. यात भक्त स्वतःचा देह, मन, धन, कर्तृत्व आणि फळ—सर्वस्व भगवंताला समर्पित करतो, “मी तुझाच” ही श्रद्धा दृढ पणे अंतःकरणात बाळगतो. यात ईश्वरावर संपूर्ण विश्वास आणि स्वातंत्र्य-अहंकाराचा पूर्ण त्याग करून वाट्याला आलेल्या सुख-दुःखाला त्याचीच इच्छा मानणे हे मुख्य आहे.

 

प्रपत्तीची व्याख्या:

रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैत वेदांतात प्रपत्ती ही शरणागतीची प्रक्रिया आहे, जी कर्म-ज्ञान-भक्तींपेक्षा थेट परमेश्वरकृपेवर अवलंबून आहे. यात वर उल्लेखिलेली सहा अंगे आहेत: अनुकूल कर्मांचा संकल्प, प्रतिकूलांचा त्याग, रक्षकत्वाचा विश्वास, गोप्तृत्वस्वीकार, कार्पण्य (असहाय्यता) आणि आत्मनिक्षेप (आत्मार्पण). ही संरचित, शास्त्रोक्त पद्धत मोक्षासाठी एकमेव साधन मानली जाते

 

साम्याचे मुद्दे:

दोन्ही सिद्धांतांचा केंद्रबिंदू “पूर्ण समर्पण” हा आहे—अहंकारत्याग, ईश्वरकेंद्रित जीवन, कृपेवरील अवलंबन आणि स्वतःचे सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण. भावार्थाने ही एकाच अध्यात्मिक सत्याची दोन रूपे दिसतात.

 

भेदाचे मुद्दे:

भावतत्त्वाने दोन्ही जवळजवळ समान आहेत, पण शास्त्रीय रचना, परंपरा आणि तात्त्विक चौकटीमुळे हे वेगळे सिद्धांत मानले जातात. त्यांना एकच म्हणता येत नाही.

 

८. उपसंहार : समर्पणातच अनंत

मानवी जीवनात ज्ञान, साधना, तपस्या आणि कर्म यांना महत्त्व आहे. परंतु या सर्व प्रयत्नांचा अंतिम अर्थ तेव्हाच उमगतो जेव्हा साधकाला समर्पणाची अनुभूती प्राप्त होते.

 

प्रपत्ती म्हणजे प्रयत्नांचा पराभव नव्हे;

ती आहे अहंकारावरचा विजय होय.

भक्ताच्या अंतःकरणात जेव्हा ही जाणीव उमलते —

“देवा, मी तुझा आहे. ”

तेव्हा परमेश्वरही जणू त्याला अश्वासक उत्तर देतो —

“हो, तू माझाच आहेस.”

अशा या दिव्य संवादातच भक्तीचा परमोच्च क्षण जन्म घेतो.

आणि त्या क्षणी साधकाला उमगते —

समर्पणातच स्वातंत्र्य आहे,

आणि शरणागतीतच मोक्ष आहे!

 

त्वमेव माता च पिता त्वमेव

त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव

त्वमेव सर्वं मम देवदेव ॥

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कधी सुधारणार?? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ कधी सुधारणार?? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

 – – – अंगातली मस्ती कधी उतरणार

२५ जानेवारीची संध्याकाळ. आधीच शनिवार-रविवार आणि त्यात पुन्हा राष्ट्रीय सुट्टी आलेली. आजूबाजूची सगळी शोरुम्स आणि मॉल्स गर्दीनं खचाखच भरुन वाहत होते. कुणाला तरी भेटायला गेलो होतो आणि तिथं आम्हाला बराच वेळ लागला, म्हणून जवळच्या एका मॉलमध्ये आम्ही पोट भरण्यासाठी गेलो. पण तिथल्या कॅफेटेरियाचे दर बघून आमचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. पंधरा-वीस स्टॉल्स होते खरे. पण किंमती अवाढव्य होत्या. ८० रुपयांची पाणीपुरी, २०० रुपयांचं सँडविच, १८० रुपयांपासून पुढे सुरु होणारी चाट हे खिशापेक्षा मनालाच परवडत नव्हतं.

मी त्यांना म्हटलं, “जाऊ द्या. आपण टपरीवर चहा घेऊ. ” ते म्हणाले, “जीबीएस कसा भडकला आहे, बघतोयस ना. उघड्यावरचं काही नको रे बाबा. ” आम्हीं पंधरा वीस मिनिटं तिथं होतो आणि शेवटी काहीही न खाता पिता तिथून निघालो. पण त्या मॉलमध्ये जे दृश्य होतं, ते बघून मला धक्का बसला. तरुण मुलामुलींची तर गर्दी होतीच, शिवाय शेकड्यांनी परिवारसुध्दा होते. तिथं पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावं लागत होतं. चार-पाच जणांचं बिल एक हजाराच्या वर सहजच जात असेल. कितीतरी लहान लहान मुलं त्या कॅफेटेरियामध्ये जंक फूड मनसोक्त खात होती. कॉलेजवयीन मुलामुलींच्या जोड्या होत्या. ५०० रुपयाचं सिझलर घेऊन टेबलावर गप्पा मारत बसलेलं एक युगुल दहा मिनिटांनी ती डिश तिथंच तशीच टाकून उठून निघून गेलं. कितीतरी लोक खाणं अर्धवट टाकून उठून निघून जात होते. छोले भटुरे मागवलेल्या एका ग्रुपनं तर निम्मे भटुरे तसेच टाकले. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा अर्धवट टाकून निघून गेलेले लोक मी बघत होतो.

बरं, असला “टाकून माजण्याचा” मस्तवालपणा करणारी जी जनता होती, ती काही मर्सिडीज क्लास नव्हती. सगळेच्या सगळे मध्यमवर्गीयच होते. “पेट्रोल २५ पैशांनी महागले अन् जनतेचे कंबरडे मोडले” किंवा “कोथिंबीर कडाडली, लोकांनी खायचं काय? ” असले मथळे लिहिणाऱ्यांनी मॉलमधले हे मध्यमवर्गीय बघितलेले असतात का? असा प्रश्न मला पडला.

मेसचे डबे लावून जेवणाऱ्या मुलांचं आणि मुलींचं मी अनेकदा निरीक्षण केलंय. आठवड्यातून तीनदा तरी डब्यातलं अन्न जसंच्या तसं कचऱ्यात गेलेलं असतं. घराघरांतून गोळा केला जाणारा ओला कचरा तुम्ही अवश्य पहा. चांगल्या प्रतीचं ब्रँडेड अन्न कचऱ्यात फेकून दिलेलं तुम्हाला दिसेल. हॉटेलमध्ये सँडविचच्या डिशमध्ये कोबी किसून डेकोरेट करुन सर्व्ह करतात. तो कच्चा कोबी कितीजण खातात? मोठमोठ्या कॉफी शॉप्समध्ये मी पाहतो, मला फार वाईट वाटतं. पाचशे-सातशे रुपये किंमतीची कॉफी अर्धवट टाकून लोक निघून जातात. पाचशे रुपयांतले तीनशे रुपये आपण कचऱ्यात ओतले, याचं त्यांना भानही नसतं आणि त्याचं त्यांना वाईटही वाटत नाही.

एकदा सोलापूरहून पुण्याला येत असताना एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये आम्ही ब्रेक घेतला. शेजारच्या टेबलावर सात-आठ जण बसले होते. आठ जणांनी आठ वेगवेगळ्या भाज्या मागवल्या. इतके स्टार्टर्स, इतक्या डिशेस.. टेबल अख्खं भरलं होतं. पण खाल्लं किती? जितकं मागवलं होतं त्यातलं निम्मंसुद्धा नाही! बिल भरुन माणसं निघूनही गेली.

याला आपण नेमकं काय नाव द्यावं? ‘महागाई किती वाढलीय’ असं ओरडणारी अगदी साधी साधी माणसंसुद्धा वडापाव घेताना पाच सात मिरच्या घेतात आणि त्यातली एखादीच खाऊन बाकीच्या चक्क कचऱ्यात टाकतात! पराक्रम दाखवण्याच्या नादात एक्स्ट्रा तिखट मिसळ मागवतात आणि चार घासातच त्यांचा धीर गळून पडतो. अन्न वाया! सँडविचची हिरवी चटणी जास्तीची घेतात आणि टाकून देतात! एखाद्या सँडविचवाल्याची किलोभर हिरवी चटणी दररोज सहजच उकिरड्यावर जात असेल.

गुरुवारी – शनिवारी देवळाबाहेर हात पसरुन बसलेली माणसं सुद्धा आता रुपया-दोन रुपयांचं नाणं, पार्ले बिस्कीट पुडा, एखादा वडापाव असलं काही दिलं तरी तोंड वेंगाडतात. त्यांना दहा रुपयांचं नाणं हवं असतं. ताजी पोळी-भाजी दिली तरी टाकून देणारे सुद्धा भिकारी मी पाहिलेत. मग भीक मागण्यामागची त्यांची नेमकी भावना तरी काय? आपल्याला आपल्या पात्रतेनुसार किंवा पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मिळतंय, याची जाणीव इथेही दिसत नाही.

न कमावणारे, कमी कमावणारे, भरपूर कमावणारे, आपकमाईवाले, बापकमाईवाले सगळे सगळे या एकाच बोटीत बसलेले आहेत. काहीजणांची ही वृत्तीच आहे आणि काहीजणांना आपलं काहीतरी चुकतंय याची लांबलांबपर्यंत जाणीवच नाही. आणि दुसरं कुणी ह्यांना ही जाणीव करुन द्यायला तयार नाही. महिन्यातले पंधरा दिवस मेसचा अख्खा डबा कचऱ्यात टाकणारे विद्यार्थी आणि मुलांच्या हट्टापायी भारंभार पदार्थ मागवून त्यातलं निम्म्याहून जास्त अन्न टाकणारे सुशिक्षित पालक दोघेही समाजाचे दोषी नाहीत का?

महागाई वाढल्याचं ढोंग करणारी माणसं, त्यांची जीवनशैली जराही बदलायला तयार नाहीत. बापकमाईवर घेतलेला ब्रँडेड कपडा जास्तीत जास्त चार पाच वेळा घालून कपाटात कोंबणारे अन् पुढच्या महिन्यात पुन्हा नवे कपडे घेणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा नेमका कसा विचार करत असतील? त्यांचे आईवडील त्यांना दर महिन्याला पैसै पाठवताना काय विचार करत असतील? कॉलेजच्या ऑफिसात फी माफीचे अर्ज करुन घेणारी मुलं मला जेव्हां त्यांच्या परमप्रिय मैत्रिणीसोबत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये दीडशे रुपयांचा उत्तप्पा खाताना दिसतात, तेव्हां त्यांची गरिबी नेमकी कोणती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण कॉलेजची फी खोटं कारण दाखवून माफ करुन घेऊन हॉटेलात एकावेळी पाचशे रुपयांची नोट खर्च करणं हे प्रामाणिक माणसाचं लक्षण नाही.

आमच्या आजूबाजूच्या परिसरात रात्री बारा वाजता पंधरा वीस बुलेट बाईक्स मोठाला आवाज करत गेल्या आणि अर्धा तास हवेत तीन चार हजार रुपयांची फटाक्यांची आतषबाजी होत राहिली की, आपण ओळखावं – आज कुठल्यातरी बेरोजगार दिवट्याचा वाढदिवस आहे आणि चार घरी धुणीभांडी करुन घराचा गाडा ओढणाऱ्या आपल्या आईच्या कमाईवर फुकट मजा मारणारं पोरगं आज एक वर्षानं मोठं झालं आहे. रेशनचं अन्न आणून जगणाऱ्या घरच्या पोरांचे वाढदिवस रात्री बारा वाजता भर रस्त्यावर दोन-दोन केक आणून कसे होतात? सर्वच स्तरांमध्ये माणसांच्या जगण्याच्या व्याख्या बदलतायत आणि त्या अमिबासारख्या आकार उकार बदलत चालल्या आहेत, हे स्पष्ट दिसतं. याचा विचार कुणी एकट्यानं नव्हे तर, संपूर्ण समाजव्यवस्थेनं केला पाहिजे आणि तो अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे.

लोकांच्या खिशात पैसा उदंड झालाय? जास्तीचे पर्याय सहज उपलब्ध झालेत? मोकळीक अन् स्वातंत्र्य वाढलंय? की माणसाला कशाचीच किंमत राहिली नाहीय? जाणिवांचं श्राद्ध घालून कुठल्याशा पोकळ धुंदीत वागण्याची ही रित समाजातल्या सर्वच स्तरांमध्ये जाणवण्याइतपत वाढतेय, हे प्रगतीचं अन् शहाणपणाचं लक्षण मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही.

खरोखरचं सुजाण पालकत्व आणि आपण सुजाण पालक होण्यासाठी करत असलेला अनाठायी खर्च या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत का? संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा निर्माण करुन आपण काय मिळवतो आहोत, याचा हिशोब कधीतरी कुणीतरी लावला पाहिजे की नको?

नादारीचा मुखवटा घालून आतून काजू-बदामावर ताव मारणं हे माणसांच्या खोटारडेपणाचं स्वच्छ लक्षण आहे.

 

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक

संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेम… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ प्रेम… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

प्रेमाच्या अनेक व्याख्या अनेकांनी केल्या असतील….! प्रेम ही भावना अशी आहे की ती तुम्हाला व्यक्त व्हायला शिकवते….!

संत स्वतः जगावर खरे प्रेम करतात आणि आपल्याला प्रेम कसे करावे हे शिकवतात….!

दुसऱ्याचे अत्यंतिक कल्याण व्हावं, त्यासाठी आपण काही कष्ट/कृति आनंदाने करावेत आणि ईश्वराच्या कृपेने त्यात यश मिळाले तर दुसऱ्याचा आनंद पाहून आनंदित व्हावे, दुसऱ्याच्या दुःखाने आपण दुःखी व्हावे, त्याच्या दुःखात त्याच्या मनावर फुंकर मारून, त्याच्या दुःखाची जाणीव कमी करण्याचा प्रयत्न आपण निरपेक्ष वृत्तीने करावा….!

…. याला प्रेम म्हणता येईल….!!

आपण आपल्या कुटुंबातील, परिवारातील सर्वांवर अशा प्रेमाचा वर्षाव करावा….! जगावर प्रेम करणे म्हणजे देवावर प्रेम करणे, कारण या साऱ्या सृष्टीचा मालक भगवंत आहे….!

लेकरावर प्रेम केले, त्याचे कौतुक केलं की नकळत त्याचा आईला आनंद होतो….

प्रेम जगावर करावे, फक्त त्यात पडू नये…!! “

कारण.. प्रेम करायला पैसे लागत नाही, पण प्रेम दाखवायला पैसे पुरत नाहीत… हे लक्षात असावे.

सर्व संत सांगतात,

*देवावर प्रेम करायला शिकायचे (भक्ति करायला शिकायचे असेल…..) तर आपल्या जवळच्या माणसांवर विनाअट (त्यांचे गुण अथवा दुर्गुण न पाहता…) प्रेम करण्यास सुरुवात करावी…! *

*देवाने दिलेल्या माणसांवर निर्व्याज, निर्मम प्रेम करायला शिकलो की देवावर आपसूक प्रेम बसेल…! *

*मग, आपण म्हटलं तरी तो देव आपल्याला सोडणार नाही….. *

असे *निर्व्याज, निरपेक्ष आणि निर्मळ प्रेम करणारा एखादा मनुष्य आपल्या आयुष्यात असावा अशी प्रार्थना मी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी करत आहे. *

आपण प्रयोग करून पाहू….

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “टाईपरायटर आणि एका भारतीय पिढीचा इतिहास…” –  लेखक : अज्ञात ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “टाईपरायटर आणि एका भारतीय पिढीचा इतिहास” –  लेखक : अज्ञात ☆ सुश्री प्रभा हर्षे

गोदरेजच्या टाईपरायटरने एका भारतीय पिढीचा इतिहास लिहिला!! 

टाईपरायटर आता अडगळीत गेला आहे. 

कम्प्युटर, स्मार्टफोनच्या युगात जुनाट टाईपरायटर मशीन वापराणार तरी कोण? * *पण या एका मशीनने भारतातल्या २ पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय करून दिली होती. 

 स्त्रियांना घराचा उंबरठा ओलांडून नोकरी मिळवून देण्यात याच मशीनचा हातभार होता हे तुम्हाला माहित आहे का? या लहानशा मशीनने आधुनिक भारताचा इतिहास लिहिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

आज आपण याच टाईपरायटर मशीन विषयी जाणून घेणार आहोत. ही माहिती वाचून आपण टाईपरायटरकडे एका नव्या दृष्टीने बघू यात शंका नाही.

****

१९४० च्या काळात भारत टाईपरायटर परदेशातून मागवत असे. परदेशातून येणाऱ्या टाईपरायटर मध्ये अमेरिकेतून येणाऱ्या टाईपरायटर्सची संख्या जास्त होती. यात अमेरिकेची रेमिंग्टन ही कंपनी अग्रगण्य समजली जायची. टाईपरायटर वगळता रेमिंग्टनचा आणि भारताचा आणखी एका बाबतीत संबंध आहे. रेमिंग्टन शस्त्र बनवणारी कंपनी आहे. या कंपनीनेच १८५७ साली गाय आणि डुकराची चरबी असलेल्या बंदुका तयार केल्या होत्या. त्यांच्या या घोटाळ्यामुळेच भारतात १८५७ चा उठाव घडून आला.

****

तर, ही रेमिंगटन कंपनी जवळजवळ १९१० पासून खास भारतासाठी मराठी, गुजराती, उर्दू, अरेबिक आणि गुरुमुखी अशा स्थानिक भाषांमधले टाईपरायटर तयार करत होती. स्थानिक भाषा लिहिता येत असल्याने टाईपरायटर भारतात प्रचंड प्रसिद्ध होते. लेखक, पत्रकार, राजकारणी टाईपरायटरचा नियमित वापर करत.

पण भारताला हवा होता आपला स्वतःचा स्वदेशी टाईपरायटर. ही कल्पना १९४८ सालीच सुचवण्यात आली होती, पण पुढे जाऊन ज्या कंपनीने पहिला भारतीय टाईपरायटर बाजारात आणला ती गोदरेज कंपनी त्यावेळी एका अत्यंत महत्वाच्या कामात गुंतली होती. हे काम होतं भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ‘मतदान पेटी’ तयार करण्याचं.

****

भारतीय टाईपरायटरचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी १९५५ साल उजाडावं लागलं. गोदरेज ही टाईपरायटर बनवणारी भारतातलीच नव्हे तर आशिया खंडातली पहिली कंपनी ठरली. या पहिल्यावहिल्या टाईपरायटरला नाव मिळालं “गोदरेज प्राइमा”.

आज आपण टाईपरायटरला तितकसं महत्व देणार नाही, पण त्याकाळी ही गोष्ट आधुनिक आणि स्वतंत्र भारताचं प्रतिक मानली गेली. आपल्याला स्वातंत्र्य मिळून अवघी काही वर्ष उलटून गेली होती आणि एवढ्या कमी वेळात भारतीय इंजिनियर्सनी संपूर्णपणे स्वदेशी असा टाईपरायटर तयार केला होता. ही बाब स्फूर्तिदायक ठरली.

काही वर्षातच परदेशी टाईपरायटरच्या जागी ‘गोदरेज प्राइमा’ने संपूर्ण भारत व्यापला. ऑफिस म्हटलं की टाईपरायटर आलाच आणि तिथला तो परिचित असा खडखडचा आवाजही आलाच. या सगळ्या गोष्टींची सुरुवात १९५५ नंतर झाली. सरकारी कार्यालये, कोर्ट, संरक्षण यंत्रणा या गोदरेज टाईपरायटर वापरण्यात पहिल्या क्रमांकावर होत्या.

****

त्याकाळी रेमिंग्टन व्यतिरिक्त हाल्डा (Halda), ओलीवेटी (Olivetti), स्मिथ-कोरोना (Smith-Corona), अॅड्लर-रॉयल(Adler-Royal), ऑलम्पिया (Olympia), नाकाजिमा (Nakajima) या कंपन्या सुद्धा प्रसिद्द होत्या. गोदरेजने फारच कमी वेळात या प्रसिद्ध कंपन्यांना टक्कर द्यायला सुरुवात केली.

गोदरेजचा खप किती होता याची कल्पना येण्यासाठी एक उदाहरण बघूया. त्याकाळी भारतभरातून जवळजवळ १, ५०, ००० टाईपरायटर्सची मागणी असायची. पण कंपनीकडून फक्त ५०, ००० टाईपरायटर्स तयार केले जायचे. भारताबाहेरही गोदरेज प्राईमाचे ग्राहक होते. श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मोझांबिक, अंगोला, मोरोक्को या देशांमध्ये या टाईपरायटर्सचा प्रचंड खप होता.

****

टाईपरायटर आणि महिला सबलीकरण:

टाईपरायटर हे पहिल्यांदा महिलांशी जोडलं गेलं ते अमेरिकेत. अमेरिकन रेमिंग्टन कंपनीने असा विचार केला होता की टाईपरायटरचा सर्वाधिक उपयोय हा महिलांकडून होईल. या विचाराने त्यांनी महिलांसाठी फुलांचं डिझाईन असलेले टाईपरायटर बाजारात आणले. ही कल्पना चांगलीच प्रसिद्ध ठरली. महिला मोठ्या संख्येने टाइपिंगच्या कामाकडे वळल्या.

या ट्रेंडने त्याकाळी उच्चांक गाठला होता. १९१० साली अमेरिकेतील जवळजवळ ८१ टक्के टाईपिस्ट या महिला होत्या. टाईपरायटरने मोठ्या प्रमाणात अमेरिकन महिलांना काम मिळवून दिलं. पण अमेरिकेत याचा एक विपरीत परिणामही झाला. त्याकाळी प्रसिद्ध होणाऱ्या पोर्नोग्राफिक मासिकांमध्ये “टाईपरायटर गर्ल” हा एक नवीन विषय बनला होता. भारतात असा कोणताही प्रकार घडला नाही. उलट या एका मशीनने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य दिलं. १९६० नंतरच्या चणचणीच्या काळात अनेक संसार या स्त्रियांच्या मदतीवर उभे राहिले. नोकरी करणारी बायको ही कन्सेप्ट इथून सुरू झाली. पाचवारी साडी, सायकल आणि टायपिंग मशीन या तीन गोष्टी म्हणजे आधुनिक भारतीय स्त्रीचे प्रोफाइल बनले. भारतीय महिलांना घराचा उंबरठा ओलांडून स्वतःच्या पायावर उभं करण्यात टाईपरायटरचा खूप मोठा हातभार लागला.

****

गोदरेज टाईपरायटरची भारतातली प्रसिद्धी

भारतात गोदरेज प्राईमा सुपरहिट का ठरलं? याचं एक प्रमुख आणि गमतीदार कारण आहे. भारतीयांना गोदरेज टाईपरायटरचा खडखडाट प्रचंड आवडला होता. हीच बाब इतर कंपन्यांनी लक्षात घेतली नाही. तसं पाहायला गेलं तर गोदरेज टाईपरायटरचा हा एक अवगुण म्हणता येईल, पण त्यानेच गोदरेजला भारतभर पोहोचवलं.

दिल्लीच्या ‘परवाना प्राधिकरण’ (driving licence authority)च्या ऑफिस बाहेर बसणारे ६० वर्षीय सतीश कालाकोटी गोदरेजच्या सुवर्णकाळाबद्दल सांगताना म्हणतात की, “जर्मन एरिका कंपनी त्यांच्या आवाज न करणाऱ्या आणि टाईप करण्यास अगदी सोप्प्या टाईपरायटर्ससाठी प्रसिद्ध होती. पण मी गोदरेजचा आवाज करणाऱ्या टाईपरायटरची निवड केली. ” सतीश कालाकोटी आजही दिल्लीत टाईपरायटरवर काम करतात. गोदरेज टाईपरायटरचा सुवर्णकाळ जगलेल्या मोजक्या लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो. भारतात टाईपरायटर म्हणजे प्रतिष्ठेचं चिन्ह समजलं जायचं. आजचा मध्यमवर्गी तरुणवर्ग बाइक किंवा कारची स्वप्न बघतो तर त्यावेळचा तरुणवर्ग हा टाईपरायटरची स्वप्न बघायचा. मॅट्रिक पास झालं की टायपिंग, शॉर्टहँड आणि नोकरीत रुजू असा प्रघातच पडलेला होता.

****

त्याकाळच्या गोदरेजच्या जाहिरातीचा मजकूरही बघण्यासारखा आहे. १९५० साली गोदरेजने आपल्या जाहिरातीत म्हटलं होतं, “Godrej presents The all-Indian Typewriter, ”. आणखी एका जाहिरातीत “Today’s typewriter with the touch of tomorrow” हे वाक्य होतं. गोदरेजची टीव्हीवर येणारी ही जाहिरात जुन्याजाणत्या लोकांना नक्कीच नॉस्टॅल्जिक करेल.

****

कॉम्प्युटर आणि टाईपरायटरचा उतरता काळ

कम्प्युटरने टाईपरायटरच्या सुवर्णयुगाचा अंत केला. २००० पासून टाईपरायटरची जागा कम्प्युटरने घेतली. कम्प्युटरच्या लाटेने गोदरेज कंपनीला जबरदस्त धक्का दिला होता. गोदरेज ही टाईपरायटर बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी तर होतीच, पण गोदरेज कंपनीच शेवटचा टाईपरायटर बनवणारी कंपनी पण ठरली.

गोदरेजने त्यांचा शेवटचा टाईपरायटर १२, ००० रुपयांना विकला होता. २०११ साली त्यांचा मुंबईचा टाईपरायटर तयार करणारा कारखाना कायमचा बंद झाला. यावेळी ५०० टाईपरायटर कारखान्यात पडून होते. गोदरेजच्या पुण्याच्या कारखान्याची अशी दश झाली नाही. कारण हा कारखाना पुढे रेफ्रिजरेटर तयार करण्यासाठी नव्याने वापरण्यात आला.

तर मित्रांनो, गोदरेजच्या टाईपरायटरने अशा प्रकारे स्वातंत्र्यानंतरच्या एका संपूर्ण पिढीचा इतिहास लिहिला.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नवीन संवत्सराचे नाव “पराभव” का? – लेखक : श्री वैभव साठे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ नवीन संवत्सराचे नाव “पराभव” का? – लेखक : श्री वैभव साठे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

कालनिर्णयचे “मागील पान ” वाचताना १९ मार्च २०२६ ला सुरु होणाऱ्या नवीन संवत्सराचे नाव “पराभव” असे आहे असे वाचले. २०२५ संवत्सराचे नाव “विश्वावसू” असे छान होते. मनात विचार आला, सौर वर्षाचे नाव कोणी पराभव असे कसे ठेवेल. मग थोडासा रिसर्च सुरु केला आणि छान माहिती मिळाली:

संवत्सर म्हणजे हिंदू पंचांगातील एक सौर-वर्ष, ज्याला स्वतंत्र नाव दिलेले असते. ख्रिस्ती संवताप्रमाणे (२०२६ इ. स.) फक्त आकडे न वापरता,

हिंदू कालगणनेत ६० वर्षांचा एक नामांकित चक्र वापरला जातो. याला म्हणतात: षष्टी‑संवत्सर चक्र (६० वर्षांचे चक्र)

या ६० वर्षांना नावे आधीपासून निश्चित केलेली आहेत. नेमकी ६० वर्षेच का? यामागे खगोलशास्त्रीय कारण आहे.

गुरू आणि शनी या ग्रहांचा ग्रहपरिभ्रमण (rotation) कालावधी सुमारे गुरू(बृहस्पती) ११. ८६ (~ १२) वर्षे आणि शनीचा परिभ्रमण काळ २९. ४६ (~ ३०) वर्षे आहे. १२ आणि ३० चा ल. सा. वि. (LCM) ६० आहे त्यामुळे साधारण ६० सौर वर्षांनंतर गुरू‑शनी यांची परस्पर स्थिती पुन्हा जवळजवळ तशीच होते.

म्हणून हा ६० वर्षांचा चक्र खगोलशास्त्रावर आधारित आहे.

या ६० संवत्सरांची निश्चित यादी ही यादी कधीही बदलत नाही. संवत्सर चक्र नेहमी याच क्रमाने सुरू होते:

कोणत्या वर्षाला कोणते नाव कसे ठरते? यासाठी कलियुग कालगणना वापरली जाते. हिंदू कालगणनेनुसार: कलियुगाचा आरंभ — इ. स. पू. ३१०२ मध्ये झाला.

त्या दिवसापासून दरवर्षी संवत्सराचे नाव एकाने पुढे सरकत जाते. ६० नंतर पुन्हा पहिल्यापासून सुरू होते.

षष्टी‑संवत्सर चक्र (६० संवत्सरे)

१) प्रभव २) विभव ३) शुक्ल ४) प्रमोदूत ५) प्रजापती ६) आंगिरस ७) श्रीमुख ८) भाव ९) युव १०) धातु ११) ईश्वर १२) बहुधान्य १३) प्रमाथी १४) विक्रम १५) वृष १६) चित्रभानु १७) स्वभानु १८) तारण १९) पार्थिव २०) व्यय २१) सर्वजित २२) सर्वधारी २३) विरोधी २४) विकृति २५) खर २६) नंदन २७) विजय २८) जय २९) मन्मथ ३०) दुर्मुख ३१) हेमलंबी ३२) विलंबी ३३) विकारी ३४) शार्वरी ३५) प्लव ३६) शुभकृत ३७) शोभकृत ३८) क्रोधी ३९) विश्वावसु ४०) पराभव ४१) प्लवंग ४२)कीलक ४३) सौम्य ४४) साधारण ४५) विरोधिकृत ४६) परिधावी ४७) प्रमादी ४८) आनंद ४९) राक्षस ५०) नल ५१) पिंगल ५२) कालयुक्ति ५३) सिद्धार्थी ५४) रौद्र ५५) दुर्मती ५६) दुंदुभी ५७) रुधिरोद्गारी ५८) रक्ताक्षी ५९) क्रोधन ६०) अक्षय

ही यादी सूर्यसिद्धांत, आर्यभटीय, व पारंपरिक पंचांगांनुसार प्रमाणित आहे

प्रत्येक संवत्सर हिंदू नववर्षापासून (गुढीपाडवा / उगाडी) लागू होतो. ६० वर्षांनंतर चक्र पुन्हा प्रभव पासून सुरू होते

गंमत म्हणजे चिनी पंचांगातही ६० वर्षांचे फिरते चक्र आहे. परंपरागत चिनी पंचांगात ६० वर्षांचे चक्र वापरले जाते, याला गान्झी (干支) चक्र म्हणतात.

हे चक्र २००० हून अधिक वर्षांपासून अखंडपणे वापरले जात आहे. हे चक्र दोन स्वतंत्र चक्रांच्या संयोगातून तयार होते:

१) १० स्वर्गीय कांड्या (Heavenly Stems – 天干)

या कांड्या पंचमहाभूत तत्त्वे (five elements) आणि स्त्री‑पुरुष (Yin–Yang) गुणधर्म दर्शवतात.

२) १२ पार्थिव शाखा (Earthly Branches – 地支)

या शाखा म्हणजेच प्रसिद्ध चिनी राशी प्राणी:

उंदीर, बैल, वाघ, ससा, ड्रॅगन, साप, घोडा, शेळी, माकड, कोंबडा, कुत्रा, डुक्कर.

६० वर्षांचे चक्र का होते?

दरवर्षी १ स्वर्गीय कांडी पुढे जाते आणि १ पार्थिव शाखा पुढे जाते. १० आणि १२ यांचा ल. स. वि. (LCM) = ६०

त्यामुळे तोच कांडी‑शाखा संयोग प्रत्येक ६० वर्षांनी पुन्हा येतो.

उदाहरण

१९८४ = Jia‑Zi (लाकूड उंदीर वर्ष) → नवीन ६० वर्षांच्या चक्राची सुरुवात

२०२४ = Jia‑Chen (लाकूड ड्रॅगन)

२०४४ = Jia‑Shen (लाकूड माकड)

२०८४ = Jia‑Zi पुन्हा (चक्र पूर्ण)

म्हणजे “ड्रॅगनचे वर्ष” असे म्हणताना,

त्यामागे तत्त्व + प्राणी + स्त्री‑पुरुष गुणधर्म यांचा एक पूर्ण संयोग असतो.

६० वर्षे हा आकडा पंचांगाचा योगायोग नाही. तो मानवी स्मृतीचा नैसर्गिक नियम आहे.

मानवी पिढी (generation) म्हणजे एकाच काळात जन्मलेले लोक, जे समान सामाजिक, आर्थिक, राजकीय अनुभवांतून गेलेले असतात.

साधारणपणे एका पिढीचा कालावधी: २०–२५ वर्षे असतो. ३ पिढ्या = आजी‑आजोबा → पालक → मुले: ३ × २० ≈ ६० वर्षे

म्हणजे ६० वर्षांत एक संपूर्ण कुटुंबीय अनुभव‑चक्र पूर्ण होते

६० वर्षानंतर अनुभवांची पुनरावृत्ती इतिहासात वारंवार दिसते:

युद्धे

आर्थिक मंदी

सामाजिक आंदोलन

मूलभूत मूल्यांचे चक्र

हेच कारण आहे की अनेक इतिहासकार म्हणतात: “History repeats itself every 2–3 generations. ”

भारत आणि चीनसारख्या संस्कृतींनी ६० वर्षांना पूर्ण कालचक्र मानले आहे.


लेखक : वैभव साठे, अटलांटा, अमेरिका 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देवाचे दर्शन…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “देवाचे दर्शन…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

कुणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराज यांचे घर शोधत शोधत फार लांबून आला होता.

नाथांच्या दारात आल्यावर त्याचा अवघा शीण निघून गेला.

त्याच्या मनात एक अधीरता, उत्कटता दाटून आली होती. मं

घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ब्राह्मणाने त्यांचे पाय धरले.

हात जोडून तो नाथांना म्हणाला की,

“नाथबाबा,

मला_भगवंताचं,

श्रीकृष्णाचं दर्शन घडवा. “

एकनाथ महाराज यांना काहीच समजेना.

हा कोण कुठला ब्राह्मण?

आपली व त्याची ओळख पण नाही,

त्याला मी कोठे रहातो?

हे पण माहीत नाही.

माझे घर शोधत शोधत तो आलाय.

तेवढ्यात तेथे गिरीजादेवी (नाथांच्या पत्नी) आल्या.

त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे, ते ऐकले होते.

नाथांनी त्याला उठवून जवळ घेतले.

पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता.

“नाथबाबा, मला भगवंताचे,

श्रीकृष्णाचे दर्शन घडवा. “

त्या ब्राह्मणाची नजर घराचा कानाकोपरा शोधत होती.

नाथांनी त्याला मंचकावर बसवले.

स्वत:च्या हाताने त्याचे पाय धुतले.

तोपर्यंत गिरीजादेवींनी गूळपाणी आणले.

ते पाहून त्या ब्राह्मणाचे ढमन भरून आले.

तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला की,

“नाथबाबा, मला १५ दिवसांपूर्वी दृष्टांत झाला.

भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले की,

‘मी एकनाथ महाराज यांच्या घरात गेली 12 वर्ष झाली श्रीखंड्याच्या रूपात रहात आहे.

आता माझी येथून जायची वेळ झाली आहे.

तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल तर तू एकनाथ महाराज यांच्या घरी ये. ‘

नाथबाबा,

मला सांगा ना, 12 वर्ष तुमच्या घरात भगवान रहात होते.

ते कोठे आहेत? “

हे ऐकून गिरिजादेवींची शुद्ध हरपली.

नाथ देहभान विसरले.

प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या १२ वर्षांपासून पाणी भरत होता.

आपल्याला त्याने साधी ओळख पण दिली नाही.

इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन १५ दिवस अगोदर त्याला सांगितले.

तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो, असे सांगून निघून गेला होता.

नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले.

गिरिजादेवी भानावर आल्या.

मग श्रीखंड्याच्या आठवणी मनात येऊ लागल्या.

ते श्रीखंड्याचे साधेपण,

त्याची प्रत्येक हालचाल,

शांतपणे आपले काम करणे

काल जातानाचे त्याच मुग्ध हसणे.

नाथांचे डोळे भरून वाहू लागले.

त्यांनी ध्यान लावले.

त्यांना समजले की,

खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, व्दारकेचा राजा आपल्या घरात पाणक्या बनून गेली १२ वर्ष रहात होता.

इकडे गिरीजादेवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती.

दोघांनीही एकमेकांकडे पाहिले.

गिरीजादेवी मनात म्हणत होत्या की….. ‘चोर, माखनचोर, चितचोर..

बारा वर्ष आमच्या जवळ राहिलास पण कळूनही दिले नाहीस.

इतक्या वर्षात तू

 आमच्यावर अपार माया केलीस. ‘

नाथ खांबाला धरून ऊठले.

त्यांनी रांजण पाहिला,

त्याला स्पर्श केला.

श्रीखंड्यान बारा वर्षं खांद्यावरून वाहिलेली कावड पाहिली, तिला स्पर्श केला.

नाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.

श्रीखंड्या जिथे जेवायला बसायचा,

जिथे विश्रांती घ्यायचा

नाथ श्रीखंड्याचा स्पर्श जेथे जेथे झाला होता,

तेथे तेथे हाताने स्पर्श करू लागले.

गिरीजादेवींनी तर डोळ्यांतील अश्रूंनी,

श्रीखंड्या जिथे बसत असे, तेथली जमीन अक्षरशः भिजवून काढली.

कंठ दाटून आला.

त्यांनी आकाशाकडे बघितले.

आणि त्या म्हणाल्या की,

“हे भगवंता,

सगळीकडे तूच आहेस,

डोळ्यांत तूच, देहात तूच,

अंतर्बाह्य तूच आहेस.

आमच्या घरात श्रीखंड्याच्या रूपात तूच राहत होतास.

आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजलो.

आम्हाला क्षमा कर देवा

_श्रीकृष्णा…..

पण तू जर खरोखरच श्रीखंड्याच्या रूपात आमच्याकडे गेली १२ वर्ष रहात होतास, हे खरे असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंड्याची खूण दे….. “

काय आश्चर्य…..

त्याबरोबरच रांजण दुथडी भरून वाहू लागला,

जोरात वारा सुटला कोपऱ्यातली श्रीखंड्याची घुंगूरकाठी त्या वाऱ्याने पडली.

घुंगरांचा आवाज झाला.

त्या घुंगूरकाठीला एक भरजरी शेला बांधलेला होता.

त्या शेल्यातून केशर- कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडेच व्यापून उरला.

तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता.

तो आ वासून हे बघत होता.

भगवान श्रीकृष्णाने त्याची पण इच्छा पूर्ण केली होती.

आपल्या सगळ्यांची अवस्था पण तीच असते.

देव कुणाच्या तरी रूपात

आपल्या आसपास रहात असतो.

आपली सेवा करत असतो.

आपल्याला मदत करत असतो.

आणि आपल्याला हे माहीत नसते.

कळते तेव्हाच,

जेव्हा ती व्यक्ती निघून जाते.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मीराबेन☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ मीराबेन ☆ शालिनी जोशी

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे समर्थन करण्यासाठी आपला देश सोडून आलेली मीराबेन.हिचे मूळ नाव मॅडलीन स्लेड. जन्म २२ नोव्हेंबर १८९२. वडील ब्रिटिश नेव्हीत ऑफिसर होते. सर एडमंट स्लेड वडिलांचे नाव आणि फ्लोरेंन्स आईचं नाव. एका सुस्थितीतल्या ब्रिटिश कुटुंबातल्या मॅडलीनला लहानपणापासून निसर्ग व घोडेस्वारीची आवड.तसेच संगीताची ही आवड होती.पियानो आणि संगीत मैफलीत भाग घेत असे. एकदा त्यासंबंधी कामासाठी जर्मनीला गेली असता रोलॅंडने लिहिलेल्या  महात्मा गांधी यांच्या चरित्राविषयी कळले. दुसरे ख्रिस्त आणि विसाव्या शतकातील महान व्यक्तिमत्त्व असे त्यांचे वर्णन ऐकून ती भारावली.

इंग्लंडला परत आल्यावर रोलँड ने लिहिलेले गांधी चरित्र वाचले. आणि गांधीजींची शिष्य होण्याचे, जीवन त्यांना समर्पित करण्याचे ठरविले. त्यासाठी तयारी म्हणून आधी साबरमती आश्रमातील साहित्याचा अभ्यास केला. मांडी घालून बसणे शिकली. आहारात बदल केला. शाकाहार स्वीकारला मांस व मद्याचा त्याग केला. सुत कातणे,लोकर विणकाम शिकली. इंग्लंडमध्ये यंग इंडियाची सदस्य झाली.  भगवत् गीता, ऋग्वेद वाचण्याचा अभ्यास केला.

१९२५ मध्ये गांधींची संपर्क साधून त्यांच्या आश्रमात राहण्याची परवानगी मागितली. भारतात येऊन गांधींना भेटल्यावर गांधींनी ‘तू माझी मुलगी होशील’ असे म्हणून तिला ‘मीराबेन’ नाव दिले. आपले जुने जीवन ती विसरली.१९२५ च्या भारतीय काँग्रेसच्या पहिल्या वार्षिक सभेला त्या उपस्थित राहिल्या. साबरमती आश्रमात सुतकताई, विणकाम, स्वयंपाक, स्वच्छता अशी कामे त्या करत. गुजराती व मराठी शिकल्या. साबरमतीत स्वतःने विणकाम केंद्र सुरू केले. रवींद्रनाथ यांच्या शांतिनिकेतनला भेट दिली.१९३१ च्या गोलमेज परिषदेसाठी गांधींबरोबर केल्या. गांधीना अटक झाल्यावर त्यांनाही अटक झाली. आर्थर रोड आणि साबरमती तुरंगात राहावे लागले.

इंग्लंडमध्ये जाऊन सरकारला पटवून दिले की, भारत देश चालवायला समर्थ आहे. ब्रिटिश वसाहत वादामुळे ग्रामीण उद्योगांचा विनाश होतो. उच्च कर लादले जातात. भारत छोडो चळवळीत गांधी व कार्यकर्त्यांबरोबर त्यांनाही अटक झाली. दोन वर्षे पुणे येथे आगाखान पॅलेस मध्ये होत्या. नंतर हरिद्वार येथे किसान आश्रम स्थापला. गो संरक्षणाचे काम केले. भारताच्या स्वातंत्र्याची संबंधित सिमला परिषद, संविधान सभा, भारताची फाळणी आणि गांधीहत्येच्या त्या साक्षीदार होत्या. स्वातंत्र्यानंतर शेती, दुग्ध व्यवसाय, वनसंरक्षण, पर्यावरण या क्षेत्रात काम केले. पुढे १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाल्या. १९८२ मध्ये मृत्यू झाला. त्यापूर्वी १९८१ मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. त्यांनी काही पुस्तके लिहिली स्वतःचे चरित्र, गांधींची मीरेला पत्रे इ. अशा प्रकारे एका सुखवस्तू  ब्रिटिश घरातील मुलगी आपले पूर्वीचे नावासकट सर्व विसरली आणि भारतीय नेत्याची कार्यकर्ती व मुलगी म्हणून राहणे पसंत केले. सगळेच अतर्क्य !

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares